बालसाहित्यांक २०१७ लेख

प्रश्नांचं मोहोळ

भाग १ । भाग २ । भाग ३
काही महत्त्वाची निरीक्षणं
दोन्ही सर्वेक्षणांतून चिक्कार विदा निर्माण झाला. आधी लिहिल्याप्रमाणे पालक आणि पाल्यं या दोघांनाही जवळजवळ सारखेच प्रश्न विचारले होते. या भागात त्यांची उत्तरं शेजारीशेजारी ठेवून पाहू या.
। १ ।
मराठी माणसाचं वाचन नेमकं आहे तरी किती, या सोप्या प्रश्नापासून सुरुवात करू या.
म्हणजे – पाल्यं वाचत नाहीत या तक्रारीत किती तथ्य आहे हे लक्ष्यात येईलच. सातापेक्षा जास्त पुस्तकं वाचणार्‍या पाल्यांची टक्केवारी ५०% आहे, तर पालकांची ३५%. त्यामुळे, ‘आजची तरुण पिढी वाचत नाही हो!’ हे विधान आजच्या मध्यमवयीन पिढीच्या तुलनेत तरी चूक आहे.
अर्थात, वरचा आलेख केवळ संख्या दर्शवतो. दर्जा ही गोष्ट सापेक्ष आहे असं जरी मानलं, तरी ‘पाडस’ वाचणे आणि ‘टिंकल’ वाचणे यात गुणात्मक फरक आहे हे नाकारून चालणार नाही. (तसाच गुणात्मक फरक पालकांच्या वाचनातही असू शकतो. या सगळ्या गुणात्मक तुलना प्रश्नावलीतून होतीलच असं नाही.) तसंच, पालकांचं वाचन कमी असण्याची अनेक कारणं आहेत. प्रौढांची पुस्तकं मोठी (पृष्ठसंख्येच्या हिशोबात) असतात, आशयाच्या दृष्टीनेही जास्त ‘जड’ असतात. बालसाहित्याच्या तुलनेत ती वाचायला जास्त वेळ लागतो हेही खरं आहे.
‘मुलं वाचत नाहीत’ ही तक्रार करण्यात अर्थ नाही, हा मुद्दा तरीही उरतोच.
। २ ।
पाल्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या वयांत वाचनाचं प्रमाण कसं आहे ते पाहू:
साधारणत: वय वर्षे ७ ते १२ या काळात वाचनाचं प्रमाण भरपूर आहे. पुढे टीनएजमध्ये ते प्रमाण अचानक घसरतं, आणि टीनएज संपताना परत पूर्वपदावर येतं. आता ही सर्वेक्षणाची मर्यादाही असू शकेल, पण टीनएजमध्ये असं नेमकं काय होत असावं की पुस्तकवाचन खालावावं?
त्याची अनेक कारणं असू शकतात.
पहिलं म्हणजे वय वर्षे ७ ते १२ या काळात पालक पुस्तकं आणून देतात, आणि पाल्यं ती पुस्तकं वाचताहेत की नाही यावर नीट लक्ष्य ठेवतात. या वयात मोबाईल आणि समाजमाध्यमं यांचा प्रभाव जरा कमी असतो. पुस्तकंही लहानशी असतात (त्यामुळे आकडा जास्त दिसत असेल!) याउलट टीनएजमध्ये – सुप्रसिद्ध वाक्प्रचार वापरायचा तर ‘शिंगं फुटलेली’ असतात. समाजमाध्यमं प्रभाव टाकत असतात, इतर पौगंडसुलभ गोष्टी साद घालत असतात. त्यात मग पुस्तकं कोण वाचणार!
शिवाय, किमान मराठीत तरी टीनएज वाचकांना भावतील अशी ‘यंग ॲडल्ट’ प्रकारच्या पुस्तकांची अनुपस्थिती जाणवते. (चटकन आठवलेला अपवाद – भा० रा० भागवतांची ‘छगन सांगू लागतो’ आणि ‘छगनचे चर्‍हाट चालूच’ ही दोन पुस्तकं.)
कदाचित हे सरसकटीकरण असू शकेल, किंवा हवेत केलेलं विधानही. माहीत नाही.  
। ३ ।
या निमित्ताने कोणत्या भाषेतली पुस्तकं वाचली जाताहेत हे पाहू. ज्या भाषेत वाचन केलं जातं, तिचा शाळाशिक्षणाच्या माध्यमाशी संबंध आहे का, हाही प्रश्न विचारण्याजोगा आहे.
इंग्रजी वाचनाकडे पाहिलं तर फारच रोचक निष्कर्ष निघतो आहे. इंग्रजी माध्यमातून शाळाशिक्षण घेणार्‍यांची संख्या कमी असूनही इंग्रजी वाचनाकडे मात्र जोरदार कल आहे. अर्थात, जवळजवळ सगळं उच्चशिक्षण इंग्रजी माध्यमातूनच होत असल्याने त्यात नवलही काही नाही.
मराठी वाचनाबद्दल मात्र पाल्यांच्या बाजूला चिंताजनक परिस्थिती आहे. पालकांच्या बाबतीत सरसकट विधान करायचं झालं, तर वाचन हे प्रामुख्याने मराठीतून आणि उरलेलं इंग्रजीतून होतं. पाल्यांच्या बाबतीत मात्र हे नेमकं उलटं आहे. पण इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली चौपट वाढ हे त्याचं कारण नक्कीच असू शकेल.
। ४ ।
हल्ली कोणत्याही पुस्तकप्रदर्शनात गेलं की ‘माहितीपर पुस्तकं’ हा सर्वात मोठा विभाग असल्याचं जाणवतं. त्या खालोखाल कथा-कादंबर्‍या. पण वाचकांच्या सवयी या आडाख्याशी सुसंगत आहेत का?
पालक आणि पाल्यं, दोन्ही गटांत ललित साहित्याच्या (कथा, कादंबर्‍या, कविता) वाचनाकडे स्पष्ट कल जाणवतो. माणसाला गोष्टी सांगितलेल्या आवडतात (असं निरीक्षण ‘सेपियन्स’ या गाजत असलेल्या अललित पुस्तकाचा लेखक युवाल नोह हरारीदेखील नोंदवतो.)
आंतरजालावर जे लेखन येतं ते वाचणार्‍या वर्गात प्रामुख्याने पालकांचा भरणा आहे. कदाचित पाल्यांना आवडेल असं आंतरजालावर लिहिलं जात नसावं. (मराठी आंतरजालावर तर नक्कीच लिहिलं जात नाही.)
या आंतरजालीय लेखनाचा आणि इतर पारंपरिक ललित लेखनाचा वाचकवर्ग एकच आहे का हे शोधण्याचाही प्रयत्न केला. जरा वेगळ्या शब्दांत प्रश्न मांडायचा, तर जो वाचक पारंपरिक कथा वाचेल तोच वाचक आंतरजालीय कथा वाचेल का? तर हे दोन गट पाडून त्यातले परस्परसंबंध (correlation) तपासले. याचा ‘परस्परसंबंध निर्देशांक’ (correlation coefficient) -०.२११ आहे. संख्याशास्त्रानुसार हा परस्परसंबंध व्यस्त आहे, पण अत्यंत तकलादू आहे (weak negative correlation). सोप्या शब्दांत – पारंपरिक वाचन आणि आंतरजालावरचं वाचन असं दोन्ही असणारा गट लहान आहे. एका अर्थी ही वाचकवर्गाची फाळणी आहे.
आंतरजालावर प्रसिद्ध असलेल्या अनेक लेखकांना / अंकांना साहित्याच्या मुख्यधारेत वेशीबाहेरचं स्थान असतं याला कारणीभूत ही फाळणी असावी!
। ५ ।
कोणत्या प्रकारचं वाचन हे वाचनाच्या साधनावरही अवलंबून आहे. उण्यापुर्‍या दहा वर्षांपूर्वी ‘कागदी पुस्तक’ हे वाचनाचं एकमेव साधन सहजप्राप्य होतं. संगणकाशी आणि आंतरजालाशी संबंध येणार्‍यांना मराठी संकेतस्थळं (मायबोली, मिसळपाव, वगैरे) हाही एक पर्याय होता. पण गेल्या काही वर्षांत मोबाईल, टॅब्लेट्स किंवा किंडलसारख्या इ-रीडर्सनी मोठी मजल मारली आहे. तंत्रज्ञानातल्या या प्रगतीचा वाचनसवयीवर कसा परिणाम झाला आहे?
कागदी पुस्तकांना अजूनही पर्याय नाही असं एकंदरीत चित्र दिसतं आहे. नव्या तंत्रज्ञानाशी पालकांनी चटकन जुळवून घेतल्याचं चित्र दिसतं आहे. सामान्यत: नव्या तंत्रज्ञानाला नवी पिढी प्रथम आपलंसं करते असं चित्र असतं. मग इथेच वेगळं का असावं?
कदाचित पाल्यांना रुचतील अशी पुस्तकं (बालसाहित्य) अजून पारंपरिक कागदी पुस्तकांच्या बाहेर पडलं नसावीत. कदाचित पुस्तक वाचण्यासाठी जेवढा सलग वेळ लागतो, तेवढा वेळ पाल्यांना मोबाईल/ टॅब्लेट/ किंडल ही आयुधं वापरू दिली जात नसावीत. अर्थात या सर्व शक्यता आहेत – उपलब्ध विद्यावरून यासंबंधी कोणतंही ठोस विधान करता येत नाही.
नव्या पिढीच्या बाबतीत ऑडियो बुक्सचा वाढता प्रभाव जाणवतो आहे.
। ६ ।
मग प्रश्न असा निर्माण होतो, की पाल्यं (आणि पालकही) वाचण्यासाठी पुस्तकं नेमकी कुठून मिळवतात?
अजूनही, पुस्तकं विकत घेऊन वाचणार्‍यांची संख्याच जास्त आहे. (किंडलवर वाचणारे बहुदा इ-कॉपी विकत घेत असावेत.) त्याखालोखाल ग्रंथालयांतून मिळवणार्‍यांची. हेही पुस्तकं मिळवण्याचे तसे पारंपरिक मार्गच आहेत. किंबहुना, फुकट डाऊनलोड करणार्‍यांची संख्या एवढी कमी असल्याचं पाहून, नाही म्हटलं तरी जरा धक्का बसला.
पुस्तकं विकत घेण्यावरून एक महत्त्वाचं निरीक्षण इथे मांडायचं आहे. अंकात अन्यत्र मराठी बालसाहित्याच्या दुबळ्या आर्थिक – व्यावसायिक बाजूंकडे चंद्रमोहन कुलकर्णींसारख्या लोकांनी लक्ष्य वेधलं आहे. इथे या सर्वेक्षणात तर असं दिसतं, की वाचकांची पसंती पुस्तकं विकत घेण्याला आहे. तिथे प्रकाशक ‘आवृत्ती खपत नाही’ अशी तक्रार करताहेत.
दोन्ही बाजूंची सांगड घालायची तर असं विधान करता येईल, की वाचकांनी पुस्तक विकत घेण्याला पसंती देऊनही विक्री पुरेशी होत नाही. याचा अर्थ पुस्तक विकत घेणारे वाचक मुळातच संख्येने कमी आहेत. (आणि तेच नेमके आमच्या सर्वेक्षणात सापडले आहेत!) मराठी वाचनाकडे असणारा पाल्यांचा कल हळूहळू विरुद्ध दिशेला झुकू लागल्याचं आपण याच लेखात आधी पाहिलंच. ग्राहकसंख्याबळ अपुरं पडायचं हे कारण आहे.
। ७ ।
पुस्तकांवर खर्च केले जाणारे पैसे हाही महत्त्वाचा घटक आहे.
जवळजवळ ५५% लोकांनी गेल्या १२ महिन्यांत रु. ३००० पेक्षा कमी खर्च पुस्तकांवर केला. म्हणजे महिन्याकाठी रु. २५० पेक्षा कमी. हे सर्वेक्षण शहरी लोकांचं आहे हे लक्ष्यात घ्या. शहरात महिना रु. २५० हे नेमकं कसलं बजेट आहे हे वाचकांनी आपल्या मनाशी ताडून पहावं, म्हणजे ग्रंथव्यवहाराची आर्थिक बाजू लंगडी का हे लक्ष्यात येईल.
। ८ ।
बालसाहित्याबद्दल विचार करताना एक कळीचा मुद्दा असतो तो माध्यमांतल्या परस्परभक्षणाचा. एखादं पुस्तक लिहिलं जातं, ते गाजतं. मग त्याचं माध्यमांतर होऊन त्यावर चित्रपट येतो, नाटक बनतं, मालिका प्रसारित होते, इ. पुस्तकांच्या तुलनेत ही इतर दृश्यमाध्यमं ‘पचायला’ सोपी असतात. (आणि लहान मुलांसाठीची माध्यमांतरं तर तशी असावीतच असं कटाक्षाने सांभाळलं जातं.) मुळात पुस्तकापासून सुरू झालेल्या त्या कथेचा घास इतर माध्यमं गिळून टाकतात. मग अशा स्थितीत मूळ पुस्तकं कोणी वाचतं का? पुस्तकांतून असा काही अनुभव मिळतो का, जो इतर माध्यमं देऊ शकत नाहीत?
हे शोधण्यासाठी आम्ही खालील प्रश्न विचारला:
पाल्यांच्या गटात पुस्तकं जास्त आवडणारे पालकांच्या गटापेक्षा सुमारे १०% जास्त आहेत. ‘मुलं वाचत नाहीत’ या तक्रारीवर आणखी एक हल्ला.
। ९ ।
वाचन हे बहुतांशी परप्रकाशी असतं. कोणीतरी सांगतं पुस्तक छान आहे, आपण वाचतो. हल्ली हे काम करणारी ‘गुडरीड्स‘सारखी संकेतस्थळं आहेत, पण मोठ्ठा प्रभावगट असतो तो मैत्रांच्या वर्तुळाचा.
या बाबतीत पाल्यगटात ही देवाणघेवाण कमी होते आहे असं दिसतंय. पण याचं कारण काय असावं याबद्दल ठोस निष्कर्ष नाही काढता येत.
। १० ।
…आणि सगळ्यांत शेवटी, सर्वांत महत्त्वाचा मुद्दा उरतो, तो म्हणजे पालक आणि पाल्यं यांच्या नजरेतून एकमेकांचं वाचन तपासण्याचा.
भरपूर वाचणारे पाल्य आपण पाहिले, आणि त्यांना वाटतं आपले पालकही भरपूर वाचतात!
पण…
पालक मात्र जास्त बचावात्मक पवित्रा घेऊन आहेत. कदाचित परिस्थितीची खरी जाणीव त्यांना असेल.
। विरामटीप ।
सर्वेक्षणाच्या विद्यातून निघालेले बहुविध निष्कर्ष आपण पाहिले. जमा झालेला विदा खूप मोठा आहे. मराठी बालसाहित्य, त्यातले बदल आणि आणखी व्यापक बघायचं झालं तर मराठी वाचनसंस्कृती यांचे बरेच पदर त्या विद्याच्या आणखी विश्लेषणातून उलगडू शकतील. (त्या विश्लेषणाच्या संभाव्य दिशांविषयी पहिल्या भागात लिहिलं होतं.) पण इथे विस्ताराचं भय आहे आणि माझ्या आकलनाला मर्यादा. त्यामुळे इथेच विराम घेतो.
भाग ३
– आदूबाळ
aadubaal@gmail.com

***

Facebook Comments

5 thoughts on “प्रश्नांचं मोहोळ”

 1. भाग १ आवडला. भाग २ वाचतोय ..पूर्ण लेख वाचलेला नाही, वाचेन तसतसं लिहेन:
  तूर्तास:
  पहिल्या दोन प्रश्नाचं विश्लेषण भारी.. फक्त,
  >>प्रौढांची पुस्तकं मोठी (पृष्ठसंख्येच्या हिशोबात) असतात, आशयाच्या दृष्टीनेही जास्त ‘जड’ असतात. <<
  यातील पृष्ठसंख्या जास्त असते हे मान्य मात्र ती त्यांच्या त्यांच्या आकालांशक्तीच्या मानाने 'जड' असतात हे साफ अमान्य. (काही लोकप्रिय वैगरे लेखक मुद्दाम शैली म्हणून किंवा थोर्वीच्या कल्पनांच्या आड जड लिहितात त्यांना वगळूयात 😉 )

  1. >वाचकांनी पुस्तक विकत घेण्याला पसंती देऊनही विक्री पुरेशी होत नाही. याचा अर्थ पुस्तक विकत घेणारे वाचक मुळातच संख्येने कमी आहेत. <

   अशीही शक्यता आहे की पुस्तक विकत तर घ्यायची आहेत पण विकत घेण्याइतकी चांगली पुस्तक लिहिलीच जात नाहीयेत, किंवा लिहिली तर त्याबद्दल पुरेशी (व अचूक माध्यमांतून) जाहीरात होत नाहीये किंवा विकत घेण्यासाठी प्रकाशकांनी वितरण व्यवस्था भिकार आहे.

   रुचिरा, वेगवेगळी पंचांग, आरती संग्रह, आयुर्वेदिक उपचार शिकवणारी पुस्तकं, आणि गर्भसंस्काराची विक्री बघता विकत घेणारे कमी आहेत हा दावा कसा पटवून घ्यावा? 😉

   1. रुचिरा, पंचांग, आरतीसंग्रह, आयुर्वेद आणि गर्भसंस्कार या पुस्तकांचा ग्राहक आणि थेट उपयुक्तता नसलेल्या पुस्तकांचा ग्राहक एकच नाही. त्यामुळे त्या प्रकारच्या विक्रीची आकडे इथे गैरलागू. पण संग्राह्य पुस्तकं मुळातच कमी निघताहेत वा वाचकापर्यंत पोचत नाहीयेत या दोन्ही शक्यता मात्र आहेतच.
    ‘रेरे’च्या 2015च्या अंकात कोपर्डेकर नामक प्रकाशकांनी नोंदल्याप्रमाणे लोकांकडे बर्‍यापैकी पैसे आहेत, त्यांना ते ‘क्लासिक’ मानल्या गेलेल्या साहित्यावर खर्चही करायचे आहेत, पण पुस्तकंच निघत नाहीत वा पोचत नाहीत त्यांच्यापर्यंत. ग्राहक कुठल्या भागात राहतो, त्याला कोणत्या प्रकारचं साहित्य हवं आहे (होय, उपयुक्तता नसलेल्या साहित्यातही प्रकार आहेत. गोनीदा वाचणारा माणूस डोंगरे विकत घेणार नाही 99 टक्के वेळा.), त्याची किती पैसे खर्चायची तयारी आहे आणि त्याची तयारी प्रकाशकापर्यंत पोचायचे काही मार्ग आहेत का… अशा अनेक प्रश्नांपाशी हे घोडं अडत असू शकतं.

 2. सर्वेक्षणाची संकल्पना आणि निष्कर्षांची मांडणी खूप आवडली. उत्तम लेखाबद्दल अभिनंदन, आदूबाळ व ’रे..रे’ चमू!
  पुस्तक/वाचनसाहित्याच्या अर्थकारणाशी संबंधित विदा आणि टिप्पणी मौलिक वाटली.
  तिसर्‍या (कुठल्या भाषेतली पुस्तकं वाचता) प्रश्नातला पाल्यांबद्दलचा विदा मी उलट्या बाजूनं बघितला. (सर्व पाल्यांनी सर्व प्रश्नांना प्रतिसाद दिलाय असं गृहीत धरून) ६८ पाल्यांचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालंय, आणि ७८ पाल्यं मराठी पुस्तकं वाचतात – म्हणजे अन्य भाषिक शिक्षणमाध्यम असलेल्या ५६ पाल्यांपैकी १० जण मराठी पुस्तकंसुद्धा वाचतात. हे जवळपास १८ % प्रमाण झालं…जे माझ्या अंदाजापेक्षा बरंच जास्त आहे, आणि आशादायकही!
  एक शंका: प्रश्न ४ आणि ५ मध्ये ’काहीही वाचत नाही’ याच्या उत्तराची टक्केवारी ही प्रश्न ६ मधल्या ’काहीही वाचत नाही’च्या टक्केवारीशी का जुळत नाहीये?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *