बालसाहित्यांक २०१७ लेख

सातासमुद्रापारची पुस्तकावळ

इंग्रजी बालसाहित्य, मराठी बालसाहित्य आणि भा. रा. भागवत यांची तुलना करणारा आणि ते करताना अनेक अतिशय इंट्रेस्टिंग संदर्भ पुरवणारा हा लेख. या अंकाच्या विषयासंदर्भात महत्त्वाचा वाटणारा. म्हणून तो लेख पुनर्प्रकाशित करतो आहोत. 

***

मैत्रेयी माझी लेक. वय वर्षं ७. माझा बालवाङ्मयातला रस वाढत गेला, तो खरं तर तिच्याचमुळे.
मैत्रेयीला वाचायला जाम आवडतं. पण तिच्या वाचनाची सुरुवात माझ्यासारखी मराठी पुस्तकांपासून झालेली नाही. कल्पनेचं समृद्ध विश्व तिच्यासाठी उघडलं, ते इंग्रजी पुस्तकांच्या माध्यमातून. डॉ. सूस, एरिक कार्ल, आरनॉल्ड लोबेल, मॉरीस सेंडॅक अशा लेखक – रेखाटनकारांनी तिला गोष्टींची गंमत उलगडून दाखवायला सुरुवात केली. ‘डिज्नी’, ‘पिक्सार’ यांच्या लाडक्या कथानायकांच्या कहाण्यांबरोबरच तिने मुलांचं अभिजात वाङ्मय (टॉम सॉयर, हकल्बरी फिन, ट्रेजर आयलंड), वाचायला सुरुवात केली. ‘न्यूबरी अॅन्ड कॅल्डेकॉट मेडल‘ विजेती पुस्तकं वाचली. तर इतर भाषांमधून इंग्रजीत आलेली पुस्तकंही वाचली. अर्कादी गैदारचं ‘चुक अॅन्ड गेक’, चिनुआ अचेबेचं ‘चिके अॅण्ड दी रिव्हर’, केन्जी मियाझावाचं ‘नाइट ऑन दी गॅलेक्टिक रेलरोड’ ही काही उदाहरणं. तिला मराठी पुस्तकं आवडतात, पण ती तिला कुणीतरी वाचून दाखवायला लागतात. तीही एकदा ऐकून तिचं समाधान होत नाही. काही आवडत्या गोष्टी आणि पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून दाखवावी लागतात. तिचं एकूण वाचन पाहिलंत, तर तिच्या वयाच्या मुलांपेक्षा खूपच जास्त आहे. वयाच्या मानानं थोडं वरच्या पातळीवरचंही. ती ‘ट्वाइस एक्सेप्शनल’ (2(e)) मुलगी आहे. म्हणजे 2SD पेक्षा जास्त बुद्ध्यांक असलेली ‘गिफ्टेड चाइल्ड’. तिच्या शाळेच्या ‘स्कूल डिस्ट्रिक्ट’मधल्या ३००० मुलांमध्ये ती पहिली आली होती. त्यामुळे तिची आकलनशक्ती तिच्या वयाच्या मानानं जास्त आहेच. पण लेकीचं कौतुक पुरे.
सांगायचा मुद्दा असा की तिच्या प्रचंड वाचनाचं निेमित्त झालं आणि मी या विषयाकडे अजूनच जिव्हाळ्यानं ओढली गेले. अहं, अभ्यासकबिभ्यासक नाही मी. तुमच्याआमच्यासारखीच एक पुस्तकप्रेमी मराठी व्यक्ती आहे. आता बालवाङ्मयाबद्दल हे जे काही बोलणार आहे, त्याला मुख्य आधार आहे तो माझ्या नि माझ्या लेकीच्या वाचनानुभवाचा. माझ्या नि तिच्या आवडीनिवडी, आमची पुस्तकांची हौस, भाषेबद्दलची ओढ, इथे उपलब्ध असणारं लहान मुलांच्या पुस्तकांचं समृद्ध आणि अद्ययावत विश्व, निरनिराळ्या प्रकारच्या पुस्तकांतून अधिकाधिक प्रकारचे अनुभव लेकीपर्यंत आणून देण्याचा माझा प्रयत्न… या सगळ्याची मर्यादा माझ्या प्रकटनाला असणार आहे. आमचं वाचन काही सर्वव्यापी नव्हे. आमच्या वाचनात न आलेल्या अनेक गोष्टी असणारच, हे ध्यानात असू द्या. त्या अर्थानं हा मराठी – किंवा कोणत्याच – बालवाङ्मयाचा सर्वंकष लेखाजोखा नव्हे. आमच्या चश्म्यातून दिसलेला एक अनुभव, इतकंच.
सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातल्या मुलींसारखीच मीही. भा. रा. भागवत हा माझ्या पुस्तकप्रेमातला सुरुवातीचा आणि महत्त्वाचा टप्पा होता. पण त्या पुस्तकांच्या बरोबरीनं मी इतरही पुस्तकं खूप वाचत असे. शकुंतला परांजपे यांच्या ‘देशोदेशीच्या गोष्टी’, शामला शिरोळकरांची पुस्तकं, इंदिरा देशपांडेंचं ‘नागमणी’, मराठीत अनुवादित झालेलं – मुख्यत्वे अनिल हवालदारांनी केलेलं – रशियन बालसाहित्य , झालंच तर सई परांजपेंचं ‘हरवलेल्या खेळण्यांचे राज्य’ अशा अनेक पुस्तकांचा माझ्यावर कायमचा ठसा आहे. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या सुस्थित चुलतभावंडांमुळे मला इंग्रजी बालवाङ्मयाचं जगही तसं लवकरच खुलं झालं होतं. शाळा संपत येते त्या टप्प्यावर ‘हार्डी बॉईज’, ‘नॅन्सी ड्र्यू’ वगैरे प्रकरणं मला फारशी परकी नव्हती.
त्यांकडे पुन्हा वळणं झालं, ते मैत्रेयीच्या निमित्तानं. तिच्यासाठी मी हौसेनं पुस्तकं हुडकायला लागले नि ‘आपल्या’ नि ‘त्यांच्या’ पुस्तकांच्या जगातले कितीतरी फरक लख्ख दिसायला लागले. ते मांडताना इंग्रजीसारख्या जागतिक भाषेत प्रकाशित होणाऱ्या बालवाङ्मयाची तुलना भारांसारख्या एकांड्या शिलेदाराच्या लेखनाशी करायची म्हणजे भारांवर तसा अन्यायच आहे, हे मला पटतंय. मराठी बालवाङ्मय म्हटलं की भारांचं नाव येतंच – कित्येकदा फक्त भारांचंच नाव येतं. लोकप्रियता, पुस्तकसंख्या, कालौघात टिकून राहिलेली त्यांची पुस्तकं हे सगळं पाहता ते मराठी मुलांच्या विश्वातले अनभिषिक्त सम्राट आहेत असंच म्हणायला हवं. देशोदेशींच्या वाङ्मयाकडे डोळस नजर ठेवून मराठी मुलांच्या विश्वात मोठीच भर घातल्याचं श्रेयही त्यांच्या खात्यावर जमा आहे. त्यांच्या साहित्याच्या रोखानं आपल्या भाषेतलं बालवाङ्मय तपासून बघण्याचा हा उपद्व्याप त्यांनाही आवडलाच असता. म्हणून हा छोटा प्रयत्न.
तर – मुख्य फरक मला जाणवतो, तो कथाकथनाच्या शैलीतला.
भारांचा फास्टर फेणे मैत्रेयीलाही खूप आवडतो. पण मजा म्हणजे मला फाफे निराळ्या कारणांसाठी आवडत असे. फाफे हा माझ्या दृष्टीनं एखाद्या सुपरहिरोसारखा होता. तो कायम कोणत्या ना कोणत्या संकटात जाऊन अडकायचा, पण त्याच्याकडे त्या संकटातून सुटायची काही ना क्लृप्ती असायचीच. एखाद्या ‘लार्जर दॅन लाईफ’ व्यक्तिरेखेसारखा होता फाफे. त्याचं हे सुपरहिरो असणं मला प्रचंड आवडायचं. पण मैत्रेयीला तसं वाटत नसावं. सुरुवातीचा थोडा भाग ऐकल्यानंतर पुढे काय होणार, हे तिला लगेच ओळखता येतं. तिच्यासाठी त्यात प्रचंड थरारक, अनपेक्षित असं काही नसतंच. तिला खरी आवडते ती भारांशी शैली. काय सहज यमक जुळवतात, शब्दातल्या एखाद्या अक्षराची फिरवाफिरव करून काहीतरी गंमत आणतात, मुलांना आवडतीलसे गंमतीदार नवेच शब्द वापरतात! उदाहरणार्थ, ‘ढोंगधत्तुरा’. हा भारांनी ‘मायापुरचे रंगेल राक्षस’मध्ये वापरलेला शब्द तर तिनं इतका एन्जॉय केला, की बस! त्याचा अर्थ कळल्यावर तर झालंच. बाईसाहेबांनी धाकट्या भावाला चिडवायला म्हणून तत्काळ त्याचा वापर सुरू केला! भारांनी शब्दांशी केलेली ही असली गंमत तिला मनापासून आवडते. बाकी गोष्टीतली वळणं, त्यातले उपदेशाचे वळसे, अपेक्षित रहस्यस्फोट… या सगळ्यांत ती अजिबात गुंतत नाही. तिथे ‘सिक्रेट सेव्हन सोसायटीज्’, ‘बॉक्सकार चिल्ड्रन’, ‘एन्साय्क्लोपीडिया ब्राउन सीरिज’, ‘नॅन्सी ड्र्यू’ वा ‘पर्सी जॅक्सन’ यांसारख्या पुस्तक-मालिकांमुळे परिपक्व झालेल्या तिच्या बुद्धीला जे हवं असतं, त्यापुढे भारा फिके पडत असावेत. रॉल्फ हाइनमानच्या किंवा मार्टीन हॅन्फर्डच्या ‘व्हेअर इज वॉल्डो‘सारख्या पुस्तकातून तर फक्त चित्रांमधून रहस्याची उकल, असा अफलातून प्रकार असतो.
लाल-निळ्या पोशाखातला चश्मेवाला वॉल्डो चित्रात शोधा:
अकबर-बिरबल, इसापनीती, सिंहासन बत्तिशी आणि परीकथा या सूत्रबद्ध विश्वात मुलांना जे मिळत नव्हतं, ते भारांनी यशस्वीपणे दिलं हे खरंच आहे. मोठ्यांच्या साहित्याला समांतर असलेला एक हक्काचा कोपरा त्यांनी कुमारवयीन मुलांसाठी तयार करून दिला. तिथे रहस्यं होती, पाठलाग होते, विनोद होता, वेगवान घटनाक्रम होते… त्याबद्दलचं त्यांचं श्रेय वादातीत आहे. पण हे सगळं आजच्या पिढीच्या मानानं आता काहीसंं संथ, प्रेडिक्टेबल आणि उपदेशपर झालेलं आहे, हेही आहेच.
मला प्रकर्षानं जाणवणारी दुसरी गोष्ट म्हणजे मराठी पुस्तकांत तर्काधारित गंमतीचा भाग फारच कमी आहे. भारांनीच भाषांतरित केलेला एक शरलॉक होम्स सोडला, तर ही असली डोकॅलिटी कुठे नाहीच. उलट ‘दी मिस्टीरियस बेनेडिक्ट सोसायटी’मधला हिरो ‘रेनी’च घ्या.
तो फाफेच्याच कुळातला आहे. पण लोकांच्या भावना एखाद्या पुस्तकासारख्या वाचण्याचं त्याचं कौशल्य, तर्काधारित निष्कर्ष, घटनेतल्या कोड्याचा नेमका वेध घेऊन त्याच्याकडे गणिती नजरेनं पाहण्याची त्याची वृत्ती… अहाहा! त्यासि तुलना नसे. त्याच्या तुलनेत फाफे अगदी फिका वाटतो. मुलांना प्रत्यक्ष आयुष्यात रेनीच्या कौशल्यांचा उपयोग होईल, की फाफेच्या? निर्विवादपणे रेनीच्याच. नि हे भारांसारख्या दिग्गजाबद्दल झालं. म्हणजे बाकीच्या मराठी बालसाहित्यातल्या कोड्यांबद्दल नि रहस्यांबद्दल नि थरारक गोष्टींबद्दल तर बोलायलाच नको.
.
विश्लेषणात्मक / तर्काधारित विचारपद्धती, नैतिक पेच यांसारखी महत्त्वाची कौशल्यं मुलांना शिकवण्यासाठी ‘मिस्ट्री अॅट ब्लॅकबेअरर्ड्स् कव‘सारख्या पुस्तकांना इथल्या अभ्यासक्रमात सामावून घेण्यात आलं. याचं कारण ही पुस्तकं गंमतीदार असूनही सामाजिक, भौगोलिक, राजकीय पट मुलांना आकर्षक वाटेल अशा प्रकारे मांडतात. त्यामुळे मुलांना अमेरिकन इतिहासाचं स्पष्ट भान येतं. अमेरिकेच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सामाजिक-राजकीय शक्तींबद्दल ही मुलं या पुस्तकांतून शिकतात.
मराठी पुस्तकांत अजिबात नसलेला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘फॅक्शन’. इथे एकतर गोष्ट तरी असते, नाही तर मग माहितीपर पुस्तकं तरी. ‘खजिन्याचा शोध’ तरी, नाही तर मग ‘खगोलशास्त्राचे विश्व’ तरी. अधेमधे काही नाहीच. नारळीकरांच्या काही विज्ञानकथांचा काय तो अपवाद. याउलट इंग्रजीत ज्याला फॅक्शन (fact + fiction) म्हणता येईल अशा पुस्तकांची एक स्वतंत्र शाखाच आहे. मुलं त्यातल्या गोष्टीमध्ये रंगतात आणि सोबतच त्यांना तळटिपांमधून म्हणा, सोबतच्या चित्रांमधून नि तक्त्यांमधून म्हणा, कितीतरी विस्तृत आणि सखोल माहिती मिळत असते.
.
मेरी पोप ऑस्बॉर्नची ‘मॅजिक ट्री हाउस‘ नावाची एक पुस्तकमालिका आहे. जॅक नि अॅनी ही दोन सर्वसाधारण मुलं ‘मॉर्गन’ची एका काळ्या मंत्रापासून सुटका करायला निघतात. त्यांच्या सोबत जादूचं मचाण – ट्रीहाउस – असतं. मग ते त्या प्रवासात चार प्राचीन कूटकथांची उत्तरं शोधून काढतात, ‘मास्टर लायब्ररियन्स’ होतात, चार प्राचीन मिथ्यकथांचं पुनरुज्जीवन करतात – त्या काळाच्या पोटात लुप्त होऊन जाण्यापासून वाचवतात, अशी गोष्ट. फक्त याच पुस्तकात नव्हे, तर या पुस्तकासोबत ‘मॅजिक ट्री हाउस फॅक्ट ट्रॅकर्स’ अशी एक जोडपुस्तिकाही मिळते. त्यातही मूळ गोष्टीतल्या कितीतरी घटकांची पार्श्वभूमी आणि इतर सखोल माहिती पुरवलेली असते. असं आपल्याकडे कुठे असतं?
एक साधा डायनॉसॉरचा विषय घ्या. डायनॉसॉरवर आधारित अंकलिपीपासून (A for Apatosaurus, B for Baryonyx,…) ते कोशांपर्यंत सगळं काही उपलब्ध आहे. गोष्टीची पुस्तकं आहेत, विषयाची रंजक पद्धतीनं ओळख करून देणारी पुस्तकं आहेत. ‘आय लव्ह यू स्टिंकी फेस’सारख्या चित्रकथेच्या पुस्तकापासून ते ‘एन्सायक्लोपिडिया प्रीहिस्टॉरिका – डायनॉसॉर्स‘ या माहितीनं खचाखच भरलेल्या ‘पॉप-अप-बुक’पर्यंत अनेक प्रकारची पुस्तकं. कोडी, खेळ, गाणी… चकित करून टाकेल असा मोठा पटच्या पट आहे.
काही पॉप-अप-बुक्स –
असं काही आहे का मराठीत? मला अजून तरी इतकी समृद्धी दिसलेली नाही. साधनं कमी आहेत. मान्य आहे. पण भारांनी केलेल्या अनेक रसाळ भाषांतरांत मजकुराखाली एखादी माहितीपर तळटीप घालणं वा संदर्भासाठी एखादा नकाशा रेखाटणं इतकं अवघड होतं? पण ते झालेलं दिसत नाही.
अजून एका महत्त्वाच्या विषयाबद्दल मला बोलायचं आहे. तो म्हणजे दुजाभाव. भारांचे तीन महत्त्वाचे मानसपुत्र घ्या. फाफे, बिपिन बुकलवार आणि नंदू नवाथे. सगळेच्या सगळे मुलगे. मुली आहेत कुठे? मला लहानपणी वाचताना हे कधीच लक्षात आलं नाही. तेव्हा लिंगभावाचं इतकं भानच आलेलं नसतं, म्हणूनही असेल कदाचित. पण मी फाफेच्या जागी स्वत:ला कल्पून त्याच्या गोष्टी अगदी सहज वाचू शकत असे. पण आता लक्षात येतं. त्यात महत्त्वाचं स्त्रीपात्र नाहीच. इंग्रजीतही हे अगदी आदर्श आहे असं माझं म्हणणं नाही. तिथेही हे काहीसं एकांगीच आहे. पण ही फट भरून काढायचा प्रयत्न ‘नॅन्सी ड्र्यू’, ‘अॅन ऑफ ग्रीन गेबल’, ‘अमेरिकन गर्ल सिरीज’सारख्या पुस्तकांनी जाणूनबुजून केलेला दिसतो. हल्ली तर कितीतरी नायिका मुलांच्या पुस्तकांतून भेटतात. पण मराठीत पाहिलं तर अशा गाजलेल्या हिरॉईन्स नाहीतच. एक सुमा आहे, तीही गोट्याची बहीण. तिला तसं स्वतंत्र कथानक नाही. मला श्यामला शिरोळकरांच्या ‘चंबळची मुले’ या पुस्तकातली एका सामान्य गोड मुलीची धाडसी गोष्ट तेवढी आठवते. त्या मुलीला दरोडेखोर पळवतात. मग ती ज्या कुटुंबात राहते, त्या कुटुंबाला कधीतरी तिच्या डॉक्टर वडिलांनी मदत केलेली असते… अशी खास भारतीय योगायोगांची गोष्ट. त्यात नायिका होती, हे महत्त्वाचं.
पण ते अपवादच. एरवी मुलींनी म्हणजे असंच वागायचं असतं… ताई आणि भाऊ! असंच सगळं… नुसता उपदेश.
सगळ्या मराठी बालवाङ्मयातून पालक आपला कोणता ना कोणत्या प्रकारचा अंतस्थ हेतू राबवत असतात, असं माझं थोडं धाडसी मत आहे. एकतर ओढून ताणून उपदेश करायचे, नाहीतर मग मुलांची कोवळी मनं जपून त्यांना स्वैराचार करू द्यायचा. ‘पंचतंत्रा’चं उदाहरण घ्या. त्या एकातून एक उलगडत गेलेल्या गोष्टी आहेत खरं तर. कोल्हा कावळ्याला म्हणाला, की मला ते कासव सांगत होतं त्याला भेटलेल्या सिंहाच्या गोष्टीबद्दल. असा एक मस्त ओघ आहे त्याला. पण आपण तो कुठे अनुभवू देतो? एक गोष्ट घ्यायची आणि त्याला खाली एक तात्पर्य चिकटवायचं! साने गुरुजींच्या पुस्तकात तर हे फार. सगळं आदर्श वागणं. एकतर हे टोक. नाहीतर मग दुसरं टोक. आता मी अनिल अवचटांचं नाव घेते आहे. पण गैरसमज नको. ते माझ्या बाबांचे अतिशय चांगले मित्र आहेत. आणि माझ्या लहानपणीच्या खूप सुंदर आठवणीही त्याच्याशी निगडित आहेत. पण त्यांच्या पुस्तकांत हे जे काही असतं ना, की मुलं म्हणजे फुलं, त्यांना कुस्करू नका, त्यांना जे जसं करायचं असेल, तसं करू द्या. पसारा करताहेत, करू द्या! खेळणी मोडताहेत, मोडू द्या! ते मला नाही आवडत. मुक्तता आणि स्वैरपणा यांत आपण काही फरक करतो की नाही? आणि तो मुलांना अगदी तरल पद्धतीनं, उपदेश न करता जाणवून देता येतो की! सई परांजप्यांचं ‘हरवलेल्या खेळण्यांचे राज्य’ घ्या. त्यात हे बटबटीतपणा टाळून फार सुरेख प्रकारे केलेलं आहे. मला फार आवडतं ते पुस्तक. ‘विजर्ड ऑफ ओझ’ आणि हॅन्स अॅन्डरसनचा ‘ब्रेव्ह टिन सोल्जर’ यांच्या मधलं प्रकरण आहे ते. त्यातही मुलांना एक संदेश आहेच. पण त्यात काय हलकंफुलकं, खेळकर वातावरण आहे! उपदेशाचा बटबटीतपणा नाही.
पण हे श्रेय आपण भागवतांनाही दिलंच पाहिजे. त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये एक छान उत्साहाचं, हलक्याफुलक्या मिश्कील विनोदाचं वातावरण आहे. थेट उपदेशाचे डोस कुठे नाहीत. सामाजिक समता, चूक नि बरोबरच्या संकल्पना यांच्याबद्दल हिंट्स आहेत. सूचन आहे. पण “हा घे उपदेश, चल हो शहाणा!” असा ‘bolus dose’ प्रकार कुठेही नाही.
भागवतांना अजून एक महत्त्वाचं श्रेय द्यायलाच पाहिजे. ते म्हणजे त्यांनी भाषांतरित केलेली पुस्तकं. आता शरलॉक होम्स काय, किंवा ज्यूल व्हर्न काय, ते मराठीत आणणं हेच आधी अवघड. मुलांसाठी आणणं अजूनच अवघड. मोठाली विशेषणं टाळायची. त्या त्या संस्कृतीतले संदर्भ असणारी भाषा वळवून मराठी करायची नि तरी अर्थ मात्र निसटता कामा नये. बरं, त्या गोष्टींमधला भूगोल आपल्या मुलांच्या फार परिचयाचा नसणार. त्याचं भान बाळगून त्याबद्दल थोड्या टिपा द्यायच्या. काही गोष्टींना इकडची समांतर उदाहरणं शोधायची. काही गोष्टी तशाच ठेवायच्या काही गाळायच्या. उदाहरणार्थ, व्हर्नच्या कादंबऱ्यांमधला अटलांटिक समुद्रात जाण्याचा उल्लेख. भारतातून तिकडे जायचं म्हटलं, तर केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावं लागेल, हे त्यांनी अचूक हेरलं. किंवा ‘मायापुरचे रंगेल राक्षस’मधे त्यांनी कापलेला भाग. तारेवरची कसरत आहे ही. भारांना ती लीलया साधलेली दिसते.
पण पुस्तकांची निर्मितिमूल्यं? त्या बाबतीत आपण फार मागे आहोत.
आपल्या वाईरकरांनी काढलेल्या फाफेच्या चित्रांचं इतकं कौतुक होतं. नि गैरसमज नको हां, ती आहेतच कौतुक करण्यासारखी, बोलकी. पण त्यापलीकडे? कागदाचा दर्जा म्हणून नका; चित्रांमधली कल्पनेची झेप म्हणू नका; चित्रांना त्रिमित परिणाम देता येण्यासारखा साधा, सरळ कल्पक विचार म्हणू नका. हे सगळं आपल्याला इंग्रजी पुस्तकांत मिळतं. पण माधुरी पुरंदरेंच्या काही पुस्तकांसारखी वा कविता महाजनांच्या ‘जोयानाचे रंग’ यांसारखी अपवादात्मक पुस्तकं वगळली, तर चित्रांचा स्वतंत्रपणे विचार केलेला कुठेच दिसत नाही. खरं म्हणजे आपल्याकडे किती प्रकारच्या शैली आहेत. मी मध्यंतरी हम्पीला गेले होते. तिथे एक लहानसं पुस्तक मिळालं मला. ‘पम्पासूत्र: दी लाइफ ऑफ अ रिव्हर’ हम्पीमधल्या तुंगभद्रा नदीची गोष्ट आहे त्यात.
नदीतल्या आळसावलेल्या मगरी, रंगीत चिटुकले मासे, नदीवर पडणारं इंद्रधनुष्य… आणि त्या नदीचं शंकराशी झालेलं लग्न. अशी गोष्ट. नि चित्रं! काय चित्रं आहेत! अगदी भारतीय शैलीतली आणि रसरशीत चित्रं. असं काहीतरी मराठीत का नाही करत आपण? फार लांब कशाला, आपल्याकडे लोककथांचा किती मोठा खजिना आहे. पण त्याचं साधं संकलन तरी कुठे केलं आहे आपण? व्योमकेश बक्षीसारखी व्यक्तिरेखा शरलॉक होम्सला समांतर आहे नि भारतीय मातीतलीही आहे. त्यात बंगालमधलं वातावरण आहे, जुन्या कोलकात्याचं चित्रण आहे. तसं मराठीत काही केल्याचं आठवत नाही. या बाबतीत इंग्रजीतही फार मोठा उजेड पडला आहे असं नव्हे. इंग्रजीत आफ्रिकन, इजिप्शियन, अरबी लोककथा, तसंच ‘ग्रिम’मुळे जर्मन, ‘पेरो’मुळे (Perrault) फ्रेंच परीकथा सापडतात. सोविएत यूनियनच्या भरभराटीच्या काळामुळे आज रशिया, यूक्रेन, मोल्देविया आदिंच्या लोककथा टिकून आहेत. पण दक्षिण अमेरिकन लोककथा किंवा मूळच्या इंडियन – रेड इंडियन – लोककथा बऱ्याचश्या लुप्तच झालेल्या दिसतात. हे आपल्याकडेही आहे की. आपल्याकडे सांगितल्या जाणाऱ्या शंकर-पार्वतीच्या गोष्टी किंवा आदिवासींच्या कथा, यांच्यात कल्पनाशक्तीला खतपाणी घालण्याची फार मोठी ताकद असते. पण ती आपण एक्स्प्लोअरच केलेली दिसत नाही. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ किंवा ‘चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ची सहज परवडणारी नि निरनिराळ्या चित्रशैली असलेली पुस्तकं हाच काय तो सुखद अपवाद.
‘नॅशनल बुक ट्रस्ट’ची पुस्तके
मराठीतही काही प्रयोग झालेले दिसतात; नाही असं नाही. विंदांच्या ‘अजबखाना’ आणि ‘राणीची बाग’मधल्या कविता आहेत. ‘अबब हत्ती’चा इंट्रेस्टिंग प्रयोग मध्यंतरी काही काळ होऊन गेला. ‘किशोर’ त्या मानानं दीर्घकाळ चालला. आता ‘साधने’चा बालकुमार विशेषांक असतो. मध्यंतरी रशियन पुस्तकांचा एक काळ होता. काय देखणी पुस्तकं होती ती… एका विशिष्ट वातावरणात घेऊन जाण्याची क्षमता होती त्या पुस्तकांत. चित्रं, पुठ्ठ्याची बांधणी… अहाहा! पण हे सगळं काही काळ चालून मग एखाद्या धूमकेतूसारखं गडप झालेलं आपल्याला दिसतं. त्याचा एक सलग वाहता प्रवाह झाल्याचं कुठे दिसत नाही.
साता समुद्रापारच्या अद्भुत पुस्तकावळीच्या या पार्श्वभूमीवर मला भारांनी केलेलं काम खूप मोठं वाटतं. जेव्हा इंटरनेट नव्हतं, तेव्हा ते परभाषेतल्या पुस्तकांबद्दल माहिती मिळवून ती मराठीत आणायला धडपडत होते. मुलं वेगळ्या प्रकारे विचार करतात, त्यांच्यासाठीचं वाङ्मय निराळं असलं पाहिजे – हा जो सध्या मान्यता मिळालेला विचार आहे, त्याचा कुठे मागमूसही नव्हता; तेव्हा ते मुलांसाठी लिहीत होते, सातत्यानं लिहीत होते. किती उपक्रम…. ‘पुस्तकहंडी’, ‘बालमित्र’चा अंक, मुलांसाठीची शिबिरं….
भारांची ‘पुस्तकहंडी’
त्यांनी एक चळवळच चालू केली. मोठ्यांच्या वाचनालयात छोट्यांना एक हक्काचा कोपरा मिळवून दिला. एक नवा साहित्यप्रकार प्रस्थापित करणं हे अजिबात सोपं नाही. ते त्यांनी केलं, म्हणून ते मोठे ठरतात.
त्यांच्या या चळवळीचं आपण आज काय करतो आहोत, हा एक मोठा प्रश्न आहे.
– ऋग्वेदिता पारख
rugvedita.parakh@gmail.com
***
लेखात आलेल्या अनेक लेखक व पुस्तकांच्या तपशिलासाठी संदर्भदुवे इथे पाहता येतील.
भारांच्या पुस्तकहंडीचे चित्र आणि ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या पुस्तकांपैकी डावीकडचे चित्र: ऋग्वेदिता पारख यांच्याकडून
स्रोत-उल्लेखाविना असलेली सर्व चित्रे जालावरून साभार
लेख-संस्करण : मेघना भुस्कुटे व अमुक
पूर्वप्रकाशन : ‘भारावलेले’, ऐसी अक्षरे
Facebook Comments

4 thoughts on “सातासमुद्रापारची पुस्तकावळ”

 1. ना. धों. ताम्हणकरांनी ‘चिंगी’ हे पुस्तक लिहिलंय. त्याची चिंगीच नायिका आहे.

 2. This message is posted here using XRumer + XEvil 4.0

  XEvil 4.0 is a revolutionary application that can solve almost any antibot captcha.
  Captcha Solution Google (ReCaptcha-1, ReCaptcha-2), Facebook, BING, Hotmail, Yahoo,
  Yandex, VKontakte, Captcha Com – and over 8400 other types!

  You read this – it means it works! 😉
  Details on the official website of XEvil, there is a free demo version.

  Check YouTube video “XEvil ReCaptcha2”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *