बालसाहित्यांक २०१७ लेख

हिंदी कॉमिक्स : एका अटळ ऱ्हासाकडे होणारी वाटचाल

मला हिंदी कॉमिक्स का आवडतात, याचं उत्तर माझ्या बालपणात दडलं आहे. मी जिथे जन्मलो आणि वाढलो, त्या भागातल्या मराठी वाचनसंस्कृतीचा अभाव आणि भारतीय रेल्वे हे दोन घटक याला मुख्यत्वे कारणीभूत आहेत. माझं लहानपण गेलं मराठवाड्यातल्या परभणीसारख्या निमशहरी भागात. परभणी हे निजामाच्या अंमलाखाली होतं. आमच्या भागात बोलल्या जाणाऱ्या मराठीवर हिंदी आणि उर्दूचा बराच पगडा आहे. माझे बरेच मित्र मुस्लीम-सिंधी-मारवाडी असल्याने त्यांच्या सान्निध्यात राहून माझी हिंदी चांगली झाली. परभणी हे मुंबई-पुण्यातल्या मराठी सारस्वतांच्या आणि कलाकारांच्या रडारवर नसल्यामुळे साहित्य संमेलनाचा एक अपवाद वगळता त्या काळी आमच्याकडे तुरळकच सांस्कृतिक कार्यक्रम होत. परभणीमध्ये मराठी नाटकंपण क्वचितच येत आणि सचिन-महेश कोठारे प्रभृतींचे चित्रपट सोडून फारसे मराठी चित्रपट येत नसत. त्या काळी मराठीमधून  प्रकाशित होणाऱ्या चंपक, चांदोबा, ठकठक अशा लहान मुलांसाठीच्या मासिकांपेक्षा मला इंद्रजाल कॉमिक्स, राज कॉमिक्स, डायमंड कॉमिक्स ही जवळची वाटायची. कारण त्यातले नायक हे सुपरपॉवर असणारे, शक्तिशाली आणि जास्त आकर्षक होते.
जेव्हा या खंडप्राय देशाला बॉलिवूड आणि क्रिकेट जोडून ठेवतं असं विधान केलं जातं, तेव्हा त्यात भारतीय रेल्वेचाही उल्लेख यायला हवा असं वाटतं. रामसे बंधूंपैकी एक असलेले श्याम रामसे एका मुलाखतीत म्हणाले होते, “देशाच्या ज्या-ज्या भागांत रेल्वे थांबते, त्या-त्या भागांत आमचा सिनेमा पोहोचला आहे.” एकदम मार्मिक विधान आहे हे. जिथे भले भले राजकारणी आणि सेलिब्रिटीज् पोहोचू शकत नाहीत, तिथे रामसे हा ब्रँड पोहोचला तो केवळ रेल्वेमुळे. त्या काळी सिनेमाची रिळं रेल्वेतून देशभरा
तल्या खेड्यापाड्यांत पोहोचवली जायची. रेल्वेने देशभरात पोहोचवलेल्या अजून काही गोष्टी म्हणजे तो विशिष्ट चवीचा चहा आणि हिंदी ‘उपन्यास’ अर्थात कादंबर्‍या. याशिवाय कोळसा आणि तत्सम गोष्टीही देशभरात पोहोचवते ती रेल्वेच. असं म्हणतात, की ज्याला हा देश थोडक्या वेळात जाणून घ्यायचा असेल, त्याने गोरखपूर-त्रिवेंद्रम गाडीने प्रवास करावा.
भारतातली रेल्वेस्थानकं हे एक मजेदार प्रकरण आहे. ही स्थानकं म्हणजे जणू स्वतंत्र संस्थानंच असतात. कुठल्याही स्टेशनावर पुरीभाजी, चहा आणि वड्यांची जी चव असते; ती तुम्हांला शहरातल्या इतर कुठल्याही हॉटेलात सापडणार नाही. भारतीय स्टेशनवर गेल्यावर दोन गोष्टी कळतात : या देशात चोवीस तास चहा मिळतो आणि इथले लोक वर्षभर प्रवास करतात. भारतीय रेल्वेचं देशातल्या लाखो मुलांच्या आयुष्यातलं असंच आणखी एक महत्त्वाचं योगदान म्हणजे राज, डायमंड आणि इंद्रजाल या कॉमिक्सचा त्यांच्या वाचनसंस्कृतीमधला शिरकाव. जिथं-जिथं भारतीय रेल्वे पोहोचली आहे, तिथं-तिथं रेल्वे स्टेशनवर ही कॉमिक्स मिळतात. निमशहरी आणि ग्रामीण भागात अजूनही रेल्वे स्टेशनवरची बुक स्टोअर्स हा पुस्तकं मिळवण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. तिथे मर्यादित रेंजमध्ये का होईना, पुस्तकं मिळतात तरी. तिथे अजूनही हिंदी कादंबर्‍या आणि कॉमिक्स यांचीच चलती आहे.

हिंदी कॉमिक्स ही सत्तर, ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत जन्मलेल्या आणि वाढलेल्या अनेक भारतीयांच्या बालपणीच्या सुखद आठवणींचा आणि नॉस्टॅल्जियाचा हिस्सा आहेत. विशेष म्हणजे यात फक्त हिंदी भाषक नाहीत, तर इतर अनेक भाषक आहेत. ज्याप्रमाणे बॉलिवूड चित्रपटांना विशिष्ट भाषेचेच प्रेक्षक मिळणं ही मर्यादा नाही, तसंच या हिंदी कॉमिक्सच्या बाबतीतपण आहे. भारतामध्ये हिंदी कॉमिक्सचं युग साधारणतः १९६४ साली सुरू झालं असं मानलं जातं. इंद्रजाल कॉमिक्सने भारतात जादूगार मँड्रेक आणि फँटम ही हीरोइक पात्रं असणारी कॉमिक्स आणली. ही कॉमिक्स हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये होती. नंतर फ्लॅश गार्डन हा अजून एक महानायक फँटम आणि मँड्रेकला येऊन मिळाला. नंतर त्यांनी ‘बहादूर’ हा देशी हीरोपण आणला. बहादूर हा झुंजार नायक (action hero) होता, जो गुप्तहेरही असतो. उत्तर भारतामध्ये हा ‘बहादूर’ भलताच लोकप्रिय झाला होता. इंद्रजाल कॉमिक्सचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती कॉमिक्स वाचताना मुलांना एक बंडखोरी केल्याचं समाधान मिळायचं. कसं? तर त्या काळात ही कॉमिक्स वाचणं चांगलं समजलं जात नसे. मुलं ही कॉमिक्स वाचताहेत याचा अर्थ ती बिघडताहेत असं त्या वेळेच्या पालकांना वाटायचं. आपल्या मुलांनी ‘चांदोबा’ किंवा ‘अमर चित्र कथा’ यांसारखी ‘संस्कारी’ पुस्तकं वाचावीत असा पालकांचा कटाक्ष असे. पण डायमंड कॉमिक्समधल्या नायकांचे सुपर-कारनामे वाचण्याची चटक लागलेली मुलं आपल्या पालकांपासून चोरून ही कॉमिक्स वाचत. मुलांनी अशी ‘बंडखोरी’ करण्यामागे त्यांचे आवडते महानायक हे एकच कारण नव्हतं. त्या बंडखोरीला एक ‘लैंगिक’ पैलू होता. या कॉमिक्समधलं नायक आणि नायिकांचं दृश्य (visual) चित्रण अतिशय बोल्ड होतं. नायक आणि नायिका हे अतिशय पिळदार आणि घाटदार शरीरयष्टीचे असत. ते अनेक वेळा अल्पवस्त्रांकित असत. त्यांना बघून अनेकांच्या नुकत्याच उमलू लागलेल्या लैंगिक जाणिवा सुखावत. त्यामुळे पालकांच्या नजरेआड ही कॉमिक्स वाचणं हा एक हवाहवासा, रोमांचकारी अनुभव होता.
भारतात ऐंशीच्या दशकात डीसी कॉमिक्स आणि मार्व्हल कॉमिक्सचं आगमन झालं आणि इंद्रजाल कॉमिक्सच्या जनाधाराला गळती लागली. नंतर हिंदीच्या इलाख्यातपण डायमंड आणि राज कॉमिक्सने इंद्रजाल कॉमिक्सचा ग्राहकवर्ग खेचायला सुरुवात केली. या ताज्या दमाच्या प्रतिस्पर्ध्यांना तोंड देण्यात इंद्रजाल कॉमिक्सचे कर्तेधर्ते कमी पडू लागले. त्यांची अतिशय जास्त किंमत हापण एक कळीचा मुद्दा ठरला आणि शेवटचा आचका देऊन भारतात इंद्रजाल कॉमिक्स १९८९ साली बंद पडलं. जागतिकीकरण भारताच्या उंबरठ्यावर उभं असताना जगभरात प्रसिद्ध असलेलं कॉमिक्स भारतात बंद पडणं हा नियतीचा जरा विचित्र न्याय वाटतो. काही वर्षांपूर्वी फँटम मालिकेच्या पहिल्या तीन कॉमिक्सची बोली लिलावात लावण्यात आली. त्या काळी आठाणा किंमत असणाऱ्या या कॉमिक्ससाठीची बोली तब्बल एक लाख रुपयांपर्यंत लागली होती .
डायमंड कॉमिक्सनं भारतात आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली ती १९७८पासून. डायमंड कॉमिक्सचं सगळ्यांत लोकप्रिय पात्र म्हणजे चाचा चौधरी. चाचा चौधरी हे एका अतिबुद्धिमान वृद्धाचं पात्र  भारतातल्या घराघरात पोहोचलं असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चाचा चौधरींच्या सोबत असलेला साबू हा गुरू ग्रहावरून आलेला अतिउंच साथीदारपण लोकप्रिय आहे. चाचा चौधरी हे पात्र निर्माण करणाऱ्या प्राण या चित्रकाराचे (cartoonist) एकूणच भारतीय कॉमिक्स विश्वावर अनंत उपकार आहेत. कारण इतकं वाचकप्रिय, ठेठ भारतीय पात्र निर्माण करण्याचं श्रेय त्याचं आहे. डीसी कॉमिक्सचं जसं एक स्वतंत्र विश्व आहे, तसंच डायमंड कॉमिक्सचंही एक विश्व आहे. त्यात बिल्लू, पिंकी, रमण, श्रीमतीजी अशी वाचकप्रिय पात्रं आहेत. अनेकदा ही पात्रं दुसऱ्या पात्रांच्या कॉमिक्समध्ये शिरतात. त्या दुसऱ्या पात्राला मदत करतात. डायमंड कॉमिक्सची बहुतेक पात्रं ही उत्तर भारतीय मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असणारी आहेत. त्यांच्या अंगात कुठलीही सुपरपॉवर नाही की कसली अतुलनीय शारीरिक शक्ती नाही. ती एकदम तुमच्या-माझ्यासारखी सर्वसाधारण माणसं आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वाचक स्वतःला त्यांच्यात सहजगत्या पाहू शकतो. ही पात्रं विशेषत: उत्तर भारतीय वाचकांना जवळची वाटतात, ती त्यांच्या तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसाधारण भासणार्‍या (boy / man / girl / woman next door) प्रतिमेमुळे. त्या अर्थाने त्यांची तुलना आर्ची या अजून एका जगद्विख्यात व्यक्तिरेखेशी (cartoon charachter) करता येते. इंटरनेटच्या युगातपण डायमंड कॉमिक्सचा वाचकवर्ग टिकून आहे. तो का टिकून आहे याचं उत्तर त्यांच्या वाचकवर्गाच्या संरचनेत आहे. डायमंड कॉमिक्सचा बहुतेक वाचकवर्ग हा निमशहरी आणि ग्रामीण भागात विखुरला आहे. शहरांच्या तुलनेत तिथे इंटरनेटचा प्रसार अजूनही कमी आहे. स्मार्टफोनचा वापर वाढला असला, तरी छापील माध्यमांची तिथे अजूनही चलती आहे. त्यामुळे या भागात अजूनही ही कॉमिक्स वाचली जातात. ‘चाचा चौधरी का दिमाग कम्प्युटर से भी तेज चलता है’ किंवा ‘साबू को जब गुस्सा आता है तब ज्युपिटर ग्रह पे कहीं एक ज्वालामुखी फट पडता है’ यांसारखे शाईनमारू संवाद अजूनही या भागांत लोकप्रिय आहेत. चाचा चौधरीवर एक मालिकापण बनली होती. रघुवीर यादवने त्यात चाचा चौधरीची भूमिका केली होती. मध्यंतरी चाचा चौधरीवर चित्रपट बनवण्याच्या हालचाली चालू होत्या, पण लवकरच तो प्रकल्प थंड्या बस्त्यात गेला. या लोकप्रिय भारतीय व्यक्तिरेखेकडे  बघण्याचा बॉलिवूडचा दृष्टिकोण इतका उदासीन का आहे, हा संशोधनाचा विषय आहे.
‘राजा पॉकेट बुक्स‘ची स्थापना १९८६ सालची. राजा पॉकेट बुक्स म्हणजे वाचकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या राज कॉमिक्सचे प्रकाशक. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची नागराज, सुपर कमांडो ध्रुव, डोगा, बांकेलाल, भोकाल ही पात्रं प्रचंड लोकप्रिय आहेत. भारताला आपल्या मातीतले स्वदेशी महानायक देण्याचं श्रेय राज कॉमिक्सचं. मार्व्हल आणि डीसीने ज्याप्रमाणे त्यांचं एक महानायकविश्व तयार केलं आहे, तसंच आणखी एक भारतीय महानायकविश्व तयार करण्याचं श्रेय जातं राज कॉमिक्सकडे. राज कॉमिक्सच्या कथांवर बॉलिवूडचा जाणवण्याइतपत प्रभाव आहे. काळ्या-पांढऱ्या रंगांतली पात्रं, काहीसे भडक संवाद, शेवटी अंतिम विजय सत्याचाच होतो या तत्त्वज्ञानावरचा विश्वास, तोंडीलावण्यापुरत्या नायिका अशी बॉलिवूड सिनेमांची व्यवच्छेदक लक्षणं राज कॉमिक्समध्ये आढळतात. साप या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल भारतीय जनमानसात एक विचित्र भीतियुक्त आकर्षण आहे. इच्छाधारी नाग, नागमणी आणि तत्सम शेकडो अंधश्रद्धा सापाच्या बाबतीत प्रचलित आहेत. ‘नगिना’, ‘निगाहे’ आणि असे अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट आहेत, जे सापाविषयी प्रचलित असलेल्या अंधश्रद्धांचा वापर कथानकात करतात. भारतीय जनमानसात सापाबद्दल असलेल्या या आकर्षणाचा अचूक अंदाज राज कॉमिक्सला आला. त्यांनी सापाचे गुणधर्म अंगी असणारा ‘नागराज’ हा महानायक बनवला. नागराज हे आजसुद्धा राज कॉमिक्सचं सर्वाधिक लोकप्रिय असलेलं पात्र आहे. सुपर कमांडो ध्रुव या दुसऱ्या पात्रावर मार्व्हलच्या ‘कॅप्टन अमेरिका’ या पात्राचा बराच प्रभाव आहे. राज कॉमिक्सचं डोगा हे पात्र माझं सर्वाधिक आवडतं आहे. एकतर डोगाला झाकावा नि त्याला काढावा, असा एक सख्खा सोबती (alter ego) डोगाला आहे. डोगा हे पात्र बरंचसं खलनायकी छटा असलेलं आहे. अशाच गडद छटा असणाऱ्या बॅटमॅन या डीसी विश्वामधल्या नायकाचा त्याच्यावर प्रभाव दिसतो. ब्रूस वेनच्या पालकांची जशी एक शोकांतिका आहे, तशीच ती डोगाच्या पालकांचीपण आहे. दस्तुरखुद्द अनुराग कश्यपसारखा अवलिया दिग्दर्शक डोगा या पात्राच्या प्रेमात पडला होता. त्याने कुणाल कपूरला मध्यवर्ती भूमिकेत घेऊन डोगावर चित्रपट बनवण्याची तयारीपण दाखवली होती. पण निर्माते आणि राज कॉमिक्स यांच्यामध्ये स्वामित्व हक्कावरून काहीतरी वाद झाला आणि तोही प्रकल्प रखडला.
याखेरीज ‘टिंकल’, ‘मधू मुस्कान’, ‘लोटपोट’ यांसारखी हिंदी कॉमिक्सपण कमी-अधिक प्रमाणात लोकप्रिय आहेत.
मी वाचलेली मराठी कॉमिक्स आणि हिंदी कॉमिक्स यांच्यात तुलना करावीशी वाटते. एकूणच मराठी साहित्यामध्ये – काही सणसणीत सन्माननीय अपवाद वगळता – जो एक सांस्कृतिक बंदिस्तपणा आहे, तो मराठी कॉमिक्समध्येपण उतरला आहे. कॉमिक्स वाचणाऱ्या मुलांमध्ये एक वर्ग असाही असतो, जो पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर असतो. लैंगिक जाणिवा दिसू लागण्याचं (sexual awakening) ते वय म्हणता येईल. इंद्रजाल कॉमिक्सप्रमाणे किती कॉमिक्सनी आपल्या या वयाच्या वाचकांचा विचार केला आहे असा प्रश्न विचारला, तर फारसं समाधानकारक काही हाती लागत नाही. फास्टर फेणे हे भा. रा. भागवतांचं अजरामर पात्र खरंतर या पौगंडावस्थेतल्या वाचकांचा प्रतिनिधी असणारं पात्र. पण त्याच्या वयातल्या मुलांसाठी नैसर्गिक असणाऱ्या लैंगिक भावना फास्टर फेणेतही अनुपस्थित दिसतात. पांढरपेशा मराठी साहित्यात आणि काही तुरळक अपवाद वगळता मराठी चित्रपटांमध्येही त्या अनुपस्थित दिसतात. एक भाषिक समूह म्हणून सेक्सकडे किमान सार्वजनिकरीत्या तरी बघताना असलेली आपली तुच्छतेची, हेटाळणीची आणि ओंगळ दृष्टीच याला कारणीभूत असली पाहिजे. हिंदी कॉमिक्समधली पात्रं आणि मराठी कॉमिक्समधली पात्रं यांच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीमध्येही खूप फरक आहे. हिंदी कॉमिक्समधली पात्रं मध्यमवर्गीय-श्रीमंत-निम्नस्तरीय अशा सर्व आर्थिक स्तरांतली आणि 
लहानपणापासून संघर्ष करणारी असतात. डोगा आणि सुपर कमांडो ध्रुव यांच्यासारखे महानायक (superhero) तर लहानपणीच आपल्या पालकांना गमावून बसतात. याउलट मराठी कॉमिक्समधली बहुतेक पात्रं मध्यमवर्गीय, नीटनेटकं, सुरक्षित आयुष्य जगणारी असतात. त्यांच्या मर्यादित परीघात जे मर्यादित संघर्ष असतात, त्यांना ती तोंड देतात. एकूणच मराठी साहित्यावर बराच काळ वर्चस्व गाजवणाऱ्या मध्यमवर्गीय संस्कृतीचं प्रतिबिंब आपल्या कॉमिक्समध्येपण पडलेलं दिसतं. बालसाहित्य या शब्दामधलं ‘बाल’पण आपल्या लेखकांनी खूपच गंभीरपणे घेतलं असावं. असो.
हिंदी कॉमिक्स उद्योगाने भारतात एक अतिशय वैभवशाली काळ बघितला आहे. पण आता त्यांच्या उतरणीचा काळ सुरू झाला आहे 
हे नाकारता येत नाही. भारतात मोठ्या प्रमाणावर झालेला टीव्हीचा प्रसार हा एकूणच देशातल्या वाचनसंस्कृतीला मारक ठरला आहे. कॉमिक्सपण या तडाख्यातून वाचलेली नाहीत. लहान मुलांना हल्ली छापील कॉमिक्स वाचण्यापेक्षा टीव्हीवरची दृक्श्राव्य कार्टून्स बघण्यात जास्त रस आहे. टीव्हीचा हा प्रसार भारतातल्या सर्व वर्गांमध्ये आणि ग्रामीण-शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे कॉमिक्स वाचणारा एक मोठा वर्ग कॉमिक्सपासून दुरावला आहे. लहान मुलांमधलं व्हिडीओ गेमचं वाढतं आकर्षण हा घटकपण कॉमिक्सच्या विरोधात गेला आहे. कॉमिक्सचे जे एक ठरलेलं आर्थिक प्रारूप होतं, त्याला कागद आणि छपाई यांच्या वाढत्या किंमतीमुळे धक्का बसला. पायरसीने चित्रपटसृष्टीला जेवढा धक्का दिला, तेवढाच कॉमिक्स उद्योगालापण दिला. अगोदरच मर्यादित आर्थिक स्रोत असणाऱ्या कॉमिक्ससाठी पायरसी ही वाईट बातमी ठरली. त्यांनी बदलत्या भोवतालाशी जुळवून घेण्याचे प्रयत्न केले नाहीत असं नाही. इंद्रजाल कॉमिक्स ही किंडलवर वाचण्यासाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. राज कॉमिक्सनेपण स्वतःचं मोबाइल अ‍ॅप सुरू केलं आहे; पण एकूणच वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाच्या काळात हे प्रयत्न तोकडे पडत आहेत.  
एका मुलाखतीमध्ये एका पुस्तक विक्रेत्याने एक रोचक निरीक्षण नोंदवलं आहे. सध्या दुकानात येऊन कॉमिक्स विकत घेणारे लोक मुख्यतः पंचवीस ते पस्तीस वर्षं या वयोगटातले आहेत. हे लोक तेच आहेत, ज्यांचं बालपण कॉमिक्स वाचण्यात गेलं आहे. आपल्या नॉस्टॅल्जियाशी जोडून  राहण्याची ही धडपड असावी. नॉस्टॅल्जियामध्ये मोठी ताकद असते खरी. कारण या पिढीसाठी कॉमिक्स वाचणं ही एक आनंद देणारी गोष्ट होतीच, पण त्याशिवाय या कॉमिक्सची देवाणघेवाण करणं, त्यांच्यावरून भावांशी भांडणं करणं, त्यांतले स्टिकर्स कापून फ्रीजवर चिकटवणं ह्या गोष्टींशीपण या पिढीच्या आठवणी निगडित आहेत. त्यामुळे हिंदी कॉमिक्स संस्कृतीची ऱ्हासाकडे होणारी अटळ वाटचाल अस्वस्थ करून जाते हे अमान्य करण्यात अर्थ नाही.
– अमोल उद्गीरकर
चित्रस्रोत : आंतरजाल
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *