बालसाहित्यांक २०१७ लेख

प्रश्नांचं मोहोळ

भाग १ । भाग २भाग ३
भूमिका आणि मर्यादा
मराठी बालसाहित्यात गेल्या तीसेक वर्षांत झालेले बदल टिपायचा हेतू मनी धरून ‘बदलतं मराठी बालसाहित्य’ या विषयावर विशेषांक काढायचं ‘रेषेवरची अक्षरे’ने ठरवलं. समाजातले बदल टिपायचे दोन सर्वमान्य मार्ग असतात. पहिला म्हणजे या विषयांतल्या तज्ज्ञ मंडळींना लिहितं करून त्यांच्या नजरेतून हे बदल टिपायचे. अंकात अन्यत्र हे केलं आहेच. पण दुसरा, तुलनेने अनवट मार्ग, म्हणजे सर्वसामान्य वाचकांना हे बदल कसे दिसले, जाणवले हे टिपणं.
या दुसर्‍या मार्गाने बदल टिपण्याचा आणखी एक फायदा आहे. बालसाहित्य या विषयातली तज्ज्ञ मंडळी काही ना काही मार्गाने बालसाहित्याच्या निर्मितीशी निगडित असणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे, अर्थशास्त्राच्या भाषेत हे सगळं विश्लेषण ‘पुरवठा बाजू’ला कललं असतं (supply side bias). पण बालसाहित्य पुरवणार्‍यांइतकेच, किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचे घटक म्हणजे खुद्द वाचक. त्यांचा आवाज या अंकात असणं आम्हांला संपादक म्हणून महत्त्वाचं वाटलं, म्हणून हा सगळा प्रपंच.
वाचकांचा आवाज मिळवण्यासाठीही दोन मार्ग होते. पहिला आणि तुलनेने सोपा मार्ग म्हणजे आमच्या आकलनानुसार ‘प्रातिनिधिक वाचक’ शोधायचे, आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या. पण ‘प्रातिनिधिक वाचक’ म्हणजे कोण हा प्रश्न राहतोच. (शिवाय आमचं आकलन किती – हाही; पण ते एक असो.)
दुसरा मार्ग म्हणजे सर्वेक्षण करायचं. व्यक्तीपेक्षा समष्टीला भिडणारा हा मार्ग जास्त आकर्षक वाटला.
अगदी पाचेक वर्षांपूर्वीपर्यंत सर्वेक्षण हाती घेणे हा अंगावर काटा आणणारा अवघड प्रकार होता. पण हल्ली श्रीगूगलकृपेने ज्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत, त्यांत ‘गूगल फॉर्म्स’ या जादूद्वारे सर्वेक्षणंही सोपी झाली आहेत. त्याचा विदा (data) नीट व्यवस्थित मिळत असल्याने विश्लेषण करणंही सोपं झालं आहे. तर सर्वेक्षण करायचं ठरवलं.
प्रश्नावली तयार करताना अनेक गोष्टी स्पष्ट होत गेल्या. ‘तुम्ही काय आणि कसं वाचता’ या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. शिवाय बालसाहित्य हा अंत:प्रवाह ठळकपणे उमटायला हवा होता. आजची पाल्यं साहित्य वाचतात, त्यांना पुस्तकं आणून देणारे त्यांचे पालकही मोठ्यांची पुस्तकं वाचतात. आणि ते पालक जेव्हा स्वत: बाल होते, तेव्हा त्यांनीही बालसाहित्य वाचलं आहे – असा मोठा विस्तीर्ण पट होता. त्यातही बालसाहित्यवाचनात झालेला बदल टिपायचा होता. म्हणून, ‘पालक’ आणि ‘पाल्यं’ अशी ढोबळ वर्गवारी केली आणि एका सर्वेक्षणाची दोन सर्वेक्षणं झाली. दोन्ही गटांना जवळजवळ सारखेच प्रश्न विचारले. त्याच्या उत्तरांतून, त्या उत्तरांना तक्त्यांत / आलेखांत मांडून, काही ठोस विधानं करता येताहेत का हे तपासण्याचा हा प्रयत्न आहे.
सर्वेक्षणाला उदंड प्रतिसाद मिळाला. अगदी आम्हांला अपेक्षा नव्हती एवढा. सुरुवातीला आम्ही ‘पन्नास उत्तरं आली प्रत्येकी, तरी मोप झालं’ वगैरे ‘अंथरूण-पाहून’ पद्धतीची चर्चा आपापसांत केली. पण प्रत्यक्षात आलेल्या प्रतिसादाने आम्हांला आडवं पाडलं – २५१ पालकांनी आणि १२४ पाल्यांनी सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला!
प्रत्येकी वीस प्रश्न असलेली प्रश्नावली भरणं हे किती कटकटीचं, वैतागाचं काम आहे याची आम्हांला पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे, सर्वेक्षणाच्या सर्व प्रतिसादकांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत.
याचबरोबर, या सर्वेक्षणाला असलेल्या मर्यादांची आम्हांला जाणीव आहे.
पहिलं म्हणजे हे सर्वेक्षण परिपूर्ण नाही. तसं कोणतंच सर्वेक्षण परिपूर्ण नसतं. व्याप्तीच्या मर्यादांमुळे काही प्रश्न विचारले जात नाहीत. काही प्रश्न विचारणं सामाजिकदृष्ट्या प्रशस्त नसतं (उदा० उत्पन्न). काही वेळेला ‘अरे, हे विचारायला हवं होतं राव!’ अशी पश्चाद्बुद्धी होते. कधी मुळात ते प्रश्न सुचतच नाहीत. यासाठी वाचकहो, या सर्वेक्षणात काही आणखी हवं होतं असं तुम्हांला वाटल्यास खाली प्रतिसाद म्हणून लिहा. भविष्यात असं सर्वेक्षण करू इच्छिणार्‍याला याचा नक्की उपयोग होईल.
दुसरं म्हणजे सर्वेक्षणाला प्रतिसाद देणारे बहुतांश लोक (९०%च्या वर) शहरी आहेत. शहरात राहतात. निमशहरी आणि ग्रामीण भागात हे सर्वेक्षण पोचवायला आम्ही कमी पडलो, हे खरं. (आधी लिहिल्याप्रमाणे सर्वेक्षणासाठी गूगल हे मुख्य साधन होतं. आंतरजालाचा प्रादुर्भाव कमी असल्याने आमचं सर्वेक्षण तिथपर्यंत पोचू शकलं नसावं.) असो.
तिसरं म्हणजे बायस – अर्थात आमचं अंशतः तरी पक्षपाती असणं. प्रश्नावली बनवताना निष्पक्ष (neutral) राहण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही केला आहे. पण समाजाचं कोणतंच निरीक्षण (आणि अर्थातच सर्वेक्षण) सर्वार्थाने निष्पक्ष नसतं. तुम्हांला वाचक म्हणून काही बायस जाणवल्यास तो आम्हांला जरूर कळवा.
चौथं आणि शेवटचं म्हणजे शास्त्राधार (scientific rigour). जमलेल्या विद्यातून काय काय करता येतं यासाठी ‘विदाशास्त्र’ (data science) ही शाखा आहे. ढोबळमानाने बोलायचं तर खालील गोष्टी करता येतात:
(१) आलेखीकरण (data visualisation);
(२) परस्परसंबंध (correlation, regression, वगैरे); आणि
(३) विधानतपासणी (hypothesis testing).
या लेखमालेत प्रामुख्याने आलेखीकरणावर भर दिला आहे. कारण आम्हांला जे म्हणायचं आहे, सांगायचं आहे, त्यासाठी तेवढं पुरेसं होतं. पण ही ‘शास्त्रकाट्याची कसोटी’ नाही याची जाणीव अर्थातच आहे. कोणा वाचकाला यापुढे जाऊन काही विश्लेषण / अभ्यास करायचा असल्यास आम्ही विदा उपलब्ध करून देऊ शकतो. कृपया संपर्क साधावा.
यापुढे या लेखमालिकेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात जमलेला विदा ‘दिसतो’ कसा हे दाखवलं आहे. आणि काही महत्त्वाची निरीक्षणं मांडली आहेत. दुसर्‍या टप्प्यात प्रकट चिंतन आणि समारोप आहे.
भाग २
– आदूबाळ
aadubaal@gmail.com

***

Facebook Comments

2 thoughts on “प्रश्नांचं मोहोळ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *