कुणी पत्कर घेतं का, पत्कर?

पुस्तकाबिस्तकांवर, कोशाबिशांवर, प्रमाणलेखनातल्या झेंगटांवर आणि एकूण जगातल्या यच्चयावत गोष्टींवर गप्पा हाणत असताना आम्ही सतत एक ध्रुवपद आळवत असतो, असं आमच्या लक्ष्यात आलं आहे.
‘हे कुणीतरी करायला हवं आहे यार!’ हे ते ध्रुवपद.
मराठीमध्ये न झालेली आणि कुणीतरी करायला हवी आहेत अशी ही कामं आहेत. ती कोण करतं हे फारसं महत्त्वाचं नाही. उत्साह, जाण कमवण्यासाठी राबायची हौस, कामातला चोखपणा सांभाळण्यापुढे मानमरातब आणि श्रेयबिय या गोष्टी क्षुल्लक आहेत हे समजण्याची अक्कल – आणि मुख्य म्हणजे बक्कळ वायझेडपणा – इतपत सामग्री असलेल्या कुणीही ती केली; तरी कामं झ्याकच होतील.
तूर्त अश्या कामांची यादी इथे देत आहोत. त्यात सुचेल तसतशी भर घालत राहू. हे काम केलं पाहिजे यार, मजा येईल – असं तुमच्या मनात आलं; तर ते काम तुमचं आहे असं समजून जरूर हाती घ्या. आम्हांला जमेल तशी मदत करायचा प्रयत्न करूच. या कल्पनांवर आमचा हक्कबिक्क नाही, श्रेयाची अपेक्षा त्याहून नाही.
यांपैकी एखादं काम तुम्ही आधीच सुरू केलं असेल वा कुणी सुरू केल्याचं तुम्हांला ठाऊक असेल, तर आम्हांला जरूर कळवा. इथे तशी नोंद केल्यास मदतीला उत्सुक असलेल्या लोकांच्या दृष्टीनं ते बरं होईल, पुनरावृत्तीही टाळता येईल.
पु. लंं.चंं चरित्र
पुलंच्या जन्मस्थळाची आणि कारकिर्दीची आणि दानशौर्याची खानेसुमारी करणं इतकंही काम आजवर कुठेही झालेलं दिसत नाही. ते तर करायला हवंच आहे. पण त्यासह या माणसाला इतकी अफाट आणि सर्वमान्य लोकप्रियता का लाभली, त्यात सामाजिक परिस्थितीचा वाटा किती, त्याच्या लोभसवाण्या माणूसप्रेमी स्वभावाचा वाटा किती, त्याच्या भाषेचा वाटा किती आणि एखाद्यावर भरभरून प्रेम करण्याच्या आपल्या भाबड्या स्वभावाचा वाटा किती, या सगळ्याचाच हिशेब मांडायला हवा आहे. लेखक म्हणून या माणसानं अनेक गोष्टी केल्या, पण काही केल्या नाहीत. त्या कोणत्या हेही नोंदायला हवं आहे. हे फक्त पुलंचंच चरित्र नसेल, ते एका विशिष्ट कालखंडातल्या मराठी सारस्वताचंच चरित्र असेल. हे कुणीतरी करायला हवं आहे.
समग्र आणि अद्ययावत मराठी व्याकरण
मोरो केशव दामल्यांचा समग्र मराठी व्याकरण हा ग्रंथ शंभर वर्षांपूर्वीचा. त्यानंतर अर्जुनवाडकरांनी त्याची सटीक आवृत्ती प्रकाशित केली. त्यानंतर हे काम अद्ययावत करायला हवं आहे. त्यात हल्लीच्या प्रयोगांची भर घालायला हवी आहे, कालबाह्य प्रयोग काढायला हवे आहेत, हे सगळं प्रकरण ऑनलाईन कुठेतरी संदर्भासाठी उपलब्ध करून द्यायला हवं आहे. मराठी व्याकरणातला संदर्भ बघायचा झाला, तर एकही उत्तम संदर्भसंस्थळ वा संदर्भपान जालावर नाही, ही किती शरमेची बाब आहे! हे काम कुणीतरी करायला हवं आहे.
मराठी-मराठी शब्दकोश
मराठी शब्दाचा अर्थ पाहायची वेळ आली, तर जालावर वावरणारा माणूस मोल्सवर्थचा कोश उघडायला धावतो. एका विदेशी माणसानं सुमारे शतकभराच्याही पूर्वी केलेलं काम आजही आपण वापरतो, हे त्या माणसाच्या कामाची थोरवी सांगणारं आहे कबूल. पण आपला नाकर्तेपणाही सांगणारं आहेच की. त्या कोशाचं अद्ययावतीकरण करायला पाहिजे; मराठी शब्दांचे अर्थ मराठीतून सांगण्यासाठी व्याख्याशब्दयादी घडवायला पाहिजे, तिचा वापर करून शब्दार्थ दिले पाहिजेत; त्यात शब्दांच्या खास आधुनिक-अर्वाचीन अर्थबदलांची अर्बन डिक्शनरीसदृश नोंद केली पाहिजे; उच्चार दिला पाहिजे; शब्दाशी निगडित समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, जोडशब्द आणि सामासिक शब्द, खेरीज सोबत जोडण्याची क्रियापदं, अव्ययं आणि इतर नामं आणि त्यांमुळे बदलणारे अर्थ नोंदले पाहिजेत; व्युत्पत्ती दिली पाहिजे; लिंग-वचन-शब्दजाती यासकट शब्दाचं सामान्यरूप आणि त्याचे लेखननियम नोंदले पाहिजेत; शक्य त्या ठिकाणी चित्र दिलं पाहिजे…. हे सगळं कुणी कधी करायचं? सरकारी मदतीची वाट पाहत बसायचं? कुणीतरी तरी सुरुवात करायला हवी ना…
महाभारताधारित मराठी पुस्तकं
मराठीत महाभारतावर आधारित पुस्तकांना तोटा नाही. ललित वाङ्मय आणि अललितही. एकेका व्यक्तिरेखेची पूजा बांधणारी पुस्तकं आहेत. काव्यगुणावर चर्चा करणारी पुस्तकं आहेत. सामाजिक शास्त्रांच्या अंगानं चर्चा करणारी पुस्तकं आहेत. या पुस्तकांना महाभारत पुन्हा-पुन्हा का खुणावत राहतं हा एक अत्यंत इंट्रेस्टिंग उत्तरांकडे नेणारा प्रश्न आहे. त्यांची भाषा, शैली, आकार, भूमिका या सगळ्याचा तौलनिक अभ्यास करून मांडला तर हाती नक्की फार मजेशीर आणि सखोल ऐवज येईल. पण कुणीतरी करायला पाहिजे…
तुम्हांलाही असे काही साहित्यिक-भाषिक प्रकल्प महत्त्वाचे वाटताहेत? आम्हांला जरूर कळवा.
– संपादक, रेषेवरची अक्षरे
resh.akshare@gmail.com
Facebook Comments