बालसाहित्यांक २०१७, बालसाहित्यांक २०१७ लेख

संपादकीय

आपल्या पुढच्या पिढीचा कोवळेपणा लोपावा आणि त्यांनी आपल्या खांद्यावरच्या पाटाची जबाबदारी त्यांच्या कणखर खांद्यावर घ्यावी असं आपल्या सगळ्यांनाच पोटातून वाटत असतं. पण त्याचबरोबर ‘अजून थोडेच दिवस… पोरपण भोगू दे त्यांना. मग आहेतच करायचे आयुष्याशी दोन हात…’ असा जीव कळवळतही असतो. आयुष्याच्या अपरूपापासून पोरांना जपलं पाहिजे. त्यांनी भलत्या वयात भलत्या गोष्टी पाहून हबकू नये, उतूमातू नये, वाकड्या वाटेला जाऊ नये; म्हणून त्यांनी शाळेत असताना ‘वासूनाका’ वाचू नये, असं वाटत असतं. पण कोंबडं टोपलीखाली झाकलं तरी उगवायचं राहत नाहीच. त्यांना वास्तवाची जाणीव वेळेवर झालेली बरी. म्हणून त्यांनी ‘पाडस’ वाचावं असंही वाटत असतं.
दोन्ही भावनांची रूपं तितकीच अस्सल, तितकीच बरोबर. म्हणूनच बालवाङ्मयाची व्याख्या करणं मोठं कर्मकठीण.
काय असतं बालवाङ्मय म्हणजे? पर्‍या, राक्षस, जादू, राजपुत्र, राण्या, साहसी सफरी आणि रोमांचकारी लढाया? तात्पर्य, सुसंस्कार, धाकदपटशा, उपदेश, बोधामृत? निरनिराळ्या साहित्यप्रकारांशी आणि चित्रशैलींची आणि भाषालकबींशी आणि एकुणातच आपल्या भवतालातल्या समग्र वैविध्याची करून दिलेली तोंडओळख? सेक्स आणि हिंसा आणि भेदभाव यांचा निपटारा करून समोर रेखाटलेलं गोग्गोड सौंदर्यचित्र?
हे थोडंसं आंधळ्यांनी पाहिलेल्या हत्तीसारखं आहे. हे सगळं म्हणजे बालवाङ्मय आहे आणि नाहीही. काही केल्या शब्दाच्या चिमटीत पकडता न येणारी ही गोष्ट आपल्याला बिचकवते, गोंधळात पाडते. म्हणूनच बालवाङ्मय म्हणताक्षणी आखीव-रेखीव शब्दांचे आणि अपेक्षांचे रकाने बांधून त्यात आपण बालवाङ्मय कोंबू पाहतो. शक्य तितकी रंगीत, ठसठशीत, बेतीव गोलाई दिलेली चित्रं; जोडाक्षरविरहित शब्द आणि लहान-लहान वाक्यं; ढोबळा-ढुबरा मोठासा टंक आणि गुळगुळीत जाडसर कागदावरची छपाई – या सगळ्या घटकांचं गाठोडं बांधून आपण त्याला बालवाङ्मय म्हणू पाहतो. काही काळ त्यानं आपल्याला स्थिरही वाटतं. पण मग ‘शारदा संगीत’सारखं किंवा ‘शाळा’सारखं एखादं पुस्तक येतं आणि आपले रकाने बघता-बघता उद्ध्वस्त होतात. हे बालवाङ्मय आहे की नाही – असल्या प्रश्नांवर पुन्हा नव्यानं चर्चा झडतात.
हे थोडं गमतीदार – काहीसं निरर्थक असलं, तरी एका अर्थानं ते आश्वासकही आहे. आपल्या पुढच्या पिढीला आपण जे काही देऊ करत असतो, त्याचा मोठाच भाग हा साहित्याचा असतो. ते आपण आपल्या भोवतालाच्या इतिहास-वर्तमान-भविष्याचं आपल्या नजरेतून रेखाटलेलं चित्र असतं, तो एका प्रकारे अत्यावश्यक असा जगण्याचा नकाशाच असतो. तो वाचायला शिकायचं असेल, तर बालसाहित्य ही त्या वाटेवरची पहिलीवहिली धूळपावलं असतात. त्यांच्याबद्दल इतक्या चर्चा झडणं, वाचनसंस्कृती नामक गोष्टीबद्दल काहीएक आस्था वाटणं, त्यावरून ‘एकूणच परिस्थिती वाईट आहे’ अशा प्रकारच्या चिंता व्यक्त केल्या जाणं; बदलत्या माध्यमांचा वापर करून वाचनसंस्कृती जिवंत ठेवायला पाहणं – हे आपल्या जागत्या मनाचंच लक्षण आहे आणि म्हणूनच ते आश्वासकही आहे.
पण सध्या खरोखरच या चर्चांमध्ये काही जीव आहे का? जगातली एक महत्त्वाची भाषा बोलणारा समाज म्हणून आपण बालसाहित्य या पायाभूत गोष्टीबद्दल किती जागरूक उरलो आहोत? त्यांच्या निर्मितिमूल्यांच्या वरवरच्या समृद्धीतच आपण रुतून बसलो आहोत की मुलांच्या डोक्यात नक्की कोणती चित्रं रेखाटली जावीत त्याबद्दलच्या काही सखोल-जबाबदार कल्पना आपल्यापाशी आहेत? आपली मुलं आपल्या भाषेतली पुस्तकं वाचताहेत का? त्यांना ती वाचावीशी वाटावीत, इतकी समकालीन-उत्कंठावर्धक-सखोल पुस्तकं आपण त्यांच्यासाठी तयार करतो आहोत का? माध्यमविस्फोटालाही सहजी पायाखाली घेणार्‍या या पिढीला, या अशा एका प्रादेशिक भाषेपुरत्या मर्यादित असलेल्या आणि उघडपणे संवादी नसलेल्या कागदी माध्यमातल्या साहित्याची खरोखर आवश्यकता तरी भासतेय का? की आपल्या स्मरणरंजनाचं ओझं तेवढं आपण त्यांच्यावर लादू पाहतो आहोत? की पोरांना झपाट्यानं मोठं करत सुटलेल्या आजच्या वेगवान आयुष्यात बालवाङ्मय ही फक्त रोमँटिक कविकल्पना म्हणून उरली आहे?
अनेक प्रश्न. सगळ्यांचीच उत्तरं मिळाली असं नाही, पण अनेक प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न मात्र या विशेषांकातून करतो आहोत. तुम्ही तुमच्या लहानपणी पाहिलेल्या चित्रातले रंग जर तुमच्या डोक्यात आजही ताजे असतील; एखाद्या अनामिक पुस्तकानं जर तुमच्या आयुष्याला अनोखं वळण दिलं असेल; झपाट्यानं देशोदेशींच्या सीमारेषा पुसत चाललेल्या आणि त्याच वेळी अस्मितांच्या तितक्याच कट्टर सीमारेषा आखत चाललेल्या आजच्या इंग्रजीबहुल वास्तवात तुमच्या पोराला जुन्या जगामधलं, त्याच्या मातृभाषेमधलं पुस्तक हे महत्त्वाचं साधन पुरवावं असं तुम्हांला मनापासून वाटून गेलं असेल – तर तुम्हीही आमचे वाचक आहात.
वाचा, आणि मोकळेपणानं प्रतिसादा. कुणी सांगावं, माध्यमांच्या या महापुरात, ही लव्हाळी वाचतील आणि वाचतीलही…
– मेघना भुस्कुटे
Facebook Comments

2 thoughts on “संपादकीय”

 1. This message is posted here using XRumer + XEvil 4.0

  XEvil 4.0 is a revolutionary application that can break any antibot captcha.
  Captcha Solution Google (ReCaptcha-1, ReCaptcha-2), Facebook, BING, Hotmail, Yahoo,
  Yandex, VKontakte, Captcha Com – and over 8400 other types!

  You read this – it means it works! 😉
  Details on the official website of XEvil, there is a free demo version.

  Check YouTube video “XEvil ReCaptcha2”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *