बालसाहित्यांक २०१७ लेख

माझे वाचनपूर्ण घर आणि मी

‘एक होता कावळा, अगदी काळा काळा, दिवसभर काव काव करायचा!’ ही माझ्या आठवणीतील मी वाचलेली पहिली गोष्ट. मी गोष्ट वाचली यात काही विशेष नाही, पण माझे वय पाहून सर्वांनी कौतुक केले. मी तेव्हा सहा-सात वर्षांचाच होतो. अशा गोष्टी वाचून कालांतराने मला कळले एवढेच, की वाचन हे गोष्टींपुरते मर्यादित नाही, पुढेही वाचण्यास खूप काही असते. शब्दाचा अर्थ समजण्यासाठी कोणी समजावण्याची गरज नसते. ते हळूहळू समजतातच. फक्त वाढत्या वयानुसार पुस्तकांचाही आकार मोठा व्हायला पाहिजे. हे पटवून देण्यासाठी उदाहरण द्यायचे झाले, तर तीस वर्षांच्या माणसाला कावळा-चिमणीच्या गोष्टी वाचताना पाहणे म्हणजे गरुडाला घरासमोर तांदूळ टिपताना पाहिल्यासारखे आहे, असे म्हणता येईल. सांगण्याचे तात्पर्य एवढेच, की जसे वाचत जाऊ तसे शब्दांचे अर्थ समजत जातात हे खरे!

इंग्रजी शाळेत मातृभाषेला महत्त्व देत नाहीत ही गोष्ट माझ्यासारख्या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलालाही कळते. हीच गोष्ट मनात ठेवून माझ्या आईने मला मराठी वाचायला लहान वयातच शिकवले. वाढत्या वयानुसार मोठमोठाली पुस्तके वाचत गेल्यावर ‘एक होता कावळा’सारख्या गोष्टी मागे पडल्या.
मी अभ्यासात हुशार असायला हवे या दृष्टीने मला देवाने घडवले असावे; पण तरी माझे बाबा माझ्यामागे अमुक एवढेच मार्क्स आण असा तगादा लावत नाहीत, उलट एकानंतर दुसरे अशी पुस्तके वाचायला देतात. अमुक वाचू नकोस, असे कधीही सांगत नाहीत. मी अभ्यासात थोडाफार हुशार आहे (गणितात सोडून). पण वर्गामध्ये माझी खरी ओळख आहे ती वाचनामुळेच. मलापण ही गोष्ट आवडते. मी गणितात असातसाच आहे. त्यामुळे कधी-कधी शिक्षक ओरडतात. पण शिक्षकांनी सोडून दुसऱ्या माणसाने मला रागावल्याचे मला आठवत नाही. त्याला कारण माझे वाचनच. अर्थात गणितात हुशार नसल्याचे इतके काही नाही. सर्वच जण शिकून डॉक्टर किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअर बनल्यास (हल्ली सगळे हेच बनायचे म्हणतात) पेशंट कोण राहणार व सॉफ्टवेअर वापरणारा तरी कोण राहणार, या एका प्रश्नामुळे मला डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यात रस नाही. माझे पुस्तकवाचनच मला एके दिवशी वेगळ्या क्षेत्रात नेणार याची मला खातरी आहे.
पुस्तके वाचण्याची सवय टीव्ही-सिनेमापेक्षा वेगळी आहे. असे का, याचे उत्तर पुस्तके न वाचणारे लोकही सांगू शकतील! पण माझे कारण मात्र फार वेगळे आहे. शाळेत जेव्हा “हा अमुक-तमुक पिक्चर कोणी पहिला आहे का?” असा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा दहावीस हात लगेच वर होतात. पण प्रश्न जेव्हा पुस्तकांचा येतो, तेव्हा फक्त माझा हात वर होतो व सर्व माझ्याकडे बोट दाखवतात! मला हे फार आवडते. हेच ते टीव्ही-सिनेमाहून पुस्तके वेगळी ठरण्यामागचे कारण!
मी एका वहीत काही मराठी कथा लिहून ठेवल्या आहेत. पण इंप्रेशन पडायला त्या कथांमध्ये जसे भारदस्त, अवघड व वजनदार शब्द वापरले आहेत, तसे शब्द मला इंग्रजीमध्ये सुचत नाहीत. त्यामुळे इंग्रजी लिहिण्याचा प्रसंग सहसा फक्त शाळेतच येतो. इंग्रजीत मी वाचलेले एकमेव पुस्तक म्हणजे ‘The Little Prince’ .एकतर या लेखकाचे नाव ‘Antoine de Saint-Exupery’ हे लक्ष्यात ठेवणे अवघड! सुरुवातीलाच त्या पुस्तकाची महानता सांगितली आहे. इतक्या भाषांत, इतक्या देशांत ते प्रसिद्ध झाले आहे. पण मला काही ते विशेष आवडले नाही. इंग्रजी शाळेत शिकण्याचा फायदा एवढाच, की मला त्या पुस्तकाची गोष्ट फक्त कळली. त्यात काय विशेष आहे, हे मला कळले नाही!
मित्रांना पुस्तके देणे मला साफ नामंजूर आहे. कारण लहान असताना माझ्या एका मित्राच्या नवव्या वाढदिवसाला मी एक पुस्तक भेट दिले; पण पुढे त्याचा अभिप्राय विचारताच त्याने ‘कोणते पुस्तक?’ असे उलटे विचारले. अशा पद्धतीने स्वतःचा व पुस्तकांचा अपमान करून घेणे मला अजिबात आवडत नाही. पण माझी इतर काही निवडक मित्रांसोबत मात्र पुस्तकांची देवाणघेवाण चालू असते व ते माझे खरे मित्र आहेत.
आमचे घर हे वाचनपूर्ण घर आहे असे सर्व जणांचे मत आहे. आमच्या घरी आलेला प्रत्येक माणूस हा वाचत असतो, पुस्तके देत असतो, घेत असतो किंवा चर्चा करत असतो. आणि हो, आमच्या घरी चर्चा क्रिकेटच्या स्कोअरविषयी नाही, तर पुस्तकांबद्दल व लेखकांबद्दल होते. एकंदरीत आमचे घर हे ग्रंथालयसदृश दिसते असे सर्व म्हणतात. टीव्हीवर एकच एपिसोड दहादा बघणार्‍यांच्या घरापेक्षा मला हे ग्रंथालयघर आवडते!
मी लहानपणी बारक्या-बारक्या गोष्टींच्या पुस्तकांना महत्त्व देत असे. पण पुढे मला जेव्हा बाबांनी द. मा. मिरासदारांचे ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ हे पुस्तक आणून दिले, तेव्हा मी ते वाचून द. मा. मिरासदारांची सर्वच पुस्तके वाचायला आणली. त्यानंतर मला जयवंत दळवींचे ‘सारे प्रवासी घडीचे’ हे पुस्तक वाचायला मिळाले. ते वाचून मी कोकणी भाषेशिवाय विनोदात काही अर्थ नाही असा सिद्धांत काढला. व्यंकटेश माडगूळकरांचे ‘घराकडील गोष्टी’ हे पुस्तक वाचल्यावर मला त्यांना भेटायची तीव्र इच्छा निर्माण झाली, पण खूपच उशिरा. पुढे मी त्यांची ‘माणदेशी माणसे’, ‘जंगलातील दिवस’ इत्यादी पुस्तकेही वाचली, पण ‘बनगरवाडी’ सगळ्यात बेस्ट! मी वाचलेले पहिले आत्मचरित्र म्हणजे ह. मो. मराठे यांचे ‘बालकांड’ आणि ‘पोहरा’. पुढे आनंद यादव यांचे ‘झोंबी’ही  वाचले. अशी कित्येक आत्मचरित्रे वाचून कळले, की विनोद वाचायला मजा येत असली, तरीही चांगली पुस्तके ही फक्त विनोदापर्यंत मर्यादित नाहीत.
पण पुस्तकांचा कोणता प्रकार मला जास्त आवडतो असे विचारल्यास मी निश्चितच आत्मचरित्र व  विनोदी पुस्तक असेच सांगेन. विनोदी पुस्तकांत ‘द. मा. मिरासदार’, शंकर पाटील यांच्यापासून पु. ल. देशपांडे यांच्यापर्यंत सर्वच जण आले. द. मा. मिरासदार यांची सर्वच पुस्तके मी वाचली आहेत; पण शंकर पाटील यांच्या मात्र मोजक्याच कथा वाचल्या आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या प्रत्येक विनोदात काहीतरी तथ्य आहेच असे मला वाटते. बटाट्याच्या चाळीतला प्रत्येक माणूस हा आपल्या शेजारचा ‘तो’ किंवा ‘हा’ माणूस आहे असे मनाला पटत जाते. पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेला प्रत्येक माणूस (अगदी दामलेमास्तर असो किंवा म्याकमिलनसारखा कुत्रा असो) मला भेटलेला आहे.
आत्मचरित्रे मला अतिशय आवडतात. मी वाचलेल्या आत्मचरित्रांपैकी एकही कथा मी विसरू शकणार नाही. आनंद यादव यांच्या ‘झोंबी’मध्ये त्यांचे वडील ‘रत्नाप्पा जकाते’ आनंदने शाळेत जाऊ नये म्हणून त्याला चक्क चाबकाने फोडतात; पण आनंद यादव आपल्या जिद्दीने पंधरा दिवस कोल्हापुरात केळीची साले खाऊन दिवस काढतात, पण शाळेत जातातच. पुढे प्राध्यापकही बनतात! हे पुस्तक मला खूप प्रेरणादायी आहे. ह. मो. मराठे यांचे ‘बालकाण्ड’ व ‘पोहरा’ ही माझी आवडती आत्मचरित्रे. खरेतर हे आवडले असे म्हणणे, हा ह. मो. मराठे यांनी सोसलेल्या हालांचा एका झटक्यात केलेला अपमान आहे. कारण त्यातले त्यांचे हाल व गरिबीचे दिवस आपल्याला आवडले असे कसे म्हणता येईल? पण ती पुस्तके मला फार आवडतात.  
व्यंकटेश माडगूळकर हे माझे आवडते लेखक. मला प्राण्यांची आवड आहे आणि माझ्या आवडीला त्यांच्या ‘जंगलातील दिवस’ या पुस्तकाने खतपाणी घातले आहे. त्यांच्यासारखा लेखक होणे अशक्य आहे. अगदी आत्ताच वाचलेले त्यांचे पुस्तक म्हणजे ‘करुणाष्टक’. ही खरेतर व्यंकटेश माडगूळकर यांचीच कुटुंबकहाणी आहे. दोन मुलांनी मोठे झाल्यावर आपल्या आईच्या कष्टांची परतफेड कशी केली, त्याची गोष्ट त्यात आहे. ती वाचताना मला माझ्या डोळ्यांतले पाणी आवरले नाही. एका पुस्तकातल्या काही शब्दांनीच डोळ्यात पाणी आणावे ही मोठी गोष्ट आहे.
मी वाचलेले आणखी एक प्रेरणादायी पुस्तक म्हणजे विश्वास नांगरे-पाटील यांचे ‘मन में है विश्वास’. हे पुस्तक वाचल्यावरच मला विश्वास नांगरे-पाटील यांना ‘यूथ आयकॉन’ का म्हणतात, हे कळले. पण एवढ्या मोठ्या आयपीएस ऑफिसरच्या जीवनात विद्यार्थीदशेपासून आयपीएस होईपर्यंतच्या अंतरात केवळ अपमान भरलेला असावा, हे खूप वाईट आहे. पण एवढ्या त्रासातून आयपीएस बनलेल्या मुलाची कथा खूप प्रेरणादायी आहे.
आता माझा छोटा भाऊही वाचतो. खूप चुकाही करतो, पण मला हसू येत नाही. कारण ‘एक होता कावळा’ ही गोष्ट मी लहानपणी कसा वाचत असे, त्याची माझे बाबा उत्तम प्रकारे मिमिक्री करतात.
– मंदार सुतार
इयत्ता आठवी, अंबेजोगाई
***
चित्रश्रेय : सारंग लेले
चित्रसंस्करण : स्नेहल नागोरी
Facebook Comments

10 thoughts on “माझे वाचनपूर्ण घर आणि मी”

 1. मस्त लिहिले आहे , एव्हड्या लहान वयात एव्हडी वाचनाबद्दल ची समज , खूप छान !!

 2. भारी वाटतंय एवडूसा पोरगा वाचतो आणि लिहितो पण

 3. खुप छान लेख आहे. परिपक्व विचार आणि वाचन संस्कांर आवडले.

 4. एवढ्या लहान मुलाने इतकं सुंदर लिहावं… आश्चर्य आणि आनंद दोन्ही वाटतंय… खूप मोठा होशील मंदार

 5. मंदार चे वाचन व अभिप्राय यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

 6. मंदार व आई बाबांचे अभिनंदन
  खूपच सुंदर लेखन केले आहे.
  वाचनाची इतकी प्रचंड आवड आहे. पुढे उज्ज्वल भविष्य आहे.
  मंदारच्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा.!

 7. मन्दारच खूप खूप कौतुक करावेसे वाटते. माझा ठाम विश्वास आहे की जो खूप वाचतो तो उत्तम लिहूही शकतो….त्याच्या वाचन- लेखन प्रवासासाठी खूप शुभेच्छा….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *