बालसाहित्यांक २०१७ लेख

सोविएत गोष्टी : आठवण आणि साठवण

ऐंशीच्या दशकात वाढणाऱ्या इतर टिपिकल मराठी मध्यमवर्गीय मुंबईकर मुलांप्रमाणे माझीही विरंगुळ्याची साधनं मर्यादित होती. हाउसिंग सोसायटीतील मित्रांबरोबरचे खेळ, ‘जायंट रोबो’चा शोध लागेपर्यंत एकाच चॅनेलपर्यंत सीमित असलेला टीव्ही, आणि भारंभार पुस्तकं. साधनं मर्यादित असली, तरी त्यातून मिळणार आनंद अमर्यादित होता. (असं आता वाटतं आणि बहुधा तेव्हाही वाटायचं.) पुस्तकाबद्दल फार चोखंदळ होतो असंसुद्धा नव्हतं. पण कदाचित सगळाच उपलब्ध ऐवज उत्तम असल्यामुळे वाचताना बोअर झालं वगैरे काही वाटत नसे. संध्या आणि रमेश मुधोळकरांच्या गोष्टी, बहुरंगी करमणूक’ प्रकारची पुस्तकं, भालबा केळकरांची विज्ञानाबद्दलची पुस्तकं, वेदातील गोष्टी, अमर चित्रकथा वगैरे शुद्ध देसी वाचन होतंच. परदेशी वाङ्मयसुद्धा बरंच वाचायला मिळायचं – (श्रीलंकेमधील बिरबल) अंदारेच्या गोष्टी, हॅन्स अ‍ॅन्डरसनच्या आणि ग्रिमच्या परीकथा, भा. रा. भागवतांच्या अनुवादित कथा, एनिड ब्लायटनच्या कथेचा ज्ञानदा नाइकांनी केलेला ‘रुप्या बुरूज आणि धाडसी चमू’ नावाचा भावानुवाद इत्यादी. पण युरोपीय आणि अमेरिकी वाङ्मयापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात परदेशी वाङ्मयाचा जो खजिना वाचायला मिळाला, तो होता सोविएत संघातून येणाऱ्या बाल-कुमार साहित्याचा!
‘पानोपानी प्राणीच प्राणी’, ‘चांगले काय आणि वाईट काय’, ‘चित्रकथा’ ही आठवणीतली पहिली सोविएत पुस्तकं. पाच-सहा वर्षांच्या वयात सोविएत संघ हा भारताहून वेगळा देश आहे असं काही ठाऊक नव्हतं. ओरिसा हे भारतातील राज्य आहे हे कळलं, ते ‘धाडसी फेलिसिटा’ हा पाठ्यपुस्तकातला धडा वाचला तेव्हा. आंतरराष्ट्रीय भूगोल तर फार दूरची गोष्ट. पण व्लादिमिर मायकोवस्की, रादुगा प्रकाशन, झूबोवस्की बुलेवार्द वगैरे अद्भुत शब्द मात्र तोंडपाठ झाले होते.
पुढे तल्स्तोयचं ‘मुलांसाठी गोष्टी’ वाचलं. मित्राला अस्वलाच्या तावडीत सोडून झाडावर लपून बसणाऱ्या स्वार्थी मित्राची गोष्ट त्यातही होती. ही गोष्ट पूर्वी ‘कनू आणि मनू’ या नावाने मराठीत वाचली असल्यामुळे मला ती मूळची मराठीच वाटायची. ती रशियन पुस्तकात बघून आश्चर्य वाटल्याचं आठवतंय. ‘लाल तुरेवाला कोंबडा’, ‘छोटा कुबडा कुरूप घोडा’ वगैरे प्राणिकथा, परीकथा वाचल्या. आता जाणवतंय; की पात्ररचना, नावं, पार्श्वभूमी वगैरे निराळी असली, तरी ही पुस्तकं मुळात आपल्या परिचित पुस्तकांसारखीच होती. कपटी राजा, सुंदर राजकन्या, भाबडा पण शूर युवक, त्याला मदत करणारे चेटक्ये किंवा पशुपक्षी इत्यादी हुकुमी व्यक्तिरेखा सोविएत पुस्तकांमध्येही होत्या. कदाचित या, तेव्हा न जाणवलेल्या, साधर्म्यामुळे सोविएत पुस्तकांशी नाळ जोडली गेली असावी.
पण पुढे मात्र पूर्ण अनोळखी विषयांबद्दलची पुस्तकं वाचायचा योग्य आला. ‘दोन भाऊ’ हे अर्कादी गैदार या लेखकाचं पुस्तक म्हणजे, सैबेरियातल्या तैगामध्ये राहणाऱ्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी दोन मुलांनी त्यांच्या आईसोबत केलेल्या प्रवासाचं वर्णन आहे. पण या साध्यासरळ कथेमध्ये सोविएत माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दडलेले आहेत. मॉस्को शहरातल्या चुक आणि गेक या भावंडांचे वडील कामानिमित्त दूर तैगामध्ये राहतात. बायको-मुलांची आठवण त्यांनाही येत असते, पण आपल्या कामाबद्दलच्या निष्ठेमुळे ते सुट्टी घेऊन मॉस्कोला जात नाहीत; त्याऐवजी बायको-मुलांना तैगामध्ये बोलावतात. त्यांची पत्नी एवढा मोठा प्रवास धीराने पार पाडते, आणि काही दिवस तर तैगाच्या जंगलातल्या झोपडीवजा घरात कोणाच्याही सोबतीशिवाय राहते. मुलगा संकटात आहे अशी भीती वाटते, तेव्हा बंदूक घेऊन अरण्यात शिरायला ती मागेपुढे पाहत नाही. भारतातल्या अनेक पुस्तकांमध्ये, उदा. श्यामची आई किंवा गोट्या (आणि परदेशी कथांमध्येही, उदा. एनिड ब्लायटनच्या ‘फेमस फाईव्ह’किंवा ‘सिक्रेट सेव्हन’ यांतही) केलेलं आईचं वर्णन हे प्रेमळ परंतु सोशीक गृहिणी अशा स्वरूपाचं असे. आणि वडील बहुधा कचेरीतलं काम करत असत. त्या तुलनेत भूगर्भशास्त्रज्ञ वडील आणि स्वत:च्या हिमतीवर मुलांना वाढवणारी आई ही व्यक्तिचित्रं प्रचंड आकर्षून गेली.
‘सूर्यावरचे वारे’ हे अंतराळप्रवासाबद्दलचं पुस्तक, ‘माणूस महाबलाढ्य कसा बनला’ हे मानवी उत्क्रांतीबद्दलचं पुस्तक, या प्रकारची पुस्तकं मराठी साहित्यात वाचायचा कधीच योग आला नव्हता. विज्ञान हसत-खेळत शिकवणारी पुस्तकं आपल्याकडेसुद्धा मिळत, परंतु वैज्ञानिक विषयांचं एवढं वैविध्य त्यांत बहुधा नसावं. आणि ‘सूर्यावरचे वारे’ तर अलेक्सेई लिओनोव्ह या अंतराळवीराने लिहिलं होतं. जयंत नारळीकरांसारखे सन्माननीय अपवाद वगळता, एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तीने त्या क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी लिहिलेली मुलांसाठीची  पुस्तकं आपल्याकडे फारशी नव्हती. ‘इवान’ ही युद्धकालीन कादंबरिका कुटुंबीयांचा मृत्यू झालेल्या, घरदार उद्ध्वस्त झालेल्या, एका लहान मुलाच्या दृष्टिकोणातून युद्धाचं विदारक वर्णन करते. बालसाहित्य हे केवळ परीकथा, प्राणिकथा, साहसकथा आणि मूल्यवर्धक इतिहास एवढंच सीमित न राहता त्यात विज्ञान, नर्मविनोद, आणि युद्धकथा असे वैविध्यपूर्ण विषय असू शकतात याची जाण तेव्हा सोविएत पुस्तकांमुळेच आली.
सहावी किंवा सातवीत असताना विक्तर द्रागुन्स्की या लेखकाचं ‘देनिसच्या गोष्टी’ हे नितांतसुंदर पुस्तक लाभलं. वाचनाचा पोत या पुस्तकाने आमूलाग्र बदलला. एकतर देनिस स्वत:च त्याच्या गोष्टी त्याच्या भाषेत सांगतो. मध्यवर्ती व्यक्तिरेखा सर्व गोष्टींमध्ये त्याच होत्या. प्रत्येक गोष्ट निराळी होती, पण आधीच्या गोष्टींच्या संदर्भांमुळे त्या अजूनच खुमासदार होत होत्या. आणि यातली मुलं अगदी गुणी बाळं नव्हती – कथानायक देनिस हा आठेक वर्षांचा शाळकरी मुलगा मारामारी करायचा, नावडती कांजी सरळ खिडकीतून फेकून द्यायचा, हॉकी खेळत बसून शाळेत जायला विसरायचा, पण तरीही निरागस, लाघवी असा होता. या पुस्तकाच्या पहिल्या भागात छान विनोदी कथा होत्या, पण दुसरा भाग काही वेगळाच, कधी कल्पनाही केली नसेल असा अद्भुत होता. आगगाडीच्या प्रवासात भेटलेल्या शेतकऱ्याशी बोलताना श्रम आणि कुटुंब यांच्या महत्त्वाची जाणीव झालेला देनिस, खिजवणाऱ्या मित्रांना उत्तर देण्यासाठी आपल्या भीतीवर मात करून उंचावरून तरण-तलावामध्ये उडी मारणारा देनिस, आंघोळीला घाबरलेल्या तान्ह्या बहिणीला आधार म्हणून आपलं बोट देताना अचानक मोठा झालेला देनिस, आणि शेवटच्या गोष्टीत सर्कसमधल्या मुलीमुळे भारावून गेलेला देनिस – हे सगळं तरलपणे, संयतपणे मांडलं होतं आणि त्याचा फार मोठा प्रभाव त्या वयात पडला होता. देनिसची कल्पनाशक्ती अचाट होती. विश्वविजेत्या बोत्वीनिकला बुद्धिबळात हरवणं, फिडेल कॅस्ट्रोला भेटणं वगैरे स्वप्नरंजन तो करत असे. पण फास्टर फेणेप्रमाणे देनिसने कधी हेरांना पकडलं नाही किंवा चोरांवर मात केली नाही. त्याची कल्पनाशक्ती दाखवताना, प्रत्यक्ष आयुष्यात सर्व स्वप्नं सत्य होत नाहीत याची जाणीवदेखील करवून देण्याचं काम लेखकाने केलं होतं. देनिसच्या गोष्टी फाफे किंवा गोट्याप्रमाणे रूढ अर्थाने साहसकथा नव्हत्या. ‘स्लाईस ऑफ लाईफ’ या स्वरूपाचं, वस्तुस्थितीशी प्रामाणिक असलेलं असं ते चित्रण होतं. मराठी बालसाहित्यात असं वाचायला मिळालं, ते फक्त ‘बोक्या सातबंडे’मध्ये, आणि तेही बऱ्याच काळानंतर.
तेव्हाहून (कदाचित) अधिक जाण आलेल्या आताच्या वयात, सोविएत पुस्तकांची वैशिष्ट्यं आणि वैगुण्यं थोड्या अलिप्तपणे बघता येतात. ‘सूर्य तुझाच आहे’ या छोटेखानी पुस्तकातली गोष्ट छोटीशीच आहे – अंड्यातून बाहेर आलेल्या कोंबडीच्या पिलाचं अंडं कुत्राचे पिलू फोडून टाकतं. दुःखी झालेल्या कोंबडीच्या पिलाला कुत्र्याचं पिलू आपल्या घराचा निम्मा भाग करवतीने कापून देतं. पाऊस आल्यावर दोघेही भिजतात, आणि मग घराचे दोन्ही तुकडे एकत्र जोडतात. आणि पावसाळी हवेत सूर्य दिसेनासा झाल्यामुळे कष्टी झालेल्या कोंबडीच्या पिलाला कुत्र्याचं पिलू दिलासा देतं, “तो नक्की परत येईल. तो आता आपल्या दोघांचाही झालाय.”
तसंच, ‘दोन भाऊ’मधला चुक. तो चॉकलेटच्या चांद्या, पक्ष्यांची पिसं वगैरे सटरफटर गोष्टी जमवत असे. याउलट गेकला गाणी म्हणायला आवडत असत. गोष्टीच्या अखेरीस गेक छान गाणं म्हणतो आणि सर्व जण त्याचं कौतुक करतात असा भाग आहे.  आता वैयक्तिक मालमत्तेबद्दल थोडा टीकेचा सूर लावणाऱ्या या गोष्टी प्रतीकात्मक आहेत का, हा प्रश्न साम्यवादाची तोंडओळख झाल्यावर पडतोच.
पण सोविएत पुस्तकं म्हणजे केवळ प्रोपगॅन्डा होती, असं मात्र अजूनही वाटत नाही. विषयांचं वैविध्य, कथाकथनाची शैली आणि उत्तम निर्मितिमूल्यं यांमुळे ही पुस्तकं खरंच आनंददायक होती. आणि प्रचाराचा जो काही भाग होता, तोसुद्धा वाईट होता असं आजही वाटत नाही. समता, श्रमप्रतिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा या तत्त्वांची जाणीव भारतीय पुस्तकांपेक्षा सोविएत पुस्तकांनीच अधिक करून दिली. नाहीतर बऱ्याचशा पौराणिक वा ऐतिहासिक भारतीय पुस्तकांमधून देव, देश, धर्म यांचं गुणगानच अधिक असे आणि स्वामीनिष्ठा वगैरे सरंजामशाही संस्कारांचा भरणाही त्या पुस्तकांमध्ये अधिक असे.  
पुढे १९९०-९१मध्ये अनेक स्थित्यंतरं होऊन सोविएत संघाचा अस्त झाला, आणि सोविएत पुस्तकं मिळणं दुरापास्त झालं. लहानपणची काही पुस्तकं मी (खरंतर आईने) जपून ठेवली होती आणि २००५च्या आसपास ती चाळताना अशा स्वरूपाची अधिक पुस्तकं गोळा करण्याची कल्पना सुचली. लहानपणी जीव की प्राण असलेलं, पण नंतर कधीतरी मित्राने ढापलेलं ‘सूर्यावरचे वारे’ हे पुस्तक (अर्थातच निराळी प्रत) दादरला एका जुन्या पुस्तकांच्या दुकानात मिळालं तेव्हा परमानंद झाला हे स्पष्ट आठवतं. या ‘यशामुळे’ अजून दुकानं धुंडाळायला प्रोत्साहन मिळालं. अनेक दुकानदारांशी ओळखी झाल्या, काहींशी मैत्रीही झाली. एकदा एकाच वेळी ‘अंतराळयानाचा प्रवास’, ‘ऊर्जाशास्त्र – आज आणि उद्या’, ‘शेकोटीपासून अणुभट्टीपर्यंत’ व ‘रासायनिक मूलद्रव्यांचा शोध’ ही पुस्तकं मिळाली. माहीमच्या एका टेक-सॅव्ही पुस्तकविक्रेत्याने तर व्हॉटसअ‍ॅपवर फोटो पाठवून खरेदी अगदीच सुकर केली.  इंग्रजीत अनुवादित झालेली बरीच सोविएत पुस्तकं त्याच्याकडून मिळाली. सोविएत पुस्तकांचा संग्रह करणाऱ्या मित्रांबरोबर याद्यांची देवाणघेवाण केल्यावर सूक्ष्म असूया किंवा आसुरी आनंद हे दोन्ही अनुभव, क्षणभर का होईना, येऊ लागले. ‘सुंदर वासीलिसा’ हे परीकथांचं पुस्तक खूप दिवस शोधत होतो, आणि एके दिवशी अचानक शिवाजी पार्कजवळच्या एका दुकानात त्याची प्रत फक्त पन्नास रुपयांना मिळाली. याउलट कधीही न पाहिलेल्या ‘माझा भाऊ युरी’ या पुस्तकाचा जंग जंग पछाडूनही मुंबईत कुठेच थांगपत्ता लागला नव्हता. रद्दीची आणि सेकंडहॅन्ड पुस्तकांची दुकानं धुंडाळताना गेल्या दहा- बारा वर्षांमध्ये इंग्रजीत अनुवादित झालेली शेकडो सोविएत पुस्तकं मिळाली, पण मराठीत अनुवादित झालेली तीसेकच. यामुळे सोविएत पुस्तकांचा शोध घेण्यासाठी ‘Soviet Literature in Marathi‘ हे फेसबुक पान काही मित्र-मैत्रिणींच्या सोबतीने निर्माण केलं. त्याद्वारे संपर्कात आलेल्या निखिल राणे व प्रसाद देशपांडे या पुस्तकवेड्या मित्रांबरोबर गप्पा मारताना, या पुस्तकांच्या इतिहासाचा आणि प्रवासाचा वेध घेण्याचा प्रयत्न करायचं ठरलं. प्रसादच्या फिल्म मेकिंगच्या अनुभवामुळे हा वेध कॅमेऱ्यात टिपायचा मार्ग सुकर झाला. दोन वर्षं माहिती काढत, मुलाखती घेत, चित्रीकरण आणि संकलन करत केलेल्या या प्रयत्नांतून ‘धुक्यात हरवलेले लाल तारे‘ हा माहितीपट साकार झाला.
जवळपास पाव शतकापूर्वी बंद पडलेल्या उपक्रमाचा शोध कसा घ्यायचा? काही पुस्तकांमध्ये सोविएत प्रकाशनगृहांच्या मुंबईतील सहप्रकाशकांचं – लोकवाङ्मय गृह – यांचं चिन्ह असे. त्यामुळे लोकवाङ्मय गृह हा आमच्या शोधाचा पहिला टप्पा होता. लोकवाङ्मय गृहाने सोविएत पुस्तकांच्या इतिहासाबद्दल आणि वितरण प्रक्रियेबद्दल बरीच माहिती दिली. त्याशिवाय तिथे मिळालेल्या संदर्भांमधून सोविएत पुस्तकांचे वितरक व अनुवादक यांच्याशी संपर्क करता आला आणि या प्रकाशन- आणि वितरण यंत्रणेच्या काही वैशिष्ट्यपूर्ण पैलूंची माहिती मिळाली.
सोविएत संघातल्या इतर अनेक गोष्टींप्रमाणे प्रगती, रादुगा, मीर या प्रकाशनसंस्थादेखील शासकीय स्तरावर काम करत. या प्रकाशनसंस्थांचे संचालक निर्यातीसाठी पुस्तकांची निवड करत. त्या-त्या भाषेतले अनुवादक, मूळ रशियन आवृत्तीवरून किंवा इंग्रजी आवृत्तीवरून या पुस्तकांचा मराठीत अनुवाद करत. पुस्तकांची छपाई सोविएत संघात होत असे. गमतीची गोष्ट अशी, की मॉस्कोतल्या छापखान्यातील कामगारांना मराठी भाषेचा गंधही नव्हता. त्यांना छपाईसाठी खिळे जुळवता यावेत यासाठी, मूळ अनुवादकाचं हस्तलिखित काही विशिष्ट रशियन व्यक्ती सुवाच्य हस्ताक्षरात पुन्हा लिहून काढत. डिजिटल तंत्रज्ञानापूर्वीच्या काळात जगातील अनेक भाषांमधील वाचकांपर्यंत आपलं वाङ्मय पोचावं यासाठी सोविएत संघाने केलेले हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होते.
USSR Books and Periodicals Showroom ही संस्था पुस्तकांची माहिती वितरकांकडे पोचवून ऑर्डरी स्वीकारत असे व त्याप्रमाणे पुस्तकं जहाजाने मुंबईत येत. पुस्तकांची विक्री वितरकांमार्फत होत असे आणि शाळा, महाविद्यालयं आणि इतर ठिकाणी पुस्तकप्रदर्शनांतून मोठ्या प्रमाणात सोविएत पुस्तकं मुलांपर्यंत पोचत असत.
मराठीव्यतिरिक्त हिंदी, बंगाली, आसामी, उडिया, पंजाबी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम या भारतीय भाषांमध्ये सोविएत पुस्तकांची भाषांतरं झाली आहेत. गूगलवर शोधताना सोविएत वाङ्मयाबद्दलच्या फेसबुक गटांची माहिती मिळाली. त्यांद्वारे विविध भाषांमधील वाचकांशी संपर्क साधता आला. मुंबईत राहणाऱ्या एका कुटुंबाशी चांगली मैत्री जुळली. गुजराती पती व केरळी पत्नी असं द्वैभाषिक कुटुंब असल्यामुळे त्यांनी आपापल्या मातृभाषेतील, बालपणी वाचलेली सोविएत पुस्तकं जपून ठेवली आहेत. मराठीतून वाचताना आपल्याला भावलेली पुस्तकं गुजराती आणि मल्याळममध्ये पाहणं, आणि त्याहीपेक्षा त्या त्या भाषांतील वाचकांना या पुस्तकांबद्दल अत्यंत आत्मीयतेनं, भरभरून बोलताना ऐकणं, हा खरंच सुंदर अनुभव होता. बंगालीमध्ये अनुवादित पुस्तकांचं  हे फेसबुक पान, तेलगूमध्ये अनुवादित पुस्तकांचा हा ब्लॉग – त्या भाषांचा गंध नसला तरीही हे सर्व पाहताना बालपणीचा मित्र भेटल्याचा आनंद होतो. अशा काही मित्रांसोबत सुरू केलेल्या एका फेसबुक गटाद्वारे विविध भाषांमधील सोविएत बालसाहित्यासंबंधी उपक्रमांचा समन्वय साधायचा प्रयत्न छोट्या स्तरावर सुरू झाला आहे.
याशिवाय क्युबा, व्हिएतनाम इत्यादी साम्यवादी विचारसरणीच्या देशांमध्ये सोविएत पुस्तकं मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात असत, अशी माहिती मिळाली. अगदी इंग्लंड आणि कॅनडासारख्या देशांमध्येही डाव्या विचारसरणीच्या स्थानिक संघटनांमार्फत सोविएत पुस्तकं उपलब्ध करून दिली जात असत. अगदी २०१७मध्येही व्हॅन्कूव्हर येथील पीपल्स को-ऑप बुक स्टोअर या ठिकाणी सोविएत पुस्तकं नव्याकोऱ्या स्थितीत सापडली, तेव्हा सोविएत संघाच्या पुस्तक-निर्यातीचा आवाका लक्षात आला.
वाङ्मयाच्या समृद्धीबरोबरच उत्तम निर्मितिमूल्यंही सोविएत पुस्तकांना अधिक आकर्षक बनवत. आपल्याकडे गोट्या, चिंगी, फाफे वगैरे पुस्तकं लहानशा आकाराची, कागदी बांधणीची, साधारण एका साच्यातून काढल्यासारखी दिसत. पण त्या काळी सोविएत पुस्तकं मात्र निरनिराळ्या आकारांत, पुठ्ठयाच्या बांधणीची असत. आपल्याकडच्या बऱ्याचशा पुस्तकांत चित्रंच नसत, किंवा असली तरी काळ्या शाईतली रेखाटनं असत. त्यांच्या तुलनेत भरपूर रंगीत चित्रं, किंचित पिवळसर जाड कागद, पुठ्ठ्याची बांधणी यांमुळे सोविएत पुस्तकं हवीहवीशी वाटत.
नंतर कळलं की, एवढी उत्तम निर्मितिमूल्यं असलेली पुस्तकं भारतात इतक्या कमी किमतीत मिळत, ती सोविएत विचारसरणीचा-समाजव्यवस्थेचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सोविएत सरकारने दिलेल्या घसघशीत अनुदानामुळे. विरोधाभास असा, की सोविएत संघात मात्र या पुस्तकांच्या निकृष्ट आवृत्त्या निघत. आपल्या विचारसरणीचा जगभर प्रसार करण्याच्या प्रयत्नात सोविएत जनतेला मात्र ही सापत्न वागणूक मिळत असे. कारण पुस्तकं आकर्षक नि उत्तम निर्मितिमूल्यं असलेली असोत वा नसोत; सोविएत जनतेला दुसरा पर्याय कुठे होता?
या निर्मिती-वितरणांतल्या प्रक्रियेसोबतच वाचकांच्या पुस्तकांबद्दलच्या आठवणी आणि विश्लेषण हेदेखील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुजाण वाचकांच्या मुलाखती घेताना काही मुद्दे समजले आणि पटलेदेखील. उदाहरणार्थ – सोविएत पुस्तकं मुलांच्या विचारक्षमतेचा आदर करत नि त्या दृष्टिकोणातून लिहिताना तल्स्तोयसारखे मोठे लेखकही मुलांचं केवळ मनोरंजन एवढाच हेतू न बाळगता मुलांचं भावविश्व समृद्ध व्हावं असं लिहीत. ‘उडी’ या कथेत, माकडाचा पाठलाग करत जहाजाच्या डोलकाठीवर पोचलेला आपला मुलगा घाबरून जाऊन डेकवर पडू नये म्हणून त्याच्यावर बंदूक रोखून समुद्रात उडी मारण्याचा आदेश त्याला देणारा बाप; ‘पक्षी’ या कथेत लहान मुलाच्या निष्काळजीपणामुळे पिंजऱ्यातच मरण पावलेला पक्षी; ‘हंस’ या कथेत, थकून समुद्रात उतरलेला आणि विश्रांती घेतल्यानंतर आपल्या थव्याच्या शोधात पुन्हा उड्डाण करणारा एकाकी हंस – या आणि अशा अनेक गोष्टी मुलांना त्यांच्या वर्तुळाबाहेर जाऊन विचार करायला प्रवृत्त करत. दुसरं म्हणजे ढोबळ तात्पर्य असलेली गोष्ट, असा एकच एक साचा नसल्यामुळे मुलांना एखाद्या कथेतले वेगवेगळे पैलू समजून घेण्याची प्रेरणा मिळे.
जवळपास दोन पिढ्यांच्या वाचनानुभवावर प्रभाव टाकणारं सोविएत बाल-कुमार साहित्य सोविएत संघाच्या अस्तानंतर भारतीय समाजमनातून विस्मृतीत गेलं. रशियामध्ये मात्र आजही सोविएत-कालीन बालवाङ्मय लोकप्रिय आहे. ‘रशियन स्टेट चिल्ड्रन्स लायब्ररी’मध्ये आजही निकोलाय नोसोव्ह, सॅम्युईल मार्शाक, विक्तर द्रागुन्स्की, अर्कादी गैदार – अगदी व्लादिमिर मायकोवस्की – अशा लेखकांच्या पुस्तकांच्या जुन्या-नव्या आवृत्त्या वाचायला मिळतात. ‘रशियन स्टेट लायब्ररी’च्या पौर्वात्य विभागात मराठीत अनुवादित कित्येक दुर्मीळ पुस्तकं आजही वाचनासाठी उपलब्ध आहेत. (‘माझा भाऊ युरी’चा शोध अखेरीस तिथेच लागला.) शासकीय स्तरावरील प्रकाशनगृहं बंद झाली असली तरी रशियन जनतेची वाचनाची आवड बऱ्याच अंशी शाबूत असावी असं वाटतं.
रशियन स्टेट चिल्ड्रन्स लायब्ररी
बाल-कुमार वाङ्मयाचे भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याचे प्रयत्न आजच्या रशियात फारसे होत नाहीयेत. भारतात मात्र या पुस्तकांच्या पुनरुज्जीवनासाठी काही प्रयत्न चालू आहेत. दिल्लीतल्या पीपल्स पब्लिशिंग हाऊस या संस्थेने आणि चेन्नई, हैदराबाद इत्यादी शहरांतल्या त्यांच्या संलग्न संस्थांनी काही पुस्तकं पुन्हा छापली आहेत. मुंबईतल्या लोकवाङ्मय गृह प्रकाशनाने सोविएत बालसाहित्यातल्या पाच पुस्तकांचा संच छापला आहे. पायोनियर प्रकाशन या पुण्यातल्या संस्थेने ‘देनिसच्या गोष्टी’ची छापील आवृत्ती व इ-बुक प्रकाशित केलं आहे.
परंतु या प्रयत्नांना पार्श्वभूमी आहे ती जागतिकीकरणानंतर आलेल्या स्थित्यंतरांची. १९७० आणि १९८०च्या दशकांमध्ये सोविएत पुस्तकांची व्यवच्छेदक लक्षणं होती उत्तम निर्मितिमूल्यं आणि माफक किंमत. पण आजकाल बरेच प्रकाशक रंगीत, चकचकीत पुस्तकं छापतात. त्याशिवाय सरकारी अनुदानाच्या अभावी, पुनर्मुद्रित केलेली सोविएत पुस्तकं साधारण बाजारभावालाच उपलब्ध होतील. अशा परिस्थितीत, केवळ वाङ्मयीन निकषांवर सोविएत पुस्तकं आजच्या बाल-कुमार वाचकांना आवडतील का?
याचं उत्तर येणारा काळच देऊ शकेल.
– देवदत्त राजाध्यक्ष
devadatta_r@yahoo.com
***
चित्रस्रोत : देवदत्त राजाध्यक्ष
Facebook Comments

2 thoughts on “सोविएत गोष्टी : आठवण आणि साठवण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *