Uncategorized

वाचनीय दिवाळी अंक – लोकमत दीपोत्सव

– अंतरा आनंद


बॅग उचलून वाट फुटेल तिथे जाणार्‍या बॅगपॅकर्सपासून ते प्रवास म्हणजे खान-पान आणि आराम असं समीकरण मांडणार्‍या प्रवासी कंपन्यांसह प्रवास करणारे प्रवासी, असे अनेक प्रकार प्रवासाचे आणि प्रवाशांचेही. पण प्रत्येक जण स्वत:च्या नकळत प्रवास करतच असतो. लहानपणीच्या बोबड्या बोलांपासून ते बोळक्या तोंडातून निघणार्‍या बोलांपर्यंतच्या प्रत्येकाच्या प्रवासात अनंत प्रवास सामावलेले असतात. अशा प्रवासांचं वेगळेपण टिपणारा दिवाळी अंक म्हणजे लोकमतचा ‘दीपोत्सव’.


मोटार, रेल्वे, विमान या सर्वांहून भारी असं प्रवासाचं साधन म्हणजे सायकल. या सायकलीचं चित्र असलेलं अंकाचं मुखपृष्ठ लक्ष्यवेधी आहे. दिवाळी म्हणून की काय, या सायकलला झालर लावलीय. तोरणासाठी पानं-फुलं घेऊन चाललेल्या या सायकलच्या कॅरिअरवर फटाक्यांच्या पेट्या तर आहेतच, पण मागे छत्रीही लावलीय. दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाची पठडी मोडणारं असं हे मुखपृष्ठ. आपला अंकाबरोबरचा प्रवास तिथूनच सुरू होतो.


लोकमतच्या पत्रकार चमूने एनएच-44 या महामार्गावरून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेला प्रवासावर आधारित ‘एनएच 44’ हा लेख हा या अंकाचा विशेष भाग.  खरं तर हा प्रवासाचा पट एवढा मोठा आहे की तो दिवाळी अंकातला एका लेखात मांडायचा, तर तो संक्षिप्त होणं अपरिहार्यच. पण तसा असूनही हा लेख कित्येक अनुभवांचं वाटप करून जातो. त्यात चंबळमधले बदल टिपणारा भाग लक्ष्यणीय. अमेरिकेकडे डोळे लावून बसलेला मदुराईतला पुजारी; इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या परिस्थितीमुळे दिल्लीला न जाऊ शकल्याने आंध्रात ढाबा वसवणारा शीख; इंजिनिअरिंग करून, ‘डकैती’तील आक्रमकता शोकेसमध्ये ठेवून आधुनिकता स्वीकारणारा चंबळचा प्रदेश… एकंदरीत भारतामधील विसंगतीतली संगती हा रिपोर्ताज दाखवतो. परंपरेचा हात धरून प्रगतीची, नव्या जमान्याची उन्हं अंगावर घेणारी दक्षिणेकडची भारतीय मनोवृत्ती उत्तरेकडे येता येता मात्र विषादपूर्ण रीतीने बदलताना दिसते. शंकराचार्यांच्या गावात त्यांच्या साईविरोधाबद्दल “मानो तो सब भगवान!” असे उत्तर देणार्‍या बी.एस.सी. करणार्‍या आदिवासी मुली आहेत; तर मथुरेत मंदिरात नेणारी, बारा-तेरा वर्षांची, शिक्षण सोडून नशा करणारी मुलं. दक्षिणेकडे भेटतात ते, ‘पैशांसाठी कुणाची चाकरी करण्यापेक्षा आपणच आपले मालक का होऊ नये?’ या विचाराने आर्थिक नुकसान सोसून गल्फमधून स्वत:च्या गावी परतलेले व्यावसायिक जमील आणि अफजल; तर स्वत:च्याच गावात काय चाललंय याचा नक्की थांग न लागल्याने, सततच्या अस्थिर आयुष्याला कंटाळून बंदूक हाती घेण्याची भाषा बोलणारे हरिफत आणि साजिद भेटतात काश्मीरमध्ये. एकाच देशातल्या या दोन टोकांच्या दोन मनोवृत्तींमधला प्रवास रेखाटण्यात हा लेख नक्कीच यशस्वी झालाय. या देशातल्या मुली मात्र शिकणे आणि आपली प्रगती करणे, या दोनच उद्दिष्टांनी झपाटलेल्या दिसतात. त्यात दक्षिण-उत्तर असा भेद नाही. असलाच तर इतकाच, की हरयाणात हे शिक्षण हॉकीचं असतं आणि केरळात इंजिनिअरिंगचं. हे चित्र आशादायी वाटतं. शेतीसमृद्ध हरयाणा-पंजाबमधली नशेच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई अस्वस्थ करते. अर्थात ही सगळी मंडळी प्रवासात भेटणार्‍या दोन घटकांपुरत्या सहप्रवाशांसारखीच वेगाने येतात आणि जातात. आत्ममग्न आणि शांत कन्याकुमारी; लांब शाळा-जवळ मंदिरं अशी अवस्था असूनही, शिकून आयुष्याला दिशा देऊ पाहणारा दक्षिण भारत. आणि राजकिय, धार्मिक, प्रादेशिक तिढ्यात सापडून शिक्षण, रोजगार या प्राथमिक गोष्टींवरच विपरित परिणाम झाल्याने दिशाहीन झालेला काश्मीरमधील युवावर्ग. एकाच देशातील दोन टोकांचं चित्र जास्त अस्वस्थ करतं.


वैशाली करमरकर यांचा ‘रानोमाळ’ हा अजून एक खास लेख. मुस्लीमबहुल प्रदेशाला वापरून चालणारं महासत्तांचं राजकारण. इराक युद्धानंतर आयसिसचा उदय, त्यामुळे स्फोटक झालेला रोजचा दिवस आणि त्यामुळे विस्थापित होणार्‍या झुंडी, मानवतेच्या दृष्टीने त्यांना प्रवेश देणारे युरोपीय देश, यात धार्मिक घटकांनी केलेला चंचुप्रवेश, त्यापायी बिघडलेलं युरोपीय देशांचं अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण या सगळ्याचा थोडक्यात वेध घेणारा हा लेख. समाज आणि राजकारण या दोन्हींना स्वत:च्या फायद्यासाठी खेळवू पाहणार्‍या वेगवेगळ्या लॉबीज, त्यांची माध्यमांवर असलेली पकड, माध्यमं नेतील त्या दिशेला वळू पाहणारं समाजमन, त्यांत मिसळलेले पूर्वग्रह, लोकशाहीला मारक ठरणारी व्यक्तिगत पातळीवरील असुरक्षिततेची भावना ह्या सगळ्याचा एकच गोंधळ उडालेला दिसतो. या गोंधळाचे ताणेबाणे थोडक्यात पण व्यवस्थित मांडणारा हा लेख मला आवडला. अजून बरंच काही लिहिता येण्याजोगं आहे, पण दिवाळी अंकात जागेच्या मर्यादा असणार. त्या मर्यादेत राहूनही खूप काही देणारा लेख.
स्टार्टअपच्या ओघात आपली, नॅनोची कहाणी सांगणारा रतन टाटा यांचा लेख ठीकठाक. स्टार्टअपच्या ओघात भारतातील कार्यसंस्कृती बदलतेय हे त्यांचं विधान आहे. तसं खरंच आहे का? की गुणवत्तेच्या आधारावर पुढे जाणारी संस्कृती आणि भारतीय पारंपरिक कार्यसंस्कृती; या एकमेकांच्या विरुद्ध जाणार्‍या कार्यसंस्कृती – कधी जुळवून घेत, तर कधी संघर्ष करत – पुढे चालल्या आहेत? याबद्दल सविस्तर वाचायला आवडलं असतं. पण लेखाचा बराचसा भाग टाटा आणि नॅनो यांवरच खर्च झालाय आणि स्टार्टअप कंपन्यांबद्दलची मतं शेवटी थोडक्यात मांडली आहेत. त्या मांडणीत काही वेगळेपणा आहे, काही नवीन विचार सांगितला जातोय असंही नाही. कदाचित मुलाखतीतून तयार केलेला लेख असल्यामुळे असेल वा या अंकासाठी खास नवीन मुलाखत न घेता आधीच्याच मुलाखतीवर आधारित असल्यामुळे असेल; पण अपेक्षेएवढं काही त्यातून मिळालं नाही. त्यापेक्षा टाटा कल्चर ते स्टार्टअप असा कार्यसंस्कृतीचा प्रवास जास्त वेधक वाटला असता.


व्हिएतनामधून अमेरिकेत आलेल्या निर्वासित कुटुंबातील प्रिसिला चान. तर विद्यापीठातला एक बेशिस्त विद्यार्थी ते आंत्रप्रुनर असा प्रवास केलेला मार्क झुकेरबर्ग. विद्यापीठात शिकत असतानाच दोघांनी आपलं आयुष्य एकत्र घालवायचं ठरवलं. मार्कच्या डोळे दिपवणार्‍या प्रवासात प्रिसिलाचं असणं सहज झाकोळलं गेलं असतं. पण स्वत:चं उद्दिष्ट ठरवून वाटचाल करणारी प्रिसिला ‘ओह! द प्लेसेस यू विल गो…’ या लेखात दिसते. दैनंदिन चालीरीती, जेवणखाणं यांमध्ये प्रचंड फरक असलेलं घरातलं आणि बाहेरचं वातावरण, त्यामुळे बुजरी असलेली प्रिसिला. अमेरिकन शिक्षणसंस्कृतीने तिच्यात आत्मविश्वास जागवला. वाचनाची आवड लावून घेऊन त्यातून तिचं इंग्रजी सुधारल्यावर “व्हॉट डिड आय डू, यू वर्क्ड ऑन युवर ग्रामर!” असं म्हणणारे इंग्रजी साहित्याचे सर, “मी टेनिस खेळले, तर मला हार्वर्डमध्ये ऍडमिशन मिळवणे सोपे जाईल का?” या तिच्या प्रश्नाला “स्ट्रेट ए ग्रेड कायम ठेवलीस, सॅट परीक्षेत उत्तम स्कोअर कमावलास आणि टेनिसही खेळलीस; तर मिळेल हार्वर्डमध्ये अॅडमिशन.” असं सांगणारे विज्ञानाचे शिक्षक, हे वाचून हेवा वाटतो. आपल्याकडच्या परीक्षा आणि असाइनमेंट्सच्या चरकात पिळले जाणारे विद्यार्थी आठवून त्यांची दयाही येते. देशाचं सामर्थ्य घडतं ते अशा शिक्षकांच्या बळावर. हार्वर्डला प्रवेश मिळाल्यावरही प्रिसिलाला न्यूनगंड आलाच. तो घालवण्यासाठी सेवाभावी उपक्रमांत सामील होणं; मार्कबरोबरच्या नात्याला दिशा मिळणं; फेसबुक-कीर्तीमुळे बदललेलं आयुष्य, तरीही तशीच राहिलेली तिची प्राथमिकता या सगळ्यांचं छान चित्रण या लेखात आलं आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची प्रिसिलाची मनापासूनची इच्छा. त्यासाठी विद्यार्थी असल्यापासून ती करत असलेलं काम, त्या कामाला ‘चान-झुकेरबर्ग इनिशिएटिव्ह’च्या स्वरूपात आलेला आकार; या सगळ्याबद्द्लचं तिचं मनोगत इथे आहे. शाळेनं आत्मविश्वास मिळवून दिलेल्या प्रिसिलाने त्या आत्मविश्वासाची रुजवण इतरही मुलांमध्ये करण्यासाठी ‘द प्रायमरी स्कूल’ हे मॉडेल उभं करणं, प्रसिद्धीसोबत आलेला पैसा जगभरातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरणं हा तिचा प्रवासानुभव समृद्ध करणाराच.
आपण जगाबद्दल बोलतो, पण आपल्या दोन सख्ख्या शेजारी देशांबद्दल आपल्याला त्रोटक आणि ऐकीव माहिती असते. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांबद्दल भारतीय मनात एक नकारात्मक दृष्टीकोन असतो. कांझा जावेद ही पाकिस्तानातील एक शिक्षिका. मुलांच्या लेखनातील विखार वाचून ती हबकली. हा विखार त्यांच्या कानावर घरीदारी पडत असताना त्यांच्याकडून विवेकाची अपेक्षा करणं वा तो बाळगायला शिकवणं, हे दोन्ही व्यर्थ. यांपैकी कशावरही थेट भाष्य न करता ‘ऐसा क्यों?’ असा प्रश्न विचारत उत्तरं शोधायला मदत करणारी तिची शैली लाजवाब. फुटकळ का असेनात, असे प्रयत्न मुलांना सत्याच्या जवळ नेऊन त्यांच्या मनातली कटुतेची धार बोथट करत राहतात. विषयाला धरून असलेला हा छोटेखानी लेख चांगला आहे.


आपला दुसरा शेजारी चीन तर अजूनच वेगळा. तिथल्या अनुभवांवर आधारित टेकचंद सोनावणेंचा ‘धुक्यातला ड्रॅगन’ हा लेख. शेजारी म्हटलं, तरी वेगळीच संस्कृती; सामाजिक आणि राजकीयही. भारतालाच काय, कोणालाही पूर्णपणे न समजलेला असा हा देश. अणुपुरवठादार राष्ट्रांच्या गटात भारताने सामील होण्याला चीनने जो विरोध केला, त्याबद्दलचे मेसेज वाचण्या-पाठवण्यात आपली दिवाळी गेली. चिनी माल बोगस असतो, हे आपलं लाडकं विधान आहे. ‘हा माल बोगस असतो, कारण तुमच्या व्यापार्‍यांनाच स्वस्त माल हवा असतो’ असं म्हणणारी युवूतली विक्रेती या लेखात भेटते. ‘युवू’ हा भाग म्हणजे चिनी मालाची पंढरी. ‘माओ म्हणजे चीनचा गांधी’ असं विधान करणारा झू म्हणजे सर्वसामान्य चीनी नागरिकांचा प्रतिनिधीच. या सगळ्या लोकांमध्ये खास आत्मविश्वास झळकताना दिसतो. या आत्मविश्वासाची यथार्थ ओळख हा लेख करून देतो.  भांडवलशाहीचा फायद्यांचा पुरेपूर लाभ उठवणारा चिनी साम्यवाद जगभरासाठीच कुतूहलाचा विषय. समृद्धी, सुखी जीवन असलं, तरी साम्यवादी पकड मात्र लोकांच्या मनावर तितकीच घट्ट आहे हेच या लेखातून दिसून येतं. लेखकाला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला भारताबद्दल कुतूहल आहे, पण चीनचं श्रेष्ठत्व त्यांच्या मनावर पूर्ण बिंबलेलं आहे. त्यामुळे लोकशाहीतील अपरिहार्य मतमतांतरं; हा त्यांना निरंकुश लोकशाहीचा दुष्परिणाम वाटतो. ‘त्यांना व्यक्त व्हायचा अधिकार नाही’ असं म्हणून हळहळणारे आपण भारतीय आणि ‘तुमच्याकडे बघा, शेतकरी आत्महत्या करतात!’ असं म्हणणारा चिनी नागरिक. कोण अधिक सुखी? हा विचारात पाडणारा प्रश्न आहे खरा.


आपल्याला परदेशाबद्दल कुतूहल असतं, तसंच परदेशी लोकांनाही भारताबद्दल कुतूहल असतं. त्यांना भारतातली धारावीची – जगातली सर्वांत मोठी – झोपडपट्टीही बघायची असते. ती दाखवणे हाच व्यवसाय करणारे वाटाडे म्हणजे फिक्सर्स. अश्या दोन फिक्सर्सच्या अनुभवांशी तोंडओळख करून देणारा लेख ‘फिक्सर्स’.  फिक्सर्सच्या कामाशी, जगाशी हा लेख थोडक्यात ओळख करून देतो. पहिल्या जगातल्या लोकांना तिसर्‍या जगातल्या लोकांचं जगणं दाखवणं हे फिक्सर्सनी काहीश्या आवडीतून पण पोटापाण्यासाठी निवडलेलं काम. पण या साध्या कामातून अनेक चांगली कामेही उभी राहिली आहेत. या सगळ्यांशी थोडक्यात करून दिलेली मजेशीर ओळख आहे.


घटम्‌ हे आपल्याला टीव्हीवरील जाहिरातीतून माहिती झालेलं वाद्य. ते वाजवणार्‍या व्यक्तीचा खास दक्षिणी पेहराव आणि विक्कू विनायकराम या नावापलीकडे मला फारसं काही माहीत नव्हतं. मृदंग वाजवणार्‍या वडिलांचं बोट दुखावल्यानंतर त्यांनी विनायकला शिकवायला सुरुवात केली. मृदंगाकडून घटम्‌कडे आणि घटम्‌मुळे जगभरात पोचलेला हा श्रेष्ठ कलाकार. भाषा, संस्कृती या सगळ्याच्या पलीकडे संगीत घेऊन जातं. आपली परंपरा जपूनही पार सातासमुद्रापर्यंत कला पोचवणार्‍या कलाकाराचा प्रवास आपल्याला कळतो तो ‘तनी अवतरम’ या लेखातून.


ठुमरी गायनाच्या क्षेत्रात गिरिजादेवी हे महत्त्वाचं नाव. ठुमरीतला लडिवाळपणा, नखरे आपल्या गाण्यातून उभ्या करणार्‍या गिरिजादेवीं. घरात पारंपारिक वातावरण असूनही त्यांना वडिलांमुळे मुलासारखं लहानपण अनुभवता आलं. मुलांच्या अकाली मृत्यूंमुळे या मुलीच्या बाबतीत हळवे असलेले त्यांचे वडील. त्यांना घोडेस्वारी-नेमबाजी शिकवणार्‍या वडिलांनीच त्यांची ओळख सुरांशी करून दिली. ‘एक बंदिश शिकल्यावर एक गुडिया’ देण्याचा करार त्यांनी तिच्याशी केला आणि निभावलाही. घरातल्या स्त्रियांच्या नाराजीला न जुमानता आपल्या गुडियाला चांगल्या गुरूंची तालीम देणारे वडील आणि पत्नीच्या गाण्याला समजून घेणारा व गाण्यासाठी एकांताची सोय करणारा पती, यांची साथ लाभल्यावर ह्या गायिकेचं गाणे अजून फुललं आणि ठुमरीचं वस्त्र लेऊन रसिकांपर्यंत पोचलं. त्यांच्या मुलाखतीचे शब्दांकन असलेला ‘तडप तडप जिया जाए’ छोटेखानी लेखही छान उतरला आहे.


किडकिडीत, काळीसावळी मुलगी ते हॉलिवूडपर्यंत पोचलेली बॉलिवूडची यशस्वी नायिका हा प्रियंका चोप्राचा प्रवास तिच्याच शब्दांत रेखाटणारा लेख. ‘इकडे आणि तिकडे’ या लेखाच्या नावाप्रमाणेच या लेखात काही विसंगती, त्रोटकपणा जाणवतो.
उन्हं आणि आग ओकणारा सूर्य यांच्या साम्राज्यात राहणारे आपण लोक. हिमाचल प्रदेशातलं शांत-थंड वातावरण, उबदार सूर्य, पर्वत, झरे, पाईन-देवदार वृक्ष, त्यांवरचे पक्षी या सगळ्यांना आपल्या अंगणात आणून सोडणारं लेखन म्हणजे रस्किन बॉन्डच्या गोष्टी. निसर्ग हेच मुख्य पात्र असणारं रस्किनचे साधंसरळ लिखाण. त्यांच्या भेटीचं चित्रण करणारा नितांतसुंदर लेख शर्मिला फडके यांचा आहे. रस्किन बॉन्डचं बालपण, आई निघून गेल्यानंतर त्याला आलेला एकाकीपणा, काही न बोलता हा एकाकीपणा समजावून घेणारा निसर्ग आणि त्या निसर्गाशी ओळख करून देणारे वडील हे सगळं या लेखात आहे. आपल्या एकाकीपणाशी बोलणारा रस्किन लिखाणातून व्यक्त होऊ लागला. अशा लेखनात निसर्गच प्रमुख पात्र असणार हे ओघानेच आलं. वडील गेल्यावर इंग्लंडमध्ये गेलेल्या, तिथे आपल्या पहिल्याच पुस्तकाने साहित्याच्या जगात जागा मिळवलेल्या रस्किनचं मन मात्र तिथे रमलं नाही; तसं ते दिल्लीतही रमलं नाही. ‘लेखकाला जगण्यासाठी लागते, ती एक खोली आणि त्यातून दिसणारा निसर्ग’ असं मानणार्‍या रस्किनने पुढचं जीवन हिमाचलमध्येच घालवलं. आता वयाची ऐंशी वर्षं ओलांडलेल्या रस्किनच्या सभोवतालचा निसर्ग बदलला आहे. पैशांचा, समृद्धीचा धूर आणि पर्यटकांची गर्दी यांत गुदमरला आहे. त्यातला निरागसपणा हरवला आहे. ते गुदमरलेपण रस्किनला अजून तीव्रपणे जाणवतं. आणि हे खूप नेमकेपणानं व्यक्त केलंय शर्मिला फडके यांच्या लेखाने. ‘रस्टी द नेम इज बॉंड, रस्किन बॉंड’ हा या अंकातला अतिशय सुंदर जमून आलेला लेख. लेखिकेसोबत आपण जणू ‘रायटर दादाजीं’कडेच जातो. त्या दोघांच्या गप्पांमध्ये निसर्गाची सळसळ ऐकू येते, मधून मधून त्यांच्या पूर्वजीवनाबद्दल सांगत लेखिका परत वर्तमानात येत राहते. रस्किन ज्या निसर्गासोबत राहिला त्या निसर्गाच्या गळ्याला नख लागताना दिसतं आहे. पण ‘पक्ष्यांची गाणी आहेत, तोवर गोष्टी राहतीलच’ असा विश्वास देणार्‍या रस्किनच्या आशावादात निसर्गाचा उबदारपणा कायम आहे. या निसर्गाचं चित्रण, रस्किनच्या भेटीतला आपलेपणा, त्याच्या जीवनातील ठाय लय हे या लेखात आहे. आपल्या जगण्यातून पार लयाला गेलेला असा शांत संथपणा देहरादूनमधल्या रस्किनच्या जगण्यात ओतप्रोत भरलेला जाणवतो. तो या लेखात चित्रमय पद्धतीनं चितारला आहे.
या अंकात कथा नाहीत, कविता नाहीत आणि भविष्यही नाही. त्याऐवजी जे आहे, त्यामुळे ह्या अंकाची गणना उत्कृष्ट अंकांमध्ये करता यावी. बरंच काही वाचनीय आहे या ’लोकमत-दीपोत्सव’च्या अंकामध्ये. पण जाहिराती थोड्या कमी असत्या; किमान गुळगुळीत जाडजूड पानांवर नसून साध्या पानांवर असत्या, तर बरं झालं असतं. चकचकीत आणि बटबटीत जाहिरातींची दोन-दोन पानं मध्येमध्ये येऊन रसभंग करतात. इतका, की त्यात लोकमत चमूनं केलेल्या प्रवासातल्या व्यक्तींचे फोटोही लपून जातात आणि एक सुंदर अंक वाचल्याच्या आनंदाला गालबोट लागतं.


ब्लॉग : http://mazeshabdmazeman.blogspot.in/
इमेल : antaranand21@gmail.com

 

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *