बालसाहित्यांक २०१७ लेख

किशोर : अभिरुची घडवणारं मासिक

लहानपणी आपण मुद्दामहून, ठरवून काही पाहत-वाचत नसलो, तरी काही ना काही आपोआपच नजरेसमोर येत असतं. पाळण्याला टांगलेल्या भिरभिऱ्यापासून ते लुकलुकणाऱ्या दिव्यांपर्यंत आणि जमिनीवरच्या मुंगीपासून ते आभाळातल्या विमानापर्यंत लक्ष्य वेधून घेणारं काहीही आपल्याला पुरेसं असतं. एकदा हलत्याडुलत्या गोष्टी सरावाच्या झाल्या की मग अधिक काहीतरी स्थिरत्व असणारंसुद्धा आपलं लक्ष्य वेधून घ्यायला लागतं. मग साहजिकच मोर्चा वळतो पुस्तकातल्या रंगीत चित्रांकडे. ‘कॉमिक्स’ हा बालपणाचा एक अविभाज्य भाग बनतो, यामागे हेच कारण असावं. अर्थात त्यातली चित्रंच आपल्या आकलनात बरीचशी भर घालत असल्याने वाचनाचे कष्ट कमी होतात हेही एक प्रमुख कारण असू शकतं. चित्रकथांचा टप्पा हा खरंतर एक अत्यंत ‘ट्रिकी’ टप्पा असतो. म्हणजे ‘काहीच नाही’ आणि ‘बरंच काही’ यांच्यामधल्या डुगडुगत्या पुलासारखा. चित्रांच्या पुढे जाऊन ओळींच्या दरम्यानचे अर्थ समजून घेण्यासाठी हा पूल ओलांडणं फार गरजेचं असतं. अनेक जण पुलावरच अडकून पडतात आणि मग पलीकडच्या विलक्षण विश्वाला मुकतात. हे होऊ नये यासाठी आवश्यकता असते ती आधारासाठी एक काठी हातात असण्याची. सत्तर ते नव्वदच्या दशकांदरम्यान असंख्य मराठी मुलांसाठी अशी एक काठी होती ‘किशोर’ मासिकाची!
माझ्याकडे ती काठी होतीच, पण ती पुलावर आल्यानंतर नव्हे, तर मी उभा राहायच्याही आधीपासून! अगदी सोप्या शब्दांत सांगायचं, तर मला अक्षरओळख व्हायच्याही आधीपासून ‘किशोर’ माझ्या सोबतीला होता… त्यातल्या चित्रांमधून, जाई काजळाच्या आणि पॉपिन्सच्या जाहिरातींमधून, गोष्टींच्या शीर्षकांच्या सुलेखनामधून निर्माण होणाऱ्या प्रतिमांमधून आपोआपच डोक्यामध्ये ‘रफ स्केच’ आधीच तयार होत गेलं होतं. मला नीट वाचता यायला लागल्यानंतर आपसूकच त्या स्केचमध्ये रंग भरत गेले. ही सगळी प्रक्रिया मला आज उलगडते आहे, जेव्हा मी हा लेख लिहायला बसलोय. काय गंमत आहे बघा, आपली ज्याच्याशी अंतरीची ओळख असते अशा व्यक्तीबद्दल आपल्याला चारचौघांत बोलायला सांगितलं, तर अचानक आपल्याला काय बोलावं हे सुचतच नाही. म्हणजे सांगायचं खूप असतं, पण मांडायचं कसं हेच कळत नसतं. तसंच काहीसं ‘किशोर’बद्दल लिहिताना झालंय खरं… आणि मग लिहिता-लिहिता मलाच नव्याने कळतंय की ‘किशोर’ने बोट धरून मला कुठपर्यंत आणून सोडलं आहे!
जेव्हा मी शाळेतही जात नव्हतो, तेव्हापासून माझ्या घरात ‘किशोर’चे बांधणी केलेले गठ्ठे होते. त्यातला एक होता सत्तरीतल्या अंकांचा, पिवळ्या पडलेल्या पानांचा गठ्ठा. पुठ्ठ्याचं छप्पर उडून गेलेेलं, बाइंडिंगच्या शिवणीवर असणारं कापडाचं आवरण कोणे एके काळीच झडून गेलेलं, पुस्तकांच्या गठ्ठ्याचा कणाही खिळखिळा झालेला. शिवणीचा दोरा मात्र बराच काळ किल्ला लढवत होता. ‘किशोर’च्या आयुष्याची दोरी बळकट असल्याचे सांगण्यासाठीच तो टिकून राहिला असावा. माझ्या मोठ्या मावसभावाच्या घरात सत्तरच्या दशकात उगम पावलेला तो पुठ्ठा बांधणीचा गठ्ठा माझ्या अनेक मामे-मावस भावा-बहिणींच्या हाताळण्यातून, अनुभवातून, वागण्यातून जात जात, बारा घरचं पाणी पीत-पीत अखेर आमच्या घरी स्थिरावला होता. बाकीची पडझड झालेली असली, तरी बारा महिन्यांचा एकच गठ्ठा असल्याने ते बाड अगदी बाळसेदार भासायचं. त्या गठ्ठ्याशी माझं नातं विशेष. मुखपृष्ठापासून एकेक पान गळत-गळत-गळत जाऊन सहावं-सातवं पानच आता त्या गठ्ठ्याचं मुखपृष्ठ झालेलं. अशा स्थितीत त्या ‘मुखपृष्ठा’वर असणारं अक्रोडाचं चित्र हे माझ्या लहानपणाच्या कुठल्याही पुस्तकावरच्या, कॉमिक्सवरच्या चित्रापेक्षाही जास्त ठळकपणे आठवतं आहे. पाहून अनेक वर्षं लोटली तरी काही प्रतिमा मनात इतक्या घट्ट रुतून बसलेल्या असतात, की नंतर कितीही पावसाळे येऊन गेले तरी त्या पुसटसुद्धा होत नाहीत. त्या अंकातल्या चित्रांचंही तसंच होतं. गाणी, गोष्टी, छायाचित्रं, विनोद, कोडी वगैरेंच्या सोबतीने त्या अंकांमध्ये एक भन्नाट गोष्ट होती. ती म्हणजे त्यातल्या चित्रांवर माझ्या मावसभावाने केलेली कलाकुसर. अंकांमधली मुलं-मुली, आजी-आजोबा, राजा-राणी या कुणाहीबद्दल आपपरभाव न बाळगता बेगुमानपणे शाईपेन चालवून त्यांना दाढी, मिशा, गॉगल, सिगरेट वगैरे दागिन्यांनी सजवून टाकलं होतं. कला, काव्य, सौंदर्य असल्या कोणत्याही गोष्टींचे त्याने फाजील लाड केलेले आढळत नव्हते. सब घोडे बारा टक्के. ही खरी समता! त्या अक्काबाईच्या फेऱ्यातून जाई काजळाच्या जाहिरातीतली छोटी (आणि बहुधा गोजिरवाणी) मुलगी किंवा गोष्टींमधली लहान बाळंही सुटली नव्हती. पण जे केलं होतं, त्यात मात्र खोट काढायला जागा नव्हती. एवढ्या प्रमाणबद्ध दाढ्या-मिश्या एखाद्या चित्रपटाच्या मेकपमनने पाहिल्या असत्या, तर त्याने माझ्या भावालाच गुरू केलं असतं. असो. या चित्रांइतकीच लक्ष्यात राहिली आहे त्या मुखपृष्ठाची प्रतिमा. ते पान ओलांडून आत गेलं की तरतरीत नाकाच्या एका तरण्याबांड क्रिकेटपटूची मुलाखत. नुकताच दौरा गाजवून आलेला कुणी एक ‘सुनील मनोहर गावसकर’ नावाचा एक खेळाडू होता म्हणे. मग ती मुलाखत पाहत असतानाच कळलं, की हा एक महान खेळाडू असून आत्ता काही वर्षांपूर्वीच तो निवृत्त झालाय.
…आईशप्पथ! हो का? आपल्याला तर कपिलशिवाय कुणाचं कौतुकच नव्हतं आत्तापर्यंत. वाचायला हवी मुलाखत. पण एवढं कठीण कोण वाचणार? त्यापेक्षा आपण ‘जाईने पाहिली जम्माडी जम्मत’ नावाची चित्रकथा वाचून पाहू. सोप्पंय ते वाचायला. शिवाय या अंकाचं शेवटचं पान उलटलं की लगोलग पुढल्या महिन्याचा अंक हजर! जाईची जम्मत आता धडामकन वाचूनच टाकू.
आणि मी ती खरंच संपवली. खरं म्हणजे अक्षरओळख नसतानाही ती चित्रं पाहून ऐंशी टक्के गोष्ट कळल्यातच जमा होती. पण वाचण्याची मज्जा काही औरच होती. पुढे मोठा झाल्यावर कळलं, की हीच ती जगप्रसिद्ध बालकादंबरी ‘Alice in wonderland’. पुढे तीसुद्धा वाचली. पण खरं सांगतो, तिच्यापेक्षा भा. रा. भागवतांनी सांगितलेली जाईची गोष्ट जास्त भारी वाटली मला!
ते वय खरं म्हणजे ससा-कासव, राजा-राणी यांच्या साध्या-सोप्या, तात्पर्य सांगून मोकळ्या होणार्‍या गोष्टी वाचायचं होतं. ‘किशोर’च्या त्या पिवळ्या पडलेल्या पानांमध्ये त्या गोष्टी तर होत्याच, पण त्यापेक्षाही खूप जास्त मसाला ठासून भरला होता. मी किशोरवयात पोचायच्या आधीच मला ते सगळं खुणावत असायचं. बालसाहित्यिक भा. रा. भागवत यांनी ‘तैमूरलंगचा भाला’ या भन्नाट कादंबरीच्या प्रस्तावनेत किशोरवयीन मुलांच्या वाचनाच्या आवडीनिवडीबद्दल अगदी चपखल लिहिलं आहे :
वयाचे पहिले दशक ओलांडताना मुले अद्भुत आणि वास्तव यांच्या सीमेवर कुठेतरी असतात. राजा-राणी, राक्षस व पऱ्या यांची मोहिनी अद्यापि मनावरून गेलेली नसते. पण त्याचबरोबर दृष्टी हळूहळू सभोवतालच्या जगात ज्या साहसी घटना घडत असतात – किंवा घडाव्यात असे त्यांना वाटते – तिकडे वळलेली असते. तेरा-चौदा वर्षांच्या मुलांनी अद्भुत गोष्टींकडून साहस कथांकडे निश्चितपणे वळावे असे मला स्वत:ला वाटते.
अद्भुत आणि वास्तव या दोन्हीचं अचूक मिश्रण पुरवणारे ‘किशोर’चे अंक माझी वाचनभूक अजूनच चेतवायचे.   
‘किशोर’च्या अंकांची मांडणी अगदी लक्ष्यपूर्वक केलेली असल्याने सगळ्या चवींना त्यांत अचूक स्थान असायचं. छोट्या वयोगटातल्या मंडळींसाठी बालकविता, नाटुकलं, राजा-राणीची गोष्ट, अंकाच्या शेवटी एखादी चित्रकथा असायची. त्याहून मोठ्या वयोगटासाठी ज्ञानात भर घालणाऱ्या गोष्टी असायच्या. विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक माहिती हे ‘किशोर’चं अविभाज्य अंग होतं. मुलांचं कुतूहल शमवणारं ‘शंका-समाधान’ नावाचं खूपच रंजक सदर होतं. विज्ञान, तंत्रज्ञान आणि सृष्टीतील घडामोडी यांविषयी आपल्याला पडणारे प्रश्न मुलं ‘किशोर’ला पाठवायची आणि त्यांची उत्तरं पुढच्या महिन्यातल्या अंकात या सदरात छापून यायची. वीज कशामुळे पडते, चेरापुंजी येथे सर्वात जास्त पाऊस का पडतो, पाऊस कसा मोजतात अशा वैज्ञानिक, भौगोलिक कुतूहलांपासून ते टीव्हीचं कार्य कसं चालतं, टेलीप्रिंटरचं कार्य कसं चालतं, सोनोग्राफी म्हणजे काय अशा तांत्रिक प्रश्नांपर्यंत अनेक गोष्टींची आकृत्यांसहित अतिशय सविस्तर उत्तरं दिलेली असायची. ‘असे हे विलक्षण जग’ नावाचं वसंत शिरवाडकर यांचं सदर जगातल्या सर्व खंडातल्या, अनेक प्रांतांमधल्या रंजक गोष्टींची सविस्तर ओळख करून देत असे. इतिहास, भूगोल, प्राणिजगत, वनस्पतिजगत यांच्याबद्दल खूप रोचक माहिती त्या सदरात असायची. उदा. हंस, माकड, हत्ती, साप अशा एकेका पशुपक्ष्याला संपूर्ण वाहिलेले लेख, ज्यात त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांसोबतच त्यांच्या उत्क्रांतीसंबंधीही माहिती असायची. विविध भौगोलिक प्रदेश, डोंगर, समुद्र कसे तयार झाले यावर काही लेख होते. पाठ्यपुस्तकांमधल्या खरीप-रब्बी पिकांचे नकाशे, अक्षांश-रेखांशांचे चौक, वाचणार्‍याला गरागर फिरवणाऱ्या खाऱ्या आणि मतलई वाऱ्यांच्या दिशा वगैरे नीरस तपशिलांपेक्षा हे जग फारच विलक्षण आहे याची जाणीव या सदरातून व्हायची. याशिवाय ‘सृष्टीतील नवलकथा’ हे एक छोटसं सदर होतं. एखाद्या पानपूरकासारखं ते एका चौकटीत असायचं, पण त्यातून प्राणिजगताची अत्यंत सुरस माहिती रेखाटनांसहित दिलेली असायची. पुढे या सदराचं एक छोटेखानी पुस्तकही झालं.  ही तीनही सदरं ‘किशोर’मध्ये प्रदीर्घ काळ चालली. शाळेत असतानाच जगाबद्दल एवढी माहिती करून देणारं हे खरंखुरं डिस्कवरी चॅनल होतं. याशिवाय ‘विज्ञानाचे वाटाडे’सारखं प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञांची ओळख करून देणारं सदर, त्या-त्या महिन्यातल्या आकाशस्थ ग्रहताऱ्यांची स्थिती आणि अन्य खगोलीय घडामोडी यांबद्दल सांगणारं ‘आकाशदर्शन’ हे सदर असायचं. अग्निबाण, स्वनातीत (supersonic) ‘कॉन्कॉर्ड’ विमानं यांची माहिती; भारताच्या अंतराळ मोहिमांचे वृत्तान्त; विविध विज्ञानकेंद्रांची माहिती; जागतिक पातळीवर घडलेल्या महत्त्वाच्या वैज्ञानिक-तांत्रिक घडामोडींचा आढावा वगैरे गोष्टींनाही अंकात न चुकता स्थान असायचं. १९७९ साली स्कायलॅब हे अमेरिकेचं पहिलं अंतराळस्थानक अपघाताने ऑस्ट्रेलियात कोसळलं, त्यावर एक लेख होता. १९८७ साली जेव्हा आपल्या देशात संगणक बाल्यावस्थेत होता, तेव्हाच ‘किशोर’मध्ये त्यावरही एक तपशीलवार लेख प्रसिद्ध झाला होता, यावरून संपादक मंडळाची तंत्रदृष्टी किती पुढची होती हे लक्ष्यात येईल.
 
‘किशोर’ने केलेले क्रीडासंस्कार आणि नाट्यसंस्कार यांचाही अभ्यास होण्याची गरज आहे. भारत दौऱ्यावर आलेला परदेशी क्रिकेट संघ किंवा परदेशी चाललेला भारतीय क्रिकेट संघ यांचा परिचय, क्रिकेटसोबतच अन्य खेळांबद्दलच्या बातम्या, खेळाडूंच्या मुलाखती (इथे मला १९८९ साली छापून आलेली नव्हाळीतल्या सचिनची मुलाखत आठवते आहे), त्यांचा इतिहास इत्यादी गोष्टी अंकात असायच्या. टेनिसमधला सर्वाधिक काळ चाललेला सामना पॅन्चो गोन्झालिस आणि चार्ली पॅसरेल यांत झाला. तेव्हा टेनिसमध्ये टायब्रेकर नव्हता. त्या सामन्यावरही एक लेख होता. इथे एक उल्लेख आवर्जून करावासा वाटतो – तो म्हणजे गिर्यारोहणाचा. हाही एक साहसी खेळच आहे अशा दृष्टीनेच ‘किशोर’मधून गिर्यारोहणाकडे पाहिलं जात होतं. विविध मोहिमा, एखादं उंच शिखर सर केलं असल्यास त्याची माहिती, साहसी गिर्यारोहकाची स्फूर्तिगाथा (यात अपंग परदेशी गिर्यारोहकापासून अरुण सावंतसारख्या मराठमोळ्या साहसवीरापर्यंत अनेक जणांवर विस्तृत लिखाण समाविष्ट आहे), गिर्यारोहणातल्या गमतीजमती अशा विविध कोनांमधून ‘किशोर’ने विशेषतः ऐंशीच्या दशकात गिर्यारोहणाची दखल सातत्याने घेतली. त्या काळात गिर्यारोहणाचा आजच्याइतका प्रसार झालेला नसताना ‘किशोर’ केलेल्या प्रसारामुळे छोट्या वाचकांच्या मनात गिर्यारोहणाबद्दल आकर्षण निर्माण होण्यास मदत झाली असेल असं प्रकर्षाने वाटतं.
खेळाला दिल्या जाणार्‍या प्रसिद्धीसोबतच ‘किशोर’मध्ये नाटिका, एकांकिका, नाट्यछटा असायच्या. रत्नाकर मतकरी, प्रतिभा मतकरी, वसंत सबनीस, राजा मंगळवेढेकर, एवढंच काय पण चिं. त्र्यं. खानोलकर उपाख्य आरती प्रभू यांनीही ‘किशोर’मधून असं लिखाण केलेलं आहे. इतक्या मातब्बर लेखकांची नावं पाहून ‘किशोर’चं संपादक मंडळ नाट्यसंस्कारांबद्दल किती जागरुक होतं हे दिसून येईल. सत्तर-ऐंशीच्या दशकातल्या बालनाट्य चळवळीचा बहराचा काळ आणि त्याच काळात ‘किशोर’मध्ये नाट्यप्रकारांना असलेलं मानाचं  स्थान हा योगायोग खचितच म्हणता येणार नाही.
कुठल्याही मासिकाचा दिवाळी अंक विशेष असतोच, पण ‘किशोर’चा एप्रिल-मे महिन्याचा मिळून सुट्टी विशेषांकही असायचा.  मला आठवतं, १९८६ सालचा सुट्टी विशेषांक केवळ खेळ या विषयाला वाहिलेला होता. त्यात क्रिकेट, फुटबॉल, टेनिस अशा परदेशी खेळांपासून मल्लखांब, कबड्डी, केरळातील देशी खेळांपर्यंत अनेक क्रीडाप्रकारांची दखल घेतली होती. शिवाय क्रीडाविषयक कोडी, किस्से, हास्यचित्रं यांनी अंक भरगच्च झाला होता. १९८९ सालचा सुट्टी विशेषांक केवळ नाटक या विषयाला वाहिलेला होता. मृणाल देव, सुप्रिया मतकरी, दिलीप प्रभावळकर, गोट्याच्या भूमिकेत गाजलेला बालकलाकार जॉय घाणेकर यांचे बालनाट्यातले आणि इतर रंगभूमीवरचे अनुभव; रत्नाकर मतकरी यांनी तेव्हा अतिशय फॉर्मात असलेल्या बालरंगभूमीवरच्या बालकलाकारांवर लिहिलेला लेख; ‘नेपथ्यातील गमतीजमती’ एकांकिकेच्या आकृतिबंधामधूनच सांगण्याचा रामनाथ थरवळ यांचा अभिनव प्रयोग; लावणी, पोवाडा, भारूड इत्यादी लोककलांचे परिचय अशा अनेक अंगांनी रंगभूमीचा वेध घेतला गेला होता. विशेष म्हणजे त्यात किशोरवयाला साजेश्या लेखांसोबतच, रंगनाथ कुलकर्णी यांचा ‘एकपात्री प्रयोग – सामर्थ्य आणि मर्यादा’ आणि कृ. रा. सावंत यांचा ‘नाट्यकलेचे स्वरूप व कार्य’ असे अभ्यासपूर्ण नाट्यविचार मांडणारे लेखही होते. त्यामुळे त्या अंकाला चांगलीच खोली प्राप्त झाली होती.  
याव्यतिरिक्त ‘किशोर’मध्ये पानपूरकं, हास्यचित्रं, विनोद अशा हलक्याफुलक्या गोष्टीही असायच्या; पण त्याहूनही मला जास्त काही आवडत असेल, तर ते ‘चित्रबोध-शब्दशोध’ अशा गंमतशीर नावाचं चित्रशब्दकोडं! हे ठोकळेबाज शब्दकोड्यांपेक्षा वेगळं असायचं. यातही उभे-आडवे शब्दच भरायचे असायचे, पण त्यांच्यासाठीचा संकेत (clue) हा शाब्दिक नसून चित्रित असायचा. उदा.  ‘१ उभे’साठी एखादं सर्पाचं चित्र दिलं असेल आणि ‘१ आडवे’साठी विष्णूचं चित्र. म्हणजे ‘ना’ हे अक्षर सामायिक असणारे २ शब्द – नाग आणि नारायण – असा विचार करून ते कोडं सोडवत जायचं.  अशा सदरामुळे चौकसपणा जागृत होणे आणि डोक्याला चालना मिळणे अशा दोन्ही गोष्टी आपसूकच व्हायच्या.
कला, संस्कृती, साहित्य यांबद्दल आणि एकूणच भवतालाबद्दल मुलांच्या मनात कळत-नकळत गोडी निर्माण व्हावी याची विशेष काळजी ‘किशोर’मध्ये घेतलेली असायची. साधारणपणे संस्कारांच्या ज्या पारंपरिक संकल्पना आहेत – उदा. दुसऱ्यांशी चांगलं वागणं, इतरांना मदत करणं, आईवडिलांविषयी आणि कुटुंबव्यवस्थेविषयी आदर बाळगणं, आपल्या उज्ज्वल इतिहासातून प्रेरणा घेणं इ. – त्यांना कळत-नकळत स्पर्श केलेला असे. फक्त ते साने गुरुजींच्या शैलीप्रमाणे आणि साने गुरुजींच्या काळाप्रमाणे उघडउघड बोधामृत पाजणारं नसून अधिक शर्करावगुंठित असायचं. ‘बालभारती’च्या अंतर्गतच ‘किशोर’ची निर्मिती होत असल्यामुळे असेल कदाचित, मुलांवर संस्कार व्हावेत हा भाव प्रत्येक अंकातून सहजगत्या प्रकट व्हायचा, मात्र गोष्टींखाली कुठलंही उघड तात्पर्य न देता.
अर्थात असं असूनही ‘किशोर’ फक्त संस्कार करण्याच्या भावनेने पछाडलेला नव्हता. त्यासाठी इथे एक उदाहरण दिल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. त्या पिवळ्या जीर्ण ‘किशोर’च्या गठ्ठ्यात एक विलक्षण थरारक कादंबरी छापून आली होती. ती म्हणजे  गंगाधर गाडगीळ लिखित ‘पक्याची गॅंग’. फास्टर फेणेची मॅड साहसं परिचित होण्याच्या खूप आधी मी ‘पक्याची गॅंग’ वाचली होती. तोपर्यंत विक्रम-वेताळ आणि हातिमताई या माझ्यालेखी सर्वोच्च साहसकथा होत्या. ही कादंबरी वाचल्यावर मात्र ते स्थान ‘पक्याची गॅंग’नं पटकावलं. ‘पक्याची गॅंग’ आजही आठवायचं कारण म्हणजे त्या कादंबरीने मला दिलेला सांस्कृतिक धक्का. ज्या काळी माझ्या कोवळ्या, सोवळ्या  इत्यादी मनासाठी ‘साल्या’ हा शब्द अब्रह्मण्यम् होता, ‘इडियट’ शब्द ऐकल्यावर काहीतरी भयंकर ऐकल्यासारखं वाटायचं; त्या काळात ‘पक्याची गॅंग’मध्ये हे शब्द वापरलेले पाहून माझी तर कानशिलंच तापली होती. पहिल्याच काही परिच्छेदांमध्ये हे असलं काहीतरी वाचल्यावर बाकीची कादंबरी घरच्या मंडळींसमोर वाचायचीही छाती झाली नव्हती. गपचूप एका खोलीत जाऊन मी ‘पक्याची गॅंग’ अधाशासारखी संपवली. आज हे सगळं आठवून हसायला येतं. पण मुलांच्या मनावर अशा शब्दांनी परिणाम होईल असा भाबडा विचार न करता चाळीस वर्षांपूर्वीच्या संपादकांनी ती कादंबरी छापली याबद्दल खरंच कौतुक वाटतं. ‘पक्याची गॅंग’ने साहसकथांचा चस्का लावला. पुढेही ‘हरवलेली चित्रे’, ‘तेरेखोलचे रहस्य’, इ. क्रमशः साहसकादंबरिका, लीलाधर हेगडे लिखित साहसकथा यांनी मला खिळवून ठेवण्याचं काम चोख केलं.
‘किशोर’बद्दल बोलताना त्यातल्या दोन अनन्यसाधारण गोष्टींबद्दल बोलावंच लागेल. पहिली गोष्ट म्हणजे त्यात लिहिणारे लेखक. अक्षरशः रथी-महारथींची फौज अनेक वर्षं ‘किशोर’ समृद्ध करत आलेली आहे. भा. रा. भागवत, लीलावती भागवत, विजया वाड, राजा मंगळवेढेकर, सुधाकर प्रभु यांच्यासारखे मोठे बालसाहित्यिक तर त्यात होतेच; पण ज्यांना आपण प्रामुख्याने मोठ्यांचे साहित्यिक म्हणून ओळखतो, असे अनेक दिग्गज ‘किशोर’मध्ये लिहायचे. शांता शेळके, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट, कुसुमाग्रज, सरोजिनी बाबर, गंगाधर गाडगीळ, वसंत सबनीस, मधु मंगेश कर्णिक, श्री. दा. पानवलकर, इंदिरा संत इत्यादी अनेक जण लहानग्यांची नस ओळखून विलक्षण भिडणारं लिहायचे. चेटकिणीच्या भीतिदायक उद्योगांवरची विंदांची प्रसिद्ध बालकविता ‘पिशीमावशीची भुतावळ’ प्रथम ‘किशोर’मध्येच छापून आली होती. शिवाय ‘भुतावळ’ या नावाची  भूतबंगल्यावरची अचाट कविताही वाचल्याचं स्मरतं. एका छोट्या मुलाच्या साहसी स्वप्नाचं वर्णन करणारी, कुसुमाग्रजांची ‘स्वारी’ ही कविता; नदी हे आईचे रूप आहे असं मानून नदीचं वर्णन करणारी ‘नदीमाय’; शांता शेळकेंची आईवरची कविता ‘फुलांत फूल बाई जाईचं’; त्यांचीच सगळ्या प्राण्यांच्या पिल्लांचं वर्णन करणारी ‘एकेकाचे बाळ’ ही कविता; शेजारच्या लहानग्या मुलीवर त्यांनी लिहिलेली शेजारची चिमणी’ ही कविता; इंदिरा संतांची दोन बहिणींवरची अक्कू बक्कू आणि…’ ही कविता; आईला मदत व्हावी म्हणून चहा करायला सज्ज झालेल्या – पण एकेक काम आईलाच सांगत गेलेल्या छोट्या मुलीवरची ‘राणीचा चहा’ ही कविता; पु. शि. रेगे यांनी रोमानियाची जगज्जेती जिम्नास्टिकपटू नादिया हिच्यावर केलेली ‘खेळाराणी’ ही कविता; चित्रपटांचे गीतकार म्हणून अधिक प्रसिद्ध असणाऱ्या गदिमा, राजा बढे, जगदीश खेबूडकर या कवींच्या अनुक्रमे ‘शोन्याची गत्ती फू’ (एका चिमुकल्याचे बोबडे बोल), ‘अळीमिळी गुपचिळी’ (मैत्रिणींमधला संवाद), ‘बाळगाणे’ (छोट्या मुलाने घरातल्या मोठ्यांचे कपडे परिधान केल्यानंतर दिसणाऱ्या त्याच्या सोंगाचे वर्णन) या कविता; चिं. त्र्यं. खानोलकरांची नादमय नाटिका ‘कावळे’ (जिचा अंकात  ‘मुक्त बालनाट्य’ असा उल्लेख केला गेला आहे); वसंत सबनिसांनी लिहिलेली शाळेतल्या धटिंगण पोराला धडा शिकवणाऱ्या मामावर लिहिलेली ‘थँक्यू मामा’ आणि गावाकडच्या इरसाल माणसांबद्द्लची ‘चार गाढवांची गोष्ट’, नारायण सुर्वे यांनी सोव्हिएत बालसाहित्यिक अलेक्सांद्र रास्किन यांच्या लिखाणाचा केलेला अनुवाद – ‘बाबा जेव्हा लहान होते’, श्री. दा. पानवलकर यांची प्रचंड खादाड ओमभटजींवरची ‘श्रीखंडाचे बोट’, दुर्गाबाई भागवतांनी अनुवादित केलेल्या ज्यू लोककथा – ‘रब्बीच्या कथा’ … अशा पक्वान्नांनी माझं लहानपण अगदी तृप्त करून टाकलं आहे.
 
मी स्वतः बऱ्यापैकी वाचन-लिखाण करत असूनही आज माझ्या भाचीला तिच्या वयाला साजेश्या गोष्टी सांगताना माझी फेफे उडते; तेव्हा लक्ष्यात येतं, की बालसाहित्य ही किती कठीण गोष्ट आहे. वयाने आणि लौकिकानेही मोठं झाल्यावर पुन्हा लहान होऊन कल्पनेच्या अचाट भराऱ्या मारणं हे मला अशक्यप्राय वाटतं. हे सगळे लेखक ज्या सातत्याने असं लिखाण ‘किशोर’च्या माध्यमातून करत आले, ते पाहून अक्षरशः नतमस्तक व्हायला होतं.
दुसरी विलक्षण खोलवर रुजलेली गोष्ट म्हणजे ‘किशोर’मधली चित्रं आणि एकूणच सजावट. श्याम जोशी, ज्ञानेश सोनार, राम वाईरकर, प्रभाशंकर कवडी, उर्मिला तळवलकर, प्रभाकर भाटलेकर, श्रीनिवास प्रभुदेसाई वगैरे मंडळींच्या रेषा, रंग, मांडणी यांतून चित्रांचे भाव, स्वभाव, शैली यांची मजा कळत गेली. कदाचित लहान वयात हे चित्र या कलाकाराचं असं लक्ष्यातही आलं नसेल. पण पुढे जेव्हा ‘कुर्यात् सदा टिंगलम्’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ यांसारख्या अनेक नाटकांच्या जाहिरातीतल्या रेखाटनांखाली ‘प्रभाशंकर कवडी’ असं नाव दिसलं किंवा फास्टर फेणेच्या चित्रांखाली ‘राम वाईरकर’ अशी आणि ‘कोट्याधीश पुलं’च्या मुखपृष्ठावर ‘श्याम जोशी’ अशी स्वाक्षरी दिसली; तेव्हा सहजच ‘किशोर’मधल्या ‘पक्याच्या गँग’सोबत पाहिलेल्या चित्रांची, ‘जाईने पाहिलेली गम्मत’मधल्या चित्रांची वा ‘किशोर’च्या एखाद्या मिश्कील मुखपृष्ठाची आठवण झाली आणि हे चित्रकार जुन्या ओळखीचे असल्याची खूण पटून गेली. एका अंकासाठी अनेक चित्रकार असणं हा अंकाच्या कामाच्या व्यापाच्या दृष्टीने फक्त सोयीचाही भाग असेल कदाचित. पण त्यामुळे अंकांचं दृश्यस्वरूप एकसुरी होणं टळलं हेही तितकंच खरं होतं. प्रत्येक अंकाच्या मुखपृष्ठाची जातकुळी वेगवेगळी असायची. कधी निःशब्द हास्यचित्र, तर कधी प्राण्यांच्या दिवाळीचं गंमतचित्र, कधी ‘जोडो भारत अभियाना’त सहभागी झालेल्या मुलांचं चित्र,  तर कधी निसर्गाच्या सान्निध्यात रमलेल्या मुलांचं छायाचित्र… दर महिन्याला नवी मेजवानी! मी आजही कुठलंही पुस्तक वाचायला सुरुवात करताना मुखपृष्ठकार कोण, आतली रेखाटनं-सजावट कुणाची आहे आहे हे पाहिल्याशिवाय पुढे जात नाही. याचं मूळ कुठेतरी ‘किशोर’ने केलेल्या चित्रसंस्कारात असावं.  
  
मला ‘किशोर’ तीन टप्प्यांत अनुभवता आला. पहिला टप्पा म्हणजे मी वर म्हटल्याप्रमाणे मावसभावाकडून आलेल्या सत्तरीतल्या अंकांचा. यातला मजकूर दर्जेदार तर आहेच, पण माझ्यासाठी तो नॉस्टाल्जिया म्हणून जास्त महत्त्वाचा आहे. दुसरा टप्पा म्हणजे ऐंशीच्या दशकातल्या शेवटाकडचे अंक – माझ्या ताईने भरलेल्या वर्गणीमुळे घरी येणारे. हे मी थोडे नंतर वाचले. या काळातल्या अंकांमध्ये लिहिणारे मुक्ता केणेकर, गजानन जोहारी, प्रकाश विनायक कामत, देवीचरण राठौर इत्यादी लेखक आधीच्या लेखाकांइतके इतके प्रसिद्ध नसले; तरीही लेखनातला मूळचा चार्म गेलेला नव्हता. उलट मला ते लिखाण माझ्या वयाला अगदी अचूक साद घालणारं वाटायचं. ज्ञानदा नाईक यांची ‘तेरेखोलचे रहस्य’ ही कादंबरी तर एवढी थरारक होती, की नेमका तिचा शेवटचा भाग असलेला अंक गहाळ झाल्याचं कळल्यावर चित्त थाऱ्यावर राहिलं नव्हतं. नंतर काही वर्षांनी कॉलेजकुमार असताना ‘मॅजेस्टिक’मध्ये ‘तेरेखोलचे रहस्य’ सबंध पुस्तकरूपात दिसली, तेव्हा मी तिच्यावर अक्षरश: झडप घातली होती. सातवी-आठवीत येईपर्यंत या दोन्ही टप्प्यांतले अंक वाचून झालेले असल्यामुळे मी हट्टाने बाबांना माझ्यासाठी ‘किशोर’ची वर्गणी भरायला लावली. नव्वदच्या दशकातल्या शेवटच्या काही वर्षांमधल्या अंकांचा अनुभव मात्र फारसा लक्ष्यात राहणारा नव्हता. अंकाचा समतोल अजूनही चांगला असला, तरीही आवर्जून वाचावा इतका आकर्षक मजकूर त्यात नव्हता. सुचेता परांजपे यांच्या ‘सुकुमार’सारखी वेगळ्या धाटणीची कादंबरिका आणि अन्य तुरळक अपवाद वगळता पुढच्या अंकाची आतुरतेने वाट पाहावी असं वाटायचं नाही. यात माझ्या वाढत्या वयाचा परिणाम किती होता आणि बदलत्या काळाचा किती हे निश्चितपणे सांगू शकत नाही. इंग्रजी माध्यमाकडे वळलेली मुलं, वाचनाचा प्रभाव कमी होऊन हळूहळू पण दमदार पावलं टाकणाऱ्या ‘कार्टून नेटवर्क’सारख्या नवनव्या दूरचित्रवाणी वाहिन्यांकडे वाढणारा त्यांचा ओढा यांमुळे एकूणच वाचणाऱ्यांच्या संख्येवर परिणाम झाला असावा असं मानायला जागा आहे. वाचणारे कमी झाले की चांगले लिहिणारे कमी होतात असं एक निरीक्षण सांगितलं जातं. त्याला अनुसरून त्या काळातला ‘किशोर’ जर आधीसारखा राहिला नसेल, तर तेही कालसुसंगतच म्हणायचं.
या तीन टप्प्यांतल्या किशोरच्या निरीक्षणांतून किशोरमध्ये झालेल्या वा न झालेल्या बदलांविषयी ‘हिट्स अँड मिसेस् प्रकारच्या काही नोंदी करणं आवश्यक आहे. त्याची सर्वसाधारणपणे पुढील प्रकारे वर्गवारी करता येईल.
१) मांडणी, सजावट, रेखाटनं : ‘किशोर’ आकर्षक होण्यामागे त्यातल्या सजावटीचा सिंहाचा वाटा होता. सत्तरीच्या दशकात अर्थातच अत्यंत आकर्षक चित्रांवर भर होता. त्यात अधिकाधिक आकर्षक रंगछटा, रंगसंगती दिसून येतात.  ऐंशीच्या दशकातली चित्रं ही अधिक वेगळ्या शैलीची, पारंपरिक सौंदर्याच्या व्याख्येत बसायलाच हवीत असा संकेत न पाळणारी दिसतात. त्यांना चित्रांपेक्षा रेखाटनं म्हणणं अधिक योग्य ठरेल, कारण त्यात सत्तरीच्या दशकातल्याइतके रंग दिसत नाहीत. ज्या बदलांबद्दल मी बोलतोय ते बदल आधीपासून ‘किशोर’मध्ये कार्यरत असणाऱ्या चित्रकारांच्या शैलीतले नसून ‘किशोर’च्या चमूमध्ये नव्याने दाखल झालेल्या रघुवीर कुलकर्णी, अनंत कुलकर्णी यांसारख्या चित्रकारांच्या वेगळ्या शैलीमुळे दिसणारे आहेत. असे वेगळ्या धाटणीचे चित्रकार ‘किशोर’मध्ये दखल झाल्यामुळे अंकांच्या सजावटीत फरक पडल्याचं दिसून येतं. चेहरा अतिशय मोठा, त्यामध्ये बरेचसे तपशील आणि त्याखाली शरीर निमुळते होत होत पाय अगदी बारीक अशा शैलीतली प्रभाकर भाटलेकरांची अर्कचित्रं त्यात उठून दिसतात. शिवाय रघुवीर कुलकर्णी यांची अनेक चित्रं  सुबकतेच्या-प्रमाणबद्धतेच्या फुटपट्ट्यांमध्ये अजिबात बसणारी नाहीत. किशोरवयात अशीही चित्रं बघायला मिळणं हाही अभ्यासाचा एक भागच म्हणायला हवा. ‘पिकासो’वर प्रभाशंकर कवडी यांनी एका अंकात लेख लिहिला होता, तोही चित्रभान विकसित करण्याचाच एक प्रयत्न होता. शिवाय चित्रांसोबतच छायाचित्रांचा वापर हाही जाणवलेला बदल. ऐंशीच्या दशकात अंकांमधली छायाचित्रांची संख्या बरीच वाढली. नव्वदीच्या दशकात तर मुखपृष्ठावरही छायाचित्रंच अधिक प्रमाणात  झळकू लागली.
२) समकालीन घडामोडी : ‘किशोर’मध्ये क्रीडाविषयक व वैज्ञानिक घडामोडी यांची दखल आवर्जून घेतली जात असे हे मी नमूद केलेलंच आहे. शिवाय एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचं निधन झाल्यास ‘किशोर’मध्ये त्याची दखल घेतली जायची. संगीतकार वसंत देसाई यांच्या निधनानंतर त्यांची छायाचित्रं, वसंत सबनीस यांचा देसाईंवरचा लेख यांमधून त्यांच्या आठवणी विस्ताराने जागवल्याचं स्मरतं. चिं. त्र्यं. खानोलकर यांनाही त्यांच्या निधनानंतर आदरांजली वाहिली गेली होती.
या तीनही टप्प्यांत समकालीन राजकीय घडामोडींना मात्र ‘किशोर’मध्ये फारसं स्थान असल्याचं आढळलं नाही. सिक्कीम राज्य भारतात समाविष्ट झाल्यावर घेतली गेलेली दखल, पंतप्रधान राजीव गांधी यांची मुलाखत अशा काही तुरळक गोष्टी वगळता राजकीय व्यक्तींविषयीचं थोडंफार लिखाण हे प्रामुख्याने अशा व्यक्तींचं स्वातंत्र्यलढ्यातील स्थान किंवा देशाची घडी बसवण्यात त्यांचं योगदान अशा अर्थाने होतं. अर्थात किशोरवयीन मुलांसाठीचं मासिक हे राजकीय डावपेच वगैरे गोष्टी सांगण्याचं व्यासपीठ असूही शकत नाही. अंकांमध्ये राष्ट्रीय घटनांना काही प्रमाणात तरी  स्थान असायचं. आंतरराष्ट्रीय घडामोडी मात्र अगदीच तुरळक दिसत असत.
‘किशोर’च्या काही अंकांमध्ये प्रत्येक अंकात एक पान अशाप्रकारे देशाच्या औद्योगिक प्रगतीबद्दल आकडेवारी, अन्य प्रगतीबद्दल तपशील दिले होते. किशोरवयीन मुलांना देशाच्या स्थितीबद्दल माहिती देणं ही गोष्ट मला कौतुकास्पद वाटली होती. पण अलीकडे अंक चाळत असताना मी याच ‘प्रगतिपुस्तका’कडे पुन्हा एकदा पाहिल्यावर मला शंका आली म्हणून पाहिलं, तर ते अंक होते १९७६ सालचे! अंकांमधल्या साहित्यात तसा काहीच फरक जाणवत नसला, तरी ‘सध्या अणीबाणीत सर्व काही सुशेगाद चालू आहे’ अशा अर्थाच्या जाहिरातींची पेरणी म्हणजे इंदिरा गांधी अणीबाणीत निर्माण करू पाहत असलेल्या प्रतिमानिर्मितीचंच प्रतिबिंब आहे हे कळून चुकलं. 
३) समकालीन साहित्याची दखल : अतिशय दर्जेदार बाल-कुमार साहित्य निर्माण करण्यात किशोर’चा महत्वाचा वाटा असला आणि त्यात देशोदेशीच्या आणि प्रांतोप्रांतीच्या लोककथा किंवा ऐतिहासिक कथा यांना निश्चित स्थान असलं, तरी तुरळक अपवाद वगळता अन्य प्रांतांतल्या दर्जेदार साहित्याचा अनुवाद करण्याकडे कल दिसत नाही. एवढंच काय, पण नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकांची दखल घेतल्याचंही फारसं दिसत नाही. १९७१ साली सुरू झालेल्या ‘किशोर’मध्ये मला ‘पुस्तक परिचय’ हे सदर प्रथम दिसलं, ते ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात! त्याबाबतीत ‘किशोर’ला अजून बरंच काही करायला वाव होता.
४) किशोरावस्था आणि पौगंडावस्था यांबद्दलचं शास्त्रीय लिखाण : हे पहिल्या दोन टप्प्यात ‘किशोर’मध्ये जवळपास नव्हतंच. या वयात असताना शरीरात होणारे बदल, मानसिक आंदोलनांमागची कारणं, लैंगिक शिक्षण, व्यसनांसारख्या समस्या या विषयांबद्दल लिखाण आढळलं नाही. त्या बाबतीत किशोर हे पारंपरिक वळणाचंच नियतकालिक होतं असं म्हणायला हरकत नाही. अर्थात, हे माझं फक्त निरीक्षण आहे. ते तसं असायला किंवा नसायला हवं होतं, यांपैकी कुठलंच मतप्रदर्शन मला करायचं नाही. तिसऱ्या टप्प्यात मात्र पौगंडवस्थेतील मानसिकतेवर मानसशास्त्रज्ञांनी केलेलं  लिखाण ‘किशोर’मध्ये समाविष्ट झालं.
दोन हजारच्या दशकापासून मात्र माझा मासिक स्वरूपातल्या ‘किशोर’शी संपर्क तुटला. नंतर काही दिवाळी अंक मी वाचले आणि ते चांगलेही होते, पण पुन्हा ‘किशोर’शी नव्यानं नातं जुळलं नाही. सध्या ‘किशोर’ची काय स्थिती आहे याची मला काहीच कल्पना नाही.
असं असलं तरीही जुन्या ‘किशोर’ची असलेली ओढ अजूनही कायम आहे. माझ्याकडचे काही जुने गठ्ठे गहाळ झाल्याची हळहळ वाटत असतानाच मध्यंतरी बातमी वाचली, की ‘किशोर’मधलं निवडक साहित्य पुनर्प्रकाशित झालं आहे : कथा, कादंबरिका, कविता या प्रत्येक साहित्यप्रकारासाठी वेगळा खंड. आनंदाने लगोलग दुकानात जाऊन ते अंक पाहिले.
  
पुन्हा अनेक जुन्या गोष्टी पाहिल्याचा आनंद मिळाला. पण मन इतकं आडमुठं, की त्याला ‘किशोर’चं असं कप्पेकरण पटेचना. अनेक प्रवाह पोटात सामावून वाहणाऱ्या नदीत भिंती घालून प्रत्येक प्रवाहाचं वेगळं कुंड केल्यासारखं वाटलं मला… असो!
‘किशोर’बद्दलचे एवढे अनुभव आणि निरीक्षणं मांडत असताना नकळत त्याची माझ्या लहानपणीच्या बाल-कुमार नियतकालिकांशी तुलना होणं अपरिहार्य आहे. खरं म्हणजे ठकठक आणि चंपक ही खऱ्या अर्थाने माझ्या पिढीची नियतकालिकं होती. मी ती खूप आवडीने वाचलीसुद्धा. ‘चंपक’मध्ये पशुपक्ष्यांच्या गोष्टी वगैरेचं प्रमाण जास्त असल्याने बालवयाला ते जास्त आकर्षित करणारं वाटायचं. ‘ठकठक’मध्ये आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी अधिक असल्यामुळे ते त्या वेळी ‘चंपक’पेक्षा जास्त आपलं वाटायचं. पण ठकठक हे मांडणीच्या अंगाने तितकंसं आकर्षक नव्हतं. ते रंगीतही नव्हतं. शिवाय त्याचा भर मुख्यत्वेकरून हास्यचित्रं, चित्रकथा, विनोद, साहसकथा यांवरच असायचा. ‘आपल्या वाचकवर्गाला जे आवडतं आहे ते देऊ’ इतपतच विचार त्यामागे होता असं वाटतं. ‘त्यापुढे जाऊन आपण अधिक वैविध्यपूर्ण मजकूर देऊ आणि वाचकांची अभिरुची अधिक व्यापक करू’ असा विचार ‘ठकठक’च्या संपादनात होता असं मला वाटत नाही. त्यामुळे ‘ठकठक’ दोन घटका करमणुकीपलीकडे मला अधिक काही देऊन गेलं असं वाटत नाही. चंपक आणि ठकठक ही दोन्ही नियतकालिकं बरीचशी मनोरंजनाकडे झुकलेली होती; तर दुसरीकडे ‘चांदोबा’सारखं पिढ्यानपिढ्या लोकप्रिय असलेलं आणि पिढ्यानपिढ्या न बदललेलं, विलक्षण आकर्षक परंतु मजकुरावरही कुरघोडी करणाऱ्या चित्रांच्या भाराने वाकलेलं, कुठल्यातरी खूप दूरच्या आटपाट नगरीतल्या गरीब ब्राह्मणाच्या किंवा विक्रम-वेताळाच्या, च्रंद्रमणी, सूर्यवर्मन, रविशलाका वगैरे जडजंबाल नावांच्या पात्रांच्या माध्यमातून संस्कारभार वाहणारं मासिक! ते रोजच्या जीवनाशी काहीही नातं सांगायचं नाही. तरीही मी ते आवडीने वाचायचो हा भाग अलाहिदा! पण त्याची जातकुळीच निराळी होती. या सर्व गोष्टींमुळेच अन्य नियतकालिकांमध्ये आणि ‘किशोर’मध्ये एक महत्त्वाचा फरक जाणवतो –  तो म्हणजे समतोलाचा. मनोरंजन आणि संस्कार यातलं एक दुसऱ्यावर कुरघोडी करायचं नाही. त्यामुळे लहानपणी ही सगळीच नियतकालिकं माझ्यातल्या वाचकाला जागी ठेवत आली हे खरं असलं, तरी ‘किशोर’ने दिलेली शिदोरी माझ्यासाठी सर्वात पौष्टिक ठरली आहे.
दैनंदिन संवादांपासून ते दूरचित्रवाणी वाहिन्यांपर्यंत मराठी भाषेची होत असलेली भीषण अवस्था पाहून मन तुटत असताना राहून राहून वाटतं, की आज पुन्हा एकदा ते सगळे जुने अंक काढून मुलांना वाचायला द्यावेत. त्यांच्या वयाला साजेशा नसणाऱ्या गोष्टींचा चहू बाजूंनी इतका मारा होत असताना नसताना किमान या खजिन्यात तरी त्यांना त्यांच्या वयानुरूप काहीतरी गवसेल. मराठी भाषेचं सौष्ठव, श्रीमंती, सौंदर्य आणि मुख्य म्हणजे गंमत कळेल… पण आजच्या मुलांना – आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आईबाबांना – आपल्या मुलांनी चांगली मराठी भाषा लहानपणापासूनच वाचायला-बोलायला हवी असं खरंच वाटतंय का?
– प्रसाद फाटक
prasadgates@gmail.com
***
चित्रस्रोत
निवडक किशोर : आंतरजाल
इतर चित्रे : प्रसाद फाटक

 

Facebook Comments

1 thought on “किशोर : अभिरुची घडवणारं मासिक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *