बालसाहित्यांक २०१७ लेख

अभ्यासाला ‘लावलेल्या’ कविता

वाचनाची आवड असो किंवा नसो, पण शाळेत गेलेल्या सगळ्यांनी दर इयत्तेत किमान एकदा तरी ‘भाषेचं पुस्तक’ वाचलेलं किंवा ऐकलेलं असतं; त्यातल्या कविता तरी खच्चून ओरडत म्हटलेल्या असतात. कितीकांनी मुला-नातवंडांना तालासुरात आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक किंवा शाळेस रोज जाताना मज विघ्ने येती नाना अशा दोन-दोन ओळी ऐकवून पुढच्या पिढ्यांच्या आठवणींतही त्या कविता घुसवलेल्या असतात.
‘लिखित साहित्य’ या अर्थानं कवितेचा पहिला संस्कार क्रमिक पुस्तकांतूनच बहुतेकांवर होतो. औपचारिक भाषाशिक्षण संपल्यानंतर मुद्दाम कवितांचं पुस्तक उचलून वाचायला जाणारे फार कमी लोक उरतात. त्यामुळे ‘अशी असावी कविता …’ या प्रकारची समाजाची अभिरुची पाठ्यपुस्तकातल्या कवितांतून तयार होते, असं म्हणायला वाव आहे. अजून टोकरायचं, तर भाषेचं पाठ्यपुस्तक तयार करणार्‍या आणि करवून घेणार्‍या व्यक्ती त्यांच्या दृष्टीने आदर्श अभिरुची तयार करण्यासाठीच धडे आणि कवितांची निवड करत असतात. उदाहरणार्थ, आचार्य अत्र्यांच्या नवयुग वाचनमालेतल्या निवडीमागचा हेतू असा दिलाय: मुलांची भाषा उत्तम व्हावी, त्यांच्या कल्पनेला चालना मिळावी, त्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेचे समाधान व्हावे व त्यांच्या अनुभवाचे क्षेत्र विस्तीर्ण होत जावे.
पाठ्यपुस्तकातल्या कविता या मुलांनी वाचण्यासाठी योग्य असतात, याचाच अर्थ ते बालसाहित्य असतं अशी ढोबळ व्याख्या करायला नको; पण ‘बालकविता म्हणजे त्यात अमुक हवं, तमुक नको’ या प्रकारचे निकष पाठ्यपुस्तकांच्या पिढ्यांतून उत्क्रांत होताना दिसतात का, ते हुडकायचा प्रयत्न या लेखात करतेय.
शिकायला आणि लिहा-वाचायला परवडणारं मराठी समाजमन पाठ्यपुस्तकातल्या बालसाहित्याकडे कसं बघत आलं असणार, आणि त्या समाजाचं दर्शन पाठ्यपुस्तकांच्या एकंदर रचनेत कसं उतरलं असणार याबद्दलही काही अंदाज बांधलेत.    
लेखात संदर्भासाठी इ. स. १८७४ ते २०१४ या कालखंडातली पहिल्या चार इयत्तांची पुस्तकं वापरली आहेत. पुस्तकांमधल्या कविता कसकशा बदलत गेल्या हे त्या कवितांचे विषय आणि संख्या कशा बदलल्या त्यावरून ध्यानात येईल असं वाटल्यामुळे तसे आलेख बनवले आहेत.
वर्गीकरणाच्या सोयीसाठी कवितांच्या विषयांचे सात विभाग केलेयत. काही कविता निसर्ग + कल्पनारम्य, निसर्ग + बाल्य अशा एकाहून अधिक लेबलांना पात्र होत्या.  कवितेचा रोख कोणत्या प्रकाराकडे आहे ते ध्यानात घेऊन त्या अधिक चपखल वाटलेल्या विभागात नोंदवल्या आहेत.
(१)   प्रार्थना : देवाचे गुणगान, देवाकडे सदाचार आणि बुद्धीचे मागणे, रक्षणासाठी विनंती
(२)   उपदेश : ‘बरे सत्य बोला, यथातथ्य चाला’ किंवा ‘मूर्खांची लक्षणे’ या धाटणीचे.
(३)   प्रसंग- / स्थळवर्णन : ऐतिहासिक / पौराणिक / सामाजिक
(४)   देश : प्रादेशिक, राष्ट्रीय, भाषिक अस्मिता व जबाबदारी
(५)   भावजीवन
  •         व्यक्ती : आई, लहान भावंड, भाऊ-बहीण, फेरीवाला, गारुडी, सैनिक, शेतकरी
  •         निसर्ग : पक्षी, प्राणी, फुलपाखरं, पाऊस, झरे, नद्या, चंद्र
  •         वस्तू / सांस्कृतिक घटक : यंत्रं (आगगाडी, जहाज, विमान), रंग, सण, शेती व खाद्यसंस्कृती
(६)   बाल्य : मूलपणाशी जोडलेले अनुभव (खेळ, नाट्य, नाच, गाणे, मौज, शाळेला जाणे, सुट्टी)
(७)   कल्पनारम्य : वास्तव जगातील एखाद्या दृश्याच्या आधारे किंवा स्वतंत्रपणे, वास्तवात नसलेल्या कल्पनासृष्टीचे चित्र.
अव्वल इंग्रजी काळ
अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या तीन वर्षं आधी, इंग्रजी अंमलाखालच्या भारतातल्या प्राथमिक शिक्षणव्यवस्थेबद्दल ’वूड्स डिस्पॅच’ हा एक महत्त्वाचा दस्तऐवज तयार झाला.  हा खलिता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ’बोर्ड ऑफ कंट्रोल’चा अध्यक्ष चार्ल्स वूड यानं गवर्नर जनरल डलहौज़ीला पाठवला होता. १८३५ सालच्या मेकॉलेच्या ’त्या’ नोंदीतली काही गृहीतकं मोडीत काढणार्‍या या आदेशामुळे, देशी भाषांतून प्राथमिक शिक्षणासाठी सरकारी अनुदान मिळण्याची तरतूद झाली. मूळ इंग्रजी पाठ्यपुस्तकांमध्ये संदर्भानुसार बदल करून भाषांतरित केलेली पुस्तकं ’बॉम्बे प्रेसिडन्सी’ इलाख्यातल्या मराठी शाळांमध्ये वापरली जाऊ लागली. याचाच अर्थ या पुस्तकांची आखणी व्हिक्टोरिया राणीच्या जमान्यातल्या प्रॉटेस्टंट नीतिमत्तेनुसार झाली होती. साहजिकच शाळेचं काम म्हणजे मुलांना देवभीरू, पापभीरू, आज्ञाधारक, परोपकारी आणि अखंड कष्टाळू बनवण्यासाठी नीतिमत्तेचे पाठ देणे आणि त्यासाठी मदत म्हणून वाचन – लेखन – गणना शिकवणे. या क्रमिक पुस्तकांमधली पहिल्या व पाचव्या इयत्तेची पुस्तकं (१८७४ साल, दुसरी आवृत्ती) उपलब्ध आहेत.
त्यातल्या पहिलीच्या पुस्तकात वट्ट पाच कविता होत्या. त्या सार्‍या ‘मुलांकडून पाठ करवावयाच्या’ होत्या आणि अनुक्रमे ‘देव, आई, देव, देव आणि देवाने बनवलेली वार्‍याची झुळूक’ यांची महती मुलांवर बिंबवू पाहत होत्या. असे नीतिपाठ घेत-घेत पाचव्या वर्गात येईपर्यंत तर मुलाचा पुरता ‘विद्यार्थी’ झालेला असणार! नजीकच्याच काळात त्या विद्येचा उपयोग अर्थार्जनासाठी करायचा असल्यामुळे त्या पाठ्यपुस्तकात हर प्रकारच्या विद्येचे (आणि १८५७च्या पार्श्वभूमीवर स्वामिनिष्ठेचे) पाठ ठासून भरले होते. त्यात रामदास-तुकारामांचे अभंग, नामदेवांची पदं, मोरोपंत-मुक्तेश्वरांची दीर्घकाव्यं, कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या ’रत्नावली’तल्या अन्योक्ती असं सज्जड साहित्य कवितांच्या गटात होतं. रचनाकारांचं उद्दिष्ट मुलांना उपदेश करणे, निसर्गातून आणि पुराण-इतिहासातून ‘धडे देणे’ हेच होतं. मात्र मुलांचं भाषिक ज्ञान वाढावं हा बालसाहित्याचा एक उद्देश म्हणून पाहिलं, तर पंडित कवींची भाषिक कारागिरी तो उद्देश सफल करायला मदत करत असणार (पुष्पवर्ण नटला पळसाचा॥ पार्थ सावध नसे पळ साचा॥).
आळोख्यापिळोख्यांचा काळ
पुढे सन १८८५ ते १९२० हा कालखंड मराठी समाज आणि साहित्य यांमधला जुने मरणालागुनि जाऊ देण्याचा, आधुनिक स्व-भान जागवणारा काळ होता. याच काळात केशवसुतांनी ‘आत्माविष्कारात्मक स्फुट भावकविता’ लिहून कवितेच्या प्रांतात क्रांती घडवली. बालबोधमेवा, बालमित्र, आनंद अशी मुलांसाठीची नियतकालिकं या काळात सुरू झाली. फुलामुलांचे कवी रेव्ह. टिळक यांनी ‘बालबोधमेव्या’च्या संपादकपदी असताना कवी दत्त आणि बालकवी यांच्याकडून काही बालगीतं लिहवून घेतली. मुलांच्या भूमिकेमध्ये प्रवेश करून लिहिलेल्या या कवितांपासून मराठीत ‘शिशुगीते’ या साहित्यप्रकाराला सुरुवात झाली.
सन १८८२मध्ये ब्रिटिश सरकारने नेमलेल्या हंटर आयोगानं प्राथमिक शिक्षणव्यवस्थेचं नवं प्रारूप पुढे आणलं. बारा वर्षं वयापर्यंत प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं असावं, लिखापढी हा ज्यांचा पिढीजाद उद्योग नाही अशा जातींना शिक्षणाची गोडी लागेल असं पाहावं, शिक्षणाचा मुलांच्या रोजच्या जगण्याशी आणि पुढच्या कारकिर्दीशी संबंध असावा असं महात्मा फुलेंनी या आयोगासमोर केलेल्या निवेदनात सुचवलं होतं. ‘जनसामान्यांसाठी शिक्षण’ ही त्यातली संकल्पना मान्य करून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावं, त्याचा पैस विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नसावा अशा सूचनांचा अहवाल हंटर आयोगानं सरकारला सादर केला. १९०६ ते १९१८ या काळात बॉम्बे प्रेसिडन्सी आणि सेन्ट्रल प्रॉविन्सेस या इलाख्यांत वापरात असलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये हंटर आयोगाच्या धोरणांचा आणि बदलत्या साहित्यजाणिवेचा प्रभाव दिसतो.
या पुस्तकांमध्ये बऱ्याच कविता इतक्या मौजेच्या आहेत, की वरच्या वर्गात गेल्यावरही मुलं त्या कविता हौसेनं चांगल्या चालीवर म्हणत असतील अशी रचनाकारांची खातरी आहे. लहान मुलांच्या रोजच्या पाहण्यातल्या गोष्टी, घटना यांच्याबद्दलच्या कविता ही या पुस्तकांमध्ये आशयाच्या दृष्टीने पडलेली नवी भर. शिवाय रचनेच्या दृष्टीने संस्कृत वृत्तबद्धतेसोबतच अन्य सोप्या चालींच्या, सोप्या शब्दांतल्या बालकवितादेखील आहेत. त्यात आपली सावली बघून नवल करणाऱ्या लहानग्याच्या तोंडची कविता उल्लेखनीय आहे. अथपासून इतिपर्यंत फक्त निरीक्षण, वर्णन आणि कुतूहल इतक्याच भावना त्या कवितेत आहेत, आणि ‘सुप्रभात’ हा या कवितेतला उच्चारायला सगळ्यात कठीण म्हणावासा शब्द आहे. नाहीतर बाकी सर्व कवितांमध्ये सर्व स्थिरचरसृष्टी – मग ते गुलाबाचं फूल असो वा वाहती नदी –  बालकांना कसला ना कसला बोध देण्यासाठीच कवितेत अवतरली आहे. बालपण म्हणजे काय ते मासिकांतल्या कवितांमधून वाचा; शाळेची पुस्तकं मात्र मोठेपण शिकवतील अशी सरळ-सरळ कार्यविभागणी या काळात दिसते.
या कालखंडात मासिकांमधून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर काव्य-नाटकांची दीर्घ परीक्षणं लिहीत होते. बोध व काव्य या कल्पनाच परस्परविरुद्ध आहेत असं ठासून सांगत होते. नीतिबोधाचा हेतू वेठीस धरावयास सापडला नाही, तर निदान शुद्ध व अलंकृत भाषेच्या द्वारे व्याकरणाचे व साहित्यशास्त्राचे ज्ञान देण्याचा हेतू तरी प्रत्येक सुंदर काव्यात सापडतोच अशा शेर्‍यांमधून आनंद हेच कवितेचं प्रयोजन आणि काव्याच्या मूल्यमापनाचा निकष असल्याचा दावा करत होते. कवितेबद्दलची ही जाणीव प्राथमिक शाळेच्या पुस्तकांमध्ये यायला मात्र बराच काळ जावा लागला.
लोकसहभागाचा, चळवळींचा काळ
१९२० ते १९५० या तीन दशकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या जनचळवळी, महायुद्धं आणि दुष्काळ या पार्श्वभूमीवर प्रमाणित सरकारी शिक्षणावर भर असण्यापेक्षा खासगी शिक्षण महत्त्वाचं ठरलं. वेगवेगळ्या कंपन्या व संस्थांच्या ‘रीडर्स’चा आणि वाचनमालांचा – म्हणजेच पूरक पुस्तकांचा – सोय, हौस व गरज यांनुसार भाषाशिक्षणासाठी वापर होऊ लागला. ही रीडर्स ’सरकारमान्य’ असली, तरी त्यांची धोरणं खासगी परिप्रेक्ष्यात ठरली होती. त्यामुळे मराठी साहित्यक्षेत्रातल्या आधुनिकतेचं वारं त्यांतल्या कवितांनाही लागलं. केशवसुत आणि त्यांच्या वारसांच्या म्हणजे भा. रा. तांबे, दत्त, ना. वा. टिळक, गिरीश, मायदेव, माधव ज्यूलियन्‌, बालकवी आदींच्या कविता पाठ्यपुस्तकांमध्ये आलेल्या दिसतात त्या १९३०च्या सुमारास आलेल्या खाजगी वाचनमालांमधून. त्याच्या अगोदर ’कवी निजधामाला गेल्याला किमान शंभर वर्षे झाल्याखेरीज त्याच्या कवितांचा टिकाऊपणा ध्यानात येत नाही; सबब तत्पूर्वी त्या पाठ्यपुस्तकात घेऊ नयेत’ असा काहीतरी सरकारी शाळाखात्याचा नियम असावा वाटतं! हयात कवींच्या कविता पुस्तकात घ्यायला किंवा पुस्तकात घेण्यासाठी म्हणून हयात कवींकडून कविता रचून घ्यायला सुरुवात झाल्यानंतर त्या कवितांमध्ये समीक्षकी साहित्यगुण असोत-नसोत, पण मुलांच्या जगाशी नातं असलेले ताजे शब्द आणि प्रतिमा आहेत असं दिसायला लागलं.
प्रमाणबोलीतले शब्द या कवितांमध्ये येऊ लागले. उदाहरणार्थ,
ठेवि चष्मा मग कसा बसा नाकीं
ग्रंथ इंग्रजि उलटाच धरी हातीं
रेलुनीया मेजास लावि पाय
’येस नो’च्या वाचनी दंग होय
(वा. गो. मायदेव, ‘बाललीला’)
मॅक्‌मिलनच्या पुस्तकात मावळ बोलीतली एक कविताही आहे. रायगडाला जाऊन शिवरायांचं दर्शन घेऊ इच्छिणार्‍या मावळ्यांच्या तोंडची. ती लिहिली मात्र आहे रविकिरण मंडळातल्या कवी गिरीशांनी. त्यामुळे ‘ठेवून्‌ म्होरलं धोरन ज्येनं बांदलं तोरन’, ’मायबोलीचा जोर करि दरारा थोर’ असे प्रस्थापित साहित्यिक शब्द आणि प्रतिमा तिच्यात आहेत.
कवितांच्या आशयानुसार या वाचनमालांमध्ये ‘राष्ट्रीय / प्रांतीय / भाषिक अस्मिता’ हा अजून एक गट वाढला. पूर्वी पिंजऱ्यातल्या पक्ष्याकरवी किंवा ऐतिहासिक व्यक्तिरेखांकरवी व्यक्त होणारी स्वातंत्र्याची संकल्पना आता थेट देशासाठी वाचकांना हाळी देऊ लागली. मॅक्‌मिलनच्या पहिल्या इयत्तेत मुलाने ‘वीर होणे’ हा आदर्श असलेली एक कविता आहे. पुढे देशाला ‘प्रियकर हिंदिस्तान’ असे संबोधणारी एक कविता आहे. तिच्यात ‘हिंदिस्तान’ शब्द कवीने ‘मुद्दाम योजिला आहे…हिंदी मनुष्य पारशी, ख्रिश्चन, मुसलमानही असेल.’ असा न-धार्मिक खुलासा केलाय. त्यापुढच्या इयत्तांत मराठी भाषा, महाराष्ट्र, विदर्भासारखा मराठीभाषक प्रांत यांची गौरवगीतं आहेत. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळणं हे सर्वोच्च प्राधान्य; आणि ते मिळाल्यानंतर आपली भाषा, आपला प्रदेश यांमधून आपली स्वतंत्र ओळख जपणं ही तेव्हाच्या समाजधुरीणांना भासू लागलेली गरज या कवितांच्या निवडीमध्ये दिसते. ज्या वयात अबोध मन आणि जाणिवा आकार घेत असतात, त्याच वयात ’देव’ या अमूर्त संकल्पनेसोबत ’देश’ ही संकल्पना पाठ्यपुस्तकांमधून मुलांनी आत्मसात केली असणार. पुढे १९४२मध्ये ही पिढी ’क्रांतीचा जयजयकार’ गात ’विशाखा’मय झाली नसती तरच नवल.
मॅक्‌मिलनच्या रीडरांमधून कवितांमधले बोधामृताचे डोस कमी होताना दिसले, पण ते पूर्णत: निघून गेले असं नव्हे. एका कवितेची सुरुवात होते, ती घरापासून दूर ठिकाणी शिकायला असलेली मुलगी सुट्टी सुरू झाल्यामुळे मनात ‘फार फार धाली’ आहे अशी. ही काहीतरी मुलांच्या भावविश्वातली आधुनिक बालकविता असावी अशा समजाने पुढे वाचायला गेलं, तर मात्र त्या मुलीचं घर कसं ‘घर असावे घरासारखे’ थाटाचं आहे, याच वर्णनात अख्खी कविता संपते. ‘बाळ व आरसा’ या कवितेत आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाची प्रथमच जाणीव होऊन गोंधळलेल्या मुलाचं वर्णन आहे. त्यातही त्याच्या आईच्या तोंडी ‘तू रागवलास की ते प्रतिबिंब रागवतं, तू हसलास की ते हसतं,’ म्हणजेच जैशी वृत्ती तुझी जगाशी तशी जगाची तुजशी  हा बायबली अर्थान्तरन्यास आहेच.
१९०० ते १९५० या अर्धशतकात मराठी साहित्यसमीक्षेत साहित्याचं प्रयोजन ’उद्बोधन की रंजन?’ यावर बरीच चर्चा झाली. ‘दोन्ही’ असं समन्वयवादी धोरण बहुतेक साहित्यकारांनी स्वीकारलं. त्याचंच प्रतिबिंब या ‘रंजनातून बोध’छाप कवितांमध्ये दिसतं.
तिसऱ्या इयत्तेतल्या, ‘खरं ज्ञान’ देणाऱ्या एका कवितेला मात्र आज बालसाहित्य म्हणून पाठ्यपुस्तकातच काय, कुठल्याही पुस्तकात थारा मिळणार नाही. जगात पैसाच कसा प्यारा असतो, अशा आशयाचं ते अख्खं कवन आहे.
(पैशात शील शक्ती, सौंदर्य धर्म भक्ती
पापामधून मुक्ती, पैशामुळे दरारा )
मराठी तिसरीत अभ्यासाला ही कविता लावणारी व्यक्ती वॉरन बफेटची वैचारिक स्नेही समजायची, की असल्या पैशाचा लहान वयातच मुलांना उबग आणून त्यांना धट्ट्याकट्ट्या गरिबीकडे वळवणारी समजायची? कदाचित या दोन्ही प्रकारची नसून नुसतीच ‘फ्रेंड्स’मधल्या फीबी बुफेसारखी मुलांशी खरं बोलणारी ती व्यक्ती असेल!

आचार्य अत्र्यांच्या नवयुग वाचनमालेची नवता तिच्या कवितांच्या शैलीतून झटकन ध्यानात येते. यापूर्वीच्या क्रमिक पुस्तकांमधल्या बऱ्याच कविता भल्याभक्कम अक्षरगणवृत्तांमध्ये, मात्रावृत्तांमध्ये बांधलेल्या असत. ते नसेल, तर किमान ‘भानुउदयाचळी तेज पुंजाळले’  अशा जिभेच्या कवायती नक्कीच. ‘नवयुग’च्या लहान इयत्तांतल्या पुस्तकांत मात्र ‘निळे निळे काय? आभाळाचे अंग. पिवळा पिवळा काय? सोनियाचा रंग’ अशी आधुनिक लयीतली कविता दिसते. ‘आईचे जरिपातळ चावुनि, छान बनवली मच्छरदाणी’ असले उंदीरमामा दिसतात. ‘जे आहे ते’ अशा वर्णनात्मक कविता साध्या शब्दांतल्या उपमा-उत्प्रेक्षांनी अजून श्रीमंत होतात (ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर). मग ‘असं असेल का?’च्या कल्पनारम्य कवितांकडे हळूहळू मोहरा वळतो (पाखरांची शाळा भरे पिंपळावरती). उपदेश आणि तात्पर्य यांपासून बालकवितांची बरीचशी सुटका करण्यात ‘नवयुग’चं योगदान मोठं आहे. त्या काळात मुलांसाठी निवडलेल्या काही कविता आजही पाठ्यपुस्तकांमध्ये सामील होण्याइतक्या सार्वकालिक आहेत.
मराठीभाषक राज्याचं बालपण
स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचना होऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनेतोवर साऱ्या मराठीभाषक प्रदेशासाठी प्रमाणित पाठ्यपुस्तकं नव्हती. साठोत्तरी काळापासून ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे’ यांच्याकडे अशी पुस्तकं तयार करण्याची जबाबदारी आहे. गेल्या पन्नास वर्षांत ‘बालभारती’च्या सहा माला त्यांनी तयार केल्या आहेत – म्हणजे सरासरी दहा वर्षांत एकदा प्रत्येक इयत्तेचा ‘सिलॅबस बदललाय.’
त्यातली पहिली माला १९६८ साली सुरू झाली. पूर्वीची ‘कमळ बघ’, ‘बदक बघ’वाली शब्द-ओळख या पुस्तकांमध्ये होतीच; पण त्याच्यापुढे छोट्या-छोट्या वाक्यांच्या सहज नादातून ‘गद्यही आहे, पद्यही आहे’ असे लयदार धडेही होते:
हात मऊ. पाय मऊ.
नाक लहान. कान लहान.
चल चल बाळा.
पायात वाळा.
सत्यनारायणाच्या कहाण्यांची आठवण करून देणारी, मराठी भाषेची ही मायेची लय पाठ्यपुस्तकात आली. त्याच्यानंतर मुक्तछंदाचे प्रवर्तक कवी अनिल यांची ‘वाट’ ही कविता आली.
(मला आवडते वाट वळणाची
सरघसरणिची पायफसणीची
लवणावरची पानबसणीची)

पहिल्या इयत्तेत अभंग आहे, पण विटीदांडू, लगोऱ्या, आट्यापाट्या, हुतुतू असं मूलपण जपणारा; ‘आपुलिया बळें नाही बोलवत’ थाटाचा हा ‘विठूचा गजर’ नाही. मुख्य म्हणजे या मालेतल्या पहिलीच्या पुस्तकात कुठल्याही कवितेला ‘कविता’ असं लेबल नाही – ना अनुक्रमणिकेत, ना धड्यात. पण ही गंमत पुढच्या इयत्तांमध्ये कायम ठेवलेली नाही. तिथे कोणती कविता आहे ते स्पष्ट छापलंय. वास्तविक,
देवाने विचारले,
“ससेराव, ससेराव, का रडता?
नारळाच्या झाडाआड का दडता?”
ही एका धड्याची शैली म्हणजे जुन्या संस्कृत नाटकांतल्यासारखी गद्य-पद्यात्मक. मात्र कविता आणि इतर अशा थेट वर्गीकरणामुळे हा मस्त लयीतला, कल्पनारम्य मजकूर ’कविता’ मानायची शक्यता खुंटली. पुढं दुसरी-तिसरीत ‘गाणी’ नावाचा नवा विभाग आला. चौथीत संगीतिका, अभंग अशी पोटविभागणीही झाली.
अर्थात, प्राथमिक शाळेत ही वर्गीकरणाची चौकट नको असं मला जे वाटतंय, तो फुक्कटचा विदग्ध दृष्टिकोन असू शकतो. सार्‍या महाराष्ट्रात प्रमाणित शिक्षणाचं लोण पोचवण्याची जबाबदारी अभ्यासक्रम आणि पुस्तक आखणार्‍यांवर असते,पण प्राथमिक शाळेतले भाषाशिक्षक हेच त्या अभ्यासक्रमाचे वाहक असतात. पुस्तकाच्या आखणीमागचा दृष्टिकोन कोणता आणि त्यातल्या कविता कशा ‘शिकवणं’ अपेक्षित आहे याबद्दलचं प्रशिक्षण अगदी मोजक्याच प्राथमिक शिक्षकांना त्या-त्या पुस्तकासंदर्भात देता येणं शक्य असतं. थेट वर्गीकरण केल्यानंतर शिक्षक-हस्तपुस्तिकेमध्ये ‘गाणी फक्त तालासुरात म्हणून घ्या. मुलांना त्यांना चाली लावू द्या. ती पाठ करणे, त्यांच्यावर लेखी प्रश्न विचारणे हे अपेक्षित नाही’ – इतकी सूचना दिली तरी रचनाकारांची उद्दिष्टं शिक्षकांपर्यंत पोचू शकतात.
विस्कळीत दशक
१९७६ साली सुरू झालेल्या दुसऱ्या मालेत पहिली ते चौथी सगळ्याच इयत्तांमधल्या कवितांना लेबलं आली. यातलं पहिलीचं पुस्तक तर उत्क्रांतीऐवजी अवक्रांतच झाल्यासारखं वाटतं. धड्यांमधली लय जाऊन एकसुरीपणा आला, कवितांची संख्या कमी झाली.  
‘ढुम्‌ ढुम्‌ ढुमाक्..’सारख्या साखळी-गोष्टींमधून काही लयदार वाक्यांचे काही तुकडे पुन:पुन्हा सांगितले जातात. प्रत्येक वेळी त्या तुकड्यांमध्ये थोडासा पण अर्थपूर्ण बदल असतो, किंवा अजून एका वाक्याची भर घातलेली असते. हळूहळू ती गोष्ट परत ऐकताना मूल ती वाक्यं स्वत: म्हणायला लागतं. रचनेचं हे मूळ तत्त्व ध्यानात न घेता नुसतं ‘पुनरावृत्ती मुलांना आवडते, ती भाषा-शिक्षणाला आवश्यक असते’ असं काहीतरी पाठ करून या पुस्तकातले धडे लिहिल्यासारखं भासतं. उदाहरणार्थ,
चिऊताई, चिऊताई, हवा का खाऊ?
चिव चिव चिव.
असा सुरू होणारा धडा पुढे फक्त ‘खाऊ’च्या ऐवजी ‘शिरा’, ‘वडा’ असे शब्द बदलत दळण दळत बसतो. जवळपास सगळ्याच कविता जुन्या क्रमिक पुस्तकांतून घेतलेल्या ‘नेहमीच्याच यशस्वी’.
१९७९ साली आलेल्या, इयत्ता दुसरीच्या पुस्तकात मात्र नव्या कवी-कवयित्रींच्या कविता, टागोरांची अनुवादित कविता आणि ‘नाच रे मोरा’सारखं चक्क सिनेमातलं बालगीतही आहे. या कविता मुलांच्या भावजीवनाशी जवळच्या विषयांवरच्या असल्या, तरी रचनेच्या दृष्टीनं ‘चल गं सई’सारख्या काही जमून आलेल्या कविता वगळता फारश्या आकर्षक वाटत नाहीत. १९८२ सालच्या तिसरीच्या पुस्तकातल्या कवितांची निवड विषय, आशय आणि रचना यांच्या दृष्टीनं चांगली आहे. पण पुन्हा १९८३च्या चौथीच्या पुस्तकात अचानक काव्यविषयांचा ‘फोकस’ बदलून उपदेशाकडे झुकला आहे.
या पुस्तकांच्या प्रस्तावनेत ‘आधीच्या इयत्तेशी वरच्या इयत्तेचे पुस्तक मिळते-जुळते व्हावे म्हणून विशेष प्रयत्न केल्या’चं नोंदवलं आहे. कदाचित, प्रत्येक पुस्तक वेगवेगळ्या धोरण-कल्पना असलेल्या व्यक्तिसमूहांनी रचलं असल्यामुळे असे विशेष प्रयत्न करायची गरज भासली असेल. ते प्रयत्न फारसे यशस्वी झाले असं दिसत तरी नाही. एकुणात त्या विशिष्ट कालखंडात महाराष्ट्रात आणि देशामध्ये जी अनुशासनप्रिय राजकीय परिस्थिती होती, आणि जिच्यात भराभरा केलेल्या अनेक सामाजिक प्रयोगांमुळे उलट गोंधळ आणि विस्कळीतपणा वाढला त्याच परिस्थितीशी या पुस्तकमालेचा संबंध जोडण्याचा मोह आवरत नाही!
सर्वांसाठी शाळेतलं बालपण
पुढे १९८६मध्ये भारत सरकारने जाहीर केलेल्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातही प्राथमिक यत्तांसाठी नवा अभ्यासक्रम आखण्यात आला. त्यावर आधारलेल्या १९८९च्या ‘बालभारती’मालेमध्ये ‘सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण’ या उद्दिष्टाचा चंचुप्रवेश झाला. पहिली ते चौथीच्या पुस्तकांच्या आखणीत पुन्हा सुसूत्रता, क्रमाक्रमाने विकसित होत जाणारं भाषाज्ञान आणण्याचा प्रयत्न केला गेला.
पहिलीत पाडगावकरांची ‘वेडं कोकरू’, वि. म. कुलकर्णींची ‘झुक्‌ झुक्‌ गाडी’ आणि अनुताई वाघांची ‘शेजीबाईची बकरी..’ अशा छोट्या, जलद ठेक्याच्या कविता; दुसरीत कुसुमाग्रजांची ‘गवताचं पातं’, गोपीनाथ तळवलकरांची ‘मला वाटते’ अशा ठाय लयीत म्हणता येण्याजोग्या कविता; तिसरीत तुकडोजींची ‘या भारतात’, तुकारामांचे अभंग आणि रामदासांचे श्लोक; आणि चौथीत यशवंतांची ‘आई’, सोपानदेव चौधरींचं ‘महाराष्ट्र गीत’ अशा वृत्तबद्ध कविता अशी विषय आणि रचना यांच्या दृष्टीनं चढती भांजणी दिसते. ही पुस्तकं पूर्वीपेक्षा जास्त दूरवरच्या, प्रमाणबोलीची फारशी ओळख नसलेल्या समाजघटकांपर्यंत पोचणार आहेत या दृष्टीनं या मालेत सर्वसमावेशक विषयांवरच्या आणि लहान कविता घेतल्या असाव्यात.
भाषाशिक्षणाचा नव्यानं विचार
१९९५मध्ये महाराष्ट्रात आखलेल्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात ‘शिक्षण क्षमताधिष्ठित असावं, भाषिक क्षमता वैयक्तिक असली तरी ती मिळवण्याची प्रक्रिया सांघिक असते’ या गोष्टींचा विचार केला गेला. पाठ्यपुस्तकं १९९७ साली प्रकाशित करून, वर्षभर त्यांच्याबद्दलचे अभिप्राय मागवून पुन्हा १९९९-२०००मध्ये त्यांची सुधारित आवृत्ती काढण्याचा स्तुत्य उपक्रम या मालेत राबवला गेला.
या मालेत पहिली-दुसरीत एका विषयावरच्या वर्णनात्मक, नादमय सोप्या शब्दांच्या कविता (मोर, भिंगरी, झोका), मग थोड्या अमूर्त भावनांच्या कविता (उदा. रुसलेल्या मुलीला ‘बोला बाई बोला’ म्हणणारी, शांता शेळकेंची कविता), मग निसर्गकविता आणि पुढे आठवणीतल्या कवितांपैकी मायदेवांची ‘चला सुटी झाली’ आणि ग. ह. पाटील यांची ‘फुलपांखरूं छान किती दिसते’, कुसुमाग्रजांची ‘उठा उठा चिऊताई’ या सगळ्या कविता मुलांच्या भावजीवनाशी निगडित आहेत. या मालेत तिसरी-चौथीतल्या पुस्तकांमध्ये मात्र मुलं एकदम मोठी झालीत असं वाटतं. आता झाडं लावण्याची, भारतीय जनदेवतेला नमन करत उद्याच्या युगाला आकार देण्याची जबाबदारी या ‘छोट्याशा बहीणभावां’वर येते. त्यांची स्वप्नंही ‘अंतराळवीर बनेन’ अशासारखी आधुनिक आणि उत्तुंग असतात. पाडगावकरांची ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’, कुसुमाग्रजांची ‘हळूच या हो’, तांबेंची ‘सायंकाळची शोभा’ या कविता बालपणाच्या पारड्यात येतात, पण एकूण वजन जबाबदारीच्या पारड्यातच जास्त दिसतं.
गतिमान समाजासोबत धावतानाची दमछाक
२००६ ते २००९ या काळात पुस्तकांचा नूर पुन्हा एकदा बदलला.
कवितांच्या रचनेच्या बाबतीत त्या ‘गुणगुणता येतील अशा असाव्यात’ हे मार्गदर्शक धोरण ठरलं. म्हणजे भाषा ही  मुख्यतः लिहायची नसून बोलायची असते, तशा कविता या वाचायच्या नसून गायच्या असतात हे प्राथमिक  शाळेतल्या बालकवितांच्या बाबतीत तरी  मान्य झालं.
पण आशयाच्या बाबतीत, मागची माला थोडी जास्तच बाळबोध असल्याचे अभिप्राय आले असावेत, किंवा नव्या सहस्रकातली मुलं फारच स्मार्ट असल्याचा सुगावा रचनाकर्त्यांना लागला असावा. कारण एकाहून अधिक विषय एकाच कवितेत येताहेत अशा, थोड्या कठीण शब्द-संकल्पनांच्या कविता या मालेत पहिलीपासूनच आहेत. उदा. पूर्वीचं ‘छान किती दिसते’वालं फुलपाखरू पहिलीच्या पुस्तकात ‘त्या रंगांचा झगा घालूनी भिरभिरते’. ‘प्राणाहुनि प्रिय’ असणारा तिरंगी झेंडा, देशासाठी मुलांना तयार करणारी शाळा हे दुसऱ्या इयत्तेतच हजेरी लावतात. ‘आनंद’ या नावाच्या कवितेतला आनंद मूलपणाचा सहज आनंद नाही, तर ‘देह, तनू, अन्‌ शरीर, काया, राष्ट्र, मायभू, देशा देऊ’ या समर्पणाचा मोठ्ठाला आनंद आहे. समानार्थी शब्द शिकवायचा केवढा तो अ-काव्यरसी आटापिटा आहे या कवितेत! पुढे संगणक या नव्या सांस्कृतिक घटकाचा कवितेतला चंचुप्रवेशही झालाय. मात्र या वयातली मुलं तो ज्यासाठी वापरतात (गाणी, कार्टून्स बघणं, गेम खेळणं), त्याला ‘रंजन’ या एका शब्दात गुंडाळून बाकी अख्खी कविता हिशेब, ज्ञान, विश्वबंधुत्व वगैरेच्या पसाऱ्यात अडकली आहे. चौथीच्या पुस्तकातल्या आठवणीतल्या कविता – शांता शेळकेंची ‘पावसाच्या धारा येती झराझरा’, अनिलांची ‘ओढाळ वासरू’ आणि अत्रेंची ‘आजीचे घड्याळ’ या चांगल्या आहेत असं वेगळं लिहायला नको. मात्र त्यांच्यातलं, विशेषत: शेवटच्या कवितेतलं, जग झपाट्यानं शहरी होत चाललेल्या मुलांच्या विश्वाला फारच परकं आहे. अर्थात निवडकारांच्या दृष्टीनं, ‘सर्व-शिक्षा अभियान’अंतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांचा आणि खेड्यापाड्यांचा विचार करून या कविता घेतलेल्या असू शकतात. “प्रस्थापितांची मुलं तशीही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये येत नाहीत, त्यामुळे त्यांच्या प्रतिमासृष्टीचा विचार कशाला करा?” असं धोरण असू शकतं. मात्र आज राज्यभरातल्या गावाकडचं, वस्त्यांमधलं अणि पाड्यांवरचं जगणं या जुन्या कवितांसारखं असेल, हेदेखील शक्य नाही. त्यामुळे या अख्ख्या मालेमध्ये, आसपासच्या झपाट्यानं बदलणाऱ्या जगात किमान पाठ्यपुस्तकांतून तरी जुनं, भरवशाचं, सच्छील जग तयार करू असं भाबडं स्मरणरंजन सुरू असल्याचा भाव जाणवतो.
लय सापडू लागलीय
२०१३-१४ सालची बालभारती-माला ही भारतात शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल जबर ऊहापोह सुरू असताना तयार केली गेली. शिक्षणहक्क कायदा, ‘आठवीपर्यंत हमखास पास’ धोरण आणि मुलांच्या आकलन-ग्रहणक्षमतेत झालेली घट, ‘मुलं पूर्वज्ञानावर आधारित स्वत:ची स्वत:च शिकत असतात आणि शिक्षकांनी त्या प्रक्रियेसाठी पूरक वातावरणनिर्मिती करायची असते’ अशा मताचा ज्ञानरचनावाद  अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा, प्रयोग गेल्या काही वर्षांत सुरू आहेत. नुसतं सर्वांपर्यंत पुस्तक पोचवून उपयोग नाही, तर सर्वांना आपलं वाटेल असं काही त्या पुस्तकात असावं, या धोरणाचा जाणीवपूर्वक वापर या मालेत केलेला दिसतो.
१९९९-२००० आणि २००६-०९ या दोन मालांमध्ये दोन टोकांना गेलेला लंबक कुठेतरी समन्वय साधून स्थिर करायचा प्रयत्न इथे झालाय. १९९९प्रमाणेच सुलभ शब्दांची बडबडगीतं या मालेतल्या पहिलीच्या पुस्तकांमध्ये पुन्हा आली. पण त्याचबरोबर बालकवींची ‘ऊठ मुला’ ही माफक उपदेशी बाजाची निसर्गकवितासुद्धा आली.  फुलपाखरांचे रंग आता ‘मजेमजेचे रंग तयांचे, संध्याकाळी जसे ढगांचे’ असे पुन्हा जरा सोपे झाले. ध्वज उंच धरायची जबाबदारी इथेही दुसऱ्या इयत्तेतच आली – पण पाडगावकरी शब्दकळेमुळे ती जरा ‘इवल्या इवल्या हातांना पेलवेल’ अशी खारूताईची वाटते. हा शेरा देण्याचा हेतू मुलांना दुय्यमत्व देण्याचा नसून, आता दर पाच वर्षांनी बदलणाऱ्या पिढीतल्या मुलांकडे नक्की कसं बघायचं हा पाठ्यपुस्तक-रचना समितीपुढे असलेला खराखुरा पेच असावा हे अधोरेखित करण्याचा आहे.
महाराष्ट्रातल्या बोलीभाषांवर दिलेला भर ही या मालेतली सर्वांत सुखद बाब आहे. बोलीतल्या कविताही भाषिक क्षमतेनुसार निवडल्या आहेत. भिलोरीतली ‘ढोंड, ढोंड पानी दे, साय-माय पिकू दे!’ ही कविता पहिलीत आहे. गोंडीमधली ‘हिक्के होक्के मरांग उरस्काट’ (इकडे तिकडे झाडे लावू या) ही कविता तिसरीच्याच काय, पण सर्व वयाच्या मुलांना म्हणायला आवडेल इतके गोड अनुप्रास आणि झन्नाट शब्द घेऊन आली आहे. पूर्णपणे वेगळा शब्दसंग्रह असलेल्या या कविता सुरुवातीला मुलांना फक्त त्यांतल्या उच्चारांच्या मजेसाठी आवडतील. ते उच्चार त्या बोलींचे बहुसंख्य भाषक कसे करतात, हे शिक्षकांना आणि मुलांना माहिती असलं तर अजून चांगलं. कारण त्यातून त्या बोलीला, ती बोलणार्‍यांना बरोबरीचा दर्जा मिळेल. त्यासाठी बालभारतीच्या संकेतस्थळावर या कवितांच्या त्या-त्या भाषकांच्या आवाजातल्या ध्वनिफिती असायला हव्यात.  मोबाइल इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या जमान्यात बहुतेक सर्व शिक्षकांना या ध्वनिफिती सहज उपलब्ध होतील.
२००६च्या पहिलीच्या पुस्तकात भाषेचं अध्यापन कसं करावं याबद्दल शिक्षकांसाठी काही सूचना आहेत.  प्रमाणबोलीतल्या उच्चारांबद्दल ’योग्य’ उच्चार, आणि इतर बोलींतल्या पानी, साळा, भाशा अशा उच्चारांबद्दल ’सदोष’, ’चुकीचे’ उच्चार असे शब्दप्रयोग त्यात आहेत.  
हा पूर्ण विभाग २०१३च्या मालेत मुख्य पाठ्यपुस्तकातून काढून टाकला असला तरी तो शिक्षक-हस्तपुस्तिकेत घातला गेला असण्याचा संभव आहे.
प्रमाणबोली अवगत असण्याचे अगणित सामाजिक-आर्थिक फायदे असले, तरी भाषाशास्त्रानुसार ती एक बोलीच आहे. तिचे उच्चार प्रमाणित केलेले असतात; पण तेच बरोबर आहेत आणि अन्य उच्चार चुकीचे आहेत हा हेका कशासाठी? पाठ्यपुस्तकं प्रमाणभाषेत लिहिली आहेत आणि ती प्रमाणबोलीत वाचावीत; ही बोली शक्यतो निर्भेळ, स्वत:शी सुसंगत असावी म्हणून पाणी, शाळा, भाषा असे उच्चार करा हे शिक्षकांना सांगणं ठीकेय. (अर्थात पोटफोड्या ‘ष’चा उच्चार प्रमाणबोलीतून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे हा माझा अनुभव.) पण तिच्यातल्या वर्णांच्या ’योग्य’ उच्चारांबद्दल पाठ्यपुस्तक मंडळ जितकं जागरूक असतं, तितकीच कळकळ अन्य बोलींबद्दलही असावी.
असं केल्यानं ‘आनी-पानी’ बोलणारी व्यक्ती ’कसं बोलतेय’ याच्या दर्जाशी ’काय बोलतेय’ याच्या दर्जाची गल्लत करणं आपण थांबवू असा माझा दावा नाही. पण एखाद्या समाजगटाच्या भाषिक अभिव्यक्तीला ’पूर्णपणे चुकीची’ ठरवणं तरी आपण बंद करू.
याच्या पुढचं पाठ्यपुस्तक रचनेचं पाऊल हे प्रमाणित पुस्तकांसोबतच स्थानिक भाषा-बोलींमधल्या वाचनमाला तयार करणं, किंवा प्रमाण पाठ्यपुस्तकांचं बोलींमध्ये सम-संदर्भ रूपांतरण करणं असं असायला हवं.  प्राथमिक शिक्षणाचं माध्यम स्वभाषा असावं हे तत्त्वत: मान्य असेल, तर मेळघाटातल्या मुलांना प्रमाण मराठीतली पुस्तकं शिकवून कसं चालेल? सध्या कोरकू आणि गोंडीमध्ये पूरक पुस्तकं त्या-त्या भागातल्या जिल्हा परिषदांतर्फे आणि सामाजिक संस्थांतर्फे तयार होताहेत. या पुस्तकांचा अजून एक फायदा म्हणजे त्या बोली शिकण्यासाठीचं अवसान तिथल्या प्राथमिक शिक्षकांनाही मिळेल. (बहुश: आदिवासी गावांमधले शिक्षक हे बाहेरून आलेले, प्रमाणबोली बोलणारे असतात. भाषिक फरकांमुळे मुलं आणि शिक्षक यांमधला सहज संवाद खुंटतो.)
या बोलींमधलं साहित्य खुलं झालं तर पाठ्यपुस्तकांतलं बालसाहित्य अजून श्रीमंत होईल.
***
पाठ्यपुस्तकांतून दिसणारं समाजमन
१८७४ ते २०१४ या विस्तीर्ण कालखंडात भारतातला, महाराष्ट्रातला समाजही बदलला. त्याच्या मूल्यचौकटी वळू-वाकू लागल्या. कवितांच्या विषयवार आलेखांकडे नजर टाकली, तर असं जाणवतं की सर्वशक्तिमान देवाची संकल्पना आणि त्याला हात जोडून प्रार्थना करून स्वत:ची उन्नती करायला सांगणारं समाजमन हळूहळू प्रार्थनेकडून स्व-अस्मितेकडे वळतं आहे. ‘देशासाठी, शाळेसाठी, स्वत:साठी आम्ही असं करू, तसं करू’ अशा प्रकारचे सकारात्मक स्व-सूचनेचे धडेच पाठ्यपुस्तकं मुलांना देऊ करताहेत.
स्वदेशाभिमान या एका मूल्याबाबत गेल्या दोन वर्षांत भारतात महामूर चर्चा झडल्यात. देशाबद्दलचा, प्रदेशाबद्दलचा आंतरिक उमाळा हा धागा देव आणि धर्माच्या धाग्याच्या वरताण बनवणं बर्‍याच जणांना सोयीचं वाटतं, कारण स्वत:ला धर्मनिरपेक्ष आणि विकासवादी घोषित करतानाच ’मी तुमच्यातलाच, तुमच्यासाठीच’ हे आपलंतुपलं संधान त्यातून चांगलं साधलं जातं. पाठ्यपुस्तकांच्या रचनेमध्ये केला जात असलेला राजकीय हस्तक्षेप हाही आपल्याला सांगोवांगी ऐकून ठाऊक आहे, आणि राज्यकर्त्यांनी समाजाच्या जाणिवा अगदी लहान वयात बदलू पाहणं त्यांच्या दृष्टीनं तर्कशुद्धही आहे. सध्याच्या राजकीय कथनानुसार (नरेटिव्ह्‌) डावीकडे झुकलेले पक्ष असल्या स्वदेशाभिमानाकडे बघून नाक मुरडतात आणि उजव्या जाणिवेचे पक्ष देशभक्तीला कवटाळून बसतात. पण महाराष्ट्राच्या बाबतीत तरी, साठोत्तरी पाठ्यपुस्तकी कवितांच्या आलेखांकडे बघितल्यावर मला आश्चर्य वाटलं. कारण ऐन शिवसेना-राजवटीतल्या प्राथमिक पाठ्यक्रमात देशभक्ती आणि प्रार्थना यांच्याबद्दलच्या कविता अगदीच नगण्य आहेत. धड्यांचा विचार या निरीक्षणात केलेला नाही आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या पार्श्वभूमीबद्दल काहीही माहिती नाही, यामुळे कोणतंही ठोस विधान इथं करत नाहीये. पण सरसकट मानलेल्या काही गृहीतकांचा सांख्यिक माहिती हाताशी आल्यावर पुन्हा विचार करावा लागतो हे नव्यानं जाणवलं इतकंच.
स्त्री-पुरुषांसंबंधीची भूमिका आणि त्यांच्याकडून असलेल्या वेगवेगळ्या अपेक्षा हा आपल्या मूल्यचौकटीचा अजून एक भाग. १९२० सालपर्यंतच्या प्राथमिक पाठ्यपुस्तकांमध्ये या अपेक्षा अगदी धडधडीतपणे मांडलेल्या आहेत. स्वयंपाक व सर्व घरगुती कामं, लेकरंबाळं यांभोवती स्त्रियांचं विश्व फिरतं. १९०६ सालच्या तिसरीच्या पुस्तकात तर ’पतींना देवासारखे मानून त्यांना आपल्या स्वाधीन ठेवण्याचा’ उपदेश करणारा महाभारतातला द्रौपदी-सत्यभामा संवादच धडा म्हणून दिला आहे! अशा थेट अपेक्षा पुढे समाज बदलतो तशा हळूहळू कमी होत जातात; मात्र त्यांचे अवशेष अगदी विसाव्या शतकाअखेरीपर्यंत शब्द आणि चित्रांमधून जाणवत राहतात. घरातलं आईचं स्थान प्रेमादराचं असतं, कारण ती सतत कष्ट करते आणि त्यागमूर्ती असते (धड्यातल्या आईनं पेरूच्या फोडी मुलांना देऊन टाकणं); किंवा जवळपास सार्‍याच कवितांमध्ये पाळण्यात ‘तो बाळ’ असतो आणि त्याची ताई त्याचे लाड करत असते. एका कवितेत बाळ‘राजा’ने नीट शिकावे म्हणून त्याची आई शाळेतल्या ‘पंतोजीं’ना खारीक देऊ करते आणि एका ओळीत एक अख्खी मूल्यव्यवस्थाच दाखवून देते.
१९८९-९२च्या मालेत चौथीच्या पुस्तकात सर्वप्रथम ‘कन्या झाली म्हणून नको करू हेळसांड, गोपूबाळाच्या शेजारी सोनूताईचा पाट मांड’ असं स्पष्टपणे बजावत समाजमूल्यं बदलण्याचा प्रयत्न करणारी कविता येते. १९९९-२०००च्या मालेत नव्या कवितांच्या शब्दांमध्ये आणि विषयांमध्ये लिंगभेदभाव जाणवत नाही. कवितांसोबतच्या चित्रांमधून किंवा गद्य पाठांच्या रचनेत तो क्वचित जाणवतो. पण एकुणातच १९८९ ते १९९९ या ‘खा-उ-जा’च्या सुरुवातीच्या दशकात ‘मुलगा मुलगी एकसमान’ ही फक्त घोषणेपुरती बाब नाही, याची जी जाणीव प्रस्थापितांमध्ये विस्फोटली, ती या कवितांच्या निवडीमध्ये आपोआप उतरली असेल.
या बदलत्या मूल्यांचा एक मासला म्हणून ’मी कोण?’ या धड्यासोबतची १९७६ची आणि २००८ची चित्रं बघा.
२००८मध्येही ती नर्स, तो डॉक्टर असे काही ठोकताळे आहेत, पण ती कंडक्टर हा बदल जाणवण्याजोगा आहे. २०१३मध्ये एका धड्यात आईचं प्रेमळ आईपण अधोरेखित केलं असलं, तरी त्याला एक मस्त कलाटणी दिलीय:
त्यातल्या मुलाची आकांक्षा आईसारखं बनण्याची आहे. आई ही आता गृहीत धरण्याची, देव्हार्‍यात बसवण्याची व्यक्ती नाही, तर आईपण हा एक प्रयत्नसाध्य, लिंगभेदविरहित आदर्श आहे.
मूल्यव्यवस्थेतला अजून एक सूक्ष्म धागा म्हणजे ‘सुष्ट-दुष्ट’ कल्पनांचा, काळंपांढरं जग रंगवण्याचा. आपल्या बऱ्याच बालसाहित्यात ‘कावळा’ हा शेणाचं घर असलेला, डाळीच्या डब्यात घाण करणारा, बाळाच्या गोष्टी घेऊन जाणारा असतो. पहिलीच्या पुस्तकातली ‘एक चिऊ आली’ ही याच धर्तीची जुनी कविता. मूळ कवितेत वेगवेगळे पक्षी-प्राणी बाळाला काहीबाही देऊन जातात, आणि शेवटी एक कावळा येऊन सगळं घेऊन जातो. पण या पाठ्यपुस्तकात शेवटची ओळ बदलून ‘एक कावळा आला, बाळाभोवती नाचून गेला’ अशी लयभंग करणारी, कावळ्याचं दुष्टपण काढून घेणारी ओळ घातली आहे. निव्वळ कवितेच्या आनंदाचा आणि ठेक्याचा विचार केला, तर हा बदल मला अजिबात आवडला नाही. दोन-तीन वर्षांच्या भाचरांनी सुरी, कातरीसारख्या गोष्टी हाताळण्यासाठी खूप हट्ट केला आणि भोकाड पसरलं तर ते थांबवायला ’काऊ येऊन ते घेऊन गेला’ वगैरे थापा मी अगदी आत्ता-आत्तापर्यंत मी मारलेल्या आहेत; यापुढेही अशा थापा मारणारच नाही अशी शपथ काही मला घेता यायची नाही. त्यामुळे एक सोयीस्कर बागुलबोवा तयार करण्याच्या मनोवृत्तीला या ओळ-बदलातून आळा घातला जातोय, याबद्दल विचारी मनाला बरं वाटत असलं तरी मनस्वी मनाला वैतागही आला.
’मोजक्या पैश्यांत खोली भरून जाईल असं काहीतरी आणणं’ या कल्पनेवर आधारलेली गोष्ट १९८२ सालच्या तिसरीच्या पुस्तकात आहे, आणि २०१३ सालच्या दुसरीच्या पुस्तकातही आहे. जुन्या पुस्तकात रशियन परीकथांच्या धर्तीवर तीन भावांमधला धाकटा भाऊ सर्वांत गुणाचा असतो. थोरले भाऊ आपापल्या खोल्या अंधारानं आणि गवतानं भरतात. धाकटा राजू त्याची खोली सुरांनी आणि सुगंधानं भरून टाकतो. त्यांचे वडील इतर दोघांना नावं ठेवून राजूचे गोडवे गातात. ताज्या पुस्तकात दोन भावंडं (चित्रांवरून ती एक मुलगा, एक मुलगी आहेत हे कळतं. लिंगसूचक शब्द गोष्टीत नाहीत.) पणतीच्या प्रकाशानं सारं घर भरून टाकतात. दोन्ही मुलांनी एकत्रित विचार करून कल्पकतेने आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले  याचा वडिलांना खूप आनंद होतो. तीस वर्षांत पाठ्यपुस्तक-निर्मात्यांच्या मूल्यव्यवस्थेत स्पर्धेकडून सहकाराकडे, हिणवण्याकडून कौतुकाकडे असा बराच फरक पडलाय.
या पद्धतीचे बदल करणं कितपत सयुक्तिक आहे, यातूनच पदोपदी भावना दुखावल्या जाणारे, स्पर्धेला आणि शेर्‍या-ताशेर्‍यांना घाबरणारे समाज निर्माण होतात काय – हे चर्चेचे विषय आहेत. बर्‍याच चर्चांप्रमाणे ‘दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी’ अशा निष्कर्षांवर ही चर्चाही स्थिरावेल. पण पहिली ते चौथीच्या पुस्तकात कावळ्याला दुष्ट आणि गाढवाला मूर्ख ठरवून आपण अजिबात सुज्ञ समाजनिर्मिती करत नसतो – हे वाटलं तर आद्य पंचतंत्रातल्या गोष्टी वाचून स्वत:ला पटवून द्यावं!
कविता कोणी लिहिल्या, कोणी निवडल्या?
गेल्या दीडशे वर्षांतला बहुतांश काळ पाठ्यपुस्तकं आणि त्यातलं साहित्य या दोन्हींच्या निर्मितीवर मराठी समाजातल्या विशिष्ट गटाचं वर्चस्व आहे: अध्यापन-अध्ययन-लिखाण-भाषण यांखेरीज अन्य मार्गांनी सहसा पैसा निर्माण करत नसलेला, मध्यमवर्गीय आणि ब्राह्मणी असा हा व्यक्तिसमूह आहे. त्यामुळे त्याच्या नजरियाचा, अभिरुचीचा प्रभाव पाठ्यपुस्तकांवर होता; आहे. मी याच गटात मोडत असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करताना याच सीमित दृष्टीचे दोष माझ्या ठिकाणीही आहेत याची मला जाणीव आहे.
मॅक्‌मिलन वाचन-पुस्तकांच्या शेवटी असलेला लेखक- / कवी-परिचय या दृष्टीनं अतिशय रोचक आहे. पुस्तक छापणारे आणि त्यातले उतारे लिहिणारे या दोन्हींचा प्रस्थापितपणा आणि छापणार्‍यांचा पराकोटीचा आत्मविश्वास यांच्यामुळे त्यात कवींचे नाव-गाव-हुद्द्यांसह तपशील, त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीचं (असल्यास!) वर्णन आणि थोडक्या शब्दांत, शेलक्या विशेषणांत त्यांच्या साहित्याची समीक्षा अशी फटाके-बाजी आहे. उदा. मायदेवांनी काही किरकोळ लेख लिहिले असून काही कवितांची पुस्तकेही प्रसिद्ध केली आहेत असं सांगत ‘कल्पनेच्या उत्तुंग भरार्‍या किंवा नवविचाराचा प्रवाह नसला तरी हे साधे स्वरूपच आल्हाददायक वाटते’ अशी उत्तेजनार्थ स्तुती. ‘गिरीशांना कुणबाऊ भाषा चांगली साधते’ हे प्रशस्तिपत्र, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे ‘कट्टे सुधारणावादी’ असल्याचा इशारा. अर्थात साक्षात तुकारामांच्या प्रगतिपुस्तकात ‘रचनेच्या ठाकठिकीकडे त्यांचें फारसे लक्ष नसे, पण अंतरीचा उमाळा अभंगांत प्रतिबिंबित झाल्यामुळे त्याच्या भाषेत जिवंतपणा ओतप्रोत भरला आहे’ असा शेरा मारल्यावर इतरांची काय गत? पुढे एका लेखकाच्या परिचयातलं पहिलंच वाक्य ‘हे जातीने मराठे आहेत’ असं. जणू त्यांनी लिहिलेल्या लेखाच्या अर्थामध्ये या माहितीने काही फरक पडेल, किंवा केवळ त्यांच्या जातीमुळे त्यांना हा लेख लिहायची मुभा आहे!
पाठ्यपुस्तकी कविता लिहिणाऱ्या वर्गातल्या काही लोकांची भाषिक क्षमता चांगलीच विकसित झालेली असते. बोलीभाषांमधले शब्द त्यांना सहजी समजतात, आत्मसात करता येतात आणि ते वापरून नवी रचनाही करता येते. मात्र या रचनेतली अनुभवसृष्टी आणि प्रतिमासृष्टी त्या बोलीच्या नैसर्गिक वापरकर्त्याच्या संदर्भात अत्यंत विजोड वाटू शकते. कधीकधी तर शब्दकळा, विचार, कल्पना सगळं स्वत:चं आणि अवसान मात्र ‘नाही रे’ गटातल्या माणसाचं अशी दयनीय गत होते. मॅक्‌मिलन पुस्तकमालेमधलं ‘गुराख्याचे गाणे’ हे या प्रकारच्या कवितांचं धडधडीत उदाहरण. ‘कुवासना घालिती धिंगा तो महाल मी टाकितो, नृपाचा महाल मी टाकितो’ हे असं कोणता ‘अधिकृत’ गुराखी स्वयंप्रेरणेनं म्हणेल? त्यानं ते तसं म्हणू नये अथवा त्याला म्हणता येणार नाही असा हा दावा नाही; तत्त्व म्हणून किंवा भावना म्हणून याहूनही सखोल विचार गुराख्याच्या गाण्यात असेल. पण त्याला असली भाषा आणि प्रतिमा असेल का?
१९८९ सालानंतर मराठी पाठ्यपुस्तकं तयार करणाऱ्या ‘मराठी भाषा समिती’मधल्या सदस्यांची नावानिशी यादी बालभारतीच्या पुस्तकांच्या सुरुवातीला छापली जायला लागली. अगदी ताज्या मालेमध्ये समितीबरोबरच प्रत्यक्ष कार्यगटातल्या व्यक्तींचीही नावं दिली आहेत. प्रत्येक नव्या मालेत या यादीमध्ये वेगवेगळ्या समाजसमूहांचं, वय, लिंग, प्रांत, वर्ग, पार्श्वभूमी यांनुसार असलेलं प्रतिनिधित्व वाढतंय असं वाटलं. नुसतंच वैविध्य आणण्यासाठी म्हणून, नामधारी प्रतिनिधित्व नको हा मुद्दा (जो प्रत्येक आरक्षणासंदर्भात, समावेशक गट बनवण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात पुढे येतो) बरोबर आहे. पाठ्यपुस्तक मंडळ तो पाळत असणार असा विश्वास ठेवायला मला आवडतं. हे प्रतिनिधित्व जसजसं वाढेल, तसतसं ते पुस्तक ‘मोकळं’ होईल, त्यातल्या कविता समाजाचा आरसा होतील, अर्थात ते बालसाहित्याच्या अधिक जवळ जाईल असं मला वाटतं.
***
शेवटी, माझ्या जन्माच्याही आधीच्या पाठ्यपुस्तकातल्या एका कवितेसंबंधी माझी एक आठवण आहे. महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला घरापासून खूप लांब, अ-मराठी प्रदेशात पहिल्यांदाच आले होते. पहिल्या परीक्षेपूर्वी वाचनालयात बसून डोकेफोड करत ‘आपल्याला काही नाही हे जमणार’ म्हणत रडवेली झाले होते. सहज समोरच्या खिडकीवर नजर टाकली तेव्हा तावदानाखालच्या पट्टीवर काहीतरी देवनागरी लिहिल्याचं दिसलं. जवळ जाऊन वाचलं तर –
जोर मनगटातला पुरा घाल, घाल खर्ची
हाण टोमणा, चळ न जरा; अचुक मार बर्ची!
अशा दोन ओळी दिसल्या. मला शांत करून पुन्हा अभ्यासाला लावायला कुण्या अज्ञात मराठी सीनियरचा हा ‘टोमणा’ पुरेसा होता. ही कविता कोणाची, कुठली – मला काहीही कल्पना नव्हती. पण या लेखासाठी पाठ्यपुस्तकं वाचताना ती केशवसुतांची ‘निर्धार’ कविता जुन्या चौथीच्या पुस्तकात सापडली आणि लै भारी वाटलं. ती कुणी व्यक्ती शाळेतली ही कविता किमान नऊ-दहा वर्षं मनात बाळगून होती, आणि तिच्यामुळे मीसुद्धा अशीच दहा-पंधरा वर्षं ती ओळ हक्कानं वापरतेय मनात… कितीही बाळबोध वाटलं तरी; उपदेशाची मलमपट्टी असली तरी– पाठ्यपुस्तकातल्या कविता समाजमनात अशाच कुठे-कुठे कातरजागी दडून बसलेल्या असतात.
आता यापुढच्या काळात पाठ्यपुस्तकं ही संकल्पना तरी राहील का, त्यातल्या कवितांचं काय होईल, असा विचार होत राहतो. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भाषा समितीचे सदस्य-सचिव माधव राजगुरू यांनी लिहिल्याप्रमाणे, पाठ्यपुस्तक हे अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्याचं एक साधन आहे. पाठ्यपुस्तकं अभ्यासक्रमावर आधारित असली, तरी पाठ्यपुस्तकं शिकवली म्हणजे अभ्यासक्रम शिकवला असं नाही.
भविष्यातल्या कोण्या काळी महाराष्ट्रात फक्त निदर्शक अभ्यासक्रमच तयार झालाय आणि प्रत्येक बोलीभाषक विभागात स्वतंत्र पूरक पुस्तकं, चित्रफिती, गाणी वापरून भाषा शिकवली जातेय असं होऊ शकेलही. पण जास्त शक्यता हीच, की अशा पूरक साहित्याचाही एक प्रमाणित कोश तयार केला जाईल आणि राज्यभर त्यातून योग्य वाटेल ते साहित्य शिक्षक, पालक आणि मुलं वापरतील.
पाठ्यपुस्तकांतल्या कवितांचं बलस्थान म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभरातल्या पिढ्यांना एका समान संस्कृतीचा दुवा त्या पुरवतात. माझ्या वयाच्या नव्या दोस्तांशी संवाद साधताना कुसुमाग्रजांची ’कणा’ ही कविता म्हटल्यावर कोल्हापूर, नाशिक, मुंबई आणि अचलपुरात ऐकणार्‍यांचे डोळे सारख्याच आनंदानं लकाकलेत. मराठी शाळेत जाणार्‍या एखाद्या बुजर्‍या पोरासमोर ’कोणाचे गं कोणाचे, सुंदर डोळे कोणाचे’ सुरू केलं, की तेही तालात ताल मिसळून कविता म्हणायला लागतं.   
अभिजात आणि लोकप्रिय अशी विभागणी तद्दन चुकीची ठरवणारी ‘कणा’, गायचा आणि नाचायचा आनंद देणारी ‘नाच रे मोरा’सारखी बालकविता, आणि ‘ढोंड ढोंड पानी दे’सारखी बोलीकविता, अशा लोकसंवेदना जपणाऱ्या कविता जितक्या जाणीवपूर्वक पाठ्यपुस्तकांत आणल्या जातील, तितकं बालसाहित्य म्हणून त्यांचं स्थान अढळ होईल असं मला वाटतं.
– गायत्री नातू
gayatrinatu@gmail.com
***
मराठी साहित्य आणि समीक्षेच्या इतिहासासंदर्भात टिप्पण्या करण्यासाठी प्रा. रा. श्री. जोग आणि व. दि. कुलकर्णी यांच्या लेखांचा उपयोग झाला. हे लेख ’प्रदक्षिणा, खंड पहिला’, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुनर्मुद्रण २०१२ या पुस्तकात आहेत.
आलेख : गायत्री नातू
इतर चित्रे : पाठ्यपुस्तकांतून
Facebook Comments

4 thoughts on “अभ्यासाला ‘लावलेल्या’ कविता”

  1. अतिशय सुरेख लेख. वाचकांना समृद्ध करणाऱ्या लेखाबद्दल मनापासून धन्यवाद.

    1. खरच फारच अभ्यासपूर्ण आणि भाषाभ्यासकांना उपयुक्त माहिती देणारा लेख

  2. अप्रतिम लेख. आजच्या शैक्षणिक धोरणात भाषेकडे पाहण्याची बदललेली दृष्टी नेमकेपणाने अधोरेखित केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *