बालसाहित्यांक २०१७ लेख

बेटावरचे नियतकालिक आणि सुपरहीरो

ऐंशीच्या दशकातल्या मुलांचे जगणे… एक प्रातिनिधिक आठवण
गेले कित्येक दिवस मी ‘ठकठक’ या पाक्षिकाच्या संदर्भात मिळणार्‍या माहितीचा आणि आठवणींचा शोध घेतोय. हा शोध म्हणजे पाण्यावर अक्षरं कोरण्याचा प्रकार असल्याचं लक्ष्यात आलं, कारण ‘ठकठक’विषयी कोणतेही संदर्भ उपलब्ध असतीलच, तर ते फक्त त्याच्या वाचकांच्या मनामध्ये होते. इतरत्र कुठेही त्यावर आजवर कुणीही लिहिलेलं नाही. आपल्याकडे सामूहिक विस्मृतीच इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, की कधी-काळी पन्नास हजारांहून अधिक  खप असलेल्या नियतकालिकाविषयी कोणतेही दस्तावेजीकरण करणे कुणालाही महत्त्वाचे वाटले नाही. वृत्तपत्र, दिवाळी अंक, मासिके यांमध्ये कुणीही त्याबद्दल चर्चा केली नाही. त्याच्या कर्त्यांची कुणी विचारपूस केली नाही, वा कुणालाही ते किती सालापर्यंत सुरू होते, त्याबाबत काही ठोस माहिती देणे शक्य नाही.
माझ्या लहानपणी ‘ठकठक’ जुन्या अंकांच्या गठ्ठ्यांच्या रूपात एका संध्याकाळी दाखल झाले. साल ८९ किंवा ९० असेल. इयत्ता तिसरी किंवा चौथी असेल. सुट्टी नव्हतीच. तरीही शाळेचा अभ्यास सोडून तेव्हा मन भरेस्तोवर ‘ठकठक’ वाचले होते. त्यातले विनोद शाळेत, चाळीत सगळ्यांना सांगितले होते. आठ-दहा अंकांचा तो गठ्ठा संपेस्तोवर ताज्या-नव्या ‘ठकठक’ची मागणी झाली होती. ‘ठकठक’चे हाती लागतील ते ते, जुने आणि नवे – अंक वाचत होतो, शाळेतल्या-क्लासमधल्या ‘ठकठक’प्रेमी मुलांसोबत अंकांची अदलाबदल करत होतो. रंगीत आणि सुबक मुखपृष्ठ असलेल्या ‘चंपक’-‘चांदोबा’हून हे पाक्षिक अधिक आवडत होते, कारण त्यात चित्रगोष्टी अधिक होत्या. विनोद अधिक होते आणि ‘हे करून पाहा’ नावाचे आत्यंतिक सुंदर असे कृतिप्रवण सदर होते. त्यातल्या सगळ्या गोष्टी करून बघण्यासाठीचे साहित्य घरातल्या घरात असे.
या पाक्षिकाकडे आकर्षित झालेल्या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून मगे वळून पाहताना ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या मुलांकडे फावल्या वेळात करण्यासाठी इतर कोणत्या गोष्टी होत्या, त्यांचा आढावा घेणे आवश्यक वाटते. ठाण्यासारख्या शहराचे आजच्याइतके कॉंक्रिटीकरण झाले नव्हते. तेव्हा गोखले रस्ता, नौपाडा हा ठाण्यातला मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जाई. बाकी जांभळी नाक्यापासून उथळसर-कॅसल मिल नाक्यापर्यंतच्या भागामध्ये लोक लहान-मोठ्या चाळींत किंवा फार तर तीन-पाच माळ्यांच्या इमारतींमध्ये राहत. अभ्यासाचा कालावधी सोडला, तर इथली मुले अनेक संमिश्र खेळांत रमलेली असत. गणपती ते दिवाळी पतंग उडवणे, दिवाळी ते नाताळ गोट्या-भवरे फिरवणे, जानेवारी ते मार्च क्रिकेटज्वर अनुभवणे आणि एप्रिलअखेरीस परीक्षा संपल्यावर गाव वगैरे उरकून शाळा सुरू होईस्तोवर इतर खेळ असे साधारण वेळापत्रक. लपंडाव, डबा-ऐसपैस, लगोरी या खेळांमध्ये रमलेली मुले अंधार पडून घरातून हाक आल्याशिवाय खेळातून वजा होत नसत. ज्याच्या घरातून हाक मारली जात नसे, ते मूल शेवटपर्यंत उंडारत राही आणि घरातलीच कुणीतरी व्यक्ती लाकडी पट्टी घेऊन त्या मुलाला घरी नेत असत. मार खात घरी पोहोचून हात-पाय धुऊन झाल्यावर काही घरांतील मुलांच्या हातात गणपतीस्तोत्र वा हनुमानस्तोत्र कोंबले जाई. काही मुले घरातल्या किंवा शेजार्‍यांकडच्या टीव्हीवरचे दूरदर्शनच्या एकमेव वाहिनीचे कार्यक्रम पाहत अभ्यास उरकत. टीव्हीची गाडी ‘संसद समाचार’पर्यंत आल्यावर पोरांना झोप येई. दहाच्या आत झोपेच्या अधीन होणार्‍या मुलांची ती पिढी होती. शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेचे आकर्षण अधिक होते आणि रविवारी संध्याकाळी लागणारा प्रत्येक सिनेमा अभिजात वाटत असल्याकारणाने तो पाहणे म्हणजे सोहळा असे. किंबहुना रविवारची सकाळ ही ‘रंगोली’ कार्यक्रमातली गाणी बिछान्यातच ऐकण्या-पाहण्यापासून होई. मग सगळ्याच कार्यक्रमांचा टीआरपी चढाच असे. उन्हाळी सुट्टीत रात्री अनेक नाक्यांवर पडद्यावर सिनेमा लावला जाई. तो पाहायला गर्दी होत असे. चाळीत कुणीतरी भाड्याने आणलेल्या ‘व्हीसीआर’वर चित्रपट पाहिले जात, तिथे चाळीतल्या सगळ्याच कुटुंबांतली चिल्लीपिल्ली आणि रिकामटेकडी मोठी मंडळी उपस्थित असत. चित्रपटांच्या गोष्टी थोडयाफार फरकाने सारख्याच असत. १९८७-८८मध्ये कधीतरी दूरदर्शनवरचे कार्यक्रम दुपारी दोन वाजल्यापासून लागू लागले. दूरदर्शनची दुसरी वाहिनी सुरू झाली. एकही इंग्रजी शब्द न कळताही चाळीतली मराठी माध्यमात शिकलेली सारी मुले ‘जायंट रॉबट’ ही जपानी मालिका पाहत. त्यात घडणार्‍या गोष्टींचा अर्थ आपल्या परीने लावत. रविवारी लागणार्‍या ‘ही-मॅन’ आणि ‘स्पायडरमॅन’ या इंग्रजी मालिकांचे दूरदर्शनवर प्रसारण झाले, तेव्हा सुपरहीरो ही संकल्पना पोरांच्या मनावर बिंबवली गेली. रामानंद सागर आणि बी. आर. चोप्राकृत रामायण-महाभारतातील सुपरहीरो आणि हे अमेरिकी सुपरहीरो – हे दोन्हीही दहाबारा वर्षांच्या पोरांसाठी प्रमुख आकर्षणबिंदू बनले होते. त्यामुळे जत्रेतील कचकड्याचे धनुष्य-बाण, सोनेरी-चंदेरी गदा, तलवारी यांच्यासोबत ही-मॅन, स्पायडरमॅन यांची चित्रे असलेले खोडरबर, कंपास-दप्तर, टीशर्ट यांचीही खरेदी सुरू झाली होती. १९९१-९२च्या काळात सुट्टीच्या दिवसांत दूरदर्शनवर ‘फन टाइम’ नावाचा कार्यक्रम मुलांसाठी दाखवण्यात येऊ लागला. त्यात ‘सिंडरेला’पासून इतर अनेक अभिजात कलाकृतींवरील सिनेमे दाखवण्यात येऊ लागले.
हे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे दृश्य आणि शब्द, छपाई आणि प्रसारण या प्रकारच्या माध्यमांचा आवाका आणि पगडा किती नि कसा होता, ते लक्ष्यात यावे.
पुन्हा विषयाकडे येतो. ‘ठकठक’ सर्वाधिक आवडत होते, ते ‘दीपू दी ग्रेट’ या चित्रकथीमधून येणार्‍या मराठी सुपरहीरोमुळे. या दीपूला एकदा संकटात सापडलेला एक परग्रहवासीय भेटतो. दीपू त्याला मदत करतो. त्याची परतफेड म्हणून परग्रहवासीय दीपूला एक जादुई पट्टा भेट देतो. त्या जादुई पट्ट्यातील शक्तीने दीपू त्याच्या परिसरात निर्माण होणार्‍या अनेक सार्वजनिक संकटांतून अनेक जणांना वाचवतो.
या चित्रकथीला सुरुवात झाली तेव्हा भारतामधील मुलांमध्ये अमेरिकी सुपरहीरोची संकल्पना फार रुजली नव्हती. या मालिकेचा पहिला भाग वाचल्यानंतर त्याच्या पराक्रमांची मालिका वाचणे माझ्यासाठी तरी अनिवार्य झाले.
एकूणच ‘ठकठक’च्या लोकप्रियतेमागे त्यातला विनोद, कृती करायला उद्युक्त करणारी अनेक सदरे आणि रंजनप्रधान मजकूर ही कारणे असावीत.
उगाच संस्कार, उपदेश इत्यादी डोस पुरवण्यापेक्षा मुलांना नक्की काय आवडेल याचा विचार त्यात अधिक असलेला दिसे. ऐंशीच्या दशकात जन्मलेली मुले थोडी मोठी होऊन केबलवाहिन्यांच्या आक्रमणाला शरण जाईपर्यंत ‘ठकठक’ या अद्भुत पाक्षिकाचा अंमल कायम होता. केवळ दोन जणांच्या सुपीक डोक्यातून निघालेले हे पाक्षिक अगदी आत्ता-आत्तापर्यंत – म्हणजे २००८ सालापर्यंत – सुरू होेते. बंद होताना त्याच्या खपाचा जो आकडा होता, तो आज मराठीत प्रसिद्ध होणार्‍या कोणत्याही मासिकाला गाठता येईल का, याबद्दल मला शंका आहे. ‘ठकठक’चा खप होता, सुमारे १३ हजार.
फेसबुकावरून माग … ठकठककर्त्यांची भेट
‘ठकठक’ची आठवण होई, तेव्हा त्यातला दीपू दी ग्रेट आठवे. या अंकासाठी अनेक परिचितांना त्याच्याबद्दल विचारून पाहिले. कुणाकडूनही काही मिळेना. काही समवयीन लेखक आणि पत्रकार यांच्या दीपू दी ग्रेटबद्दलच्या आठवणी होत्या. पण त्यात खरी मदत झाली, ती फेसबुकाची. ‘ठकठक’च्या कर्त्यांबद्दल पृच्छा केल्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. पोस्ट्स शेअर करण्यात आल्या. लहानपणी आपण ‘ठकठक’मध्ये काय वाचायचो, याचे दाखले अनेकांनी दिले. दीपूची आठवण प्रत्येकाच्या मनात ताजी होती. कुणाला मोठे होऊन त्यावर सिनेमा काढायचा होता, तर कुणाला ‘ठकठक’ मिळवण्यासाठी आडगावामध्ये केल्या जाणार्‍या धडपडीची आठवण सांगायची होती. ‘ठकठक’चे पान फेसबुकावर असल्याचे कळले. तिथेही अगदी त्रोटक माहिती होती. पण अंकातल्या काही पानांची कात्रणे, लाल कपड्यांतल्या दीपू दी ग्रेटची छबी हे तिथे सापडले. नकुल चुरी या ‘ठकठक’प्रेमी संग्राहकाने अनेक छायाचित्रे पाठवली. ‘ठकठक’ आपल्याला जितके आणि जसे आवडायचे, तसे ते अनेकांना आवडत असे, हे कळले. अशाच काही तारा जुळल्या आणि तोरसकर यांच्या कांदिवलीमधील घरी मी धडकलो.
आनंद तोरसकर यांनी चित्रकार म्हणून अनेक ठिकाणी काम केले होते. त्यांना मराठीमध्ये चित्रकथी शैलीतले आणि मुलांशी संवाद साधणारे, त्यांना गुंतवून ठेवणारे नियतकालिक काढायचे होते.
‘‘त्या वेळची मासिकं उपदेश खूप करायची आणि त्यांची भाषाही मुलांना रुचेल-आवडेल अशी नव्हती. इंग्रजीतल्या ‘टिंकल’सारखं, पण मराठीत स्वतंत्र ओळख निर्माण करेल, असं नियतकालिक आम्हांला काढायचं होतं. म्हणून ठकठक हे नाव घेऊन आम्ही सहा अंकांचं नियोजन केलं. बाजाराचा आढावा घेतला. छपाई, वितरण यांचा अभ्यास केला आणि सहा अंकांचा मजकूर, चित्रं हाताशी ठेवून ६४ पानी चार-रंगी अंक काढला.’’
आनंद तोरसकर यांची पहिल्या अंकाची आठवण साल वा महिना याबाबतची नाही. ती आहे कल्पक विषय साकार केल्याची. निता तोरसकर यांनी मात्र १९८७ सालातल्या ऑगस्टमधली, अंकाच्या जन्माच्या काळातली एक वेगळी आठवण सांगितली.
‘‘बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या अंकाचं उद्घाटन झालं. त्या काळी ‘मार्मिक’ आणि शिवसेना या दोघांचाही जोर होता. या अंकाचं प्रकाशन अशा मोठ्या नेत्याच्या हस्ते होतंय याचं माहीममधल्या अनेक जणांना प्रचंड कौतुक वाटलं होतं. लोकांनी अंकाला खूप चांगला प्रतिसाद दिला.’’
‘‘या पहिल्या अंकाच्या रंगीत छपाईचं आर्थिक गणित थोडं बिघडतंय हे लक्ष्यात आल्यानंतर आम्ही दुसर्‍या अंकापासूूनच त्यात बदल केले. ६४ पानांचा काळा-पांढरा आणि काही पानांवर दोनच रंग घेऊन तयार झालेला दुसरा अंक बाजारात आला. काहीच अंकांनतर सगळी आवृत्ती संपायला लागली. सगळ्या प्रयोगांना उत्तम प्रतिसाद मिळायला लागला.” आनंद तोरसकर सांगत होते.
अंकातली सारी चित्रे, चित्रसंकल्पना आनंद तोरसकर यांच्या, तर लिखाण निता तोरसकर यांचे होते. लिखाण आणि चित्रे हे दोन्ही एकत्रितरीत्या दोघांच्याही पसंतीला उतरल्याशिवाय अंकात जात नसे. काही अंकांनंतरच ‘ठकठक’ने बालवाचकांना लिखाण पाठवण्याचे आवाहन केले. अनेक प्रकारच्या लेखनावर संस्कार करून, त्यात जीव भरत निता तोरसकरांनी ते लिखाण छापले. त्या लिखाणाला मानधन दिले. प्रोत्साहनपर पत्रे पाठवली. लहान मुलांनी काढलेली चित्रे छापली. त्यांना अंकांत सहभागी होण्याची संधी दिली. आज नागरिकांना माध्यमव्यवहारात समाविष्ट करून घेण्यासाठी माध्यमे जे प्रयोग करतात, ते तोरसकरांनी स्वतःच्याही नकळत तेव्हाच केले होते.
१९८८-८९ साली ‘ठकठक’ सर्वाधिक मागणी असलेले बालनियतकालिक झाले.
‘‘ठिकठिकाणचे पालक आपल्या मुलांना घेऊन ‘ठकठक’च्या कार्यालयात यायचे. ती मुलं निताताईंना भेटायला, त्यांच्याशी बोलायला आणि ‘ठकठक’चं कार्यालय पाहायला यायची. मला आता त्या पालकांचे कौतुक वाटते. तेव्हा मुलांच्या हट्टासाठी ते लांबून लांबून ‘ठकठक’च्या कार्यालयामध्ये यायचे.’’
आनंद तोरसकरांचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण मुलांच्या मराठी वाचनासारख्या गोष्टीला महत्त्व देणारी पालकांची पिढी तेव्हा शिल्लक होती, असा निष्कर्ष यातून निघतो.
‘‘इतर दोन सहकारी मदतीला घेऊन माहीमच्या घरामध्ये अंकाचं पॅकिंग आणि इतर बारीकसारीक कामं चालत. अंकाचे बालवाचक आपल्या पालकांसह तिथेच भेटायला येत. अंकाचा पसारा वाढला, तेव्हा माहीमच्या पोस्ट ऑफीसमधल्या यंत्रणेचा काही भाग फक्त ‘ठकठक’साठी राबत होता. पोतं भरून पत्रं यायची, लेख-गोष्टी यायच्या आणि अंक पोस्टातूनच राज्यभरातल्या वर्गणीदार वाचकांपर्यंत पोहोचायचा.’’ इति निता तोरसकर.  
या अंकातले सगळे प्रयोग दाम्पत्याच्याच कल्पनेतून निघालेले होते. संपादक मंडळ किंवा वाचकपाहणी-यंत्रणा असे काही येथे नव्हते. पण मुलांना काय भावेल याचा त्या दाम्पत्याला असलेला अंदाज कधीच चुकला नाही. परिणामी अंकातले वेगवेगळे प्रयोग यशस्वी झाले. मुलांसाठीच्या प्रश्नमंजुषा, शब्दकोडी लोकप्रिय झाली. बक्षिसांच्या आकर्षणानेही या अंकाचा बालवाचक वाढला. अंक स्टॉलवर आल्यानंतर दोन दिवसांत संपायचा. पुन्हा आणवून घेतला, तरीही लगेच संपायचा. रेल्वे स्टेशन आसपासच्या स्टॉल्सवर प्रती शिल्लकच राहत नसत.
मलाही एकदा दहा तारखेनंतर ‘ठकठक’च्या ताज्या अंकासाठी केलेली निष्फळ पायपीट आठवली. जरा उशीर झाला, की ताजा अंक मिळायचा नाही म्हणजे नाहीच.
या तडाखेबंद खपाकडे पाहून एका एजन्सीने ‘ठकठक’च्या दिवाळी अंकाआधी एक नकली अंक बाजारामध्ये काढून विकण्याचा प्रकार केला होता. जुन्या अंकातील मजकूर आणि चित्रांची जुळवाजुळव करून ‘केवळ ठकठक’ नावाने हा अंक बाजारात विक्रीस निघाला. जेव्हा या दाम्पत्याच्या लक्ष्यात ही गोष्ट आली, तेव्हा एजन्सीच्या मोबदल्यात लाख रुपयांचे आमिष तोरसकर दाम्प्त्याला दाखण्यात आले. हे प्रकरण पोलिसात गेले आणि त्या नकली अंकवाल्यांना आवर घालण्यात आला.
‘ठकठक’ एव्हाना इतके लोकप्रिय झाले होते, की कोणत्याही जाहिरातीची, स्तुतीची, वृत्तपत्रीय कौतुकाची तोरसकर दाम्पत्याला गरज वाटली नाही. मुलांनाच त्याचे मोल सर्वाधिक होते. ‘ठकठक’चे अंक नीट लक्ष्य देऊन काढणे, इतकाच ध्यास. त्यांनी ना इतर वाचन केले, ना इतर अभ्यास केला. आपल्या अंकासाठी वेगवेगळ्या विषयांवरच्या स्वतंत्र कल्पना राबविणे, बालवाचकांना पत्रोत्तरे लिहिणे, त्यांच्या एकेका ओळीच्या गोष्टींना, कवितांना कल्पकतेने पूर्ण करून घेऊन त्या अंकात वापरणे यापलीकडे निता तोरसकर यांना दुसर्‍या कोणत्याही गोष्टीचे महत्त्व नव्हते.
अंक वाढत गेला, तशीच तो वाचणारी मुलंही वाढत गेली. नवीन पिढ्यांना दूरदर्शनवरचा शक्तिमान आवडत होता. त्यांना परदेशी सिनेमा, कार्टून्सच्या वाहिन्या मिळाल्या. कॉम्प्युटरवरचे गेम्स, व्हिडिओ गेम्स मिळाले. त्यांची कुतूहलक्षमता विस्तारणारी इतरही आकर्षणकेंद्रे निर्माण होत होती. दोन हजारोत्तर काळात ‘ठकठक’चा आकार कमी झाला. पहिला अंक ६४ पानांचा आणि छोट्या वहीच्या आकाराचा होता. तो तेव्हा चार रुपयांना मिळे. दुसर्‍या अंकापासून ६४ पानांचा अंक अडीच रुपयांत मिळायला लागला. दिवाळी अंकांच्या किंमती जेव्हा १०० रुपयांवर गेल्या, तेव्हाही ‘ठकठक’चा दिवाळी अंक ३० रुपयांत मिळत होता. साधारण पॉकेट बुकपेक्षा मोठ्या आकाराचा अंक १२ रुपयांना मिळे.
‘दीपू दी ग्रेट’ आणि त्याची लोकप्रियता
‘दीपू दी ग्रेट’ येण्याआधी आपल्या मराठी वाचकांना अमेरिकी सुपरहीरोसारखे दुसरे कुणीच माहीत नव्हते. ‘दीपू दी ग्रेट’ पाहिल्यावर त्याची मुळं अमेरिकी वाटायची. पण त्याच्या गोष्टी मात्र तद्दन मराठमोळ्या असत. मराठी समाजामध्ये घडणार्‍या घडामोडींकडे लक्ष्य देत दीपूच्या गोष्टी रचलेल्या असत.
“त्यावर कुणाचा प्रभाव आहे, असं वाटू नये म्हणून मी स्वत: कोणत्याही सुपरहीरोच्या गोष्टी वाचायचं टाळलं.” निता तोरसकर यांनी प्रामाणिकपणे सांगितले. परग्रहवासीय आणि कथानायकाची भेट होणे, कथानायकाला त्याच्याकडून गॅझेट मिळणे, त्याचा वापर करून नायक शक्तिशाली होणे आणि त्याने अनेक पराक्रम करणे या सगळ्या गोष्टी परदेशी वाटतात खर्‍या. पण त्यांच्या आजूबाजूचे वातावरण अस्सल देशी आहे. ‘दीपू दी ग्रेट’च्या गोष्टीमध्ये हेर, भूत, दरोडेखोर, दहशतवादी हे सगळे घटक होते. आणि ते त्या-त्या काळातील घटनांच्या आधारे बेतलेले होते.
‘दीपू दी ग्रेट’च्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांपैकी ही एक प्रतिक्रिया :
“ठकठक मी पहिल्यापासून वाचत नव्हतो. मधल्या काळात कधीतरी वाचायला सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीपासून ‘दीपू दी ग्रेट’ची कथा माहीत नव्हती. नंतर ती आपोआप समजत गेली. प्रत्येक भागात किंवा दोनतीन भागांत मिळून एक-एक कथा असायची, त्यामुळे ती सहज समजायची. दीपू नावाचा मुलगा त्याच्याकडे असलेला बेल्ट लावून सुपरमॅन व्हायचा, आकाशात उडायचा आणि त्याच्या बोटांमध्ये शक्तिशाली किरण असायचे. एका कथेत एका मिलिटरी ऑफिसरच्या मुलाला किडनॅप केले जाते आणि ‘दिपू दी ग्रेट’ त्याला सोडवून अतिरेक्यांचा खातमा करतो. यात माझ्या स्मरणशक्तीचे कौतुक नाही. तो अंक माझ्याकडे अजूनही आहे, कारण त्यात माझा फोटो होता. दुसर्‍या एका कथेत तनरेजा नावाच्या श्रीमंत माणसाला धमक्या येत असतात आणि हा दिपू दी ग्रेट त्या धमकी देणार्‍यांचा नायनाट करतो. दिपू दी ग्रेट तेव्हा आवडायचा, पण नंतर ‘शक्तिमान’सारख्या मालिका आणि कार्टून नेटवर्क वगैरे सुरू झाल्यावर त्याचं आकर्षण ओसरलं. पण अजूनही त्यातली चित्रं आणि भाषा चांगली वाटते.”
ही एक प्रतिक्रिया सोडली, तर अनेकांनी ‘दिपू दी ग्रेट’ आणि ‘ठकठक’बद्दलचे प्रेम व्यक्त केले. पण ‘ठकठक’ नक्की का आवडत असे, याबद्दल मात्र फारशी उत्तरे मिळाली नाहीत.
या ‘दीपू दी ग्रेट’वर आनंद तोरसकर यांचा हात फिरत होता. मध्यंतरी त्यांच्याजवळ कुणीतरी ‘दीपू दी ग्रेट’च्या सिनेमासाठीही बोलणी केली होती. पण ती बोलणी पुढे सरकली नाहीत. ‘दीपू दी ग्रेट’ पुस्तकरूपातही येऊ शकला असता. आताही येऊ शकेल. त्यावर टीव्ही मालिका घडू शकली असती. आताही घडू शकेल.
यांतले काहीतरी प्रत्यक्षात यावे, नाहीतर ‘दीपू दी ग्रेट’ ‘ठकठक’च्या अंकांच्या पानांतच गोठून जाईल.
‘ठकठक’चा उत्तरकाळ
‘ठकठक’ २००८ सालापर्यंत येत होते, हे १९९६ ते २०१७ या काळात मलाही माहिती नव्हते. म्हणजे स्टॉलवर एखादा दिवाळी अंक पाहिला असेल, पण पाक्षिक अंक मात्र त्याआधीच बंद झाला असावा, असा माझा अंदाज होता. ‘ठकठक’ का बंद पडले?
तोरसकरांनी एक कारण सांगितले, की ‘‘पूर्वीसारखी वितरणयंत्रणा राहिली नव्हती. वितरकांची पुढची पिढी धंद्यात तितकी मेहनत घेऊ इच्छित नव्हती.’’
‘ठकठक’ राज्यभरात सर्वदूर पोहोचत होते. त्याची इंग्रजी आर्णि हिंदी आवृत्तीही निघत होती. मासिकाकडून पाक्षिकाकडे अशी त्याची वारंवारताही वाढली होती. मग घोडे अडले, कुठे?
गेल्या शतकभरापासून छापील मासिकांना आर्थिक अडचणी तर सतावताहेतच. त्यात पुढे-पुढे काळ बदलत गेला. मुलांच्या आवडीनिवडी बदलत गेल्या. ‘ठकठक’चा खप ४५ हजारांवरून उतरत गेला. वाचक कमी झाले. वर्गणीदार कमी झाले. मुलांनी मराठीतून वाचावे, याची जाणीव असणारे पालकही कदाचित कमी झाले.
पण तरीही ‘ठकठक’ १० ते १५ हजार हा खपाचा आकडा टिकवून होते. कमी होत गेलेले का असेनात, त्याचे असे स्वतःचे वाचक होते, संग्राहक होते. पण जाहिराती नसलेला अंक काढणे पुढल्या काळात कठीण व्हायला लागले. एका बड्या मासिकाचा अनुभव असलेल्या व्यक्तीने ‘ठकठक’चे नाव खरेदी करून ते टॅबलॉइड स्वरूपात काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यातल्या खर्चापोटी ‘ठकठक’चे नवीन मालक तोट्यात गेले आणि अंक बंद झाला. अंक बंद होऊ नये, म्हणून ‘ठकठक’चे नाव पुन्हा आपल्याला मिळावे अशी विनंती तोरसकर दाम्पत्याने नव्या मालकाला केली होती. पण अव्वाच्या सव्वा किंमतीवरून नवीन मालक खाली येईना, तेव्हा तोरसकरांचाही नाईलाज झाला.
‘ठकठक’ बंद होऊनही खूप काळ लोटला आहे. तोरसकर दाम्पत्य समाधानी आहे. ”ठकठक’ने आम्हांला भरभरून दिलं,’ अशी त्यांची भावना आहे. “आम्ही ‘ठकठक’मध्ये आमचं सर्वस्व ओतलं. त्या आधारावरच घर, गाडी सगळं घेतलं. ‘ठकठक’मुळेच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आम्हांला सेलिब्रिटी असल्यासारखी ओळख मिळाली. राज्यभरातल्या मुलांचं प्रेम आम्हांला मिळालं. आम्हांला शाळेत बोलावलं जाई. मुलं आमच्याशी गप्पा मारत. आम्हांला शेकडो प्रश्न विचारत आणि आम्हांला त्यांच्यात सामावून घेत. आम्ही त्यांना भरभरून आनंद दिला, याचं समाधान आमच्या गाठीशी आहे.’’
या दाम्पत्याचे कृतार्थ उत्तर ऐकताना मला प्रश्न पडला होता, आपण मराठी माणसांनी त्यांना काय दिले? त्यांना भेटून निघाल्यानंतर मला जणू वाटत होते, हे दाम्पत्य एका बेटावर राहते आहे. ते त्यांच्या बेटावर सुखात आहेत. त्यांची कुणाकडून कसलीही अपेक्षा नाही की आपण केलेल्या डोंगराएवढ्या कामाबद्दल आपले कुणी कौतुक करावे, अशी इच्छा नाही.
‘ठकठक’ आम्हांला प्रचंड आवडायचे, पण त्याने आम्हांला काय दिले हे मात्र आम्हांला आजही नीटसे सांगता येत नाही. आम्ही सामूहिक विस्मृतीच्या प्रदेशात वावरणार्‍या पिढीचे प्रतिनिधी आहोत. ‘फारच छान’, ‘वा’,‘चांगले होते’, ‘सुंदर दिवस होते ते’… यांपलीकडे व्यक्त होण्याचीही आमची तयारी नाही. आमच्याकडे व्यक्त होण्यासाठी शब्द उरलेले नाहीत. आमच्याकडे तेवढा वेळही नाही. ‘ठकठक’चे बंद होणे हे एका नियतकालिकाचे अपयश नाही. प्रामाणिकपणे काम करत राहून मुलांच्या प्रेरणा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नांनाच आलेले ते अपयश आहे.
आम्हांला ‘ठकठक’चे महत्त्व कळलेच नाही. ज्या गोष्टींनी आमचे मनोरंजन केले, आमचे कुतूहल शमवले, आमच्या जिज्ञासा जाग्या केल्या; त्या गोष्टींना आम्ही एक साधी केबल आल्यानंतर पुरते विसरलो. पुरत्या दशकभराचीही वाट न पाहता.
– पंकज भोसले
pankaj.bhosale@gmail.com
***
ठकठकची मुखपृष्ठचित्रे : तोरसकर दाम्पत्याकडून
इतर चित्रे : फेसबुकावरून
Facebook Comments