बालसाहित्यांक २०१७ लेख

अशक्त अर्थव्यवस्थेची लुकडी फळे

नाही म्हटलं तरी १९८०- ८२पासून मी मराठी साहित्याच्या दृश्य स्वरूपावर (म्हणजे मुखपृष्ठ, आतली चित्रं, आर्टवर्क, लेआऊट, वगैरे) काम करतो आहे. त्यात मी बालसाहित्यावरही काम केलं. आकड्यांतच बोलायचं झालं, तर माझ्या पूर्ण कामापैकी उणापुरा १०% भाग बालसाहित्याचा आहे. जेवढं काम केलं, त्यात बालसाहित्य लिहिणार्‍या मराठीतल्या मोठ्या लेखकांबरोबर काम केलं. पण जितक्या सहजतेने यात पडलो, तितक्याच सहजतेने त्यातून बाहेर पडलो. स्वत:हून त्यात राहावं असं काही मला वाटलं नाही.
मला त्यात काम करायची इच्छा नव्हती असं नाही. पण मग मी जाणीवपूर्वक म्हणा किंवा अजाणतेपणे म्हणा, त्यापासून लांब का बरं गेलो? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे मुक्त चिंतन.
सुरुवात करण्याआधी दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटताहेत. पहिलं म्हणजे या लेखातली माझी मतं ही माझ्या अनुभवांवरून बनली वा बनवली आहेत. हा अनुभव माझ्यापुरताच आहे; तो प्रातिनिधिक आहे असा माझा आग्रह बिलकुल नाही.
दुसरं म्हणजे दृश्य स्वरूपातलं बालसाहित्य म्हटल्यावर त्यात दोन भाग येतात. पहिला म्हणजे लिखित बालसाहित्याला दिलेली चित्रांची जोड. सोप्या भाषेत : पुस्तकांत काढली जातात ती चित्रं. माझं काम यातलं आहे, आणि त्यामुळे यावर मी बोलणार आहे. दुसरा भाग म्हणजे मुलांसाठी काढलेली चित्रं – मग त्यात शब्दांचा भाग असेलच असं नाही. हाही विषय खूप मोठा आहे, पण त्याचा ऊहापोह या लेखात नको.
तीन पिढ्यांची एक मळलेली वाट आणि वाचकांचं दुष्टचक्र
साधारणत: प्रकार असा असायचा –
कोणी प्रसिद्ध लेखक मुलांसाठी काही लिहायचा. त्यातही कथांपेक्षा कवितांचा भरणा जास्त असे. अशा अनेक कविता साठत. त्या कविता कुठल्यातरी नियतकालिकासाठी किंवा दिवाळी अंकासाठी वेळप्रसंग पाहून लिहिलेल्या असत. त्यामुळे त्यात बारावीतल्या मुलासाठीच्या कविताही असत, आणि पाचवीतल्या मुलासाठीच्या कविताही.
मग कोणी प्रकाशक ते सगळं लेखन जमवून त्याचं पुस्तक काढायचं ठरवे.
पुढे जाण्याआधी या प्रकाशनांबद्दल दोन शब्द. मराठीतले बहुतांश प्रकाशक हे प्रकाशनाचा ‘फॅमिली-साईड बिझनेस’ असलेले प्रकाशक आहेत. आज कार्यरत असलेल्या प्रकाशक-पिढीच्या आजोबांनी वेळ-पैसे-आवड आहे म्हणून फावल्या वेळात प्रकाशनाचा व्यवसाय सुरू केलेला असतो. चांगलं लिहिणार्‍या कोणाला, किंवा कोणा प्रथितयश लेखकाला पकडून त्याचं हस्तलिखित मिळवलं जाई. आपल्या दिवसभराच्या नोकरीवरून परतायचं, आणि रात्रीचं जेवण वगैरे करून प्रुफं तपासायची. सकाळी ऑफिसात जाताना ती छापखान्यात देऊन यायची. असा सगळा हौशी मामला. पुस्तकांबद्दल प्रेम नव्हतं असं नाही, किंबहुना होतं म्हणूनच तर एवढं आत्मीयतेने ते केलं जायचं. पण मामला हौशीच.
मग कोणी चित्रकार पकडायचा चित्रं काढण्यासाठी. तोही असाच आत्मीयतेपोटी आपली जाहिरात-कंपनीतली नोकरी सांभाळून चित्रं काढणारा. तोही अत्यल्प मानधनात चांगली चित्रं काढून द्यायचा.
मग ते पुस्तक छापायचं आणि विकायचं. सगळंच हौशी. त्यामुळे लेखनाचा दर्जा उत्तम असला, तरी निर्मितिमूल्यं तितकी उत्तम असायचीच असं नाही. त्यातही – वाचकांच्या वयाबियाचा विचार न करता सगळ्या कवितांचं भरताड एकाच पुस्तकात.
मग या प्रकाशकांची दुसरी पिढी आली. त्यांनी प्रकाशन हे काम व्यवसाय म्हणून केलं. त्यांना हौशी काम आणि व्यावसायिक सफाईने केलेलं काम यांतला फरक चांगलाच जाणवत होता. दृश्यभागाबद्दल बोलायचं झालं, तर या काळात आर्ट स्कूलमध्ये शिकून आलेल्या (माझ्यासारख्या) चित्रकारांना या प्रक्रियेत स्थान मिळालं. छपाईचं तंत्रही प्रगत होतच होतं. त्यामुळे या काळात निर्मितिमूल्यं सुधारलीच. माझ्या आधीच्या पिढीनं तर फारच वरच्या दर्जाचं काम ह्या क्षेत्रात केलं. अर्थातच त्यांनीही ही ते काम जाता जाताच केलं, पण भारी केलं. ते पुढे मात्र सरकलं नाही, इच्छा असूनही मीदेखील ते पुढे नेऊ शकलो नाही, कारण अशक्त अर्थव्यवस्था. मला ह्या अर्थव्यवस्थेत फरफटून घेऊन मुलांसाठी योगदान वगैरे द्यायची बिलकुलच इच्छा नव्हती, आजही नाही.
माशी कुठे शिंकली असेल, तर ती व्यावसायिक गणितात. ‘बालसाहित्याची पुस्तकं खपत नाहीत’ ही ओरड मी गेली अनेक वर्षं ऐकतो आहे. मग एक दुष्टचक्र चालू झालं: पुस्तकं खपत नाहीत म्हणून त्या पुस्तकांच्या निर्मितीत जास्त पैसे गुंतवता येत नाहीत म्हणून चांगली पुस्तकं बनत नाहीत म्हणून दर्जात तडजोड केलेली पुस्तकं बनवायला लागतात म्हणून पुस्तकं खपत नाहीत!
संपादकीय टिपण:
चंद्रमोहन कुलकर्णींनी वर्णिलेलं हे दुष्टचक्र हे मराठी बालसाहित्याची आर्थिक बाजू तपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण आहे. याचा परिणाम असा, की बाजारपेठेतून ‘चांगली पुस्तकं’ हद्दपार  होतात आणि त्यांची जागा ‘सुमार पुस्तकं’ घेतात.
अर्थशास्त्राच्या परिभाषेत या प्रकाराला ‘ग्रेशम्स लॉ’ अशी संज्ञा आहे. समजा, बाजारपेठेत एकाच वेळेला एकच मागणी पुरवणार्‍या दोन वस्तू अस्तित्त्वात आहेत. त्यातली एक उच्च दर्जाची आहे आणि एक कामचलाऊ आहे. दोहोंच्या किमतीत अर्थातच फरक आहे. या स्थितीत कामचलाऊ वस्तूची मागणी वाढते आणि उच्च दर्जाच्या वस्तूची मागणी कमीकमी होत जाते. शेवटी, कामचलाऊ वस्तू उच्च दर्जाच्या वस्तूला बाजारपेठेतून हद्दपार करते. दिवाळीच्या विजेरी माळांबद्दल असं झालेलं आपण बघितलंच – उत्तम दर्जाच्या देशी माळांना तकलादू दिखाऊ चिनी बनावटीच्या माळांनी हद्दपार केलं आहे. नेमकं हेच बालसाहित्याबद्दल घडताना दिसतं.
या साखळीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्याकडे नीट पाहा : पैसे नाहीत म्हणून चांगली पुस्तकं बनत नाहीत. यावर तपशिलात पुढे बोलूच.
तर आता प्रकाशकांची तिसरी पिढी आली. त्यांनी बालपणापासून प्रकाशनव्यवसाय पाहिला आहे. तो व्यवसाय म्हणून चांगला आहे हे त्यांना कळतंय, पण दुसरीकडे जास्त पैसे देणार्‍या नोकर्‍या-व्यवसायांचे हरितपट्टे खुणावतायत. व्यवसाय वाढवण्यासाठी करायला लागणार्‍या गोष्टी दिसताहेत. असो.
याचा सगळ्याचा परिणाम असा आहे, की मराठीत मुळात बालसाहित्याची निर्मिती कमी होते. मुलांसाठी काही चांगलं लिहवून घ्यावं असा दृष्टिकोण मलातरी कुठे आढळला नाही. जे लिहिलं गेलं ते बर्‍याच अंशी चांगलं होतंच, पण व्यावसायिक बाजू दुबळी असल्याने सगळं सामान्य-सामान्य ठोकळेबाज-ठोकळेबाज होत गेलं. या दोन्हींवर बोलण्याची गरज आहे.
ठोकळेबाजी
कमर्शियल आर्टिस्ट म्हणून मी बालसाहित्यात खूप काम होताना बघत होतो. भारतातही आणि परदेशातही. नाही म्हटलं तरी नकळत तुलना होत होती. आपल्याकडचं काम हे खूप तात्पुरतं आणि कामचलाऊ आहे हे जाणवत होतं. निर्मितीतल्या भाबडेपणाविषयी आधी लिहिलं आहेच – की वयोगटाचा, आशयाचा विचार न करता कवितांना ‘बालसाहित्य’ हे लेबल ठोकायचं आणि एकाच संग्रहात भरून ते सादर करायचं. मांडणीचा, प्रावाहिकतेचा कोणताही विचार न करता. लेखक लिहीत गेले, प्रकाशक छापत गेले… असा सरधोपट मामला – त्यात कोणतीही दूरदृष्टी किंवा  गांभीर्य नव्हतं.
बालसाहित्याच्या त्या पुस्तकांतल्या दृश्य बाजूबाबत असलेल्या ठोकळेबाजीला तर काही अंतच नाही. पहिलं म्हणजे हे पुस्तक मुलांसाठी आहे ना, मग त्याला घाबरलं पाहिजे, त्याचं दडपण घेतलं पाहिजे असा दृष्टिकोण ठेवायचा. घाबरणं म्हणजे काय, तर बालसाहित्य म्हणून जे काही ठोकताळे बनलेले आहेत, पायंडे पडून गेलेले आहेत; त्यापलीकडे विचार करायचाच नाही!
उदाहरण देतो : कोणीतरी कधीतरी ठरवलं की बालसाहित्य हे मोठ्या टायपातच छापलं गेलं पाहिजे. अठरा पॉइंटात. विषय संपला! आता बालसाहित्य वाचणारे जे ‘बाल’ आहेत ते दृष्टीला अधू आहेत का? अभ्यासाची पुस्तकं, वर्तमानपत्रं वगैरे वाचतातच की. त्यामुळे हा ‘मोठ्या टायपा’चा आग्रह अनाकलनीय आहे. बरं – अगदी समजा मोठा टाईपच घ्यायचा आहे. पण तो नक्की किती मोठा असावा यावर भाष्य करण्यासाठी कमर्शियल आर्टिस्ट नावाच्या तज्ज्ञाला विचारलं गेलं पाहिजे! अठराच पॉइंट हवा याला काही अर्थ नाही. कमर्शियल आर्टिस्टला विचारलं तर तो सांगेल, की पॉइंट साईज एकच असला तरी छापानुसार (font) अक्षरांच्या वजनात फरक पडतो. कर्नाटक फाउंड्रीचा अठरा पॉइंट आणि पुण्यातल्या फाउंड्रीचा अठरा पॉईंट यांत फरक आहे. कमर्शियल आर्टिस्ट कलामहाविद्यालयात जाऊन हे सगळं शिकला आहे. अंतिम निर्णय कदाचित त्याचा नसेलही, पण या प्रक्रियेत त्याला साधं विचारलंही जात नाही. आता ही खाली दिलेली उदाहरणं श्रीलिपीच्या छापाची आहेत. माप तेच आहे. निर्मातेही एकच. पण अक्षराच्या वळणानुसार आकारात नि वजनात किती फरक पडतो पाहा. असं असताना कुणीतरी उठून ठरवून टाकायचं, अठरा पॉइंट हेच आदर्श, याला काय अर्थ आहे?
एकाच पॉइन्टमापातल्या पण विविध फौंड्रीत बनलेला एक फॉन्ट
असंच भडक रंगांबाबत. ‘मुलांना भडक रंग आवडतात’ असा एक ठोकताळा असतो. भडक – ठळक – बटबटीत या तीन भिन्न गोष्टी आहेत हे कमर्शियल आर्टिस्टला समजतं. किंबहुना बालसाहित्यनिर्मितीच्या अनेक टप्प्यांवर कमर्शियल आर्टिस्ट आपलं ज्ञान वापरून काही मूल्यवर्धन करू शकतो. पण – ठोकळेबाजी, भाबडेपणा आणि अव्यावसायिक दृष्टिकोण आड येतो. आजही कोणत्याही प्रकाशनाकडे स्वतःचा असा ‘कलादिग्दर्शक’ नाही, जो पुस्तकाच्या दृश्य स्वरूपाकडे लक्ष्य देऊ शकेल.
कथेच्या केंद्रस्थानी काय आहे, लेखनातली मर्मस्थळं काय आहेत याबद्दल चांगला चित्रकार विचार करू शकतो, आणि त्या अनुषंगाने चित्र काढू शकतो. पण सहसा होतं असं, की लेखकाकडून किंवा प्रकाशकाकडून सूचना लिहून येते, की ‘अमुकतमुक चित्र काढा’. असं मेड-टू-ऑर्डर चित्र त्या कथा/कवितेला शोभेलच असं नाही. आता समजा, कवितेत एक तांब्याभांडं आहे. तर चित्रकाराने कोणतंही तांब्याभांडं चित्रात दाखवून चालणार नाही. ते तांब्याभांडं कोणत्या धातूचं आहे, त्याचा घाट मराठी आहे की बंगाली, त्याची प्रकाशयोजना कशी दाखवायची आहे, हे सगळं चित्रकाराने ठरवलं पाहिजे. त्यासाठी त्याला पुरेसं स्वातंत्र्य दिलं पाहिजे.
चित्रकाराच्या कामाला, आणि मुख्य म्हणजे ज्ञानाला, मान देणं शिकलं पाहिजे. आर्थिक विषयावर तपशिलात ऊहापोह करूच, पण आहे त्या आर्थिक चौकटीत राहूनही अनेक गोष्टी करता येतात. पण प्रयोग करायला आपण घाबरतो.
आर्थिक आणि व्यावसायिक बाजू
ठोकळेबाजी आपण पाहिली. त्याचं व्यवच्छेदक लक्षण म्हणाल तर ‘प्रयोग न करणे’ हे आहे. यासाठी मी प्रकाशकांना दोष देतो आहे असं समजू नका. यापाठीमागे असलेली कारणं शोधली तर ती प्रामुख्याने आर्थिक आणि व्यावसायिक आहेत. आता वर लिहिलेल्या दुष्टचक्राच्या ‘खपत नाही’ भागाकडे आपण येतो. आपण करतो आहोत ते पुस्तक बालवाचकांना समजेल का / आवडेल का/ पटेल का अशी भीती प्रकाशकाच्या मनात कायम असते. बालसाहित्याचं प्रकाशन करण्यामागचे ‘ड्रायव्हिंग फोर्सेस’ जरी पाहिले, तरी त्यात ‘खपेल म्हणून’ यापेक्षा ‘अचानक [प्रसिद्ध लेखकाचं] अप्रकाशित लेखन हाताशी लागलं म्हणून’ किंवा ‘अबक संस्थेने स्पर्धा आयोजित केली आहे म्हणून’ किंवा ‘पलीकडच्या प्रकाशनसंस्थेचं असलंच पुस्तक खपतं आहे म्हणून’ असलीच कारणं जास्त दिसतात. म्हणजे व्यवसाय म्हणून प्रकाशित केल्या गेलेल्या गोष्टीमागे अव्यावसायिक कारणंच अधिक आहेत.
याचा परिणाम म्हणजे कमी किमतीत काम करून घेतलं जाणं. माझ्या बाबतीत बोलायचं झालं, तर बालसाहित्यात काम केल्यावर खूप काळानंतर कधीतरी अत्यंत अशक्त मानधनाचा एक चेक हातात येतो. पण चित्रकार म्हणून मी माझा व्यावसायिक वेळ देतो आहे, त्यामुळे मला व्यावसायिक पातळीचं मानधन मिळावं अशी माझी अपेक्षा असते. रकमेबाबत मी कदाचित तडजोड करेनही, पण काहीएक किमान पातळीचं ते मानधन असावं अशी माझी अपेक्षा राहणारच. चित्रकाराच्या वेळेची योग्य किंमत दिली गेली पाहिजे.
एकवेळ हा व्यावहारिक भाग मोठ्यांच्या पुस्तकांबाबत सांभाळला जाईलही, पण बालसाहित्याबाबत कारभार ढिला असतो. कारण तेच – खप नाही!
किंमत कमी करण्याच्या नादात आपण मुलांना काही हलक्या प्रतीचं देतो आहे याची जाणीव आपल्याला होत नाही. मुलांसमोर सुमार निर्मिती येते याचं व्यक्तिशः मला दु:ख आहे. माझी मुलगीही ते वाचणार असते – तिने हलक्या प्रतीचं काही वाचावं असं मला वाटत नाही. दुसरं म्हणजे पैसे कमी मिळताहेत म्हणून हलक्या प्रतीचं काही देणं मला पटत नाही. शेवटी माझाही वैयक्तिक ‘ब्रँड’ मला सांभाळायला हवाच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाईट काम केल्याची रुखरुख राहते ती वेगळीच.
चांगले प्रकाशकही आहेत, पण आर्थिक बाजू डळमळीत असल्यावर ते तरी काय करणार? त्यातून ‘पडद्याच्या आत’ सगळं आलबेल आहे असंही नाही. व्यवसाय म्हटल्यावर असणार्‍या सगळ्या भल्याबुर्‍या प्रवृत्ती इथेही आहेत. एका प्रकारचं पुस्तक चालतंय म्हटल्यावर तस्संच्या तस्सं पुस्तक काढणारे ‘छुपे’ (किंवा नकलमारू वा कॉपीकॅट) प्रकाशक असतात. दुसर्‍या बाजूला अत्यल्प पैशांत आपली कला विकणारे चित्रकार असतात. कथेला वा कवितेला चित्राची गरज नसताना उगाचच एखादं सुमार चित्र छापणारे संपादकही असतात.
इतर प्रकाशनांतला, भाषांतला आणि देशांतला अनुभव
हे वरचं सगळं झालं मराठी बालवाङ्मय प्रकाशित करणार्‍या व्यावसायिक प्रकाशनांबद्दल. मी इतरही ठिकाणी बालसाहित्याशी संबंधित काम केलं आहे. त्याबद्दल लिहितो:
– वर लिहिल्याप्रमाणे ‘मागणीनुसार चित्र काढून घेणे’ हा प्रकार काही नावाजलेली परदेशी प्रकाशनंही करतात!
– व्यावसायिक गणितांशी बांधील नसलेल्या, ‘ना नफा’ तत्त्वावर काम करणार्‍या सरकारी संस्थांचा अनुभवही फारसा उत्साहवर्धक नाही. तिथे प्रचंड लालफितीचा कारभार असतो. शिवाय अभेद्य ठोकळेबाजी. व्यावसायिक प्रकाशकांशी किमान चर्चा तरी करता येते. सरकारी नियमपुस्तिकेसमोर काहीही करता येत नाही.
– तळमळीने, आर्थिक बाजूकडे न बघता काम करणारे माधुरी पुरंदर्‍यांसारखे लोक आहेत, पण तेही तुरळकच.
– नियतकालिकांसाठीही काम केलं, पण त्यांचं आर्थिक गणितही दोलायमानच राहिलं.
– मराठीत एकही ग्राफिक नॉव्हेल नाही. एका सुप्रसिद्ध लेखकाने मला विचारलं होतं, की आपण ग्राफिक नॉव्हेल करू या का? ग्राफिक नॉव्हेलमध्ये जे अंतिमतः तयार होतं, ते जितकं लेखकाचं असतं तितकंच चित्रकाराचं असतं. त्यामुळे त्यांना संहिता बदलायला लागली असती. त्यासाठी त्यांची तयारी नसल्याने ते सगळं बारगळलंच.
हिंदीतला अनुभव
सद्यस्थिती अशी आहे, की अगदी आर्टस्कूलमध्येही ‘बालसाहित्यासाठी चित्र कसं काढावं’ याचं शिक्षण दिलं जात नाही. बालसाहित्यासाठी चित्र काढण्याला चित्रकलाच मानलं जात नाही! (मी शिकलो ते धडपडत, ज्येष्ठांचं काम बघत, वगैरे.)
यासाठी काही करावं म्हणून टाटा ट्रस्ट आणि एकलव्य अ‍ॅकेडमीने मध्य प्रदेशात भोपाळमध्ये ‘रियाझ अ‍ॅकेडमी फॉर इलस्ट्रेटर्स’ सुरू केली आहे. त्यामध्ये मी शिकवतो. लहान मुलांच्या पुस्तकांना सुंदरशी चित्रं काढून देणारे रेखाचित्रकार (इलस्ट्रेटर्स) तयार व्हावेत हा या संस्थेचा हेतू आहे. यात वर्षाकाठी वीस मुलं निवडली जातात, आणि त्यांना ‘साहित्य कसं समजून घ्यावं’ इथपासून सगळं शिक्षण दिलं जातं.
या निमित्ताने माझा हिंदीतील बालसाहित्यिकांशी परिचय झाला. हिंदीमध्ये बालसाहित्यात चांगलं काम होत आहे. बालसाहित्याला लोकाश्रय आहे. ‘चकमक’सारखी नियतकालिकं चालू आहेत. कवितेसहित चित्र असं असलेली पोस्टर्स प्रचंड संख्येने विकली जातात. तसंच पोस्टकार्ड्सचं.
एका बालकवितासंग्रहावर काम केल्यानंतर ‘यातली एक कविता आणि एक चित्र असं पोस्टर करू’ अशी कल्पना प्रकाशकांना सुचवली होती. परंतु गणित करता प्रत्येक पोस्टरची किंमत दीडशे रुपयांवर जायला लागली. ‘मराठी बालकवितेचं एक पोस्टर आपल्या घरात असावं’ असं पालकांना वाटेलच याची खात्री प्रकाशकांना वाटेना! बरं, पोस्टरची किंमत कमी करण्यासाठी घाऊक प्रमाणात पोस्टर्स छापावी लागली असती. (उदाहरणादाखल: हिंदीमधल्या त्या पोस्टरची किंमत आहे पंधरा रुपये, आणि पोस्टर्स छापली आहेत अडीच लाख!) परत सगळं व्यावसायिक गणितावर येऊन अडलं!
बदलत्या तंत्रज्ञानाचा परिणाम
‘मराठी बालसाहित्यातली दृश्यकला’ या आधीच उतरणीला लागलेल्या गाड्याचा वेग कोणी वाढवला असेल, तर तो बदलत्या तंत्रज्ञानाने.
बालसाहित्यातली दृश्यकला आर्टस्कूलमध्ये शिकवत नाहीत हे मागे आलंच आहे. जे शिकवतात, त्यातही हल्ली ‘चित्र काढणे’ या मूलभूत कौशल्याऐवजी ‘वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरणे’ हे प्रामुख्याने शिकवतात! त्यामुळे आर्टस्कूलमधून बाहेर पडतात ते चित्रकार नव्हे, ते तंत्रज्ञ. एकदा सॉफ्टवेअर वापरता यायला लागलं की सगळंच सोपं वाटायला लागतं. पण चित्र हे मुळात ‘काढता’ यायला लागतं. मग माध्यम आयपॅड असो, कॅन्व्हास असो, कागद असो किंवा दगड असो.
झपाट्याने बदललेलं दुसरं तंत्रज्ञान म्हणजे छपाईचं. मी सुरुवात केली तेव्हा मूळ चित्रावरून ब्लॉक वगैरे बनवावे लागत. चित्र छापायचं असेल तेव्हा छपाई यंत्रात सायन, मजेन्टा वगैरे रंग स्वहस्ते मिसळावे लागत. त्या तुलनेत आताची छपाई यंत्रं बघितलीत, तर ती फारच सोपी आहेत. त्या यंत्रासमोर दगडाला जरी उभं केलं तरी चित्र सुबकच छापलं जाणार आहे.
या दोन्हींचा एकत्र परिणाम असा झाला, की वाईट चित्रही चांगलं ‘दिसायला’ लागलं! चांगली छपाई म्हणजे चांगलं चित्र नव्हे हे हळूहळू विसरलं जात आहे.
फलश्रुती
व्यावसायिकतेचा अभाव, चुकत चाललेली आर्थिक गणितं आणि कदाचित या दोन्हीमुळे जन्माला येणारी ठोकळेबाजी हे या चित्रपटाचे मुख्य खलनायक आहेत. हे बदलायचं असेल तर सर्वप्रथम आर्थिक व्यवहार सुधारायला हवा. त्याशिवाय काही बदल होणं अवघड आहे.
फलश्रुतीमध्ये ‘साठां उत्तरी कहाणी…’ वगैरे म्हणायची पद्धत आहे. मराठी बालसाहित्याबद्दल, त्यातही त्यातल्या दृश्य भागाबद्दल बोलायचं; तर आपण सगळे मिळून मुलांसाठी काही बांधू शकलो नाही हे सत्य शेवटी उरतं. याला ‘सुफळ’ म्हणता येणार नाही, पण ‘संपूर्ण’ तरी म्हणू या.
– चंद्रमोहन कुलकर्णी
chandramohan.kulkarni@gmail.com
(शब्दांकन: आदूबाळ)
aadubaal@gmail.com
***
चित्रस्रोत : चंद्रमोहन कुलकर्णी
Facebook Comments

4 thoughts on “अशक्त अर्थव्यवस्थेची लुकडी फळे”

  1. मर्मावर व वर्मावर बोट ठेवणारा लेख!
    हा घरोघरी व शाळोशाळी आणि चौकाचौकात लावायला हवा, कारण या पातकासाठी एक समाज म्हणून आपण सगळेच जबाबदार आहोत.

  2. संपादकीय टिपण लेखाच्या शेवटी टाकले असते तर बरे झाले असते. लेखाच्या मधेच तिरप्या ठशात ते टाकणे लेखाच्या वाचनाला बाधा आणणारे आहे, विनाकारण हस्तक्षेप करणारे आहे. लेखाची लय बिघडवणारे आहे. वाटतच असेल, तर लेखाच्या शेवटी टाका. तसेही बहुतेक लेखांमधे असे मुद्दे येतच असतात, त्यावर प्रत्येक ठिकाणी संपादकिय टिप्पणीची गरजही नसावी. पण आपल्याला वाटतच असेल तर शेवटी करा, अन्यथा वेगळा लेख लिहा.

  3. लेख मात्र उत्तम आहे. शब्दांकनही प्रवाही आहे. लेखातील मुद्दे चिंतनीय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *