बालसाहित्यांक २०१७ लेख

बुकवर्म

हल्ली फार बोंबाबोंब एेकू येते, की मुलं पुस्तकं वाचत नाहीत; पण मला तरी त्यात काही आश्चर्य वाटत नाही. मी लहान असताना मुलं पुस्तकांकडे बघायची, ती प्रामुख्याने खेळापलीकडे जाणारं मनोरंजनाचं एक माध्यम म्हणून. आणि त्या काळात दुसरं होतंच काय? टीव्हीवरच्या एकुलत्या एका चॅनलवरचे तुटपुंजे कार्यक्रम, आणि थिएटर्समधले नाटक-सिनेमे. तेही लोकप्रिय वळणाचे. ना व्हिडिओ गेम्स (ते अगदी नव्हते असं नाही, पण जे असत ते खूप बाळबोध असत आणि अगदीच कमी मुलांकडे असत), ना अनेक चॅनल्स, ना इंटरनेट, ना सेलफोन्स आणि त्यामुळेच ना त्यावरच्या गेम्सपासून व्हाॅट्सॅपपर्यंत संबंधित टाईमपास. आजच्या मुलांकडे हे सगळं आहे म्हटल्यावर पुस्तका‍ंना दिला जाणारा त्यांचा वेळ या इतर गोष्टींबरोबर वाटला गेला, तर त्यात आश्चर्य ते काय?
त्यात ‘मुलं वाचत नाहीत’ अशी तक्रार करणाऱ्या या मोठ्यांपैकी तरी किती जण आज गंभीरपणे वाचतात? ज्या गोष्टी आज मुलांचा वेळ खातात, त्या मोठ्यांचाही वेळ खातातच. त्यामुळे संध्याकाळी आॅफिसातून घरी आलेली मोठी माणसंही पुस्तक काढून बसलीत, या दृश्यापेक्षा ती टीव्हीसमोर बसल्याचंच दृश्य मुलांना अधिक ओळखीचं आहे. मुलं शिकतात, ते शेवटी आपल्या आजूबाजूला दिसणार्‍या गोष्टी‍ंवरूनही.
मी शाळेत असताना मला आजूबाजूला काय दिसायचं हे पाहिलं, तर असं लक्ष्यात येईल, की पुस्तकं हा त्या दिवसांचा मोठा भाग होता. पुस्तकांचा मोठा साठा आमच्या घरी तर होताच, वर माझ्या आजोबांकडे – म्हणजे माझ्या आईचे वडील माधव मनोहर (आम्ही त्यांना पपा म्हणत असू) यांच्याकडेही पुस्तकं प्रचंड प्रमाणात होती. आणि नुसती होती असं नाही, तर घरातल्या सर्वांच्या लिहिण्या-वाचण्यासंबंधातल्या खूप अॅक्टिविटीज असायच्या. बाबा, म्हणजे माझे वडील रत्नाकर मतकरी, आमच्या शेजारच्या सुमती भालेरावांच्या दिवसा रिकाम्या असणाऱ्या घरात बसून सकाळी दहा ते संध्याकाळी किमान सहा असं नियमितपणे लिहायचे. अनेकदा त्यांनी लिहिलेलं आम्हांला वाचून दाखवायचे. पुस्तकांविषयी बोलायचे. आम्ही (म्हणजे मी आणि माझी बहीण सुप्रिया) काय वाचतोय ते विचारायचे, काही नवं सुचवायचे. आईचंही वाचन चिकार, पण प्रामुख्याने मराठी होतं. पपांचं त्या सुमारास ‘सोबत’मध्ये समीक्षेचं सदर सुरू होतं. ते लिहून घ्यायला आणि त्यांच्या इतर लिखाणासाठीही त्यांच्याकडे लेखनिक येत असत. त्यांचं स्वत:चं अक्षर सुंदर असताना ते लेखनिक का वापरत, आणि खाडाखोड न करावी लागता त्यांना सलग कसं सुचायचं, हा माझा पपांना विचारायचा राहून गेलेला प्रश्न. त्यांच्या पलंगाशेजारी त्यांची एक मोठी खुर्ची होती. दिवसाची कामं आटपली की तिथे रात्री उशिरापर्यंत बसून टेबल लॅंपच्या प्रकाशात त्यांचं पद्धतशीरपणे वाचन चाले. घरातले बाकी सारे दिवे मालवल्यानंतरही कितीतरी वेळ. माझी आजी – आईची आई, म्हणजे मालती मनोहर उर्फ ताई – तर शिक्षिकाच होती. तिने माझा अभ्यास सुधारण्याचा निष्फळ प्रयत्न बराच काळ केल्याने तिचा संबंध माझ्या शाळेच्या पुस्तकांशी अधिक होता, निदान माझ्या दृष्टीने. आमच्या दादरच्या घराबरोबरच पपांच्या शिवाजी पार्कच्या घरातही आमचं सतत येणंजाणं असल्याने (मधे एक-दीड वर्षाचा काळ तर मी शिवाजी पार्कला पूर्ण वेळ राहतही होतो) ही सगळी माणसं आणि त्यांचं या ना त्या मार्गाने पुस्तकांशी जोडलेलं असणं याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काहीतरी प्रभाव आमच्यावर असेलच.
माझ्या या काळातल्या खूपच आठवणी आहेत. म्हटलं तर सुट्या सुट्या, पण सगळ्यांचा एकत्रित परिणाम असलेल्या. एक आहे, ती वाढदिवसाच्या दिवशी पपांबरोबर दादर स्टेशनजवळच्या ‘आयडिअल’मध्ये जाऊन पुस्तकांचा एक ढीग विकत घेतल्याची. तेव्हा मी फारच लहान होतो. नक्की कितवीत होतो ते आठवत नाही, पण बहुतेक दुसरी-तिसरीत असेन. ही अगदी साधी, बारकी, मराठी पुस्तकं होती. ‘जादूची अंगठी’ वगैरे टाईपची नावं असलेली. लेखक कोण ते आता आठवत नाही, पण वेगवेगळे होते. हा ढीग मी पुढे कितीतरी दिवस वाचत होतो. पपांच्या घरी आलेल्या लोका‍ंना त्यांचा दरारा वाटत असला, तरी घरातल्या लोकांसाठी पपांकडे उदार लोकशाही असायची. कोणालाही जे करायचं असेल ते करू द्यायचं, हीच पद्धत. लोकशाहीचे जसे फायदे असतात तसे तोटेही. ते इथेही होतेच. बाबा जसे वाचण्यासाठी विशिष्ट लेखक सुचवायचे, तसे पपाही सुचवायचे. पण विचारलं तर आणि तरच. नाहीतर तुमच्या मनाला जे येईल ते वाचायला त्यांची मुभा होती. मग ते वाचन फार दर्जेदार नसलं, तरी त्याला त्यांची हरकत नसे. मला खात्री आहे, की त्या वाढदिवसाला घेतलेली पुस्तकं मी माझ्या डोक्यानी घेतली असणार. काय घेऊ असं मी त्यांना विचारलं असतं, तर त्यांनी काही सूचना केल्या असत्या; पण तेवढी समज मला तेव्हा आलेली नसल्याने मला जे हवं होतं ते मी घेतलं आणि त्यांनीही काहीच चर्चा न करता ते घेऊन दिलं. (आता एवढे ज्येष्ठ विद्वान नाट्यसमीक्षक दुसरीतल्या मुलाशी चर्चा कशाला करतील असं कोणाला वाटेल. तर ते मात्र बरोबर नाही. आमच्याकडे सर्वच मोठी माणसं मुलांबरोबर काहीशा बरोबरीच्या नात्याने बोलत.) संपूर्ण लोकशाही. हे भाषणस्वातंत्र्य शिवाजी पार्कप्रमाणे आमच्या घरीही होतं.
पपा सतत कोणत्या ना कोणत्या प्रदर्शनांना जात असत. आणि तिथून ते जशी मोठ्यांची पुस्तकं आणत, तशी मुलांचीही. त्यांनी मराठीत भाषांतर केलेली बरीचशी सोविएत पुस्तकं आम्हांला आणून दिली होती. (त्यांतली ल्येव तल्स्तोय यांची ‘मुलांसाठी गोष्टी’, ‘रादलोवच्या चित्रकथा’; अर्कादी गैदार यांचं ‘दोन भाऊ’; आणि एम बुलातोवा यांचं ‘पिंगट- करडा घोडा’, ही अलीकडे ‘लोकवाड़मय’ने पुनर्प्रकाशित केलेल्या संचात दिसली. मी तो संच लगेच घेऊन टाकला. पण तेव्हाचा कागद आणि छपाई, आणि आताचा नि छपाई यांत मला फरक वाटतो. आता हा खरंच आहे, की हा केवळ स्मरणरंजनाचा परिणाम कोणाला माहीत! पण असं वाटतं हे खरं.) मूळ संचातल्या बऱ्याच पुस्तकांच्या आम्ही वाचवाचून चिंध्या केल्या. किंवा मग पपांकडच्या पुस्तकांची पुढे जी हलवाहलवी झाली, त्यात त्यांचं काहीतरी बरंवाईट झालं असावं. त्यांनी आणलेल्या पुस्तकांत फक्त ही रशिअन पुस्तकंच होती असं नाही. एमिल नावाच्या एका मुलाची गोष्ट असलेलं जर्मन पुस्तकाचं भाषांतर, लीलावती आणि भा. रा. भागवतांची अनेक पुस्तकं (‘ब्रम्हदेशचा खजिना’, ‘भुताळी जहाज’ आणि इतर काही. पण फास्टर फेणे त्यात नव्हता. तो पुढे वेगळा वाचला.), झालंच तर रंगवायची पुस्तकं, अॅक्टिविटी बुक्स, वगैरे. मी मराठी माध्यमात असल्याने माझं इंग्रजी वाचन शाळेत कमी होतं. त्यामुळे त्यांच्याकडे असली, तरी जाडजूड इंग्रजी क्लासिक्स वाचायची जबरदस्ती त्यांनी कधी केली नाही,. शिवाय लोकशाही धोरण होतंच. (पुढे कधीतरी, बहुधा दहावीत, मार्क ट्वेनच्या ‘हकलबरी फिन’ची अनअब्रिज्ड आवृत्ती माझ्या हातात पाहून त्यांना बरं वाटल्याचं आठवतं.) एक मात्र होतं. त्यांचं पुस्तकाचं प्रचंड कपाट ज्या मोजक्या लोकांसाठी खुलं असायचं, त्यांत एक मी होतो. अट एकच. जे घेतलंय, ते त्यांना दाखवून न्यायचं. ते पुस्तक का नेलं, हेच का – दुसरं का नाही, पुन्हा कधी आणणार, वगैरे विचारत नसत; पण एकदा पुस्तक हातात घेऊन पाहत. त्यांच्या खास आवडीचं असल्यास त्याबद्दल एखाद-दुसरं वाक्य बोलत आणि देत.
चित्रस्रोत : आंतरजाल
पपांचं कपाट हे शिवाजी पार्कच्या घरातलं मोठं आकर्षण होतं. इतकं, की त्या कपाटाशिवाय मी त्या घराची कल्पनाही करू शकत नाही. हाॅल आणि बेडरुम यांची एकेक भिंत व्यापणारं हे कपाट होतं. त्यातच मध्ये स्वयंपाकघरात जायच्या दाराची जागा सोडलेली होती. पण बाकी कपाट सलग होतं. खरंतर याला कपाट म्हणण्यापेक्षा पुस्तकांची भिंतच म्हणता येईल. कारण हे बाहेरून आणून ठेवलेलं कपाट नव्हतं, तर भिंतीवर बसवून टाकलेलं, जमिनीपासून छतापर्यंत पसरलेलं कपाट होतं. याचा खालचा अडीचेक फुटाचा भाग आणि वरचा अदमासे तेवढाच भाग लाकडी शटर्सनी बंद असायचा, आणि मधल्या भागात काचेची स्लायडिंग शटर्स होती. हाॅलमधल्या भागात जवळजवळ सगळीच इंग्रजी पुस्तकं होती, तर बेडरुममध्ये इंग्रजीबरोबर मराठीचं प्रमाण खूप होतं. मला जेव्हा वेळ व्हायचा, तेव्हा मी त्यात पुस्तकं हुडकत असायचो. मराठी आणि इंग्रजी दोन्ही. अगदी इंग्रजी वाचत नव्हतो तेव्हाही. कारण पुस्तकांचं एकूणच आकर्षण होतं. आणि पपांकडे सिनेमाचीही बरीच पुस्तकं असायची. काही कलाभ्यासाशी संबंधित, तर काही चरित्रात्मक. त्यांतले फोटो पाहायला मला आवडत असे. पुढे पपा गेल्यावर जेव्हा हे कपाट काढलं, तेव्हा ते घरच अनोळखी झालं. पुन्हा मी तिथे कधी गेलोच नाही. पण ते असताना आणि खास करून शाळेच्या दिवसांत मात्र आमची मजा होती.
या दिवसात मी त्यांच्या संग्रहामधली जितकी मुलांची पुस्तकं किंवा इतर इंग्रजी पुस्तकं वाचली, त्याहून अधिक मोठ्यांची पुस्तकं वाचली. शिवाय ‘समग्र चिं. वि. जोशीं’सारखी वयापलीकडे असलेली पुस्तकं. त्यांच्याकडे किंवा आमच्याकडेही, मोठ्यांच्या पुस्तकांना तोटाच नव्हता. नाटकं, कथासंग्रह, कादंबऱ्या यांचं अमाप वाचन त्या काळात झालं. नारायण धारप हे या काळातले खास आवडते. (ते आवडते अजून आहेत, पण पुढे लक्ष्यात यायला लागलं; की त्यांचं बरच साहित्य आधारित आहे.) आमच्याकडे ‘चंद्राची सावली’ किंवा ‘पारंब्यांचे जग’ यांसारखी त्यांची काही पुस्तकं होती, पण मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा सभासदही असल्याने तिथे बरीच पुस्तकं मिळायची. बाबा स्वत: लहान असताना तेही मोठ्यांचीच पुस्तकं आधी वाचायला लागले. त्यामुळे आम्हीही ती वाचायला लागलो, याबाबत कोणाला काही आक्षेप असण्याचं काहीच कारण नव्हतं. मी अभ्यास न करता ती वाचायचो याबद्दल मात्र आई आणि ताईची थोडीफार तक्रार होती. मात्र दोन्ही घरांचा पुस्तकांशी एवढा घनिष्ट संबंध होता, की ते वाचन बंद व्हावं म्हणून कोणी काही केलं नाही.
मराठीत मुलांना चालणारी (मुलांसाठीच लिहिलेली असं नाही) बरीच क्लासिक्स अनुवादित होती. ‘अराउन्ड द वर्ल्ड इन एटी डेज’, ‘अॅलिस इन वन्डरलॅन्ड’चे दोन्ही भाग (याची एक काॅमिक बुक फाॅर्ममधली आवृत्ती ‘किशोर’च्या दिवाळी अंकांमधे येत असे. बहुधा आम्ही शाळेत होतो त्याच्याही काही वर्षं आधी. पण ‘किशोर’चे अनेक जुने अंक शिवाजी पार्कला होते. तिथे मी ती कधीतरी वाचली.), `विझर्ड आॅफ ओझ’ (याचं एक मराठीतलं काॅमिक बुकही माझ्याकडे होतं – लवकरच चिंध्या!) हेही बहुतेक भाषांतरित स्वरूपात ‘किशोर’मधून क्रमशः आलं होतं. शिवाय राॅबिन हूड, ट्वेन्टी थाऊजंड लीग्ज अंडर द सी, मोबी डिक हे सारं तेव्हा मराठीतून वाचलं गेलं. त्या सुमारास साने गुरुजींच्या गोड गोष्टींचा संचही कोणीतरी घरी आणून ठेवला. त्यात ‘फाऊस्ट’, आणि ‘ल मिजराब्ल’ या साहित्यकृतींच्याही थोड्या सिम्प्लिफाईड आवृत्त्या वाचायला मिळाल्या. गंमत अशी, की आज मी ही गोड गोष्टींची पुस्तकं आठवायला गेलो तर पुस्तकं स्पष्ट आठवतात. पण ही मुखपृष्ठं अजिबात आठवत नाहीत. कोणीतरी – कदाचित माझ्या बहिणीने किंवा मग बाबांनी – या पूर्ण संचाला आमच्याकडे येणाऱ्या स्पॅन या मासिकाच्या जुन्या अंकांमधल्या गुळगुळीत पानांची कव्हर्स घातली होती. त्यामुळे गोड गोष्टी म्हटलं की बारीक टायपातलं इंग्रजी आणि त्यावर स्केच पेनने मराठीतून लिहिलेली नावं हेच आठवतं. रवीन्‍द्र गुर्जरांनी केलेला ‘गाॅडफादर’चा, ‘पॅपिलाॅन’चा, ‘सेकंड लेडी’चा अनुवाद असे अगदीच थेट मोठ्यांचे अनुवादही तेव्हाच वाचले होते. (दहावीनंतर एखाददुसरा अपवाद वगळता मी मराठी अनुवाद वाचणं थांबवूनच टाकलं.) नाथमाधवांचं ‘वीरधवल’ किंवा गो. ना. दातारांची ‘कालिकामूर्ती’, ‘इंद्रभुवन गुहा’ ही पुस्तकंही तेव्हाच वाचली. खरं सांगायचं, तर बाकी मुलं त्या दिवसांत काय वाचायची याची मला कल्पना नाही. मी मात्र सापडेल ते वाचायचो, आणि मला सापडणाऱ्या खूपच गोष्टी होत्या.
विंदा करंदीकरांच्या ‘अजबखाना’चं आणि ‘अल्लख बिलंदर’चं मुखपृष्ठ, तसंच ‘टाॅप’ कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ आणि आतली चित्रंही, बाबांनी केली. विंदांच्या मुलांच्या कविता हा एक फारच ग्रेट प्रकार होता, पण शाळेच्या पुस्तकात त्या (असतीलही कदाचित, पण) वाचल्याचं आठवत नाही. पिशीमावशी ‘किशोर’च्या जुन्या अंकांमधे भेटली होती, पण करंदीकरांचा एकूण संचच खूप लक्ष्यात राहणारा होता. ‘राणीची बाग’, ‘एटू लोकांचा देश”, ‘परी गं परी’, ‘एकदा काय झाले’, ‘सशाचे कान’ वगैरे साऱ्याच पुस्तकांमधल्या कविता सोप्या आणि व्हिजुअल होत्या. त्यांच्या मोठ्यांसाठी लिहिलेल्या कविता आणि मुलांसाठी लिहिलेल्या कविता यांची व्यक्तिमत्त्व‍ंच एकमेकांपेक्षा संपूर्ण वेगळी होती. यांतल्या अनेक कविता मला अनेक वर्षं पाठ होत्या. आजही काही-काही आहेत.
अनुवाद आणि घरातली बरीचशी मुलांची मराठी पुस्तकं आई आणायची. बाबांची पुस्तकखरेदी बरीचशी इंग्रजी होती. त्यांनी हॅन्स क्रिश्चन अॅन्डरसन किंवा ग्रिम्स ब्रदर्सच्या परीकथांच्या डिलक्स एडिशन्स असं कायकाय आणून ठेवलं होतं, पण मी सांगतोय त्या दिवसात ते बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरूनच काम करत असल्याने त्यांचं बुकशाॅप्समधे येणंजाणं कमी होतं. आईचं मात्र ते चालू होतं. तिला ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या पुस्तकांचं फार वेड होतं तेव्हा. ती पुस्तकंही चांगली असायची. मोरा नावाच्या हत्तीच्या पिलाची गोष्ट असलेलं पुस्तक, बापू, महाभारतातल्या गोष्टी वगैरे काही पुस्तकं मला अजून आठवतात. काहींची चित्रं, त्यांची शैली डोळ्यासमोर आहे, आशय लक्षात नसला तरी. तिने एडगर राईस बरोज यांच्या ‘टारझन’ पुस्तकांचा, पुठ्ठाबांधणीतला जबरदस्त संच आणलेला आठवतोय. पण तो कधी आणला हे नक्की आठवत नाही. माझ्या आठवणीतली ही पुस्तकं खिळखिळी झालेलीच आहेत. संचातलं एखादं पुस्तक गायब आहे. पण तरीही मी त्या पुस्तकांची पारायणं केल्याचं लक्ष्यात आहेच.
आई आणखी एक गोष्ट करायची. ती म्हणजे मुलांची मासिकं आणणं. ‘किशोर’ तर होताच. तो बरीच वर्षं आमच्याकडे येत असे. त्याशिवाय बिरबल आणि टारझन या नावांची दोन मासिकं असायची. ही किती वर्षं चालली ते आठवत नाही, पण फार वर्षं नसावीत. ‘बिरबल’मध्ये थोडं विनोदी, गमतीदार लिखाण असायचं; तर ‘टारझन’मध्ये साहसकथा, शौर्यकथा. याबरोबर आनंद, कुमार ही मासिकंही मी वाचायचो, पण ती आमच्याकडे येत नसत. वर्गातल्या कोणाकोणाकडे आलेली हातात पडायची, तशी वाचली जायची. दिवाळी अंक बरेच यायचे. ‘किशोर’बरोबर ‘बालवाडी’ आणि ‘टाॅनिक’ ही दोन नावं आठवतायत. ‘किशोर’ आधी फार दर्जेदार असायचा, करमणूक आणि माहिती याचा तोल त्यांना चांगला साधला होता. ८०च्या दशकाच्या उत्तरार्धात तो उगाचच अधिक गंभीर व्हायला लागला आणि कंटाळवाणा झाला. आई आणत असलेलं आणखी एक मासिक नेमाने वाचलं जायचं, ते म्हणजे ‘दक्षता’. याचा दर्जा फार बरा कधीच नव्हता, पण केसेस अनेकदा इन्टरेस्टिंग असायच्या. (तिच्या या आवडीचंच एक्स्टेन्शन म्हणून श्रीकांत सिनकर आणि व. कृ. जोशी यांची अनेक पुस्तकं आमच्याकडे असायची. तीही मी वाचून टाकलेली होती.) माझं मुलांचं आणि मोठ्यांचं जे संमिश्र वाचन चालायचं, ते दिवाळी अंकांच्या बाबतीतही तसंच होतं; कारण बाबांचं बरंच लेखन दिवाळी अंकांमधून येत असल्याने आमच्याकडे ते प्रचंड प्रमाणात येत. त्यात आलेलं त्यांचं लिखाण आधीच वाचलेलं तरी असायचं किंवा त्यांनी वाचून दाखवलेलं तरी. पण घरात अंकांची थप्पी लागल्यावर त्यात आलेलं बाकीही लेखन वाचलं जायचं. दीपावली, किस्त्रीम, हंस, नवल अशा प्रस्थापित मासिकांबरोबर नव्या अंकानांही बाबा बरंच लेखन देत. त्यामुळे सर्व प्रकारचे अंक घरी यायचे आणि वाचूनही व्हायचे.
शाळेत असताना मला कायमच एक सवय होती , ती म्हणजे हातात पुस्तक असल्याशिवाय जेवायचं नाही. या सवयीला घरचेही कारणीभूत असू शकतील कदाचित. कारण माझा वाचण्याचा वेग अजिबातच नव्हता त्या काळात (बहुधा मी पहिलीत असताना) आईने मला ‘झपाटलेला प्रवासी’ मधलं (अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज) एकेक प्रकरण रोज रात्रीच्या जेवणाच्या वेळी वाचून दाखवल्याचं स्पष्ट आठवतंय. आमच्याकडे अनेकांना जेवताना वाचायची सवय होती. बाबा आणि पपा यांना तशी सवय असल्याचं मात्र आठवत नाही. ही सवय मला पुढे अनेक वर्षं होती. पुढे कधीतरी ती टीव्हीमुळे सुटली.
फास्टर फेणेशी माझा परिचयही या काळातला. जसा साने गुरुजींचा संच घरी आला, तसाच फास्टर फेणेचाही. ‘पाॅप्युलर’ने काढलेला पहिल्या सहा भागांचा संच. आज माझ्याकडे या संचातलं जेमतेम एखादं पुस्तक असेल. (पुढे मी घेतलेला संपूर्ण फास्टर फेणे मात्र आहेच.) पण मला या दोन संचांमध्ये जाणवणार्‍या फरकाला निव्वळ नाॅस्टाल्जिआ या वर्गात टाकणं शक्य होणार नाही, असा फरक त्या मूळ पुस्तकांची निर्मितिमूल्यं आणि आताच्या संचाची निर्मितिमूल्यं यांत आहे. वाईरकरांना बन्या उर्फ फास्टर फेणेची चित्रं काढायला कोणी सांगितली असावीत याची काही कल्पना नाही. हे जर ‘पाॅप्युलर’चं काम असेल, तर हा नायक मुलांच्या अक्षरश: डोळ्यासमोर उभा करण्याचं श्रेय काही प्रमाणात तरी नक्की त्यांनाच जाईल. काॅमिक्समधे लेखका-चित्रकाराचं श्रेय सारख्या प्रमाणात असतंच, पण साध्या पुस्तकातल्या काही रेखाटनांच्या आणि मुखपृष्ठांच्या बळावर या नायकाला मुलांच्या विश्वात अढळ प्रतिमा मिळवून देणं हे सोपं नाही. ही चित्रं किती महत्त्वाची होती याची कल्पना नसलेल्यांनी पुढे वाईरकरांची चित्रं नसलेले भाग आणि ती असलेले आधीचे भाग ताडून पाहावेत. पुढे चर्चेची गरजच पडणार नाही.
अर्थात वाईरकरांना श्रेय देताना मी भा. रा. भागवतांना कमी लेखत नाही. आपल्याकडे तोवर नसलेला साहसकथांचा प्रांत त्यांनी फास्टर फेणेमधून नव्यानेच तयार केला. ना. धों. ताम्हनकरांच्या गोट्याच्या बऱ्याच करामती वाचल्या मी आहेत. पण तो आणि फाफे यांचा काळ, विश्व, जगणं सारंच वेगळं. त्या दिवसांमधे इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या हातात हार्डी बाॅईज आणि मुलींच्या हातात नॅन्सी ड्रू (एनिड ब्लायटनचे फाईव्ह फाइन्ड आउटर्स आणि इतर छोटे नायक या दिवसांत कमी व्हायला लागले होते आणि रहस्यापेक्षा थ्रिलरच्या अधिक जवळ जाणाऱ्या साहसकथा लिहिल्या जायला लागल्या होत्या.) या मालिकांमधली पुस्तकं नेहमी दिसत. फाफे हा काही प्रमाणात त्यांना पर्याय म्हणता येईल.
मला स्वत:ला हार्डी बाॅईजचा कंटाळा यायचा. एकतर आम्हांला इंग्रजी सुरू व्हायलाच पाचवी उजाडल्याने वाचनाला गती नव्हती. शिवाय नुसत्या हाणामाऱ्यांचा मला कंटाळाही होता. तरीही दोनतीन वर्षांत थोडं इंग्रजी वाचायला लागलो. मला हार्डी बाॅईजच्याच प्रकारचे, पण सुपरनॅचरल भागाला थोडं महत्त्व असलेले (बाबा आणि धारपांनी ही एक आवड लावून ठेवलेलीच होती), आल्फ्रेड हिचकाॅक या प्रख्यात दिग्दर्शकाशी जोडण्यात आलेले थ्री इन्वेस्टीगेटर हे बाल गुप्तहेर अधिक आवडायचे. यांच्या पुस्तकांचं स्वरूप हे बहुधा एखादं अतिमानवी वाटणारं रहस्य आणि पुढे त्याची मानवी उकल या प्रकारचं असायचं. या तिघांची हिचकाॅकशी ओळख असते आणि तो वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतो, असा हिचकाॅकचा गेस्ट अपिअरन्सही या पुस्तकांमधून होता. या दिवसांत मला हिचकाॅक हा मोठा दिग्दर्शक आहे हे माहीत होतं. त्र्युफो या फ्रेंच दिग्दर्शकाने घेतलेल्या त्याच्या दीर्घ मुलाखतीचं हिचकाॅक-त्र्युफो हे पुस्तक बाबांनी ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीतून आणलेलं मी पाहिलं होतं. सायको, वर्टिगो अशा काही सिनेमांची नावं माहीत होती. पण पाहिलेलं बहुधा काहीच नव्हतं. या काळातला हिचकाॅक पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर भेटायचा, कारण बाबांकडे त्याने प्रेझेन्ट केलेल्या रहस्यकथांची अनेक पुस्तकं होती. या कथा मुळात त्याच्या आल्फ्रेड हिचकाॅक प्रेझेन्ट्स या मालिकेत आलेल्या आणि पुढे कथासंग्रहांच्या रूपात हिचकाॅकचा शिक्का मारून लोकांपुढे आणलेल्या. (पपांकडे मनोहर हे मासिक यायचं. त्यात हिचकाॅकच्या रहस्यदालनात या नावाने विजय देवधरांनी केलेले या कथांचे अनुवाद असत. ते मी वाचत असे, पण यात लेखकांची नावं असल्याचं आठवत नाही. हे अनुवाद वाचणाऱ्या आणि हाॅलिवूड फार माहीत नसलेल्या वाचकांना या कथा हिचकाॅकनेच लिहिल्या असं वाटलं असल्यास नवल नाही.) ही पुस्तकं मी इंग्रजीतूनही जमेल तशी वाचायचो. पपांना मी सोपं इंग्रजी सुचवायला सांगितल्यावर त्यांनी मला रोअल्ड डाल हा अफलातून लेखक सुचवला आणि वाचायलाही दिला, पण त्याची ‘मटिल्डा’, ‘विचेस’ किंवा ‘बीएफजी’ यांसारखी मुलांची पुस्तकं नाही, तर ‘स्विच बिच’, ‘किस किस’ किंवा ‘द वन्डरफुल स्टोरी आॅफ हेन्री शुगर’ यांसारखी मोठ्यांसाठी लिहिलेली कथांची पुस्तकं. त्याचं बालवाड़मय मी पुढे मोठा झाल्यावरच वाचलं !
आमच्या दोन घरांमधल्या पुस्तकसंग्रहाबरोबर आणखी दोन पुस्तकसंग्रह मला सहज उपलब्ध होते. एक होता तो मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेतला, जे आमच्या घरापासून चालत दहा मिनिटाच्या अंतरावर होतं; तर दुसरा पपांच्या शेजारच्या इमारतीतल्या छोट्याशा वसंत वाचनालयाचा, ज्याचा मी अनेक वर्ष सभासद होतो. आमच्या शाळेतली अनेक मुलं ‘दासावा’ची, अर्थात दादर सार्वजनिक वाचनालयाची, सभासद होती, मीही काॅलेजमधे एखादं वर्ष सभासद होऊनही पाहिलं. पण मी तिथे कधीच रुळलो नाही. नाही म्हणायला मी आमच्या वर्गातल्या एका मुलाचं दासावातून आणलेलं पुस्तक वाचायला घेतलं आणि हरवलं अशी एक आठवण मात्र आहे. तेव्हा मी पपांकडेच राहत होतो. पुस्तक माझ्या प्रकारचं नव्हतं. मला वाटतं, ज्ञानेश्वर किंवा अशाच एखाद्या संताचं चरित्र वगैरे होतं. आता मी असं काहीच वाचत नसूनही ते कशाला घेतलं कोणाला माहीत! पण मला पुस्तकं बाळगण्याचं व्यसन आहे. वाचली-नाही वाचली, तरी माझ्याकडे खूप पुस्तकं असतात. आज मी ती सरळ विकत घेतो, पण तेव्हा ते शक्य नसल्याने मी कदाचित कोणाकोणाकडून वाचायला घेत असेन. तर ते पुस्तक कुठेतरी गेलंच, सापडेचना! मुदत संपली, घरी वाचनालयाचं पत्र वगैरे आलं, तो वर्गमित्र अगदी रडकुंडीलाच आला. त्यात तो वर्गाचा एक माॅनिटर आणि मी दुसरा. टाळणार तरी कसं? मीही खूप शोधलं. शेवटी मुदतीनंतर तीन-चार महिन्यांनी कुठेतरी मिळालं. मग मी लगेच देऊन टाकलं. मध्ये शाळेच्या रियुनिअनला तो मुलगा भेटला, तेव्हा आम्हां दोघांच्याही डोक्यात एकदम तीच आठवण आली.
मुंमग्रंसं काय किंवा दासावा काय, त्यांची वाचकांना पुस्तकं इशू करण्याची पद्धत मला फार जुनाट वाटायची, आता जर ती बदलली असेल तर कल्पना नाही. त्यांचा कॅटलाॅग बघून तुम्ही हव्या त्या पुस्तकाचं नाव, ते नसल्यास दुसरा चाॅईस, तिसरा चाॅईस असं सगळं ठरवायचं, आणि ते काउंटरवर द्यायचं. मग काउंटरवरचे कर्मचारी ती यादी घेंऊन जाणार आणि त्यातलं हवं ते पुस्तक शोधून देणार. पुस्तकं सतत हाताळायची सवय असलेल्या माझ्यासारख्या कोणालाही हे असं पुस्तकांच्या कपाटांपासून लांब ठेवलं जाणं आवडणार नाही. तसंच ते मलाही आवडत नसे. फर्स्ट इअर आर्किटेक्चरला असताना ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीचा सभासद झाल्यावर मग स्वत: पुस्तकांच्या प्रचंड कक्षात फिरून पुस्तकं निवडण्याची गंमत अनुभवता आली. अर्थात हे झालं मोठ्या जागेचं. कोणत्याही छोट्या वाचनालयाप्रमाणे शिवाजी पार्कच्या वसंत वाचनालयात मात्र थेट शेल्फवरून पुस्तक उचलण्याची पूर्ण मुभा होती. आता ती जागा फारच छोटेखानी होती ते सोडा.
वसंत वाचनालयातलं माझं वाचन, हे जवळपास पूर्णपणे काॅमिक बुक्सचं होतं. यात सुरुवातीला भाषेची सवय नसल्याचा मुद्दा होताच. पण त्याने फार फरक पडला नाही. चित्रं ही माझ्यासाठी पुरेशी होती. बहुतेकदा मी त्यांच्यावरून गोष्ट जुळवू शकत होतो. इथे माझा रोख होता तो प्रामुख्याने आर्ची, रिची रिच, तसंच कॅस्पर, वेन्डी वगैरे हार्वी काॅमिक्सची बाकी गॅंग यांच्यावर. क्वचित इंद्रजाल काॅमिक्सचे मेम्बर. विशेषत: फॅंटम आणि मॅंड्रेक. बाकी रिप किर्बी, बझ साॅयर वगैरे लोकांचा मला कंटाळा यायचा आणि बहादूरची चित्रं अतिशय आळशीपणाने काढल्यासारखी वाटायची. डिस्नीची कार्टून्स आणि अॅनिमेटेड फिल्म्सवर सत्ता चालली, तरी काॅमिक्समधे त्यांचं काम फार छाप पाडणारं नाही. त्यामुळे विचित्रवाडी अशा नावाने चक्क मराठीत डिस्नीच्या मिकी, डोनल्ड वगैरे मंडळींना घेऊन काॅमिक्स बनायला लागूनही त्यांचा माझ्यावर तरी फार प्रभाव कधी पडला नाही.
वसंत वाचनालयात सुपरहिरोंची बरीच काॅमिक्स असायची. तशीच अॅस्ट्रिक्स, टिनटिन अशी काॅमिक्समधली राजघराणीही होती. पण मी ती नियमितपणे वाचत नसे. (पुढे मी ती वेळोवेळी खरेदी मात्र करून ठेवली आणि आता माझ्याकडे टिनटिन आणि अॅस्ट्रिक्सचेही सर्व भाग आहेत हा मुद्दा वेगळा.) सुपरहिरोंची अडचण ही होती, की कथानकाच्या मोठ्या धाग्यानुसार भाग एकत्र छापलेल्या आवृत्त्या इथे नव्हत्या आणि सुट्या काॅमिक्समधून हे भाग सलग क्रमाने शोधणं अशक्य व्हायचं. सुपरहिरोंशी माझी अधिक ओळख झाली, ती ते आपल्याकडे हिंदीमध्ये आले तेव्हा.
इंद्रजाल काॅमिक्सचे नायक हे सुपरहिरोंच्याही आधी हिंदीत पोचले होते. त्याहूनही मागे जायचं, तर हे चक्क मराठी बोलत याचा शोध मला एका मित्राच्या काकांच्या जुन्या संग्रहातून लागला. ही पुस्तकं फार छान, सोप्या आणि शुद्ध मराठीत होती, पण तो एक मित्र सोडता पुढे इतर कोणाकडेही मी या मराठी आवृत्त्या पाहिल्या नाहीत. हिंदी आणि इंग्रजी आवृत्त्या मात्र सहज मिळत. यातली काही बाइन्ड केलेली काॅमिक्स आमच्या बालनाट्य संस्थेमध्ये काम करणारी मैत्रीण, रुईया कॉलेजच्या तेव्हाच्या डीनची मुलगी आदिती वळसंगकर हिनेही वाचायला दिली होती. पण याचा एक मुख्य सोर्स होता, तो आमच्याच वर्गातला कुडाळकर .
कुडाळकर आणि मी काही वर्षं एका वर्गात होतो आणि पुढे शाळेनंतर अकरावी-बारावीतही एकत्र होतो. त्याला दोन गोष्टींचं खूप वेड होतं, क्रिकेट आणि काॅमिक्स. मला खेळाचा गंध नसला, तरी काॅमिक्स आणि एकूणच गोष्टीची पुस्तकं ही मला प्रिय होती. शाळेतही मोकळ्या तासाला किंवा मधल्या सुट्टीत वाचायला माझ्याकडे दप्तरात गोष्टीची पुस्तकं असत. शाळेत एकूणच अभ्यास वगळता इतर पुस्तकं वाचण्याबद्दल अनास्था असे. त्यामुळे शाळेत लायब्ररी मुलांना नीट अॅक्सेसिबल करून देणं, ती काय वाचतायत याकडे लक्ष देणं, ही आवड विस्तारण्याचा प्रयत्न करणं असं काहीही शाळेत झाल्याचं आठवत नाही. आम्ही पुस्तकं आणायचो, तीही लपवून. मग मधल्या सुट्टीत ती एक्स्चेंज करणं, वर्गात कोणी वाचायला मागितली तर त्यांना ती देणं, असे आमचे उद्योग सुरू असत. कुडाळकरकडे हिंदी सुपरहिरो काॅमिक्सचा खूप मोठा साठा असायचा, आणि माझी या जान्रशी खरी ओळख झाली ती तिथे. या हिंदी आवृत्त्यांना कन्टीन्यूइटीची अडचण नव्हती; कारण त्यात लहान, फार तर एक-दोन भागांत संपणाऱ्या, गोष्टी निवडलेल्या असत आणि पुस्तकं नियमित घेतली जात असल्याने सगळेच भाग उपलब्ध असत. ही हिंदी आवृत्ती कालांतराने बंद झाली, पण काही वर्षांनी गाॅथम काॅमिक्स या नावाखाली चांगली छपाई असलेली इंग्रजी आवृत्ती मिळायला लागली आणि आमची काही काळासाठी सोय झाली. मी माझं काॅमिकबुकप्रेम तसंच ठेवल्याने पुढे उपलब्धता जशी वाढत गेली, तसा मला फायदा झाला.
आता एवढं वाचत असताना मला अभ्यासाला वेळ कसा मिळायचा असं कोणी विचारलं; तर मी म्हणीन की मध्यमच मिळायचा. त्यात आमच्या घरी इतर उद्योगही असत. बालनाट्य, प्रायोगिक नाटकं करणं, त्याच्या तालमी-प्रयोग वगैरे चालू असायचं. त्यामुळे मी काही वर्गातला फार हुशार मुलगा नव्हतो. पण माझ्या मते ठीकठाक होतो. कधी नापास झालो नाही, अभ्यासही साधारण होता. स्काॅलर वगैरे नव्हतो, पण मला (नववी-दहावीत क्लास न लावता) आधी सायन्सला आणि मग ठरल्याप्रमाणे आर्किटेक्चरला जाता आलं, म्हणजे गरजेइतका होता असंच म्हणायला हवं. नाही म्हणायला या दिवसांतला एक चमत्कारिक अनुभव आहे. त्याचा अर्धा भाग मला आधीपासून माहीत होता, तर अर्धा अलीकडेच कळला. मला त्याचं वाईट वाटलं, कारण तो ज्या शिक्षिकेबद्दलचा होता ती माझ्या आवडत्या शिक्षिकांपैकी होती आणि तिचं माझ्याबद्दल मत चांगलं आहे असा माझा समज होता.
ही गोष्ट सातवीतली. रोज मधल्या सुट्टीत आम्ही खाली फिरायला जात असू. मी आणि माझा एक अगदी जवळचा, अनेक वर्षं माझ्याबरोबर असणारा मित्र. तो मित्र त्या दिवशी शाळेत आला होता का आठवत नाही, पण मी खाली गेलो होतो हे आठवतं. मी वर आलो, तर वर्गातले कोणी माझ्याशी धड बोलेनात. पुढे खोदून खोदून विचारल्यावर कळलं, की या शिक्षिका एका प्यूनला घेऊन आमच्या वर्गात आल्या होत्या आणि त्यांनी माझ्या दप्तराची तपासणी केली. त्यात अर्थातच बरीच गोष्टीची पुस्तकं निघाली. याचं पुढे काही झालं नाही. मला कोणी काही विचारलं नाही, म्हणून मीही या गोष्टीकडे फार लक्ष दिलं नाही. पण दोनचार वर्षांपूर्वी मला माझ्या त्या मित्राकडून कळलं, की या बाईंनी त्याच्या वडिलांना शाळेत भेटायला बोलावलं होतं. ते आल्यावर या म्हणाल्या, की तुमच्या मुलाची संगत चांगली नाहीये. त्याला गणेश मतकरीपासून लांब राहायला सांगा, नाहीतर तो वाया जाईल. त्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे वडील हसले आणि त्यांनी सोडून दिलं. हे शक्यही आहे, कारण त्यांना आम्ही किती चांगले आणि जुने मित्र आहोत हे माहीत होतं. पण हेदेखील खरं, की पुढच्या वर्षी तो मित्र आमच्या शाळेतून बालमोहनमधे गेला. आता याला थेट काॅज अॅन्ड इफेक्ट म्हणता येणार नाही, कारण पुष्कळ मुलं मेरीट लिस्टमध्ये येण्यासाठी बालमोहनची कीर्ती असल्याने आमच्याकडून अनेक जण तिथे जायचेही. पण हा मित्र तसा गेला की या शिक्षिकेच्या सल्ल्याचा त्यात काही हात होता? कोण जाणे. मला जर तेव्हाच हे कळतं, तर मी अधिक खोलातही गेलो असतो; पण आता या सगळ्याला खूप वर्षं उलटली. असो, माझ्या पुस्तकप्रेमाला व्यसन आणि मला वाईट संगत ठरण्याची पाळी आली, ती अशी. याने आमच्या मैत्रीला काही फरक पडला नाही. ती तशीच राहिली हे सिल्व्हर लायनिंग.
हे सगळं होत असताना आपल्याकडे भारतीय काॅमिक्सची एक लाट आली, जी माझ्यापर्यंत अजिबात पोचली नाही; पण आज वळून पाहिल्यावर या लाटेचे बरेच चाहते आहेत असं लक्ष्यात येतं. टिंकल हा एक त्यातल्या त्यात रिस्पेक्टेबल प्रकार. तरी त्यातही इज्नोगुड या फ्रेंच काॅमिकबुकवरून तंत्री द मंत्री बेतणं या प्रकारची उचलेगिरी चालायची. शिवाय लोटपोट, मधुमुस्कान वगैरे प्रकारही होते. चाचा चौधरी आणि साबू (बहुधा अॅस्ट्रिक्सवरून सुचलेलं कथानक – एक बुटका हुशार मिशीवाला आणि त्याचा सर्वशक्तिमान साइडकिक), मोटू – पतलू (लाॅरेल – हार्डीची भ्रष्ट नक्कल) अशा व्यक्तिरेखाही या देशी काॅमिक्समधून पुढे आल्या. काही सुपरहिरोंच्या थेट नकलाही होत्या. या सगळ्यातल्या काही व्यक्तिरेखा आज टेलिव्हिजन – सिनेमापर्यंतही पोचलेल्या दिसतात. मी काॅमिक्सबरोबर पहिल्या ओळख झाल्यापासूनच चांगली पाश्चात्य निर्मिती पाहत असल्याने आपल्या आवृत्त्यांपर्यंत पोचलोच नाही. त्या पाहिल्या, तरी मला पटल्या नाहीत, आवडल्या नाहीत. आता बाजू घेणारे निश्चितच म्हणतील, की त्यांनी भारतीयांची मानसिकता ओळखण्याचा प्रयत्न करून आपल्या वाचकाला आवडेल ते द्यायचा प्रयत्न केला; पण ते काही खरं नाही. आपल्याकडे मूळ पुस्तकं वाचणारा वाचक मोठ्या संख्येने आहे आणि अॅस्ट्रिक्स, टिनटिनपासून सारं अनेक भारतीय भाषांतही मिळतं. पण तसा समज ठेवायचाच असेल तर ठेवेनात बापडे! या सगळ्या उचलेगिरीत अमर चित्र कथा ही एकच अस्सल भारतीय, चांगली चित्रं आणि संहिता असलेली, आणि रंजनासह प्रबोधनाचं काम करणारी मालिका दिसते. मी अमर चित्रकथांचा फार नियमित वाचक नव्हतो, कारण मला बोधकथा, एेतिहासिक – पौराणिक कथांमध्ये फार रस नव्हता. माझं प्राधान्य होतं ते शुद्ध करमणुकीला. असं असूनही मी त्यांच्या अनेक कथा वाचल्या आहेत आणि त्यांच्याबद्दलचं माझं एकूण मत चांगलं आहे.
या साऱ्या पुस्तकांमधे अजून एकच नाव मिसिंग आहे, ज्याच्या उल्लेखाशिवाय हा लेख अपुरा राहील. ते म्हणजे मॅड मॅगझिन. मॅडची पहिली ओळख झाली ती बाबांमुळे. तिसरी-चौथीत. त्यांनी कुठूनतरी एक अंक आणला होता आणि मी विचारल्यावर त्यातला विनोदाचा प्रकार त्यांनी स्पष्ट करून सांगितला. ‘मॅड’मध्ये विडंबनापासून व्यंगचित्रांपर्यंत अनेक प्रकारचा विनोद आहे, पण तो बाळबोध नाही. तुम्हीही विचार करावा अशी त्यांची अपेक्षा असते. माॅर्ट ड्रकरची चित्रपटांच्या विडंबनातली अफलातून चित्रं, प्ले बाॅय मासिकात सुंदर तरुणींची छायाचित्रं सलग दाखवण्यासाठी दोन-तीन पानं जोडणारे फोल्ड आउट्स असत – त्याचं विडंबन करण्यासाठी एकाच पानाला घड्या घालून केलेले अॅल जेफीचे फोल्ड इन्स, सर्जिओ अॅरेगाॅन्सची मासिकभर पसरलेली समासातली चित्रं, थेट विनोदापेक्षा शैलीत गंमत करणारा डाॅन मार्टिन असं बरंच काही ‘मॅड’चं नाव काढताच डोळ्यासमोर उभं राहतं. पपांनी एकदा यातला एक नवा अंक कुठूनतरी आणून माझ्या हातात ठेवला. तेव्हा मला पहिल्यांदाच असं वाटलं, की हे अंक जमवले तर मजा येईल. योगायोगाने पुढल्या काही दिवसांतच ब्रिटीश आवृत्तीची तीस वर्षं साजरी करणारा विशेषांक मला गोखले रोडवरच्या एका रद्दीवाल्याकडे मिळाला, ज्यात नियतकालिक प्रकारात निघालेल्या पहिल्या ‘मॅड’चंं पुनर्मुद्रण होतं. त्याआधी मॅड काॅमिक्ससारखा येत असे. हा अंक मला काहीतरी पाचेक रुपयांना मिळाला. मग मला रद्दीवाल्यांकडे ‘मॅड’चे अंक हुडकण्याची खोडच लागली. पैसे फार नसतच – पाच, दहा, पंधरा. फारच डोक्यावरून पाणी म्हणजे पंचवीस रुपये. पण या दिवसात मला ‘मॅड’चे खूप इशूज मिळाले, त्यांची कलेक्शन्सही मिळाली. ‘मॅड’ला बालवाङ्मय म्हणावं का, तर हो आणि नाही. त्याला वयाची मर्यादा नाही, पण व्यक्तीच्या स्वभावाची आहे. तुम्ही त्या प्रकृतीचे असलात की कोणत्याही वयाला तुम्हांला ‘मॅड’ कळतो, आणि नसलात तर तो कधीच कळायचा नाही.
शाळेच्या दिवसात गोष्टी शोधणं यात एक मोठी गंमत होती. ती गोष्ट जेव्हा सापडायची, तेव्हा तुम्हांला तिची किंमत असायची. पुढे उपलब्धता वाढत गेली हे चांगलं झालं, तरीही शोधण्यातली गंमत गेल्याने त्या वस्तूची किंमत कमी-कमी व्हायला लागली. ‘मॅड’ शोधून मिळाल्याचा आनंद ना घरबसल्या टाॅरन्टवर हे अंक डाउनलोड करण्यात आहे ना आॅनलाईन आॅर्डर करण्यात. आणि काही अंशी ही मला आजच्या पिढीची शोकांतिका वाटते. त्यांना सगळं मिळू शकतं हे चांगलंय का? निश्चितच. पण ते मिळण्याच्या खात्रीमुळे जर त्यामागचं आकर्षणच संपून जाणार असेल, तर काय उपयोग?
फॅमिलिअॅरीटी ब्रीड्स कंटेम्प्ट असं म्हणतात, तसंच उपलब्धतेचंही असतं. तुम्ही सगळं गृहीत धरता. ते तुमच्याकडे असतं तरी, किंवा ते झटक्यात कसं मिळवता येईल याची तुम्हांला कल्पना तरी असते. आणि एकदा ती असली की नव्याबद्दलचं कुतूहल संपून जातं. मला दिसणारा प्राॅब्लेम आहे तो हा – आजकालची मुलं वाचत नाहीत हे ठीक आहे. किंवा निदान ते अर्धसत्य तरी आहे. ही मुलं जे वाचतात त्यातली बरीचशी भाषा आज पानावर लिहिलेली नसून दृश्यभाषा आहे. ती परदेशी मालिका वाचतात, कन्सोल गेम्स वाचतात, फिल्म्स वाचतात. इन्टरनेटने या सगळ्याला एक इन्टरॅक्टिविटी दिलीय. ही मुलं वाचून थांबत नाहीत, तर काही प्रमाणात सहभागी होतात. सोशल नेटवर्कवर बडबड करतात, मल्टिप्लेअर गेम्स खेळतात, आपल्या आवडीनिवडीचे इतर लोक शोधतात. या निवडलेल्या मित्रांचा संबंध वयाशी नसून आवडीनिवडीशी असतो. हे सगळं उत्तम आहे. या सगळ्यामुळे पुस्तकं वाचण्याचं प्रमाण कमी झालं असेल, तरी हरकत नाही. कारण लेखन-वाचन हे माणसासाठी इतकं मूलभूत आहे, की ते नाहीसं कधीच होणार नाही. या ना त्या स्वरूपात टिकून राहीलच. त्यामुळे ते अमुकच प्रकारे व्हायला हवं हा हट्ट बाजूला ठेवायला हवा. जर आज काळजी करायचीच असेल, तर ती पुस्तकं कशी टिकवावीत अशी न करता कुतूहल कसं टिकवावं याची करायला हवी. कुतूहल असेल, तर सगळं आलबेल आहे. आणि तेच जर संपलं, तर मात्र काही खरं नाही.
– गणेश मतकरी
Facebook Comments

8 thoughts on “बुकवर्म”

  1. सही लेख . वर उल्लेख केलेला किशोर मध्ये अनुक्रमे प्रकाशित झालेला wizard of oze चा अनुवाद हा माझ्या समजुतीनुसार ररत्नाकर मतकरींनीच केला होता.पण नंतर असंही वाटलं की ,त्याचेही अनुवादक भा. रा. भागवतच होते की काय ? यातली चित्रेही वाईरकरांचीच होती , आणि भा.रा. आणि वाईरकर ही जोडी लक्षात घेता बहुधा भागवतच त्याचे अनुवादक असावेत. खास या अनुवादाच्या शोधासाठी मी बालभारतीच्या ककार्यालयात जाऊन तिथले त्यांच्या संग्रहातले वर्षा- वर्षांचे binding केलेले जुने गठ्ठे शोधून आलो होतो.पण नाहीच सापडले.

  2. ‘टिपिकल’ लेख. ठिक, पाल्हाळीक.
    अर्थात अंक म्हटला की असाही लेख असणारच त्यात नावीन्य नसलं तरी त्याचा असा वाचक असेलच – आहेच

  3. शेवट आवडला.
    कुतुहल टिकवले पाहिजे. एकदम पटेश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *