समकालीन आणि सखोल - युगांतर

- मेघना भुस्कुटे

आपण एखाद्या विचारसरणीच्या बाजूचे असलो, की त्या विचारसरणीला अनुकूल अशा लेखनाचं मूल्यमापन करताना आपण पुरते तटस्थ असत नाही. तर या मर्यादेचं काय करायचं, असा एक पेच मला 'साप्ताहिक युगांतर'च्या दिवाळी अंकाबद्दल लिहिताना पडला आहे. पण समकालीन गोष्टींना प्रतिसाद देण्याच्या बाबतीत आणि लेखनशैलीच्या बाबतीत इतकं वैविध्य, दर्जा आणि तातडी जपणारा एकसंध अंक हाती आलेला असताना त्याबद्दल लिहिणं अत्यावश्यकच आहे. तटस्थपणा कुठवर ताणायचा, असा एक प्रश्न माझा मलाच विचारून मी अंकाबद्दल बोलणार आहे.

व्याप्तिनिर्देश (disclaimer) संपला.

एक कोणतंतरी सूत्र घेऊन त्यावर विशेषांक काढण्याची टूम सध्या दिवाळी अंकांमध्ये लोकप्रिय आहे. अशा प्रकारची कोणतीही घोषणा न करता, 'साप्ताहिक युगांतर'चा अंक एका विशिष्ट सूत्राभोवती नैसर्गिकपणे उगवून आल्यासारखा भासतो. जगाला विनाशाकडे लोटणारं आजच्या भांडवलशाहीचं प्रारूप आणि त्यामुळे बदलतं जग, हे ते सूत्र आहे. अनेक अभ्यासपूर्ण आणि समयोचित लेख, ललित लेख, कथा आणि विशेषतः कविता यांमधून हे सूत्र कधी पार्श्वभूमीला, तर कधी पुरोभूमीला; मूकपणे उभं असल्याचं जाणवत राहतं. त्या अर्थाने या अंकात असलेली उणीव एकच - या भूमिकेचं खंडन करणारी विरुद्ध बाजू अंकात अजिबातच न येणं.

दिवाळी अंकांमधून समकालीन विषय आणि त्यावरचं ताजं नि सखोल लेखन मिळावं अशी माझी अपेक्षा असते. त्याबरहुकूम या अंकात मला अनेक महत्त्वाचे लेख मिळाले. संजीव खांडेकरांचा 'ऋतुसंहाराचा काळ : अर्थात भविष्याचा बर्फखडा' हा लेख एखाद्या कवीनं भविष्यवाणी करताना लिहावा तशा सुरात लिहिलेला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत कामगार या वर्गाचं वैचारिक अस्तित्व कसं लीलया मिटवून-पुसून टाकण्यात आलेलं आहे, त्याचे इतर विस्मयकारी वाटणारे परिणाम कोणते आणि यातून पुढे काय उद्भवेल, याचं सूचन हा लेख करतो. ते एखाद्या दुःस्वप्नासारखं अंगावर येणारं आणि काहीसं अविश्वसनीय असं वाटतं. विचारधारा, अर्थव्यवस्था, तत्त्वज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान आणि राजकारण अशा सगळ्या अंगांना कवेत घेणारा हा लेख वाचताना मला सतत खर्‍यांच्या 'उद्या' या कादंबरीची आणि 'ब्लॅक मिरर' या बीबीसीच्या टीव्हीमालिकेची आठवण येत होती. लेख समजून घेताना पडलेले कष्ट जाणवून असंही वाटून गेलं, की या परिस्थितीशी लोकांना जोडून घेण्याकरता फिक्शन हाच घाट अधिक परिणामकारक तर नसेल?

संजीव चांदोरकरांचा कॉर्पोरेट्सबद्दलचा लेख ('आर्थिक निर्णयस्वातंत्र्य हिरावून घेतलेली सार्वभौम (!) राष्ट्रे') हा या अंकातला दुसरा झगझगीत लेख. तो ललित साहित्याचा वा काव्यात्म भाषेचा मुलामा चढवून घेत नाही, वैचारिक समीकरणं मांडल्याचा आव आणत नाही. आंतरराष्ट्रीय बलाढ्य कंपन्यांचा - कॉर्पोरेट्सचा - चेहरा नक्की कसा असतो आणि त्या चेहर्‍यामागे कायकाय असतं या प्रश्नांची उत्तरं चक्क मुद्दे, उपमुद्दे आणि पोटमुद्दे मांडत हा लेख देत जातो. या कंपन्यांच्या हाती असलेल्या शस्त्रांचा आढावा घेतो. आर्थिक नियंत्रणांपासून राजकीय हस्तक्षेपांपर्यंत आणि भाषिक खेळांपासून ते नाकेबंदीपर्यंत. बहुजन-श्रमिक-कामगार वाचवा अशी सबगोलंकारी आरोळी ठोकत भावनिक आवाहन करणार्‍या शंभर घोषणांपेक्षा हा एकच लेख अधिक परिणामकारक ठरेल.

ज्या लेखांसाठी दिवाळी अंक साठवून ठेवण्याचा मोह होतो, अशा लेखांपैकी तिसरा लेख म्हणजे रणधीर शिंदे यांनी विष्णू खरे या कवीबद्दल लिहिलेला लेख ('विष्णू खरे यांची कविता'). शिंदे या लेखात विष्णू खरे यांच्या समग्र कवितेचा परिचय करून देतात. शहरांच्या कराल, यांत्रिकी, धावत्या, आधुनिक आयुष्यात स्वतःला मुडपून घेत राहणारा; अभिव्यक्तीची कोणतीही इच्छा व्यक्त न करता, बदलत्या अवकाशाच्या उदासवाण्या पिवळसर उजेडात आपलं जगणं मुकाट रेटत राहणारा सर्वसामान्य माणूस त्यांच्या कवितेत दिसतो. हिंदी कवितेचा पारंपरिक घाट नाकारत, एखाद्या कॅमेर्‍याच्या नजरेने तपशील टिपत न्यावेत आणि त्यातून एक तटस्थ भेदक कथा साकारावी, तशी त्यांची कविता - दीर्घ 'न-कविता'. राजकीय भान आणि भूमिका दोन्ही पेलणारी. या कविता चंद्रकांत पाटील यांनी मराठीत आणल्या आहेत, हे वाचल्यावर मी चटकन विचारात पडले, की या ताकदीचा मराठीतला आजचा कवी कोण? मला उत्तर सुचलं नाही. असा निरुत्तर करणारा प्रश्न विचारणारा हा लेख माझ्या दीर्घकाळ स्मरणात राहील. 'आजच्या काळात लेखकाने का लिहावे?' हा वसंत आबाजी डहाकेंचा लेखही उदय प्रकाशांच्या एका हिंदी कथेचा परिचय करून देत वास्तवातले ताणेबाणे आणि विसंगती टिपतो. तो लेख वरच्या लेखाला पूरक म्हणावा असा.

या अंकाचं सार्थक झालं, असं आणखी एका गोष्टीमुळे वाटलं. किरण गुरव यांची दीर्घकथा - 'बाळूच्या अवस्थांतराची डायरी'. खेडेगावातून उच्चशिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये दाखल होणारा एक मुलगा आणि त्याचं बावचळलेलं गरीब कुटुंब यांच्या आयुष्यातला एखाद-दीड दिवसच ही कथा रेखाटते. या वर्णनामुळे वास्तविक डोळ्यासमोर येते ती एक सरधोपट, झिजट कथा - ग्रामीण कथा या लेबलाखाली धकून जाईल अशी. पण या सगळ्या अपेक्षांची अलगद विकेट घेत गुरव आपल्याला गोष्टीत कसे खेचून नेतात ते कळत नाही! पहिलं म्हणजे, यांतली पात्रं. ती दरिद्री आहेत. हुशार आहेत. पण लाचार वा ठोकळेबाज रीतीने करुणास्पद नाहीत. त्यांचं जगण्याचं महालबाड तत्त्वज्ञान आहे. कुटुंबाबाहेरच्या जगाशी खेळायचं राजकारण तर आहेच, पण कुटुंबातही आपापसांत करायच्या कुरघोड्या आणि खेळ्या आहेत. पारंपरिक चौकटीत न बसणारं, वर्णन न करणारं, संवादांतून आणि घटनांतून बोलणारं सूक्ष्म तिरकस व्यक्तिरेखाटन करत गुरव पुढे जातात. एका मोठ्या बदलाला सामोरं जाताना कथानायक-निवेदकानं केलेली बेरकी टिप्पणी त्याच्या गरिबीचा काळा बॅकड्रॉप अधिकच गडद आणि तरीही जिवंत करत नेते. गुरव एरवीही मला अतिशय आवडतात. पण या कथेनंतर त्यांनी लिहिलेलं काहीही न वाचता जाऊ देईन, तर खंडोबाच्या नावानं आठ खडे.

त्या मानाने मला प्रणव सखदेवची 'अभ्र्यांमध्ये दडलेलं फॅन्ड्री' ही कथा तितकीशी आवडली नाही. एका सोसायटीत वाढत चाललेला असहिष्णूपणा दाखवत ती सध्याच्या वातावरणातल्या एकूण उन्मादाकडे लक्ष्य वेधू पाहते. कल्पना छान होती. पण त्यात इतकं एकास एक लावून दाखवणं होतं, की प्रणवला त्यातलं साटल्य (subtlety) राखता आलं नाही, आणि माझ्या लेखी गोष्टीतली गंमत संपली. कृष्णात खोत यांची दोन कथार्धुकं इंट्रेष्टिंग आहेत. पण मला ती अपुरी, त्रोटक वाटली. असं वाटलं, की एका मोठ्या कथाविश्वामधला लहानसाच भाग उघड करण्यात आला आहे. उत्सुकता निर्माण होते, पण समाधान मात्र होत नाही.

त्याहून खूप भेदक वाटली, ती मणि मधुकर यांची जयप्रकाश सावंतांनी अनुवादित केलेली कथा, 'फाशी'. विष्णू खरे यांच्या कवितेतली उदासवाण्या पिवळसर प्रकाशातली गरीब, मुकी माणसं पाहावीत आणि गोठून जायला व्हावं, पुष्कळ वेळ काही सुचूच नये, तसं काहीतरी ही गोष्ट वाचल्यावर झालं.

यांखेरीज 'साप्ताहिक युगांतर'च्या अंकातल्या दोन महत्त्वाच्या लक्ष्यवेधी गोष्टी म्हणजे बालकामगारांवरची संदेश भंडारे यांची छायाचित्रमालिका. लेखापेक्षा कितीतरी अधिक वेगळी आणि म्हणून परिणामकारक. दुसरी गोष्ट म्हणजे कविता. कविता आणि अनुवादित कविताही सगळ्याच दिवाळी अंकांत असतात. पण सतीश काळसेकरांनी संपादित केलेल्या या काव्यविभागात एका कवीची एक मराठी कविता आणि त्याच कवीनं परभाषेतून मराठीत आणलेली एक कविता; अशा काही जोड्या आहेत. या भाषांतरित कवितांची निवड कवीनं केलेली आहे की संपादकांनी केलेली आहे, ते मात्र कळलं नाही. ते कळलं असतं, तर निदान माझ्याकरता हा प्रयोग अधिक अर्थपूर्ण ठरला असता.

अंकातला अतुल देऊळगावकरांचा 'धुक्यातून कोणीकडे?' हा पर्यावरणबदलाचं भीषण वर्तमान दाखवणारा लेख आवडला. 'शतरंज के खिलाडी' या राय यांच्या सिनेमाचं 'आरोप-खंडन-मुद्दा' या प्रकारे अभिजीत देशपांड्यांनी केलेलं बचावात्मक रसग्रहण आवडलं; नेहमीपेक्षा निराळं वाटलं. अभिरुचीचा प्रवास न्याहाळून पाहणारा महेंद्र तेरेदेसाई यांचा सिनेमाप्रेमाबद्दलचा लेखही आवडला, जवळचा वाटला. 'बुर्किनी ते बिकिनी, सत्तापटावरील सोंगट्या' हा तृप्ती डिग्गीकरांचा लेख संस्कृती आणि जगाचं एकत्र येणं यांमधला विरोधाभास मांडणारा होता. तोही इंट्रेष्टिंग वाटला.

डॉ. गणेश देवी यांची मुलाखत मात्र अतिशय त्रोटक, साचेबंद आणि मुख्य म्हणजे यंदा अनेक दिवाळी अंकांमध्ये आलेली आहे. ती का घेतली असावी, ते कळलं नाही. तसाच जयदेव डोळ्यांचा रा०स्व०संघाच्या साहित्यातल्या दर्शनाबद्दलचा लेखही आधीच निष्कर्ष ठरवून लिहिल्यासारखा भासला. इतका देखणा, सुरेख अंक काढूनही 'आपली विचारधारा - आपले निष्कर्ष - कंपल्सरी सिलॅबस' अशा प्रकृतीत बसणारा लेख का घ्यावा कुणी अंकात? हाच प्रश्न मला मेघा पानसरे यांचा रशियन स्त्रीबद्दलचा लेख वाचतानाही पडला. आजमितीस ना एकसंध सोव्हिएट युनियन अस्तित्वात आहे, ना आपली आणि त्यांची मैत्री तितकी घट्ट उरली आहे. ना तिथल्या स्त्रियांच्या प्रगतीचे टप्पे न्याहाळल्यामुळे आपल्या आजच्या स्त्रीसंदर्भांना काही विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. मग फक्त अंक 'डावा' आहे, 'काहीतरी रशियन' यायलाच पाहिजे, म्हणून हा लेख घेतला आहे का? माहिती म्हणून लेख चांगलाच आहे. पण माहितीसाठी आता इंटरनेटही उपलब्ध आहेच की.

असो. काहीतरी गालबोट हे हवंच. तरीही वाचावं, काही केल्या चुकवू नये असं समकालीन आणि सखोल पुष्कळ लेखन या अंकात आहे, हे पुनश्च नोंदवून थांबते.


Post a Comment