Uncategorized

नवल – सेम ओल्ड, सेम ओल्ड

– गणेश मतकरी
मराठी साहित्यात भय, गूढ वगैरे जॉनर्सना कायमच बॅकसीट देण्यात आलीय याचा सर्वाधिक खेद वाटणाऱ्या गटामधे मी मोडतो. पो, लवक्राफ्ट, स्टीवन किंग आणि इतर मंडळींनी या प्रकारचं लिखाण मोठ्या प्रमाणात केलं, आणि या विषयांना जगभरात मान्यता मिळवून दिली. एका विशिष्ट चौकटीतल्या आणि विशिष्ट आशयाच्या साहित्याला अ दर्जाचं आणि इतर प्रकारच्या आशयाला आणि शैलींना कनिष्ठ मानण्याच्या आपल्याकडच्या प्रवृत्तीमुळे नाव घेण्यासारखे (आणि कोण काय म्हणतं याकडे फार लक्ष्य नं देणारे) काही मोजके लेखक वगळता, नवे चांगले लेखक या प्रकारांकडे वळलेच नाहीत. या साहित्याकडे दुर्लक्ष झालं, त्याची वाढ खुंटली. केवळ हेच साहित्य नाही; तर रहस्यकथा, अद्भुतकथा, तपासकथा अशा सर्वत्र वाचकप्रिय ठरलेल्या साहित्यप्रकारांत आपल्याकडे म्हणावं तसं स्वतंत्र लिखाण झालं नाही आणि आज आपण एका ठरावीक वर्तुळात फिरतो आहोत.
कै० अनंत अंतरकरांनी स्थापन केलेल्या ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ या त्रयीमधल्या ‘नवल’चं महत्त्व आहे; ते तो या प्रकारच्या लेखनाला वाहिलेला अंक आहे म्हणून.
मी गेली अनेक वर्षं ‘नवल’चा बराचसा नियमित वाचक आहे. पण गेल्या काही वर्षांत ‘नवल’चा दर्जा घसरत चाललाय असं माझं प्रामाणिक मत आहे. नारायण धारप असताना त्यांच्या कथा मी ‘नवल’मधे वाचलेल्या आहेत. ते गेल्यावर त्या तोलामोलाचं दुसरं नाव त्या जागी आलेलं दिसत नाही. स्वतंत्र लिखाण ‘नवल’मधे कमी दिसतं. आता या प्रकारचं दर्जेदार आणि स्वतंत्र लिखाण एकूणच कमी असल्याने नव्या दमाच्या लेखकांमधे ते कोण करू शकेल हे पाहणं अधिकच आवश्यक आहे. या प्रकारचा काही प्रयत्न ‘नवल’च्या या दिवाळी अंकात दिसत नाही. याउलट तो आजही एका जुनाट साच्याला धरून राहिलेला दिसतो.
पाश्चिमात्य फॅन्टसी आर्टचं नक्कल करणारं कव्हर; भयकथा, चातुर्यकथा, संदेहकथा अशा अनावश्यक वर्गवारीत टाकलेल्या कथा – त्यांतल्या बहुतेक भाषांतरित; काही लेख; काही फॅन्टसी-पिन-अप स्टाईल चित्रं, काही माहितीपर चौकटी वगैरे. यांतलं काहीच प्रथमदर्शनी, आणि नंतरच्या दर्शनांमधेही, नवीन वाटणारं नाही.
‘नवल’मधे दर्जेदार, नव्या वळणाचं स्वतंत्र लिखाण कमी असणं हा काळजीचा विषय आहे, जो संपादक मंडळाने तातडीने हाताळायला हवा असं माझं मत आहे.  उदाहरणार्थ, भयकथांमधलं अलीकडचं महत्त्वाचं नाव म्हणजे ऋषिकेश गुप्ते. प्रणव सखदेवसारख्या अलीकडे चर्चेत असणाऱ्या लेखकाच्या कामातही फॅन्टसीची झाक आपल्याला दिसते. त्यांच्या गोष्टी वा त्यांच्या तोडीच्या गोष्टी इथे पाहायला का मिळू नयेत? ऋषिकेशच्या गोष्टी या आधी ‘नवल’मधे आल्या असाव्यात; पण भयकथालेखकांमधला तो आजचा महत्त्वाचा लेखक असल्याने तो ‘नवल’मधे आताही नियमितपणे लिहीत राहीलसं पाहायला हवं. (बाबांची – रत्नाकर मतकरींची- ‘खेकडा’ ही कथा ‘हंस’मधे छापल्यावर, बाबा गूढकथा या फाॅर्ममधे सतत लिहीत राहतील याकडे  अंतरकरांनी काही वर्षं जातीनं लक्ष्य पुरवलं होतं. आताही नवे लेखक शोधून त्या प्रकारचा प्रयत्न करायला हवा. )
या वर्षीच्या ‘नवल’मधल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या भाषांतरित. रोअल्ड डालची ‘राॅयल जेली’ (अनु० वनिता सावंत), अॅगथा क्रिस्टीची ‘द ड्रीम'(अनु० वृषाली जोशी), मोपांसाची ‘मदाम बॅप्टीस्ट’ (अनु० पुरुषोत्तम देशमुख) अशा या कथा. इतरही काही अनुवादित आहेत, काही आधारित; पण रूपांतरित कथांत या सर्वांत प्रसिद्ध. आता माझा अनुवादांना काही विरोध नाही. किंबहुना, चांगले अनुवाद जरूर व्हावेत असंच माझं मत आहे. अनुवाद होणाऱ्या कथाही चांगल्या आहेत. मग माझा आक्षेप तरी काय, असा प्रश्न कोणालाही पडेल. तर – आक्षेप दोन आहेत.
पहिला हा, की मूळ लेखक उत्तम असले; तरी आजच्या काळात, नव्या वाचकांसाठी हे जरा जुन्या पद्धतीचं लेखन आहे. सध्या या साहित्यप्रकारांमधे काय लिहिलं जातय, हे आज ‘नवल’मधून कळणं अधिक उद्बोधक ठरलं असतं. (कदाचित ही कॉपीराइट्सची अडचण असेल. पण अडचण कसलीही असली; तरी नवं काही दिसत नाही, हा प्रश्न राहतोच.) दुसरी गोष्ट ही, की ही भाषांतरं बरीच कृत्रिम झाली आहेत. हा मूळ साहित्याचा अभ्यास नाही, तर सामान्य वाचकांना होणारी ही ओळख आहे, करमणूक आहे. त्यामुळे कथा रूपांतरात शक्य तितकी ओघवती झाली असती, तर बरं झालं असतं. पण तसं होत नाही. ‘राॅयल जेली’ या कथेसाठी काढलेलं (आणि ‘जखीणराई’ या कथेसाठी काढलेलंही) चंद्रमोहन कुलकर्णींचं चित्र मात्र फार उत्तम आहे. विरोधाभास असा, की एकूण अंकातच (‘भयभावना आणि दृश्यकला’ या दीपक घारे यांच्या लेखातले मास्टरपीसेस वगळता) पाश्चिमात्त्य चित्रंच सामान्य, जेनेरिक वाटणारी आहेत. उलट आपल्या लोकांनी कथांवर काढलेली चित्रं बऱ्याच प्रमाणात चांगली आहेत.
वर उल्लेखलेल्या कथा मुळात तरी चांगल्या आहेत, पण कुमुदिनी रांगणेकरांनी अनुवादित केलेली एथेल एम डेल् यांची ‘व्हेअर थ्री रोड्स मीट’ ही कादंबरी तर मुळातच सामान्य आहे. १९३५ सालच्या या मध्यम कादंबरीचा अनुवाद २०१६ मधे का वाचावा, हे काही मला कळलं नाही. रांजणकरांची ‘अ(भूत) पूर्व मुकद्दमा’ ही दीर्घकथाही आधारित आहे. पण कशावर आधारित आहे, ते काही कळलं नाही.
स्वतंत्र कथांमधे काही चांगले प्रयत्न जरूर आहेत. मेघश्री दळवींची ‘मोहिरान’ आणि दीपक नारायण मोडकांची ‘जखीणराई’ या दोन्ही कथा मला इन्टरेस्टींग वाटल्या. मात्र दोन्ही कथांचा अधिक विस्तार झाला असता, तर मजा आली असती. खासकरून ‘जखीणराई’. त्यात भरलेला हाॅर्टीकल्चरचा प्रचंड तपशील आणि प्रत्यक्ष घटनावस्तू घडणं, यांचा मेळ बसत नाही. हा तोल साधला गेला असता आणि शेवट अधिक अनपेक्षित असता, तर कथेत आणखी मजा आली असती. पण आताही वातावरणनिर्मितीसाठी ही कथा जमलेली आहे. समीर वाकणकरांची ‘विदेही’देखील चांगली आहे, पण त्याच्या शेवटापेक्षा त्यातला नैतिक पेच हा अधिक गुंतवणारा आहे. पण तो गुंडाळून टाकून लेखकाने शेवटच्या धक्क्यावर लक्ष्य केंद्रित केलेलं दिसतं. रमा गोळवलकरांच्या ‘त्रिपुरांतक’ या दीर्घकथेने माझ्या अपेक्षा उंचावून ठेवल्या, पण पुढे मात्र त्या कथेला माझ्या अपेक्षा पुर्‍या करता आल्या नाहीत. तिचा सुरुवातीचा भाग चांगला आहे. कोडी सोडवत पुढे जाण्याचा पॅटर्न परिचित असला, तरी तो उत्कंठावर्धक होऊ शकला असता. इथे मात्र त्याची एकाच प्रकारे पुनरावृत्ती होत राहते आणि आपण काहीतरी वेगळं होईलशी वाट पाहत राहतो. बाकी कथा ठीक, पण त्या फक्त ‘ठीक’ असून भागणार नाही. ‘नवल’कडून वाचकांच्या अपेक्षा असतात. त्या दृष्टीने काही नवं, स्वतंत्र आणून या अंकाचं पुनरुज्जीवन झालं तर योग्य दिशेने बदल झाल्यासारखं होईल.
कथांबाबत एकुणात अपेक्षा पूर्ण न करणारा हा अंक लेखांमधे मात्र चांगला आहे. त्यांत काही आधारित लेख आहेत, तर काही स्वतंत्र. पण हरकत नाही. माहिती आणि लेखनशैली, या दोन्ही दृष्टींनी लेख चांगले आहेतच. डॅफ्ने डू माॅरिए (ले० साधना सराफ) आणि प्रिन्सेस डायना (ले० कौमुदी अरविंद फडके) ही व्यक्तिचित्रं, आधी उल्लेख केलेला दृश्यकलेबद्दलचा लेख, श्यामला पेंडसेंचा ‘सिरीआतील परंपरा’ हा नॅशनल जाॅग्रफिक मासिकाच्या आधारे लिहिलेला लेख हे सारेच विषयाचं वैविध्य आणि वाचकाचं कुतूहल जपणारे आहेत.

 

आपल्याकडचे अनेक वर्षं टिकलेले आणि हक्काचा वाचक असणारे जे दिवाळी अंक आहेत, त्यांत ‘नवल’ नक्कीच मोडतो. तो तसाच राहावा असं वाचकांना निश्चितच वाटतं. मला तर नक्कीच वाटतं. पण त्यासाठी अंकाचा संपूर्णतः नव्याने विचार होणं आवश्यक आहे. नव्या लेखकांनी या प्रकारच्या लेखनाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. हे साहित्य उच्चभ्रू मानलं गेलं नसलं, तरी ते लिहायला नक्कीच सोपं नाही. चटकन लिहून टाकण्याइतकं हलकंफुलकं नाही. विचार, शैली, रचना या सगळ्यांचाच पुरेसा विचार होण्याची गरज आहे. तो करू शकणाऱ्या लेखकांना (नव्या आणि या अंकात लिहिणार्‍यांनाही) मी स्वत:च आवाहन करतो, की जुन्याचा विचार, भाषांतरं करणं सोडा आणि नवीन लिहा. या साहित्यविभागात नव्या वळणाचं सकस साहित्य तयार होण्याची गरज आहे. ते व्हायला लागलं, तर ‘नवल’ही त्याचा विचार नक्कीच करेल.
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *