डिजिटल दिवाळी : आकाराने मोठा आणि रूपाने सुबक अंक

- ऋषिकेश

तुम्ही कधी, रांगोळ्या-बिंगोळ्या घालून, लय भारी वातावरण तयार करून, चांदीच्या ताटात भरपूर वाट्या असणारी 'थाली' लोकांना खिलवणार्‍या काही हॉटेलांत गेलायत का? तिथलं वातावरण, आसनव्यवस्था, अदबशीर वेटर्स, मंद संगीत, अतिशय सुरेख पद्धतीनं भरलेलं 'देखणं' ताट यांमुळे तुम्हांला सपाटून भूक लागते का? अशी भूक लागल्यावर पहिल्याच घासात खडा लागला, आणि मग एकापेक्षा एक छान नावं असलेल्या प्रत्येक वाटीतला पदार्थ खाताना - एखादीत गुंतवळ, तर दुसरीतल्या पदार्थात मीठ कमी, एका वाटीतल्या पदार्थात नुसताच मसाला, तर दुसरीतली भाजी पोटात कच्ची - अश्या निरनिराळ्या बाबी खटकायला लागल्या तर? नि शेवटी बाहेर पडताना पोट भरलं तर खरं, पण तोंडाला चव अशी आली नाहीच; उलट अती गोग्गोडपणानं एक प्रकारचा चिकटाच आला, तर तुम्ही काय म्हणाल?

मला नेमकं तेच 'डिजिटल दिवाळी' या दिवाळी अंकाबद्दल म्हणायचंय!

खाणं हा जगाला एकत्र आणणारा विषय. त्यावर सर्वच भाषांतून सतत आणि ढीगभर लिहिलं, बोललं, वाचलं आणि म्हटलं जात असतं. नि तरीही समाधान होत नाही. सगळ्यांनाच त्यावर आणखी काहीतरी म्हणायचं असतंच. मराठी आंतरजालही खाणेपिणे या विषयाच्या बाबतीत अगदी संपन्न आहे. केक्स, पाव, दारू (माधवी हा धागा किती जणांना आठवला असेल! :)) इत्यादी पाककृतींपासून ते फोडणीच्या भातापर्यंत अनेक पदार्थांच्या पाककृती मायबोली, मिसळपाव, ऐसी अक्षरे या सायटींवर आहेतच; त्याचबरोबर या विषयाला वाहिलेल्या ब्लॉग्जची संख्या प्रचंड आहे. केवळ पाककृतीच नाही, तर पाककलेवर ललित अंगाने झालेलं लेखनही या साईट्सवर भरपूर आढळतं. पैकी 'अन्नं वै प्राणा:' ही चिनूक्सची मालिका किंवा 'सुगरणीचा सल्ला' ही लेखमालिका, ही कोणत्याही छापील साहित्याच्या तोंडात मारतील इतकी भारी प्रकरणं आहेत. त्यात 'मिसळपाव'ने गेल्याच वर्षी 'रुची विशेषांक' काढला होता.

त्या पार्श्वभूमीवर 'डिजिटल दिवाळी'ने यंदाच्या दिवाळी अंकासाठी खाद्यसंस्कृती हा(च) विषय घेतलाय, हे समजताच अतिशय अपेक्षेने, यापेक्षा वेगळं काय देताहेत या उत्सुकतेने आणि हिरिरीने तो अंक वाचायला घेतला. पण जसजसा अंक वाचू लागलो, तसतसा उत्साह ओसरत गेला. फोडणीत हिंग टाकताच काही काळ तो चुरचुरावा,  जिरं-मोहरी तडतडावी नि नंतर सगळं एकदम थंड पडावं, फोडणीत काही मजा उरू नये; तसा तो उत्साह उत्तरोत्तर कमी-कमी होत गेला. काही गोष्टी खूपच आवडल्या, हे कबूल करावं लागेल. पण एकुणात अंकाबद्दलचं मत मात्र "ठीक, चकचकीत आहे. पण फार नवं काही नाही दिलं या अंकानं." असं झालं. आता 'अंकनामा'मध्ये झाडाझडती घ्यायचीच आहे, तर तपशिलात सांगतो. अंकाचा आकार खूप मोठा आहे; तेव्हा त्याला न्याय देण्यासाठी हा लेखही मोठा होणं क्रमप्राप्त आहे, ही आगाऊ सूचना.

सर्वसाधारण प्रथेनुसार आवडलेल्या काही गोष्टी परीक्षणात आधी नमूद करणं प्रचलित असलं, तरी मला त्याची घाई नाही. अनुक्रमणिकेप्रमाणे अंक वाचताना मला खटकलेल्या बाबी खुलेआम जाहीर करून, तोंड (आणि मन) साफ केल्यावर मगच त्या-त्या भागात मला आवडलेल्या बाबींबद्दल लिहिणार आहे.

प्रथमग्रासे मक्षिकापात व्हावा, तशी या अंकाची साईट उघडल्या-उघडल्या सगळ्यांत आधी 'टाटा कॅपिटल'ची जाहिरात म्हणून पांढर्‍या चौकोनी पार्श्वभूमीवरचा तो लोगो नामक बिल्ला आपल्यावर आदळतो! एखाद्या वेबसाइटचा लोगो साधारणतः जिथे असतो, तिथे प्रायोजकाचा लोगो चिकटवला आहे. बरं, हा लोगो पहिल्याच पानावर दिसतो असं नाही; तर तो यत्र-तत्र-सर्वत्र तुमच्याकडे डोळे वटारून बघत असतो! त्या लोगोचा ठसा, रंग, आकार वगैरे अंकाच्या एकूण दृश्य सजावटीला बाधकच नव्हे, तर ठार मारक ठरलं आहे. छान रसरशीत फळांवर भडक, विद्रूप आणि न काढता येणारे स्टिकर्स चिकटवलेले असावेत नि दर घास खाताना ते टाळता आले,  तरी त्यांचं अस्तित्व डाचत राहावं; तसं काहीसं! चांगलं तंत्रज्ञान वापरायचं, तर अंकाला आर्थिक पाठबळ लागतं. त्यामुळे प्रायोजकत्व घ्यावं आणि प्रायोजकांची जाहिरातही करावी - याला अजिबात ना नाही! पण जाहिरात करताना आपल्याच अंकाच्या दृश्यरूपावर किती हल्ला करून घ्यावा, ते मात्र पाहणं महत्त्वाचं.

याव्यतिरिक्त पहिल्या पानाबद्दल चांगलं लिहिणंही गरजेचं आहे. केवळ पहिलं पानच नाही, तर एकूण अंकच समकालीन बांधणीचा आणि चकचकीत आहे. शिवाय मोबाईल आणि लॅपटॉपवर, तो त्या-त्या स्क्रीन साईजशी स्वतःच जुळवून घेईल अशी थीम निवडली आहे. यंदाचा हा अंक तांत्रिक अंगाने इतर कोणत्याही ऑनलाइन अंकापेक्षा उजवा आहे, यात शंका नाही आणि त्यासाठी प्रसाद देशपांडे यांचं कौतुक करणं अनिवार्य ठरतं. या अंकाला मुखपृष्ठ असं नाही. पण 'होम पेज'वर (मुख्य पानावर) जे छायाचित्र आहे; ते देखणं आहे, व्यावसायिक सफाईचं आहे. (पण ते कोणी काढलं आहे याचा उल्लेख मला तरी कुठेही मिळाला नाही. "या अंकासाठीचा सर्व व्हिज्युअल कंटेंट प्रसाद देशपांडे यानं केलेला आहे." असं एक सर्वसमावेशक वाक्य संपादकीयात आहे. पण म्हणजे ज्या छायाचित्रांचा स्रोत दिलेला नाही, ती सगळी छायाचित्रं देशपांडे यांनीच काढली आहेत असा त्याचा अर्थ घ्यायचा का? तसं असल्यास ते स्पष्ट म्हणायला हवं होतं. मग अशा शंका डोकावल्या नसत्या.).

मात्र या अंकाचं मुखपृष्ठ मोबाईलवर नीट दिसतच नाही. लॅपटॉप/डेस्कटॉपवर डाव्या भागात चित्र व उजवीकडे लेख हा सध्याचा ट्रेंड वापरला असला, तरी डाव्या भागाचा उपयोग अधिक कल्पकतेने करता आला असता. शिवाय लेख कोणाचाही असला, तरी प्रत्येक लेखावर बाजूला 'पोस्टेड बाय सायली राजाध्यक्ष' असं दिसत असतं. कोणत्याही तंत्रज्ञानात हे लपवता येणं इतकं काही कठीण नसावं. त्यामुळे बाकी अंक दिसायला सुबक असला, तरी या बारीक-सारीक बाबी खटकत राहतात.

तांत्रिक बाबींकडून मूळ लेखांकडे वळू या. अनुक्रमणिकेप्रमाणे जायचं, तर आधी 'भारतातील खाद्यसंस्कृती' अशा नावाचा विभाग आहे आणि त्यानंतर विदेशातील खाद्यसंस्कृतींना वाहिलेला दुसरा विभाग ('परदेशातली खाद्यसंस्कृती') आहे. या दोन्हीतल्या विशिष्ट लेखांच्या तपशिलात जायच्या आधी एकूण विभागाबद्दल काही मुद्दे मांडायचे आहेत.

या विभागातल्या बहुतांश लेखांचं स्वरूप एकाच साच्यातलं आहे. आधी लेखक/लेखिकेची नि मग त्या प्रदेशाची जुजबी ओळख; मग लेखक/लेखिका नि त्या राज्याचं/देशाचं नातं कसं जुळलं हे सांगणारी एखादी आठवण; 'आमच्या सासूबाई किंवा कुणा सुहृदांनी कस्सं बाई आम्हांला त्या त्या भागातलं जेवण शिकवलं!' याचा गहिवर अधिक तिथल्या खाद्यपदार्थांची झालेली ओळख; आणि शेवटी एखाद-दुसर्‍या खाद्यपदार्थाची पाककृती (आणि या सगळ्यात मधूनच - दाबेलीच्याच हातांनी भेळ केल्यावर मधूनच येणार्‍या डाळिंबदाण्यांसारखे; म्हटले तर भेळेचा भाग असलेले, पण वेगळ्याच भाषेचे, पोताचे व वेगळ्याच उद्देशाने चित्रित केलेले यूट्यूब व्हिडिओज) अशी एक 'टेंप्लेट' तयार करता यावी. एकदा का असा साचा आला, की कितीही वेगळ्या प्रकारे रंगवा-सजवा; मूर्तीचा बाज एकाच साच्यातला होतो. तसंच काहीसं या विभागांचं झालंय. वेगवेगळ्या प्रदेशांत काय, कधी खाल्लं जातं, त्यांची  नावं काय, यांबद्दल भरपूर माहिती या विभागात मिळते. पण त्या-त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त इतकंच नसतं ना!

वर म्हटलं, त्यानुसार यांतले भारतीय राज्यनिहाय पदार्थलेख एकाच साच्यातले - टेंप्लेटमधले - आहेतच; पण ते इतरही कारणांनी नीरस झालेत. (एक उगाच लक्षात आलेली गंमत - एकही पुरुष भारतातल्या खाण्याबद्दल लिहायला तयार झालेला दिसत नाही! ;)) या लेखांत लालित्य हे नावालाच आणि बर्‍यापैकी सामान्य दर्जाचं आहे. बहुतांश लेख हे पदार्थांची माहिती देणारे आणि विकीपिडीय झाले आहेत. दुसरी गोष्ट अशी - यांतले बहुतांश लेख हे 'सोवळ्यातले' आहेत! सामान्य मराठी उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय माणसाची झेप जिथवर जाऊ शकते; त्यापलीकडे एकही लेख जात नाही. भारतात इतक्या प्रकारचं आणि इतक्या प्रमाणात मांसभक्षण होत असतं; पण यांतले लेख वाचले, तर एखाद्याचा समज नक्की होईल की केरळ नि बंगाल-आसामातलं मासे आणि हैदराबादेतलं मांसभक्षण वगळलं, तर इतर राज्यांतली बहुसंख्य जनता ही शाकाहारी आहे. एखाद्या राज्याची 'खाद्यसंस्कृती' अशा सर्वसमावेशक मथळ्याखाली लेख लिहिताना, केवळ उच्चवर्गीय-मध्यमवर्गीय २५-३०% घरं डोळ्यांसमोर न ठेवता लेख लिहिले असते; तर मजा आली असती. मात्र आताच्या लेखांतून ती सर्वसमावेशकता डोकावत नाही.

सुदैवाने विदेशी खाण्याबद्दलचे बहुतांश लेख जरी याच साच्यात बसवलेले असले; तरी माहिती आणि शैली या दोन्ही अंगांनी चांगले वठले आहेत. शैलेन भांडारे यांचा ब्रिटिश खाण्यावरचा लेख  म्हणजे वर घेतलेल्या माझ्या जवळजवळ सगळ्याच आक्षेपांना सणसणीत उत्तर आहे. ओघवती भाषा, तपशीलवार माहिती, त्या भागात काय खाल्लं जातं, ते कसं बनवतात, इतक्याच मुद्द्यांवर सीमित न राहता हा लेख भाषा, वाक्प्रचार, लोकांच्या सार्वजनिक - खाजगी सवयी या गोष्टींवर खाण्याचा आणि खाण्यावर या गोष्टींच्या पडलेल्या प्रभावापर्यंत जातो आणि त्यामुळे संग्राह्य ठरतो. असाच छान लेख म्हणजे सचिन पटवर्धन यांनी लिहिलेला 'घाना'मधल्या खाद्यसंस्कृतीवरचा लेख. इथली खाद्यसंस्कृती तुलनेने अल्पपरिचित असल्यामुळे विषयाचं नावीन्य हे त्यामागचं एक कारण आहे. मिलिंद जोशी यांचा 'सहनौ भुनक्तु!!!' हा लेखही खूप वाचनीय झाला आहे. छान लेखनशैली, चाकोरीच्या बाहेर जाऊन दिलेली विषयाची माहिती, विविधांगी धांडोळा यांमुळे हे दोन्ही लेख वाचनखुणांत साठवावे असे होतात. गौरव सबनीस यांचा त्रिनिदादच्या खाद्यसंस्कृतीवरचा लेख आणि अरुणा धाडे यांचा अरेबिक संस्कृतीवरचा लेख हेसुद्धा अतिशय वाचनीय आणि माहितीपूर्ण आहेत.

पुढचा विभाग 'अशीही खाद्यसंस्कृती' या वेगळेपणा सुचवणार्‍या नावाखाली येतो, शिवाय लेखकांची नावं वाचून अपेक्षाही वाढतात. पैकी हेमंत कर्णिक, सुनील तांबे वगैरे प्रभृतींनी माझी साफच निराशा केली. 'रेल्वेची खानपान सेवा' असा कर्णिकांचा लेख आहे. रेल्वेतलं अन्न, ते बनवण्याच्या पद्धती, रेल्वेच्या खाद्यसंस्कृतीचा इतिहास, रेल्वेच्या भटारखान्यात (आणि गिर्‍हाइकांतही) झालेले बदल, रेल्वे कँटिन्स आणि त्यांतले बदल, रेल्वे स्टेशनवरचे पाणीस्रोत - प्याऊ (पाणपोया), सोडे, मुंबईच्या लोकल स्टेशनवरची खाद्यसंस्कृती अशा अनेक अंगांनी हा लेख कर्णिकांनी फुलवला असेल असं वाटलं होतं. कारण त्यांचं लेखन नेहमीच अनेक शक्यतांना कवटाळणारं असतं. पण इथे मात्र लेख कसातरी उरकल्यासारखा त्रोटक झाला आहे. सुनील तांबे हे वेगळेपणासाठी नावाजलेले लेखक आहेत. त्यांचा या अंकातला लेखही भरपूर माहितीने भरलेला आहे. पण या लेखावर संपादकीय संस्कार होणं आवश्यक होतं. त्या लेखाला आपला असा घाटच नाहीय. जो आठवेल तो पदार्थ, वाटेल त्या क्रमाने सांगणारं; अचानक इतिहासातले तर अचानक वर्तमानकाळातले तपशील देणारं हे लेखन एकुणात विस्कळीत ठरतं. खूप मोठा आवाका एका लेखात बसवण्याच्या प्रयत्नात असं होणं सहजशक्य आहे, पण संपादक-लेखकांनी चर्चा करून त्या लेखाला अधिक बांधेसूद आकार देणं गरजेचं होतं.

याच विभागातला शर्मिला फडके यांचा चिनी पाहुणचारावरचा लेख छान निवांत वाचण्यासारखा झाला आहे.  त्यांचाच 'कला आणि खाद्यसंस्कृती' हा आढावाही माहितीपूर्ण झाला आहे. विषयाच्या वेगळेपणामुळे मेघा कुलकर्णींचा 'मुळारंभ आहाराचा'' हा लेखही एकदा वाचण्यासारखा आहे. इतर लेखकांकडून मात्र त्यांच्या लौकिकाला साजेसं लेखन झालेलं नाही, काही शैलीदार लेखही त्रोटक आहेत.

पुढला 'चिअर्स' हा विभाग मात्र खासच जमून आलाय. त्यातले चारही लेख हे लेखिकांनी लिहिले आहेत ही 'अपने आप में' असणारी संपादिकाबाईंची बारीकशी बंडखोरी खूपच आवडून गेली ;). या विभागात मला रुपल कक्कड यांचा लेख खूपच आवडला. त्याचा अनुवादही सुबक झाला आहे. 'मेन कोर्स' विभागातला 'दम (बिर्याणी) है बॉस' हा आशिष चांदोरकर यांचा 'दम'दार लेख वगळला; तर बाकी विषय आणि लेखांचा घाट परिचित आहे आणि काहीसा विकीपिडीयसुद्धा आहे. पुढल्या 'फोटो' विभागातली बहुतांश छायाचित्रं ही 'वेगवेगळ्या पदार्थांच्या फोटोजेनिक रचना' इतक्यावरच सीमित राहतात. नुसत्या या विभागाचं नाव काढलं तरी काही क्षणात पानाची डबी-अडकित्ता वगैरेसह असलेल्या बैठकीपासून; खानावळी, रेल्वे कँटिन्स, कामगारांचे जेवण, अंगणवाड्यांमधील वाटलं जाणारं खाणं, संन्यासी ते हमाल यांची खाद्यसंस्कृती हे आणि असे कितीतरी विषय डोक्यात घोंगावू लागतात. त्याऐवजी फक्त पदार्थांचे कॉफी-टेबल-बुकीश फोटो देऊन संपादकांनी ती संधी वाया घालवली आहे.

असा प्रवास करत-करत आपण 'स्वयंपाकघर' या विभागाकडे येतो. या विभागातला, 'ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट' हा नीरजा पटवर्धन यांचा लेख मात्र त्याच्या मजेदार शैलीमुळे छानच खुलला आहे. आपली शैली आणि माहिती यांची दुपेडी वीण नीरजा पटवर्धन इतकी तलम विणतात, की माहितीपूर्ण लेखाचा पोतही छान घरगुती होत जातो. या विभागात दुसरा लेख सचिन कुंडलकरांचा आहे. इथे मी कुंडलकरांबद्दलचा त्रागा एकदाच काय तो व्यक्त करून घेणार आहे आणि त्यानंतर कुंडलकर या एकेकाळच्या आशेवर काट मारायची वेळ आलेली आहे, असं कबूल करणार आहे. या त्राग्याचा अंकाशी किंवा त्यातल्या याच लेखाशी थेट संबंध नाही - हा लेख केवळ निमित्तमात्र. या अंकात(ही) कुंडलकर कोणताही अनपेक्षित धक्का देत नाहीत. मी ७-८ वर्षांपूर्वी कुंडलकर पहिल्यांदा वाचले असावेत. फ्रेश विषय, खुसखुशीत शैली, समकालीन भाषा यांमुळे मला ते लगेचच आवडून गेले. एक वाचक म्हणून त्यानंतर त्यांच्या लेखनातली मजा मी पुरेपूर अनुभवली. कुटुंब नावाच्या अस्ताव्यस्त प्राण्याला ते ज्या कोनातून बघतात, त्याचा आनंदही लुटला. पण पुढे काय? त्यांचा या अंकातला लेख एका 'साचलेल्या' लेखकाचं मूर्तिमंत उदाहरण आहे! 'सर्व आया आपापल्या मुलांचे प्रवास ओळखून असतात.' छापाच्या तद्दन भाबड्या, टाळ्याखाऊ विधानांपासून भारतीय संस्कृतीतील गुंतागुंतींबद्दल अज्ञान दाखवणार्‍या 'आपल्या समाजासाठी एकटेपणा ही विकृती किंवा दुःख आहे, म्हणून आपण त्याची सांस्कृतिक नोंद केलेली नाही.' अशा घाऊक विधानापर्यंत कितीतरी पातळ्यांवर - हा लेख वाचकाला जांभई ते त्रागा या पट्ट्यात झुलवतो. अपेक्षेप्रमाणेच, नव्वदीच्या दशकातल्या नैतिकतेत आणि स्मरणरंजनातच हा लेख(ही) बरबटलेला आहे. नव्वदीच्या शहरी नॉस्टॅल्जियाला मागे सोडायला कुंडलकर काही तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्या एकूण लेखनात कमालीचा एकसुरीपणा येत चाललेला आहे. शोकेसमध्ये ठरावीक पद्धतीने रचलेल्या वस्तू असणारे दिवाणखाने, मोठ्या स्वयंपाकघराचे 'फेटीश', घर सोडलं तेव्हाचा मनातला 'कल्लोळ', नव्वदीतलं पुणे-मुंबई आणि फ्रेंच अनुभव यांच्या पलीकडे - वास्तववादी आणि मुख्य म्हणजे समकालीन जगात - कुंडलकर केव्हा पोचणार आहेत, याची वाचक म्हणून मी आतुरतेने वाट पाहतो आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचं 'अरेरावी करत फणा काढून गावभर फिरणाऱ्या आणि अजून १९६८ची क्रांतीच जगात चालू आहे, असे समजणाऱ्या चळवळखोर स्त्री-पुरुषांसारखे मी एकट्याने आयुष्य जगत नाही.' हे वाक्य कितीही खरं असलं; तरी "अहो कुंडलकर! तुमच्या बाबतीत फक्त साल बदललं आहे, स्मरणरंजनाचं साधर्म्य तसंच उरलं आहे, त्याचं काय?" असं ओरडून विचारावंसं वाटतं. आधीच आम्हांला कायमस्वरूपी आवडू शकणारी गोष्ट क्वचित मिळते. त्यात एखाद्या लेखकाकडून अपेक्षा ठेवाव्यात आणि पुढे त्या लेखकाचं हे असं होऊ लागावं हे वेदनादायी आहे! असो.

इतका प्रवास करून दमल्यावर आपल्यासमोर येतात या अंकातल्या दोन खास गोष्टी. एक म्हणजे आदिवासी खाद्यसंस्कृतीवरचा माहितीपट (डॉक्युमेंट्री) आणि दुसरी म्हणजे मोहसिना मुकादम यांची मुलाखत! या अंकातले हे दोन व्हिडिओ मला 'या अंकाने काय दिले?' हे सांगायला पुरेसे आहेत. चित्रीकरणाचा चांगला तांत्रिक दर्जा, स्पष्ट उच्चार आणि माहितीचा आवाका या गोष्टी या दोन्ही व्हिडिओंना बाकी अंकापासून कितीतरी वरच्या पातळीवर नेऊन ठेवतात. प्रचंड मोठा आवाका असलेली माहिती मोहसिनाबाई ज्या सहजतेने आणि नेमकेपणाने मांडतात, ते थोर आहे. खाणं म्हणजे फक्त पदार्थ, त्यांची वर्णनं आणि पाककृती असला प्रकार टाळून; अन्न आणि संस्कृतीचा सतत एकमेकांवर पडणारा प्रभाव, त्यातून बदलत जाणारी दोहोंची रूपं, व्यक्ती-समाज-भूगोल-धर्म-अन्न अशा सगळ्या घटकांचे परस्परसंबंध… अशा अनेक गोष्टींचा एकत्रित आढावा त्यांनी या मुलाखतीत घेतला आहे. ऐकलीच पाहिजे अशी ही मुलाखत.


सई कोरान्ने यांच्या मुलाखतीतून खूप काही मिळवण्याची संधी मुलाखतकर्तीने वाया घालवली असं मला वाटलं. मुळात कोरान्ने यांचं 'क्रम्ब्स' हे पुस्तक केवळ पावाच्या पाककृती अशा स्वरूपाचं नाही. 'ब्रेडवरती बोलू काही' अशा सैलसर अंगाने ते पुस्तक जातं आणि मुलाखतीतही सईताई एकूणच पावाच्या अनुषंगाने बरंच काही इंटरेस्टिंग बोलू पाहताना दिसतात. पण सायली राजाध्यक्ष यांनी "ब्रेडचे प्रकार किती व कोणते? त्यांत नक्की फरक काय?" किंवा "यीस्ट कोणकोणत्या प्रकारचं असतं? त्यांत फरक काय?" वगैरे 'आम्ही-सारे-खवैये'-छाप साटोपचंद्रिका प्रश्न विचारल्यावर थोडा रसभंग होतो. सईताई मात्र त्या प्रश्नांना थोडक्यात छापील उत्तर देतात आणि मग पुरवणी म्हणून काहीतरी फार महत्त्वाचं आणि रंजक बोलतात, म्हणून मुलाखत शेवटपर्यंत ऐकली. सई कोरान्ने यांच्यासारखी माहितगार व्यक्ती उपलब्ध आहे; तर भारतीयांचा आणि पाश्चात्यांचा पावाकडे बघण्याचा निरनिराळा दृष्टिकोन, यीस्ट आणि भारतीय हवामान यांचा मेळ, पाव तयार करण्याची औद्योगिकीकरणामुळे आमूलाग्र बदललेली प्रक्रिया इत्यादी अनेक विषयांवर प्रश्न विचारता आले असते.

महेश एलकुंचवारांची मुलाखत बर्‍यापैकी नीरस झाली आहे. सगळ्यांत आधी मला पडलेला प्रश्न म्हणजे एलकुंचवारांसारख्या लेखकाची मुलाखत खाद्यविशेषांकात घेण्याचं काय बरं प्रयोजन? मुलाखत ऐकल्यावरही तो प्रश्न सुटला नाही. 'एक चांगला लेखक, काही पदार्थ स्वतः रांधायची इच्छा राखून असतो.  तो ते रांधतो आणि मित्रमंडळींना खिलवतोही.'  या माहितीव्यतिरिक्त वाचकांनी या मुलाखतीतून खाद्यसंस्कृतीच्या अंगाने नक्की काय घ्यावं, हे कोडं काही सुटलं नाही. पुन्हा एकदा, असो.

शेवटी अभिवाचनाचे व्हिडिओज आहेत. व्हिडिओ वापरून ऑनलाइन माध्यमाचा उपयोग चांगला केला गेला आहे. बहुतांश वाचनं नाट्यसृष्टीतल्या कसलेल्या अभिनेत्यांनी केलेली आहेत. त्यामुळे वाचिक अभिनयाचा दर्जा खूपच छान आहे. 'माझे खाद्यजीवन' हा कितीही परिचित असला, तरी न टाळता येणारा लेख परचुरे छानच वाचतात. शुभांगी गोखले यांना त्यांच्या वाचनाचा विषय ज्यांनी सुचवला, त्यांचं मला कौतुक वाटलं. या विषयासाठी याहून नेमकी समकालीन अभिनेत्री मिळणं कठीण. अनपेक्षितरीत्या प्रांजळ नि थेट लेखन आणि त्याचं दमदार अभिवाचन हे दोन्ही प्रचंड आवडलं. 'आयदान'मधल्या उतार्‍याचं अभिवाचनही खास झालं आहे. या बहारदार अभिवाचनांचा प्रयोग चांगलाच रंगला आहे, त्याबद्दल संपादकांचं अभिनंदन!

तर, खाद्यसंस्कृती हा मोठा आवाका घेऊन येणारा विषय आहे. खाद्यसंस्कृतीतले बारकावे जाऊ देत, पण केवळ ठळक विषय जरी घ्यायचे म्हटले; तरी जंकफूड, स्ट्रीटफूड, कृत्रिम अन्न, जैविक (ऑरगॅनिक) अन्न, अन्नाचं व्यावसायिक छायाचित्रण, विविध भौगोलिक प्रदेशांतल्या काही सामायिक पदार्थांचा इतिहास नि भूगोलानुरूप त्यांत झालेले बदल, भाषा आणि अन्न यांचा परस्परसंबंध, अन्नाची उपलब्धता किंवा अनुपलब्धता आणि त्यामुळे होणारे सामाजिक-राजकीय परिणाम, दुष्काळ, अन्न पिकवण्याची प्रक्रिया आणि तिचा खाद्यसंस्कृतीवर होणारा परिणाम अश्या कितीतरी अंगांनी पसरलेला हा विषय आहे. मोहसिना मुकादम यांची मुलाखत, आदिवासींवरचा माहितीपट आणि वर उल्लेखलेले काही लेख सोडले; तर या अंकात असा बहुपेडी विचार झालेला जाणवला नाही. क्वचितच पदार्थांचा इतिहास दिला आहे. काही वेळा एकाच पदार्थाचा उगम वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याचं वेगवेगळ्या लेखांतून सांगितलं गेलं आहे (उदा. समोसा). या विसंगतीवर काम केलं जाणं अपेक्षित होतं. अंकात अनेकविध प्रसिद्ध-अप्रसिद्ध-पूर्ण नवीन पदार्थ आणि त्यांच्या कृती आहेत. ते महत्त्वाचं आहेच, पण 'खाद्यसंस्कृती' असं नाव घेऊन अंक काढल्यावर या पदार्थांच्या माहितीशिवाय इतर कितीतरी प्रकारचं आणि मोठा आवाका असलेलं कसदार लेखन अपेक्षित होतं. माहीत नसलेल्या काही पदार्थांची नावं, त्यांच्या पाककृती, ते कुठे-कसे-कधी खाल्ले जातात अशी अनेक प्रकारची नवी माहिती अंक वाचून मिळते. त्या दृष्टीने हा अंक नक्कीच संग्राह्य आहे; पण त्याहून अधिक काही शोधू जाल, तर मात्र निराश व्हाल!

इमेल: rushikeshonrere@gmail.com


Post a Comment