बालसाहित्यांक २०१७ लेख

देनिसची गोष्ट

शाळेचं वर्ष संपल्यानंतरची मे महिन्याची सुट्टी मला खूप आवडायची. बाबा दर सुट्टीत नेहमीच नवीन गोष्टींची पुस्तकं आणायचा. गरम, उबदार दुपारी आजीच्या घरातल्या छोट्या बाजेवर उपडं पडून वाटीतला चिवडा जिभेने खात, वाचत, लोळत पडायचं.
अशाच एका सुट्टीत बाबाने ‘देनिसच्या गोष्टी’ आणलं. का कोणास ठाऊक, पण बराच काळ मी न वाचता ते तसंच ठेवून दिलं. मग कधीतरी वाचलंही. खरं सांगायचं तर तेव्हा मला कळलंच नाही, की मला ते कित्ती आवडलंय. माझ्याही नकळत कित्तीतरी गोष्टींमधली मज्जा मी देनिसमुळे किंवा देनिससोबत अनुभवली.
कोणा एका रशियन लेखकाने लिहिलेलं पुस्तक मराठीत भाषांतरित व्हावं आणि माझ्या बाबाने ते आणून मला वाचायला द्यावं आणि ह्यात मुख्य म्हणजे मी त्या कालखंडात जन्माला आलेलं असावं हे सगळं कसलं ‘लय भारी’ जमून आलंय हे फक्त माझ्यासारख्या देनिसवेड्यांनाच कळू शकेल!
काही वस्तू आपल्याला त्यांच्या विशिष्ट जागेसकट लक्ष्यात राहतात. तुमच्यासाठी त्यांची जागासुद्धा त्यांच्या अस्तित्वाचा एक भागच असतो. तसंच माझ्या पुस्तकांच्या कपाटातलं, वरच्या खणात ठेवलेलं ‘देनिस’, माझ्याकरता कायमचं तसंच लक्ष्यात राहिलं. कोणालातरी वाचायला दिलेलं ते पुस्तक मला परत मिळालंच नाही. मी जगदुनिया शोधली… माझा जीव अक्षरशः कासावीस झाला. ते माझं पुस्तक होतं; माझ्यापुरतं ते आख्ख्या जगात माझ्या एकटीचंच होतं. त्याची प्रत बाजारात उपलब्ध नाही हे कळल्यावर तर मला फारच दुःख झालं. देनिसच्या भाषेत म्हणायचं तर ‘मी प्रचंड दुःखी बनले.’*
माझ्या एका मैत्रिणीने पुस्तकाची लिंक दिली. त्यानंतर ऊर्जा नावाच्या एका प्रकाशनाने त्याचं नवीन भाषांतरही बाजारात आणलं, पण मला ते पुरलं नाही. कारण त्यातल्या गोष्टींइतकंच ते कागदाचं पुस्तकही माझं तितकंच लाडकं होतं. आतून-बाहेरून-आख्खंच्या आख्खं आवडतं मला ‘देनिस’. त्याचं ते जाड पुठ्ठ्याचं पिवळंधम्मक कव्हर, त्यावरचा सोंडेत फुगे घेऊन मज्जेत चालणारा हत्ती, त्याच्या पाठीवर बसून हात दाखवणारा देेनिस, कोपऱ्यात लिहिलेलं पुस्तकाचं नाव, पिवळसर झाक असलेली जाडसर पानं, मधे-मधे पानभर काढलेल्या रंगीत चित्रांतून जिवंत होणारे प्रसंग, आणि आख्ख्या पुस्तकभर हुंदडणारा आठ-दहा वर्षांचा, उत्सुक डोळ्यांचा, भावुक, विचारी, हडकुळा देनिस. नुसतं इतकंच नाही, तर त्या पुस्तकाचा वास, स्पर्श – आणि अतिशयोक्ती वाटेल कदाचित – पण वाचताना मनात ऐकलेला आवाजही…
ऑनलाईन वाचताना ही सगळी गंमत येत नाही. नुसती आशयाची तहान भागते, पण बाकी समाधान होत नाही! ऊर्जा प्रकाशनाने काढलेलं पुस्तक म्हणजे तर मूळ पुस्तकाचा अपमानच आहे… दोन भागांत विभागलेलं  ते पुस्तक मला अजिबातच आवडलं नाही. पुस्तकातली चित्रं, मुखपृष्ठ, संपूर्ण मांडणी अशा सगळ्याच गोष्टी पाहून माझा पारच विरस झाला.  जुनं पुस्तक पुनःप्रकाशित करताना त्याच्या गाभ्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असतं… कदाचित त्यांना ‘देनिस’ नीट समजलंच नसेल!
लहानपणी देनिससोबत खूप मज्जा केली मी. सर्कशीत काम करणाऱ्या मुलाने स्वतः बसायच्या जागी देनिसला बसवलं आणि सर्कशीतला मुलगा समजून करंदाश विदुषकाने त्याला बकोटीत पकडून हवेत उंच गिरक्या घ्यायला सुरुवात केली, तेव्हा देनिसच्या हातातली कागदी पिशवी फाटून त्यातले टोमॅटो बॉम्बगोळ्यासारखे तंबूभर पडू लागले हे वाचतानाचा अनुभव ‘मी तिथेच तर होते की’ असं वाटण्याइतका जिवंत आहे.
किंवा सिंगापूरचा काका घोरत पडलेला असताना त्याला कुत्रा समजून त्याच्या अंगावर अंडी आणि कटलेटं फेकून त्याला शांत करायचा प्रयत्न करणाऱ्या देनिसने मला दर वेळी तितकंच हसवलंय. अनेकदा वाचल्यानंतरही त्यातली गंमत कमी झालेली नाही.
देनिसने आईचं बोलणं ऐकून तिला विचारलं, “रहस्याला वाचा फुटते म्हणजे काय?” तेव्हा तिने सांगितलं,  “माणूस प्रामाणिक वागला नाही, तर त्याचा खोटेपणा कुणालातरी समजतोच आणि मग त्याला स्वतःच्या वागणायची लाज वाटते आणि त्याला शिक्षा भोगावी लागते.” याचा अर्थ देनिसला चांगलाच कळला. खूप प्रयत्न करूनही चांगली न लागणारी कांजी देनिसने आईला कळू नये म्हणून हळूच रस्त्यावर ओतून टाकली. पण ती नेमकी एका माणसावर पडली. आणि त्या माणसाला घेऊन एक पोलीस देनिसच्या दारात हजर झाला. रहस्याला वाचा फुटते म्हणजे नेमकं काय हा देनिसचा अनुभव मलाही शहाणं करायला पुरेसा होता!
मातीच्या रस्त्यावरून अनवाणी चालताना होणाऱ्या, पायांना हव्याहव्याशा वाटणार्‍या गुदगुल्या मी देनिसचा हात धरूनच अनुवभवल्या.
‘पाडस’ वाचताना देनिसच्या कांचील हरणाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.
मला कांजिण्या झाल्या, तेव्हा प्रत्येक कांजिणीला हिरवं औषध माखून मला चित्यासारखं दिसायचंय असा हट्टही मी केला…
देनिस मला अधिक जवळचा वाटला तो त्याच्या संवेदनशील स्वभावामुळे. एका संध्याकाळी देनिस आईची वाट बघत घराच्या आवारात बसला होता. आईला यायला खूप उशीर झाला होता. एवढ्यात देनिसचा मित्र मिष्का तिथे आला. त्या वेळी देनिसने त्याची बक्षीस मिळालेली नवी कोरी मालमोटार मिष्काला देऊन बदल्यात मिष्काचा काडेपेटीत ठेवलेला काजवा घेतला. आई आल्यावर तिने विचारलं  “तू असं का केलंस?” तेव्हा देनिस म्हणाला “तुला एवढं कसं समजत नाही? तो जिवंत आहे! आणि चमकतोय!”
खरंच, त्या एकट्या संध्याकाळी जिवंत चमकणारा काजवा हीच सगळ्यात सुंदर गोष्ट असू शकते. नाही?
देनिसच्या प्रत्येक गोष्टीत माणूसपण जपलंय आणि ते उगाच ओढूनताणून नाही, तर अगदी सहज, नकळत. आपण बोधपर गोष्टी सांगत आहोत असा कोणताही आव न आणता केलेलं या प्रकारचं लेखन बालसाहित्यात सापडणं विरळाच. ‘स्वतंत्र गोर्बुर्श्का’ या गोष्टीमधल्या तोतरं  बोलणाऱ्या गोर्बुर्श्काला देनिसच्या अख्ख्या वर्गाने किती सहज सामावून घेतलं. किंवा वेशभूषा स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळण्यासाठी मिष्काने मदत केली, म्हणून देनिसने त्याच्या बक्षिसातलं मिष्काचं आवडतं पुस्तक आनंदाने त्याला देऊन टाकलं. गॅसचा हातात धरलेला फुगा उडून जायला मागतोय असं वाटून देनिसने  फुग्याचा दोरा सोडून दिला. त्याला नक्की काय वाटत होतं हे लहान असलेल्या आल्योन्काला कसं  समजवावं असा विचार करत असतानाच आल्योन्काने त्याला सांगितलं, “जर माझ्याजवळ आणखी पैसे असते, तर मी आणखी एक फुगा घेतला असता तुला उडवायला देण्यासाठी!”
असे कित्येक छोटे-छोटे प्रसंग पुस्तकात आहेत. जे खरं म्हटलं तर माणसाच्या नैसर्गिक संवेदनशीलतेचा भाग आहेत, पण तरीही मोठं होण्याच्या प्रक्रियेत हरवत गेले आहेत.
नुसतं इतकंच नाही.  देनिस माझ्याबरोबर मोठाही झाला.
लहान मुुलांसाठी लिहिलेली पुस्तकं मुलांसोबत मोठी होणं ही फारच दुर्मीळ बाब आहे. पण या प्रांतात देनिससोबत नाव घेण्यासारखं दुसरं कोणतंही बालसाहित्यातलं पुस्तक मला आत्तातरी आठवत नाही.
लहानपणी वाचलेला देनिस माझ्याएवढाच होता. त्याच्या लहानपणीच्या गमती मला मजेशीर वाटत होत्या. पण मोठं झाल्यावर परत वाचताना निराळं काय-काय दिसलं.
कलिंगडाच्या गोष्टीतला बाबा नुसतं अन्नाला नावं ठेवू नये असं सांगत नसून, तो युद्धकालीन परिस्थितीवर किती सहज आणि तरीही किती परखड भाष्य करतोय याची जाणीव झाली.
शाळेतल्या प्राणिसंग्रहालयासाठी प्राणी आणायला गेलेल्या देनिसला पांढरे उंदीर हवे होते, पण त्याचा नंबर येईपर्यंत उंदीर संपले. तेव्हा देनिस रागावून दुकानदाराला म्हणाला, “उंदरासारख्या अत्यंत आवश्यक वस्तूंचा पुरवठा तुम्ही फार वाईट रीतीनं करता!” यातली कम्युनिस्ट पार्श्वभूमी, त्या राजवटीत लोकांना भासलेली जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, मला फारच नंतर जाणवली.
संपूर्ण पुस्तकातल्या बाया आणि पुरुष यांच्यात समता आहे. त्यांची कामं, त्यांचं महत्त्व यात भेद नाही. हा समतेचा पैलूदेखील मला फार उशिरा जाणवला. अर्थात हे पुस्तक रशियन साम्यवादी पार्श्वभूमीत जन्माला आलं म्हणून ही समता अधिक सहजपणे उतरली असेलही; पण कैक वर्षं लोकशाहीत राहून, समतेच्या मोठमोठ्या वार्ता करूनही आपल्या साहित्यात, विशेषतः बालसाहित्यात, ही स्त्रीपुरुष समता अजूनही का बरं दिसत नाही?
एवढं ‘देनिस-देनिस’ करतेस, तर काहीतरी लिही त्यावर असं एका मित्राने सांगितलं. त्याने त्याची प्रतही मला देऊन टाकली.  मीही उत्साहाने ‘हो’ म्हटलं खरं, पण लिहिताना काही सुचेचना. शेवटी परत देनिस वाचायलाच घेतलं. आणि वाचता वाचता एकदम लक्ष्यात आलं, की आता जर लिहिलं नाही तर आपण मार्या पेत्रोवना ठरू.

देनिसला नेहमी काहीतरी वचन देऊन ते न पाळणारी ही थापाडी बाई – मार्या पेत्रोवना
आपल्या खूप जवळच्या, खूप लाडक्या माणसाबद्दल बोलणं किंवा लिहिणं जितकं कठीण असतं ना, तितकंच मला देनिसबद्दल लिहिणं कठीण होतं. मी लिहिल्यामुळे त्यातली गंमत कमी होईल किंवा मी नीट न लिहिल्यामुळे समोरच्याला ते कळणार नाही आणि त्याचं देनिसबद्दलचं मत तितकंसं चांगलं होणार नाही असं बरंच काही मला वाटत होतं.
शेवटी पुन्हा देनिस वाचताना पटलं; खरंतर देनिसची मज्जा लेख वाचून नाही, तर पुस्तक वाचून येते आणि ती ज्याची-त्याची स्वतंत्र असते. ज्यांनी ‘देनिस’ वाचलं नाही, त्यांना हे कळणारच नाही आणि ज्यांनी ते वाचलंय त्यांना सांगायची गरज नाही! कारण देनिस प्रत्येकासाठी त्याचा-त्याचा स्वतंत्र असतो. देनिस वाचताना आपणच थोडे थोडे देनिस असतो!
द्रागून्स्की आणि हवालदार काकांना माझा सलाम!
– स्नेहल नागोरी
snehalnagori@gmail.com
***
*’देनिस’चं भाषांतर तसं व्याकरणाच्या पातळीवर मराठी रचनेला धरून नाही. दूर देशातल्या एका मुलाची गोष्ट आपण वाचत आहोत याचं भान अशा भाषेमुळे सतत राहतं. पण त्या भाषांतरात एक गोडवा आहे, लहान मुलांचा सूर आहे; ज्यामुळे देनिस तितकाच जवळचाही वाटतो.
चित्रस्रोत : देनिसच्या गोष्टी, रादुगा प्रकाशन
Facebook Comments

3 thoughts on “देनिसची गोष्ट”

 1. बालिश लेख आहे. ऊर्जा प्रकाशनाने काढलेल्या देनिसच्या पुस्तकांविषयी लेखिकेला आक्षेप आहे, हे समजले. परंतु, आक्षेपांचे किमान विश्लेषणही केलेले नाही. आपल्या आधीच्या पुस्तकाशी जुळणारे पुनःप्रकाशन नाही, एवढाच निकष असेल, तर काय बोलावे! परंतु इतरांचे प्रयत्नही प्रामाणिक असतील, याची बूज ठेवणे गरजेचे असते. असो. आपल्या लोकशाहीमध्ये इतकी वर्षे जाऊनही स्त्री-पुरुष समानता का नाही? ती बालसाहित्यात का नाही? हे प्रश्नही असेच वरवरचे आहेत. समानता हवीच, परंतु ती का नाही, याचे स्पष्टीकरण साम्यवादी – लोकशाही अशा स्वरूपांमधे शोधणे हास्यास्पद आहे. असो.

 2. This message is posted here using XRumer + XEvil 4.0

  XEvil 4.0 is a revolutionary application that can break almost any anti-bot captcha.
  Captcha Bypass Google (ReCaptcha-1, ReCaptcha-2), Facebook, BING, Hotmail, Yahoo,
  Yandex, VKontakte, Captcha Com – and over 8400 other types!

  You read this – it means it works! 😉
  Details on the official website of XEvil, there is a free demo version.

  Check YouTube video “XEvil ReCaptcha2”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *