Uncategorized

बदलतं मराठी बालसाहित्य

‘बदलतं मराठी बालसाहित्य’ या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे. 
यासंदर्भात आजच्या मराठी बाल/कुमार पिढीच्या वाचनसवयी काय आहेत हे टिपण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही पिढी काय वाचते, कसं वाचते, का वाचते, कोणत्या भाषेतलं साहित्य वाचते वगैरे. या पिढीच्या वाचनसवयींची तुलना त्यांच्या पालकांच्या पिढीशी केली तर साधारण पन्नासेक वर्षांचं चित्र एकत्र पाहता येईल, आणि या काळात झालेले बदलही टिपता येतील.
यासाठी आम्ही दोन सर्वेक्षणं करत आहोत. किंबहुना एकाच सर्वेक्षणाचे हे दोन भाग आहेत. साधारण वाचत्या वयात असलेल्या मुलामुलींनी (वय वर्षे सात ते अठरा) भरायची एक प्रश्नावली आहे. जवळजवळ तशीच, पण थोडं वेगळेपण असलेली प्रश्नावली त्यांच्या पालकांनी भरायची आहे. खाली या प्रश्नावल्यांचे दुवे दिले आहेत. जर तुम्ही सात ते अठरा या वयोगटातल्या मुलामुलींचे पालक असाल, तर ही प्रश्नावली स्वत: भरा आणि आपल्या पाल्याकडूनही भरून घ्या. तुमच्या माहितीत असे आणखी पालक किंवा पाल्यं असतील, तर त्यांच्यापर्यंत या सर्वेक्षणाचे दुवे पोचवा.
या प्रश्नावल्यांतून जमा झालेल्या माहितीचं संकलन आणि त्यातून निघालेले निष्कर्ष घेऊन आम्ही येऊच!
मदतीसाठी आपले अनेक आभार!
Uncategorized

वाचनीय दिवाळी अंक – लोकमत दीपोत्सव

– अंतरा आनंद


बॅग उचलून वाट फुटेल तिथे जाणार्‍या बॅगपॅकर्सपासून ते प्रवास म्हणजे खान-पान आणि आराम असं समीकरण मांडणार्‍या प्रवासी कंपन्यांसह प्रवास करणारे प्रवासी, असे अनेक प्रकार प्रवासाचे आणि प्रवाशांचेही. पण प्रत्येक जण स्वत:च्या नकळत प्रवास करतच असतो. लहानपणीच्या बोबड्या बोलांपासून ते बोळक्या तोंडातून निघणार्‍या बोलांपर्यंतच्या प्रत्येकाच्या प्रवासात अनंत प्रवास सामावलेले असतात. अशा प्रवासांचं वेगळेपण टिपणारा दिवाळी अंक म्हणजे लोकमतचा ‘दीपोत्सव’.


मोटार, रेल्वे, विमान या सर्वांहून भारी असं प्रवासाचं साधन म्हणजे सायकल. या सायकलीचं चित्र असलेलं अंकाचं मुखपृष्ठ लक्ष्यवेधी आहे. दिवाळी म्हणून की काय, या सायकलला झालर लावलीय. तोरणासाठी पानं-फुलं घेऊन चाललेल्या या सायकलच्या कॅरिअरवर फटाक्यांच्या पेट्या तर आहेतच, पण मागे छत्रीही लावलीय. दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाची पठडी मोडणारं असं हे मुखपृष्ठ. आपला अंकाबरोबरचा प्रवास तिथूनच सुरू होतो.


लोकमतच्या पत्रकार चमूने एनएच-44 या महामार्गावरून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेला प्रवासावर आधारित ‘एनएच 44’ हा लेख हा या अंकाचा विशेष भाग.  खरं तर हा प्रवासाचा पट एवढा मोठा आहे की तो दिवाळी अंकातला एका लेखात मांडायचा, तर तो संक्षिप्त होणं अपरिहार्यच. पण तसा असूनही हा लेख कित्येक अनुभवांचं वाटप करून जातो. त्यात चंबळमधले बदल टिपणारा भाग लक्ष्यणीय. अमेरिकेकडे डोळे लावून बसलेला मदुराईतला पुजारी; इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या परिस्थितीमुळे दिल्लीला न जाऊ शकल्याने आंध्रात ढाबा वसवणारा शीख; इंजिनिअरिंग करून, ‘डकैती’तील आक्रमकता शोकेसमध्ये ठेवून आधुनिकता स्वीकारणारा चंबळचा प्रदेश… एकंदरीत भारतामधील विसंगतीतली संगती हा रिपोर्ताज दाखवतो. परंपरेचा हात धरून प्रगतीची, नव्या जमान्याची उन्हं अंगावर घेणारी दक्षिणेकडची भारतीय मनोवृत्ती उत्तरेकडे येता येता मात्र विषादपूर्ण रीतीने बदलताना दिसते. शंकराचार्यांच्या गावात त्यांच्या साईविरोधाबद्दल “मानो तो सब भगवान!” असे उत्तर देणार्‍या बी.एस.सी. करणार्‍या आदिवासी मुली आहेत; तर मथुरेत मंदिरात नेणारी, बारा-तेरा वर्षांची, शिक्षण सोडून नशा करणारी मुलं. दक्षिणेकडे भेटतात ते, ‘पैशांसाठी कुणाची चाकरी करण्यापेक्षा आपणच आपले मालक का होऊ नये?’ या विचाराने आर्थिक नुकसान सोसून गल्फमधून स्वत:च्या गावी परतलेले व्यावसायिक जमील आणि अफजल; तर स्वत:च्याच गावात काय चाललंय याचा नक्की थांग न लागल्याने, सततच्या अस्थिर आयुष्याला कंटाळून बंदूक हाती घेण्याची भाषा बोलणारे हरिफत आणि साजिद भेटतात काश्मीरमध्ये. एकाच देशातल्या या दोन टोकांच्या दोन मनोवृत्तींमधला प्रवास रेखाटण्यात हा लेख नक्कीच यशस्वी झालाय. या देशातल्या मुली मात्र शिकणे आणि आपली प्रगती करणे, या दोनच उद्दिष्टांनी झपाटलेल्या दिसतात. त्यात दक्षिण-उत्तर असा भेद नाही. असलाच तर इतकाच, की हरयाणात हे शिक्षण हॉकीचं असतं आणि केरळात इंजिनिअरिंगचं. हे चित्र आशादायी वाटतं. शेतीसमृद्ध हरयाणा-पंजाबमधली नशेच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई अस्वस्थ करते. अर्थात ही सगळी मंडळी प्रवासात भेटणार्‍या दोन घटकांपुरत्या सहप्रवाशांसारखीच वेगाने येतात आणि जातात. आत्ममग्न आणि शांत कन्याकुमारी; लांब शाळा-जवळ मंदिरं अशी अवस्था असूनही, शिकून आयुष्याला दिशा देऊ पाहणारा दक्षिण भारत. आणि राजकिय, धार्मिक, प्रादेशिक तिढ्यात सापडून शिक्षण, रोजगार या प्राथमिक गोष्टींवरच विपरित परिणाम झाल्याने दिशाहीन झालेला काश्मीरमधील युवावर्ग. एकाच देशातील दोन टोकांचं चित्र जास्त अस्वस्थ करतं.


वैशाली करमरकर यांचा ‘रानोमाळ’ हा अजून एक खास लेख. मुस्लीमबहुल प्रदेशाला वापरून चालणारं महासत्तांचं राजकारण. इराक युद्धानंतर आयसिसचा उदय, त्यामुळे स्फोटक झालेला रोजचा दिवस आणि त्यामुळे विस्थापित होणार्‍या झुंडी, मानवतेच्या दृष्टीने त्यांना प्रवेश देणारे युरोपीय देश, यात धार्मिक घटकांनी केलेला चंचुप्रवेश, त्यापायी बिघडलेलं युरोपीय देशांचं अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण या सगळ्याचा थोडक्यात वेध घेणारा हा लेख. समाज आणि राजकारण या दोन्हींना स्वत:च्या फायद्यासाठी खेळवू पाहणार्‍या वेगवेगळ्या लॉबीज, त्यांची माध्यमांवर असलेली पकड, माध्यमं नेतील त्या दिशेला वळू पाहणारं समाजमन, त्यांत मिसळलेले पूर्वग्रह, लोकशाहीला मारक ठरणारी व्यक्तिगत पातळीवरील असुरक्षिततेची भावना ह्या सगळ्याचा एकच गोंधळ उडालेला दिसतो. या गोंधळाचे ताणेबाणे थोडक्यात पण व्यवस्थित मांडणारा हा लेख मला आवडला. अजून बरंच काही लिहिता येण्याजोगं आहे, पण दिवाळी अंकात जागेच्या मर्यादा असणार. त्या मर्यादेत राहूनही खूप काही देणारा लेख.
स्टार्टअपच्या ओघात आपली, नॅनोची कहाणी सांगणारा रतन टाटा यांचा लेख ठीकठाक. स्टार्टअपच्या ओघात भारतातील कार्यसंस्कृती बदलतेय हे त्यांचं विधान आहे. तसं खरंच आहे का? की गुणवत्तेच्या आधारावर पुढे जाणारी संस्कृती आणि भारतीय पारंपरिक कार्यसंस्कृती; या एकमेकांच्या विरुद्ध जाणार्‍या कार्यसंस्कृती – कधी जुळवून घेत, तर कधी संघर्ष करत – पुढे चालल्या आहेत? याबद्दल सविस्तर वाचायला आवडलं असतं. पण लेखाचा बराचसा भाग टाटा आणि नॅनो यांवरच खर्च झालाय आणि स्टार्टअप कंपन्यांबद्दलची मतं शेवटी थोडक्यात मांडली आहेत. त्या मांडणीत काही वेगळेपणा आहे, काही नवीन विचार सांगितला जातोय असंही नाही. कदाचित मुलाखतीतून तयार केलेला लेख असल्यामुळे असेल वा या अंकासाठी खास नवीन मुलाखत न घेता आधीच्याच मुलाखतीवर आधारित असल्यामुळे असेल; पण अपेक्षेएवढं काही त्यातून मिळालं नाही. त्यापेक्षा टाटा कल्चर ते स्टार्टअप असा कार्यसंस्कृतीचा प्रवास जास्त वेधक वाटला असता.


व्हिएतनामधून अमेरिकेत आलेल्या निर्वासित कुटुंबातील प्रिसिला चान. तर विद्यापीठातला एक बेशिस्त विद्यार्थी ते आंत्रप्रुनर असा प्रवास केलेला मार्क झुकेरबर्ग. विद्यापीठात शिकत असतानाच दोघांनी आपलं आयुष्य एकत्र घालवायचं ठरवलं. मार्कच्या डोळे दिपवणार्‍या प्रवासात प्रिसिलाचं असणं सहज झाकोळलं गेलं असतं. पण स्वत:चं उद्दिष्ट ठरवून वाटचाल करणारी प्रिसिला ‘ओह! द प्लेसेस यू विल गो…’ या लेखात दिसते. दैनंदिन चालीरीती, जेवणखाणं यांमध्ये प्रचंड फरक असलेलं घरातलं आणि बाहेरचं वातावरण, त्यामुळे बुजरी असलेली प्रिसिला. अमेरिकन शिक्षणसंस्कृतीने तिच्यात आत्मविश्वास जागवला. वाचनाची आवड लावून घेऊन त्यातून तिचं इंग्रजी सुधारल्यावर “व्हॉट डिड आय डू, यू वर्क्ड ऑन युवर ग्रामर!” असं म्हणणारे इंग्रजी साहित्याचे सर, “मी टेनिस खेळले, तर मला हार्वर्डमध्ये ऍडमिशन मिळवणे सोपे जाईल का?” या तिच्या प्रश्नाला “स्ट्रेट ए ग्रेड कायम ठेवलीस, सॅट परीक्षेत उत्तम स्कोअर कमावलास आणि टेनिसही खेळलीस; तर मिळेल हार्वर्डमध्ये अॅडमिशन.” असं सांगणारे विज्ञानाचे शिक्षक, हे वाचून हेवा वाटतो. आपल्याकडच्या परीक्षा आणि असाइनमेंट्सच्या चरकात पिळले जाणारे विद्यार्थी आठवून त्यांची दयाही येते. देशाचं सामर्थ्य घडतं ते अशा शिक्षकांच्या बळावर. हार्वर्डला प्रवेश मिळाल्यावरही प्रिसिलाला न्यूनगंड आलाच. तो घालवण्यासाठी सेवाभावी उपक्रमांत सामील होणं; मार्कबरोबरच्या नात्याला दिशा मिळणं; फेसबुक-कीर्तीमुळे बदललेलं आयुष्य, तरीही तशीच राहिलेली तिची प्राथमिकता या सगळ्यांचं छान चित्रण या लेखात आलं आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची प्रिसिलाची मनापासूनची इच्छा. त्यासाठी विद्यार्थी असल्यापासून ती करत असलेलं काम, त्या कामाला ‘चान-झुकेरबर्ग इनिशिएटिव्ह’च्या स्वरूपात आलेला आकार; या सगळ्याबद्द्लचं तिचं मनोगत इथे आहे. शाळेनं आत्मविश्वास मिळवून दिलेल्या प्रिसिलाने त्या आत्मविश्वासाची रुजवण इतरही मुलांमध्ये करण्यासाठी ‘द प्रायमरी स्कूल’ हे मॉडेल उभं करणं, प्रसिद्धीसोबत आलेला पैसा जगभरातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरणं हा तिचा प्रवासानुभव समृद्ध करणाराच.
आपण जगाबद्दल बोलतो, पण आपल्या दोन सख्ख्या शेजारी देशांबद्दल आपल्याला त्रोटक आणि ऐकीव माहिती असते. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांबद्दल भारतीय मनात एक नकारात्मक दृष्टीकोन असतो. कांझा जावेद ही पाकिस्तानातील एक शिक्षिका. मुलांच्या लेखनातील विखार वाचून ती हबकली. हा विखार त्यांच्या कानावर घरीदारी पडत असताना त्यांच्याकडून विवेकाची अपेक्षा करणं वा तो बाळगायला शिकवणं, हे दोन्ही व्यर्थ. यांपैकी कशावरही थेट भाष्य न करता ‘ऐसा क्यों?’ असा प्रश्न विचारत उत्तरं शोधायला मदत करणारी तिची शैली लाजवाब. फुटकळ का असेनात, असे प्रयत्न मुलांना सत्याच्या जवळ नेऊन त्यांच्या मनातली कटुतेची धार बोथट करत राहतात. विषयाला धरून असलेला हा छोटेखानी लेख चांगला आहे.


आपला दुसरा शेजारी चीन तर अजूनच वेगळा. तिथल्या अनुभवांवर आधारित टेकचंद सोनावणेंचा ‘धुक्यातला ड्रॅगन’ हा लेख. शेजारी म्हटलं, तरी वेगळीच संस्कृती; सामाजिक आणि राजकीयही. भारतालाच काय, कोणालाही पूर्णपणे न समजलेला असा हा देश. अणुपुरवठादार राष्ट्रांच्या गटात भारताने सामील होण्याला चीनने जो विरोध केला, त्याबद्दलचे मेसेज वाचण्या-पाठवण्यात आपली दिवाळी गेली. चिनी माल बोगस असतो, हे आपलं लाडकं विधान आहे. ‘हा माल बोगस असतो, कारण तुमच्या व्यापार्‍यांनाच स्वस्त माल हवा असतो’ असं म्हणणारी युवूतली विक्रेती या लेखात भेटते. ‘युवू’ हा भाग म्हणजे चिनी मालाची पंढरी. ‘माओ म्हणजे चीनचा गांधी’ असं विधान करणारा झू म्हणजे सर्वसामान्य चीनी नागरिकांचा प्रतिनिधीच. या सगळ्या लोकांमध्ये खास आत्मविश्वास झळकताना दिसतो. या आत्मविश्वासाची यथार्थ ओळख हा लेख करून देतो.  भांडवलशाहीचा फायद्यांचा पुरेपूर लाभ उठवणारा चिनी साम्यवाद जगभरासाठीच कुतूहलाचा विषय. समृद्धी, सुखी जीवन असलं, तरी साम्यवादी पकड मात्र लोकांच्या मनावर तितकीच घट्ट आहे हेच या लेखातून दिसून येतं. लेखकाला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला भारताबद्दल कुतूहल आहे, पण चीनचं श्रेष्ठत्व त्यांच्या मनावर पूर्ण बिंबलेलं आहे. त्यामुळे लोकशाहीतील अपरिहार्य मतमतांतरं; हा त्यांना निरंकुश लोकशाहीचा दुष्परिणाम वाटतो. ‘त्यांना व्यक्त व्हायचा अधिकार नाही’ असं म्हणून हळहळणारे आपण भारतीय आणि ‘तुमच्याकडे बघा, शेतकरी आत्महत्या करतात!’ असं म्हणणारा चिनी नागरिक. कोण अधिक सुखी? हा विचारात पाडणारा प्रश्न आहे खरा.


आपल्याला परदेशाबद्दल कुतूहल असतं, तसंच परदेशी लोकांनाही भारताबद्दल कुतूहल असतं. त्यांना भारतातली धारावीची – जगातली सर्वांत मोठी – झोपडपट्टीही बघायची असते. ती दाखवणे हाच व्यवसाय करणारे वाटाडे म्हणजे फिक्सर्स. अश्या दोन फिक्सर्सच्या अनुभवांशी तोंडओळख करून देणारा लेख ‘फिक्सर्स’.  फिक्सर्सच्या कामाशी, जगाशी हा लेख थोडक्यात ओळख करून देतो. पहिल्या जगातल्या लोकांना तिसर्‍या जगातल्या लोकांचं जगणं दाखवणं हे फिक्सर्सनी काहीश्या आवडीतून पण पोटापाण्यासाठी निवडलेलं काम. पण या साध्या कामातून अनेक चांगली कामेही उभी राहिली आहेत. या सगळ्यांशी थोडक्यात करून दिलेली मजेशीर ओळख आहे.


घटम्‌ हे आपल्याला टीव्हीवरील जाहिरातीतून माहिती झालेलं वाद्य. ते वाजवणार्‍या व्यक्तीचा खास दक्षिणी पेहराव आणि विक्कू विनायकराम या नावापलीकडे मला फारसं काही माहीत नव्हतं. मृदंग वाजवणार्‍या वडिलांचं बोट दुखावल्यानंतर त्यांनी विनायकला शिकवायला सुरुवात केली. मृदंगाकडून घटम्‌कडे आणि घटम्‌मुळे जगभरात पोचलेला हा श्रेष्ठ कलाकार. भाषा, संस्कृती या सगळ्याच्या पलीकडे संगीत घेऊन जातं. आपली परंपरा जपूनही पार सातासमुद्रापर्यंत कला पोचवणार्‍या कलाकाराचा प्रवास आपल्याला कळतो तो ‘तनी अवतरम’ या लेखातून.


ठुमरी गायनाच्या क्षेत्रात गिरिजादेवी हे महत्त्वाचं नाव. ठुमरीतला लडिवाळपणा, नखरे आपल्या गाण्यातून उभ्या करणार्‍या गिरिजादेवीं. घरात पारंपारिक वातावरण असूनही त्यांना वडिलांमुळे मुलासारखं लहानपण अनुभवता आलं. मुलांच्या अकाली मृत्यूंमुळे या मुलीच्या बाबतीत हळवे असलेले त्यांचे वडील. त्यांना घोडेस्वारी-नेमबाजी शिकवणार्‍या वडिलांनीच त्यांची ओळख सुरांशी करून दिली. ‘एक बंदिश शिकल्यावर एक गुडिया’ देण्याचा करार त्यांनी तिच्याशी केला आणि निभावलाही. घरातल्या स्त्रियांच्या नाराजीला न जुमानता आपल्या गुडियाला चांगल्या गुरूंची तालीम देणारे वडील आणि पत्नीच्या गाण्याला समजून घेणारा व गाण्यासाठी एकांताची सोय करणारा पती, यांची साथ लाभल्यावर ह्या गायिकेचं गाणे अजून फुललं आणि ठुमरीचं वस्त्र लेऊन रसिकांपर्यंत पोचलं. त्यांच्या मुलाखतीचे शब्दांकन असलेला ‘तडप तडप जिया जाए’ छोटेखानी लेखही छान उतरला आहे.


किडकिडीत, काळीसावळी मुलगी ते हॉलिवूडपर्यंत पोचलेली बॉलिवूडची यशस्वी नायिका हा प्रियंका चोप्राचा प्रवास तिच्याच शब्दांत रेखाटणारा लेख. ‘इकडे आणि तिकडे’ या लेखाच्या नावाप्रमाणेच या लेखात काही विसंगती, त्रोटकपणा जाणवतो.
उन्हं आणि आग ओकणारा सूर्य यांच्या साम्राज्यात राहणारे आपण लोक. हिमाचल प्रदेशातलं शांत-थंड वातावरण, उबदार सूर्य, पर्वत, झरे, पाईन-देवदार वृक्ष, त्यांवरचे पक्षी या सगळ्यांना आपल्या अंगणात आणून सोडणारं लेखन म्हणजे रस्किन बॉन्डच्या गोष्टी. निसर्ग हेच मुख्य पात्र असणारं रस्किनचे साधंसरळ लिखाण. त्यांच्या भेटीचं चित्रण करणारा नितांतसुंदर लेख शर्मिला फडके यांचा आहे. रस्किन बॉन्डचं बालपण, आई निघून गेल्यानंतर त्याला आलेला एकाकीपणा, काही न बोलता हा एकाकीपणा समजावून घेणारा निसर्ग आणि त्या निसर्गाशी ओळख करून देणारे वडील हे सगळं या लेखात आहे. आपल्या एकाकीपणाशी बोलणारा रस्किन लिखाणातून व्यक्त होऊ लागला. अशा लेखनात निसर्गच प्रमुख पात्र असणार हे ओघानेच आलं. वडील गेल्यावर इंग्लंडमध्ये गेलेल्या, तिथे आपल्या पहिल्याच पुस्तकाने साहित्याच्या जगात जागा मिळवलेल्या रस्किनचं मन मात्र तिथे रमलं नाही; तसं ते दिल्लीतही रमलं नाही. ‘लेखकाला जगण्यासाठी लागते, ती एक खोली आणि त्यातून दिसणारा निसर्ग’ असं मानणार्‍या रस्किनने पुढचं जीवन हिमाचलमध्येच घालवलं. आता वयाची ऐंशी वर्षं ओलांडलेल्या रस्किनच्या सभोवतालचा निसर्ग बदलला आहे. पैशांचा, समृद्धीचा धूर आणि पर्यटकांची गर्दी यांत गुदमरला आहे. त्यातला निरागसपणा हरवला आहे. ते गुदमरलेपण रस्किनला अजून तीव्रपणे जाणवतं. आणि हे खूप नेमकेपणानं व्यक्त केलंय शर्मिला फडके यांच्या लेखाने. ‘रस्टी द नेम इज बॉंड, रस्किन बॉंड’ हा या अंकातला अतिशय सुंदर जमून आलेला लेख. लेखिकेसोबत आपण जणू ‘रायटर दादाजीं’कडेच जातो. त्या दोघांच्या गप्पांमध्ये निसर्गाची सळसळ ऐकू येते, मधून मधून त्यांच्या पूर्वजीवनाबद्दल सांगत लेखिका परत वर्तमानात येत राहते. रस्किन ज्या निसर्गासोबत राहिला त्या निसर्गाच्या गळ्याला नख लागताना दिसतं आहे. पण ‘पक्ष्यांची गाणी आहेत, तोवर गोष्टी राहतीलच’ असा विश्वास देणार्‍या रस्किनच्या आशावादात निसर्गाचा उबदारपणा कायम आहे. या निसर्गाचं चित्रण, रस्किनच्या भेटीतला आपलेपणा, त्याच्या जीवनातील ठाय लय हे या लेखात आहे. आपल्या जगण्यातून पार लयाला गेलेला असा शांत संथपणा देहरादूनमधल्या रस्किनच्या जगण्यात ओतप्रोत भरलेला जाणवतो. तो या लेखात चित्रमय पद्धतीनं चितारला आहे.
या अंकात कथा नाहीत, कविता नाहीत आणि भविष्यही नाही. त्याऐवजी जे आहे, त्यामुळे ह्या अंकाची गणना उत्कृष्ट अंकांमध्ये करता यावी. बरंच काही वाचनीय आहे या ’लोकमत-दीपोत्सव’च्या अंकामध्ये. पण जाहिराती थोड्या कमी असत्या; किमान गुळगुळीत जाडजूड पानांवर नसून साध्या पानांवर असत्या, तर बरं झालं असतं. चकचकीत आणि बटबटीत जाहिरातींची दोन-दोन पानं मध्येमध्ये येऊन रसभंग करतात. इतका, की त्यात लोकमत चमूनं केलेल्या प्रवासातल्या व्यक्तींचे फोटोही लपून जातात आणि एक सुंदर अंक वाचल्याच्या आनंदाला गालबोट लागतं.


ब्लॉग : http://mazeshabdmazeman.blogspot.in/
इमेल : antaranand21@gmail.com

 

Uncategorized

समकालीन आणि सखोल – युगांतर

– मेघना भुस्कुटे
आपण एखाद्या विचारसरणीच्या बाजूचे असलो, की त्या विचारसरणीला अनुकूल अशा लेखनाचं मूल्यमापन करताना आपण पुरते तटस्थ असत नाही. तर या मर्यादेचं काय करायचं, असा एक पेच मला ‘साप्ताहिक युगांतर’च्या दिवाळी अंकाबद्दल लिहिताना पडला आहे. पण समकालीन गोष्टींना प्रतिसाद देण्याच्या बाबतीत आणि लेखनशैलीच्या बाबतीत इतकं वैविध्य, दर्जा आणि तातडी जपणारा एकसंध अंक हाती आलेला असताना त्याबद्दल लिहिणं अत्यावश्यकच आहे. तटस्थपणा कुठवर ताणायचा, असा एक प्रश्न माझा मलाच विचारून मी अंकाबद्दल बोलणार आहे.
व्याप्तिनिर्देश (disclaimer) संपला.
एक कोणतंतरी सूत्र घेऊन त्यावर विशेषांक काढण्याची टूम सध्या दिवाळी अंकांमध्ये लोकप्रिय आहे. अशा प्रकारची कोणतीही घोषणा न करता, ‘साप्ताहिक युगांतर’चा अंक एका विशिष्ट सूत्राभोवती नैसर्गिकपणे उगवून आल्यासारखा भासतो. जगाला विनाशाकडे लोटणारं आजच्या भांडवलशाहीचं प्रारूप आणि त्यामुळे बदलतं जग, हे ते सूत्र आहे. अनेक अभ्यासपूर्ण आणि समयोचित लेख, ललित लेख, कथा आणि विशेषतः कविता यांमधून हे सूत्र कधी पार्श्वभूमीला, तर कधी पुरोभूमीला; मूकपणे उभं असल्याचं जाणवत राहतं. त्या अर्थाने या अंकात असलेली उणीव एकच – या भूमिकेचं खंडन करणारी विरुद्ध बाजू अंकात अजिबातच न येणं.
दिवाळी अंकांमधून समकालीन विषय आणि त्यावरचं ताजं नि सखोल लेखन मिळावं अशी माझी अपेक्षा असते. त्याबरहुकूम या अंकात मला अनेक महत्त्वाचे लेख मिळाले. संजीव खांडेकरांचा ‘ऋतुसंहाराचा काळ : अर्थात भविष्याचा बर्फखडा’ हा लेख एखाद्या कवीनं भविष्यवाणी करताना लिहावा तशा सुरात लिहिलेला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत कामगार या वर्गाचं वैचारिक अस्तित्व कसं लीलया मिटवून-पुसून टाकण्यात आलेलं आहे, त्याचे इतर विस्मयकारी वाटणारे परिणाम कोणते आणि यातून पुढे काय उद्भवेल, याचं सूचन हा लेख करतो. ते एखाद्या दुःस्वप्नासारखं अंगावर येणारं आणि काहीसं अविश्वसनीय असं वाटतं. विचारधारा, अर्थव्यवस्था, तत्त्वज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान आणि राजकारण अशा सगळ्या अंगांना कवेत घेणारा हा लेख वाचताना मला सतत खर्‍यांच्या ‘उद्या’ या कादंबरीची आणि ‘ब्लॅक मिरर’ या बीबीसीच्या टीव्हीमालिकेची आठवण येत होती. लेख समजून घेताना पडलेले कष्ट जाणवून असंही वाटून गेलं, की या परिस्थितीशी लोकांना जोडून घेण्याकरता फिक्शन हाच घाट अधिक परिणामकारक तर नसेल?
संजीव चांदोरकरांचा कॉर्पोरेट्सबद्दलचा लेख (‘आर्थिक निर्णयस्वातंत्र्य हिरावून घेतलेली सार्वभौम (!) राष्ट्रे’) हा या अंकातला दुसरा झगझगीत लेख. तो ललित साहित्याचा वा काव्यात्म भाषेचा मुलामा चढवून घेत नाही, वैचारिक समीकरणं मांडल्याचा आव आणत नाही. आंतरराष्ट्रीय बलाढ्य कंपन्यांचा – कॉर्पोरेट्सचा – चेहरा नक्की कसा असतो आणि त्या चेहर्‍यामागे कायकाय असतं या प्रश्नांची उत्तरं चक्क मुद्दे, उपमुद्दे आणि पोटमुद्दे मांडत हा लेख देत जातो. या कंपन्यांच्या हाती असलेल्या शस्त्रांचा आढावा घेतो. आर्थिक नियंत्रणांपासून राजकीय हस्तक्षेपांपर्यंत आणि भाषिक खेळांपासून ते नाकेबंदीपर्यंत. बहुजन-श्रमिक-कामगार वाचवा अशी सबगोलंकारी आरोळी ठोकत भावनिक आवाहन करणार्‍या शंभर घोषणांपेक्षा हा एकच लेख अधिक परिणामकारक ठरेल.
ज्या लेखांसाठी दिवाळी अंक साठवून ठेवण्याचा मोह होतो, अशा लेखांपैकी तिसरा लेख म्हणजे रणधीर शिंदे यांनी विष्णू खरे या कवीबद्दल लिहिलेला लेख (‘विष्णू खरे यांची कविता’). शिंदे या लेखात विष्णू खरे यांच्या समग्र कवितेचा परिचय करून देतात. शहरांच्या कराल, यांत्रिकी, धावत्या, आधुनिक आयुष्यात स्वतःला मुडपून घेत राहणारा; अभिव्यक्तीची कोणतीही इच्छा व्यक्त न करता, बदलत्या अवकाशाच्या उदासवाण्या पिवळसर उजेडात आपलं जगणं मुकाट रेटत राहणारा सर्वसामान्य माणूस त्यांच्या कवितेत दिसतो. हिंदी कवितेचा पारंपरिक घाट नाकारत, एखाद्या कॅमेर्‍याच्या नजरेने तपशील टिपत न्यावेत आणि त्यातून एक तटस्थ भेदक कथा साकारावी, तशी त्यांची कविता – दीर्घ ‘न-कविता’. राजकीय भान आणि भूमिका दोन्ही पेलणारी. या कविता चंद्रकांत पाटील यांनी मराठीत आणल्या आहेत, हे वाचल्यावर मी चटकन विचारात पडले, की या ताकदीचा मराठीतला आजचा कवी कोण? मला उत्तर सुचलं नाही. असा निरुत्तर करणारा प्रश्न विचारणारा हा लेख माझ्या दीर्घकाळ स्मरणात राहील. ‘आजच्या काळात लेखकाने का लिहावे?’ हा वसंत आबाजी डहाकेंचा लेखही उदय प्रकाशांच्या एका हिंदी कथेचा परिचय करून देत वास्तवातले ताणेबाणे आणि विसंगती टिपतो. तो लेख वरच्या लेखाला पूरक म्हणावा असा.
या अंकाचं सार्थक झालं, असं आणखी एका गोष्टीमुळे वाटलं. किरण गुरव यांची दीर्घकथा – ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’. खेडेगावातून उच्चशिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये दाखल होणारा एक मुलगा आणि त्याचं बावचळलेलं गरीब कुटुंब यांच्या आयुष्यातला एखाद-दीड दिवसच ही कथा रेखाटते. या वर्णनामुळे वास्तविक डोळ्यासमोर येते ती एक सरधोपट, झिजट कथा – ग्रामीण कथा या लेबलाखाली धकून जाईल अशी. पण या सगळ्या अपेक्षांची अलगद विकेट घेत गुरव आपल्याला गोष्टीत कसे खेचून नेतात ते कळत नाही! पहिलं म्हणजे, यांतली पात्रं. ती दरिद्री आहेत. हुशार आहेत. पण लाचार वा ठोकळेबाज रीतीने करुणास्पद नाहीत. त्यांचं जगण्याचं महालबाड तत्त्वज्ञान आहे. कुटुंबाबाहेरच्या जगाशी खेळायचं राजकारण तर आहेच, पण कुटुंबातही आपापसांत करायच्या कुरघोड्या आणि खेळ्या आहेत. पारंपरिक चौकटीत न बसणारं, वर्णन न करणारं, संवादांतून आणि घटनांतून बोलणारं सूक्ष्म तिरकस व्यक्तिरेखाटन करत गुरव पुढे जातात. एका मोठ्या बदलाला सामोरं जाताना कथानायक-निवेदकानं केलेली बेरकी टिप्पणी त्याच्या गरिबीचा काळा बॅकड्रॉप अधिकच गडद आणि तरीही जिवंत करत नेते. गुरव एरवीही मला अतिशय आवडतात. पण या कथेनंतर त्यांनी लिहिलेलं काहीही न वाचता जाऊ देईन, तर खंडोबाच्या नावानं आठ खडे.
त्या मानाने मला प्रणव सखदेवची ‘अभ्र्यांमध्ये दडलेलं फॅन्ड्री’ ही कथा तितकीशी आवडली नाही. एका सोसायटीत वाढत चाललेला असहिष्णूपणा दाखवत ती सध्याच्या वातावरणातल्या एकूण उन्मादाकडे लक्ष्य वेधू पाहते. कल्पना छान होती. पण त्यात इतकं एकास एक लावून दाखवणं होतं, की प्रणवला त्यातलं साटल्य (subtlety) राखता आलं नाही, आणि माझ्या लेखी गोष्टीतली गंमत संपली. कृष्णात खोत यांची दोन कथार्धुकं इंट्रेष्टिंग आहेत. पण मला ती अपुरी, त्रोटक वाटली. असं वाटलं, की एका मोठ्या कथाविश्वामधला लहानसाच भाग उघड करण्यात आला आहे. उत्सुकता निर्माण होते, पण समाधान मात्र होत नाही.
त्याहून खूप भेदक वाटली, ती मणि मधुकर यांची जयप्रकाश सावंतांनी अनुवादित केलेली कथा, ‘फाशी’. विष्णू खरे यांच्या कवितेतली उदासवाण्या पिवळसर प्रकाशातली गरीब, मुकी माणसं पाहावीत आणि गोठून जायला व्हावं, पुष्कळ वेळ काही सुचूच नये, तसं काहीतरी ही गोष्ट वाचल्यावर झालं.
यांखेरीज ‘साप्ताहिक युगांतर’च्या अंकातल्या दोन महत्त्वाच्या लक्ष्यवेधी गोष्टी म्हणजे बालकामगारांवरची संदेश भंडारे यांची छायाचित्रमालिका. लेखापेक्षा कितीतरी अधिक वेगळी आणि म्हणून परिणामकारक. दुसरी गोष्ट म्हणजे कविता. कविता आणि अनुवादित कविताही सगळ्याच दिवाळी अंकांत असतात. पण सतीश काळसेकरांनी संपादित केलेल्या या काव्यविभागात एका कवीची एक मराठी कविता आणि त्याच कवीनं परभाषेतून मराठीत आणलेली एक कविता; अशा काही जोड्या आहेत. या भाषांतरित कवितांची निवड कवीनं केलेली आहे की संपादकांनी केलेली आहे, ते मात्र कळलं नाही. ते कळलं असतं, तर निदान माझ्याकरता हा प्रयोग अधिक अर्थपूर्ण ठरला असता.
अंकातला अतुल देऊळगावकरांचा ‘धुक्यातून कोणीकडे?’ हा पर्यावरणबदलाचं भीषण वर्तमान दाखवणारा लेख आवडला. ‘शतरंज के खिलाडी’ या राय यांच्या सिनेमाचं ‘आरोप-खंडन-मुद्दा’ या प्रकारे अभिजीत देशपांड्यांनी केलेलं बचावात्मक रसग्रहण आवडलं; नेहमीपेक्षा निराळं वाटलं. अभिरुचीचा प्रवास न्याहाळून पाहणारा महेंद्र तेरेदेसाई यांचा सिनेमाप्रेमाबद्दलचा लेखही आवडला, जवळचा वाटला. ‘बुर्किनी ते बिकिनी, सत्तापटावरील सोंगट्या’ हा तृप्ती डिग्गीकरांचा लेख संस्कृती आणि जगाचं एकत्र येणं यांमधला विरोधाभास मांडणारा होता. तोही इंट्रेष्टिंग वाटला.
डॉ. गणेश देवी यांची मुलाखत मात्र अतिशय त्रोटक, साचेबंद आणि मुख्य म्हणजे यंदा अनेक दिवाळी अंकांमध्ये आलेली आहे. ती का घेतली असावी, ते कळलं नाही. तसाच जयदेव डोळ्यांचा रा०स्व०संघाच्या साहित्यातल्या दर्शनाबद्दलचा लेखही आधीच निष्कर्ष ठरवून लिहिल्यासारखा भासला. इतका देखणा, सुरेख अंक काढूनही ‘आपली विचारधारा – आपले निष्कर्ष – कंपल्सरी सिलॅबस’ अशा प्रकृतीत बसणारा लेख का घ्यावा कुणी अंकात? हाच प्रश्न मला मेघा पानसरे यांचा रशियन स्त्रीबद्दलचा लेख वाचतानाही पडला. आजमितीस ना एकसंध सोव्हिएट युनियन अस्तित्वात आहे, ना आपली आणि त्यांची मैत्री तितकी घट्ट उरली आहे. ना तिथल्या स्त्रियांच्या प्रगतीचे टप्पे न्याहाळल्यामुळे आपल्या आजच्या स्त्रीसंदर्भांना काही विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. मग फक्त अंक ‘डावा’ आहे, ‘काहीतरी रशियन’ यायलाच पाहिजे, म्हणून हा लेख घेतला आहे का? माहिती म्हणून लेख चांगलाच आहे. पण माहितीसाठी आता इंटरनेटही उपलब्ध आहेच की.
असो. काहीतरी गालबोट हे हवंच. तरीही वाचावं, काही केल्या चुकवू नये असं समकालीन आणि सखोल पुष्कळ लेखन या अंकात आहे, हे पुनश्च नोंदवून थांबते.

 

Uncategorized

डिजिटल दिवाळी : आकाराने मोठा आणि रूपाने सुबक अंक

– ऋषिकेश
तुम्ही कधी, रांगोळ्या-बिंगोळ्या घालून, लय भारी वातावरण तयार करून, चांदीच्या ताटात भरपूर वाट्या असणारी ‘थाली’ लोकांना खिलवणार्‍या काही हॉटेलांत गेलायत का? तिथलं वातावरण, आसनव्यवस्था, अदबशीर वेटर्स, मंद संगीत, अतिशय सुरेख पद्धतीनं भरलेलं ‘देखणं’ ताट यांमुळे तुम्हांला सपाटून भूक लागते का? अशी भूक लागल्यावर पहिल्याच घासात खडा लागला, आणि मग एकापेक्षा एक छान नावं असलेल्या प्रत्येक वाटीतला पदार्थ खाताना – एखादीत गुंतवळ, तर दुसरीतल्या पदार्थात मीठ कमी, एका वाटीतल्या पदार्थात नुसताच मसाला, तर दुसरीतली भाजी पोटात कच्ची – अश्या निरनिराळ्या बाबी खटकायला लागल्या तर? नि शेवटी बाहेर पडताना पोट भरलं तर खरं, पण तोंडाला चव अशी आली नाहीच; उलट अती गोग्गोडपणानं एक प्रकारचा चिकटाच आला, तर तुम्ही काय म्हणाल?
मला नेमकं तेच ‘डिजिटल दिवाळी’ या दिवाळी अंकाबद्दल म्हणायचंय!
खाणं हा जगाला एकत्र आणणारा विषय. त्यावर सर्वच भाषांतून सतत आणि ढीगभर लिहिलं, बोललं, वाचलं आणि म्हटलं जात असतं. नि तरीही समाधान होत नाही. सगळ्यांनाच त्यावर आणखी काहीतरी म्हणायचं असतंच. मराठी आंतरजालही खाणेपिणे या विषयाच्या बाबतीत अगदी संपन्न आहे. केक्स, पाव, दारू (माधवी हा धागा किती जणांना आठवला असेल! :)) इत्यादी पाककृतींपासून ते फोडणीच्या भातापर्यंत अनेक पदार्थांच्या पाककृती मायबोली, मिसळपाव, ऐसी अक्षरे या सायटींवर आहेतच; त्याचबरोबर या विषयाला वाहिलेल्या ब्लॉग्जची संख्या प्रचंड आहे. केवळ पाककृतीच नाही, तर पाककलेवर ललित अंगाने झालेलं लेखनही या साईट्सवर भरपूर आढळतं. पैकी ‘अन्नं वै प्राणा:‘ ही चिनूक्सची मालिका किंवा ‘सुगरणीचा सल्ला‘ ही लेखमालिका, ही कोणत्याही छापील साहित्याच्या तोंडात मारतील इतकी भारी प्रकरणं आहेत. त्यात ‘मिसळपाव’ने गेल्याच वर्षी ‘रुची विशेषांक‘ काढला होता.
त्या पार्श्वभूमीवर ‘डिजिटल दिवाळी’ने यंदाच्या दिवाळी अंकासाठी खाद्यसंस्कृती हा(च) विषय घेतलाय, हे समजताच अतिशय अपेक्षेने, यापेक्षा वेगळं काय देताहेत या उत्सुकतेने आणि हिरिरीने तो अंक वाचायला घेतला. पण जसजसा अंक वाचू लागलो, तसतसा उत्साह ओसरत गेला. फोडणीत हिंग टाकताच काही काळ तो चुरचुरावा,  जिरं-मोहरी तडतडावी नि नंतर सगळं एकदम थंड पडावं, फोडणीत काही मजा उरू नये; तसा तो उत्साह उत्तरोत्तर कमी-कमी होत गेला. काही गोष्टी खूपच आवडल्या, हे कबूल करावं लागेल. पण एकुणात अंकाबद्दलचं मत मात्र “ठीक, चकचकीत आहे. पण फार नवं काही नाही दिलं या अंकानं.” असं झालं. आता ‘अंकनामा’मध्ये झाडाझडती घ्यायचीच आहे, तर तपशिलात सांगतो. अंकाचा आकार खूप मोठा आहे; तेव्हा त्याला न्याय देण्यासाठी हा लेखही मोठा होणं क्रमप्राप्त आहे, ही आगाऊ सूचना.
सर्वसाधारण प्रथेनुसार आवडलेल्या काही गोष्टी परीक्षणात आधी नमूद करणं प्रचलित असलं, तरी मला त्याची घाई नाही. अनुक्रमणिकेप्रमाणे अंक वाचताना मला खटकलेल्या बाबी खुलेआम जाहीर करून, तोंड (आणि मन) साफ केल्यावर मगच त्या-त्या भागात मला आवडलेल्या बाबींबद्दल लिहिणार आहे.
प्रथमग्रासे मक्षिकापात व्हावा, तशी या अंकाची साईट उघडल्या-उघडल्या सगळ्यांत आधी ‘टाटा कॅपिटल’ची जाहिरात म्हणून पांढर्‍या चौकोनी पार्श्वभूमीवरचा तो लोगो नामक बिल्ला आपल्यावर आदळतो! एखाद्या वेबसाइटचा लोगो साधारणतः जिथे असतो, तिथे प्रायोजकाचा लोगो चिकटवला आहे. बरं, हा लोगो पहिल्याच पानावर दिसतो असं नाही; तर तो यत्र-तत्र-सर्वत्र तुमच्याकडे डोळे वटारून बघत असतो! त्या लोगोचा ठसा, रंग, आकार वगैरे अंकाच्या एकूण दृश्य सजावटीला बाधकच नव्हे, तर ठार मारक ठरलं आहे. छान रसरशीत फळांवर भडक, विद्रूप आणि न काढता येणारे स्टिकर्स चिकटवलेले असावेत नि दर घास खाताना ते टाळता आले,  तरी त्यांचं अस्तित्व डाचत राहावं; तसं काहीसं! चांगलं तंत्रज्ञान वापरायचं, तर अंकाला आर्थिक पाठबळ लागतं. त्यामुळे प्रायोजकत्व घ्यावं आणि प्रायोजकांची जाहिरातही करावी – याला अजिबात ना नाही! पण जाहिरात करताना आपल्याच अंकाच्या दृश्यरूपावर किती हल्ला करून घ्यावा, ते मात्र पाहणं महत्त्वाचं.
याव्यतिरिक्त पहिल्या पानाबद्दल चांगलं लिहिणंही गरजेचं आहे. केवळ पहिलं पानच नाही, तर एकूण अंकच समकालीन बांधणीचा आणि चकचकीत आहे. शिवाय मोबाईल आणि लॅपटॉपवर, तो त्या-त्या स्क्रीन साईजशी स्वतःच जुळवून घेईल अशी थीम निवडली आहे. यंदाचा हा अंक तांत्रिक अंगाने इतर कोणत्याही ऑनलाइन अंकापेक्षा उजवा आहे, यात शंका नाही आणि त्यासाठी प्रसाद देशपांडे यांचं कौतुक करणं अनिवार्य ठरतं. या अंकाला मुखपृष्ठ असं नाही. पण ‘होम पेज’वर (मुख्य पानावर) जे छायाचित्र आहे; ते देखणं आहे, व्यावसायिक सफाईचं आहे. (पण ते कोणी काढलं आहे याचा उल्लेख मला तरी कुठेही मिळाला नाही. “या अंकासाठीचा सर्व व्हिज्युअल कंटेंट प्रसाद देशपांडे यानं केलेला आहे.” असं एक सर्वसमावेशक वाक्य संपादकीयात आहे. पण म्हणजे ज्या छायाचित्रांचा स्रोत दिलेला नाही, ती सगळी छायाचित्रं देशपांडे यांनीच काढली आहेत असा त्याचा अर्थ घ्यायचा का? तसं असल्यास ते स्पष्ट म्हणायला हवं होतं. मग अशा शंका डोकावल्या नसत्या.).
मात्र या अंकाचं मुखपृष्ठ मोबाईलवर नीट दिसतच नाही. लॅपटॉप/डेस्कटॉपवर डाव्या भागात चित्र व उजवीकडे लेख हा सध्याचा ट्रेंड वापरला असला, तरी डाव्या भागाचा उपयोग अधिक कल्पकतेने करता आला असता. शिवाय लेख कोणाचाही असला, तरी प्रत्येक लेखावर बाजूला ‘पोस्टेड बाय सायली राजाध्यक्ष’ असं दिसत असतं. कोणत्याही तंत्रज्ञानात हे लपवता येणं इतकं काही कठीण नसावं. त्यामुळे बाकी अंक दिसायला सुबक असला, तरी या बारीक-सारीक बाबी खटकत राहतात.
तांत्रिक बाबींकडून मूळ लेखांकडे वळू या. अनुक्रमणिकेप्रमाणे जायचं, तर आधी ‘भारतातील खाद्यसंस्कृती’ अशा नावाचा विभाग आहे आणि त्यानंतर विदेशातील खाद्यसंस्कृतींना वाहिलेला दुसरा विभाग (‘परदेशातली खाद्यसंस्कृती’) आहे. या दोन्हीतल्या विशिष्ट लेखांच्या तपशिलात जायच्या आधी एकूण विभागाबद्दल काही मुद्दे मांडायचे आहेत.
या विभागातल्या बहुतांश लेखांचं स्वरूप एकाच साच्यातलं आहे. आधी लेखक/लेखिकेची नि मग त्या प्रदेशाची जुजबी ओळख; मग लेखक/लेखिका नि त्या राज्याचं/देशाचं नातं कसं जुळलं हे सांगणारी एखादी आठवण; ‘आमच्या सासूबाई किंवा कुणा सुहृदांनी कस्सं बाई आम्हांला त्या त्या भागातलं जेवण शिकवलं!’ याचा गहिवर अधिक तिथल्या खाद्यपदार्थांची झालेली ओळख; आणि शेवटी एखाद-दुसर्‍या खाद्यपदार्थाची पाककृती (आणि या सगळ्यात मधूनच – दाबेलीच्याच हातांनी भेळ केल्यावर मधूनच येणार्‍या डाळिंबदाण्यांसारखे; म्हटले तर भेळेचा भाग असलेले, पण वेगळ्याच भाषेचे, पोताचे व वेगळ्याच उद्देशाने चित्रित केलेले यूट्यूब व्हिडिओज) अशी एक ‘टेंप्लेट’ तयार करता यावी. एकदा का असा साचा आला, की कितीही वेगळ्या प्रकारे रंगवा-सजवा; मूर्तीचा बाज एकाच साच्यातला होतो. तसंच काहीसं या विभागांचं झालंय. वेगवेगळ्या प्रदेशांत काय, कधी खाल्लं जातं, त्यांची  नावं काय, यांबद्दल भरपूर माहिती या विभागात मिळते. पण त्या-त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त इतकंच नसतं ना!
वर म्हटलं, त्यानुसार यांतले भारतीय राज्यनिहाय पदार्थलेख एकाच साच्यातले – टेंप्लेटमधले – आहेतच; पण ते इतरही कारणांनी नीरस झालेत. (एक उगाच लक्षात आलेली गंमत – एकही पुरुष भारतातल्या खाण्याबद्दल लिहायला तयार झालेला दिसत नाही! ;)) या लेखांत लालित्य हे नावालाच आणि बर्‍यापैकी सामान्य दर्जाचं आहे. बहुतांश लेख हे पदार्थांची माहिती देणारे आणि विकीपिडीय झाले आहेत. दुसरी गोष्ट अशी – यांतले बहुतांश लेख हे ‘सोवळ्यातले’ आहेत! सामान्य मराठी उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय माणसाची झेप जिथवर जाऊ शकते; त्यापलीकडे एकही लेख जात नाही. भारतात इतक्या प्रकारचं आणि इतक्या प्रमाणात मांसभक्षण होत असतं; पण यांतले लेख वाचले, तर एखाद्याचा समज नक्की होईल की केरळ नि बंगाल-आसामातलं मासे आणि हैदराबादेतलं मांसभक्षण वगळलं, तर इतर राज्यांतली बहुसंख्य जनता ही शाकाहारी आहे. एखाद्या राज्याची ‘खाद्यसंस्कृती’ अशा सर्वसमावेशक मथळ्याखाली लेख लिहिताना, केवळ उच्चवर्गीय-मध्यमवर्गीय २५-३०% घरं डोळ्यांसमोर न ठेवता लेख लिहिले असते; तर मजा आली असती. मात्र आताच्या लेखांतून ती सर्वसमावेशकता डोकावत नाही.
सुदैवाने विदेशी खाण्याबद्दलचे बहुतांश लेख जरी याच साच्यात बसवलेले असले; तरी माहिती आणि शैली या दोन्ही अंगांनी चांगले वठले आहेत. शैलेन भांडारे यांचा ब्रिटिश खाण्यावरचा लेख  म्हणजे वर घेतलेल्या माझ्या जवळजवळ सगळ्याच आक्षेपांना सणसणीत उत्तर आहे. ओघवती भाषा, तपशीलवार माहिती, त्या भागात काय खाल्लं जातं, ते कसं बनवतात, इतक्याच मुद्द्यांवर सीमित न राहता हा लेख भाषा, वाक्प्रचार, लोकांच्या सार्वजनिक – खाजगी सवयी या गोष्टींवर खाण्याचा आणि खाण्यावर या गोष्टींच्या पडलेल्या प्रभावापर्यंत जातो आणि त्यामुळे संग्राह्य ठरतो. असाच छान लेख म्हणजे सचिन पटवर्धन यांनी लिहिलेला ‘घाना’मधल्या खाद्यसंस्कृतीवरचा लेख. इथली खाद्यसंस्कृती तुलनेने अल्पपरिचित असल्यामुळे विषयाचं नावीन्य हे त्यामागचं एक कारण आहे. मिलिंद जोशी यांचा ‘सहनौ भुनक्तु!!!‘ हा लेखही खूप वाचनीय झाला आहे. छान लेखनशैली, चाकोरीच्या बाहेर जाऊन दिलेली विषयाची माहिती, विविधांगी धांडोळा यांमुळे हे दोन्ही लेख वाचनखुणांत साठवावे असे होतात. गौरव सबनीस यांचा त्रिनिदादच्या खाद्यसंस्कृतीवरचा लेख आणि अरुणा धाडे यांचा अरेबिक संस्कृतीवरचा लेख हेसुद्धा अतिशय वाचनीय आणि माहितीपूर्ण आहेत.
पुढचा विभाग ‘अशीही खाद्यसंस्कृती’ या वेगळेपणा सुचवणार्‍या नावाखाली येतो, शिवाय लेखकांची नावं वाचून अपेक्षाही वाढतात. पैकी हेमंत कर्णिक, सुनील तांबे वगैरे प्रभृतींनी माझी साफच निराशा केली. ‘रेल्वेची खानपान सेवा’ असा कर्णिकांचा लेख आहे. रेल्वेतलं अन्न, ते बनवण्याच्या पद्धती, रेल्वेच्या खाद्यसंस्कृतीचा इतिहास, रेल्वेच्या भटारखान्यात (आणि गिर्‍हाइकांतही) झालेले बदल, रेल्वे कँटिन्स आणि त्यांतले बदल, रेल्वे स्टेशनवरचे पाणीस्रोत – प्याऊ (पाणपोया), सोडे, मुंबईच्या लोकल स्टेशनवरची खाद्यसंस्कृती अशा अनेक अंगांनी हा लेख कर्णिकांनी फुलवला असेल असं वाटलं होतं. कारण त्यांचं लेखन नेहमीच अनेक शक्यतांना कवटाळणारं असतं. पण इथे मात्र लेख कसातरी उरकल्यासारखा त्रोटक झाला आहे. सुनील तांबे हे वेगळेपणासाठी नावाजलेले लेखक आहेत. त्यांचा या अंकातला लेखही भरपूर माहितीने भरलेला आहे. पण या लेखावर संपादकीय संस्कार होणं आवश्यक होतं. त्या लेखाला आपला असा घाटच नाहीय. जो आठवेल तो पदार्थ, वाटेल त्या क्रमाने सांगणारं; अचानक इतिहासातले तर अचानक वर्तमानकाळातले तपशील देणारं हे लेखन एकुणात विस्कळीत ठरतं. खूप मोठा आवाका एका लेखात बसवण्याच्या प्रयत्नात असं होणं सहजशक्य आहे, पण संपादक-लेखकांनी चर्चा करून त्या लेखाला अधिक बांधेसूद आकार देणं गरजेचं होतं.
याच विभागातला शर्मिला फडके यांचा चिनी पाहुणचारावरचा लेख छान निवांत वाचण्यासारखा झाला आहे.  त्यांचाच ‘कला आणि खाद्यसंस्कृती‘ हा आढावाही माहितीपूर्ण झाला आहे. विषयाच्या वेगळेपणामुळे मेघा कुलकर्णींचा ‘मुळारंभ आहाराचा” हा लेखही एकदा वाचण्यासारखा आहे. इतर लेखकांकडून मात्र त्यांच्या लौकिकाला साजेसं लेखन झालेलं नाही, काही शैलीदार लेखही त्रोटक आहेत.
पुढला ‘चिअर्स’ हा विभाग मात्र खासच जमून आलाय. त्यातले चारही लेख हे लेखिकांनी लिहिले आहेत ही ‘अपने आप में’ असणारी संपादिकाबाईंची बारीकशी बंडखोरी खूपच आवडून गेली ;). या विभागात मला रुपल कक्कड यांचा लेख खूपच आवडला. त्याचा अनुवादही सुबक झाला आहे. ‘मेन कोर्स’ विभागातला ‘दम (बिर्याणी) है बॉस‘ हा आशिष चांदोरकर यांचा ‘दम’दार लेख वगळला; तर बाकी विषय आणि लेखांचा घाट परिचित आहे आणि काहीसा विकीपिडीयसुद्धा आहे. पुढल्या ‘फोटो’ विभागातली बहुतांश छायाचित्रं ही ‘वेगवेगळ्या पदार्थांच्या फोटोजेनिक रचना’ इतक्यावरच सीमित राहतात. नुसत्या या विभागाचं नाव काढलं तरी काही क्षणात पानाची डबी-अडकित्ता वगैरेसह असलेल्या बैठकीपासून; खानावळी, रेल्वे कँटिन्स, कामगारांचे जेवण, अंगणवाड्यांमधील वाटलं जाणारं खाणं, संन्यासी ते हमाल यांची खाद्यसंस्कृती हे आणि असे कितीतरी विषय डोक्यात घोंगावू लागतात. त्याऐवजी फक्त पदार्थांचे कॉफी-टेबल-बुकीश फोटो देऊन संपादकांनी ती संधी वाया घालवली आहे.
असा प्रवास करत-करत आपण ‘स्वयंपाकघर’ या विभागाकडे येतो. या विभागातला, ‘ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट‘ हा नीरजा पटवर्धन यांचा लेख मात्र त्याच्या मजेदार शैलीमुळे छानच खुलला आहे. आपली शैली आणि माहिती यांची दुपेडी वीण नीरजा पटवर्धन इतकी तलम विणतात, की माहितीपूर्ण लेखाचा पोतही छान घरगुती होत जातो. या विभागात दुसरा लेख सचिन कुंडलकरांचा आहे. इथे मी कुंडलकरांबद्दलचा त्रागा एकदाच काय तो व्यक्त करून घेणार आहे आणि त्यानंतर कुंडलकर या एकेकाळच्या आशेवर काट मारायची वेळ आलेली आहे, असं कबूल करणार आहे. या त्राग्याचा अंकाशी किंवा त्यातल्या याच लेखाशी थेट संबंध नाही – हा लेख केवळ निमित्तमात्र. या अंकात(ही) कुंडलकर कोणताही अनपेक्षित धक्का देत नाहीत. मी ७-८ वर्षांपूर्वी कुंडलकर पहिल्यांदा वाचले असावेत. फ्रेश विषय, खुसखुशीत शैली, समकालीन भाषा यांमुळे मला ते लगेचच आवडून गेले. एक वाचक म्हणून त्यानंतर त्यांच्या लेखनातली मजा मी पुरेपूर अनुभवली. कुटुंब नावाच्या अस्ताव्यस्त प्राण्याला ते ज्या कोनातून बघतात, त्याचा आनंदही लुटला. पण पुढे काय? त्यांचा या अंकातला लेख एका ‘साचलेल्या’ लेखकाचं मूर्तिमंत उदाहरण आहे! ‘सर्व आया आपापल्या मुलांचे प्रवास ओळखून असतात.’ छापाच्या तद्दन भाबड्या, टाळ्याखाऊ विधानांपासून भारतीय संस्कृतीतील गुंतागुंतींबद्दल अज्ञान दाखवणार्‍या ‘आपल्या समाजासाठी एकटेपणा ही विकृती किंवा दुःख आहे, म्हणून आपण त्याची सांस्कृतिक नोंद केलेली नाही.’ अशा घाऊक विधानापर्यंत कितीतरी पातळ्यांवर – हा लेख वाचकाला जांभई ते त्रागा या पट्ट्यात झुलवतो. अपेक्षेप्रमाणेच, नव्वदीच्या दशकातल्या नैतिकतेत आणि स्मरणरंजनातच हा लेख(ही) बरबटलेला आहे. नव्वदीच्या शहरी नॉस्टॅल्जियाला मागे सोडायला कुंडलकर काही तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्या एकूण लेखनात कमालीचा एकसुरीपणा येत चाललेला आहे. शोकेसमध्ये ठरावीक पद्धतीने रचलेल्या वस्तू असणारे दिवाणखाने, मोठ्या स्वयंपाकघराचे ‘फेटीश’, घर सोडलं तेव्हाचा मनातला ‘कल्लोळ’, नव्वदीतलं पुणे-मुंबई आणि फ्रेंच अनुभव यांच्या पलीकडे – वास्तववादी आणि मुख्य म्हणजे समकालीन जगात – कुंडलकर केव्हा पोचणार आहेत, याची वाचक म्हणून मी आतुरतेने वाट पाहतो आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचं ‘अरेरावी करत फणा काढून गावभर फिरणाऱ्या आणि अजून १९६८ची क्रांतीच जगात चालू आहे, असे समजणाऱ्या चळवळखोर स्त्री-पुरुषांसारखे मी एकट्याने आयुष्य जगत नाही.’ हे वाक्य कितीही खरं असलं; तरी “अहो कुंडलकर! तुमच्या बाबतीत फक्त साल बदललं आहे, स्मरणरंजनाचं साधर्म्य तसंच उरलं आहे, त्याचं काय?” असं ओरडून विचारावंसं वाटतं. आधीच आम्हांला कायमस्वरूपी आवडू शकणारी गोष्ट क्वचित मिळते. त्यात एखाद्या लेखकाकडून अपेक्षा ठेवाव्यात आणि पुढे त्या लेखकाचं हे असं होऊ लागावं हे वेदनादायी आहे! असो.
इतका प्रवास करून दमल्यावर आपल्यासमोर येतात या अंकातल्या दोन खास गोष्टी. एक म्हणजे आदिवासी खाद्यसंस्कृतीवरचा माहितीपट (डॉक्युमेंट्री) आणि दुसरी म्हणजे मोहसिना मुकादम यांची मुलाखत! या अंकातले हे दोन व्हिडिओ मला ‘या अंकाने काय दिले?’ हे सांगायला पुरेसे आहेत. चित्रीकरणाचा चांगला तांत्रिक दर्जा, स्पष्ट उच्चार आणि माहितीचा आवाका या गोष्टी या दोन्ही व्हिडिओंना बाकी अंकापासून कितीतरी वरच्या पातळीवर नेऊन ठेवतात. प्रचंड मोठा आवाका असलेली माहिती मोहसिनाबाई ज्या सहजतेने आणि नेमकेपणाने मांडतात, ते थोर आहे. खाणं म्हणजे फक्त पदार्थ, त्यांची वर्णनं आणि पाककृती असला प्रकार टाळून; अन्न आणि संस्कृतीचा सतत एकमेकांवर पडणारा प्रभाव, त्यातून बदलत जाणारी दोहोंची रूपं, व्यक्ती-समाज-भूगोल-धर्म-अन्न अशा सगळ्या घटकांचे परस्परसंबंध… अशा अनेक गोष्टींचा एकत्रित आढावा त्यांनी या मुलाखतीत घेतला आहे. ऐकलीच पाहिजे अशी ही मुलाखत.
सई कोरान्ने यांच्या मुलाखतीतून खूप काही मिळवण्याची संधी मुलाखतकर्तीने वाया घालवली असं मला वाटलं. मुळात कोरान्ने यांचं ‘क्रम्ब्स’ हे पुस्तक केवळ पावाच्या पाककृती अशा स्वरूपाचं नाही. ‘ब्रेडवरती बोलू काही’ अशा सैलसर अंगाने ते पुस्तक जातं आणि मुलाखतीतही सईताई एकूणच पावाच्या अनुषंगाने बरंच काही इंटरेस्टिंग बोलू पाहताना दिसतात. पण सायली राजाध्यक्ष यांनी “ब्रेडचे प्रकार किती व कोणते? त्यांत नक्की फरक काय?” किंवा “यीस्ट कोणकोणत्या प्रकारचं असतं? त्यांत फरक काय?” वगैरे ‘आम्ही-सारे-खवैये’-छाप साटोपचंद्रिका प्रश्न विचारल्यावर थोडा रसभंग होतो. सईताई मात्र त्या प्रश्नांना थोडक्यात छापील उत्तर देतात आणि मग पुरवणी म्हणून काहीतरी फार महत्त्वाचं आणि रंजक बोलतात, म्हणून मुलाखत शेवटपर्यंत ऐकली. सई कोरान्ने यांच्यासारखी माहितगार व्यक्ती उपलब्ध आहे; तर भारतीयांचा आणि पाश्चात्यांचा पावाकडे बघण्याचा निरनिराळा दृष्टिकोन, यीस्ट आणि भारतीय हवामान यांचा मेळ, पाव तयार करण्याची औद्योगिकीकरणामुळे आमूलाग्र बदललेली प्रक्रिया इत्यादी अनेक विषयांवर प्रश्न विचारता आले असते.
महेश एलकुंचवारांची मुलाखत बर्‍यापैकी नीरस झाली आहे. सगळ्यांत आधी मला पडलेला प्रश्न म्हणजे एलकुंचवारांसारख्या लेखकाची मुलाखत खाद्यविशेषांकात घेण्याचं काय बरं प्रयोजन? मुलाखत ऐकल्यावरही तो प्रश्न सुटला नाही. ‘एक चांगला लेखक, काही पदार्थ स्वतः रांधायची इच्छा राखून असतो.  तो ते रांधतो आणि मित्रमंडळींना खिलवतोही.’  या माहितीव्यतिरिक्त वाचकांनी या मुलाखतीतून खाद्यसंस्कृतीच्या अंगाने नक्की काय घ्यावं, हे कोडं काही सुटलं नाही. पुन्हा एकदा, असो.
शेवटी अभिवाचनाचे व्हिडिओज आहेत. व्हिडिओ वापरून ऑनलाइन माध्यमाचा उपयोग चांगला केला गेला आहे. बहुतांश वाचनं नाट्यसृष्टीतल्या कसलेल्या अभिनेत्यांनी केलेली आहेत. त्यामुळे वाचिक अभिनयाचा दर्जा खूपच छान आहे. ‘माझे खाद्यजीवन’ हा कितीही परिचित असला, तरी न टाळता येणारा लेख परचुरे छानच वाचतात. शुभांगी गोखले यांना त्यांच्या वाचनाचा विषय ज्यांनी सुचवला, त्यांचं मला कौतुक वाटलं. या विषयासाठी याहून नेमकी समकालीन अभिनेत्री मिळणं कठीण. अनपेक्षितरीत्या प्रांजळ नि थेट लेखन आणि त्याचं दमदार अभिवाचन हे दोन्ही प्रचंड आवडलं. ‘आयदान’मधल्या उतार्‍याचं अभिवाचनही खास झालं आहे. या बहारदार अभिवाचनांचा प्रयोग चांगलाच रंगला आहे, त्याबद्दल संपादकांचं अभिनंदन!
तर, खाद्यसंस्कृती हा मोठा आवाका घेऊन येणारा विषय आहे. खाद्यसंस्कृतीतले बारकावे जाऊ देत, पण केवळ ठळक विषय जरी घ्यायचे म्हटले; तरी जंकफूड, स्ट्रीटफूड, कृत्रिम अन्न, जैविक (ऑरगॅनिक) अन्न, अन्नाचं व्यावसायिक छायाचित्रण, विविध भौगोलिक प्रदेशांतल्या काही सामायिक पदार्थांचा इतिहास नि भूगोलानुरूप त्यांत झालेले बदल, भाषा आणि अन्न यांचा परस्परसंबंध, अन्नाची उपलब्धता किंवा अनुपलब्धता आणि त्यामुळे होणारे सामाजिक-राजकीय परिणाम, दुष्काळ, अन्न पिकवण्याची प्रक्रिया आणि तिचा खाद्यसंस्कृतीवर होणारा परिणाम अश्या कितीतरी अंगांनी पसरलेला हा विषय आहे. मोहसिना मुकादम यांची मुलाखत, आदिवासींवरचा माहितीपट आणि वर उल्लेखलेले काही लेख सोडले; तर या अंकात असा बहुपेडी विचार झालेला जाणवला नाही. क्वचितच पदार्थांचा इतिहास दिला आहे. काही वेळा एकाच पदार्थाचा उगम वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याचं वेगवेगळ्या लेखांतून सांगितलं गेलं आहे (उदा. समोसा). या विसंगतीवर काम केलं जाणं अपेक्षित होतं. अंकात अनेकविध प्रसिद्ध-अप्रसिद्ध-पूर्ण नवीन पदार्थ आणि त्यांच्या कृती आहेत. ते महत्त्वाचं आहेच, पण ‘खाद्यसंस्कृती’ असं नाव घेऊन अंक काढल्यावर या पदार्थांच्या माहितीशिवाय इतर कितीतरी प्रकारचं आणि मोठा आवाका असलेलं कसदार लेखन अपेक्षित होतं. माहीत नसलेल्या काही पदार्थांची नावं, त्यांच्या पाककृती, ते कुठे-कसे-कधी खाल्ले जातात अशी अनेक प्रकारची नवी माहिती अंक वाचून मिळते. त्या दृष्टीने हा अंक नक्कीच संग्राह्य आहे; पण त्याहून अधिक काही शोधू जाल, तर मात्र निराश व्हाल!
इमेल: rushikeshonrere@gmail.com

 

Uncategorized

विचक्षण संपादकांचा ‘मुक्त शब्द’

– रमताराम
दिवाळी अंक तयार करणे म्हणजे लेखकु बनण्याची इच्छा पुरी झाल्यानेच ‘सुखिया जाला’ समजणार्‍यांचे लेखन जमा करून जाहिरातींच्या अधेमधे मजकूर टाकून दोन-एकशे पाने भरून काढणे, इतक्या माफक व्याख्येपर्यंत आपण येऊन पोचलो असताना, ‘संग्राह्य दिवाळी अंक’ ही संकल्पना अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच अनेक दिवाळी अंक हे वर्षानुवर्षे ‘पकडून ठेवलेल्या’ लेखकांच्या जुन्या लेखनाच्या आवृत्त्यांची भरताड करून काढले जात असताना ‘संपादक’ नावाचा प्राणी फक्त मॅनेजर याच पातळीवर शिल्लक राहिला आहे का, अशीही शंका येऊ लागली आहे.
या वर्षीचा ‘मुक्त शब्द’चा दिवाळी अंक मात्र याला सणसणीत अपवाद ठरावा असा. नगण्य जाहिराती घेऊन; खोगीरभरती लेखनाऐवजी वैचारिक लेखनाला समाविष्ट करत; अंकाचा पुरा फोकसच त्या प्रकारच्या लेखनावर ठेवण्याचे धाडस करत; संपादकांनी संपूर्ण अंकाला एक निश्चित चौकट दिली आहे आणि त्या आधारे लेखन निवडले आहे किंवा त्या-त्या विषयातील अधिकारी व्यक्तींकडून लिहून घेतले आहे. एखाद-दोन अपवाद वगळले, तर त्यांतला कोणताच लेख ‘चाळला नि सोडून दिला’  असे करताच येणार नाही. ते लेखन वा त्यातील मुद्दे, वाचकाला आवडतील की नाही, पटतील की नाही हा पुढचा भाग आहे; परंतु अंक तयार करताना संपादक आणि संपादकीय मंडळाने दाखवलेल्या विचक्षण दृष्टीला पहिला सलाम करायला हवा.
अंकाबद्दल लिहिताना प्रथमच माझी मर्यादा स्पष्ट करायला हवी. दृश्यकलेच्या आणि नवकाव्याच्या बाबतीत मी अंगठाबहाद्दर माणूस आहे. तेव्हा प्रभाकर कोलते यांचा मुखपृष्ठाविषयीचा लेख आणि डहाकेंपासून कल्पना दुधाळ यांच्यापर्यंत अनेक नव्या-जुन्या आणि प्रसिद्ध कवी-कवयित्रींच्या कविता – या दोन्ही गोष्टी न वाचता मी पुढे गेलो आहे. तेव्हा त्या दोन्हीबाबत मी काही बोलणार नाही, हे आधीच सांगून टाकतो. त्याचबरोबर फक्त इतिहासाबद्दलचेच लेखन नव्हे; तर ज्यांच्या वास्तव असण्याबाबतच शंका आहे अशा महाकाव्यांमधील घटना,  प्रसंग, व्यक्ती यांबाबत नवनवे अन्वयार्थ लावत सतत त्यावर चर्वण करणारे, अस्मिता-विद्रोहांना मदत होईल अशा प्रकारे केलेले लेखन वाचण्याचे मी टाळतो.  त्यामुळे ताटका राक्षसीवरील सुकन्या आगाशे यांचा लेखही वाचनातून वगळला. या तीन गोष्टी वगळल्या, तर अंकाचे सरळ चार भाग पडतात.
पहिल्या भागात व्यक्तिपरिचयपर लेख आहेत. त्यात जयप्रकाश सावंत यांनी लिहिलेला ‘कुर्त वोल्फ’ या संपादकावरील दीर्घ लेख आहे.  लेखक, कवी, विचारवंत यांच्याबाबत पुष्कळ लिहिले-बोलले जाते, पण ते वाचकांपर्यंत पोचवणार्‍या संपादक-प्रकाशक यांच्याबाबत फारशी माहिती वाचकांना नसते. प्रकाशक म्हणजे लेखकाच्या जीवावर भरपूर पैसे मिळवून त्यांची रॉयल्टी देणे टाळणारा इसम इतपतच ओळख आज मराठी वाचकांना आहे. (अर्थात ‘आपले रोजगारक्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्रांत फक्त भ्रष्टाचारीच असतात’ असा सर्वसाधारण समज असतो, असे विधान केले; तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही.) श्री. पु. भागवत किंवा रा. ज. देशमुख यांच्यासारख्या अपवादात्मक व्यक्तींबद्दल थोडेफार बोलले गेले आहे. प्रकाशन व्यवसायाशी जवळून संबंध असलेले जयप्रकाश सावंत यांनी काफ्कासह इतर अनेक प्रसिद्ध लेखकांचा प्रकाशक असलेला कुर्त वोल्फ याचा परिचय करून दिला आहे. लेखकाच्या आयुष्यातील चढ-उतार, विपन्नावस्थेत केलेली साहित्यसेवा इत्यादी आपण नित्य वाचत असतोच. पण एखाद्या प्रकाशकाचा प्रवासही तितकाच खाचखळग्यांनी भरलेला असतो, त्याच्या साहित्यनिष्ठाही तितक्याच प्रबळ असू शकतात हे निदान शक्यतेच्या पातळीवर मान्य करावे, इतके जरी यातून वाचकाला उमगले; तरी खूप झाले.
या विभागात याशिवाय आणखी दोन लेख आहेत, मिलिंद बोकील यांनी ‘निर्मिती’ संस्थेच्या कै. अशोक सासवडकर यांचा लिहिलेला परिचय, आणि प्रसिद्ध लेखिका सानिया यांनी अंबिका सरकार यांचा करून दिलेला परिचय.
हे दोन्ही लेख परिचय म्हणून उत्तम असले, तरी काही गोष्टी खटकल्या. एक म्हणजे दोन्ही लेखांत ‘मी’ वाजवीपेक्षा (हे मूल्यमापन सापेक्ष असते, हे आधीच मान्य करतो) जास्त डोकावतो, असे मला प्रामाणिकपणे वाटते. याशिवाय बोकिलांच्या लेखात तर त्यांच्यातला कथालेखकही डोकावतो. उदाहरण द्यायचे झाले, तर सासवडकरांचे कार्यक्षेत्र असलेल्या उद्धर गावाचा उल्लेख आल्याबरोबर तेथील वनस्पतीसृष्टीबद्दल (flora आणि fauna) येणारा एक पुरा परिच्छेद. अंबिका सरकार यांच्यावरील लेखात ‘लेखिके’चा परिचय करून देताना आलेले, ‘संसार करता-करता येणार्‍या अडचणी’ वगैरे मुद्दे आता सर्वमान्य झालेले आहेत नि नव्याने सांगावेत असे नाहीत, असे मला प्रामाणिकपणे वाटते. दोन्ही लेख अशा तपशिलांनी विनाकारण पसरट होत गेले आहेत असे वाटून गेले.
दुसर्‍या भागात आनंद तेलतुंबडे, संपत देसाई आणि केशव वाघमारे या तिघांनी मराठा मोर्चांचा आणि त्यामागच्या पार्श्वभूमीचा वेध घेतला आहे. यांपैकी आनंद तेलतुंबडे यांच्या ‘EPW’मधील लेखाचा अनुवाद हा सर्वसामान्यांमधे आधीच चर्चिलेले मुद्देच पुन्हा आणतो, नवीन काहीच सापडत नाही. संपत देसाईंचा लेख (‘कुणबी-मराठ्यांच्या उद्ध्वस्तीकरणाचा आक्रोशः मराठा क्रांती मोर्चा’) हा लेख या मोर्चांमधील प्रमुख मागण्यांचा ऊहापोह करतो (विविध शहरांत मोर्चांची संख्या नि तपशील थोडेफार बदलत गेले, तरी सुरुवातीला मांडल्या गेलेल्या मागण्याच इथे विचारात घेतल्या आहेत.). या मागण्यांमागची ऐतिहासिक, सामाजिक पार्श्वभूमी उलगडून दाखवतो. प्रामुख्याने शेतीवर आधारित असलेला हा समाज आणि राज्यकर्ती जमात यात अभिन्नत्व मानता कामा नये असा या लेखाचा दावा आहे. ब्रिटीशपूर्व काळात आणि ब्रिटीश अधिसत्तेच्या काळात या समाजाची स्थिती कशी बदलत गेली आहे याचा लेखाजोखा त्यात मांडला आहे. भांडवलशाहीचा गाभा असलेल्या औद्योगिकीकरणाने प्रामुख्याने याच समाजाच्या जमिनी गेल्या, त्या विकासाच्या रेट्याचा सर्वाधिक तोटा याच समाजाला झाला आहे असे लेखक म्हणतो. मोर्चाच्या मागण्या न्याय्य ठरवत असतानाही केवळ आरक्षण मिळाल्याने समाजाचे मागासलेपण संपणार नाही हे भान राखण्यास बजावतो. तसे का याची कारणमीमांसाही करतो. याचबरोबर या समाजाच्या मानसिकतेतच त्याच्या मागासलेपणाची बीजे सापडतात हे डॉ. साळुंखे, डॉ सदानंद मोरे आदी मान्यवरांच्या साक्षीने मांडतो. हा लेख प्रामुख्याने मोर्चाची बाजू उलगडणारा आहे. संपूर्ण लेखात न चुकता निव्वळ ‘मराठा’ असा उल्लेख न करता ‘मराठा (कुणबी)’ असा उल्लेख करत या दोन जातींतले अभिन्नत्व देसाई अधोरेखित करतात. तसे असेल तर मंडल आयोगाच्या काळात ‘आरक्षणाच्या कुबड्या नकोत, आम्ही आणि कुणबी वेगळे आहोत’ अशी भूमिका काही मराठा नेत्यांकडून मांडली गेली होती, ती चूक होती, त्या नेत्यांची वैयक्तिक मते होती की ती भूमिका कालबाह्य झाली आहे, याबाबत लेखकाने आपले म्हणणे स्पष्ट करायला हवे होते.
केशव वाघमारे यांचा लेख (‘मराठा समाजाला खरा धोका कोणाकडून?’) हा लेख मोर्चाच्या समर्थनार्थ मांडलेल्या भूमिकेचा प्रतिवाद करणारा आहे असे ढोबळ मानाने म्हणू शकतो. मुळात अर्थ-वर्गीय समस्या जात-अस्मितेवर आधारित उत्तराने कशी संपू शकते, असा सवाल वाघमारे करतात. राज्यकर्ती जमात आणि श्रमजीवी मराठे/कुणबी हे जर वेगळे नसतील; तर जिथे जिथे राजकीय, शैक्षणिक अथवा रोजगाराची सत्तास्थाने मराठा नेत्यांच्या हाती आहेत, तिथे आपल्याच समाजातील मागास व्यक्तींना हात देण्याचा किती प्रयत्न केला जातो असा त्यांचा प्रश्न आहे. देसाईंच्या आणि वाघमारेंच्या लेखात एक समान मुद्दा आहे. तो असा, की जिथे मराठा नेते सत्ताधारी आहेत, तिथे त्यांनी आपल्याच समाजातील मागास गटाच्या विकासासाठी काही विशेष उपाययोजना का केल्या नाहीत? अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत मोर्चा काढण्याऐवजी राजकीय पटलावर वस्तुनिष्ठ स्वरूपात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबद्दलचे तथ्य का मांडले जात नाही, असाही वाघमारे यांचा मुद्दा आहे. तसेच कोपर्डी घटना खरेतर अमानुष पितृसत्ताक हिंसेची परिणती होती, तिला जातीय रूप देऊन ‘उलट्या जातीयवादाचा’  बागुलबुवा उभा केला जात आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे. हे दोनही लेख ढोबळ मानाने दोन बाजू दाखवतात असे म्हटले, तरी चुकीचे ठरणार नाही.
तिसरा भाग ‘विचारतुला’. दोन प्रसिद्ध व्यक्तींची तुलना करणारे एकूण पाच लेख असलेला हा विभाग. हा अंक संग्राह्य आहे, असे जे म्हणालो; ते प्रामुख्याने या भागासाठी. यात सर्वप्रथम येतो, तो आनंद तेलतुंबडे यांचा ‘मार्क्स-लेनिन आणि फुले-आंबेडकर’ हा लेख (ज्याचा अनुवाद शुभांगी थोरात यांनी केला आहे). पुढील लेखनाबाबत अपेक्षा कमी करण्याचे काम या लेखाने केले, असे म्हणावे लागेल. या लेखात या चारही महापुरुषांबद्दल मला(तरी) आधीच माहीत असलेले तपशील एकापुढे एक मांडून दाखवले आहेत. त्यात तुलना अशी जवळजवळ नाहीच. जणू चार स्वतंत्र लेख असावेत इतके स्वतंत्रपणे, एकमेकांत मिसळू न देता चौघांबाबत लिहिलेले आहे.
पण त्यानंतर येणारा चैत्रा रेडकर यांचा ‘महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग’ यांच्यावरील लेख मात्र ती कसर भरून काढतो. हिंसा, प्रतिवाद आणि संघर्ष ही आजच्या काळात वैचारिक आणि राजकीय अशा दोन्ही प्रकारच्या सत्तेची समाजमान्य हत्यारे झालेली असताना नागरी प्रतिकार आणि प्रबोधन या दोन अहिंसक हत्यारांची धार नाहीशी होते आहे का, असा संभ्रम समाजात निर्माण होतो आहे. अशा वेळी नागरी प्रतिकाराचे हत्यार यशस्वीपणे वापरूनदेखील आपल्या कार्यात यशस्वी होता येते हे निर्विवादपणे सिद्ध करणार्‍या या दोन नेत्यांबद्दल बोलणे आवश्यकच ठरले आहे. दोघांच्या संघर्षाची भूमी, त्यांचे दृष्टीकोन, त्यांच्यावर असलेले पूर्वसुरींचे प्रभाव यांच्या आधारे दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख रेडकर यांनी उत्तम मांडला आहे.
हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हेडगेवारांच्याहूनही अधिक प्रभाव आहे, तो गोळवलकरांचा. म्हणूनच त्यांना ‘गुरुजी’ हे संबोधन मिळाले आहे. मुसोलिनी आणि गोळवलकर यांच्यावरील लेखात मुसोलिनी फारच थोडा असला, तरी गोळवलकरांच्या विचारसरणीचा घेतलेला आढावा अतिशय साक्षेपी आहे. गोळवलकरांचे आणि त्यांनी दिशा दिलेल्या संघाचे हिंदुत्व प्रामुख्याने शत्रुलक्ष्यी असल्याने त्या हिंदुत्वाच्या व्याख्येत दिसणारी विसंगती आणि अंमलबजावणीत करावी लागणारी कसरत यावर किशोर बेडकीहाळ यांची अचूक बोट ठेवले आहे.
या विभागातील सर्वांत उत्तम लेख म्हणता येईल, तो विवेक कोरडे यांचा – भगतसिंग आणि सावरकर यांच्यावरचा लेख. माझे हे मत बहुसंख्येला पटणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. या लेखात पुन्हा एकदा भगतसिंग यांना अतिशय कमी स्थान आहे आणि लेखाचा मोठा भाग हा सावरकरांवर आहे. भगतसिंगांना मिळालेले उणेपुरे २४ वर्षांचे आयुष्य आणि सावरकरांचे ऐंशीहून अधिक वर्षांचे आणि अनेक चढ-उतारांनी भरलेले जीवन आयुष्य हे साहजिकच म्हणावे लागेल. हिंदुत्ववादी म्हणवणारे लोक सत्ताधारी झाल्यापासून सावरकर हे व्यक्तिमत्त्व दोन बाजूंच्या साठमारीत भरडले जाताना दिसते. एका बाजूने त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणत भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान – ‘भारतरत्न’ – देण्याची मागणी करणारे माथेफिरू सक्रिय झाले आहेत, तर दुसर्‍या बाजूने अतीव तुच्छतेने त्यांचा उल्लेख ‘माफीवीर’ असा करणारे उथळ पुरोगामी दिसू लागले आहेत. अशा वेळी त्यांना हिरो किंवा व्हिलन यांपैकी काहीही ठरवण्याचा पूर्वहेतू समोर न ठेवता केलेली ही मांडणी ज्यांना स्वच्छ मनाने वाचता येईल त्यांनी अवश्य वाचावी अशी आहे. महाभारतातले कृष्णाचे पात्र जसे त्यातला देव बाजूला ठेवून पाहिले, तर एक माणूस म्हणून अधिक उंच भासते (हे वाचताच आमचे काही पुरोगामी मित्र, “बघा! मी म्हणत नव्हतो हा छुपा ‘तिकडचा’ आहे!’ असे म्हटल्याचे स्पष्ट ऐकू आले. :))  तसेच सावरकरांच्या बाबतीत वर उल्लेख केलेले पूर्वग्रह दूर ठेवून पाहिले, तर त्यांची शोकांतिका अधिक गहिरी होताना दिसते. अंदमानपूर्व सावरकर, अंदमानातले सावरकर आणि अंदमानोत्तर सावरकर यांचे कोरडे यांनी स्वतंत्रपणे केलेले विश्लेषण सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभास अधोरेखित करत जाते. विचारांचे बळ भरपूर, पण कृतीच्या बाबत कचखाऊ दिसणारी वृत्ती; सय्यद अहमद यांनी मुस्लीम समाजाच्या दिशेने जसे ध्रुवीकरण करू पाहिले, तसेच हिंदू धर्मीयांचे संघटन करण्याचा माथेफिरू विचार मांडत नकळत किंवा हेतुतः ध्रुवीकरणाला केलेली मदत; यातून ज्या द्विराष्ट्रवादाचा दावा त्यांनी केला, त्याला वास्तवात अधिक टोकदार करत नेण्याचे केलेले प्रयत्न; परंतु हे करत असतानाही प्रत्यक्ष कृतीच्या वेळी जबाबदारी घेण्याचे टाळणे (त्या अर्थी संघाने त्यांना शिरोधार्य मानणे औचित्यपूर्ण आहेे); आपद्धर्म म्हणत केलेली माफीची याचना (त्या पार्श्वभूमीवर, प्रत्यक्ष सहभाग नसतानाही संपूर्ण गटाच्या कृत्याची जबाबदारी भगतसिंगांनी स्वीकारणे); अर्थार्जनासाठी केलेली सावकारी… या मार्गाने अंदमानपूर्व सावरकरांचे अंदमानोत्तर आयुष्यात होत गेलेले अधःपतन हा एका शोकान्त कथेचा ऐवज आहे. कोरडे यांनी तो टिपा, संदर्भ यांसह मांडला आहे. पण हे करत असताना त्यांच्या अंदमानपूर्व आयुष्यातील सकारात्मक बाजूबद्दल बोलणे कोरडे यांनी टाळलेले नाही, हे विशेष दाद देण्याजोगे. सावरकरप्रेमी त्यांच्यावरील आरोपांचे दुबळे समर्थन देतात, बहुमताच्या आधारे ते समर्थन लादू पाहतात, चलाखीने काही दावे करून सावरकरांना दोषमुक्त करू पाहतात; त्या दाव्यांचाही व्यवस्थित प्रतिवाद करत कोरडे पुढे जातात. शेवट निश्चित करून लेख न लिहिता अभ्यास म्हणून लेख कसा लिहावा, याचा वस्तुपाठ म्हणून हा लेख वाचायला हवा.
हे तीन उत्कृष्ट लेख वाचून झाले की पुन्हा पहिल्या लेखासारखाच निव्वळ माहितीस्वरूप लेख (‘चे गवेरा आणि भगतसिंगः युवकांचे आदर्श’ – प्रा. चमनलाल, अनु. सागर भालेराव) देऊन हा विभाग संपतो.
कथाविभागात संख्येने बर्‍याच कथा असल्याने प्रत्येक कथेबद्दल विस्ताराने लिहिणे शक्य नाही. यांपैकी वंदना भागवत यांची कथा दिशाहीन, तर ऐनापुरेंची पाल्हाळिक आणि पारंपरिक वाटली.  कृष्णात खोत यांची कथा एका लहान मुलीच्या निवेदनातून साकार होते, याचे प्रयोजन नक्की समजले नाही. कथेतील पात्रानेच आपली कथा सांगणे याला जे दृष्टीकोनाचे वळण असते, ते कुठे जाणवले नाही. हीच कथा तृतीय पुरुषी निवेदनातून लिहिली असती, तर काय फरक पडला असतात असे वाटून गेले. सुमती जोशी यांनी अनुवादित केलेली सुचित्रा भट्टाचार्य यांची कथा अगदीच परिचित प्रकारची, आवृत्त म्हणावी अशी.
या सार्‍या कथांपेक्षा वेगळ्या उमटतात, त्या प्रशांत बागड, मनस्विनी लता रवींद्र आणि सतीश तांबे यांच्या कथा. पैकी सतीश तांबे हे आता कथालेखक म्हणून दीर्घकाळ परिचित असलेले नाव. लैंगिकतेच्या परिप्रेक्ष्यांची मांडणी करणार्‍या त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. महाभारतातील पांडव आणि द्रौपदी यांच्या सहजीवनाच्या कथेला अर्वाचीन वळण देताना हिप्पी कल्टमधील कम्यून संकल्पनेशी त्यांनी जोडून त्यांनी त्याला काहीसे देशी वळण दिले आहे. यातील पात्रांनी प्रथम व्यवस्थेच्या बंधनांना नाकारत केलेली सुरुवात जेव्हा अशा स्वरूपाच्या सहजीवनात परिवर्तित होते तेव्हा प्रस्थापित समाजाच्या रूढ कल्पना धुडकावून लावल्या, तरीही त्या चौकटीचे अस्तित्व नाकारता येत नाहीच; इतकेच नव्हे, तर व्यवस्थाहीनतेची वाटचालही हळूहळू नव्या व्यवस्थेकडे होत जाते, याची मांडणी ते करत जातात. सर्वांत उल्लेखनीय आहे ते पाचांच्या स्त्रीच्या पुत्राचे नाव. त्याला नाव कोणाचे लावायचे, हा प्रश्न त्या सहा जणांसमोर उभा राहतो, तेव्हाच ते सामाजिक संकेतांचे पूर्णतः गुलाम असल्याचे निर्णायकरीत्या सिद्ध होते. पाचांचा पुत्र म्हणून वडिलांचे नाव ‘पांडव’ लावण्याची तोड काढणार्‍यांना जाबालीची कथा आठवत नाही, मुलाची ओळख मातेच्या नावाने करून द्यावी हे ध्यानातही येत नाही. व्यावहारिक पातळीवर मागे सोडून दिलेली पितृसत्ताक व्यवस्था त्यांच्या मनाचा मात्र पुरा कब्जा घेऊन बसलेली दिसते.
मनस्विनी लता रवींद्र यांची कथा मात्र मला नीटशी ‘सापडली’ नाही, हे मान्य करावे लागेल. काळाच्या एका लहानशा तुकड्यातून एका स्त्रीच्या आजवरच्या आयुष्याचा पट उलगडून पाहताना तिला वेगवेगळ्या पातळ्यांवर भेटत गेलेले पुरुष आणि स्त्रिया यांचा एक अंतर्मुखपणे मांडलेला पट इतपतच उमज मला पडली असे मी म्हणेन. प्रशांत बागड यांची कथा मात्र एक सशक्त कथाकार म्हणून त्यांचे स्थान बळकट करणारी आहे. फँटसीचे हलके अस्तर घेऊन उभी असलेली आणि विचारांचा भक्कम गाभा असलेली कथा. सावली’ या रूपकाचा इतका सुंदर वापर जीएंच्या कथेची आठवण करून देतो. असे असले, तरी त्या कथेचे वळण मात्र स्वतंत्रच आहे.
या अतिशय उत्कृष्ट अंकाला गालबोट लागले आहे, ते टाइपसेटिंगमधल्या बेफिकिरीने. नव्या ओळीवर जाताना शब्द अतिशय वाईट तर्‍हेने तोडल्याने – अनेकदा आकारान्त शब्दाचा फक्त कानाच पुढच्या ओळीत जातो – वाचताना अनेकदा रसभंग होतो. आणि ही नजरचूक म्हणताच येणार नाही, इतका हा प्रकार वारंवार घडतो आहे. हे सहज टाळण्यासारखे होते.

 

इमेल : ramataram@gmail.com
Uncategorized

लक्ष्यवेधक ‘पुणे पोस्ट’

– प्रणव सखदेव
गेल्या काही वर्षांपासून पुण्यातून प्रकाशित होणार्‍या ‘पुणे पोस्ट’ या पाक्षिकाचा दिवाळी विशेषांक वाचकांच्या पसंतीस उतरतो आहे; कारण हे अंक आशय, मांडणी व निर्मितिमूल्य अशा तीनही अंगांनी लक्ष्यवेधक असतात. यंदाच्या अंकातही कथा-कविता आणि लेख-मुलाखती असा मिक्स्ड-बॅग मजकूर आहे. नरेंद्र चपळगावकर, भारत सासणे, वसंत आबाजी डहाके यांसारख्या मान्यवरांचेही लेख यात आहेत. संदीप वासलेकर यांची मुलाखत या अंकाचा आकर्षणबिंदू ठरावा अशी झाली आहे.
मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचं आहे. चित्र ओपेक रंगातलं आहे. करड्या-पांढर्‍या पार्श्वभूमीवर आपला संसार घेऊन प्रवासाला किंवा ‘कुठेतरी’ जात असलेल्या राजस्थानी जोडप्याचं हे चित्र अप्रतिम आहे. त्यात एक सायकल आहे, जी एका पुरुषाने धरली आहे. त्याने लालगुलाबी, पांढरे ठिपके असलेला फेटा घातला आहे. सायकलीच्या हँडलला पिशव्या टांगल्या आहेत. पुढ्यात कुत्रा आहे आणि मागे घुंगट ओढलेल्या बाईबरोबर लहान मुलगी आहे. तिच्या हातात माठ आहे. कुत्रा आणि ही मुलगी दोघांच्या चेहर्‍यावरचे भाव उत्सुक आहेत. भरदार मिश्यांचा पुरुष मात्र सरळ पाहत चालला आहे. कडेवर लहान मूल असलेल्या बाईच्या चेहर्‍यावरचे भाव मात्र घुंगटामुळे समजत नाहीत. पण तिची मान किंचित खाली वाकलेली आहे. चित्रातला किंवा विषयातला सायकल हा मध्यबिंदू आहे. सायकल हे प्रवासाचं रूपक मानलं, तर त्याभोवती जमलेलं ते कुटुंब आहे असं वाटलं. या बोलक्या चित्रामुळे प्रथमदर्शनीच अंक हातात घ्यावासा वाटतो.
एकीकडे भौतिक प्रगती घडत असताना, विज्ञान अनेक शक्यता आपल्यासमोर ठेवत असताना आणि आर्थिक समृद्धी होत असताना; प्रगतीच्या टप्प्यावर जग विनाशाकडे चालले आहे की काय, अशी भीती अनेक विचारवंत व्यक्त करताना दिसतात. वासलेकरांच्या या मुलाखतीत त्यांनी हा ऊहापोह केलेला आहे. तो वाचण्यासारखा व चिंतन करण्यासारखा आहे. विवेकाचा मार्गच यातून आपल्याला तारू शकेल असं ते यात म्हणतात (आणि हे कितीही घासून गुळगुळीत झालेलं वाक्य वाटत असलं, तरी ते विचार करण्यासारखंच आहे असं माझं मत. सध्याच्या वातावरणात तर विवेकी असणं ही मोठीच कठीण गोष्ट होऊन बसली आहे.) मुलाखतीत शेवटच्या प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तरातल्या काही ओळी मुद्दाम उद्धृत कराव्याशा वाटतात. त्या अशा – “संपूर्ण भारतात जवळ-जवळ ४० टक्के मुलं कुपोषित आहेत. दर वर्षी भारतातील १० लाख मुलं कुपोषणाने मरतात… याचा आपल्याला किती राग येतो? टीव्ही न्यूज चॅनेलच्या प्राइम टाइममध्ये यावर किती वेळा चर्चा होते? सोशल मीडियावर याची किती दखल घेतली जाते? हा विषय गंभीर आहे. पण आपल्या विचारविश्वात याला गौण स्थान आहे…”
‘टिळक ते गांधी एक पर्वांतर’ या लेखात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी शंभर वर्षांपूर्वी झालेल्या गांधीयुगाचा उदय आणि टिळकयुगाचा अस्त याचा परामर्श आपल्या लेखात घेतला आहे. विविध दाखले देत, ओघवत्या, साध्यासोप्या शैलीत ते हा परामर्श घेतात. लेखातल्या आशयापेक्षा मला त्यांची ही शैली जास्त आवडली.
‘माझ्यातला लेखक मेला आहे’ असं घोषित करणार्‍या तमिळ लेखक पेरूमल मुरूगन यांच्या ‘माधोरूबागान’ (इंग्रजी – वन पार्ट वूमन) या कादंबरीचा परिचय ‘अर्धनारीश्वर – एक सामाजिक शोकांतिका’ या लेखात वसंत डहाकेंनी करून दिला आहे. लेखक आणि समाज यांच्या परस्परसंबंधाबद्दलचं त्यांनी केलेलं चिंतन, मुरुगनच्या लेखनशैलीची दाखवून दिलेली वैशिष्ट्यं मूळ कादंबरी वाचण्यास उद्युक्त करतात.
‘चिरतरुण दु:खाचे बुरूज’ या आपल्या गाजलेल्या दीर्घकथेवर आधारित असलेल्या संभाव्य चित्रपटाची पटकथा लिहिताना दिग्दर्शकासोबत व पटकथाकारासोबत कथाकार भारत सासणे यांनी केलेलं चिंतन, त्यांनी ‘कथेकडून पटकथेकडे – एक चिंतन’ या आपल्या लेखातून मांडलं आहे. एखाद्या कथेत पटकथेच्या शक्यता कशा दडलेल्या असतात यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न त्यांनी या लेखातून केला आहे.
याशिवाय लक्ष्मीकांत देशमुख यांनी, प्रसिद्ध कवी व गीतकार साहिर लुधियानवी यांच्या ‘तल्खियाँ’ या संग्रहातील काही कवितांचा केलेला रसास्वाद (‘ये गीत रूह गीत…’); दिवंगत शायर निदा फाजली यांच्यावर आठवणीवजा लिहिलेला प्रदीप निफाडकर यांचा लेखही (‘तुम मुझ में जिंदा हो’) वाचनीय आहेत.

दारूपार्ट्या न करता, जातधर्माच्या आधारावर कोणताही प्रचार न करता केवळ लोकशाही मार्गाने प्रचार करून लोकसभेसाठी जळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार्‍या डॉ. संग्राम पाटील यांचं अनुभवकथन (‘माझा दुसरा निवडणूक प्रयोग’) अंतर्मुख करतं. परदेशात डॉक्टरकी करणारे पाटील जळगावातल्या एरंडोलमध्ये ‘बाबा आमटे रुग्णालय’ उभं करण्याचं ध्येय घेऊन भारतात परतले आणि निवडणूकही लढले. पण त्यात त्यांचा सपशेल पराभव झाला आणि तरीही ते आपलं काम करताहेत, याबद्दलचं त्यांचं विवेचन आवडलं. याशिवाय अंजली कुलकर्णी यांचा ‘नर्मदा बचाव आंदोलना’वरचा लेख, संपतराव पाटील या समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याचा कर्तृत्वपट मांडणारा सतीश देशपांडे यांचा लेख आणि मॅकडोनाल्ड या ब्रँडची रंजक कहाणी सांगणारा देवेंद्र सासणे यांचा लेख असे आणखीही काही लेख अंकात आहेत.

कथा-कवितेच्या विभागात गणेश मतकरी यांची ‘खो’ ही कथा आवडली. रचनाकौशल्याचं उत्तम भान आणि वाचनीयता यांचा मिलाफ कथेत आहे. तसंच खो-खो या खेळाचे रूपक वापरून जीवनविषयक इनसाइटही मतकरी देऊन जातात. बाकी कथाविभागातल्या कथा ठीक वाटल्या. अनुभवाचा कच्चा माल फिक्शनमध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक तो विचार व चिंतन या कथांमध्ये (की अनुभवकथनांमध्ये?) फारसा जाणवला नाही. कवितांचा विभागही ठीक वाटला. मराठी कविता सध्या तरी जास्तीत जास्त वर्णनपर (रिपोर्ताजी) होत जाते आहे की काय, अशी मला शंका येते आहे. लेट्स सी, पुढे काय होतंय.
हिंमत पाटील, कृष्णात खोत आणि मनोहर सोनवणे यांच्या ललित लेखांमधला सोनवणे यांचा लेख आवडला. त्यातली निरीक्षणं आणि तपशीलवारता आवडली.
प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना मनीषा साठे यांच्या हेमंत मेढी यांनी घेतलेल्या मुलाखतीने मात्र निराशा केली. मुळात कथ्थक हा नृत्यप्रकार आवडत असल्याने मोठ्या अपेक्षेने ही मुलाखत वाचायला घेतली, पण विचारलेले प्रश्न नेहमीचे आणि वरवरचे वाटले. त्यातून फार काही नवं मला तरी मिळालं नाही. कथ्थक नृत्यामागचा विचार, आजच्या काळाशी तो कसा जोडून घेता येईल आणि त्याचा मूळ गाभा व सर्जकता याबद्दल वाचायला मिळेल अशी अपेक्षा मला होती. तसंच शेवटी असणारा ‘श्री दत्तप्रेमलहरी’ हा अविनाश असलेकर यांचा निरुपणलेखही सगळ्या मजकुरात खड्यासारखा बोचला. कुणाच्या श्रद्धेविषयी मला काही आक्षेप नाही घ्यायचा, पण दिवाळी अंकाच्या या सगळ्या मजकुरात हे पान नसतं (तेही सगळ्यात शेवटी) तर चाललं असतं, असं जाता-जाता संपादकांना सांगावंसं वाटतं.

पुणे पोस्ट टीमला पुढच्या अंकांसाठी शुभेच्छा!

इमेल : sakhadeopranav@gmail.com
ब्लॉग : http://mazemuktchintan.blogspot.in/
Uncategorized

भवताल

– मीना वैद्य

हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा अशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या या नियतकालिकाचा २०१६चा दिवाळी अंक पाहिला.
हा अनोखा खडक विशेषांक आहे आणि विशेष म्हणजे दगडात सापडणाऱ्या खनिजाची – स्फटिकाची एक अनोखी भेटही या अंकाबरोबर ग्राहक-वाचकासाठी देण्यात आली आहे.
आपल्या आयुष्याचा भाग असलेल्या पर्यावरणाचं आणि विशेषकरून पंचतत्त्वांपैकी पृथ्वी या तत्त्वाचं दर्शन खड़कांमधून, डोंगरदऱ्यांमधून, अगदी पायाखालच्या दगडमातीतूनही, आपल्याला पदोपदी घडत असतं. पण सहसा सामान्य माणूस याकडे अतिशय उदासीनतेने, अलिप्तपणे पाहत असतो. हे सारं गृहीत धरून जगत असतो. अशा लोकांचंदेखील कुतूहल चाळवावं आणि त्यांची अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढावी, असं या अंकाचं स्वरूप आहे. याचं मुखपृष्ठ अतिशय आकर्षक आहे आणि तितकंच आकर्षक आहे त्याचं अंतरंगदेखील!
महाराष्ट्रातील दगड / खडक म्हणजे डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट, इथला सह्याद्री पर्वत हा सहा-सात कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला. याच्या कठीणपणामुळे यात उत्तम कोरीव काम घडू शकतं. म्हणूनच आपल्या देशातील सर्वाधिक कोरीव लेणी महाराष्ट्रात आहेत. अशा या ‘महाराष्ट्र घडवणाऱ्या’ दगडाची ओळख वाचकांना करून देण्याचा संकल्प ‘भवताल’ने  केलाय आणि तो त्यांनी उत्तमरीत्या सिद्धीला नेलाय असंच हा अंक पाहून म्हणावंसं वाटतं.
अंकाच्या हाताळणीचा पट खूपच विशाल, विस्तीर्ण आहे. कालखंडाच्या दृष्टीकोनातून पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत; आणि विविधतेच्या दृष्टीकोनातून – केवळ थक्क करून सोडणारा.
खड़कांची निर्मिती, त्यांचे तीन प्राथमिक प्रकार, पृथ्वीच्या अंतरंगात घडणाऱ्या उलथापालथीमुळे आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे पृष्ठभागावर होणारी स्थित्यंतरं, निर्माण होणारे प्रचंड डोंगर, सुळके, कडेकपाऱ्या, गुहा, बोगदे, दऱ्या, घळी, तलाव यांचा परिचय यांतील लेखांमधून आपल्याला होतो. त्याचबरोबर या डोंगरदऱ्यांच्या आधाराने उभे राहिलेले गडकिल्ले, वेरूळ-अजंठासारखी जगप्रसिद्ध कोरीव लेणी अशा मानवनिर्मित गोष्टींचंही दर्शन घडतं.
याखेरीज याच पृथ्वीतत्त्वाच्या विविध, विस्मयकारी आविष्कारांचा परामर्श घेतलेलाही सापडतो. दगडांमधली सच्छिद्रता, जलधारण शक्ती, त्यांच्या थरांचे विविध आकारप्रकार, स्थानिक खनिजांच्या आणि मातीच्या संयोगामुळे त्यांच्यामध्ये उमटणारे विविध रंग, खनिजांवरच्या प्रक्रियेमुळे तयार झालेले सुंदर स्फटिक या सर्वांचा होणारा परिचय चित्तवेधक आहे. त्यांमधल्या काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांचा उल्लेख करावासा वाटतो.
दगडावरील माळरानं : नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर इथपासून मराठवाड्याच्या परिसरातदेखील काळ्या पाषाणावर बहरणारी माळरानं आणि त्यांच्यामधील जैवविविधता.
कातळसडे (पुष्पपठारं) : उन्हाळ्यात वैराण असणारे, पावसाळ्यात पानाफुलांनी बहरून जिवंत होऊन उठणारे प्रदेश – पाचगणी, महाबळेश्वर, कास अशा ठिकाणी पुष्पपठारं म्हणून ओळखले जाणारे कातळसडे.
कडा : हरिश्चंद्रगडावरील १४२४ मीटर उंचीचा, काळजात धडकी भरवणारा आणि रौद्ररूप कोकणकडा.
सरोवर : बावन्न हजार वर्षांपूर्वी अशनिपातामुळे निर्माण झालेलं बुलढाण्यातील लोणार सरोवर.
घाट : अनेक शतकांपूर्वी कातळातून पायऱ्या खोदून बनवला गेलेला जुन्नरजवळील नाणेघाट.
सह्याद्री ही भारतीय गिर्यारोहकांची पंढरी मानली जाते. काही धाडसी गिर्यारोहकांचे अनुभव सांगणारे, चढाईला योग्य असलेल्या ठिकाणांची माहिती देणारे लेख या अंकात आहेत. तसेच पट्टीच्या गिर्यारोहकाला आव्हान देणाऱ्या काही खास कडेसुळक्यांचा परिचयदेखील कसलेल्या गिरिप्रेमींनी करून दिला आहे. गिर्यारोहणाचा छंद जोपासण्यासाठीदेखील हे लेख मोलाचे ठरतील.
ज्यांचं आयुष्यच पिढ्यानपिढ्या दगडांशी निगडित आहे, अशा वडार या भटक्या समाजाची ओळखही या अंकातून घडते. स्वतःला भगीरथाचे पुत्र मानणारे वडार लोक. प्राचीन काळापासून लेणी, किल्ले, घरं यांच्या निर्मितीमध्ये वडार जमातीचं मोठं योगदान असे. जुन्या शिलालेखांमध्ये ‘पाथरवट’ असं त्यांचं नामाभिधान झालेलं सापडतं म्हणे. दगडांच्या बाबतीत वडार निष्णात असतात. दगडांची जात, त्यांची घडण, पोत (Texture), वय यांबाबतची जाण आणि पारख त्यांना पिढीजात असते. आजही रस्ते-तलाव यांची बांधणी, खाणी-विहिरींचं खोदकाम, पाटा-वरवंटा, जातं, रगडे यांसारख्या स्वयंपाकघरातील आयुधांची घडण हे सगळं वडार करतात. अशा या समाजाच्या कारागिरीबरोबर त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची ओळखही या अंकामधून आपल्याला होते.
वर उल्लेखल्यानुसार या सर्व विषयांची मांडणी होते ती अतिशय उद्बोधक, माहितीपूर्ण आणि रंजक अशा लेखांमधून. या लेखांना जोड आहे ती उत्कृष्ट छायाचित्रांची. अतिशय सुबोध आणि दर्जेदार भाषेतून हे लेख सादर होतात.
लेखक आहेत पुरातत्त्व​शास्त्र​, भूशास्त्र​, पर्यावरण, भूकंप यांचे अभ्यासक; कलाइतिहासतज्ज्ञ; वन्यजीवांचे-पुष्पपठारांचे अभ्यासक; कन्झर्वेशन आर्किटेक्टस; निसर्गनिरीक्षक; मुक्तपत्रकार; चित्रकार; कलाकार; अध्यापक; प्राध्यापक; छायाचित्रकार; गिर्यारोहक वगैरे.
वरील सर्व विषयांच्या पलीकडे पसरलेलं या दगडाखडकांचं एक जादुई विश्व आहे – खनिजांचं  आणि स्फटिकांचं! या अद्भुत दुनियेचं दर्शनही या अंकातून आपल्याला घडतं. महाराष्ट्रातील खडक म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून उफाळलेल्या लाव्हारसाचं रूप. तो थंड  होत असताना तयार झालेल्या खडकांमध्ये अनेक पोकळ्या निर्माण झाल्या. त्यांच्यात दीर्घकाळ कैद (trap) होऊन राहिलेली खनिजं कालांतराने थंड होत असताना स्फटिकरूप (crystalise) झाली. लाल, निळ्या, हिरव्या, जांभळ्या, पांढऱ्या अशा विविध रंगांमध्ये आणि आकारांमध्ये हे स्फटिक नेत्रदीपक स्वरूपात प्रकटले. त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेचं रहस्य उलगडून सांगणाऱ्या लेखांबरोबर अनेक स्फटिकांची सुंदर छायाचित्रंही समाविष्ट केली गेली आहेत. काळ्याकभिन्न फत्तरांमधून व्यक्त झालेली सौंदर्याची खाण!
स्फटिकांचा असा सुंदर, मोहक खजिना इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि उत्तम स्वरूपात महाराष्ट्राखेरीज जगात इतरत्र कुठेही सापडत नाही म्हणे.
हा खास खजिना जगापुढे उलगडून दाखवण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे ज्येष्ठ खनिजसंग्राहक श्री. एम. एफ. मक्की यांचं.  राज्यभर भटकून ही खनिजं शोधणं, जगभरातील ‘शोज्’मध्ये पोचवणं, अभ्यासकांसाठी आणि संग्रहालयांसाठी ती उपलब्ध करून देणं हे मोलाचं काम श्री. मक्की गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ करताहेत. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक भूशास्त्र परिषदेच्या (Geology Conference) निमित्ताने भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनात त्यांच्या व्यक्तिगत संग्रहातील नमुने प्रदर्शित होतात; आणि जिज्ञासूंना माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी ते स्वतः उपलब्धही असतात. अशा या व्यक्तीचा आणि त्यांच्या कामाचा विस्तृत परिचय करून देणारा लेख या अंकाचं मोल निश्चितच वाढवतो.
महाराष्ट्रातून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन अशा अनेक देशांतील संग्रहालयांमध्ये जाऊन पोचलेल्या काही स्फटिकांचा तपशीलही या अंकात समाविष्ट आहे.
‘हा दगड आम्हांला कोणी शिकवलाच नाही’ अशी खंत संपादकीयामधून व्यक्त करत असतानाच या अंकाचे संपादक श्री. अभिजीत घोरपडे यांनी योग्य दिशेने योग्य पाऊल उचललंय. ते स्वतः वरिष्ठ पत्रकार आणि पर्यावरण-अभ्यासक आहेत. अनेक तज्ज्ञांना आणि अभ्यासकांना बरोबर घेऊन त्यांनी हा देखणा, वाचनीय आणि संग्राह्य अंक आपल्यासाठी आणला आहे. जेणेकरून ‘हा दगड आम्हांला कोणी शिकवलाच नाही’ अशी तक्रार आपली पुढची पिढी आपल्याबद्दल करू शकणार नाही!
दगड न्याहाळण्याचा, अभ्यासण्याचा हा छंद आपल्याला निसर्गाच्या खूप जवळ घेऊन जाऊ शकतो; निखळ, निर्मळ आनंद देऊ शकतो. त्यासाठी तेवढी जिज्ञासा आणि संवेदनशीलता मात्र हवी.
नवख्या आणि अनभिज्ञ व्यक्तींना या विषयाकडे आकर्षित करणं, हौशी खडक-अभ्यासकाला खूप माहिती पुरवणं आणि सखोल अभ्यासकाला मौल्यवान  विदा (data) उपलब्ध करून देणं असं तिहेरी उद्दिष्ट या अंकाने साधलंय. त्याबद्दल ‘भवताल’ दिवाळी विशेषांकाच्या सर्वच निर्मात्यांचं मनःपूर्वक अभिनंदन.
– एक हौशी खडकसंग्राहक आणि अभ्यासक
इमेल : vaidya.mv@gmail.com
Uncategorized

नवल – सेम ओल्ड, सेम ओल्ड

– गणेश मतकरी
मराठी साहित्यात भय, गूढ वगैरे जॉनर्सना कायमच बॅकसीट देण्यात आलीय याचा सर्वाधिक खेद वाटणाऱ्या गटामधे मी मोडतो. पो, लवक्राफ्ट, स्टीवन किंग आणि इतर मंडळींनी या प्रकारचं लिखाण मोठ्या प्रमाणात केलं, आणि या विषयांना जगभरात मान्यता मिळवून दिली. एका विशिष्ट चौकटीतल्या आणि विशिष्ट आशयाच्या साहित्याला अ दर्जाचं आणि इतर प्रकारच्या आशयाला आणि शैलींना कनिष्ठ मानण्याच्या आपल्याकडच्या प्रवृत्तीमुळे नाव घेण्यासारखे (आणि कोण काय म्हणतं याकडे फार लक्ष्य नं देणारे) काही मोजके लेखक वगळता, नवे चांगले लेखक या प्रकारांकडे वळलेच नाहीत. या साहित्याकडे दुर्लक्ष झालं, त्याची वाढ खुंटली. केवळ हेच साहित्य नाही; तर रहस्यकथा, अद्भुतकथा, तपासकथा अशा सर्वत्र वाचकप्रिय ठरलेल्या साहित्यप्रकारांत आपल्याकडे म्हणावं तसं स्वतंत्र लिखाण झालं नाही आणि आज आपण एका ठरावीक वर्तुळात फिरतो आहोत.
कै० अनंत अंतरकरांनी स्थापन केलेल्या ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ या त्रयीमधल्या ‘नवल’चं महत्त्व आहे; ते तो या प्रकारच्या लेखनाला वाहिलेला अंक आहे म्हणून.
मी गेली अनेक वर्षं ‘नवल’चा बराचसा नियमित वाचक आहे. पण गेल्या काही वर्षांत ‘नवल’चा दर्जा घसरत चाललाय असं माझं प्रामाणिक मत आहे. नारायण धारप असताना त्यांच्या कथा मी ‘नवल’मधे वाचलेल्या आहेत. ते गेल्यावर त्या तोलामोलाचं दुसरं नाव त्या जागी आलेलं दिसत नाही. स्वतंत्र लिखाण ‘नवल’मधे कमी दिसतं. आता या प्रकारचं दर्जेदार आणि स्वतंत्र लिखाण एकूणच कमी असल्याने नव्या दमाच्या लेखकांमधे ते कोण करू शकेल हे पाहणं अधिकच आवश्यक आहे. या प्रकारचा काही प्रयत्न ‘नवल’च्या या दिवाळी अंकात दिसत नाही. याउलट तो आजही एका जुनाट साच्याला धरून राहिलेला दिसतो.
पाश्चिमात्य फॅन्टसी आर्टचं नक्कल करणारं कव्हर; भयकथा, चातुर्यकथा, संदेहकथा अशा अनावश्यक वर्गवारीत टाकलेल्या कथा – त्यांतल्या बहुतेक भाषांतरित; काही लेख; काही फॅन्टसी-पिन-अप स्टाईल चित्रं, काही माहितीपर चौकटी वगैरे. यांतलं काहीच प्रथमदर्शनी, आणि नंतरच्या दर्शनांमधेही, नवीन वाटणारं नाही.
‘नवल’मधे दर्जेदार, नव्या वळणाचं स्वतंत्र लिखाण कमी असणं हा काळजीचा विषय आहे, जो संपादक मंडळाने तातडीने हाताळायला हवा असं माझं मत आहे.  उदाहरणार्थ, भयकथांमधलं अलीकडचं महत्त्वाचं नाव म्हणजे ऋषिकेश गुप्ते. प्रणव सखदेवसारख्या अलीकडे चर्चेत असणाऱ्या लेखकाच्या कामातही फॅन्टसीची झाक आपल्याला दिसते. त्यांच्या गोष्टी वा त्यांच्या तोडीच्या गोष्टी इथे पाहायला का मिळू नयेत? ऋषिकेशच्या गोष्टी या आधी ‘नवल’मधे आल्या असाव्यात; पण भयकथालेखकांमधला तो आजचा महत्त्वाचा लेखक असल्याने तो ‘नवल’मधे आताही नियमितपणे लिहीत राहीलसं पाहायला हवं. (बाबांची – रत्नाकर मतकरींची- ‘खेकडा’ ही कथा ‘हंस’मधे छापल्यावर, बाबा गूढकथा या फाॅर्ममधे सतत लिहीत राहतील याकडे  अंतरकरांनी काही वर्षं जातीनं लक्ष्य पुरवलं होतं. आताही नवे लेखक शोधून त्या प्रकारचा प्रयत्न करायला हवा. )
या वर्षीच्या ‘नवल’मधल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या भाषांतरित. रोअल्ड डालची ‘राॅयल जेली’ (अनु० वनिता सावंत), अॅगथा क्रिस्टीची ‘द ड्रीम'(अनु० वृषाली जोशी), मोपांसाची ‘मदाम बॅप्टीस्ट’ (अनु० पुरुषोत्तम देशमुख) अशा या कथा. इतरही काही अनुवादित आहेत, काही आधारित; पण रूपांतरित कथांत या सर्वांत प्रसिद्ध. आता माझा अनुवादांना काही विरोध नाही. किंबहुना, चांगले अनुवाद जरूर व्हावेत असंच माझं मत आहे. अनुवाद होणाऱ्या कथाही चांगल्या आहेत. मग माझा आक्षेप तरी काय, असा प्रश्न कोणालाही पडेल. तर – आक्षेप दोन आहेत.
पहिला हा, की मूळ लेखक उत्तम असले; तरी आजच्या काळात, नव्या वाचकांसाठी हे जरा जुन्या पद्धतीचं लेखन आहे. सध्या या साहित्यप्रकारांमधे काय लिहिलं जातय, हे आज ‘नवल’मधून कळणं अधिक उद्बोधक ठरलं असतं. (कदाचित ही कॉपीराइट्सची अडचण असेल. पण अडचण कसलीही असली; तरी नवं काही दिसत नाही, हा प्रश्न राहतोच.) दुसरी गोष्ट ही, की ही भाषांतरं बरीच कृत्रिम झाली आहेत. हा मूळ साहित्याचा अभ्यास नाही, तर सामान्य वाचकांना होणारी ही ओळख आहे, करमणूक आहे. त्यामुळे कथा रूपांतरात शक्य तितकी ओघवती झाली असती, तर बरं झालं असतं. पण तसं होत नाही. ‘राॅयल जेली’ या कथेसाठी काढलेलं (आणि ‘जखीणराई’ या कथेसाठी काढलेलंही) चंद्रमोहन कुलकर्णींचं चित्र मात्र फार उत्तम आहे. विरोधाभास असा, की एकूण अंकातच (‘भयभावना आणि दृश्यकला’ या दीपक घारे यांच्या लेखातले मास्टरपीसेस वगळता) पाश्चिमात्त्य चित्रंच सामान्य, जेनेरिक वाटणारी आहेत. उलट आपल्या लोकांनी कथांवर काढलेली चित्रं बऱ्याच प्रमाणात चांगली आहेत.
वर उल्लेखलेल्या कथा मुळात तरी चांगल्या आहेत, पण कुमुदिनी रांगणेकरांनी अनुवादित केलेली एथेल एम डेल् यांची ‘व्हेअर थ्री रोड्स मीट’ ही कादंबरी तर मुळातच सामान्य आहे. १९३५ सालच्या या मध्यम कादंबरीचा अनुवाद २०१६ मधे का वाचावा, हे काही मला कळलं नाही. रांजणकरांची ‘अ(भूत) पूर्व मुकद्दमा’ ही दीर्घकथाही आधारित आहे. पण कशावर आधारित आहे, ते काही कळलं नाही.
स्वतंत्र कथांमधे काही चांगले प्रयत्न जरूर आहेत. मेघश्री दळवींची ‘मोहिरान’ आणि दीपक नारायण मोडकांची ‘जखीणराई’ या दोन्ही कथा मला इन्टरेस्टींग वाटल्या. मात्र दोन्ही कथांचा अधिक विस्तार झाला असता, तर मजा आली असती. खासकरून ‘जखीणराई’. त्यात भरलेला हाॅर्टीकल्चरचा प्रचंड तपशील आणि प्रत्यक्ष घटनावस्तू घडणं, यांचा मेळ बसत नाही. हा तोल साधला गेला असता आणि शेवट अधिक अनपेक्षित असता, तर कथेत आणखी मजा आली असती. पण आताही वातावरणनिर्मितीसाठी ही कथा जमलेली आहे. समीर वाकणकरांची ‘विदेही’देखील चांगली आहे, पण त्याच्या शेवटापेक्षा त्यातला नैतिक पेच हा अधिक गुंतवणारा आहे. पण तो गुंडाळून टाकून लेखकाने शेवटच्या धक्क्यावर लक्ष्य केंद्रित केलेलं दिसतं. रमा गोळवलकरांच्या ‘त्रिपुरांतक’ या दीर्घकथेने माझ्या अपेक्षा उंचावून ठेवल्या, पण पुढे मात्र त्या कथेला माझ्या अपेक्षा पुर्‍या करता आल्या नाहीत. तिचा सुरुवातीचा भाग चांगला आहे. कोडी सोडवत पुढे जाण्याचा पॅटर्न परिचित असला, तरी तो उत्कंठावर्धक होऊ शकला असता. इथे मात्र त्याची एकाच प्रकारे पुनरावृत्ती होत राहते आणि आपण काहीतरी वेगळं होईलशी वाट पाहत राहतो. बाकी कथा ठीक, पण त्या फक्त ‘ठीक’ असून भागणार नाही. ‘नवल’कडून वाचकांच्या अपेक्षा असतात. त्या दृष्टीने काही नवं, स्वतंत्र आणून या अंकाचं पुनरुज्जीवन झालं तर योग्य दिशेने बदल झाल्यासारखं होईल.
कथांबाबत एकुणात अपेक्षा पूर्ण न करणारा हा अंक लेखांमधे मात्र चांगला आहे. त्यांत काही आधारित लेख आहेत, तर काही स्वतंत्र. पण हरकत नाही. माहिती आणि लेखनशैली, या दोन्ही दृष्टींनी लेख चांगले आहेतच. डॅफ्ने डू माॅरिए (ले० साधना सराफ) आणि प्रिन्सेस डायना (ले० कौमुदी अरविंद फडके) ही व्यक्तिचित्रं, आधी उल्लेख केलेला दृश्यकलेबद्दलचा लेख, श्यामला पेंडसेंचा ‘सिरीआतील परंपरा’ हा नॅशनल जाॅग्रफिक मासिकाच्या आधारे लिहिलेला लेख हे सारेच विषयाचं वैविध्य आणि वाचकाचं कुतूहल जपणारे आहेत.

 

आपल्याकडचे अनेक वर्षं टिकलेले आणि हक्काचा वाचक असणारे जे दिवाळी अंक आहेत, त्यांत ‘नवल’ नक्कीच मोडतो. तो तसाच राहावा असं वाचकांना निश्चितच वाटतं. मला तर नक्कीच वाटतं. पण त्यासाठी अंकाचा संपूर्णतः नव्याने विचार होणं आवश्यक आहे. नव्या लेखकांनी या प्रकारच्या लेखनाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. हे साहित्य उच्चभ्रू मानलं गेलं नसलं, तरी ते लिहायला नक्कीच सोपं नाही. चटकन लिहून टाकण्याइतकं हलकंफुलकं नाही. विचार, शैली, रचना या सगळ्यांचाच पुरेसा विचार होण्याची गरज आहे. तो करू शकणाऱ्या लेखकांना (नव्या आणि या अंकात लिहिणार्‍यांनाही) मी स्वत:च आवाहन करतो, की जुन्याचा विचार, भाषांतरं करणं सोडा आणि नवीन लिहा. या साहित्यविभागात नव्या वळणाचं सकस साहित्य तयार होण्याची गरज आहे. ते व्हायला लागलं, तर ‘नवल’ही त्याचा विचार नक्कीच करेल.
Uncategorized

शुभ ‘दीपावली’

– सन्जोप राव
माझ्या टेबलावरील दिवाळी अंकांचा गठ्ठा उचकटून बघताना माझी एक मैत्रीण म्हणाली, “‘तू हंस’, ‘किस्त्रीम’, ‘साप्ताहिक सकाळ’चे अंक घेतोस यात काही नवल नाही”. तिच्या ‘नवल’ या शब्दावर मी हसलो.  त्याकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करत ती म्हणाली,”पण तू ‘दीपावली’ कशासाठी घेतोस, आणि कशासाठी वाचतोस?” “एका वाक्यात सांगायचं तर..” मी तिला म्हणालो, “त्यात नंदिनी आत्मसिद्धांचे उर्दू, फारसी लेखकांवरचे, शायरांवरचे अप्रतिम लेख असतात म्हणून.”
‘दीपावली’चा या वर्षीचा अंक वाचताना मला मीच दिलेले कारण तर पटलेच, पण त्याशिवाय इतरही… पण थांबा. हे असं उभ्या-उभा सांगता येणार नाही. नीट मांडी घालून बसून बैजवार सांगावं लागेल. सांगतो. बसा.
प्रथमदर्शने मक्षिकापात. ‘दीपावली’च्या अंकाची अनुक्रमणिका बघा. मिलिंद बोकीळ? सुबोध बावडेकर? पहिल्याच पानावर अशी कच्ची भाजणी का असावी? पण ते जाऊ दे. नंदिनी आत्मसिद्ध यांचे लेखन अप्रतिम असते. उर्दू शायरी आणि लेखन म्हणजे ग़ालिबपासून सुरु होऊन ग़ालिबबरोबर संपते असली बाळबोध कल्पना बाळगणाऱ्या (माझ्यासारख्या) वाचकांना उत्तमोत्तम लेखकांची आणि शायरांची ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आत्मसिद्ध यांनी केलेले आहे. मंटो, मजा़ज़ यांच्यावरचे त्यांचे लेख दीर्घकाळ स्मरणात राहातील.
‘पुरजोश शायर जोश मलिहाबादी’ हा त्यांचा लेख त्यांच्या आतापर्यंतच्या लेखनाला शोभेसा असाच आहे. फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेलेल्या (आणि नंतर त्याचा घनघोर पश्चाताप झालेल्या) असंख्य गुणी कलावंतांमध्ये ‘जोश’ यांचा समावेश होतो. वस्तुत: ते नेहरूंचे निकटवर्तीय. पण नेहरूंनंतर तुमचे, तुमच्या मुलाबाळांचे काय, असल्या फसव्या चिंतांना आणि कराचीचे मुख्य आयुक्त नकवी यांनी घातलेल्या गळीला बळी पडून  ते १९५८ साली पाकिस्तानला निघून गेले आणि पस्तावलेही. पण ती नंतरची गोष्ट झाली. भारतात असताना विशेषत: स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ‘जोश’ यांची बंडखोर आणि तीक्ष्ण लेखणी एखाद्या समशेरीसारखी तळपत राहिली. प्रतिभा आणि परखडपणा यांचे काही गूढ नाते असावेच. इतर बऱ्याच प्रतिभावंतांप्रमाणे ‘जोश’ हे अत्यंत परखट, प्रसंगी उद्धट वाटावे असे, होते. सरंजामी थाटाचे, कधी क्रूर वाटावे असे त्यांचे वागणे असे. ते व्यसनी तर होतेच. शिवाय कधीकधी आपल्या लेखनाशी, त्यातल्या विचारांशी विसंगत असेही ते वागून दाखवत. म्हणजे एकूण ज्याच्यापासून चार हात लांब राहावेसे वाटावे असा माणूस. पण या लोकांचे असेच सगळे तिरपागडे असते की काय कुणास ठाऊक.  शायरीची परंपरा ‘जोश’ यांच्या घरातच होती. त्यांचे वडील शायर बशीर अहमद खान यांना ‘दाग’ यांचे ‘उसको कहते है जबान-ए-उर्दू, जिसमें न हो रंग फारसी का’ हे मत मान्य होते. तरीही ‘जोश’ यांनी स्वत: उर्दू शायरी करताना फारसी, अरबी शब्दांचा मुबलक वापर केला. तरीही उर्दूवर ‘जोश’ यांनी मनापासून प्रेम केले. या संदर्भात उर्दू भाषेवर आत्मसिद्ध यांनी केलेले भाष्य मला (उर्दूचा अजिबात अभ्यास नसतानाही) फार आवडले. उर्दू म्हणजे मुस्लिमांची भाषा, पाकिस्तानची भाषा असे ढोबळ समज घेऊन वावरणाऱ्यांना (तसे पुष्कळ लोक आहेत!) आत्मसिद्ध यांचे हे विवेचन एक नवा दृष्टीकोन देईल असे वाटले. अर्थात असा समज असलेले किती लोक आत्मसिद्ध यांचे हे लेखन वाचतील हा वेगळा प्रश्न! त्या काळात शायरी म्हणजे गजल असेच समीकरण असताना ‘जोश’ यांनी गजलेपेक्षा कवितेला- नज्मला- अधिक जवळ केले. या बंडखोरीशिवाय मला स्वत:ला ‘जोश’ यांचा वाटलेला विशेष म्हणजे शब्दांच्या वापराबद्दलचा, भाषेबद्दलचा त्यांचा काटेकोरपणा. पकिस्तानचे जनरल अयूब खान यांनी ‘जोश’ यांची प्रशंसा करताना वापरलेला ‘आलम’ हा शब्द चुकीचा आहे, असे ‘जोश’ यांनी अयूब यांना त्यांच्या तोंडावर सुनावले होते अशी एक कथा आहे. खरे-खोटे कुणास ठाऊक, पण असला सडेतोडपणा आणि विक्षिप्तपणा – अव्यवहारीपणा म्हणा तर – अल्लाचा हात डोक्यावर घेऊन आलेल्यांना (आणि फक्त त्यांनाच!) शोभूनच दिसतो.  स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आणि धर्मावर आधारित फाळणीच्या काळात ‘जोश’ यांनी अत्यंत ज्वलंत शब्दांत लिहिलेल्या कवितांचे अंश आत्मसिद्ध यांच्या लेखात मुळापासून वाचावे असे आहेत. अशा लेखकांची, शायरांची ओळख करुन दिल्यावर तो लेखक, शायर संपूर्ण वाचावा असे वाटणे हे त्या ओळखीचे मोठे यश आहे असे मी समजतो. आत्मसिद्ध यांच्या या लेखाने हे साधले आहे. विनया जंगले यांच्या लिखाणाप्रमाणेच आत्मसिद्ध यांच्या अशा लेखांचे पुस्तक कधी प्रसिद्ध होते याची मी वाट पाहतो आहे.  विनोद दुवा त्यांच्या ‘जायका इंडिया का’ या (फारच सुंदर) कार्यक्रमात ते एखाद्या भोजनातील सर्वोत्तम पदार्थासाठी ‘हासिल-ए-महफिल’ हा शब्द वापरत असत. आत्मसिद्ध यांचा ‘जोश’ यांच्यावरील हा लेख ‘दीपावली’च्या अंकाचे ‘हासिल-ए-महफिल’ आहे, असे मला वाटले.
व्यवस्थापनात, विशेषत: विपणनशास्त्रात, ‘Product Life Cycle’ (उत्पादनाची सुरुवात, वाढ, उत्कर्ष आणि र्‍हास) अशी एक संकल्पना आहे.  पूर्वी ही जीवनचक्रे खूप मोठी, लांबलचक असायची. म्हणजे एखाद्या उत्पादनाची लोकप्रियता बरेच दिवस टिकून राहायची. लाईफबॉय साबणाचे उदाहरण घ्या. कित्येक वर्षे तो भारतात सर्वात अधिक विकला जाणारा अंघोळीचा साबण होता. आता मात्र हे टप्पे संकुचित झाले आहेत. लेखकाचेही असेच होते की काय कुणास ठाऊक! लेखकाला ठरावीक काळानंतर येणाऱ्या Writer’s Block ला न जुमानता लेखक तसाच मुर्दाडपणाने लिहीत राहिला, की त्याचे लेखन पचपचीत, मचूळ होते की काय? ‘मौजे’च्या दिवाळी अंकातल्या मिलिंद बोकिलांची ‘सरोवर’ कादंबरी वाचून बोकिलांच्या लेखणीतली धार आता कमी झाली की काय, असे मला वाटले होते. ‘दीपावली’तल्या बोकिलांच्या ‘नेचर पार्क’ने बाकी माझी जवळजवळ खात्रीच झाली. धकाधकीचे आयुष्य जगणाऱ्या जोडप्याबरोबर वाचकानेही बदल म्हणून बाहेरगावी (या कादंबरीत, परदेशी) जायचे आणि मग तिथले असंख्य कंटाळवाणे तपशील सोसत शेवटी कंटाळूनच परत यायचे एवढेच मला बोकिलांच्या या कादंबरीत सापडले. नवीन म्हणाल तर काय; तर ज्या ठिकाणी हे जोडपे जाते, तेथे कपडे घालणे ऐच्छिक आहे. बरं मग?  Shallow people demand variety. I have been writing the same story of my life, each time trying to cut nearer to the aching nerve असे स्ट्रिंडबर्ग म्हणतो. पण बोकिलांच्या लिखाणातली ही दुखरी नस मला काही सापडता सापडेना. पण ज्यांच्याकडून कधी फार अपेक्षा होत्या त्या बोकिलांचे हे असे झालेले बघून काही बरे वाटले नाही.
अंबरीश मिश्र यांचा ‘टॅली हो!’ हा शम्मी कपूरवरचा लेख वाचनीय आहे. शम्मी कपूरचे कौतुक करताना त्याचे उगाचच उदात्तीकरण करण्याचा मोह मिश्र यांनी टाळला आहे. त्यांची भाषा खेळीमेळीची आणि मिश्किल आहे. काही वेळा ती खूपच श्रीमंत होऊन येते. आपल्या शाळेतल्या शिक्षिकेचे, मिस एफींचे, वर्णन करताना ते लिहितात, ‘शिडशिडीत देहयष्टी, सावळा रंग, अतिशय तेजस्वी डोळे आणि काळजात जिव्हाळ मायेचा पायलीभर चंद्रचुरा.’ हीच मिस एफी मुलांना सिनेमाला घेऊन जाते. (आताच्या काळात हे झालं असतं, तर सोशल नेटवर्किंग साईट्सवर तिची पूर्णपणे बदनामी झाली असती. ‘चोंबाळते’ की काय लहान मुलांना? India wants to know वगैरे. या संदर्भात मिश्र यांनी या लेखात वापरलेलं ‘in that order’ हे पालुपदही गंमतीशीर आहे.) ‘आसमानसे आया फरिश्ता’ गात शम्मी कपूर शर्मिला टागोरशी यथेच्छ झोंबाझोंबी करतो हे सांगून ते पुढं लिहितात, ‘खरंतर फरिश्ता असा वाह्यातपणा करत नसतो. देवदूताच्या डोळ्यांत तर समर्पणाची निरांजनं तेवत असतात आणि तो दिलीपकुमारप्रमाणं भावव्याकूळ, आर्त स्वरात ‘यह हवा यह रात यह चांदनी’ असं संथखोल आणि गहिरं गात असतो.’ हे मजेशीर आहे. ते पुढं लिहितात, ‘पन्नासच्या दशकातल्या सिनेमांत दिलीपकुमार, मीनाकुमारी, मधुबाला वगैरे मंडळींचं दु:ख गोपुराप्रमाणं उदात्त असायचं. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा’ असं म्हणण्याची खोटी, की त्यांच्यावर मरणाचा वर्षाव सुरू झालाच म्हणून समजा.’ मिश्र यांचा हा ‘टंग इन चीक’ विनोद मजेदार आहे. काही वेळा बाकी ते जरासे घसरल्यासारखे होतात.
‘एहसान तेरा होगा मुझपर’ हे ‘जंगली’तलं गाणं चांदीच्या पालखीत बसून आलं. जयकिशनदेखील आपल्या खास, वाळ्याचं अत्तर शिंपडलेल्या चाली शम्मीसाठी राखून ठेवायचा, शम्मीचा (हे असं लोकांना एकेरीत संबोधणं मला आवडत नाही. जणू काही तो माणूस आपला लंगोटीयार असावा, त्याच्याबरोबर आपण जोडीने इतिहासाच्या पेपरला कॉपी केलेली असावी आणि ज्याच्याबरोबर पहिली सिगारेट अर्धी-अर्धी  ओढली असावी. पण बरेच लेखक असं करतात. मिश्र यांनी तरी त्याला अपवाद का असावं?) पर्सोना नाईल नदीइतका विशाल होता. सत्यनारायणाच्या प्रसादाप्रमाणे तो घरोघरी पोचला.
असली किणीकरी भाषा त्यांच्या लिखाणात येते. पण एकूण हा लेख वाचताना मला फार मजा आली.
विजय पाडळकरांनी आवंदा शैलेंद्र आणि राज कपूरला वेठीला धरलं आहे. शैलेंद्र उत्तम गीतकार होता, राज कपूर आणि तो यांनी मिळून काही सुंदर कलाकृती दिल्या, वगैरे सगळं ठीक आहे. पाडळकरांच्या ‘मेरा नाम राजू’ या लेखामध्ये मात्र काहीही नवीन नाही. एक नायक, एक गायक आणि सात गीते असा काहीसा या लेखाचा विषय आहे. ‘तीसरी कसम’, ‘मारे गये गुलफाम’ वगैरे सगळे त्यांनी ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकातल्या ‘सजनवा बैरी हो गये हमार’ या लेखात लिहिले आहेच. खरे तर खुद्द बासु भट्टाचार्यांकडूनच हे सगळे ‘अनुभव’मध्ये वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याचा रवंथ का व्हावा ते कळत नाही. असो. विजय पाडळकरांचे लेखन (मला) एकतर अत्यंत आवडते (‘कवडसे पकडणारा कलावंत’), किंवा अजिबात आवडत नाही (‘जी.एंची निवडक पत्रे’ ची प्रस्तावना). एकूण, लेखकांना लिहिते करणे हे पूर्वी जसे उत्तम संपादकांचे काम समजले जायचे, तसे काही लेखकांनी प्रत्येक वर्षी लिहिलेच पाहिजे असे काही बंधन नाही हे त्या लेखकांना – प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या – समजावून द्यायचे हे आताच्या संपादकांचे काम असले पाहिजे, असे मला वाटले.
सुबोध जावडेकरांची ‘मेंदूची बाळं’ ही विज्ञानकथा रोचक आहे. तिच्यावर जरा संपादकीय कात्री चालली असती, तर ती आणखी चांगली झाली असती असे मला वाटले. (तिच्यातलाही ‘हंबक!’ हा मुद्रणदोष खटकतोच.) कथेतले शेवटचे वाक्य खटकेदार आणि सूचक असणे हे (नारायण धारपांच्या कथांमध्ये दिसते तसे) वैशिष्ट्य या कथेतही दिसते.
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या डबक्यांना चुकवत, पाय सांभाळत, ओलांडून जावे; तसा मी दिवाळी अंकांमधील इतर कथा आणि कविता यांना चुकवत-चुकवत जातो. याचे कारण म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा कथा-कविता मला समजतच नाहीत. नील आर्ते नावाचे कुणी लेखक आहेत. त्यांच्या कथा मी काही दिवाळी अंकांत चाळल्या आणि आता नवीन कथा आपल्याला समजणारच नाही या निर्णयाप्रत आलो. ‘आटपाट नगर होते, नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता…’ अशी सुरुवात असणाऱ्याच कथा आपल्याला कळतील असे हल्ली मला वाटू लागले आहे. दोष अर्थातच माझा. ‘डोक्यावर पुस्तक मारले आणि ‘ठक्क’ असा आवाज आला की प्रत्येक वेळी दोष पुस्तकाचाच असतो असे नाही’ हे आइनस्टाइनचे वाक्य कधीकधी आठवते, इतकेच.   कवितेचेही तेच. ‘कबूल कर की, तू मत्सर करतेस माझा, कबूल कर की, तू द्वेष करतेस माझा, कबूल कर की, तू घृणा करतेस माझी, कबूल कर की, आपण प्रेम करतो परस्परांवर’ अशी एक कविता या अंकात आहे. झाले. एवढेच. ‘तू इडली, मी डोसा, तू खार, मी ससा’ हे काय वाईट होते मग?
‘मौजे’प्रमाणे ‘दीपावली’मध्येही राशीभविष्य नाही. धन्यवाद. पण मुक्तांगण वगैरे आहेच. शेवटी’ ‘मी अमक्याकडून काय घेतले, तमक्याकडून काय घेतले, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावेत…’ असलेही सगळे आहे. इतके सगळे घेता येते, तर यांच्याकडून त्यांच्या लेखण्या कायमच्या हिसकावून घेण्यासाठी काय करावे या विचारात आपण पडलो असता हा अंक संपतो. (‘इचका’ आणि ‘टग्या’ यांबाबत तात्या माडगूळकरांनी केलेले मौलिक भाष्य आठवते. तरीही) हे पिकासोप्रमाणे जिभेने कारागृहाच्या भिंतींवर चित्रे काढतील की काय, बजावलेल्या समन्सांची ओरिगामी करतील की काय आणि कारागृहाच्या गजांची बासरी करून तिच्यातून मारवा ऐकवतील की काय या शंकेने जिवाचे पाणी पाणी होते! तरीही शिरीष बेरींवरचा लेख मी ‘त्यांनी मला काय दिलं’ या अटळ प्रश्नासकट वाचला आणि हताश होत्सासा पुढे गेलो.
‘सेलिब्रेटींचं प्रस्थ –कोणामुळे? कशासाठी’ या विषयावरची एक लेखमाला ‘दीपावली’च्या दिवाळी अंकात आहे. भीष्मराज बाम, राजन खान, अभिराम भडकमकर, विक्रम गायकवाड आणि प्रवीण दवणे यांची टिपणे या लेखमालेत आहेत असे तिचे शीर्षक सागते. सेलिब्रिटींना लोकमान्यता, लोकप्रियता, ‘स्टेटस’ आहे आणि चिकाटीने, न हरता काम करणाऱ्या लोकांबद्दल मात्र समाजाला आस्था नाही. असे का असावे, अशा बाळबोध प्रश्नाने या लेखमालेची सुरुवात होते. पण ते असो. ‘सेलेब्रिटी’ या शब्दाला चपखल मराठी शब्द काय? राजन खान त्याचा शब्दकोशातला अर्थ ‘प्रसिद्ध, गाजलेला’ असा देतात. ‘दिग्गज’ हा त्यांना सुचलेला शब्द सांगतात (आणि ‘सेलेब्रिटी’ हा शब्द ‘दिग्गज’ या शब्दाच्या उंचीचा नाही हेही लिहितात). पण तेही काही खरे नव्हे. एकूण काय, सेलेब्रिटी म्हणजे सेलेब्रिटी. सगळ्या लेखांमध्ये एक समान सूर दिसतो. तो म्हणजे एकूणच समाजात साचलेला उथळपणा (एका प्रसिद्ध पण आता डबघाईला आलेल्या मराठी संकेतस्थळावर दिगम्भा यांनी वापरलेला ‘थैल्लर्य’ हा अफलातून शब्द आठवतो!) आणि चकचकीत कचकड्यांच्या व्यक्तिपूजेचे स्तोम यांसाठी या सर्व लेखकांनी प्रसारमाध्यमे, चित्रवाणी, संगणक, चलभाष आणि आंतरजाल यांना जबाबदार धरले आहे. सकृतदर्शनी ते तसे आहेही. पण खान यांच्या लेखात ते म्हणतात त्याप्रमाणे, चांगल्याचा अपमान आणि वाइटाचा मान ही वैशिष्ट्ये असणारा हा सांप्रतकाळ केवळ भांडवली व्यवस्थेने निर्माण केलेला नाही, तर भारतीय मानसिकताही तशीच आहे. हे मला अधिक महत्त्वाचे वाटले. ‘Money does not change people, it only magnifies what is already there’ हे खरेच आहे. मुळात अंगार नसेल, तर बाहेरून येणारा कोणताही वारा वणवा पेटवू शकत नाही. म्हणजे बटबटीतपणाचे हे बी कुठूनतरी बाहेरून येऊन इथे रुजले, वाढले आणि त्याला माध्यमे, संगणक यांनी खतपाणी घातले, असे नाही. ते मुळात इथे होतेच. फक्त वाव मिळताच ते फोफावले, इतकेच. मला हे अगदी हुबेहूब मान्य आहे. भीष्मराज बाम यांनी राजेंद्र जक्कल आणि त्याच्या साथीदारांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीचे वर्णन केले आहे आणि ‘पोलिसांनी त्या गुन्हेगारांना परत नेण्यासाठी गाडीत बसवले, तेव्हा त्या लोकांनी जमलेल्या गर्दीकडे बघून हात हलवले आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मी हादरून गेलो.’ असे लिहिले आहे. हे वाचताना माझ्या अंगावर काटा आला. जोशी-अभ्यंकर हत्याकांडाला आता इतकी वर्षे झाली. त्यामुळे आज समाजात सुटलेले सैराट वारे ही काही नव्याने निर्माण झालेली वावटळ नाही; त्या काळात लोकांकडे स्मार्टफोन्स असते, तर लोकांनी या गुन्हेगारांचे चित्रीकरण केले असते आणि जमले असते तर त्यांच्याबरोबर स्वत:च्या ‘सेल्फीज’पण काढल्या असत्या असे मला वाटले. फक्त बाम हे या उथळपणाला अमेरिकी आणि युरोपीय व्यक्तिस्वातंत्र्याशी जोडतात, ते काही मला पटले नाही. खान यांचे या विषयावरचे टिपण प्रगल्भ आहे, पण त्यांनीही ‘संगणक येताना मुळात सेवा म्हणून नाही, तर धंदा म्हणूनच आला’ असे एक सरधोपट विधान केले आहे. विक्रम गायकवाड यांच्या मते आपण मानसिकदृष्ट्या भ्रष्ट झालो आहोत. त्यांच्या टिपणात बाकी बहुतांश ‘मी आणि माझे जीवन’ हेच आहे. दवणे यांच्या अत्यंत हसऱ्या आणि सकारात्मक फोटोखाली ‘सेलेब्रिटी: ‘ध्रुव कोण? उल्का कोण?’ असे खांडेकरी वळणाचे शीर्षक आहे.
जाहिरातींत ‘डब’ केलेलं अत्यंत अशुद्ध मराठी आम्हांला आता खटकत नाही, यामागे सारं काही समजून घेऊन समोरच्याला सन्मान देण्याची महाराष्ट्रीयन (हा कोणता शब्द बुवा?) संस्कृती आहे, न्यूनगंड नाही. न्यूनगंडाची ठिकाणं वेगळी आहेत, ती जोपासण्याचं पद्धतशीर कार्य सुरू आहे.
असं लिहून ते पुढं लिहितात,
‘न्यूनगंड भाषेचा नसून परंपरेने जपलेल्या आर्थिक गरिबीचा आहे. चाळकरी सामान्य जीवनशैलीतून तो आलेला आहे.’ (या दोन वाक्यांचा एकत्रित अर्थ लावण्याचा मी अजून प्रयत्न करत आहे.)
अपेक्षेप्रमाणे –
उल्का आणि ध्रुव यांतला फरक जाणिवेने आकळला की मग कितीही प्रस्थ वाढो, ते ओलांडून नवी पिढी शाश्वत ध्रुवताऱ्याकडे वळेल. निश्चितच वळेल.’
अशा आशावादी वळणावर दवणे यांचे हे टिपण संपते. अभिराम भडकमकरांना त्यांच्या टिपणात काय म्हणायचे आहे हे मला सांगता येणार नाही, कारण या अंकात मला ते टिपण सापडलेच नाही!
शेवटी सुहास बहुळकर यांच्या अब्दुलरहीम अप्पाभाई आलमेलकरांविषयीच्या दीर्घ लेखाबद्दल. बहुळकर यांची भाषा साधी आणि अनलंकृत आहे. आलमेलकरांची या लेखात दिलेली जी चित्रे आहेत, त्यांत न समजण्यासारखे काही नाही. या चित्रांमधील माणसे माणसांसारखी दिसतात आणि घरे घरांसारखी दिसतात. त्यामुळे मला हा लेख आवडला. हा लेख वाचतानाही विलक्षण प्रतिभा आणि विक्षिप्तपणा यांचे नाते मनात अधोरेखित झाले. ‘कलंदर’ हा शब्द त्याच्या अतिवापरामुळे बदनाम झाला आहे; पण आयुष्य ज्यांना घारीसारखे (‘चील’ की तरह!) धरून ठेवते आणि ज्यांना पोटापाण्यासाठी, रोजच्या जगण्याच्या झगड्यासाठी तडफडावे लागते अशा कलावंतांची फरफट आणि तिच्यातूनही त्यांची दिसणारी झळाळती प्रतिभा यांबद्दलचे पूर्वी अजिबात माहिती नसलेले एक प्रकरण मला या लेखात सापडले.