बालसाहित्यांक २०१७ लेख

खुणेची पानं…

शाळा नुकतीच सुरू झाली आहे. इयत्ता दुसरी ब. नव्या वर्गाचं अप्रूप वाटतंय. नव्या इयत्तेची पुस्तकं आणायला बाबांबरोबर बाजारात. आमचं घर कल्याणच्या दत्तआळीतील तेव्हाच्या झुंजारराव वाड्यात. शाळेची पुस्तकं मिळणारी दुकानं तेव्हा तुलनेत कमी होती. टिळक चौकातलं बागडे स्टोअर्स हे आमचं पुस्तकं-वह्यांसाठीचं नेहमीचं दुकान. बाबांबरोबर नव्या इयत्तेची पुस्तकं, वह्या आणायला दुकानात जायचं म्हणजे छानच वाटायचं. पावसाचे दिवस. पुस्तकं दुकानातून घेताना ताजंतवानं वाटायचं. मग घरी आल्यावर ती पुस्तकं निरखण्याचा आवडता उद्योग.
पुस्तकांची माझी अगदी पहिली आठवण ही दुसरीतल्या पुस्तकांची आहे आणि तीही मराठी विषयाच्या पुस्तकाची. त्यात ‘श्यामची आई’मधील एक धडा होता. एका अस्पृश्य मोळीवाल्या महिलेला मदत करण्यासाठी श्यामची आई त्याला सांगते असा विषय. तो विषय आणि त्यातील आशय तेव्हा कितपत समजला असेल ती शंकाच आहे. बहुदा फारसं कळलं नसावंच. पण तरीही ते पुस्तक, तो धडा, त्या धड्यातील चित्र कायमचं स्मरणात राहिलं. तोच धडा स्मरणात का राहिला याचं कारण काहीच सांगता येत नाही. आणि त्याहीपेक्षा स्मरणात राहिला तो त्या पुस्तकाचा नवाकोरा वास. ते पुस्तक – तो धडा व चित्र आणि त्या पुस्तकाचा वास हा असा सारा कोलाज मनात आजही लख्खपणे रंग टिकवून आहे. तेव्हापासूनच नव्या पुस्तकांचा वास मला अतीव प्रिय. आजही नवं पुस्तक घेतल्यानंतर मी त्याची पानं उलगडून त्यांचा वास श्वासांत भरून घेतो. तो वास आला की मन झपकन मागच्या काळात जातं आणि जरा सैलावतं.

पुस्तकाबाबतची कायम स्मरणात राहिलेली ही पहिली आठवण. तिच्या जोडीला आठवणी चांदोबा आणि किशोर मासिकाच्या. त्यातही ‘चांदोबा’च्या विशेषच. चांदोबा अगदी नियमितपणे आमच्या घरी यायचा. तो पोस्टानं यायचा की बाबा कुठून विकत आणायचे ते आठवत नाही नेमकं. पण दर महिन्याला चांदोबा घरी यायचा हे नक्की. तो आला की वाचताना त्यात बुडून जायला व्हायचं. विक्रम वेताळच्या कथा, राजे-जमीनदार-सामान्य लोक-राक्षस-देवदूत यांच्या कहाण्या विलक्षण आवडायच्या. त्यातील अद्भुत रस खूप भावायचा. चित्रंही आवडायची. काळीपांढरी आणि रंगीतही. अनेकदा त्यांतील गोष्टींमधील गावांची चित्रं पाहताना आपणही त्या गावात आहोत, किंवा त्या गावात जायला हवं, असं वाटायचं. खांद्यावर वेताळ घेऊन जंगलातून चाललेला विक्रम राजा, त्या जंगलातून जाणारे वेटोळे साप हे ‘चांदोबा’तील चित्र आजही आठवतं. विक्रम-वेताळ कहाणीची सुरुवात… विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही आणि वेताळ पुन्हा झाडाला लोंबकळू लागतो तो शेवट दर वेळी वाचताना सारखीच मजा यायची. फोटोंसाठी ओळ सुचवा, अशी एक स्पर्धा असायची. ते फोटो पाहून त्यावर काही सुचतंय का, असा विचार करताना त्यात पूर्णपणे हरवून जायला व्हायचं. आधीच्या स्पर्धेतील फोटोच्या ओळी वाचताना, असं आपल्याला कधी जमेल लिहायला, असं वाटून जायचं. जाहिरातीही आठवतायत त्यातल्या. एका बिस्किटाची जाहिरात तर विशेषच स्मरतेय. कथ्थक करणाऱ्या एका मुलीची मुद्रा आणि त्यासोबत तिरकीट तिरकीट किंचित खारट… अशी काहीशी नादमयी शब्दरचना त्या जाहिरातीची होती. मस्तच वाटायचं त्या ओळी स्वतःशीच गुणगुणताना. हिंदी चित्रपटाच्याही जाहिराती असायच्या. ‘चांदोबा’चे सर्वेसर्वा असलेले बी. नागीरेड्डी यांच्या एका चित्रपटाची जाहिरात आजही आठवतेय. संजीव कुमार, जितेंद्र, मौसमी चटर्जी आदी मंडळी होती त्यात. चित्रपटाचं नाव आठवत नाहीये. ती जाहिरात स्ट्रिप पद्धतीत होती आणि त्यात मराठी मजकूर होता. संजीवकुमार, जीतेंद्र मराठीतून बोलतायत असं काहीतरी गमतीशीर वाटायचं ती जाहिरात बघून. कृष्णधवल टीव्ही हळूहळू रुजू लागला होता. त्यावर ही कलाकार मंडळी हिंदी बोलताना दिसायची चित्रपटांतून वगैरे. अशा हिंदी लोकांच्या तोंडी मराठी मजकूर वाचताना वेगळंच वाटायचं. ती मंडळी जवळची वाटायची.
एकेका वर्षाचे ‘चांदोबा’चे अंक एकत्र करायचे आणि ते बाइंडिंग करून घ्यायचे. मग ते जाड बाड मित्रांना दाखवून मिरवायचं असा एक प्रकार होता त्या वेळी आमच्यासह अनेकांच्या घरांत. मग कुणाकडे कुठल्या वर्षाचे चांदोबा आहेत, वर्षाचे सगळे अंक आहेत का, त्यात कुठल्या गोष्टी आहेत, त्यातली चित्रं कशी आहेत, यावर गप्पा व्हायच्या. बाइंडिंग केलेल्या ‘चांदोबा’च्या बाडांची देवाणघेवाण व्हायची.
चांदोबा आपल्याला काय देत आहे, याचं मूल्यमापन करण्याचं ते वय नव्हतं. निरर्थक समीक्षा वगैरे न करता वाचनातील… एकुणातच सगळ्यातलाच आनंद मनःपूत उपभोगण्याचं ते वय होतं. त्यामुळे तेव्हा चांदोबा आपल्याला अमकं देत आहे… तमकं देत आहे… असले हिशेब नव्हते. आपल्याला वाचायला आवडतंय व त्यातून भरपूर आनंद मिळतोय एवढंच थोडं थोडं कळायचं. नंतर वाढलेल्या वयात त्या आनंदाचं विश्लेषण झालं. आपल्याला वाचनाची गोडी लागण्यात चांदोबाचा वाटा मोठा आहे, हे नंतर नीटच लक्षात येऊ लागलं. त्या अर्थानं चांदोबाचं मोठंच ऋण आहे माझ्यासारख्या अनेकांवर.   

चांदोबा अगदी आपल्या वयाच्या मित्रासारखा वाटायचा. ज्याच्यासोबत आपण हसू-खिदळू शकतो अशा मित्रासारखा. तो वाचताना मनावर दबाव नाही यायचा. त्याचं वाचन खूप साधंसोपं-सहज वाटायचं. पण का कुणास ठाऊक, किशोरबाबत तसं व्हायचं नाही. म्हणजे किशोरही आवडायचा, पण तो आपल्या वयाच्या नव्हे, तर आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मित्रासारखा वाटायचा. ‘चांदोबा’च्या खांद्यावर सहज हात टाकता यायचा, तसं ‘किशोर’बाबत होत नसे. त्या अंकाला कदाचित थोडा शिक्षणाचा बाज असल्याने असं व्हायचं की काय कुणास ठाऊक. म्हणजे ‘चांदोबा’च्या सोबत मनसोक्त हुंदडता यायचं, तर ‘किशोर’बाबत, त्याच्या मागून चालावं असं वाटायचं.
शाळेची अभ्यासाची पुस्तकं सोडून इतर पुस्तकांशी ओळख तशी शाळेतही झाली होतीच. आमच्या बालक मंदिर विद्यामंदिर शाळेत पुस्तकपेटीचा उपक्रम होता. आठवड्यातून एकदा बहुतेक. नेमक्या किती दिवसांनी ते आता आठवत नाही, पण पुस्तकांची पेटी वर्गात आणली जायची. त्यातलं आपल्याला हवं ते पुस्तक घ्यायचं आणि पुढल्या वेळी बदलायचं असा तो उपक्रम. त्यावेळी आपण निवडलेलं पुस्तक, मित्रानं निवडलेलं पुस्तक यांच्यात तुलना होत राहायची. आणि मित्रानं घेतलेलं पुस्तक आपल्याला मिळायला हवं होतं असं अनेकांना वाटतं राहायचं.
वाचनाच्या या आवडीतूनच लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत एक छोटासा उपक्रम आम्ही मित्रांनी मिळून केला होता. वाचनालयाचा. आजूबाजूला वाचनालयं होती. सुट्ट्यांमध्ये तिथे सभासदही झालो होतो. छानच वाटायचं एकदम. म्हणजे आपल्या नावाचं कार्ड आहे, आपण त्या कार्डावर आपल्या नावावर पुस्तक घेतोय, ते बदलतोय, असं सगळं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कल्याण सार्वजनिक वाचनालयाची माहिती होती. बाबा त्याचे सभासद होते. तिथून ते मासिक अगदी नियमित बदलून आणत असत. आपणही सुट्टीपुरतं असं वाचनालय सुरू करू या, असं आम्ही मित्रांनी मिळून ठरवलं. गोष्टींची छोटीछोटी पुस्तकं यायची ती अगदी २५ पैसे… ५० पैसे… १ रुपया अशा किमतीत. आम्ही मित्रांनी मिळून थोडेथोडे पैसे काढले. पैसे अर्थातच घरून घेतलेले. दिवसभर क्रिकेट आणि इकडेतिकडे हुंदडत बसण्यापेक्षा मुलं हे काहीतरी बरं करतायत म्हटल्यावर घरून पैसेही लगेच मिळालेले असणार तेव्हा. तर मित्रांनी मिळून जमा केलेल्या पैशांतून पुस्तकं आणली आम्ही. शिवाय सगळ्यांच्या घरची पुस्तकंही घेतली सोबतीला. एक एक करता करता छोटी पेटी भरून गेली पुस्तकांनी. जागेचा प्रश्न नव्हताच.  ना खेळण्यासाठी ना वाचनालयासाठी. वडाच्या झाडाची गर्द सावली असलेला, घराजवळच असलेल्या दत्ताच्या देवळाचा आवार म्हणजे आमची हक्काची जागा. वाचनालय तिथेच सुरू करायचं ठरलं. वाचनालय म्हणजे काय, तर पुस्तकांची पेटी, सदस्यांची आणि पुस्तकं दिल्याघेतल्याची नोंद करणारी एक वही, एक छोटं टेबल आणि आम्हांला बसायला दोन-तीन खुर्च्या. आमचा मित्रांचा गोतावळा खूपच मोठा. त्यातून वाचनालयासाठी सदस्य अगदी सहजच मिळाले. वर्गणी किती ठेवली होती ते आठवत नाही. पण अगदीच थोडी असणार ती. अगदी त्या काळाच्या हिशेबातही ती फार नसणार. आम्ही दोन-तीन मुलं सकाळच्या वेळी दत्ताच्या देवळाच्या आवारात टेबल-खुर्ची टाकून वाचनालय उघडून बसायचो. छानच वाटायचं. आपण मोठ्या माणसासारखं काहीतरी मोठ्ठं काम करतो आहोत, अशी भावना मनात यायची. वाचनालय चाललं काही दिवस. अर्थातच ते तेवढंच चालणार होतं. सुट्टीपुरतं असलेले त्याचं निमित्त आणि एक गोष्ट खूप काळ करण्याचा कंटाळा हा लहानांमधील अंगभूत गुण हे ते बंद होण्याची कारणं. पण ते जेवढा काही काळ चाललं तेवढा काळ आनंद दिला त्यानं. ते बंद झाल्यानंतर पुस्तकं आपापसात वाटून घेतली आम्ही मित्रांनी.
हे झालं छोट्याछोट्या, बारक्या पुस्तकांचं. लहानपणी एका जाडजूड पुस्तकाशीही संबंध आला. ते पुस्तक म्हणजे आमचा कुलवृत्तांत. आपल्याला माहीत असलेल्या लोकांची नावं छापील स्वरूपात बघण्याचं कोण अप्रूप असायचं. जे आजोबा, जे बाबा आपल्या घरात, आपल्या समोर वावरतात, जे काका आपल्या घरी येतात, जी आत्या खूपच मायाळू आहे अशा सगळ्यांची नावं एका जाडजूड पुस्तकात छापली जातात म्हणजे अद्भुतच आहे, असं वाटायचं. मग आपल्या आजोबांच्या वडिलांचं-आईचं नाव काय होतं… त्यांच्या वडिलांचं-आईचं नाव काय होतं… त्यांच्याही वडिलांचं-आईचं नाव काय होतं असं बघताना प्रचंड मौज वाटायची. ती नावं वाचताना, ते लोक कसे दिसत असतील, त्यांची उंची कशी असेल, त्यांचे कपडे कसे असतील, त्यांची बोलण्याची पद्धत कशी असेल, त्यांची घरं कशी असतील… असे काय काय विचार डोक्यात यायचे. आणि डोळ्यांसमोर त्यांची चित्रं उभी करताना हरवून गेल्यासारखं व्हायचं…
अगदी काही महिन्यांपूर्वी त्या कुलवृत्तांताची नवी आवृत्ती आली. त्यात माझं, बायकोचं, मुलीचंही नाव समाविष्ट होतं. ती नावं वाचताना लहानपणी मनात यायच्या तशाच भावना पुन्हा एकदा उभ्या राहिल्या…
जाडजूड पुस्तकाची दुसरी ओळख म्हणजे ज्ञानेश्वरीची. आजोबा ज्ञानेश्वरी वाचायचे. मला अर्थातच त्यातलं काही कळत नसे. पण आपल्या घरात एक मोठ्ठं पुस्तक आहे, आणि आजोबा ते वाचतात ही गोष्टच मस्त वाटायची. ज्ञानेश्वरीची ती प्रत आजही आम्ही जपून ठेवलेली आहे. ज्ञानेश्वरीची नवीन, अगदी रंगीत प्रत नंतर घरात आली असली, तरी आजोबांची ज्ञानेश्वरी आजही घरी आहे. ती प्रत म्हणजे केवळ कागद नव्हेत. ज्ञानेश्वरीपेक्षाही माझ्या लेखी त्या प्रतीला महत्त्व आहे, ते आजोबांची प्रत म्हणून.
वाचनाची आवड आणि पुढे पेशाची गरज यामुळे पुस्तकं ही आयुष्याचा अविभाज्य घटकच झाली. पण आजही श्यामची आई पुस्तक पाहिलं की दुसरीतील श्यामचा धडा व त्या पुस्तकाचा नवाकोरा वास आठवतो. चांदोबाचा विषय निघाला की ते लहानपणचे दिवस मनात फेर धरतात. लहानपणचे चांदोबाचे ते बायंडिगं केलेले गठ्ठे कुठे हरवले ते कळले नाही. ते नीटच राखून ठेवायला हवे होते, असं वाटत राहतं. दत्ताच्या देवळाच्या आवारातील आमचं वाचनालय आजही स्मरतं. आणि आजही आमचा कुलवृत्तांत हाती धरून त्यातील नामावळी वाचावीशी वाटते. आजोबांच्या ज्ञानेश्वरीवरून प्रेमानं निव्वळ हात फिरवावासा वाटतो…
पुस्तकांची कितीही पानं उलटली तरी काही पानं आपल्या कायम स्मरणात राहतात. त्यात पिंपळाचं जाळीदार पान घालून ठेवण्याची पूर्वी पद्धत होती. तशीच ही देखील काही महत्त्वाची पानं… कायम आठवणीत राहतील अशी. खुणेची.
– राजीव काळे
kale.rajiv@gmail.com
***
चित्रस्रोत : ‘बालभारती’च्या दप्तरातून आणि आंतरजालावरून इतरत्र
Facebook Comments

3 thoughts on “खुणेची पानं…”

 1. सुंदर!माझ्याही वाचनाची सुरवात चांदोबापासूनच झाली होती.यातली चित्रे,गोष्टींमधल्या पात्रांची नावे,त्यांच्या वेशभूषा एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात.

 2. This message is posted here using XRumer + XEvil 4.0

  XEvil 4.0 is a revolutionary application that can bypass any antibot captcha.
  Captcha Bypass Google (ReCaptcha-1, ReCaptcha-2), Facebook, BING, Hotmail, Yahoo,
  Yandex, VKontakte, Captcha Com – and over 8400 other types!

  You read this – it means it works! 😉
  Details on the official website of XEvil, there is a free demo version.

  Check YouTube video “XEvil ReCaptcha2”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *