बालसाहित्यांक २०१७ लेख

गप्पा राजीव तांबेंशी

२०१३ सालच्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ‘युनिसेफ’चे शिक्षण सल्लागार, पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य, ‘गंमत शाळा’ अभिनव उपक्रमाचे निर्माते… तांब्यांच्या अशा अनेक ओळखी करून देता येतील. पण सगळ्यांत खरी ओळख म्हणजे ते मुलांसाठी पुस्तकं लिहिणारे आणि मुलांचे लाडके असलेले लेखक आहेत. बालसाहित्य म्हणजे नक्की काय,याबद्दल त्यांचं हे टिपण . 
बालसाहित्य हे मुलांना आपलं वाटलं पाहिजे, मग साहित्यप्रकार किंवा विषय कोणताही असो. तुम्ही त्याची मांडणी मुलांच्या दृष्टीकोनातून कशी करता तेच फक्त महत्त्वाचं आहे.
दुसरं म्हणजे एकान्तात राहून तुम्ही मुलांसाठी लिहू शकत नाही. त्यासाठी तुम्हांला मुलांशी बोलता आलं पाहिजे, त्यांच्यात मिसळता आलं पाहिजे, परक्या मुलाशी मैत्री करता आली पाहिजे. तसं झालं, की त्या परक्या मुलाला त्या मोठ्या माणसात दडलेलं मूल ओळखता येतं. मगच मुलं बोलतात. ही मला बालसाहित्यकाराची ‘लिटमस टेस्ट’ वाटते. लेखकामधलं खट्याळ मूल लिहिताना कायम जागं असलं पाहिजे. त्याच्याच नजरेतून गोष्टी टिपल्या जायला हव्यात.
बालसाहित्य सकस असावं. मुलांच्या मनोरंजनात न अडकता मनोरंजनाबरोबर शिक्षणही देणारं असावं. एक उदाहरण देतो. रवींद्रनाथांनी ऐंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला त्यांनी मुलांसाठी चार पुस्तकं लिहिली आणि मगच लेखणी खाली ठेवली. बंगाली लिपीबद्दलचं एक आणि उरलेली तीन म्हणजे बंगालीचे सहजपाठ. हे जे सहजपाठ आहेत, त्यांचं शरीर जरी साहित्याचं असलं तरी त्यात शिक्षणदेखील आहे. तसं सहजशिक्षण बालसाहित्यातून व्हावं. पण संस्कार मात्र नकोत. एक गैरसमज असा असतो आपला, की मुलं ही संस्कारक्षम असतात, म्हणून त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत. मुलं संस्कारक्षम असतात’ मग मोठ्या माणसांची संस्काराची बॅटरी काय पूर्ण चार्ज झालेली असते का काय? माणूस मरेपर्यंत संस्कारक्षमच असतो की. म्हणून मला असं मनापासून वाटतं, की बालसाहित्यात दोन गोष्टी अजिबात नसाव्यात. एक म्हणजे ते संस्कारक्षम नसावं. कारण संस्कार ‘करता’ येत नाहीत. मुलं जे-जे बघतात, ऐकतात, करतात; त्यांतून संस्कार आपोआप होत असतात. दुसरं म्हणजे बालसाहित्यात तात्पर्य अथवा बोध नसावा. ह्या संस्कारक्षम गोष्टी आणि गोष्टीखाली ठळक ढबोर्‍या ठशात लिहिलेल्या तात्पर्य यांमुळे माझं बालपण नासलं. थोडं वाईट वाटतं ऐकताना, पण मला ‘नासलं’ हाच शब्द वापरायचा आहे. उदा : “कठीण समय येता जो कामास येतो तो मित्र.” मला नाही असं वाटत. मित्र काय फक्त कठीण समयात कामाला येतो का? नाही. एरवीसुद्धा तो सोबत असतो, मदत करतोच की. शिवाय एका गोष्टीतून अनेक तात्पर्यं निघू शकतात, हेही आहेच. तुम्ही गोष्ट सांगा. मुलांना काय घ्यायचं, ते ती घेतील ना… मला हवं तेच तात्पर्य मुलाने स्वीकारलं पाहिजे, ही जी एकाधिकारशाही आहे तिथेच खरी अडचण आहे. त्यामुळे ह्या दोन मुद्द्यांवर मुलांना खिंडीत गाठून अजिबात छळू नये.
बालसाहित्यानं कसला आव आणू नये. अभिनिवेशरहित असावं.
***
बालकुमार साहित्य संमेलनात त्यांनी केलेलं हे भाषण 
शोधा, समजून घ्या आणि सांगा
ही तशी खूप जुनी गोष्ट असली तरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
आमच्या गावात एका रविवारी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होती. शेकडो मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेच्या परीक्षकांपैकी एक जण न आल्याने अचानक तिथे माझी नेमणूक झाली. शाळेच्या वर्गात, व्हरांड्यात, मैदानात बसून चित्रं काढण्यात मुले रंगून गेली होती. मुलांची चित्रं पाहत मी मुलांमधून फिरू लागलो.
त्याच वेळी मला भेटली इयत्ता पहिलीतली प्रिया.
प्रियाचं चित्र पाहून तिला मदत करण्याची व सल्ला देण्याची अनिवार उबळ मला आली. तिने चित्रात संपूर्ण पानभर पसरलेलं हिरवं झाड काढलं होतं. त्या झाडाखाली काही मुले खेळत होती, काही खात होती तर काही लोळत वाचत होती. पण त्या सर्व मुलांचे कपडे, त्यांची खेळणी व त्यांची पुस्तकंपण प्रियाने हिरव्या रंगात रंगवली होती. आणि तिचं हे हिरवा रंग देण्याचं काम सुरूच होतं.
मी प्रियाच्या बाजूला मांडी घालून बसलो. आणि माझ्या आवाजाला उसन्या प्रेमाची झालर लावत तिला म्हणालो, “अगं तुला आणखी खडू हवेत का? वेगवेगळ्या रंगात रंगव की, या मुलांचे कपडे, त्यांची खेळणी आणि पुस्तकं. बघ ना आजूबाजूला.. मुलांनी किती सुंदर रंगीबेरंगी कपडे घातले आहेत ना? का..य? हा घे रंगीत खडूंचा नवीन बॉक्स.”
माझ्या या चमकदार बोलण्याने आणि मी देत असलेल्या नवीन बॉक्सने ती भारावून जाईल असं मला वाटलं होतं. पण मी ज्या हातात बॉक्स धरला होता तो बाजूला सारत ती वज्रासनात बसल्यासारखी बसली.
तिने दोन हातात चित्रं घेऊन ते मला दाखवलं. एकदा त्या अपूर्ण चित्राकडे व एकदा माझ्याकडे पाहत ती हळूच हसली व म्हणाली,“काका, तुम्हांला या चित्रातली सावली दिसली नाही ना?”
मी मनापासून माझी हार कबूल करत मान डोलावली.
मला समजावत प्रिया म्हणाली,“काका, या मुलांच्या कपड्यावर, त्यांच्या खेळण्यांवर आणि सर्वांवरच या हिरव्या झाडाची सावली पडली आहे.. हिरवीगार सावली! पाहा नं नीट..?”
तिच्या नजरेतून त्या चित्राकडे पाहताना मी अवाक झालो.
‘मोठ्यांच्या विश्वात झाडांच्या सावल्या काळ्या पडतात, म्हणून मोठ्या माणसांना झाडाच्या सावलीत गेलं की थंडगार वाटतं. पण मुलांच्या विश्वात झाडांच्या सावल्या हिरव्या पडतात. त्यामुळे झाडाखाली गेल्यावर हिरवंगार तर वाटतंच पण त्यांचं अवघं विश्वही हिरवंगार होतं!!’
मुलांच्या अभिव्यक्तीकडे पाहण्याची एक नवी दृष्टीच मला प्रियाने दिली होती. “मुलांची अभिव्यक्ती ही आपल्याला समजेल अशीच असली पाहिजे असं नाही, तर ती आपण मुलांकडून समजून घेतली पाहिजे.”
“तुम्ही तुमचं मोठेपण आणि पूर्वग्रह बाजूला भिरकावून दिले आहेत, याची खात्री जेव्हा मुलांना पटते तेव्हाच ती तुमच्याशी दोस्ती करतात आणि त्यांच्या कृतीमागील कार्यकारणभाव तुम्हांला समजावा यासाठी त्यांच्या भावविश्वात तुम्हांला सामावून घेतात.”
मुलांसाठी लिहिताना आणि मुलांसोबत काम करताना ही गोष्ट मला सतत सावध करत असते.
बालसाहित्याबाबत भूतकाळाचा तपशीलवार आढावा न घेता वर्तमानात राहून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे.
बालसाहित्याचे किंवा साहित्याचे नेमके प्रयोजन काय? मुलांना शिकवणं, उपदेश करणं, तात्पर्य सांगणं, संस्कार करणं किंवा त्यांना घडवणं हे तर नव्हे आणि नव्हेच. बालसाहित्याचं प्रयोजन आहे, मुलांना दृष्टी देणं आणि मुलांना आनंद देत त्यांच्या विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणं. बालसाहित्य हे मुलांना शिकवत नाही, तर शिकण्याच्या अनेकानेक पद्धती, विविध पर्याय मुलांसमोर सहजी उलगडून ठेवतं आणि मुलाला त्याच्यातील सुप्त शक्ती व सर्जनशीलता यांची जाणीव करून देतं. कारण बालसाहित्याचा पाया हा ‘मुलांना गृहीत धरणे’ हा नसून ‘मुलांवरचा अपार विश्वास आणि मुलांवर निरपेक्ष प्रेम’ हा आहे.
मुलांना जसे वेगवेगळे साहित्य प्रकार वाचायला मिळायला हवेत तसंच वेगवेगळे प्रकार लिहायलाही मिळायला हवेत. शाळेत मुलांना खूपंच चाकोरीबद्ध लेखन करावं लागतं. ठरलेल्या पद्धतीनेच निबंध लिहिणे. विशिष्ट प्रकारेच कवितेचे रसग्रहण करणे किंवा टिपा लिहिणे. काही वेळा तो त्या सिस्टीमचा एक भागही असतो. पण सततची चाकोरी ही सर्जनशीलतेला मारक ठरते. मग कोवळ्या वयातच मुलांची सर्जनशीलता ठेचली जाते आणि त्यांचे शिस्तबद्ध सैनिकांत रूपांतर होते.
प्रत्येक शाळेत महिन्यातून किमान दोन तासिका जरी ‘मुलांच्या सर्जनशील उपक्रमांसाठी’ राखून ठेवल्या तरी खूप फरक पडू शकेल. या वेळी मुलांना पुस्तकाबाहेरचं शिकणं निर्भयपणे अनुभवता आलं पाहिजे. ‘निर्भयपणे’ म्हणजे या तासिकांच्या वेळी मुलांना ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्यही असावे. या दोन तासिकांच्यावेळी मुले त्यांना जे पाहिजे ते लिहितील, वाचतील, चित्र काढतील किंवा आपापसात गप्पाही मारतील. पण या तासिकांचा अभ्यसक्रम मात्र तयार करायचा नाही.
याबाबतीत आमच्या गंमतशाळेतला अनुभव अतिशय बोलका आहे. ‘पावसाळ्यातला पहिला दिवस’ हा निबंध आमच्या शाळेतली मुले लिहीत नाहीत. ‘पावसाळा’ आम्ही तीन भागात विभागला आहे. गावातला पावसाळा, शहरातला पावसाळा व झोपडपट्टीतला पावसाळा. पाऊस पडल्यावर या तीनही ठिकाणी ‘धरणीमाता काही हिरवा शालू पांघरून बसत नाही’ तर इथे वेगवगेळ्या आणि परस्परभिन्न घटना घडतात. वर्गातील मुलांचे तीन गट तयार करून मुलांनी त्या-त्या भागातील माहिती गोळा केली. काही मुलांनी मिळून लिहिलं तर काहींनी स्वतंत्रपणे.
वस्तीत राहणार्‍या एका मुलीने आपल्या निबंधात लिहिले,“आमच्या घराच्याच बाजूला गॅरेज आहे. पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर डिझेल पडलं की तिथे गोल इंद्रधनुष्य तयार होतं. मी काठीने ती एकमेकांना जोडते आणि इंद्रधनुष्यांची रंगीत माळ तयार करते.” इतका सुंदर विचार केवळ मुलंच मांडू शकतात. मुलांवरचं चाकोरीबद्ध लेखनाचं दडपण कमी केलं की मुलांमधील सुप्त सर्जनशीलता अशी उसळी घेते.
प्रत्येक वर्गाची भित्तिपत्रिका (वॉल पेपर) जरी सुरू केली तरी त्यावर मुलांना त्यांच्या आवडीचं त्यांच्या पद्धतीने लिहिता येईल. जेव्हा मुले लेखनाच्या वेगवेगळ्या प्रकारातून स्वत:ला व्यक्त करू लागतील किंवा आपल्या मनातील विचार आपल्याच भाषेत मांडण्यासाठी वेगळे प्रकार शोधू लगतील तेव्हा साहजिकच मुले साहित्यातील विविध प्रकार वाचण्यासाठी उद्युक्त होतील.
पण आज मुलं खरंच काही वाचतात? आणि जर मुले वाचत नसतील तर याला जबाबदार कोण? पण न वाचण्यासाठी सर्वस्वी मुलांनाच जबाबदार ठरवणं अन्याकारकच होईल. मुलांचं वाचन आणि त्याचे शिकण्याचे माध्यम यांचा जवळचा संबंध आहे. मातृभाषा आणि परिसरभाषा एकंच असेल आणि मुलाचे शिकण्याचे माध्यम ही तीच भाषा असेल तर त्या मुलांचे वाचन अधिक असते. घरात आणि समाजात तो ती भाषा सतत ऐकत असतो आणि चुकांची पर्वा न करता तो बोलतही असतो.. नवनवीन संकल्पना समजून घेत असताना त्याची शब्दसंख्या वाढत जाते. जसजशी शब्दसंख्या वाढते तसा त्याचा आत्मविश्वास दुणावतो. त्याची विचार करण्याची भाषा आणि त्याची अभिव्यक्तीची भाषा यांचा घट्ट समन्वय साधला जातो. यामुळेच त्याला जे म्हणायचं आहे ते तो त्याच्या भाषेत, त्याच्या शब्दात बिनचूकपणे मांडू लागतो. आणि नेमक्या याच क्षणी जर त्याच्या हाती पुस्तकं आली तर तो उत्तुंग भरारी घेतोच.
पण इथे ग्यानबाची मेख आहे त्या ‘जर’ आणि ‘तर’मधे.
इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतल्यावर ‘न वाचनाचा’ पहिला धोंडा पायावर पडण्याची शक्यता निर्माण होते. कारण इथे शाळेत फक्तं इंग्रजी ‘ऐकायचं’ आहे. त्या मानाने बोलणं कमीच. घराची आणि समाजाची भाषा वेगळी असल्याने या मुलांच्या इंग्रजीला म्हणजेच त्यांच्या शब्दसंख्येला, पर्यायाने नवीन संकल्पनांना,  पाठ्यपुस्तकांच्या मर्यादा येतात. आणि याक्षणी जर मुलाची विचार करण्याची भाषा व अभिव्यक्तीची भाषा यात समन्वय साधला गेला नाही, तर तो मुलगा इंग्रजी भाषेच्या जाळ्यात कायमचा गुरफटला जातो.
इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळातील वाचनालयात ‘न वाचनाचा’ धोंडा पायावर पडण्याची शक्यता असते. ‘मुलांनी जाणीवपूर्वक वाचावं’ यासाठी फारतर 5 टक्के शाळांतून प्रयत्न केले जातात, काही उपक्रम राबवले जातात. आत प्रश्न आहे तो 95 टक्के शाळांचा. या ठिकाणी ‘दात आहेत तर चणे नाहीत व चणे आहेत तर दात नाहीत’ अशी अवस्था आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांची मर्यादित शब्दसंख्या व पुस्तकातील परकी संस्कृती व त्यानुसार आलेले संदर्भ यामुळे पुस्तके असूनही ‘न वाचनाकडे’ कल जातो. मराठी माध्यमाच्या शाळेत ‘स्वतंत्र वाचनालय, नवीन पुस्तके, त्यासाठी वेगळा शिक्षक आणि मुलांसाठी वाचनाची तासिका नव्हे तर तास..’ ही चैनीची बाब झाली. अनेकानेक मराठी शाळांतील मुले कपाटातील पुस्तकांपर्यंत पोहोचूच शकत नाहीत हे मी स्वत: पाहिलं आहे. वाचनालयात पुस्तके आहेत, पण ती मुलांपर्यंत पोहचवण्याची सक्षम यंत्रणा शाळेकडे नाही. शाळा समाजात मिसळली नाही म्हणून समाजाला ती शाळा आपली वाटली नाही, त्यामुळे  ही अडचण निर्माण झाली. यातून मार्ग काढता येईल. शाळेच्या पालकांनी, आजूबाजूला राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांनी किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या नागरिकांनी शाळेच्या वाचनालयाची जवाबदारी घ्यावी.
‘न वाचनाचा’ तिसरा धोंडा लेखकांच्या आणि प्रकाशकांच्या हाती आहे. याबाबत तुम्हांला एक गोष्ट सांगितलीच पाहिजे.
दोन वर्षांपूर्वी एका बालकुमार दिवाळी अंकाचे संपादक म्हणाले,“आपण मोठ-मोठ्या लेखकांना मुलांसाठी लिहायला सांगू या आणि ते छापू या! काय?” हे ऐकून तर मला धडकीच भरली. मोठ-मोठे लेखक हे जणू काही कंत्राटी लेखक असल्याप्रमाणे त्यांच्याकडे बालसाहित्याची ‌ऑर्डर नोंदवायची आणि त्यांनी वेळेत ऑर्डरबरहुकूम माल पाठवून द्‍यायचा आणि मग संपादकांनी तो चांगल्या वेष्टनात गुंडाळून मुलांना द्यायचा. हे फारंच भयावह आहे. कारण यात जसं आपण लेखकाला गृहीत धरत आहोत तसंच मुलांनाही गृहीत धरत आहोत. हे सर्वार्थाने गैर आहे. मी भीत-भीत त्या संपादकांना म्हंटलं,“आधी आपण त्या मोठमोठ्या लेखकांना विचारू की ते मुलांसाठी लिहितील का? आणि काय लिहितील? त्यांचे लेखन आपण संपादित करणार आहोत हेही त्यांना सांगू.” हे ऐकल्यावर त्या संपादकांनी तोंड फिरवलं. त्या संपादकांना बालसाहित्य आणि मुलं यांच्याशी काही देणंघेणं नाही. अंक प्रचंड प्रमाणात संपवण्याएवढं बळ त्यांच्याकडे आहे आणि हाच त्यांचा सकस बालसाहित्याचा निकष आहे!
‘चांगलं लिहिलं तरी प्रकाशक मिळत नाही.’ ‘प्रकाशक मिळाला तरी व्यवहारात पारदर्शकता नाही.’ ‘आम्हांला चांगले लेखनंच मिळत नाही.’ ‘बालसाहित्याला तेवढी मागणी नाही.’ पुस्तकांच्या बाजारत डोकावल्यावर असं काही ऐकू येतं. पण आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ.
बालसाहित्य ही गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे हे लेखक, कवी, संपादक, चित्रकार आणि  प्रकाशक यांनीही समजून घेतलं पाहिजे. मुलांसाठी लिहिताना जसा त्यांच्या वयोगटाचा विचार करावा लागतो तसाच त्या वयोगटाला साजेशी भाषा, वाक्यरचना आणि त्यांचं भावविश्व यांचा विचार करावा लागतो. लेखनशैलीतील चित्रमयतासुद्धा जशी वयोगटानुसार बदलत जाते तशीच वयोगटानुसार मुलांसाठी विविध साहित्य प्रकारांची गरज निर्माण होते. हे वयोगट म्हणजे, शिशुगट, किशोरगट व कुमारगट. हे तीन गट म्हणजे मुलांच्या शारीर मानसिक वाढीचे वेगवेगळे टप्पे आहेत. या प्रत्येक टप्प्यावरील मुलांचं भावविश्व वेगळं आहे. यामुळेच मुलांसाठी लिहिणार्‍याला आपण कुठल्या वयोगटासाठी लिहीत आहोत याची जाण असणं गरजेचं आहे.
खरं म्हणजे बालसाहित्याला कुठलाच विषय वर्ज्य नाही. कुठलाही विषय समंजसपणे व कल्पकपणे कसा मांडायचा इथे लेखकाचे कसब आहे. पण वेगवेगळे साहित्यप्रकार मुलांसाठी समर्थपणे हाताळणारे लेखक आज दिसत नाहीत. मुलांना गूढकथा, विज्ञानकथा, विज्ञान कादंबर्‍या, प्रवासवर्णनं, प्राणिकथा, फॅंटसीकथा असे अनेक प्रकार वाचयला हवे आहेत. काही तरुण प्रकाशक असं वेगळं साहित्य मुलांसाठी प्रकाशित करायला उत्सुकही आहेत. मग लेखक का लिहीत नाहीत?
आज मुलांसाठी लिहिणारी माणसं शोधावी लागतात. बालसाहित्याला ग्लॅमर नाही किंवा त्यात पैसा नाही म्हणून कुणी लिहीत नाही हे कारण मला अतिशय तकलादू वाटतं. मला वाटतं, ‘मूल समजून घेण्याची त्यांना आंस नाही, कारण ती माणसं मुलांचं भावविश्व जाणून घेण्यासाठी ‘अपग्रेड’ झालीच नाहीत.’ ही सगळी मोठी माणसं नेहमीच चाळिशीच्या पुढच्यांचा विचार करत आली, त्यांच्यासाठीच लिहीत आली, त्यांच्यासाठीच लेखनाच्या आणि वाचनाच्या विविध योजना आणत गेली. थोडक्यात सांगायचं तर ही मोठी माणसं सतत कापणी करत गेली..पेरणीचा विचार न करता. ह्या मोठ्या माणसांनी जर आपल्या बालपणात डोकावून पाहिलं तर ती नक्कीच यू टर्न घेतील.
काही मोठ्या माणसंचं बालपण हे करपून गेलेलं असतं. त्यामुळे त्याच्यांत दडलेलं मूल हे एकतर चिरचिरं-किरकिरं तरी असतं किवा अपार नॉस्टॅलजिक. अशी माणसं मुलांसाठी नाही लिहू शकत.
किंबहुना कुठलाही मोठा माणूस तो ‘मोठा’ आहे म्हणून मुलांसाठी नाही लिहू शकत. समोरचं मूल गुणदोषासकट स्वीकारण्याची तयारी आणि मुलाला उपदेश न करता सर्व पूर्वग्रह बाजूला सारून मुलाकडून शिकण्याची आंतरिक इच्छा असेल, तरंच तो मोठा माणूस लहान मुलांत मूल होऊन मिसळू लागतो. जी माणसं मुलांत मिसळू शकतात, तीच माणसं मुलांसाठी लिहू शकतात. कारण त्यांच्यात लपलेलं मूल फक्त चौकसच नाही, तर खट्याळही असतं. थंड हेवच्या ठिकाणी जाऊन आणि बंद खोलीत बसून मुलांसाठी नाही लिहिता येत. मुलांसाठी चांगलं लिहू लागलं, तर पैसा आणि तथाकथित ग्लॅमर मागून येतंच. मुलांसाठी चांगलं लिहिणं कठीणंच आहे, पण अशक्य मात्र नाही.
यातून मार्ग काढण्यसाठी शाळाशाळांतून वाचकांसाठी व इतरत्र लेखकांसाठी पण ‘लेखन कौशल्य कार्यशाळा’ व ‘वाचन कौशल्य कार्यशाळा’ यांचे आयोजन करावे लागेल. विविध लेखकांनी हाताळलेले विविध साहित्यप्रकार, वेगवेगळ्या भाषांतील अनुवादित पुस्तकं मुलांसमोर मांडली गेली पाहिजेत. वाचलेल्या साहित्यातील आवडलेल्या व न आवडलेल्या गोष्टींबाबत मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. चित्रकारांनी सप्रयोग मुलांसमोर ‘चित्र आणि मजकूर’ यांतील नातेसंबंध उलगडून दाखवला पाहिजे. मुलांनी लेखकांशी ‘लेखन प्रक्रिया, विषयातील वैविध्य आणि शैली’ याबाबत गप्पा मारल्या पाहिजे. वेगवेगळे लेखनप्रकार मुलांनी हाताळून पाहिले पाहिजेत. या कार्यशाळांचं प्रयोजन इतकंच आहे की, मुलांना लेखनातल्या व पुस्तकातल्या गमती-जमती समजाव्यात. लेखन-वाचनाबाबत त्यांनी अधिक सजग व्हावं. त्यांनी समजून वाचावं आणि आनंदानं लिहावं, बस्स इतकंच.
लहानपणी वाचलेल्या पुस्तकांचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. याबाबतचा एक अनुभव तुम्हांला सांगतो. नगरला बालसाहित्य संमेलन होतं. तिथे मला इयत्ता आठवीतल्या अनुजा मुळेने विचारलं,“मी काय वाचू?” तिला मी तोत्तोचान हे पुस्तक दिलं आणि म्हणालो, मला वाचून कळव. एका आठवड्यातच तिचं मला सुंदर पत्र आलं. तिने लिहिलं होतं, ‘मला शिक्षिका व्हायचं आहे. मुलांनी मजेत शिकण्यासाठी मला मुलांसाठी वेगवेगळे प्रयोग तयार करायचे आहेत.’ मी तिला लिहिलं, ‘कोबायशींसारखी प्रयोगशील शाळा ग्रामीण भागात काढण्याची माझीपण इच्छा आहे. तू शिक्षिका होशील तेव्हा आमच्या शाळेत ये. आम्हांला चांगली शिक्षिका हवीच आहे.’
या माझ्या पत्राला तिने दिलेले उत्तर थक्क करणारे होते. अनुजाने लिहिलं होतं, ‘सर मी तुमच्या शाळेत येणार नाही. मी दुसरी शाळा सुरू करेन. यामुळे आपल्या मुलांना दोन चांगल्या शाळा मिळतील.’ काही कारणामुळे ती शिक्षिका होऊ शकली नाही आणि मीपण अजून तशी शाळा काढली नाही. कालांतराने मी मुलांसाठी रविवारची गंमतशाळा सुरू केली. आणि मला खात्री आहे अनुजा तिचं शिक्षिका होण्याचं स्वप्नं अजून विसरलेली नाही. संधी मिळताच मुलांसाठी मजेशीर उपक्रमांची ती आखणी करायला लागेल. तोत्तोचान हे खरंच एक जादुई पुस्तक आहे. मुलांनी आणि मुलांसाठी काम करणार्‍या सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच हवं. नॅशनल बुक ट्रस्टने ते प्रकाशित केलं आहे.
‘न वाचनाचा’ आणि एक धोंडा घरात पालकांनीच हातात घेतलेला असतो. इतर वेळी साधुसंतांच्या गोष्टी करत संस्कार उगाळणारे पालक दिवेलागण झाल्यावर टीव्हीवरच्या पांचट मालिका आवडीने पाहतात. नंतर ‘त्याच’ विषयांवर तन्मयतेने बोलतात. मग जेवताना ‘विनोदी’ समजला जाणारा अत्यंत हीन अभिरुची असणारा कार्यक्रम एकत्रितपणे पाहतात. आणि मग भरल्या पोटावरून हात फिरवत ते ‘नाच’ नावाच्या पॅकिंगमधे गुंडाळलेला बीभत्स रिॲलिटी शो चघळतात. तुम्हांला काय वाटतं, अशा वेळी त्या घरातली मुलं पुस्तकं वाचत असतात? असे आदर्श घरीच असल्यावर पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
‘वाचन संस्कृती’ रुजवण्यात शाळांप्रमाणेच पालकांचीपण महत्त्वाची भूमिका आहे. अगदी लहानपणापासून मुलांना पुस्तकांच्या दुकानात घेऊन जाणं, त्यांना पुस्तकं हाताळायला देणं, मुलांसोबत पुस्तकं वाचणं, मुलांना पुस्तकनिवडीचं स्वातंत्र्य देणं आणि आपण वाचलेल्या आणि वाचत असलेल्या पुस्तकाविषयी मुलांशी आवर्जून बोलणं करावं लागतं. यातूनंच मुले पुस्तकांकडे वळण्याची शक्यता असते.
आपण आपल्या वाचनाविषयी मुलांशी मोकळेपणाने बोलू लागलो, त्यांची मते ऐकून घेऊ लागलो की मुले वाचनाविषयी सजग होतानाच आस्वादकही होत असतात. पण त्याच वेळी मुलांच्या भावविश्वातल्या, त्यांच्या अंतरंगातल्या अनेक खुब्या आपल्याला उमगत जातात. विंदांच्या बालकविता वाचताना तर मी अनेक वेळा हा थरार अनुभवला आहे. त्यांची ‘सर्कसवाला’ ही दीर्घकविता तर मास्टरपीस आहे. या कवितेची शैली इतकी चित्रमय आहे की वाचता वाचता आपल्या डोळ्यासमोरून एक चित्रपटच सरकू लागतो. या कवितेतून विंदांनी मुलांचं भावविश्व अलवारपणे उलगडलं आहे. दोस्ती, प्रेम, असूया, जिव्हाळा आणि असहायता या भावभावनांचा गोफ या कवितेत असा घट्ट विणला आहे की कवितेचा शेवट जसजसा जवळ येऊ लागतो, तसतशी व्याकूळ होणारी मुले मी पाहिली आहेत.
विंदांच्या बालकविता भन्नाटच आहेत. कारण त्या दोन पातळ्यांवर आहेत. जेव्हा त्या कविता मुलं वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्याच वाटतात. आणि जेव्हा मोठी माणसं त्या बालकविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा, मूल समजून घेण्याच नवीन दृष्टीकोन देतात. या बालकविता मोठ्या माणसांना अधिक प्रगल्भ करतात.
‘अजबखाना’ या कवितासंग्रहातील एका अगदी लहान कवितेमधली महान गंमत मी आज तुम्हांला सांगणारंच आहे. ही कविता आहेत फक्त 19 शब्दांची. पण या कवितेमधला अर्थ जेव्हा मला उलगडला तेव्हा मी पार बदलून गेलो. या एका बालकवितेसाठी मी विंदांचा आजन्म ऋणी आहे.
या इटुकल्या कवितेचं नाव आहे, ‘मावशी.’ जेव्हा प्रथम मी ही कविता वाचली तेव्हा या कवितेत काही खास आहे असं जाणवलंच नाही. या कवितेतला नाद आणि नातेवाईक आवडत असावेत मुलांना, असंच वाटायचं मला. मुले या कवितेला भरभरून दाद द्यायची. या कवितेत काकू आहे, आत्या आहे व मावशी आहे. कविता वाचल्यानंतर सहज एकदा मुलांना विचारलं, “या कवितेतली काकू तुम्हांला आवडते, आत्या आवडते की मावशी आवडते?” मी हा प्रश्न विचारला तेव्हा समोर किमान हजार मुलं दाटीवाटीने बसलेली होती. प्रश्न ऐकताच सगळी मुले एका सुरात ओरडली, “मावशी..मावशी आवडली आम्हांला.”
ही 19 शब्दांची कविता मी पुन्हा पुन्हा वाचली. मुलांसोबत अनुभवली आणि एका क्षणी मला ते कोडं सुटलं. आपण आजपर्यंत काय चूक करत होतो, हे स्वच्छपणे समजलं. आणि आता या क्षणापासून आपण काय करायला पाहिजे ते लख्खपणे उलगडलं. ही कविता मला सदैव धीर देते. मला धाकात ठेवते. मूल समजून घेण्याची माझी प्रेरणा सतत तीव्र करत राहते.
मावशी
सोलापूरहून
येते काकू;
माझ्यासठी
आणते चाकू.
कोल्हापूरहून
येते आते;
माझ्यासाठी
आणते पत्ते.
राजापूरहून
मावशी येते;
माझा एक
पापा घेते!
या कवितेतली काकू मुलासाठी चाकू आणते. या कवितेतली आते मुलासाठी पत्ते आणते. पण या कवितेतली मावशी मुलासाठी काहीच आणत नाही. तरीही सगळ्या मुलांना ही मावशीच आवडते! कारण, मोठ्या माणसांना असं वाटतं की आपण मुलांना काहीतरी दिलं तर आपण मुलांना आवडू. मुलांना खाऊ दिला, खेळणी दिली किंवा महाग वस्तू दिल्या तर आपण त्यांना नक्कीच आवडू. पण नाही!
काकू चाकू आणते. आते पत्ते आणते. पण या दोघी जणी मुलाशी बोलत नाहीत. त्याला जवळ घेत नाहीत. मुलाचा आत्मसन्मान जपत नाहीत.
मावशी काही आणत नाही, तर ती मुलाकडून घेते. मुलाचा मायेने, प्रेमाने पापा घेते. त्याला जवळ घेते. मावशी तिचं प्रेम तिच्या कृतीतून तिच्या स्पर्शातून व्यक्त करते. मुलाचा आत्मसन्मान उंचावते. मुले काही केवळ महागड्या वस्तूंची किंवा खाऊची भुकेलेली नसतात. ‘आपणाला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून किंमत असावी’ इतकीच माफक अपेक्षा मुलांची असते.
आपण मुलांना ‘देणारे’ नव्हे तर मुलांकडून ‘घेणारे’ व्हायला पाहिजे तरच आपण मुलांचे होऊ, असं मला ही कविता सांगत असते. ओळखीच्या किंवा अनोळखी मुलांना भेटल्यावर आपली कृती ही प्रेममयच असली पाहिजे, आपण मन आधिकाधिक मोठं करून समोरच्या मुलाला समजून घेतलं पाहिजे, असं हे विंदांचे 19 शब्द मला सतत बजावत असतात.
मी लहानपणी ज्या नीतिकथा, बोधकथा वाचल्या त्या सर्व गोष्टींच्याखाली ठळक टाइपात त्या-त्या गोष्टीचे तात्पर्य छापलेले असायचे. आणि (छळवादी) मोठी माणसे “गोष्ट वाचली का?’’ असं प्रेमाने न विचारता, “काय समजलं गोष्ट वाचून? किंवा अं.. तात्पर्य काय गोष्टीचं?” असं त्रासिक आवाजात विचारत. कालांतराने ‘ती मोठी माणसं’ बालसाहित्य लिहू लागली आणि ‘तसलेच प्रकाशक’ ते छापू लागले. आज तशीच पुस्तकं मुलांच्या हातात पाहताना वाईट वाटतं. गोष्टीखालचे तात्पर्य हे गोष्टीतला आनंद नासवून टाकते हे त्या मोठ्यांना कधी कळेल, असं वाटतं. खरं म्हणजे कुठल्याच गोष्टीला केवळ एकंच तात्पर्य नसतं, इतकी साधी गोष्ट का त्यांच्या लक्षात येत नाही? याचं एक कारण असं असू शकेल,  की ‘अनेक मोठ्या माणसांना वाटतं की आता ते मोठे झाले असल्याने त्यांना आता संस्काराची गरज नाही. त्यांची संस्काराची बॅटरी फुल्ल झाली आहे. मुलांचे वय हे संस्कारक्षम असल्याने त्यांची संस्काराची बॅटरी सारखी चार्जिंगला लावली पाहीजे. येता-जाता, उठता-बसता सतत संस्काराची फवारणी करायला पाहिजे.’ ‘बालसंस्कार कथा, संस्कार सीडीज् आणि संस्कारवर्ग असल्या मुलांना पकवणार्‍या खुळचट कल्पना ‘तात्पर्य’छाप माणसांच्या डोक्यातूनच निपजल्या आहेत. संस्कार हे करता येत नाहीत किंवा संस्काराची कुठलीही रेसिपी नाही; तर संस्कार हे होत असतात आणि ते फक्त मुलांवरच नाही तर जख्ख म्हातार्‍या माणसांवरसुद्धा होत असतात, अगदी दगडावरसुद्धा होत असतात हे सत्य जर मोठ्या माणसांनी जाणून घेतलं तर मुले अधिक आनंदी होतील.
सध्या अनेक वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवणीतून मुलांचे पान गायब होत आहे. आणि ज्या पुरवणीत मुलांचे पान आहे तिथे दर्जेदार बालसाहित्य अभावानेच आढळत आहे. काही पुरवण्यांतून तर ‘संकलित साहित्य’ हे बालसाहित्य म्हणून खपवलं जात आहे. आणि ‘बालसाहित्याची समीक्षा’ ही तर फार लांबची गोष्ट झाली.
अत्रेंनी स्वतः पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून, संपादन करून आणि त्यात लिहूनही आजच्या बालसाहित्यिकांपुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. सई परांजपे यांच्या एकांकिका आणि त्यांचं ‘हरवलेल्या खेळण्यांच्या राज्यात’ अजूनही तितकंच ताजं आहे. तेंडुलकरांच्या नाटिका आजच्या मुलांना आपल्याच वाटतात. इंदिरा संत, शांताबाई, मंगळवेढेकर, आणि वसंत बापट यांच्या काही बालकविता व जीएंची ‘बखर बिम्मची’ कालातीत आहेत. विंदांच्या सर्वच बालकविता इतक्या अफलातून आहेत, की पुढील पन्नास वर्ष त्या अढळस्थानी आहेत. मला इथे एक कल्पना सुचवावीशी वाटते. ‘मराठीतले, भारतातल्या इतर भाषांतले व जगातले सर्वश्रेष्ठ बालसाहित्य त्या-त्या वयोगटाचा विचार करून एकत्रिपणे प्रकाशित करायला हवं.’  माझ्याप्रमाणेच इतर भाषांत व वेगवेगळ्या देशांत काय-काय मजा आहे, हे मुलांना समजायलाच हवं. निवडक बालसाहित्याचा 100 पुस्तकांचा एक संच करायला हवा. किंबहुना जागतिक बालसाहित्याची एक वेबसाईट तयार व्हायला हवी.
“मी का लिहितो? आणि मी मुलांसाठीच का लिहितो?” या दोन प्रश्नांचा हजार वेळा विचार केला तरी मला एकच उत्तर सुचतं. मी का लिहितो याचं उत्तर तर सोपं आहे, मला आवडतं म्हूणून, मला लिहिताना आनंद होतो म्हणून, किंवा लिहिल्याशिवाय मी राहूच शकत नाही, म्हणून मी लिहितो. दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर तर एकदमच सोपं आहे – मी सतत मुलांचाच विचार करत असतो, मुलांमधे असतो त्यामुळे मी मुलांसाठीच लिहितो.
पहिल्या प्रश्नाला आता एक उपप्रश्न जोडू या, ‘मी मुलांसाठी वेगवेगळे फॉर्मस् का लिहितो? म्हणजे मी मुलांसाठी विज्ञानप्रयोग कथा, भय कथा, संवाद कथा, प्रेमळ भुताच्या गोष्टी, गंमत कथा, फॅंटसी कथा, प्राणिकथा, रूपक कथा, गणित कथा, साहस कथा, पोस्ट कार्ड कथा, बोलक्या गोष्टी, कविता,  विविध संकल्पनांवर आधारित (ससोबा-हसोबा, बब्बड, बंटू, आई आणि बाळ, गंमत गॅंग) कथामालिका, प्रवासवर्णन, पत्रं, कादंबरी, शून्य खर्चाचे विज्ञानाचे सोपे प्रयोग, शून्य खर्चाचे खेळ, एकपात्रिका, द्विपात्रिका, एकांकिका, नाटक असं खूप काही का लिहितो? या प्रश्नासाठी एक मुख्य उत्तर व काही उप-उत्तरे सुचतात. मुलांना विविध फॉर्मस् वाचायला मिळाले पाहिजेत, वेगवेगळ्या संकल्पनांशी त्यांना खेळायला मिळालं पाहिजे हे निश्चित. आता असं दुसरं कुणी लिहीत नसेल तर तक्रार करत बसण्यापेक्षा आपण लिहायला सुरुवात करावी. मुलांना आवडलं तर आपलं लेखन टिकेल, नाहीतर जाईल डब्यात!
काही वेळा मुलांच्या आग्रहाखातर पण लिहावं लागतं. एकपात्री स्पर्धा असते तेव्हा मुले नवीन लिहून द्या म्हणून हट्ट करतात. अशा वेळी त्यांचे लाड करावे लागतात. काही मुलांना स्टेजवर जायचं तर असतं, पण एकट्याने स्टेजवर जायला भीती वाटते, अशा मुलांसाठी द्विपात्रिका, त्रिपात्रिका लिहिल्या. पाच-पाच शब्दांची वाक्यं आणि छोटे-छोटे संवाद. मुले बिनधास्त स्टेजवर जाऊ लागली.
मी पूर्वी ‘युनिसेफ’मधे असताना मला शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी फिरावं लागे. तेव्हा माझा पहिलीतला मित्र म्हणाल, “माझ्यासाठी रोज एक गोष्ट लिहा ना!” त्याला नाही कसं म्हणणार? मी त्याला रोज एक गोष्ट पोस्ट कार्डवर लिहून पाठवत असे.
माझा मित्र चित्रकार गिरीश सहस्रबुध्दे याला मी एकदा विचारलं,“चित्रकाराला काढण्यासाठी कठीण चित्र कोणतं?” क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “आई आणि बाळ.” याच संकल्पनेवर गोष्टी लिहायचं मी ठरवलं. ‘डुकरीण आणि डुकरू, नागीण आणि नागू, पाल आणि पालू, गाढवीण आणि गाढवू’ आपापसांत काय बोलत असतील, त्यांच्या भावविश्वात काय गमती-जमती होत असतील आणि माणसांविषयी ते काय विचार करत असतील? अशा अनेक गोष्टी लिहिल्या. मजा आली.
मी शाळेत असताना माझे चार प्रमुख जबरी शत्रू होते. ते मला रोज छळायचे, अतोनात त्रास द्यायचे. ते म्हणजे माझे शिक्षक, गणित, विज्ञान व इंग्रजी. (इंग्रजीमधे पाठ्यपुस्तकातील अहमद, गोपाल, सीता व यास्मीन यांनीपण मला दरवर्षी नेमाने पीडलं आहे.)  मी शाळेत विज्ञानाचा एकही प्रयोग केला नाही. प्रयोगाच्या वहीत नेहमी खोटंच लिहिलं. “ मी एक मेणबत्ती घेतली. ती पेटवली. वगैरे.” पण खरंतर हे सगळं शिक्षकांनीच केलेलं असायचं. स्वत: प्रयोग न करताच शिक्षकांनी केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष, शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे स्वत:चेच म्हणून लिहिले. गणितं वाचताना तर मला फार त्रास व्हायचा. मला खूप प्रश्न पडायचे, पण ते कुणाला विचारताही यायचे नाहीत. गणितातली मोठी माणसं कर्ज काढतात, बुडवतात. मग अशा लबाड माणसांच्या व्याजाचा हिशोब मुलांनी का करायचा? कर्ज काढून व्यवस्थित व्याज भरणारी मोठी माणसं जगात नाहीतंच की काय?  मुलांना कुणी कर्ज देत नाही, तर मग त्यांनी मदक भागीले 100 असं का करायचं? मोठी माणसं शेत घेणार आणि त्याला कुंपण घालण्यसाठी किती तार लागेल याचा हिशोब मुलांनी का करायचा? तसंच भाषेच्या तासांना आमच्या भावविश्वाशी काडीचाही संबंध नसणार्‍या विषयांवर आम्ही का बरं निबंध लिहायचे? याविषयी काही प्रश्न मोठ्या माणसांना विचारण्याची हिंमत आम्हां मुलांत नव्हती. ‘मोठी माणसे सशक्त असतात व लहान मुले अशक्त असतात’ हे सत्य रोजच आमच्या हातावर, गालावर किंवा पाठीवर उमटत असे. थोडक्यात सांगायचं तर, मी कधीच आनंदाने शाळेत गेल्याचं व सुखासमाधानाने शाळेतून घरी परत आल्याचं मला आठवतच नाही.
मला वाटलं आपल्या नशिबी जे आलं ते किमान आपल्या मुलांच्या नशिबी नको. म्हणून मग मी माझ्या मुली लहान असताना गंमतशाळा सुरू केली. शनिवार-रविवारची गंमतशाळा. माझ्या मुलींसोबत तोत्तोचान आणि दिवस्वप्न ही पुस्तकं वाचत असताना “आपणपण गंमतशाळा सुरू करू या” अशी मुलींनी भुणभुण सुरूच केली होती. पण गांधीच्या ‘त्या’ (पुढे दिलेल्या) गोष्टीनंतर घरातूनच गंमतशाळेला मुलींनी सुरुवात केली. आधी घराची प्रयोगशाळा झाली आणि मग त्यातून गंमतशाळा.
एकदा गांधीजींना भेटायला काही मुले गेली. गांधींनी मुलांना विचारले, “तुमचे शिकण्याचे माध्यम काय?” काही मुले म्हणाली, “इंग्रजी,” तर काही म्हणाली,“हिंदी.”
गांधी म्हणाले, “कमाल आहे. मी तुम्हांला शिकण्याच्या माध्यमाविषयी विचारत आहे आणि तुम्ही तर मला भाषेविषयी सांगत आहात.” मुले गोंधळली. तेव्हा मुलांना जवळ घेत गांधी म्हणाले, “अरे गणित, भाषा, विज्ञान असे कुठलेही विषय शिकण्यासाठी तुम्ही तुमचे हात वापरता का? प्रत्यक्ष अनुभव घेता का? ही शिकण्याची प्रभावी माध्यमं आहेत.” आता मुलांना कळलं, की इतके दिवस आपण भाषेलाच माध्यम समजत होतो. जे काही शिकायचं ते हाताने. प्रत्यक्ष अनुभव घेऊन. केवळ पाठांतर नव्हे, तर स्वत:हून समजून घेऊन. गंमतशाळेचं हेच गाभातत्त्व आहे.
गंमतशाळेत मुलांना चुका करण्याचं जसं स्वांतंत्र्य आहे तसं चुकांतून शिकण्याची संधी ही आहे. मुले त्यांच्या मनातला कुठलाही प्रश्न विचारू शकतात, असं निर्भय वातावरणही आहे. इथे आम्ही मुलांना शिकवत नाही, तर शिकण्यासाठी उत्सुक करतो. यासाठी मुलांनी प्रयोग करून पाहणं, निरीक्षणं करणं, अनुभव घेणं व स्वत:हून शिकणं यांवर अधिक भर आहे. गंमतशाळेतील मुलांसाठी भाषा, गणित, विज्ञान, सामान्यज्ञान, भूगोल या विषयांचे सुमारे 100 खेळ व विविध उपक्रम तयार केले.  मजेत निबंध लिहिण्याच्या वेगवेगळ्या 10 पद्धती विकसित केल्या. आकलनावर आधारित मजेशीर आणि बहुआयामी स्वाध्याय तयार केले. गंमतशाळेत तिसर्‍या रविवारी समाजातील निरनिराळ्या स्तरातील व्यक्ती मुलांशी गप्पा मारायला येऊ लागल्या. गावातले भाजीवाले, डॉक्टर, पोलीस, कचरा वेचणार्‍या महिला, तृतीयपंथी, नगरसेविका असे खूप जण मुलांशी गप्पा मारून गेले. समाजासोबत संवाद साधत त्यातून शिकण्याची पद्धत गंमतशाळेने विकसित केली. डॉक्टरांसोबत गप्पा मारताना मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, पपई आणि दुधी भोपळ्याला इंजेक्शनस् दिली. खेळता-खेळता मुले नकळत शिकू लागली. यामुळे मुले आनंदाने शाळेत येऊ लागली आणि वेळ संपला तरी शाळेत रेंगाळू लागली. ही आमची गंमतशाळा 8 वर्षं चालली. मी अध्यापनशास्त्राचे औपचारिक शिक्षण न घेतल्याचा मला फायदा झालाच, पण गंमतशाळेत मुलांसोबत शिकण्याचा मला अधिक फायदा झाला. ‘मुलांच्या आनंददायी शिक्षणाचा ध्यास मनात रुजला आणि बालकेंद्री विचारांचा मार्ग स्वच्छं दिसू लागला.’ गरीबातल्या गरीब मुलाला मस्त मजेत शिकता यावं यासाठी शून्य खर्चाचे शैक्षणिक खेळ तयार केले, ते गावातल्या व शहरांतल्या अनेक शाळांतून वापरले, त्यात आवश्यक बदल केले आणि मग ते लिहिले.
विज्ञानाचे शून्य खर्चाचे 89 प्रयोग तयार करून ‘युनिसेफ’च्या मदतीने ग्रामीण भागातील शाळाशाळांतून ‘शून्य खर्चाच्या प्रयोगशाळा’ सुरू केल्या. दर सोमवारी शाळेतल्या सर्व मुलांनी जादू करायची, असं सुरू झाल्यावर शाळेतील मुलांची गळती कमी झाली. मुले स्वत:हून प्रयोग करत एकमेकांच्या मदतीने शिकू लागली. मग हे सारे प्रयोग गोष्टीरूपात लिहिले. गोष्ट वाचता-वाचताच प्रयोग उलगडत जातो आणि प्रयोगामागचं विज्ञान अलगद उमजत जातं. वाचायच्या आणि करायच्या गोष्टी म्हणजे या विज्ञानप्रयोगकथा. याचप्रकारे इतिहास म्हणजे ‘देशाची गोष्ट’ आणि भूगोल म्हणजे ‘पृथ्वीची गोष्ट’ अशी पुस्तकं लिहिली, तर मुलांच्या आनंदात भर पडेल. आता कुणालातरी हे काम करावंच लागणार आहे.
विज्ञानाची एक अनामिक भीती आपल्या समाजात आहे. पालकांना वाटतं, शिक्षकांनी मुलांना विज्ञान शिकवावं. शिक्षकांना वाटतं, पाठ्‍यपुस्तकात विज्ञान आहेच की, आणखी आपण काय शिकवायचं? खरा घोळ इथेच आहे. विज्ञान नावाची अशी काही खास गोष्ट नाही, की जी फक्त पाठ्‍यपुस्तकात आहे. विज्ञान तर आपल्या सभोवती आहे. दैनंदिन जीवन आणि विज्ञान यांचा सहसंबंध जोडून दाखवणे हे खरे काम आहे.
आमच्य गंमतशाळेतील एक उदाहरण पाहू.
इयत्ता तिसरीच्या विज्ञानाच्या पुस्तकात ज्ञानेंद्रियांची ओळख आहे. त्यात नाकाने वास समजतो व हाताला स्पर्श समजतो असे एक ‘बालभारतीय’ वाक्य आहे. त्याखाली स्मरणशक्तीवर आधारित रटाळ स्वाध्याय आहे.
यासाठी एका प्रयोगाचं आयोजन केलं. एक सुती रुमाल आणला व त्याचे तीन सारखे तुकडे केले. मग मेणबत्ती पेटवली. एक तुकडा हातात घेऊन मुलांना विचारलं, “हा तुकडा जळायला किती वेळ लागेल?” मुलांनी काहीही उत्तरे दिली. ‘एक तास’, ‘अर्धा तास’, ‘दहा मिनिटं’ वगैरे. प्रत्येकाने आपापले अनुमान वहीत लिहून ठेवले. आत्तापर्यंत कापड जाळण्याची मुलांना मुभा नसल्याने, कापड जळण्यासठी किती वेळ लागेल हे मुलांनी सांगणे अपेक्षितच नव्हते.
तो तुकडा अकरा सेकंदात जळला. मग आम्ही सर्वांनी जळलेल्या कापडाचा वास घेतला. दुसरा तुकडा पाण्यात भिजवला व पिळला. ‘आता हा तुकडा जळायला किती वेळ लागेल?’ या प्रश्नाला सगळ्या मुलांनी सेकंदात उत्तरे दिली. हा तुकडा जळण्यासाठी वीस सेकंद लागले. या तुकड्याचा वास पहिल्यापेक्षा वेगळा होता.
तिसरा तुकडा तेलात भिजवून मग मेणबत्तीवर धरला. हा तुकडा जळायला बत्तीस सेकंदं लागली. कारण आधी तेल जळते, मग कापड. हा वासही वेगळाच होता. मग मुलांनी अशा पदार्थांची यादी केली; जे सुके, ओले व तेलात भिजून जळले असता वेगवेगळा वास येतो. त्यानंतर अशा पदार्थांची यादी केली, जे पदार्थ एकच, पण वेगवेगळ्या स्टेजेसवर त्याचे वेगवेगळे वास येतात. उदा. उतू जाणारं दूध, लागलेलं दूध आणि आटणारं दूध इ. आणि मग डोळे बंद करून ओळखता येणारे वास. तिसरीतल्या मुलांनी सुमारे 182 वासांची यादी तयार केली.
नाकाने आपल्याला फक्त वास समजत नाही, तर त्या वासामुळे आपल्याला खूप माहिती समजते आणि तीच खरी महत्त्वाची असते. अशी विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी वास हे केवळ एक माध्यम आहे आणि त्यासाठी नाक हे एक साधन आहे. पण त्या वासामागे दडलेली माहिती शोधणं हे आपलं खरं साध्य आहे. हे सर्जन शिक्षणामध्येही किती उपयुक्त आहे, पण शिक्षण स्वतःच याबाबतीत गोंधळलेलं आहे. शिक्षणात असा मूलभूत विचार केलाच जात नाही. मुलांनी स्वत:हून काही शोधायचं नाही, तर पाठ्यपुस्तकातील स्मरणशक्तीवर आधारित रटाळ स्वाध्याय सोडवणं व चाकोरीबद्ध लिहिणं म्हणजे शिक्षण असं झालं आहे. या शिक्षणात मुलांना जे वाटतं ते त्यांच्या भाषेत आणि त्यांना हव्या त्या माध्यमातून मांडण्याचं स्वातंत्र्य तर नाहीच, पण त्यांच्या जिज्ञासेचा, शोधकवृत्तीचा, आकलनशक्तीचा, सर्जनशीलतेचा कसही लागत नाही. या सगळ्याचं मुलांच्या संपूर्ण जीवनाशीच नातं असतं, पण हे पालकांना कुणी सांगतच नाही. आता ‘घोका आणि ओका’ ही अत्याचारी पद्धत बाद करून, ‘शोधा, समजून घ्या आणि सांगा’ ही स्वतःहून शोधण्यास प्रेरित करणारी, समोरच्या गोष्टीतला आशय समजून घेण्यास उत्सुक करणारी आणि सर्जनशीलतेला मुक्त वाव देणारी शिक्षणपद्धती आणायला हवी. मुलांसाठी किमान गावागावांतून, वस्तीपातळीवर गंमतशाळा सुरू करण्याचं स्वप्न मी यासाठीच पाहतो आहे.
आता ‘इ-बुक’ सुरू झालं आहे. आत्ता तरी किमान 4 टक्के मुलांना इ-बुक वापरता येईल. छपाइचा खर्च नसल्याने पुस्तकाची किंमतही कमी आहे. सध्यातरी अनेक प्रकाशक आपल्या छापील पुस्तकांचेच इ-बुकमध्ये रूपांतर करत आहेत. म्हणजेच हातातल्या पडद्यावर दिसणार्‍या मजकुराला ते इ-बुक म्हणत आहेत. प्राथमिक अवस्थेत हे समजून घेता येईल, पण पुढच्या 5 वर्षांत तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होईल आणि उपकरणे स्वस्त होतील. पुढील 5 वर्षांचा वेध घेत आत्तापासूनच लेखक व प्रकाशकांना त्यांच्या कार्यशैलीत बदल करावे लागतील. हे बदल दोन पातळ्यांवर असतील, आशय (कंटेण्ट) आणि सादरीकरण (प्रेझेंटेशन). पुढील 5 वर्षांत पुस्तकाची व्याख्याही बदलणार आहे. रूढ अर्थाने वाचण्याची व पाने उलटण्याची पुस्तके असतीलच, पण आता ‘इंटरॲक्टिव्ह टच-स्क्रीन पुस्तके’ येऊ लागली आहेत. त्यानंतर ‘सेल्फ मॉनिटरींग व्हर्चुअल इंटरॲक्टिव्ह पुस्तके’ येत आहेत. आणि या पुस्तकांची पुढची पिढी म्हणजे ‘कस्टमाईज्ड इंटरॲक्टिव्ह एक्सटेंडेड शेअरिंग बुक्स’ असणार आहे. वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणार्‍या अफाट शक्यता समजून घेऊन सादरीकरणाच्या पद्धतीत तर आमूलाग्र बदल करावा लागणारच आहे, पण आशयाची मांडणी ही नवीन तंत्रज्ञानाची कास धरूनच करावी लागणार आहे. अगदी थोड्याच वर्षांत लेखनाच्या साधनात झालेला बदलसुद्धा 4G आहे. फाऊंटन पेन, बॉल पॉईंट पेन, जेल पेन आणि आता की-बोर्ड. एक हाताने लिहिणारे आता दोन हातांनी लिहू लागले आहेत. वाचनाचे साधनही बदलण्यस सुरुवात झाली आहे. सध्या जरी आपण 2G मधे असलो तरी 3G ची चाहूल लागण्याआधीच जरी 4G अवतरले तरी आश्चर्य वाटायला नको. 4Gमधे ‘पुस्तक वाचन’ ही संकल्पनाच बदलणार आहे. 3D चित्रातून 4G आशय उलगडत जाणार आहे आणि यात अफाट शक्यता अनुस्यूत आहेत. त्यातील काही शक्यता अशा आहेत.. मुलाचा आवाज ओळखून पडद्यावरील चित्रे मुलांशी संवाद साधणार आहेत, मुलांच्या स्पर्शाने ती मुलांशी खेळणार आहेत आणि खेळता खेळता तो मुलगा त्या चित्रांशी म्हणजेच त्याला हव्याअसणार्‍या व्यक्तिरेखांशी एकरूप होणार आहे, त्या चित्रात तोच असणार आहे.. हे आहे कस्टमाईज्ड एक्सटेंडेड शेअरिंग. इथून नवीन गोष्ट सुरू होणार आहे ‘त्या मुलाच्या’ ओळखीच्या माणसांसोबत ‘त्यांच्याच’ भावविश्वात घडणारी, खरीखुरी ‘त्याची’ गोष्ट. यानंतर तो मुलगा जे संवाद लिहील (म्हणजे टाइप करेल), त्यास प्रतिसाद देत गोष्टीतील व्यक्तिरेखा वागू लागतील. गोष्ट पुढे सरकू लागेल. काही वेळा पात्रांच्या आंतरक्रियांचा मागोवा घेत संवाद / घटना लिहाव्या लागतील. यानंतर सुरू होईल कस्टमाईज्ड प्रिडिक्शन शेअरिंग. यामधे मुलगा लिहू लागला की पुढे काय घडू शकेल याचा अंदाज घेऊन पडद्यावर किमान 4 घटनांचे पर्याय चित्ररूपात समोर येतील. पुढील 55 सेकंदात जर मुलाने निर्णय घेऊन एखादी घटना निवडली नाही किंवा त्या सर्व घटना नाकारून वेगळी घटना मांडली नाही, तर संगणकाने निवडलेल्या पर्यायाचा स्वीकार करून पुढे जावे लागेल. लिहिणं आणि त्याचं मूल्यांकन हे अटळच आहे, विकसित होत आहेत त्यांची साधनं आणि त्यांचे विलक्षण पर्याय. ‘चाइल्ड फ्रेंडली कस्टमाईज्ड इंटरॲक्टिव्ह व्हिडिओ’ ही तर केवळ वर्षभरातच मुलांच्या हाताशी लागणारी गोष्ट आहे.
संगणकाच्या भाषेत सांगायचं तर आपण मोठी माणसं ‘विंडोज 95’ मधे आहोत तर मुले ‘विंडोज 13’ मधे आहेत. बदलायचं आपल्याला आहे. म्हणजे अपग्रेड आपण व्हायचं आहे, मुलांनी नव्हे. 4G तंत्रज्ञान समजून घेण्यास लेखक, पालक किंवा प्रकाशक म्हणून आपण तयार असू, तरच आपल्याला मुलांच्या विश्वात प्रवेश आहे. अन्यथा “आमच्या काळात असं नव्हतं.. तेव्हा किती बरं होतं..” असली भुक्कड रेकॉर्ड (खरंतर सीडी) वाजवत आजन्म ‘विंडोज 95’च्या कोशात गुरफटून राहावं लागेल.
“मी सतत कसा काय लिहू शकतो?” असा एक उपप्रश्न मीच मला विचारतो, तेव्हा त्याचे अनेक पैलू दिसू लागतात. मी मुलांसठी खूप काही करत असतो. उदा. वेगवेगळ्या विषयांवर किंवा संकल्पनांवर आधारित मुलांच्या कार्यशाळा घेतो. वेगवेगळ्या शाळांत जाऊन मुलांसोबत भाषेचे, गणिताचे खेळ खेळतो किंवा मुलांसोबत विज्ञानाचे धमाल प्रयोग करतो. मोठ्या मुलांशी ‘माझी फजिती आणि त्यातून शिकणं’ याबाबत मस्त गप्पा मारतो. बालवाडी शिक्षिकांच्या किंवा प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या ‘अध्यापन कौशल्य कार्यशाळा’ घेतो. पालकांसाठी विविध कार्यक्रम करतो. पण हे सर्व करण्यासाठी मला अनेकांची मदत लागते व अनेक जणांशी जुळवून घेताना सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबूनही राहावे लागते. पण लिहिण्यासाठी..? लिहिण्यासाठी माझा मी स्वतंत्र असतो. मी कुणावरंच अवलंबून नसतो. म्हणूनच मी अधिकाधिक वेळ लेखनासाठी देतो.
मी मुलांसाठी लिहीत असताना माझे आदर्श कोण आहेत? मला रवींद्रनाथ टागोर, गिजुभाई बधेका, ‘तोत्तोचान’ची लेखीका तेत्सुको कुरोयानागी, स्वामीच्या गोष्टी लिहिणारे आर. के. नारायण. रस्कीन बॉंड, देनिसच्या गोष्टी लिहिणारे व्हिक्टर द्रागून्स्की, लेखनाच्या शैलीचा विचार केला तर एनिड ब्लायटन आणि विज्ञानप्रसाराला आपलं आयुष्य समर्पित करणारे, मुलांत मूल होणारे अरविंद गुप्ता, प्रत्येक उपेक्षित मूल जणू आपलंच आहे असं समजून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्याच्या शिक्षणाचा ध्यास घेणार्‍या रेणू गावसकर आणि महाश्वेता देवी असे खूप जण आहेत. पण या सर्वांत मला रवींद्रनाथ श्रेष्ठ वाटतात.
रवींद्रनाथांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणार्‍या ‘सहज पाठ’ या तीन पुस्तिका लिहिल्या. त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगालमधील प्रत्येक मुलाला हे सहजपाठ तोंडपाठ आहेत ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे, तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून. हे सहजपाठ म्हणजे ‘शरीर शिक्षणाचे, पण आत्मा म्हणजे गाणी, गोष्टी, कविता, संगीत व गमती-जमती.’ मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं, शरीराशी नाही याची रवींद्रनाथांना जाणीव होती. मुले गोष्टी वाचत, गाणी म्हणत, गमती-जमती करत कधी शिकली हे त्यांना कळतच नसे. “ करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे” असा त्यांचा दृष्टीकोन होता. माझ्यासाठी ते वंदनीय आहेत.
मुलांनी मजेत शिकावं यासाठी मी प्रयत्न करत असतो. म्हणजे मी नेमकं काय करतो? बालसाहित्यिक म्हणून किंवा मुलांचा लेखक म्हणून ‘मला कशाची खंत वाटते? किंवा कुठल्या गोष्टीबाबत मी असमाधानी आहे?’  
शिक्षकांना मुलांना शिकवताना कोणत्या अडचणी येतात? कुठले घटक किंवा संबोध समजून घेताना मुलांचा गोंधळ होतो? अभ्यासातला कुठला भाग फारच किचकट आहे असं वाटतं? हे मी त्यांच्याकडून समजून घेतो व मग तो कठीण भाग सोपा होण्यासाठी त्यांना एखादा नवीन खेळ, उपक्रम किंवा मजेशीर स्वाध्याय सुचवतो. थोडक्यात त्यांच्याच मदतीने त्यातून मार्ग काढतो.
मी मुलांसाठी काम करतो म्हणजेच मी सगळ्या मुलांशी बांधील आहे असं समजतो. पण तरीही मी नॉर्मल मुलांसाठीच काम करतो ही माझी खंत आहे. मला अंध, अपंग, कर्णबधिर, तृतीयपंथी मुले, उपेक्षित आणि गतिमंद मुलांसाठी काम करायचं आहे. त्यांचे प्रश्न मला समजून घ्यायचे आहेत. त्यांना शिकताना येणार्‍या अडचणींतून काही मार्ग काढण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आज मला या सर्व मुलांची जाहीर माफी मागायची आहे, दोन कारणांसाठी. एक, मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे थोडेफार प्रयत्न केले, पण त्यात सातत्य राहिलं नाही. मी कमी पडलो. दोन, माझ्या लेखनातून कधी तुमच्यातले नायक-नायिका आलेच नाहीत, हे आज सांगतान मला लाज वाटते आहे. पण या वर्षात मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या सोबत राहीन. आणि यापुढे तुमच्याकडे दुर्लक्ष्य होणार नाही, असं मी तुम्हांला या मुलांच्या साक्षीने वचन देतो.
मध्यंतरी मी काही महिने सिडनीला गेलो होतो. तिथे काही शाळा पाहिल्या. वर्गात बसलो. खूप नवीन गोष्टी शिकलो. मला इतर देशांतील शाळाही पाहायच्या आहेत. त्यांच्या शाळांतल्या चांगल्या गोष्टी, शिकण्याच्या नवनवीन पद्धती मला माझ्या देशातल्या मुलांसाठी आणायच्या आहेत. मुलांना निर्भय वातावरणात आनंदाने स्वत:हून शिकता यावं, हेच काम आता करायचं आहे. लवकरच अशी संधी मला मिळेल याची मला खात्री आहे.
राजीव तांबे
rajcopper@gmail.com
***
राजीव तांबे यांनी सादर केलेल्या विंदांच्या कविता –
***
चित्रस्रोत : आंतरजाल
बालसाहित्यांक २०१७ लेख

गेल्या पिढीत अडकलेलं बालसाहित्य

मी एक इंग्लंडमध्ये राहणारा मराठी माणूस. अमराठी बायको आणि दोन वर्षांचं मूल असलेला. माझ्या मुलासाठी म्हणून मी मराठी बालसाहित्य शोधायला लागलो आणि मला पावलोपावली ठेच लागायला सुरुवात झाली.
पण तसं नको. नीट पहिल्यापासून बघू.
माझ्या मुलानं जगण्याचा आनंद लुटावा, प्रेम करायला आणि करून घ्यायला शिकावं, अनेक नवनवीन गोष्टी करून पाहाव्यात असं मला मनापासून वाटतं. नवनवीन गोष्टी करून पाहण्यातूनच अधिकाधिक आनंदाच्या आणि खुलेपणाच्या वाटा पडत जात असतात. त्यामुळे त्यानं होता होईतो पूर्वग्रहरहित असलं पाहिजे, याचीही मी खातरजमा करून घेत असतो. कारण होतं असं, की विशिष्ट अनुभवांतून विशिष्ट आडाखे बांधणं – थोडक्यात पूर्वग्रह तयार करणं – हे मेंदू करतच असतो. ते पूर्णपणे टाळता येत नाही. पण हे पूर्वग्रह सतत ‘अपडेट’ करून घेत राहणं, हाही माणूस म्हणून आपल्या उत्क्रांत होत जाण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, आपल्या सीमा विस्तारण्याचं ते गमक आहे. त्यामुळे माझ्या मुलापाशी होता होईतो पूर्वग्रह असू नयेत, आणि माझ्या पिढीनं बाळगलेले पूर्वग्रह तर नयेच नयेत, असा प्रयत्न मी सतत करत असतो.
मी त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाकडे पाहतो, तेव्हा मला काय दिसतं? अहिंसा आणि समानता या दोन मूल्यांचं institutionalisation केलेला समाज दिसतो. अशा समाजाचं वैशिष्ट्यच मुळी हे असतं, की समाज म्हणून सुरळीत जगण्यासाठी व्यक्तींनी जी मूल्यं पाळून हवी असतात – उदाहरणार्थ अहिंसा आणि समता ‌-  त्या मूल्यांची प्रतिष्ठापना करून त्यांभोवती एक व्यवस्था उभारली गेलेली असते. जेणेकरून ती मूल्यं पाळली जाताहेत की नाही, यावर पाळत ठेवण्याचं व्यक्तींचं काम कमी होतं. सगळे जण ती मूल्यं बिनबोभाट-जणू सवयीनंच पाळतात. थोडक्यात वृत्तीचंच व्यवस्थेत रूपांतर होत जातं आणि परिणामी व्यक्तिस्वातंत्र्य बर्‍याच अंशी वाढल्याचा भास निर्माण होतो. समाजात सगळं आलबेल असल्याचं दिसतं. कुणी कुणाच्या हितसंबंधांवर घाला तर घालत नाही ना, यावर लक्ष्य ठेवण्याचे प्रसंगच मुळी कमी येतात.
हे मला माझ्या आजूबाजूलाही दिसतं. पण याचा अर्थ खरोखरच सगळं आलबेल असतं का?
अहं. सगळं आलबेल नसतं. इंग्लंडमध्ये लिंगाधारित भेदभाव जवळजवळ नाही, असं तुम्हांला वाटेल. सगळ्यांना सगळ्या संधी मिळतात. सगळे जण हवे तसे कपडे घालतात? कुठे आहे भेदभाव? पण थोडं खणायला सुरुवात केली, की अनेक फटी दिसत जातात.
उदाहरणार्थ : इथे जन्माला येणार्‍या बाळाला जन्माला आल्यापासून आपलं लिंग सतत जाहीर करणं आवश्यक असतं. जर मुलगा असेल, तर निळे कपडे. मुलगी असेल, तर गुलाबी. हे कायद्यानं बंधनकारक नाहीय. पण बाजारपेठेनं देऊ केलेले पर्याय सतत ओरडून ओरडून सांगत असतात, की तुमच्या मुलाचं लिंग अमुक अमुक आहे आणि त्याच्यासाठी केलेल्या प्रत्येक निवडीमध्ये हे प्रतिबिंबित होणारच. लोक याविरुद्ध अजिबात वागत नाहीत. पण तुमच्या मुलाचे कपडे निराळ्या रंगाचे असले आणि त्यामुळे त्यांच्याकडून मुलाचं लिंग ओळखायला चुकलं, तर ते प्रचंड कानकोंडे होतात. जणू लिंगभाव हा व्यक्तीच्या एकूण जडणघडणीतला अतिमहत्त्वाचा भाग आहे.
साधं उदाहरण देतो. मला एका पाच वर्षांच्या मुलासाठी भेट म्हणून एक खेळणं विकत घ्यायचं होतं. मी खेळण्यांच्या दुकानात गेलो. मुलाचा वयोगट सांगून मला योग्य त्या विभागात का बरं जाता येऊ नये? पण नाही. तिथे प्रश्न असा होता, मुलगा आहे की मुलगी? मी मुलींच्या विभागात गेलो, तर तिकडे गुलाबी रंगाचा एक समुद्र पसरलेला होता. अतिशय गोडगोड दिसणारी सॉफ्ट टॉइज, गुलाबी पेहरावातल्या कमनीय बाहुल्या, गुलाबी रंगामुळे ढवळायला लागेल अशा प्रकारे त्याचा शिडकावा केलेल्या अनेक नाजूक वस्तू. त्यानं कसंतरी होऊन, मी मुलांच्या विभागात गेलो. तर तिथली परिस्थिती अजूनच वाईट होती. निरनिराळ्या प्रकारच्या हत्यारांची रेलचेल होती. बंदुका, वेगवान वाहनांची खेळणी आणि ‘कूल’ समजली जाणारी अशी काही गॅजेट्स यांनी तो विभाग व्यापलेला होता. काळ्या रंगाचं साम्राज्य होतं हे तर सांगायला नकोच. पण झिंग आणणारा वेग आणि त्यातून प्रस्थापित केली जाणारी आभासी सत्ता यांचं प्रतीक असलेली अनेक खेळणी तिथे होती. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या दोन स्वच्छ तुकडे केलेल्या कुरणांच्या पलीकडे जाणारी, मुलाचं लिंग कोणतं आहे त्याला काहीही महत्त्व नसलेली कोणतीही खेळणी तिथे उपलब्ध नव्हती. मला हे अतिशय भीषण वाटलं.
आता वरवर पाहता यात काय जबरदस्ती आहे? काहीसुद्धा नाही. कायदा सांगत नाही, की तुमच्या मुलाला निळे’च’ कपडे घातले पाहिजेत असं. पण समाजानं स्वतःला लावून घेतलेलं ते वळण आहे आणि त्यातून व्यक्तीही त्याच वळणाचे पर्याय ‘निवडत’ असतात.
इथल्या माध्यमांमधूनही अशा अपेक्षा सतत बिंबवण्यात येत असतात. हॅरी पॉटरचंच उदाहरण घ्या. तुम्ही त्यातला कोणत्याही स्त्रीव्यक्तिरेखेकडे नीट पाहिलंत, तर तुमच्या लक्ष्यात येईल, सगळ्या व्यक्तिरेखांना कुणी ना कुणी वरिष्ठ पुरुष नेमून दिलेला आहे. त्यांतली कुणीच बाई ‘हीरो’ नाही. हरमॉयनी -> हॅरी. जिनी -> हॅरी. लूना -> नेव्हिल. मॅडम मॅक्गॉनागल -> डम्बलडोअर. इतकंच काय – बेलॅट्रिक्स -> व्हॉल्डरमॉट. शेवटच्या भागात जेव्हा हॅरी आणि त्याच्या मित्रांचं त्रिकूट अज्ञातवासात जंगलांतून भटकत प्रवास करत असतं, तेव्हा सगळ्या घरगुती कामांची जबाबदारी कुणाकडे असते? अर्थात – हरमॉयनीकडे. नियम मोडण्याचं काम कोण करतं? रॉन आणि हॅरी. त्यांच्यासोबत हरमॉयनी असते. पण ती मात्र स्कॉलर, धाडसी आणि स्मार्टही असते, तेव्हाच तिचं नियम मोडणं समर्थनीय असू शकतं. हे पुरेसं धक्कादायक आहेच. पण त्याहून धक्कादायक आहे ते हे, की हे आजूबाजूला कुणाच्या ध्यानातही येत नाही.
नाही पटत?
थोडं पुढे जाऊन पाहू. मी इथे एका विद्यापीठात ‘development econonics’ शिकवतो. माझ्या विषयात जेव्हा लिंगभावाधारित असमानता हा मुद्दा शिकवण्याची वेळ येते, तेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना विचारतो, ‘तुमच्या आजूबाजूला आहे का लिंगभावाधारित असमानता?’ तर त्यांच्या मते ती त्यांच्या समाजात अस्तित्वातच नसते. त्यांच्या मते अशा प्रकारचा भेदभाव अफगाणिस्तानात किंवा आशियाई देशांत होत असतो फक्त. फारतर त्यांच्या देशात स्थलांतरित झालेल्या काही निराळ्या वंशाच्या लोकांमध्ये. पण गोर्‍या लोकांच्यात? चक्. शक्यच नाही. मग मी एक साधा प्रश्न विचारतो. वर्गातल्या किती व्यक्ती खेळाला किती वेळ देतात, त्यांपैकी स्त्रिया किती वेळ देतात आणि पुरुष किती वेळ देतात? आजही पुरुष आणि स्त्रिया यांच्या बाबतीत, या प्रमाणात चांगलीच तफावत आहे. या उत्तराला अडखळणं हा त्या विदयार्थ्यांच्या शिक्षणातला महत्त्वाचा टप्पा असतो. आपल्या समाजात कोणत्याही प्रकारचा लिंगाधारित भेदभाव होत नाही आणि आपण अशा भेदभावापासून जणू मुक्तच आहोत, असं मानत असलेल्या या मुलांचं आभासी निर्णयस्वातंत्र्य या प्रश्नापाशी संपतं आणि त्यांचे डोळे उघडतात.
भारतात – महाराष्ट्रात – या बाबतीत काय चित्र दिसतं? मी मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो आहे. मी या प्रकारचं बंदिस्त निर्णयस्वातंत्र्य अनुभवलेलं नाही.  पुढे मी महाराष्ट्रातल्या काही खेड्यांमध्ये राहिलो, काही काम केलं. तिथेही आपल्या समाजातल्या स्त्रीपुरुष भेदभावाबद्दल लोकांची जाण लख्ख असलेली मी अनुभवलेली आहे. उत्तरं अजून पूर्णपणे मिळवता आलेली नाहीत. मान्य आहे. पण प्रश्न नक्की काय आहे, तो आहे की नाही, या पातळीवर अशिक्षित, ग्रामीण, गरीब समाजातही व्यवस्थित जागृती आहे, हा माझा अनुभव आहे. ‘बाई म्हणून मला दुय्यम स्थान मिळतं’ हे भान तळागाळातल्या बाईपासून उच्चशिक्षित-सवर्ण-शहरी बाईपर्यंत सगळ्यांना आहे.
माझ्या मुलानं या देशातल्या आभासी स्वातंत्र्याच्या पिंजर्‍यात अडकू नये, त्यालाही आपल्या सामाजिक स्थानाचं लख्ख भान असावं असं मला वाटतं. शिवाय व्यक्ती म्हणून आपण गोर्‍या लोकांपेक्षा कुणीतरी कमी आहोत, असं त्याला न वाटता त्याला आपल्या वैविध्यपूर्ण वारशाची आणि त्यातून मिळणार्‍या सामर्थ्याचीही जाणीव असावी असंही मला वाटतं. म्हणून त्यानं मराठी आणि पर्यायानं भारतीय संस्कृतीला पारखं होऊ नये, अशी माझी इच्छा होती.
म्हणून मी मराठी बालसाहित्याकडे वळलो. समग्र बालसाहित्याची झाडाझडती काही घेतली नाही, तसा दावाही नाही. पण मला मिळालेल्या मोजक्या पुस्तकांतूनच मला धक्के बसायला सुरुवात झाली.
पुस्तकं मिळवायला सुरुवात केल्या-केल्याच लक्ष्यात आलं, बालसाहित्यातून हिंसा आणि भेदभाव या गोष्टींचा उघड पुरस्कार असू नये, असं जे एक सर्वमान्य तत्त्व आहे, ते आपल्याकडे अजून पुरतं अवतरलेलं नाही. अजुनी राक्षसांचा खून करण्यासाठी केवळ ते राक्षस आहेत एवढं एकच ‘कारण’ आपल्याला पुरेसं वाटतं. बदलाला सुरुवात झालीय, नाही असं नाही. पाठ्यपुस्तकांत थोडे जाणीवपूर्वक बदल दिसतात. पण ते अपवादात्मक म्हणावेत अशीच परिस्थिती आहे.
मग मी माझ्या बरोबरीच्या पालकांकडे विचारणा करायला सुरुवात केली. तेव्हा मला ‘प्रथम बुक्स’ची पुस्तकं मिळाली. त्यात या प्रकारच्या मूलभूत अन्यायांची पायरी मागे टाकलेली मला जाणवली. भेदभाव असू नये, इतका साधा विचार तरी त्यांना मान्य असावा असं वाटलं, नि मी खूश झालो. पण त्यात भाषांतरित पुस्तकांचा भरणा होता. बरं, भाषांतर तरी नीट असावं? बरेचदा ते शब्दाला शब्द या प्रकारे केलेलं भाषांतर असे नि वरकरणी ती भाषा मराठी दिसली, तरी माझ्या भाषेशी त्या भाषेचा काहीच संबंध नसे. यानं मी वैतागलो. दुसरं म्हणजे, प्रचंड कंटाळवाण्या गोष्टी. त्यांना गोष्टी तरी कसं म्हणावं? गोष्टीत काहीतरी घडावं, त्यातून धक्के मिळावेत, आनंद-दुःख-मजा अशा भावना अनुभवाला याव्यात, कल्पनेला आव्हान मिळावं… असं काही त्यात नव्हतंच. नुसती ‘चिमखडे बोल’ सदरात टाकण्याजोगी महाबोअरिंग स्फुटं.
तोही टप्पा बाद.
मग मला माधुरी पुरंदरे भेटल्या.
खरंच सांगतो, मी सुखावलो. एकतर बाबाला ‘अरे बाबा’ म्हणणारी मुलं होती त्यात. मला लगेच त्या मुलांबद्दल आपलेपणा वाटला. दुसरं म्हणजे नायकांच्याइतक्याच नायिकाही असणं, त्यांच्या खेळण्या-वाढण्याबद्दलच्या संकल्पनांमध्ये लिंगभावाला अजिबात स्थान नसणं हेही मला फारच आवडलं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे भाषा. मी ज्या भाषेत वाढलो, जी भाषा रोज वापरतो, ती जिवंत भाषा या पुस्तकांत होती. बरं वाटलं. आपला शोध संपला असं वाटून मी त्यांची अनेक पुस्तकं मुलासोबत वाचायला सुरुवात केली. पण जसजसा मी खोलात जायला लागलो, तसतसं माझं डोकं मला स्वस्थ बसू देईना. यश आणि राधा या त्यांच्या बालनायक-नायिकांपर्यंत सगळं आलबेल होतं. पण त्यांच्या मागच्या पिढीकडे बघितलं, की चोर पकडला गेल्यासारखं वाटे. आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा या सगळ्या मोठ्या माणसांच्या लिंगाधारित पारंपरिक भूमिका आपल्या जशाच्या तशा. वास्तवात काही माझ्या पिढीतले आई-बाप इतके पारंपरिक कपडे घालत नाहीत नि इतकी पारंपरिक कामंही करत नाहीत. पण यश नि राधाचे पालक मात्र माधुरी पुरंदरेंचे पालक असावेत, असे मागच्या पिढीत गोठल्यासारखे! अगदी ‘आज्जी’ पुस्तकातली आज्जीही खट्याळपणाचे काहीसुद्धा तपशील न देऊ शकणारी आणि त्या गुलदस्त्यातल्या खट्याळपणाबद्दल तिच्या शिक्षा देण्यापुरत्या येणार्‍या बाबांकडून पट्टीचा मार खाणारी. आजोबा मात्र राजरोस कुणाच्या तरी बागेत शिरून आंबे चोरण्यासारख्या ‘निरागस’ खोड्या करणारे. हे फारच चाकोरीबद्ध होतं. दुसरी जाणवण्याजोगी त्रासदायक बाब म्हणजे वर्णभेद. सगळ्या मोलकरणी आणि रिक्षावाले काका यांचा वर्ण सावळा. अरेच्चा! हेही वास्तवाला धरून नाहीच की. मुद्दाम एखादी संकल्पना डोक्यात बिंबवण्यासाठी करावी, तशी वर्णाची निवड. बरं, ही थोडी निम्न स्तरातली मंडळी यश आणि राधाशी कशी वागतात? जसं ‘अशा’ माणसांनी उच्चवर्णीय श्रीमंत लहान पोराशी वागावं, तशीच. त्याच्या सामाजिक स्तराला जपून. आपली ‘पायरी सांभाळून’.
मला दिसत-खुपत होतं ते खोटं नव्हतं. पण आपण जरा जास्तच कीस काढतोय की काय, असं वाटून मी माझ्या डोक्याला तिथेच थांबवलं आणि पर्याय शोधायचं ठरवलं.
आपल्याला हव्या त्या प्रकारच्या भेदभावरहित आधुनिक समाजाची निर्मिती करण्यावर विश्वास ठेवणारे नि तशी कृतीही करणारे माझे आवडते साहित्यिक म्हणजे विंदा करंदीकर. मी त्यांचं ‘एटू लोकांचा देश’ मिळवलं.
आता इथे मला थोडी पार्श्वभूमी सांगणं भाग आहे. त्याचं काय आहे, मी अर्धा ब्राह्मण, अर्था मुसलमान असा मराठी. माझी बायको चिनी. अर्थात माझा मुलगा अर्धा चिनी.
तर – मी त्याला ते वाचून दाखवावं म्हणून उघडलं. त्याचं कथानक ठाऊक आहे ना तुम्हांला? एटू लोकांच्या राज्यावर चिनी लोक हल्ला करतात आणि आपली घरं हवेत उडवून नेऊन नि मग त्याच घरांखाली चिन्यांचा कपाळमोक्ष करून एटू लोक पुन्हा एकदा सुखी होतात, अशी ती गोष्ट. १९६२ सालच्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली.
मला मान्य आहे, यात विंदांना काही दोष देता येणार नाही. त्यांच्या काळाला धरून असलेलीच ती कविता होती. आज मी चिनी बायको करीन, असं त्यांना तरी काय स्वप्न पडलेलं असणार! पण म्हणून मी माझ्या मुलाला आज ती कविता ऐकवीन म्हणता? कोणत्या तोंडानं ऐकवू? पन्नास-साठ वर्षांनंतर, जग जवळ येत असताना, आपण आपल्या सीमा अधिकाधिक विस्तारत चाललेले असताना, ती कविता मागल्या पिढीतच अडकून पडलेलं आहे, कालबाह्य झालेलं आहे, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. मी गुमान ‘एटू लोकांचा देश’ सोडून दिला!
माझं अतिशय आवडत पुस्तक काढलं – ‘राणीचा बाग’. पण इथेही रस्ता सरळ नव्हताच.
‘माकड होते वाचीत पुराण,
उंट होता वाचीत कुराण’
या ओळीला अडखळलो. का बुवा? प्राण्यांचेही धार्मिक-सामाजिक लागेबांधे असलेच पाहिजेत? त्यांनीही यातून मुक्त असू नये? हत्ती आपला कायम मोदक खाण्यात मग्न, मारुतीचं वंशज असलेलं माकड पुराणावर हक्क सांगणार, नि अरबस्तानातून आलेला उंटच कायम कुराण वाचणार?
मुद्दामहून नसेलच केलं हे विंदांनी. पण नकळत झालेली ही निवड मला अनावश्यक आणि संकुचित वाटत होती.
हेही असोच. आपण अद्भुताकडे जाऊ, असं म्हणत ‘आटपाट नगरामध्ये’ उघडली.
आटपाट नगरामध्ये
नाही होत चोरी;
हुशार मुले काळी; आणि
खुळी मुले गोरी.
‘हुशार मुले काळी आणि खुळी मुले गोरी’ ही उलटापालट? म्हणजे हुशार मुलांनी गोरं असणं नि खुळ्या मुलांनी काळं असणं ही आदर्श व्यवस्था?
यावर काही बोलायची तरी गरज आहे?
असो.
माझ्या मते मराठी बालसाहित्य इतकं संकुचित, पारंपरिक आणि रूढीबाज असायची काहीच गरज नाहीय. मराठी साहित्याला विद्रोहाचीही दीर्घ परंपरा आहेच की. पण अडचण अशी, की फुले-आंबेडकर म्हणा किंवा कष्टकरी समाजाच्या चळवळी म्हणा – बालसाहित्यापर्यंत पोचल्याच नाहीत. त्या पोचायला हव्या आहेत. आपण मनावर घेतलं, तर ते अशक्यही नाही. विद्रोही साहित्य संमेलनात प्रतिमा परदेशींनी सांगितलेली एक गोष्ट सांगतो.
एक होता काऊ आणि एक होती चिऊ. कावळ्याचं घर होतं शेणाचं नि चिमणीचं घर होतं मेणाचं. पावसाळ्यात काऊचं घर गेलं वाहून. म्हणून तो गेला चिऊकडे. म्हणाला,
‘चिऊताई, चिऊताई… दार उघड…”  
चिऊनं त्याला घरात तर घेतलं नाहीच. ठेवलं पावसात भिजत. वर त्याच्या शेपटीला निखार्‍याचा चटकाही दिला. गेला बिचारा निघून.
पुढे उन्हाळा आला. उन्हाचा अगदी कहर झाला. त्यात चिऊचं घर मेणाचं. मेण वितळून त्याचे ठिपके तिच्या पंखावर पडू लागले. त्यामुळे तिची मऊमऊ पिसं एकमेकांना चिकटू लागली. बिचारी हताश झाली. काऊच्या घरी आली. म्हणाली,
“काऊदादा, काऊदादा, दार उघड….” खरा म्हणजे काऊ चिडायचाच. पण त्याने विचार केला, आता ही बिचारी कुठे जाईल, काय करील? त्याने तिला घरात घेतलं, शेणाच्या थंडगार भिंतीपाशी सावलीला बसवलं, प्यायला पाणी दिलं, अंगावरचं मेण झाडलं…
दोघांची पुन्हा मैत्री झाली…
– सुमेध दलवाई
sumedhdalwai@yahoo.com
(शब्दांकन : मेघना भुस्कुटे)
meghana.bhuskute@gmail.com
***
चित्रस्रोत : आंतरजाल
बालसाहित्यांक २०१७ लेख

बेटावरचे नियतकालिक आणि सुपरहीरो

ऐंशीच्या दशकातल्या मुलांचे जगणे… एक प्रातिनिधिक आठवण
गेले कित्येक दिवस मी ‘ठकठक’ या पाक्षिकाच्या संदर्भात मिळणार्‍या माहितीचा आणि आठवणींचा शोध घेतोय. हा शोध म्हणजे पाण्यावर अक्षरं कोरण्याचा प्रकार असल्याचं लक्ष्यात आलं, कारण ‘ठकठक’विषयी कोणतेही संदर्भ उपलब्ध असतीलच, तर ते फक्त त्याच्या वाचकांच्या मनामध्ये होते. इतरत्र कुठेही त्यावर आजवर कुणीही लिहिलेलं नाही. आपल्याकडे सामूहिक विस्मृतीच इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, की कधी-काळी पन्नास हजारांहून अधिक  खप असलेल्या नियतकालिकाविषयी कोणतेही दस्तावेजीकरण करणे कुणालाही महत्त्वाचे वाटले नाही. वृत्तपत्र, दिवाळी अंक, मासिके यांमध्ये कुणीही त्याबद्दल चर्चा केली नाही. त्याच्या कर्त्यांची कुणी विचारपूस केली नाही, वा कुणालाही ते किती सालापर्यंत सुरू होते, त्याबाबत काही ठोस माहिती देणे शक्य नाही.
माझ्या लहानपणी ‘ठकठक’ जुन्या अंकांच्या गठ्ठ्यांच्या रूपात एका संध्याकाळी दाखल झाले. साल ८९ किंवा ९० असेल. इयत्ता तिसरी किंवा चौथी असेल. सुट्टी नव्हतीच. तरीही शाळेचा अभ्यास सोडून तेव्हा मन भरेस्तोवर ‘ठकठक’ वाचले होते. त्यातले विनोद शाळेत, चाळीत सगळ्यांना सांगितले होते. आठ-दहा अंकांचा तो गठ्ठा संपेस्तोवर ताज्या-नव्या ‘ठकठक’ची मागणी झाली होती. ‘ठकठक’चे हाती लागतील ते ते, जुने आणि नवे – अंक वाचत होतो, शाळेतल्या-क्लासमधल्या ‘ठकठक’प्रेमी मुलांसोबत अंकांची अदलाबदल करत होतो. रंगीत आणि सुबक मुखपृष्ठ असलेल्या ‘चंपक’-‘चांदोबा’हून हे पाक्षिक अधिक आवडत होते, कारण त्यात चित्रगोष्टी अधिक होत्या. विनोद अधिक होते आणि ‘हे करून पाहा’ नावाचे आत्यंतिक सुंदर असे कृतिप्रवण सदर होते. त्यातल्या सगळ्या गोष्टी करून बघण्यासाठीचे साहित्य घरातल्या घरात असे.
या पाक्षिकाकडे आकर्षित झालेल्या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून मगे वळून पाहताना ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या मुलांकडे फावल्या वेळात करण्यासाठी इतर कोणत्या गोष्टी होत्या, त्यांचा आढावा घेणे आवश्यक वाटते. ठाण्यासारख्या शहराचे आजच्याइतके कॉंक्रिटीकरण झाले नव्हते. तेव्हा गोखले रस्ता, नौपाडा हा ठाण्यातला मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जाई. बाकी जांभळी नाक्यापासून उथळसर-कॅसल मिल नाक्यापर्यंतच्या भागामध्ये लोक लहान-मोठ्या चाळींत किंवा फार तर तीन-पाच माळ्यांच्या इमारतींमध्ये राहत. अभ्यासाचा कालावधी सोडला, तर इथली मुले अनेक संमिश्र खेळांत रमलेली असत. गणपती ते दिवाळी पतंग उडवणे, दिवाळी ते नाताळ गोट्या-भवरे फिरवणे, जानेवारी ते मार्च क्रिकेटज्वर अनुभवणे आणि एप्रिलअखेरीस परीक्षा संपल्यावर गाव वगैरे उरकून शाळा सुरू होईस्तोवर इतर खेळ असे साधारण वेळापत्रक. लपंडाव, डबा-ऐसपैस, लगोरी या खेळांमध्ये रमलेली मुले अंधार पडून घरातून हाक आल्याशिवाय खेळातून वजा होत नसत. ज्याच्या घरातून हाक मारली जात नसे, ते मूल शेवटपर्यंत उंडारत राही आणि घरातलीच कुणीतरी व्यक्ती लाकडी पट्टी घेऊन त्या मुलाला घरी नेत असत. मार खात घरी पोहोचून हात-पाय धुऊन झाल्यावर काही घरांतील मुलांच्या हातात गणपतीस्तोत्र वा हनुमानस्तोत्र कोंबले जाई. काही मुले घरातल्या किंवा शेजार्‍यांकडच्या टीव्हीवरचे दूरदर्शनच्या एकमेव वाहिनीचे कार्यक्रम पाहत अभ्यास उरकत. टीव्हीची गाडी ‘संसद समाचार’पर्यंत आल्यावर पोरांना झोप येई. दहाच्या आत झोपेच्या अधीन होणार्‍या मुलांची ती पिढी होती. शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेचे आकर्षण अधिक होते आणि रविवारी संध्याकाळी लागणारा प्रत्येक सिनेमा अभिजात वाटत असल्याकारणाने तो पाहणे म्हणजे सोहळा असे. किंबहुना रविवारची सकाळ ही ‘रंगोली’ कार्यक्रमातली गाणी बिछान्यातच ऐकण्या-पाहण्यापासून होई. मग सगळ्याच कार्यक्रमांचा टीआरपी चढाच असे. उन्हाळी सुट्टीत रात्री अनेक नाक्यांवर पडद्यावर सिनेमा लावला जाई. तो पाहायला गर्दी होत असे. चाळीत कुणीतरी भाड्याने आणलेल्या ‘व्हीसीआर’वर चित्रपट पाहिले जात, तिथे चाळीतल्या सगळ्याच कुटुंबांतली चिल्लीपिल्ली आणि रिकामटेकडी मोठी मंडळी उपस्थित असत. चित्रपटांच्या गोष्टी थोडयाफार फरकाने सारख्याच असत. १९८७-८८मध्ये कधीतरी दूरदर्शनवरचे कार्यक्रम दुपारी दोन वाजल्यापासून लागू लागले. दूरदर्शनची दुसरी वाहिनी सुरू झाली. एकही इंग्रजी शब्द न कळताही चाळीतली मराठी माध्यमात शिकलेली सारी मुले ‘जायंट रॉबट’ ही जपानी मालिका पाहत. त्यात घडणार्‍या गोष्टींचा अर्थ आपल्या परीने लावत. रविवारी लागणार्‍या ‘ही-मॅन’ आणि ‘स्पायडरमॅन’ या इंग्रजी मालिकांचे दूरदर्शनवर प्रसारण झाले, तेव्हा सुपरहीरो ही संकल्पना पोरांच्या मनावर बिंबवली गेली. रामानंद सागर आणि बी. आर. चोप्राकृत रामायण-महाभारतातील सुपरहीरो आणि हे अमेरिकी सुपरहीरो – हे दोन्हीही दहाबारा वर्षांच्या पोरांसाठी प्रमुख आकर्षणबिंदू बनले होते. त्यामुळे जत्रेतील कचकड्याचे धनुष्य-बाण, सोनेरी-चंदेरी गदा, तलवारी यांच्यासोबत ही-मॅन, स्पायडरमॅन यांची चित्रे असलेले खोडरबर, कंपास-दप्तर, टीशर्ट यांचीही खरेदी सुरू झाली होती. १९९१-९२च्या काळात सुट्टीच्या दिवसांत दूरदर्शनवर ‘फन टाइम’ नावाचा कार्यक्रम मुलांसाठी दाखवण्यात येऊ लागला. त्यात ‘सिंडरेला’पासून इतर अनेक अभिजात कलाकृतींवरील सिनेमे दाखवण्यात येऊ लागले.
हे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे दृश्य आणि शब्द, छपाई आणि प्रसारण या प्रकारच्या माध्यमांचा आवाका आणि पगडा किती नि कसा होता, ते लक्ष्यात यावे.
पुन्हा विषयाकडे येतो. ‘ठकठक’ सर्वाधिक आवडत होते, ते ‘दीपू दी ग्रेट’ या चित्रकथीमधून येणार्‍या मराठी सुपरहीरोमुळे. या दीपूला एकदा संकटात सापडलेला एक परग्रहवासीय भेटतो. दीपू त्याला मदत करतो. त्याची परतफेड म्हणून परग्रहवासीय दीपूला एक जादुई पट्टा भेट देतो. त्या जादुई पट्ट्यातील शक्तीने दीपू त्याच्या परिसरात निर्माण होणार्‍या अनेक सार्वजनिक संकटांतून अनेक जणांना वाचवतो.
या चित्रकथीला सुरुवात झाली तेव्हा भारतामधील मुलांमध्ये अमेरिकी सुपरहीरोची संकल्पना फार रुजली नव्हती. या मालिकेचा पहिला भाग वाचल्यानंतर त्याच्या पराक्रमांची मालिका वाचणे माझ्यासाठी तरी अनिवार्य झाले.
एकूणच ‘ठकठक’च्या लोकप्रियतेमागे त्यातला विनोद, कृती करायला उद्युक्त करणारी अनेक सदरे आणि रंजनप्रधान मजकूर ही कारणे असावीत.
उगाच संस्कार, उपदेश इत्यादी डोस पुरवण्यापेक्षा मुलांना नक्की काय आवडेल याचा विचार त्यात अधिक असलेला दिसे. ऐंशीच्या दशकात जन्मलेली मुले थोडी मोठी होऊन केबलवाहिन्यांच्या आक्रमणाला शरण जाईपर्यंत ‘ठकठक’ या अद्भुत पाक्षिकाचा अंमल कायम होता. केवळ दोन जणांच्या सुपीक डोक्यातून निघालेले हे पाक्षिक अगदी आत्ता-आत्तापर्यंत – म्हणजे २००८ सालापर्यंत – सुरू होेते. बंद होताना त्याच्या खपाचा जो आकडा होता, तो आज मराठीत प्रसिद्ध होणार्‍या कोणत्याही मासिकाला गाठता येईल का, याबद्दल मला शंका आहे. ‘ठकठक’चा खप होता, सुमारे १३ हजार.
फेसबुकावरून माग … ठकठककर्त्यांची भेट
‘ठकठक’ची आठवण होई, तेव्हा त्यातला दीपू दी ग्रेट आठवे. या अंकासाठी अनेक परिचितांना त्याच्याबद्दल विचारून पाहिले. कुणाकडूनही काही मिळेना. काही समवयीन लेखक आणि पत्रकार यांच्या दीपू दी ग्रेटबद्दलच्या आठवणी होत्या. पण त्यात खरी मदत झाली, ती फेसबुकाची. ‘ठकठक’च्या कर्त्यांबद्दल पृच्छा केल्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. पोस्ट्स शेअर करण्यात आल्या. लहानपणी आपण ‘ठकठक’मध्ये काय वाचायचो, याचे दाखले अनेकांनी दिले. दीपूची आठवण प्रत्येकाच्या मनात ताजी होती. कुणाला मोठे होऊन त्यावर सिनेमा काढायचा होता, तर कुणाला ‘ठकठक’ मिळवण्यासाठी आडगावामध्ये केल्या जाणार्‍या धडपडीची आठवण सांगायची होती. ‘ठकठक’चे पान फेसबुकावर असल्याचे कळले. तिथेही अगदी त्रोटक माहिती होती. पण अंकातल्या काही पानांची कात्रणे, लाल कपड्यांतल्या दीपू दी ग्रेटची छबी हे तिथे सापडले. नकुल चुरी या ‘ठकठक’प्रेमी संग्राहकाने अनेक छायाचित्रे पाठवली. ‘ठकठक’ आपल्याला जितके आणि जसे आवडायचे, तसे ते अनेकांना आवडत असे, हे कळले. अशाच काही तारा जुळल्या आणि तोरसकर यांच्या कांदिवलीमधील घरी मी धडकलो.
आनंद तोरसकर यांनी चित्रकार म्हणून अनेक ठिकाणी काम केले होते. त्यांना मराठीमध्ये चित्रकथी शैलीतले आणि मुलांशी संवाद साधणारे, त्यांना गुंतवून ठेवणारे नियतकालिक काढायचे होते.
‘‘त्या वेळची मासिकं उपदेश खूप करायची आणि त्यांची भाषाही मुलांना रुचेल-आवडेल अशी नव्हती. इंग्रजीतल्या ‘टिंकल’सारखं, पण मराठीत स्वतंत्र ओळख निर्माण करेल, असं नियतकालिक आम्हांला काढायचं होतं. म्हणून ठकठक हे नाव घेऊन आम्ही सहा अंकांचं नियोजन केलं. बाजाराचा आढावा घेतला. छपाई, वितरण यांचा अभ्यास केला आणि सहा अंकांचा मजकूर, चित्रं हाताशी ठेवून ६४ पानी चार-रंगी अंक काढला.’’
आनंद तोरसकर यांची पहिल्या अंकाची आठवण साल वा महिना याबाबतची नाही. ती आहे कल्पक विषय साकार केल्याची. निता तोरसकर यांनी मात्र १९८७ सालातल्या ऑगस्टमधली, अंकाच्या जन्माच्या काळातली एक वेगळी आठवण सांगितली.
‘‘बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या अंकाचं उद्घाटन झालं. त्या काळी ‘मार्मिक’ आणि शिवसेना या दोघांचाही जोर होता. या अंकाचं प्रकाशन अशा मोठ्या नेत्याच्या हस्ते होतंय याचं माहीममधल्या अनेक जणांना प्रचंड कौतुक वाटलं होतं. लोकांनी अंकाला खूप चांगला प्रतिसाद दिला.’’
‘‘या पहिल्या अंकाच्या रंगीत छपाईचं आर्थिक गणित थोडं बिघडतंय हे लक्ष्यात आल्यानंतर आम्ही दुसर्‍या अंकापासूूनच त्यात बदल केले. ६४ पानांचा काळा-पांढरा आणि काही पानांवर दोनच रंग घेऊन तयार झालेला दुसरा अंक बाजारात आला. काहीच अंकांनतर सगळी आवृत्ती संपायला लागली. सगळ्या प्रयोगांना उत्तम प्रतिसाद मिळायला लागला.” आनंद तोरसकर सांगत होते.
अंकातली सारी चित्रे, चित्रसंकल्पना आनंद तोरसकर यांच्या, तर लिखाण निता तोरसकर यांचे होते. लिखाण आणि चित्रे हे दोन्ही एकत्रितरीत्या दोघांच्याही पसंतीला उतरल्याशिवाय अंकात जात नसे. काही अंकांनंतरच ‘ठकठक’ने बालवाचकांना लिखाण पाठवण्याचे आवाहन केले. अनेक प्रकारच्या लेखनावर संस्कार करून, त्यात जीव भरत निता तोरसकरांनी ते लिखाण छापले. त्या लिखाणाला मानधन दिले. प्रोत्साहनपर पत्रे पाठवली. लहान मुलांनी काढलेली चित्रे छापली. त्यांना अंकांत सहभागी होण्याची संधी दिली. आज नागरिकांना माध्यमव्यवहारात समाविष्ट करून घेण्यासाठी माध्यमे जे प्रयोग करतात, ते तोरसकरांनी स्वतःच्याही नकळत तेव्हाच केले होते.
१९८८-८९ साली ‘ठकठक’ सर्वाधिक मागणी असलेले बालनियतकालिक झाले.
‘‘ठिकठिकाणचे पालक आपल्या मुलांना घेऊन ‘ठकठक’च्या कार्यालयात यायचे. ती मुलं निताताईंना भेटायला, त्यांच्याशी बोलायला आणि ‘ठकठक’चं कार्यालय पाहायला यायची. मला आता त्या पालकांचे कौतुक वाटते. तेव्हा मुलांच्या हट्टासाठी ते लांबून लांबून ‘ठकठक’च्या कार्यालयामध्ये यायचे.’’
आनंद तोरसकरांचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण मुलांच्या मराठी वाचनासारख्या गोष्टीला महत्त्व देणारी पालकांची पिढी तेव्हा शिल्लक होती, असा निष्कर्ष यातून निघतो.
‘‘इतर दोन सहकारी मदतीला घेऊन माहीमच्या घरामध्ये अंकाचं पॅकिंग आणि इतर बारीकसारीक कामं चालत. अंकाचे बालवाचक आपल्या पालकांसह तिथेच भेटायला येत. अंकाचा पसारा वाढला, तेव्हा माहीमच्या पोस्ट ऑफीसमधल्या यंत्रणेचा काही भाग फक्त ‘ठकठक’साठी राबत होता. पोतं भरून पत्रं यायची, लेख-गोष्टी यायच्या आणि अंक पोस्टातूनच राज्यभरातल्या वर्गणीदार वाचकांपर्यंत पोहोचायचा.’’ इति निता तोरसकर.  
या अंकातले सगळे प्रयोग दाम्पत्याच्याच कल्पनेतून निघालेले होते. संपादक मंडळ किंवा वाचकपाहणी-यंत्रणा असे काही येथे नव्हते. पण मुलांना काय भावेल याचा त्या दाम्पत्याला असलेला अंदाज कधीच चुकला नाही. परिणामी अंकातले वेगवेगळे प्रयोग यशस्वी झाले. मुलांसाठीच्या प्रश्नमंजुषा, शब्दकोडी लोकप्रिय झाली. बक्षिसांच्या आकर्षणानेही या अंकाचा बालवाचक वाढला. अंक स्टॉलवर आल्यानंतर दोन दिवसांत संपायचा. पुन्हा आणवून घेतला, तरीही लगेच संपायचा. रेल्वे स्टेशन आसपासच्या स्टॉल्सवर प्रती शिल्लकच राहत नसत.
मलाही एकदा दहा तारखेनंतर ‘ठकठक’च्या ताज्या अंकासाठी केलेली निष्फळ पायपीट आठवली. जरा उशीर झाला, की ताजा अंक मिळायचा नाही म्हणजे नाहीच.
या तडाखेबंद खपाकडे पाहून एका एजन्सीने ‘ठकठक’च्या दिवाळी अंकाआधी एक नकली अंक बाजारामध्ये काढून विकण्याचा प्रकार केला होता. जुन्या अंकातील मजकूर आणि चित्रांची जुळवाजुळव करून ‘केवळ ठकठक’ नावाने हा अंक बाजारात विक्रीस निघाला. जेव्हा या दाम्पत्याच्या लक्ष्यात ही गोष्ट आली, तेव्हा एजन्सीच्या मोबदल्यात लाख रुपयांचे आमिष तोरसकर दाम्प्त्याला दाखण्यात आले. हे प्रकरण पोलिसात गेले आणि त्या नकली अंकवाल्यांना आवर घालण्यात आला.
‘ठकठक’ एव्हाना इतके लोकप्रिय झाले होते, की कोणत्याही जाहिरातीची, स्तुतीची, वृत्तपत्रीय कौतुकाची तोरसकर दाम्पत्याला गरज वाटली नाही. मुलांनाच त्याचे मोल सर्वाधिक होते. ‘ठकठक’चे अंक नीट लक्ष्य देऊन काढणे, इतकाच ध्यास. त्यांनी ना इतर वाचन केले, ना इतर अभ्यास केला. आपल्या अंकासाठी वेगवेगळ्या विषयांवरच्या स्वतंत्र कल्पना राबविणे, बालवाचकांना पत्रोत्तरे लिहिणे, त्यांच्या एकेका ओळीच्या गोष्टींना, कवितांना कल्पकतेने पूर्ण करून घेऊन त्या अंकात वापरणे यापलीकडे निता तोरसकर यांना दुसर्‍या कोणत्याही गोष्टीचे महत्त्व नव्हते.
अंक वाढत गेला, तशीच तो वाचणारी मुलंही वाढत गेली. नवीन पिढ्यांना दूरदर्शनवरचा शक्तिमान आवडत होता. त्यांना परदेशी सिनेमा, कार्टून्सच्या वाहिन्या मिळाल्या. कॉम्प्युटरवरचे गेम्स, व्हिडिओ गेम्स मिळाले. त्यांची कुतूहलक्षमता विस्तारणारी इतरही आकर्षणकेंद्रे निर्माण होत होती. दोन हजारोत्तर काळात ‘ठकठक’चा आकार कमी झाला. पहिला अंक ६४ पानांचा आणि छोट्या वहीच्या आकाराचा होता. तो तेव्हा चार रुपयांना मिळे. दुसर्‍या अंकापासून ६४ पानांचा अंक अडीच रुपयांत मिळायला लागला. दिवाळी अंकांच्या किंमती जेव्हा १०० रुपयांवर गेल्या, तेव्हाही ‘ठकठक’चा दिवाळी अंक ३० रुपयांत मिळत होता. साधारण पॉकेट बुकपेक्षा मोठ्या आकाराचा अंक १२ रुपयांना मिळे.
‘दीपू दी ग्रेट’ आणि त्याची लोकप्रियता
‘दीपू दी ग्रेट’ येण्याआधी आपल्या मराठी वाचकांना अमेरिकी सुपरहीरोसारखे दुसरे कुणीच माहीत नव्हते. ‘दीपू दी ग्रेट’ पाहिल्यावर त्याची मुळं अमेरिकी वाटायची. पण त्याच्या गोष्टी मात्र तद्दन मराठमोळ्या असत. मराठी समाजामध्ये घडणार्‍या घडामोडींकडे लक्ष्य देत दीपूच्या गोष्टी रचलेल्या असत.
“त्यावर कुणाचा प्रभाव आहे, असं वाटू नये म्हणून मी स्वत: कोणत्याही सुपरहीरोच्या गोष्टी वाचायचं टाळलं.” निता तोरसकर यांनी प्रामाणिकपणे सांगितले. परग्रहवासीय आणि कथानायकाची भेट होणे, कथानायकाला त्याच्याकडून गॅझेट मिळणे, त्याचा वापर करून नायक शक्तिशाली होणे आणि त्याने अनेक पराक्रम करणे या सगळ्या गोष्टी परदेशी वाटतात खर्‍या. पण त्यांच्या आजूबाजूचे वातावरण अस्सल देशी आहे. ‘दीपू दी ग्रेट’च्या गोष्टीमध्ये हेर, भूत, दरोडेखोर, दहशतवादी हे सगळे घटक होते. आणि ते त्या-त्या काळातील घटनांच्या आधारे बेतलेले होते.
‘दीपू दी ग्रेट’च्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांपैकी ही एक प्रतिक्रिया :
“ठकठक मी पहिल्यापासून वाचत नव्हतो. मधल्या काळात कधीतरी वाचायला सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीपासून ‘दीपू दी ग्रेट’ची कथा माहीत नव्हती. नंतर ती आपोआप समजत गेली. प्रत्येक भागात किंवा दोनतीन भागांत मिळून एक-एक कथा असायची, त्यामुळे ती सहज समजायची. दीपू नावाचा मुलगा त्याच्याकडे असलेला बेल्ट लावून सुपरमॅन व्हायचा, आकाशात उडायचा आणि त्याच्या बोटांमध्ये शक्तिशाली किरण असायचे. एका कथेत एका मिलिटरी ऑफिसरच्या मुलाला किडनॅप केले जाते आणि ‘दिपू दी ग्रेट’ त्याला सोडवून अतिरेक्यांचा खातमा करतो. यात माझ्या स्मरणशक्तीचे कौतुक नाही. तो अंक माझ्याकडे अजूनही आहे, कारण त्यात माझा फोटो होता. दुसर्‍या एका कथेत तनरेजा नावाच्या श्रीमंत माणसाला धमक्या येत असतात आणि हा दिपू दी ग्रेट त्या धमकी देणार्‍यांचा नायनाट करतो. दिपू दी ग्रेट तेव्हा आवडायचा, पण नंतर ‘शक्तिमान’सारख्या मालिका आणि कार्टून नेटवर्क वगैरे सुरू झाल्यावर त्याचं आकर्षण ओसरलं. पण अजूनही त्यातली चित्रं आणि भाषा चांगली वाटते.”
ही एक प्रतिक्रिया सोडली, तर अनेकांनी ‘दिपू दी ग्रेट’ आणि ‘ठकठक’बद्दलचे प्रेम व्यक्त केले. पण ‘ठकठक’ नक्की का आवडत असे, याबद्दल मात्र फारशी उत्तरे मिळाली नाहीत.
या ‘दीपू दी ग्रेट’वर आनंद तोरसकर यांचा हात फिरत होता. मध्यंतरी त्यांच्याजवळ कुणीतरी ‘दीपू दी ग्रेट’च्या सिनेमासाठीही बोलणी केली होती. पण ती बोलणी पुढे सरकली नाहीत. ‘दीपू दी ग्रेट’ पुस्तकरूपातही येऊ शकला असता. आताही येऊ शकेल. त्यावर टीव्ही मालिका घडू शकली असती. आताही घडू शकेल.
यांतले काहीतरी प्रत्यक्षात यावे, नाहीतर ‘दीपू दी ग्रेट’ ‘ठकठक’च्या अंकांच्या पानांतच गोठून जाईल.
‘ठकठक’चा उत्तरकाळ
‘ठकठक’ २००८ सालापर्यंत येत होते, हे १९९६ ते २०१७ या काळात मलाही माहिती नव्हते. म्हणजे स्टॉलवर एखादा दिवाळी अंक पाहिला असेल, पण पाक्षिक अंक मात्र त्याआधीच बंद झाला असावा, असा माझा अंदाज होता. ‘ठकठक’ का बंद पडले?
तोरसकरांनी एक कारण सांगितले, की ‘‘पूर्वीसारखी वितरणयंत्रणा राहिली नव्हती. वितरकांची पुढची पिढी धंद्यात तितकी मेहनत घेऊ इच्छित नव्हती.’’
‘ठकठक’ राज्यभरात सर्वदूर पोहोचत होते. त्याची इंग्रजी आर्णि हिंदी आवृत्तीही निघत होती. मासिकाकडून पाक्षिकाकडे अशी त्याची वारंवारताही वाढली होती. मग घोडे अडले, कुठे?
गेल्या शतकभरापासून छापील मासिकांना आर्थिक अडचणी तर सतावताहेतच. त्यात पुढे-पुढे काळ बदलत गेला. मुलांच्या आवडीनिवडी बदलत गेल्या. ‘ठकठक’चा खप ४५ हजारांवरून उतरत गेला. वाचक कमी झाले. वर्गणीदार कमी झाले. मुलांनी मराठीतून वाचावे, याची जाणीव असणारे पालकही कदाचित कमी झाले.
पण तरीही ‘ठकठक’ १० ते १५ हजार हा खपाचा आकडा टिकवून होते. कमी होत गेलेले का असेनात, त्याचे असे स्वतःचे वाचक होते, संग्राहक होते. पण जाहिराती नसलेला अंक काढणे पुढल्या काळात कठीण व्हायला लागले. एका बड्या मासिकाचा अनुभव असलेल्या व्यक्तीने ‘ठकठक’चे नाव खरेदी करून ते टॅबलॉइड स्वरूपात काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यातल्या खर्चापोटी ‘ठकठक’चे नवीन मालक तोट्यात गेले आणि अंक बंद झाला. अंक बंद होऊ नये, म्हणून ‘ठकठक’चे नाव पुन्हा आपल्याला मिळावे अशी विनंती तोरसकर दाम्पत्याने नव्या मालकाला केली होती. पण अव्वाच्या सव्वा किंमतीवरून नवीन मालक खाली येईना, तेव्हा तोरसकरांचाही नाईलाज झाला.
‘ठकठक’ बंद होऊनही खूप काळ लोटला आहे. तोरसकर दाम्पत्य समाधानी आहे. ”ठकठक’ने आम्हांला भरभरून दिलं,’ अशी त्यांची भावना आहे. “आम्ही ‘ठकठक’मध्ये आमचं सर्वस्व ओतलं. त्या आधारावरच घर, गाडी सगळं घेतलं. ‘ठकठक’मुळेच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आम्हांला सेलिब्रिटी असल्यासारखी ओळख मिळाली. राज्यभरातल्या मुलांचं प्रेम आम्हांला मिळालं. आम्हांला शाळेत बोलावलं जाई. मुलं आमच्याशी गप्पा मारत. आम्हांला शेकडो प्रश्न विचारत आणि आम्हांला त्यांच्यात सामावून घेत. आम्ही त्यांना भरभरून आनंद दिला, याचं समाधान आमच्या गाठीशी आहे.’’
या दाम्पत्याचे कृतार्थ उत्तर ऐकताना मला प्रश्न पडला होता, आपण मराठी माणसांनी त्यांना काय दिले? त्यांना भेटून निघाल्यानंतर मला जणू वाटत होते, हे दाम्पत्य एका बेटावर राहते आहे. ते त्यांच्या बेटावर सुखात आहेत. त्यांची कुणाकडून कसलीही अपेक्षा नाही की आपण केलेल्या डोंगराएवढ्या कामाबद्दल आपले कुणी कौतुक करावे, अशी इच्छा नाही.
‘ठकठक’ आम्हांला प्रचंड आवडायचे, पण त्याने आम्हांला काय दिले हे मात्र आम्हांला आजही नीटसे सांगता येत नाही. आम्ही सामूहिक विस्मृतीच्या प्रदेशात वावरणार्‍या पिढीचे प्रतिनिधी आहोत. ‘फारच छान’, ‘वा’,‘चांगले होते’, ‘सुंदर दिवस होते ते’… यांपलीकडे व्यक्त होण्याचीही आमची तयारी नाही. आमच्याकडे व्यक्त होण्यासाठी शब्द उरलेले नाहीत. आमच्याकडे तेवढा वेळही नाही. ‘ठकठक’चे बंद होणे हे एका नियतकालिकाचे अपयश नाही. प्रामाणिकपणे काम करत राहून मुलांच्या प्रेरणा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नांनाच आलेले ते अपयश आहे.
आम्हांला ‘ठकठक’चे महत्त्व कळलेच नाही. ज्या गोष्टींनी आमचे मनोरंजन केले, आमचे कुतूहल शमवले, आमच्या जिज्ञासा जाग्या केल्या; त्या गोष्टींना आम्ही एक साधी केबल आल्यानंतर पुरते विसरलो. पुरत्या दशकभराचीही वाट न पाहता.
– पंकज भोसले
pankaj.bhosale@gmail.com
***
ठकठकची मुखपृष्ठचित्रे : तोरसकर दाम्पत्याकडून
इतर चित्रे : फेसबुकावरून
बालसाहित्यांक २०१७ लेख

समारोप

बालसाहित्यांकाची  सुरुवात करताना तीन टप्पे मनाशी होते.
काल
लहानपणीच्या अनेक आनंदांच्या आठवणी पुस्तकाशी निगडित असल्यामुळे आपल्या पिढीनं कायम केलेलं स्मरणरंजन. ‘वाचन म्हणजे लै भारी महाराजा, प्रश्नच नाही’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया, वाचन म्हणजेच उत्तम संस्कार अशी गाढ समजूत, पुस्तकाबद्दलचा एक भाबडा भक्तिभाव… या सगळ्या गोष्टी ज्या स्मरणरंजनातून उद्भवतात, ते स्मरणरंजन. स्मरणरंजनाला टाकाऊ समजण्याची चाल अलीकडे आलेली असली, तरी त्याचे म्हणून काही फायदे असतातच. परंपरेचा ओघ न बिघडवता तिला शक्य तितक्या डौलदारपणे वर्तमानात आणण्याचं ते साधन असतं. आपल्याला सगळ्यांनाच ‘आमच्या काळी’छापाच्या गप्पा बोला-ऐका-लिहा-वाचायला मज्जा येते, ती उगाच नव्हे. त्या दृष्टिकोणातून लहानपणीच्या वाचनाकडे पाहण्याचा एक टप्पा होता.
आज 
आपली पोरं-पोरी, भाचरं, पुतण्ये-पुतण्या, नातवंडं… ही सगळी समकालीन बालमंडळी वाचन या गोष्टीला किती महत्त्व देताहेत, ते रोखठोक दर्शवणारा समकाल. बालसाहित्यात आज काय परिस्थिती आहे? संख्यात्मक, दर्जात्मक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय निकष लावून तपासून पाहिलं, तर मराठी बालसाहित्यात काय चाललेलं दिसतं? खरोखरच चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे का? असल्यास त्यावर नक्की कोणते उपाय आहेत? या गोष्टी तपासून पाहणारा हा टप्पा होता.
उद्या
बालसाहित्य या गोष्टीच्या भवितव्याचा विचार म्हणजे अखेरशेवट साहित्याच्याच भवितव्याचा विचार. आज बालवाचक असलेले लोक उद्या सज्ञान वाचक असणार आहेत. उद्या ते वाचणार आहेत का? ते वाचू इच्छितात का? कोणत्या माध्यमांतून? जर हे माध्यम पुस्तक नसणार असेल, तर आपल्याला ते चालणार आहे का? जर ज्ञान आणि पुस्तक यांच्यात अद्वैत नसेल, तर का चालू नये? जर मतलब ज्ञानसंस्कृतीशी असेल, तर ती पुस्तकातून आली काय किंवा चित्रफितीतून आली काय, आपल्याला नक्की अडचण काय आहे? या सांधेबदलाचे नक्की कोणते तोटे असू शकतील? अशा प्रकारचे ‘सैतानी’ प्रश्न उघड्या डोळ्यांनी विचारणारा हा टप्पा होता.
या टप्प्यांचा विचार करूनच ‘तेथे लव्हाळी वाचती?’ असं काहीसं आशावादी, पण काहीसं प्रश्न उपस्थित करणारं शीर्षक अंकासाठी निवडण्यात आलं होतं.
हे तिन्ही टप्पे पेलण्यात आम्हांला पूर्णतः यश आलं का? याचं उत्तर संमिश्र आहे.
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरलो. खेड्यामधल्या आणि शहरामधल्या वाचनाच्या आठवणी, वाचनात बुडून जाण्याचा आनंद, वाचनाच्या काठाकाठानं हिंडत अनेक विषयांना स्पर्श करता येणं आणि समृद्ध होणं, वाचनातून लेखनाकडे – अर्थात निष्क्रिय आस्वादातून सक्रिय निर्मितीकडे जाणं… अशा अनेक प्रकारे आम्ही ‘काल’चा वेध घेऊ शकलो. दुसर्‍या टप्प्यावरही फार निराशा झाली नाही. आमच्या सर्वेक्षणातून हाती आलेली आकडेवारी आणि निष्कर्ष; निदान पुण्यामुंबईसारख्या शहरांतून तरी मराठी वाचणारी टीन एजर मुलं शोधताना आलेली निराशा; तरीही निराळ्या भाषेत, निराळ्या गावात वाचनाची आवड टिकून असण्याच्या आश्वासक खुणा; बालसाहित्याच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय बाजूंबद्दल अनेकांनी उपस्थित केलेले रोखठोक सवाल… या सगळ्यासकट आम्ही समकालाचं एक यथातथ्य चित्र उभं करू शकलो. असं लक्ष्यात आलं, की मराठी बालसाहित्याच्या सद्यकालीन परिस्थितीपेक्षा भूतकाळ थोडा बरा होता. हे नॉस्टॅल्जियामुळे झालेलं मत आहे, की खरोखरच माध्यमस्फोटापूर्वी पुस्तकांना बरे दिवस होते, हे ठरवता येणं कठीण आहे. पण आज मुलं जितकी पुस्तकं वाचतात, त्याहून जास्त तीसेक वर्षांपूर्वी वाचत असावीत असं म्हणायला जागा आहे. तेव्हाही मराठी बालसाहित्यात सगळं काही आलबेल सुरू होतं असं नव्हेच. पण मधल्या काळात झालेल्या आर्थिक-सामाजिक-राजकीय-भाषिक बदलांच्या काळात मराठी बालसाहित्याची पुरती दाणादाण उडालेली आहे. मुलं वाचताहेत, नाही असं नाही. पण इंग्रजीनं याही प्रांतात हातपाय पसरलेले आहेत. याच्याशी जुळवून घेणं हे मराठी बालसाहित्यापुढचं आणखी एक आव्हान आहे.
तिसर्‍या टप्प्याला भिडणं मात्र आम्हांला काहीसं जड गेलं. ‘स्टोरी वीव्हर’ या संपूर्ण नव्या माध्यमातून पुस्तकाकडे पाहणार्‍या प्रयोगाचा अपवाद वगळता आम्ही ‘उद्या’चा वेध घेऊ शकलो नाही. वास्तविक माधुरी पुरंदरेंच्या (प्रकाशित न करता आलेल्या) मुलाखतीत एक कळीचा मुद्दा होता. आठवणी उगाळत न बसता, आजूबाजूच्या भोवतालाला नैसर्गिकपणे भिडणं आपल्या बालसाहित्यात नाही, हेच तर मराठी बालसाहित्याच्या अपयशाचं प्रमुख कारण नाही ना, असा तो मुद्दा होता. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. जर आजचं वास्तव पुस्तक या एकतर्फी, अचल (static), संथ माध्यमाशी जुळणारं नसेल; आणि या माध्यमातून निर्माण होणारं साहित्य माध्यमाच्या मर्यादांवर मात करत आजच्या वास्तवाला भिडण्याची ताकद बाळगून नसेल; तर कुणी ते का वापरावं, त्यातून नक्की कुणाचं नि काय भलं साधणार आहे असे मूलभूत प्रश्न त्यातून निर्माण होत होते. त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करताना इतरही काही अनुत्तरित प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली असती. पण आम्ही या प्रश्नापर्यंत पोहोचू शकलो नाही, हे इथे कबूल करणं भाग आहे.
तरीही – हा उपक्रम राबवायला अतिशय मजा आली, हे निराळं सांगायला नकोच.
या विषयाच्या शक्य तितक्या बाजू तपासण्याचा प्रयत्न करताना, ठरलेल्या तारखेचा धाक सांभाळताना, शक्य तितक्या अचूकतेचा ध्यास घेताना, पुन्हा-पुन्हा पुन्हा-पुन्हा सुधारणा करत राहताना – काही वाद, काही संवाद, आणि काही वादंगही झाले! पंकज भोसले यांनी ‘रेषेवरची अक्षरे’च्या संस्थळासमोर हा प्रस्ताव ठेवल्यापासून अंक प्रकाशित होईपर्यंत अनेक चढ-उतार आले. सहभागी होणारे लोक बदलले, गळाले, वाढले. कधी जाणूनबुजून समजूनउमजून विषयांत बदल केला, कधी उपलब्ध माहितीनुसार आपोआपच विषयांत बदल झाले. तांत्रिक मदतीच्या गरजा बदलल्या. चित्र आणि सजावट यांच्या मूळच्या कल्पना बदलत गेल्या.
या सगळ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर आम्हांला मदत करणार्‍या आमच्या मुद्रितशोधकांचे, चित्रकारांचे, तांत्रिक सल्लागारांचे, सजावटकारांचे आणि भाषांतरकारांचे आभार तर आम्ही मानतोच आहोत; पण संकल्पना सादर करणार्‍या पंकज भोसले यांचेही इथे आभार मानतो आहोत. इथून पुढेही असे एकेका विषयसूत्राला वाहिलेले, नवनवीन प्रयोग करणारे दर्जेदार अंक आम्ही देत राहू, अशी आशा आहे. अंकाच्या मुखपृष्ठासाठी आणि अंतपृष्ठासाठी आपली रसरशीत चित्रं देऊ करणारी बालचित्रकार सिया बांगडे आणि आपल्या वाचनानुभवाबद्दल लिहिताना थक्क करणारी भाषेची समज नि प्रगल्भता दाखवणारे बालवाचक – मंदार सुतार आणि साची देशपांडे – यांचे आम्ही विशेष ऋणी आहोत.
सरतेशेवटी – वाचक म्हणून तुम्हांला या अंकातून काय मिळालं? काही आनंदाचे क्षण, काही डोळे उघडायला लावणारे विचार आणि काही अस्वस्थ करणारे प्रश्न… हे सगळं मिळालं असेल, तर अंक यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. तसं असेल तर आणि तसं नसेल तरीही –  तुमच्या प्रतिक्रियांचं आणि सुचवण्यांचं मनापासून स्वागत आहे.
अंकाच्या मूडला साजेशा अशा एका कवितेनं समारोप करणं उचित होईल. हॅप्पी दिवाळी!
– संपादक
***
उघडावे कवाड
टिपावे उजेड
वाचावे सकळ
डोळसपणीं
येकेक वस्तू निरखावी
स्पर्शे-गंधें आकळावी
नादे-रसें अनुभवावी
मुक्तपणीं
सोडावे चित्त मोकाट
दौडवावी कल्पना फुफांट
करावे अवकाश उफराट
पिसाटपणीं
मग जे सामोरे ठाकते
ते ते बहुतांसी खुणावते
आत आत काही जुळते
आपसुखीं
– अमुक
***
मितीचा खेळ, सिया बांगडे

 

 

बालसाहित्यांक २०१७ लेख

‘अबब! हत्ती’ – मराठी बालसाहित्यातील एक बेदखल प्रयोग

‘अबब! हत्ती’ची सुरुवात खरंतर अपघाताने झाली. म्हणजे असं, की ‘आजचा चार्वाक’ ह्या दिवाळी अंकाचं लहान भावंड या स्वरूपात ‘हत्ती’ जन्माला आला. पण त्याआधी ‘आजचा चार्वाक’ची सुरुवातदेखील अशी ‘बातों बातों में’च झाली होती. तर तिथपासून सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडं मागे जावं लागेल.
त्याचं झालं होतं असं, की ‘जनता सरकार’ची राजवट आल्यानंतर समविचारी मंडळींकडून कधी नाही ते ‘आपलं राज्य’ आल्याच्या उत्साहात आणि ‘माये’पोटी ‘दिनांक’ ह्या साप्ताहिकाचा जन्म झाला होता. त्यात सुमारे २०-२५ मंडळी सक्रिय होती. दररोज संध्याकाळी ग्रँटरोडच्या ‘दिनांक’च्या कार्यालयात अंकाच्या आखणीच्या निमित्ताने चांगलीच वर्दळ असायची. त्यात आम्ही बँकवाले पाच-सात जण असायचो. तेव्हा बँकांमध्ये शनिवारी हाफ डे असायचा. त्यामुळे शनिवारी दुपारी तर तिथे गप्पागोष्टींची मस्त मैफल जमायची. राजकारण, समाजकारण, संस्कृती, परंपरा, क्रीडा, अर्थकारण, नाटक-सिनेमा-साहित्य-चित्र-संगीतादी कला अशा अनेक विषयांवर तिथे झडझडून चर्चा व्हायच्या. त्यामुळे शनिवार हा आमच्या लेखी ‘चंगळवार’ होता. पुढे जनता सरकारचं राज्य कोलमडलं आणि तात्कालिक वा नैमित्तिक कारणं वेगळी असली, तरी फंड आणि उत्साह यांच्याअभावी साप्ताहिक ‘दिनांक’देखील यथावकाश बंद पडलं. तिथल्या मंडळींची पांगापांग झाली.
आम्ही सारे तेव्हा २५४०च्या वयोगटातले होतो. ‘दिनांक’मधल्या अनुभवाच्या शिदोरीवर प्रत्येकाला काही ना काही करायची सुरसुरी होतीच. थोडे आधीच बाहेर पडलेले निखिल वागळे, मीना कर्णिक, द्वारकानाथ संझगिरी, कपिल पाटील वगैरेंनी ‘अक्षर’ हा दिवाळी अंक, ‘चंदेरी’ हे सिनेसाप्ताहिक आणि ’षटकार’ हे क्रीडा साप्ताहिक सुरू केलं होतं. त्याचाच विस्तार नंतर ‘महानगर’ आणि ’आज दिनांक’ ही सायंदैनिकं सुरू होण्यात झाला. विनायक पडवळने ‘भरतशास्त्र’ हे नाटकाला वाहिलेलं नियतकालिक आणि ‘स्पंदन’ हा दिवाळी अंक सुरू केला. राजन पडवळ ह्या विनायकच्या भावाने ‘बखर’ नावाचा दिवाळी अंक सुरू केला. नंतर विनायक पडवळने काही वर्षं साप्ताहिक ‘श्री’चं संपादन करून पुढे ‘करू टवाळकी’ हे मासिक सुरू केलं. ‘साप्ताहिक दिनांक’मधून निपजलेल्या ह्या नियतकालिकांच्या पिलावळीने नंतर माध्यमांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. ही वंशावळ तशी लोभस आहे. तर ह्या अंकांमध्ये कुठे ना कुठे लिहायची निकड म्हणा, हौस म्हणा, पूर्ण व्हायची. पण शनिवारी गप्पांचा फड जमवायची आम्हा बँकवाल्यांची हौस काही त्यातून भागेना!
मग आमचा गप्पांचा अड्डा हळूहळू दर शनिवारी फोर्टमधल्या ‘कॅफे मोकॅम्बो’मध्ये जमू लागला. त्यात आम्ही (मी, हेमंत कर्णिक, गोपाळ आजगांवकर), युसुफ शेख, विश्वास पाटणकर, सुधीर प्रधान, सुरेश पाटोळे वगैरे ‘बँक ऑफ इंडिया’वाले ‘दिनांकीय’ असायचे; तसेच सुनील तांबे, विजय तांबे, गणेश जगताप हेदेखील असायचे. मेघनाद कुलकर्णी, नीलकंठ कदम असे काही पाहुणे कलाकारदेखील यायचे. साधारण साताठ तास हा बीअरयज्ञ सुरूच असायचा. त्यात युसुफ, विश्वास वगैरे सहसा प्यायचे नाहीत. पण गप्पांमध्ये मात्र सगळे सामील व्हायचे. तल्लख हास्यविनोद व्हायचे. बौद्धिक-वैचारिक बोललं जायचं. भन्नाट अनुभव सांगितले जायचे.  मतभिन्नता असल्यामुळे हिरिरीने वाद घातले जायचे. एकुणात आकंठ मजा यायची.
‘दिनांक’मध्ये आम्ही जे वीसेक जण होतो, त्यांची स्वारस्यक्षेत्रं वेगवेगळी होती. आमचा गट हा साहित्याशी जास्त निगडित होता. आम्ही ‘मोकॅम्बो’त बसायला लागलो, तेव्हा ‘सत्यकथा’ बंद पडून तीनचार वर्षं झाली होती आणि हळूहळू दर्जेदार वाङ्मयीन मासिकाची उणीव जाणवू लागली होती. ‘मौजे’च्या अभिरुचीविरुद्ध कितीही झोड उठवली असली, तरी ‘सत्यकथे’च्या निष्ठेविषयी मनामध्ये आदर होताच. आम्ही जरी ‘साठोत्तरी’ म्हणवल्या जाणार्‍या जाणिवेला जास्त महत्त्व देत असलो, तरी आमच्या आवडीचे अनेक लेखक हे ‘मौजे’चेच होते. वास्तववाद व देशीवाद ह्याबाबत आमच्यात आपापसांत कमी-जास्त ओढ असली, तरी त्यातला ठिसूळपणा बहुतेकांना जाणवत असल्यामुळे आपण काहीतरी वेगळ्या जाणिवेचं साहित्य वाचकांना देऊ शकू अशी आम्हांला आशा होती. सत्यकथा, युगवाणी, अनुष्टुभ ही साहित्यिक, आणि नवभारत, समाज प्रबोधन पत्रिका ही सामाजिक नियतकालिकं आमच्यासमोर होती.
थोडक्यात सांगायचं तर साप्ताहिक ‘दिनांक’चा अनुभव आणि ‘सत्यकथे’मुळे निर्माण झालेली वाङ्मयीन व्यासपीठांची पोकळी ह्यांतून मराठी साहित्यात काहीतरी भरीव करावं, अशी कल्पना त्या बीअरयज्ञामध्ये आमच्या बोलण्यात वरचेवर येऊ लागली. त्यातून मासिक, द्वैमासिक वगैरे शक्यतांचा विचार करत आम्ही दिवाळी अंकाने सुरुवात करून नंतर मासिकाकडे वाटचाल करण्याच्या कल्पनेवर स्थिरावलो. दिवाळी अंकांना जाहिराती मिळण्याची शक्यता असल्यामुळे ते जास्त परवडणारं होतं.
बर्‍याच दिवसांच्या चर्वितचर्वणानंतर एक दिवाळी अंक काढण्याचं पक्कं झालं. ज्याचं नाव कुणाला सुचलं वगैरे काही आठवत नाही आणि असे सर्वच तपशील आठवणं तसं महत्त्वाचंही नाही. ह्याचं कारण ती शेवटी एक सामूहिक कृती होती आणि श्रेय वगैरे तेव्हा कुणाच्याही डोक्यात नव्हतं. आज जसं करिअरला महत्त्व आहे, तसं तेव्हा बेदरकारीला महत्त्व होतं. मात्र मराठीमध्ये आपण एक वेगळी अभिरुची जोपासू या असं भान सगळ्यांनाच होतं. ढोबळ मानाने ह्या अभिरुचीचं स्वरूप असं होतं, की मराठीमध्ये साहित्य काय किंवा वैचारिक लेखन काय, एकूणच भावुकतेवर भर आहे आणि बौद्धिकतेला फारसा थारा नाही. तर हे चित्र बदलण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करणे, ललित लेख या बोकाळलेल्या अल्लड-लडिवाळ प्रकाराला पायबंद घालण्यासाठी सज्जड वैचारिक लेखांचं पुनरुज्जीवन करणे, परंपरेवर केवळ हल्ले चढवायचा आततायीपणा करण्याऐवजी तिची रीतसर चिकित्सा करणे आणि साहित्यातदेखील कल्पकतेला वाव देणार्‍या कलाकृती बव्हंशाने प्रकाशित करणे असं डोक्यात होतं. सुदैवानेच म्हणायला हवं; त्या वेळी श्याम मनोहर, कमल देसाई, भाऊ पाध्ये, अनिल डांगे वगैरे फिक्शन लेखक आणि वसंत पळशीकर, मे. पुं. रेगे, विश्वनाथ खैरे आदि वैचारिक मांडणी करणारे बुजुर्ग लेखक ह्यांच्याबरोबर आम्हां मंडळींची आजवरच्या वाटचालीमुळे जवळीक होती. आम्हांला प्रायोगिक साहित्यच हवं होतं. पण ते केवळ देशीवादी वा वास्तववादी नको होतं, तर महानगरी आणि जागतिक भान असलेलंदेखील हवं होतं. तर ह्यासाठी ’चार्वाक’ हे नाव सुचणं अगदी सयुक्तिकच होतं. ‘चार्वाक’ हे नाव आधीच कुणीतरी पटकावलेलं असल्यामुळे नावनोंदणीच्या दृष्टीने त्याला ’आजचा’ हे बिरुद जोडावं लागलं. आणि तेही तसं सयुक्तिकच होतं.
थोडक्यात सांगायचं, तर ‘आजचा चार्वाक’चं संपादकीय धोरण वा उद्दिष्ट हे सुजाण वाचकांसाठी एक प्रयोगशील दिवाळी अंक सुरू करणं हे होतं, ज्यासाठी मजकूर मिळवण्याच्या पातळीवर आमची पुरेशी तयारी होती. मात्र त्याची तांत्रिक बाजू, अर्थकारण ह्याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. उत्साहाच्या भरात आम्ही कामाला लागलो. साप्ताहिक ‘दिनांक’पासून असलेले आमचे हितचिंतक आणि मित्रांचा फौजफाटा हेदेखील आम्हांला हातभार लावण्यासाठी तैनात होताच. त्यामुळे जाहिराती मिळवणं तितकंसं जड गेलं नाही. एकूण पहिल्या अंकातच अर्थकारण जमून गेलं. परंतु तांत्रिक बाजूकडून आम्ही लंगडे ठरलो आणि आमचा पहिलाच अंक दिवाळीनंतर तब्बल आठवड्याभराने आला. त्यामुळे खपाकडून तो अंक काहीसा लंगडा ठरला. परंतु त्याला मुंबई मराठी पत्रकार संघाचा सर्वोत्कृष्ट अंकासाठी दिला जाणारा पुरस्कार मिळाला आणि आपल्या वेगळ्या स्वरूपामुळे हा अंक चांगलाच चर्चेत आला. तरीही हे कबूलच करायला हवं, की खपाच्या दृष्टीने पोषक ठरण्यासाठी अंक जेवढ्या आधी बाजारात यायला लागतो; तेवढ्या आधी ‘चार्वाक’च्या शेवटच्या – म्हणजे अगदी दहाव्या – अंकापर्यंत एकही अंक बाजारात आला नाही. मात्र ‘चार्वाक’च्या पहिल्याच अंकामध्ये आम्हांला सुमारे पंधरा हजार रुपये फायदा झाला. ह्याचे श्रेय अर्थातच मित्रमंडळींच्या आणि हितचिंतकांच्या कृपेने मिळालेल्या जाहिरातींना होतं, खपाला नव्हतं.
हे जरी असलं, तरी वर सांगितल्याप्रमाणे ’चार्वाक’चा पहिलाच अंक हा चोखंदळ मराठी वाचकांच्या मर्जीला उतरला आणि त्याचा बर्‍यापैकी बोलबाला झाला. त्यामुळे आमचा हुरूप अर्थातच वाढला. आणि अंकाविषयीच्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने तेव्हा झालेल्या चर्चेतून असा एक सूर निघाला, की आपण जी अभिरुची आणि धारणा मराठी साहित्यात रुजवू पाहत आहोत ती सहजी स्वीकारली जाणं हे तसं दुरापास्त आहे आणि त्यासाठी वाचकांची अभिरुची जोपासायची सुरुवात बालपणापासून करायला हवी. अर्थातच एकविसाव्या शतकात  जगामध्ये ज्या उलथापालथी घडल्या आणि जग जे स्क्रीनमय झालं, ते विचारात घेता हा कयास आता भाबडाच वाटतो ते वेगळं! गंमतीत सांगायचं, तर आपल्याला प्रगल्भ वाटणारा वाचक घडवायची सुरुवात बालपणापासूनच करायला हवी हे आमचं वाटणं, ज्यांना आम्ही लहानपणी ’पोरं पकडायची गाडी’ असं हिणवायचो,  त्या ‘आरेसेस’च्या धर्तीवर होतं.   
‘आजचा चार्वाक‘च्या पहिल्या अंकाच्या गंगाजळीतून लेखकांची मानधनं आणि सर्वच खर्चांची बिलं रीतसर चुकती केल्यानंतर झालेला फायदा हा कनवटीला लावण्याची इच्छा कुणालाही नसल्यामुळे त्यातून पुढच्या वर्षी लहान मुलांचा दिवाळी अंक काढून त्यानंतर लहान मुलांसाठी  मासिक सुरू करायचं हे नक्की झालं. थोडक्यात ‘नानास भावंड जाहले’ ह्या चालीवर म्हणायचं, तर ’अबब! हत्ती’चा जन्म हा ’आजचा चार्वाक’चा लहान भाऊ या स्वरूपात झाला. १९९०च्या दिवाळीमध्ये सुप्रसिद्ध चित्रकार बद्रीनारायण ह्यांच्या लालगडद हत्तीचं मुखपृष्ठ घेऊन ‘अबब! हत्ती’ दिवाळी अंकांच्या बाजारात दिमाखात अवतरला.
ह्या पहिल्या अंकामध्ये ज्यांचा वाटा आहे, त्या लेखकांची नावं द्यावीशी वाटतात; कारण त्यातून ‘अबब! हत्ती’चे पाळण्यातले पाय दिसून येतात. शाहीर पांडुरंग माळी, स. गं. मालशे, कमल देसाई, श्रीराम लागू, रमेश रघुवंशी, नीलकांती पाटेकर, उर्मिला पवार, रघुवीर कुल, विश्वनाथ खैरे, वसंत आबाजी डहाके, ज्योत्स्ना कदम, सुचेता भिडे-चापेकर, पंडित विद्यासागर, मारुती चितमपल्ली, निर्मला देशपांडे, वीणा गवाणकर, मनोहर शहाणे, आशापूर्णादेवी, देवदत्त साबळे, रिचर्ड फाइनमन, सिसिलिया कार्व्हालो, विभावरी कुलकर्णी, मंगला नारळीकर, नरेश कवडी, राहुल पुरंदरे, सुनील तांबे, मुग्धा, अदिती, मदन गोकुळे. ह्याची सजावट केली होती, ती यशोदा वाकणकर आणि सचिन रास्ते ह्यांनी. ही यादी वाचून तुम्हांला कळलं असेलच, की ह्यांतले कुणीही ‘बालवाङ्मयातील नेहमीचे यशस्वी’ म्हणतात तशातले लेखक नव्हते. किंबहुना ह्यांतल्या बहुतेकांना आम्ही लहान मुलांसाठी लिहायची गळ प्रथमच घातली होती. ह्यापुढच्या अंकांत चक्क भाऊ पाध्ये, निखिल वागळे वगैरेंनीही लिहिलं. ह्यामध्ये आमचा हेतू मुलांना अनुभवांच्या, मांडणीच्या, अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या शैलींची ओळख करून देऊन बालसाहित्याच्या कक्षा विस्तारणं हा होता. आम्हांला मुलांचं मनोरंजन तर करायचं होतंच, पण त्यांच्यात मानवतावादी मूल्यं रुजवायची होती. भूतकाळाचा गौरव, इतिहासाबद्दलचा फाजील गंड, परधर्मीयांबद्दलचा थंड शत्रुत्वभाव अशा नकारात्मक गोष्टी टाळायच्या होत्या. प्रश्न विचारणं, पूर्वग्रहरहित निरीक्षणं करणं, विश्लेषण करणं यांना महत्त्व द्यायचं होतं. हे आम्ही कधी अधिकृतपणे बोललो वगैरे नाही, पण आमचं यावर न बोलताच एकमत होतं.
‘अबब! हत्ती’चं प्रयोजन बालसाहित्यामध्ये प्रयोग करणं हे होतं. मराठीमध्ये बालवाङ्मयाचं एकुणातच दुर्भिक्ष जाणवत होतं; शिवाय ‘टॉनिक’, ‘किशोर’, ‘चांदोबा’ वगैरे प्रस्थापित अंकांमधून दिल्या जाणार्‍या साहित्यापेक्षा वेगळं देण्याचाही आमचा प्रयत्न होता. मुलांसाठीचे अंक मुळात कमीच असल्यामुळे ‘अबब! हत्ती’च्या खपातून बरीच गंगाजळी उरली; तसंच ‘चार्वाक’च्या दोन दिवाळी अंकांतून – विशेषतः आमच्या स्नेही मंडळींच्या सहकार्यामुळे ज्या जाहिराती मिळाल्या, त्यांमुळे आमचा हुरूप वाढला आणि आम्ही मग मोठ्यांसाठी ‘चार्वाक’ आणि छोट्यांसाठी ‘हत्ती’ हे मासिक स्वरूपात आणण्याचा विचार करू लागलो. मराठी भाषक लहान मुलांची संख्या विचारात घेता आम्हांला जम बसवण्याच्या दृष्टीने ह्याची खातरी वाटली, की खपाचा विचार करता ‘चार्वाक’पेक्षा ‘हत्ती’ जास्त सोयीचा ठरू शकेल. मग ‘हत्ती’चा चांगला जम बसला, की त्या पैशांमधून आपण ‘चार्वाक’चं आधी द्वैमासिक आणि मग मासिक करू वगैरे वगैरे बेत!
दिवाळी अंकांचा आर्थिक व्यवहार पूर्ण व्हायला साधारण जानेवारी उजाडतोच. तर आम्ही ठरवलं असं, की आता परीक्षांचा काळ जवळ आला असल्यामुळे पालकांना मुलांचं पूर्ण लक्ष्य अभ्यासात असावंसं वाटत असणार. तर आपण आधी मे महिन्याचा एक सुट्टी अंक काढू आणि नंतर शाळा सुरू होताना ‘अबब! हत्ती’ मासिक स्वरूपात सुरू करू. झालं, आम्ही आमच्या हितचिंतकांबरोबरच कामाला लागलो. काळा घोडा इथल्या ’भारत हाऊस’ ह्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरच्या एका पोटमाळ्यावरचा एक पोटभाडेकरू ह्या स्वरूपात आमचा कारभार सुरू झाला. गप्पांच्या अड्ड्यासाठी छोटेखानी का होईना, हक्काची जागा तयार झाली.
शनिवारी ‘मोकॅम्बो’मध्ये जाणं तुलनेत खूपच कमी झालं!  
दिवाळी अंक काढताना आम्ही जाहिराती मिळण्यासाठी सोयीस्कर ठरणारा ए-फोर साइज कागद वापरला होता. तोच आकार मासिकासाठी सोयीचा ठरणं शक्य वाटलं नाही. मग विचार करता असं जाणवलं, की ज्या अर्थी लहान मुलांच्या मासिकांमध्ये जास्त जाहिराती ह्या ’चांदोबा’ ह्या आई-मुलांच्या मासिकाला मिळतात, त्या अर्थी जी जाहिरात-सामग्री तयार होते, ती ‘चांदोबा’च्या आकाराची असणार. तर आपणदेखील तोच आकार निवडावा. ‘अबब! हत्ती’चा आकार असा ठरला. पुढचा पेच मात्र काहीसा अवघड होता आणि अगदी खरं सांगायचं, तर तो शेवटपर्यंत कधीही नीटपणे सुटला नाही. तो म्हणजे वाचकांचा वयोगट ठरवणं. ‘चांदोबा’चं ह्या दृष्टीने कौतुक करायला हवं. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ’पत्र नव्हे मित्र’प्रमाणेच’ ‘आई-मुलांचे मासिक’ ही त्यांची टॅगलाईन त्यांची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित करणारी होती. आणि ‘चांदोबा’चं स्वरूप ह्या टॅगलाइनला साजेसंच होतं. त्यातल्या अनेक गोष्टी ह्या माध्यमिक शाळेतील मुलं आणि त्यांच्या घरातल्या आईवडलांनाच काय, पण आजी-आजोबांनादेखील रमवू शकणार्‍या होत्या.
बालसाहित्यात प्राथमिक शाळा – सुमारे चौथीपर्यंतची मुलं, पूर्व माध्यमिक शाळा – म्हणजे पाचवी ते सातवीपर्यंतची मुलं, आणि माध्यमिक शाळा – म्हणजे आठवी ते दहावीपर्यंतची मुलं; असे तीन वयोगट ढोबळमानाने जाणवतात. ह्या सगळ्यांना आपलासा वाटेल असा मजकूर एकाच मासिकात देणं ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे. मुलं भरभर वाढत असतात. मूल जितकं लहान तितका त्याचा वाढीचा वेग जास्त. पहिली, चौथी आणि सातवी या तीनही यत्तांमधल्या मुलांच्या आकलनांत मोठाच फरक असतो. त्यामुळे अंक नक्की कुणासाठी काढायचा हे ठरवणं फार जड जात असे. आज मागे वळून पाहताना असं वाटतं, की ‘हत्ती’च्या प्रयोगाच्या अपयशात वयोगटाविषयी नसलेली सुस्पष्टता हा एक महत्त्वाचा घटक होता. त्याऐवजी ‘हत्ती’ने जवळचं केलं ते द्वैभाषिक स्वरूप. जे इंग्रजी माध्यमाकडे असणारा वाढता कल पाहता काळाशी अनुरूप होतं. ‘अबब! हत्ती’च्या ४८ पानांपैकी पानं इंग्रजी मजकूर द्यायचं आम्ही ठरवलं आणि ह्या इंग्रजी मजकुराचा वयोगट बव्हंशाने माध्यमिक शाळेतला होता. बाकीच्या ४० पानांमध्ये आम्ही साधारणपणे पूर्व माध्यमिक ते माध्यमिक शाळांतल्या मुलांचा विचार करून मजकूर देत असू.
बालसाहित्यामध्ये सर्वसाधारणपणे अद्भुत आणि कल्पिताला जास्त आणि वास्तवाला कमी स्थान असतं. पण मराठी साहित्यात तेव्हा वास्तववाद प्रस्थापित होताना दिसत होता. त्या दृष्टीने आम्ही अंकात कल्पित आणि वास्तवाचा मेळ साधायचं ठरवलं. ह्यासाठी आम्ही मित्रांनीच कधी नाही ते बालसाहित्य प्रसवायला सुरुवात केली. ह्यातल्या इंग्रजी विभागातल्या गोष्टी लिहायची जबाबदारी हेमंत कर्णिकने एकहाती पार पाडली. लहानपणीच्या एरवी टारगटपणे सांगितल्या जाणार्‍या गोष्टी सुनील तांबेने अत्यंत खुसखुशीत शैलीमध्ये लिहिल्या. बालसाहित्यात लक्षणीय ठरेल अशी ‘झोपून अभ्यास’ ही त्याची ‘हत्ती’मधली गोष्ट अजूनही आठवते. विश्वास पाटणकरने कोकणातल्या बालपणाच्या अत्यंत रसाळ आठवणी आणि कल्पित कथादेखील लिहिल्या. ही तीन नावं चटकन आठवली म्हणून सांगितली. एरवी सुरेश परांजपेंसारखा विज्ञान लेखक ते  विश्वनाथ खैरेंसारखे परंपरा आणि संस्कृती यांचं वेगळं आकलन असणारे लेखक ‘हत्ती’करिता नित्यनेमाने लिहीत होते. ही नावंदेखील केवळ उदाहरणार्थ म्हणून आहेत. ५० अंक समोर ठेवून बसलं, तर लेखकांची ही यादी खूप मोठी होऊ शकेल.
ह्यातला गमतीचा भाग असा, की उदाहरणार्थ नावं घेऊन सांगायचं तर राजीव तांबे, अनंत भावे हे मुलांचे अत्यंत आवडते लेखक आमच्या अगदी घनिष्ट परिचयातले असूनही त्यांचं साहित्य आम्ही एखादा दिवाळी अंक वगळता क्वचितच प्रकाशित केलं असेल. ओ. पी. नय्यर ह्यांनी लता मंगेशकरना वगळून आपली अवघी संगीतदिग्दर्शनाची कारकीर्द सिद्ध केली, त्यातलाच हा प्रकार होता. ‘अबब! हत्ती’च्या अंकांमध्ये कोडी, उखाणे, विनोद ह्यांचीदेखील रेलचेल होती. त्यातही वेगळेपण राखायचा आमचा प्रयत्न असायचा. जसं शब्दकोडं असतं, तसं आम्ही अंककोडं सुरू केलं. म्हणजे गणिताची गोडी लागावी, सराव व्हावा, वगैरे उद्देश.  रामायण-महाभारत हे आपल्या संस्कृतीतले महत्त्वाचे ग्रंथ. त्यामुळे त्यांतल्या गोष्टी ह्या सर्वांना थोड्याबहुत प्रमाणात ठाऊक असतातच, हे लक्ष्यात घेऊन आम्ही रामायण-महाभारत कोडं हा प्रकार सुरू केला. मुलाला काही अडलं, तर त्यानं घरच्या वडीलधार्‍यांना त्याचं उत्तर विचारावं आणि त्यातून घरामध्ये चर्चेचं वातावरण तयार व्हावं हा हेतूदेखील होता. आम्ही केलेला आणखी एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे ‘अभ्यास -बिभ्यास’ हा विभाग. पुस्तकांपेक्षा अधिक ज्ञान हे आपल्या सभोवतालच्या जीवनात आहे, ह्याची जाणीव मुलांना करून देणं हा त्याचा हेतू होता. ह्या विभागाचं जे सुलेखन होतं, त्यातदेखील अभ्यास हा शब्द दुरेघी रेषांमध्ये पोकळ दाखवला होता, तर ’बिभ्यास’ हा शब्द दुरेघी रेषांमध्ये काळ्या रंगाने भरलेला होता. मार्कांनाच सर्वस्व समजणार्‍या पालकांना हे धार्ष्ट्य पचनी पडणं तसं काहीसं कठीणच होतं. साहजिकच ही एक जोखीम होती, पण ती तर आम्ही पहिल्या अंकापासूनच घेत आलो होतो. ‘हत्ती’च्या पहिल्याच अंकातला उर्मिला पवार ह्यांचा आपल्या शिक्षकांविषयीचा आणि पालकांविषयीचा उद्वेग उघडपणे सांगणारा लेख हा ‘मातृ देवो भव, गुरु देवो भव’ ह्या पारंपरिक धारणेला जोरदार धक्का देणारा होता. त्याविषयी काही पालकांनी नापसंतीदेखील दर्शवली होती. ‘मला लहानपणी मोठ्यांविषयी काय वाटायचं?’ असा एक भन्नाट विषय आम्ही एका दिवाळी अंकात घेतला होता.
‘हत्ती’तल्या मजकुरामध्ये मुलांचा सहभाग असावा ह्यासाठी आम्ही त्यांच्याकडूनही विनोद-कविता-गोष्टी वगैरे मागवायचो. गमतीचा भाग म्हणजे सचिन वानखेडे, संजय नारिंग्रेकर, दिनेश शिर्के हे आमचे टपाल हाताळणारे मदतनीस एवढे तरबेज झाले होते, की मुलांकडून येणार्‍या साहित्याची पहिली छाननी तेच करायचे आणि बहुतांश वेळा ती अचूकही असायची. तर ‘हत्ती’मधल्या मजकुराचा प्रश्न अशा रीतीने एकुणात मार्गी लागला होता.
मुलांच्या अंकासाठी मजकुराएवढीच सजावटदेखील महत्त्वाची असते. त्यात कल्पकता अत्यंत गरजेची असते. ‘अबब! हत्ती’ची मुखपृष्ठंदेखील चित्रकलेतील  वेगवेगळ्या शैलीचं दर्शन घडवणारी असत. ज्यांमध्ये बी. प्रभा, रघुवीर कुल, अरुण कालवणकर ते थेट नामदेव ढसाळ-मल्लिका अमरशेख ह्यांचा मुलगा आशुतोष ढसाळ, संभाजी व ज्योत्स्ना कदम ह्यांचा मुलगा शार्दूल कदम अशा वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या लोकांनी आपले कुंचले सरसावले होते. अंतर्गत सजावटीमध्ये ऋजुता घाटे, महेश परांजपे, महेंद्र दामले, अश्विन परुळेकर, अतुल मानकर वगैरेंचा मोलाचा हातभार असायचा. एकुणात काय, तर निर्मितीच्या बाबतीत ‘हत्ती’ स्वयंपूर्ण आणि संपन्न होता.  
राहता राहिला होता तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे आर्थिक प्रश्न. मुलांसाठीची उत्पादनं आज जागतिकीकरणानंतर जेवढ्या संख्येने उपलब्ध आहेत, तेवढी ती नव्वदच्या दशकामध्ये मुबलक नव्हती. कॅम्लिन, रावळगाव, पार्ले बिस्किट्स, नवनीत प्रकाशन, डी. एम. पाकिटवाला वगैरे मोजकी उत्पादनं तेव्हा मुलांच्या मासिकांमध्ये जाहिराती द्यायची. पण अशा जाहिराती मिळवण्यासाठी जाहिरात आणणारा माणूस नेमावा लागतो आणि  जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी मुळात तुम्हांला लक्षणीय ग्राहकाधार लागतो. तो मिळवण्यासाठी अंकाची जाहिरात करणं गरजेचं असतं. ह्यासाठी आम्ही प्रयत्न जरूर केले, पण ते फारच जुजबी होते. म्हणजे मराठी शाळांना पत्रं लिहिणं वगैरे. त्यातून थोडेबहुत वर्गणीदार मिळाले, तरीही ती संख्या जेवढ्या झपाट्यानं वाढणं अपेक्षित होतं, ते आम्हांला साधलं नाही. ह्याचं कारण म्हणजे बर्‍याच शाळांमधल्या सत्प्रवृत्त शिक्षकांना अशी धास्ती वाटायची, की आपण जर ह्या अंकाचा प्रसार केला तर आपल्याला ह्यातून काहीतरी आर्थिक लाभ हवा असेल अशी शंका तर पालकांना येणार नाही ना? आणि पालकांची मानसिकता तर मोठीच बुचकळ्यात पाडणारी होती. त्याच काळात दहा हजार रुपयांमध्ये ‘वर्ल्ड बुक’ नावाचं इंग्रजी भाषेतलं एक चकाचक पुस्तक हसतखेळत विकत घेणारे पालक ‘अबब! हत्ती’चा पाच रुपयांचा अंक विकत घेताना किंवा  अंकाची वार्षिक वर्गणी भरताना काचकूच करायचे. आपल्या मुलाला अभ्यासाव्यतिरिक्त एखादं पुस्तक विकत घेऊन देणं ही कल्पनाच आपल्याकडच्या पालकांना माहीत नसे. एक तर त्याला पैसे लागत, दुसरं म्हणजे अडगळ होई आणि तिसरं म्हणजे मुलाचा वेळ अशा ‘फालतू’ वाचनात फुकट जातो, असंही वाटे. त्याहून त्यानं अभ्यास – म्हणजे पाठांतर! – केलं तर त्याचा वर्गात वरचा नंबर तरी येईल, असं अनेक पालकांना वाटत असे. मराठीच्या नावाने गळे काढणारे लोक पाहिले की हे हटकून आठवतं.
ह्यासंबंधात आणखी एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. ‘अबब! हत्ती’चे अंक घेऊन आम्ही दर वर्षी साहित्यसंमेलनामध्ये एखादा स्टॉल टाकायचो. आणि तिथे काहीतरी विक्रीयोजना राबवून आमचे जुने अंक काढून टाकायचो. आमच्यासाठी हा एक मौजमजेचा भाग असायचा, कारण तिथे आम्ही साताठ जण एकत्र जायचो, त्यामुळे अर्थातच एक सहल तर व्हायचीच. पण फेरीवाल्यांसारखा आरडाओरडा करताना आम्हांला आनंद मिळायचा. संमेलनाच्या मंडपात आम्ही सहसा फिरकायचो नाही. पण त्या स्टॉलवर बसून टपोरीगिरी करणं ही एक भन्नाट मजा असायची. परळमध्ये वाढल्यामुळे मराठी संस्कृतीची जाण आणि प्रेम असलेल्या किशोर पांचाळ ह्या आमच्या मित्राने विक्रीसाठी जो काही कल्पक आरडाओरडा केला होता, तो त्या मंडपात मोठाच कौतुकाचा विषय बनला होता. संमेलनांमधल्या ह्या स्टॉलवर आम्ही अर्थातच वर्गणीदेखील स्वीकारायचो. ह्यासंबंधात असा अनुभव यायचा, की बरीचशी मराठी पालक मंडळी ही मुलामुलीनं हट्ट केला तरीही शक्यतो आमच्या स्टॉलकडे फिरकायचीच नाहीत. फिरकलीच, तर वर्गणी भरायचं टाळायची. ह्याउलट गावातले गुजराथी – विशेषत: मारवाडी समाजातली मंडळी – आवर्जून वर्गणीदार व्हायची. आपण ज्या गावात व्यापार करतो तिथली भाषा आपल्या मुलांना यायला हवी हे त्यांचं भान मराठी भाषकांच्या मातृभाषेच्या तिरस्काराच्या पार्श्वभूमीवर विशेषच उठून दिसायचं. तर अशा रीतीने आम्ही आमची वर्गणी मोहीम राबवून जाहिरातदारांचं लक्ष्य वेधेल एवढा विक्रीचा आकडा गाठेपर्यंत मजल मारली. स्टॉलवरचा खपदेखील दिसामासाने वाढत होता. त्यानंतर आम्हांला राजेश मनोचा नावाचा एक चांगला जाहिरात प्रतिनिधीही मिळाला, ज्याने काही वार्षिक कंत्राटं वगैरे आणायलाही सुरुवात केली. ‘अबब! हत्ती’चं  आता बस्तान बसणार अशी स्थिती तयार होत असतानाच एक अपघात घडला. तो म्हणजे  वैराग्याचा झटका येऊन, व्यवसाय बंद करून राजेश थेट हिमालयात वगैरे निघून गेला आणि ‘अबब! हत्ती’ची आर्थिक चणचण अधिकच वाढली. सध्या ‘प्रमोशन’वर जो खर्च केला जातो, तो विचारात घेता ‘अबब! हत्ती’ जाहिरात करण्यात कमी पडला हे मान्य करावंच लागेल. एकुणातच आमची कार्यपद्धती ही आजकाल ज्याला व्यावसायिक – ‘प्रोफेशनल’ म्हणतात तशी नव्हती.
दरम्यान आमच्या एका मित्रानं तब्बल पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत स्वयंस्फूर्तीने केली. आयुर्वेदिक उत्पादनं तयार करणार्‍या एका उद्योजक मित्राने त्याचं विक्रीकौशल्य वापरून हत्तीचा खप काही पटींमध्ये वाढवायचा प्रयत्न केला नि त्यासाठी आर्थिक गुंतवणूकदेखील केली. पण दोनतीन महिने प्रयत्न केल्यावर त्यानेदेखील हात टेकले आणि ‘ह्या मराठी मुलखात बाकी काहीही विकता येईल, पण पुस्तकं विकणं कठीण आहे’, असं नमूद करून त्यानं अंग काढून घेतलं. बाकी, वर्गणीचं नूतनीकरण हा सर्वच नियतकालिकांना जाणवणारा ताप आमच्याही वाट्याला आला होताच. संपादन, लेखन, मुद्रितशोधन, कागदखरेदी, छपाई, पत्ते घालून अंक पोस्टात पाठवणं, वर्गणी जमवणं, अंकांचे गठ्ठे इकडून तिकडे वाहून नेणं… अशी सगळी पडतील ती कामं न लाजता आम्ही करूनही तोटा वाढतच गेला. सुरुवातीला उत्साह होता, तोवर तोटाही आम्ही आनंदानं सहन केला. ज्या अर्थी तोटा होतोय, त्या अर्थी आपण ध्येयवादीपणे काम करतोय, असंही पहिल्या-पहिल्यांदा वाटायचं! पण शेवटी आमचे तिघांचे मिळून तीन-साडेतीन लाख रुपये ह्या प्रयत्नामध्ये खर्ची पडल्यानंतर आम्हांला ‘हौसेला मोल नसतं, तरी आर्थिक झळ सोसण्याला मर्यादा असते’ ह्या सत्याला सामोरं जात हा बालसाहित्यातला प्रयोग पन्नास अंकांनंतर आटोपता घेणं भाग पडलं.
हा प्रयोग सुरू करताना ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे’ वगैरे भावुकता आमच्यापैकी कुणाकडेच नसल्यामुळे हा प्रयोग थांबवताना आम्हांला कुणालाही गहिवर वगैरे अजिबात आला नाही. उलट ह्यातून जे शिकायला मिळालं ते महत्त्वाचं होतं. अक्कलखाती बरीच धनदौलत तयार झाली. पाठी वळून पाहताना सापडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या होत्या, की जिथे आर्थिक किंवा वेळेची किंवा ऊर्जेची गुंतवणूक करणं गरजेचं असतं, तिथे तांत्रिक व आर्थिक बाजूंवर व्यवस्थित विचार करायला हवा. त्यासाठी गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. केवळ हौस तर सोडूनच द्या, अगदी कळकळ-तळमळदेखील प्रयोग करण्यासाठी कामाची नसते. आणि ही चूक आम्ही थेट ‘चार्वाक’पासून करत आलो होतो. परिणामी ‘चार्वाक’देखील दहा वर्षांची वाटचाल करून बंदच पडला. कारण त्यामध्येदेखील आर्थिक तोशीस लावून घेणं कालांतराने परवडेनासं झालं. त्यात ‘हत्ती’चा खड्डा हा आमच्या आधीच जेमतेम असलेल्या अर्थकारणावर  बराच आघात करून गेला होता. आपल्याला अपेक्षित अशी अभिरुची लहानपणापासून रुजवण्याच्या ह्या भाबड्या प्रयोगात जर आम्ही पडलो नसतो, तर कदाचित ‘आजचा चार्वाक’ आम्हांला आणखीही काही वर्षं काढता आला असता. अर्थात त्याचीदेखील हळहळ फारशी नाहीच. जे आपल्याला करावंसं वाटतं, त्यातलं काही ना काही करून पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. तो आम्ही एकमेकांच्या संगतीत मिळवला. त्यात दहा वर्षं आम्ही एक कंपू म्हणून एकमेकांना भेटत, मौजमजा करत, थोडे समज-गैरसमज करून घेत घालवू शकलो ही ह्या प्रयोगाची जमेची बाजू होती. मात्र हा प्रयोग वरकरणी जरी वैयक्तिक-सामूहिक स्वरूपाचा भासला, तरी प्रत्यक्षात तो एका भाषकसमूहाचा प्रयोगदेखील होता. ह्यातून त्या भाषकसमूहाला काय मिळालं, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यादृष्टीने काही गोष्टी नोंदवाव्याशा वाटतात, त्या अशा –
हत्तीला सुरुवात केल्यानंतर पहिल्या वर्षी आम्हांला बाल-कुमार साहित्याच्या व्यासपीठावर – चुकूनमाकून का असेल पण – जायची संधी मिळाली होती, पण आम्ही बालसाहित्यामधल्या प्रस्थापित मंडळींना ‘अबब! हत्ती’मध्ये स्थान दिलं नाही आणि त्यांनी ‘हत्ती’ला कधीही आपलं मानलं नाही. आणि ही चूक तशी दोन्हीकडून झालेली म्हणायला हवी. ‘हत्ती’साठी सुमारे पाच वर्षं बालसाहित्य लिहूनही आमच्यापैकी कुणीही नंतर बालसाहित्य लिहिलं नाही. आमची बांधिलकी बालसाहित्याशी नव्हती, तर आमच्या प्रयोगाशी होती हेच यातून दिसतं, हे कबूल करावंच लागेल. पण मुद्दा असाही येतो, की ह्या पन्नास अंकांमधून प्रकाशित झालेल्या सुमारे अडीच हजार पानी साहित्यातून किमान पंधरा-वीस पुस्तकं सहज तयार होऊ शकतात; पण त्यासाठी कुणीही प्रकाशक किंवा मध्यस्थ आमच्याकडे गेल्या दहा वर्षांमध्ये कधीही आला नाही. असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल, की तुमच्याकडून असे प्रयत्न का नाही झाले? तर तेही योग्यच आहे. पण ह्याचा अर्थ ’आपला घोडा आपणच पुढे दामटायचा अशी संस्कृती आपण जोपासतो आहोत’ हे मान्य करावं लागेल. बरं, बालसाहित्य हा काही तसा गजबजलेला प्रकार नव्हे. तेव्हा नवनवीन पुस्तकं शोधणं ही एक समाज म्हणून आपली जबाबदारीच असायला नको का? दुसरा मुद्दा येतो, तो बालसाहित्यातल्या जागल्यांचा. हा प्रयोग बंद झाल्यानंतर बालसाहित्याबद्दल जे काही आढावा स्वरूपाच्या संकलनाचे प्रयत्न झाले, त्यामध्ये ह्या प्रयोगाची  दखल कुणीही घेतल्याचं आढळले नाही. हे आपल्या सांस्कृतिक भानावर प्रकाश टाकणारं आहे. एकूण ‘अबब! हत्ती’हा प्रयोग बेदखल राहणं ही आम्हांला आपली सांस्कृतिक अनास्था वाटते.  
हा लेख केवळ आठवणीतून लिहिला आहे. समोर सगळे अंक घेऊन बसलो, तर आणखीही पानंच्या पानं लिहिता येतील. आणि खरंतर असं दस्तावेजीकरण हे गरजेचं आहे, कारण दस्तावेजीकरणावाचून फसलेले आणखीही काही प्रयोग असतीलच. समाज सजग होण्याच्या दृष्टीने अशा नोंदी कधी का कधी कुणा ना कुणाच्या कामाला येऊ शकतात. आज इंटरनेटच्या जमान्यात असे प्रयोग करणं तुलनेनं सोपं आहे. अशा प्रयोगकर्त्यांना आमचे अनुभव कदाचित मदत करू शकतील. असो. ह्या बाबतीतलं एकच उदाहरण देतो आणि थांबतो.
मासिक हे त्याच्या कालावधीपुरतं सीमित काळ विक्रीसाठी मांडलं जाऊ शकतं. नंतर ते शिळं होतं. वास्तविक पाहता ‘हत्ती’सारखं मासिक हे काही तात्कालिक घटनांशी संबंधित नसतं, त्यामुळे ते शिळं होण्याची खरंतर काहीच गरज नसते. पण वाचकांची मानसिकता तशी असते हे खरं. अंकाच्या खपाचा विचार करताना साधारण मधल्या टप्प्यावर ही अडचण आम्हांला जाणवली. मग आम्ही तडजोड म्हणून अंकांच्या मुखपृष्ठावर महिन्याऐवजी अंक क्रमांक छापायला सुरुवात केली. ज्यामुळे तो अंक महिनाभरात शिळा व्हायची शक्यता थोडी का होईना, कमी झाली. अर्थात तेदेखील तसं जुजबीच म्हणायला हवं. ह्या दोन अंकांमध्ये – विशेषतः ‘हत्ती’मध्ये – जी गुंतवणूक आम्ही केली, त्यातून जर मासिकांऐवजी पुस्तकं काढली असती, तर ती दीर्घकाळपर्यंत बाजारात राहिली असती अशी पश्चातबुद्धी आज होते. पश्चातबुद्धी ही केवळ ज्याची त्याला नव्हे, तर इतरांनाही कामाची ठरू शकते. म्हणूनच ह्या फसलेल्या प्रयोगातले महत्त्वाचे मुद्दे लिहावेसे वाटले.
– गोपाळ आजगांवकर, सतीश तांबे, हेमंत कर्णिक
ajgaonkar.gopal@gmail.com
hemant.karnik@gmail.com
satishstambe@gmail.com
***
चित्रस्रोत : ‘अबब! हत्ती’च्या फेसबुक पानावरून
कविता : गोपाळ आजगांवकर
बालसाहित्यांक २०१७ लेख

