Uncategorized

कवितेची गोष्ट

खूप जुनी – म्हणजे जवळ जवळ माणूस सुसंस्कृत होण्याच्या पहिल्या पायरीवर होता म्हणा ना,  तेव्हाची – गोष्ट आहे. नेहमी असतं तसंच या गोष्टीतही एक आटपाट नगर होतं. बरीचं माणसं कामाची होती, तर काही बिनकामाचीही होती.

काही बिनकामाची माणसं फिरत फिरत झाडांच्या जंगलात गेली
त्यांना तिथं झऱ्यांचं गाणं ऐकू आलं
फुलांचं निर्व्याज हसू त्यांनी डोळाभर पाहिलं
उन्हाचा निवांत तुकडा त्यांनी मुठीत धरून बघितला
तृणपात्यावर लगडलेल्या दवबिंदूची चव त्यांनी चाखली
त्यांच्या आत काहीतरी दाटून आलं…
काही बिनकामाची माणसं निराकार माणसांच्या जंगलात रुजली
त्यांनी नर-मादीतलं मैथुन तटस्थ पाहिलं
चाबकाच्या फटकाऱ्यानिशी उडणारं चरचर रक्त त्यांनी जिभेला लावून पाहिलं
बाळाच्या गुरगुट्या बोलांना त्यांनी कानात साठवून बघितलं
माजोरी कधी, तर कधी संन्यस्त अभोग, त्यांनी अंगावर घेऊन बघितले
त्यांच्या आत काहीतरी दाटून आलं…
काही बिनकामाची माणसं आक्रसून स्वतःतच हरवून गेली
त्यांनी स्वतःतून माणसं उगवताना आणि मावळताना पाहिली
आठवणींची श्वापदं त्यांनी अंगावर घेऊन भोगली
“सो..हं”भोवती त्यांनी सृष्टीचा अक्ष तीव्रपणे खोचून बघितला
परकाया प्रवेशाचा गोरखधंदा त्यांनी करून बघितला
त्यांच्या आत काहीतरी दाटून आलं…
…त्यांच्या आत काहीतरी दाटून आलं आणि त्याची कविता झाली.
झाली असेल?
अनुभुतीच्या प्रस्तरांना छेदत शब्दांची नेमकी लय आणि पोत कुण्या शब्दवेत्त्यांना सापडतातही कधी, त्यांची मग कविता होते.
झाली असेल.
कवितेच्या भवितव्याविषयी आज बऱ्याच चर्चा झडत असतात; तिच्या शिलकीचा, उरलेल्या आयुष्याचा लेखाजोखा घेतला जातो. पण कविता या सगळ्यातून निसटून तरीही उरतेच. कवी कधी विनोदाचे विषय झाले; तर कधी त्यांनी माणसाला चेतवण्याचं काम केलं. पण ‘कवी तो दिसतो कसा आननी’ ही उत्सुकता आजही लोकांमधे दिसून येतेच.  ‘रेषेवरची अक्षरे’च्या या विशेष विभागात आम्ही कवितेची आणि पर्यायाने कवींची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कवींच्या प्रेरणा, कवितांचं उलगडणं, नव्या माध्यमातली कविता, कवितेचे व्यवहार, कवींशी गप्पा अशा वेगवेगळ्या कोनांतून कवितेला जोखण्याचा हा एक अनवट प्रयोग.
***
कवितेची गोष्ट
पाकीट आणि चपला गायब : अभिजित बाठे
आमचं हॉगवर्ट्स : जास्वंदी
नवं जग, नवी कविता : विश्राम गुप्ते
तापशतानि वितरतानि : वितरकांच्या चश्म्यातून (अक्षरधारा)
कवितेचे व्यवहार : प्रकाशकांच्या चश्म्यातून (इंद्रायणी साहित्य)

वाचकही पुस्तकापर्यंत पोचू पाहत असतो! : संपादकांच्या चश्म्यातून (सतीश काळसेकर)

श्रीधर तिळवे यांची मुलाखत : राहुल सरवटे

 

***
चित्रश्रेय : कल्याणी
अक्षरलेखन : संवेद
***
Uncategorized

रेषेवरची अक्षरे २०१५

संपादकीय
कथा
पाव्हणा : सतीश वाघमारे
जयविजय : अभ्या
पत्र-कथा : मेरा कुछ सामान..
जिमी : आदूबाळ
आंजी : आतिवास
अमान आणि चांदसिंग बुलू : जयंत कुलकर्णी
रॅम्पेज : आकाश खोत
कविता
सिद्धोबा : विसुनाना
देखावे : चैताली आहेर
दोन कविता : सुनील तांबे
संकीर्ण
तिरंगा : फारएण्ड
एक होती आजी : उत्पल व. बा.

रक्तात पेटलेल्या अगनीत सूर्यान्नो : अभिजित बाठे

पायाखाली : अरुणजोशी
जग दस्तूरी रे : रमताराम
एका गारुड्याची गोष्ट : जॅक डनियल्स
शुक्रवार सकाळ : Nile
अडगळीतल्या आठवणींचा पसारा : शिवोऽहम्

शटरबंद : अमृतवल्ली
इतिहास : Arnika
तुम्ही (नेटावर) कुठे लिहिता?


कवितेची गोष्ट
आमचं हॉगवर्ट्स : जास्वंदी
तापशतानि वितरतानि : वितरकांच्या चश्म्यातून (अक्षरधारा)
कवितेचे व्यवहार : प्रकाशकांच्या चश्म्यातून (इंद्रायणी साहित्य)
वाचकही पुस्तकापर्यंत पोचू पाहत असतो! : संपादकांच्या चश्म्यातून (सतीश काळसेकर)
***
Uncategorized

श्रीधर तिळवे यांची मुलाखत

– राहुल सरवटे


जरी हे कबूल करताना फारसं बरं वाटत नसलं, तरी मराठी वाचकाला श्रीधर तिळवे हे नाव तितकंसं परिचित नाही हे सत्य आहे. ‘अडाहव्का बानासुना’ ही त्यांची कादंबरी, ‘क. व्ही.’ हा कवितासंग्रह आणि चौथ्या नवतेचा त्यांचा सिद्धान्त या गोष्टी माहीत असल्याच, तर आडरस्ते ढुंडाळणार्‍या विचक्षण वाचकाला ठाऊक असण्याचीच शक्यता जास्त. पण कोणत्याही पंथात आंधळेपणानं सामील न होता, जिथे न पटेल, तिथे नेमाडे यांनाही रोखठोक विरोध नोंदवणारे श्रीधर तिळवे एक महत्त्वाचे विचारवंत आहेत असं म्हटलं जातं. नव्वदोत्तरी जगाचं खरं चित्र रेखाटणारे, आणि ते चित्र फार खरं असल्यामुळेच डावलले गेलेले; एक नवा प्रवाह सुरू करण्याची ताकद असलेले लेखक ही त्यांची खरी ओळख असल्याचं त्यांचे चाहते सांगतात.


इतिहासकार राहुल सरवटे यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत ‘रेषेवरची अक्षरे’च्या वाचकांसाठी सादर करत आहोत. त्यात ‘कविता’ या एकमात्र विषयाला चिकटून न राहता अनेक निरनिराळ्या विषयांवर ते भरभरून बोलले आहेत. ते पटेल वा न पटेल; रोचक आहे, चकित करणारं आहे, रसाळ आहे, विचार करायला लावणारं तर आहेच आहे.

“मी म्हणतो आहे, ते सगळंच बरोबर असेल असं नाही. पण आपण शक्यता तरी मांडून बघायला काय हरकत आहे?” हे त्यांचं प्रांजळ विधान ऐकताना मनाशी असू द्या. अनेक नवे रस्ते दिसायला लागतील.


वेळेअभावी ही मुलाखत टंकणं शक्य झालेलं नाही, कारण दिवाळी अंकाला काहीएक मुहूर्त असतो. या मुलाखतीचं संपादनही केलेलं नाही.  तांत्रिक दृष्ट्या ती काहीशी कच्ची आहे. लिखित शब्दाला देता येते, ती संदर्भांची जोडही या मुलाखतीला दिलेली नाही, त्याबद्दलही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आहोत.
भाग १ : 

 

भाग २:
भाग ३ (‘तिळवे भांडार’ या कवितेच श्रीधर तिळवे यांनी केलेलं अभिवाचन) :

***

 

 

Uncategorized

वाचकही पुस्तकापर्यंत पोचू पाहत असतो!

संपादकांच्या चश्म्यातून (सतीश काळसेकर)


सतीश काळसेकर हे ‘लोकवाङ्मय गृह’चे संपादक आहेत हे खरेच.


पण ती त्यांची एकमात्र ओळख नाही. मराठी सारस्वतात त्यांच्या इतरही अनेक ओळखी आहेत. कुणाला ते ‘विलंबित’ या कवितासंग्रहातून भेटलेले कवी म्हणून माहीत असतात. कुणाला ते ‘पुस्तके साठत जातात…’ असे विरक्त मायेने पुस्तकांविषयी म्हणणारे संग्राहक म्हणून माहीत असतात. कुणाला ‘वाचणार्‍याची रोजनिशी’मधून भेटणारे अव्याहत वाचक म्हणून माहीत असतात.


तर गावकुसाबाहेरून कशीबशी पुस्तके मिळवत अक्षरांपर्यंत पोचणार्‍या एखाद्या वाचकाला ते पुस्तकव्रती प्रकाशक म्हणून माहीत असतात…


‘आपले वाङ्मयवृत्त’मधून सतत आडवाटेच्या कविता आणि कवितांचे अनुवाद सादर करत राहणार्‍या, ‘वाचा प्रकाशन’सारखा प्रयोग करणार्‍या सतीश काळसेकरांशी गप्पा मारणे महत्त्वाकांक्षी होते. अपेक्षेनुसार या गप्पा फक्त कवितेवर न थांबता, पुस्तके-भाषा-वाचनव्यवहार… अशा कशाही आडव्यातिडव्या होत गेल्या.


या गप्पा ‘रेषेवरची अक्षरे’च्या वाचकांसाठी ध्वनिमुद्रित रूपात सादर करतो आहोत. गप्पांच्या सुरुवातीला असलेला या मुलाखतीत अप्रस्तुत ठरेल असा काही भाग वगळला आहे. संकलनात सफाई जितकी असायला हवी होती तितकी नाही, याची जाणीव आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आहोत. वेळ होईल तसतशा या गप्पा अक्षरात नोंदून ठेवण्याचाही प्रयत्न होता, आहे. पण तूर्तास दिवाळी अंकाचा मुहूर्त साधण्यासाठी तो प्रयत्न पडद्यामागे नेत आणि माध्यमाने दिलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेत मुलाखत आहे त्या स्वरूपात प्रकाशित करतो आहोत.

 

***

ही मुलाखत या स्वरूपात प्रकाशित करायला संमती दिल्याबद्दल श्री. सतीश काळसेकर यांचे मन:पूर्वक आभार.

Uncategorized

कवितेचे व्यवहार : प्रकाशकांच्या चश्म्यातून (इंद्रायणी साहित्य)

’इंद्रायणी साहित्य’च्या सागर कोपर्डेकरशी साधलेला मनमोकळा संवाद


– संपादक


संपादक : सागर, इंद्रायणी प्रकाशन हे मराठीतलं एक जुनं नाव आहे. एक प्रकाशक म्हणून तू कवितेकडे कसा बघतोस?


सागर : इंद्रायणी प्रकाशनानं एक धोरण म्हणून फारसे कविता संग्रह प्रकाशित केलेले नाहीत. कविता कळणारा वाचकवर्ग हा मर्यादित आहे, त्याचमुळे व्यावहारिकदृष्ट्या कवितासंग्रह प्रकाशित करणं फारसं फायद्याचं नाही. त्यामधे प्रकाशकाचे पैसे अडकून राहतात, पुस्तकांचे गठ्ठे वर्षानुवर्ष जागा अडवून ठेवतात आणि त्यामुळे नवीन काही प्रकाशित करण्यावरोदेखील मर्यादा येतात. शिवाय प्रस्थापित कवींचे त्यांच्या प्रकाशकांशी चांगले सूर जुळलेले असतात. तिथे दुसऱ्या कुणाचा शिरकाव होणं थोडं कठीण.


पॉप्युलर-मौजसारख्या प्रकाशकांनी एका वेगळ्या भूमिकेतून कवितासंग्रह प्रकाशित केले असतील असं माझं मत आहे. तिथे आर्थिक गणितांपल्याड जाऊन हा वाङ्मयप्रकार, चांगले कवी समाजापुढे आले पाहिजेत असा दृष्टीकोन त्यांनी बाळगला असावा. पण आम्ही कवितासंग्रह केलेच नाहीत असं नाही. आम्ही कवी गिरीशांच्या जन्मशताब्दीनिमित्त वसंत कानेटकरांनी संकलित केलेल्या ’गिरीशांच्या समग्र कविता’ प्रकाशित केल्या आहेत. कवी गिरीश हे मराठीतलं एक मोठं नाव, त्यांच्या कविता एकत्रित स्वरूपात पुढे आल्या पाहिजेत असा आमचा मानस होता. शिवाय ’टीकटॉक’ नावाचा बालकवितांचा एक छोटा संग्रह आम्ही काढला होता. इंग्रजीमधल्या कविता, त्याच्या बाजुला मराठी अनुवाद असं त्याचं स्वरूप होतं. या पुस्तकासाठी आम्हाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कारही मिळाला होता.


संपादक : उद्या तुझ्याकडे कुणी कविता प्रकाशनासाठी पाठवली तर तुझी निवड प्रक्रिया कशी असेल?


सागर : कविता वाचकाला भावायला हवी, त्याला ती सोपी वाटायला हवी. आमच्याकडे जेव्हा कवितेसाठी प्रस्ताव येतात, तेव्हा मी हेच निकष लावून बघतो.


संपादक : पण कविता हा प्रकार तसा तितकासा सरळ नाही. मग ती वाचकाला सोपी किंवा आपलीशी कशी वाटेल?


सागर : माझी आणि ग्रेसांची फार छान मैत्री होती. ’साजणवेळा’च्या सुमारास ते पुण्यात असताना माझी त्यांची ओळख झाली होती. नंतर कधीतरी मी त्यांना विचारलं होतं की तुमची कविता दुर्बोध आहे असा एक समज आहे. मग ती वाचणाऱ्यानं कशी समजून घ्यायची? तेव्हा त्यांनी मला फार छान उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की चांगला कवी हा त्याच्या कवितेत वाचकांसाठी काही पॉइंटर्स सोडतो. वाचणाऱ्याला ते पॉइंटर्स सापडले पाहीजेत आणि त्यांच्याशी वाचकाला त्याचे अनुभव जोडता आले पाहिजेत. कवीला काय म्हणायचंय, त्याला काय अनुभव आलेत हे वाचकांना विचारावं लागता कामा नये. कवीला जे सांगायचंय, ते त्यानं कवितेत आधीच सांगितलेलं असतं.


तर माझ्याकडे जेव्हा कवितेचं बाड येतं तेव्हा मी मला काही पॉइंटर्स सापडतात का ते आधी बघतो. मला स्वतःला ती भावते का ते मी पाहतो. त्या कवितेत काही विचार असावा लागतो, जो लोकांपर्यंत पोचणं आवश्यक असतं आणि हे सगळं तपासल्यावर आम्ही त्याची आर्थिक गणितं जुळवून बघतो.


संपादक : पुस्तक आणि वाचक यांच्यामधला दुवा म्हणजे वितरक. एखादा कवितासंग्रह विकला जावा म्हणून वितरकांकडून कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले जातात?


सागर : पुस्तकासंदर्भातला सोहळा हा बहुतेक वेळा प्रकाशकांकडून केला जातो. वितरक पुस्तकांसाठी जागा उपलब्ध करून देतात. हल्ली बरेच वितरक स्टेशनरी, इंग्रजी पुस्तकं यांच्या सोबत असावीत म्हणून मराठी पुस्तकं विकतात. आता याला काही अपवाद आहेत. ’अक्षरधारा’चे राठिवडेकर पुस्तकांचे बरेच इव्हेण्ट्स करतात. ’रसिक साहित्य’चे नांदूरकर यांचादेखील एक वेगळा प्रयत्न असतो. त्यांचा ’रसिक आंतरभारती’ म्हणून एक उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत काही वर्षांपूर्वी त्यांनी कवी अनिलांच्या कवितांची सीडी काढली होती. त्याला आनंद मोडकांचं संगीत होतं आणि हृषीकेश रानडे, विभावरी आपटे, अजय गोगावले इ. गुणी गायकांनी त्यांचा आवाज त्या कवितांना दिला होता. या उपक्रमाचं साहित्यिक मूल्य उच्च होतं. वैभव जोशींच्या ’मी वगैरे’ नावाच्या कवितासंग्रहाचादेखील ’रसिक साहित्य’नं छान सांगीतिक उपक्रम केला आहे. पण ही अपवादात्मक उदाहरणं आहेत.


संपादक : चांगली कविता असेल आणि तिचं मार्केटिंगही तितकंच चांगल्या पद्धतीनं केलं तर कवितासंग्रहांना उठाव येतो असं म्हणायचंय तुला?


सागर : हो, विशेषतः ग्रेस किंवा संदीप खरे यांच्यासारखे प्रस्थापित कवी असतील आणि जर त्यांच्या कवितांचं सादरीकरण होत असेल, तर त्यांच्या पुस्तकांची मागणी वाढते असं एक निरीक्षण आहेच.


संपादक :  ’मी माझा’ या चंद्रशेखर गोखले यांच्या तुफान खपाच्या कवितासंग्रहाचं वितरण तू केलं होतंस. त्याचे काही अनुभव सांगशील?


सागर : साधारण वाचकाच्या दृष्टीने बघायचं, तर कवितेचा नि त्याचा संबंध प्रेमात पडल्यावर येतो! त्याआधी कविता भेटते ती अभ्यासाच्या निमित्ताने, मार्क मिळवायचे म्हणून कविता पाठ करावी लागते इतपतच तिची ओळख. कळत्या वयात कविता – तिच्या कुठल्यातरी चार ओळी – अचानक ओळखीच्या वाटायला लागतात, कुठेतरी नेणिवांच्या पातळीवर भिडतात. ही कवितेची गंभीर ओळख.


चंद्रशेखर गोखलेंच्या कवितेचं असंच झालं. ’आय़डियल’च्या नेरूरकरांनी मला हे पुस्तक दिलं होतं. त्या कवितांमधली शब्दमांडणी आणि विचार सहज भिडणारे होते, त्यात कुठे काही क्लिष्ट नव्हतं. चंद्रशेखरला गोखलेंना भेटल्यावर त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि ते फसवले जाण्याची शक्यता मला स्पष्ट दिसत होती. म्हणून मी ’मी माझा’च्या वितरणाची जबाबदारी घेतली. मी निव्वळ शंभरेक प्रतींपासून वितरणाची सुरुवात केली आणि त्याची सांगोवांगी प्रसिद्धीच इतकी झाली होती, की माझं काम फक्त मागणीनुसार पुरवठा करणं इतकंच उरलं होतं.


संपादक :  ’मी माझा”चं वितरण करताना तुला कुठला पॅटर्न जाणवला का?
सागर : या एका पुस्तकाच्या बाबतीत मी पाहिलं, की ते सगळीकडे पोहचलेलं होतं. नाशिक, कोल्हापूर, अकोला अशा सर्वच भागातून त्याला मागणी होती. मघाशी म्हटल्याप्रमाणं, त्या पुस्तकातले विचार साध्या भाषेले आणि सहजपणे भिडणारे होते. कॉलेजमधे जाणारी मुलं भेट द्यायला हे पुस्तक वापरायची. ’मी माझा’सारखीच दिसणारी, तशाच फॉर्ममध्ये लिहिलेली असंख्य पुस्तकं नंतर आली. निव्वळ ट ला ट जोडून किंवा गोखल्यांच्याच काही ओळी मोडून-वापरून लिहीलेली ही पुस्तकं वितरित करण्यासाठी मला विचारणा झाली होती, त्यातल्या काहींना आर्थिक फायदाही झाला पण मला त्यात पडायचं नव्हतं. ती कमअस्सल प्रॉडक्ट्स होती. अशी निदान पंचवीसेक पुस्तकं आलेली मला माहित आहेत. पण ती काळाच्या ओघात टिकली नाहीत. का? कारण त्यात तो विचार नव्हता. गोखल्यांच्या कवितेचा ‘भावणं’ हा एक जो गुण होता तो या बाकीच्या नकलांमधे नव्हता.


संपादक : आपण एकीकडे कवितासंग्रहांच्या खपाबद्दल बोलतो तेव्हाच ब्लॉगसारख्या माध्यमातून बऱ्या-वाईट कवितांचं मोठं पीक आलेलं दिसतं. विनाखर्च उपलब्धता आणि इंटरनेटचा सर्वदूर आवाका या कारणांपलीकडे या तथाकथित विरोधाभासाची अजून काही कारणं आहेत असं तुला वाटतं का?


सागर : आजही साहित्यसंमेलनात कोटीकोटी रुपयांची पुस्तकं विकली जातात. तेव्हा पुस्तकं विकलीच जात नाहीत असं नाही. आज मुळात पुस्तकं प्रमोट करावी लागतात, वाचकांपर्यंत सतत त्या पुस्तकाबद्दलची माहिती पोचवत राहावी लागते आणि एकदा लेखक स्थिरावला की त्याची पुस्तकं विकली जातातच. पूर्वी सांगोसांगी प्रसिद्धी व्हायची, मोठे प्रकाशन सोहळे व्हायचे किंवा ’सत्यकथा’सारखी दर्जेदार मासिकं होती; ’ललित’, ’साहित्यसूची’सारखी नव्या पुस्तकांची दखल घेणारी माध्यमं होती, ज्यांच्यामुळे नवे कवी वाचकापर्यंत पो़चायचे. मघाशी तुला म्हणाल्याप्रमाणे, वितरकांची भूमिका आज मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून जवळजवळ फुकट काही वाचायला मिळणार असेल, तर लोक ते नक्कीच वाचणार. माझं असं निरीक्षण आहे की ब्लॉगवर जे असतं ते सर्वच चांगलं असतं असं नाही. त्यातलं जे खरंच चांगलं आहे ते टिकावं आणि जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचावं हे महत्त्वाचं. ब्लॉगवर पंधराएक कविता वाचल्या तर एखादी कविता चांगली निघते, बाकी निव्वळ टाकाऊ असतात. ग्रेस नेहमी म्हणायचे की तुम्ही जे लिहिता ते तुम्हीच खा, म्हणजे ते अर्धकच्चं आहे की कसं ते तुम्हांला कळेल, तुमची पचनशक्ती वाढेल आणि मग तुमच्या हातून चांगलं लिखाण होईल. तेव्हा ब्लॉगवर मिळणाऱ्या झटपट प्रसिद्धीच्या मागे लागून अर्धकच्चं काहीतरी लोकांपर्यंत नेणं हे कवीसाठीच घातक असतं.


संपादक : कविता इथून पुढे कुठे जाईल असं तुला वाटतं?


सागर : कविता पुढेच जाईल! गुलज़ार एकदा खाजगी बैठकीत म्हणाले होते की भाषेची उत्क्रांती होताना व्याकरण असं हवं, शब्द असेच हवे किंवा त्यात इंग्रजी शब्द नकोच असा कोणताही अट्टहास कशाला? वयाच्या ब्यांशीव्या वर्षी हा माणूस इतका मोकळेपणाने विचार करतो! या वयात लोक हट्टी बनतात… मराठीत फारसीमधून, अरबी भाषेतून बरेच शब्द आले आहेत, ते येऊ द्यावेत, त्यानेच भाषा समृद्ध होते. कवितेत असे प्रकार व्हायला हवेत. मराठी कवितेत असे वेगळ्या भाषेतले शब्द आले किंवा हिंदी/ इंग्रजी ओळी आल्या; तर येऊ द्याव्यात की. कदाचित यातूनच जास्त लोकांपर्यंत पोचता येईल असं मला वाटतं. मला वाटतं, कविता ही शेवटी एक संभाषणाचं माध्यम आहे, तेव्हा लोकांना कळेल असं कवींनी लिहावं. लिहिताना ’या हृदयीचे त्या हृदयात घालणे’ हा मूळ उद्देश विसरू नये हे महत्त्वाचं.
***
चित्रस्रोत : सागर
Uncategorized

तापशतानि वितरतानि : अर्थात कविता वितरकांच्या चश्म्यातून (अक्षरधारा)

– संपादक

प्रत्येक पुस्तकप्रेमीसाठी ‘अक्षरधारा’ हे नुसतं पुस्तकांचं दुकान नसून एक सांस्कृतिक चळवळ आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुस्तकं नेण्यात तिचा फार मोठा सहभाग आहे. पुस्तकवितरकांच्या नजरेतून कवितांबद्दल जाणून घेण्यासाठी, ’रेषेवरची अक्षरे’च्या कविता विभागासाठी ’अक्षरधारा’च्या श्री. रमेश राठिवडेकरांशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.संपादक : नमस्कार, तुम्ही सर्वसाधारण किती वर्षांपासून पुस्तकवितरणाच्या व्यवसायात आहात?श्री. राठिवडेकर : ’अक्षरधारा’ला आता २१ वर्षं होतील! या २१ वर्षांमध्ये आम्ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक अश्या राज्यांमध्ये, जिथे जिथे मराठी वाचक आहेत तिथे तिथे, जाण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तक प्रदर्शनांबरोबरच आता आम्ही मोबाईल व्हॅनच्या माध्यमातूनही वाचनसंस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. या दिवाळीत ’अक्षरधारा’चं साडेपाचशेवं प्रदर्शन आम्ही भरवणार आहोत! हल्ली वाचन कमी झालंय असा ओरडा केला जात असला, तरी आम्हाला तो मान्य नाही. आम्ही आता एकाच वेळी दोन प्रदर्शनं भरवतो. आपण वाचकांपर्यंत पुस्तके पोचवण्यात कमी पडतोय असं माझं मत आहे. चंद्रपूरसारख्या ठिकाणी (जिथे पुस्तकांची फारशी दुकानं नाहीत) आम्ही जातो, तेव्हा लोक पुस्तकांची यादी आणि पैसे घेऊन आमची वाट बघत असतात.हल्ली लोकांचं पुस्तकांसाठीचं वैयक्तिक बजेट वाढलेलं दिसतं. पूर्वी एखादं कुटुंब जेव्हा प्रदर्शनात यायचं, तेव्हा घरातल्या कुणीही कुठलीही पुस्तकं घेतली तरी बजेट हे शेवटी कुटुंबप्रमुखाच्या हातात असायचं. कुटुंबप्रमुख बजेटनुसार फायनल यादी पास करत असे! आता असं दिसत नाही. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार पुस्तकं घेताना दिसतो. पूर्वी लोक वाचनालयावर अवलंबून असायचे, आता लोकांना त्यांच्या आवडीच्या लेखकांच्या पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह करायचा असतो. हा फार चांगला बदल मला जाणवतो.संपादक : कवितांबद्दल – कवितासंग्रहांबद्दल विक्रीच्या दृष्टीने – तुमचं काही खास निरीक्षण आहे का?श्री. राठिवडेकर : आमच्या संस्थेची वाटचालच मुळी कवी कुसुमाग्रजांच्या आशीर्वादानं झालेली आहे. विंदा, सुरेश भट, ग्रेस, पाडगावकर, वसंत बापट, शांता शेळके, अरुणा ढेरे यांच्यापासून ते थेट आजच्या संदीप खरेेपर्यंत, अनेक मोठे कवी ’अक्षरधारा’शी जोडले गेलेले आहेत. मला असं जाणवतं की नव्याने कविता लिहिणारी मंडळी तितकीशी लोकप्रिय होताना दिसत नाहीत. आजही लोकांना पूर्वीचेच कवी जवळचे वाटतात. कुसुमाग्रज, पाडगावकर, विंदा यांच्या काव्यसंग्रहांना आजही तितकीच मागणी असते. संदीप खरेसारख्या काही कवींनी काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले, त्यांच्या काव्यसंग्रहांना चांगली मागणी असते. पूर्वी  विंदा- पाडगावकर- बापट यांनी एकत्र काव्यवाचन करून महाराष्ट्र गाजवला होता. त्यांच्या काव्यवाचनामुळे वाचकांमध्ये कुठेतरी त्यांच्या कवितांची नोंद व्हायची. त्यामुळे त्यांच्या कवितांचा उठावही मोठा होता.हल्लीचं, अगदी ताजं उदाहरण द्यायचं तर, बालिका ज्ञानेश्वर नावाने कविता लिहिणाऱ्या एक पोलीस कॉन्स्टेबल आहेत. नुकताच आम्ही त्यांच्या ’मॅगझिनीतून सुटणारी गोळी’ या  त्यांच्या कवितासंग्रहाच्या वाचनाचा कार्यक्रम केला, वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली आणि आता त्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. चारोळी हा प्रकार रुजवणाऱ्या आणि कवितावाचनाचे जाहीर कार्यक्रम करणाऱ्या चंद्रशेखर गोखल्यांच्या पुस्तकाला मिळणारा प्रतिसाद आजही कमी झालेला नाही. आजही काव्यवाचनांनंतर त्यांच्या पुस्तकांच्या शेकडो प्रती विकल्या जातात.  तर मुळात कवितासंग्रह लोकांपर्यंत पोचण्यातच कमी पडताहेत असं माझं निरीक्षण आहे.  नव्यानं लिहिणाऱ्या कवींनी कवितावाचनाचे प्रयोग केले तर वाचकांना तो कवी आपलासा वाटायला लागतो असा आमचा अनुभव आहे.संपादक : एक वितरक म्हणून कवितासंग्रह विकले गेले तर तुमचाही फायदा होतोच, पण तरीही ’अक्षरधारा’सारख्या मोजक्याच संस्था असे काव्यवाचनासारखे कार्यक्रम करताना दिसतात. असं का?श्री. राठिवडेकर : ’अक्षरधारा’च्या पंचविसाव्या प्रदर्शनाला शांता शेळके आल्या होत्या. त्यांनी भाषणातच सांगितलं की ’अक्षरधारा’नं नुसतं पुस्तकं न विकता, वाचकांना त्यांच्या आवडीचे लेखक, कवीदेखील भेटवावेत. इतर बऱ्याच संस्थांचा उद्देश पुस्तकविक्रीएवढाच मर्यादित राहिला; पण आम्हाला नवे वाचक तयार करण्यातही रस होता. याच भूमिकेतून मी ’बालकुमार शब्दोत्सव’, ’आम्ही वाचक उद्याचे’ असे काही प्रयोग केले होते. आमच्या अशाच एका उपक्रमातून निबंधस्पर्धा जिंकलेला एक मुलगा आता मोठा होऊन पुस्तक प्रकाशित करतोय, मला हे मोठं यश वाटतं.संपादक : पूर्वी अभ्यासक्रमातून चांगल्या कवींची ओळख व्हायची. आता त्याची खातरी नाही. शिवाय, मुळातच भाषा शिकणारी मुलंच आता कमी झाली आहेत. तर तुम्हांला याचा काही परिणाम जाणवतो का?श्री. राठिवडेकर : आता असं होत नाही, यामुळे वाचकात आणि कवितेमध्ये एक दरी नक्कीच निर्माण झालेली आहे. पूर्वी कवीदेखील एकमेकांना मदत करायचे. कुसुमाग्रजांनी नारायण सुर्व्यांना पुस्तक प्रकाशित करण्यात मदत केलेली होती. आता अशी सहकार्याची भावना दिसत नाही. अगदी एक कवी दुसऱ्या कवीच्या कवितादेखील वाचताना दिसत नाही. या सगळ्याचा एकूणच परिणाम नक्की होतोच.संपादक : गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही सर्वात जास्त विकलेला कवितासंग्रह कोणता?श्री. राठिवडेकर : कवितांच्या कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोचलेल्या कवींचे काव्यसंग्रह मागणीत असतात. उदा. कवी सौमित्रचं पुस्तक ’…आणि तरीही मी’. त्या पुस्तकाला मागणी असूनही ते उपलब्धच नाही. विंदांसारख्या ज्ञानपीठ मिळालेल्या कवींची पुस्तकं आज प्रचंड मागणीत असूनही उपलब्ध नाहीत. प्रकाशकांनी याची नोंद घ्यायला पाहिजे. आत्तापर्यंत विक्रीच्या बाबतीत टॉपला राहिलेला काव्यसंग्रह म्हणजे ’विशाखा’. असाच प्रतिसाद पाडगावकरांच्या, सुरेश भटांच्या कवितासंग्रहांनादेखील असतो. नवीन लेखकांमध्ये संदीप खरेच्या पुस्तकांना चांगली मागणी असते. स्पृहा जोशीच्या ’लोपामुद्रा’चा कार्यक्रम आम्ही केला होता. त्याही पुस्तकाला उत्तम प्रतिसाद आहे. उत्तम कंटेट आणि कवीचा समाजातला वावर यावर कवितासंग्रह विकला जाणं अवलंबून आहे असं दिसतं.संपादक : तुम्ही मागणी असूनही पुस्तकं उपलब्ध नाहीत असं म्हणालात…श्री. राठिवडेकर : स्पृहा जोशींचं पहिलं पुस्तक किंवा दासू वैद्यांचं ’तूर्तास’ आज मागणी असूनही मिळत नाहीत. ’तूर्तास’ आणि ’माझे विद्यापीठ’ जवळजवळ गेली दोन वर्षं बाजारात उपलब्ध नाहीत. प्रकाशकांची काही कारणं असतीलच; पण त्याच्याशी वाचकांना काही देणंघेणं नसतं. काहीच नाही तर निदान छायाप्रत तरी द्या, असं त्यांचं म्हणणं असतं. मध्ये ’समग्र नारायण सुर्वे’ असा प्रयोग झाला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ’समग्र-’ या कन्सेप्टला चांगली मागणी आहे. ’समग्र इंदिरा’ आत्ता आलं आहे. ’समग्र विंदा’ही यायलाच हवं.संपादक : सत्तरच्या दशकाच्या आसपास कवितेत बरेच प्रयोग झाले. मन्या ओक, दिलीप चित्रे इत्यादी कवी गाजले. आज त्यांना मागणी असते?श्री. राठिवडेकर : त्या पिढीतल्या आरती प्रभूंना आजही मागणी आहे. दिलीप चित्रेंच्या पुस्तकांना मागणी असते, पण पुस्तकं उपलब्ध नाहीत. हे एक कोडंच आहे. नवीन काही छापायला प्रकाशक तयार नाहीत, जे चालतं तेही द्यायला ते तयार नाहीत. त्यामुळे हल्ली लोक स्वतःच पुस्तक प्रकाशित करू बघतात.संपादक : पण मग अशा पुस्तकांना वितरकांचा कसा प्रतिसाद असतो?श्री. राठिवडेकर : वितरकांपर्यंत पोचण्यात लेखकांना खूप अडथळे असतात, आणि खरं म्हणजे ते त्याचं कामही नसतं. जाहिराती कुठे लावायच्या, किंमती किती ठेवायच्या, प्रकाशनाची वेळ कशी साधायची, इत्यादी व्यवसायातल्या खाचाखोचा त्याला माहीत नसतात. वितरकही अशा व्यवहाराला फारसा प्रतिसाद देत नाहीत. या सगळ्याचा मधल्यामध्ये वाचकावर मात्र खूप परिणाम होतो. आज वाचक खिशात पैसे घेऊन उभा असतो, पण त्याला पुस्तकं मिळत नाहीत. मला असं वाटतं, की निव्वळ कविता प्रकाशित करणारी एखादी प्रकाशनसंस्था आज महाराष्ट्रात असायला हवी. यामुळे आपल्याला चांगले कवीदेखील मिळतील आणि वाचकांना पुस्तकं उपलब्धही होतील.संपादक : आजच्या काळात संतकाव्याला कशी मागणी आहे?श्री. राठिवडेकर : बाकी कोणत्याही प्रकारांपेक्षा धार्मिक पुस्तकांना जास्त मागणी असते. आजही सर्वात जास्त प्रतिसाद ’ज्ञानेश्वरी’ आणि ’तुकारामगाथे’ला आहे. मग एकनाथांचे अभंग वगैरे…संपादक : ज्ञानेश्वरीच्या कोणत्या विशिष्ट आवृत्तीला विशेष मागणी आहे?श्री. राठिवडेकर : साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या आवृत्तीला, बेलसरेंच्या दासबोधाच्या आवृत्तीला, ढवळे प्रकाशनाचं एकनाथी भागवत यांना जास्त मागणी आहे. लोक या नावांनिशीच ही पुस्तकं मागतात.संपादक : परत एकदा वर्तमानात येऊ. नवीन कवींपैकी तुम्हांला कोण आश्वासक वाटतं?श्री. राठिवडेकर : स्पृहा जोशी, संदीप खरे, बालिका यांच्या आगामी कवितासंग्रहांबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. काही जुन्या कवींबद्दलही हे खरं आहे. अरुणा ढेरेंचं नवीन पुस्तक आलं की आजही त्याला चांगला प्रतिसाद असतो.संपादक : तुम्हांला एकूणच कविता या साहित्यप्रकाराच्या भविष्याबद्दल काय वाटतं?श्री. राठिवडेकर : कविता हा फार महत्त्वाचा फॉर्म आहे, तो पुसला जाणार नाही. अनेक मोठ्या साहित्यिकांनी त्यांच्या लिखाणाची सुरुवात कवितांनी केलेली आहे. कवितेच्या आजच्या परिस्थितीला आपली सिस्टीम जबाबदार आहे. या फॉर्मला मिळणारा प्रतिसाद कदाचित कमी होईल, पण तो थांबणार नाही. थांबूही नये. ती आपली गरजच आहे.संपादक :इतर साहित्यप्रकारांच्या तुलनेत, विक्रीच्या दृष्टीने, तुम्ही कवितेला कुठल्या स्थानावर बघता?श्री. राठिवडेकर : विक्रीच्या दृष्टीनं, कविता पहिल्या पाचात नक्कीच येते. कथा, कादंबरी, चरित्र यांनंतर कुठेतरी कविता असते. नाटकाला आता पहिल्या पाचात स्थान नाही. कवितेचा वाचकवर्ग मात्र मोठा आहे. आजही लोक विशिष्ट कवितासंग्रह शोधत येतात किंवा नवीन काही चांगलं आलं आहे का, याची चौकशी करतात.संपादक : आज तुमच्यामुळे कवितेबद्दलचा एक नवा पैलू समोर आला, तुमचे  ’रेषेवरची अक्षरे’तर्फे मनापासून आभार.
***
चित्रस्रोत : आंतरजालावरून साभार

Uncategorized

तंत्रज्ञान आणि कवितांचा मनगुंती संगम : शाप की वरदान?

– संहिता अदिती जोशीमी एके काळी पॉकेटमनीसाठी एका कॉलेजात कंत्राटी पद्धतीने शिकवायचे. माझं काम सिलॅबसचा ठरावीक भाग शिकवणं एवढंच होतं… असं मीच समजून घेतलं होतं. हजेरी वगैरे मी घ्यायचे नाही. तासाला शंभर रुपयांत एवढंच मिळेल, असं मीच माझं ठरवून टाकलं होतं. पहिल्याच दिवशी मी बीएस्सीच्या पहिल्या वर्षाच्या वर्गात जाहीर करून टाकलं, “तुम्हांला वर्गात बसायचं असेल तर शांतपणे बसा. ऐकायचं असेल तर ऐका किंवा नका ऐकू. मी हजेरी घेणार नाहीये, तेव्हा गैरहजेरीच्या भीतीपोटी इथे बसून मला त्रास देऊ नका. तुम्ही वर्गात बसलात किंवा नाही बसलात तरी मला तासाचे शंभर रुपये मिळणारेत. आणि माझं शिक्षण आधीच झालेलं आहे. त्यामुळे माझं काहीही नुकसान होणार नाहीये.”हे सांगण्याचं कारण? ‘अमुक तमुक – शाप का वरदान?’ या छापाचे शाळकरी निबंध तुम्ही चिक्कार वेळा वाचले असतील. हा आला त्यातलाच एक, असं समजून पुढचं वाचणार नसाल तर नुकसान तुमचंच आहे. कारण पुढे किती थोर विचार आणि विश्लेषण लिहिलेलं आहे, ते मी वाचलेलं आहे. तुम्ही वाचलं नाहीत तर नुकसान तुमचंच आहे. अंकाच्या संपादकांनी मला निबंध लिहायला सांगितलं आहे; वाचकांनी त्यात गुंतून पडावं का नाही, याबद्दल आमचं बोलणं झालेलं नाही. (शिवाय हा निबंध वाचून निबंधावर टीका करायचीही गरज नाही. नाक बंद करून तुमच्या नरड्यात हा निबंध कोणीही ओतलेला नाही.)***कविता आणि अँडी वॉरहॉल यांच्यात एक साधर्म्य आहे. लोक एकतर त्यांच्यावर प्रेम करतात किंवा त्यांचा तिरस्कार करतात. (अँडी वॉरहॉलबद्दल असं विधान सचिन कुंडलकरने केलं होतं. त्याला कलेतलं बरंच काही कळतं, कळतच असणार. तो प्यारीसमध्ये राहून आलाय. आपण असे लोकांचे संदर्भ टाकले की स्पष्टीकरणाची जबाबदारी आपल्यावर येत नाही.)  पण come technology हे चित्र पालटायला लागलेलं आहे. पुन्हा एकदा मी माझंच (थोर) उदाहरण देऊन हे सिद्ध करणार आहे.शाळेत शिकत असताना दुर्दैवाने माझी आणि कवितांची गाठ पडली. मी तेव्हा मार्कवादी असल्यामुळे कविताही रटणं भाग होतं. मोकळ्या मैदानावर मधोमध एखादी गगनचुंबी इमारत उभारली की ती किती ओंगळ दिसेल, तशाच मला कविता दिसत असत. आडव्या-तिडव्या, प्रशस्त पसरलेल्या, विरामचिन्हांनी नटलेल्या गद्याच्या गुबगुबीत मैदानात या उंचच उंच कविता येत असत. त्या काळात, म्हणजे बालपणात, त्याला पद्य म्हणत. माझ्यासाठी बालपणाचा काळ मराठी अस्मिता चेकाळायच्या आधीचा होता. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी ओव्यांमध्ये पूर्णविरामाच्या जागी वापरलेले हिंदी-संस्कृत छापाचे दंड बघून कोणीही मांड्यांवर हाताच्या ओंजळी आपटत शड्डू ठोकत नसत. थोडक्यात दंडातही मराठीपण आहे इतपत माहिती त्या कवितांमधून मिळाली. ‘हिंदी हटाओ’छाप चळवळी मराठी लोकांनी दंड थोपटून सुरू केल्यावर त्यात दंडाची काडी न पेटण्याची सोय झाली खरी। [मुद्रितशोधकांसाठी सूचना – हा दंड मुद्दाम वापरलेला आहे. [संपादक: ठीक.]]सुनीताबाईंनी ‘आहे मनोहर तरी’मध्ये एक किस्सा सांगितलाय. पुलंच्या पुस्तकांतली चित्रं चित्रकार शि. द. फडणीस काढायचे. त्यांच्या कोणत्याशा चित्रावरून एकमत होत नव्हतं, वाद होत होता. तेव्हा शि.द. सुनीताबाईंना म्हणाले होते, “मराठी माणसांना दृश्यकलांमधलं फार ज्ञान नाही.” कविता बघितल्यावर मला अगदी तस्संच शि. द. फडणिसांसारखंच वाटायचं. भारतातल्या कोणत्याही शहरात, भारतीय हवेत गगनचुंबी इमारती चांगल्या का दिसतात? पर्यटन म्हणून आपण कोकणात, जयपुरात किंवा स्वित्झर्लंडलाच जातो ना! तिथे जाऊन सुंदर इमारती आणि छान-छोटी घरं बघूनच आपल्याला आनंद होतो ना! गद्यासारखी सुंदर सोय असताना लोक या काचबंद, गगनचुंबी पद्याच्या, सॉरी कवितांच्या, इमारती उभ्या का करतात?सुदैवाने, माझं बालपण संपलं तशी मार्कवादावरची निष्ठा ढळायला लागली. बारावीनंतर आयुष्याचे निर्णय घेण्याची संधी मिळाल्यावर मी धावतपळत जाऊन ती हिसकावून घेतली आणि कवितांना अभ्यासक्रमातून हद्दपार केलं. आता पुस्तकांमध्ये पूर्णविराम, उद्गारचिन्ह, किंवाचा स्लॅश यांच्यासारख्या विरामचिन्हांच्या जोडीला इंटिग्रल, समेशन, d/dx आणि δ/δu यांच्यासारख्या सुंदर, स्वप्नवत गोष्टी अभ्यासक्रमात आल्या. आयुष्य एवढं सुंदर झालं होतं की एकदम एक कविताच पाडावीशी वाटायला लागली.पण कविता (किंवा गगनचुंबी इमारती) बनवणं तसं सोपं नसतं. आधी प्लॅन बनवावा लागतो. मग उंची किती याचा अंदाज करून खोलीची गणितं करावी लागतात. बुडातला मजला अरुंद आणि वरचा मजला (पंप्रंच्या ५६ इंची छातीसारखा) रुंद असं करून चालत नाही. (बघा ५६ इंची छाती असून बिहारमध्ये करिश्मा चालला का? पायाची गणितं करावी लागतात.) कविता किंवा इमारत स्त्रीलिंगी असल्या, तरीही सिंहकटी आणि वर… हॅ हॅ हॅ, चालत नाही. (बार्बीला चालताना बघितलंय का कधी?) एवढं करून ती घट्टमुट्ट कविता बांधण्यासाठी लिहिणाऱ्यांचं हृदय मात्र कोमल वगैरे असायला लागतं. आनंदाची काही वर्षं अशीच कोरडी, कोणतीही भावना व्यक्त न करता गेली. कवितांबद्दलचे माझे मनोव्यापार ‘तुझं माझं जमेना…’ या पातळीवर आले होते, याची कल्पना मला पुढची काही वर्षं येणार नव्हती.… आणि माझ्या आयुष्यात ‘ते’ आलं. ते एकटंच नाही आलं, जोडीला कविताही आली. d/dx, δ/δu या सगळ्यांबरोबर फ्लर्टिंग, डेटिंग अशा आणि बाकीच्या सगळ्या पायऱ्या [हॅहॅहॅ!!! [हॅहॅहॅ!!? – संपादक]] करून हे लोक जुने झाले होते. जुनं सोडून जाणार नाही, याची खात्री पटल्यावर मला माझ्या दिलात पुन्हा नव्याची आच जाणवायला लागली होतीच. तेव्हाच ‘ते’ आलं. [अहो, काय ‘ते’? इथे आम्हांला चोखंदळ आणि परंपराप्रिय वाचक सांभाळावे लागतात. तुम्हांला काय?!? नाही नाही ते अश्लील नव्वदोत्तरी चाळे लिहाल नि मोकळ्या व्हाल. – संपादक]‘ते’ म्हणजे तंत्रज्ञान, इंटरनेट, इमेल, इमेलमधले फॉरवर्ड आणि त्यात असणाऱ्या कविता.‘दिल गार्डन गार्डन हो गया’ ही कविता नंतरच्या जमान्यात आली असली; तरीही इमेलमधून पहिली फॉरवर्ड कविता आल्यावर कवीला या भावना जाणवल्या असणार याबद्दल मला १००% खात्री आहे. ती कविता हातात घेऊन घरभर नाचावंसं वाटलं मला!! तेव्हाचे कंप्यूटर, मॉनिटर्स काहीही हातात घेऊन नाचणं मला जमणार नव्हतं. मग फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी माउस हातात घेऊन घरभर नाचले; उश्या-पांघरुणं घरभर उडवली (आणि ती न आवरण्याबद्दल आईवडलांचा ओरडा खाल्ला).माझे कवितांसंदर्भात असणारे मनोव्यापार द्वेषाच्या चिखलातून उमलणाऱ्या प्रेमाच्या कमळासारखे अल्लाद उमलले होते, याची पहिली जाणीव मला तो ओरडा खाताना झाली. आमचं प्रेम युक्लिडीय रेषात्मक नसून अयुक्लिडीय अरेषात्मक आहे, त्याच वेळेस ते समकालीन आणि अ‌व्यापारेषु आहे याचीही जाणीव मला झाली. [काय (घेऊन) बरळताय बाई? – संपादक (उघड) आम्हांलाही हवं झालंय. (स्वगत)] पण तो क्षण आला जेव्हा मी पहिली कविता एका सुंदर फोटोवर छापलेली पाहिली. माथेरान किंवा ग्रँड कॅन्यन [वा! काय रेंज आहे. नशीब ठाण्याचा किल्ला नाही आणला. – संपादक] कुठेतरी होणारा सूर्योदय आणि त्या पार्श्वभूमीवर छापलेली एक प्रेमकविता मी वाचली.[हॅम्मिंगलव डॉट कॉमवरून सप्रेम साभार: संपादक]अशा कवितांना कुणी समीक्षक कदाचित वेदनवाद (sensationalism) म्हणतीलही. पण माझ्या मनात भावनांचा जो कल्लोळ झाला, त्यामुळे मला केऑस थिअरीही नीटच समजली. आफ्रिकेत फुलपाखराने पंख फडफडवल्यामुळे युरोपात हिमवादळं उठू शकतात, हे मी फक्त वाचलं होतं. आता हे माझ्यासमोर प्रत्यक्ष घडत होतं, माझ्या अनुभवविश्वाचा भाग बनलेलं होतं. लांब कुठेतरी, कुणीतरी अनाम व्यक्तीने काढलेल्या नेचर फोटोवर प्रेमभावनांचं हे उत्कट [पॉर्नला जरा पॉर्न शब्द सुचवा बघू! [संपादक: उसासमैथुन चालेल?] अं, हं… घासून घासून एवढाच सापडला? ठीक. सध्या वापरून घेऊ.] उसासमैथुन बघून माझ्या मनात वादळं उठत होती. केऑसच्या नावाखाली शिकवलेले फ्रॅक्टल्स, [संपादक: फ्रॅक्टल्स म्हणजे काय गं दिदी?] [गूगल वापरा. इमेज सर्च. म्हणजे कळेल.] एकात एक तोच-तोच आकार पुन्हा-पुन्हा दिसणं, हे कवितेतही दिसत होतं. d/dx, δ/δu या सगळ्यांबरोबर सगळं काही करून झालं, हा माझा समज किती बालीश होता याची जाणीव मला त्या पहिल्या कवितेने करून दिली.फास्ट फॉरवर्ड – आजचा दिवस :
तर – कविता करणं आणि इमारती बांधणं हे अतिशय किचकट काम आहे असं मी समजत होते. मधल्या काळात मला कवितांचं मॅग्नेटोहायड्रोडायनॅमिक [संपादक: म्हणजे?] [संपादक ना तुम्ही? अभ्यास वाढवा. काय सर्च करायचं ते स्पेलिंगही सांगायचं का आता? संपादक म्हणून मिरवायला तेवढं पाहिजे…] विश्लेषण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. त्यातून मला कवितांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या आहेत.कविता बांधणं हे काम तंत्रज्ञानाने फार सोपं केलं आहे. सर्वात आधी गद्याचं मोकळं पसरलेलं मैदान तंत्रज्ञानाने साफ करायला घेतलं. पुस्तकात एका टोकापासून दुसऱ्या टोकापासून पसरलेलं गद्य आता मोबाईलच्या दोन-चारशे पिक्सलमध्ये येतं. एके काळी आपली रेष मोठी आहे हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेष लहान करण्याची परंपरा होती. [हल्ली लोक त्यासाठी ऑनलाईन दिवाळी अंक काढतात. पण ते असो. विषयांतर होतंय. (कुजबुजत बोलत्ये, अंकाचं नाव काय ते पहा.)] पण फोन रेषेवर आल्यापासून हा प्रश्न पारच सुटला. कंप्यूटरची आडवी स्क्रीन मोबाईलसाठी उभी झाल्यावर विस्तीर्ण मैदानच कापून-कातरून गगनचुंबी इमारती बसवण्यासाठी फिट झालं. आता पाया किती खोल आहे, किती उंची गाठायची याचं गणित, विचार करायची काही गरजच राहिली नाही. कविता या साहित्यविधेचं लोकशाहीकरण झालं. विटेवर वीट चढवायची, ओळंबा वगैरे लावायची गरज नाही; मोबाईलची स्क्रीन बारीक असल्यामुळे लाईन हलून हलून किती हलणार!गूगलमुळे ग्रँड कॅन्यन किंवा माथेरानला जाऊन पहाटे उठून सूर्योदयाचे फोटो काढायची आवश्यकता राहिली नाही. फोटोशॉपमुळे संध्याकाळी सूर्यास्ताचे फोटो काढून, तिथे ‘मि पाहीलेला सुरयोदय’ असं लिहिण्याची सोय झाली. कवितांसाठी फोटोची गरज काय, असा एक जुनाट प्रश्न पडलाच असेल तर? कविता कशी आहे यापेक्षा ती कुठे आणि कशी प्रदर्शित केली जाते हे आज माध्यमस्फोटाच्या कालात महत्त्वाचं ठरलं आहे. माध्यम जेवढं महत्त्वाचं तेवढाच फॉर्मही. एके काळी स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, उदारमतवाद ही मूल्यं महत्त्वाची नव्हती. आता झाली आहेत. तसंच आता कवितेच्या पार्श्वभूमीला असणारा फोटोही फार महत्त्वाचा झालेला आहे. सूर्योदय किंवा सूर्यास्ताचा सौंदर्यसंपृक्त फोटो अतिशय लोकप्रिय आहे. त्यावर हातात हात धरणारं जोडपं असेल तर उत्तम. हे सापडलं नाही तर कष्टप्रद पर्याय वापरला जातो. फेसबुकवर मित्रमंडळ यादीत काही जण आपले श्लील जोडपी(य) संस्कार दाखवणारे असतात. त्यातला नेमका फोटो उचलला जातो. पुरुषाचा हात बाईच्या खांद्यावर ‘ही माझ्या मालकीची आहे’ असं दाखवणारा आहे आणि बाई गोडशी हसत, त्याच्या दिशेला चेहरा वाकवून आपली आपणच उभी आहे असा काव्यात्म फोटो सिल्हूएट बनवून सूर्योदयास्तावर वापरला जातो. [उदाहरणादाखल फोटो मिळेल काय? – संपादक][इथे या आणि माझ्याबरोबर फोटो काढून घ्या. मग दाखवते.][न-नको नको, राहू दे. – संपादक]तर हे झालं फोटोचं. आता प्रत्यक्ष कवितेच्या मजकुराकडे वळू.एखादी बहुजनप्रिय भावना घ्या, शक्यतो शिळी. उदाहरणार्थ स्मरणरंजन. त्यातही आई-वडील-आजी यांच्याबद्दल असणारं प्रेम (शक्यतोवर स्त्री नातेवाईकांबद्दलचं प्रेम दाखवावं. ते विकणं सोपं जातं.). स्त्रीवाद मुळातच कवीला झेपायला थोडा कठीण असतो; पण उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, उच्चशिक्षित, होममेकर (हौसाबाई) बाई आजही कशी पिचलेली आहे, ही भावना चलनी नाणं आहे. (टीप: स्त्रीवाद थोडा जड असतो, अननुभवी लोकांनी जपून हाताळावा. नवशिक्यांनी बहिणाबाईंची नक्कल करून बघावी.) या भावनांबद्दलची कविता काळजाला अचूक हात घालते. (सराईत पाकिटमाराचा हात खिशातच जातो किंवा अंधारात जेवतानाही आपला हात तोंडातच जातो, तशी. किंवा… असो. You get the idea, no?) त्यातही हमखास विकल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे शाळेतले शिपाई’काका’, शाळेतलं बाक, शाळेतला गळका नळ. (टीप:  शाळेतल्या संडासांमध्ये लिहिलेल्या साहित्याबद्दल लिहिणं हा पर्याय स्त्रीवादाची सवय झाल्यानंतरच हाताळला जातो. ही अतिशय कठीण विधा . जपून. पहिल्या प्रयत्नात नको. तोंडावर आपटायला होतं. लोक रॅगिंग करतात ते निराळंच.) पुढे कॉलेजच्या गोष्टींचा फार उपयोग नसतो, पण पहिलं प्रेम कॉलेजात सेट केलं तर चालू शकेल. पण ज्युनियर कॉलेजच्या पुढे जाऊ नये. सिनियर कॉलेजबद्दल लिहायचं असेल तर हॉस्टेल लाईफ हा एक विषय महत्त्वाचा असतो; पण कविता या विधेद्वारे हे मनोव्यापार हाताळण्यासाठी भावनांनी शब्द लथपथ होणं अत्यावश्यक असतं. हॉस्टेलबद्दल लिहिण्याला एक बायपोलर छटाही सापडते. कधी त्यात जुने मित्र, प्राध्यापक, कॉपी केलेल्या असाईनमेंट्स अशा प्रकारचं स्मरणरंजन असू शकतं किंवा होस्टेलातल्या शिळं, बेचव आणि वास येणाऱ्या तेलकट अन्नाबद्दल असणारी घृणासुद्धा सुंदर, भावनाळलेल्या कवितेचा विषय ठरू शकते. आयुष्यातल्या यापुढच्या भावना मात्र बहुतांशी आई-वडील-आजी-आजोबा यांच्या मृत्यूनंतर ज्वालामुखीसारख्या फसफसून वर येतात. मृत्यू ही गोष्ट साहित्यासाठी अतिशय पोषक कच्चा माल ठरते. प्रेम, आपुलकी, आदर, आनंद, सुख याबाबत कुपोषण होणं तितकं महत्त्वाचं नाही. लक्षात घ्या, एके काळी आपलं कुपोषण होत नव्हतं, पण आता होतं आहे, याचा भावनातिरेक तंत्रकवींच्या बाबतीत फार महत्त्वाचा असतो. कुपोषण, दुःख, वेदना यांतूनच सुंदर आणि अभिजात साहित्य जन्माला येतं हे विसरू नये.दुसरं महत्त्वाचं म्हणजे, ‘आमच्या काळात आयुष्य किती छान होतं,’ ही भावना कविता लिहिण्यासाठी खूप सुंदर आणि खरंतर उपयुक्त आहे. ती भावना मनात येत नसेल एक गोष्ट लक्षात ठेवा. वृत्तबद्ध, प्रमाणलेखनाचे नियम पाळून लिहिलेल्या कवितेला एके काळी किंमत होती.  पण आता तसं उरलेलं नाही. कवितांचं गगनचुंबी इमारतींचं हिडीस रुपडं जाऊन त्याजागी निसर्गाचे अतिसुंदर फोटो आल्यामुळे कविता लोकप्रिय होत आहेत. वृत्त, छंद, मात्रा या आस्पेक्ट्समध्ये कवितांचं भणंगीकरण होणं, ही लोकप्रियता आणि सौंदर्याची किंमत आहे. [आणि मी ती देणारच!!!] [दे बाई दे, आम्हांला सोडव लवकर. – संपादक (अर्थात स्वगत).]***
आम्ही खरंतर एसीत, गुबगुबीत खुर्चीत बसून विश्लेषण करणारे. पण संपादकांच्या खास [आणि ’खास’, समजलं ना!] आग्रहास्तव एका आल्गोरिदमची पाककृती देत आहोत. हे आल्गोरिदम नीट उबवल्यास तुम्हांलाही तंत्रज्ञानी कविता जमण्याची बरीच शक्यता आहे. न जमल्यास सराव करत राहणे. सरावासाठी संधी म्हणून दिवाळी येतच आहे, नातेवाइकांना त्या सरावाचं ग्रीटींग कार्ड बनवून पाठवू शकता. (पैशे [श मुद्दाम] [कळलं हॉ. – संपादक] पडत नाहीत, इमेलवर हे फुकटच  होतं. तेव्हा, हूं… )कवितेसाठी लागणारे साहित्य –
१. एक रत्तल प्रेमानंदमयी भावना. वर उल्लेख केलेल्या भावनांपैकी कोणतीही चालेल. उदा. शाळेतल्या बाकाप्रती स्मरणरंजन.  (टीप: स्मरणरंजन ही भावना रडारडबहुल असण्याचा समज आधुनिकोत्तर काळात मोडून निघतो आहे. तंत्रज्ञान वापरून कविता लिहिताना, तंत्रज्ञानापूर्वीचं जग किती सुंदर होतं ही स्मरणरंजनी भावना तंत्रज्ञानबहुल जगात सकारात्मक आणि उत्सवी समजली जाते.)
२. अर्धा तोळा (तरी) विरामचिन्हं. (होय, तंत्रज्ञानी कवितेत विरामचिन्हं फार लागतात. फोडणीत मोहरी-जिरं कमी पडलं तरी चालेल, पण कवितेत टिंबं – अर्थातच तीन – कमी पडल्यास कविता फसफसण्याऐवजी नुसतीच फसते.)
३. दोन रत्तल यमकं. यमकं जुळवताना ती एकाच भाषेत असावीत असा आग्रह नाही. उदाहरणार्थ ‘ग्रॅम -राम’ असं यमकही चालेल; नव्हे ध‌ावेल. [पाहा: खालील तीन कॉलमी कविता. – संपादक]
४. दोन गुंजा इमोटीकॉन्स. तंत्रज्ञानी कवितेत निदान एकतरी हसरा चेहेरा – अर्थात स्मायली – न आल्यास फाउल मानला जातो. स्मरणरंजन ही भावना सकारात्मक कशी बनते याचा अंदाज इथे सुज्ञ वाचकांस आला असेलच.
५. वर गार्निशिंगसाठी प्रमाणलेखनातल्या चुका. उदाहरणार्थ: ‘ऊन, हून’ असे पंचमीचे प्रत्यय असणारे सगळे शब्द (राहून, खाऊन, करून, जाऊन) ऱ्हस्व उकारी लिहायचे. उदाहरणार्थ, राहुन, खाउन, करुन, जाउन.
६. आर्थिक आणि वैचारिक दारिद्र्याबद्दल अभिमान – चवीनुसार.  [हा शब्द खरंतर ’स्वादानुसार’ असाच हवा. आपलं आधुनिकोत्तर ज्ञान मिरवणार्‍या या उद्धट लेखिकेचा इथे फाउल झालेला आहे. पण लेखनस्वातंत्र्य मान्य करत असल्यामुळे आणि स्त्रीवादा(द्यां)ची भीती असल्यामुळे नाईलाजानं ही चूक तशीच ठेवावी लागत आहे. – संपादक][संपादक बिनडोक आहेत. असो.][आता मात्र अती होतंय. – संपादक][बॉर्र. मला लेख छापून हवाय.]
७. “वेळात वेळ काढून वाचाच”, “शाळेवर (किंवा …. गोष्टीवर) खरं प्रेम असेल तर ही कविता शेअर कराच” अशा प्रकारचा चार रत्तल पेट्रनायझिंग आणि ब्लॅकमेलिंग गळेपडूपणा.हे सर्व पदार्थ एका कोऱ्या फायलीवर ओतावेत. ते आपापल्या कुवतीनुसार ढवळून काढावेत. जे मिश्रण होईल ते खपेल. बदफाईल, अर्थात कविता बरी न झाल्यास, लेखिका जबाबदार नसेल. ही कविता कितीही लोकांना वाढता येते. जितक्या लोकांना वाढाल, तितकी चव वाढेल.आता सादर आहेत अशा प्रकारच्या दोन कविता.(सूचना: या कविता आम्ही केलेल्या नाहीत. आम्ही विश्लेषक आहोत. फारतर सिम्युलेशनसाठी आल्गोरिदम देऊ शकतो. त्यातही ‘स्वादानुसार’ [हं, वाचा संपादक.] [संपादकांची शुद्ध हरपली आहे. – संपादक] फेरफार करावे लागतील. तेव्हा आल्गोरिदम आपापल्या जबाबदारीवर वापरावे.)***फक्त तुझी साथ हवी – ही कविता नक्की वेळ काढुन वाचा…
अप्रतिम रचना…
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला..
शरीर तुटकं पाय बारीक,
थोडा म्हाताराच वाटला…
“ओळखलसं का मला?”,
विचारलं त्याने हसुन…
वेळ असेल तुला तर,
बोलुया थोडं बसुन…
गाडी पाहताचं आनंदला,
हलवली तुटकी मान…
“खुप मोठा झालासं रे,
पैसा कमावलासं छानं”
“ओळखल्यास का बघ ह्या,
माझ्यावरच्या रेघा…
भांडण करुन मिळवलेली,
दोन बोट जागा…
अजुनही भेटतात का रे,
पक्या, मन्या, बंटी…?
टाळ्या देत करत असालं,
मनमोकळ्या गोष्टी…
डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?
निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?
टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन…
मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन…
धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं…
एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं…
त्राण गेलं, आवेश संपला,
करावं तरी काय..?
कोरड पडली घशाला,
थरथरले तरणे पाय…
तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत…
बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत…
“अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण…
कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन…”
मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट…
वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट…
शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला…
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला…
Miss u all friends
आता कितीही गाणी ऐकली तरी शाळेतल्या बेंचवर कान लाऊन🙇 हाताने वाजवलेल्या music ची मजा काय वेगळीच होती.
एक आठवण शाळेची..🙇***कविता क्र २.
dreaded_poem.png[हुश्श. – संपादक]***
चित्रस्रोत : पहिले चित्र – स्नेहल, इतर चित्रे : आंतरजालावरून साभार

Uncategorized

मौनोत्सवाचा गलबला

– संवेद

कविता: टोकदार भावनांची मोजक्या शब्दांमधे, प्रतीकांचे आधार घेत केलेली, नादमय उत्स्फूर्त मांडणी.कविता कशी वाचावी हे आपल्याकडं क्वचितच शिकवलं जातं. त्यातही तुम्ही भाषेचे विद्यार्थी नसाल तर, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर कविता वाचायला शिकता. कविता हा एक मौनोत्सवाचा गलबला असतो आणि त्यातून नेमके सूर शोधणं, हे थोडं कौशल्याचं काम असतं. लेखाच्या मूळ मुद्द्याकडे वळण्याआधीो, वॉर्म-अप म्हणून, कविता समजून घेण्याच्या प्राथमिक तंत्राकडे बघू :

कवितेकडे असंख्य कोनांमधून बघता येईल (असा एक प्रयत्न: इथे). पण या लेखासाठी कवितेचे मी तीन ढोबळ प्रकार करतो : समूहमग्न कविता, सहमग्न कविता आणि आत्ममग्न कविता. या प्रत्येक प्रकाराच्या, वाचकांकडून काही विशिष्ट मागण्या असतात, ज्यामुळे त्यांच्या वाचनाचा पॅटर्न ठरतो. (उदा. समूहमग्न कविता आवडणाऱ्याला फार तर सहमग्न कविता आवडू शकतात आणि आत्ममग्न कविता आवडणारा वाचक शक्यतो सहमग्न कवितेच्या पलीकडे जात नाही. तर असे हे एकूण ५ पॅटर्न्स). हे महत्त्वाचं आहे कारण तुम्ही कवितेला समजून घेऊ शकता किंवा नाही हे तुम्ही त्या काव्यप्रकाराची मागणी मान्य करू शकता किंवा नाही यावर अवलंबून असतं.  समूहमग्न – समूहाची कविता. सर्वांची कविता! या कवितांना मास अपील असतं. या व्यासपीठावरून हातखंडा यशस्वीरित्या प्रस्तुत करता येऊ शकतात. यात शाहिरी काव्य, लावण्या, ओव्या, अभंग, विडंबन, सामाजिक कविता, विद्रोही कविता, विनोदी कविता, बालकविता, चारोळ्या, गजल इ. प्रकार येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर यात गुंतागुंत कमी असते, विचार स्पष्ट असतो, श्रोत्यांची गुंतवणूक सहज आणि अपेक्षित असते.

सहमग्न – दोघांची कविता! हा थोडा अधलामधला प्रकार आहे. यातली कविता कधी कुंपणाबाहेर (समूहमग्न) जाऊ शकते, तर कधी उंबऱ्याच्या आत (आत्ममग्न) येऊ शकते. निसर्गकविता, प्रेमकविता, स्त्रीवादी कविता, गजल वगैरे प्रकार यात मोडतात. यात श्रोता वाचकाच्या भूमिकेत आलेला असतो. मास अपील कमी झालेलं असतं. वाचकाची काही सामान्य अनुभवांशी जोडवणूक गृहीत धरलेली असते. वाचकाकडून विचारशक्ती, सौंदर्यवाद, अभिरुची, कलावादी दृष्टीकोन, शब्दांची पारख, किंचित गुंतागुंत / शब्दभ्रम सोडवण्याची हातोटी अपेक्षित असते .आत्ममग्न – माझी कविता! स्वकेंद्रित, संदिग्ध, प्रस्तरी, दुर्बोध, क्वचित तुटक असं काहीसं या कवितांचं वर्णन करता येईल. इथे वाचकाचा परकाया प्रवेश गृहीत धरलेला असतो. विशिष्ट अनुभवांना विशिष्ट तीव्रतेनं भिडणं, शब्दांच्या/ अर्थांच्या नेमक्या छटांना उलगडणं,  वैयक्तिक संदर्भांचं वैश्वीकरण इ. गुणविशेष वाचकाकडून अपेक्षित असतात.या लेखाचा मूळ उद्देश, अशा आत्ममग्न कवितांशी निगडीत आहे.***   
                                                                                                                             
॥ग्रेस वाचताना॥कविता : टोकदार भावनांची मोजक्या शब्दांमधे, प्रतीकांचे आधार घेत केलेली, नादमय उत्स्फूर्त मांडणी.आत्ममग्न कवितांचा वाचक ग्रेसला टाळून सहजी पुढे जाऊ शकत नाही. माझ्यापुरतं सांगायचं तर आठवी-नववीत कधीतरी अचानक झालेली ग्रेसांची ओळख भक्ती, वेड, व्यसन या सगळ्या वळणांवरून शेवटी तटस्थ अभ्यास या टोकावर स्थिरावली आहे. ग्रेसांच्या कवितेने छळलेले बरेच जीव कुठे कुठे भेटत राहातात आणि ग्रेस समजून घेण्यासाठी घनघोर चर्चेचीही त्यांची तयारी असते. व्यक्तिशः मला मात्र कवितेवर चर्चा करायला आवडत नाही, तो माझ्यापुरता एक अत्यंत वैयक्तिक अनुभव असतो. पण चंद्रमाधवीच्या प्रदेशात चकवा लागू नये म्हणून काही खुणा मी नक्कीच सांगू शकतो. या खुणा मी कवितेच्या वर दिलेल्या ढोबळ व्याख्येच्या आधारे करणार आहे.टोकदार भावना – कविता तीन प्रकारे समजून घेता येते; कवितेतील शब्दांमागचे अर्थ शोधणे आणि/किंवा कवितेची एकूण मांडावळ (इकोसिस्टीम) समजून घेणे आणि/किंवा कवीच्या खाजगी आयुष्यातील संदर्भ कवितेशी जुळवून पाहणे.ग्रेसांच्या बाबतीत बोलायचं, तर शब्दकोशातून तुम्ही त्यांच्या शब्दांचे अर्थ तर शोधाल; पण त्या शब्दांचा पोत आणि ज्या वातावरणात त्यांना रुजू घातलं आहे, ते तुम्ही कुठून आणाल? ती मांडावळ सर्वसाधारण वाचकाच्या कल्पनेच्या पार पल्याडची आहे. शिवाय हा कवी स्वतःचं खाजगीपण प्राणपणाने जपतो. थोडक्यात, कविता समजून घेण्याचे तुमच्या परिचयाचे सर्व मार्ग इथे बंद होतात. आणि मग जो मार्ग उरतो, तो पूर्णपणे स्वतःच्या हिकमतीवर पार करावा लागतो.वाचकाला सुरुवातीला या कवितेला शरण जावं लागतं. ही पुन्हापुन्हा वाचावी लागते. तिची अद्भुत शब्दकळा अंगात भिनवावी लागते ( त्या शब्दकळेच्याच प्रेमात पडून, तिथेच ‘संपणारे’ असंख्य भक्तही मला माहीत आहेत!). हा टप्पा तसा सोपा आहे.  पुढचा टप्पा क्लिशे आहे. ग्रेसांची कविता ही ‘अनुभवावी’ लागते… असंख्य वेळा ऐकलेलं आणि वाचलेलं हे वाक्य प्रत्यक्षात उतरवणं महाकठीण काम आहे. ग्रेसांच्या कवितेशी रेझोनेट होण्यासाठी, भावनांच्या ज्या टोकाला कवी गेला आहे, त्या टोकापर्यंत वाचकाला पोचावंच लागतं. हे टोकाला पोचणं स्वानुभवांना कवितेशी जोडून-ताडून तरी साध्य होतं किंवा कल्पनाशक्तीच्या दांडग्या भरारीनं तरी. या अर्थाने ग्रेसांची कविता ही ‘भोगायची’ कविता आहे.ग्रेसांच्या कवितेत वारंवार येणारे ख्रिश्चन धर्मातले किंवा संत साहित्यामधले किंवा पौराणिक संदर्भ, संध्याकाळच्या उदास हाका आणि मिथकांनी भारलेली त्यांची एकूणच मांडावळ या एका विशिष्ट संवेदनशीलतेला आवाहन करतात. एकटेपणा, भयगंड, नाकारलेपण, अपराधीपणा, विरोधाभास, शारीर वास्तव, समर्पण, द्वैतवाद, दुभंगता, उदासी, नार्सिझम, ईडिपस कॉम्लेक्स, खाजगीपणा जपत वैश्विक होण्याची कुतरओढ… हा एक पॅटर्न जेव्हा जेव्हा वाचकाला ओळखीचा वाटतो, तेव्हा तेव्हा तो त्या कवितांशी स्वतःला जोडू शकतो. (‘राजपुत्र आणि डार्लिंग’सारख्या रूपकविता हा एक पूर्ण स्वतंत्र अनुभव. आणि ग्रेसांनी तो अर्पणही केला आहे जीएंना! हा लेख ग्रेसांच्या कवितेच्या समीक्षेसाठी नसल्याने (हे माझंच दुर्दैव) हा एक प्रकार मी बाजूला ठेवला आहे. असो.) उदा.आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतों
नदीच्या प्रवाहांत…   (वाट)किंवामी उदास बसलो आहे
या एकट ओढ्यापाशी
परतीच्या गाई मजला
कां दिसती आज उपाशी?     (गाणे)मोजके शब्द – मोजके शब्द हे कवितेचं दुसरं गूढ. सरगममधे चढत्या भाजणीतले सात सूर असतात – सा – रे – ग – म… जेव्हा एखादा गायक ‘सा’नंतर ‘रे’ लावतो, तेव्हा ते दोन स्वर एकमेकांमधे घट्ट रुतलेले नसतात, त्यांच्यामध्ये अंतराळ असतो. प्रतिभावंत गायकाला, संगीतकाराला या शब्दातीत अंतराळाचा अर्थ समजतो आणि त्याच्या योग्य वापराने ते आपलं गाणं परिणामकारकरीत्या   नटवतात. कवीचंही तसंच असतं. तो मोजक्या शब्दांमध्ये खूप काही सांगू पाहतो. त्यामुळे वाचणाऱ्याला गाळलेल्या जागा भरण्याचा उपद्व्याप करावा लागतो. मोजके शब्द वापरण्यामागे जशी (कविता) या फॉर्मची निवड आहे, तशीच ती कधी कवीची आंतरिक गरजही असू शकते. योग्य तेवढी संदिग्धता सोडली की कविता ही व्यक्तिसापेक्ष आकलनासाठी मोकळी होते. मोजके शब्द वापरण्यामागे  कधी कधी टोकदार भावना + उत्स्फूर्त मांडणी हे मिश्रणदेखील कारणीभूत ठरतं.ग्रेसांच्या कविता रूढार्थाने लघुकविता नाहीत. पण वाचताना एक सुजाण वाचक म्हणून तुम्हांला त्यांचा विस्तार करता यायला हवा. त्या कवितांमागची गोष्ट, दोन ओळींमधल्या न लिहिलेल्या ओळी, तुम्हांला दिसायला हव्यात. ग्रेसांनी जाहीर कार्यक्रमात सांगेपर्यंत ‘ती गेली तेव्हा’ या कवितेचा अन्वयार्थ ‘आई देवाघरी गेली’ असंच होतं. मग ग्रेसांनी सांगितलं तिकडेच आई गेली असं लोक समजू लागले! का यावर विश्वास ठेवायचा? ही गोष्ट एखाद्या कर्ण नावाच्या मुलाची असू शकते (हे रक्त वाढतानाही । मज आता गहिवर नाही । वस्त्रांत द्रौपदीच्याही । तो कृष्ण नागडा होता ।) किंवा आपल्या याराबरोबर पळून गेलेल्या आईचीदेखील ही गोष्ट असू शकते.किंवा “तहान” नावाची कविता-कुठल्याही क्षणी यावेसें वाटतें.
हुतात्म्याच्या समाधीवरील फुलांसारखे
मंद मधुर दिवस…
मृत्युच्या पार्श्वभूमीवर गळणारे तुझें लावण्य
कुठल्याही क्षणी प्यावेंसे वाटतें…ही कविता समजुन घ्यायची असेल तर ती वाचताना, तुमच्यासमोर एक गोष्ट उलगडायलाच हवी; एक अशी गोष्ट ज्यात प्रेमभंग आहे, ज्यात भेटण्याची ईच्छा आहे पण काही मर्यादा आहेत, ज्यात कुणी मृत्युशय्येवर आहे…प्रतीकांचे आधार- कवितेचा आकृतिबंध हा प्रतिमा, प्रतीकं आणि संदर्भ यांनी भरलेला असतो. कवितेच्या व्याकरणात फारसं न अडकता मी सोयीसाठी प्रतिमा आणि प्रतीकांसाठी एकच शब्द – प्रतीकं – वापरत आहे.ग्रेसांच्या कवितेत घोडा, हत्ती, कावळा, मोर, गाय, बगळे हे काही प्राणी/पक्षी; महाकाव्यातील व्यक्ती (उर्मिला, द्रौपदी, कर्ण, गांधारी, कुंती, कृष्ण); काही नाती – आई, सखी, मुली; काही नैसर्गिक घडामोडी – संध्याकाळ, पाऊस इ. सतत भेटत राहतात. पार ‘संध्याकाळच्या कविता’ ते शेवटच्या ‘बाई! जोगियापुरुष’पर्यंत सतत. उर्दू, इंग्रजी साहित्यातील संदर्भ जागोजागी पेरलेले असतात. यात कुठे काही मिरवण्याची वृत्ती किंवा चूस नसते, ती ग्रेसांची गरज असते.ग्रेसांची कविता जशी नादमयी आहे, तशीच ती बऱ्याच अंशी चित्रमयीदेखील आहे. तुम्ही डोळस वाचक असाल, तर कॅनव्हासवर चित्र उलगडावं तशी ती कविता तुमच्या डोळ्यासमोर उलगडते. प्रतिमांचा वापर कवितेत वाचकाच्या डोळ्यांसमोर काही चित्र उभं करण्यासाठी केलेला असतो. उदा. मेघांचे कोसळती पर्वत । दरी निनादे दूर । गाव चिमुकला वाहुन जाईल । असा कशाला पूर (पाऊसगाणे). कवितेतला प्रतीकांचा वापर हा तुलनात्मक असतो. ग्रेस मुक्तहस्ते प्रतीकं वापरतात. उदा. जशा उडती घारी(१) गगन तितुके उंच जाई । तुझ्या हंबरणाऱ्या परत फिरवी सर्व गाई(२) (कवितेचं नाव : शब्द) (१- प्रतीक, २- प्रतिमा). किंवा आवर्तांच्या नृत्यभूमीत भटकणारा एक पक्षी । तसे तुझे केस (मरलीन मन्रो).प्रतीकांच्या या खेळात मी काही नाती गृहीत धरली आहेत. कारण वाचकांनी त्यांच्याकडे निव्वळ शब्दशः रूढार्थाने बघितलं तर कवितांचं जंगल होऊन जाईल. इडिपस कॉम्प्लेक्सच्या टोकापर्यंत पोचलेलं मातृप्रेम, सखीच्या पातळीवर उतरलेली मैत्रीण, मुलीमध्ये प्रतिबिंबित होणारा इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स, उत्कट शारीर अनुभव या साऱ्या धीट भावना ग्रेसांच्या कवितेत नात्यांच्या प्रतीकांखाली खुबीने दडवलेल्या आहेत. सामान्य माणूस सहजगत्या या आवेगाने अशा नात्यांना भिडत नाही. म्हणून त्याचं नात्यांसंबंधीचं आकलन पारंपरिक राहतं आणि तो त्याच चश्म्यातून कविता वाचायला जातो. जेव्हा त्या कवितेचा पोत आणि नाती यांचा संबंध लागत नाही, तेव्हा तो हताश होतो (आणि कविता दुर्बोध ठरते!).ग्रेसांच्या कवितेत महाकाव्यातील काही व्यक्तिरेखा पुन्हापुन्हा येत राहतात. या व्यक्तिरेखांमध्ये काही समान दुवे आहेत. उदा. उर्मिला किंवा कर्ण यांना त्यांची अत्यंत जवळची माणसं कारण न देता सोडून गेलेली आहेत. तिथे एक दुखावलेपण आहे. कुंतीच्या व्यक्तिरेखेतच एक अपराधगंड आहे. कविता वाचताना हे दुवे आपोआप उलगडायला हवेत.ग्रेसांची कविता कळत नाही असं म्हणणारा एक मोठा वाचकवर्ग इंग्रजी वाङ्मय न वाचणारा आहे. ग्रेसांची प्रतिमासृष्टी ही या वाङ्ममयाशी ओळख सांगणारी आहे. उदा. कावळा (रोजचा असूनही घरात प्रवेश नसणारा, कर्कश, नकोसा इ.), घोडा आणि साप (प्रखर लैंगिकता, पौरुष इ.). अर्थात हे सुलभीकरण होय. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही वाचताना शब्द आणि अर्थ यांची या प्रतीकांशी सरसकट अदलाबदल करावी. सहज गंमत म्हणून मोजाल, तर घोडा/ घोडेस्वार हे प्रतीक कवितांच्या निव्वळ नावांमध्येसुद्धा आठ-दहा वेळा आलेलं दिसतं; ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’मध्येच जवळ जवळ पाच वेळा.तिच्या देहाची वस्त्रदूर शरम  
माझ्या देहात आली
तेव्हा;
माझ्या घोड्यांना मी आंघोळ घातली
या झऱ्याच्या निर्मळ
पाण्याने… (पाषाणाचे घोडे)किंवाकेशरी दिव्यांची तंद्रा
प्रासाद उभा कललेला
राणीच्या स्तनगंधाचा
ये वास इथे घोड्याला (घोडा)नादमय उत्स्फूर्त मांडणी – चांगल्या शब्दांना तितक्याच ताकदीच्या संगीताची जोड मिळाली, तर त्या कवितांचं आयुष्य वाढतं. इतकंच नाही, तर तो एकूणच अनुभव वाचकांसाठी कविता सुलभ करायला मदत करतो.ग्रेसांच्या छंदयुक्त कवितेला मुळातच एक नाद आहे. हा नाद अस्पष्ट स्वरूपात का होईना, पण तयार कानांना ऐकू येतो. त्याला ठोस स्वरूपात आणायला प्रयोगशील प्रतिभावंत संगीतकार हवा. असे प्रयोग त्या कवितांना एक कायमचा आकार देऊन, वाचकांचं काम हलकं करतात. हृदयनाथांनी ‘निवडुंग’मध्ये हे असं काम करून ठेवलं आहे. ग्रेसांचे कातर शब्द, हृदयनाथांचा विरक्त आवाज आणि हृदयाला हात घालणाऱ्या रचना; वाचकांसमोर ‘घर थकलेले संन्यासी’ किंवा ‘ती गेली तेव्हा’ यांसारख्या कवितांचं एक श्राव्यचित्र उभं करतात.संगीताच्या सारणीतून झरणारी कविता वाचकाला अचानक भेटण्याची शक्यता दाट असते. त्यात चंद्रकांत काळ्यांनी ग्रेसांचेच ललितलेख वापरून त्या कवितांभोवती एक सूत्र मांडण्याचा अचाट उपक्रम केला. ग्रेसांच्या अनवट कवितांसाठी आनंद मोडकांनी तितक्याच अनवट चाली ‘साजणवेळा’मध्ये बांधल्या आणि त्या कवितांना मंगेशकरांच्या बरोबरीनं न्याय दिला. मुकुंद फणसळकरांचा स्वमग्न आवाज आणि माधुरी पुरंदरेंच्या आवाजातला विक्षिप्त टोकदारपणा, ‘साजणवेळा’मधून ग्रेसांची कविता अगदी अलगद वाचकांच्या झोळीत आणून सोडतात.ग्रेस मला आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर भेटले, जिथं निवांतपण आणि गलबला एकाच वेळी पेलावा लागला आणि दोन टोकांवरचं जगणं त्यांच्या कवितांमुळे किंचित सुकर झालं. ग्रेसांसाठीचं एक जुनं टिपण सापडलं –नाकारीत जून शकुनांना
गहिवरली संध्यासखी कळी
ना दिठीत रुजती शब्द
पण उघडी काळीज झोळीग्रेस वाचायचा असेल तर त्यांचे पहिले तीन कवितासंग्रह जरूर वाचा. त्यानंतर माणिक गोडघाटे लोकांसाठी व्यासपीठावर उपलब्ध झाले आणि कुठेतरी एका कवीची तपश्चर्या भंग झाली. त्यानंतर उरला तो निव्वळ शब्दांचा झगमगता पिसारा आणि काही हट्टी दुराग्रह. ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ हा ग्रेसांची परंपरा जपणारा शेवटचा कवितासंग्रह. ग्रेसांच्या प्रतिमासृष्टीला समजून घेण्यासाठी ‘चर्चबेल’ आणि ‘मितवा’मधले ललितलेख नक्कीच मदत करतात, पण तो अट्टहास नसावा.कविता हा आयुष्यभराचा छळवाद असतो. काही कविता पुनःपुन्हा वाचाव्या लागतात, रोजच्या जगण्यात असा एखादा क्षण येतो, जिथे कवितेतल्या नेमक्या ओळींची अनुभूती येते आणि त्या वेळी ती कविता नव्यानेच भेटते.॥गोरखधंदा॥गंभीर कविता मी पहिल्यांदा १९९२ मध्ये लिहिली, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात. घरापासून लांब असण्याचं निमित्त नव्हतं, वायफळ मजा चालायच्या हॉस्टेलवर. पण ते जग उथळ आणि गुदमरून टाकणारं होतं. व्यवहाराला चिकटून येणारे सर्व गुण त्या जगात होते. संवेदनशील माणसाची वीण नकळत उसवून टाकण्याची अजब रीत असते अशा वातावरणाची. आपलं जग आणि ‘ते’ जग यांतला असा गुंता सोडवायचा तर चिवट मुखवटे लागतात. दोन टोकांना निभावण्याच्या या कसरतीत कुठेतरी कविता उगवून आली. भिडस्त माणसालाही कधी तरी बोलावंसं वाटतंच ना? स्वगतांच्या कविता झाल्या. कविताच का? कदाचित कवितांचं क्रिप्टिक स्वरूप असेल, कदाचित त्या सर्व आवेशाला पेलू शकणारा कविता हाच एक फॉर्म असेल; पण  आपला पिंड कवीचा हा तेव्हा नव्यानेच लागलेला शोध.  त्या काळी लिहिलेल्या टिपणाचा हा एक भाग : ‘मानसिक पातळीवरचे  भोगवटे हे नेहमीच दुय्यम मानले गेले आहेत. पण त्यांच्या अनावर स्फोटांची परिणती सर्जनाने आपल्याकडे वाटचाल करण्यात होते. ही मानसिक तरलता अंशरूप तरी वास्तवात आणणे ही सर्जनाची आत्यंतिक गरज असते. कारण त्या स्फोटाला सामोरे जाण्याची ताकद त्याच्यात नसते. त्याची तीव्रता कमी करण्याचे कागद हे केवळ माध्यम असते.’तेव्हाची कविता ही बऱ्याच अंशी अभिव्यक्तीतून दिलेल्या प्रतिसादासारखी.झाडे,
सारे ऋतू पानगळ मनात;
असून नसल्यासारखी अलिप्त.
खोल मुळे गाडून घट्ट उभी राहिल्यासारखी.
झाडे,
माणसांवर कलम होतात कधी,
स्वतःच्याही नकळत रुजून जातात
झाडे, मात्र वाटतात कधी कधी झाडांसारखी
(१९९२ – ‘झाडे’ कवितेतला भाग)स्वतःत डोकावून बघण्याची निकड, माणसांचं प्रतिमाभंजन, नात्यांची बदलती परिमाणं या वळणांवरून कवितेचा प्रवास बरीच वर्षं चालला. कधीतरी टोकं थोडी बोथट झाली, स्वीकारा-नकारात समजूतदारपणा आला आणि कवितेत एक स्वल्पविराम आला. तोही बरीच वर्षं पुरला.
एका अर्थानं ते बरंही होतं. कवितेवरचे प्रभाव, कवितेची विचार करण्याची पद्धत आणि एकूणच कवितेचं उभं राहणं यांत थोडे बदल करता आले. लोक काहीतरी सांगण्याकरिता लिहितात, मला लपवण्यासाठी लिहायचं असायचं. त्या टोकापासून, ते ‘The more personal it is, the more universal it becomes.’ या टोकापर्यंत कवितेनं एक दीर्घ झोका घेतला.पाण्याचे गोत्र निराळे
ते तहानलेले ओले
प्रतिमा वाहून नेताना
झाडास पुसे ना बोले
प्रतिमांचे साजण ओझे
झाडे जळता झुकली
माशांचे रडणे पाहून
पण झाडे भ्रमिष्ट झाली(२००९ – ‘झाडे भ्रमिष्ट झाली’ कवितेतला भाग)


कवितेचं सुचणं ही माझ्यासाठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एखादी प्रतिमा, दॄश्य, शब्द, संगीताचा तुकडा, अनुभव रेंगाळत राहतो, तळ ढवळतो. त्या आकारहीन प्रतिमेला (प्रतिमाच ना? एक तरंग असतो निव्वळ.) अर्थाच्या नेमक्या छटेत बंदिस्त करण्याचा एक अगम्य अट्टहास केलाच, तर ती कवितेच्या जन्माची सुरुवात असते.हैरान हूं इस बात पे, तुम कौन हो क्या हो?
हाथ आओ तो बुत, हाथ ना आओ तो खुदा हो
तुम एक गोरखधंधा होअर्थाचा साचा सापडला(च) तर शब्दांचे पोत न्याहाळत बसावं लागतं, गण-मात्रा-वृत्तांचे हिशेब ही निव्वळ उत्क्रांतीनंतरची गोष्ट आहे. हा विदेही ते सदेही प्रवास काही क्षणांचा असू शकतो किंवा अनंत काळचा. (‘सखीचे किनारे । असे पावसाळी । जसा बुद्ध । डोळ्यातुनी हासला’ या ओळी लिहिल्यानंतर पुढची पूर्ण कविता लिहायला कैक वर्षं लागली). आपलं कवीपण या काळात जपणं ही तशी जोखमीची बाब. त्या नंतरच्या प्रक्रियेशी माझा कवी म्हणून फारसा संबंध नसतो. कविता कुठेतरी प्रसिद्ध व्हावी ह्याबाबत मी ठरवून उदास असतो (नपेक्षा ब्लॉग बरा). कुणीतरी ती वाचावी हे उत्तम, पण त्यावर चर्चा करावी हे महापाप.
  
कवितेच्या छापून येण्याशी कुणी कवी असण्या-नसण्याचा काही संबंध नसतो, नसावाही. कवीपणाचा माज मात्र मिरवता आला पाहिजे.***संदर्भ:
ग्रेसांचे काव्यसंग्रह :
संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)
बाई! जोगियापुरुष (२०१३)ललितलेखन
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)

ओल्या वेळूची बासरी (२०१२)
***

चित्रश्रेय : ऋतुजा
चित्रातले शब्द : संजीवनी बोकील
Uncategorized

नवं जग, नवी कविता : उत्तरआधुनिकतेचं नमन

– विश्राम गुप्ते***
उत्तरआधुनिक जग आणि त्या जगातली कविता यांचा वेध घेणारं ‘नवं जग नवी कविता’ हे विश्राम गुप्ते यांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. वाचकाला चिरपरिचित असणारं कवितेचं प्रारूप इतकं आमूलाग्र बदलतं आहे, कारण ते बदललेल्या काळाचं अपत्य आहे. काळ आणि कविता यांच्यातलं हे नातं उलगडणारा निबंध म्हणजे प्रस्तुत पुस्तक. त्या पुस्तकातला अंश प्रसिद्ध करतो आहोत.प्रकाशनाला संमती देणार्‍या लेखकाचे आणि ‘संस्कृती प्रकाशना’चेही आम्ही ऋणी आहोत.
***  नव्या जगातली नवी कविता वाचताना नव्या जगाचं स्वरूप समजावून घेऊ या. ह्या जगात मिडिया, मार्केट, मनी, मॅनेजमेंट आणि मेडिटेशन ह्या पाच मकारांचं प्राबल्य वाढतंय. हे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कमी होणार नाही. नवी कविता ह्या पाच मकारांचा कलात्मक आणि संकल्पनात्मक हुंकार आहे. नवं जग जुन्याच्या तुलनेत समजावून घ्यायला अधिक कठीण गोष्ट आहे. म्हणून नवी कविता समजावून घेताना आपल्याला नव्या जगाचे हे मकारात्मक संदर्भ लक्षात ठेवायचे आहेत. प्रस्तुत निबंध जसा नव्या कवितेबद्दल आहे, तसाच तो नव्या जगाबद्दलसुद्धा आहे. ह्या कवितेबद्दल बोलताना नव्या जगाचे, म्हणजेच जागतिकीकरणाचे संदर्भ अटळ आहेत. जग आणि कविता हे नातं आई-मुलासारखं जैविक असतं. जशी आई तसं मूल. जसं जग, तशी कविता. जसा अनुभव तशी अभिव्यक्ती.’श्री चावुण्‍डराजें करवियलें’ ह्या त्रोटक वाक्याने लिखित मराठी साहित्याचा इतिहास सुरू झाला असं म्हणतात. म्हैसूरजवळ श्रवण-बेळगोळा इथला गोमतेश्वराचा भव्य पुतळा राचमल्ल गंग ह्या राजाच्या चामुण्‍डराय नावाच्या प्रधानाने करवून घेतला. त्याची जाहिरात व्हावी म्हणून त्याने हे वाक्य दगडावर कोरून घेतलं. हाच मराठीचा पहिला शिलालेख. हा शिलालेख आजपासून सुमारे साडेआठशे ते नऊशे वर्षांपूर्वी लिहिला गेला आहे. त्याचा उद्देश दात्याच्या दातृत्वाची द्वाही फिरवणे आहे.भाषेचा प्रमुख उद्देश संदेशवहन असला तरी तिचा दुय्यम उद्देश जाहिरातबाजी किंवा ’सेल्फ प्रमोशन’ही असतो. हे केवळ आजच्या म्हणजेच उत्तरआधुनिक संवेदनशीलतेचंच व्यवच्छेदक लक्षण नाही, तर ते लक्षण प्राचीन काळात म्हणजे सुमारे एक हजार वर्षांपूर्वीसुद्धा आढळून येतं. मराठीतला पहिला शिलालेख चामुण्‍डरायाचा ‘ब्रँड’ प्रमोट करणारा आहे. लिखित मराठी वाङ्मयाची – त्यात कवितेचाही अंतर्भाव होतो – कथा प्राचीन शिलालेखांपासून सुरू होते. मराठीच्या ह्या शिलालेखांत सार्वजनिक स्वरूपाच्या व्यावहारिक म्हणजेच रुक्ष नोंदी आढळून येतात. आजतागायत शोधल्या गेलेल्या अर्धा डझन शिलालेखांपैकी एकावरही कवितेची एकही ओळ नाही.एकविसाव्या शतकातल्या मराठी कवितेची अभिव्यक्ती आणि व्याप्ती समजून घेण्यापूर्वी तिची उत्क्रांती समजावून घेणं मनोरंजक ठरतं. जिला ‘खणखणीत’ म्हणता येईल अशी मराठीतली आद्य अभिव्यक्ती कवितेच्याच माध्यमातून झालेली आहे. मराठीतल्या सकल संतकवींचा हा सृजनानंद ज्ञानेश्वरांच्या अद्भुत प्रतिभाविलासानंतर क्रमाने वाढत चाललाय की घटत चाललाय ह्या प्रश्नाचं उत्तर एकविसाव्या शतकात लिहिलेल्या मराठी कवितेच्या संदर्भात देणं रोचक असेल.तेराव्या शतकापासून सुरू झालेला मराठी कवितेचा हा उत्कट आणि भावरम्य प्रवास जागतिकीकरणाच्या संपूर्ण कह्यात गेलेल्या एकविसाव्या शतकात नेमका कुठल्या पडावावर येऊन थांबलाय, आणि इथून तो प्रवास पुढे कुठच्या दिशेने होणार आहे ह्याची कथा (narrative) मनोरंजक असू शकते. ही कथा जितकी थेट, होईल तितकी हसतखेळत सांगण्याचा प्रस्तुत निबंधाचा इरादा आहे. चालू काळ व्यामिश्र भावस्थितींना जन्म देणारा रोचक काळ आहे. त्याला चिंताक्रांत, लांबोड्या चेहर्‍याने सामोरे न जाता तो हसतखेळत समजून घेता येतो अशी प्रस्तुत निबंधाची भूमिका आहे. गांभीर्याची दुसरी बाजू हसरी असते.साहित्यिक कृतींच्या आकलनासाठी ’गांभीर्य’ हे मूल्य विसाव्या शतकापर्यंत वैध होतं. कारण तोपर्यंत भाषेतून व्यक्त होणारा अर्थ बर्‍यापैकी ’स्थिर’ स्वरूपाचा होता. जागतिकीकरणानंतर ह्या अर्थालाच ’अस्थिरतेचं’ ग्रहण लागलं. जागतिकीकरणाने रूढ केलेली नवी नैतिकता नि:संशय, निखालस किंवा निरपेक्षतावादी तत्त्वांवर आधारलेली नाही, तर ती सापेक्षतावादी मूल्यांवर आधारित असल्याचा एकूण प्रत्यय येतो. ह्या नवनैतिकतेला आत्मसात केलेल्या नव्या शतकाने आधीच्या वीसही शतकांपासून तात्त्विक आणि मानसिक काडीमोड घेतल्याचेही दिसून येतंय. त्यामुळे सुमारे आठशे ते हजार वर्षांची   स्थिर मूल्यपरंपरा चालू शतकात शीर्षासन करताना दिसून येते. प्रस्थापित मूल्यांची ही विपरीत करणी चालू काळातलं सर्वाधिक मोठं आव्हान आहे हे फक्त कवीच नव्हे तर कवीतरसुद्धा मान्य करतील.गेल्या वीसबावीस वर्षात झालेली आय.टी. क्रांती, त्यातून मानवी मनावर प्रस्थापित झालेली इलेक्ट्रॉनिक मिडियाची अधिसत्ता आणि त्यातून बदललेलं मानवी मन हे चालू काळासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. माध्यम (media) क्रांतीमुळे हजार-दीड हजार वर्षं रुजलेल्या स्थिर मानवी वर्तणुकीच्या साच्यांना नवे पर्याय निर्माण झालेत. मिडियाच्या प्रादुर्भावामुळे मानवी वर्तणुकीचे नवे आविष्कार जन्माला आलेत, नवे विभ्रम रूढ झालेत आणि नवी मूल्यव्यवस्था रूजू लागली आहे. मानवी जाणीव (conscience) आणि नेणीव (sub-conscience) दोन्हीमध्ये इलेक्ट्रॉनिक मिडियाने घुसखोरी केली. त्याचा परिणाम म्हणजे, व्यक्तिगत आणि पर्यायाने सामुदायिक मनाची स्वायत्तताच हरवली. समाज टेलिव्हिजनचं ऐकू लागला. चौकोनी चेहर्‍याचा टेलिव्हिजन सेट आपला फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड झाला. नव्हे, तो सर्वव्यापी ईश्वर झाला.रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट, मोबाईल इत्यादी मिडियाच्या सर्वव्यापी सत्तेमुळे आणि जगणं उलटंपालटं करणार्‍या ह्या मिडियाच्या विलक्षण संस्कारांमुळे काव्य, शास्त्र आणि विनोदाच्या प्रांतात अनोखे वारे वाहू लागले आहेत. थोडक्यात, पारंपरिक हळवी मराठी कविता धीट होऊ लागली आहे. जागतिकीकरणानंतर लिहिल्या गेलेल्या ह्या नव्या कवितेचा, पारंपरिक – म्हणजेच स्वस्थ आणि सुस्त – वाचकांना सांस्कृतिक धक्का बसू शकतो. सांस्कृतिक धक्के सगळ्यांनाच पचवता येत नसतात. त्यामुळे असे धक्के देणारी कविता दुर्लक्षित ठेवली तर बरं असं सामान्य वाचकांना वाटू शकतं. कुठल्याही काळात नव्याला विरोध ही स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया असते. पण हा विरोधही कालांतराने मावळतो. नवं अखेरीस जुनं होऊन नव्या नव्याची चाहूल लागते. हा कालचक्राचा नियम आहे. ह्या नियमासमोर आपण सगळेच, इन्क्लुडिंग कवी, हतबल आहेत.आज आपण जगतोय ते जग जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे अभूतपूर्व खुलं म्हणून अस्थिर झालं आहे. खुलेपणा किंवा लिबरलिझम आभाळातून पडत नसतो. त्यासाठी निर्ढावलेल्या परंपरेशी वाटाघाटी कराव्या लागतात. जुनं सोडून नव्याचा पाठलाग करावा लागतो. जुन्यात स्थैर्य असतं, नव्यात मात्र अस्थैर्य आणि टेंशनच असतं. हे टेंशन किंवा anxiety म्हणजेच भविष्याबद्दल भय आपल्या काळाची प्रमुख ओळख होऊ पाहतंय.जुनं संपलं, पण नवं सुरू होत नाही ह्या सस्पेन्सयुक्त अवस्थेत मनं चिंताक्रांत आणि भयभीत होतात. ह्या मानसिक अवस्थेत जुन्याचं पुनरुज्जीवन करावसं वाटतं. पण तेही धड होत नाही आणि नवंही धड पचवता येत नाही ह्या संभ्रमित अवस्थेत जगणार्‍या समाजाला जागतिकीकरणोत्तर समाज म्हणतात. हा संभ्रम न संपणारा आहे तेव्हा त्याचा बाऊ न करता आपण जागतिकीकरणाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक आशयात, नव्या कवितेचं कारण, तिचा उद्देश आणि तिची दृष्टी नेमकी काय आहे ह्याची सर्वांगीण चौकशी करून बघू या.
एक गोष्ट निश्चित आहे. जागतिकीकरणामुळे आपल्या सभोवताली अनोखा आणि अनपेक्षित अवकाश तयार झालेला दिसतोय. ह्या अवकाशात जसे मानवी स्वभावाचे नवे विभ्रम दिसून येतायत, तसेच कलेचे नवनवे आविष्कारसुद्धा रूजू बघतायत. ह्या आविष्कारांचा तसेच नव्या मूल्यांचा ज्ञानाच्या हरेक क्षेत्रात प्रसार होतोय. साहित्य, समीक्षा, कला आणि उपभोगाच्या क्षेत्रात जेव्हा नवी विचारसरणी रूढ होऊ लागते तेव्हा मानवी वर्तणूक, विचार, आचार इत्यादीचे नवे साचे निर्माण होतात. साहित्याची नवी व्याख्या तयार होऊन त्याच्या आकलनात ’गांभीर्या’सोबत ’खेळकरपणाचा’सुद्धा अंतर्भाव होऊ शकतो.मूलत: आर्थिक म्हणजेच भौतिक आशय घेऊन येणार्‍या जागतिकीकरणाने जगभरातल्या सांस्कृतिक म्हणजेच अधिभौतिक अवकाशांमध्ये (cultural pockets) खळबळ निर्माण केली. त्यामुळे देशोदेशी सर्वमान्य असलेल्या सांस्कृतिक समजुतीअपसमजुतींमध्ये नवी संशोधनं होऊ लागली आहेत. किंबहुना आज अशी कालानुरूप संशोधनं करणं नव्या सांस्कृतिक प्रवक्त्यांना भाग पडलं आहे.कुठल्याही काळातला कवी त्या काळातला सांस्कृतिक प्रवक्ता असतो. ह्या कवीच्या प्रवक्तेपणाचा पाया ज्या गृहितांवर आधारित होता, त्या गृहितांना जागतिकीकरणाने जबरदस्त हादरा दिलेला आहे. ह्या हादर्‍यांचे विविध पदर उलगडवून सांगणे आणि त्या अनुषंगाने नव्या कवींच्या रचना जोखून बघणे हे ह्या निबंधाचं ध्येय आहे.काळासोबत राहायचं असेल तर अंतर्यामी वसत असलेल्या पारंपरिक मूल्यव्यवस्थेत ’स्ट्रक्चरल अ‍ॅडजेस्टमेंट्स’ आणि अमेंडमेंट्सना सध्यातरी पर्याय दिसत नाही. मग तो कवी असो की कवितेचा वाचक, चित्रकार असो की चित्राचा आस्वाद घेणारा रसिक, लेखक असो की समीक्षक आणि सत्ताधीश असो की त्याला सत्तेपर्यंत पोहोचवणारा मतदाता नागरिक, ही अंतर्यामीची ’स्ट्रक्चरल अ‍ॅडजेस्टमेंट’ अटळ आहे.बदलता काळ माणसाच्या भावविश्वात उलथापालथ करणारा ८.३ रिक्श्टर स्केलचा भूकंप आहे. ह्या भूकंपात माणसांची जुनी घरं नष्ट होतील हे नक्की, पण त्या घरात राहणार्‍यांच्या मनांची उभारी नष्ट होऊ द्यायची नसेल तर प्रत्येकाला स्वत:ची जाणीव आणि नेणीव चालू काळाशी सुसंगत ठेवावी लागणार आहे. ही कालसापेक्ष जाणीव फक्त तगून राहाण्यासाठीच नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठीसुद्धा उपयुक्त होईल असंही प्रस्तुत निबंधाचं प्रतिपादन आहे.काळ बदलला आहे. तो बदलत आहे. तो पुढेही बदलणार आहे. काळाबद्दल केवळ ही तीन विधानंच खातरीपूर्वक करता येतात. जुन्या काळाच्या गर्भातून नवा काळ जन्मतो ह्या घासून गुळगुळीत झालेल्या पारंपरिक समजुतीवर आधारलेलं काळाचं स्थिर ‘मॉडेल’ एकविसाव्या शतकात जुनं म्हणून गैरलागू झालेलं दिसतंय. त्या ऐवजी नवोत्तर काळाला समजून घेणारं काळाचं पर्यायी ‘मॉडेल’ प्रस्थापित होऊ बघतंय. ह्या नव्या मॉडेलची खुबी म्हणजे ते अतोनात परिवर्तनशील आहे. एखादा ’काऊच पोटॅटो’ (टिव्ही अ‍ॅडिक्ट) ज्या वेगाने रिमोटचं बटण दाबून चॅनेल हॉपिंग करतो त्यापेक्षाही जास्त वेगाने भोवतालचा काळ बदलत चाललाय. त्याला समजावून घेणं हे नव्या कवितेसमोरचं मोठं आव्हान आहे. काळाचं हे नवं किंवा नवोत्तर ‘मॉडेल’ जुन्या, पारंपरिक काळाला ठार मारून उभं ठाकलंय हा प्रस्तुत निबंधाचा युक्तिवाद आहे.व्यापक सांस्कृतिक नजरेने बघायचं झालं तर असं म्हणता येईल की अंदाजे वीस शतकांनी युक्त अशा एका पारंपरिक काळाचा आज ‘अंत’ झाला असून त्या जागी नव्या अपारंपरिक काळाचा उदय झाला आहे. ह्या अपारंपरिक काळात जुनी मूल्यव्यवस्था गैरलागू ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याऐवजी नवी मूल्यव्यवस्था रूजू बघतेय. कवी संस्कृतीचा प्रवक्ता असल्याने सांस्कृतिक मूल्यव्यवस्थेवर सखोल चिंतनाची त्याच्याकडून अपेक्षा असते. ह्या चिंतनाच्या गाभ्यात जागतिकीकरणाने अभूतपूर्व बदल घडवून आणलेले दिसतात. मूल्यव्यवस्थेच्या संदर्भात सांगायचं झालं तर हे एकविसावं शतक उपटसुंभासारखं अवतरलेलं आहे. त्याचा गेलेल्या वीस शतकांशी फारसा संबंध नाही असं भीत भीत का होईना, पण नोंदवावसं वाटतं.पंधरा वर्षांपूर्वी अंत पावलेल्या विसाव्या शतकाचं एकविसाव्या शतकाशी नातं आहे का? आलेल्या नव्या शतकाचा गेलेल्या दहाबारा शतकांशी काही तार्किक, ऐतिहासिक, भावनिक आणि जैविक संबंध आहे की नाही? असा तात्त्विक संभ्रम पैदा करणार्‍या ह्या एकविसाव्या शतकाला ‘नवोत्तर जाणीवेचं शतक’ म्हणण्याचं स्वातंत्र्य हा निबंध घेणार आहे. एकविसाव्या शतकात ही नवोत्तर संवेदनशीलता (new sensibility) जन्म घेतेय. संवेदनशीलता म्हणजे अनुभवाला दिलेला सौंदर्यवादी, मूल्यगर्भ आणि भावनाशील प्रतिसाद (gut reaction) असते. जागतिकीकरणोत्तर नव्या कवींची ही गट रिअ‍ॅक्शन नेमकी काय आहे? हे तपासून बघणं ह्या निबंधाचं एक ध्येय आहे.अनुभव बदलला की संवेदनशीलता बदलते. जागतिकीकरणपूर्व काळातला सामाजिक-सांस्कृतिक आणि जागतिकीकरणोत्तर कालखंडातला सामाजिक-सांस्कृतिक अनुभव भिन्न असल्याने त्यांना दिलेला अभिव्यक्त्तीचा प्रतिसाद भिन्न असणं स्वाभाविक आहे. विसाव्या शतकातली संवेदना जर ’नवी’ होती हे आपण मान्य केलं तर एकविसाव्या शतकातल्या संवेदनशीलतेला ’नवोत्तर’ म्हणण्यात काहीच गैर नाही. ह्या नवोत्तर मूल्यरचनेचं सार्वजनिक बांधकाम आज सर्वत्र जोरात सुरू आहे. त्यामुळे होणारं नैतिकतेचं ट्रॅफिकजॅम आपली डोकेदुखी ठरली आहे. त्यावर झटपट उपाय दिसत नाही.भारतासारख्या उतरंडप्रिय (hierarchical) समाजात, जिथे सगळा भर जन्मावर आधारित अधिकार, वर्णाधिष्ठित कर्मकांड आणि घोकंपट्टी संस्कारांवर असतो, त्या समाजात नव्या मूल्यरचनेचे बांधकाम अहोरात्र सुरू आहे. ह्या मूल्यरचनेतून अभूतपूर्व मानसिक ताणतणाव निर्माण होऊ लागले आहेत. जुन्या मूल्यांची उत्क्रांती होतेय. मानसिक स्थैर्य, जेष्ठांबद्दल धाक, चिरंतन मूल्यांबद्दल आदर, इतिहासाबद्दल रम्य समजूत ह्या जमीनदारी अवस्थेत रूजण्यार्‍या मूल्यांची सद्दी संपत आली की काय? ही शंका येतेय. त्याऐवजी लोकशाही आणि समतेवर आधारित नव्या मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना होण्याची शक्यताही वाढतेय.जागतिकीकरणोत्तर एकविसाव्या शतकात जगभरात पारंपरिक सामाजिक उतरंड मोडली जाऊन त्या ऐवजी एक आडवी (horizontal) समाजव्यवस्था अस्तित्वात येतेय. ही गोष्ट खेदजनक नाही तर आनंददायक आहे असं पोस्टमॉडर्निझमचं तत्त्वज्ञान सांगतं. ह्या जागतिक पार्श्वभूमीवर भारतातसुद्धा उतरंडीची समाजव्यवस्था आडवी होतेय का, हा प्रश्न विचारता येतो. त्याला गंमतीदायक उत्तर असं आहे: भारतात आडवी समाजव्यवस्था येऊ घातली तरी सध्या ही पारंपरिक उतरंड कललेली दिसते. भारतात आज उभी नाही आणि आडवीही नाही तर ’तिरपी’ समाजव्यवस्था दिसून येतेय.’अल कायदा’ आणि ’तालिबान’ काहीही म्हणोत, सत्य हे आहे की जागतिकीकरणानंतर जगभरातले मानवी समाज कालच्या तुलनेत आज अधिक लिबरल, अधिक मोकळे आणि अधिक उपभोगप्रवण झाले आहेत. भारतसुद्धा ह्या नियमाला अपवाद नाही. ह्या आडव्या म्हणजेच समतेचं सूचन करणार्‍या समाजव्यवस्थेला फ़ारसं परिचित नसलेलं पारंपरिक भारतीय मन त्यामुळे पुरतं भांबावून गेलेलं दिसतं. त्यातून पैदा होणारा सामुदायिक संभ्रम, राग, चिंता, मानसिक ताण आणि हिंसा दिवसेंदिवस आडव्या होऊ बघणार्‍या समाजरचनेची ओळख ठरू लागलीय. आज तरी नव्या जाणीवेच्या कवींसमोर आडवी समाजरचना एक कलात्मक अव्हान आहे. कारण आपली कविता, आपलं साहित्य, प्रस्थापित कला ही मुळात उभ्या (vertical) समाजरचनेत आकारास आली होती. त्यामुळे ती प्रकृतीने पारंपरिक आणि वृत्तीने कंझर्वेटिव्ह होती. नव्या वातावरणात हे समीकरण बदललं आहे हा प्रस्तुत निबंधाचा युक्तिवाद आहे.लॉरेन्स एम. फ़्रिडमनच्या ’द हॉरिझॉंटल सोसायटी’ ह्या विख्यात पुस्तकात आडव्या समाज रचनेबद्दल विस्तृत विवेचन केलं आहे. ते थोडक्यात असं: आधुनिक तंत्रज्ञानाने मानवी अस्मितेची कल्पना कमालीची बदलून टाकली. तंत्रज्ञान क्रांतीमुळे आपलं एकूणच सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवन बदललं. पारंपरिक समाजात मानवी नातेसंबंध आणि परस्परव्यवहार हे उतरंडीच्या रचनेवर आधारित होते. ह्या उतरंडीत खाली असलेल्यांना वरच्यांचं ऐकावं लागायचं. ह्या उतरंडप्रिय समाजव्यवस्थेत माणसाचं स्थान त्याच्या जन्मावरून ठरायचं. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञान क्रांतीनंतर हे बदललं. आधुनिक काळ सुरू झाला. त्यात प्रत्येक माणसाला स्वत:ची जन्मदत्त अस्मिता बदलण्याची मुभा मिळाली. आधुनिक समाजात मिडियाचा प्रभाव वाढला. त्यातून पारंपरिक मानवी अस्मितेच्या संकल्पना उलट्यापालट्या झाल्या. खर्‍या अर्थाने समताधिष्ठित समाजरचनेचं सूतोवाच झालं. सामाजिक समतेच्या शक्यता वाढल्या. हा ’खास’ नव्हे तर ’मास’ कल्चरचा प्रभाव आहे असं लॉरेन्स एम. फ्रिडमन सुचवतो.जागतिकीकरणानंतर भारतात माहिती तंत्रज्ञानाची तुफान वावटळ आली. मिडियाची म्हणजेच टेलिव्हिजनची मानवी मनावर, पर्यायाने मानवी जाणिवेवर आणि नेणिवेवर सत्ता स्थापन झाली. माणूस टेलिव्हिजनशी एकरूप झाला. तो मास कल्चरचा उपभोक्ता झाला. त्यामुळे त्याचे पारंपरिक सांस्कृतिक आग्रह सैल झाले. नवे, पाश्चात्य वाटतील असे सांस्कृतिक उपक्रम त्याला आपले वाटू लागले. तमाशा आणि वगनाट्याचा आस्वाद घेणारं मराठमोळं सामुदायिक मन टिव्हिवरच्या सोपऑपेरात गुंग झालं. कोणी काहीही म्हणो, आज भारतात हळूहळू का होईना, पण सर्वत्र आडव्या समाज रचनेची, हॉरिझॉंटल सोसायटीची पायाभरणी सुरू झाली आहे. ह्या दाव्याच्या पुष्टीसाठी रोजमर्राच्या मानवी संबंधांचं उदाहरण देता येतं. काल हे संबंध पुरेसे बंदिस्त होते, आज ते अधिक मोकळे होऊ लागले आहेत.अश्या आडव्या समाजरचनेत सनातनी मूल्यांऐवजी आधुनिक मूल्यं, स्थैर्याऐवजी सळसळ, धाकाऐवजी संवाद, जन्मदत्त अधिकारांऐवजी मानवी अधिकार आणि रम्यतेऐवजी प्रखर वास्तवतेचे विकल्प उपलब्ध असतात. ह्याला मूल्यपरिवर्तन किंवा मूल्यउत्क्रांती म्हणून नव्या बदलांना समजावून घेता येतं. एकेकाळच्या धाकयुक्त सांस्कृतिक पर्यावरणावर खेळकर संवादाचा अंमल सुरू होतोय. घट्ट नाड्या सैलावतायत. गोठलेली मनं वितळतायत. सनातनी प्रवृत्तीला सहनशीलतेशी तडजोड करावी लागतेय. ‘जगा आणि जगू द्या’ आणि ‘हजार गुलाब फुलू द्या’ ही सर्वसमावेशक मानसिकतेला अधोरेखित करणारी दोन वाक्यं उत्तरआधुनिक काळाच्या भिंतीवर चितारलेली दिसतायत. ‘वेलकम टू पोस्टमॉडर्न टाईम!’. आडव्या समाजव्यवस्थेत तुमचं स्वागत आहे हेच जणू काही नवा काळ कवी आणि कवीतरांना ओरडून सांगतोय. काळाचा हा आवाज ऐकणं आणि त्याचा अन्वयार्थ लावणं हे ह्या निबंधाचं प्रयोजन आहे.ह्या काळात म्हणजे, उदाहरणार्थ २०१५ साली, मराठी कवितेच्या सांस्कृतिक पर्यावरणात संकल्पनांचा संकर घडून येतोय. म्हणून नवोत्तर कवितेला समजावून घेणं बौद्धिकदृष्ट्या रोमांचकारी ठरतंय. जर कवितावाचनाची आणि आकलनाची खेळकर शैली रूढ केली, आणि कवितेला जोखताना तिच्याकडे केवळ एक साहित्यिक अभिव्यक्ती म्हणून न बघता कवितेसोबत तिचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक आणि तात्त्विक पर्यावरण विचारात घेतलं तर त्या कवितेचा अर्थ प्रसरण पावतो ही प्रस्तुत निबंधाची भूमिका आहे. थोडक्यात, कवितेच्या आकलनात इंटरडिसिप्लिनरी अ‍ॅप्रोच लागू केला तर त्या कवितेचा आशय व्यापक होण्याची शक्यता आहे. ही शक्यता जोखून बघणार्‍या परंपरेने चालत आलेल्या जुनकट आस्वादनाच्या आणि अर्थांतरणाच्या पद्धतीला नवे पर्याय सुचवावे लागतात. तसा एक प्रयत्न ह्या निबंधात करण्याचा इरादा आहे.

***
Uncategorized

कवी-बिवी लिहितात-बिहितात…

– प्रणव सखदेव
आज आपण २०१५ सालात आहोत. आभासी – व्हर्च्युअल जग आणि वास्तव जग, अशा दोन्ही जगांचे फोर्सेस आपल्यावर कळत-नकळत अप्लाय होत आहेत. आपण ते फोर्सेस पचवतो, स्वीकारतो, नाकारतो आहोत. आजचं जग आहे, इंटरनेटचा प्रचार-प्रसार झालेलं, आणि मोबाइल फोन आणि आता अॅपक्रांती झालेलं. सोशल किंवा व्हायरल मीडियाचं. टीव्हीचं, सिरियल्सचं. आणि अशा जगात आजही मराठी कविता उदंड लिहिली जाते आहे, नव्हे तर मराठी कवितेच्या नदीचा पात्रविस्तार हा दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसतो आहे. दर्जाच्या दृष्टीने हा विस्तार किती गुणात्मक आहे; हा वेगळा अभ्यासाचा विषय असला, तरी पात्रविस्तार होतानाच दिसतो आहे हे मात्र नक्की.
याची कारणं बरीच असतील. त्यातलं मला महत्त्वाचं वाटणारं एक कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत शिक्षणाचा आणि इंटरनेटचा झपाट्याने झालेला प्रचार-प्रसार हे होय. त्यामुळे आपलं जग, आपले अनुभव आदी गोष्टी व्यक्त करण्यासाठी ग्रामीण किंवा ज्यांना याआधी अभिव्यक्तीच्या फारशा संधी उपलब्ध नव्हत्या, अशांना शिक्षणामुळे एक्स्पोजर मिळालं. लोकशाहीकरण झालं. याशिवाय आणखी एक कारण कविता या साहित्यप्रकाराची वैशिष्ट्यं हेही आहे. तो कथा-कादंबरीपेक्षा तुलनेने छोटा प्रकार आहे आणि त्यात स्वप्रकटनावर जास्त भर आहे. कष्ट व बैठक कमी आहे. शिवाय उत्स्फूर्तता हा त्याचा पाया मानला गेल्याने (माझे मतभेद आहेत यावर!) भावनेचा उद्गार(बिद्गार) असंही समीकरण रूढ झालं आहे, जे प्रत्यक्षात उतरवणं सोपं; किंवा ज्याची भाषेवर बर्‍यापैकी कमांड आहे, तो योग्य ओघ राखत ते सहजगत्या सांगू शकतो. (कारण आपण तसे बाय डिफॉल्ट सेन्टी असतोच! 🙂 😉 )
मराठी कवितेच्या या नदीतून आपण मागे मागे जात राहिलो, तर थेट ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतकवींपर्यंत, नंतरच्या शाहिरी आणि पंडित कवींपर्यंत जाऊन पोहोचू. पण त्याचा आढावा आत्ता घ्यायची काहीच गरज नाही. त्यापेक्षा थोडं आधुनिक काळापासून (जो आता जुनाच वाटतो!) सुरुवात करू. केशवसुतांनी ‘तुतारी’ फुंकल्यानंतर आधुनिक कवितेचा खर्‍या अर्थाने पहिला उद्गार काढला तो बा.सी. मर्ढेकर या कवीने. (म्हणजे असं म्हटलं तरी जातं!) त्याच काळात रविकिरण मंडळाचा, रोमँटिक कवितेचा प्रवाहही होताच. मराठी कविता बहरली किंवा जीवनसन्मुख झाली ती साठोत्तरी काळात. तेव्हाच देशीवादाचाही जन्म झाला. त्यातून ग्रामीण भागातले तसंच दलित-आदिवासी कवी मोठ्या प्रमाणावर लिहिते झाले. 1990मध्ये आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाल्यानंतर जागतिकीकरण खर्‍या अर्थाने इंटरनेटच्या वायरींमधून, टॉवर्समधून, टीव्ही-मोबाइलच्या स्क्रीनमधून घराघरात पोहोचू लागलं, ‘दिसू’ लागलं, अनुभवता येऊ लागतं. त्याला नव्वदोत्तरी पिढीतल्या कवींनी भलाबुरा प्रतिसाद दिला, अजूनही देताहेत.
आणि आता 2015 साली, ज्याचा मी लेखाच्या सुरुवातीलाच उल्लेख केला, त्या साली जागतिकीकरणाची गंगा घरोघरी पोहोचून बर्‍यापैकी काळ लोटलाय. आणि हे जागतिकीकरण लहानपणापासून उपभोगत असलेली, त्याचे फायदे-तोटे घेत, किंवा सहन करत असलेली किंवा ते पाहत, अनुभवत असलेली पिढी आज कविता लिहिते आहे.
त्यामुळे या पिढीची कविता कशी आहे, या पिढीत लिहिणार्‍या कवींना काय वाटतं, त्यांच्या प्रेरणा कोणत्या, त्यांची कविता लिहिण्यामागची भूमिका, सर्जनप्रक्रिया काय आहे आदी गोष्टींबद्दल याच पिढीतला एक कवी-लेखक म्हणून मला जाम उत्सुकता आहे. म्हणून मी माझ्या पिढीतल्या काही कवींना थोडेफार प्रश्न विचारून हा त्यांच्याशी हा संवाद साधणार आहे.
सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्टपणे करतो की, या सगळ्या कवींशी आणि कवयित्रीशी केलेली चर्चा आणि घेतलेल्या मुलाखती यासाठी ईमेलचा, व्हॉट्सअॅपचा वापर केला असल्याने त्यात असलेली विखंडितता व अॅब्रप्टता ही या संवादालाच एक संलग्न असलेला, अपरिहार्य असा भाग आहे.
यात मी पाच प्रातिनिधिक कवींशी बोलणार आहे. या कवींशिवायही, बाहेरच्या जगात अनेक जण कविता लिहीत आहेत. पण आज कविता कशी लिहिली जाते आहे, याचा साधारण अंदाज येण्यासाठी मी पाच जणांशी प्रतिनिधी म्हणून संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी त्यांची नावं आणि ओळख करून देतो –
ओंकार कुलकर्णी : समकालीन कवितेत विलक्षण टोकदार, अर्थानुगामी, भाषिक संकर असलेली कविता ओंकार लिहितो आहे. त्याचा ‘मॅड स्वप्नांचे प्रवाह’ हा संग्रह प्रकाशित आहे. तो मुंबईसारख्या महानगरात वाढलेला असल्याने त्याचं अनुभवक्षेत्र महानगरीय आहे. याशिवाय तो अभिनेता, दिग्दर्शक आहे. इंग्रजी साहित्याचा अभ्यासक आहे.
वैभव छाया : वैभवही मुंबईचाच असला, तरी तो सामाजिक चळवळीतला सक्रिय कार्यकर्ता व पत्रकार आहे. त्यामुळे त्याची कविता सामाजिक भूमिका घेणारी, परिवर्तनाची आस असलेली आहे. त्याचा ‘डिलीट केलेलं आकाश’ हा संग्रह प्रकाशित झाला आहे. भाषिक संकर, टोकदार निरीक्षणं, यथार्थ वर्णनं आणि वंचित-शोषित गटांची दुःख, वर्गसंघर्ष आदी त्याच्या कवितेची वैशिष्ट्यं आहेत.
चैताली अहेर : चैतालीची कविता ही काहीशी रोमँटिक (माझं मत!) आणि स्त्री-जाणिवा व्यक्त करणारी असली, तरी ती त्यातच अडकून राहणारी नाही. शब्दनिवड व नवे शब्द घडवणं, आध्यात्मिक आशय, चिंतन, उत्कटता आणि जगण्यातली लहान-लहान निरीक्षणं मांडण्याची हातोटी ही तिच्या कवितांची खासियत म्हणता येईल. तिचा ‘विंझोळ’ हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. याशिवाय ती शिक्षिका आहे आणि ती मुलांसाठी सामाजिक कार्य करणारी संस्थाही चालवते.
सत्यपालसिंग राजपूत : सत्यपाल हा खानदेशातल्या वरणगाव या गावात राहतो, पण तो मुंबई-पुण्यातही असतो. त्यामुळे ग्रामीण भागातलं आणि शहरी भागातलं जीवन सत्यपालला नीट माहिती आहे. त्याच्या कवितेत ग्रामीण-शहरी भाषांचा संकर आणि प्रतिमा आढळतात. भाषेचा ओघ, तिचा अर्थानुगामी वापर हे सत्यपालच्या कवितेचं प्रमुख वैशिष्ट्य मला वाटतं. आशयासाठी भाषा वाकवण्याची हातोटी सत्यपालकडे आहे. पुराणातल्या मिथक-कथांचा सत्यपालच्या कवितेत उत्तम प्रकारे वापर केलेला असतो.
आणि शेवटचा कवी आहे, अजिंक्य दर्शने : अजिंक्य हा पुण्यातला, म्हणजे आणखी एका महानगरात राहणारा कवी असला, तरी मुंबई आणि पुणे या दोन्ही महानगरांमधल्या जीवनशैलीत, वेगातही बराच फरक आहे. भाषिक संकर, ठरीव व्यवस्थेपुढे प्रश्न निर्माण करणं, आपल्या सत्याचा घेतलेला शोध, आणि हा शोध घेताना निर्माण होणार गोंधळ (केऑस) ही त्याच्या कवितेची बलस्थानं आहेत. नॉनकन्फर्मिस्टता त्याच्या कवितेत दिसून येते.
वरील कवी आणि त्यांची ओळख वाचून तुम्हाला मी हे कवी का निवडले याची कल्पना आली असेलच. पण तरी थोडं स्पष्टीकरण देतो. श्रेष्ठ कवी किंवा कनिष्ठ कवी, किंवा उत्तम कवी आणि भंगार कवी अशी गुणात्मक सरधोपट परिमाणं मला तोकडी वाटतात. ते काळं किंवा पांढरं केल्यासारखं वाटतं. या दोन कॅटेगरींमध्येही बर्‍याच बारीक बारीक गोष्टी असू शकतात, असं मला वाटतं. त्यामुळे मला वेगवेगळ्या भूमिका घेऊन लिहिणारे, वेगवेगळी मतं असलेले कवी असं वर्गीकरण करावं असं वाटतं. म्हणजे ओंकार हा वेगळ्या प्रकारची कविता लिहितो, त्याचप्रमाणे वैभव वेगळ्या प्रकारची कविता लिहितो. त्यामुळे या दोघांच्या कवितांना लावायचे निकष वेगवेगळे असायला हवेत, असं मला वाटतं. कारण त्यांची जडणघडण; कविता लिहिण्यामागची प्रेरणा, भूमिका वेगळी आहे. त्यामुळे अर्थातच त्यांची कविता वेगळी आहे, आणि त्याला श्रेष्ठ-कनिष्ठत्वात न बसवता, त्या समजून घेणं, त्यांच्या मर्यादा-बलस्थानं समजून घेणं जास्त सयुक्तिक वाटतं.
यातही ओंकारच्या कवितेच्या जवळपास जाणारी अजिंक्यची कविता, ही एक वेगळीच कविता आहे. ती ओंकारच्या कवितेच्या जवळची असली, दोन्ही कवितांमध्ये फरक आहेत. आणि सत्यपालची कविता ही आणखीनच महानगरी-ग्रामीण आणि सामाजिक आशय या तीनही कवितांच्या सीमेवरची आहे. हेच चैतालीच्याही कवितेबाबत म्हणता येईल. तिची कविता थेट स्त्रीवादी कवितेत बसवता येणार नाही. कारण त्यात स्त्रीजाणिवा, अनुभव असले तरी ती तथाकथित स्त्रीवादी नाही.
एकुणातच कवितेला एकच एक ठरीव निकष न लावता, कविता कशी-कशी होऊ शकते किंवा असू शकते हे शोधणं-पाहणं-निरखणं हे मला आवश्यक वाटतं. कविता श्रेष्ठ आहे की नाही, यापेक्षा त्यात कवीने काय सांगायचा प्रयत्न केला आहे, त्याने काय फॉर्म वापरला आहे, त्याची जडणघडण काय आहे हे समजून घेणं मला जास्त सयुक्तिक वाटतं. आणि तोच प्रयत्न मी इथे करणार आहे. अर्थातच हा प्रयत्न अपुरा आहे याची पुरेपूर जाणीव मला असली तरी या निमित्ताने मला कवींच्या अंतरंगात थोडेफार का होईना डोकावता आलं आहे. आता यापुढे आपण थेट कवींशीच बोलणार आहोत.
कवी म्हणून तुम्ही स्वतःकडे कसं पाहता, या पहिल्याच प्रश्नाला पाचही कवींनी दिलेली वेगवेगळी उत्तरं मिळाल्यावर मला हुरूप आला. कारण मला एकाच एक प्रकारची ठरीव उत्तरं नको होती. दिलेली उत्तरं, मांडलेली मतं चूक का बरोबर, याचा न्यायनिवाडा तर मला मुळीच करायचा नव्हता. त्यापेक्षा कवींना काय वाटतं हे मला समजून घ्यायचं होतं.
भाषेच्या विशिष्ट अशा मांडणीतून, ध्वनीच्या-नादाच्या निवडक रचनेतून अर्थाच्या आकृत्यांचे डिझाइन तयार करून अनुभवांचं मिथ तयार करणं हे कवीचं काम असतं, असं ओंकारला वाटतं. त्याच्या या मताशी मीही सहमत झालो. तो पुढे म्हणाला, “माझ्याबाबतीत मी स्वत:कडे कवी म्हणून पाहतो, तेव्हा अर्थाच्या डिझाइनची प्रक्रिया माझ्या लेखनात कायम सजग असते. कमी-अधिक प्रमाणात सर्वच कवींच्या डोक्यात ही प्रक्रिया लिहिताना ‘ऑन’ असते. माझ्याबाबतीत मी लिहीत असताना भाषेच्या स्थापत्यशास्त्राचे बरेच प्रभाव मला सर्जनात्मक ‘टोचन’ देत असतात. हे प्रभाव भाषेच्या आकुंचन/विस्तार/प्रसरण पावण्याच्या क्षमतेमधून बाहेर पडतात आणि नेणिवेच्या पातळीवर माझ्या मनातल्या शब्द जोडणार्‍या, घडवणार्‍या कार्यशाळेत स्रवतात. या कार्यशाळेत कारक, कार्य आणि कृती हे सर्व घटक, भाषा या सार्वभौम संस्थेत समाविष्ट झालेले असतात. माझं काम एका एजंटासारखं असतं. या कार्यशाळेत काम कोण करतं? त्यात नक्की काय केलं जातं? तर भाषेवर प्रक्रिया. आणि या कार्यशाळेचं अंतिम उत्पादन काय असतं तर भाषा.”
वैभवचं म्हणणं हे राजकीय किंवा सामाजिक परिवर्तनाची भूमिका घेणारं आहे. त्याच्यामते त्याची कविता ही त्याची राजकीय अभिव्यक्ती असते, तिच्यातून तो त्याची राजकीय भूमिकाच उतरवत असतो. तो म्हणाला, “प्रत्येक कवीला स्वतःचं वर्गचरित्र असतं असं साधारणपणे म्हटलं जातं. पण प्रत्येक कवीचं जातचरित्र हे त्याच्या अथवा तिच्या वर्गचरित्रापेक्षा अधिक रखरखतं असतं. म्हणून मी जेव्हा केव्हा माझ्या कवितेतून व्यक्त होतो तेव्हा ती कविता अधिकाधिक कृतिशील कशी होईल, याचं पूर्ण भान बाळगून असतो. म्हणून मला ती जात-वर्ग-लिंगभेदाच्या लढ्यातील हत्यार वाटते. त्यामुळे कवी म्हणून या लढ्यातील मी एक कार्यकर्ता आहे, या भूमिकेतून माझ्याकडे पाहतो.”
चैतालीचं उत्तर मात्र ओंकार आणि वैभवपेक्षा वेगळं होतं. ओंकार कवीला ‘एजंट’ या नजरेतून पाहत होता, तर वैभव कवितेकडे हत्यार म्हणून. पण चैतालीचं मात्र कवीवर ‘कवी असण्याचा’ शिक्का असू नये असं म्हणणं होतं. तिने सांगितलं, “कवी म्हणून आपण असे काही वेगळं असतो, असं मलातरी वाटत नाही. कविता म्हणजे जगण्याच्या ओघात अलगद वाहत आलेल्या ओळी. त्यांना स्वत:त सामावून घेणं हेच तेवढं आपल्या हातात असतं. त्यामुळे स्वत:चा उल्लेख कधीही मी कवी म्हणून केला नाही आणि स्वत:कडे कवी म्हणूनही कधी बघितलं नाही. अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून मला कविता मिळाली आहे, ती कायम तशीच माझ्याजवळ राहील हे तरी कुठे मला ठाऊक आहे?”
सत्यपालने समाज आणि कवी वा कलावंत यांतले संबंध मांडायचा प्रयत्न केला. काही अंशी त्याचंही उत्तर हे चैतालीसारखंच होतं. तो म्हणाला,“ ’आपण कवी आहोत’ ही भावना मनात सतत जागती ठेवल्याने आपण इतर लोकांपेक्षा फार वेगळे असल्याची जाणीव कवींमध्येही आपल्याला दिसून येते. माझ्यामते ही कवी असण्याची जाणीव आपल्याला विसरता आली पाहिजे. जेव्हा केव्हा काही सुचेल तेव्हा लिहून मोकळं व्हायचं, बस्स! कुणी वाचायला किंवा छापायला मागितलं तरच त्यांना द्यायचं. या काही मोजक्या वेळा सोडून आपल्याला स्वत:ला आपण कवी आहोत याचे भान असू नये. हे भान जेवढे जागृत तेवढी कवितेतील कृत्रिमता वाढत जाते. ओढून ताणून काही विषय कवितेत येतात, ते खरंतर अनाठायी आहेत; हे खोलवर विचार न करताही आपल्याला जाणवू शकतं. सहजता हे कवितेचं फार महत्त्वाचं वैशिष्ट्य मला वाटतं.”
अजिंक्यने विषयाला थोडा वेगळा फाटा फोडला. पण तो सयुक्तिक होता. त्याच्याप्रमाणेच मीही नॉनकन्फर्मिस्ट असल्याने त्याचं म्हणणं मलाही पटलं. आत्ताचा काळ हा काही ठामपणे म्हणण्याचा नसल्याने, काही ठाम सांगणं तसं जिकिरीचंच असल्याचं त्याने सांगितलं. तो म्हणाला, “मी कवितेकडे गंभीरपणे बघायला लागलो ते फेसबुकवर पोस्ट होणार्‍या कवितांमुळे आणि त्यावर होणार्‍या साहित्यिक चर्चांमुळे! माझं काहीतरी ज्याच्यात दिसू शकतं, असं लिहिलं जाऊ शकतं आणि तेसुद्धा मला कळणार्‍या आणि वळणार्‍या भाषेत, याचं भान या कवितांनी दिलं. कवींशी माझा वन टू वन डायलॉग जसा व्हायला लागला तसं मला हळूहळू लक्षात येत गेलं की, आपल्याला पण काहीतरी सांगावंसं वाटतंय आणि त्यासाठी खूप वाचनाची नाही तर लिहून पाहण्याची गरज आहे! मग मी ते करत गेलो. माझी पहिली कविता ‘बिविता’ म्हणावी लागेल एवढी वाईट होती! कसं ते माहीत नाही, पण तिसर्‍या कवितेत मला असं वाटलं की, मला जे दिसतंय; जे आतमध्ये अडकलंय आणि जे कागदावर उतरलंय, त्यामधला फरक थोडा कमी झाला होता.
“हे जरा मजेशीर आहे की मी कविता करण्याआधी फारशा कविता वाचल्याच नव्हत्या; (पाठ्यपुस्तकातल्या वगळता) पण नंतर मात्र मला जे रिलेट होऊ शकेल किंवा होतंय असं वाटलं, असे कवी आणि अशा कविता मी वाचत गेलो. थोडक्यात उन्हात थकून आल्यावर लिंबू सरबत घेतल्यावर जशी जरा हुशारी किंवा तरतरी येते तशाच प्रकारच्या कविता वाचण्याकडे माझा कल होता. मला आत्ता विलास सारंगांची एक कविता आठवतीये ज्याने मी बरेच दिवस बेचैन होतो, शीर्षक होतं जगणं-बिगणं! त्यातल्या काही ओळी मला आठवतायत, त्या अशा होत्या –
कवी-बिवी
लिहितात-बिहितात.

 

बूट-बीट

 

झिजतात-बिजतात.

 

तारा-बिरा

 

तुटतात-बिटतात.

 

पाणी-बिणी

 

संपतं-बिंपतं.

 

वर्षं-बिर्षं

 

सरतात-बिरतात.

 

देव-बीव

 

असतो-बिसतो

 

आमच्या संवादाची सुरुवात तर चांगली झाली होती. मी माझा दुसरा प्रश्न विचारला, कवी म्हणून तुमच्या प्रेरणा व सर्जनप्रक्रिया काय असते? पोटप्रश्न – कविता सुचते कशी, त्यावर कसं काम करता, किती खर्डे करता, की जशी लिहिली तशीच ठेवता? कविता या फॉर्मकडे कसं पाहता?
कोणताही कलावंत कलाकृतीची निर्मिती नेमकी कशी होते, याचं छातीठोक नेमकं उत्तर देऊ शकत नाही. कारण ती काही एखादा पदार्थ तयार करण्याची रेसिपी नसते. त्यात अनेक गोष्टी कळत-नकळत कार्यरत असतात. पण तरी या सर्जनाच्या काही खाणाखुणा शोधाव्यात, असं मला कायमच वाटत आलं आहे. तो माझा आवडीचा विषय आहे. याशिवाय मला स्वत:ला यातला ‘किती खर्डे करता?’ या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे; कारण मी स्वतः ‘खर्डेघाशी कवी’ आहे. कविता लिहून झाल्यावर मी काही दिवस ती ठेवून देतो आणि मग तिचे खर्डे काढतो. खास करून दीर्घ कवितेचे. जे सांगायचं आहे त्याच्या जास्तीत जास्त जवळ जायचा माझा प्रयत्न असतो. कारण मला ते सांगायचं असतं, ते भाषेत मांडताना डेटा लॉस होतच असतो. तो कमीत कमी व्हावा म्हणून जास्तीत जास्त नेमकेपणा येण्यासाठी ही खर्डेघाशी पद्धत योग्य वाटते. ‘व्हायरसस्तोत्र’ नावाच्या कवितेचे मी असे अनेक खर्डे केले आहेत. एकतर त्यात मीटरमध्ये कविता बसवणं हा भाग होता, आणि कंटेटही आणायचा होता. त्यातल्या काही ओळी अशा –
रिपोर्टरूपी व्हायरसरुद्रा मारुतीची शेपटी
जाणिवा नेणिवा नसती देवदूता न-मना

 

महाबळी प्राणहर्ता  शोषती शरीरा बळे

 

सौख्य तुझे दुःख होई, ठरशी तू खलनायका

 

नेमका दिसतो कैसा याचा अंदाजच नसे

 

नुसताच वाढशी एेसा पेशीप्रोटिनावरी

 

डीएनएनाथा आरएनएनाथा प्राणघेता कधीकधी

 

वस्तू हवा पाणी एेशा माध्यमांतून पसरशी

 

कधी सेक्शूअली येतो कधी लाळेतूनही

 

आल्यावर वाटतो साधा अन् काळाचे रूप घेतसे

 

एवढा छोटा टायनी डोळ्यांनाही न दिसे

 

स्थायू आणि द्रववायू यांहूनही वेगळा असे

 

ओंकार त्याच्या सर्जनप्रक्रियेबद्दल सांगताना म्हणाला, “माझी बहुतांश काव्यनिर्मिती किंवा कविता सुरू होण्याची घटना ही इतरांच्या कलानिर्मितीचा, लेखनाचा, स्थापत्याचा, स्ट्रक्चर्सचा अनुभव घेताना होते. त्याचा अर्थ मी रिस्पाँड करतो असा नव्हे. अशा अनुभवात समाविष्ट असलेल्या विश्लेषण/विवेचन/पृथक्करण या वैचारिक प्रक्रियांमध्ये कवितेच्या रचनेचं अंधुक रूप स्पष्ट होत असतं. याला जोड म्हणून प्रत्यक्ष जीवनाच्या अनुभवातल्या अर्थाच्या शृंखलांचे पुंजके मी वापरतो. हे थोडंसं मेकॉनोच्या खेळासारखं असतं. पण त्यात संपूर्ण रचनाकृतीतल्या विविध घटकांचे आकार आणि कार्य, सुनिश्चित व मर्यादित असतात; तसे काव्यकृतीत नसतात. सुटे सुटे अर्थांचे पुंजके कवितेतला काव्य’मांस’ (Mass) असतात. त्यांना जोडणारं सूत्र हे वर उल्लेखलेली काव्यपूर्व प्रक्रिया असते.”
ओंकारची लेखनप्रक्रिया ही उलटसुलट दिशेने प्रवास करणारीही असते. म्हणजे तो जे लिहितो, त्या अनुभवालाच फोडून बाहेर पडण्यासाठी, तो अधिक व्यापक होण्यासाठी; विरुद्ध दिशेने जाण्याचं कामही करण्याची शक्यता असते, असं त्याने सांगितलं. ते असं – “लेखनपूर्व प्रक्रियेमध्येच माझं बहुतांश internal editing पूर्ण झालेलं असतं. परंतु जेव्हा लेखन सुरू होतं, तेव्हा चॉइसेसचा खेळ सुरू होतो. ही प्रक्रिया अत्यंत अनपेक्षित व उत्कंठावर्धक असते. ही प्रक्रिया माझे ईप्सित बांधकाम फोडून काढण्याची एक प्रक्रिया असते. म्हणजे internal editing पूर्ण झाल्यानंतर तयार झालेली कल्पित रचना कागदावर उतरताना त्यात अनपेक्षित बदल मी करतो. यात शब्द (नामं, सर्वनामं, विशेषणं, अव्ययं इ.) यांच्या निवडीपासून ते संपूर्ण अनुभवाचे ‘फ्लिपिंग’ही उद्भवू शकतं. त्यामुळेच लेखनपूर्व मूळ अर्थांचे पुंजके कवितेत येत असताना मी अनेकदा उलटे करून लिहितो. जे म्हणायचं असतं त्याच्याहून भिन्न, कधीकधी विरुद्ध असं लिहितो. ही जाणीवपूर्वक केलेली कृती असते व तिच्या मुळाशी, माझी अनुभव मांडण्याची कक्षा मोडण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे सिद्ध होणारी कलाकृती/कविता ही जरी संरचनेच्या पातळीवर मला पूर्ण माहीत असली, तरी अर्थनिर्णयनाच्या पातळीवर ती लेखक/कवी म्हणून मला बाजूला सारून/ओलांडून बहुविध/बहुपेडी होते अशी माझी समजूत आहे.
रणरणत्या उन्हात छातीवरती सनी साइड अप्स
कधी तर मी सिंदबाद कधी कधी पप्स

 

 

या ओळी वर सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणेच एका अद्भुत cerebral orgyतून आलेल्या आहेत. अशा अनियोजित कल्पना दृश्यं इ.ची रेलचेल असणं मला आवडतं. त्यातच चमत्कृतीपूर्ण, टिकाऊ, संपृक्त काव्य दडलेलं असतं, असं मला वाटतं.”
ओंकारने सोदाहरण कविता या फॉर्मविषयी त्याला काय वाटतं, हे सांगितलं. तो म्हणाला, “फॉर्म निवडणं हा एक सहज चॉइस असतो. माझ्याबाबतीत छंद/मुक्तछंद स्वीकारणं हा जसा लेखनपूर्व काळातला एक महत्त्वाचा निर्णय असतो, तसाच तो लेखनोत्तरही बदलू शकतो.” त्याने त्याच्या ‘पिंकी एमएमएस क्वीन’ या कवितेचं उदाहरण दिलं. तिचा लेखनपूर्व आराखडा हा मुक्तछंदात्मक होता; पण तो कच्चा लिहून झाल्यावर त्यात अपेक्षित उपरोध, उपहास, वक्रोक्ती या अलंकारांचा समुच्चय स्वाभाविकपणे न येता, तो काव्यविधानांच्या स्वरूपात येऊ लागल्याचं त्याला वाटलं. त्यातून त्याची भूमिका थेट समोर येतेय, असं वाटू लागलं. त्याने सांगितलं, “अशा पद्धतीच्या मांडणीविषयी माझ्या मनात अनेक reservations नेहमीच असतात. कारण सरळसोट काव्यविधान केल्याने कविता फार फार तर पॉप्युलर होऊ शकते. निश्चित विधान, निश्चित ड्रामा, निश्चित अनुभव व निश्चित स्ट्रक्चर संघटित करण्यासाठी कवितेच्या मैदानाचा वापर न करता हे घटक नाटक, सिनेमा या माध्यमांत एक्स्प्लॉईट करावेत, असं वाटतं. कारण ती त्यांची बलस्थानं आहेत.
“कवितेच्या फॉर्ममध्ये अक्षरगणवृत्त, मात्रा, छंद यांच्याबाबतीत क्लासिकल अप्रोच ठेवून लिहावंसं सध्या तरी वाटत नाही. प्रयोग करताना पारंपरिक विधिनिषेध मोडावे लागू शकतात, रादर ते तसे लागतातच. त्यासाठी धेडगुजरीपणाचे सर्व दोषारोप अंगावर घेण्याची तयारी असली पाहिजे –
संपली गुलाबी दुपार पिंकी
मागे फिरायला नाही हरकत

 

मन थिंकी ते वैरी न थिंकी

 

बिब्टे असतात नॅशनल पार्कात.”

 

धेडगुजरीपणाच्या आरोपाचा मुद्दा आला म्हणून मला इथे अजिंक्यचं याबाबतचं म्हणणं मुद्दाम नोंदवावंसं वाटतं. जाणूनबुजून आणि नकळत आलेल्या कवितेतल्या इंग्रजी शब्दांबद्दल तो सांगतो, “याचं कारण मला फ्रॅगमेंटेशन हे वाटतं, जसा समाज जास्तीत जास्त व्यक्तिकेंद्रित होत जातो, तसं तसं त्याच्या छोट्या छोट्या समूहाची एक वेगवेगळी भाषा बनत जाते. जो भाग अपरिहार्य आहे. म्हणजे आपण सगळे एकच भाषा बोलतो ही गोष्ट आजच्या काळात तितकीशी खरी नाही. ती वेगवेगळी आणि फ्रॅगमेंटेड आहे. दुसरं कारण म्हणजे मला आपल्या भोवतालातलं काही मांडण्याची निकड हे वाटतं. तिसरं कारण हे कंडिशनिंग आणि भवताल यामधल्या संकरातून स्वत:चं असं aesthetics तयार करणं, हे वाटतं.”
वैभवसाठी कविता ही त्याची बौद्धिक व मानसिक गरज असते, असं तो म्हणाला. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही चार सूत्रं त्याच्या कवितेची अंतःप्रेरणा आहेत, असं त्याने सांगितलं. तो पुढे म्हणाला, “खरंतर मी आजवर स्वतःलाच प्रश्न विचारलेला नाही की कविता नेमकी कशी सुचते ते. जे मनाला पटत नाही त्यावर संताप होतो, मग ती सिस्टिम कशी बदलायला हवी, त्याचे मार्ग काय हे सांगण्याच्या प्रयत्नात शब्द लिहिले जातात आणि त्यांची कविता होते. मी एकदा कविता लिहिली की, त्यात पुन्हा बदल करत नाही. खर्डे करणं वगैरे असं कधी केलेलं नाही. मी फर्स्ट स्ट्रोकमध्ये जे येतं ते तसंच राहू देतो.” कविता ही त्याची राजकीय भूमिका असते, हे वैभवने जोरकसपणे पुन्हा मांडलं. तो म्हणाला, “कविता ही माझी राजकीय कृती होऊन जाते, ज्यात किमान समानतेच्या कार्यक्रमाचा आग्रह असतो. ज्यात शोषित आणि शोषक एवढीच सरळसोट मांडणी न करता तळागाळातल्या घटकांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि त्यांच्या जगाचे स्वतंत्र अस्तित्व कसं अधोरेखित करता येईल, यावर माझा भर असतो. कवितेशिवाय मी इतर काही लिहू शकेन असं वाटत नाही. तिच्याशिवाय माझी राजकीय कृती आणि भूमिका अपुरी राहील. मी केलेल्या कामाचं सैद्धान्तिक मूल्यांकन कवितेशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.”
चैतालीची कवितेच्या निर्मितिप्रक्रियेकडे पाहण्याची दृष्टी मला काहीशी ‘क्लासिक’ वाटली. ती म्हणाली, “माझी कविता कधीही येते, धाडकन दार न वाजवता. जी खरी कविता आहे, ती न सांगताच येते; बऱ्याचदा मध्यरात्री जेव्हा आतला आणि बाहेरचा अंतराळ विसावलेला असतो.”
एकदा कविता लिहिल्यावर त्यात ती बदल करत नाही; कारण त्यातली उत्स्फूर्तता जाण्याची शक्यता असते, असं तिला वाटतं. “काही शब्द इकडेतिकडे करण्याशिवाय मी फार काही बदल करत नाही. मी म्यूझिक अल्बम, तसंच आमच्या शोसाठी विषय घेऊन, ठरवूनही लिहिलेलं आहे. मात्र जेव्हा खूप आतून आलेलं लिहिलं जातं तेव्हा त्याचा pure form मी नेहमी जपते.”
सत्यपालच्या मते त्याच्या मनात अनुभवांचं फर्मेंटेशन सुरू असतं. त्याचंच एक प्रॉडक्ट कविता असते. त्यामुळेच त्याला मनोहर ओक यांच्या ‘आयत्या कविता’ हे कवितासंग्रहाचं शीर्षक निर्मितिप्रक्रियेचं वर्णन करण्यासाठी योग्य वाटतं. तो म्हणाला, “आपण जगतो तेव्हा अनेक गोष्टींशी आपला संबंध येतो. वस्तू, व्यक्ती, यंत्रणा, समाज, मूल्यव्यवस्था यांतून प्रत्येक वेळी मनात सतत काहीतरी प्रक्रिया सुरू असतात. त्या सुप्त मनात फारच जोरात असतात. वरवर पाहता त्या प्रक्रिया आपल्याला फारशा जाणवत नाहीत. अनेक समस्या आणि दु:खांना आपण सामोरे जात असतो. या समस्या आणि दु:खांचे सुप्त मनात जणू काही फर्मेंटेशनच सुरू असतं. सुप्त मनातील त्या फर्मेंटेशनमध्येच कविता एखाद्या बायप्रॉडक्टसारखी जन्म घेते. लाव्हा रसासारखी ती उफाळून येते तेव्हा दुसरं काहीच सुचत नाही. हातात पेन घेऊन कागदावर काहीतरी खरडून काढण्याची प्रबळ इच्छा होते. मग कविता लिहिली जाते. ती कविता अशीच का आली, याच प्रतिमा किंवा प्रतीकं कशी आलीत, भाषा आणि फॉर्म हाच कसा आला; याविषयी फार काही सांगता येत नाही. कारण कवितेचा जन्मच मुळात सुप्त मनात होतो, तो आपल्यासाठी जणू काही एक अनोळखी प्रांत आहे.
“आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांनी सतत ज्ञानग्रहणाची प्रक्रिया सुरू असते. या ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेद्वारे सुप्त मनात प्रवेश करणार्‍या गोष्टी आपल्या रोजच्या जगण्यातल्याच असतात. त्यांबद्दल काहीतरी तार्किक भाषेत आपण बोलू शकतो. कवितेला सुप्त मनातून येणारं आउटपुट मानलं, तर बाहेरून सुप्त मनात जाणार्‍या अनेकविध बाबींना इनपुट मानावं लागेल. आउटपुट आणि इनपुटबद्दल आपण काहीतरी बोलू शकतो. परंतु इनपुटचं आउटपुटमध्ये रूपांतर करणार्‍या प्रोसेसविषयी मला फार काही बोलता येणार नाही.”
सत्यपाल आधी कवितेचे खर्डे करायचा नाही. पण नंतर त्याला त्याची आवश्यकता वाटायला लागल्याचं त्याने कबूल केलं. “कवितेच्या ओळींचा सिक्वेन्स बदलणं, काही शब्द बदलणं, काही कमी करणं, काही अॅड करणं हे मी करत असतो. ही नंतर चालणारी प्रक्रिया बुद्धी आणि तर्काच्या प्रभावाखाली घडून येते. ही प्रतिमा अधिक चांगली असेल की ती, हा विचार तेव्हा होतो. परंतु नंतर चालणार्‍या प्रक्रियेमुळे खूप मोठ्या प्रमाणात बदल माझ्या कवितेत घडून येत नाही. त्यामुळे सुप्त मनातून जशीच्या तशी अवतरणारी माझी ‘रॉ’ कविता आणि नंतर काही संपादकीय संस्कार घडवून आणलेलं तिचं नवं रूप, या दोन्हींमध्ये फारच तुरळक ठिकाणी फरक असतो. अगदी एका शब्दाचाही बदल घडवावासा वाटत नाही, ती कविता मला अधिक भारी वाटते.” त्यासाठी त्याने त्याच्यात ‘अॅडमला हवाय मोक्ष’ या कवितेचं उदाहरण दिलं. ती अशी –
कारेपणाच्या ह्या घनदाट अरण्यात
कुठून आलेत हे मदमस्त हत्तींचे कळप
कुणी दाबून भरलाय निद्रिस्त ज्वालामुखीच्या गर्भात
हा अफाट बेफाम लाव्हारस
पृथ्वीच्या पाठीवर ह्या महामूर्ख प्राण्याने
बांधलाय सिव्हिलायझेशनचा बंगला
आणि अटकपूर्व जामीन नाकारून
आम्ही बंदिस्त ह्यांच्या नैतिकतेच्या तुरुंगात
पुरूष-प्रकृतीच्या फारकतीने सरलीये
जगण्यातील बरकत
विनाशकाली पुरात सापडून
मातीखाली  दडो हे अस्वस्थ शहर
नेणिवेच्या पायथ्याशी चालणारे बंद पडो
अनावृत्त चित्रपटांचे हाउसफुल्ल टॉकीज
अंडकोषांचे विस्फोट होऊन
उद्ध्वस्त होवोत शुक्राणूंच्या वसाहती सा-या
मरोत रक्तात दौडणारे अविरत आदिम घोडे
एकदाच माझ्यातल्या अडमला शेवटचा मोक्ष मिळो
कविता कशी सुचली किंवा तिची नेमकी प्रक्रिया काय, ही गोष्ट कधीच कोणाला कळता कामा नये, असं अजिंक्यला वाटतं. तो म्हणाला, “मला जे रिलेट होतंय त्याला जपण्याचा आणि जे जे रिलेट होत नाहीये ते रिजेक्ट करण्याचा माझा एक एक्सरसाइज चालू झाला, जो आजही चालू आहे. आपल्या सांस्कृतिक पर्यावरणामध्ये लेखकावर/कवीवर परंपरेचं गाठोडं नसून विटा असतात, असं माझं हल्ली मत झालंय. हे ओझं झुगारून दिलं पाहिजे. कारण जी रूट्स आपली आहेत असं आपल्याला सांगितलं जातं, ती आपली नाहीयेत असा माझा आत्तापर्यंतचा माझा वैयक्तिक अनुभव आहे. म्हणून असले कन्व्हिनियंट पर्याय वापरण्यात मला कधीच स्वारस्य नव्हतं, नसेल.”
“कविता कशी सुचते किंवा त्याची नेमकी प्रक्रिया काय ही गोष्ट एकदा कळली की, काठावर पास व्हायचा मार्ग मिळत जातो आणि नापास व्हायच्या भीतीने आपण आपल्या क्षमता अधिकाधिक ताणून बघायला घाबरतो. आपला मेंदू म्हणजे पॅटर्न मेकिंग मशिन आहे, तो पॅटर्न एकदा आपल्या सिस्टिममध्ये गेला की, क्रिएटिविटीची जागा कसब घेतं. जे हल्ली सर्रास होताना दिसतंय.”
“कविता हा आर्ट फॉर्म लिबरेट करणारा आहे. कधी कंटेंट आधी सुचतो तर कधी फॉर्म, कधी इमेज, तर कधी लेआउट! इथे कधीही काहीही कसंही सुचू शकतं. जसं आपण तोंडी गणित करताना बरीचशी आकडेमोड मनात आणि एखादा गुणाकार कागदावर करतो तसा प्रकार कवितेबाबतीत होत असावा. आता तोंडी आकडेमोड प्रथमदर्शनी चमत्कृतीचा भाग वाटू शकतो! पण तो नसतो! कारण बरंचसं प्रोसेसिंग हे आत झालेलं असू शकतं. (जी सोय प्रोजमध्ये नाही!) (अजिंक्य जे म्हणतोय ते मला पूर्णत: मान्य नाही. प्रोजमध्येही अशी सोय असते. किंवा सोयीपेक्षाही ती प्रोसेसच असते. पण तरी तो वेगळा व मोठा विषय असल्याने आत्ता इथे तोंडाला कुलूप घालतो.) शब्द कागदावर आल्यावर त्याची कविता होतेच असं नाही, पण त्या शब्दांसोबत काय काय होऊ शकतं याच्या शक्यता मी तपासत राहतो. कधी ही प्रक्रिया दोन मिनिटांत संपते तर कधी दोन महिनेपण पुरत नाहीत. कधी कविता फसते किंवा ती होत देखील नाही! (माझ्या अशा बर्‍याच मायक्रोसॉफ्ट वर्डच्या फाइल्स तशाच पडून आहेत! )
“आजपर्यंतचा इतिहास बघता धोका न पत्करता एकही चांगली कलाकृती निर्माण झालेली नाही. बहुतेक जगातल्या सगळ्याच चांगल्या आर्टिस्ट्सनी जाणीवपूर्वक मिडियोकर काम करणं टाळलं आहे. कविता फसतात, त्या फसत राहणारच आहेत… त्याला कोणीच अपवाद नाही, नसणार आहेत. पण एक गोष्ट इथे कबूल करावीशी वाटते ती अशी की, कच्चा माल जो कागदावर आहे त्याच्यात फारसा बदल करावासा वाटत नाही. थोडक्यात फेरफार आणि एडीट खूप होतं पण कंटेंटची त्रिज्या सोडावीशी वाटत नाही. अर्ध्यापेक्षा अधिक फेरफार करावासा वाटला तर नवीन कविताच का लिहू नये, असं वाटतं आणि मग कच्च्या मालाचा अजून एक ड्राफ्ट तयार होतो. प्रोजपेक्षा ही मेहनत अगदीच वेगळ्या प्रकारची आहे, याला आपण फारफार तर ‘उत्स्फूर्तता टिकवण्याची मेहनत’ असं काहीतरी शीर्षक देऊ शकतो. याचा अर्थ त्यात काहीच काटछाट होत नाही किंवा पुनर्लेखन होत नाही, असा नसून ती एवढी संथ प्रक्रिया असते की मला तरी त्याला संपादन हा शब्द जरा जड वाटतो!”
अजिंक्यने यासाठी त्याच्या दोन कवितांचं उदाहरण दिलं. पहिली कविता ‘मिसफिट’ आणि दुसरी ‘हॅप्पिनेस’.  तो म्हणाला, “यातली पहिली कविता लिहिताना मला खूप काही सांगायचं होतं, आतला धबधबा थांबत नव्हता पण मला फॉर्म सापडत नव्हता. आता एवढं चांगलं सुचलेलं वाया जाणार असं वाटत असतानाच, मला समजा एक वन वे टेलिफोन कॉल झाला तर?, अशी एक थीम सुचली. त्यानुसार मी कविता लिहिली. ही थीम कितपत कळते, ही कवितेची थीम असू शकते का नाही, यावर वाद होऊ शकतात. पण स्वत:ची एक अभिव्यक्ती म्हणून मला आजही ते रिलेव्हंट वाटतं.
अरे सांगतोय ना तुला मी.. मिसफिट आहे मी;
समाजात जगायचं असेल तर एक पॉसिटीव्ह प्रॉस्टिट्यूशन अंगी बाणवायला लागतं, ते माझ्यात बहुतेक जन्मत:च नाहीये, मी खोटा वावरलो की कम्फर्टेबल नसतो, खर्‍या आणि खोट्याच्यामधे तळ्यात मळ्यात करताना थोडा तरी असतो…
काहीतरी काळंबेरं पण मनापासून शांत करणारं सापडायला हवं,

 

चल आपण सगळे अव्वल प्लेयर्स बनू,

 

क्रिएटीव्हीटीची गांड मारायला शिकू

 

डेथबेडवर चड्डीत शू करत सगळी प्रायश्चित्तं फेडू

 

समाजाच्या बोजकारू एक्सरे मधून गेल्याशिवाय जगण्याची प्रॅक्टीकल व्हर्जीनीटी कशी घालवता येईल?

 

ZOOOOOOOOOOORUR CONDOMS! व्वा..काय ब्रँड नेम आहे! Z वरचा आघात काय कमाल आहे!
पण म्हणून सगळ्यांनी Z पाऊडर वापरावी हे काही खरं नाही. मध्यमवर्गीय जगणं म्हणजे मुके साप उराशी घेऊन फुत्कार विरहीत संभोग करणं..
सोड, तुला पटतंय नं आता मी मिसफिटच आहे ते?
वरील उदाहरणात, हा पूर्णपणे मोनोलॉग असला तरी तो स्वत:ची खात्री करण्यासाठी मध्ये मध्ये जे प्रश्न विचारतोय, त्याने त्याला एक र्‍हेटोरिक प्राप्त झालंय. कारण असंगतीचा ओघ एवढा जास्ती आहे की कवितेसाठी आणि त्या पात्रासाठीदेखील काही थांबे घेणं गरजेचं होऊन बसतं.
याच्या विरुद्ध टोकाचं उदाहरण म्हणजे माझी ‘हॅप्पिनेस’ ही कविता. या कवितेत मला जे सांगायचं होतं ते उत्क्रांतिवादाबद्दलचं एक भाष्य, या स्वरूपाचं होतं. मला बरेच प्रश्न पडले होते आणि ते माझ्या धारणा गदागदा हलवतायत, असं मला वाटायला लागलं होतं. या सगळ्या गडबडीत, मी मला जे सांगायचंय याचा फॉर्म अगदीच साधा ठेवला.
याचा परिणाम असा झाला की, तो एका लेखकाचा त्रोटक मोनोलॉग वाटू लागला.
हॅप्पिनेस दु:खापेक्षा
जास्त व्हॅलिड असेल
असं कशावरून?
लाईफ एवढ्या रिडक्टिव्ह
लेव्हलवर आणून ठेवायचंय तुला?
का कल्टीच मारायचीये मौन ठेवून?
त्यापेक्षा सिग्नलत राहूयात की…
वरची वाक्यं मी बोलतो तशीच्या तशी कवितेत टाकली का? मी ढोबळ स्टेटमेंट्स तर करत नाहीये ना?, असा मला संशय यायला लागला. अर्थात या कवितेचा कंटेंट मला प्रिय असला तरी कविता म्हणून मला फारशी आवडत नाही. माझ्यासाठी पहिली कविता ही अधिक संवेदनाक्षम आहे, कारण तुम्ही काय सांगता याबरोबरच कसं सांगता यावरही ती कविता तुमच्याआत किती झिरपते, हे अवलंबून असतं.”
मी माझ्या भात्यातून पुढचा प्रश्न काढला – जगणं हा कवितेचा कच्चा माल असतो असं समजलं, तर मग त्या कच्च्या मालावर काही प्रोसेस करावीशी वाटते का ,म्हणजे घाट-फॉर्मच्या दृष्टीने? ती प्रक्रिया काय असते? एखाद्या कवितेचं उदाहरण सांगितल्यास अधिक चांगलं.
ओंकारने ‘पिंकी एमएमएस क्वीन’ कवितेचंच उदाहरण दिलं. तो म्हणाला, “समकालीन जगात असलेलं पोर्नोग्राफीचं स्थान मी यात पाया म्हणून वापरलंय. त्याच्या आधारावर पिंकी या काल्पनिक स्त्रीचं पात्र प्रथम तयार केलं. ही पिंकी उभयलिंगी अशी माझ्या मनात कल्पलेली असून माझ्या इतर कवितांमध्ये ती गरजेनुसार पिंकी किंवा पिंकेश या नावे अवतरते. माझ्या कोणत्याही कवितेत येणार्‍या पात्रांच्या चरित्रचित्रणात मला finality कोणत्याही रूपात द्यावी असं वाटत नाही. ही पात्रं infinite असतात. त्यांची लिंगं ही साशंकता निर्माण करणारी असतात. तसंच ती एकाच वेळी अनेक पर्सनॅलिटीज धारण करून असतात. ‘पिंकी एमएमएस क्वीन’मधली पिंकी ही पॉर्न एमएमएस क्लिपमधली अॅमॅच्युअर नटी असते, तर दुसर्‍या ‘हॅप्पी बर्थडे पिंकेश’मधला पिंकेश हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या एका कुटुंबाचा लाडका सदस्य असतो.”
ओंकारसाठी पात्रांची यथार्थता हा महत्त्वाचा मुद्दा नसतो, जो मलाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वाटतो. तो म्हणतो, “पात्रांना वास्तवातल्या निरनिराळ्या तुकड्यांचे मी लेप देत असतो. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वांच्या मर्यादित चौकटीतदेखील ती पात्रं निरनिराळ्या व्यक्ती, संकल्पना, वाद यांनी घडलेली कोलाज-चित्रं होतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ती म्हणजे जगण्यातला कच्चा माल अगदी अपरिहार्यपणे कवितेत येत असताना प्रोसेस होतो. पात्र जगत असलेला किंवा कवितेच्या संहितेत व्यक्त होणारा अनुभव मी प्रत्यक्ष व्यवहारात जसाच्या तसा अनुभवलेला असतो, असं नाही. मुळातला अनुभव पूर्णत: बदलून, प्रोसेस करून मी कल्पनेने जगून बघतो आणि योग्य वाटल्यास तो कवितेत इष्ट फेरफार करून टाकतो. पाण्यात रंग टाकल्यावर जसं होतं, तसाच हा प्रकार आहे.”
वैभवच्या मते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, येणाऱ्या व्यक्ती, आपल्याला मुळापासून हलवणारी पात्रं, त्यांच्या आणि स्वतःच्या राजकीय भूमिका आणि कृती; सारं सारं काही एखाद्या कवीच्या कवितेचा कच्चा माल असतो. “आपला दृष्टिकोन, वाचन, अनुभव आणि कृतिशीलता हीच कवितेवर प्रोसेस करण्याचं काम करत असते; कारण हे चार घटक आपल्याला प्रगल्भ बनवत असतात. कवितेच्या दृष्टीतून प्रगल्भ झालेला कवी हा लोकांची, पात्रांची कविता करू शकतो. तेव्हाच त्याच्या कवितेतून नवनिर्मिती साधली जाते. उदाहरणार्थ माझ्या कवितेतल्या ओळी अशा –
आपली सॉंफ्टवेअर्स आपल्यालाच बनवावी लागतील
आणि ती चालवायला लागणारे संगणकदेखील
त्यांना सुरक्षित ठेवणारा अंटीव्हायरसपण
आपल्यालाच बनवावा लागणार
मनगटातली ताकद बोटांत उतरू दे आता
डोळ्यातली आग मेंदूत शिरू दे आता
बघ, हार्डबॉडीपेक्षा
सॉंफ्टवेअरचा जमाना अवतरलाय.”
रोज तितक्याच उत्कटपणे जगणं हीच चैतालीसाठी एक प्रोसेस आहे. कविता आणि जगणं, असं द्वैत ती मानत नाही. ती म्हणाली,“ते जितकं असोशीने समोर येतं, कदाचित तितकीच कविता जिवंत होते. आता आपल्याला कविता/कादंबरी लिहायची आहे म्हणून जगू या; असं तर कोणताच कवी किंवा लेखक म्हणत नसतो. मात्र स्वत:शी कायम प्रामाणिक राहायचं हा प्रयत्न नेहमी मी करत असते. कारण आपण जेवढं स्वत:शी प्रामाणिक राहू, तेवढी कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती सच्ची असणार. उदा. माझी ‘पर्यायवाची’ ही कविता. यात कुठेतरी रोजचं तेच ते जगणं डोकावल्याशिवाय राहत नाही –
पर्यायवाची शब्दांच्या माकड-उड्या
शब्दांची सभ्य-असभ्य टाळाटाळ
मिळमिळीत जगण्याच्या ओकाऱ्या
Back to basics म्हणणारे चाक
अन् माझ्या
भोचक होत जाणाऱ्या कविता”
कवितेवर घाट-फॉर्मचे प्रयोग मी ठरवून करत नाही, असं सत्यपालने ठामपणे सांगितलं. तो म्हणाला, “कवितेचा आशय हा स्वत:च स्वत:ला साजेसा फॉर्म घेऊन अवतरतो. हे तुला काहीसं अमूर्त वाटेल, पण हे खरंय. (इथे तो मला उद्देशून असं का म्हणतोय, याचं थोडक्यात स्पष्टीकरण असं – माझ्यामते जाणीव व नेणीव ही दोन्ही बलं सर्जनप्रक्रियेवर कार्य करत असली, तरी मी घाटाचे प्रयोग हे सजगतेनं करतो; किंवा पहिल्या खर्ड्यात तयार झालेला आराखडा किंवा घाट मी अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी पूर्णत: सजगपणे बदलतो. ओंकारने जे अनुभव फोडून बाहेर जाण्याबद्दल सांगितलं, तसंच काहीसं.) समजा आपल्या कवितेत तुटलेपण व्यक्त झालेलं असेल तर फॉर्ममध्येही एक तुटकता येतेच. पूर्वी मी काही गझलाही लिहिल्या आहेत, पण कवितेचे विषय जसजसे क्लिष्ट आणि मिश्र होत गेले तसतसे माझ्या कवितेचे फॉर्मही बदलत गेल्याचं मला जाणवतं. मग आपोआपच माझं गझललेखन बंद पडलं.”
कविता नक्की काय आहे वा नक्की काय नाही, यावर वादविवाद करण्यात फारसं हशील नसलं तरी व्हर्टिकल लिहिलेल्या मजकुराला कविता म्हणावं का? असा मजेशीर प्रश्न आजकाल विचारला जाऊ लागला आहे, असं अजिंक्यने सांगितलं. (हा प्रश्नकर्ताही मीच आहे! 🙂 आम्ही कधीतरी भेटलो असताना याबद्दल बोलणं झालं होतं.) तो म्हणाला, “कविता म्हणजे शब्दांचा ध्वनीच्या/साउंडच्या दिशेने झालेला प्रवास आहे, असं मला वाटतं. थोडक्यात असं की नाद/ साउंडची कल्पना केल्याशिवाय कवितासदृश्य एंटिटी अस्तित्वात येऊ शकत नाही. जसं नाणं म्हटल्यावर ‘ते खणखणीत वाजणं’ असं एक असोसिएशन डोक्यात तयार (ट्रिगर) होतं तसंच ते कविता – साउंड याबाबतही तयार होत असावं.  त्यामुळे कविता हा एक असा आर्ट फॉर्म आहे, ज्याकडून शब्द ते ध्वनी/साउंड एवढा विस्तृत स्पेक्ट्रम हाताळला जातो. जर सगळ्या कलांचा आपण एक abstraction index काढला तर शब्द सगळ्यात कमी abstract आणि नाद/म्युझिक सगळ्यात जास्त abstract, असं एक
ढोबळ स्वरूपाचं वर्गीकरण शक्य आहे. म्हणूनच कवितेमध्ये मुळातच बहुआयामी आणि बहुमितीय अनुभव देण्याची एक वेगळीच ताकद आहे, ज्यामध्ये मानवी भावभावनांचा एक मोठ्ठा पल्ला काबीज करता येतो.
ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक अॅनॅलॉजी द्यायला आवडेल. थर्मोडायनॅमिक्समध्ये ‘ट्रिपल पॉइंट’ नावाची पदार्थाची एक अवस्था आहे. ज्यात घन, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्था एका इक्विलिब्रियममध्ये एकाच वेळेस अस्तित्वात असतात. कवितेतही शब्द (ठोस), उद्भवणार्‍या इमेजेस (फ्लिकरिंग) आणि निर्माण होणारा ध्वनी (व्होलॅटाइल) या तीन गोष्टींचा आपल्याला एकाच वेळेस अनुभव घेता येतो, अथवा असं म्हणू या की या तिन्ही अवस्थांच्या कोएक्झिस्टन्सचं एक आभासी वास्तव निर्माण करण्याची ताकद कविता या आर्ट फॉर्ममध्ये आहे.
कविता हा असा आर्ट फॉर्म आहे की ज्यामध्ये तुमचा स्वत:चा असा एक अर्क उतरतोच; तुमची इच्छा असो वा नसो! त्याचं स्वरूप मोनोलॉग्जसारखं होत जातं. आपले प्रश्न, विचार, भान, दृष्टी हे एकाच टप्प्यात पाहण्याचा केलेला तो एक प्रयत्न असतो. हाताला लागलेल्या शब्दांबरोबरच निसटलेला प्रदेशही महत्त्वाचा असतो. कारण त्यामधूनच कवितेचा अवकाश क्रिएट होत असतो; जसं की कुठल्याही प्रकारच्या संगीतात दोन नोट्समधलं अंतर किंवा सायलेन्स हा कशा प्रकारचा आहे, यावरच त्या संगीताची जातकुळी ठरत असते. कवितेची आंतरिक लय हे प्रकरणसुद्धा याच्याशी मिळतं-जुळतंच आहे असं मला कायम वाटत आलेलं आहे.”
माझा पुढचा प्रश्न होता – जागतिकीकरणोत्तर काळाचे तुमच्यावर व पर्यायाने तुमच्या कवितेवर काही परिणाम होतात का? ते कोणते? त्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी काय आहे? या प्रश्नावर ‘उठसूट सगळ्या गोष्टी जागतिकीकरणाला का म्हणून भिडवाव्यात?’ असे उलटप्रश्न काही वाचक व कवी विचारतीलही. पण मला हा प्रश्न या पाचही कवींच्या बाबतीत महत्त्वाचा वाटतो. कारण हे पाचही कवी जागतिकीकरण पाहत-पचवत वाढलेले आहेत. आणि पुढेही ते वाढणार आहेत. मागच्या पिढ्यांप्रमाणे त्यांच्यावर ते लादलं गेलेलं नाही किंवा त्यांच्यावर अचानक त्याचा माराही झालेला नाही. ते त्यातच लहानाचे मोठे झाले आहेत. त्यामुळे यावर सगळ्यांनीच सविस्तर उत्तरं दिली.
ओंकारने सांगितलं, “जागतिकीकरणोत्तर काळाचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे मानवी जीवनाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कानाकोपर्‍यांत पसरलेल्या संगणकीय प्रणालींचं जाळं होय. संगणकीकरणामुळे आजच्या जगण्याला जशी कलाटणी मिळाली आहे, तशीच कवितेलाही मिळाली आहे. किंबहुना आजच्या काळाशी सुसंगत राहायचं असल्यास ती तशी मिळायला हवी. मला इथे नव्वदोत्तरी समीक्षा किंवा मागच्या पिढीतल्या कवींच्या वादचर्चांमध्ये वापरल्या गेलेल्या आभासी वास्तवाची संकल्पना वापरावीशी वाटते. (एेतिहासिकदृष्ट्या किंवा व्याख्येच्या पातळीवर मी त्याची इथे चर्चा करणार नाहीये.) प्रत्यक्ष वास्तव आणि आभासी वास्तव अशी वर्गवारी करणं हे मला संगणकीय किंवा जालीय वास्तवाला नाकं मुरडणार्‍या प्रवृत्तींनी केलेलं सुलभीकरण वाटतं. जालीय वास्तव हे प्रत्यक्ष वास्तवाच्या आधाराने तयार होतं आणि तिथे प्रत्यक्षाचे केवळ आभास निर्माण होतात असं म्हणावं; तर प्रत्यक्ष वास्तवांतील वास्तव शतखंडित, विकेंद्रित आणि जालीय वास्तावाचा आधार घेऊनच तयार झालेलं आहे. अशा पद्धतीच्या वास्तवामुळे प्रत्यक्ष व आभासी वास्तव एकमेकांत बेमालूम मिसळून वास्तव व सत्य यांसारख्या तत्त्वांविषयी भ्रमोत्पादन होत आहे. ‘माध्यम हाच संदेश’ हे तत्त्व पूर्णत: रुजल्यामुळे राइट विंग भांडवलशाहीने प्रसारित केलेलं उजवं संभाषित व त्याच्या विरुद्ध जाणारं इंडिफिल्म्ससारखं डावं संभाषित ही दोन्ही एकाच वेळी आपापल्या वास्तवांचे बावटे उभारून लढताना दिसतात.
“फेसबुक हा आजच्या परिस्थितीतला एक लक्षणीय phenomenon झाला आहे. ब्रिटिशांच्या राज्यात एके काळी सूर्य मावळत नव्हता, असं म्हणतात. तसाच एफबीवरचा सूर्य संगणकीय प्रणालींवर चालणार्‍या बहुतेक देशांत मावळत नाही. त्याच्या बरोबरीनंच इतरही सोशल नेटवर्क्स आहेत. त्या बहुतांश साइट्सच्या शेअरिंगचे आयकॉन्स पॉर्नसाइट्सपासून ते ऑनलाइन शॉपिंगच्या साइट्सपर्यंत सर्वत्र आढळतात. भारताच्या सद्यत्कालीन पंतप्रधानालाही या जालीय वास्तवाचं महत्त्व कळून चुकल्याने निवडणुकीमध्ये, तसंच परदेशी घडणार्‍या सातत्यपूर्ण दौर्‍यांमध्ये, पीआर सांभाळणारी स्वतंत्र टीमच एफबीवर लक्ष केंद्रित करत असते. याचा अर्थ जालीय वास्तवाचा प्रत्यक्ष वास्तवावर प्रभाव पाडता येऊ शकतो या विचाराने मूळ धरलं आहे. हे परस्परांना सतत मॉडिफाय करणारे तुल्यबळ प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर निर्माण झालेले आहेत. माणसं सेल्फी काढून शेअर करतात आणि प्रत्यक्ष भेटल्यावर शेअर्ड फोटो डिस्कस करतात.
“अशा परिस्थितीत कविता एखाद्या सायमलटेनियस अवकाशाचं काम करते का, या प्रश्नाचा मी सतत वेध घेतो आहे. कॉम्प्यूटर ग्राफिक्समध्ये जसे वास्तवाच्या काही टक्केच प्रमाणात असलेले वास्तव ‘sets’ उभे करून, त्यांच्या मदतीनं हिरव्या क्रोम शीटवर काल्पनिक दृश्यं उभी केली जातात; तशी फँटसी कविता उभी करता येऊ शकते का? प्रत्यक्ष/वास्तव याच्या तत्त्वाला जाणीवपूर्वक sacrosanct न मानता, त्यांच्या मर्यादांची जाणीव ठेवून काव्य निर्माण व्हावं का, हा माझ्यापुढचा कळीचा मुद्दा आहे.”
जागतिकीकरणाचा मोठा परिणाम आपल्या कवितेवर झाल्याचं वैभवनेही मान्य केलं. तो म्हणाला, “जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर चळवळीच्या संघर्षाचं केंद्र बदललं आहे; आणि त्या संघर्षाचं शस्त्रसुद्धा. मी व्यक्तिगत आयुष्यात नव्या तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर करतो. त्याचाच वापर करून जुनं अवकाश पुसून टाकण्याइतपत बेधडक होऊन जुन्या दलित अस्तित्वाची वेगळीच झाडाझडती घेण्याचं बळ मला या काळात मिळालं आणि त्यातूनच माझ्या कवितेचा नेमका अवकाश कळला. माझी नेमकी भूमिका माझ्याशीच स्पष्ट झाली. तिच्या सैद्धान्तिक विवेचनाला मी ‘पोस्ट-पँथरियन’ असं म्हणतो. आता आंबेडकरी चळवळीच्या कवितेचं सैद्धन्तिक मूल्यांकन हे नव्याने झालं पाहिजे या मताचा मी आहे. त्यासाठी आवश्यक असणारी ज्ञानशाखा ही पोस्ट-पँथरियन थिअरीवर विकसित व्हावी यासाठी मी प्रयत्नशील असेन.”
आपल्या आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींचे पडसाद आपोआपच आपण कवितेतून टिपत असतो, असं चैतालीचं मत आहे. ती म्हणाली, “माझं जग तसं फार लहान आहे. मात्र आपल्याही नकळत आजूबाजूला होणारे बदल कुठेतरी टिपले जात असतातच. कदाचित ते लगेचच कवितेच्या रूपाने बाहेर पडत नसतील. पण तरी त्यामुळे कुठे ना कुठे ते fragmented स्वरूपात कवितेत येत असणार हे नक्की. उदा. मी सामाजिक विषयावर फारशा कविता लिहिल्या नाहीत. पण दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या असोत किंवा छोटा अयलान कुर्दी असो; त्या गोष्टी मनावर परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत. या गोष्टींची मनात कुठेतरी नोंद केली जाते. कदाचित पुढे-मागे त्या कवितेतून बाहेर येतीलही, मात्र त्यांचं स्वरूप कसं असेल ते सांगता येत नाही.”
जगण्यातील प्रत्येक बाजूवर मार्केट फोर्सेस परिणाम करत असून उपभोगवाद सर्वच स्तरांत वाढत चालला आहे आणि हे सारे बदल केवळ महानगरातच नाही, तर ग्रामीण भागातही वाढत चाललेले आहेत. या सगळ्याच बाबींच्या प्रभावापासून माझी कविता अलिप्त राहू शकत नाही; असं सत्यपालचं म्हणणं आहे. त्याने सांगितलं, “मी १९८७ साली जन्माला आलो. १९९१ साली नवीन आर्थिक धोरणांचा स्वीकार सरकारने केला. आपल्या मिश्र अर्थव्यवस्थेचा लंबक भांडवलशाहीकडे सरकला. या सार्‍या गोष्टींचा माझ्याही आयुष्यावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात शेतीची जी वाताहत झाली त्यामागचं कारण केवळ निसर्गाची अवकृपा हे नाही. सरकारची कृषी-धोरणंही जागतिकीकरणाच्या काळात बदलत गेली. मी स्वत: शेतकर्‍याचा मुलगा आहे. कृषी-आदानं (बियाणं, कीटकनाशकं, खतं, अवजारं, बैल इ.) महाग होत गेली. कृषी उत्पादन वाढलं, नाही असं नाही, पण त्या मानाने कृषी मालाचे भाव फार वाढले नाहीत. भारतात शेतकर्‍यांच्या आत्महत्या साधारण १९९५-९६ सालानंतरच झालेल्या आहेत. आपले शेतकरी आधीही दारू पीत होते, आधीही दुष्काळ येतच होते. पण आत्महत्या या जागतिकीकरणानंतरच सुरू झाल्या. जागतिकीकरण आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या यांतले संबंध समजून घ्यायचे असतील, तर पी. साईनाथ यांचं लिखाण अभ्यासणं गरजेचं आहे. माझ्या घरातही आर्थिक विपन्नावस्थाच होती. मामांच्या घरी बुलढाण्यात राहून माझं शिक्षण झालं. लहानशा कोरडवाहू शेतीतून आता आपल्या गरजा भागणार नाहीत या विचारानेच मी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि गाव तुटलं. मला गावातून विस्थापित व्हावं लागलं यात जागतिकीकरणाचाही मोठा वाटा आहे. जागतिकीकरणानंतर आपल्या देशातील आदिवासी, दलित, ग्रामीण, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, छोटे दुकानदार यांच्यावर आर्थिकदृष्ट्या वाईट परिणाम झालेला आहे. विषमता वाढली आहे. नंतर दिसून येणारी ग्रोथ ही ‘जॉबलेस ग्रोथ’ आहे. संघटित क्षेत्रातली रोजगाराची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. अशा अनेक पातळ्यांवर जागतिकीकरणाचा भला-बुरा परिणाम झाला आहे. संस्कृती आणि मूल्यव्यवस्था यांतही बदल होत गेला आहे. वास्तवापासून नाळ तुटण्याचा वेग वाढला. माणसाचे एकटेपण वाढले. गरजेपेक्षा जास्त आणि बिनकामाच्या गोष्टी, विशेषत: जाहिराती, आपल्या मनावर आदळणं सुरू झालं. प्रत्येक गोष्टीचं कमोडिफिकेशन सुरू झालं.”
जागतिकीकरणासारख्या अक्राळविक्राळ फेनामेनॉनला सर्वार्थाने कवेत घेणं शक्य नसल्याचं अजिंक्यने सांगितलं. तो म्हणाला, “जागतिकीकरणाने जे महाजालीय वास्तव अस्तित्वात आलंय – म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी – त्यामुळे पूर्वी कधीच झाली नसेल एवढी ‘ह्यूमन पर्सनल हिस्ट्री’ रेकॉर्ड होते आहे. म्हणजे प्रत्येक माणसाचं खरं-खोटं अतंरग, त्याच्या इमेजेस्‌, व्हिडीओज्‌ इथपासून ते तो कुठल्या रेस्टॉरंटमध्ये कधी जेवला आणि कोणाबरोबर होता याचे सर्व डिटेल्स आता या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये फ्रीझ झाले आहेत.
“समजा अशी कल्पना करू की, पृथ्वीवरच्या प्रलयात सगळे जण मेले आणि नंतर परग्रहवासी इथे आले, आणि हे ईमेल, फेसबुक, ट्विटर अकाउंट्स त्यांच्या हाती लागले; तर ही मानवजात कशी जगत होती याचे अत्यंत मुद्देसूद आणि तंतोतंत नकाशे त्यांना काढता येतील, एवढी ही माहिती विस्तृत आणि खोल असू शकते. या माहितीचं अजून एक लक्षण म्हणजे ही अविनाशी या स्वरूपाची आहे. (अर्थातच काही अपवाद वगळता.) म्हणजे माणूस मेल्यानंतरही त्याचं फेसबुक अंकाउंट सुरूच राहतं!”
अजिंक्यला ही अनन्यसाधारण अशी गोष्ट वाटते. त्याच्यामते आपण मानवसमूह म्हणून कसे जगतो, आपण कुठे जात आहोत, आपली दिशा काय आहे याबाबत सगळ्याच कलाप्रकारांमधून आर्टिस्ट्स एक दार्शनिक संकेत निर्माण करत असतात. तो म्हणाला, “त्यासाठी लागणारा कच्चा माल आता विपुल प्रमाणात उपलब्ध होतो आहे. तसंच आपली कला सादर करण्यासाठी, आपलं काम शेअर करण्यासाठी लागणारं व्यासपीठसुद्धा याच माध्यमांनी उपलब्ध करून दिलेलं असल्याने एक कन्व्हेक्शन करंट निर्माण झाल्याचं चित्र दिसून येतंय; ज्याने सतत वरचा थर खाली व खालचा थर वर होण्याची एक प्रक्रिया चालू राहते. त्यामुळे सध्याच्या काळात कलानिर्मिती ही जेवढी सोप्पी, तेवढीच अवघड गोष्ट आहे. चित्र काढलं की तुम्ही चित्रकार होता का? की त्यासाठी मेहनतीची गरज आहे? हा प्रश्न आपल्या पिढीसाठी खूपच जटिल झाला आहे. कारण फेसबुकवर तुम्ही चित्र पोस्ट केलं की तुम्हांला प्रतिक्रिया मिळण्यास सुरुवात होते; लाइक्स मिळतात. पण मी एकदा ‘ह्तटिरतिलैँण्डच्यू’ असं एक स्टेटस टाकलं होतं, तर त्यालाही प्रतिक्रिया आणि लाइक्स आले होते. तर हे यातले संभावित धोके आहेत. पण हे काही वर्ष व्हर्च्युअल आयुष्य जगल्याशिवाय कळत नाहीत. तसंच यातली उत्तरं ही ब्लॅक अँड व्हाइटमध्ये देता येणार नाहीत. कारण हे प्राधान्यक्रम व्यक्तिसापेक्ष आहेत.
“जागतिकीकरणाचा अजून एक परिणाम म्हणजे त्याने दिवस-रात्र नष्ट केले आहेत. मी रात्री झोपलेला असतो, तेव्हा अमेरिकेतला माझा मित्र जागा असतो आणि मीसुद्धा माझं व्हॉट्सअॅप ऑन ठेवलेलं असतं. तो माझ्याशी संपर्क साधू शकतो. याचाच अर्थ मी अनेक आयडेंटिटीज्‌ असलेला ओम्नीप्रेझेंट मनुष्य आहे. एकाच वेळेस मी अनेक ठिकाणी ऑनलाइन असतो, झोपलेलाही असतो आणि ‘अव्हेलेबल’पण असतो. म्हणजे थोडक्यात मी झोपत असा कध नाहीच. हे बदल पचवण्याच्या संक्रमणावस्थेतून आपण सगळे जातोय. हे बदल जसे जास्त जास्त आत शोषले जातील, तसे त्याच्या बांधिलकीचे स्तर उलगडत जातील.”
यानंतर मी थोडे ढोबळ आणि नेहमीचेच प्रश्न विचारले. ते असे – तुमच्यावर कोणाचे प्रभाव आहेत? या प्रभावांचं काय करता? ते स्वीकारता की आहेत तसेच राहू देता? किंवा त्यांचा वापर कसा करता?
या प्रश्नाचं उत्तर ओंकारने दिलं की, तसे अनेक प्रभाव आपल्यावर होतच असतात. तर वैभवनेही तसंच काहीसं उत्तर दिलं, “जो कवी वैश्विक कविता लिहितो अथवा लिहिते, त्या प्रत्येक कवीचा माझ्यावर प्रभाव आहे. मी माझ्या भौगोलिक सीमांच्या गरजांनुसार त्या प्रभावाला मोल्ड करण्याचा प्रयत्न करतो. मी अमेरिकन ब्लॅक लिटरेचरचा चाहता आहे. त्यांच्या कविता मला भावतात. त्यांत कोणताही बनेलपणा नसतो. आंबेडकरी साहित्याने सत्तरच्या दशकात जे साहित्य दिलं, त्यात कोणत्याही प्रकारची सेटलमेंट करणं नाकारलं. पण ते नाकारताना आपली मानवतावादी भूमिका ही अधिकाधिक वैश्विक कशी होईल, ही शिकवण कायम राहू दिली. माझ्यावर नामदेव ढसाळांसोबत, बाबुराव बागूल, संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, बॉब मार्ले, उदय प्रकाश, माया अँजेलो यांसारख्या कलावंताचा प्रभाव आहे.”
चैतालीला इंदिरा संत, ग्रेस, सौमित्र यांच्या कविता खूप आवडतात. कदाचित त्यांचा प्रभाव तिच्यावर कुठेतरी असेलच असं तिला वाटतं. ती म्हणाली, “मी कधीच प्रभाव टाळला नाही, पण म्हणून अगदीच लिखाणाची नक्कल करावी असंही नाही. कोणाचाही प्रभाव असणं हे नेहमीच तात्पुरतं असतं. त्यातून खरंतर आपलं आपण स्वत:ला सापडतोच.”
साठोत्तरी आणि नव्वदोत्तरी पिढीतील अनेक कवींचे प्रभाव माझ्या कवितेवर असून अस्तित्वशोध आणि परात्मता या बाबी माझ्या कवितेत येण्याला कदाचित साठोत्तरी कविता कारणीभूत असू शकते, असं सत्यपालला वाटतं. तो म्हणाला, “कोलटकर, ढसाळ, नेमाडे, चित्रे, नारायण सुर्वे, मनोहर ओक, तुळशी परब, वसंत गुर्जर, वसंत आबाजी डहाके यांच्या कविता मला आवडतात. जुन्या कवींमध्ये गालिब, तुकाराम, नामदेव आणि मर्ढेकर हे माझे आवडते कवी आहेत. अकरावीत असल्यापासून मी नव्वदोत्तरी कविता वाचत आलोय. ‘शब्दवेध’, ‘अभिधानंतर’, ‘ऐवजी’, ‘खेळ’ आणि ‘दर्शन’ या अनियतकालिकांबद्दल मला भावनिक जवळीक वाटते. त्यामुळे रविंद्र इंगळे-चावरेकर, मंगेश काळे, रमेश इंगळे-उत्रादकर, आनंद विंगकर, हेमंत दिवटे, प्रवीण दशरथ बांदेकर, अरुण काळे, अविनाश गायकवाड, वर्जेश सोलंकी, श्रीधर नांदेडकर, वीरधवल परब, मनोज सुरेंद्र पाठक, संतोष पवार, बालाजी सुतार, भगवान निळे असे अनेक कवी मला कमी-अधिक प्रमाणात आवडतात. माझ्या पिढीत महेश लोंढे, स्वप्निल शेळके, अजित अभंग, अविनाश वसंत किनकर, प्रणव सखदेव, अजिंक्य दर्शने, फेलिक्स डिसूझा, इग्नेशियस डायस, प्रेषित सिद्धभट्टी, वैभव छाया, शर्मिष्ठा भोसले, योजना यादव, अमोल कदम, हर्षवर्धन पवार, विक्रांत बदरखे, विनोद कुळकर्णी, अभ्या, सचिन कापसे असे अनेक कवी मला आवडतात. महेश लोंढे हा मला सर्वाधिक प्रभावित करणारा माझ्या पिढीतला कवी आहे. या सगळ्यांचाच माझ्या कवितेवर कमी-अधिक प्रमाणात परिणाम झालेला आहे.
“आपल्यावर जेव्हा एखाद्या  पडतो, तेव्हा ते लिखाणात झिरपणं हे मला अत्यंत नैसर्गिक वाटतं. ते प्रभाव कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मी कधीच करत नाही. प्रत्येक कवी हा पंरपरेतल्या मागच्या कवींच्या खांद्यावरच उभा असतो; त्यामुळे प्रभाव असणं ही गोष्ट वाईट नसते.”
अजिंक्यला एखाद्यावर दोन कवीचांच प्रभाव असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक वाटतं. त्याच्यामते त्याच्यावर ३३, ४४, ५५ जणांचा प्रभाव असावा; आणि भविष्यात हे क्षेत्रफळ वाढतच जावं! तो म्हणाला, “मी कविता करायला लागल्यानंतर मला समकालीन असलेले असे ओंकार, प्रणव हे कवी वाचले. (ज्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत असे.) तसंच सलील वाघ, हेमंत दिवटे, गणेश विसपुते, संजीव खांडेकर, मन्या जोशी हे कवीदेखील वाचले. रॉय किणीकर, दि. पु. चित्रे, अरुण कोलटकर, विलास सारंग, मनोहर ओक यांच्या काही कविता वाचल्या. मराठीशिवाय इतर कवींपैकी दुष्यंत कुमार, मुक्तिबोध, पाब्लो नेरूदा, विस्लावा सिम्बोर्सका यांच्याही कविता वाचल्या आहेत. विस्लावा सिम्बोर्सका यांची एक ‘टर्न ऑफ द सेंच्युअरी’ नावाची कविता आहे. (मूळ कविता : पोलिश)  त्यातल्या काही ओळी या, आपण जे आत्ता जगतोय त्याला, किती चिकटून आहेत बघ –
God was at last to believe in man:
good and strong,
but good and strong
are still two different people.
How to live – someone asked me this in a letter,
someone I had wanted
to ask that very thing.
Again and as always,
and as seen above
there are no questions more urgent
than the naive ones.

 

तर वाचन आणि लेखन यातून ऊर्जेची देवाणघेवाण असा प्रकार चालूच राहणार असला, तरी उद्या मला कोणी “अरे अजून तू हे वाचलं नाहीस?” असं विचारलं तर मला त्याचा मुळीच गिल्ट येणार नाही. कारण मी मुळातच या दोन प्रक्रिया स्वतंत्र आहेत असं मी मानतो. मला या जगातलं उतमोत्तम वाचायचं आहे, पण त्या शिदोरीवर माझं लेखन चांगलं होईल या भ्रमात मी नाही. कारण त्यासाठी मला वेगळी मेहनत घ्यावी लागेल याची मला कल्पना आहे.”
मग मी याला जोडूनच विचारलं की, मागच्या पिढीतल्या कवींबद्दल काय वाटतं? उदा. साठोत्तरी-नव्वदोत्तरी किंवा त्याही आधीचे?
ओंकारनं मागच्या पिढीतल्या कवींबद्दल त्याचं नेमकं मत तयार झालेलं नसल्याचं सांगितलं. तर प्रत्येक पिढीतील कवींचं स्वतःचं असं योगदान असलं, तरी त्याला स्वत:ला सर्वांत जास्त भावते ती साठोत्तरी पिढीच, असं वैभव म्हणाला. “त्या पिढीनेच कवितेचे खरे आयाम निश्चित केले. ह्यूमॅनिझम डिफाइन केला. कवितेतला विद्रोह कसा असतो हे जगाला दाखवून दिलं. पानं, फुलं, हिरवळ, प्रेयसी यांपुढे जात जात-वर्ग-लिंग-धर्माची चिलखतं कुरतडणाऱ्या राजकीय भूमिका जन्माला घातल्या. त्यांनी कवीचं कार्यकर्तेपण सिद्ध केलं. त्यांच्या याच योगदानावर आमच्या आजच्या पिढीला हे आत्मभानाचं बळ मिळालेलं आहे.”
चैतालीने या प्रश्नावर उलट प्रश्न विचारला – कवितेला कुठे कधी कालखंडात बांधता आलं आहे? कारण ती कालातीत आहे. ती म्हणाली, “मला कवितांची अशी विभागणी समजत नाही. जी मनाला भिडली, ती आताची कविता. मग ते तुकारामांचे अभंग असोत अथवा आत्ताच्या काळातल्या सत्यपालची कविता असो. जे काव्य प्रामाणिकपणे काहीतरी सांगतंय, ते मला महत्त्वाचं वाटतं. तरीही प्रश्न विचारलाच आहे म्हणून सांगते, मला इंदिरा संत नेहमीच आवडत आल्यात. त्या म्हणा किंवा शांता शेळके म्हणा, स्वत:चा परीघ रेखाटताना, पाहता पाहता अवघा अवकाश कवेत घेतात आणि ती कविता फक्त एका स्त्रीची न राहता आपल्या सगळ्यांची होऊन जाते. साठोत्तरी कवींमध्ये ढसाळ, ग्रेस यांच्या कविता मला नेहमीच जवळच्या वाटत आल्यात.”
अजिंक्यने नव्वदोत्तरी कवी आणि आत्ता लिहिणारे कवी यांची थोडी तुलना केली. तो म्हणाला, “मी नव्वदोत्तरी या शीर्षकाखाली जे कवी आहेत, ते वाचले आहेत. त्यातल्या काही कविता मला खूप आवडतात, तर काही कवितांबद्दल माझी टोकाची मतं आहेत; पण तो एका वेगळ्याच लेखाचा विषय होईल. मुळात मला हे वर्गीकरण आता फारच जुनं वाटायला लागलं आहे. हा त्या कवींवर अन्याय आहेच, पण आत्ताच्या पिढीच्या कवींवरही त्यामुळे अन्याय होईल की काय अशी भीती वाटते. You can’t compare apples with oranges! सध्याचा काळ बघता प्रत्येकाचं जग हे अधिकाधिक फ्रॅगमेंट्समध्ये विभागलं जाणार असून कंडेन्स होत जाणार्‍‍या साहित्याकडे बघण्यासाठी, जनरलायझेशन न करता, नवनवीन भिंगं शोधायची गरज आहे.”
पाचही कवी आपल्या कविता फेसबुक किंवा ब्लॉग यांसारख्या माध्यमांवर पोस्ट करत असल्याने मी विचारलं, बदलत्या माध्यमांमुळे कवितेत, प्रकाशनात, वाचकांपर्यंत पोचण्याच्या प्रक्रियेत काय बदल झालेत?
ओंकारच्या बर्‍याचशा कविता फेसबुकवर पहिल्यांदा प्रकाशित झाल्या आहेत व होतात. त्यामुळे लोकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी ते एक चांगलं माध्यम असल्याचं त्याचं मत आहे. वैभवनेही याला पुष्टी दिली. तो म्हणाला, “खूप बदल झाले आहेत. सध्या कविता या डिजिटल माध्यमांवर लिहिल्या जाण्याचा काळ आहे. अनेक कवी-कवयित्री फेसबुक, ब्लॉग यांसारख्या माध्यमांवर कवितालेखन करतात. तिथे त्यांना त्यांच्या कवितेवर इंस्टंट प्रतिक्रिया मिळते. त्यामुळे अनेक कवी हे केवळ सनसनाटी निर्माण  करेल अशी कविता लिहिण्यावर प्रचंड भर देतात. त्यात बभर म्हणून कवितेची आणि कवीची नाहक खिल्ली उडवणारे अनेक महाभाग याच सोशल मीडियावर खोऱ्याने उपस्थित आहेत. त्यांच्या नाठाळपणामुळे अनेकदा चांगल्या कवितेला मागे राहावं लागतं. सोशल मीडियावर असलेल्या प्रत्येकाला कविता कळतेच असं नाही. कविता हा थॉटप्रोसेसचा भाग असतो हे नीट समजून घ्यायला हवं.
“ऑनलाइन माध्यमांतून जास्तीत जास्त वाचकांपर्यंत  कविता पोहोचवता येतात. फक्त त्यासाठी कवीने तंत्रज्ञानाचा अंगीकार करायला हवा. कारण डिजिटल मीडियात छपाईचा खर्च, वितरणाचा खर्च वजा होतो. त्यामुळे अगदी माफक किमतीत किंवा मोफत कविता उपलब्ध होऊ शकतात.”
बदलत्या माध्यमांमुळे, उदा. फेसबुक, ब्लॉगमुळे, कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते, असं मत चैतालीनेही मांडलं. ती म्हणाली, “इथे कवितेचा, लिखाणाचा खूप मारा होत असला; तरी त्यातून खूप छान लिहिणाऱ्या कवींशी ओळखही झाली किंवा प्रत्यक्ष ओळख नसतानाही खूप वेगळं लिखाण वाचायला मिळालं. मात्र नवीन माध्यमांमुळे आपला वाचन-मनन करण्याचा वेळ खूप कमी झाला आहे असं मला जाणवलं. त्यावर ठरवून नियंत्रण ठेवलं, तर या माध्यमांचा योग्य वापर करता येईल.”
फेसबुकसारख्या माध्यमाचा फायदा कवी म्हणून आपल्यालाही झाल्याचं सत्यपालने सांगितलं. तो म्हणाला, “फेसबुकवर मी अधून-मधून माझ्या आणि माझ्या मित्रांच्या कविता टाकत असतो. कवितेची चांगली जाण असणारे कितीतरी लोक तिथे जोडले गेले आहेत. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटी झाल्या. आभासी मैत्रीचं रूपांतर वास्तव मैत्रीत झालं. या लोकांशी कवितेवर अनेकदा बोलणं होतं. त्यांच्या कविता वाचता येतात. यातून माझीही कवितेची जाण वाढत जाते.”
अंजिक्यने तर आधीच सांगितलं आहे की, तो फेसबुकमुळेच कविता लिहू लागला! फेसबुक किंवा तत्सम माध्यमाचा कविता वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच फायदा होतो, असं तो म्हणाला. पण त्याचं म्हणणं होतं, एखाद्या कवीची वा लेखकाची नोंद मराठी वाचक-समीक्षकांनी घ्यावी, याकरिता त्याला अजूनही हार्ड कॉपी असणारा संग्रह का काढावा लागतो? तो म्हणाला, “ईबुक्स आपल्याकडे कोणीच विकत का घेत नाहीत? माझी नोंद घ्या हे म्हणण्यासाठी हार्ड कॉपी असणारा कविता संग्रह का काढावा का लागतो?”
ई-माध्यमं किंवा फेसबुकचा होत असलेला वापर यावर मी मध्ये एक टिपण लिहिलं होतं. त्यात मी म्हटलं होतं – फेसबुकवर कविता लिहिणार्‍यांना फेसबुकोत्तर कवी असं म्हटलं जातं. तर मला ते फारसं पटत नाही किंवा फक्त सोय म्हणूनच ते ठीक आहे असं वाटतं. कारण आम्ही कवितेचा, किंवा खरंतर शब्दांचाच, अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून वापर केला; तर फेसबुकचा साधन म्हणून. कॅमेर्‍याचा वापर करून सिनेमातून सांगितलेली गोष्ट ही पडद्यावर पाहिली काय, किंवा लॅपटॉपवर पाहिली काय; सिनेमा तोच असतो, फक्त स्क्रीन बदलते. तसाच हा प्रकार आहे. नंतर आमच्यापैकी बर्‍याच जणांच्या कविता नियतकालिकांमध्ये छापून आल्या, संग्रहही आले. पण एक मात्र खरं की, माझा किंवा माझ्या पिढीतल्या बहुतांश कवी-लेखकांचा प्रवास हा उलटा, म्हणजे फेसबुकवरून किंवा इंटरनेटवरून नियतकालिकांकडे, म्हणजे ऑनलाइनकडून प्रिंट-छापील असा, झालेला आहे. इंटरनेटमुळे आम्ही नियतकालिकांच्या संपादकांना कळलो. त्यामुळे मी फेसबुक किंवा नियतकालिकं किंवा पुस्तकं या सगळ्यांकडे साधन म्हणून पाहतो. कारण मी अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून कविता-कथा हा प्रकार निवडला आहे. तो लोकांपर्यंत पोचवण्यासाठी नेट किंवा छापील कागद यांपैकी किंवा आणखीनही दुसरं साधन मला वापरायला आवडेल.
पण तरीही मला असं वाटतं की, या दोन्ही – फेसबुक व नियतकालिकं किंवा छापील साधनं – या साधनांचे फायदे-तोटे आहेत.
फेसबुक हे काहीसं अनियंत्रित किंवा मुक्त असं साधन आहे. तसंच ते व्यक्तीशी संलग्न आहे. त्यामुळे त्या अकाउण्टवरून ती व्यक्ती तिला हवं ते, हवं तेव्हा,  हव्या त्या भाषेत, हव्या त्या शब्दांत व हव्या त्या मर्यादेत व्यक्त होऊ शकते. त्यावर तत्काळ प्रतिसाद मिळतात. वाहवा होते, वाद-चर्चा होतात. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की, हे साधन – नकळतपणे किंवा सुप्तपणे – आपल्या अहंकाराला खतपाणी घालणारं आहे. परिणामी इथे १०० किंवा ३०० शब्दांच्या पोस्ट्स लिहिणार्‍या लेखकांना आपण ‘ऑथर’ झाल्यासारखं वाटू शकतं. किंवा प्रत्यक्ष जीवनात मिळालेला अनुभव हा इथे त्वरित मांडण्याची सोय हाताशीच असल्याने तो जसाच्या तसा उत्स्फूर्तपणे, ओघवत्या शैलीत मांडताही येतो. पण त्यामुळे होतं असं की, त्या अनुभवाचे विविध कंगोरे, बारीकसारीक गोष्टी हे मात्र दुर्लक्षित राहण्याचा धोका संभवतो. शिवाय लाइक्सची किंवा स्तुतीची सवय लागल्याने पेशन्सचा – संयमाचा –  खातमा होण्याचीही शक्यता निर्माण होते. म्हणूनच मला वाटतं की, फेसबुक हे साधन कवींसाठी सोयीचं ठरतं; कारण कविता हा फॉर्म मुळातच स्वप्रतिमेशी निगडित व काही प्रमाणात स्वप्रतिमा कुरवाळणारा असल्याने त्या फॉर्मचं फेसबुकवर ‘फावलं’ आहे. आम्हीही त्याचा वापर आमच्या कवितांसाठी करू शकलो, ते म्हणूनच. पण जेव्हा गद्यलेखनाचा किंवा फिक्शनचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र फेसबुक उपयुक्त ठरत नाही. कारण अशा लेखनासाठी हवा असलेला पेशन्स, मांडणी-घाट यांचा विचार, वास्तवाचे पदर पाहण्याची दृष्टी (जी खरंतर कवितालेखनासाठीही हवी असतेच!) आदी गोष्टींचा विकास होण्यासाठी आवश्यक असलेलं पूरक वातावरण फेसबुक देऊ शकत नाही. त्यामुळे असं लेखन लिहून झाल्यानंतर, त्याची जाहिरात करण्यासाठी मात्र फेसबुक हे चांगलं साधन ठरू शकतं. आणि दुसरं मला असं वाटतं की, फिक्शन-लेखकांसाठी किंवा गद्यलेखकांसाठी फेसबुक हे लेखनाचा कच्चा माल गोळा करण्याचं एक उपयुक्त साधन आहे. इथे अनेक व्यक्ती – ज्या कधी आपल्याला भेटण्याची शक्यताही नसतीते, त्या – आपल्याशी कनेक्ट होतात. त्यांच्याशी देवाणघेवाण होण्याची शक्यता निर्माण होते. त्यांच्या अनुभवांचा, घटनांचा लेखकाला कच्चा माल म्हणून उपयोग करता येऊ शकतो, असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.
नियतकालिकाचा विचार केल्यावर असं वाटतं की, नियतकालिकाला एक संपादक किंवा एकापेक्षा जास्त संपादक असतात. त्या त्या संपादकाचा स्वतःचा अशा एक दृष्टिकोण असतो; भले तो कितीही तटस्थ असू दे. लेखक किंवा कवीने दिलेलं लेखन वाचून आवश्यक असल्यास संपादक त्याबाबत लेखकाशी चर्चा करतो आणि त्यात आवश्यक त्या सुधारणा करून द्यायला सांगतो. किंवा तो सरळ ते लेखन नाकारतो.
मला असं वाटतं की, ही प्रक्रिया कोणत्याही कवी-लेखकाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. कारण लेखक किंवा कवी हा काही प्रमाणात ईगोइस्ट असतो असं माझं मत आहे. आणि जिथे ईगोचा विचार असतो, तिथे व्यापक विचार संकुचित होतात असं मला वाटतं. आता या प्रक्रियेमुळे लेखक-कवींच्या ईगोला एक धक्का देण्याचं काम होतं. त्याच्या लेखनाकडे त्रयस्थ व्यक्ती कशी पाहते याचं दर्शन त्याला होतं. त्यामुळे त्याच्या लेखनकक्षा रुंदावू शकतात. किंवा या नकारामुळे, आपल्या लेखनाबाबतच्या – ते ग्रेट आहे किंवा भारी आहे, असल्या – भ्रामक समजुतींतून तो बाहेर येण्याची शक्यता निर्माण होते. आणि त्यामुळे संयम वाढून कदाचित तो लेखनाबद्दल अधिक सखोल विचार करण्यास उद्युक्त होऊ शकतो. यातून त्याला आधी माहीत नसलेल्या किंवा न दिसलेल्या अनेक गोष्टी नव्याने दिसूही शकतात. मला असं वाटतं की, ही प्रक्रिया फेसबुकसारख्या माध्यमात नसते; जी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ती फेसबुकवरच्या ग्रुप्ससारख्या सोयींचा वापर करून कशी तयार करता येईल, याचा आपण विचार करायला हवा.
दुसर्‍या बाजूने विचार करायचा झाल्यास, नियतकालिकांत संपादक असल्याने सत्तेचं, ओळखीपाळखींचं राजकारण सुरू होतं. जे फेसबुकमध्ये आपणच यूझर असल्यामुळे – म्हणजेच आपल्या स्व या नियतकालिकाचे आपणच प्रकाशक असल्यामुळे! – मोडीत निघतं. पण तरी फेसबुकवरही ठराविकांना लाइक करणं, कमेंट्स करणं, अनुल्लेखाने मारणं किंवा गट तयार करणं असले प्रकार होतच असतात.
फेबसुक काय किंवा छापील माध्यमं काय; ही दोन्ही साधनं तटस्थ आहेत. त्याचा वापर कोण कसा करतो यावर त्यांचं यशापयश किंवा फायदेतोटे अवलंबून आहेत. मी वर उल्लेखलेल्या साधनांबद्दलच्या निरीक्षणांना अपवादही आहेत. त्यामुळे या दोन्ही साधनांचा ज्याने-त्याने आपापल्या परीने वापर करायला हवा. दुसरं असं की, छापील साधनं ही कितीतरी वर्षांपासून विकसित होत आहेत. परिणामी छापील साधनाचा वापर साहित्यादीदी कलांसाठी कसा करता येऊ शकेल, याच्या जास्तीत जास्त शक्यता आपल्याला समजल्या आहेत. उलट फेसबुक हे गेल्या काही वर्षांत विकसित झालेलं नवं साधन आहे. त्यामुळे ट्रायल अँड एरर या तत्त्वाचा वापर करून त्याचा अधिकाधिक वापर करायला हवा, असं मला वाटतं. कारण ते भविष्यातलं एक महत्त्वाचं साधन ठरेल असं वाटतं.
तर आमच्यात झालेला हा संवाद सगळ्या विषयांना, मुद्द्यांना कवेत घेणारा नसला; तरी त्यातून काही गोष्टींचा अंदाज मात्र नक्की आला आहे. काही विषयांबद्दल आणखीही बोलता येण्यासारखं आहे, शिवाय दिलेल्या उत्तरांच्या खोलात जाण्यासाठी किंवा उत्तरांची उलटतपासणी घेण्यासाठी प्रतिप्रश्नही विचारता येण्यासारखे आहेत; ज्यातून आणखी कित्येक तास गप्पा रंगू शकतील, वाद होऊ शकतील. पण सध्या तरी अशा संवादाच्या आणखी दीर्घ राउंड्स करायच्या, हे डोक्यात मुरवत ठेवत मी टायपायचं थांबतो!
***
चित्रस्रोत :
‘F’ – कल्याणी, संवेद
छायाचित्रे : प्रणव सखदेव