बालसाहित्यांक २०१७ लेख

प्रश्नांचं मोहोळ

भाग १भाग २ । भाग ३

पण हे सगळं का करायचं?

या सर्वेक्षणातून (आणि ‘रेषेवरची अक्षरे’च्या बालसाहित्याला वाहिलेल्या या संपूर्ण अंकातून) काही थेट प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. विशेषत: शहरी पालकांना आणि मुलांना.
आजच्या पिढीतली मुलं ‘मराठी बालसाहित्य’ या प्रकारात मोडणारं साहित्य वाचतात का?
आधल्या भागात आपण पाहिलं, की मुलं वाचतात. वयोपरत्वे वाचन कमीजास्त होत असेल, पण वाचतात हे नक्की. प्रामुख्याने ललित वाचतात. हेही पाहिलं, की मुलांचा कल हा इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाकडे जास्त आहे. त्याची कारणं अनेक असतील: त्यांच्या शालेय शिक्षणाचं माध्यम इंग्रजी आहे. इंग्रजीमध्ये प्रत्येक वयोगटासाठीच्या बालसाहित्याची मोठी समृद्ध दालनं आहेत.
त्या तुलनेत मराठी बालसाहित्य तोकडं पडतं आहे, हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नाही.
पण मराठी बालसाहित्य न वाचल्याने मुलांचं काही बिघडतं आहे का? सर्वेक्षणामध्ये याचं थेट उत्तर नाही सापडणार. पण सर्वेक्षणाच्या काही कंगोऱ्यांवरून यावर भाष्य करता येईल.
शहरी भागातल्या मुलांचं इंग्रजी वाचन वाढतं आहे. जागतिक बालसाहित्य वाचनात येत आहे. अजूनही पारंपरिक कागदी पुस्तकांकडे कल असला, तरी तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढतो आहे. ऑडियो बुक्ससारखे पर्याय समोर येताहेत. आजच्या मुलांना जगाकडे पाहण्याचे पुष्कळ पर्याय उपलब्ध आहेत.
मुलांना पुस्तकं का वाचावीशी वाटावीत याची मुख्य कारणं रंजन आणि ज्ञानसाधन ही आहेत असं समजू. या दोन्हीसाठी वेगवेगळे पर्याय – विशेषत: दृश्यमाध्यमांत – उपलब्ध होत आहेत. अव्याहत चालणार्‍या कार्टून वाहिन्या आहेत, आंतरजाल उपलब्ध असणार्‍यांसाठी यूट्युब, नेटफ्लिक्स आहेत. अगदी दर्जाचं भान ठेवायचं म्हटलं, तरी पर्यायांचा समुद्र आटत नाही. लहान मुलांसाठी असलेल्या सिंड्रेलाच्या ॲनिमेटेड चित्रपटापासून ते टीनएजर्ससाठीच्या ‘थर्टीन रीझन्स व्हाय’ या प्रगल्भ मालिकेपर्यंत सगळं उपलब्ध आहे. (किंवा थोड्या प्रयत्नांती होऊ शकतं.)
यात मराठी बालसाहित्य कुठे आहे?
शहरी पालक मुलाने ‘मराठीच्च वाचावं’ अशी सक्ती करताना सहसा दिसत नाहीत. किंबहुना तशी सक्ती ते करूच शकत नाहीत, कारण मुलंच त्यांना फाट्यावर मारतील. मुलांच्या सर्जनशील विकासाला जे लागतं, ते सगळं उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मात्र पालकांची आहे. ते मराठी असावं अशी अपेक्षा आजच्या मुलांची नाही, पालकांचीही नाही.
पालकांच्या बालवयात परिस्थिती कदाचित वेगळी होती. बालसाहित्य लिहिणारे लेखक होते, नियतकालिकं होती. त्या खुराकावर आजचे पालक मोठे झाले. मराठी साहित्याशी नाळ जोडून ठेवायला कदाचित तत्कालीन बालसाहित्याची गुटी उपयोगी पडली असेल. आता हा आग्रह धरण्यात काही अर्थ नाही.
मग मराठी बालसाहित्यासाठी आपण गळा का काढायचा?
तर नाहीच काढायचा!
’मातृभाषेतून शिक्षण’ या आग्रहाचा काय बोजवारा उडाला आहे आपण पाहतोच आहोत. मग मातृभाषेतलं बालसाहित्य यालादेखील काय अर्थ आहे? ‘मातृभाषा’ या संकल्पनेचा परीघ विस्तारताना आपण पाहतो आहोत. महाराष्ट्रातल्या शहरी भागात आज किमान तीन भाषा तरी मुलांच्या कानी पडतात, आणि त्या मिश्रणातून तयार झालेली चौथी भाषा वेगळीच. (महाराष्ट्राबाहेरच्या शहरात वाढणारं मूल आणखीही वेगळ्या भाषांत पारंगत होईल. सर्वेक्षणाला उत्तर देणार्‍या, हेलसिंकीत राहणार्‍या एका मुलाला मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषांबरोबरच फिनिश भाषा येते. अगदी त्या भाषेतली पुस्तकंही वाचण्याएवढी अस्खलित येते.)
जगभर उत्तमोत्तम बालसाहित्य निर्माण होतं आहे. तंत्रज्ञानाच्या कृपेने ते मिळवणं आवाक्यात आलं आहे. कोणतेही स्मरणरंजनी कढ न काढता त्याचा आस्वाद घेत राहणं हे योग्य.
– आदूबाळ
aadubaal@gmail.com

***

Facebook Comments

2 thoughts on “प्रश्नांचं मोहोळ”

 1. उत्तम समारोप! या फार महत्वाच्या कामाबद्दल आभार!

 2. अरे वा ! मनासारखे निष्कर्ष काढून मोकळे झालात की
  तीन मुद्दे पटले नाहीत

  १. मुलांनी इंग्रजी साहित्य जरूर वाचावे पण दहा इंग्रजी पुस्तकांच्या मागे एकतरी मराठी वाचायला नको का
  वाचतात मुलं, पण पालकच तुमच्यासारखे निष्कर्ष काढतात मग काय करणार
  ते जर पालकांना फाट्यावर मारत असतील तर तो दोष पालकांचा

  २. मातृभाषेतील शिक्षणाचा काय बोजवारा उडाला कळू शकेल का ?
  मी बरेच नावाजलेले कॉन्व्हेंट असे पाहिलेले आहेत जिथे शिक्षणाचा दर्जा ( infrastructure चा नव्हे ) अतिसामान्य आहे, याउलट अतिशय दर्जेदार शिक्षण देणाऱ्या, मुलांवर संस्कार करणाऱ्या ( अन तेही फुकट ) मराठी शाळाही अजून आहेत
  त्यात semi english माध्यमही असतं ज्यात गणित विज्ञान इंग्रजीत असतं
  मातृभाषेतून बालसाहित्य यातही तुम्हाला अर्थ दिसत नाही. म्हणजे साने गुरुजींच्या लिखाणाला ही तुमच्या अर्थ नसेल

  ३. मुलांना ललित जास्त आवडतं याबाबतही मी साशंक आहे.
  ललित मुलांना जास्त आवडतं की पालकांना ? कारण ते जे माथी मारतील तेच मुलांना वाचावं लागतं
  ( मुलाने हट्ट केल्यास गोष्ट वेगळी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *