Uncategorized
शुभ दीपावली!
… तर तीन वर्षांनंतर ‘रेषेवरची अक्षरे’चा एक नवा अंक पुन्हा एकदा तुमच्यासमोर ठेवत आहोत. नोंदी गेल्या तीन वर्षांतल्या अाहेत नि फोरम्सही अाहेत यंदा, त्यामुळे अंक जरा नेहमीपेक्षा ऐसपैस झाला अाहे…
अनुक्रमणिकेतले काही विभागच अपडेट झालेले दिसतील, काहींच्या लिंका अजुनी अपडेट व्हायच्या असतील. दचकू नका. ही उ०सं०डु० नव्हे! यंदा ४ नोव्हेंबरपासून सुरुवात करून ७-८ नोव्हेंबरच्या वीकान्तापर्यंत टप्प्याटप्प्यानं अंक प्रकाशित करतो आहोत. तूर्तास कथा, कविता, काही ललित लेखन आणि ऑनलाईन लेखनावरचा एक छोटेखानी विभाग प्रकाशित केला आहे…वीकान्ताला पुरा अंक – होय, पीडीएफसकट – तुमच्या हातात असेल.

वाचा आणि ‘रेषेवरची अक्षरे’चं हे नवं रुपडं कसं वाटलं ते जरूर कळवा. सूचना, सुचवण्या, दाद आणि प्रश्न… सगळ्याचं ‘दिल खोल के’ स्वागत आहे.

 

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्या दिवाळीवर दुर्दैवाने दुष्काळाचं सावट अाहे त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देऊ या अाणि ही दिवाळी संयतपणे साजरी करू या.
संपादक
रेषेवरची अक्षरे
२०१५
***
***
Uncategorized

पहिलंवहिलं संपादकीय

ब्लॉग ही संज्ञा अस्तित्त्वात येऊन ती प्रसिद्ध होण्याला दशकाहून अधिक काळ लोटला. जसजशी आंतरजालाशी आपली ओळख वाढत गेली तसतशी ती मराठी भाषिकांतसुद्धा प्रसिद्ध होत गेली. आंतरजालावर ब्लॉग होस्ट करण्यासाठी, देवनागरीमधून लिहिण्यासाठी व ब्लॉगवर प्रसिद्ध होणार्‍या लेखांची तात्काळ सूचना देण्यासाठी दिवसागणिक उपलब्ध होणार‍्या विनामूल्य सुविधांमुळे ह्या माध्यमाचा प्रसार वेगाने होत आहे व होत राहील. मराठीत लेखन करणार्‍या ब्लॉगरपैकी अनेकांनी ब्लॉगवर वैयक्तिक अनुभवकथन करता करता साहित्यिक पातळीवर जाणारं वैविध्यपूर्ण लिखाण केलं आहे. या लेखनातील निवडक पंचवीस नोंदींचे संकलन करून येत्या दिवाळीच्या निमित्ताने ते जालावर प्रकाशित करण्याचं आम्ही ठरविलं. आम्ही वाचलेल्या ब्लॉगपैकी आम्हांला आवडलेली, आमच्या स्मरणात राहिलेली ही काही…रेषेवरची अक्षरे! ऑनलाईन असणं नित्याचं असणार्‍या ब्लॉगशी परिचितांना हे संकलन पुनर्भेटीचा आनंद देईल. जे ब्लॉगशी अनभिज्ञ आहेत, त्यांच्यापर्यंत हे संचित पोहोचेल व त्यांनाही आनंद देईल अशी आशा आहे.

आजवरच्या मराठी ब्लॉग पोस्ट्सपैकी सर्वोत्तम काही पोस्ट्स एकत्र करून प्रकाशित केली जावीत, हा एकमेव हेतू ह्या संकलनाच्या मूळ कल्पनेमागे आहे. ह्या कल्पनेपासून ह्या संकलनापर्यंतचा प्रवास येथे सविस्तर सांगणं यथोचित ठरेल. हे संकलन म्हणजे ब्लॉगवर आजवर प्रसिद्ध झालेलं अक्षर अन अक्षर वाचून त्याचा घेतलेला मागोवा नाही. जे ब्लॉग आम्ही वाचतो, किंबहुना ब्लॉगजगतातील अनेक लोक वाचतात, अशा सुमारे साठ ब्लॉगची एक यादी करण्यात आली. ह्या यादीत वेगवेगळ्या विषयांवर व सकस लिखाण करणार्‍या ब्लॉगचा समावेश करण्यात आला. ह्यांतून काही चांगलं लेखन सुटलं असणं शक्य आहे. आम्ही आमच्या परीने उत्तमोत्तम ब्लॉग ह्या यादीत समाविष्ट केले परंतु अस्ताव्यस्त पसरलेल्या ब्लॉगविश्वात ही यादी परिपूर्ण असल्याची खात्री देणे केवळ अशक्य आहे. आम्ही चौघे मिळून नियमित वाचत असणार्‍या ब्लॉगची संख्या ह्याच्या किमान दुप्पट वा अधिक असेल, हे मात्र येथे नमूद करावेसे वाटते. सवयीच्या गावातल्या ओळखीच्या वाटा पुन्हा एकदा धुंडाळल्या एवढंच. एखादी रम्य पायवाट ह्यांतून निसटली असण्याची शक्यता नाकारण्याचा कुठलाही हट्ट नाही. त्या ब्लॉगवर ३१ ऑगस्ट २००८ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक अक्षराचा विचार करण्याचं मग आम्ही निश्चित केलं. संपादक मंडळातील आम्ही चौघांनी मिळून ह्या सर्व ब्लॉगवरील ३१ ऑगस्ट २००८ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व नोंदी काळजीपूर्वक वाचल्या. ह्या ब्लॉगनोंदींपैकी कोणत्या नोंदी विचारात घ्यायच्या ह्याकरता भाषा, आशय, नाविन्य आणि घाट असे काही निकष ठरविण्यात आले. त्यानुसार व संपादकाच्या मतानुसार सुमारे पन्नास नोंदींची एक यादी करण्यात आली. ही यादी करणं हे अत्यंत अवघड काम होतं हे वेगळं सांगायला नकोच. तरीही काही गोष्टींवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. ह्या यादीत लेख समाविष्ट करताना एकाच ब्लॉगरचे तीनापेक्षा अधिक लेख त्या यादीत नसतील असं बंधन आम्ही घालून घेतलं. वैयक्तिक आवडीनिवडींपायी कोणत्याही एका लेखकावर भर दिला जाऊन इतरांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका ह्यामागे होती. संपादक मंडळातील आम्ही मंडळीही ब्लॉगर असल्यामुळे आमचेही ब्लॉग पहिल्या साठांच्या यादीत होते. त्यामुळे संपादक मंडळातील लेखकाच्या ब्लॉगवरील नोंदींची निवड करताना त्या लेखकाला निवडीचा किंवा त्यावर कोणताही अभिप्राय देण्याचा अधिकार नाकारण्यात आला व इतर तिघांनी मिळून ही प्रक्रिया पार पाडली. ह्या स्वतःहून स्वतःवर घातलेल्या नियमाचं आम्ही नक्कीच काटेकोर पालन केलं. तसंच लेखन हे पूर्णतः मूळ लेखकाचं असावं हाही निकष ठरविण्यात आला. साहित्य, चित्रपट, संगीत, पौराणिक ग्रंथ, इतिहास इत्यादी विषयांशी संबंधित चिकित्सा, मीमांसा किंवा समीक्षा करणारं लेखन ह्या संकलनात समाविष्ट न करण्याचा निर्णय संपादक मंडळाने घेतला. परिणामी ह्या विषयांवर सातत्यपूर्ण लेखन करणारे ब्लॉगर व त्यांच्या ब्लॉगवरील अभ्यासपूर्ण नोंदी ह्या संकलनात आढळणार नाहीत. नैमित्तिक किंवा तात्कालिक विषय असणार्‍या तसेच विशिष्ट प्रश्नांवर प्रबोधन करणार्‍या अनेक महत्त्वपूर्ण नोंदीही आम्हांला वगळाव्या लागल्या.

विषय, शैली, मांडणी ह्या सर्वांमधली विविधता हे तर ब्लॉगचं वैशिष्ट्य. त्यामुळे निवड करताना काही गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार आम्ही केला. वैयक्तिक अनुभवांच्या पलीकडे जाणारं असं काही नोंदीत असावं असं पाहण्यात आलं. आपले अनुभव पार्श्वभूमीला ठेवून व्यक्ती-स्थळ-काल ह्यांच्या मर्यादा ओलांडू शकेल असं लेखन व अशा नोंदींचा विचार करण्यात आला. ह्यातही शैली, भाषा, आशय, नाविन्य हे निकष होतेच. अत्यंत निर्दय होऊन ही पन्नास नोंदींची यादी आपण केली आहे असं वेळोवेळी वाटत होतं. ही भावना अंतिमतः केवळ पंचवीस नोंदी निवडण्याच्या बंधनामुळे अधिकाधिक दृढ होत गेली. ह्या वेळेला पुन्हा एकदा संभाव्य असमतोलाचा विचार केला गेला. काही ठराविक लेखकांच्या लिखाणाने ही निवड व्यापली जाऊ नये, म्हणून एका लेखकाच्या कमाल दोन नोंदी निवडण्याचं नक्की करण्यात आलं. मुळात हेतू हा उत्तमोत्तम लेखांच्या संकलनाचा होता. त्यात दर्जा हा एकमेव निकष. त्यामुळे एका लेखकाचा एकच लेख घ्यावा, असे कोणतेही संख्यात्मक बंधन प्रथमपासूनच आम्ही घालून घेतले नव्हते. प्रत्येकी आधी तीन व नंतर दोन कमाल नोंदी निवडण्याचा निर्णय हा केवळ अंतिम पंचवीस नोंदींत होणारा असमतोल टाळण्यासाठी घेतलेला निर्णय होता. किंबहुना कोणा लेखकाच्या किती नोंदी ह्या संकलनात आहेत ह्यावरून त्या लेखकाबद्दल, त्या ब्लॉगच्या गुणवत्तेबद्दल कोणतेही अनुमान काढले जाऊ नये, असे आमचे प्रामाणिक मत आहे. शिवाय हे ब्लॉगवर पूर्वप्रकाशित लेखांचे संकलन असल्यामुळे एकाच लेखकाचे एकाहून अधिक लेख दर्जेदार असणं हे स्वाभाविक व अंतिम पंचवीसांमध्ये ते समाविष्ट करणं हे गरजेचं वाटलं. आम्ही अंतिम यादी पंचवीस ठरवूनही प्रत्यक्षात सव्वीस नोंदींची केली, एवढीच काय ती आम्ही संपादक म्हणून आमची स्वतः पाळावयाची ठरवलेली शिस्त मोडली.

आम्ही ज्या ब्लॉगनोंदी निवडल्या, त्या सर्व नोंदी ह्या संकलनात प्रसिद्ध करण्यास त्या त्या लेखकाची संमती आहे किंवा नाही अशा अर्थाची विचारणा करणारे इपत्र त्या त्या लेखकाला पाठवून त्यांची संमती मागण्यात आली. ज्या ज्या लेखकांनी तशी संमती दिली, त्यांच्याच नोंदी ह्या संकलनात आम्ही प्रसिद्ध करत आहोत. ह्या इपत्राच्या उत्तरार्थ काही लेखकांनी त्यांच्या दोनऐवजी एकच नोंद ह्या संकलनात समाविष्ट करण्यास संमती दिली. आपल्या दोन लेखांना प्रसिद्धी मिळणे ही आपणांस मिळालेली विशेष सवलत आहे, अशा समजुतीने व ती नाकारण्यासाठी त्यांनी एकच लेख समाविष्ट करण्यास संमती दिली. एकाच लेखकाच्या लेखांची संख्या कोणत्याही प्रकारे त्या लेखकाच्या वा त्याच्या ब्लॉगच्या दर्जाशी निगडीत नाही, एकाच लेखकाचे एकाहून अधिक लेख प्रकाशित करून केवळ ब्लॉगवरील अधिकाधिक उत्तम लेख संकलित करता येतील, तसे केल्याने त्या व्यक्तीला कोणतेही झुकते माप देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तसेच हे संकलन ब्लॉगजगतातील उत्तमोत्तम लेखांचे असून उत्तमोत्तम ब्लॉगरचे नाही, परिणामी ज्यांचे एकाहून अधिक लेख ह्या संकलानात समाविष्ट होऊ शकतात त्यांचे कमाल दोन लेख निवडण्याचे बंधन हे केवळ तांत्रिक आहे, अशी ठाम भूमिका असूनही अशा प्रकारचे गैरसमज व विश्वासार्हतेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात व ते टाळले पाहिजेत, ह्या दृष्टिकोणातून एकाच लेखकाच्या एकाहून अधिक नोंदी प्रकाशित न करण्याचा निर्णय नाइलाजास्तव आम्हांला घ्यावा लागला. ह्या सर्वाचा परिणाम म्हणून निवडलेल्या अंतिम सव्वीस नोंदींच्या यादीमधून काही नोंदी वगळून हे संकलन आम्ही प्रकाशित करत आहोत. ज्या लेखकांच्या एकाहून अधिक नोंदींना ह्या संकलनात स्थान मिळणे संपादकांच्या मते आवश्यक होते व तसे त्यांना कळविण्यात आले होते, त्या सर्वांचे आम्ही दिलगीर आहोत. ज्या लेखकांनी काही कारणास्तव आपल्या काही नोंदी समाविष्ट करण्यास संमती दिली नाही, त्यांच्याही निर्णयस्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो. तसेच ज्या लेखकांनी विनातक्रार त्यांच्या नोंदी समाविष्ट करण्यासाठी अनुमती दिली, त्यांच्या सहकार्याबद्दल व आपले लेख प्रकाशित करण्याची संमती दिल्याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. ब्लॉग हे माध्यम उपलब्ध करून देणार्‍या तसेच त्यासाठी पूरक तंत्रवैज्ञानिक सेवा पुरविणार्‍या सर्व व्यक्ती, सर्व विनानफा तत्त्वावर चालणारे उपक्रम, तसेच सर्व खाजगी व सार्वजनिक उद्योग ह्या सर्वांचे आम्ही आभार मानतो.

ब्लॉगविश्वातील वैविध्याची ही झलक आहे, हे विधान हास्यास्पद ठरेल, ह्याचं कारण असं की वर नमूद केल्याप्रमाणे आम्ही अनेक विषय जाणीवपूर्वक वगळले आहेत. जरी ह्या संकलनामागे ब्लॉगजगतातील वैविध्य प्रदर्शित करण्याचा हेतू नसला तरीही अंतिमतः ह्या संकलनातील प्रत्येक लेखाचा विषय वेगळा आहे, असे आपणास दिसून येईल. त्यात विनोदापासून कवितांपर्यत, अनुभवकथनापासून ललित साहित्यापर्यंत बरंच काही सापडेल. प्रत्येकाची आपली अशी शैली आहे. आपले विचार सहजतेने मांडण्याची हातोटी आहे. हे तुम्हांलाही वाचताना जाणवेल. ह्या संकलनात समाविष्ट करण्यात आलेलं लेखन हे दर्जेदार लेखन आहे, असं आमचं प्रामाणिक मत आहे. पण त्यात ब्लॉगवरील वैविध्य सामावून घेण्याचा जराही अट्टाहास नाही. ब्लॉगविश्वाशी ओळख करून देण्याचा तर मुळीच प्रयत्न नाही. प्रयत्न असलाच तर तो ब्लॉगवर लिहिलं गेलेलं दर्जेदार लेखन अधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आहे.

ब्लॉगवरील दर्जेदार लेखनाचं संपादन व संकलन करण्याचा हा आमच्या माहितीत पहिलाच प्रयत्न आहे. ब्लॉगप्रमाणेच हे संकलनदेखील सर्वांसाठी खुलं असून विनामूल्य उपलब्ध आहे. ह्या उपक्रमाचं यश वाचकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. हा उपक्रम पुढील वर्षीही चालू ठेवावा अशी आमची इच्छा जरूर आहे. तरीही हा उपक्रम एक वार्षिक उपक्रम होईल का, कोणत्या स्वरूपात चालू राहील, ह्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळणार्‍या प्रतिसादावर अवलंबून आहेत. आपल्या सर्व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. आपण इपत्र पाठवून त्या आम्हांला कळवू शकता. आम्ही आमच्या दृष्टिने चांगलं ते वेचून तुमच्यापुढे ठेवत आहोत. आम्ही ते प्रामाणिकपणे वेचलं आहे असा आमचा नक्कीच दावा आहे. त्याच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित होऊ नयेत अशी आशा आहे. तुमच्या दृष्टिनेदेखील हेच सर्वोत्तम किंवा हे सर्वोत्तमच असेल, अशी कोणतीही भाबडी आशा नाही. असं झालं तर आनंद आहे, नाही झालं तर खंत नाही. ह्या संकलनाच्या संदर्भात पडणार्‍या स्वाभाविक प्रश्नांची उत्तरं ‘नेति नेति’ अशीच आहेत. पण म्हणूनच हे संपादन ह्या सगळ्या प्रश्नांपलीकडच्या लेखांचं आहे. जी अक्षरं ब्लॉगच्या नसणार्‍या रेषांवर सरींसारखी झरली, रेषांवर पागोळ्यांसारखी साचली, आनंद देऊन गेली, बरंच काही सांगून गेली नि हळूच निसटताना अक्षर ओलावा मागे ठेवून गेली, त्यातलीच काही स्मृतींमध्ये कायमची साठलेली…तुमच्यासाठी नम्रपणे सादर.

***

’रेषेवरची अक्षरे २००८’ ब्लॉग आवृत्तीत उपलब्ध नाही.

अंकाची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.

***

Uncategorized

पुन्हा रेषेवरची अक्षरे!

‘रेषेवरची अक्षरे’ या दिवाळीत पुन्हा येतो आहे!

२०१२ मधे ‘रेषेवरची अक्षरे’चा शेवटचा अंक काढला तेव्हा ब्लॉगवरचं चांगलं लिखाण आटत चाललंय याचं दुःख तर होतंच. पण तो अंक करताना होणारी ई-पत्रांची देवाणघेवाण, चर्चा, वादविवाद, गॉसिप्स आणि भंकस, उलगडत जाणारे नवनवीन ब्लॉग्स… हे सारं संपणार याची खंतही होती.
मधल्या काळात आम्ही ब्लॉग सोडून थोडे थोडे बाहेरख्याली झालो. फोरम्सवर डोकावलो. फेसबुकावर उंडारलो. पोटापाण्यात रमलो. लिहिण्यावाचण्याशी अपराधीपणाचे, मैतरकीचे आणि घरपरतीचे खेळ आलटून पालटून खेळलो. ‘रेरे’च्या अंकाबद्दल लोकांनी विचारणा केल्यावर थोडे गडबडलो, शरमलो आणि सुखावलो. दरम्यानच्या काळात काही ताजे लेखक आले, काही जुन्या लेखकांच्या शब्दांना परत धार चढली, बऱ्याच गोष्टींचे संदर्भ बदलले आणि नव्या अर्थाचे शब्दही उगवले. आमची उत्सुकता नव्याने जागी झाली. गेल्या तीन वर्षात मराठी ब्लॉग विश्वात नक्की काय काय झालं याचे हिशेब मांडायला आम्ही चित्रगुप्ताच्या तत्परतेनं पुन्हा सज्ज झालो. 
तर… ‘रेरे’ – अर्थात ‘रेषेवरची अक्षरे’ – या दिवाळीत पुन्हा येतो आहे!
आम्ही ब्लॉग्सची यादी बनवायला सुरुवात केली आहेच. पण यंदा मराठीतल्या महत्त्वाच्या फोरम्सचाही आम्ही ढांडोळा घेतो आहोत. तिथेही उल्लेखनीय ललित लिहिलं जातं आहे. तुमच्या वाचनात काही नवीन चांगले ब्लॉग्स आले असतील, तर ते आम्हांला ‘resh.akashare@gmail.com’ या पत्त्यावर जरूर कळवा. इंटरनेटचं आभासी विश्व प्रचंडच आहे आणि म्हणूनच ‘साथी हाथ बढाना’चं हे एक प्रांजळ आवाहन. 
बाकी, यंदा भेटत राहूच!
Uncategorized

जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें

’रेषेवरची अक्षरे’च्या मागल्या अंकाच्या संपादकीय प्रस्तावनेत आम्ही तसा बराच थयथयाट केला होता आणि तरीही आम्ही (अंमळ भाबडेपणाने) नवीन वाटा शोधत राहण्याचा आमचा उत्साह अद्याप टिकून असल्याचं लिहिलं होतं. त्याचबरोबर तो तसा किती दिवस टिकून राहील याबद्दल जरा शंका व्यक्त केली होती. पण आमचा उत्साह पुरेसा भाबडा आहे हा साक्षात्कार नोंदवण्याची वेळ बहुदा आली आहे.

आपण लिहीत नाही आता जुन्या वेगाने, उत्साहाने वगैरे. आधीच मराठीतून लिहिल्या जाणार्‍या ब्लॉगवर हाताळले जाणारे विषय मर्यादित. त्यात ’रेषेवरची अक्षरे’ची चौकट त्याहूनही बंदिस्त. जे ललित साहित्याच्या चौकटीत बसेल, असं ब्लॉगवर लिहिलं गेलेल्यातलं उत्तम काही वेचून समोर ठेवणं इतकंच आमचं मूळ उद्दिष्ट. त्यामुळे ’रेषेवरची अक्षरे’च्या साच्यात मराठी ब्लॉग ओतले की, तेच ते नि तेच ते होत जाण्याचा एक धोका होता. दुर्दैवानं तो यंदा खरा ठरल्याचं जाणवत गेलं. तेच ते विषय, संकुचित विश्व, मर्यादित आवाका यांमुळे मराठी ब्लॉगांवरचं ललित लेखन ठरीव, घोटीव आणि निर्जीव होत गेलं. ही शक्यता ’रेषेवरची अक्षरे’ सुरू करताना माहीत नव्हती का? अर्थात होती. पण तरीही ’करून तर पाहू’ म्हणून करून पाहिलं. काही नवीन देण्याचा प्रयत्न करत राहिलो. पण दोन-तीनशे ब्लॉग पालथे घालूनही, वेगानं वाढणार्‍या नवनवीन ब्लॉगांचे पत्ते उत्साहानं हुडकूनही, म्हणावं तितकं काही सापडलंच नाही हे खरं.

पुढे वाचा...

अनुक्रमणिका

संपादकीयहातवार्‍यांमधून बोलणारी मुलगी -  प्रणव सखदेव (मुक्तचिंतन)
एका (सरकारी) पावसाळ्य़ाचा जमाखर्च - अश्विन (अवघा रंग एक झाला...)
आवंढा - निरंजन नगरकर (अळवावरचे पाणी)
मी लेखक असते... - मेरा कुछ सामान (मेरा कुछ सामान)
शनिवार पेठ - निल्या (निल्या म्हणे!!!)
सुव्हनियर - श्रद्धा भोवड (शब्द-पट म्हणजे कोडं..)
कलेचा प्रवास आणि मूल्यमापन - राज (Random Thoughts)
सरसकट गोष्ट आणि सरसकट गोष्ट (२) - संवेद (संदिग्ध अर्थाचे उखाणे)
प्रवाहापलीकडे... - शर्मिला फडके (चिन्ह)
गाठी - जुई (...झुई ...झुई झोका!)
झाडांनो इथून पुढे - कमलेश कुलकर्णी (अफ़ू)
खिडकी - जास्वंदी (जास्वंदीची फुलं)
वाघीण - संग्राम गायकवाड (ओसरी)
चिंता - आतिवास (अब्द शब्द)

***
Uncategorized

जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें

’रेषेवरची अक्षरे’च्या मागल्या अंकाच्या संपादकीय प्रस्तावनेत आम्ही तसा बराच थयथयाट केला होता आणि तरीही आम्ही (अंमळ भाबडेपणाने) नवीन वाटा शोधत राहण्याचा आमचा उत्साह अद्याप टिकून असल्याचं लिहिलं होतं. त्याचबरोबर तो तसा किती दिवस टिकून राहील याबद्दल जरा शंका व्यक्त केली होती. पण आमचा उत्साह पुरेसा भाबडा आहे हा साक्षात्कार नोंदवण्याची वेळ बहुदा आली आहे.

आपण लिहीत नाही आता जुन्या वेगाने, उत्साहाने वगैरे. आधीच मराठीतून लिहिल्या जाणार्‍या ब्लॉगवर हाताळले जाणारे विषय मर्यादित. त्यात ’रेषेवरची अक्षरे’ची चौकट त्याहूनही बंदिस्त. जे ललित साहित्याच्या चौकटीत बसेल, असं ब्लॉगवर लिहिलं गेलेल्यातलं उत्तम काही वेचून समोर ठेवणं इतकंच आमचं मूळ उद्दिष्ट. त्यामुळे ’रेषेवरची अक्षरे’च्या साच्यात मराठी ब्लॉग ओतले की, तेच ते नि तेच ते होत जाण्याचा एक धोका होता. दुर्दैवानं तो यंदा खरा ठरल्याचं जाणवत गेलं. तेच ते विषय, संकुचित विश्व, मर्यादित आवाका यांमुळे मराठी ब्लॉगांवरचं ललित लेखन ठरीव, घोटीव आणि निर्जीव होत गेलं. ही शक्यता ’रेषेवरची अक्षरे’ सुरू करताना माहीत नव्हती का? अर्थात होती. पण तरीही ’करून तर पाहू’ म्हणून करून पाहिलं. काही नवीन देण्याचा प्रयत्न करत राहिलो. पण दोन-तीनशे ब्लॉग पालथे घालूनही, वेगानं वाढणार्‍या नवनवीन ब्लॉगांचे पत्ते उत्साहानं हुडकूनही, म्हणावं तितकं काही सापडलंच नाही हे खरं. 

यावर उपाय म्हणून ब्लॉगलेखकांकडून ’मी आणि माझी जात’ या वेगळ्या वाटेच्या विषयावर काही लिखाण मागवलं. तर त्यालाही जेमतेमच प्रतिसाद मिळाला. त्याची कारणं आपल्या प्रश्न कार्पेटखाली ढकलून वरपांगी स्वस्थ राहण्याच्या वृत्तीत शोधावीत की प्रेमप्रकर्ण-प्रेमभंग-प्रेमचारोळ्या यापलीकडे पाहायला तयार नसणार्‍या बनचुक्या शहामृगीपणात शोधावीत, या यक्षप्रश्नाचं उत्तर तुमच्यावरच सोडतो! पण आलेला प्रतिसाद इतका क्षीण होता, की तो तितकाच आणि तसाच छापावा असं अजिबात वाटलं नाही. त्यामुळे प्रतिसाद देणार्‍या मोजक्या लेखकांचे आभार आणि क्षमा एकदमच मानत तो विभाग यंदा रद्द करतो आहोत.

असो. प्रचंड वेगानं संख्याबळ वाढवणार्‍या मराठी ब्लॉगविश्वात उत्तम काही मिळवताना कष्ट झाले आणि त्यात अंतिम निवड करताना नेहमी होणारी ’हे घ्यावं की ते, हेही उत्तम नि तेही’ या प्रकारची दमछाक यंदा जराही न झाल्याने आम्ही कष्टीही झालो...

सूर निराशेचा लागला खरा. आमचा उत्साह आटला की ब्लॉगलेखकांचं सर्जन? माहीत नाही. पण आम्हांला येणारी मजा कमी झाली हे निश्चित. तरीही ’उपक्रम घेतला आहे हाती, तर एक प्रयोग म्हणून तो चालू ठेवू’ असा विचार करून झाला. पण हे असं बळंच चालू ठेवण्याची गरज आहे का? याचं उत्तर आज आमच्यापाशी नाही. ’आता नाही करावंसं वाटत’ असं म्हणून मुकाटपणे हा अंक बंद करता आला असताच. खंतावलेल्या सुरात हे सगळं सांगायची तरी काय गरज होती, हा प्रश्नही पडू शकेल कुणाला. पण ज्या उत्साहानं मराठी ब्लॉगांवरचं भरभरून लिहिणं तुमच्याशी वाटून घेतलं, त्याच चोखपणानं ही सवंगाईही दाखवली पाहिजे, असं वाटत राहिलं. केवळ म्हणून हा खटाटोप.

कदाचित आम्हांला वाटते आहे, तेवढी परिस्थिती वाईट नसेल. नसतील लोक लिहीत ब्लॉगवर, तर त्याने काहीही फरक पडणार नसेल. हे तात्कालिक असेल. कदाचित पुन्हा मराठी ब्लॉगवर सकस लिखाण होऊ लागेल. कदाचित आम्ही नेमक्या ठिकाणी पाहत नसू. कदाचित हे डायरीवजा माध्यम ललित लेखनाला तितकंसं मानवलं नसेल. कदाचित संस्थळांवर मिळणार्‍या विपुल प्रतिक्रिया इथे न मिळाल्यानं लेखक खट्टू झाले असतील... शक्यता अनेक. सगळ्याच कमीअधिक प्रमाणात महत्त्वाच्या. पण तूर्तास ’तोच तो’पणातला कंटाळा काही केल्या टळत नाही. 

या ब्लॉगविश्वात, तिथल्या लेखकांत आणि लिखाणात आम्ही गेली पाच वर्षं रमलो होतो. निर्मितिक्षम लोकांच्या सोबतीत भारावलो होतो. आम्ही ब्लॉग जगत होतो. ’रेषेवरची अक्षरे’मधून हा आनंद, उत्साह, भारावलेपण, सर्जन तुमच्याशी वाटून घेत होतो. यंदा त्याला काहीशी ओहोटी लागलेली असली, तरीही ब्लॉगवरच्या रिकाम्या जागांशी जुळलेल्या आठवणी ’रेषेवरच्या अक्षरे’च्या पीडीएफ फायलीत पुन्हा सापडतील. या अंकाच्या निमित्तानं तुम्हांला रेषेवरची अक्षरं पुन्हा आठवतील. जालावरच्या मुशाफिरीत आपल्याला सापडलेल्या या नव्या माध्यमाची अपूर्वाई, जादू आणि ताकदही तुम्हांला पुन्हा जाणवेल... अशी आशा बाळगत यंदाचा अंक सादर करतो आहोत. 

भेटत राहूच. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

संपादक
रेषेवरची अक्षरे
२०१२
Uncategorized

तुतारीच्या शोधात…


सालाबादप्रमाणे ‘रेषेवरची अक्षरे’चा अंक ह्याही दिवाळीला आपल्यासमोर हजर आहे. मागल्या वर्षात काय झालं? काही ब्लॉग आले, काही ब्लॉग गेले. काही तरले, काही बुडाले. काही मंदावले. काही सुस्तावले.काही दौडले. काही सुटलेच. काही आपले चालले नि काही दुसर्‍यांनीच चालवायला घेतले! त्यांना आपण शुभेच्छा देऊ. चालणार्‍यांना प्रोत्साहन देऊ. सुटलेच आहेत त्यांना सोडून देऊ. दौडणार्‍यांना दौडू देऊ.सुस्तावल्यांना गदगदा हलवू. मंदावल्यांना दमदाटी करून लिहितं करू. बुडलेल्यांना तरलेल्यांनी वंदन करावे. आलेल्यांनी गेलेल्यांच्या रिकाम्या जागा भराव्यात. हे सगळं झालं की कशी ब्लॉगविश्वाची अनुदिनी मागल्या पानावरून पुढे चालू. काही नवं नाही नि काही जुनंही नाही. पण आम्ही एक तुतारी शोधत राहणार. जमेल तसं नवं शोधत राहणार, करत राहणार नि तुम्हांला सारखं तसं सांगत राहणार.
अनुक्रमणिका
संकलित विभाग
******
Uncategorized
तुतारीच्या शोधात

 

सालाबादप्रमाणे ‘रेषेवरची अक्षरे’चा अंक ह्याही दिवाळीला आपल्यासमोर हजर आहे. मागल्या वर्षात काय झालं? काही ब्लॉग आले, काही ब्लॉग गेले. काही तरले, काही बुडाले. काही मंदावले. काही सुस्तावले. काही दौडले. काही सुटलेच. काही आपले चालले नि काही दुसर्‍यांनीच चालवायला घेतले! त्यांना आपण शुभेच्छा देऊ. चालणार्‍यांना प्रोत्साहन देऊ. सुटलेच आहेत त्यांना सोडून देऊ. दौडणार्‍यांना दौडू देऊ. सुस्तावल्यांना गदगदा हलवू. मंदावल्यांना दमदाटी करून लिहितं करू. बुडलेल्यांना तरलेल्यांनी वंदन करावे. आलेल्यांनी गेलेल्यांच्या रिकाम्या जागा भराव्यात. हे सगळं झालं की कशी ब्लॉगविश्वाची अनुदिनी मागल्या पानावरून पुढे चालू. काही नवं नाही नि काही जुनंही नाही. पण आम्ही एक तुतारी शोधत राहणार. जमेल तसं नवं शोधत राहणार, करत राहणार नि तुम्हांला सारखं तसं सांगत राहणार.
‘रेषेवरची अक्षरे’चे मागचे अंक वाचले आहेत तुम्ही? हा अंक ऑनलाईन स्वरूपात तुमच्या हातात पडला असेल, तर इथेच तुम्हांला ते सापडतील. जर तुमच्यापर्यंत पीडीएफ पोचली असेल, तर ऑनलाईन अंक मिळवून जरूर वाचा. या अंकात काय असतं? दर वर्षी तेच असतं. आधीच मराठी ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या निवडक (आमच्या दृष्टीने दर्जेदार) नोंदी वेचून तुमच्यापुढे ठेवलेल्या असतात. दर वर्षी तेच असलं, तरी तेच तेच कधीच नसतं. दर वर्षी आम्ही आमच्या परीघाच्या बाहेरचे ब्लॉग शोधून पालथे घालतो. कोणी नवीन ब्लॉगर सापडला की आपण त्याचे पी. आर. असल्यागत ‘हो, हो, ह्या ब्लॉगरचं लेखन आलंच पाहिजे अंकात’ म्हणून आमची धडपड सुरू होते. नि कधी एकदा ते सगळ्यांना सांगतोय असं आम्हांला होतं. सकस लेखन करणारे नवे ब्लॉगर्स, जुन्या ब्लॉगर्सचे नवे प्रयोग, नवं सकस लिखाण ह्यासाठी आम्ही अंकाचं काम सुरू झाल्यापासून हपापलेले असतो. पण ह्यातलं आमच्या हातात किती असतं? खरं सांगायचं, तर काहीच नसतं. लोक लिहितात. का लिहितात? आपापल्या कारणांसाठी लिहितात. त्या कारणांत रेषेवरची अक्षरेसाठी हे कारण कुणाचंच नसतं (नसावं!). मग लोक जे लिहितात, त्यातलं आम्ही आपलं वेचून ठेवतो तुमच्यापुढे. मग नवं काय करायचं किंवा नवं कुठे, कसं शोधायचं याबाबत असंख्य वाद आम्ही वर्षभर घालत बसतो. नि त्यातच ‘रेषेवरची अक्षरे’मध्ये आजवर ज्यांचे लेख आले, त्या सर्वांना गोळा करून एकत्र ठेवण्याचा घाट घालत असतो.
ही मंडळी आमची गिनिपिगं आहेत. मागे एकदा मारे आम्ही एक कविता/संकल्पना देऊन लेखन मागवायचा प्रयोग केला. तो सपशेल फसला. तो अंक केवळ ब्लॉगसंकलनासहच निघाला. मग पुढच्या वर्षी ह्यांच्याकडून आपापलं लिखाण-ब्लॉग-माध्यम ह्यासंबंधी लेख मागवून चर्चा घडवून आणायचा घाट घातला. लोक उत्साहाने उतरले, पण वाचकांचा प्रतिसाद? शून्य. कारण कळायला मार्ग नाही. कारण कसं शोधायचं हेही आम्हांला माहीत नाही. पण तरीही आपली आमची नव्याची नवलाई संपेना. मग यंदा एका विषयावर लेख मागवले आहेत – ‘लैंगिकता आणि मी’. हाच विषय का? आम्हांला आवडला म्हणून. जुन्या लेखकांसह काही इतर ऑनलाईन मंडळींना व ब्लॉगर्सना यात आमंत्रित केलं होतं. त्यांचे लेख ह्या अंकात समाविष्ट आहेत. ह्यात लेख पाठवलेल्या सर्वांनी ज्या उत्साहाने व गांभीर्याने ह्यात सहभाग घेतला, तो आमचा उत्साह वाढवणारा आहे. त्याचबरोबर आपल्याला कुणीतरी गांभीर्याने घेतंय या आकलनामुळे जबाबदारीची जाणीवही करून देणारा आहे. त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.
ब्लॉगर मित्रमैत्रिणींनो, आम्हांला एक तुतारी शोधत जायला एवढं पुरतं. खरंच. निदान अद्याप पुरत होतं. पण ते किती दिवस पुरेल हे कसं सांगणार? त्यासाठी तुम्हीही काही नवं करायला हवं. ब्लॉगविश्वात काही नवं होत राहिलं, तर ते ‘रेषेवरची अक्षरे’मध्ये उमटत राहील. एरवी आम्ही चार वर्षांपूर्वी साठ ब्लॉग पालथे घातले होते, ते आता जवळपास एकशे नव्वदापर्यंत गेले आहेत. ते वाचून आमची संकलन करताना तयार झालेली नजर, आलेली पकड नि आमच्यात तयार झालेली लेबलं ह्यांच्या साह्याने यंत्रवत सफाईने संकलन करता येतंच आहे की आम्हांला आताशा. पण सकस लिखाण मात्र ब्लॉगसंख्येच्या प्रमाणात वाढताना दिसत नाही, हेपण सांगायलाच हवं तुम्हांला. आम्हांला तुतारीच्या ध्येयाचा फाजील ध्यास नाही, पण त्यासाठी नव्या वाटा ढुंढाळण्याचा हव्यास आहे. दाखवाल त्या? तुमच्या काही न करण्यात आमच्या मर्यादा आहेत आणि तुमच्या प्रयोगांत आमच्या नव्या वाटा आहेत. आणि कृपया ‘हो, पण काय करायचं नवीन?’ हा प्रश्न विचारू नका. ते आम्हांला माहीत असतं, तर आम्हीच नसतं केलं? नि तेही आम्हीच सांगायचं, तर मग तुमचे ब्लॉग कशासाठी आहेत? ते जरा वापरा. प्लीज.
भेटूच.
दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छांसह,
ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
‘रेषेवरची अक्षरे’
२०११
Uncategorized

तुतारीच्या शोधात

सालाबादप्रमाणे ‘रेषेवरची अक्षरे’चा अंक ह्याही दिवाळीला आपल्यासमोर हजर आहे. मागल्या वर्षात काय झालं? काही ब्लॉग आले, काही ब्लॉग गेले. काही तरले, काही बुडाले. काही मंदावले. काही सुस्तावले. काही दौडले. काही सुटलेच. काही आपले चालले नि काही दुसर्‍यांनीच चालवायला घेतले! त्यांना आपण शुभेच्छा देऊ. चालणार्‍यांना प्रोत्साहन देऊ. सुटलेच आहेत त्यांना सोडून देऊ. दौडणार्‍यांना दौडू देऊ. सुस्तावल्यांना गदगदा हलवू. मंदावल्यांना दमदाटी करून लिहितं करू. बुडलेल्यांना तरलेल्यांनी वंदन करावे. आलेल्यांनी गेलेल्यांच्या रिकाम्या जागा भराव्यात. हे सगळं झालं की कशी ब्लॉगविश्वाची अनुदिनी मागल्या पानावरून पुढे चालू. काही नवं नाही नि काही जुनंही नाही. पण आम्ही एक तुतारी शोधत राहणार. जमेल तसं नवं शोधत राहणार, करत राहणार नि तुम्हांला सारखं तसं सांगत राहणार.
‘रेषेवरची अक्षरे’चे मागचे अंक वाचले आहेत तुम्ही? हा अंक ऑनलाईन स्वरूपात तुमच्या हातात पडला असेल, तर इथेच तुम्हांला ते सापडतील. जर तुमच्यापर्यंत पीडीएफ पोचली असेल, तर ऑनलाईन अंक मिळवून जरूर वाचा. या अंकात काय असतं? दर वर्षी तेच असतं. आधीच मराठी ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या निवडक (आमच्या दृष्टीने दर्जेदार) नोंदी वेचून तुमच्यापुढे ठेवलेल्या असतात. दर वर्षी तेच असलं, तरी तेच तेच कधीच नसतं. दर वर्षी आम्ही आमच्या परीघाच्या बाहेरचे ब्लॉग शोधून पालथे घालतो. कोणी नवीन ब्लॉगर सापडला की आपण त्याचे पी. आर. असल्यागत ‘हो, हो, ह्या ब्लॉगरचं लेखन आलंच पाहिजे अंकात’ म्हणून आमची धडपड सुरू होते. नि कधी एकदा ते सगळ्यांना सांगतोय असं आम्हांला होतं. सकस लेखन करणारे नवे ब्लॉगर्स, जुन्या ब्लॉगर्सचे नवे प्रयोग, नवं सकस लिखाण ह्यासाठी आम्ही अंकाचं काम सुरू झाल्यापासून हपापलेले असतो. पण ह्यातलं आमच्या हातात किती असतं? खरं सांगायचं, तर काहीच नसतं. लोक लिहितात. का लिहितात? आपापल्या कारणांसाठी लिहितात. त्या कारणांत रेषेवरची अक्षरेसाठी हे कारण कुणाचंच नसतं (नसावं!). मग लोक जे लिहितात, त्यातलं आम्ही आपलं वेचून ठेवतो तुमच्यापुढे. मग नवं काय करायचं किंवा नवं कुठे, कसं शोधायचं याबाबत असंख्य वाद आम्ही वर्षभर घालत बसतो. नि त्यातच ‘रेषेवरची अक्षरे’मध्ये आजवर ज्यांचे लेख आले, त्या सर्वांना गोळा करून एकत्र ठेवण्याचा घाट घालत असतो.
ही मंडळी आमची गिनिपिगं आहेत. मागे एकदा मारे आम्ही एक कविता/संकल्पना देऊन लेखन मागवायचा प्रयोग केला. तो सपशेल फसला. तो अंक केवळ ब्लॉगसंकलनासहच निघाला. मग पुढच्या वर्षी ह्यांच्याकडून आपापलं लिखाण-ब्लॉग-माध्यम ह्यासंबंधी लेख मागवून चर्चा घडवून आणायचा घाट घातला. लोक उत्साहाने उतरले, पण वाचकांचा प्रतिसाद? शून्य. कारण कळायला मार्ग नाही. कारण कसं शोधायचं हेही आम्हांला माहीत नाही. पण तरीही आपली आमची नव्याची नवलाई संपेना. मग यंदा एका विषयावर लेख मागवले आहेत – ‘लैंगिकता आणि मी’. हाच विषय का? आम्हांला आवडला म्हणून. जुन्या लेखकांसह काही इतर ऑनलाईन मंडळींना व ब्लॉगर्सना यात आमंत्रित केलं होतं. त्यांचे लेख ह्या अंकात समाविष्ट आहेत. ह्यात लेख पाठवलेल्या सर्वांनी ज्या उत्साहाने व गांभीर्याने ह्यात सहभाग घेतला, तो आमचा उत्साह वाढवणारा आहे. त्याचबरोबर आपल्याला कुणीतरी गांभीर्याने घेतंय या आकलनामुळे जबाबदारीची जाणीवही करून देणारा आहे. त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.
ब्लॉगर मित्रमैत्रिणींनो, आम्हांला एक तुतारी शोधत जायला एवढं पुरतं. खरंच. निदान अद्याप पुरत होतं. पण ते किती दिवस पुरेल हे कसं सांगणार? त्यासाठी तुम्हीही काही नवं करायला हवं. ब्लॉगविश्वात काही नवं होत राहिलं, तर ते ‘रेषेवरची अक्षरे’मध्ये उमटत राहील. एरवी आम्ही चार वर्षांपूर्वी साठ ब्लॉग पालथे घातले होते, ते आता जवळपास एकशे नव्वदापर्यंत गेले आहेत. ते वाचून आमची संकलन करताना तयार झालेली नजर, आलेली पकड नि आमच्यात तयार झालेली लेबलं ह्यांच्या साह्याने यंत्रवत सफाईने संकलन करता येतंच आहे की आम्हांला आताशा. पण सकस लिखाण मात्र ब्लॉगसंख्येच्या प्रमाणात वाढताना दिसत नाही, हेपण सांगायलाच हवं तुम्हांला. आम्हांला तुतारीच्या ध्येयाचा फाजील ध्यास नाही, पण त्यासाठी नव्या वाटा ढुंढाळण्याचा हव्यास आहे. दाखवाल त्या? तुमच्या काही न करण्यात आमच्या मर्यादा आहेत आणि तुमच्या प्रयोगांत आमच्या नव्या वाटा आहेत. आणि कृपया ‘हो, पण काय करायचं नवीन?’ हा प्रश्न विचारू नका. ते आम्हांला माहीत असतं, तर आम्हीच नसतं केलं? नि तेही आम्हीच सांगायचं, तर मग तुमचे ब्लॉग कशासाठी आहेत? ते जरा वापरा. प्लीज.
भेटूच.
दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छांसह,
ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
‘रेषेवरची अक्षरे’
२०११

resh.akshare@gmail.com

Uncategorized

विशेष विभाग: लैंगिकता आणि मी

(चित्र जालावरून साभार)

’रेषेवरची अक्षरे’च्या ’लैंगिकता आणि मी’ या विशेष विभागात आपले स्वागत. गेल्या वर्षीही आम्ही वेगळ्या विषयावरच्या विशेष विभागाचे आयोजन केले होते. लेखकांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती कल्पना आम्हाला रद्द करावी लागली.

या वर्षी तसे झाले नाही.
लैंगिकता आणि मी- “या विषयासंदर्भात आम्ही काही लिहू असे वाटत नाही”, “विषय कम्फर्टेबल वाटत नाही” अशा काही अपवादात्मक प्रतिक्रिया (अनपेक्षित लेखकांकडून) मिळाल्या ते सोडले, तर या विषयावर लिहिण्याच्या आमच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
प्रतिसाद मिळण्याचे कारण विषयाची निवड असू शकते का? असूही शकेल. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर यावर विचार करण्याइतकी सवडच आम्हाला मिळालेली नाही. अर्थात तसे असेल तर चांगलेच आहे. संस्कृतीने दडपलेल्या कोणत्याही गोष्टीला विचारमंथनाचा खुला वारा लागलेला केव्हाही चांगलाच.
आलेल्या लेखांमधून काही विचारमंथन झाले आहे का?
या विषयावर काही वेगळे, वैचारिक वाचायला मिळते आहे का?
ते तुम्ही ठरवायचे आणि आम्हाला सांगायचे.
वैचारिक काही मिळावे हा विचार लेखन मागवण्यामागे नक्कीच होता.
अजूनही काही अपेक्षा होत्या ज्या काही(च) प्रमाणात पूर्ण झाल्या.
काय अपेक्षा होत्या आमच्या? मुळात हा विषय आम्ही विशेष विभागासाठी निवडण्याचे कारण काय होते?
सुरुवातीला फारसे काही खास कारण नव्हते. ब्रेनस्टॉर्मिंगमधे हा विषय सुचला इतकेच. मात्र एकदा विषय सुचल्यावर लेखन मागवताना काही ठोस अपेक्षा मनात आल्या. त्या स्पष्टपणे लेखकांसमोर मांडणे मात्र आम्ही जाणीवपूर्वक टाळले. आधीच सुचवलेल्या विषयावर लिहायचे ही कठीण गोष्ट, त्यात अपेक्षांचे ओझे. लेखकमंडळी बिचकली असती.
लैंगिकतेवरचे तुमचे वैयक्तिक विचार मांडा- इतकेच मग आम्ही सांगितले.
लैंगिकतेचा अर्थ इथे वैयक्तिक, शब्दश:, प्रतीकात्मक अशा कोणत्याही प्रकारे घेणे अपेक्षित होते.
काही जणांचा इथे काहीसा गोंधळ झाला.
स्वत:च्या अनुभवाला सामाजिकतेची, सार्वजनिकतेची, सार्वकालीन अनुभवाची जोड नक्की कशी द्यावी हे काही लेखकांना कळेना.
काहींना ते जमले, काहींना नाही.
ब्लॉगिंग करताना वैयक्तिकतेमधून सार्वकालीनतेकडे जाणे जसे काहींना जमले, काहींना नाही त्यासारखेच हे.
प्रयत्न केला त्या सर्वांचेच स्वागत.
सर्जनशीलतेच्या मागच्या काही प्रेरणा शोधताना त्यात लैंगिकता हीसुद्धा एक महत्त्वाची प्रेरणा असू शकते या विचाराचा आत्तापर्यंत कधी धांडोळा (निदान मराठीत) घेतलाच गेलेला नाही. सर्जनशीलता आणि लैंगिकता यांचा परस्परांशी जवळचा काहीतरी संबंध आहे हे नक्कीच.
प्राचीन साहित्यात कालिदास आणि जयदेवाने कुमारसंभव, गीतगोविंद यांसारख्या रचना करताना उत्कट शारिरीक-मानसिक पातळीवरचे प्रेम, विरह, शृंगार, वियोग, दमन, व्यभिचार इत्यादी भावना उत्कृष्टरित्या अभिव्यक्त करून ठेवल्या. हे लेखक वैयक्तिक पातळीवर प्रिय व्यक्तीच्या विरहातून जन्मणा-या तीव्रतम लैंगिकतेच्या जाणिवा अनुभवत होते हे सर्वश्रुत आहे. लैंगिकता आणि सर्जनशीलतेच्या परस्परपूरक संबंधाचे इतके उत्कट उदाहरण दुसरे नाही. लैंगिकतेचा हा वारसा आपल्या कुवतीनुसार शतकानुशतके भारतीय साहित्यिकांनी गिरवला. पण त्यात कालानुरूप फार काही वेगळेपणा उमटू शकला नाही. आपल्या वैयक्तिक लैंगिक जाणिवा इतक्या तीव्रतेने आणि खरेपणाने साहित्यातून अभिव्यक्त करणे सोपे नाहीच.
वैयक्तिक पातळीवर लैंगिकता ही शारीरिक, वैचारिक, मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक अशा असंख्य थरांमध्ये आपल्या आख्ख्या जीवनालाच दुस-या कातडीप्रमाणे वेढून बसलेली असते. तशीच सर्जनशीलताही.
प्रत्येकाच्या आनंदाच्या, मजेच्या, तत्त्वाच्या जाणिवा जशा वेगवेगळ्या, तशाच लैंगिकतेच्याही वेगवेगळ्याच. मराठी साहित्यात या जाणीवा फारशा समर्थपणे उमटू शकल्या नाहीत. लैंगिकतेचे विरूपीकरणच जास्त झाले.
काही पाश्चात्य लेखकांच्या बाबतीत लैंगिकता आणि सर्जनशीलतेच्या संबंधाचा जाणीवपूर्वक शोध घेतला गेला. उदा. ख्रिस्तिना रोझेट्टी, जॉर्ज इलियट, एमिली डिकन्सन, टी.एस.इलियट, फेडेरिको गार्सिया, शार्लट म्यू, सिसिली हॅमिल्टन, व्हर्जिनिया वूल्फ, सिमॉन द बोव्हा… भारतीय साहित्यात अमृता प्रीतम, कमला दास, हरिवंशराय बच्चन, मैत्रेयी पुष्पा, राजेन्द्र यादव अशा काही मोजक्या साहित्यिकांनी लैंगिकता आणि साहित्यनिर्मितीचा एकत्रितपणे विचार मान्य केला. काही अपवाद वगळता मराठी साहित्यात मात्र असे कोणी आढळत नाही.
ब्लॉगर्स म्हणजे नव्या युगाचे, नव्या माध्यमाचे लेखक. त्यांच्या लेखनामधून जे काही नवीन, सर्जनशील सापडते ते निवडून ’रेषेवरची अक्षरे’मध्ये सादर करण्याचा आमचा अट्टहास असतो हे आत्तापर्यंत तुम्हाला माहीत झालेले आहेच.
तर अशा या आजच्या लेखकांना लैंगिकता आणि सर्जनशीलतेचा काही परस्परसंबंध आपल्या लिखाणामधून जाणवतो का? जाणवत असला, तर त्यांच्या या जाणिवा नेमक्या कोणत्या सामाजिकतेतून, वैयक्तिक अनुभवांतून विकसित होत गेल्या आहेत, हे या निमित्ताने जाणून घेता येणे ही एक अपेक्षा नक्कीच होती.
स्वत:तून वाहणारा शुद्ध अभिव्यक्तीचा ओघ, संवादाची उच्चतम पातळी गाठत मुक्ततेसाठी धडपडत बाहेर येत आहे… या ऊर्जेला मग लैंगिकता म्हणा किंवा सर्जनशीलता… नक्की काय फरक पडतो?
– संपादक
अनुक्रमणिका
*****
Uncategorized

प्रस्तावना

‘मराठी ब्लॉग व साहित्य’ अशा ढोबळ चौकटीत काम करणार्‍या ‘रेषेवरची अक्षरे’चं हे तिसरं वर्ष. ही ढोबळ चौकट सुस्पष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही पहिल्या अंकाच्या (वर्ष २००८) प्रस्तावनेमध्ये केला होता. आम्ही त्यात म्हटलं होतं, की आजवरच्या मराठी ब्लॉगनोंदींपैकी काही सर्वोत्तम नोंदी एकत्र करून प्रकाशित केल्या जाव्यात, हा एकमेव हेतू ह्या संकलनाच्या मूळ कल्पनेमागे आहे. हे करताना लेखन पूर्णतः मूळ लेखकाचं असण्यापासून काही विषयांवरील नोंदी वगळण्यापर्यंत काही निकषदेखील आम्ही ठरवले होते. ब्लॉगनोंदींना असणार्‍या वैयक्तिकतेच्या अपरिहार्य स्पर्शाची दखल घेतानाच त्यापल्याड जाऊन व्यक्ती-स्थळ-काल ह्यांच्या मर्यादा ओलांडू शकेल अशाच लेखनाचा विचार आम्ही प्रामुख्याने करत आलो आहोत. आम्ही ठरवलेले निकष, स्वत:वर संपादक म्हणून घातलेली बंधनं, आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी एका मर्यादेपलीकडे डोकावू नयेत म्हणून केलेला अट्टाहास, आणि संपूर्ण वर्षभर मराठी ब्लॉगविश्वातील लेखनाची आपापसांत केलेली चर्चा व त्या मंथनातून आपल्या उपक्रमाबाबत आमच्या विचारांत येत गेलेला नेमकेपणा ह्या सर्वांमधून आम्ही लेखनाच्या दर्ज्याचं परिमाण अधिकाधिक वस्तुनिष्ठ करण्याचा प्रयत्न केला आहे व करत राहूच. हे सगळं पुन्हा एकदा सांगण्याचं कारण केवळ ‘रेषेवरची अक्षरे’शी ओळख नसणार्‍यांना ती व्हावी एवढंच नाही. मराठी ब्लॉगविश्वाकडे गांभीर्याने पाहून त्यामधील लेखनाची ‘मराठीतून लिहिणं’ ह्या पल्याड जाऊन भाषानिरपेक्ष सकस लेखनाशी सांगड घालण्याचा ‘रेषेवरची अक्षरे’च्या माध्यमातून केलेला जाणीवपूर्वक व प्रामाणिक प्रयत्नही त्यानिमित्ताने आम्ही अधोरेखित करू इच्छितो.
मराठी अस्मितेप्रति (वास्तव वा अवास्तव) संवेदनशील होऊन तिची पुनर्मांडणी वा पुनरुच्चार केला जाण्याचा व मराठी ब्लॉगविश्वाच्या विस्ताराचा काळ समांतर आहे. आंतरजालावर आधारित सोशल नेटवर्किंग वेगाने फैलावण्याचा काळही हाच आहे. ह्या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हा संशोधनाचा विषय असला तरीही ब्लॉगविश्वावर त्याचा बरावाईट परिणाम होणं स्वाभाविक आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध आपली ‘ओळख’ पुनर्निधारित करण्याशी आहे. ह्या दोन्ही गोष्टींच्या योग्यायोग्यतेविषयी कोणतीही शेरेबाजी टाळतानाच ब्लॉग ह्या माध्यमाद्वारे आपली व आपल्या लेखनाची स्वतंत्र व प्रगल्भ ओळख (अगदी फक्त स्वत:च्या पातळीवरसुद्धा) जपणार्‍या वा असू इच्छिणार्‍यांचं ‘रेषेवरची अक्षरे’ हा उपक्रम नेहमीच स्वागत करेल, हे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो, आणि त्यांना ’रेषेवरची अक्षरे’सारख्या उपक्रमातून प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करतो.
आम्हांला आमच्याआमच्यातच वेळोवेळी पडत गेलेल्या प्रश्नांमधून ठेचकाळत आम्ही मागील वर्षीच्या अंकाशी आलो, तेव्हा आम्ही ब्लॉग ह्या गोष्टीकडे एक संवादाचं, संपर्काचं, साहित्यप्रसाराचं माध्यम म्हणून पाहू लागलो. त्या माध्यमाचा विचार केला, त्याच्या वेगळेपणाचा विचार केला. त्यावर प्रकाशित होणार्‍या मजकूराच्या वर्गीकरणाचा घाट घातला. मराठीतून ब्लॉग लिहिणारे लोक केवळ ब्लॉगर आहेत, लेखक आहेत, लेखक होण्यास इच्छुक आहेत, की कसं असेही प्रश्न पाडून घेतले. आमच्या घुसळणीतून काही नीटसं हाती येईना, तेव्हा आम्ही काही निवडक ब्लॉगर मंडळींना त्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रश्नांना त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित परिसंवादात्मक विभाग ह्या अंकात आपल्याला वाचायला मिळेल. आमच्या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन आवर्जून प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.
यंदाच्या अंकासाठी आम्ही सुमारे ११० मराठी ब्लॉगांवरील ०१ ऑगस्ट २००९ ते ३१ ऑगस्ट २०१० ह्या कालावधीत प्रकाशित झालेल्या नोंदींचा विचार केला. त्यामधून वेचलेल्या नोंदींपैकी ज्यांच्या प्रकाशनासाठी संबंधित लेखकांची संमती मिळू शकली, त्या नोंदी आम्ही आपल्यापुढे ठेवत आहोत. आपली नोंद प्रकाशित करण्यासाठी संमती देणार्‍या सर्व ब्लॉगलेखकांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. अंक कसा वाटला ते जरूर कळवा. आपलं प्रोत्साहन, बर्‍यावाईट प्रतिक्रिया आवश्यकच असतात. कृपया त्या आमच्यापर्यंत पोचू द्यात. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे २०१०