चाळिसाव्या कोसावर

इतिहासात अमुकतमुकुद्दीन खानाची कारकीर्द लिहिली जाते, तशी माझ्या वाचनाची लिहिली तर ती १९६२ ते आज अशी लिहावी लागेल.
आमचं घर वाचकांचं घर होतं. आमच्या घरात सगळे – म्हणजे त्यात सख्खे, चुलत, आते, मामे, मावस आणि शेजारी असे सगळेच – वाचक होते. त्यामुळे मी शाळेत जाण्यापूर्वीच वाचायला शिकलो. त्याचं घरात फार काही वेगळंसं कौतुक नव्हतं. बोलायला लागण्याआधी वाचायला लागलो असतो, तर कदाचित कौतुक झालं असतं.
घर नागपूरला. तिथे ‘तरुण भारत’ यायचा. सकाळी एम्प्रेस मिलचा भोंगा वाजण्याआधी उठून पेपरवर ताबा मिळवायला चढाओढ लागावी, इतकी तुडुंब माणसं असत.
मग चौथीत असताना इंग्रजी वाचायला लागलो आणि ‘हितवाद’चा वाचक झालो. आमच्या घरमालकांकडे ‘हितवाद’ यायचा. ते शी करायला जाताना पेपर घेऊन जायचे आणि वाचूनच बाहेर पडायचे, म्हणून मी आधीच गुपचूप पेपर चाळून घ्यायचो.
चौथीत असताना पहिली कादंबरी वाचली. ‘सत्तावनचा सेनानी’. वसंत वरखेडकरांची.
‘अस्तनीतला निखारा’ हा शब्द त्यात पहिल्यांदा वाचला. त्या वेळी अर्थ विचारायची अक्कल नव्हती. मी बरेच दिवस अस्तनीतला निखारा म्हणजे काखेतला निखारा असंच समजत राहिलो. कुठल्या ना कुठल्या शब्दानं भुरळ घालायचे ते दिवस होते.
वडलांच्या खणात एक महानुभावांचं पुस्तक मिळालं. त्यात ‘सर्वज्ञे भणीतले’ असं लिहिलं होतं. मग बरेच दिवस ‘मी भणतो… तू भण…’ अशी गंमत चालू होती.
मग काही दिवसांनी ‘चांदोबा’त ‘भल्लूक’ नावाचं एक पात्र भेटलं. मग काही दिवस ‘भल्लूक-भल्लूक’!
अगदी तेव्हापासून पक्कं केलं होतं – घर बांधलं, तर त्याला ‘काशाचा किल्ला’ किंवा ‘दुर्गेश नंदिनी’ असं नाव द्यायचं.
इथेच सगळे लोचे सुरू झाले. मेंदूच्या अस्तराच्या आत शब्द भूसुरुंगासारखे लपून राहायला लागले. जरा कुठे एखाद्या शब्दावर पाय पडला, की स्फोट सुरू! चित्रं बघितली,  तरी ती शब्दांमध्ये रूपांतरित होऊनच मेंदूत शिरायची. एक नवीन बोली भाषा डोक्यात तयार व्हायला सुरुवात झाली होती.
इंदे म्हणजे काय, दर म्हणजे घर, सुदर म्हणजे देऊळ, बाखुळ म्हणजे भांडण… असलं काहीच्या काही.
एक दिवस मी घरी सांगितलं, की आपल्या घरासमोरून रोज छोटू आणि धनंजय जातात. सगळी पुस्तकं जप्त झाली. वाचनावर बंदी आली. मी रागाच्या भरात आमच्या आप्पांना म्हणालो, “तुम्ही गेस्टाप्प्पो आहात!”
झालं! आता सगळ्यांची जास्तच तंतरली. रोज दप्तराची तपासणी सुरू! वह्यांची फाडलेली पानं दिसली की चौकशी आयोगाच्या बैठका सुरू!
सरतेशेवटी वाचन बंद आणि संध्याकाळी शाखा कंपलसरी करण्यात आली.
घरी गेस्टाप्पो आणि बाहेर घेट्टो!
हा सगळा चुत्यापा हाताबाहेर बळावत जाणार होता, इतक्यात काकोडकरांचं एक पुस्तक हातात आलं आणि मग रोम्यांस एक्स्प्रेसची सफर सुरू झाली. अनेक स्टेशनांवर थांबत थांबत रोम्यांस एक्सप्रेस बरीच वर्षं धावत होती.
अजूनही धावतेय, असं म्हटलं असतं. पण ते थोडं खोटं असेल. कारण आता मेंदूत लपलेले इतर सुरुंग न सांगताच फुटत राहतात. पहिल्या महायुद्धात न फुटलेले जिवंत सुरुंग अधूनमधून उत्खननात सापडावेत आणि फुटावेत, तसं काहीतरी होत राहतं.
***
सुरुवात गिरीपेठेतल्या पापारावांच्या घराच्या पायर्‍यांवर बसून ऐकलेल्या एका कथेतून होते.
सिनेमाच्या जाहिराती वाटणारा माणूस आणि एक लहान मुलगा यांची ही गोष्ट आहे. जाहिराती घेण्याऱ्या मुलांच्या गर्दीत तो मुलगा असतो. वाटणारा माणूस फक्त अशांच्याच हातात पत्रकं देत असतो, जी त्याच्या मते वाचण्याच्या वयात असतील. हा लहान मुलगा त्या माणसाला अजिजीने सांगतो, “अहो, मला वाचता येतंय.”
एकदाचं त्याला ते पत्रक मिळतं आणि हातात पत्रक मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहेर्‍यावरून ओसंडून वाहत राहतो. मध्यंतरी काही दिवस जातात. माणूस पुन्हा कसलीशी पत्रकं वाटायला येतो. त्याची नजर नकळत मुलाला शोधत राहते. पण तो लहान मुलगा दिसत नाही. मग कुणीसं सांगतं, की तो मुलगा कसल्याशा आजारानं गेला.
लहानपणी ‘ऐकलेली’ ही गोष्ट बिब्ब्याच्या फुलीसारखी मनावर चरचरीत ‘बुकमार्क’ करून गेली.
असले बुकमार्क्स विरतात, पण जाता जात नाहीत. उसवलेच, तर व्रण ठेवून जातात.
***
असे अनेक बुकमार्क्स सहन करूनही वाचनाच्या वेडातून सुटका होत नाही. पण अवसेपोर्णिमेला अपस्मारासारखे दिवस येतात, वेडाची झिंग वाढत जाते.
‘मैं अच्छा न हुआ, बुरा न हुआ’ असे दिवस आहेत.
या वेडाचा शेवट मला माहिती आहेच आणि तो प्रत्येक वाचकालापण कळायला हवा.
***
एका माणसाला देव पावला आणि देवानं त्याला सांगितलं, “दर दहा कोसांवर खणून बघ. जे मिळेल त्यानं समाधान झालं, तर ते तुझंच. पण नाही झालं, तर पुढच्या दहा कोसांवर काहीतरी मिळेल. शेवटचा मुक्काम चाळिसाव्या कोसावर आहे.”
पुढची गोष्ट सोपी आहे.
आधी चांदी, मग सोनं, नंतर हिरे मिळाले. पण चाळिसाव्या कोसावर आणखी काही असेल, म्हणून तो माणूस चालतच राहिला. चाळिसाव्या कोसावर एक विचित्र दृश्य दिसलं. तिथे उभ्या असलेल्या माणसाच्या डोक्यावर एक काटेरी चक्र फिरत होतं. रक्ताच्या ओघळांनी शरीर माखलं होतं. हे अनपेक्षित होतं.
त्या रक्तबंबाळ माणसाला पहिल्या माणसानं विचारलं, “हे कसं झालं रे बाबा?”
तत्क्षणी ते चक्र उडून विचारणाऱ्या माणसाच्या डोक्यावर बसलं आणि आधीचा माणूस हसत निघून गेला.
दहा-दहा कोसांवर खणत, शोधत वणवणणारा वाचक होता आणि चाळिसाव्या कोसावर उभा असलेला लेखक होता हे सांगायला नकोच.
मी बरीच वर्षं चाळिसाव्या कोसावर उभा आहे इतकंच मला सांगायचं आहे!
– रामदास
dwaraka2@hotmail.com
***
चित्रश्रेय : अमुक
बालसाहित्यांक २०१७ लेख

आठवणीतलं पुस्तक

एका आडगावच्या खेड्यात वाढलेलो. गावात वाचनसंस्कृती असा काही प्रकार नव्हता. गावात एक घरगुती लायब्ररी होती, दोनतीनशे पुस्तकांची. आणि ती लायब्ररीवाल्या मामींच्या मर्जीवर चालायची. त्या दाखवतील त्यांतलं एखादं पुस्तक निवडायचं लिमिटेड स्वातंत्र्य असायचं.
आमच्या घरी वडलांना फारशी वाचनाची आवड नसावी. आईला तर मुळात मराठीच फारसं यायचं नाही. वडील पेपर सोडला, तर कधी काही वाचताना दिसायचे नाहीत. कुठं प्रवासाला निघालो की चंपकचांदोबाकॉमिक्स वगैरे मिळायची, तीही मी प्रवासात त्रास देऊ नये म्हणून दिलेली लाच असायची. कधीतरी एकदा वडलांनीअमर चित्रकथा’मधलं महाभारत घेऊन दिलं होतं. नंतर त्या महाभारताची कथा जवळपास पन्नाशीत पोचलेल्या माझ्या काकांना सांगून मी काव आणला होता. पुढं बरेच दिवस अगदी आजोळपर्यंत माझी ओळखमहाभारत सांगणारा तात्यांचा मुलगाम्हणून राहिली. शिवाय, दर दिवाळीतकिशोर’ मिळायचा. पण एकूण घरात वाचनाचं वातावरण होतं असं म्हणता येत नाही. (आज घरात ढीगभर पुस्तकं असून माझी मुलं वाचत नाहीत. त्यांचा हेवा वाटतो कधीकधी.)
गोट्या, चिंगी, फाफे, भागवतांच्या अनुवादित कथा वगैरे पुस्तकं हायस्कूलमध्ये आल्यावर जरा उशिराच वाचली. आधी वाचली असती, तर आवडली असती असं तेव्हा उगाच वाटून गेलं. शाळा सुटतासुटता ही पुस्तकं सुटूनमोठ्यांचीपुस्तकं हाती पडू लागली. आणि मग ती वाचतच गेलो. पुढं नोकरीधंदा लागला. वाचन अगदीच कमी झालं. एका बैठकीत एक पुस्तक वाचण्यापासून ते सहा-सहा महिने एक पुस्तक रेंगाळत वाचण्यापर्यंतचा हा प्रवास झाला. आणि परवा अचानक पुस्तकांबद्दल लिहा म्हणून विचारणा झाली, तेव्हा पहिल्यांदा आठवला तो गडबडराव!
त्या काळात आम्ही गावाबाहेर राहत होतो. शेजारपाजार कुणी नाही. मोठं अंगण, दारात आंब्याची झाडं. शाळानामक त्रास अजून आयुष्यात यायचा होता. सकाळी चांगली उन्हं वर आल्यावर उठून मी बनियनवरच बागेत एकटा खेळत बसलेलो असायचो. सगळी भावंडं मोठी असल्यानं शाळेला गेलेली असायची. आई कामात. अशा वेळी हेगडबडराव’ कुणीतरी मला दिलं. फंचुफाकड्या, फाटक्या कपड्यांतला चक्रवर्ती राजा, बजरबट्टू वगैरे नावांची सोळा पानी पुस्तकं पूर्वी येत, त्यांसारखंच हे एक असावं. भावाबहिणींच्या संगतीनं तेव्हा मला बऱ्यापैकी वाचता यायचं. एखादा शब्द अडला, तर वाचून दाखवायला भावंडं होतीच. त्यात छोटी ताई जरा आखडू होती, पण मोठी ताई मदत करायची. मी ला काना टा’ करत-करत सगळं पुस्तक वाचून काढलं. एकदा वाचल्यावर आवडलं म्हणून परत-परत वाचलं. वाचतच राहिलो.
हा गडबडराव बाकी मस्त होता. गडबडराव म्हणजे माकडाचं एक पिल्लू. टोपी घातलेला, शेपटीला घंटा बांधलेला हा गडबडराव भलताच खट्याळ होता. त्याच्या करामती अगदीच नव्या नव्हत्या. इतर माकडांच्या गमतीच्या कथा गडबडरावाच्या नावानं लिहिलेल्या होत्या. पण त्या संस्कारक्षम वगैरे वयात माझ्यावर गडबडरावचा विलक्षण परिणाम झाला. मी तेव्हाच जाहीर केलं, की आपणही आता गडबडरावासारखं झाडावर राहणार. दारातल्या आंब्याच्या झाडावर तासनतास बसून मी स्वतःला गडबडराव समजून खेळत असायचो. ‘जेवणही झाडावरच करणार’ असा हट्ट आईकडं केला होता. गडबडराव फळं खातो… आपल्या बागेतही फळझाडं असती तर किती मजा आली असती, असं वाटून गेलेलं तेव्हा.
गडबडरावच्या काही कथाही भारीच्च होत्या. एका कथेत गडबडराव रोपांच्या मुळांशी पाणी गेलंय की नाही हे पाहण्यासाठी रोप उपटून पाहतो. आणि अर्थात, ते रोप मरतं. असं केल्यानं खरोखर रोप मरतं का याची खातरी करून घेण्यासाठी मी एक रोप उपटून पुन्हा मातीत खुपसून पाहिलं होतं. गडबडराव आणि त्याचे मित्र एका रात्री तळ्यात चंद्राचं प्रतिबिंब पाहतात. त्यांना वाटतं, की चांदोबा पाण्यात पडलाय. आणि सगळी बालमंडळी त्या चंद्राला पाण्यातून काढण्यासाठी एकमेकांच्या शेपटीची साखळी करून तळ्यापर्यंत लोंबकळतात. चंद्र पाण्यात पडलेला नसतो हे त्या वयातही मला कळत होतं. पण पाण्यात पडलेला चंद्र नेमका कसा दिसतो हे बघायची इच्छा फार दिवस मनात घर करून होती. एका गोष्टीत गडबडराव लाकूड तासणाऱ्या सुतारांच्या कामात लुडबूड करून आपली शेपूट ओंडक्यात अडकवून घेतो. मला वाटतं, मला जर शेपूट असती, तर मीही नक्कीच शेपूट अडकल्यावर कसं वाटतं ते करून पाहिलं असतं. दिवस-रात्र गडबडरावाचं पुस्तक वाचून माझ्यावर भयानक त्याचा पगडा बसला होता.
कधीतरी ते पुस्तक हरवलं. आजही माकड पाहिलं, की गडबडरावच आठवतो. आणि मिश्कील हसणाऱ्या टोपीवाल्या माकडाचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं.
पुढचे दिवस भलतेच धामधुमीचे होते. शाळा सुरू झाली. मधल्या काळातमहाभारत सांगणारा मुलगाही ओळख अंधुक होऊन आजोळीही मला गडबडराव म्हणून ओळखू लागले होते. मी दुसरीला असताना आम्ही पुन्हा एका दुसऱ्या छोट्या गावात राहायला गेलो.
या गावातही वाचनालय वगैरे प्रकार नव्हता. पण ताईनं कॉलेजला ऍडमिशन घेतली, तेव्हापासून वातावरण थोडं बदलत गेलं. तिच्या बाकी मैत्रिणी लायब्ररीच्या कार्डावर अभ्यासाची पुस्तकं घेऊन जात, पण ताईला वडलांनी अभ्यासाची सगळी पुस्तकं आधीच घेऊन दिलेली असल्यानं ती अवांतर वाचनाची पुस्तकं घरी आणी. तिथं वाचनाची सुरुवात झाली.
आपल्या नावावर पुस्तक आणल्यानं ताई मुद्दाम दुष्टपणा करायची. माझ्या हाताला लागू नये, म्हणून पुस्तक कपाटात लपवून ठेवायची. तिनं माझी दया येऊन मला पुस्तक वाचायला द्यावं म्हणून मला तिच्यासमोर जमेल तेवढं शहाण्या मुलासारखं वागावं लागायचं. इतकंच काय, छोट्या बहिणीनं तिचे कान भरू नयेत म्हणून मी तिच्याशीही आदरानं बोलायचो.
याच वेळेला कधीतरी वाचलंअसं असतं जंगल!’
आज नाव सोडलं, तर या पुस्तकाबद्दल काही म्हणजे काही आठवत नाही. कॉर्बेट, अँडरसन यासाहिबलोकांची ओळख इथूनच झाली. बहुदा हे पुस्तक कॉर्बेट आणि अँडरसनच्या शिकारकथांवर बेतलेलं असावं. कारण एका कथेत अँडरसननं आपल्या मुलाचा उल्लेख केलेला (तो आपल्यापेक्षा उंच असल्याचा) स्पष्ट आठवतो. कॉर्बेटच्या कथा इथंच वाचल्या की नंतर ते नक्की आठवत नाही.
पुस्तक शंभर टक्के वाचनीय होतं. त्यात बॅरन मुंचहासनसारख्या लंब्याचवड्या बाता नव्हत्या, तर त्या अस्सल शिकारकथा होत्याआणि त्याही शिकारीचा दांडगा अनुभव असलेल्या माणसांच्या. शिकारकथा म्हणजे कुणी गोरा साहेब जंगलात जातो, मचाणावर बसतो, हाकारे शिकार त्याच्या दिशेला पळवत आणतात, मग तो निवांत बार टाकतो, की झालाच वाघ ढेर… ही गुळमुळीत समजूत बाकी हौशी लोकांमुळे रूढ झाली. कॉर्बेटअँडरसनच्या शिकारीत तसं नव्हतं. त्यांच्या कथांत आजूबाजूचे गाववाले, त्यांच्या श्रद्धा, वाघाची माहिती, स्वतः माग काढणं आणि शिकार यांचं बारकाव्यांसहित वर्णन असायचं.
हे पुस्तक वाचताना मी अक्षरशः थरारून गेलो.
शाळेतून आल्याआल्या दप्तर फेकून मी मांजराच्या पावलांनी ताईच्या कपाटाशी जात पुस्तक हातात घ्यायचो आणि अंधार पडेपर्यंत किंवा कुणी पुस्तक हातातून काढून घेईतो खिडकीत बसून वाचायचो. यातल्या बऱ्याच कथा मी दोनदोनदा वाचल्या होत्या. एका कथेत अँडरसन नाल्याकडेनं वाघाचा माग काढत जातो. हा प्रसंग मला कित्येक दिवस लक्ष्यात राहिला होता. माझ्या शाळेच्या वाटेवर छोटासा नाला लागायचा. तिथून जाताना मला उगाच धडधडल्यासारखं व्हायचं. कॉर्बेटसारखं आपणही शिकारी बनायचं, हे वेड डोक्यात तिथं घुसलं. आधी गडबडराव, मग कॉर्बेट.
मी झाडावर चढून मोडक्यातोडक्या काठ्यांचं मचाण बनवलं होतं. नंतर एकदा वडलांनी ते पाहिलं, तेव्हा त्याच काठ्यांचा प्रयोग माझ्यावर झाला. झाडावर चढायची हौस पुढं बरीच वर्षं टिकली. झाडावर बसून कधी वाघ मारला नसला, तरी पुढच्या आयुष्यात झाडावर बसून पुस्तकं वगैरेही वाचली.
या पुस्तकानं वाचनाची गोडी लावली. बरीच पुस्तकं वाचताना मी स्वतःला त्या जागी कल्पून वाचतो, ती सवयअसं असतं जंगल!’मुळे लागली. अगदी जीएंचीगुंतवळ’ असो की जयंत पवारांचीतर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ असोमी नेहमी त्या कथेत गुंतत किंवा त्यातलं एक पात्र असल्यासारखं बनून वाचत राहिलो.
‘असं असतं जंगल!’ या पुस्तकाचा शेवट मात्र अगदी वाईट झाला. मी वाचण्यात फार वेळ घालवतोय म्हणून ताईनं माझं पूर्ण वाचून होण्यापूर्वीच ते पुस्तक लायब्ररीत परत दिलं. दुष्टपणा! इतकी वर्षं झाली, मला आजवर कुठल्याही लायब्ररीत, प्रदर्शनात, दुकानात हे पुस्तक दिसलं नाही.
पण समजा, ते सापडलं आणि मी ते वाचू लागलो, तरी माझ्या मापाची खिडकी कुठं असणार आहे?
– ज्युनिअर ब्रह्मे
https://www.facebook.com/Jr.Brahme/
***
चित्रस्रोत : आंतरजाल
बालसाहित्यांक २०१७ लेख

अभ्यासाला ‘लावलेल्या’ कविता

वाचनाची आवड असो किंवा नसो, पण शाळेत गेलेल्या सगळ्यांनी दर इयत्तेत किमान एकदा तरी ‘भाषेचं पुस्तक’ वाचलेलं किंवा ऐकलेलं असतं; त्यातल्या कविता तरी खच्चून ओरडत म्हटलेल्या असतात. कितीकांनी मुला-नातवंडांना तालासुरात आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक किंवा शाळेस रोज जाताना मज विघ्ने येती नाना अशा दोन-दोन ओळी ऐकवून पुढच्या पिढ्यांच्या आठवणींतही त्या कविता घुसवलेल्या असतात.
‘लिखित साहित्य’ या अर्थानं कवितेचा पहिला संस्कार क्रमिक पुस्तकांतूनच बहुतेकांवर होतो. औपचारिक भाषाशिक्षण संपल्यानंतर मुद्दाम कवितांचं पुस्तक उचलून वाचायला जाणारे फार कमी लोक उरतात. त्यामुळे ‘अशी असावी कविता …’ या प्रकारची समाजाची अभिरुची पाठ्यपुस्तकातल्या कवितांतून तयार होते, असं म्हणायला वाव आहे. अजून टोकरायचं, तर भाषेचं पाठ्यपुस्तक तयार करणार्‍या आणि करवून घेणार्‍या व्यक्ती त्यांच्या दृष्टीने आदर्श अभिरुची तयार करण्यासाठीच धडे आणि कवितांची निवड करत असतात. उदाहरणार्थ, आचार्य अत्र्यांच्या नवयुग वाचनमालेतल्या निवडीमागचा हेतू असा दिलाय: मुलांची भाषा उत्तम व्हावी, त्यांच्या कल्पनेला चालना मिळावी, त्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेचे समाधान व्हावे व त्यांच्या अनुभवाचे क्षेत्र विस्तीर्ण होत जावे.
पाठ्यपुस्तकातल्या कविता या मुलांनी वाचण्यासाठी योग्य असतात, याचाच अर्थ ते बालसाहित्य असतं अशी ढोबळ व्याख्या करायला नको; पण ‘बालकविता म्हणजे त्यात अमुक हवं, तमुक नको’ या प्रकारचे निकष पाठ्यपुस्तकांच्या पिढ्यांतून उत्क्रांत होताना दिसतात का, ते हुडकायचा प्रयत्न या लेखात करतेय.
शिकायला आणि लिहा-वाचायला परवडणारं मराठी समाजमन पाठ्यपुस्तकातल्या बालसाहित्याकडे कसं बघत आलं असणार, आणि त्या समाजाचं दर्शन पाठ्यपुस्तकांच्या एकंदर रचनेत कसं उतरलं असणार याबद्दलही काही अंदाज बांधलेत.    
लेखात संदर्भासाठी इ. स. १८७४ ते २०१४ या कालखंडातली पहिल्या चार इयत्तांची पुस्तकं वापरली आहेत. पुस्तकांमधल्या कविता कसकशा बदलत गेल्या हे त्या कवितांचे विषय आणि संख्या कशा बदलल्या त्यावरून ध्यानात येईल असं वाटल्यामुळे तसे आलेख बनवले आहेत.
वर्गीकरणाच्या सोयीसाठी कवितांच्या विषयांचे सात विभाग केलेयत. काही कविता निसर्ग + कल्पनारम्य, निसर्ग + बाल्य अशा एकाहून अधिक लेबलांना पात्र होत्या.  कवितेचा रोख कोणत्या प्रकाराकडे आहे ते ध्यानात घेऊन त्या अधिक चपखल वाटलेल्या विभागात नोंदवल्या आहेत.
(१)   प्रार्थना : देवाचे गुणगान, देवाकडे सदाचार आणि बुद्धीचे मागणे, रक्षणासाठी विनंती
(२)   उपदेश : ‘बरे सत्य बोला, यथातथ्य चाला’ किंवा ‘मूर्खांची लक्षणे’ या धाटणीचे.
(३)   प्रसंग- / स्थळवर्णन : ऐतिहासिक / पौराणिक / सामाजिक
(४)   देश : प्रादेशिक, राष्ट्रीय, भाषिक अस्मिता व जबाबदारी
(५)   भावजीवन
  •         व्यक्ती : आई, लहान भावंड, भाऊ-बहीण, फेरीवाला, गारुडी, सैनिक, शेतकरी
  •         निसर्ग : पक्षी, प्राणी, फुलपाखरं, पाऊस, झरे, नद्या, चंद्र
  •         वस्तू / सांस्कृतिक घटक : यंत्रं (आगगाडी, जहाज, विमान), रंग, सण, शेती व खाद्यसंस्कृती
(६)   बाल्य : मूलपणाशी जोडलेले अनुभव (खेळ, नाट्य, नाच, गाणे, मौज, शाळेला जाणे, सुट्टी)
(७)   कल्पनारम्य : वास्तव जगातील एखाद्या दृश्याच्या आधारे किंवा स्वतंत्रपणे, वास्तवात नसलेल्या कल्पनासृष्टीचे चित्र.
अव्वल इंग्रजी काळ
अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या तीन वर्षं आधी, इंग्रजी अंमलाखालच्या भारतातल्या प्राथमिक शिक्षणव्यवस्थेबद्दल ’वूड्स डिस्पॅच’ हा एक महत्त्वाचा दस्तऐवज तयार झाला.  हा खलिता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ’बोर्ड ऑफ कंट्रोल’चा अध्यक्ष चार्ल्स वूड यानं गवर्नर जनरल डलहौज़ीला पाठवला होता. १८३५ सालच्या मेकॉलेच्या ’त्या’ नोंदीतली काही गृहीतकं मोडीत काढणार्‍या या आदेशामुळे, देशी भाषांतून प्राथमिक शिक्षणासाठी सरकारी अनुदान मिळण्याची तरतूद झाली. मूळ इंग्रजी पाठ्यपुस्तकांमध्ये संदर्भानुसार बदल करून भाषांतरित केलेली पुस्तकं ’बॉम्बे प्रेसिडन्सी’ इलाख्यातल्या मराठी शाळांमध्ये वापरली जाऊ लागली. याचाच अर्थ या पुस्तकांची आखणी व्हिक्टोरिया राणीच्या जमान्यातल्या प्रॉटेस्टंट नीतिमत्तेनुसार झाली होती. साहजिकच शाळेचं काम म्हणजे मुलांना देवभीरू, पापभीरू, आज्ञाधारक, परोपकारी आणि अखंड कष्टाळू बनवण्यासाठी नीतिमत्तेचे पाठ देणे आणि त्यासाठी मदत म्हणून वाचन – लेखन – गणना शिकवणे. या क्रमिक पुस्तकांमधली पहिल्या व पाचव्या इयत्तेची पुस्तकं (१८७४ साल, दुसरी आवृत्ती) उपलब्ध आहेत.
त्यातल्या पहिलीच्या पुस्तकात वट्ट पाच कविता होत्या. त्या सार्‍या ‘मुलांकडून पाठ करवावयाच्या’ होत्या आणि अनुक्रमे ‘देव, आई, देव, देव आणि देवाने बनवलेली वार्‍याची झुळूक’ यांची महती मुलांवर बिंबवू पाहत होत्या. असे नीतिपाठ घेत-घेत पाचव्या वर्गात येईपर्यंत तर मुलाचा पुरता ‘विद्यार्थी’ झालेला असणार! नजीकच्याच काळात त्या विद्येचा उपयोग अर्थार्जनासाठी करायचा असल्यामुळे त्या पाठ्यपुस्तकात हर प्रकारच्या विद्येचे (आणि १८५७च्या पार्श्वभूमीवर स्वामिनिष्ठेचे) पाठ ठासून भरले होते. त्यात रामदास-तुकारामांचे अभंग, नामदेवांची पदं, मोरोपंत-मुक्तेश्वरांची दीर्घकाव्यं, कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या ’रत्नावली’तल्या अन्योक्ती असं सज्जड साहित्य कवितांच्या गटात होतं. रचनाकारांचं उद्दिष्ट मुलांना उपदेश करणे, निसर्गातून आणि पुराण-इतिहासातून ‘धडे देणे’ हेच होतं. मात्र मुलांचं भाषिक ज्ञान वाढावं हा बालसाहित्याचा एक उद्देश म्हणून पाहिलं, तर पंडित कवींची भाषिक कारागिरी तो उद्देश सफल करायला मदत करत असणार (पुष्पवर्ण नटला पळसाचा॥ पार्थ सावध नसे पळ साचा॥).
आळोख्यापिळोख्यांचा काळ
पुढे सन १८८५ ते १९२० हा कालखंड मराठी समाज आणि साहित्य यांमधला जुने मरणालागुनि जाऊ देण्याचा, आधुनिक स्व-भान जागवणारा काळ होता. याच काळात केशवसुतांनी ‘आत्माविष्कारात्मक स्फुट भावकविता’ लिहून कवितेच्या प्रांतात क्रांती घडवली. बालबोधमेवा, बालमित्र, आनंद अशी मुलांसाठीची नियतकालिकं या काळात सुरू झाली. फुलामुलांचे कवी रेव्ह. टिळक यांनी ‘बालबोधमेव्या’च्या संपादकपदी असताना कवी दत्त आणि बालकवी यांच्याकडून काही बालगीतं लिहवून घेतली. मुलांच्या भूमिकेमध्ये प्रवेश करून लिहिलेल्या या कवितांपासून मराठीत ‘शिशुगीते’ या साहित्यप्रकाराला सुरुवात झाली.
सन १८८२मध्ये ब्रिटिश सरकारने नेमलेल्या हंटर आयोगानं प्राथमिक शिक्षणव्यवस्थेचं नवं प्रारूप पुढे आणलं. बारा वर्षं वयापर्यंत प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं असावं, लिखापढी हा ज्यांचा पिढीजाद उद्योग नाही अशा जातींना शिक्षणाची गोडी लागेल असं पाहावं, शिक्षणाचा मुलांच्या रोजच्या जगण्याशी आणि पुढच्या कारकिर्दीशी संबंध असावा असं महात्मा फुलेंनी या आयोगासमोर केलेल्या निवेदनात सुचवलं होतं. ‘जनसामान्यांसाठी शिक्षण’ ही त्यातली संकल्पना मान्य करून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावं, त्याचा पैस विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नसावा अशा सूचनांचा अहवाल हंटर आयोगानं सरकारला सादर केला. १९०६ ते १९१८ या काळात बॉम्बे प्रेसिडन्सी आणि सेन्ट्रल प्रॉविन्सेस या इलाख्यांत वापरात असलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये हंटर आयोगाच्या धोरणांचा आणि बदलत्या साहित्यजाणिवेचा प्रभाव दिसतो.
या पुस्तकांमध्ये बऱ्याच कविता इतक्या मौजेच्या आहेत, की वरच्या वर्गात गेल्यावरही मुलं त्या कविता हौसेनं चांगल्या चालीवर म्हणत असतील अशी रचनाकारांची खातरी आहे. लहान मुलांच्या रोजच्या पाहण्यातल्या गोष्टी, घटना यांच्याबद्दलच्या कविता ही या पुस्तकांमध्ये आशयाच्या दृष्टीने पडलेली नवी भर. शिवाय रचनेच्या दृष्टीने संस्कृत वृत्तबद्धतेसोबतच अन्य सोप्या चालींच्या, सोप्या शब्दांतल्या बालकवितादेखील आहेत. त्यात आपली सावली बघून नवल करणाऱ्या लहानग्याच्या तोंडची कविता उल्लेखनीय आहे. अथपासून इतिपर्यंत फक्त निरीक्षण, वर्णन आणि कुतूहल इतक्याच भावना त्या कवितेत आहेत, आणि ‘सुप्रभात’ हा या कवितेतला उच्चारायला सगळ्यात कठीण म्हणावासा शब्द आहे. नाहीतर बाकी सर्व कवितांमध्ये सर्व स्थिरचरसृष्टी – मग ते गुलाबाचं फूल असो वा वाहती नदी –  बालकांना कसला ना कसला बोध देण्यासाठीच कवितेत अवतरली आहे. बालपण म्हणजे काय ते मासिकांतल्या कवितांमधून वाचा; शाळेची पुस्तकं मात्र मोठेपण शिकवतील अशी सरळ-सरळ कार्यविभागणी या काळात दिसते.
या कालखंडात मासिकांमधून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर काव्य-नाटकांची दीर्घ परीक्षणं लिहीत होते. बोध व काव्य या कल्पनाच परस्परविरुद्ध आहेत असं ठासून सांगत होते. नीतिबोधाचा हेतू वेठीस धरावयास सापडला नाही, तर निदान शुद्ध व अलंकृत भाषेच्या द्वारे व्याकरणाचे व साहित्यशास्त्राचे ज्ञान देण्याचा हेतू तरी प्रत्येक सुंदर काव्यात सापडतोच अशा शेर्‍यांमधून आनंद हेच कवितेचं प्रयोजन आणि काव्याच्या मूल्यमापनाचा निकष असल्याचा दावा करत होते. कवितेबद्दलची ही जाणीव प्राथमिक शाळेच्या पुस्तकांमध्ये यायला मात्र बराच काळ जावा लागला.
लोकसहभागाचा, चळवळींचा काळ
१९२० ते १९५० या तीन दशकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या जनचळवळी, महायुद्धं आणि दुष्काळ या पार्श्वभूमीवर प्रमाणित सरकारी शिक्षणावर भर असण्यापेक्षा खासगी शिक्षण महत्त्वाचं ठरलं. वेगवेगळ्या कंपन्या व संस्थांच्या ‘रीडर्स’चा आणि वाचनमालांचा – म्हणजेच पूरक पुस्तकांचा – सोय, हौस व गरज यांनुसार भाषाशिक्षणासाठी वापर होऊ लागला. ही रीडर्स ’सरकारमान्य’ असली, तरी त्यांची धोरणं खासगी परिप्रेक्ष्यात ठरली होती. त्यामुळे मराठी साहित्यक्षेत्रातल्या आधुनिकतेचं वारं त्यांतल्या कवितांनाही लागलं. केशवसुत आणि त्यांच्या वारसांच्या म्हणजे भा. रा. तांबे, दत्त, ना. वा. टिळक, गिरीश, मायदेव, माधव ज्यूलियन्‌, बालकवी आदींच्या कविता पाठ्यपुस्तकांमध्ये आलेल्या दिसतात त्या १९३०च्या सुमारास आलेल्या खाजगी वाचनमालांमधून. त्याच्या अगोदर ’कवी निजधामाला गेल्याला किमान शंभर वर्षे झाल्याखेरीज त्याच्या कवितांचा टिकाऊपणा ध्यानात येत नाही; सबब तत्पूर्वी त्या पाठ्यपुस्तकात घेऊ नयेत’ असा काहीतरी सरकारी शाळाखात्याचा नियम असावा वाटतं! हयात कवींच्या कविता पुस्तकात घ्यायला किंवा पुस्तकात घेण्यासाठी म्हणून हयात कवींकडून कविता रचून घ्यायला सुरुवात झाल्यानंतर त्या कवितांमध्ये समीक्षकी साहित्यगुण असोत-नसोत, पण मुलांच्या जगाशी नातं असलेले ताजे शब्द आणि प्रतिमा आहेत असं दिसायला लागलं.
प्रमाणबोलीतले शब्द या कवितांमध्ये येऊ लागले. उदाहरणार्थ,
ठेवि चष्मा मग कसा बसा नाकीं
ग्रंथ इंग्रजि उलटाच धरी हातीं
रेलुनीया मेजास लावि पाय
’येस नो’च्या वाचनी दंग होय
(वा. गो. मायदेव, ‘बाललीला’)
मॅक्‌मिलनच्या पुस्तकात मावळ बोलीतली एक कविताही आहे. रायगडाला जाऊन शिवरायांचं दर्शन घेऊ इच्छिणार्‍या मावळ्यांच्या तोंडची. ती लिहिली मात्र आहे रविकिरण मंडळातल्या कवी गिरीशांनी. त्यामुळे ‘ठेवून्‌ म्होरलं धोरन ज्येनं बांदलं तोरन’, ’मायबोलीचा जोर करि दरारा थोर’ असे प्रस्थापित साहित्यिक शब्द आणि प्रतिमा तिच्यात आहेत.
कवितांच्या आशयानुसार या वाचनमालांमध्ये ‘राष्ट्रीय / प्रांतीय / भाषिक अस्मिता’ हा अजून एक गट वाढला. पूर्वी पिंजऱ्यातल्या पक्ष्याकरवी किंवा ऐतिहासिक व्यक्तिरेखांकरवी व्यक्त होणारी स्वातंत्र्याची संकल्पना आता थेट देशासाठी वाचकांना हाळी देऊ लागली. मॅक्‌मिलनच्या पहिल्या इयत्तेत मुलाने ‘वीर होणे’ हा आदर्श असलेली एक कविता आहे. पुढे देशाला ‘प्रियकर हिंदिस्तान’ असे संबोधणारी एक कविता आहे. तिच्यात ‘हिंदिस्तान’ शब्द कवीने ‘मुद्दाम योजिला आहे…हिंदी मनुष्य पारशी, ख्रिश्चन, मुसलमानही असेल.’ असा न-धार्मिक खुलासा केलाय. त्यापुढच्या इयत्तांत मराठी भाषा, महाराष्ट्र, विदर्भासारखा मराठीभाषक प्रांत यांची गौरवगीतं आहेत. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळणं हे सर्वोच्च प्राधान्य; आणि ते मिळाल्यानंतर आपली भाषा, आपला प्रदेश यांमधून आपली स्वतंत्र ओळख जपणं ही तेव्हाच्या समाजधुरीणांना भासू लागलेली गरज या कवितांच्या निवडीमध्ये दिसते. ज्या वयात अबोध मन आणि जाणिवा आकार घेत असतात, त्याच वयात ’देव’ या अमूर्त संकल्पनेसोबत ’देश’ ही संकल्पना पाठ्यपुस्तकांमधून मुलांनी आत्मसात केली असणार. पुढे १९४२मध्ये ही पिढी ’क्रांतीचा जयजयकार’ गात ’विशाखा’मय झाली नसती तरच नवल.
मॅक्‌मिलनच्या रीडरांमधून कवितांमधले बोधामृताचे डोस कमी होताना दिसले, पण ते पूर्णत: निघून गेले असं नव्हे. एका कवितेची सुरुवात होते, ती घरापासून दूर ठिकाणी शिकायला असलेली मुलगी सुट्टी सुरू झाल्यामुळे मनात ‘फार फार धाली’ आहे अशी. ही काहीतरी मुलांच्या भावविश्वातली आधुनिक बालकविता असावी अशा समजाने पुढे वाचायला गेलं, तर मात्र त्या मुलीचं घर कसं ‘घर असावे घरासारखे’ थाटाचं आहे, याच वर्णनात अख्खी कविता संपते. ‘बाळ व आरसा’ या कवितेत आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाची प्रथमच जाणीव होऊन गोंधळलेल्या मुलाचं वर्णन आहे. त्यातही त्याच्या आईच्या तोंडी ‘तू रागवलास की ते प्रतिबिंब रागवतं, तू हसलास की ते हसतं,’ म्हणजेच जैशी वृत्ती तुझी जगाशी तशी जगाची तुजशी  हा बायबली अर्थान्तरन्यास आहेच.
१९०० ते १९५० या अर्धशतकात मराठी साहित्यसमीक्षेत साहित्याचं प्रयोजन ’उद्बोधन की रंजन?’ यावर बरीच चर्चा झाली. ‘दोन्ही’ असं समन्वयवादी धोरण बहुतेक साहित्यकारांनी स्वीकारलं. त्याचंच प्रतिबिंब या ‘रंजनातून बोध’छाप कवितांमध्ये दिसतं.
तिसऱ्या इयत्तेतल्या, ‘खरं ज्ञान’ देणाऱ्या एका कवितेला मात्र आज बालसाहित्य म्हणून पाठ्यपुस्तकातच काय, कुठल्याही पुस्तकात थारा मिळणार नाही. जगात पैसाच कसा प्यारा असतो, अशा आशयाचं ते अख्खं कवन आहे.
(पैशात शील शक्ती, सौंदर्य धर्म भक्ती
पापामधून मुक्ती, पैशामुळे दरारा )
मराठी तिसरीत अभ्यासाला ही कविता लावणारी व्यक्ती वॉरन बफेटची वैचारिक स्नेही समजायची, की असल्या पैशाचा लहान वयातच मुलांना उबग आणून त्यांना धट्ट्याकट्ट्या गरिबीकडे वळवणारी समजायची? कदाचित या दोन्ही प्रकारची नसून नुसतीच ‘फ्रेंड्स’मधल्या फीबी बुफेसारखी मुलांशी खरं बोलणारी ती व्यक्ती असेल!

आचार्य अत्र्यांच्या नवयुग वाचनमालेची नवता तिच्या कवितांच्या शैलीतून झटकन ध्यानात येते. यापूर्वीच्या क्रमिक पुस्तकांमधल्या बऱ्याच कविता भल्याभक्कम अक्षरगणवृत्तांमध्ये, मात्रावृत्तांमध्ये बांधलेल्या असत. ते नसेल, तर किमान ‘भानुउदयाचळी तेज पुंजाळले’  अशा जिभेच्या कवायती नक्कीच. ‘नवयुग’च्या लहान इयत्तांतल्या पुस्तकांत मात्र ‘निळे निळे काय? आभाळाचे अंग. पिवळा पिवळा काय? सोनियाचा रंग’ अशी आधुनिक लयीतली कविता दिसते. ‘आईचे जरिपातळ चावुनि, छान बनवली मच्छरदाणी’ असले उंदीरमामा दिसतात. ‘जे आहे ते’ अशा वर्णनात्मक कविता साध्या शब्दांतल्या उपमा-उत्प्रेक्षांनी अजून श्रीमंत होतात (ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर). मग ‘असं असेल का?’च्या कल्पनारम्य कवितांकडे हळूहळू मोहरा वळतो (पाखरांची शाळा भरे पिंपळावरती). उपदेश आणि तात्पर्य यांपासून बालकवितांची बरीचशी सुटका करण्यात ‘नवयुग’चं योगदान मोठं आहे. त्या काळात मुलांसाठी निवडलेल्या काही कविता आजही पाठ्यपुस्तकांमध्ये सामील होण्याइतक्या सार्वकालिक आहेत.
मराठीभाषक राज्याचं बालपण
स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचना होऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनेतोवर साऱ्या मराठीभाषक प्रदेशासाठी प्रमाणित पाठ्यपुस्तकं नव्हती. साठोत्तरी काळापासून ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे’ यांच्याकडे अशी पुस्तकं तयार करण्याची जबाबदारी आहे. गेल्या पन्नास वर्षांत ‘बालभारती’च्या सहा माला त्यांनी तयार केल्या आहेत – म्हणजे सरासरी दहा वर्षांत एकदा प्रत्येक इयत्तेचा ‘सिलॅबस बदललाय.’
त्यातली पहिली माला १९६८ साली सुरू झाली. पूर्वीची ‘कमळ बघ’, ‘बदक बघ’वाली शब्द-ओळख या पुस्तकांमध्ये होतीच; पण त्याच्यापुढे छोट्या-छोट्या वाक्यांच्या सहज नादातून ‘गद्यही आहे, पद्यही आहे’ असे लयदार धडेही होते:
हात मऊ. पाय मऊ.
नाक लहान. कान लहान.
चल चल बाळा.
पायात वाळा.
सत्यनारायणाच्या कहाण्यांची आठवण करून देणारी, मराठी भाषेची ही मायेची लय पाठ्यपुस्तकात आली. त्याच्यानंतर मुक्तछंदाचे प्रवर्तक कवी अनिल यांची ‘वाट’ ही कविता आली.
(मला आवडते वाट वळणाची
सरघसरणिची पायफसणीची
लवणावरची पानबसणीची)

पहिल्या इयत्तेत अभंग आहे, पण विटीदांडू, लगोऱ्या, आट्यापाट्या, हुतुतू असं मूलपण जपणारा; ‘आपुलिया बळें नाही बोलवत’ थाटाचा हा ‘विठूचा गजर’ नाही. मुख्य म्हणजे या मालेतल्या पहिलीच्या पुस्तकात कुठल्याही कवितेला ‘कविता’ असं लेबल नाही – ना अनुक्रमणिकेत, ना धड्यात. पण ही गंमत पुढच्या इयत्तांमध्ये कायम ठेवलेली नाही. तिथे कोणती कविता आहे ते स्पष्ट छापलंय. वास्तविक,
देवाने विचारले,
“ससेराव, ससेराव, का रडता?
नारळाच्या झाडाआड का दडता?”
ही एका धड्याची शैली म्हणजे जुन्या संस्कृत नाटकांतल्यासारखी गद्य-पद्यात्मक. मात्र कविता आणि इतर अशा थेट वर्गीकरणामुळे हा मस्त लयीतला, कल्पनारम्य मजकूर ’कविता’ मानायची शक्यता खुंटली. पुढं दुसरी-तिसरीत ‘गाणी’ नावाचा नवा विभाग आला. चौथीत संगीतिका, अभंग अशी पोटविभागणीही झाली.
अर्थात, प्राथमिक शाळेत ही वर्गीकरणाची चौकट नको असं मला जे वाटतंय, तो फुक्कटचा विदग्ध दृष्टिकोन असू शकतो. सार्‍या महाराष्ट्रात प्रमाणित शिक्षणाचं लोण पोचवण्याची जबाबदारी अभ्यासक्रम आणि पुस्तक आखणार्‍यांवर असते,पण प्राथमिक शाळेतले भाषाशिक्षक हेच त्या अभ्यासक्रमाचे वाहक असतात. पुस्तकाच्या आखणीमागचा दृष्टिकोन कोणता आणि त्यातल्या कविता कशा ‘शिकवणं’ अपेक्षित आहे याबद्दलचं प्रशिक्षण अगदी मोजक्याच प्राथमिक शिक्षकांना त्या-त्या पुस्तकासंदर्भात देता येणं शक्य असतं. थेट वर्गीकरण केल्यानंतर शिक्षक-हस्तपुस्तिकेमध्ये ‘गाणी फक्त तालासुरात म्हणून घ्या. मुलांना त्यांना चाली लावू द्या. ती पाठ करणे, त्यांच्यावर लेखी प्रश्न विचारणे हे अपेक्षित नाही’ – इतकी सूचना दिली तरी रचनाकारांची उद्दिष्टं शिक्षकांपर्यंत पोचू शकतात.
विस्कळीत दशक
१९७६ साली सुरू झालेल्या दुसऱ्या मालेत पहिली ते चौथी सगळ्याच इयत्तांमधल्या कवितांना लेबलं आली. यातलं पहिलीचं पुस्तक तर उत्क्रांतीऐवजी अवक्रांतच झाल्यासारखं वाटतं. धड्यांमधली लय जाऊन एकसुरीपणा आला, कवितांची संख्या कमी झाली.  
‘ढुम्‌ ढुम्‌ ढुमाक्..’सारख्या साखळी-गोष्टींमधून काही लयदार वाक्यांचे काही तुकडे पुन:पुन्हा सांगितले जातात. प्रत्येक वेळी त्या तुकड्यांमध्ये थोडासा पण अर्थपूर्ण बदल असतो, किंवा अजून एका वाक्याची भर घातलेली असते. हळूहळू ती गोष्ट परत ऐकताना मूल ती वाक्यं स्वत: म्हणायला लागतं. रचनेचं हे मूळ तत्त्व ध्यानात न घेता नुसतं ‘पुनरावृत्ती मुलांना आवडते, ती भाषा-शिक्षणाला आवश्यक असते’ असं काहीतरी पाठ करून या पुस्तकातले धडे लिहिल्यासारखं भासतं. उदाहरणार्थ,
चिऊताई, चिऊताई, हवा का खाऊ?
चिव चिव चिव.
असा सुरू होणारा धडा पुढे फक्त ‘खाऊ’च्या ऐवजी ‘शिरा’, ‘वडा’ असे शब्द बदलत दळण दळत बसतो. जवळपास सगळ्याच कविता जुन्या क्रमिक पुस्तकांतून घेतलेल्या ‘नेहमीच्याच यशस्वी’.
१९७९ साली आलेल्या, इयत्ता दुसरीच्या पुस्तकात मात्र नव्या कवी-कवयित्रींच्या कविता, टागोरांची अनुवादित कविता आणि ‘नाच रे मोरा’सारखं चक्क सिनेमातलं बालगीतही आहे. या कविता मुलांच्या भावजीवनाशी जवळच्या विषयांवरच्या असल्या, तरी रचनेच्या दृष्टीनं ‘चल गं सई’सारख्या काही जमून आलेल्या कविता वगळता फारश्या आकर्षक वाटत नाहीत. १९८२ सालच्या तिसरीच्या पुस्तकातल्या कवितांची निवड विषय, आशय आणि रचना यांच्या दृष्टीनं चांगली आहे. पण पुन्हा १९८३च्या चौथीच्या पुस्तकात अचानक काव्यविषयांचा ‘फोकस’ बदलून उपदेशाकडे झुकला आहे.
या पुस्तकांच्या प्रस्तावनेत ‘आधीच्या इयत्तेशी वरच्या इयत्तेचे पुस्तक मिळते-जुळते व्हावे म्हणून विशेष प्रयत्न केल्या’चं नोंदवलं आहे. कदाचित, प्रत्येक पुस्तक वेगवेगळ्या धोरण-कल्पना असलेल्या व्यक्तिसमूहांनी रचलं असल्यामुळे असे विशेष प्रयत्न करायची गरज भासली असेल. ते प्रयत्न फारसे यशस्वी झाले असं दिसत तरी नाही. एकुणात त्या विशिष्ट कालखंडात महाराष्ट्रात आणि देशामध्ये जी अनुशासनप्रिय राजकीय परिस्थिती होती, आणि जिच्यात भराभरा केलेल्या अनेक सामाजिक प्रयोगांमुळे उलट गोंधळ आणि विस्कळीतपणा वाढला त्याच परिस्थितीशी या पुस्तकमालेचा संबंध जोडण्याचा मोह आवरत नाही!
सर्वांसाठी शाळेतलं बालपण
पुढे १९८६मध्ये भारत सरकारने जाहीर केलेल्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातही प्राथमिक यत्तांसाठी नवा अभ्यासक्रम आखण्यात आला. त्यावर आधारलेल्या १९८९च्या ‘बालभारती’मालेमध्ये ‘सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण’ या उद्दिष्टाचा चंचुप्रवेश झाला. पहिली ते चौथीच्या पुस्तकांच्या आखणीत पुन्हा सुसूत्रता, क्रमाक्रमाने विकसित होत जाणारं भाषाज्ञान आणण्याचा प्रयत्न केला गेला.
पहिलीत पाडगावकरांची ‘वेडं कोकरू’, वि. म. कुलकर्णींची ‘झुक्‌ झुक्‌ गाडी’ आणि अनुताई वाघांची ‘शेजीबाईची बकरी..’ अशा छोट्या, जलद ठेक्याच्या कविता; दुसरीत कुसुमाग्रजांची ‘गवताचं पातं’, गोपीनाथ तळवलकरांची ‘मला वाटते’ अशा ठाय लयीत म्हणता येण्याजोग्या कविता; तिसरीत तुकडोजींची ‘या भारतात’, तुकारामांचे अभंग आणि रामदासांचे श्लोक; आणि चौथीत यशवंतांची ‘आई’, सोपानदेव चौधरींचं ‘महाराष्ट्र गीत’ अशा वृत्तबद्ध कविता अशी विषय आणि रचना यांच्या दृष्टीनं चढती भांजणी दिसते. ही पुस्तकं पूर्वीपेक्षा जास्त दूरवरच्या, प्रमाणबोलीची फारशी ओळख नसलेल्या समाजघटकांपर्यंत पोचणार आहेत या दृष्टीनं या मालेत सर्वसमावेशक विषयांवरच्या आणि लहान कविता घेतल्या असाव्यात.
भाषाशिक्षणाचा नव्यानं विचार
१९९५मध्ये महाराष्ट्रात आखलेल्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात ‘शिक्षण क्षमताधिष्ठित असावं, भाषिक क्षमता वैयक्तिक असली तरी ती मिळवण्याची प्रक्रिया सांघिक असते’ या गोष्टींचा विचार केला गेला. पाठ्यपुस्तकं १९९७ साली प्रकाशित करून, वर्षभर त्यांच्याबद्दलचे अभिप्राय मागवून पुन्हा १९९९-२०००मध्ये त्यांची सुधारित आवृत्ती काढण्याचा स्तुत्य उपक्रम या मालेत राबवला गेला.
या मालेत पहिली-दुसरीत एका विषयावरच्या वर्णनात्मक, नादमय सोप्या शब्दांच्या कविता (मोर, भिंगरी, झोका), मग थोड्या अमूर्त भावनांच्या कविता (उदा. रुसलेल्या मुलीला ‘बोला बाई बोला’ म्हणणारी, शांता शेळकेंची कविता), मग निसर्गकविता आणि पुढे आठवणीतल्या कवितांपैकी मायदेवांची ‘चला सुटी झाली’ आणि ग. ह. पाटील यांची ‘फुलपांखरूं छान किती दिसते’, कुसुमाग्रजांची ‘उठा उठा चिऊताई’ या सगळ्या कविता मुलांच्या भावजीवनाशी निगडित आहेत. या मालेत तिसरी-चौथीतल्या पुस्तकांमध्ये मात्र मुलं एकदम मोठी झालीत असं वाटतं. आता झाडं लावण्याची, भारतीय जनदेवतेला नमन करत उद्याच्या युगाला आकार देण्याची जबाबदारी या ‘छोट्याशा बहीणभावां’वर येते. त्यांची स्वप्नंही ‘अंतराळवीर बनेन’ अशासारखी आधुनिक आणि उत्तुंग असतात. पाडगावकरांची ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’, कुसुमाग्रजांची ‘हळूच या हो’, तांबेंची ‘सायंकाळची शोभा’ या कविता बालपणाच्या पारड्यात येतात, पण एकूण वजन जबाबदारीच्या पारड्यातच जास्त दिसतं.
गतिमान समाजासोबत धावतानाची दमछाक
२००६ ते २००९ या काळात पुस्तकांचा नूर पुन्हा एकदा बदलला.
कवितांच्या रचनेच्या बाबतीत त्या ‘गुणगुणता येतील अशा असाव्यात’ हे मार्गदर्शक धोरण ठरलं. म्हणजे भाषा ही  मुख्यतः लिहायची नसून बोलायची असते, तशा कविता या वाचायच्या नसून गायच्या असतात हे प्राथमिक  शाळेतल्या बालकवितांच्या बाबतीत तरी  मान्य झालं.
पण आशयाच्या बाबतीत, मागची माला थोडी जास्तच बाळबोध असल्याचे अभिप्राय आले असावेत, किंवा नव्या सहस्रकातली मुलं फारच स्मार्ट असल्याचा सुगावा रचनाकर्त्यांना लागला असावा. कारण एकाहून अधिक विषय एकाच कवितेत येताहेत अशा, थोड्या कठीण शब्द-संकल्पनांच्या कविता या मालेत पहिलीपासूनच आहेत. उदा. पूर्वीचं ‘छान किती दिसते’वालं फुलपाखरू पहिलीच्या पुस्तकात ‘त्या रंगांचा झगा घालूनी भिरभिरते’. ‘प्राणाहुनि प्रिय’ असणारा तिरंगी झेंडा, देशासाठी मुलांना तयार करणारी शाळा हे दुसऱ्या इयत्तेतच हजेरी लावतात. ‘आनंद’ या नावाच्या कवितेतला आनंद मूलपणाचा सहज आनंद नाही, तर ‘देह, तनू, अन्‌ शरीर, काया, राष्ट्र, मायभू, देशा देऊ’ या समर्पणाचा मोठ्ठाला आनंद आहे. समानार्थी शब्द शिकवायचा केवढा तो अ-काव्यरसी आटापिटा आहे या कवितेत! पुढे संगणक या नव्या सांस्कृतिक घटकाचा कवितेतला चंचुप्रवेशही झालाय. मात्र या वयातली मुलं तो ज्यासाठी वापरतात (गाणी, कार्टून्स बघणं, गेम खेळणं), त्याला ‘रंजन’ या एका शब्दात गुंडाळून बाकी अख्खी कविता हिशेब, ज्ञान, विश्वबंधुत्व वगैरेच्या पसाऱ्यात अडकली आहे. चौथीच्या पुस्तकातल्या आठवणीतल्या कविता – शांता शेळकेंची ‘पावसाच्या धारा येती झराझरा’, अनिलांची ‘ओढाळ वासरू’ आणि अत्रेंची ‘आजीचे घड्याळ’ या चांगल्या आहेत असं वेगळं लिहायला नको. मात्र त्यांच्यातलं, विशेषत: शेवटच्या कवितेतलं, जग झपाट्यानं शहरी होत चाललेल्या मुलांच्या विश्वाला फारच परकं आहे. अर्थात निवडकारांच्या दृष्टीनं, ‘सर्व-शिक्षा अभियान’अंतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांचा आणि खेड्यापाड्यांचा विचार करून या कविता घेतलेल्या असू शकतात. “प्रस्थापितांची मुलं तशीही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये येत नाहीत, त्यामुळे त्यांच्या प्रतिमासृष्टीचा विचार कशाला करा?” असं धोरण असू शकतं. मात्र आज राज्यभरातल्या गावाकडचं, वस्त्यांमधलं अणि पाड्यांवरचं जगणं या जुन्या कवितांसारखं असेल, हेदेखील शक्य नाही. त्यामुळे या अख्ख्या मालेमध्ये, आसपासच्या झपाट्यानं बदलणाऱ्या जगात किमान पाठ्यपुस्तकांतून तरी जुनं, भरवशाचं, सच्छील जग तयार करू असं भाबडं स्मरणरंजन सुरू असल्याचा भाव जाणवतो.
लय सापडू लागलीय
२०१३-१४ सालची बालभारती-माला ही भारतात शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल जबर ऊहापोह सुरू असताना तयार केली गेली. शिक्षणहक्क कायदा, ‘आठवीपर्यंत हमखास पास’ धोरण आणि मुलांच्या आकलन-ग्रहणक्षमतेत झालेली घट, ‘मुलं पूर्वज्ञानावर आधारित स्वत:ची स्वत:च शिकत असतात आणि शिक्षकांनी त्या प्रक्रियेसाठी पूरक वातावरणनिर्मिती करायची असते’ अशा मताचा ज्ञानरचनावाद  अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा, प्रयोग गेल्या काही वर्षांत सुरू आहेत. नुसतं सर्वांपर्यंत पुस्तक पोचवून उपयोग नाही, तर सर्वांना आपलं वाटेल असं काही त्या पुस्तकात असावं, या धोरणाचा जाणीवपूर्वक वापर या मालेत केलेला दिसतो.
१९९९-२००० आणि २००६-०९ या दोन मालांमध्ये दोन टोकांना गेलेला लंबक कुठेतरी समन्वय साधून स्थिर करायचा प्रयत्न इथे झालाय. १९९९प्रमाणेच सुलभ शब्दांची बडबडगीतं या मालेतल्या पहिलीच्या पुस्तकांमध्ये पुन्हा आली. पण त्याचबरोबर बालकवींची ‘ऊठ मुला’ ही माफक उपदेशी बाजाची निसर्गकवितासुद्धा आली.  फुलपाखरांचे रंग आता ‘मजेमजेचे रंग तयांचे, संध्याकाळी जसे ढगांचे’ असे पुन्हा जरा सोपे झाले. ध्वज उंच धरायची जबाबदारी इथेही दुसऱ्या इयत्तेतच आली – पण पाडगावकरी शब्दकळेमुळे ती जरा ‘इवल्या इवल्या हातांना पेलवेल’ अशी खारूताईची वाटते. हा शेरा देण्याचा हेतू मुलांना दुय्यमत्व देण्याचा नसून, आता दर पाच वर्षांनी बदलणाऱ्या पिढीतल्या मुलांकडे नक्की कसं बघायचं हा पाठ्यपुस्तक-रचना समितीपुढे असलेला खराखुरा पेच असावा हे अधोरेखित करण्याचा आहे.
महाराष्ट्रातल्या बोलीभाषांवर दिलेला भर ही या मालेतली सर्वांत सुखद बाब आहे. बोलीतल्या कविताही भाषिक क्षमतेनुसार निवडल्या आहेत. भिलोरीतली ‘ढोंड, ढोंड पानी दे, साय-माय पिकू दे!’ ही कविता पहिलीत आहे. गोंडीमधली ‘हिक्के होक्के मरांग उरस्काट’ (इकडे तिकडे झाडे लावू या) ही कविता तिसरीच्याच काय, पण सर्व वयाच्या मुलांना म्हणायला आवडेल इतके गोड अनुप्रास आणि झन्नाट शब्द घेऊन आली आहे. पूर्णपणे वेगळा शब्दसंग्रह असलेल्या या कविता सुरुवातीला मुलांना फक्त त्यांतल्या उच्चारांच्या मजेसाठी आवडतील. ते उच्चार त्या बोलींचे बहुसंख्य भाषक कसे करतात, हे शिक्षकांना आणि मुलांना माहिती असलं तर अजून चांगलं. कारण त्यातून त्या बोलीला, ती बोलणार्‍यांना बरोबरीचा दर्जा मिळेल. त्यासाठी बालभारतीच्या संकेतस्थळावर या कवितांच्या त्या-त्या भाषकांच्या आवाजातल्या ध्वनिफिती असायला हव्यात.  मोबाइल इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या जमान्यात बहुतेक सर्व शिक्षकांना या ध्वनिफिती सहज उपलब्ध होतील.
२००६च्या पहिलीच्या पुस्तकात भाषेचं अध्यापन कसं करावं याबद्दल शिक्षकांसाठी काही सूचना आहेत.  प्रमाणबोलीतल्या उच्चारांबद्दल ’योग्य’ उच्चार, आणि इतर बोलींतल्या पानी, साळा, भाशा अशा उच्चारांबद्दल ’सदोष’, ’चुकीचे’ उच्चार असे शब्दप्रयोग त्यात आहेत.  
हा पूर्ण विभाग २०१३च्या मालेत मुख्य पाठ्यपुस्तकातून काढून टाकला असला तरी तो शिक्षक-हस्तपुस्तिकेत घातला गेला असण्याचा संभव आहे.
प्रमाणबोली अवगत असण्याचे अगणित सामाजिक-आर्थिक फायदे असले, तरी भाषाशास्त्रानुसार ती एक बोलीच आहे. तिचे उच्चार प्रमाणित केलेले असतात; पण तेच बरोबर आहेत आणि अन्य उच्चार चुकीचे आहेत हा हेका कशासाठी? पाठ्यपुस्तकं प्रमाणभाषेत लिहिली आहेत आणि ती प्रमाणबोलीत वाचावीत; ही बोली शक्यतो निर्भेळ, स्वत:शी सुसंगत असावी म्हणून पाणी, शाळा, भाषा असे उच्चार करा हे शिक्षकांना सांगणं ठीकेय. (अर्थात पोटफोड्या ‘ष’चा उच्चार प्रमाणबोलीतून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे हा माझा अनुभव.) पण तिच्यातल्या वर्णांच्या ’योग्य’ उच्चारांबद्दल पाठ्यपुस्तक मंडळ जितकं जागरूक असतं, तितकीच कळकळ अन्य बोलींबद्दलही असावी.
असं केल्यानं ‘आनी-पानी’ बोलणारी व्यक्ती ’कसं बोलतेय’ याच्या दर्जाशी ’काय बोलतेय’ याच्या दर्जाची गल्लत करणं आपण थांबवू असा माझा दावा नाही. पण एखाद्या समाजगटाच्या भाषिक अभिव्यक्तीला ’पूर्णपणे चुकीची’ ठरवणं तरी आपण बंद करू.
याच्या पुढचं पाठ्यपुस्तक रचनेचं पाऊल हे प्रमाणित पुस्तकांसोबतच स्थानिक भाषा-बोलींमधल्या वाचनमाला तयार करणं, किंवा प्रमाण पाठ्यपुस्तकांचं बोलींमध्ये सम-संदर्भ रूपांतरण करणं असं असायला हवं.  प्राथमिक शिक्षणाचं माध्यम स्वभाषा असावं हे तत्त्वत: मान्य असेल, तर मेळघाटातल्या मुलांना प्रमाण मराठीतली पुस्तकं शिकवून कसं चालेल? सध्या कोरकू आणि गोंडीमध्ये पूरक पुस्तकं त्या-त्या भागातल्या जिल्हा परिषदांतर्फे आणि सामाजिक संस्थांतर्फे तयार होताहेत. या पुस्तकांचा अजून एक फायदा म्हणजे त्या बोली शिकण्यासाठीचं अवसान तिथल्या प्राथमिक शिक्षकांनाही मिळेल. (बहुश: आदिवासी गावांमधले शिक्षक हे बाहेरून आलेले, प्रमाणबोली बोलणारे असतात. भाषिक फरकांमुळे मुलं आणि शिक्षक यांमधला सहज संवाद खुंटतो.)
या बोलींमधलं साहित्य खुलं झालं तर पाठ्यपुस्तकांतलं बालसाहित्य अजून श्रीमंत होईल.
***
पाठ्यपुस्तकांतून दिसणारं समाजमन
१८७४ ते २०१४ या विस्तीर्ण कालखंडात भारतातला, महाराष्ट्रातला समाजही बदलला. त्याच्या मूल्यचौकटी वळू-वाकू लागल्या. कवितांच्या विषयवार आलेखांकडे नजर टाकली, तर असं जाणवतं की सर्वशक्तिमान देवाची संकल्पना आणि त्याला हात जोडून प्रार्थना करून स्वत:ची उन्नती करायला सांगणारं समाजमन हळूहळू प्रार्थनेकडून स्व-अस्मितेकडे वळतं आहे. ‘देशासाठी, शाळेसाठी, स्वत:साठी आम्ही असं करू, तसं करू’ अशा प्रकारचे सकारात्मक स्व-सूचनेचे धडेच पाठ्यपुस्तकं मुलांना देऊ करताहेत.
स्वदेशाभिमान या एका मूल्याबाबत गेल्या दोन वर्षांत भारतात महामूर चर्चा झडल्यात. देशाबद्दलचा, प्रदेशाबद्दलचा आंतरिक उमाळा हा धागा देव आणि धर्माच्या धाग्याच्या वरताण बनवणं बर्‍याच जणांना सोयीचं वाटतं, कारण स्वत:ला धर्मनिरपेक्ष आणि विकासवादी घोषित करतानाच ’मी तुमच्यातलाच, तुमच्यासाठीच’ हे आपलंतुपलं संधान त्यातून चांगलं साधलं जातं. पाठ्यपुस्तकांच्या रचनेमध्ये केला जात असलेला राजकीय हस्तक्षेप हाही आपल्याला सांगोवांगी ऐकून ठाऊक आहे, आणि राज्यकर्त्यांनी समाजाच्या जाणिवा अगदी लहान वयात बदलू पाहणं त्यांच्या दृष्टीनं तर्कशुद्धही आहे. सध्याच्या राजकीय कथनानुसार (नरेटिव्ह्‌) डावीकडे झुकलेले पक्ष असल्या स्वदेशाभिमानाकडे बघून नाक मुरडतात आणि उजव्या जाणिवेचे पक्ष देशभक्तीला कवटाळून बसतात. पण महाराष्ट्राच्या बाबतीत तरी, साठोत्तरी पाठ्यपुस्तकी कवितांच्या आलेखांकडे बघितल्यावर मला आश्चर्य वाटलं. कारण ऐन शिवसेना-राजवटीतल्या प्राथमिक पाठ्यक्रमात देशभक्ती आणि प्रार्थना यांच्याबद्दलच्या कविता अगदीच नगण्य आहेत. धड्यांचा विचार या निरीक्षणात केलेला नाही आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या पार्श्वभूमीबद्दल काहीही माहिती नाही, यामुळे कोणतंही ठोस विधान इथं करत नाहीये. पण सरसकट मानलेल्या काही गृहीतकांचा सांख्यिक माहिती हाताशी आल्यावर पुन्हा विचार करावा लागतो हे नव्यानं जाणवलं इतकंच.
स्त्री-पुरुषांसंबंधीची भूमिका आणि त्यांच्याकडून असलेल्या वेगवेगळ्या अपेक्षा हा आपल्या मूल्यचौकटीचा अजून एक भाग. १९२० सालपर्यंतच्या प्राथमिक पाठ्यपुस्तकांमध्ये या अपेक्षा अगदी धडधडीतपणे मांडलेल्या आहेत. स्वयंपाक व सर्व घरगुती कामं, लेकरंबाळं यांभोवती स्त्रियांचं विश्व फिरतं. १९०६ सालच्या तिसरीच्या पुस्तकात तर ’पतींना देवासारखे मानून त्यांना आपल्या स्वाधीन ठेवण्याचा’ उपदेश करणारा महाभारतातला द्रौपदी-सत्यभामा संवादच धडा म्हणून दिला आहे! अशा थेट अपेक्षा पुढे समाज बदलतो तशा हळूहळू कमी होत जातात; मात्र त्यांचे अवशेष अगदी विसाव्या शतकाअखेरीपर्यंत शब्द आणि चित्रांमधून जाणवत राहतात. घरातलं आईचं स्थान प्रेमादराचं असतं, कारण ती सतत कष्ट करते आणि त्यागमूर्ती असते (धड्यातल्या आईनं पेरूच्या फोडी मुलांना देऊन टाकणं); किंवा जवळपास सार्‍याच कवितांमध्ये पाळण्यात ‘तो बाळ’ असतो आणि त्याची ताई त्याचे लाड करत असते. एका कवितेत बाळ‘राजा’ने नीट शिकावे म्हणून त्याची आई शाळेतल्या ‘पंतोजीं’ना खारीक देऊ करते आणि एका ओळीत एक अख्खी मूल्यव्यवस्थाच दाखवून देते.
१९८९-९२च्या मालेत चौथीच्या पुस्तकात सर्वप्रथम ‘कन्या झाली म्हणून नको करू हेळसांड, गोपूबाळाच्या शेजारी सोनूताईचा पाट मांड’ असं स्पष्टपणे बजावत समाजमूल्यं बदलण्याचा प्रयत्न करणारी कविता येते. १९९९-२०००च्या मालेत नव्या कवितांच्या शब्दांमध्ये आणि विषयांमध्ये लिंगभेदभाव जाणवत नाही. कवितांसोबतच्या चित्रांमधून किंवा गद्य पाठांच्या रचनेत तो क्वचित जाणवतो. पण एकुणातच १९८९ ते १९९९ या ‘खा-उ-जा’च्या सुरुवातीच्या दशकात ‘मुलगा मुलगी एकसमान’ ही फक्त घोषणेपुरती बाब नाही, याची जी जाणीव प्रस्थापितांमध्ये विस्फोटली, ती या कवितांच्या निवडीमध्ये आपोआप उतरली असेल.
या बदलत्या मूल्यांचा एक मासला म्हणून ’मी कोण?’ या धड्यासोबतची १९७६ची आणि २००८ची चित्रं बघा.
२००८मध्येही ती नर्स, तो डॉक्टर असे काही ठोकताळे आहेत, पण ती कंडक्टर हा बदल जाणवण्याजोगा आहे. २०१३मध्ये एका धड्यात आईचं प्रेमळ आईपण अधोरेखित केलं असलं, तरी त्याला एक मस्त कलाटणी दिलीय:
त्यातल्या मुलाची आकांक्षा आईसारखं बनण्याची आहे. आई ही आता गृहीत धरण्याची, देव्हार्‍यात बसवण्याची व्यक्ती नाही, तर आईपण हा एक प्रयत्नसाध्य, लिंगभेदविरहित आदर्श आहे.
मूल्यव्यवस्थेतला अजून एक सूक्ष्म धागा म्हणजे ‘सुष्ट-दुष्ट’ कल्पनांचा, काळंपांढरं जग रंगवण्याचा. आपल्या बऱ्याच बालसाहित्यात ‘कावळा’ हा शेणाचं घर असलेला, डाळीच्या डब्यात घाण करणारा, बाळाच्या गोष्टी घेऊन जाणारा असतो. पहिलीच्या पुस्तकातली ‘एक चिऊ आली’ ही याच धर्तीची जुनी कविता. मूळ कवितेत वेगवेगळे पक्षी-प्राणी बाळाला काहीबाही देऊन जातात, आणि शेवटी एक कावळा येऊन सगळं घेऊन जातो. पण या पाठ्यपुस्तकात शेवटची ओळ बदलून ‘एक कावळा आला, बाळाभोवती नाचून गेला’ अशी लयभंग करणारी, कावळ्याचं दुष्टपण काढून घेणारी ओळ घातली आहे. निव्वळ कवितेच्या आनंदाचा आणि ठेक्याचा विचार केला, तर हा बदल मला अजिबात आवडला नाही. दोन-तीन वर्षांच्या भाचरांनी सुरी, कातरीसारख्या गोष्टी हाताळण्यासाठी खूप हट्ट केला आणि भोकाड पसरलं तर ते थांबवायला ’काऊ येऊन ते घेऊन गेला’ वगैरे थापा मी अगदी आत्ता-आत्तापर्यंत मी मारलेल्या आहेत; यापुढेही अशा थापा मारणारच नाही अशी शपथ काही मला घेता यायची नाही. त्यामुळे एक सोयीस्कर बागुलबोवा तयार करण्याच्या मनोवृत्तीला या ओळ-बदलातून आळा घातला जातोय, याबद्दल विचारी मनाला बरं वाटत असलं तरी मनस्वी मनाला वैतागही आला.
’मोजक्या पैश्यांत खोली भरून जाईल असं काहीतरी आणणं’ या कल्पनेवर आधारलेली गोष्ट १९८२ सालच्या तिसरीच्या पुस्तकात आहे, आणि २०१३ सालच्या दुसरीच्या पुस्तकातही आहे. जुन्या पुस्तकात रशियन परीकथांच्या धर्तीवर तीन भावांमधला धाकटा भाऊ सर्वांत गुणाचा असतो. थोरले भाऊ आपापल्या खोल्या अंधारानं आणि गवतानं भरतात. धाकटा राजू त्याची खोली सुरांनी आणि सुगंधानं भरून टाकतो. त्यांचे वडील इतर दोघांना नावं ठेवून राजूचे गोडवे गातात. ताज्या पुस्तकात दोन भावंडं (चित्रांवरून ती एक मुलगा, एक मुलगी आहेत हे कळतं. लिंगसूचक शब्द गोष्टीत नाहीत.) पणतीच्या प्रकाशानं सारं घर भरून टाकतात. दोन्ही मुलांनी एकत्रित विचार करून कल्पकतेने आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले  याचा वडिलांना खूप आनंद होतो. तीस वर्षांत पाठ्यपुस्तक-निर्मात्यांच्या मूल्यव्यवस्थेत स्पर्धेकडून सहकाराकडे, हिणवण्याकडून कौतुकाकडे असा बराच फरक पडलाय.
या पद्धतीचे बदल करणं कितपत सयुक्तिक आहे, यातूनच पदोपदी भावना दुखावल्या जाणारे, स्पर्धेला आणि शेर्‍या-ताशेर्‍यांना घाबरणारे समाज निर्माण होतात काय – हे चर्चेचे विषय आहेत. बर्‍याच चर्चांप्रमाणे ‘दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी’ अशा निष्कर्षांवर ही चर्चाही स्थिरावेल. पण पहिली ते चौथीच्या पुस्तकात कावळ्याला दुष्ट आणि गाढवाला मूर्ख ठरवून आपण अजिबात सुज्ञ समाजनिर्मिती करत नसतो – हे वाटलं तर आद्य पंचतंत्रातल्या गोष्टी वाचून स्वत:ला पटवून द्यावं!
कविता कोणी लिहिल्या, कोणी निवडल्या?
गेल्या दीडशे वर्षांतला बहुतांश काळ पाठ्यपुस्तकं आणि त्यातलं साहित्य या दोन्हींच्या निर्मितीवर मराठी समाजातल्या विशिष्ट गटाचं वर्चस्व आहे: अध्यापन-अध्ययन-लिखाण-भाषण यांखेरीज अन्य मार्गांनी सहसा पैसा निर्माण करत नसलेला, मध्यमवर्गीय आणि ब्राह्मणी असा हा व्यक्तिसमूह आहे. त्यामुळे त्याच्या नजरियाचा, अभिरुचीचा प्रभाव पाठ्यपुस्तकांवर होता; आहे. मी याच गटात मोडत असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करताना याच सीमित दृष्टीचे दोष माझ्या ठिकाणीही आहेत याची मला जाणीव आहे.
मॅक्‌मिलन वाचन-पुस्तकांच्या शेवटी असलेला लेखक- / कवी-परिचय या दृष्टीनं अतिशय रोचक आहे. पुस्तक छापणारे आणि त्यातले उतारे लिहिणारे या दोन्हींचा प्रस्थापितपणा आणि छापणार्‍यांचा पराकोटीचा आत्मविश्वास यांच्यामुळे त्यात कवींचे नाव-गाव-हुद्द्यांसह तपशील, त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीचं (असल्यास!) वर्णन आणि थोडक्या शब्दांत, शेलक्या विशेषणांत त्यांच्या साहित्याची समीक्षा अशी फटाके-बाजी आहे. उदा. मायदेवांनी काही किरकोळ लेख लिहिले असून काही कवितांची पुस्तकेही प्रसिद्ध केली आहेत असं सांगत ‘कल्पनेच्या उत्तुंग भरार्‍या किंवा नवविचाराचा प्रवाह नसला तरी हे साधे स्वरूपच आल्हाददायक वाटते’ अशी उत्तेजनार्थ स्तुती. ‘गिरीशांना कुणबाऊ भाषा चांगली साधते’ हे प्रशस्तिपत्र, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे ‘कट्टे सुधारणावादी’ असल्याचा इशारा. अर्थात साक्षात तुकारामांच्या प्रगतिपुस्तकात ‘रचनेच्या ठाकठिकीकडे त्यांचें फारसे लक्ष नसे, पण अंतरीचा उमाळा अभंगांत प्रतिबिंबित झाल्यामुळे त्याच्या भाषेत जिवंतपणा ओतप्रोत भरला आहे’ असा शेरा मारल्यावर इतरांची काय गत? पुढे एका लेखकाच्या परिचयातलं पहिलंच वाक्य ‘हे जातीने मराठे आहेत’ असं. जणू त्यांनी लिहिलेल्या लेखाच्या अर्थामध्ये या माहितीने काही फरक पडेल, किंवा केवळ त्यांच्या जातीमुळे त्यांना हा लेख लिहायची मुभा आहे!
पाठ्यपुस्तकी कविता लिहिणाऱ्या वर्गातल्या काही लोकांची भाषिक क्षमता चांगलीच विकसित झालेली असते. बोलीभाषांमधले शब्द त्यांना सहजी समजतात, आत्मसात करता येतात आणि ते वापरून नवी रचनाही करता येते. मात्र या रचनेतली अनुभवसृष्टी आणि प्रतिमासृष्टी त्या बोलीच्या नैसर्गिक वापरकर्त्याच्या संदर्भात अत्यंत विजोड वाटू शकते. कधीकधी तर शब्दकळा, विचार, कल्पना सगळं स्वत:चं आणि अवसान मात्र ‘नाही रे’ गटातल्या माणसाचं अशी दयनीय गत होते. मॅक्‌मिलन पुस्तकमालेमधलं ‘गुराख्याचे गाणे’ हे या प्रकारच्या कवितांचं धडधडीत उदाहरण. ‘कुवासना घालिती धिंगा तो महाल मी टाकितो, नृपाचा महाल मी टाकितो’ हे असं कोणता ‘अधिकृत’ गुराखी स्वयंप्रेरणेनं म्हणेल? त्यानं ते तसं म्हणू नये अथवा त्याला म्हणता येणार नाही असा हा दावा नाही; तत्त्व म्हणून किंवा भावना म्हणून याहूनही सखोल विचार गुराख्याच्या गाण्यात असेल. पण त्याला असली भाषा आणि प्रतिमा असेल का?
१९८९ सालानंतर मराठी पाठ्यपुस्तकं तयार करणाऱ्या ‘मराठी भाषा समिती’मधल्या सदस्यांची नावानिशी यादी बालभारतीच्या पुस्तकांच्या सुरुवातीला छापली जायला लागली. अगदी ताज्या मालेमध्ये समितीबरोबरच प्रत्यक्ष कार्यगटातल्या व्यक्तींचीही नावं दिली आहेत. प्रत्येक नव्या मालेत या यादीमध्ये वेगवेगळ्या समाजसमूहांचं, वय, लिंग, प्रांत, वर्ग, पार्श्वभूमी यांनुसार असलेलं प्रतिनिधित्व वाढतंय असं वाटलं. नुसतंच वैविध्य आणण्यासाठी म्हणून, नामधारी प्रतिनिधित्व नको हा मुद्दा (जो प्रत्येक आरक्षणासंदर्भात, समावेशक गट बनवण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात पुढे येतो) बरोबर आहे. पाठ्यपुस्तक मंडळ तो पाळत असणार असा विश्वास ठेवायला मला आवडतं. हे प्रतिनिधित्व जसजसं वाढेल, तसतसं ते पुस्तक ‘मोकळं’ होईल, त्यातल्या कविता समाजाचा आरसा होतील, अर्थात ते बालसाहित्याच्या अधिक जवळ जाईल असं मला वाटतं.
***
शेवटी, माझ्या जन्माच्याही आधीच्या पाठ्यपुस्तकातल्या एका कवितेसंबंधी माझी एक आठवण आहे. महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला घरापासून खूप लांब, अ-मराठी प्रदेशात पहिल्यांदाच आले होते. पहिल्या परीक्षेपूर्वी वाचनालयात बसून डोकेफोड करत ‘आपल्याला काही नाही हे जमणार’ म्हणत रडवेली झाले होते. सहज समोरच्या खिडकीवर नजर टाकली तेव्हा तावदानाखालच्या पट्टीवर काहीतरी देवनागरी लिहिल्याचं दिसलं. जवळ जाऊन वाचलं तर –
जोर मनगटातला पुरा घाल, घाल खर्ची
हाण टोमणा, चळ न जरा; अचुक मार बर्ची!
अशा दोन ओळी दिसल्या. मला शांत करून पुन्हा अभ्यासाला लावायला कुण्या अज्ञात मराठी सीनियरचा हा ‘टोमणा’ पुरेसा होता. ही कविता कोणाची, कुठली – मला काहीही कल्पना नव्हती. पण या लेखासाठी पाठ्यपुस्तकं वाचताना ती केशवसुतांची ‘निर्धार’ कविता जुन्या चौथीच्या पुस्तकात सापडली आणि लै भारी वाटलं. ती कुणी व्यक्ती शाळेतली ही कविता किमान नऊ-दहा वर्षं मनात बाळगून होती, आणि तिच्यामुळे मीसुद्धा अशीच दहा-पंधरा वर्षं ती ओळ हक्कानं वापरतेय मनात… कितीही बाळबोध वाटलं तरी; उपदेशाची मलमपट्टी असली तरी– पाठ्यपुस्तकातल्या कविता समाजमनात अशाच कुठे-कुठे कातरजागी दडून बसलेल्या असतात.
आता यापुढच्या काळात पाठ्यपुस्तकं ही संकल्पना तरी राहील का, त्यातल्या कवितांचं काय होईल, असा विचार होत राहतो. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भाषा समितीचे सदस्य-सचिव माधव राजगुरू यांनी लिहिल्याप्रमाणे, पाठ्यपुस्तक हे अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्याचं एक साधन आहे. पाठ्यपुस्तकं अभ्यासक्रमावर आधारित असली, तरी पाठ्यपुस्तकं शिकवली म्हणजे अभ्यासक्रम शिकवला असं नाही.
भविष्यातल्या कोण्या काळी महाराष्ट्रात फक्त निदर्शक अभ्यासक्रमच तयार झालाय आणि प्रत्येक बोलीभाषक विभागात स्वतंत्र पूरक पुस्तकं, चित्रफिती, गाणी वापरून भाषा शिकवली जातेय असं होऊ शकेलही. पण जास्त शक्यता हीच, की अशा पूरक साहित्याचाही एक प्रमाणित कोश तयार केला जाईल आणि राज्यभर त्यातून योग्य वाटेल ते साहित्य शिक्षक, पालक आणि मुलं वापरतील.
पाठ्यपुस्तकांतल्या कवितांचं बलस्थान म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभरातल्या पिढ्यांना एका समान संस्कृतीचा दुवा त्या पुरवतात. माझ्या वयाच्या नव्या दोस्तांशी संवाद साधताना कुसुमाग्रजांची ’कणा’ ही कविता म्हटल्यावर कोल्हापूर, नाशिक, मुंबई आणि अचलपुरात ऐकणार्‍यांचे डोळे सारख्याच आनंदानं लकाकलेत. मराठी शाळेत जाणार्‍या एखाद्या बुजर्‍या पोरासमोर ’कोणाचे गं कोणाचे, सुंदर डोळे कोणाचे’ सुरू केलं, की तेही तालात ताल मिसळून कविता म्हणायला लागतं.   
अभिजात आणि लोकप्रिय अशी विभागणी तद्दन चुकीची ठरवणारी ‘कणा’, गायचा आणि नाचायचा आनंद देणारी ‘नाच रे मोरा’सारखी बालकविता, आणि ‘ढोंड ढोंड पानी दे’सारखी बोलीकविता, अशा लोकसंवेदना जपणाऱ्या कविता जितक्या जाणीवपूर्वक पाठ्यपुस्तकांत आणल्या जातील, तितकं बालसाहित्य म्हणून त्यांचं स्थान अढळ होईल असं मला वाटतं.
– गायत्री नातू
gayatrinatu@gmail.com
***
मराठी साहित्य आणि समीक्षेच्या इतिहासासंदर्भात टिप्पण्या करण्यासाठी प्रा. रा. श्री. जोग आणि व. दि. कुलकर्णी यांच्या लेखांचा उपयोग झाला. हे लेख ’प्रदक्षिणा, खंड पहिला’, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुनर्मुद्रण २०१२ या पुस्तकात आहेत.
आलेख : गायत्री नातू
इतर चित्रे : पाठ्यपुस्तकांतून
बालसाहित्यांक २०१७ लेख

अर्धा फूट ते ७२ फूट आणि मध्ये आपण!

गणपतीच्या प्रतिष्ठापनेला आमच्या सरळसाध्या बोलीभाषेत गणपती बसले म्हणतात आणि विसर्जनाला गणपती उठले म्हणतात. गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रात देवी बसतात; त्या देवीला आम्ही दुर्गादेवी म्हणतो. माझ्या दिग्रस गावात त्या काळी, मी लहान असताना म्हणजे साधारण १९७६-७७च्या काळात गणपतीपेक्षा दुर्गादेवीला जास्त महत्त्व होतं. गावात एक जुनी गढी होती. म्हणजे साधारण शिवाजी महाराजांच्या काळातली असावी. गावाचं रक्षण करण्यासाठी गावाच्या सीमेवर उभारलेली ही छोटीशी तटबंदी चांगली आठ-दहा मजल्यांएवढी उंच होती. तिला चारही बाजूंनी बुरूज होते आणि कधी काळी त्या बुरुजांवर टेंभे किंवा मशाली पेटवून पहारेकरी गावाच्या सीमांचं रक्षण करीत. या गढीच्या परिसरात असलेल्या राष्ट्रीय शाळेत मी शिकत असताना, त्या शाळेच्या मैदानातच दुर्गादेवी बसवली जात असे. नवरात्रातले नऊ दिवस तिथं रात्रीच्या आरतीला संपूर्ण गाव येत असे. गावातले अनेक मुस्लीमही तिथं डोळे मिटून श्रद्धेनं टाळ्या वाजवीत दुर्गे घुर्घट भारी तुजविण संसारी म्हणताना मी पाहिलेलं आहे. गळ्यात नरमुंड धारण केलेली दुर्गादेवीची ती मूर्ती दहा-बारा फूट उंचीची असे. सिंहावर बसलेली. तिच्या हातातला त्रिशूल खाली पडलेल्या राक्षसाच्या पोटात खुपसलेला असे. सिंहाचा एक पायही त्या राक्षसाच्या पोटावर. दुसरा राक्षस उभा असे. देवीचा चेहरा म्हटलं की तोच चेहरा अजूनही मला आठवतो. अत्यंत रेखीव नाक, पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर तेज. गावातील मूर्तिकार जाधव ही मूर्ती दर वर्षी अशीच घडवत आणि त्यात बदल करण्याची कल्पनाही कुणाला करवत नसे. या मूर्तीसोबतच्या दोन्ही राक्षसांसंबंधात झालेला माझा गोंधळ हा माझ्या बालसाहित्याच्या वाचण्याच्या पहिल्या अनुभवाशी जोडला गेलेला आहे. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही वाचायचे असते याची दीक्षा घरच्या वातावरणामुळे आपोआपच मिळाली होती. मासिकं घरपोच धाडणारी लायब्ररी होती ती आमच्या गावापासून पंधरा-वीस किलोमीटर दूर असलेल्या मानोरा या छोट्याशा खेडेगावातली. ‘जे. डी खुणे, मानोरा’ असा शिक्का त्या मासिकांवर असे. दात पुढे आलेला आणि सदरा-पायजमा घातलेला एक उंचसा माणूस आठवड्यातून एक दिवस सायकलवर येत असे. त्याच्याकडील मोठ्या आडव्या पिशवीत त्याने मासिके आणलेली असत. वाचून झालेलं मासिक परत घेणारी आणि नवं मासिक देणारी अशी ती घरपोच लायब्ररी होती. मात्र त्या मासिकांमध्ये किर्लोस्कर, स्त्री, गृहशोभा, मोहिनी अशी मासिकं असंत. ही मासिकं मी उत्सुकतेनं चाळू लागलो, तेव्हा एक दिवस घरी ‘चांदोबा’ आलं. माझ्यासाठी म्हणून घरात आणलेलं ते पहिलं साहित्य. ‘चांदोबा’चा मला लळा लागला आणि चंद्रसेन, सूर्यसेन, विश्वकर्मा अशा नावांच्या व्यक्तिरेखा, राजे, त्यांची राज्यं यांच्यात मी रमू लागलो. चांदोबातल्या गोष्टींमध्ये हटकून राक्षस यायचे आणि त्या राक्षसांची चित्रंही असायची. गुडघ्यापर्यंतच्या लांबीचा गोल स्कर्ट असावा तसे काही तरी रेषारेषांचे कमरेला असे, वरचे अंग उघडे आणि त्याच्या हातात कपडे धुताना बायका वापरत तशी एकमोगरी, मात्र ती काटेरी असे. दुर्गादेवीच्या मूर्तीसोबतचा राक्षस असा नव्हता. त्याच्या डोक्यावर दोन शिंगे होती, दोन पांढरे अणकुचीदार सुळे ओठांच्या दोन बाजूंनी बाहेर आलेले, लालचुटूक जीभ बाहेर आलेली आणि कमरेपासून खाली काही इंचांपर्यंत पांढऱ्या रंगाचा पंचा कमरेला गुंडाळवा तसे एक वस्त्र. जाधवांच्या मूर्तीत दिसतो तसा असतो राक्षस की चांदोबामध्ये चित्र असतं तसा असतो?
शाळा सुटल्यावर मी नदीकाठी असलेल्या जीनगर पेंडीत (म्हणजे मूर्तिकारांच्या वस्तीत) जाऊन तासन् तास मूर्ती घडताना पाहत असे. मूर्ती घडविण्यासाठी मातीत घट्टपणा यावा म्हणून मातीत कापूस कालवून तो एकत्र कांडून एकजीव केला जात असे. त्या क्रियेपासून मूर्तीच्या घडण्याचा मी साक्षीदार असे. मातीचा केवळ आकार, नाक-डोळे नसलेला चेहरा, लोखंडी कांबीभोवती गवताच्या काड्या गुंडाळून तयार केलेले देवीचे हात, त्यावर मग हळूहळू चढत जाणारे मातीचे लेप आणि अंगात बनियन घालून, चश्म्यातून पाहत ती मूर्ती घडवण्यात तल्लीन झालेले जाधव. हे सगळं पाहताना जणू मीच ती मूर्ती घडवीत आहे असे वाटून आमच्यात भावबंध तयार होत. त्यातून साकार झालेला राक्षस खोटा कसा असेल? पण मग, चांदोबातला राक्षसही खोटा कसा असेल? बरेच दिवस माझ्या मनात हे द्वंद्व सुरू होतं. काळाच्या ओघात कधीतरी ते मिटलं असावं. पण बालसाहित्य म्हणून पहिल्यांदा हाती पडलेल्या चांदोबानं माझ्यापुढे असा पेच उभा केला होता हे लक्ष्यात राहिलं.
मी ‘चांदोबा’ वाचू लागल्यावर, वाचनात रस वाढलेला पाहून काही महिन्यांनी माझी बढती झाली आणि गावातील नगर वाचनालयाच्या बालविभागाचं सदस्यत्व घेण्याची अनुमती घरून मिळाली. एक रुपया महिना वर्गणी आणि एक रुपया अनामत. खुरखुरिया अशा आडनावाचे तरुण गृहस्थ तिथे ग्रंथपाल होते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कायम रागाचा किंवा त्राग्याचा स्वर असे. लहान मुलांच्या विभागामध्ये जाऊन पुस्तकं पाहून त्यातलं पुस्तक निवडताना माझा एक डोळा कायम या खुरखुरियांकडे असायचा. कारण पुस्तक निवडायला थोडा जास्त वेळ घेतला की ते ओरडायचे, “चल रे लवकर…आटप.” मी खूप घाबरटस्वभावाचा होतो, त्यामुळे अनेकदा त्यांचा आवाज आल्या-आल्या मी हाती असेल ते पुस्तक घेऊन त्याची नोंद करण्यासाठी काऊंटरवर जात असे. त्यातही एखादं नवंकोरं पुस्तक मी घेतलं असेल तर त्याची नोंद करता करता खुरखुरिया ते पुस्तक देण्यास नकार देतील की काय अशी सतत धास्ती वाटत असे. नगर वाचनालयाच्या बालविभागात शंभऱ-सव्वाशे पुस्तक होती. २०-२५ पानांची छोटी-छोटी पुस्तकं. त्यांतलं सर्वाधिक लक्ष्यात राहिलं ते ‘गॅलिव्हरच्या सफरी’ हे पुस्तक. स्पेलिंग बघता त्याचा उच्चार गुलिव्हर असावा, परंतु त्या पुस्तकाचं नाव मात्र ‘गॅलिव्हरच्या सफरी’ असंच होतं.
‘जादूचा शंख’, ‘प्रामाणिकपणाची किंमत’, ‘उडती सतरंजी’, ‘बोलका ससा’ अशा गोष्टींच्या पुस्तकांमध्ये मी रमलो असताना आणि फँटसीचे पहिलेवहिले संस्कार मनावर होत असताना तुलनेनं थोडी अधिक पृष्ठसंख्या असलेलं हे पुस्तक दिसलं. त्याच्या मुखपृष्ठावर धिप्पाड गलिव्हर आडवा पडलेला आणि त्याच्या अंगाभोवती त्याच्या गुडघ्याहूनही कमी उंचीची माणसं चारही बाजूंनी वेढा घालून आहेत असं चित्र होतं. ते पुस्तक वाचायला घेऊ असं ठरवून मी इतर पुस्तकं चाळण्यासाठी म्हणून दुसऱ्या कपाटाकडे गेलो आणि तेवढ्यात ते पुस्तक कुणीतरी घेऊन गेलं. ते पुन्हा परत येऊन मला मिळायला पंधरावीस दिवस गेले. तेवढ्या वेळात माझं लक्ष्य इतर पुस्तकांमधून उडालं. त्याच्या मुखपृष्ठावर मी जे चित्र पाहिलं होतं, ते दृश्य मला वारंवार स्वप्नातही दिसू लागलं आणि माझा मीच त्या पुस्तकात काय असावं याच्या कल्पना मनातल्या मनात करू लागलो. हाती लेखणी न धरताच, लेखक होण्याचा माझा तो पहिला प्रयत्न होता, हे मला आता जाणवतं. प्रत्यक्षात ते पुस्तक हाती आलं आणि वाचलं तेव्हा मी भारावून गेलो. हे जे काही लिहिलेलं आहे, त्याचं मूळ मराठी नव्हे किंवा तो अनुवाद आहे वगैरे लक्ष्यात येण्याचं ते वय नव्हतं. परंतु आपण नेहमी वाचतो ते बालसाहित्य आणि हे लिखाण यात खूप फरक आहे हे मात्र लक्ष्यात आलं. तो काय फरक आहे, हे मी आत्ता सांगू शकतो, परंतु ही समज किंवा हे अवधान त्या वयातल्या आकलनाला चिकटवता येणार नाही. तोवर वाचलेलं मराठीतलं बालसाहित्य आणि हा इंग्रजी बालसाहित्याचा अनुवाद या दोहोंमध्ये मला मुख्य फरक जाणवला तो असा, की ‘बोलका ससा’, ‘उडता गालिचा’ यांसारखी आपली मराठी पुस्तकं आपलं वय चार-दोन वर्षांनी वाढल्यानंतर आपल्याला हातातही घ्यावीशी वाटत नाहीत. उलट ‘गॅलिव्हरच्या सफरी’ मी आजही वाचू शकतो. अद्भुतरम्य जगाची सफर घडवताना वाचकाला केवळ चकित करण्याचा उद्देश समोर ठेवून आपलं बालसाहित्य लिहिलेलं असतं. याउलट ‘गॅलिव्हर’सारखी पुस्तकं अद्भुताच्या सफरीतही वास्तव जगावर सतत टिप्पणी करत असतात. एका विशिष्ट वयाच्या वाचकाला, त्याच्या अनुभवविश्वाला, त्याच्या कल्पकतेला पेलू शकेल असं साहित्य लिहितानाच – त्या वाचकाची बौद्धिक वाढही व्हावी; त्याचं कुतूहल जागृत व्हावं; समाज, जग, विज्ञान, उत्पत्तीचा इतिहास यांविषयीच्या चार गोष्टी त्याच्या नजरेखालून सहज जाव्यात… अशी काही योजना या साहित्यात केली आहे असं इतर बालपुस्तकं वाचताना कधी वाटलं नव्हतं. ते त्या काळी ‘गॅलिव्हर…’ वाचताना मात्र वाटलं. इतर पुस्तकांमधून जे मिळालं नाही, ते यातून मिळालं अशी भावना निर्माण झाली; जी त्या वेळी जाणवली नाही किंवा त्या वेळी सांगताही आली नसती.
गलिव्हर नावाचा एक प्रवासी त्याच्या बोटीला झालेल्या अपघातामुळे पिटुकया माणसांच्या देशात पोचतो. त्या देशाचं नाव असतं लिलिपुट. (पुढे लिलिपुट नावाचा एक बुटका अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीत आला, तेव्हा त्यानं स्वतःचं नाव तसं का ठेवलं असावं याचा मला चटकन उलगडा झाला आणि पुन्हा या पुस्तकाची आठवणही झाली.) गलिव्हर चांगला सहा फुटी धिप्पाड आणि लिलिपुट या देशातल्या नागरिकांची उंची मात्र जेमतेम अर्धा फूट. खूप गंमत वाटली. या ‘राक्षसी’ पाहुण्याच्या अचानक येण्यामुळे लिलिपुटमधल्या बुटक्या लोकांमध्ये आलेली भीतीची लाट, त्या भीतीपोटी त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी गलिव्हरचा बंदोबस्त करण्याचा केलेला प्रयत्न, नंतर जुळलेले त्यांचे सूर, शेवटी बिघडलेले संबंध आणि गलिव्हरनं तिथून केलेलं यशस्वी पलायन हे सगळं एवढं रोमांचित करणारं होतं, की मी ते पुस्तक पंधरावीस वेळा तरी वाचलं आणि ते परत न करण्याचा (थोडक्यात ढापण्याचा) काही मार्ग मिळतो का ते पाहणं सुरू केलं. पुस्तकाची किंमत बहुधा तीन किंवा चार रुपये होती. पुस्तक हरवलं तर तेवढे पैसे द्यावे लागणार होते आणि मला ते शक्य नव्हतं म्हणून अखेर मी ते नाईलाजानं परत केलं. परंतु त्यानंतर कित्येकदा लायब्ररीत पुस्तक बदलून घ्यायला गेलो, तेव्हा-तेव्हा हे पुस्तक हाती आलं की मी उभ्या-उभ्या चार पानं वाचून घेत असे. किमान त्याच्या मुखपृष्ठाकडे तरी बारकाईनं एकदा निरखून घेत असे. तेव्हा माझा एक कान आणि एक डोळा खुरखुरियाकडे असे.
हे पुस्तक वाचून झाल्यावर त्याचे आणखी काही भाग आहेत का अथवा अशी आणखी काही पुस्तकं आहेत का याची चौकशी मी लायब्ररीत केली, तेव्हा मला त्या ग्रंथपालानं अक्षरशः धुडकावून लावलं. ‘इथं जी पुस्तकं दिसतात तेवढीच आहेत. आहेत त्यातली पुस्तकं घे, फालतू शहाणपणा करू नकोस,’ अशा अर्थाचं त्यानं फटकारलं (ग्रंथपालांचे तुटपुंजे पगार वगैरे बातम्या वाचल्या, की मला अजूनही त्याची आठवण येते आणि कदाचित त्या पैशात भागवायचं कसं, या विवंचनेमुळेच त्याचा स्वभाव तसा झाला असावा असं वाटून सहानुभूती वाटू लागते. कसाही असला तरी तो माझ्या वाचनाच्या पहिल्यावहिल्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे). त्यानंतर त्याला काही विचारण्याची माझी हिंमतच झाली नाही. कुठल्यातरी दूरच्या देशात अचानक झालेला बुटक्यांचा हल्ला, असा विषय घेऊन मराठीत लिहिली गेलेली आणखी काही पुस्तकं लगोलग वाचायला मिळाली, परंतु गलिव्हरची सर कुणालाच नव्हती. बहुधा गलिव्हरचं यश लक्षात घेऊन किंवा त्यावरून प्रेरित होऊन ती लिहिली गेली असावीत. गलिव्हर लहान मुलांसाठी म्हणून लिहिलं गेलं असलं, तरी मोठ्यांनाही ते तेवढंच आवडेल असं काहीतरी त्यात होतं. लहान मुलांना लहान मुलं न समजता वाचक समजून ते लिहिलं गेलं आहे, असं वाटतं होतं. इतर बालसाहित्य वाचताना हा कोणीतरी काका, मामा किंवा काकू, आजी आपल्याला गोष्ट सांगत आपल्यावर संस्कार करत आहे अशी भावना मनात येत असे. परंतु गलिव्हरच्या सफरी वाचताना हा लेखक आपल्याला मित्र म्हणून सगळं सांगत आहे असं वाटे. मानवी स्वभावातील विसंगती, विनोद आणि भाष्य करण्यातला तिरकसपणा यांचा वापर बालसाहित्यात कुणी केल्याचं मला तेव्हा मी वाचलेल्या इतर पुस्तकांत दिसलं नव्हतं. त्यामुळे हा लेखक आपल्याला लहान समजत नाही, या भावनेनं त्याच्याविषयी जवळीक वाटू लागली होती. अशा प्रकारची मैत्रीची भावना त्यानंतरच्या काळात भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणेमुळे निर्माण झाली आणि पुढे मुंबईत आल्यावर ‘लंपन’ वाचताना त्यातही हा वेगळेपणा जाणवला.
मुंबईत आल्यावर मी सुरुवातीची काही वर्षे कामगार किंवा तंत्रज्ञ म्हणून नोकरी करत होतो. आवतीभोवती वावरणार्‍यांची ‘वाचणे म्हणजे वृत्तपत्र वाचणे’ एवढीच कल्पना होती. त्यातही वृत्तपत्र म्हणजे ‘नवा काळ’. त्यामुळं साहित्य, पुस्तकं यांबाबत चर्चा किंवा त्यांची उपलब्धता याविषयी सांगणारं कोणी नव्हतं. आतली इच्छा, ऊर्मी सतत उफाळून येत असताना अखेर एका अपघातानं मी पत्रकार झालो आणि मग पुन्हा पुस्तकांच्या जगात आलो. त्याबाबत माहिती देऊ शकतील अशा लोकांच्या संपर्कात आलो. जेव्हा केव्हा वेळ मिळेल, तेव्हा दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन तिथं बसूनच, दिवसाला एक असा पुस्तकांचा फडशा पाडू लागलो. तेव्हा मी ‘मुंबई सकाळ’मध्ये होतो आणि ‘सकाळ’मधील पुस्तकांची लायब्ररी सांभाळण्याचं काम मनोहर पारायणे करीत असत. त्यांच्या ओळखीनंच ‘मुंबई मराठी’मध्ये मुक्तद्वार मिळालं. तोवर ‘गॅलिव्हरच्या सफरी’ हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे इतपतच माहिती मिळाली होती. मग मी इंग्रजी पुस्तकांचा शोध सुरू केला आणि मला गलिव्हर सापडला.
या पुस्तकाचा मूळ लेखक जोनाथन स्विफ्ट आहे आणि आपण जो मराठी अनुवाद वाचला त्या पुस्तकाचं नाव A Voyage to Lilliput आहे हे कळलं.
मी मूळ इंग्रजी पुस्तक वाचून माझ्या आठवणींना उजाळा दिला. मराठी अनुवाद कोणी केला होता ते मला अजूनही कळलेलं नाही, परंतु तो चांगला केलेला असावा. कारण इंग्रजी वाचताना मला त्यातले सगळे संदर्भ आठवत होते. स्विफ्टने या पुस्तकाचे आणखी चार भाग लिहिले आहेत हे समजल्यावर अर्थातच तेही मिळवून वाचणे आले. परंतु मी एकच भाग वाचू शकलो, A Voyage to Brobdingnag. पहिल्या भागाच्या पार विरुद्ध टोकाची गोष्ट यात होती. पुन्हा गलिव्हरची समुद्री सफर, पुन्हा त्याचं तसंच भरकटणं. मात्र या वेळी तो अशा प्रदेशात पोचतो, जिथे सगळी माणसं ७०-७२ फूट उंचीची. तिथे गलिव्हर हाच बुटका ठरतो. सामान्य स्थितीतल्या माणसांच्या जगाचं एक, म्हणजे खालचं, टोक पहिल्या भागात; तर दुसरं वरचं टोक या भागात होतं. ज्या एका इसमाला गलिव्हर सापडतो, तो गलिव्हरला बघण्यासाठी तिकीट लावून पैसे कमावतो असं यात दाखवलं होतं. ही दोन्ही जगं स्तिमित करणारी होती आणि लेखकाच्या कल्पनाशक्तीच्या दोन टोकांना खेचून त्याच्या प्रतिभेची परीक्षा पाहणारी होती. फँटसीबद्दल आकर्षण निर्माण करण्याचे आणि लेखनात सतत फँटसीचा उपयोग करण्याचे संस्कार  माझ्यावर बहुधा याच दोन पुस्तकांनी केले असावेत.
संकटांमध्ये सतत सापडूनही गलिव्हरची प्रवासाची आवड कमी होत नाही किंवा त्याला नव्या प्रवासाची भीती वाटत नाही. अर्धा फूट ते ७२ फुटांची माणसं, त्यांचं जग, आणि मध्ये आपलं सामान्य वाटत राहणारं जगणं. या सामान्य मानवी जगापासून दूर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती अस्तित्वात आहेत याचा त्याला सतत अनुभव येत राहतो. प्रत्येक वेळी तो अगदी जिवावरच्या संकटात सापडतो आणि त्याची सुटकाही होते. सुटका होणार याची खात्री असूनही आपण त्यात रमतो. याच प्रकारचा अनुभव आपण बाँडपटातही घेतो. आपल्या बालसाहित्यात, मी वाचलं तेवढ्यापुरतं तरी मला असं वाटतं, की लंपनमुळे रोजच्या जगण्यातल्या गंमती कळतात (हाच अनुभव ‘मालगुडी डेज’ देतं), तर फास्टर फेणेमुळे त्यातला थरार कळतो. काही वर्षांपूर्वी गॅलिव्हरच्या सफरींवर हॉलिवूडचा चित्रपटही आला होता. मी तो पाहायचं टाळलं, कारण या पुस्तकाने माझ्या मनात ज्या प्रतिमा तयार केल्या होत्या, त्या मला जपायच्या होत्या. कदाचित या चित्रपटानं ते जग फार प्रभावीपणे दाखवलं असेलही, पण मला माझं स्वतःचं जग जपायचं होतं, जे मी लहानपणापासून मनात ठेवलं होतं. हे माझं अनेक पुस्तकांच्या, कादंबऱ्यांच्या बाबतीत होतं. आवडलेलं पुस्तक पडद्यावर बघू नये असं मला वाटत राहतं. शांता गोखलेंच्या ‘रीटा वेलिणकर’ या कादंबरीवर आधारित ‘रीटा’ हा चित्रपट, जी. एं.च्या कथेवरून केलेला ‘कैरी’ हा चित्रपट, ‘बोक्या सातबंडे’चा पडद्यावरचा आविष्कार यांनी निराशा केल्यानं हे मत अधिक पक्कं झालं. ‘गॉन विथ द विंड’च्या बाबतीत मात्र मी आधी चित्रपट पाहून मग कादंबरीकडे वळलो आणि दोन्ही आवडले. ‘गाइड’च्या बाबतीतही मी चित्रपट आधी पाहिला आणि नंतर कादंबरी वाचली, तेव्हा मला चित्रपट खूपच तोकडा वाटला. या बाबतीत वेगवेगळी मतं असतील, असू शकतील; परंतु गलिव्हरच्या बाबतीत मात्र मी पुस्तकाच्या बाजूनं मत दिलं, कारण माझ्यासाठी ते केवळ पुस्तक नाही, तर माझ्या कळत्या-न कळत्या वयाच्या सीमारेषेवरील आठवणींचा एक कप्पा आहे. तो मला तसाच ठेवायचा होता. अजूनही गलिव्हरचे पुढचे भाग मी वाचलेले नाही. रोजची निकड म्हणून, साहित्यात नवीन जे येतं ते माहिती असावं म्हणून आणि कधी कधी परीक्षण लिहायचं म्हणूनही नवी पुस्तकं वाचली जातात. त्यामुळे जुनं बरंचसं वाचायचं मनाच्या यादीत नोंदलं जात राहतं. सवड मिळाल्यावर नक्की पहिल्यांदा हेच वाचू म्हणून मी जे काही ठेवलं आहे, त्यात गलिव्हरचे पुढले दोन भाग येतात, जे माझ्याकडे नाहीत. अरेबियन नाईट्सचे १६ अनुवादित खंड (जे मांडणीध्ये रांगेत मांडून ठेवलेले रोज दिसतात) आणि गजानन मेहेंदळे यांनी दोन खंडांत लिहिलेलं शिवचरित्र (जे मला कुमार केतकरांनी दिलं) ही पुस्तकं आहेत. सवड कधी मिळते याची वाट मी पाहतोय. कारण हे सगळं सलग वाचण्यातच मजा आहे.
– श्रीकांत बोजेवार
shrikant.bojewar@gmail.com
***
चित्रस्रोत : आंतरजाल
बालसाहित्यांक २०१७ लेख

खारीच्या वाटा आणि खारीचा वाटा

 

यंदाचा सर्वोत्कृष्ट बालसाहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेल्या ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकाचे लेखक आणि रेखाचित्रकार, ‘गमभन प्रकाशन’ या संस्थेचे सर्वेसर्वा असलेले प्रकाशक आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी सातत्यानं उत्तम काम प्रकाशित करण्याची धडपड करणारे एक साहित्यप्रेमी सक्रिय गृहस्थ.
हे त्यांचं प्रकटन –
***
माझी पार्श्वभूमी लेखकाची नाहीय.
मुलांना केंद्रस्थानी ठेवून मी गेली अनेक दशकं वेगवेगळ्या गोष्टी  करतो आहे. ‘खारीच्या वाटा’ हे पुस्तक म्हणजे त्याचाच एक भाग आहे.
ह्या सगळ्याची सुरुवात आंतरभारतीच्या शिबिरापासून झाली. शाळेत असताना इयत्ता नववीत मी एकवीस दिवसांचं एक निवासी शिबिर केलं होतं. आंतरभारतीचं. त्या एकवीस दिवसांचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. मी अगदी दुर्गम खेड्यातून आलो आहे. पुणं मला सर्वाथाने नवीन होतं. मी खेड्यातल्या शाळेत सर्व उपक्रमांत पुढे होतो, पण पुण्यात आल्यावर परिस्थिती बदलली. मला  इथे जुळवून घ्याययला त्रास झाला. हे शिबिर मी १९६१ साली केलं. पुण्यातल्या ‘मॉडर्न स्कूल’मध्ये ते झालं. आदिवासी आणि शहरी अशा दोन्ही भागांतली एकूण ५५ मुलं शिबिरात होती. त्या शिबिरात चित्रकला, नृत्यकला, वाचन लेखन ह्या सगळ्याचा समावेश होता. आपण जरी खेड्यातून आलो असलो तरी आपणही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास ह्या शिबिरामुळे मला मिळाला. माझा बुजरा आणि संकोची स्वभाव बदलून गेला. पुढे आंतरभारतीतर्फे आम्ही गुजरात आणि केरळमधल्या चांगल्या शैक्षणिक संस्था बघायला गेलो, त्यामुळे बरंच नवं काय-काय बघायला मिळालं. नवीन माहिती कळली. मी समृद्ध झालो. पुण्यासारख्या ठिकाणी उभं राहणं – म्हणजे स्वत:च्या पायावर उभं राहणं – जमवताना मला जे जड जात होतं, ते मी पेलायला शिकलो. नोकरी करायची नाही हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. यदुनाथ थत्ते यांच्यामुळे दहावीत असतानाच प्रेसशी संबंध आला होता. त्यामुळे प्रेसमध्ये काम करण्याचा अनुभव मिळाला. मी राहत होतो, तिथे एक पेंटिगचं दुकान होतं. तिथे लेटरिंगच्या कामाचा अनुभव मिळाला. एका ट्रेनिंग कॉलेजमध्ये एक शिक्षक जलरंगातली चित्रं काढायचे, ते मी पाहिलं होतं. ते बघून रंग कसे तयार करायचे हे कळलं होतं. आंतरभारतीच्या शिबिरातले अनुभव आणि हे निरनिराळ्या गोष्टी बघणं, शिकणं यांतून आलेला आत्मविश्वास – या सगळ्याचा परिणाम म्हणून समाजसेवा करण्यासाठी डॉक्टर व्हायचं असं मी ठरवलं होतं. त्यानुसार मी बी. एस. सी.ला प्रवेशही घेतला. दोन वर्षं अभ्यासही केला. पण  १९६६ साली मला एक अपघात झाला. माझं वर्ष वाया गेलं आणि मग मी अभिनव कलामहाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथल्या शिक्षणाच्या जोडीला प्रत्यक्ष कामाचाही अनुभव मला मिळत होता. इतका अनुभव आणि शिवाय पदवी असताना कोणाच्या हाताखाली काम करण्याची तयारी नव्हती. त्यामुळे चालून आलेल्या चांगल्या-चांगल्या नोकर्‍याही नाकारत गेलो. माझा एक स्वभाव आहे – शक्यतो आपल्याला जे जमतं आहे ते करत राहायचं. नकारात्मक बोलायचं नाही. सुरुवातीला १९७०च्या सुमाराला मुलांसाठी पुण्यात बालनाट्यं केली. तेव्हा त्यातली काहीही माहिती नव्हती. पण एक आव्हान म्हणून ते केलं. मुलांना काय आवडेल, आपल्याकडून काय चुका होऊ शकतात, ह्याचा विचार करून बालनाट्याचे प्रयोग केले. त्यात जादूगार, राक्षस असे कोणतेही अद्भुत विषय न घेता रोजच्या जीवनातले, मुलांना रुचणारे विषय घेतले. मुलांची कामं मुलांनी आणि मोठ्यांची कामं मोठ्यांनी अश्या वेगळ्या पद्धतीने प्रयोग सादर केल्याने ते यशस्वी झाले. परंतु ह्यात माझा खूप वेळ जात होता. व्यवसायाने मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. माझं काम सांभाळून या कामासाठी इतका वेळ देणं मला दिवसेंदिवस शक्य होईना. मग ते बंद केलं.
दहावीत असल्यापासूनच यदुनाथ थत्ते यांच्यामुळे माझा साधना प्रेसशी संबंध आला होता. त्यातून १९९ साली ‘गमभन प्रकाशन’ ही संस्था स्थापन केली. मुलांसाठी चांगली पुस्तकं काढणं हा ह्या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. या संस्थेकडून पहिलं पुस्तक प्रकाशित केलं ते श्रीधर राजगुरू यांचं ‘सहलीचे खेळ’. हे पुस्तक  चांगलं खपलं. हेच कशाला, आतापर्यंत मला कोणत्याच पुस्तकात नुकसान झालेलं नाही. व्यवसाय म्हणून काम करताना मुलांच्या पुस्तकांची मुखपृष्ठं, आतली चित्रं करायचे अनेक प्रसंग आले. तेव्हा व्यावसायिक तडजोड म्हणून मी ते करत गेलो. पण अनेक गोष्टी पटत नसत. मुलांना त्यांच्या जगातल्या गोष्टी मिळायला हव्या, पुस्तकातल्या गोष्टी त्यांना आपल्याशा वाटायला हव्या, त्यांचं पर्यावरणाशी असलेलं नातं तुटता कामा नये हे विचार सतत मनात घोळत असायचे.
राम गणेश गडकरी ह्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मला कळलं, की गडकर्‍यांनी मुलांसाठी ‘चिमुकली इसापनीती’ हे पुस्तक लिहिलं होतं. त्यांना त्या पुस्तकासाठी प्रकाशक मिळाले नाहीत, म्हणून त्यांनी ते स्वत: छापलं. त्यात चित्रं देणं आर्थिक कारणांनी जमलं नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्या इसापनीतीच्या गोष्टी जवळपास जोडाक्षरविरहित आहेत हे त्या गोष्टींचं वैशिष्ट्य. मला हे पुस्तक खूप शोधावं लागलं. शेवटी पुण्यातल्या गोखले हॉलच्या जवळच्या सरकारी वाचनालयात ते मिळालं. पण पुस्तक वाचनालयाच्या बाहेर घेऊन जायला परवानगी नव्हती. तशीच झेरॉक्स प्रत काढायलादेखील परवानगी मिळाली नाही, मग मी ते पुस्तक चक्क हाती उतरवून काढलं. त्यासाठी लागणारी चित्रं काढली आणि चित्रांसकट त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढली. त्याचबरोबर ‘सकाळचा अभ्यास’ हे गडकर्‍यांचंच छोटं नाटुकलंदेखील छापलं.
पुढे मला कळलं, रेव्हरंड टिळकांनी बालकवींकडून निसर्गावरच्या काही गोष्टींची भाषांतरं करून घेतली होती. ती भाषांतरं मी ‘निसर्गाची जादू’ म्हणून छापली. तेव्हा ‘बालकवींनी गद्यही लिहिलं आहे हे महाराष्ट्राला ठाऊक नव्हतं’ असा मथळा ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये छापून आला होता. बालकवींच्या बालकवितांचं पुस्तकपण मी काढलं.
त्यानंतरचं पुस्तक होतं, ते कवी यशवंत यांचं. त्यांनी बडोद्याच्या राजघराण्यातल्या मुलांसाठी ‘मोतीबाग’ हे पुस्तक लिहिलं होतं. त्याची दुसरी आवृत्ती मी काढली.
पुण्यात असलेल्या आदिवासी वस्तुसंग्रहालयाच्या सूचीवर काम करताना माझा डहाणूमधल्या आदिवासी मुलांशी संबंध आला. तेव्हा त्यांच्याकडची कवितांची पुस्तकं आणि त्यांच्या त्याबद्दलच्या प्रतिक्रिया पाहण्यात आल्या.  त्या पुस्तकांत सगळी वर्णनं होती, ती शहरी भागातली. त्यात अनेक वस्तूंची नावं होती, जी या मुलांना ऐकूनही माहीत नव्हती. या प्रश्नावर काय उत्तर शोधता येईल असा विचार करताना तिथल्या शिक्षकांशीही बोलून पाहिलं. पण त्यांनी विशेष उत्साह दाखवला नाही. मग मी संग्रहालयाचे प्रमुख डॉ. गोविंद गारे यांच्याशी बोललो आणि मग ‘आदिवासी बालगीते’ असं एक पुस्तक काढलं. तेव्हा मला बर्‍याच लोकांनी वेड्यात काढलं होतं. ‘कोण घेणार हे पुस्तक?’ असे प्रश्नही विचारले. पण ते पुस्तक चांगलं खपलं. आदिवासी बालगीतांबद्दल उत्सुकता वाटल्यामुळे असेल, पण खूप लोकांनी ते खरेदी केलं.      
मला अजूनही असं वाटतं, की ताराबाई मोडकांनी जी चार-चार ओळींची बडबडगीतं लिहिली, तशी गीतं मुलांसाठी हवीत.  हा विचार करून मी शांता शेळकेंशी बोललो. त्यांनी मला दोन पुस्तकं लिहून दिली. एक ‘चिमुकलं’ नावाचं पुस्तक आणि दुसरं ‘मांजरांचा गाव’ हे पुस्तक – ज्यात फक्त मांजरांच्या कविता आहेत.
माझ्या असं लक्ष्यात आलं आहे, की अगदी ज्ञानेश्वर ते आताचे दासू वैद्य या सर्व कवींनी कधी ना कधी मुलांसाठी कविता लिहिल्या आहेत. मग त्या बालगीतांच्या संकलनाचं काम करावं असं मनात आलं. ते सध्या सुरू आहे.
हे झालं प्रकाशनाबद्दल. मी लिहायलाही खूप लहानपणापासून सुरुवात केली, परंतु ते तात्कालिक विषयांवरचं आणि गंभीर स्वरूपाचं लिखाण होतं. उदा. धर्मांतर, गिरणी कामगारांच्या संपाचे खेड्यात उमटलेले पडसाद, धरणग्रस्तांचा प्रश्न इत्यादी. मला आठवतंय, अत्रे असताना मी ‘मराठा’मध्येदेखील लिहिलं होतं. ‘अक्षर दिवाळी’ नावाचा एक उपक्रम ऐंशीच्या दशकात काही वर्षं चालला. त्यात त्या-त्या वर्षीच्या दिवाळी अंकांमधलं निवडक-वेचक साहित्य प्रकाशित होत असे. माझी ‘इंडीन्यूज’ नावाची कथा त्यांतल्या उत्तम कथांमध्ये भारत सासणे, ह.मो.मराठे यांच्या कथांबरोबर निवडली गेली होती. त्या कथेची उर्दू, हिंदी अशा दोन्ही भाषांत भाषांतरंदेखील झाली. पण माझ्याकडे इतरही काम बरंच असे. दिवाळी अंक, शाळांचे आणि संस्थांचे वार्षिक अहवाल… त्या व्यावसायिक धावपळीत माझं लेखन मागे पडलं. ‘झाड’ नावाचं एक सतरा-अठरा ओळींचं पुस्तक मी मुलांसाठी लिहिलं. त्याची बर्‍यापैकी दखल घेतली गेली.
आता ‘खारीच्या वाटा’बद्दल. ह्या पुस्तकाचा विषय जवळजवळ आठ ते दहा वर्षं मनात घोळत होता. पुस्तकाच्या वेगळेपणाची जाणीव पहिल्यापासूनच मला होती. पुस्तकाचा जो शेवट आहे त्या चार ओळी मी आधी लिहिल्या होत्या आणि मग मागे जाऊन बाकीची गोष्ट लिहिली. विश्वास पाटलांचं बहुचर्चित ‘झाडाझडती’ही याच विषयावर आहे. धरणग्रस्तांच्या आयुष्यावर. ‘झाडाझडती’मध्ये मोठ्या माणसांचे प्रश्न आहेत. त्याखेरीज त्या भागातल्या लहान मुलांचंदेखील एक विश्व असतं, असं माझ्या डोक्यात घोळत असायचं. ते उद्ध्वस्त झालं, तर काय होतं हे मला सांगायचं होतं. ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकातून मी ते सांगायचा प्रयत्न केला  आहे.
अनेक जण मला या पुस्तकाच्या ‘पाडस’ आणि ‘लांडगा’ या पुस्तकांशी असलेल्या साम्याबद्दल विचारतात. मी ती दोन्ही पुस्तकं वाचली नव्हती. मुद्दामहून अलीकडे ती वाचली. पण मला नाही साम्य जाणवलं. ‘पाडस’चा विषय तर पूर्ण वेगळा आहे. असो.
या पुस्तकात मी खूप विचारपूर्वक छोटी-छोटी वाक्यं ठेवली आहेत. वाचताना त्यातून एक लय कशी साधली जाईल, याचा विचार केला आहे. तसंच एकच एक क्रियापद किंवा शब्द पुन्हा पुन्हा न वापरता त्या-त्या भावनेची नेमकी छटा व्यक्त करणारा शब्द शोधायचा प्रयत्न केला आहे. तो सगळा खर्डा मी पाच वेळा लिहिला. वाचताना ठरावीक वाक्यानंतर वाचकालाही विराम जाणवायला हवा, असं माझ्या डोक्यात पक्कं होतं. म्हणून त्याचं डीटीपीदेखील आम्हीच केलं. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा या दोन्हीचं मिश्रण त्यात वापरलं आहे. त्यामागेही विचार आहे. पूर्णतः ग्रामीण बोलीतलं पुस्तक नागर वस्तीतली मुलं कितपत वाचतील ही शंका होती. पण त्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, असं मात्र पक्कं वाटत होतं. म्हणून त्या दोन्ही प्रकारच्या भाषांचं मिश्रण वापरलं. प्रादेशिक शब्दही त्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. पण त्या शब्दांनी वाचकसंख्येवर मर्यादा येईल, असं मात्र मला वाटलं नाही. त्याच्या अर्थापाशी अडायला होऊ नये, म्हणून मागे त्यांचे अर्थही दिले. पण एकूण प्रसंगाचा अर्थ म्हणा, सूर म्हणा, कळला की अशा खास शब्दांचे अर्थही आपल्याला संदर्भानं कळतच असतात. त्यामुळे कटाक्षाने इंग्लिश शब्द टाळले आणि चपखल बसतील असे प्रादेशिक शब्द आवर्जून घेतले. पुस्तक खपाऊ व्हावं असा माझा उद्देश नव्हताच. विशेष करून नागर वस्तीतल्या मुलांना या अनुभवाबद्दल कळलं पाहिजे, त्यांनी गावाकडच्या प्रदेशापर्यंत पोचलं पाहिजे हे माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट होतं. गावाकडची मुलं वाचतील, असं डोक्यात नव्हतं. त्यांनी वाचलं, तर उत्तमच. पण शहरापर्यंत मात्र पोचायचंच हा विचार पुस्तक करताना होता. पुढे हळूहळू लक्ष्यात येत गेलं की ते सगळ्या वयाच्या वाचकांसाठी आहे. पण ते नंतर.
त्या गोष्टीत जो दिनू आहे, त्याच्याबद्दल अनेकांनी मला प्रश्न विचारला. अजुनी मुलं विचारतात, ‘तुम्हांला दिनू भेटला आहे का?’ तर खरंच दिनू होता, मला भेटलादेखील पुढे खूप वर्षांनी. पण माझ्यासारखं त्याचं काही धड झालं नाही. त्याच्या शिक्षणाची काही सोय झाली नाही. जेव्हा पानशेतचं धरण बांधलं जात होतं, तेव्हा त्या धरणाच्या भिंतीला लागून माझं गाव होतं. आमचं पूर्ण गाव धरणाखाली गेलं. त्या दिवसांतलं ते सगळं वर्णन आहे. त्या गोष्टीच्या ओघात परिसराची अनेक वर्णनं येतात. परिसर डोळ्यांसमोर उभा करण्यासाठी त्यातल्या झाडांची, प्राण्यांची, नैसर्गिक वैशिष्ट्यांची नेमकी चित्रं रेखाटणं अतिशय महत्त्वाचं होतं. ते वगळलं असतं, तर पुस्तकाचा आत्माच हरवला असता. पुस्तकातल्या व्यक्तिरेखांइतकाच तो परिसर महत्त्वाचा होता. तोच एक व्यक्तिरेखा होता. त्यांची जंत्री देतो आहे असं न वाटता गोष्टीच्या ओघातच त्यांचं चित्र रेखाटलं जावं, यासाठी मी विशेष प्रयत्न केला. संपादन करतानाही त्यासाठी जागरूक राहिलो.
त्या गोष्टीतल्या परिसराशी माझं बालपण जोडलं गेलं आहे. म्हणून तिथल्या डोंगरात मी एक जागा विकत घेतली. २ गुंठ्यांचा, अगदी मोकळा असा, गवताचा एका कणही नसलेला जमिनीचा तुकडा एक प्रयोग म्हणून घेतला. तिथे एका राखणदार ठेवला आणि त्याला सांगितलं, की ह्या माळावरून कोणालाही काहीही बाहेर घेऊन जाऊ द्यायचं नाही आणि बाहेरून कोणतीही गोष्ट माळावर येता कामा नाही. पुढच्या दोन वर्षांत तिथे जंगल तयार झालं. मग उरलेल्या मोकळ्या जागेत त्या भागातल्याच, परंतु नष्ट होत चाललेल्या, वनस्पती लावायला सुरुवात केली. उदा. नरक्या ही वनस्पती कर्करोगावर औषध म्हणून उपयोगी आहे. त्यामुळे लोकांनी तिची रानंच्या रानं विकून टाकली. आता ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशी झाडं लावली तिकडच्या मोकळ्या भागात. मुलांना याबद्दल कळायला पाहिजे असं मला वाटतं. आपण बालवाडीतल्या मुलांना झाडाबद्दल शिकवतानाही झाडाचे फक्त ठरावीक पाच अवयव तेवढे सांगतो – मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. पानांच्या चवींचे अनेक प्रकार असतात. हे सगळं मुलांना सांगायला नको? काटेसावरीचं खोड कसं खडबडीत असतं, श्वेतसावरीचं एकदम मुलायम असतं; कोकमाचं पान आंबट लागतं, तर कडूनिंबाच्या पानाची चव कडू असते; नारळाचं पान किती मोठं असतं नि उलट बाभळीचं… हे पोरांना कुणी सांगायचं, दाखवायचं? म्हणून मी हा प्रयोग केला आहे. तिथे मुलांना सहलीसाठी नेऊन त्यांना हे सगळं प्रत्यक्ष दाखवायचं, अनुभवू द्यायचं अशी माझ्या डोक्यातली कल्पना आहे. जपानी लेखक फुकुओका यांचं एक पुस्तक आहे – ‘एका काडातून क्रांती’ नावानं त्याचं भाषांतर झालं आहे मराठीत. त्यात त्यांनी परिसरातल्या बिया गोळा करून त्यावर शेणामातीचं लिंपण करून ते छोटे गोळे वाळवायची युक्ती सांगितली आहे. ते वाळले, की मग ते परिसरात टाकत जायचं. पाऊस आला की त्यातून झाडं उगवायला सुरुवात होते. हे तंत्र मी गेली वीस वर्षं वापरतो आहे.
‘खारीच्या वाटा’ हे या सगळ्या प्रयत्नांचा एक भाग असलेलं पुस्तक. खारीचा वाटा असलेलं‍! साहित्य अकादमी पुरस्कारामुळे त्यातली लुकी खार अनेकांपर्यंत पोचली. मुलांच्या पत्रांतून, कार्यक्रमासाठी येणार्‍या आमंत्रणांतून, तिथे मिळणार्‍या प्रतिक्रियांतून तिच्याबद्दल लोकांना जे वाटतं, ते दिसतं. बरं वाटतं. पण हे तिच्या गोष्टीपर्यंतच थांबू नये. त्याच्या पलीकडचंही सगळं दिसावं… म्हणजे पावलं.
– ल. म. कडू
gamabhanaprakashan@gmail.com
(मुलाखत : तिर्री)
***
‘खारीच्या वाटा’चे मुखपृष्ठ : आंतरजाल
‘झाड’चे मुखपृष्ठ  : झाड, गमभन प्रकाशन