बालसाहित्यांक २०१७ लेख

गावाकडची वाचनसंस्कृती म्हणतात, त्याची वैयक्तिक गोष्ट…

दिवाळीचे दिवस. दिवसभर वावरात बसून भुईमुगाच्या शेंगा तोडायला आईला मदत करायची. नाहीतर वाळायला घातलेल्या शेंगांची राखण करत बसायचं. मामाची मोठी पोरं विहिरीच्या कठड्याला खेटून किल्ला बांधायची. त्यांच्यामागे लुडबुड करायची. त्यांनी नाहीच घेतलं त्यांच्यात, तर आपणच कुठंतरी हुंदडत बसायचं. हा उद्योग.
रात्री मात्र मजा असायची. जेवणखाण होऊन चड्डीला हात पुसत बाहेर यायचं. घराबाहेर एका बाजूला मोकळ्या वावरात शेकोटी पेटवून शंकरमामा बसलेले असायचे. तिथं कोंडाळं करायचं आणि मामांच्या गोष्टीसत्रात हरवून जायचं.
मामा सांगत असायचे, “चैतन्य महाराजांच्या समाधीच्या वारुळातून रोज असा एक नाग बाहेर यायचा. हा एवढा मोठा नाग. फण्यावर एवढा मोठा धाचा आकडा. तो बाहेर यायचा आणि महाराजांचा नातू होता, त्याला सोन्याचा होन देऊन जायचा. रोज असं चाललं होतं…”
इकडं आमची जाम टरकलेली. रात्रीचा काळोख. त्या शेकोटीच्या उजेडानं तो अधिकच गडद झालेला. तिकडं बाजूला उसाचं रान. सारखी सळसळ चाललेली त्याची. अशात नागाची गोष्ट कोण काढतं का? उसात लई जनावरं असतात, म्हणतात…
“पण एक दिवस काय झालं, जुन्नरच्या बाश्शाला कळली ती गोष्ट. का चैतन्याच्या वारुळातून रोज सोन्याचा होन मिळतो. त्याला वाटलं, का म्हंजे त्या वारुळात सोन्याचा लई साठा असणार. तो आपण घ्यायचा. मग त्यानं काय केलं, का आपल्या सुभेदाराला हुकूम दिला. म्हणला, ते सोनं माझ्यासमोर हाजीर करा. तसा तो सुभेदार गेला त्याची फौज घेऊन. घुसला महाराजांच्या मंदिरात. म्हणला, फोडा हे वारूळ. तसा त्याच्या एका सैनिकानं मारला का टिकाव वारुळावर, तशी त्या वारुळातून रक्ताची ही चिळकांडी उडाली…”
बाप रे! रक्त. चिळकांडी. कुठं लागलं असेल बरं चैतन्य महाराजांना? डोक्यातच टिकाव बसला असणार खण्णकन. अशी चीड आली त्या सुभेदाराची.
“…आणि काय चमत्कार झाला… त्या रक्तातून असे भुंगे निघाले. हे एवढाले भुंगे. लालभडक. आणि मग त्या भुंग्यांनी काय केलं, चावत सुटले ते सगळ्या सैनिकांना. दिसला सैनिक का चाव. का मेला सैनिक! सगळे सैनिक ढुंगणाला पाय लावून तोबा-तोबा करत पळायला लागले… पण एक सैनिक काय शिल्लक ठेवला नाही त्या भुंग्यांनी. हे जे दर्गे नि कबरी दिसत्यात ना आपल्या गावातून पार जुन्नरपर्यंत, त्या सगळ्या त्या भुंग्यांनी मारलेल्या सैनिकांच्या.”
मामांची ही गोष्ट ऐकल्यानंतर, आठवतंय, पुढचे आठ दिवस रस्त्यानं येता-जाता मुसलमानांच्या कबरी शोधत असायचो… की भुंग्यांनी मारलेले ते सैनिक? डोक्यात सतत तोच सिनेमा. कसा उगारला असेल टिकाव, कसे पळाले असतील ते सैनिक…
मामांकडे अशा गोष्टींचा भरपूर साठा असायचा. ते सांगायचे त्या नवनाथांच्या कथा म्हणजे तर धमालच. ते नवनाथ, त्यांची विविध अस्त्रं… एकदा तर त्यांनी एक अस्त्र टाकून सगळ्या देवांना झाडाला उलटं टांगलं आणि मग पवनास्त्र सोडून एवढा वारा आणला, की त्या देवांची सगळी वस्त्रंच उडून गेली… अशा त्या कथा.
एकदा उन्हाळ्याच्या सुटीत डिंगोरला गेलो होतो. तेव्हा अण्णांनी – माझ्या वडलांनी – सांगितली होती ती वर्‍हाड्या डोंगराची कथा. माळशेज घाटाजवळचा हा डोंगर. तीन बारक्याशा शिखरांचा. आजोबा सांगायचे, “ते सगळ्यांत मोठं शिखर दिसतंय, तो होता नवरा. त्याच्या मागं आहे नवरी आणि तिच्या मागं कलवरी. एकदा त्या रानातून त्यांचं वर्‍हाड चाललं होतं. मधी रस्त्यात त्यांना दिसलं पाणी. तेव्हा ते म्हणाले, की दुपारचा टाईम झालाय. इथंच गाड्या सोडू. म्हंजे बैलांना जरा आराम मिळंल. आपणपण जेऊन घेऊ. तेव्हा बायकांनी काय केलं, की बाजूलाच तिथं भलामोठा खडक होता. त्याच्यावर तीन दगडी रचल्या. चूल केली आणि त्याच्यावर ठेवला तवा. आता हळूहळू काय झालं, की त्या जाळानं खालचा खडक लागला तापायला. त्याला काय ती आग सहन होईना. तसा तो लागायला चुळबुळायला आणि मग गपकन त्यानं पाण्यातंच बुडी घेतली. सगळं वर्‍हाड त्याच्यासकट पाण्यात बुडालं. तेव्हापासून त्या डोंगराला म्हणतात वर्‍हाड्या डोंगर.”
आता आमच्या डोक्यात प्रश्न. की तो खडक कसा बुडाला? मग अण्णांनी सांगितलं, की तो खडक बुडाला, कारण तो खडक नव्हताच.
मग?
ते होतं कासव. त्याच्या पाठीवरच यांनी चूल पेटवली होती.
लहानपणी ऐकलेल्या या अशा गोष्टींतून मनामध्ये एक चमत्कारिक विश्व निर्माण झालं होतं. अतार्किक, अवास्तव, कल्पनेच्याही पलीकडलं. आणि कल्पनांना पंख लावणारं. खेड्यातलं ते वातावरणही त्याला बरंचसं कारणीभूत होतं.
ओतूर हे तेव्हा खेडंच होतं. तीन वेशींचं मोठं खेडं. गावात कुठं-कुठं कधीकाळी बांधलेल्या भेंडाच्या तटाचे अवशेष पाहायला मिळत. वेशी मात्र ताठ उभ्या होत्या. त्यामुळे आपोआपच गावाला जुनाट वाड्यासारखी एक कळा आलेली असायची. हे वातावरण अद्भुततेला पोषक. शिवाय अशा प्रत्येक गावाच्या म्हणून काही दंतकथा असतातच. ‘ओतूरमध्ये दर श्रावणी सोमवारी कपर्दिकेश्वराच्या मंदिरात तांदळाच्या पिंडी बनत. त्या आपोआप. म्हणजे मध्यरात्री गुरव जातो. मांडवीच्या डोहात तांदूळ भिजवून देवळात नेतो. मग डोळ्यावर पट्टी बांधतो. आणि हातानं ओल्या तांदळाचे असे ढीग करत जातो, की त्यातून आपोआप सुबक पिंडी निर्माण होतात. स्वतः देव बनवतो त्या पिंडी. एकदा ओतूरमधल्या एकानं तो सगळा प्रकार पाहायचा प्रयत्न केला होता. मध्यरात्री गुपचूप गाभार्‍याच्या दारातून तो पाहायला लागला, तसे त्याचे दोन्ही डोळे गेले…’
फार भारी वाटायचं हे सारं ऐकताना. पण अखेर किती दिवस त्याच त्या गोष्टी ऐकणार? चौथी-पाचवीपर्यंत तर त्या सगळ्या गोष्टी पार पाठ झाल्या होत्या. अर्थात त्या कुणी सांगू लागलं, की ऐकत राहाव्याशा वाटायच्या. पण त्यातलं नावीन्य संपलेलं होतं. ज्यात कल्पनांच्या भरार्‍या मारायच्या ते आकाश मर्यादित झालेलं होतं. आता काहीतरी नवीन हवं होतं. या वळणावर इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांच्या कथा आल्या होत्या. त्यात मन रमत होतं. छाती अभिमानानं फुगत होती. आज त्या शिवकथेतला ‘चमत्कार’ समजतो. तेव्हा तो समजण्याचं वय नव्हतं. अद्भुताची ओढ त्या कथांनी भागण्यासारखी नव्हती.
आज वाटतं, आयुष्यातलं ते फार मोक्याचं असं वळण होतं. तिथं ‘चांदोबा’ भेटला नसता, तर कदाचित पुढचं वाचनच गुंडाळलं गेलं असतं.
हा ‘चांदोबा’ भेटला शेजारच्याच घरात. आमच्या वाड्याशेजारीच गेनभाऊनानांचा वाडा. त्यांचा मुलगा भास्कर माझ्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठा. त्यांच्याकडं चांदोबा यायचा. नानांचा हातभट्टीच्या दारूविक्रीचा व्यवसाय असल्याने असेल, त्यांना दर महिन्याला असा पुस्तकावरचा खर्च परवडायचा. ते मासिक पहिल्यांदा कधी पाहिलं ते आता आठवण्यापलीकडचं आहे. पण भास्करच्या वाड्यात खेळायला जायचो, तेव्हा कधीतरी ते हातात आलं असेल. इंद्रजाल, भानामती, चकवा… एका क्षणात हे सारं करण्याची ताकद होती त्या मासिकात. मुखपृष्ठावरच्या चित्रांतूनच त्याचं गारूड सुरू व्हायचं. ते उंच, धिप्पाड, पिळदार बाहू असलेले राजे. त्यांच्या त्या कमनीय बांध्याच्या, कटिवस्त्र, कंचुकी आणि उत्तरीय परिधान केलेल्या वैजयंतीमालासारख्या नायिका. ते अकराळविकराळ राक्षस. आणि ते विक्रम-वेताळ. त्यांची मोहिनी अशी होती, की पुढे एकदा फँटम चित्रमालिकेची मराठी आवृत्ती हाती पडली, तेव्हा वेताळ हे त्याचं नाव पचनीच पडेना. वेताळ म्हणजे विक्रम राजाने खांद्यावर उचलून घेतलेलाच. त्या कथांचे लेखक आणि चित्रकार कोण होते कोणास ठाऊक. पण त्यांनी लहानपणी डोक्यातल्या कल्पनांच्या शेतीची चांगलीच मशागत केली.
या चांदोबानं नेमके काय दिले, वगैरे समीक्षकी थाटाचा प्रश्न हे लिहिताना उगाचच मनात येतो आहे. खरंच, काय दिलं त्यानं?
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वाचनातून आनंद मिळतो हे चांदोबातून समजलं. आता पोराला वाचनाची आवड लागली आहे हे आमच्या अण्णांच्या तोवर लक्ष्यात आलं होतं. ते ओतूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. तेव्हाच्या जिल्हा परिषदेच्या शाळांचं नाव जीवन शिक्षण मंदिर असं असायचं. त्यामुळे असेल कदाचित, त्या शाळेतल्या मुलांनी अवांतरही काही वाचावं अशी योजना असायची. शाळेची एक छोटीशी पाच-पन्नास पुस्तकांची लायब्री होती. एके दिवशी अण्णांनी त्यातली काही पुस्तकं आमच्या हाती ठेवली. म्हणाले, वाच. चांगली आहेत. थोरांची ओळख या मालिकेतल्या त्या छोट्या-छोट्या पुस्तिका होत्या. संतांची, राष्ट्रपुरुषांची चरित्रं. आज आठवतंय, ज्ञानेश्वर, बसवेश्वर, दादाभाई नौरोजी, पं. सातवळेकर, तात्या टोपे अशी बरीच नावं त्यात होती. त्यातली एक पुस्तिका तेवढी मला भावली होती. ते होतं गारिबाल्डीचं चरित्र. नेमकं तेच पुस्तक तेव्हा पारायण करावं इतकं का आवडावं? चांदोबाचा प्रभाव, दुसरं काय! थोरांची चरित्रं वाचून पोरानं संस्कार घ्यावेत हे तेव्हाच्या शाळाखात्याचं स्वप्नं मात्र आमच्या वडलांच्या स्वप्नाप्रमाणेच मोडीत निघालं, हे आता जाणवतंय!
ओतूरच्या बाजारपेठेत एका टोकाला भाट्यांचं स्टेशनरीचं दुकान होतं. असं उंच जोत्यावर बांधलेलं. चार-पाच पाय-या असलेलं. जाता-येता त्या दुकानात उभे असलेले काळी टोपी घातलेले म्हातारेसे भाटे दिसायचे. कोणत्याही दुकानाच्या पायर्‍या चढायचं ते वयच नव्हतं. जायचं तर वडलांचं बोट धरूनच. एरवी ते विश्व म्हणजे दुरून दर्शन घेण्याचंच. पाय रेंगाळायचेच त्या दुकानासमोर. त्या दुकानात वर टांगलेल्या दोर्‍यांना चिमट्यानं अडकवलेली पुस्तकं आता खुणावू लागली होती. अख्खी जादुई दुनियाच भाट्यांच्या चिमट्यांना लटकलेली होती. जादूचा घोडा आणि राजपुत्र, राजकन्या आणि काळा राक्षस… ती नावं तेव्हाही लक्षात ठेवण्यासारखी नसायची. खरंतर त्या वयात पुस्तकाचं नाव, लेखक यांत रस नसतोच कुणाला. मजकूर महत्त्वाचा. त्यात चित्रंसुद्धा आलीच. ते सारं उत्तम असणं महत्त्वाचं. वय वाढलं, की मग लेखक वगैरे गोष्टी महत्त्वाच्या ठरू लागतात. गाजलेल्या लेखकाच्या रद्दड लेखनालाही चांगलं म्हणायचं असतं हे समजू लागतं. ती राजकीय-सांस्कृतिक समज लहानपणी नसते.
शिवाय ओतूरसारख्या तेव्हाच्या खेड्यात आणखी एक बरं होतं. तिथं अजून इंग्रजी वाङ्मय पोचलेलं नव्हतं. त्यामुळे मनाला तोही काच नव्हता. इंग्रजी न वाचल्याच्या न्यूनगंडापासून मुक्त असं जगणं होतं ते. तो न्यूनगंड पुढं पुस्तकांवरचं लेखन वाचून आला. अजूनही तो गेलेला नाही. सात्र, काम्यू अन् टॉलस्टॉय, डिकन्स वगैरे नावं वाचून आपण धडपडत ते वाचायला जावं; तर कोणीतरी गंभीरपणे सांगतं, मुराकामी वाचायला हवा. म्हणजे आपण कायमचे मागेच. कारण कितीही डिकन्स वगैरे म्हटलं, तरी आपल्याला फ्रेडरिक फोर्सिथ आणि रॉबर्ट लडलममध्येच रस. पुढचं सारं वाचन हे अ-कथात्मक. त्याला अभिजाततेच्या दुनियेत किंमत नाही. पण हे क्लासिक वारं ओतूरमध्ये पोचलंच नव्हतं कधी. याचं कारण तेव्हा सकाळ आणि केसरीही मोजक्याच घरांमध्ये दुपारी केव्हातरी यायचा.
भाट्यांच्या दुकानातली ती रुपया-दीड रुपयावाली पुस्तकं मिळायची ती दिवाळी वा मे महिन्याच्या सुटीतच. विकत घेतलं जायचं एखादंच. बाकी सगळं वाचन मग देवाणघेवाणीच्या तत्त्वावर चालायचं. ज्याच्या घरात चार-पाच पुस्तकांची समृद्ध लायब्री, त्याच्या पुढं गोंडा घोळणं हे एक कामच होऊन बसायचं तेव्हा. अशी एक मोठी लायब्री होती नंदू भोर याच्याकडं.
नंदू म्हणजे माईंचा मुलगा. माई या अण्णांच्या शाळेतल्या शिक्षिका. आज्जीसारख्या होत्या त्या आम्हांला. खूप मायाळू. आणि तालेवार घरातल्या. शेती वगैरे होतीच त्यांची. शिवाय त्यांचे पती, भोरसरही ओतूरच्या हायस्कूलात शिक्षक होते. काही काळ आमचा दुधाचा रतीब त्यांच्याकडं होतं. रोज सकाळी उठून हातात किटली घ्यायची आणि त्यांच्या शेतातल्या घरी जायचं हे माझं काम.
गावाबाहेर उंब्रजपांदीला त्यांचं मोठं घर. छान सजवलेलं. आत फर्निचर वगैरे. तिथंच एका बाजूला बुटकंसं शिसवी कपाट. दरवाजाला काचा लावलेलं. हे नंदूदादाचं कपाट. त्याची वह्या-पुस्तकं त्यात असत. त्यातच एका कप्प्यात गोष्टीची पुस्तकंही. खजिनाच होता तो. किटलीत दूध भरून येईपर्यंत त्या कपाटातली पुस्तकं न्याहाळत बसणं हा आमचा कार्यक्रम. कधी-कधी तो द्यायचा त्यातलं एखादं वाचायला. तो दिवस म्हणजे अत्यानंदाचाच. चांगलं आठवतंय, त्याच्याकडं पहिल्यांदा ओळख झाली ती इंग्रजी अनुवादित पुस्तकांची. त्यातलं एक गोष्टीचं पुस्तक आजही चांगलंच आठवतेय. गुप्त खजिना हे त्याचं नाव. रॉबर्ट लुई स्टीव्हन्सनचं हे पुस्तक. १८८१-८२मध्ये लिहिलं गेलेलं. आज गूगल केल्यावर लक्षात आलं, की ते मराठीत आणलं ह. भा. वाघोलीकर म्हणून कोणा सद्लेखकाने. आमची अख्खी वाचकपिढी त्यांची आणि अर्थातच स्टीव्हन्सनची ऋणाईत आहे. झपाटून टाकलं होतं त्या गोष्टीच्या पुस्तकानं तेव्हा. तोवर आमच्यासाठी चाचा म्हणजे मोमीन गल्लीतला. गुप्त खजिन्यातले चाचे म्हणजे काहीतरी अलौकिकच होतं. ते सागरी जीवन, ते चाचे, खजिना, त्याचा नकाशा, आणि ती सारी पात्रं ही सारी वेगळीच दुनिया.
 
असंच एक गोष्टींचं पुस्तक म्हणजे सर्वपरिचित गलिव्हर्स ट्रॅव्हल्स. तिचा अनुवादही त्या काळात वाचल्याचं आठवतंय. आता मुळात ती राजकीय कादंबरी. उपहास ठासून भरलेला त्यात. उपहास तेव्हाच्या राजदरबारांबद्दलचा, राजकारण्यांबद्दलचा, त्यांच्या धोरणांबद्दलचा. ते लिलिपूटचे सहा इंची नागरिक काय किंवा ७२ फूट उंचीचे ब्रॉबडिंगनॅगवासी काय, त्यांतून जोनाथन स्विफ्ट तेव्हाच्या राजकारणावर भाष्यच करत होते. पण त्या कादंबरीतली चांदोबासम चमत्कृती मनाला मोहून टाकणारी होती. कल्पनाच भारी होती त्या कादंबरीची. गलिव्हरने सागरी सफरीवर जावे. त्याच्या जहाजाला काहीतरी दुर्घटना व्हावी. तो कसाबसा एखाद्या बेटावर पोचावा आणि तिथं त्याला कधी ही बुटकी तर कधी महाउंचीचीची माणसं भेटावीत. भन्नाटच होतं ते सगळं. म्हणजे अजून आठवतंय, की त्या ७२ फुटी मानवांच्या हाती तो सापडल्याचं वाचल्यानंतर त्यांच्या तावडीतून तो कधी एकदा सुटतोय असं झालं होतं तेव्हा. आता ‘वॉर ऑफ वर्ल्ड’धर्तीचे चित्रपट पाहताना हमखास त्या ब्रॉबडिंगनॅग देशाच्या रहिवाशांची आठवण येते. पत्रकारितेत काम करत असल्यामुळे लिलिपुटांचं राजकारण तर काय, नेहमीच दिसतं. ते लिलिपूट, त्यांचा शेजारी आणि कट्टर शत्रू देश ब्लेफस्कुडियन, त्यांच्यातलं सागरी युद्ध… हे सारं फारच परिचयाचं. पत्रकारितेत आल्यानंतर ही कादंबरी मुद्दामहून विकत घेऊन पुन्हा वाचली.
आतापावेतो जादूची चटई नि अल्लाउद्दिन आणि चेटकीण नि हिमगौरी आणि सात बुटके वगैरेंच्या वरची एक पायरी पार केली होती. हा काळ श्यामच्या आईचा आणि ताम्हणकरांच्या गोट्या-चिंगीचा. हे काही वेगळंच प्रकरण होतं. मनात द्वंद्व निर्माण करणारं. म्हणजे टॉम सॉयर आवडावा की श्याम? आमच्या चैतन्य विद्यालयाची ही कृपा. इंग्रजी शाळा म्हणायचो आम्ही त्याला. या शाळेतल्या मुलांच्या हातात तंगुसाच्या वा खाकी कापडाच्या पिशव्यांची दप्तरं नसत. ती मुलं हातात मोकळी वह्या-पुस्तकं घेऊन जात. त्यांचे विषयांचे तास ठरलेले असत. त्यात एक वाचनाचाही तास असे. हे भारीच.
गावातल्या काही जाणत्या मंडळींनी चालवलेली ही शाळा. रावत सरांसारखे कडक हेडमास्तर. तिकडे लांबवर ते दिसले तरी भीती वाटायची त्यांची. पण या कडक हेडमास्तरांनी शाळेत प्रत्येक वर्गासाठी गोष्टींच्या पुस्तकांची एक पेटी नेमून दिली होती. वाचनाच्या तासाला त्यातली पुस्तकं मुलांना दिली जात. त्यांनी ती वाचावीत. घरी घेऊन जावीत. पुढच्या तासाला परत आणावीत. काही महिन्यांनी ती पेटी बदलली जायची. खूपच छान कल्पना होती ती. त्या पेटीने आमचं वाचन वाढवलं. श्याम, गोट्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे त्या पुस्तकपेटीने भेटवला. याच दरम्यान पुस्तकांच्या खजिन्याची आणखी एक गुहा सापडली. तिचं नाव होतं – श्रीकृष्ण रामजी तांबे ग्रंथालय, ग्रामपंचायत, ओतूर.
ओतूरच्या नगरवेशीतून आत गेलं, की समोरच दिसतं पांढरीच्या मारुतीचं मंदिर. फार जुनं देऊळ ते. चावडीनंतर गावात मान असेल तो या पांढरीच्या मारुतीच्या मंदिराच्या कट्ट्याला. गुरुवारचा आठवडी बाजार भरे तो या परिसरातच. त्या मंदिराच्या बाजूलाच, मध्ये एक रस्ता सोडून एक भली मोठी गोदामासारखी इमारत होती. तिच्या एका खोलीत हे ग्रामपंचायतीचं ग्रंथालय होतं. पाच-सहा कपाटं आणि त्यात भरलेली पुस्तकं. त्यात बाबा कदम, पु. लं. देशपांडे, सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक हे महत्त्वाचे लेखक. फास्टर फेणेची बरीच पुस्तकं तिथं गावली. डिटेक्टिव्ह कथा वाचनाची पूर्वतयारीच त्या पुस्तकांनी करून घेतली.
या वाचनालयाची एक छानशी आठवण मनावर कोरली गेलेली आहे. ती अर्थातच फार पुढची, महाविद्यालयात असतानाची आहे. तोवर वाचनालयातील बरीचशी पुस्तकं वाचून झालेली होती. जी उरली होती, ती वाचण्याच्या लायकीची वाटत नव्हती. त्यामुळे तेव्हा आपसूकच मोर्चा वळायचा, तो नव्या पुस्तकांऐवजी जुन्या पुस्तकांच्या कपाटांकडे. फाटलेली, पानं गळालेली पुस्तकं असायची त्यात. एके दिवशी तिथं चांगल्या पुस्तकाची शोधयात्रा सुरू असताना हातात एक पान लागलं. सहजच ते वाचलं. वाचता वाचता गुंगूनच गेलो त्यात. मग त्या पुस्तकाची आणखी पानं शोधू लागलो. चघाळच झालं होतं त्या पुस्तकाचं. कुठं पानांचा एखादा गड्डाच हाती येई. कुठं एखादंच पान सापडे. बराच वेळ शोधून ती सारी पानं मिळवली. पुस्तक जुळवलं. तरी त्यांतली आधीची, मधली, नंतरची अशी अनेक पानं गायब होती. पण रजिस्टरमध्ये नोंद करून ते पुस्तक घरी आणलं. मराठीत पहिल्यांदाच तशा प्रकारचं पुस्तक वाचत होतो. भूत, भानामती, राजे, राण्या, गड-किल्ले, गुप्तहेर, लढाया, डावपेच, षड्यंत्रं… आणि त्याची ती खास भाषा. जुन्या मराठीशी नातं सांगणारी, संस्कृताळलेली, तरीही मनाची पकड घेणारी. रात्रभर जागून ते पुस्तक वाचून काढलं. तेव्हापासून ते पुस्तक शोधत होतो. दोन वर्षांपूर्वी ते सापडलं. आता त्यात फारसं विशेष काही जाणवलं नाही. पण तेव्हा त्या पुस्तकाने मोहून गेलं होतं मन. त्याचं नाव होतं – मर्मभेद. लेखक शशी भागवत.
ही कादंबरी पुन्हा त्या बालपणी वाचलेल्या जादुई पुस्तकांशीच नातं सांगणारी होती. आजच्या जादुई वास्तववादी कादंबर्‍यांच्या आवडीशी त्या बालपणातल्या वाचनाचं नातं जुळलेलं असेल? एकदा शोधायला हवं.
ओतूर हे तेव्हा लहानसं गावंच होतं. शहरी संस्कृतीकडे लांबून पाहत असलेलं एक गाव. त्या गावात जे वाचायला मिळालं, ते खूपच जास्त होतं असंच म्हणावं लागेल. त्या गावातही संस्कारक्षम वगैरे वयातल्या मुलांनी काय वाचायला हवं हे सांगणारे लोक होतेच. अशा माणसांमुळे दहावी वगैरे सुटल्यानंतर हातात श्रीमान योगी आणि मृत्युंजय आणि स्वामी या कादंब-या आल्याच. बहुधा त्या वयात या कादंबर्‍या वाचणं हे आमच्या पिढीचं भागधेयच होतं. पण त्याआधी वाचलेल्या जादुई पुस्तकांचा एक मोठा संस्कार मनावर झालेला होता. तो पुढेही गडदच होत गेला.
एकदा या पोराला नीट वाचता येतंय हे कळाल्यानंतर चातुर्मासात एखाद्या घरात पोथ्या वाचण्याची जबाबदारी त्याच्याकडं यायचीच. नववी-दहावीच्या वयातली आताची पिढी काय वाचते आणि मोबाईलवर काय पाहते त्याचा अंदाज लावणं कठीण नाही. त्या वयात आम्हांला पोथ्याही वाचायला लागायच्या. त्यातली सर्वांत खास पोथी नवनाथांची. वाचताना रंगून जायला व्हायचं त्यात. त्या नवनाथांच्या लीला, त्यांचे चमत्कार, त्यांची अस्त्रे, त्यांच्या देवांशी झालेल्या लढाया… नास्तिकतेच्या वळणावरचा तो अखेरचा थांबा होता.
पुढे आपसूकच वाचनाच्या आवडीनिवडी बदलत गेल्या. ओतूर कॉलेजात बी. ए. इंग्रजीला प्रवेश घेतल्यानंतर त्या भाषेचं एक मोठं दालन खुलं झालं. पण आता ओतूरमधल्या आमच्या वाचनसंस्कृतीचा विचार करताना जाणवतंय, की साहित्य कथात्मक असो वा अ-कथात्मक – फिक्शन वा नॉन फिक्शन – त्यातली गोष्टीची आवड मात्र कधीही सुटली नाही. लहानपणी झालेले संस्कार सहजी पुसले जात नाहीत.
– रवि आमले
ravi.amale@gmail.com
***
चित्रस्रोत : आंतरजाल
Facebook Comments

2 thoughts on “गावाकडची वाचनसंस्कृती म्हणतात, त्याची वैयक्तिक गोष्ट…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *