बालसाहित्यांक २०१७ लेख

पुस्तकाच्या दुनियेत

‘…घामेजलेल्या हातांनी मी पुस्तकाचं कव्हर घट्ट धरलं आहे. उत्कंठावर्धक शेवटाकडे माझे डोळेही धाव घेत आहेत. आसपास लोक गप्पा मारताहेत, पण मी मात्र केव्हाच कल्पनेच्या जादुई आणि अद्भुत दुनियेत जाऊन पोचले आहे.’ पुस्तकवाचनाचा हा माझा नेहमीचा अनुभव.
माझं नाव साची. कॅनडातल्या एका शहरात मी सहाव्या इयत्तेत शिकते. वाचन ही माझी आवड, छंद आणि विरंगुळा तर आहेच; पण काही वेळेला माझं टोपणनावही! 
चार वर्षांची असताना मी पहिल्यांदा पुस्तक हाती धरलं. मला वाटतं, याला आईबाबांनी अगदी लहानपणापासून मला वाचून दाखवलेली गोष्टींची पुस्तकं कारणीभूत असावीत. त्या वयात, आधी शब्द ध्यानी राहिले असावेत आणि अर्थ नंतर कळला असावा. आता मला स्वतःचं स्वतः वाचता येत असलं, तरी आईबाबांचा माझ्या वाचनाच्या छंदावर मोठा प्रभाव आहे. एक म्हणजे, आईबाबा ज्या विषयावरची पुस्तकं वाचत असतात त्याच विषयांशी संबंधित पुस्तकं सहसा मी निवडते. अलीकडे, आईला उपहासात्मक शैलीतल्या पुस्तकांत (सटायर) रस निर्माण झाला होता. त्यानंतर, आपसूकच मीही सटायर शैलीतल्या पुस्तकांची भर माझ्या वाचायच्या यादीत घालू लागले. दुसरं म्हणजे, आईबाबांच्या संग्रहातली पुस्तकं कधीकधी मी वाचते, त्यांनी प्रभावित होते आणि त्या लेखकाची वा त्या शैलीतली अन्य पुस्तकं मला वाचावीशी वाटू लागतात. अर्थात, आईबाबांच्या वाचनाच्या सवयीचा सर्वात थेट प्रभाव म्हणजे त्यांनी सुचवलेली पुस्तकं. काही वेळेला, मी त्या सूचना सुरुवातीला धुडकावून लावते; मग काही पानं वाचते आणि ते पुस्तक बेहद्द आवडू लागतं. यातून आईबाबांच्या निवडीवर शंका न घेण्याचा धडा मी शिकायला हवा; पण दर खेपेस ‘पहिले पाढे पंचावन्न’ असं होतं खरं.
‘हरून अँड द सी ऑफ स्टोरीज’ हे माझ्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांपैकी एक. आकाराने बऱ्यापैकी मोठी अशी मी वाचलेली ही पहिली कादंबरी. पहिल्यांदा वाचली तेव्हा लहान मुलांना वाटेल तशी मजेदार, एक्सायटिंग वाटली होती; पण आता कळतं की हे पुस्तक मोठ्यांसाठीही आहे. त्यातल्या फेटेवाले वॉटर जीनिज् आणि ‘Shadowy’ चुपवालाज् यांच्याआड संवाद आणि मौन यांची प्रतीकं दडलेली आहेत.
अलीकडेच मी ‘द हेट यू गिव्ह’ किंवा (आद्याक्षरांवरून) ‘थग’ हे अँजी थॉमसचं पुस्तक वाचलं. मी आजवर वाचलेल्या पुस्तकांपैकी सर्वात प्रत्ययकारी. अमेरिकेतला आधुनिक वर्णभेद हा त्याचा विषय आहे. पोलिसांच्या अत्याचारांची निष्पाप कृष्णवर्णीय मुलांनाही पोचणारी झळ आणि त्याविरुद्ध अपरिहार्यपणे उठवावा लागलेला आवाज या पुस्तकात येतो.
डग्लस अ‍ॅडम्सचं ‘द हिचहायकर्स गाईड टू द गॅलक्सी’ हे मी आजवर वाचलेलं सर्वोत्कृष्ट पुस्तक! धमाल विनोदी आणि अशक्यप्राय वाटल्या तरीही घडू शकणाऱ्या गोष्टींची रेलचेल असलेलं. विज्ञानकथा असली तरी तिचा समावेश सरळ विनोदी वाङ्मयातच करणं अधिक योग्य ठरेल. यातले विनोद इतके थेट आणि उघड आहेत की ते चुकवू म्हटलं तरी चुकवता यायचे नाहीत.
पुस्तक वाचणं हे चित्रपट पाहण्यापेक्षा नक्कीच निराळं आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक हा आपल्या मगदुराप्रमाणे मूळ पुस्तकाचा अर्थ लावतो आणि चित्रपट तयार करतो. त्या पुस्तकाचा दिग्दर्शकाने लावलेला अर्थ आणि तुम्हांला झालेला उलगडा भिन्न असू शकतात. ‘हॅरी पॉटर’ मालिकेतली पुस्तकं वाचताना माझ्या डोळ्यांसमोर उभं राहणारं हॉगवार्टस हा एक बंदिस्त किल्ला असला तरी तिथलं वातावरण उजळलेलं, आनंदी आहे. दिग्दर्शकाने मात्र त्याचं चित्रण भलीमोठी आवारं असणारा; तरीही अंधुक, गूढ असं केलं आहे. अजून एक फरक म्हणजे, पुस्तक वाचताना अनेक बारक्यासारक्या तपशिलांची भर आपल्याला त्यात घालता येते. चित्रपट, विशेषतः कादंबऱ्यांवर बेतलेले चित्रपट, महत्त्वाचे काही तपशील गाळून सरधोपट होण्याची आणि कादंबरीतल्या घटना अधिक अतिरंजित स्वरूपात आपल्या समोर येण्याची दाट शक्यता असते. चित्रपटांवर असणाऱ्या ठरावीक वेळेच्या मर्यादेमुळे हे होत असावं.
इ-बुक्सपेक्षा मला हाडामांसाची कागदी पुस्तकं वाचायला आवडतात; कारण एखादं मोठं पुस्तक वाचून संपवल्याचं खरं अभिमानमिश्रित समाधान त्यांतून मिळतं. डोंगर चढताना खाली पाहावं आणि आपण किती पल्ला गाठला आहे, याचा अदमास घ्यावा तसं काहीसं. शिवाय दिवसभर आपण निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी आणि त्यांच्या डोळ्यांना हानिकारक अशा ‘ब्ल्यू लाईट’ने वेढलेले असतो; त्यातूनही ही घटकाभर सुटका. तसंच, निवडीला मदत करणारा पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा मजकूरही (blurb) बऱ्याचशा इ-बुक्समध्ये नसतो.
मी पुस्तकं तशी विचारपूर्वक निवडते. इंग्रजीत ‘जजिंग अ बुक बाय इट्स कव्हर’ असा वाक्प्रचार आहे, तसं विनोदाने याबद्दल म्हणता येईल. मलपृष्ठावर पुस्तकाबद्दलची माहिती पाहण्यापूर्वी, मी पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव वाचते. पुस्तकाचं नाव कसं गूढ, उत्सुकता चाळवणारं हवं. लेखकाचं नाव तितकंसं महत्त्वाचं नाही; पण पी. जी. वुडहाऊससारखं खरं वाटणारं नाव ‘यु. आर. विअर्ड’सारख्या उघडउघड बनावटी नावापेक्षा बरं. शिवाय माझा कल अभिजात पुस्तकं (classics) निवडण्याकडेही असतो. इतकी वर्षं काळाच्या कसोटीवर उतरलेली ही पुस्तकं उगाच का ह्या उपाधीला पात्र होतात?
मला वाचायला आवडतं, कारण वाचतेवेळी कागदाला जखडलेले शब्दसुद्धा आपल्या डोळ्यांसमोर निरनिराळ्या, विलक्षण प्रतिमा उभ्या करू शकतात. कागदावर ओढलेल्या ह्या वेड्यावाकड्या रेघोट्यांतून अर्थ लावण्याची आपली क्षमता अद्भुत आहे – मग ते अंतराळयानातून प्रवासाला निघालेल्या माणसाचं वर्णन असो वा बेडकीत रूपांतर होणाऱ्या मुलीचं. वाचनाच्या छंदाचा उपयोग मला अन्यत्रही होतो. जेव्हा मी गोष्टी लिहिते, तेव्हा व्यावसायिक लेखक ज्या कॢप्त्या वा साधनं वापरतात, त्यांचं मी काही वेळेला अनुकरण करून पाहते. वाचताना अनेक शब्द नजरेखालून गेल्यामुळे, चुकांचा अंदाज येऊन, माझं स्पेलिंगही आता बरंच सुधारलं आहे आणि शब्दसंग्रहातही भर पडली आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वाचनाच्या छंदामुळे आजवर कधीही न पाहिलेल्या जागा, माणसं आणि प्राणी, कल्पनेच्या राज्यात पाहण्याचं बळ मला मिळालं आहे.
– साची देशपांडे
इयत्ता सहावी, इंग्रजी माध्यमाची शाळा, कॅनडा
saachi2006@gmail.com
(इंग्रजीतून अनुवाद : नंदन होडावडेकर)
nandan27@gmail.com
***
चित्रश्रेय : अवंती कुलकर्णी
मूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी
Facebook Comments

2 thoughts on “पुस्तकाच्या दुनियेत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *