बालसाहित्यांक २०१७ लेख

स्टोरी वीव्हर : अगणित आणि मनोरम शक्यतांची नांदी

खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट. त्या राज्यात बरीच गोजिरवाणी मुलं राहायची. कल्पनेच्या राज्यात भराऱ्या मारायला सज्ज असलेली, स्वच्छंदी आणि आनंदी. पण आई-बाबांना वाटायचं, त्यांनी कसं ‘आदर्श’ असायला हवं! दोन वेण्या घट्ट बांधून वर टांगलेल्या आणि हाताची घडी तोंडावर बोट हे ध्येयवाक्य! वाचायला गोष्टींची पुस्तकं होती. पण मुलांच्या गोष्टी म्हणजे त्यात उपदेश असायलाच हवा अशी प्रबळ उबळ असायची.
“बरं का रे मुलांनो, आता कळलं ना कसं वागायचं ते?”
नीतिमत्तेचे धडे आणि उपदेशाचे डोस यांनी हैराण होत मुलं कान बंद करून टाकायची. (अजूनही उपदेश करायची ती वाईट खोड गेलेली नाही असं म्हणतात!)
पण तरी आज वातावरण बदलतं आहे. गोष्ट म्हणजे वाचनानंदाचा अमर्याद ठेवा, कल्पनेची भरारी आणि गंमत ही कल्पना मूळ धरते आहे. शिवाय चांगल्या गोष्टीतून सार्वकालिक मूल्यं रुजतात. समज वाढते. कुठल्याही चांगल्या साहित्यातून ते घडत असतंच. शिवाय गोष्टींमुळे वाचनकौशल्य वाढतं. उपदेशपर गोष्टी लिहायला तशा सोप्या असतात. मात्र आजच्या मुलांच्या मनोविश्वात शिरून, त्यांच्या जगातल्या गोष्टी लिहिणं हे आव्हानात्मक काम आहे. त्यामुळेच अशा गोष्टींच्या पुस्तकांची संख्या कमी आहे.
तसा तर एकूणच पुस्तकांचा दुष्काळ मोठा आहे. त्यात मुलांना त्यांच्या भाषेत पुस्तकं वाचायला मिळत नाहीत. आपण सवयीनं म्हणतो खरं, की सध्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकं प्रसिद्ध होतात. पण पाठ्यपुस्तकं सोडली, तर भारतात दर मुलामागे उपलब्ध असणार्‍या पुस्तकांचं प्रमाण किती कमी आहे माहीत आहे? ‘टाटा ट्रस्ट’नं केलेल्या एका अभ्यासानुसार भारतात दर ५ मुलांमागे फक्त १ पुस्तक उपलब्ध असतं. ग्रामीण भागात हीच आकडेवारी आहे ११ मुलांमागे १ पुस्तक इतकी कमी. बरं, या कमी पुस्तकांमधली जवळपास ७० टक्के पुस्तकं ही इंग्लिश आणि हिंदीत असतात. आणि बाकी ३० टक्क्यांत भारतातल्या उरलेल्या सर्व भाषा. यात बरी, वाईट, टुकार सर्व पुस्तकं आली.
– म्हणजे मुलांना मुळातच त्यांच्या भाषेतली पुस्तकं कमी मिळतात.
– आणि जर मिळालीच तशी, तर ती दर्जेदार आणि चांगल्या चित्रांनी सजलेली नसतात!
– आणि जर मिळालीच तशी, तर ती चाररंगी, मोठ्या टायपातली, उत्तम छपाईची नसतात.
– आणि जर मिळालीच तशी, तर त्यांच्या किमती काय म्हणता महाराजा! १००-१५० रुपयांच्या खाली नाहीत.
कारण प्रकाशक म्हणतात : मुलांसाठी चांगलं लिहिणारे लेखक नाहीत. मोठे चित्रकार आम्हांला परवडत नाहीत. कागद, छपाई यांचा खर्च तर आहेच. पण त्यापलीकडे पैसे खाणारा मोठा राक्षस म्हणजे वितरण व्यवस्था. पुस्तक विक्रेत्यांना ४०, ५०, ६० असे कितीही टक्के कमिशन द्यावं लागतं. शिवाय प्रकाशकाचा नफा. एवढं झालं, की ३०- ४० रुपयांचं पुस्तक जातं १००- १५० रुपयांच्या घरात!
एवढ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून प्रत्येक मुलाच्या हाती, त्याच्या भाषेतलं गुणवत्तापूर्ण पुस्तक परवडणाऱ्या दरात मिळणार कसं? आणि त्यातही खेड्यातल्या, वस्तीतल्या आणि पाड्यातल्या मुलापर्यंत जाणार कसं?
यावर मात करण्याचा प्रयत्न आजही काही प्रकाशक, लेखक आणि चित्रकार करताना दिसतात. ‘प्रथम बुक्स’ हे त्यापैकीच एक. ‘प्रत्येक मुलाच्या हाती पुस्तक’ हे ध्येयवाक्य घेऊन २००४मध्ये सुरू झालेली, अनेक भारतीय भाषांत, परवडणाऱ्या दरात, पुस्तकं काढणारी ना-नफा संस्था. आजवर त्यांनी २४ भाषांमधली २४०० पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. या पुस्तकांसाठी भारतभरातले अत्यंत नावाजलेले, बालसाहित्यासाठी पुरस्कार मिळालेले लेखक गोष्टी लिहितात, एनआयडी, आयडीसी, सृष्टी स्कूल ऑफ डिझाईन अशा नामवंत संस्थातून शिक्षण घेतलेले तरुण चित्रकार चित्रं काढतात. एकच गोष्ट इंग्रजी, मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगु अशा अनेक भाषांमध्ये जाते.
तरीसुद्धा छापील पुस्तकांच्याबाबत वितरणाचा प्रश्न शिल्लक राहतोच. किमती कमी ठेवायच्या, तर विक्रेत्यांना २०-२५ टक्क्यांपेक्षा जास्त कमिशन देता येत नाही. आणि ३५ रुपये किमतीच्या पुस्तकावर २० टक्के म्हणजे असे कितीसे पैसे मिळणार? म्हणून विक्रेते ही पुस्तकं ठेवत नसत. त्यावरही उपाय हवा होता.
प्रथम बुक्सच्या स्टोरी वीव्हर या डिजिटल मंचाच्या रूपानं तो उपाय प्रत्यक्षात आला. कमी किमतीतच नव्हे, तर पूर्णपणे मोफत पुस्तकं वाचायला मिळण्याची शक्यता.
 ***
बदलता काळ हा नेहमीच आव्हानं घेऊन येतो.
मुलांना वाचनापेक्षा चकाकत्या छोट्या पडद्यावरच्या हलत्या चित्रांचं आकर्षण वाटणं किती स्वाभाविक आहे! आता तर एका हातात दुधाची बाटली असतानाच दुसरा हात मोबाईल धरू लागला आहे. आणि हे वर्ग, जात, सामाजिक स्तर यांच्या मर्यादा ओलांडून घडतं आहे. जर मुलं मोबाईल, कॉम्प्यूटर बघणारच असतील; तर आपल्याला तिथे काहीतरी चांगलं देता येईल का? वितरणाचे काही नवे मार्ग खुले होतील का? डिजिटल माध्यमाचा विवेकी आणि प्रभावी वापर हा आव्हानांना तोंड देण्याची, लाटेवर स्वार होण्याची ताकद देऊ शकतो हा विचार इथे कळीचा ठरला.
नव्या तंत्रज्ञानाबरोबर अभिव्यक्तीचं माध्यम बदलतं. आजवर हे सातत्यानं घडलेलं आहे. किंबहुना माध्यमं ही मूळ आशयाचं आणि कलेचं रूपही बदलतात. उदाहरणार्थ, ३ मिनिटांच्या रेकॉर्ड आल्या, तेव्हा  गाणं त्यातल्या सर्व वैशिष्ट्यांसह ३ मिनिटांत बांधलं जायचं. अलीकडच्या काळात फेसबुक हे स्वतःचे फोटो आणि बातम्या टाकायचं जणू स्वतःच्या मालकीचं वर्तमानपत्रच झालं. ट्वीटरमुळे १४० अक्षरांत आपलं म्हणणं मांडायची सवय लागली. इंटरनेटच्या प्रसारामुळे अनेक ऑनलाईन दर्जेदार दिवाळी अंक हवे तेव्हा आणि मोफत वाचता येऊ लागले. अशी वेगवेगळ्या प्रकारची कित्येक उदाहरणं देता येतील. छापील पुस्तकांचं रूपही बदलत जाणं अपरिहार्य होतं.
तर मुद्दा असा, की बदलता काळ आपल्यासमोरची आव्हानं वाढवत असतो; तसाच तो काही उत्तरं शोधायला साधनंही पुरवत असतो. उदाहरणार्थ, एका बाजूला डिजिटल तंत्रज्ञान आणि दुसरीकडे प्रताधिकारमुक्त (free of copyrights} खुला आशय. वाचकांना हे साहित्य विनामूल्य वापरता आलं, तर कायकाय घडू शकतं? कल्पना येणार नाही इतकं मनोरम आणि क्रांतिकारी आहे ते! अक्षरशः अगणित शक्यता आणि अफाट ताकद त्यात दडलेली आहे.
याच ताकदीचा वापर करून अनेक मुलांपर्यंत किती वेगवेगळ्या भाषेत पुस्तकं पोचवता येतात याचं उदाहरण म्हणजे ‘प्रथम बुक्स’चा स्टोरी वीव्हर  हा डिजिटल मंच. ‘प्रत्येक मुलाच्या हाती पुस्तक’ हे ध्येय कितीतरी वेगात पुढे न्यायला या मंचाची मदत झाली. नव्या काळातल्या आव्हानांना सामोरं जाण्याचा उपाय सापडला.
गोष्टींची संख्या आणि वितरणाची ताकद 
आतापर्यंत स्टोरी वीव्हरला मिळालेला प्रतिसाद प्रचंड म्हणावा असाच आहे. २०१५च्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचं निमित्त साधून स्टोरी वीव्हर सुरू झालं. त्या वेळी या मंचावर २४ भाषेमधल्या ८०० गोष्टी होत्या. गेल्या २ वर्षांत ही संख्या ५,००० गोष्टींवर पोचली आणि आता तर शंभर भाषांमध्ये गोष्टी उपलब्ध आहेत. भारतातल्या सर्व मुख्य भाषांबरोबर कोरा, संथाळी गोंडी यांसारख्या आदिवासी भाषा; सुरजापुरी, सौराष्ट्री अशा बोलीभाषा; संस्कृतसारखी अभिजात भाषा; कोकणीसारखी विशिष्ट प्रदेशात बोलली जाणारी भाषा आणि फ्रेंच, जर्मन, आफ्रिकान्स, स्वाहिली, झुलू, कॅँटोनीज, चेक… यांसारख्या परदेशी भाषा एवढा मोठा हा पट आहे.  विशेष म्हणजे ज्या भाषांची नव्याने भर पडली त्या सर्व भाषा त्या-त्या भाषकांच्या किंवा वापरकर्त्यांच्या सूचनेवरून आल्या आहेत. या मंचाला मिळणारा प्रतिसादही त्यातून अधोरेखित होतो.
सर्वांत अधिक प्रतिसाद इंग्रजी भाषेला मिळत असला हे जरी खरं असलं, तरी प्रादेशिक भाषांमध्ये स्टोरी वीव्हरवर हिंदी, मराठी, कन्नड आणि तमिळ या लोकप्रिय भाषा आहेत.
मराठी पुस्तकं 
स्टोरी वीव्हरच्या वापरकर्त्यांमध्ये २०% लोक महाराष्ट्रातले आहेत. वापरकर्त्यांची सतत नव्यानं भर पडण्यामध्ये कर्नाटकच्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक आहे. इथे एकूण ३६१ मराठी गोष्टी असून माधुरी पुरंदरे, डॉ. माधव गाडगीळ, राजीव तांबे, वर्षा जोशी यांच्या मूळ मराठीतच लिहिलेल्या  गोष्टी आहेत.
एकदा उत्तम गुणवत्तेची गोष्ट आणि चित्रं हाती असतील, तर ज्याला जसं हवं असेल तसं रूप धारण करण्याची ताकद या मंचामुळे पुस्तकात आली. प्रत्येक पानावरच्या सहा-सात ओळींचा अनुवाद केला, की नव्या भाषेत पुस्तक तयार. चित्र, मांडणी, मुखपृष्ठ सगळं तयारच मिळतं.
कोणताही प्रताधिकार (copyright) न ठेवता हा सर्व खजिना कुणालाही खुला असणं ही स्टोरी वीव्हरमधली सगळ्यांत बहारदार गोष्ट आहे. इथे गोष्टींची पुस्तकं विनामूल्य वाचता येतात, डाऊनलोड करता येतात, गोष्टी अनुवादित करता येतात, तुम्ही स्वतः लिहिलेल्या गोष्टी अपलोड करता येतात. इथल्या हजारो सुंदर चित्रांच्या खजिन्यातली चित्रं तुमच्या गोष्टींसाठी वापरता येतात. एवढंच नाही, तर ते पुस्तक तुम्ही छापू शकता. त्यावर कडी म्हणजे ते पुस्तक तुम्हांला बाजारात विकता येतं. स्टोरी वीव्हरला एकही पैसा न देता. फक्त लेखक, चित्रकार, प्रकाशक यांना श्रेय देऊन.
परंतु लेखक आणि चित्रकार आपलं काम असं प्रताधिकारमुक्त ठेवायला तयार होतात का? म्हणजे जगातल्या अक्षरशः कुणीही त्यांची गोष्ट विनामूल्य वापरावी, किंवा वापरकर्त्यानं  स्वतःच्या गोष्टीसाठी चित्रकारांची चित्रं मोफत डाउनलोड करून घ्यावी, हवं तर ती छापावी, विकावी त्यांना पटतं का?
तर लेखक आणि चित्रकार ‘क्रिएटीव कॉमन्स’ या खुल्या परवान्याला तयार होतात असा प्रथम बुक्सचा अनुभव आहे. क्रिएटीव कॉमन्स या परवान्यामुळे आशय, चित्रं, फोटो यांचा कोणत्याही स्वरूपात वापर करता येतो. अर्थातच श्रेय देऊन. आत्ता या मंचावर ज्या नामवंतांची पुस्तकं दिसतात त्या सगळ्यांनी हे केलं आहे. आपलं काम या मंचाच्या माध्यमातून भारतातल्या आणि जगातल्या असंख्य लोकांपर्यंत पोचणार याचा आनंद असतो. आपल्या पुस्तकाचं फ्रेंच भाषेतलं रुपडं अचानक समोर आलं, किंवा आदिवासी मूल आपली गोष्ट त्याच्या भाषेतून वाचताना दिसलं तर कुणाला नाही आनंद होणार?
डिजिटल गोष्टी कोण वाचतं?
वितरणाची ताकद अफाट वाढली असं आपण म्हणतो खरं, पण त्यात काही प्रश्न महत्त्वाचे आहेत.  मुळात डिजिटल आणि ऑनलाईन कोण वाचतं? जर पुस्तक वाचलंच गेलं नाही, तर नुसत्या आकड्यांना काय महत्त्व उरेल? ज्यांना वाचन साहित्य उपलब्ध नाही अशा, ग्रामीण भागातल्या, तळागाळातल्या मुलांचं काय? की फक्त मूठभर ‘आहे रे’ वर्गासाठीच हा खटाटोप आहे? आणि दुसरं म्हणजे आंतरजालावर इतक्या बेसुमार गोष्टी असतात की त्यात तुमचं वेगळेपण कसं उठून दिसणार?
हे प्रश्न सोडवायला सोपे नक्कीच नाहीत. त्यासाठी कसून वेगळे प्रयत्न करावे लागतात.
स्टोरी वीव्हरने त्यासाठी एक प्रारूप तयार केलं आहे. देशभरातील शिक्षक, ग्रंथपाल आणि स्वयंसेवी संस्था, तसंच गावपातळीवर साक्षरता प्रसाराचं काम करणारी मंडळी आणि संस्था यांच्याशी सततचा संपर्क, संवाद ठेवून त्यांच्या मदतीनं ग्रामीण, अर्धग्रामीण आणि शहरी हा सगळा भाग आवाक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाधिक शाळा आणि ग्रंथालयं यांच्यापर्यंत पोचता यावं म्हणून प्रथम बुक्सतर्फे शिक्षक, ग्रंथपाल आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी सतत कार्यशाळा होत असतात.
पाठ्यपुस्तकातले धडे शिकवताना गोष्टींच्या पुस्तकाचा वापर कसा करता येईल यावरही त्यात भर देण्यात येतो. असा वापर अर्थपूर्ण होतो, मुलांना गुंगवून आणि गुंतवून ठेवतो. संकल्पना चटकन समजतात.
अशा प्रयत्नातून गेल्या एक-दोन वर्षांत बरंच काही घडलं आहे. तळागाळापर्यंत पोचण्याच्या यशस्वी प्रयत्नाचं उत्तम उदाहरण म्हणजे फलटणची ‘प्रगत शिक्षण संस्था’. त्यांच्यामार्फत या परिसरातल्या जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये स्टोरी वीव्हरच्या गोष्टी पोचतात. जास्तीतजास्त शाळांमध्ये ग्रंथालयं सुरू करण्याचं प्रगत शिक्षण संस्थेनं ठरवलेलं होतं. जेव्हा त्यांना कळलं, की उत्तम दर्जेदार गोष्टींचा खजिना मराठीत स्टोरी वीव्हर या मंचावर उपलब्ध आहे आणि तोही पूर्णपणे मोफत, तेव्हा त्यांनी शाळेत या गोष्टी वापरायला सुरुवात केली.
ढवळेवाडी ही अगदी छोटी वस्ती. शाळेला दोनच खोल्या आणि दोनच शिक्षक. पहिली-तिसरी आणि दुसरी- चौथी असे वर्ग एकत्र भरतात. शाळेला कुणीतरी प्रोजेक्टर भेट दिलेला आहे. प्रगत शिक्षण संस्था शिक्षकांना प्रशिक्षण देते. हे प्रशिक्षण आणि मुलांसाठी मोफत उपलब्ध असलेल्या चित्रमय गोष्टी या दोन्हीची सांगड घालण्यातून काय साध्यं होऊ शकतं याचा बोलका पुरावा म्हणजे हा व्हिडिओ.
प्रगत शिक्षण संस्थेच्या सहकार्याने, फलटण जवळच्या  ढवळेवाडी या खेड्यातली जिल्हा परिषदेची शाळा आणि त्यांनी स्टोरी वीव्हरचा वर्गात केलेला वापर –
आणखी एक उदाहरण पश्चिम बंगालमधील. आदिवासी मुलांसाठी काम करणारी करणारी ‘सूचना’ नावाची संस्था आहे. त्यांनी कोरा आणि संथाळी या दोन भाषांमध्ये प्रथम बुक्सच्या  गोष्टी अनुवादित केल्या. त्या स्टोरी वीव्हरवर अपलोड झाल्या आणि आदिवासी मुलांपर्यंत पोचल्या.
संथाळी आणि कोरा या आदिवासी भाषांमध्ये ‘सूचना’ या संस्थेने केलेली पुस्तकं. 
वर्षा जोशी यांच्या ‘पुरी का फुगते’ या गोष्टीचा प्रभावी वापर इथे कसा झाला ते दाखवणारा हा फोटो (मूळ गोष्ट इथे वाचता येईल.)
‘एमगुरू’ नावाचा एक सामाजिक उपक्रम आहे. मुलांमध्ये साक्षरता वाढवी यासाठी त्यांनी एक मोबाईल अ‍ॅप तयार केलं असून स्टोरी वीव्हरच्या गोष्टींचं रूपांतर त्यानी गेममध्ये केलं आहे.
गोव्यातल्या ‘कोंकणी भाषा मंडळा’ने डिजिटल मंचावरील तब्बल १०० गोष्टींचा कोकणीत अनुवाद केलाय आणि आता त्या गोष्टी तिथल्या अनेक शाळांमध्ये वापरल्या जातात.
‘बुकशेअर’ ही ऑनलाईन लायब्ररी. छापील माध्यमातून ज्यांना पुस्तकं वाचता येत नाहीत अशा मराठी भाषक मुलांसाठी बुकशेअरनं स्टोरी वीव्हरमधील  ‘इ पब’ स्वरूपात उपलब्ध असलेल्या गोष्टींचं रूपांतर  ब्रेल लिपीत आणि श्राव्यमाध्यमात केलं आहे. पुण्यातल्या काही शाळांबरोबर बुकशेअर काम करत असून, तंत्रज्ञानाच्या साह्याने लहान मुलांमधील वाचनकौशल्य विकसित करण्याच्या उपक्रमाचाच हा एक भाग आहे.
अशी अनेक उदाहरणं देता येतील. प्रताधिकारमुक्त (free of copyrights} आणि सर्वांसाठी खुला असलेला आशय वापराच्या अनेक शक्यतांना जन्म देतो. ब्रेल लिपीतली पुस्तकं, श्राव्य पुस्तकं, गेम, मोबाईलवर ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी, विज्ञानातले प्रयोग… अशा कितीतरी पद्धतींनी या गोष्टींचा वापर आज होतो आहे!
स्टोरी वीव्हरची ‘ऑनलाईन कम्युनिटी’ हे या डिजिटल मंचाचं सामर्थ्य आहे. लेखक, चित्रकार, शिक्षक, पालक, ग्रंथपाल, अनुवादक, भाषामंडळं, मुलांसाठी काम करणाऱ्या आणि साक्षरता प्रसार करणाऱ्या संस्था असे अनेक जण विविध पद्धतींनी इथे जोडले गेले आहेत. देशात मुंबई-दिल्लीपासून ते नांदेड-सोलापूरपर्यंत आणि भारताबाहेरच्या १३ देशांमध्ये विखुरलेले अनेक जण असे एकंदर ३,६०,००० जण या सहजसंवादी कम्युनिटीचा भाग आहेत.
गुणवत्तेचं काय?
स्टोरी वीव्हरवर दोन पद्धतीची गोष्टींची पुस्तकं असतात. प्रथम बुक्सनं प्रकाशित केलेली आणि दुसरी म्हणजे कम्युनिटीनं तयार केलेली किंवा अनुवादित केलेली.
प्रथम बुक्स स्वत: जी पुस्तकं प्रकाशित करतं, अनुवादित करतं; ती गुणवत्तेच्या अनेक कसोट्यांमधून जातात आणि काटा-काळजीपूर्वक तपासलेली असतात. लेखक, चित्रकार यांच्या निवडीपासून ते पुस्तकाच्या मांडणीपर्यंत सर्व काही नीट बघितलं जातं. मात्र जी पुस्तकं ही ऑनलाईन कम्युनिटी तयार करते, त्यांच्या गुणवत्तेचं काय असा प्रश्न सहजच पडू शकतो. मुळात गोष्टी अपलोड करणाऱ्यांवर प्रथम बुक्सचा विश्वास आहेच. तरीही मुलांसाठी या मंचाचा वापर होणार असल्यानं अनेक निकषांवर त्या तपासून पाहण्याची काळजी मात्र घ्यावीच लागते.
उदाहरणार्थ, मंचावर एक ‘फ्लॅग’  बटण दिलेलं आहे. जर कोणतीही गोष्ट, चित्र किंवा आशय हा आक्षेपार्ह वाटला किंवा मुलांसाठी हा योग्य ठरणार नाही असं वाटलं, तर वापरकर्ते तो ‘फ्लॅग’ करू शकतात. त्याची सूचना तत्काळ स्टोरी वीव्हर मंचाचं आशय व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीकडे जाते. मग त्यावर निर्णय घेऊन तो मजकूर काढला वा बदलला जातो.
दुसरी गोष्ट म्हणजे एक परीक्षण मंडळ तयार केलं आहे. या परीक्षण मंडळातले लोक  काही भाषांसाठी गोष्टी वाचून, परीक्षण करून गोष्टींचा दर्जा ठरवतात. जास्तीत जास्त भाषांमध्ये ही परीक्षण मंडळं तयार करून त्यांची व्याप्ती वाढवण्याची योजना आहे.
तिसरी बाब म्हणजे इतर प्रकाशक आणि त्या-त्या भाषेतल्या संस्था यांच्या सहयोगाने, चांगल्या मजकुराचा एक मजबूत स्त्रोत तयार होऊ शकतो. असं सहकार्य इतर प्रकाशक आणि संस्थांकडून मिळावं यासाठी प्रयत्न चालू आहेत.
पुस्तकाच्या नावाबरोबरच प्रकाशकाचं नाव असलं, तर वाचणाऱ्याना निवडीचा आणखी एक निकष मिळतो. शिवाय ‘संपादकांची शिफारस’, ‘सर्वाधिक वाचल्या गेलेल्या गोष्टी’, ‘नव्याने आगमन’ असे काही पर्याय असतात, ज्यांच्या मदतीने चांगल्या पुस्तकांची निवड करायला मदत होते.
माहिती आणि ज्ञान यांची देवघेव या मंचावर सतत चालू असते. लेखक-चित्रकारांचे छोटे व्हिडीओ, संपादकांकडून लेखनाचे-अनुवादाचे कानमंत्र ही त्यांपैकी काही उदाहरणं.
शिवाय ब्लॉग, ट्वीटर संवाद हे सतत चालू असते. गुणवत्ता वाढीसाठी या मदतीचाही नक्कीच उपयोग होऊ शकतो.
पुस्तकांची गुणवत्ता, त्यांतून होणारा साक्षरता प्रसार, अनेक भाषांत जाणारी पुस्तकं, कामाचा आवाका आणि ना-नफा तत्त्वावर जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचण्याचं ध्येय यांमुळे गूगलसारख्या काही नामवंत संस्थांकडून या उपक्रमाला पुस्तकनिर्मितीसाठी अनुदान मिळत आहे. प्रथम बुक्सच्या अध्यक्षा सुझान सिंग म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रत्येक मुलाच्या हाती पुस्तक हे प्रथम बुक्सचं ध्येय आहे. त्यामुळे अनेक भाषांमध्ये गुणवत्तापूर्ण पुस्तकं तयार करणं आणि ज्यांना गरज आहे अशा मुलांपर्यंत ती पोचवणं ही दोन उद्दिष्टं आहेत. छापील विरुद्ध डिजिटल पुस्तकं अशा दृष्टीनं आम्ही या उपक्रमाकडे कधीच बघत नाही.’
यामुळेच स्टोरी वीव्हरसारखे प्रयत्न म्हणजे नव्या काळातल्या अगणित आणि मनोरम शक्यतांची नांदी ठरायला हरकत नाही.
– संध्या टाकसाळे
sandhyataksale@gmail.com
***
चित्र आणि चित्रफिती : स्टोरी वीव्हर
Facebook Comments

2 thoughts on “स्टोरी वीव्हर : अगणित आणि मनोरम शक्यतांची नांदी”

 1. सुरेख कल्पना, आणि त्यामागची तळमळ जाणवली.

 2. This message is posted here using XRumer + XEvil 4.0

  XEvil 4.0 is a revolutionary application that can break almost any anti-bot CAPTCHA’s.
  Captcha Recognition Google (ReCaptcha-1, ReCaptcha-2), Facebook, BING, Hotmail, Yahoo,
  Yandex, VKontakte, Captcha Com – and over 8400 other types!

  You read this – it means it works! 😉
  Details on the official website of XEvil, there is a free demo version.

  Check YouTube video “XEvil ReCaptcha2”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *