Uncategorized

लक्ष्यवेधक ‘पुणे पोस्ट’

– प्रणव सखदेव
गेल्या काही वर्षांपासून पुण्यातून प्रकाशित होणार्‍या ‘पुणे पोस्ट’ या पाक्षिकाचा दिवाळी विशेषांक वाचकांच्या पसंतीस उतरतो आहे; कारण हे अंक आशय, मांडणी व निर्मितिमूल्य अशा तीनही अंगांनी लक्ष्यवेधक असतात. यंदाच्या अंकातही कथा-कविता आणि लेख-मुलाखती असा मिक्स्ड-बॅग मजकूर आहे. नरेंद्र चपळगावकर, भारत सासणे, वसंत आबाजी डहाके यांसारख्या मान्यवरांचेही लेख यात आहेत. संदीप वासलेकर यांची मुलाखत या अंकाचा आकर्षणबिंदू ठरावा अशी झाली आहे.
मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचं आहे. चित्र ओपेक रंगातलं आहे. करड्या-पांढर्‍या पार्श्वभूमीवर आपला संसार घेऊन प्रवासाला किंवा ‘कुठेतरी’ जात असलेल्या राजस्थानी जोडप्याचं हे चित्र अप्रतिम आहे. त्यात एक सायकल आहे, जी एका पुरुषाने धरली आहे. त्याने लालगुलाबी, पांढरे ठिपके असलेला फेटा घातला आहे. सायकलीच्या हँडलला पिशव्या टांगल्या आहेत. पुढ्यात कुत्रा आहे आणि मागे घुंगट ओढलेल्या बाईबरोबर लहान मुलगी आहे. तिच्या हातात माठ आहे. कुत्रा आणि ही मुलगी दोघांच्या चेहर्‍यावरचे भाव उत्सुक आहेत. भरदार मिश्यांचा पुरुष मात्र सरळ पाहत चालला आहे. कडेवर लहान मूल असलेल्या बाईच्या चेहर्‍यावरचे भाव मात्र घुंगटामुळे समजत नाहीत. पण तिची मान किंचित खाली वाकलेली आहे. चित्रातला किंवा विषयातला सायकल हा मध्यबिंदू आहे. सायकल हे प्रवासाचं रूपक मानलं, तर त्याभोवती जमलेलं ते कुटुंब आहे असं वाटलं. या बोलक्या चित्रामुळे प्रथमदर्शनीच अंक हातात घ्यावासा वाटतो.
एकीकडे भौतिक प्रगती घडत असताना, विज्ञान अनेक शक्यता आपल्यासमोर ठेवत असताना आणि आर्थिक समृद्धी होत असताना; प्रगतीच्या टप्प्यावर जग विनाशाकडे चालले आहे की काय, अशी भीती अनेक विचारवंत व्यक्त करताना दिसतात. वासलेकरांच्या या मुलाखतीत त्यांनी हा ऊहापोह केलेला आहे. तो वाचण्यासारखा व चिंतन करण्यासारखा आहे. विवेकाचा मार्गच यातून आपल्याला तारू शकेल असं ते यात म्हणतात (आणि हे कितीही घासून गुळगुळीत झालेलं वाक्य वाटत असलं, तरी ते विचार करण्यासारखंच आहे असं माझं मत. सध्याच्या वातावरणात तर विवेकी असणं ही मोठीच कठीण गोष्ट होऊन बसली आहे.) मुलाखतीत शेवटच्या प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तरातल्या काही ओळी मुद्दाम उद्धृत कराव्याशा वाटतात. त्या अशा – “संपूर्ण भारतात जवळ-जवळ ४० टक्के मुलं कुपोषित आहेत. दर वर्षी भारतातील १० लाख मुलं कुपोषणाने मरतात… याचा आपल्याला किती राग येतो? टीव्ही न्यूज चॅनेलच्या प्राइम टाइममध्ये यावर किती वेळा चर्चा होते? सोशल मीडियावर याची किती दखल घेतली जाते? हा विषय गंभीर आहे. पण आपल्या विचारविश्वात याला गौण स्थान आहे…”
‘टिळक ते गांधी एक पर्वांतर’ या लेखात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी शंभर वर्षांपूर्वी झालेल्या गांधीयुगाचा उदय आणि टिळकयुगाचा अस्त याचा परामर्श आपल्या लेखात घेतला आहे. विविध दाखले देत, ओघवत्या, साध्यासोप्या शैलीत ते हा परामर्श घेतात. लेखातल्या आशयापेक्षा मला त्यांची ही शैली जास्त आवडली.
‘माझ्यातला लेखक मेला आहे’ असं घोषित करणार्‍या तमिळ लेखक पेरूमल मुरूगन यांच्या ‘माधोरूबागान’ (इंग्रजी – वन पार्ट वूमन) या कादंबरीचा परिचय ‘अर्धनारीश्वर – एक सामाजिक शोकांतिका’ या लेखात वसंत डहाकेंनी करून दिला आहे. लेखक आणि समाज यांच्या परस्परसंबंधाबद्दलचं त्यांनी केलेलं चिंतन, मुरुगनच्या लेखनशैलीची दाखवून दिलेली वैशिष्ट्यं मूळ कादंबरी वाचण्यास उद्युक्त करतात.
‘चिरतरुण दु:खाचे बुरूज’ या आपल्या गाजलेल्या दीर्घकथेवर आधारित असलेल्या संभाव्य चित्रपटाची पटकथा लिहिताना दिग्दर्शकासोबत व पटकथाकारासोबत कथाकार भारत सासणे यांनी केलेलं चिंतन, त्यांनी ‘कथेकडून पटकथेकडे – एक चिंतन’ या आपल्या लेखातून मांडलं आहे. एखाद्या कथेत पटकथेच्या शक्यता कशा दडलेल्या असतात यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न त्यांनी या लेखातून केला आहे.
याशिवाय लक्ष्मीकांत देशमुख यांनी, प्रसिद्ध कवी व गीतकार साहिर लुधियानवी यांच्या ‘तल्खियाँ’ या संग्रहातील काही कवितांचा केलेला रसास्वाद (‘ये गीत रूह गीत…’); दिवंगत शायर निदा फाजली यांच्यावर आठवणीवजा लिहिलेला प्रदीप निफाडकर यांचा लेखही (‘तुम मुझ में जिंदा हो’) वाचनीय आहेत.

दारूपार्ट्या न करता, जातधर्माच्या आधारावर कोणताही प्रचार न करता केवळ लोकशाही मार्गाने प्रचार करून लोकसभेसाठी जळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार्‍या डॉ. संग्राम पाटील यांचं अनुभवकथन (‘माझा दुसरा निवडणूक प्रयोग’) अंतर्मुख करतं. परदेशात डॉक्टरकी करणारे पाटील जळगावातल्या एरंडोलमध्ये ‘बाबा आमटे रुग्णालय’ उभं करण्याचं ध्येय घेऊन भारतात परतले आणि निवडणूकही लढले. पण त्यात त्यांचा सपशेल पराभव झाला आणि तरीही ते आपलं काम करताहेत, याबद्दलचं त्यांचं विवेचन आवडलं. याशिवाय अंजली कुलकर्णी यांचा ‘नर्मदा बचाव आंदोलना’वरचा लेख, संपतराव पाटील या समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याचा कर्तृत्वपट मांडणारा सतीश देशपांडे यांचा लेख आणि मॅकडोनाल्ड या ब्रँडची रंजक कहाणी सांगणारा देवेंद्र सासणे यांचा लेख असे आणखीही काही लेख अंकात आहेत.

कथा-कवितेच्या विभागात गणेश मतकरी यांची ‘खो’ ही कथा आवडली. रचनाकौशल्याचं उत्तम भान आणि वाचनीयता यांचा मिलाफ कथेत आहे. तसंच खो-खो या खेळाचे रूपक वापरून जीवनविषयक इनसाइटही मतकरी देऊन जातात. बाकी कथाविभागातल्या कथा ठीक वाटल्या. अनुभवाचा कच्चा माल फिक्शनमध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक तो विचार व चिंतन या कथांमध्ये (की अनुभवकथनांमध्ये?) फारसा जाणवला नाही. कवितांचा विभागही ठीक वाटला. मराठी कविता सध्या तरी जास्तीत जास्त वर्णनपर (रिपोर्ताजी) होत जाते आहे की काय, अशी मला शंका येते आहे. लेट्स सी, पुढे काय होतंय.
हिंमत पाटील, कृष्णात खोत आणि मनोहर सोनवणे यांच्या ललित लेखांमधला सोनवणे यांचा लेख आवडला. त्यातली निरीक्षणं आणि तपशीलवारता आवडली.
प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना मनीषा साठे यांच्या हेमंत मेढी यांनी घेतलेल्या मुलाखतीने मात्र निराशा केली. मुळात कथ्थक हा नृत्यप्रकार आवडत असल्याने मोठ्या अपेक्षेने ही मुलाखत वाचायला घेतली, पण विचारलेले प्रश्न नेहमीचे आणि वरवरचे वाटले. त्यातून फार काही नवं मला तरी मिळालं नाही. कथ्थक नृत्यामागचा विचार, आजच्या काळाशी तो कसा जोडून घेता येईल आणि त्याचा मूळ गाभा व सर्जकता याबद्दल वाचायला मिळेल अशी अपेक्षा मला होती. तसंच शेवटी असणारा ‘श्री दत्तप्रेमलहरी’ हा अविनाश असलेकर यांचा निरुपणलेखही सगळ्या मजकुरात खड्यासारखा बोचला. कुणाच्या श्रद्धेविषयी मला काही आक्षेप नाही घ्यायचा, पण दिवाळी अंकाच्या या सगळ्या मजकुरात हे पान नसतं (तेही सगळ्यात शेवटी) तर चाललं असतं, असं जाता-जाता संपादकांना सांगावंसं वाटतं.

पुणे पोस्ट टीमला पुढच्या अंकांसाठी शुभेच्छा!

इमेल : sakhadeopranav@gmail.com
ब्लॉग : http://mazemuktchintan.blogspot.in/
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *