बालसाहित्यांक २०१७ लेख

एका पुस्तकाच्या निमित्ताने…

मालेयव्ह – शोध आणि अर्थात बोध
या सार्‍याला सुरुवात झाली बदलापूरच्या वास्तव्यातल्या एका रद्दीच्या दुकानातल्या मोठ्या धाडीत. म्हणजे कोणत्याही शहराचा किंवा कोणत्याही परिसराचा वाचननिर्देशांक वा त्याचं समुदायबहुलत्व ज्याला जाणून घ्यायचे असेल, त्याने तिथल्या रद्दीच्या दुकानाला हात घालावा. बदलापूर हे सांस्कृतिकदृष्ट्याही नव्याने विकसित झालेलं शहर आहे आणि दादरपासून ठाण्यापर्यंत राहणार्‍या अनेक लोकांनी सेकंडहोम म्हणून किंवा दुसरा पर्याय नसल्याने अंतिम होम म्हणून स्वीकारलं आहे. इथल्या वाचनसंस्कृतीत कमालीची विविधता आहे. पूर्वेकडे असलेल्या माझ्या माहितीतल्या तीन दुकानांमध्ये तिचं नेहमीच दर्शन घडतं. बदलापूर पूर्वेतल्या एका प्रसिद्ध चौकाजवळच्या रद्दीवाल्याकडे अमेरिकन क्राइम कादंबर्‍याच्या आणि बेस्टसेलर्सच्या काळपट झालेल्या प्रती, मराठी हिंदी-इंग्रजीतल्या महिला मासिकांची गर्दी, जुनी-जीर्ण सार्वभाषिक पुस्तकं तर असतातच; पण खेरीज मुख्य म्हणजे केजी ते कॉलेजपर्यंतची सेकंडहॅण्ड पुस्तकं असतात. त्या दिवशीच्या माझ्या धाडीत अमेरिकी-ब्रिटिश परिचित लेखकांच्या न वाचलेल्या आणि जरा बर्‍या अवस्थेतल्या बर्‍याच पुस्तकांची खरेदी झाल्यानंतर त्या रद्दीवाल्याने दुकानाच्या आतमधल्या भागात असलेल्या पुस्तकांच्या गठ्ठ्यांवरही नजर टाकायची मुभा दिली.
तिथे लडलम, किंग, अ‍ॅगाथा ख्रिस्ती आणि त्यांच्यासोबत सातत्याने दिसणार्‍या आणखी काही लेखकांची आणखी जुनी पुस्तकं वाट्टेल त्या पद्धतीने अनेक कप्प्यांमध्ये कोंबली होती. गुजराती नि हिंदी कविता, टेलिफोन डिरेक्टर्‍या, धार्मिक पुस्तकं आणि पोथ्या, डेल कार्नेगी ते ब्रायन ट्रेसीपर्यंत ‘हाऊ टू…’ छापाची पुस्तकं,  लहान मुलांच्या अगदीच बाळबोध पुस्तकांचे गठ्ठे असं सारंच फडताळात सुखनैव नांदत होतं. बालसाहित्याच्या पुस्तकांमध्ये एनिड ब्लायटन, आर. एल. स्टाइन, फ्रँकलिन डब्ल्यू डिक्सन यांची मक्तेदारी होतीच. त्यानंतर मराठीतली तुलनेने अगदीच गरीब निर्मितिमूल्यांची पुस्तकं होती. मुंबई-ठाण्यापासून अगदी पुण्यातल्याही रद्दीवाल्यांकडेही याच प्रकारची पुस्तकं थोड्या-फार फरकाने पाहायला मिळतात. यांत फार नवं नाही असं डोक्यात आल्यानंतरही हा गठ्ठा गंमत म्हणून हाताळायला गेलो नसतो, तर हा लेख झालाच नसता. शिवाय आनंदाच्या एका पर्वाला मुकलो असतो. कारण रशियन भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेलं ‘व्हिट्या मालेयव्ह, घरीं व शाळेत’ हे पुस्तक याच गठ्ठ्यामध्ये दडलं होतं.
लहानपणीच्या वाचनामध्ये हे पुस्तक कधी दिसलं नव्हतं, इतक्या वर्षांत पाहिलेल्या रद्दीच्या अड्ड्यांमध्ये त्याची प्रत नजरेखालून गेली नव्हती किंवा त्याबद्दल कुठेच वाचलंही नव्हते. रशियन साहित्य भारतात अनुवादित होण्याचा एक मोठा कालखंड होता. माझ्याकडे प्रगती आणि रादुगा प्रकाशनाने छापलेली रशियन पुस्तकं भरपूर होती. उझबेक कथा, उरल कथा, रशियन परीकथा यांचे इंग्रजीत आलेले सारे खंड होते. मराठीतलं ‘देनिसच्या गोष्टी’ही माहीत होतं. ते मूळच्या हार्डबाऊंड स्वरूपात चर्चगेटजवळच्या रस्त्यावर जुनी पुस्तकं विकणार्‍या माणसाकडे कवडीमोलामध्ये मिळालं होतं. तेव्हाच कधीतरी अलेक्झांडर रस्किन याचं ‘व्हेन डॅडी वॉज ए लिटिल बॉय’ नावाचं सचित्र पुस्तक गंमत म्हणून वाचून काढलं होते. पण लहान मुलांसाठीची देशोदेशींची पुस्तकं वाचूनही मला व्हिट्या मालेयव्ह या नावाच्या रशियन पुस्तकाची काहीएक माहिती नव्हती. आपण पुस्तकांच्या दुकानात जातो, तेव्हा नेहमीच आपल्या वाचन-अभिमानाला तडा जातो. वाचून झालेल्या पुस्तकांपेक्षा न वाचलेल्या पुस्तकांची तिथली गर्दी आपल्याला आपण फार काही न वाचल्याची जाणीव करून देते. रद्दीवाला जर ग्रंथश्रीमंत असला, तर तिथेही तसंच होतं. फक्त दुकानात आपण जितकी खरेदी करू, त्यापेक्षा अधिक खरेदी करण्याची क्षमता आपण रद्दीवाल्याच्या दुकानात बाळगून असतो.
कित्येक वर्षांपासून धूळ न झटकलेलं, अत्यंत जीर्ण अवस्थेतलं ‘व्हिट्या मालेयव्ह, घरीं आणि शाळेत’ हे पुस्तक पाहून माझं त्याबाबतचं कुतूहल वाढलं. मूळ लेखकाचं नाव  मुखपृष्ठावर न देता तिथे फक्त ‘अनुवादक वि. ग. फाटक’ असं लिहिलं होतं, त्याचीही सुरुवातीला गंमत वाटली. त्या दुकानामध्ये घेतलेल्या इतर पुस्तकांचे गठ्ठे उघडण्याआधीच मी व्हिट्या मालेयव्हसोबत सत्तर वर्षांपूर्वीच्या भाबड्या सोव्हिएत रशियात फेरफटका मारून आलो. एका दमात वाचता येण्यासारखं हे पुस्तक असल्याने त्याने दिलेल्या आनंदलहरीतच जालावरच्या अजस्र संदर्भकोशांतून व्हिट्या मालेयव्हची खबरबात घ्यायला सुरुवात केली. त्यातून रशियन बालपुस्तकांच्या जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी तयार झाली आणि माझ्या बालसाहित्यवाचनातल्या मर्यादांची जाणीव झाली. आणखी वाचन गरजेचं वाटलं. पण हा आत्मजाणिवा विस्तारण्याचा प्रकार असल्याने इतर वाचनाच्या धबडग्यात आणि दैनंदिन कामाच्या तडाख्यात या वाचनाची गती संथच राहिली.
बदलापूरच्या रद्दीवाल्याकडून भरपूर पुस्तकं – तो सांगेल त्या किंमतीला – विकत घेतलेली असल्यामुळे त्याने ‘व्हिट्या मालेयव्ह’ तेव्हा मोफतच देऊन टाकलं होतं. त्याच्या दृष्टीने ते नगण्य, एका हातात मावण्याइतक्या आकाराकं, एक नष्ट होत चाललेलं पुस्तक होतं. माझ्या दृष्टीने ते विस्मृतीत गेलेल्या आणि आता संपत चाललेल्या या पुस्तकाच्या उरलेल्या काही प्रतींपैकी एक होतं. कुठल्याशा शाळेत किंवा खासगी ग्रंथालयांमध्ये, वैयक्तिक संग्रहामध्ये या पुस्तकाच्या प्रती असतीलच. तरी त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कागदामुळे त्या प्रतींची अवस्था फारशी बरी नसेल अशीच शक्यता जास्त आहे.
हे पुस्तक मे, १९५३मध्ये, म्हणजे तेव्हाच्या उन्हाळी सुट्टीत प्रकाशित झालं आहे. ‘दी टीचर्स आयडिअल पब्लिशिंग हाऊस लि. पुणे-२’ असं या पुस्तकाच्या प्रकाशनाचं नाव आहे. ‘स्थूलवाचन, अधिकवाचन, पुरवणीवाचन, वर्ग ग्रंथालये, विद्याार्थी ग्रंथालये, शिक्षक ग्रंथालये, बक्षिसे, भेट इत्यादींकरिता अल्पमोली व बहुगुणी पुस्तकं मिळण्याचे एकमेव ठिकाण’ असं त्या प्रकाशनाने पुस्तकावर अभिमानानं नोंदलं आहे. मात्र आज हे प्रकाशन कुठे आहे, याचा पत्ता लागला नाही. अनेकांकडे विचारणा केल्यानंतरही नाही. प्रस्तावनेमध्ये अनुवादक वि.ग.फाटक यांनी  छ. ल. बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. के. गो. अक्षीकर यांना या पुस्तकाच्या अनुवादाचं श्रेय दिलं आहे.
‘‘‘सोव्हिएट लिटरेचर’ या मासिकातून इंग्रजीत प्रसिद्ध झालेली ही दीर्घकथा मला स्वत:ला आवडल्यामुळे मी त्यांना (अक्षीकर) दिली होती. विद्यााथ्र्यांच्या जीवनावर अभ्यासपूर्वक लिहिली गेलेली ही कथा त्यांना फार आवडली. या कथेचा अनुवाद करण्याचा माझा विचार आहे, असे मी त्यांना सहजगत्या बोललो. त्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. हस्तलिखित वाचून त्यांनी सूचना केल्या. शेवटी अनुवाद छापवून घेण्यासही तेच कारणीभूत झाले आहेत. म्हणूनच अशा प्रकारचे पुस्तक मराठी वाचकांच्या हाती पडत आहे. याबद्दल श्री. अक्षीकर यांचा मी मन:पूर्वक आभारी आहे.’’  
हे अनुवादक वि. ग. फाटक यांनी केलेलं आभारप्रदर्शन आहे. हे वि. ग. फाटक छबिलदास लल्लुभाई बॉईज हायस्कूल, मुंबई इथे शिक्षक होते, यापलीकडे त्यांची फारशी माहिती पुस्तकातून मिळत नाही.
पुस्तकाचे मूळ लेखक निकोलाय (पुस्तकात दोन्ही ठिकाणी ‘एन’ म्हटले आहे.) नोसॉव्ह हे सोव्हिएतमधल्या मुलांचे आवडते लेखक आहेत. लहान मुलांच्या मनोव्यापारांचा सूक्ष्मपणे अभ्यास करून ते आपल्या कथा-कादंबर्‍या लिहितात, असं फाटकांनी लेखकाचा परिचय देताना म्हटलं आहे. सोव्हिएतमधल्या सर्वसामान्य मुलांचंच चित्रण त्यांनी आपल्या साहित्यात केलं आहे. ही मुलं सर्वसामान्य आहेत. कुठल्याही विशिष्ट प्रवृत्ती त्यांच्यात बळावलेल्या नाहीत, असं म्हणताना ‘ती मुलं बंडखोर नाहीत’ असं फाटकांना म्हणायचं असावं का? कारण १९५३ सालातला काळच मुळी देशात साम्यवादी विचारांच्या प्रभावाचा होता. त्यामुळे लहान मुलांनी आदबशीर वागत समानतेच्या धाकात कसं राहावं, याचे पाठ देणार्‍या साहित्यातल्या पात्रांचा पुरस्कार जसा रशियामध्ये केला जात होता, तशीच त्याची भारतातही री ओढली जात होती.
सर्वसाधारण, सुदृढ आणि उमद्या मनाच्या मुलांना गंमत आणि खोडकरपणा यांची स्वाभाविकच भरपूर आवड असते. त्याचबरोबर सत्य व न्याय यांची उपजत जाणीव असते. सत्य आणि न्याय या सोव्हिएत समाजजीवनाच्या पायावृत्ती आहेत, असे सांगताना या कादंबरीला स्टालिन पारितोषिक मिळालं असल्याचीही माहिती फाटकांनी दिली आहे.
१९५१ साली ‘सोव्हिएत लिटरेचर’च्या अंकात आलेली व्हिट्या मालेयव्ह ही कादंबरी  १९५३ साली मराठीमध्ये प्रकाशित होते, याचा अर्थ मराठी पुस्तक रशियन पुस्तकासोबतच प्रकाशित झालं होतं. रशियन भाषेतून या पुस्तकाचं जगभरातल्या शेकडो भाषांमध्ये रूपांतरण झालं. २०१६ साली या पुस्तकाची नवी प्रत प्रकाशित करण्यात आली असून, या पुस्तकामुळे एक पिढी घडल्याचंही ‘अ‍ॅमेझॉन’वरच्या कॅप्सूल रिव्ह्यूमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्याचे बालवाचक आता आजी-आजोबा झाले असतील, पण त्या बालवाचकांच्या पुढल्या पिढीसाठी हे पुस्तक पुन्हा उपलब्ध करून देत असल्याचं तिथे म्हटलं आहे. या पुस्तकाने रशियन बालवाचकांना गणिताची दीक्षा दिली, मूल्यं आणि सामाजिक जाणिवा त्यांच्यात पेरल्या. त्यावरही कडी म्हणजे, हे पुस्तक आठ-नऊ वर्षाच्या मुलांमध्ये साम्यवादी विचारांची बीजं पेरण्यासाठी उपयुक्त ठरलं होतं. रशियातली मुलं अमेरिकेतल्या टॉम सॉयर आणि हकलबरी फिन या बंडखोर उडाणटप्पू बालव्यक्तिरेखांनी प्रभावित होऊ नयेत, म्हणून त्या साहित्याच्या तोडीस तोड असं हे देशी साहित्य रशियनांनी तयार केलं असावं का?
२०१५ साली एक बातमी आली होती. ज्यात असा अंदाज व्यक्त केला होता, की ‘द अ‍ॅडव्हेन्चर्स ऑफ टॉम सॉयर’ हे पुस्तक मुलांच्या मानसिक प्रगतीसाठी अनुकूल उपयुक्त नाही म्हणून एका रशियन खेड्यातल्या वाचनालयाच्या संग्रहातून ते काढून टाकलं असावं. मार्क ट्वेनने सुमारे दीड शतकापूर्वी निर्माण केलेल्या या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा बंडखोर, प्रसंगानुसार खोटं बोलणार्‍या आणि कौटुंबिक मूल्याची पोच नसलेल्या अशा आहेत. अशा या व्यक्तिरेखा मुलांच्या जडणघडणीत उपयुक्त नसल्याचंही रशियाच्या पब्लिक चेंबरच्या प्रतिनिधीनं म्हटल्याची नोंद आहे. रशियन भाषेमध्ये मार्क ट्वेनच्या या दोन्ही बालकलाकृती अनुवादित झाल्या आहेत, त्यांवर चित्रपटही आले आहेत. रशियन वाचनालयांमध्ये टॉम सॉयरच्या पहिल्या आवृत्तीपासूनच्या अनेक आवृत्त्या उपलब्ध असल्याचे दाखले आहेत. तरीही २०१५ साली त्या पुस्तकाबाबत ही भूमिका आहे! मग युद्धोत्तर क्रांतीनंतरच्या दशकांत ती किती जहाल असू शकेल, याची कल्पनाच केलेली बरी.
सहाज तुलना मनाशी आली – आपल्याकडे मराठीत भा. रा. भागवतांनी ‘हकलबरी फिन’चा भटकबहाद्दर या नावाने अनुवाद केला आहे, तर गंगाधर गाडगिळांनी ‘द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर’ ‘धाडसी चंदू’ या नावानं आणला आहे. पण आपल्याकडे बालसाहित्याबाबत अज्ञान आणि अनास्थाच इतकी आहे, की आपल्या मुलांच्या जडणघडणीत अमुक पुस्तकाने अडथळा येतो, असं कुणी बोलल्याचं आठवत नाही. वाटेल त्या वाचनामुळे किंवा अजिबात वाचन न करताच आपल्याकडची बालकं घडत किंवा बिघडत असतात. मराठीतल्या बालवाचकांना ना अमेरिकी टॉम सॉयरने बिघडवलं, ना रशियन व्हिट्या मालेयव्हसारख्या पुस्तकांनी घडवलं. मुळात त्यांच्या जडणघडणीत या बालव्यक्तिरेखांचा इतका महत्त्वाचा वाटा असताच, तर आज बालसाहित्याचा प्रवाह असा आटलेल्या नदीसारखा दिसला नसता. असो.
बालवाचनाचं आत्मचरित्र – अर्थात १९८५ ते १९९५
‘व्हिट्या मालेयव्ह, घरीं आणि शाळेत’ हे माझ्या बालसाहित्याच्या संग्रहात दाखल होणारं थोर पुस्तक  नाही. थोर आहे ते इटालियन लेखक कार्लो कोलॉदी याचं जगप्रसिद्ध पुस्तक ‘द अ‍ॅडव्हेन्चर्स ऑफ पीनोक्क्यो’. माझ्याकडची त्याची आवृत्ती नव्वदेक वर्षांपूर्वीची. जाडजूड दिवाळी अंकापेक्षा दीडपट जाड असलेली. सचित्र रंगीत पानांचा हा बालग्रंथ माझ्याकडचा सर्वात जुना आणि तितकाच लख्ख असलेला आहे. इतक्या वर्षांत ना त्याच्या चित्रांचा रंग फिका झालाय, ना त्यातल्या कागदाचा दर्जा घसरलाय. ठाण्यातल्या आडबाजूच्या रद्दीवाल्याकडून त्याने मागितलेल्या पन्नास रुपये या किंमतीत तो मिळवल्यानंतर ‘आपण रद्दीवाल्याची केवढी मोठी लुबाडणूक केली!’ याचं शल्य कित्येक दिवस बोचत होतं. उझबेक बालकथांचे आणि उरल बालसाहित्याचे इंग्रजी अनुवाद, प्रसिद्ध फ्रेंच बालपुस्तक ‘लिटिल प्रिन्स’च्या प्रकाशनाच्या अगदी सुरुवातीच्या काळातली इंग्रजी अनुवादाची प्रत हे सारं माझ्या दृष्टीने माझ्याजवळचं दुर्मीळ बालसाहित्य आहे.
माझ्या वाचनाला सुरुवात झाली ती पाचेक वर्षांचा असताना. पहिली-दुसरीत वगैरे. जोडशब्द लिहिण्यामध्ये किंवा वाचण्यामध्ये वर्गातल्या इतर मुलांना सर्वाधिक त्रास का होतो, याची पक्की नोंद मी तेव्हा घेतल्याचं आठवतं. गोष्टीची पुस्तकं वाचण्याचा माझा वेग मला पाठ्यपुस्तकांतल्या धड्यातली जोडाक्षरं तयार करण्यातच नव्हे, तर कठीण शब्द समजून घेण्यातही मदत करत होता. त्या धड्यांहूनही लांबलचक चालणारी गोष्ट म्हणून पुस्तकांबाबत कुतूहल – उत्सुकता असे. शाळेच्या सुट्टीमध्येच पुस्तकं वाचावीत असा नियम नसल्यामुळे वडील मागेन तितकी पुस्तकं लगेच आणून देत. तेव्हा आम्ही ठाण्यातल्या आजच्या लोकप्रिय घोडबंदर रोडकडे जाणार्‍या मीनाताई ठाकरे चौकाजवळच्या तंबाखूवाला नावाच्या चाळीत राहत होतो. वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत तिथल्या दहा-बाय बाराच्या खोलीतल्या शोकेसच्या ड्रॉवरमध्ये माझ्या मालकीचा पहिला ग्रंथसंग्रह होता. ना.धों.ताम्हनकरांचा गोट्या, फास्टर फेणेचे बरेचसे भाग, ठकठक-चंपक-मासिकं. यांत किशोर उशिराने दाखल झाला. जादूची चटई ते जादूचा दिवा, राजे-रजवाड्यांच्या छान-छान गोष्टी, हातिमताई, इसापच्या गोष्टी, एकशेएक गोष्टी, पाचशेएक गोष्टी इत्यादी पुस्तकं लख्ख आठवतात.
माझी वाचनभूक पुरवताना आर्थिकदृष्ट्या थकलेल्या वडिलांनी एक दिवस गंमत केली.
१९८७ किंवा ८८ साल असेल. सुट्टीचे दिवस नव्हते. उलट दिवाळीची सुट्टी संपून शाळा सुरू झाली होती.  एका संध्याकाळी जांभळी नाक्यावरच्या मोठाल्या जुन्या रद्दी पुस्तकविक्रेत्याच्या दुकानात त्यांनी मला नेलं. वाटेल तेवढी पुस्तकं इथून घे, असं मुक्तद्वार दिलं. पु्स्तकांचा नक्की आकडा आता आठवत नाही, पण अवघ्या सतरा रुपयांमध्ये तीन पिशव्या भरून पुस्तकं घेऊन मी घरी तरंगत आलो होतो एवढं आठवतं. त्यातलं एक पुस्तक टिळकांवरचं होतं. ‘दोन जादूगार’ या नावाचं खूप वर्षं लक्ष्यात राहिलेलं उत्कंठावर्धक पुस्तक आणि ‘हसतखेळत अर्थशास्त्र सांगणार्‍या गोट्यांची बँक’ या नावाचं एक पुस्तक होतं. ‘तेरेखोलचे रहस्य’ होतं. नावं आणि चित्रं दोन्ही विस्मृतीत गेली आहेत, अशीही अनेक पुस्तकं होती.
आटपाट नगरापासून सुरू झालेली, कुण्या एके काळाचा महिमा वर्णन करणारी, सुखी राजाचं किंवा राज्याचं एकुलतं एक शल्य सांगणारी व त्यावर उपाय म्हणून संपूर्ण पुस्तक संपेस्तोवर रहस्यरंजन करणारी ही पुस्तकं चाळीत कुठे आणि कुणाकडे गेली, कुणास ठाऊक. चाळीतून फ्लॅटमध्ये जाताना ती कुठे गडप झाली याचा पत्ता लागला नाही. पण रद्दीवाल्याचा शोध लागल्यानंतर, पुस्तकं वाचायसाठी फार पैसा लागत नाही, याची जाणीव डोक्यात पक्की झाली. त्यामुळे टेंभी नाक्याजवळील धोबी आळी परिसरामध्ये राहायला आल्यानंतर तिथल्या घराच्या गच्चीत वाचनाची अभूतपूर्व चंगळ वर्षभर अनुभवल्याचं आठवतं आहे. त्यात पहिल्यांदा ब्लायटनच्या ‘फेमस फाईव्ह’च्या प्रभावातून मराठीत आलेलं, उजाड वाड्यातल्या भुताचं पाच मुलांनी उकललेलं रहस्य, मग ‘टिनटिन’च्या प्रभावातून मराठीत आलेल्या एका बातमीदार मुलाच्या गोष्टींचं पुस्तक… अशा आठवणी आहेत. पण वाचन हा एकमेव छंद न उरता पतंग, क्रिकेट, कबूतरपालन आणि गाणी ऐकणे अशी अनेक व्यसनं लागत गेल्यामुळे वाचनाचा वेग आटोक्यात होता.
१९९२ साली, वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षी, टीव्हीवरच्या क्रिकेट सामन्यांतलं मनोरंजन कळायला लागलं. याच कालावधीमध्ये चित्रीकरणासाठी वेगवेगळ्या अँगल्समधून लावलेले शक्तिशाली कॅमेरे वापरायला सुरुवात झाली होती. ३६० अंशांतून मैदानाचं चित्रीकरण झालेला पहिला एकदिवसीय सामनाही आठवतोय. आळीतल्या क्रिकेटमध्ये खेळताना डोक्यात सचिन, अ‍ॅलन बॉर्डर, उतारवयात आलेला कपिउल देव आणि डेव्हिड बून यांचे आदर्श भिनले होेते.
रद्दीच्या दुकानात मिळणार्‍या पुस्तकांसोबत तिथेच आणखी एक आकर्षण तयार झालं, ते म्हणजे ‘एकच षटकार’ हे साप्ताहिक मिळवण्याचं. सगळ्याच रद्दीच्या दुकानांत एक रुपयात मिळणारे नवे-जुने षटकार असत. त्यांच्या मुखपृष्ठांची नोंद डोक्यात असे. मी वाचलेलं मोठ्या माणसांचं पहिलं नियतकालिक म्हणजे षटकार. त्याच्या दिवाळी अंकांपासून ते कोणत्याही जुन्यापान्या साध्या अंकांपर्यंत क्रिकेटची आणि इतर खेळांची कोणत्याही कोशात सापडणार नाही, इतकी नवी-जुनी माहिती असायची. मोठ्या माणसांच्या चर्चेमध्ये क्रिकेटबाबत मत मांडण्यासाठी हे षटकार-वाचन मला पुरून उरलं. यशस्वी कर्णधार या नावाचंदेखील एक उत्तम क्रिकेट साप्ताहिक द्वारकानाथ संझगिरी यांनी संपादित केलं होतं. त्याचे काही मोजकेच अंक प्रकाशित झाले, अन् तेव्हा ते सगळे माझ्याकडे होते. त्या काळात क्रिकेट सामन्यांचं विश्लेषण, मुलाखती, वेगवेगळ्या मुलखांमधल्या खेळांची माहिती, नवे शब्द या साप्ताहिकांतून मिळाले.
रीतसर वाचनालयात जाऊन पुस्तकं वाचणंही याच काळात सुरू झालं.
तीनेक मिनिटांच्या अंतरावरच ठाणे नगर वाचन मंदिर हे वाचनालय होतं. त्या वेळी संध्याकाळी तिथे वाचकांची प्रचंड वर्दळ असे. पुठ्ठ्यांत बांधलेली मासिकं आणि बालपुस्तकं एका कोपर्‍यात रचून ठेवलेली असत. मी अधाश्यासारखी त्या गठ्ठ्यांतली पुस्तकं एका सुट्टीच्या थोड्याच दिवसांत संपवली होती. त्या वाचनालयामध्ये तेव्हा माझ्या वयाची दहा-बारा तरी मुलं पुस्तकांवर तुटून पडण्यासाठी वाचनालय उघडण्याच्या वेळीच पोहोचायची. आपल्या आवडीच्या जागेवर बसून पुस्तक वाचण्यासाठी हा आटापिटा असे. त्यातल्या काहींशी ‘हे पुस्तक चांगलंय’ आणि ‘ते तर लयच भारी आहे,’ अशा चर्चा व्हायच्या. पण आपल्याकडे सगळ्यांत भारी पुस्तक आहे, हा अभिमानी बाणा प्रत्येकाचा असायचा. कित्येकदा आमच्यामुळे मोठ्या माणसांना जागा मिळायची नाही. मग ती वैतागत. पण तहान-भूक आणि शी-शू विसरून आम्ही लायब्ररी बंद होईस्तोवर आमची जागा धरून वाचत बसायचो. यात आपल्या जागेबद्दलची विचित्र हक्कभावना असायची.
वाचनाचं अल्पचरित्र – अर्थात १९९५ ते २०१०
दहावीत असताना माझ्या वाचनामध्ये आणखी एक बदल झाला. नववी-दहावीतल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांत सापडणारे सगळे लेखक वाचनालयामधून वाचून घेतले. त्यानंतर ललित मासिक लावलं. त्यात वाचलेल्या संदर्भांचा आधार घेऊन एकेक लेखक पहिल्या पुस्तकापासून शेवटच्या पुस्तकार्यंत वाचण्याचा सपाटा लावला. मग आंतरभारतीची सर्व भारतीय भाषांतून मराठीत आलेली पुस्तकं वाचली. जयकांतनच्या कथा, पूर्णचंद्र तेजस्वी, सुनील गंगोपाध्याय, विजयदान देठा, इस्मत चुगताई यांच्या कथाकादंबर्‍या आणि बहुतांश उर्दू कथांचे खंड अकरावीत जाण्यापूर्वी वाचून संपले होते. याच काळात ‘दैनिक वृत्तमानस’ची रविवारची पुरवणी प्रकाशित व्हायला लागली होती. माझ्यावर या वृत्तपत्राचे खूप संस्कार झाले. या साप्ताहिकातल्या साहित्य आणि कला या विभागांतला शब्द अन् शब्द मी वाचून काढला. त्यात सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके, शांताराम पारपिल्लेवार हे वाचन आणि देशो-देशीच्या कला यांबद्दलचं भारारावून गेलेल्या सुरातलं लिखाण करत. काळसेकरांचे समांतर जगण्यावरचे निबंध असत. पारपिल्लेवार हे सररिअ‍ॅलिस्ट चळवळीविषयी लिहीत आणि डहाके त्यांच्या चंद्रपुरातल्या साहित्यिक जडणघडणीच्या आठवणी लिहीत. त्यांनी जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘सांजशकुन’वर एक फर्मास लेख लिहिल्याचं आठवतं. दहावीत असताना वाचलेल्या या लेखातला ऐवज अजून लक्षात आहे, कारण त्या लेखामुळेच परीक्षा संपल्यावर जी.ए.देखील सगळेच वाचून काढले. जी. ए. कुलकर्णींची ‘बखर बिम्मची’ आणि ‘अ‍ॅलिस इन वंडरलॅन्ड’ने प्रभावित होऊन लिहिलेली ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ ही दोन्ही पुस्तकं महान असूनही त्यांचा मला सापडणारा वाचकवर्ग तुरळकच आहे.
रद्दीच्या दुकानांत ढिगांनी असलेले आणि तोवर मी कधीच न घेतलेले दिवाळी अंक मी या काळात विकत घ्यायला लागलो. भारत सासणे, आशा बगे, मिलिंद बोकील, अनिल अवचट यांच्या लिखाणाशी परिचय झाला. सासणेंच्या ‘जॉन आणि अंजिरी पक्षी’पासून सगळ्या कथा वाचून त्यांच्या एखाद्या स्वयंघोषित प्रसिद्धीप्रमुखाप्रमाणे मी त्या कैक वर्षे इतरांना वाचायला दिल्या.
माझं कच्चं इंग्रजी जरा सुधारण्यासाठी कुणीतरी अभिजात पुस्तकांच्या (क्लासिक्स) छोट्या आवृत्त्या वाचण्याचा सल्ला दिला. ती पुस्तकंही ठाण्यातल्या रद्दीच्या दुकानांमध्ये मोठ्या संख्येनं सापडायची.
एस.चंद (एस चंद बुक फॉर ऑल – अशी जाहिरात यायची या प्रकाशनाची टीव्हीवर!) प्रकाशनानं काढलेल्या,  चार्ल्स डिकन्सच्या पुस्तकांच्या पुनर्कथित आवृत्त्या तेव्हा वाचल्याचं आठवतं. पाच रुपयांना एक या किंमतीत त्या तिथे मिळत. त्यानंतर मॅकमिलन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या अभिजात पुस्तकांच्या लघुआवृत्त्या वाचल्या. सर्वांतिसचं ‘डॉन किहोटे’, सॉमरसेट मॉमचं ‘केक्स अ‍ॅण्ड एल’ यांसोबत एनिड ब्लायटनच्या साहसी व्यक्तिरेखांची आणि नॅन्सी ड्र्यूच्या ‘हार्डी बॉइज’सारखी खूप पुस्तकं वाचली. याच काळात एक समृद्ध रद्दीवाला घंटाळी परिसरामध्ये सापडला. त्याच्याकडे विल्यम सरॉयनपासून ते देशोदेशीच्या बाल पुस्तकांचा, परीकथांचा साठा सापडला. तिबेटियन लोककथा, मलेशियाच्या परीकथा, रशियन बालगोष्टी याच ठिकाणावरून उचलल्या.
कॉलेजच्या दिवसांत ‘अंतर्नाद’, ‘अनुभव’ आदी मासिकांमुळे मराठीतल्या समांतर साहित्याचं वाचन घडलं. पदवीनंतर पत्रकारिता शिकताना त्यात वाढ झाली. तरीही वेळोवेळी रद्दीत सापडणार्‍या बालपुस्तकांवर हमखास नजर ठेवून होतो. फक्त परीकथा आणि एरवी सहज सापडणार नाहीत अशी पुस्तकं तेवढी विकत घेऊन ठेवायचो.
या काळात जपानमधल्या ‘तोत्तोचान’ या बालपुस्तकाचा अनुवाद मराठीत आला. सर्वच वयोगटातल्या लोकांसाठी ते अनिवार्य पुस्तक असल्याची चर्चा इतकी होती, की ते वाचून काढलंच. आवडल्यावर प्रसारही केला. पण मला एक प्रश्न पडला – १९८१ साली जपानमध्ये आणि १९८४ साली इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक आपल्याकडे यायला नि लोकप्रिय व्हायला दोन दशकं का लागली? हिंदी, गुजराती, तमीळ, आसामी, कन्नड, मल्याळम, बंगाली या भाषांत त्याचा अनुवाद नव्या सहस्रकात झाला. अमेरिकेत लोकप्रिय झाल्यानंतरच साहित्यकलाचित्रपटसंगीत यांचा प्रसार जगभरात व्हायला लागण्याचे ते दिवस होते.
मी पत्रकारितेमध्ये आल्यानंतर माझं बालसाहित्याचं वाचन हळूहळू कमी व्हायला लागलं. त्या पुस्तकांचा नितिमूल्यसंस्कारप्रसाराचा उद्देश थेटपणे जाणवे. मध्यांतरीचा हिंदी सिनेमा जसा एकसुरी प्रेमप्रकरणांनी व्यापलेला असे, तशीच ही पुस्तकंही एकसुरी वाटायला लागली. या काळात जाणवलेली बाब म्हणजे मराठी बालपुस्तकांचं अस्तित्व रद्दीवाल्यांच्या दुकानांमधून कमी व्हायला लागलं. रद्दीच्या आणि जुन्या पुस्तकांच्या दुकांनामध्ये येणारा त्यांचा ओघ आटला. ‘श्यामची आई’ हे एकमेव पुस्तक साहित्य संमेलनासह सगळीकडे लोकप्रिय असल्याचं चित्र दिसू लागलं.
बालवाचनाचं अल्पचरित्र – अर्थात आकलनकाळ  
जीन वाइनगार्टन नावाचे एक अमेरिकी पत्रकार आहेत. पुलित्झर वगैरे बक्षिसं मिळालेले. पिकबू पॅरेडॉक्स या एका लेखाच्या वाचनामुळे जगभरातील अनेक लोकांप्रमाणे मी त्यांच्या लेखनाचा चाहता बनलो. ‘द हाडी बॉईज : द फायनल चॅप्टरनावाचा ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधला लेख २०११च्या सुमारास माझ्या वाचनात आला आणि अशा प्रकारचं लेखन पहिल्यांदाच वाचत असल्याचं माझ्या लक्ष्यात आलं. जगभरामध्ये ‘हार्डी बॉईज’ पुस्तकं गाजली आहेत. मराठीमध्ये या हार्डी बॉईजच्या प्रेरणेतून आलेली काही पात्रं वाचल्याची आठवतात. अर्थात मूळ लेखकाला श्रेय न देता! पण कुठल्याश्या खेडेगावातली लेस्ली मॅकफर्लेन नावाची व्यक्ती आपल्या अत्यंत हलाखीच्या जीवनावरचा उतारा म्हणून या गोष्टी लिहीत होती. त्याबद्दलचा शोधनिबंध जेन वाइनगार्टन यांनी ऑगस्ट १९९८ साली मांडला. फारशी प्रसिद्धी नसतानाही पुस्तकं काढत राहणारे प्रकाशक, बालसाहित्यलेखकांची सार्वकालिक-सार्वत्रिक आर्थिक कुचंबणा इत्यादी गोष्टी या लेखातून समजल्या.
हा लेख वाचल्यानंतर, पुस्तकव्यवहाराची आर्थिक बाजू बघायची नजर तयार झाली. लक्ष्यात यायला लागलं, की मराठी पुस्तकांच्या निर्मितीचा सुवर्णकाळही फार थोडा होता. कोट्यवधींच्या संख्येने मराठी भाषक असूनही मुलांना पुस्तकाकडे आकर्षून घेण्यासाठी काही फारसे प्रयत्न होत नाहीत. ‘अबब! हत्ती’, ‘ठकठक’ यांसारखी मासिकं आर्थिक कारणावरून तगू शकली नाहीत. मोठ्या प्रमाणावर वाचकप्रेम लाभूनही ‘ठकठक’ दहाएक वर्षं नुकसानीत चालू होतं.
आपल्याकडच्या बालपुस्तकांच्या निर्मितीच्या आणखी एका पैलूवर ‘व्हिट्या मालेयव्ह घरीं आणि शाळेत’ या पुस्तकामुळे प्रकाश पडला.
पोटतिडीक आणि कळकळ असणार्‍या (किंवा खाज म्हणा) व्यक्ती कुणी सांगण्याआधी स्वत:च्या इच्छेनं परभाषिक पुस्तकांच्या आधारे किंवा स्वतःच्या कल्पनेतून बालपुुस्तकं काढत होती. त्यांंच्या खपाचं आणि नफ्याचं गणित कधीच जुळत नसल्यामुळे अर्थातच त्यांची निर्मितिमूल्यं, चित्रसंख्या साधारण होती. परदेशी पुस्तकांप्रमाणेच मुलांवर नीती, संस्कार, मूल्यं यांचा मारा करणारी ही पुस्तकं परदेशी पुस्तकांच्या तुलनेत दिसायला मात्र अगदीच गरीब होती. बहुतांश बड्या लेखकांनी आपल्या मुलांकरता, नातवंडांकरता लिहिलेल्या पुस्तकांचं स्वरूप हौशी होतं. त्यामुळे खास मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांची व्यावसायिकता त्या लेखकांनी कधी अंगी बाणवली नाही. १९८० ते ९०च्या  काळात स्वस्त कागदावर छापल्या जाणार्‍या ‘जादूची चटई’छाप पुस्तकांचं वितरण जबरदस्त होतं, तरीही त्यांच्या माध्यमातून वाढू शकणार्‍या वाचनसंस्कृतीला मर्यादा होत्या. वाचकांच्या मागणीअभावी त्याही पुस्तकांची छपाई-वितरण संपलं आणि ती कधीच वाचकांच्या विस्मृतीतही गेली.
‘सोव्हिएत लिटरेचर’ वाचणारे मुंबईस्थित शिक्षक, पुणेस्थित प्रकाशक आणि आर्थिक गणितं जुळवण्यासोबतच मणभर प्रोत्साहन देऊ करणारे मुख्याध्यापक अक्षीकर या सगळ्यांच्या हौसेचं आणि जागृतीचं अपत्य म्हणजे व्हिट्या मालेयव्ह. त्यावरच्या या लेखासाठीच्या शोधयात्रेत वि. ग. फाटक यांची माहिती हाती लागली. ते अभिनेते लिलाधर कांबळी यांचे शिक्षक. वि. ग. फाटक वाचनाविषयी, लिखाणाविषयी मुलांना प्रोत्साहित करायचे. ते विविध सार्वजनिक सण-समारंभांत राजकारण सोडून इतर विषयांवर व्याख्यानं देत. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी त्यांनी शाळेत विविध प्रयोग केले.
‘‘छबिलदासमध्ये वि. ग. फाटक मराठी शिकवायचे. ते शाळेच्या ‘अभ्युदय’ या नियतकालिकात अंकात विद्यार्थ्यांचे त्यांना आवडलेले निबंध प्रसिद्ध करायचे. माझे अनेक निबंध त्यांनी ‘अभ्युदय’मध्ये प्रसिद्ध केले आहेत. एवढेच नव्हे तर केशवसुतांच्या चरित्राचं निबंधवजा लिखाण त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं होतं. हे लिखाण इतके मोठे होते की, माझ्या जवळची शंभर पानांची वही भरली. त्या लिखाणाचा दर्जा एखाद्याा प्रबंधासारखा असल्याचे आमच्या शिक्षकांचे मत पडले. त्यांनी तो लेख ‘अभ्युदय’मध्ये प्रसिद्ध करून माझा जो सन्मान केला ते मी विसरणार नाही. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्याार्थी आणि शिक्षक नाटक बसवायचे. त्या स्नेहसंमेलनातील नाटके  हा माझ्या नाटयजीवनातला पहिला धडा होता.’’
१९५३ साली व्हिट्या मालेयव्ह या पुस्तकाच्या हजारेक प्रती छापल्या गेल्या असतील. त्या लोकांपर्यंत कितपत पोहोचल्या याबाबत काही माहिती नाही. कारण अनेक मराठी प्रकाशकांसह लेखकांनाही या पुस्तकाचा परिचय नाही.
व्हिट्या मालेयव्ह – मनात आणि बाहेर
हे पुस्तक अनुवादित झालं, तेव्हा देशभरातल्या तरुणांमध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचं प्रचंड वेड असल्याचं पुस्तकाच्या प्रस्तावनेतून जाणवतं.
‘‘एन नोसॉव्ह यांची ‘व्हिट्या मालेयव्ह-घरीं आणि शाळेंत’ ही दीर्घकथा सोव्हिएत युुनियनमधील शालेय विद्याार्थ्यांच्या जीवनावर लिहिलेली आहे.
‘‘रवींद्रनाथ टागोर सोव्हिएट युनियनला गेले होेते. त्या गोष्टीला आता बरीच वर्षे झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत सोव्हिएत जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. पण त्या काळीसुद्धा मुलांच्या जोपासनेविषयी सोव्हिएत युनियनमध्ये व्यक्त होणारी आत्यंतिक आस्था आणि अगत्य पाहून टागोरांचे कविहद््य हेलावले.
लेखक हे मानवी आत्म्याचे शिल्पकार होत’ असे स्टालीन यांनी म्हटले आहे. लहानपणीच मानवी मन अत्यंत संस्कारक्षम असते. शारीरिक जोपासनेबरोबर मानसिक जोपासनेचेही हेच वय असते. आत्म्याची जडण-घडण करायची तर या वयात बालमनावर योग्य संस्कार घडतील याविषयी दक्षता घेतली पाहिजे.’’
यातला रवींद्रनाथ टागोरांच्या सोव्हिएत युुनियनला जाण्याचा आणि सोव्हिएत रशियानी त्या काळापर्यंत प्रगती करण्याचा काही संबंध नाही. तरीही रवींद्र-साहित्यावर आपल्याकडे जो शब्दपूर आला होता, त्या काळाचा प्रभाव वि. ग. फाटकांच्या प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच दिसतो. पुढे ते म्हणतात –
‘‘सोव्हिएतमधील बालसाहित्य उच्च दर्जाचे असावे, त्याचा दर्जा टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी जास्तीत जास्त श्रम घेतले जावेत अशी अपेक्षा तेथील लेखकांकडून सोव्हिएत जनता करते. लहान मुलांना नवशिक्यांच्या प्रयोगाचा विषय बनविले जाऊ नये, अशी जागरूकता सोव्हिएत युनियनमध्ये घेतली जाते.’’ यातलं शेवटचं वाक्य गंमतीशीर यासाठी की नवप्रयोगी व्यक्तींना नवशिकं म्हणून हिणवण्यात आलं आहे, त्याच वेळी त्यांच्याबाबत सरकार सजग आहे, हेही सांगितलं आहे!
वि.ग फाटक मराठीमध्ये पोसलेल्या पिढीच्या बालसाहित्यवाचनाविषयी खूप चांगली माहितीही देतात.
‘‘आमच्या आजच्या पिढीपर्यंत – जिला आता जुनी पिढी म्हटली पाहिजे – गेल्या शंभर वर्षांतील शिक्षितांच्या सर्व पिढ्यांचा सांस्कृतिक पिंड इंग्रजी वाङ्मयीन संस्कारावर वाढलेला आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. चार्ल्स डिकन्सच्या ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’, ‘ऑलिव्हर ट्विस्ट’ इत्यादी कादंबर्‍यांचा या पिढ्यांना शालेय जीवनातच परिचय झाला होता. याच तर्‍हेचे वाड्मय मराठी भाषेतही लिहिले गेले आहे. ना. ह. आपट्यांची ‘सुखाचा मूलमंत्र’ ही कथा आणि साने गुरुजींचे ‘शामची आई’, ‘धडपडणारी मुले’ इत्यादी बाल जीवनाकडे लक्ष वेधणारे वाङ्मयही अलीकडे जुन्या पिढ्यांनी आपल्या विद्यार्थिदशेत वाचले आहे.’’
थोडे विषयांतर करून या काळातल्या एका गाजलेल्या आणि आता विस्मृतीत गेलेल्या मराठी नायकाची आठवण नोंदवतो. ‘व्हिट्या मालेयव्ह’च्या आधी येऊन १९६५ पूर्वी तीन आवृत्त्या संपलेलं ‘चंदू’ हे ते पुस्तक. या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये लेखक खानवेलकर यांनी रिचमल क्रॉम्प्टन या ब्रिटिश बालसाहित्यिकेच्या ‘जस्ट विल्यम्स’ मालिकेचा आपल्या पिढीतल्या लेखकांवर असलेला प्रभाव मान्य केला आहे.
माझ्या माहितीप्रमाणे चंदू आणि गोट्या हे मराठी मातीमधले नायक होते. पण खानवेलकर मात्र म्हणतात, ‘‘चन्दू मी तुमच्यासाठी लिहिला. तुम्हांला त्याचे पराक्रम वाचताना आनंद झाला, हे पाहून मला बरे वाटले. टीकाकारांसाठी मी चन्दू लिहिला नव्हता. कुणाला तो अतिप्रौढ वाटला, कुणी त्याला फाजील म्हणाले, कुणी त्याला परदेशी मानलं तर कुणाला ती अद्भुत कथा वाटली. तुम्हांला तो आवडला यातच सारे आले. ज्यांच्यासाठी मी त्याचे पराक्रम लिहिले आणि ज्यांना चन्दूला ‘चांगलं म्हणा’ असं मी कधी विनवलं नाही, त्यांच्या मताशी मला काय करायचंय?’’
खानवेलकरांच्या या काहीशा नाराज प्रतिक्रियेतून स्पष्ट होणार्‍या गोष्टी अशा, की तीन आवृत्त्या संपल्यानंतरही चंदूवर परदेशी असल्याची टीका होत होती. त्याचं जे मूळ, त्या विल्यम्स या नायकावरही अमेरिकी हकलबरी फिन, टॉम सॉयर यांचा प्रभाव होताच. म्हणजे चंदू, गोट्या, देनिस किंवा व्हिट्या मालेयव्ह हे जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी निपजलेले; तरीही नितिमूल्यपूर्ण नायक तयार करून त्यातून बालवाचकांची जडणघडण करण्याचा हेतू एकच होता. त्याबाबतीत ही सगळी पात्रं कधी एकमेकांचा प्रभाव नाकारत होती, कधी प्रभाव सरळसरळ मान्य करत होती.
काय आहे ‘व्हिट्या’मध्ये?
चौथीतील या विद्यार्थ्याची शाळा सुरू झाली आहे. पण शाळेचा कंटाळा करत तो नाईलाजाने शाळेत जाताना दिसतो. रॉबिन हूड, अरेबियन नाईट्स ही पुस्तकं वाचण्यात त्याची सुट्टी कशी झटकन निघून गेली, याचं दु:ख त्याला असतं. गणितात प्रगती करण्यासाठी आपण कोणतीही मेहनत न घेतल्याची खंतही त्याला शाळेच्या पहिल्याच दिवशी वाटते. सुट्टीत कुणी काय केलं या बाईंच्या प्रश्नांची जी उत्तरं मिळतात, त्यातून प्रत्येकाचा आर्थिक स्तर जाणवायला लागतो. फेड्या नावाच्या कुणा मुलाच्या पालकांना मॉस्कोमध्ये नोकरी मिळाल्यामुळे तो गाव सोडून गेलेला असतो. त्याच्या जागी शिशकीन नावाचा नवा मुलगा दाखल होतो. नाझींच्या सैन्याशी लढताना या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झालेला असतो. आपल्या आई नि मावशीसोबत तो व्हिट्याच्या गावामध्ये राहायला आलेला असतो. त्याच्याकडे अनेक पक्षी-प्राण्यांचा संग्रह असतो. व्हिट्या-शिशकिन मित्र होतात आणि अभ्यास सोडून अनेक करामती करतात. या करामती फारश्या धाडसी नसल्या तरीही त्यातून बोधप्रद संदेश देण्यात आलेला आहे. देशाचे नुकसान करता कामा नये. सर्व संपत्तीवर सार्वजनिक मालकी हक्क आहे. त्यामुळे शाळेतल्या भिंतीवर कुणी सुंदर चित्र काढलं, तरी ती राष्ट्रसंपत्तीची नासाडी होय, हे बिंबवणारा कथाभाग आहे. वर्गातला एखादा मुलगा अभ्यासामध्ये मंदगती असेल, तर इतर मुलांनी त्याच्या घरी जाऊन त्याचा अभ्यास घेणे, वाईट कृत्य करताना दिसला तर सार्वजनिकरीत्या त्याला समज देणे, असले प्रकार कथेमध्ये आहेत.
वि.ग. फाटकांनी प्रस्तावनेमध्येच या पुस्तकाचं अल्पपरीक्षणही केलं आहे.
‘‘सोव्हिएतमधील विद्यार्थिदशेचे चित्रण करणार्‍या या कथेत कारुण्याचा मागमूसही नाही. डिकन्स अगर आपटे-साने गुरुजी यांच्या साहित्यात व या कथेत हा ठळकपणे ध्यानात घेण्यासारखा फरक आहे. वाङ्मयात स्पष्टपणे वा अस्पष्टपणे, प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे, सरळपणे किंवा विकृत रीतीने प्रचलित समाजजीवनाचे प्रतिबिंब दिसते. सोव्हिएत वाङ्मयात कारुण्यभाव अभावानेच आढळतो. यामागील कारणांचा मागोवा सोव्हिएत युनियनमधील समाजजीवनातच घेतला पाहिजे. तेथे सामाजिक विषमता व वर्गभेद पूर्णपणे नष्ट झाले आहेत. आपल्याकडील जीवनात काठोकाठ भरलेली अनिश्चितता सोव्हिएत युनियनमध्ये औषधालाही उरलेली नाही. सोव्हिएत युनियनमधील योजनाबद्ध अर्थव्यवस्थेत समाजाच्या प्रत्येकाला जीविताची व आत्मविश्वासाची शाश्वाती आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जिवाला स्थैर्य आहे. जेथे मानखंडनेची धास्ती नाही.”
स्वातंत्र्योत्तर कालपटलावर आपल्याकडे जो नैराश्यवाद आणि अनिश्चितता आली होती आणि नवकथाकारांची पिढी तथाकथित धारदार-वास्तव अनुभवांचं साहित्यातून चित्रण करत होती, त्या काळामध्ये लिहिलेली ही प्रस्तावना आहे. त्यात सोव्हिएत युनियनमधल्या समाजवादाची सुंदर चित्रं रंगवून सांगितली जात होती. आपल्याकडच्या या काळातल्या हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये आणि नवकथाकारांच्या कथांमध्येही बेरोजगारी, गरिबी ही प्रमुख समस्या दिसते. या पार्श्वभूमीवर सोव्हिएत संघाची पुस्तकं कोणत्या प्रकारचे विचार पसरवत होती, त्याचा नमुना ‘व्हिट्या मालेयव्ह’च्या प्रस्तावनेमध्ये दिसतो.
पुढे वि. ग. फाटक प्रश्न विचारतात आणि उत्तरही देऊन टाकतात.
‘‘सोव्हिएत वाङ्मय प्रचारकी असते काय? अनुवाद केलेली ही कथा प्रचार आहे काय? सोव्हिएत साहित्य जाहीरपणे आणि जाणूनबुजून पक्षपाती आहे. सत्याचा आणि मानवी प्रगतीचा कैवार हे सोव्हिएत वाङ्मयाचे ब्रीद आहे. समाजप्रगतीला अडथळा करणार्‍या शक्तींवर निकराचा हल्ला आणि समाजाला नवचैतन्य देणार्‍या समाजशक्तीचा पुरस्कार व त्यांच्या प्रयत्नांचे प्रकर्षाने व उन्नतपणे चित्रण ही सोव्हिएत वाङ्मयाची सूत्रे आहेत. आपले वाङ्मय सत्याचा व मानवी प्रगतीचा कैवार घेणारे असले पाहिजे, याबद्दल सोव्हिएत जनमत आग्रही आहे. सोव्हिएत साहित्याच्या या पक्षपाती बैठकीला कुणी प्रचारकी म्हणणार असेल, तर त्याबद्दल मी एवढेच म्हणेन की, सत्यासारखा अत्यंत प्रभावी प्रचारक दुसरा नाही.”
तर या प्रचारकी कथेमध्ये सत्याच्या वाटेने जाताना व्हिट्याच्या वाटेत अनेक काटे येतात. गणितामध्ये प्रगती करण्यासाठी तो खूप धडपडतो. या पुस्तकात काही गणितंही आहेत.
‘‘एक मुलगा आणि एक मुलगी जांभळे पाडायला गेली. त्यांनी एकंदर १२० जांभळे पाडली, मुलाच्या निम्मी मुलीने पाडली, प्रत्येकाने किती जांभळे पाडली?’’ हे उदाहरणही चित्रासह पुस्तकात आहे. हे गणित व्हिट्या सोडवितो आणि त्याच्यात आत्मविश्वास येतो.
पुढे शिशकीनला उपदेश करताना मुख्याध्यापक सांगतात, ‘‘प्रत्येकाने आपापले काम प्रामाणिकपणे व सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून केले पाहिजे. विद्यार्थ्यांचे काम शिकणे. मोठी माणसे गिरण्या-गोद्यांत कामे करतात, धरणे बांधतात, सामुदायिक शेती करतात. जंगलेसुद्धा पाण्याखाली आणून सुपीक बनवतात. मोठेपणी आपण आपल्या देशासाठी व समाजासाठी उपयोगी पडावे म्हणून मुले शाळेत जाऊन शिक्षण घेतात. तुला आपल्या समाजासाठी उपयोगी पडायचे नाही का?’’
बालसाहित्यातून समाजपयोगी पिढी घडवण्याची ‘साहित्यिक-फॅक्टरी’च रशियामध्ये तयार होत होती. या पुस्तकांचा ज्या ज्या भाषांत अनुवाद झाला, त्या त्या भाषांत हे विचार तेव्हा पोहोचले असणार.
तरी आज असं दिसतं, की व्हिट्या मालेयव्हसारखी पुस्तकं विस्मृतीत गेली आहेत. काही महिन्यांपूर्वी जुन्या रशियन पुस्तकांचे अनुवाद लोकवाङ्मयगृह प्रकाशनाने पुन्हा प्रकाशित केले. त्यात व्हिट्या मालेयव्ह नव्हता.
व्हिट्या मालेयव्ह हे रशियनमधून मराठीत अनुवादित झालेल्या पुस्तकांपैकी उत्तम पुस्तक आहे. पण तो आपल्याकडे तितका लोकप्रिय झाला नाही. त्याची कारणं त्याच्या सुमार निर्मितिमूल्यांमध्ये असतील का? निव्वळ हौसेखातर तयार झालेल्या या पुस्तकात मूळ चित्रांचंही भारतीयीकरण केलेलं आहे. भय्यासाहेब ओंकार यांनी काढलेली मूळ चित्रं चांगली असावीत, पण पुस्तकातल्या ढिसाळ छपाईमुळे त्यांना न्याय मिळाला आहे की नाही ते कळत नाही.ती छापल्यानंतर  आहेत. याच पुस्तकाच्या रशियन आवृत्तीमधली रंगीत चित्रं मात्र नजरेत भरतात. या फरकामागे आर्थिक कारणं असतील का? व्हिट्या मालेयव्हच कशाला, खुद्द मराठी भाषेतलीही कितीतरी चांगली बालपुस्तकं अस्तंगत झाली आहेत. ती कशामुळे? आर्थिक पाठबळ नसल्यामुळे का?
व्हिट्या मालेयव्हचा निसटलेला दुवा सापडल्यानंतर असे काही प्रश्न पडतात. चांगल्या बालसाहित्याच्या निर्मितीबद्दल आज आपण निष्क्रिय आहोत. साने गुरुजींची बाल-बोधप्रद साहित्यसंपदा, ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ची काही पुस्तकं आणि माधुरी पुरंदरेंची लोकप्रिय पुस्तकं यांपलीकडे काहीही प्रयोग होताना दिसत नाहीत. कालसुसंगत नायक-नायिका गायब आहेत. गोट्या, फाफे आणि नंतर एकदम बोक्या सातबंडे अशी आपल्याकडच्या बालनायकांची तुटपुंजी परंपरा आहे. अशा परिस्थितीत एका पुस्तकाची प्रचारक्षमता ओळखून असणार्‍या, त्यामागे आपलं आर्थिक-राजकीय बळ उभं करणार्‍या आणि त्यातून व्हिट्याला जगभर पोचवणार्‍या रशियन लोकांची कमाल वाटते.
वेळीच जागं होऊन, यातून काही शिकून आपल्याला आपल्या बालवाङ्मयाच्या परिस्थितीत काही बदल करता येणार नाही का?
– पंकज भोसले
pankaj.bhosale@gmail.com
***
तळटीप : ‘व्हिट्या मालेयव्ह’सारखी आणखी बरीच पुस्तकं कालौघात नाहीशी झाली. कुणाकडे अशा प्रकारची, रशिया किंवा इतर देशांच्या भाषांतून अनुवादित झालेली उत्तम पुस्तकं असल्यास जरूर संपर्क करावा.
जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्याचे चित्र : आंतरजाल
इतर चित्रस्रोत : पंकज भोसले
Facebook Comments

4 thoughts on “एका पुस्तकाच्या निमित्ताने…”

  1. सुरेख लेख. 👌👌👍👍
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
    लहानपणी अनुवादित रशियन पुस्तकं बरीच वाचली होती, त्याची आठवण झाली 😊

  2. उत्कृष्ट लेख, पंकज! हा ’आत्मजाणिवा विस्तारण्याचा प्रकार’ थेट भिडला. एका पुस्तकाच्या निमित्तानं इतक्या वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत पुन:पुन्हा मराठी बालसाहित्याबद्दलच्या आस्था-अनास्थेची सम गाठलीत..लेखातला आशय महत्वाचा आहेच, आणि मांडणी तर मुद्दाम अभ्यासावी अशी!जीन वाइनगार्टनच्या पत्रकारितेची ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार.
    “बालसाहित्याबाबत अज्ञान आणि अनास्थाच इतकी आहे, की आपल्या मुलांच्या जडणघडणीत अमुक पुस्तकाने अडथळा येतो, असं कुणी बोलल्याचं आठवत नाही. ” >> एकदम मार्मिक! (मात्र, ’चंदू’ला फाजील म्हणताना काही टीकाकारांचा तसा रोख असावा. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *