बालसाहित्यांक २०१७ लेख

आम्ही एकटे कुठवर पुरे पडणार?

रत्नाकर मतकरी हे मराठी बालनाट्य चळवळीमधलं एक कळीचं नाव. प्रतिभा मतकरी आणि रत्नाकर मतकरी यांनी मिळून १९६२ साली स्थापन केलेल्या ‘बालनाट्य’ या संस्थेच्या माध्यमातून बालरंगभूमीवर बहुआयामी काम केलं आणि नाट्यप्रेमींची एक संपूर्ण पिढी घडवली. एकूण बालवाङमयाचं काय चालू आहे, याबद्दल विचार करत असताना – प्रौढ रंगभूमीइतक्याच गंभीरपणे, निष्ठेनं, कलेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता, कलानिर्मिती आणि प्रेक्षकशिक्षण असं दोन्ही एकाच वेळी करत मुलांसाठी नाट्यनिर्मिती करणार्‍या मतकरींचे अनुभव जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं होतं. त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
रत्नाकर मतकरी
बालनाट्य चळवळीचं सध्या काय सुरू आहे?
बालनाट्याच्या एकूण क्षेत्रातच सध्या फार काही चालू आहे असं दिसत नाही. बालनाट्यं होतात तरी कुठे? थोडीफार सुट्ट्यांमध्ये होतात. सुट्टीपूर्वी एखादं शिबिर घेतलं जातं. त्यातून त्यांना नट मिळतात. मुलांना नाटकात काम करता यावं म्हणून पालक खर्च करायला तयार होतात, ते याच शिबिरांतून. दोन-तीन जण असे आहेत, की जे शाळेच्या सुट्ट्या आणि परीक्षांची वेळापत्रकं नीट हेरून त्याबरहुकूम प्रयोगांचं वेळापत्रक तयार करतात. मुलांनाही ते सोयीचं जातं. पण अलीकडे दोन-तीन वर्षांपासून हेही अगदी तुरळक होताना दिसतं. हल्ली मुलांचं नाटकं पाहणंही कमी झालं आहे. एकतर त्यांना कॉम्प्युटर आहे. त्यावर म्हणाल ते ते घरबसल्या पाहता येतं. त्यात त्यांचे अनंत क्लासेस्. त्यांना वेळ असतो कुठे? त्यामुळे एकाच तिकिटात दोन नाहीतर तीन बालनाट्यं – म्हणजे नाटिका – दाखवून मोकळं व्हायचं असाच खाक्या दिसतो. आम्ही तसं करत नसू. आम्ही एकच पूर्ण लांबीचं नाटक करत असू. ‘निम्माशिम्मा राक्षस’सारखं. एक पूर्ण लांबीचं नाटक आणि चांगल्या नटांनी त्यात अभिनय करणं  अशीच आमच्या बालनाट्याची संकल्पना होती. कारण आम्ही नाटकं धंद्यासाठी करत नसू. अलीकडच्या लोकांना थोडेफार का होईना, पैसे कमवायचे असतात. सुट्टीत पन्नास ते पंच्याहत्तर प्रयोग झाले की सुटतातही तेवढे पैसे. त्या नाटकांत काम करणार्‍या मुलांच्या पालकांनाही फार अपेक्षा नसतात एकूण उपक्रमाकडून. आपलं मूल वेगळ्या रंगभूषेत-वेषभूषेत रंगमंचावर येऊन गेलं, एवढ्यातच ते खूश असतात, त्यासाठी खर्चही करतात. आमचं असं नव्हतं. नाटक चालवून पैसे कमावणं या उद्देशापेक्षा दर्जेदार नाटक करणं, ‘मुलांचं नाटक’ असं त्याला न म्हणता गंभीरपणे नाटक करण्याचाच तो एक आविष्कार असं मानून नाटक करणं, त्याकडे नाटकाच्या प्रायोगिकतेचा एक नमुना म्हणून पाहणं… असा रंगभूमीचा ध्यास आम्हांला होता. दुसरं असं, की आमची नाटकं होता होईतो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचली पाहिजेत, असाही आमचा आग्रह असे. शाळा, झोपडपट्ट्या, रुग्णालयं अशा अनेक ठिकाणी नाटक घेऊन पोचण्याचा आम्ही स्वतःहून प्रयत्न करत असू. आता असं कुणी करत नाही. मुदलात आपण मुलांपर्यंत पोचायसाठी प्रयत्न करायला हवेत, हा घटकच त्या नाटकांच्या विचारांतून गायब झालेला दिसतो. सध्याची एखादी लोकप्रिय कल्पना उचलायची – तीही टीव्हीवरच्या मालिकेवर किंवा कॉमिकमधल्या पात्रावर आधारित असलेली, स्वतंत्र नाही – आणि त्याभोवती काहीतरी रचायचं. त्यात नाट्यगुण आहे की नाही, हा विचार दूरच. तुम्ही पन्नास प्रयोग केलेत, आम्ही पंच्याहत्तर करून दाखवतो, इतकीच ईर्ष्या. चांगल्या दर्जाचा अभिनय, उत्तम निर्मितिमूल्यं, दिग्दर्शनामागे काही विचार – या सगळ्या गोष्टी जमेसही नसतात. याला काय बालनाट्य चळवळ म्हणणार!    
होय, सुट्ट्यांमधल्या नाटकांच्या जाहिराती पाहिल्या, तर मालिकांची नावंच दिसतात खरी…
तेही करायला हरकत नाही. पण त्या व्यक्तिरेखांवर तुम्ही काही काम कराल की नाही? तेही नाही. मध्यांतरी आमच्या ‘वंचितांचा रंगमंच’ची ६ नाटकं आणि प्रस्थापित संस्थांची ६ नाटकं – अर्थात बालनाट्यंच – अशी मी एका बालनाट्य महोत्सवामध्ये पाहिली. एका दिवशी चार नाटकं असे सलग तीन दिवस चाललेला तो महोत्सव होता. झोपडपट्टीमधल्या मुलांनी बसवलेली नाटकं आणि प्रस्थापितांनी बसवलेली नाटकं यांत जमीन-अस्मानाचा फरक होता. आमच्या मुलांच्या नाटकांना गोष्ट होती, त्यांची स्वतःची वास्तव अडचण मांडणारी अशी गोष्ट होती. कपडेपट चकाचक नव्हता, निर्मितिमूल्यं फार महागडी नव्हती. उलट प्रस्थापितांच्या नाटकांमध्ये अतिशय किमती वेशभूषा होती. उत्तम आणि हुबेहूब लोकप्रिय कार्टून कॅरेक्टरच्या वेशातला एक नट मुलांबरोबर उभा, इतर मुलं रंगमंचावर रांगेत उभी राहिलेली. मग संगीत वाजायला लागलं. कार्टून कॅरेक्टर रंगमंचावरून खाली उतरलं. प्रेक्षकांमध्ये त्यानं एक फेरी मारली. आणि तो नट परत गेला. बस. बाकी काही नाही. अरे? हे नाटक आहे? यात त्या नाटकात काम करणार्‍यांचा दोष नाही काही. लिहिणार्‍यांना याहून जास्त काही सुचत नाही. लिहिणारे मुळात लेखकच नाहीत. कसलीतरी लोकप्रियता वापरून घेण्यासाठी आणलेले काहीतरी लिहून देणारे लोक आहेत, ही अडचण आहे.
‘वंचितांचा रंगमंच’..?
हा आम्ही अलीकडे – ‘बालनाट्य’च्या सुवर्णमहोत्सवानंतर राबवलेला उपक्रम. ठाण्यातल्या ‘समता विचार प्रसारक संस्थे’च्या सहकार्यानं. झोपडपट्ट्यांतून राहणार्‍या, गरीब मुलांना नाटक करता यावं म्हणून केलेला. तो अतिशय यशस्वी झाला. नाटक तर सोडाच, पण या मुलांनी कधी नाट्यगृहाची इमारत बघितलेलीदेखील नसे. पहिला प्रयोग आम्ही काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात केला, तेव्हा मुलं इमारत बघण्यात, लिफ्टचा वापर अनुभवण्यातच हरखून गेलेली असायची. आपण आपल्या मुलांसाठी जे सहज गृहीत धरतो, ते त्यांच्यासाठी इतकं अप्रूपाचं असलेलं बघून फार उदास वाटायचं सुरुवातीला. पण पोरं रमली आता. उत्सुकतेनं ‘कधी करायचं नाटक?’ असं विचारतात, त्यातून आत्मविश्वास मिळवतात.
मुलांसाठी नाटक लिहिताना काही वेगळ्या गोष्टींचं भान राखावं लागतं का?
बालनाट्यं लिहिणारा लेखक नाट्यक्षेत्रात शिरण्यापूर्वीची उमेदवारी म्हणून बालनाट्यं लिहिणारा नको, तो उत्तम लेखकच हवा. मुलांना समजायला जड जाणार नाही अशा शैलीत लिहिणारा, किंवा मुलांना मजा वाटेल, हसू येईल, त्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देईल अशा ताकदीनं लिहिणारा लेखक हवा. साधी गोष्ट आहे – अर्कचित्र किंवा व्यंगचित्र (cartoon) काढायचं असेल, तर तुम्हांला आधी उत्तम चित्र काढता येणं आवश्यक असतं. शरीररचना आणि प्रमाणबद्धता यांचं उत्तम भान असावं लागतं. नजरेत एक तिरकसपणा असायला लागतो. ही सगळी कौशल्यं एकत्र येतात, तेव्हा उत्तम व्यंगचित्र वा अर्कचित्र रेखाटलं जातं. उगाच कसंही-वेडंवाकडं-दर्जाहीन काढलंय, म्हणून त्या चित्राला व्यंगचित्र म्हणता येत नाही. तसंच हेही आहे. लेखन उत्तम असलं पाहिजे आणि ते मुलांना आवडेल, भिडेल असंही असलं पाहिजे. दुर्दैवानं फार कमी लोकांनी मुलांसाठी लिहिलं. आधीच्या पिढीत एक भा. रा. भागवत. त्याआधी चिंविंनी मुलांसाठी थोडी पुस्तकं लिहिली आहेत. दुसरे ना. धों. ताम्हनकर. ‘गोट्या’, ‘चिंगी’ आणि ‘खडकावरला अंकुर’. बालसाहित्यातच असे मोजके लोक. त्यातही नाटक लिहिणं ही अधिकच वेगळी, तंत्र आवश्यक असणारी गोष्ट… तेंडुलकर, सई परांजपे, पुलं अशा मोजक्या सिद्धहस्त मंडळींनी मुलांसाठी नाटक लिहिलं. अशा विशिष्ट प्रकारे, विशिष्ट वाचकासाठी लिहिणं हे सोपं काम नव्हे, अवघडाहून अवघड आहे. मोठ्या माणसांना जो आशय सांगायचा, तोच आशय. पण सोपा, गमतीदार करत सांगायचा. विंदांची बालगीतंच घ्या. त्यांची बालगीतं आणि इतरांची बालगीतं यांत जमीनअस्मानाचा फरक आहे! असं लिहिणं सोपं कसं असेल? ती ‘स्पेशलाइज्ड ब्रांच’ आहे. त्यात काम करणारे लोक दुर्मीळच असणार. पण हे किती खास, अप्रूपाचं, कौतुकाचं आहे, हे दुर्दैवानं लोकांच्या लक्ष्यात येत नाही. चार दुर्बोध लेखक घ्यायचे आणि त्यांचाच फक्त उदो-उदो करत बसायचं अशी आपल्याकडच्या साहित्यप्रेमींची मानसिकता आहे. बालसाहित्य या जॉन्राबद्दल त्यांना काही माहीतच करून घ्यायचं नसतं, तर पुढे काय बोलणार!
 
सज्ञान नटांनी बालरंगभूमीवर काम केलं पाहिजे, या तुमच्या भूमिकेबद्दल थोडं सांगाल का?
एकतर मुलांची कामं मुलांनी करायची, मोठ्यांनी मोठ्यांची हे तर्काला धरून आहे. मुलांना नुसत्या मिशा लावून वा पोरींना साड्या नेसवून व्यक्तिरेखा विश्वासार्ह कशा वाटणार? त्या व्यक्तिरेखेसाठी जो विचार, जी प्रगल्भता नटात असायला हवी, ती मुलांच्यात कशी असणार? त्यामुळे हे करायचं नाही, ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती. पूर्वी पुरुष स्त्रीच्या भूमिका करत. तेव्हा दुसरा काही इलाजच नव्हता, त्यामुळे ते खपूनही जाई. पण आता चालेल का? विडंबनासारखा काही उद्देश असेल, तरच चालेल. एरवी नाही. ‘ग्रिप्स थिएटर’नं त्यांच्या नाटकांत याच्या बरोबर उलट तडजोड केली. त्यांनी जेव्हा मुलांसाठी नाटकं केली, तेव्हा त्यांना वर्षभर तो उपक्रम चालवायचा असे. त्यांना वर्षभर मुलं कामासाठी उपलब्ध असणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मोठ्या माणसांनी मुलांची कामं करायची अशी तडजोड ते करत असत. आपण व्यावसायिकरीत्या चोख काम करताना अशी तडजोड का करायची? ते विश्वासार्ह वाटणार नाही. दुसरं म्हणजे, मुलांसाठीच तर नाटक आहे ना, त्यांना काय कळतंय, करा तडजोड – ही वृत्तीच मला मान्य नाही. मी जे लेखकाबद्दल वर म्हणालो, तेच इथेही लागू. आमच्याकडे कायम अतिशय चांगल्या नटांनीच कामं केली. दिलीप प्रभावळकर, अजय वढावकर, रवी पटवर्धन, मीनल परांजपे यांच्यासारखे कसलेले नट होते. पुढे ‘येलो’ चित्रपट करणार्‍या व ‘डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी’ असा मान मिळवणार्‍या महेश लिमयेनं आमच्याकडे सुरुवातीच्या काळात काम केलं. पंकज विष्णू या आजच्या लोकप्रिय अभिनेत्यानंही. फक्त नटच नव्हे, इतरही निरनिराळ्या क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या पण गंभीरपणे अभिनय करणार्‍या लोकांनी आमच्या नाटकांमधून काम केलं. न्यायमूर्ती अजित शहा हे अशांपैकी एक नाव. त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. एकदा कोर्टाच्या आवारात मला बघून ते पुढे झाले आणि त्यांनी विचारलं, “मला ओळखलंत का? मी तुमच्या ‘इंद्राचे आसन, नारदाची शेंडी’मध्ये काम केलं होतं.” मी चकित! वृत्तनिवेदक प्रदीप भिडे हाही आमच्या नटांपैकी. ‘बालनाट्य चळवळ हे आमचं विद्यापीठच होतं’ असं तो आजही म्हणतो. आमच्या कामामागे काहीएक तत्त्वाची बैठक होती. मुलांना आवडेल म्हणून काहीतरी अतिशयोक्ती करायची किंवा अतिरंजित अभिनय करायचा, या मोहाला आवर घातला जायचा. कुणी पाय घसरून पडेल आणि मग मुलं हसतील, मग पाडा दणादण लोकांना, असले सवंग प्रकार आम्ही करत नसू. दिलीप प्रभावळकर चेटकीचं काम करायचा. ही चेटकी म्हणजे एक म्हातारी बाई. तिची फजिती बघून मुलं हसायची खूप. पण म्हातार्‍या, विद्रूप बाईची फजिती बघून हसत नसत, तर तिचे मूर्खासारखे नि दुष्ट बेत राबवताना ती तोंडघशी पडते म्हणून हसत असत. हे अभिनयातून पोचवणं ही दिलीपची जबाबदारी होती, नि तो ती गंभीरपणे पेलत असे. ही काही मूलभूत नैतिक तत्त्वं आम्ही कायम पाळली. अशी तत्त्वं पाळून, उत्तम दर्जा राखणं, योग्य ते संस्कार करणं आणि मुलांपर्यंत पोचण्यासाठी अथक प्रयत्न करत राहणं, हे किती कठीण काम आहे हे अनेकांच्या लक्ष्यात येत नाही. ‘उंः! मुलांचंच तर आहे नाटक!’ अशा कॅज्युअल दृष्टिकोनातून ते बालरंगभूमीकडे पाहतात.
बालनाट्याला भाषा आणि प्रांताच्या मर्यादा पडतात का?
माझ्या मते अशा मर्यादा कोणत्याही नाटकाला नसाव्यात, नसतात. बालनाट्य काय किंवा मोठ्यांचं नाटक काय. मुंबईतही हिंदी, इंग्रजी, गुजराथी नाटकं कित्येक वर्षं होत आली आहेत. त्यांना काय त्या-त्या भाषेचेच प्रेक्षक फक्त जातात, असं थोडंच आहे? ‘निम्माशिम्मा राक्षस’ गुजराथीत गेलं. मी ‘यक्षनंदन’ नावाचं नाटक केलं होतं, ते गुजराथीत प्रागजी डोसा यांनी नेलं. ग्रॅँटरोडच्या एका शाळेत नामदेव लहुटे म्हणून शिक्षक होते. त्यांनी माझी काही नाटकं गुजरातीत भाषांतरित करून केली. आत्माराम भेंड्यांनी आय. एन. टी.साठी माझं ‘यक्षनंदन’ करून पाहिलं, पण नाटक मुलांपर्यंत पोचवणारे कार्यकर्ते हाताशी नसल्यामुळे ते चाललं नाही. त्यासाठी कार्यकर्तापातळीवर जे प्रयत्न घ्यावे लागतात, त्या प्रयत्नांचा स्वतः भेंडेंचा पिंड नव्हता. पण वनलता मेहतांनी – ती सुधा करमरकरांच्याच जातकुळीची, अस्सल कार्यकर्ती – गुजरातीत ‘चालो बाटुकजीना देशमां’ असं त्याचं रूपांतर केलं, ते मात्र उत्तम चाललं. कारण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न.
मुलांची नाटकं आणि मोठ्यांची नाटकं यांत तुमच्या दृष्टीनं काय फरक असतो? असावा? मुलांच्या नाटकात अद्भुतरस, परीकथा या प्रकारच्या गोष्टी प्रामुख्याने असल्याचं दिसतं. ते कशामुळे?
मुलांच्या नाटकात अद्भुतरस असतो, असं म्हणणार्‍या लोकांनी मुलांची नाटकं फारशी पाहिलेली नसतात. त्यांनी नुसती नावं ऐकलेली असतात. एक उदाहरण देतो. ‘राक्षसराज झिंदाबाद’ या नाटकाचं नाव तुम्ही ऐकता. तुम्हांला वाटतं, हे राक्षसाची गोष्ट असलेलं नाटक आहे. आणि मग तुम्ही म्हणता, हं… मुलांचं नाटक आहे ना, म्हणून त्यात जादूबिदू असणार. पण नाटकात काय आहे ते तुम्हांला माहीत आहे का? राक्षसांचं राज्य आणि माणसांचं राज्य या दोन, दोन राष्ट्रांना समांतर असणार्‍या संकल्पनांविषयीचं ते नाटक आहे. काहीसा राजकीय विचार व्यक्त करणारं. तसंच ‘इंद्राचं आसन आणि नारदाची शेंडी’बद्दल. अणीबाणीच्या वेळी शाहीर साबळे म्हणाले होते, “इंद्राचं आसन कशाला, हे ‘इंदिराचं आसन’ म्हणूनसुद्धा चपखल बसेल!” तर – असे अनेक अर्थ मुलांच्या नाटकाला असू शकतात, असतात. आम्हीच किती वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करून पाहिली. ‘अदृश्य माणूस’सारखी विज्ञानकथा, ‘सावळ्या तांडेल’सारखं ऐतिहासिक नाटक – सूचक नेपथ्य नव्हे हां! वास्तववादी नेपथ्यासह केलेलं नाटक – अगदी बोटीचा डेक, तोफा, लाकडी पिंप यासकट केलेलं, ‘इंद्राचे आसन’सारखं लोकनाट्याचा-पौराणिक फार्सचा बाज असलेलं नाटक… किती प्रकारचे प्रयोग केले.
सावळ्या तांडेल
ओघानं आठवलेली मजा म्हणजे, तेव्हाही ‘इंद्राचे आसन’मध्ये देवांचं विडंबन नाहीय, नारदासारख्या फुटकळ दैवतांना घेऊन रचलेली गोष्ट आहे – असं आम्ही प्रेक्षकांना सांगत असू नि त्यांना ते पटत असे. हल्लीइतकी भीषण परिस्थिती नव्हती‍! असो. तर – नेपथ्यातही आम्ही अनेक प्रयोग केले. साहित्य संघासाठी १९६० सालाच्या सुमारास सुधा करमरकरनं जेव्हा माझं ‘मधुमंजिरी’ केलं; त्या वेळी मला असं वाटत असे, की इतर नाटकांसारखीच हीदेखील पूर्ण लांबीची, वास्तववादी आणि तपशीलवार नेपथ्यानिशी केलेली नाटकं असावीत. ती त्या प्रकारे केली. मग माझ्या असं लक्ष्यात यायला लागलं, की गोष्टीच्या ओघापेक्षा आणि वेगापेक्षा मुलांची कल्पनाशक्ती जोरात धावत असते. ते समोरच्या वास्तववादी तपशिलांपेक्षाही खूप काही कल्पनेत रंगवून पाहत असतात. अनेक स्थळं कल्पनेतून समोर सहज उभी करू शकतात. त्यांना संपूर्ण नेपथ्य वास्तववादी असण्याची गरज नाही. त्यातून मग ‘निम्माशिम्मा राक्षस’ची कल्पना सुचली. त्यात एक सूत्रधार असे. तो कापड हातात घेऊन एक नदी तात्पुरती उभारे आणि प्रेक्षकांना विश्वासात घेई. मुलं त्याला प्रचंड दाद देत. हे ‘ब्रेकिंग द फोर्थ वॉल’ त्यांना नीटच समजून येई. तर विषय, नेपथ्य, जॉन्रा.. असे अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग आम्ही केले. फक्त अद्भुतरसावरच थांबलो नाही. अद्भुताकडेही एका वेगळ्या तिरकस वास्तववादी दृष्टिकोनातून पाहायला मुलांना शिकवलं.
इंद्राचंं आसन नारदाची शेंडी – दिलीप प्रभावळकर आणि इतर कलाकार
बालनाट्याच्या सध्याच्या दशेमध्ये वाचन कमी होण्याचा आणि मराठीची पिछेहाट होण्याचा किती वाटा आहे?
आता खोटं का बोला? माझी मुलं खूप वाचतात. सुप्रिया आणि गणेश, दोघंही. मराठी आणि इंग्रजी, दोन्ही. नातवंडांनाही वाचनाची आवड आहे. पण फक्त इंग्रजी. माझंसुद्धा काही वाचत नाहीत. ‘आजोबांनी लिहिलंय म्हणून तरी वाचा’ असं सांगूनही वाचत नाहीत. त्याला आपण काय करणार? प्रत्येक घराची आपली अशी एक संस्कृती असते. महत्त्वाकांक्षांची जातकुळी असते. आपण ज्याला व्यक्तिमत्त्वविकास म्हणतो, त्याचाही साचा आपण ठरवलेला आहे नि तो परदेशाच्या धर्तीवरच बेतलेला आहे. नेहरूंपासूनचं आहे ते. तो जो सगळा बुद्धिवादी वर्ग होता, त्यांनी परकीय संस्कृतीमधल्या सुटाबुटासारख्या वरवरच्या गोष्टी तेवढ्या उचलल्या. त्यांची मुलंही त्याच दिशेनं गेली. त्यामुळे यश मिळवायचं असेल, चांगल्या नोकर्‍या मिळवायच्या असतील, तर आपल्या पोराला इंग्रजी आलं पाहिजे ही समजूत बळावत गेली. पैशाकडून परवडत नसलं, तरी मोलकरणीही आपल्या पोरांना इंग्रजी शाळांत घालतात. हे सगळं तुम्ही कसं बदलणार? नाही बदलू शकत. मराठी न का वाचेनात, वाचन तरी पोरांनी केलं पाहिजे, असे प्रयत्न मात्र आम्ही करतो. चांगलं नाटक करायचं असेल, तर चांगलं वाचनही आवश्यक आहे हे आम्ही ‘वंचितांचा रंगमंच’च्या मुलांना कायम सांगतो. वाचन वाढवण्यासाठी निरनिराळे प्रयोग करतो. फिरत्या ‘सिक्स बॅग्ज’ लायब्ररीसारखे उपक्रम चालवतो. त्यासाठी पुस्तकं गोळा करतो, पुस्तकं देण्याची आवाहनं करतो.
पाश्चात्त्य रंगभूमीवर बालनाट्य चळवळीचं काय चालू आहे?
त्यांना कशाला करावी लागेल चळवळ? त्यांच्याकडे मोठ्यांच्या रंगभूमीवरच, मोठ्यांच्या रंगभूमीसारखीच गंभीरपणे मुलांची नाटकं होतात. ‘लायन किंग’ काय, ‘स्पायडर मॅन’ काय… ही धो-धो चाललेली नाटकं आहेत. दोन-दोन महिने आधीपासून तिकिटं काढावी लागतात, इतकी जोरात चाललेली नाटकं. आणि तीही मोठ्यांच्या रंगभूमीवर. लोक त्याकडे ‘मुलांची नाटकं’ अशा संकुचित नजरेनं पाहत नाहीत. ‘नाटक’ इतक्या एकच निकषातून पाहतात. आपल्याकडे प्रौढांची रंगभूमी म्हणजे आपल्याला काहीतरी थोर कळलंय असा आव असतो किंवा मग आपण फार गंभीर साहित्याचे शौकीन आहोत, असं तरी दाखवायचं असतं. तसं तिथे नाही. नाटक म्हणजे नाटक. उत्तम नाटक हे उत्तम नाटक. मग विषय कुठला का असेना!
तंत्रदृष्ट्या श्रीमंत, देखणं, विषयाला साजेसं सादरीकरण करता यावं; म्हणून किती कष्ट घेतात ते लोक! दोन जवळजवळची नाट्यगृहं एकत्र बांधून नाटकाला अवकाश उपलब्ध करून देण्यापासून ते त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी तयार करून देण्यासाठी अवाढव्य खर्च करण्यापर्यंत. उदाहरणार्थ, ‘फॅँटम ऑफ दी ऑपरा’मध्ये नंतर खाली पडताना दाखवता येईल असं एक भलं मोठं झुंबर नेपथ्यकाराला हवं होतं. ते नेहमीच्या रंगमंचाच्या मापात बसेना, तर त्यांनी चक्क रंगमंचातच सुधारणा करून घेतल्या. एका झुंबरासाठी. त्यासाठी ते कांकू करत नाहीत. शिवाय मुलांच्या नाटकांची तिकिटं आहेत, म्हणून ती काही स्वस्त असत नाहीत. इतर चार नाटकांइतकीच असतात. लोक ती हौसेनं काढतात आणि नाटक पाहतात. प्रेक्षकवर्ग फक्त मुलांपुरताच मर्यादित असत नाही. शिवाय मुलांसाठी खास ‘ख्रिस्मस प्लेज’ वगैरे असतातच.
पण खरं सांगायचं, तर हे फक्त पैशापुरतं नसतं. मी एक उदाहरण देतो.  मी ‘स्पायडर मॅन’ हे नाटक मी ब्रॉडवेवर पाहिलं. त्यात त्यांनी एक गंमत केलीय. कॉमिक्समध्ये कसा कॅमेर्‍याचा डोळा असल्यासारखं असतं – आपल्याला भिंतींचं विहंगम दृश्य दिसतं, जमिनीपाशी कॅमेरा ठेवून वर तिरकं पाहिलं तर कसं दृश्य दिसेल, तसं चित्र असतं… – हेच त्यांनी नाटकाच्या नेपथ्यातही आणू पाहिलं आणि यशस्वीपणे आणलंही. कॉमिक्समध्ये जसं ‘टू बी कंटिन्यूड’ म्हटलं जातं, तसंच मध्यांतरात म्हटलं आणि त्या नाटकाला कॉमिक्सच्या अनुभवाचा पोत दिला. आता हे करायला पैशाची काय गरज आहे? गरज आहे ती बुद्धिमत्तेची. दुसरी एक गंमत म्हणजे त्यांचा रंगमंचावरचा स्पायडरमॅनही सिनेमातल्यासारख्या निमिषार्धात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोचतो. हे करायला काही तांत्रिक चमत्काराची आवश्यकता नाही. एकाच नटाऐवजी अनेक नटांची योजना करून हा डोळे दिपवणारा परिणाम साधता येतोच की, जो त्यांनी साधलाय! मध्येच एकदा जेव्हा चेहर्‍यावरचा मुखवटा दूर सारायची वेळ येते, तेव्हा स्पायडरमॅनची भूमिका करणारा मुख्य नटच त्या जागी असेल, इतकी खबरदारी घ्यायची फक्त. आपल्याला काहीसुद्धा कळत नाही. शेवटी ‘कर्टन कॉल’च्या वेळी इतके सगळे स्पायडरमॅन मानवंदना स्वीकारायला येतात, तेव्हा आपल्याला ते गुपित कळतं आणि आपण चकित होऊन दाद देतो!
हे करायला पैसे वा तंत्रज्ञान नाही लागत, कल्पनेची झेप लागते. आणि मुख्य म्हणजे बालरंगभूमी ही रंगभूमीचीच एक शैली आहे, दुय्यम शाखा नव्हे, हे भान असावं लागतं.
उत्तम लेखक आणि उत्तम नट हे जसे बालरंगभूमीकरता अत्यावश्यक आहेत, तसं प्रेक्षकांचं नाही का? त्यांनी त्यांच्या बाजूनं काहीच कष्ट घेऊ नयेत?
मी असं म्हणेन, की आम्ही आमच्या प्रेक्षकवर्गाला प्रशिक्षण देऊन तयार केलेलं होतं. त्याआधी मुलांचं नाटक ही संकल्पनाच नव्हती. त्यामुळे त्याचा प्रेक्षक असणार कसा? आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करून तो तयार केला. मुलांना नवीन, चांगलं काही बघायला, करायला, शिकायला पाठवावं असं घरोघरी वाटतं. पण शाळांमधून ही जाणीव नसते. आपण जे मुलांना देतो आहोत, त्यांच्यासाठी जे करतो आहोत, तेच पुरेसं आहे, अशी काहीतरी विचारपद्धती. शाळांच्या बाबतीत ते आजही बदललेलं नाही. मुलांना विकासासाठी नाटक कशाला हवं, असं अनेक शाळांचं म्हणणं असे. रविवारी नाटकाकरता शाळेत या, अशी विनंती शिक्षकांना केली, तरी ते तयार होत नसत. एकच रविवार तर मिळतो… तो कुठे नाटकासाठी घालवायचा, असा प्रश्न. सगळीकडे हाच अनुभव. शाळेला काहीसुद्धा करावं लागणार नसे. शनिवारी नाटक आहे, इतकी नोटीस लावायची. बस. बाकी सगळं आम्ही करत असू. पण त्यातही धड सहकार्य करत नसत. परीक्षांची वेळापत्रकं सांगत नसत. एखाद-दुसरा नियम सिद्ध करणारा अपवाद. भायखळ्याच्या ह्यूम हायस्कूलमध्ये आम्ही ‘निम्माशिम्मा राक्षस’ केलं. त्यांच्याकडे एक परदेशी मिशनरी मुख्याध्यापिका होत्या. त्या स्वतः नाटकाला आल्या. शिक्षकांसाठी काही प्रशिक्षण आम्ही करू का, अशी चौकशी केली. त्यांना या उपक्रमात रस होता. आम्हांलाही उत्साह वाटला. पण पुढच्या वर्षी आम्ही नवं नाटक घेऊन गेलो, तोवर मुख्याध्यापक बदललेले! ‘आम्ही आमच्या शाळेत नाटकं-बिटकं काही करत नाही!’ हे उत्तर. असे अनेक झगडे अनेक वर्षं केले. खरं म्हणजे शिक्षकांनी रस घेऊन हे पुढे चालवलं असतं, तर मराठी बालरंगभूमीला प्रचंड फायदा झाला असता. सुलभानं – सुलभा देशपांडे – तिच्या शाळेत पुढाकार घेऊन काही चांगल्या नाटिका केल्या. ‘दुर्गा झाली गौरी’ केलं. माधव साखरदांडेंनी लिहिलेल्या काही एकांकिका केल्या. आर. एम. भट विद्यालयात भाई मोरे म्हणून एक शिक्षक होते. त्यांनी माझ्या सुरुवातीच्या काही नाटिका त्यांच्या शाळेत दर वर्षी नियमितपणे केल्या. पण अशी उदाहरणं फार कमी. हा आपल्या कामाचा भागच आहे, असं बहुसंख्य शिक्षकांना – आणि विशेषतः मुख्याध्यापकांना – नाही वाटलं, हे दुर्दैव. पूर्वी चित्रकला आणि संगीत हे शालेय शिक्षणाचाच भाग होते. तसंही नाटकाच्या बाबतीत करता आलं असतं. पण शाळांनी ते कधीही मनावर घेतलं नाही.
त्या दिवसांत अनेक कॉलन्यांमधून नाट्यमहोत्सव होत असत. त्या महोत्सवात एक नाटक मुलांचं ठेवा, असा प्रस्ताव घेऊन आम्ही जात असू. मंडप तर तयार असेच. रात्री मोठ्यांचं नाटक सुरू होण्यापूर्वी संध्याकाळी मुलांचं नाटक. असा काय मोठा खर्च होणार होता? पण छे! अजिबात तयार होत नसत लोक. मुलांच्या वाढदिवसासाठी जे काही हजार-दोन हजार रुपये खर्च करता, ते आम्हांला द्या. आम्ही मुलांसाठी नाटक करतो, असंही आवाहन नंतर नंतर आम्ही पालकांना करत असू. पण त्यालाही प्रतिसाद मिळत नसे. तीस-पस्तीस वर्षं हे पाहिल्यावर, अनुभवल्यावर आम्हांला वाटायला लागलं, की आपल्या समाजाला आणि शाळांना जर हे इतकं नकोच असेल, तर आपण तरी त्यांच्यावर हे का लादावं? हा उदासीन विचार हळूहळू मूळ धरत गेला. प्रकल्प कमी कमी होत गेले. तरीही आमची हौस पुरती संपली नाहीच. झोपडपट्ट्यांमधल्या आणि रस्त्यावर राहणार्‍या मुलांसाठी आम्ही काही नाटकं करायला घेतली. बालमजुरीसारख्या सामाजिक प्रश्नांवर आधारित असलेलं ‘दोन बच्चे, दोन लुच्चे’सारखं नाटक आम्ही त्या मुलांसोबत केलं. प्रतिभाच्या – प्रतिभा मतकरी – गोव्याच्या शिबिरासाठी ते केलं होतं, पण इथेही त्याचे अनेक प्रयोग झाले. ‘शाब्बास लाकड्या’मधून बालशिक्षणाचा प्रश्न मांडला. ठाण्याच्या ‘वंचितांचा रंगमंच’साठी आम्ही अजूनही काम करतो आहोत. आपल्या आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीवर आपणच नाटक लिहायचं आणि बसवायचं अशी त्यामागची कल्पना आहे. तिथल्या ‘समता विचार प्रसारक संस्थे’च्या मदतीनं आम्ही ‘नाट्यजल्लोष’ नावाचा एक कार्यक्रम करतो. मुलांच्या स्वविकासासाठी नाटक हे माध्यम वापरलं, तर कदाचित त्यातून थोर नाटक नाही येणार जन्माला, पण मुलं स्वतंत्रपणे विचार करायला, ते योग्य प्रकारे व्यक्त करायला शिकतील, अशी त्यामागची मूळ कल्पना आहे. नाटकाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या समस्या मांडाव्यात असा विचार. तिथल्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षांत उत्तम काम केलं आहे. मुलांपासून सुरुवात करून आता तरुण मंडळी आणि महिलांनाही या कामात जोडून घेतलं आहे. ठाण्याजवळ येऊर हे गाव आहे. तिथे अनेकदा बिबट्या वस्तीत येतो आणि लहान मुलांचे बळी घेतो. येऊरमध्येच बेबंद पर्यटन, दारूपार्ट्या, अपघात आणि प्रदूषण अशीही समस्या आहे. नाटक या माध्यमाचा सामाजिक कामातही उपयोग होऊ शकेल… अशा शक्यतेची चाचपणी म्हणून तिथल्या नगरसेवकाला मदतीनं आम्ही त्यावर केलेलं नाटक दाखवलं व चर्चा घडवून आणल्या. असे अनेक प्रयोग केले, अजूनही करतो आहोत. काहीतरी होतच असेल कुठेतरी. परदेशी भेटणारे अनेक प्रेक्षक असे असतात, ज्यांना माझ्या इतर कामाबद्दल काही माहीत नसतं. पण बालनाट्यं पाहिलेली असतात. तो संस्कार त्यांच्यावर असतो. ते आवर्जून येऊन सांगतात. असं कुठे कुठे बीज पडत असतं… हे थोडं सामाजिक कामासारखंच आहे… प्रेक्षकांना तयार करण्याचं काम आपलंच असं मानून करावं, तेव्हा फळं दिसतात. आम्ही यासाठी शिबिरंही घेत आलो आहोत कायम. आम्ही म्हणजे प्रतिभा. ती तर त्यासाठी हिमाचल प्रदेश, त्रिपुरा इतक्या लांबपर्यंतदेखील जाऊन आली. चित्रपट रसग्रहणासाठी जशी शिबिरं घेतात, तशी खूप शिबिरं तिनं घेतली, अजूनही घेते. पण आमचे प्रयत्न आमच्यापुरतेच राहतात. मराठी माणसांची लोकसंख्या काय कमी का आहे? पण त्यातले काही मूठभर लोक वगळले, तर फार कमी लोक रंगभूमीच्या मूलभूत कामात रस दाखवतात. मोठ्ठाले चकचकीत इव्हेंट्स आयोजित करणं, त्यात हजेर्‍या लावणं आणि शक्यतोवर स्वतः रंगमंचावर चमकणं यांत उत्साह मोठा. या उदासीनतेचं काय करायचं, कळत नाही.
शाळांपेक्षाही शिक्षणखात्यानं या बाबतीत काही करायला पाहिजे होतं का?
सरकारी मदतीचं तर सोडूनच द्या. मंत्री काय, शिक्षण खातं काय… त्यांना काहीही करण्यात रस नाही. आपल्याला प्रसिद्धी मिळेल ते आणि तेच फक्त आपण करायचं, इतर कशालाही हात लावायचा नाही हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. मी मध्यांतरी शिक्षणमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं – शाळांच्या परीक्षा जवळ आलेल्या असताना झोपडपट्टीतल्या मुलांना अभ्यासाला जागा नसते. शेवटची गाडी गेल्यावर चक्क रेल्वेच्या रुळांत बसून अभ्यास करतात. जोगेश्वरीच्या गुंफांमध्ये बसतात. दिवे चालू असतील, अशा सार्वजनिक ठिकाणी बसतात. तर तुम्ही महाविद्यालयं किंवा ऑफिसं यांची आवारं या मुलांना संध्याकाळी उपलब्ध नाही का करून देऊ शकणार? यात काही जास्तीच्या आर्थिक मदतीचाही प्रश्न नाही. वॉचमन तर असतोच. काय हरकत होती खरी? पण मोठाली बजेट्स नसलेले प्रकल्प त्यांच्या काय कामाचे? नाही झालं त्यातून पुढे काहीच. दोनदा छायाचित्रांसकट पत्र पाठवूनही त्याचं उत्तर तर सोडाच, पोचही आली नाही. ही जिथे मुलांच्या शिक्षणाविषयीची आस्था, तिथे बालरंगभूमी आणि व्यक्तिमत्त्वविकास वगैरे दूर राहिलं!
तुम्ही मुलांना तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केलेत?
आम्ही आमच्या खिशातून पैसे घालून मुलांसाठीही शिबिरं घेत असू. ‘बालनाट्य’ या संस्थेतर्फे आम्ही एक मोठं, एक महिनाभर चाललेलं शिबिर केलं होतं, त्यासाठी आम्ही ग्रंथसंग्रहालयाची जागा भाड्यानं घेतली होती. संध्याकाळी सात वाजल्यानंतर – म्हणजे मुलं शाळेनंतर सहज येऊ शकतील अशा वेळी – आणि सलग एक महिनाभर असं ते चाललं. शाळांकडून आम्ही त्यांच्या उत्तम विद्यार्थी अभिनेत्यांच्या शिफारशी मागवत असू आणि मग त्या मुलांना प्रशिक्षित करत असू. त्या शिबिरात केदार शिंदे, सुमीत राघवन, पंकज विष्णू यांसारखे नट मिळाले. राहुल दाभोळकर – जो आता अमेरिकेत ‘डिज्नी’साठी काम करतो – त्यातूनच भेटला. या शिबिराचा व्याप चिकार मोठा होता. शिवाय ते शिबिर विनामूल्य होतं. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ते घेतलं होतं. अशी मोठी शिबिरं पुन्हा-पुन्हा करणं परवडलं नाही. पण लहान कार्यशाळा आणि शिबिरं होऊ शकतात. ‘बालनाट्य’तर्फेच असं नाही. पण स्वतंत्रपणे प्रतिभा अशा कार्यशाळा घेत असते.  कधी एन. एस. डी.साठी, तर कधी कला अकादमीसाठी. पूर्वी तिनं शशांक वैद्यच्या मदतीनं हॉर्निमन सर्कलला सबंध दिवसभर आणि जवळपास पूर्ण वर्षभर चालणारा रंगभूमी प्रकल्प चालवला होता. त्यात मुलांच्या शिक्षणाला खूप महत्त्व होतं. पण आम्ही एकटे कुठवर पुरे पडणार? लोकांची उदासीनता हाच खरा चिंतेचा विषय आहे…
प्रतिभा मतकरींच्या एका कार्यशाळेची चित्रफीत
आज मुलांसमोर अनेक नवनवीन आकर्षणं आहेत. कॉम्प्यूटर आहे, इंटरनेट आहे, स्मार्टफोन्स आहेत, गेम्स आहेत. आज त्यांना नाटकाकडे आकर्षित करून घ्यायचं असेल, तर काय करावं लागेल?
आज मुलांना नाटकाकडे वळवणं हे मोठंच आव्हान आहे. ‘बालनाट्य’च्या नाटकांना हे आव्हान कधी नव्हतंच. आम्ही केलं त्या-त्या सगळ्या गोष्टींना मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. हसत काय, ओरडत काय, नाटक संपल्यावर मागे कलाकारांना बघायला-भेटायला येत, पुन्हा-पुन्हा नाटकं बघितल्याचं सांगत…
कित्येक वेळा आम्ही मोठ्यांच्या उदासीनतेमुळे वा व्यवस्थेच्या असहकारामुळे वा खर्चाकडून तोंडमिळवणी करताना खचून जायचो, आणि म्हणायचो, आता पुरे करू या – आणि मुलांचा उदंड प्रतिसाद बघून पुन्हा नव्या उमेदीनं काम करायला लागायचो. हे तेव्हा जमलं. कारण तेव्हा नाटकाची जादू एकमेवाद्वितीय होती. आजही ती आहेच. कारण ते जिवंत आहे. पण आज इतर आकर्षणंही मोठी आहेत. ही सगळी माध्यमं तर आहेतच, पण त्याशिवाय इंग्रजी बालसाहित्य त्यांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेलं आहे. ‘हॅरी पॉटर’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातून मुलांनी आपल्याला दाखवून दिलं आहे, की त्यांना फॅन्टसी अतिशय आवडते. फक्त ती त्यांना पटेल, भिडेल, त्यांच्या आयुष्याशी लागाबांधा जोडून घेईल, त्यांना विश्वासार्ह वाटेल अशी मात्र हवी. अशा वेळी त्यांना आकर्षित करून घ्यायचं असेल, तर या सगळ्या माध्यमांमधला दृश्यघटकांचा भाग झाकोळून टाकेल असं आणि इतकं भव्यदिव्य काहीतरी करावं लागेल. ते करू देण्याची ताकद फॅन्टसीतच आहे. शिवाय फॅन्टसी आली म्हणून नाटकानं इतर गोष्टी बोलूच नयेत असंही नाहीच. त्यामुळे तो फार आकर्षक घाट होईल, मुलांना आवडेलसा. कॉमिक बुक्स हा दुसरा अतिशय आकर्षक प्रकार आहे. मुलांना कॉमिक्स आवडतात. त्यातल्या दृश्यभागाशी साधर्म्य साधेल, असं नाटक उभं केलं, तर मुलं आवडीनं बघतील. पण अडचणी किती त्यात! एक वेळ आपण असं गृहीत धरू की पैसे ही अडचण नाहीय. निर्मितीला पैसे मिळतील. पण वितरण? अशा प्रकारचं नाटक जिथे विनायास करता येईल, कोणत्याही तडजोडीविना आपले प्रयोग करू शकेल, अशी नाट्यगृहं आपल्याकडे आहेत? किती आहेत? कुठे आहेत? तंत्रज्ञानही मिळवता येईल. पण कल्पनाशक्ती आणि इच्छाशक्ती या गोष्टी आपल्याकडे आहेत का?
– रत्नाकर मतकरी
 मुलाखत : रेवती असेरकर
revatiindienne@gmail.com
(शब्दांकन – मेघना भुस्कुटे)
meghana.bhuskute@gmail.com
***
चित्रश्रेय
रत्नाकर मतकरी – अभिषेक असेरकर
पुस्तकांची मुखपृष्ठे व स्पायडरमॅन – आंतरजालावरून
नाट्यप्रयोग आणि प्रेक्षक – रंगरूप – रंगभूमी चिकित्सा, नवचैतन्य प्रकाशन
Facebook Comments

3 thoughts on “आम्ही एकटे कुठवर पुरे पडणार?”

 1. मुलाखत छान झाली आहे.. मतकरी क्लास बोललेत.

  “चार दुर्बोध लेखक घ्यायचे आणि त्यांचाच फक्त उदो-उदो करत बसायचं अशी आपल्याकडच्या साहित्यप्रेमींची मानसिकता आहे. ”
  या बद्दल त्यांना कडक चुम्मा!

 2. This message is posted here using XRumer + XEvil 4.0

  XEvil 4.0 is a revolutionary application that can bypass almost any antibot captcha.
  Captcha Solution Google (ReCaptcha-1, ReCaptcha-2), Facebook, BING, Hotmail, Yahoo,
  Yandex, VKontakte, Captcha Com – and over 8400 other types!

  You read this – it means it works! 😉
  Details on the official website of XEvil, there is a free demo version.

  Check YouTube video “XEvil ReCaptcha2”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *