बालसाहित्यांक २०१७ लेख

वाचन मोठम्… खोटम्!

अक्षयला आज शाळेतून घरी पोचायला दुपटीपेक्षा जास्त वेळ लागणार होता.
शाळेपासून अक्षयचं घर चालत गेल्यास पाचच मिनिटांच्या अंतरावर होतं. पण आज तब्बल दहा मिनिटं होऊन गेली तरी अक्षय घरी पोचला नव्हता. त्याऐवजी तो रस्त्याच्या मधोमध उभा राहून कसलातरी विचार करत होता.
रस्ता शहराच्या आतला असल्याने फारसा मोठा नव्हता. अक्षयच्या आजूबाजूने वाहनं, माणसं येत-जात होती. संध्याकाळचे सहा वाजले होते. उन्हं उतरायला लागली होती. आकाशात पिवळसर-तांबूस प्रकाश भरून राहिला होता. दुपारी विश्रांती घेण्यासाठी घरी आलेले लोक आपापली कामं करण्यासाठी घराबाहेर पडू लागले होते.
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींमधून माणसं ये-जा करत होती. त्यात किराणामाल पोचवणारा पोर्‍या होता. कोणी आजीबाई भाजी आणायला निघाल्या होत्या, कोणी काका संध्याकाळचा फेरफटका मारायला निघाले होते, एखादं कुटुंब नटून-थटून कोणत्यातरी समारंभाला जायला बाहेर पडलं होतं. तर कोणी सायकलवरून शहराच्या मुख्य चौकातल्या बाजारातलं आपलं दुकान उघडायला निघालं होतं. प्रत्येक जण आपापल्या कामात होता. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध उभा असूनही अक्षयकडे कोणाचंही लक्ष गेलं नव्हतं. जणू एखादं झाडच अचानक उगवून आल्यागत प्रत्येक जण त्याला वळसा घालून जात-येत होता. आणि या लोकांप्रमाणेच अक्षयचंही त्याच्या या आजूबाजूच्या लोकांकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो आपल्याच विचारात बुडून गेला होता. त्या तंद्रीत त्याने आपलं दप्तर तसंच खाली टाकून दिलं होतं. त्याने शाळेचा गणवेश – पांढरा शर्ट आणि खाकी रंगाची हाफ चड्डी घातली होती. शर्ट खोचलेला असला, तरी एक कोपरा बाहेर आला होता. पायात काळे बूट होते. उजव्या हाताच्या दोन बोटांमध्ये आपल्या काळ्याभोर केसांची एक बट धरून, ती फिरवत तो आकाशात कुठेतरी पाहत होता. त्यावरून तो कसलातरी गहन विचार करत असावा असं वाटत होतं. त्याच्या डोळ्यांत हरवून गेल्याचे भाव होते, तर चेहरा प्रश्नांकित झाल्याने मलूल वाटत होता.
अक्षय ज्या शहराच्या रस्त्यावर उभा होता, त्या शहराचं नाव कल्याण असं होतं. मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातला कल्याण हा महत्त्वाचा तालुका होता आणि आता शहरीकरणाच्या रेट्यात मुंबईजवळचं उपनगर म्हणून विकसित होत होता. दोन हजार साल उजाडायच्या आधी, कल्याणमध्ये मोठ्या आणि नावाजलेल्या अशा दोन मराठी माध्यमाच्या शाळा होत्या – एक पंत वाड्यातली ई.ए.आय. हायस्कूल आणि दुसरी कर्नल स.मा. फडके हायस्कूल. अक्षय फडके हायस्कूलमधल्या इयत्ता सातवीच्या अ तुकडीत होता. तेव्हा इंग्रजी माध्यमाचं पेव फुटलेलं होतं, पण अजून कल्याणमधल्या मध्यमवर्गात ते तितकं फोफावलेलं नव्हतं.
अक्षयची तुकडी शाळेतल्या सर्वांत हुशार मुलांची तुकडी असली, तरी त्यातही कमी हुशार, मध्यम हुशार, खूप हुशार आणि खूप खूप हुशार असे मुलांचे गट होते. अक्षय त्यातल्या खूप हुशार आणि खूप खूप हुशार मुलांच्या गटातला होता. प्रत्येक तासाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार्‍या पहिल्या पंधरा मुलांपैकी अक्षय एक होता. त्याचा गृहपाठही कायम झालेला असायचा आणि कधीतरी काही कारणामुळे गृहपाठ झालेला नसेल, तर अक्षय तसं वर्गात उभं राहून प्रामाणिकपणे त्या-त्या विषयाच्या शिक्षकांना सांगायचा. मग सर किंवा मॅडम त्याला थोडं ओरडायचे, कधी एखादा फटकाही द्यायचे, पण त्याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे ते प्रभावित झालेले असायचे आणि म्हणून त्याला माफ करून टाकायचे. एवढंच नाही, तर सगळ्या वर्गासमोर त्याचं उदाहरण द्यायचे.
अक्षयच्या अख्ख्या शाळेत गणित आणि विज्ञान शिकवणारे रास्तेसर ‘मारकुटे’ म्हणून प्रसिद्ध होते. ते मुलांना पाठीवर एका पाठोपाठ एक असे लागोपाठ दहा-पंधरा जोरदार रट्टे द्यायचे. त्या रट्ट्यांचा ‘धपाक्-धपाक्’ असा आवाज घुमायचा आणि त्यापाठोपाठ मुलांचा ‘आई गं’ किंवा ‘नको सर’ असा आवाज यायचा. त्या आवाजामुळे सरांना आणखीनच चेव यायचा आणि मग ते आणखी दोन-तीन रट्ट्यांचा प्रसाद द्यायचे. सर जेव्हा एखाद्या मुलाला मारायचे, तेव्हा वर्गातली इतर मुलं तोंडावर हात ठेवून खिदिखिदि हसायची. खासकरून मुली. कधीकधी त्यातली एखादी मुलगी सरांच्या हातात सापडली, तर ते तिलाही सोडायचे नाहीत. पण मुलींच्या अंगाला हात लावायचा नाही, हे फडके हायस्कूलमधल्या पुरुष शिक्षकांचं तत्त्व होतं. त्यामुळे मुलींना तळव्यांवर पट्टीचा किंवा डस्टरच्या उलट्या बाजूचा प्रसाद खावा लागायचा. जर रास्तेसर खूपच रागावलेले असतील, तर हाताच्या तळव्यावर उभ्या पट्टीने मार मिळायचा. रागाच्या भरात त्यांनी डस्टर फेकून मारल्याचंही ऐकिवात होतं आणि त्यामुळे एका मुलाला मोठी खोक पडली असल्याचंही बोललं जायचं. पण अक्षयच्या वर्गात मात्र त्यांनी तसं कधीही केलं नव्हतं.
तर अशा रास्तेसरांचा अक्षय मात्र आवडता विद्यार्थी होता. त्यांनी फक्त एकदाच अक्षयचा गाल रागाने ओढला होता. तेव्हा दोन दिवस त्याच्या गालावरचा लालबुंद चट्टा गेला नव्हता. त्यानंतर अक्षयने ठरवलं, की यापुढे कधीही, काहीही झालं तरी कोणत्याच सर किंवा मॅडमचा मार खायचा नाही. म्हणून मग तो घरी गेल्या गेल्या पहिले दिलेला गृहपाठ पूर्ण करून टाकू लागला. दुसर्‍या दिवशी वर्गात जे काही शिकवलं जाणार असेल, ते धडे तो आधीच वाचून ठेवू लागला. एवढंच नाही, तर न शिकवलेलं गणित कसं सोडवायचं हे तो आधीच गाइडमध्ये पाहू लागला. त्यामुळे अगोदरच प्रामाणिक असलेला अक्षय आपोआपच सगळ्या सर आणि मॅडमचा लाडका झाला. बरेचदा रास्तेसर त्यालाच धडे वाचायला सांगायचे, किंवा संस्कृतच्या ओकमॅडम तपासणीसाठी वह्या गोळा करायचं काम त्यालाच सांगायच्या.
पण आज मात्र वर्गात एक वेगळीच गोष्ट घडली होती, ज्यामुळे वर्गातल्या हुशार हुशार मुलांपैकी एक, शिक्षकप्रिय अक्षय हिरमुसून गेला होता आणि असा भर रस्त्यात आपल्याच विचारात गुंग होऊन नुसताच उभा राहिला होता.
आज वर्गात आल्या आल्या मराठीच्या फुलेमॅडमनी फळ्यावर दोन शब्द लिहिले होते. अक्षयचा इतर विषयांप्रमाणे मराठी हा भाषाविषयही चांगला होता. त्याच्या सगळ्या कविता धडाधडा पाठ असायच्या आणि तो धडेही अस्खलितपणे वाचून दाखवायचा. आधीच वाचलेलं असल्याने धड्याखाली असलेल्या प्रश्नांची उत्तरंही तो पटापटा देत असे. मॅडमनी एखादा प्रश्न विचारण्याची खोटी, की अक्षय हात वरून चेंडूसारखा उसळू लागे. पण आज मात्र त्याला चूप्प बसावं लागलं होतं. कारण होतं, फुलेमॅडमनी फळ्यावर लिहिलेले दोन शब्द – माझे वाचन.
मुला-मुलींच्या रांगांमधल्या मोकळ्या जागेत उभं राहत, फुलेमॅडम म्हणाल्या, “मुलांनो, आजपासून बरोब्बर एका आठवड्याने तुम्हाला या विषयावर निबंध लिहून आणायचा आहे. तो मी एकेक करत वर्गात वाचून घेणार आहे. कळलं?
सगळ्या मुलांनी ‘हो’ असं म्हणून माना डोलावल्या.
“शाब्बास,” मॅडम म्हणाल्या. “तर सांगा बरं, वाचन म्हणजे काय?”
अक्षयप्रमाणेच उत्तरं द्यायला कायम तत्पर असलेल्या हुशार मुलां-मुलींनी लगेचच हात वर केले. अक्षयचा हात मात्र त्याच्या बाकावर तसाच होता. हात वर केलेल्या त्यातल्या एका मुलीला, धनश्रीला मॅडमनी उत्तर द्यायला सांगितलं. धनश्री म्हणाली, “वाचन म्हणजे अक्षरं, शब्द वाचणं. एखादा लिहिलेला मजकूर मोठ्याने किंवा मनातल्या मनात वाचणं.”
“बरोबर, पण वाचन एवढंच असतं का?” मॅडमनी विचारलं.
अजितने झटकन हात वर केला. तो वर्गातल्या सर्वांत हुशार मुलांपैकी एक होता. उत्तर देण्याच्या बाबतीत त्याची आणि अक्षयची कायम चढाओढ लागलेली असायची. फुलेमॅडमनी त्याला बोलायला सांगितलं. तो हाताची घडी घालून सांगू लागला, “वाचन म्हणजे नुसती अक्षरे वाचणे नव्हे. तर ती समजून घेणे. म्हणजे सगळ्या शब्दांमागे असलेले अर्थ समजून घेणे.”
“अगदी बरोबर. छान, अजित.” फुलेमॅडम म्हणाल्या. “आता मला सांगा, तुमच्या अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त कोण कोण आणखीन वेगळं काहीतरी वाचता?”
अक्षय आणि आणखी थोडीफार मुलं-मुली वगळता सगळ्यांनीच आपले हात वर केले. ते पाहून, आता मात्र अक्षयला कसंतरी झालं. इतकंच नाही, त्या हात वर करणार्‍यांमध्ये एरवी अभ्यासात अगदी मागे असणारे अनेक जणही होते. त्यामुळे तर अक्षय आणखीनच खजील झाला. शक्यतो, आपलं तोंड फुलेमॅडमना दिसू नये म्हणून तो त्याच्यासमोर बसणार्‍या साळवेच्या मागे आपला चेहरा लपवू लागला.
फुलेमॅडम म्हणाल्या, “बरेच वाचणारे आहेत की… चला, मग एकेकाने सांगा तुम्ही काय वाचता ते… हं, तू सांग सौरभ…”
सौरभ उभा राहून बोलू लागला, “मॅडम, मी रोज सकाळी पेपर वाचतो. मराठी. थोडासा इंग्लिश. संध्याकाळी घरी गेलो की देनिसच्या गोष्टी, ठकठक, टॉनिक असं वाचतो. आमच्याकडे घरी एका लहानशा कपाटात ही पुस्तकं कायम ठेवलेली असतात.”
सौरभ खाली बसल्यावर अक्षय विचार करू लागला, ‘पुस्तकांचं कपाट? आपल्या घरी कपड्यांसाठी कपाट आहे, बूट ठेवण्यासाठी आहे, बेसिनच्या वर पेस्ट-कंगवा-पावडर ठेवण्यासाठी लहान कपाट आहे. पण पुस्तकांचं कपाट असं काहीही नाहीये. आपली सगळी अभ्यासाची पुस्तकं-वह्या तर आपण टीव्हीच्या कपाटातच ठेवतो. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आपण काय करतो बरं… हां, एकतर व्हिडिओ गेम खेळतो किंवा कार्टून नेटवर्क पाहतो. नाहीतरी टीव्हीवरचे इतर कार्यक्रम.’
पुन्हा एकदा अजित उभं राहून म्हणाला, “मॅडम, माझ्या बाबांनी फॉरेनहून मस्त रंगीत पुस्तकं आणलीयेत. त्यात कॉमिक्स, चित्रांची पुस्तकं आहेत खूप. त्यातलं अॅस्टेरिक्स मला खूप आवडतं. शेरलॉक होम्सच्या डिटेक्टिव्ह गोष्टीही आवडतात. सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी मी माझ्या खोलीत बसून ही सगळी पुस्तकं वाचत बसतो.”
‘आपण काय करतो सुट्टीच्या दिवशी?’ अक्षयला प्रश्न पडला. ‘रविवारी तर आपण क्रिकेट खेळायला जातो सुभाष मैदानात. आणि संध्याकाळी सायकल चालवायला. दुपारी जेवण करून झोपायचं, नाहीतरी केबलवरचा सिनेमा पाहायचा.’
फुलेमॅडम म्हणाल्या, “मनाली, तू सांग बरं.”
मनाली बोलू लागली, “मॅडम, आम्ही सुट्टीत जेव्हा कोकणात आजीआजोबांकडे जातो, तेव्हा ते आम्हाला साहसी गोष्टी सांगतात. सिंदबादच्या. त्यांनी आम्हाला पुस्तकं पण दिलीयेत. ती आम्ही रोज वाचतो. या दिवाळीच्या सुट्टीत मी स्वामी आणि मृत्युंजय वाचलं. श्यामची आईपण.”
फुलेबाईंनी सगळ्या मुलांचं खूप कौतुक केलं आणि म्हणाल्या, “श्यामची आई तर तुम्ही सगळ्या मुलांनी वाचायलाच हवं. आजच घरी गेल्यावर आईला सांगा हे पुस्तक विकत घ्यायला. ते खूप सुंदर पुस्तक आहे. तुम्हाला आत्ता त्या पुस्तकाचं महत्त्व समजणार नाही. नक्की वाचा सगळ्यांनी.” मग त्या पुढे म्हणल्या, “तर मुलांनो, आपल्या निबंधात हेच सगळं लिहायचंय तुम्हाला. तुम्ही काय वाचलं ते, त्यात काय गोष्टी होत्या ते, काय माहिती होती ते. सगळं, नीट लिहून आणायचं एका फुलस्केपवर. पाठपोट लिहायचं नाही, लक्षात ठेवा.”
मग फुलेमॅडम फळ्याजवळ जाऊन काहीतरी लिहू लागल्या. तेव्हा अक्षयला आठवलं की, एकदा भाऊबीजेला परतभेट म्हणून त्याच्या आतेबहिणीने त्याला महाभारतातल्या गोष्टींचं एक पुस्तक दिलं होतं. त्यातल्या गोष्टी अक्षयला आवडल्या होत्या. त्यात चित्रंही होती. एकदा शाळेतून घरी गेल्या गेल्या अक्षय ते पुस्तक वाचू लागला. सकाळी त्याची अर्धीच गोष्ट वाचून झाली होती आणि त्यात पुढे काय होतं, हे जाणून घ्यायची उत्सुकता त्याला लागली होती. जेव्हा अक्षय ते पुस्तक वाचू लागला, तेव्हाच त्याच्या पाठीत आईचा एक धपाटा पडला. ती म्हणाली, “अक्षय, आल्या आल्या गोष्टीचं पुस्तक काय वाचतोएस? गृहपाठ नाहीये वाटतं?”
“हो. आहे.”
“मग! जा गृहपाठ कर आधी. गोष्टी वाचून काहीही फायदा होणार नाही. त्यापेक्षा वेळ असेल तर पाढे पाठ कर. चल, ऊठ…”
अक्षयने आठवून पाहिलं, तर त्याने आईलाही कधीच पुस्तक वाचताना पाहिलं नव्हतं आणि त्याच्या बाबांनाही. बाबा सकाळी ऑफिसला जायच्या आधी कायम वर्तमानपत्र वाचायचे आणि त्यातल्या लॉटर्‍यांचे निकाल पाहायचे. आई तर तेही कधी पूर्ण वाचायची नाही. हां, कधीकधी ती दुपारी ‘चारचौघी’ नावाची मासिकं वाचताना अक्षयने पाहिलं होतं. पण ती मासिकं त्याला कधीच टेबलावर किंवा अशी कुठेही पडलेली पाहायला मिळाली नाहीत. आई ती कुठेतरी लपवून ठेवायची, हे अक्षयला माहीत होतं. पण त्याला ती कधीच सापडली नाहीत.
मागून येणार्‍या रिक्षाने जेव्हा पाचव्यांदा पॉ-पॉ केलं, तेव्हा अक्षयची तंद्री भंगली आणि तो रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिला. मग मान खाली घालून तो घराकडे जाऊ लागला. पण चालतानाही त्याला बाईंनी फळ्यावर लिहिलेली चार वाक्यं नीट आठवत होती –
१. वाचनाने बुद्धीला खाद्य मिळते.
२. त्यामुळे बुद्धी तल्लख होते.
३. अनुभवांचा परिघ वाढतो
४. म्हणूनच थोरामोठ्यांनी म्हटलेले आहे, वाचाल तर वाचाल.
तास संपल्याची घंटा झाल्यावर फुलेमॅडमनी जे सांगितलं होतं, ते अक्षयच्या डोक्यात जसंच्या तसं कोरलं गेलं होतं – “तुम्हाला वाचनाची गोडी लागावी म्हणून आपल्या शाळेने या निबंधस्पर्धेचं आयोजन केलं आहे. प्रत्येक इयत्तेतल्या सर्वोत्कृष्ट चार निबंधांना शाळेतर्फे बक्षीस देण्यात येणार आहे. मला खात्री आहे की हे बक्षीस अ तुकडीतल्या मुलालाच मिळणार. चला, लागा मग कामाला… तीन दिवसांनी मी काही जणांना मुद्दाम इथे निबंध वाचायला सांगणार आहे. अजित, मनाली, सौरभ, अमेय आणि तू अक्षय. तुम्ही पहिले वाचायचा निबंध.” फुलेमॅडमनी त्याचं नाव घेताच मान खाली घालून बसलेला अक्षय झटकन स्प्रिंगच्या बाहुलीसारखा उठला आणि त्याने बळंच होकार भरला. त्यानंतर पुढच्या तासाचे सर येईस्तोवर सगळ्या मुलांमध्ये निबंधस्पर्धेची आणि पुस्तकांबद्दलचीच चर्चा सुरू होती. पण अक्षयकडे सांगायला काहीच नसल्याने तो सगळ्यांपासून वेगळा पडला होता. परिणामी, फारच अस्वस्थ झाला होता.
रागाने तरातरा चालत अक्षय घरी गेला. पायातले बूट काढून ते आपटत तो आईला म्हणाला, “तुम्ही मला वाचनाची गोडीच नाही लावली. अजित, सौरभ, मनाली सगळ्यांचे आईबाबा त्यांना वाचायला लावतात!”
आल्या आल्या अक्षयने घेतलेला हा पवित्रा पाहून आईला काय बोलावं ते समजेना. ती म्हणाली, “पण काय झालं तरी काय?”
अक्षय म्हणाला, “आई मला पुस्तकं पाहिजेत वाचायला. मला लायब्ररी लावायचीये. आत्ताच्या आत्ता आपण जाऊ या. चल.”
“अरे, पण अक्षय तू खरंच वाचणारेस का एवढं? नाहीतर उगाच वाया जायचे पैसे. हे बघ, संध्याकाळी बाबा आले की त्यांना विचार. मग बघू.”
“नाही गं आई. मला मॅडमनी माझ्या वाचनावर निबंध लिहायला सांगितलाय. आणि आत्तापर्यंत मी काहीच वाचलं नाहीये. मग मी काय लिहू त्यात? चल, आपण जाऊ या. कपडे बदल.”
“पण परवाच तुला ती निबंधलेखनाची पुस्तकं आणली होती ना, त्यात असेल ना हा निबंध. बघितलास का?”
अक्षय कावून म्हणाला, “आई, तुला समजतच नाहीये. आमच्या शाळेची स्पर्धा आहे ही.”
“मग असं कर, तुझ्यासाठी खायला पोहे केलेत, ते खा. तोवर मी आवरते…”
“नको, पोहेबिहे. मी आल्यावर खाईन. जा तू आणि लवकर ये.”
“काय एक एक नाटकं या मुलांची आणि शाळांची…” असं म्हणत आई कपडे बदलायला आत गेली. आणि मग कल्याणमधल्या शंभर वर्षं जुन्या असलेल्या कल्याण सार्वजनिक वाचनालयाचा अक्षय सभासद झाला!
***
लायब्ररीचा सभासद झाल्या झाल्या, अक्षयने पहिलं पुस्तक घेतलं – श्यामची आई. साने गुरुजी. वर्गात फुलेबाईंसकट बर्‍याच जणांनी या पुस्तकाबद्दल सांगितल्याने अक्षयला ते वाचायचंच होतं. आणि तेही आरामात नव्हे, तर एका रात्रीत! कारण दुसर्‍या दिवशी सौरभसारखंच वर्गातल्या मित्रांना आपणही कसं फटाफट पुस्तक वाचून काढलं हे सांगायचं होतं.
त्या दिवशी रात्री जेव्हा आईबाबा झोपायला गाद्या घालू लागले, तेव्हा अक्षय मोठ्या अभिमानाने त्यांना म्हणाला, “आज काही झालं तरी मला श्यामची आई पूर्ण करायचंच आहे. म्हणजे मग मी उद्या दुसरं पुस्तक बदलून आणेन. आतल्या खोलीत झोपतोय मी आज.”
अक्षयचे आईबाबा तर त्याच्याकडे चकित होऊन पाहतच राहिले. रोज रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणारा अक्षय, आज अचानक पुस्तक वाचायला आतल्या खोलीत गेला होता. त्यांच्यासाठी हे सगळं नवीनच होतं.
आई बाबांना म्हणाली, “काही नाही, नवं खूळ आहे निबंधाचं. ओसरेल लवकरच.”
आतल्या खोलीतल्या पलंगावर आडवा पडून अक्षय वाचू लागला... अक्षयने पहिली दहा-बारा पानं वाचली. त्याला कंटाळा येऊ लागला. एकतर त्या पुस्तकातली भाषा त्याला रटाळ वाटली आणि गोष्ट खूपच रडू-रडू होती. वाचता वाचता तो आपोआपच मनातल्या मनात त्याची आई आणि श्यामची आई यांची तुलना करू लागला. त्याला प्रश्न पडला, अशी कुठे आहे आई? निदान आपली आई आणि आपल्या मित्रांच्या आया तरी अशा नाहीयेत. पण तरी वर्गातल्या एवढ्या जणांना हे पुस्तक का बरं आवडत असेल? की आपल्याला वाचायची गोडी लागायचीये अजून म्हणून एवढा कंटाळा येतोय? विचार करता करता अक्षयला कधी झोप लागली हे त्याचं त्यालाही समजलं नाही.
सकाळी जेव्हा अक्षयला जाग आली, तेव्हा त्याला काय झालं ते समजलं. अर्धवट मिटलेलं श्यामची आई पुस्तक त्याच्या शेजारी पडलं होतं. त्याला स्वतःचा खूप राग आला. तोंड धुवायला तो जेव्हा बाहेर गेला, तेव्हा आई त्याच्याकडे पाहत मिश्कील हसत होती. ती म्हणाली, “काय महाराज झालं का वाचून पुस्तक?”
“नाही,” एवढंच म्हणून अक्षयने तोंड धुतलं. आईने दिलेलं दूध पिऊन आवरलं आणि रागाने धुमसतच तो सायकल चालवायला निघून गेला.
सकाळचे सव्वासात वाजले होते. हवेत किंचित गारवा आणि थोडा ओलावा होता. धुरकं पसरलं होतं. सोसायटीच्या गल्लीतून बाहेर पडून अक्षय मोठ्या रस्त्याला लागला आणि लाल चौकीकडे जाऊ लागला. लाल चौकीच्या चौकात आग्रा रोड ओलांडण्यासाठी त्याला थोडं थांबावं लागलं. सकाळची वेळ असल्याने आग्रा रोड हायवेवर ट्रक्स आणि ट्रेलरची रहदारी जास्त होती. चौक ओलांडून तो आधारवाडीच्या दिशेने जाऊ लागला. आधारवाडी हे एकेकाळचं कल्याण गावाबाहेरचं स्मशान होतं. पण आता त्या भागात मोठ्या प्रमाणावर पाच-सहा मजली उंच सोसायट्यांचं बांधकाम चालू होतं. हा भाग नव्याने विकसित होत होता. पूर्वी गावात वाड्यांमध्ये राहणारे अक्षयचे बरेचसे मित्र आता या भागात राहायला आले होते. काही सोसायट्या पूर्ण झाल्या होत्या. त्यांच्या नवा रंग दिलेल्या इमारती दिमाखात उभ्या होत्या. तर काही इमारतींचे अर्धवट, करडे सांगाडे जखमी माणसांसारखे भासत होते. त्यांच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीतून काळ्या धुराचा लोट आकाशात उंच उंच जात होता.
अक्षयला लवकरात लवकर शहरापासून दूर जायचं होतं. त्यामुळे तो जोरजोरात पेडल मारू लागला. तशी त्याची शिंगासारखी हँडल असलेली ‘एमटीबी’ सायकल वेगात पळू लागली. स्मशानभूमी पार करून थोडं पुढे गेल्यावर, रस्ता थोडा चढाचा झाला. अक्षयच्या पोटर्‍यांमध्ये पेटके आले. त्याने थोडा दम घेतला आणि मग तो सीटवर न बसता, वर-खाली होत सायकल हाणू लागला. चढ संपून उतार लागल्यावर त्याने पेडल मारणं बंद केलं आणि त्याची सायकल एकलयीत वेगाने धावू लागली. तेव्हा तिचा ‘टर्रर्र’ असा आवाज येऊ लागला.
कल्याणचं सेंट्रल जेल मागे गेल्यावर, अक्षयला जरा बरं वाटू लागलं. कल्याण शहर आता बरंच मागे राहिलं होतं. आता तो उल्हास नदीवरच्या गांधारी पुलाकडे जाणार्‍या रस्त्याला लागला होता. रस्त्याच्या दुतर्फा झाडंझुडपं होती. मधूनच एखादी इमारत किंवा लहानशा घरांची वस्ती लागायची. रस्ता दुपदरी आणि डांबरी होता. त्यावर सकाळचं कोवळं ऊन पडल्याने तो झळाळून निघाला होता. अक्षय नेहमीच या रस्त्याने मित्रांसोबत सायकल चालवायला जायचा. त्याला ते आवडायचं. बरेचदा ते गांधारी पुलापर्यंत जायचे. अक्षयच्या घरापासून तो पूल साडेतीनेक किलोमीटर होता. बरेचदा हिवाळ्यात सकाळी पुलाच्या इथे धुकं परसलेलं असायचं. त्यात पूल हरवून जायचा आणि एक स्तब्ध शांतता असायची. पूल सुरू व्हायच्या अलीकडे, मुख्य रस्ता सोडून एक लहानशी पायवाट होती. ती नदीकाठाकडे जायची. त्यावरून आपल्या सायकली चालवत, वर-खाली होत अक्षय आणि त्याचे मित्र नदीकाठावर जायचे. तिथल्या ओल्या गवतात बसून राहायचे किंवा कधीकधी क्रिकेट किंवा फुटबॉलही खेळायचे.
आज मात्र अक्षय एकट्यानेच पुलावर आला होता. आज त्याला त्याच्यासोबत कोणीही नको होतं. तो नदीकाठाकडे गेला आणि त्याच्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसला. नदीकाठचा बराचसा भाग खडकाळ माळरानाचा होता. या माळरानावर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हिरवंगार गवत असायचं, तर उन्हाळ्यात ते वाळून पिवळंधम्मं व्हायचं. त्या गवताला विशिष्ट असा एक वास असायचा आणि त्या गवतात बसल्यावर तो अक्षयच्या चड्डीलाही लागायचा. खूप पाऊस असला की नदी फुगायची. मग नदीकाठावर जाता यायचं नाही. नदीकाठावर मधेमधे टेंगूळ आल्यासारखे गुडघ्याएवढे काळे कातळखडक वर आले होते. त्यावर अक्षयला बसायला आवडायचं.
आत्ताही अक्षयने कुलूप लावून आपली सायकल एका खडकाला टेकवून ठेवली आणि स्वतः शेजारच्याच एका खडकावर जाऊन बसला. गवतातले पाच-सहा लहानमोठे दगड त्याने हातात घेतले आणि एकेक करत तो नदीत फेकू लागला. नदीचं पाणी काळंशार आणि स्थिर होतं. असं म्हटलं जायचं की, या नदीत भरपूर भोवरे आहेत. त्यामुळे तिच्यात पोहायला उतरणं म्हणजे साक्षात मृत्यूच्या मगरमिठीतच शिरणं. त्यामुळे अक्षयला आणि त्याच्या मित्रांना त्यांच्या-त्यांच्या घरच्यांकडून काही झालं तरी नदीत न उतरण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. अक्षयच्या मित्रांच्या ओळखीत कोणीतरी या नदीत बुडून मेल्याचंही अक्षयने ऐकलं होतं.
अक्षयने रागाने एक दगड पाण्यात भिरकावला, तसं नदीचं पाणी थोडंसं डचमळलं. बिस्कीट बुडवल्यावर चहावरची साय जशी दुभंगते तसं. मग अक्षय आणखी रागाने आणि त्वेषाने दगड टाकू लागला. दुसरा… तिसरा… चवथा… पाचवा… हातातले दगड संपले म्हणून त्याने चप्पट अशी दगडाची कपची हातात घेतली आणि ती नदीला समांतर ठेवून जोरात भिरकावली. तेव्हा ती कपची नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर एक… दोन… आणि तीन… अशी उसळी मारत मारत त्या काळ्याशार पाण्याचा भाग झाली. अक्षयचा हा आवडता खेळ होता.
आता अक्षयचा राग थोडा कमी झाला होता आणि तो या खेळात रमला होता. त्याने आणखी एक कपची घेतली आणि “चार वेळा तरी उसळी मारली पाहिजे” असं स्वतःला सांगून जोरात फेकली. पाण्यात तिसर्‍यांदा जिथे ती कपची आपटून उसळली, तिथून झपकन एक माणूस वर आला!
अचानक वर आलेल्या त्या आकृतीने अक्षय घाबरून ओरडला, “ओय… काये?”
तो माणूस हात हलवत ओरडून म्हणाला, “घाबरू नकोस. माणूसच आहे मी!” आणि सपासप हात मारत तो अक्षयच्या दिशेने येऊ लागला. अक्षयने झटकन आपली सायकल उचलली, कुलूप उघडलं आणि त्यावर बसून तो पळायच्या तयारीला लागला. तेवढ्यात तो माणूस त्याच्यापाशी येऊन उभाही राहिला होता. अक्षयच्या सायकलची कॅरिअर पकडत तो माणूस म्हणाला, “दगड कशाला मारत होतास रे?”
अक्षयने निथळणार्‍या त्या माणसाकडे पाहिलं आणि अक्षयनेच उलटप्रश्न केला, “तुम्ही… तुम्ही काय करत होतात पाण्यात?”
“मी? अभ्यास करत होतो माझा.”
“अभ्यास? पाण्यात? काहीही.”
“हो. खरंच. मी बायोलॉजिस्ट आहे. संशोधन करतो. या उल्हास नदीत जरा वेगळ्याच प्रजातीचे मासे आहेत म्हणे. मी त्यांचं प्रत्यक्ष निरीक्षण करत होतो. आता मासे पाहायचे म्हणजे पाण्यातच जायला पाहिजे ना! पण तुझ्या दगडांमुळे, पळाले ना ते!”
“हॅ… काहीपण बोलताय तुम्ही! मला माहितेय या नदीत खूप भोवरे आहेत. डेंजरस आहे ही नदी. तरी तुम्ही त्यात कसे उतरलात?”
“तू म्हणतोएस ते खरंय. भोवरे आहेतच यात.”
“मग?”
“मग काय?”
“मग तुम्ही स्वतःहून का गेलात पाण्यात?”
“एकतर मला ही नदी अगदी नीट माहितेय आणि दुसरं म्हणजे आता संशोधन करायचं म्हटल्यावर एवढा धोका तर पत्करलाच पाहिजे ना. तुला माहितेय, ही नदी कुठे उगम पावते ते?”
अक्षयने नकारार्थी मान डोलावली.
“ही नदी उगम पावते रायगड जिल्ह्यातल्या राजमाची डोंगरात. यात भोवरे भरपूर आहेत हे खरंय. पण इथे तसं पाणी संथ आहे, त्यामुळे धोका जरा कमी आहे. म्हणून मी पाण्यात शिरायला ही जागा निवडली. कळलं?”
“पण तरी समजा तुम्ही चुकून एखाद्या भोवर्‍यात अडकलात तर? इथे तर आजूबाजूला कोणीही नसतं.”
“तर…. तर काही नाही.”
“काही नाही कसं? मराल ना मग तुम्ही!”
“हो. मरेन मी. जसं कधीतरी तू मरशील तसंच मीही मरेन. फक्त कदाचित थोडं आधीच. तू रोज सायकल चालवायला जातोस, बरोबर?”
“हो. मला आवडतं.”
“तू रस्त्यावरून सायकल चालवतोस, तेव्हा वाहनांच्या नदीतच तर असतोस. त्यातलं एखादं वाहन तुला धडकू शकतं. म्हणजे असं समज की तो भोवरा. या भोवर्‍यामुळे तूही मरू शकतोस. कळलं – अगदी तेच लॉजिक इथेपण आहे. तुला जसं सायकलिंग आवडतं, तसंच मला माझं संशोधन.”
“हं…” अक्षय जरा विचार करू लागला. त्याला तो माणूस जे सांगत होता, ते पटत होतं. पण त्याचं एक मन त्याला तिथून निघायला सांगत होतं. म्हणून तो म्हणाला, “बरंय, मग मी निघतो. बाय.”
“निघतोएस? असं कसं? तू दगड का मारत होतास ते सांग आधी.”
“मला राग आला होता म्हणून. जाऊ दे…”
“काढलास ना राग, मग ठीके.” तो माणूस असं म्हणाला, तेवढ्यात नदीच्या पाण्यात सुळकन काहीतरी शिरलं आणि एक निळसर-आकाशी चकाकती रेषा भरकन बाहेर आली आणि दूर उडत गेली.
“हे काय झालं आत्ता तिथे?” अक्षयने विचारलं.
“ती ना, जादू होती निसर्गाची, जी तू उघड्या डोळ्यांनी पाहिलीस. आत्ता त्या पाण्यात जे निळं आत गेलं ना, तो पक्षी होता – खंड्या त्याचं नाव. किंगफिशर.”
“किंगफिशर? म्हणजे बिअरच्या कॅनवर असतो तो…?”
“बरोबर तोच. या पक्ष्याच्या जगभरात बर्‍याच जाती आहेत. त्यातला हा खंड्या. त्याला आणखी एक थोडा मोठा भाऊही असतो. त्याला बंड्या म्हणतात. तो तपकिरी पांढरा असतो, आणि त्याची चोच नारिंगी असते. आणखी एक असतो, तो पाइड किंगफिशर. तो काळापांढरा असतो. त्यांचं मुख्य अन्न मासे.”
अक्षयने आश्चर्याने विचारलं, “म्हणजे त्याने आत्ता पाण्यात शिरून मासा पकडला?”
“हो.”
“हॅ! काहीही. असं कसं काय? पक्षी कसा काय पाण्यात शिरेल?”
“बरोबर, खंड्याला पोहता येतच नाही. पण त्याची नजर एवढी तीक्ष्ण असते की उडता उडता तो पाण्यातलं आपलं भक्ष्य बरोब्बर हेरतो आणि रॉकेटच्या वेगाने पाण्यात शिरून ते टिपतो. परत त्याच वेगात पाण्याबाहेर येतो. त्यामुळे त्याला पोहावं वगैरे लागतच नाही. तुमच्याकडे केबल आहे का?”
“हो.”
“मग त्यावरचं डिस्कव्हरी चॅनेल बघ. हे सगळं त्यावर दाखवतात. असे कितीतरी पक्षी शिकार करतात माशांची.”
आता अक्षय त्या माणसाच्या बोलण्याने, त्याच्या धडाधड माहिती सांगण्याने प्रभावित झाला होता. तो म्हणाला, “तुम्हाला एवढं कसं काय माहीत? तुम्ही नक्कीच खूप वाचलं असणार!”
तसा तो माणूस हसला आणि म्हणाला, “छॅ, छॅ. उगाच माझ्याबद्दल गैरसमज नको करून घेऊस. मला काहीही माहिती नाहीये, म्हणून तर संशोधक झालो आणि असे बुडी मारून मासे पाहत बसलो होतो. वाचनाचं म्हणशील तर तेही अगदीच थोडं. एवढी पुस्तकं अन् काय काय आहे जगात… बरं ते जाऊ दे. तू रोज इथे येतोस का?”
“अं… अगदी रोज नाही. पण आम्ही मित्रमित्र बरेचदा येतो.”
“मग असं कर उद्या सकाळी इथेच ये. तुला एक गंमत दाखवतो. जा तू आता. उद्या थोडा लवकर ये. उजाडायच्या सुमाराला.”
अक्षय त्याच्याही नकळत ‘चालेल’ असं म्हणून गेला आणि पायवाटेने मुख्य रस्त्याला लागला. ‘कोण असेल हा माणूस?’ सायकल चालवताना त्याला प्रश्न पडला. याआधी त्याने कधीही त्याला इथे पाहिलं नव्हतं. त्याच्या मित्रांपैकीही कोणीही त्याला अशा कोण्या माणसाबद्दल सांगितलं नव्हतं. कोणी का असेना, पण आहे एकदम मस्त असा विचार करत तो घरी पोचला.
अंघोळ वगैरे झाल्यावर थोडा वेळ अभ्यास करून अक्षयने पुन्हा ‘श्यामची आई’ वाचायचा प्रयत्न केला, पण पुन्हा त्याला कंटाळा येऊ लागला आणि झोप यायला लागली. मग संध्याकाळी लायब्ररीतून दुसरं कोणतंतरी पुस्तक आणायचं असं त्याने ठरवलं आणि तो टीव्हीवर डिस्कवरी चॅनेल पाहू लागला.
***
दुसर्‍या दिवशी अक्षय जेव्हा पुलापाशी पोचला, तेव्हा तो माणूस त्याची वाट पाहत तिथे उभाच होता. आता त्या माणसाकडेही एक हरक्युलसची ‘घोडा’ सायकल होती. तो माणूस म्हणाला, “चल माझ्यामागे.” तो झटकन टांग मारून सायकलवर बसला आणि पेडल मारू लागला. त्याच्या मागोमाग अक्षयही निघाला. पूल ओलांडून थोडं पुढे गेल्यावर मुख्य रस्ता सोडून एक पायवाट जात होती. त्यावरून तो माणूस जाऊ लागला. अक्षय त्याच्या अगदी मागेच होता. अक्षयने विचारलं, “कुठे जातोय आपण?”
तो माणूस म्हणाला, “दोन-तीन मिनिटांत पोचूच.”
आता थोडं थोडं फटफटू लागलं होतं. काळा अंधार करडा होऊ लागला. तो माणूस म्हणाला, “इथून थोडं पुढे अशीच वाढलेली झाडांची दाटी आहे. त्याला मी झाडराई म्हणतो. या उल्हास नदीचे दोन्ही काठ खरंतर खडकाळ माळरानाचे आहेत. पण तरी या राईत दाट झाडं वाढलीयेत. बेटासारखी. तिथेच जायचंय आपल्याला.”
अंधार आता उजळू लागला होता आणि इतका वेळ आजूबाजूला असलेल्या गवताची उंची थोडी वाढली होती. आणखी पुढे गेल्यावर मोठी झाडंझुडपं लागली. मग अक्षय आणि तो माणूस दाट झाडांच्या भागात शिरले. तिथे आंबा, वड, पिंपळ, चाफा, शिरीष, पेरू अशी वेगवेगळी झाडं होती आणि सगळी झाडं चांगली वाढलेली होती. झाडांच्या फांद्या एकमेकांत अडकलेल्या होत्या. झाडांवर वेलीही चढल्या होत्या. एक अगदी लहानसं जंगलच तिथे होतं.
कोवळा तांबूस-पिवळा प्रकाश पडायला सुरुवात झाली असली, तरी अजून झाडांच्या या बेटावर मात्र करडा अंधारच होता. मधूनच झाडांच्या फांद्यांमधून प्रकाशाची एखादी तिरीप येत होती आणि कुठे कुठे प्रकाशाच्या जाळीदार पिवळ्या रांगोळ्या जमिनीवर उमटायला सुरुवात झाली होती.
तो माणूस म्हणाला, “ही जी सगळी झाडं आहेत ना ती माझ्या अंदाजाने इथे पन्नासएक वर्षांपासून तरी असावीत. यातली सगळी काही आपोआप आलेली नाहीत, काही मुद्दाम लावलेली पण असावीत. मला असं वाटतं की, कोणीतरी इथे बागबिग तयार करायचा प्रयत्न केला असावा आणि नंतर तो माणूस मेला असावा किंवा त्याचा उत्साह संपला असावा. पण झाडांचं काय ती लावली की लावली. ती वाढतच राहतात!”
एका वडाच्या झाडाखाली थांबून तो माणूस म्हणाला, “आता इथेच ठेव सायकल. पुढे चालतच जाऊ. इथे एक मचाण बांधलंय मी. त्यावर जायचंय आपल्याला.”
अक्षयला आता जरा भीती वाटत होती. हा अनोळखी माणूस आपल्याला कुठे घेऊन जातोय? त्याच्यासोबत आणखी पुढे जावं की नाही? असे प्रश्न त्याला पडले. शिवाय त्याने त्याच्या आईबाबांना यातलं काहीही सांगितलं नव्हतं. अक्षयने विचारलं, “अं? नक्की कुठे जातोय आपण?”
तो माणूस म्हणाला, “कमॉन. घाबरू नकोस. मी काहीही करणार नाही तुला. आणि तसं वाटत असेल तर चल, आपण मागे फिरू या.”
आता इथपर्यंत आल्यावर परत फिरणं अक्षयला योग्य वाटत नव्हतं. त्याहीपेक्षा तो माणूस त्याला काय दाखवणार आहे याचं एक सुप्त आकर्षण त्याच्या धाडसी मनाला होतंच. त्यामुळे अक्षय म्हणाला, “नाही, ठीके. चला, जाऊ या.”
“हे बघ, तुझ्या खात्रीसाठी – ” असं म्हणून त्या माणसाने त्याच्या खिशातून एक ओळखपत्र काढून दाखवलं. त्यावर त्या माणसाचा फोटो होता. त्या कार्डावर ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या संस्थेचं नाव होतं. त्या माणसाचं नाव वाचायच्या आत त्याने ते कार्ड परत खिशात ठेऊन दिलं.
“ठीके,” असं म्हणून अक्षयने वडाच्या झाडाखाली सायकल लावली. तेव्हा त्याचं लक्ष त्या अजस्र झाडाकडे गेलं. त्याचा बुंधा दोन माणसांच्या मिठीत मावला असता आणि त्याच्या पारंब्यांच्या संभार तर प्रचंडच मोठा होता. या झाडाखाली तर आपल्या शाळेतल्या सगळ्या मुलांच्या सायकली सहज मावतील, अक्षयला वाटलं.
मचाण तिथून काही मिनिटांवरच होतं. ते सिमेंटचं होतं. त्याला लोखंडी पायर्‍यांचा जिना होता आणि त्याची उंची सगळ्या झाडांपेक्षा जास्त होती.
“पटकन चल. नाहीतर उशीर होईल आपल्याला.” असं म्हणून तो माणूस भराभरा वर चढून गेला. त्याच्यामागोमाग अक्षयही चढू लागला. चढताना एक-दोन पायर्‍यांवरून अक्षयचा पाय घसरला, तेव्हा त्या माणसाने त्याला पटकन धरलं आणि सावरून घेतलं.
मचाणावर पाच-सहा माणसं मावू शकतील एवढी चौकोनी गच्ची होती आणि तिला चारही बाजूंनी गुडघ्याएवढा कठडा होता. बाकी सगळं मोकळंच होतं. तिथून चारही बाजूला पाहिलं की, झाडराईच्या झाडांचे शेंडे दिसत होते. सूर्याची पिवळी कोवळी किरणं शेंड्यांवर पडू लागली होती. त्यामुळे ते उजळू लागले होते, चमचमते सोनेरी-हिरवे दिसत होते.
तो माणूस म्हणाला, “जरा थांब अजून काही क्षण, मग बघ मजा!”
अक्षय अवाक होऊन अनिमिष डोळ्यांनी चारही बाजूंना पाहत होता. नदीवरून येणारा गार वारा पिऊन घेत होता. तो माणूस म्हणाला, “आता बघच…”
खरोखरीच अक्षयने जे दृश्य पाहिलं, ते अद्भुत होतं. एकाएकी काही शे हिरवेकंच पोपट आणि तितकेच काळेकुळकुळीत पाणकावळे झाडांच्या त्या दाटीमधून उडू लागले. पोपटांच्या लालबुंद चोची कोवळ्या सूर्यकिरणांत चमकू लागल्या आणि पाणकावळ्यांचा चकचकीत काळा रंग झळाळू लागला. ते दृश्य अवर्णनीय होतं. हिरव्या डोंगरातून झटकन पोपटी-काळा लाव्हारस उफाळून यावा, तसे ते पोपट क्वॅ क्वॅ करत उडू लागले आणि इंग्लिश व्ही अक्षराचा आकार करत पाणकावळ्यांचे थवे निघून गेले.
“अप्रतिम,” अक्षय म्हणाला. “थँक्स.”
तो माणूस म्हणाला, “ही जी राई आहे ना तो या सगळ्या पक्ष्यांचा रातथारा झालाय. ही कॉलनी आहे त्यांची असं समज.”
त्या दिवशी संध्याकाळी अक्षयने लायब्ररीतून त्या माणसाच्या सुचवण्यावरून सालीम अलींचं पक्ष्यांवरचं एक पुस्तक आणलं. झाडराईतून परतत असताना तो माणूस अक्षयला म्हणाला होता की, सालीम अली हे पहिले मोठे भारतीय पक्षीनिरीक्षक होते. त्यांनी खूप मूलभूत असं काम करून ठेवलं आहे.
ते पुस्तक अक्षयला खूप आवडलं. त्यात वेगवेगळ्या पक्ष्यांची सचित्र माहिती होती. त्याने यातले काही पक्षी जसं की शिंजीर, कावळा, कबूतर, वटवट्या याआधी बरेचदा आपल्या आजूबाजूला पाहिलेही होते. पण त्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं.
रात्री पुस्तक वाचून झाल्यावर पडल्या पडल्या विचार करताना अक्षय स्वतःशीच म्हणाला, ‘आज आपण जे वाचलं ते आपल्याला खरोखरीच समजलं. याआधी आपण जे धडे वाचायचो, कविता पाठ करायचो, ते बरेचदा नुसतेच वाचायचो. त्यामागे उत्तरं देणं हे कारण असायचं. पण त्यातलं समजायचं किती?’ त्याला वाटलं, ‘आणि असाच प्रश्न सौरभ, अनिल, मनाली यांना पडला असेल?’ त्याचं दुसरं मन म्हणालं, ‘कदाचित पडला असेलही. आपल्याला काय माहीत?’ मग त्याला वाटलं, ‘आपण आपल्या निबंधाविषयी उद्या त्या माणसाला सांगू या. तो आपल्याला आणखीन अशी भारी पुस्तकं सुचवेल. मग आपल्याला त्यावर लिहिता येईल.’
***
सकाळी नदीकाठच्या खडकापाशी गेल्या गेल्या अक्षयने त्या माणसाला सांगितलं, “मला सालीम अलींचं पुस्तक खूपच आवडलं. त्याआधी मी श्यामची आई, लंपनच्या गोष्टी असं वाचायचा खूप प्रयत्न केला, पण मला झोपच यायची. असं का झालं असेल? आमच्या मॅडमनी तर ही पुस्तकं खूपच भारी आहेत असं सांगितलं होतं.”
तो माणूस म्हणाला, “तुझा प्रश्न तसा मोठाय. त्याचं एक असं उत्तर नाही. तरी आत्तापुरतं सांगायचं, तर… कसं असतं, की सुरुवातीला आपल्याला जे आवडतं ना, ते बरेचदा आपण आपल्या जगण्याशी ताडून पाहत असतो. जसं तू सालीम अलींची माहिती तुला दिसणार्‍या पक्ष्यांशी ताडून पाहिलीस, तसं. पण नंतर तसं होत नाही. आपली भूक वाढते. आपल्याला माहीत नसलेलंही आवडायला लागतं.”
“हं, असेल असंच काहीतरी.” थोडं थांबून अक्षय म्हणाला, “मला तुमची मदत हवीये. आमच्या शाळेत एक निबंधस्पर्धा आहे. त्यात मला वाचनावर निबंध लिहायचाय. पण मला तो जमतच नाहीये. मला समजतच नाहीये, मी कोणत्या पुस्तकांवर लिहू ते आणि त्यात मी फार वाचलेलंही नाहीये. आमच्या घरीही कोणी वाचत नाही. प्लीज, मला मदत करा ना. निदान मला मस्त पुस्तकं तरी सांगा… प्लीज…”
तो माणूस हसत म्हणाला, “बापरे, पेचातच टाकलंस तू मला. मी आणि वाचन! छे, छे! आमचा काहीही संबंध नाही रे बाबा. जगात माझ्यापेक्षा कितीतरी वाचणारी, ज्ञानी माणसं आहेत.”
“हो असतील, पण मला त्या सगळ्यांना भेटायला आत्ता वेळ नाहीये. मला निबंध तर लगेचच लिहायचाय ना!” अक्षयने त्या माणसाला बरोब्बर शब्दात पकडलं होतं.
“बरं, ठीके. मी काही तुला पुस्तकं सांगणार नाही आणि मी जे काही सांगेन त्याने तुला निबंधासाठी किती फायदा होईल हेही मला माहीत नाही. तरी मी थोडं सांगायचा प्रयत्न करतो. मी आत्तापर्यंत जे काही वाचलंय, किंवा वाचतो त्यातलं फारच थोडं माझ्या लक्षात राहतं. बरेच जण कसे एकपाठी असतात, त्यांना वाचलेला शब्दन् शब्द लक्षात राहतो. ते भारीच असतात. पण मी अगदी विसराळू आहे. हां, पण मी जे काही वाचतो, त्याचा एक ठसा माझ्या मनावर उमटतो.”
“…म्हणजे?”
“म्हणजे… अजून लहान आहेस तू तसा, पण तरी सांगतो. माझ्या क्षेत्रातली पुस्तकं असतील किंवा अगदी दोस्तोव्हस्की, चेखव्ह किंवा माडगुळकर अशा लेखकांच्या कथा-कादंबर्‍या असतील, त्यांचं मी जे काही वाचतो ना ते जसंच्या तसं कधीच माझ्या लक्षात राहत नाही. पण पुस्तकातून लेखकाला जे सांगायचं असतं, ते माझ्या मनावर कायमचं कोरलं जातं. ते कायम माझ्या लक्षात राहतं. म्हणून वाचताना मी ते सांगणं काय आहे, याचा सारखा शोध घेत राहतो आणि जे सापडेल ते माझ्या आत जिरवू पाहतो.”
अक्षयने विचारलं, “म्हणजे तुम्हाला पुस्तकाचं नावबिव असं काहीही लक्षात नसतं?”
“अगदी नसतंच असं नाही. पण बरेचदा मला ती नावं, त्यातले प्रसंग किंवा माहिती या गोष्टी कमी महत्त्वाच्या वाटतात. जसं तू वाचलेलं सालीम अलींचं पुस्तक हे आजूबाजूच्या निसर्गाचं वाचन असतं किंवा एखादी गोष्ट ही काही माणसांचं त्या लेखकाने केलेलं एक वाचनच असतं.”
अक्षयच्या चेहर्‍यावरचे गोंधळलेले भाव पाहून तो माणूस पुढे म्हणाला, “थोडं जड वाटेल तुला, पण तू एवढाही लहान नाहीयेस. तुला सांगायला पाहिजेच. कदाचित आत्ता थोडंसंच समजेल, पण काही हरकत नाही. सगळं सगळ्यांना लगेच समजलं पाहिजे असा कुठे नियम आहे? जसं मी एवढा मोठा घोडा झालो तरी मला या नदीतल्या माशांबद्दल काहीही समजलेलं नाही!”
तो माणूस हसायला लागला आणि मग त्याच्या सोबत अक्षयही. अक्षयच्या खांद्यावर हात ठेवत तो माणूस म्हणाला, “पुस्तकं आपल्याला माणसं, निसर्ग असं काय काय कसं वाचावं हे सांगत असतात. म्हणून पुस्तकाचं अंतिम ध्येय पुस्तकातून बाहेर पडायला लावणं हे आहे असं मला कायम वाटतं. पुस्तकातून आपल्याला शिकायचं असतं, आपण जे जगतो ते समजून घेणं – म्हणजे आजूबाजूची माणसं, त्यांचं वागणं, निसर्ग. समजलं?”
अक्षय म्हणाला, “सगळं नाही. पण थोडं थोडं. जसं सालीम अलींमुळे मला शिंजीर पक्षी समजला. त्याआधी मी तो रोज पाहायचो, पण मला तो ‘माहिती’ नव्हता. बरोबर?”
“हं, बरोबर,” असं म्हणून त्या माणसाने मान डोलावली.
घरी जाताना राहून राहून त्या माणसाचं बोलणं अक्षयला आठवत राहिलं. पण त्याचा आपल्या निबंधात वापर कसा करून घ्यायचा, आणि मुख्य म्हणजे निबंध कशावर लिहायचा हे मात्र त्याला समजत नव्हतं. आणि वेळ तर उद्यावर येऊ ठेपली होती. मग त्या रात्री त्याने कागद-पेन घेतलं आणि जसा येईल तसा निबंध लिहायचा असं ठरवलं. तो लिहू लागला, तशी नाही म्हणता म्हणता त्याची दोन पानं भरली. सकाळी त्या माणसाला हा निबंध वाचून दाखवायचा असं ठरवून तो शांतपणे झोपी गेला.
***
“माझे वाचन,” अक्षय निबंध वाचायला वर्गासमोर उभा होता. त्याच्या शेजारी खुर्चीवर फुलेमॅडम बसल्या होत्या आणि त्यांचा हातातल्या डस्टरशी काहीतरी चाळा चालला होता.
“हं, वाच,” मॅडमनी अक्षयला सांगितलं. अक्षयने एकवार सगळ्या वर्गाकडे पाहिलं आणि त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला. तरी तो वाचू लागला –
“धूप में निकलो घटाओं में नहाकर देखो
जिंदगी क्या है किताबोंको हटाकर देखो*
ह्या ओळी कोणाच्या आहेत हे मला माहीत नाही, परंतु या ओळी ज्यांच्या तोंडून मी ऐकल्या त्या काकांबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.
यावर तुम्हाला असा प्रश्न पडेल, निबंधाचा विषय आणि हे काका यांचा काय संबंध? तर थोडे थांबा. माझे म्हणणे ऐका. मग कदाचित, मी काय सांगतोय हे तुम्हाला समजेल…
मी ज्या काकांबद्दल सांगणार आहे, त्यांचं नाव आहे जलराजा काका. हे त्यांचे खरे नाव नाही. मीच हे नाव त्यांना दिले आहे. कारण मला त्यांचे खरे नाव माहिती नाही. गेले तीन दिवस आम्ही रोज सकाळी भेटत होतो. तेही फक्त थोडाच वेळ. त्या वेळात आम्ही कधीही एकमेकांना आपापली नावे विचारली नाहीत. परंतु तरी आमच्यात एक मैत्रीचे नाते तयार झाले असावे असे मला वाटते.
या जलराजा काकांना मी पहिल्यांदा जेव्हा पाहिले तेव्हा मी खूपच घाबरून गेलो होतो. कारण तेव्हा ते पोहत पोहत नदीतून बाहेर येऊन माझ्याकडे चालत आले होते. त्यांनी घट्टसा टीशर्ट घातला होता आणि ढगळ सिक्सपॉकेट्स पँट घातली होती. त्यांच्या डोक्यावर कॅप होती. सगळ्या कपड्यांमधून पाणी निथळत होते. त्यांच्या कॅपवर मध्यभागी एक लहानसा बेडूक बसला होता, तर खांद्यावर जलपर्णी चिकटलेली होती. ते चालत चालत येत होते तेव्हा त्यांच्या खिशांमधून दोन-तीन मासेही टपकन बाहेर पडले. त्यांना पाहून वनराणी असते तसे ते जलराजा असावेत असे मला वाटले. (म्हणूनच त्यांचे नाव जलराजा ठेवले.) ते दिसायला थोडे वेगळेच होते. त्यांचे नाक थोडे मोठे, निमुळते आणि धारदार होते. कान जरासे लहान होते, आणि त्यावर खवल्यासारखे काहीतरी होते. ओठ जाड होते आणि हातपाय हिरवट होते. मला वाटले की, नदीत बुडी घेतल्याने शेवाळ लागलेले असेल, पण तसे नव्हते. नंतरही मी त्यांना भेटलो, तेव्हाही त्यांचे हातपाय मला हिरवटच दिसले. ते बायोलॉजिस्ट असल्याचे त्यांनी मला सांगितले. तिथे ते कोणत्यातरी प्रकारच्या माशांवर संशोधन करत होते.
एकदा त्यांनी मला नदीच्या काठाच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या एका झाडांच्या बेटावर नेले. या बेटावर दाट झाडी होती. तिथे आम्ही गप्पा मारत असताना ते मला म्हणाले की, आपण म्हणजे माणूस खरेतर अडाणी प्राणी आहे. त्याला निसर्गातले फार काहीच माहीत नाहीये आणि तरीही तो माकडासारख्या उड्या मारत फिरतो. बघ ना तू तुझ्या आजूबाजूला – मला हे माहितेय, मला ते माहितेय असं किती जण बोलत असतात. मला तेव्हा त्यांचे हे बोलणे जरा उद्धटपणाचे वाटले, परंतु नंतर मात्र मला ते पटले.
कसे ते सांगतो, मला आठवते आहे जेव्हा मी सहावीत होतो, तेव्हा सरांनी (a + b)2 किती अशा प्रश्न वर्गात कोणालातरी विचारला होता. तेव्हा त्या मुलाला उत्तर सांगता आले नव्हते. मी लगेच हात वर केला आणि झटकन उत्तर दिले. सरांनी कौतुक केल्यावर मी मनातल्या मनात खूप आनंदी झालो होतो. मी तेव्हा स्वतःलाच सांगितलं की, आपल्याला सगळे येते आणि सगळे माहीत आहे. परंतु जेव्हा जलराजा काकांनी मला पक्ष्यांचे एक पुस्तक दिले, तेव्हा मला समजले की मला तर आमच्या कुंडीतल्या झाडांवर रोज येणारा पक्षी माहीतच नाही, मी कबूतर पाहिले होते, परंतु ते काय करते, काय खाते हे मला माहीत नाही. त्या काकांनी सांगितलेली झाडे मला माहीत नव्हती, सकाळचे कोवळे ऊन मी रोज अंगावर घ्यायचो, परंतु मला त्याचा स्पर्श माहीत नव्हता. हे आणि असे कितीतरी मला माहीत नव्हते. तरी मी किती उड्या मारत होतो?
मी जलकाकांना माझ्या या निबंधाबद्दल सांगितलं आणि त्यांना मला मदत करायची विनंती केली. मला वाटले, ते मला भरपूर पुस्तकांची यादी सांगतील. परंतु त्यांनी तसे काहीच केले नाही. त्याऐवजी त्यांनी मला वेगळेच काहीतरी सांगितलं. ते माझ्या डोळ्यांत पाहत शांतपणे म्हणाले, ‘पुस्तकं वाचणे वाईट आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही. मला पण वाचायला खूप आवडते. पण पुस्तकांपेक्षाही आपण रोज जे काही पाहतो, अनुभव घेतो ते वाचायचा प्रयत्न केला तर? मला ते काय बोलत होते, हे खरोखरच नीट समजलेले नाहीये. एकदा वाटले, हो मला समजले आहे, पण लगेचच वाटले नाही, नाही समजले आहे. बुळबुळीत साबण कसा हातातून सटकत राहतो, तसे त्यांचे हे म्हणणे आहे. पण तरी त्यांनी मला जे काही सांगितलं, त्यातून जे काही मला समजले ते असे – मी आत्ता कुठे वाचनाला सुरुवात केली आहे. आणि हे वाचन काही फक्त पुस्तकांचेच नसून माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचे आहे. या वाचनाच्या वर्गात मी आत्ता शिशुवर्गात असलो, तरी मला हे वाचन कायम चालू ठेवायला हवे. तसा प्रयत्न मी करणार आहे हे नक्की!
तर असे आहे माझे वाचन – साधेसे. आत्ताच सुरू झालेले.
जलराजा काकांशी झालेल्या गप्पांमधून मला सुचलेल्या दोन ओळी सांगून मला या निबंधाचा शेवट करावासा वाटतो –
पुस्तकातली अक्षरे, आहेत आपुली सोयरे ।
हात त्यांचा धरूनिया, जे जे दिसेल ते वाचू या ।
ता.क. – मी हा निबंध ज्यांच्या प्रेरणेने लिहिला, त्या जलराजा काकांना मी तो दाखवायला गेलो होतो, पण ते आम्ही जिथे भेटायचो तिथे नव्हतेच. आणि आता मला नाही वाटत की ते तिथे असतील. मला एकदा वाटले, काकांना एकदातरी भेटायला हवे, एकदाच. पण आता वाटतेय, भेटायची काही गरज उरलेली नाही आहे.
अक्षय वाचायचं थांबला. वर्गात चिडीचूप शांतता पसरली आणि त्याला फुलेमॅडमच्या ओरडण्याने मोठ्ठा तडा गेला. “हा काय निबंध आहे का अक्षय? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. यात पुस्तकं कुठेत? त्यांची माहिती कुठे? तुला विषयच समजलेला नाहीये.” अक्षय मान खाली घालून उभा राहिला. तोंडावर हात दाबून हसू आवरणार्‍या समोरच्या चेहर्‍यांकडे त्याला पाहायचं नव्हतं.
फुलेमॅडम गरजल्या, “ना यात सुविचार ना थोर माणसांची वाक्यं… छ्यॅ. आत्ताच्या आत्ता अंगठे धरून उभा रहा इथे…”
नंतर इतर मुलांनी आपापले निबंध वाचले आणि तास संपेस्तोवर अक्षय वर्गाच्या एका कोपर्‍यात पाठीला रग लागेपर्यंत उभा होता.
– प्रणव सखदेव
sakhadeopranav@gmail.com

***
चित्रश्रेय : अवंती कुलकर्णी
*या ओळी निदा फाजली यांच्या आहेत.
Facebook Comments

20 thoughts on “वाचन मोठम्… खोटम्!”

 1. प्रणव,अप्रतिम कथा.शिक्षकाने वर्गात ध्यापन करताना वर्गाच्या चार भिंतींच्या बाहेरची अनुभूती देणे अपेक्षित असते.तसेच पुस्तक वाचत असताना पुस्तकाबाहेर जाता आलं पाहिजे .पुस्तकाचं अंतिम ध्येय हे पुस्तकातून बाहेर पडायला लावणं हे असतं हे या कथेचं कथाबीज.ते इतकं सुंदर विकसित केलंय की त्याला तोडच नाही. तुझी निसर्गातल्या बारीकसारीक गोष्टींची निरीक्षणे अगदी वाखान ण्याजोगी आहेत .शिक्षकाने नेणिवेच्या पातळीवर केलेले वर्गातील अपराध विद्यार्थ्यांच्या मनावर खोल परिणाम करतात हे तुझ्या स्वानुभवातून आलेले असावे असे वाटते. .

  एकूणच मला ही कथा अत्यंत परिणामकारक वाटली . प्रणव ,तू असाच लिहित राहा .

  1. अगदी स्वानुभव म्हणता नाही येणार, परंतु डोक्यात पक्की बसलेली काही निरीक्षणं व त्यातून समजलेली संकल्पना मांडण्याचा हा प्रयत्न.
   खूप आभार.

 2. Pranav , very nice story ! While reading , I felt like I am seeing all this. The message given by the story is also good ! Keep writing!

 3. फार आवडली कथा, अतिशय परिणामकारक. मुलीला वाचून दाखवेन, तिलाही आवडेल नक्की. कथेची भाषा जितकी चित्रदर्शी आहे तितकाच तिचा साधेपणा आकर्षक आहे, कथेतल्या अक्षयसारखाच प्रामाणिक आणि लोभस आहे.

 4. तुझ्या नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळा विषय! आणि उत्तम प्रकारे मांडला आहेस…थोड्याफार फरकाने प्रत्येकानेच शाळेत अशा सारखे अनुभव घेतले असतातच. तुझं लिखाण टीकाकार/समीक्षकांना कुठल्याही ‘-इझम’ मध्ये बसविता येणार नाही, असंच इथून पुढेही लिहीत जा!

 5. दादा, मस्तच आहे कथा. तेवढा फुले बाईचा पत्ता दे. खून करेन म्हणतो तिचा…

 6. जरा खटकली. वयोगट समोर न आल्यामुळे अक्षयच्या वैचारिक पातळीचा अंदाज येत नाही. वाचत जातो पण कथा आतून पकड घेत नाही. तसा हा लहान मुलांच्या छोटेखानी कादंबरीचा विषय आहे. हीच कथा जशीच्या तशीही लहान मुलाकरता कादंबरी म्हणून छापता येईल. लहान मुलाकरता एक अतिशय वेगळा विषय यात आणलाय व तो फार परिणामकारकपणे उतरलाय. अशा आणखी काही कथा, कादंबऱ्या लिहिल्यास तर बालवाङ्मयात वेगळी भर पडेल. मी अलिकडे बालसाहित्य काही वाचलेलं नाही. पूर्वी मी रेग्युलर फुलबाग व इतरही मासिके वाचायचो. आता कसले साहित्य येत आहे याबद्दल मी अनभिज्ञ आहे. अधून मधून म.टा.मध्ये परिक्षणे येतात पण त्यावरुन काही खास आयडिया येत नाही. अबब हत्तीच्यावेळी मी एक वेगळा प्रयत्न करत होतो. उदा. १) पक्षी जाळ्यात अडकतात पण ते सर्व जोर लावून जाळ्यासकट उडून जातात व शिकाऱ्याला चकमा देतात. २) घंटा कशाला बांधायची? — सर्व उंदीरच एकजुटीने मांजरावर ठरवून हल्ला करतात. हे विषय थोडेसे आठवले. पाटणकर, तांबे यांच्यापुढे बालसाहित्य गेले नसेल तर ते नेले पाहिजे. ती बीजे तुझ्या या कथेत दिसताहेत.

 7. छानंय गोष्ट! जलराज काकांसोबतच्या भेटींचे प्रसंग, ’रातथारा’ हा शब्द आणि अक्षयचा निबंध, पुस्तक वाचणं ते जग वाचणं अशी अलगद झेप हे सारे खूपच आवडले. अक्षयचं सुरुवातीचं व्यक्तिचित्रणसुद्धा चांगलं साधलंय..पण त्या चित्रणानुसार वागणारं उपनगरी मध्यमवर्गीय मूल सात दिवसांच्या इटुकल्या डेडलाइनमध्ये लायब्ररी लावून पुस्तकं वाचायचा विचार करेल हे आधी माझ्या पूर्वग्रहदूषित मनाला पचलं नाही. म्हणजे जलराजकाकांबद्दलच्या सत्य-सत्याभासी फॅन्टसीपेक्षा कितीतरी मोठी ही फॅन्टसी आहे असं वाटत राहिलं. (पालकांनी वाचनाची सवय न लावल्याबद्दल तो कितीही वैतागला तरी शेवटी त्याची आई म्हणते तसा तो निबंधाच्या पुस्तकातला निबंधच फेरफार करून लिहेल, किंवा लायब्ररीतल्या पुस्तकांमधल्या ब्लर्ब्स वाचून पुस्तक वाचल्यासारखं दाखवायची अति अतिहुशारी त्याच्याकडे असेल असे ते पूर्वग्रह. त्यांमागचं कारण म्हणजे माझी आई, माझी शाळा, माझा आवडता ऋतू/सण यांच्याबद्दलचे निबंध कसे “असायला पाहिजेत” हे अगदी लहान वर्गांपासून (तिसरी-चौथी) मुलांच्या मनात भिनवलं गेलेलं असतं सहसा. त्यातल्या ’माझी’ या शब्दाच्या खरेपणाला मार्कांच्या किंवा ग्रेडच्या मापात काहीही किंमत नसते – हे अति अतिहुशार मुलांनी वय वर्षं दहापर्यंत ताडलेलं असतं. मग अचानक ’माझे’ वाचन यातल्या ”माझे’चा खरेपणा अक्षयला (तो ५वी-८वीतला आहे असं वाटतं) भिडला कुठून?) मग विचार केला आणि वाटलं की हा आत्मसिद्ध खरेपणा हेच कळसूत्र आहे गोष्टीचं, म्हणून लेखकानं मुद्दाम तो बिंदू कथेत आणला असेल. तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल.

 8. म्हणून पुस्तकाचं अंतिम ध्येय पुस्तकातून बाहेर पडायला लावणं हे आहे असं मला कायम वाटतं.
  I could always relate to this 🙂

  Its a lovely story.
  Writing for kids is a feat itself I long to achieve someday.
  Kudos again.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *