Uncategorized

भवताल

– मीना वैद्य

हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा अशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या या नियतकालिकाचा २०१६चा दिवाळी अंक पाहिला.
हा अनोखा खडक विशेषांक आहे आणि विशेष म्हणजे दगडात सापडणाऱ्या खनिजाची – स्फटिकाची एक अनोखी भेटही या अंकाबरोबर ग्राहक-वाचकासाठी देण्यात आली आहे.
आपल्या आयुष्याचा भाग असलेल्या पर्यावरणाचं आणि विशेषकरून पंचतत्त्वांपैकी पृथ्वी या तत्त्वाचं दर्शन खड़कांमधून, डोंगरदऱ्यांमधून, अगदी पायाखालच्या दगडमातीतूनही, आपल्याला पदोपदी घडत असतं. पण सहसा सामान्य माणूस याकडे अतिशय उदासीनतेने, अलिप्तपणे पाहत असतो. हे सारं गृहीत धरून जगत असतो. अशा लोकांचंदेखील कुतूहल चाळवावं आणि त्यांची अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढावी, असं या अंकाचं स्वरूप आहे. याचं मुखपृष्ठ अतिशय आकर्षक आहे आणि तितकंच आकर्षक आहे त्याचं अंतरंगदेखील!
महाराष्ट्रातील दगड / खडक म्हणजे डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट, इथला सह्याद्री पर्वत हा सहा-सात कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला. याच्या कठीणपणामुळे यात उत्तम कोरीव काम घडू शकतं. म्हणूनच आपल्या देशातील सर्वाधिक कोरीव लेणी महाराष्ट्रात आहेत. अशा या ‘महाराष्ट्र घडवणाऱ्या’ दगडाची ओळख वाचकांना करून देण्याचा संकल्प ‘भवताल’ने  केलाय आणि तो त्यांनी उत्तमरीत्या सिद्धीला नेलाय असंच हा अंक पाहून म्हणावंसं वाटतं.
अंकाच्या हाताळणीचा पट खूपच विशाल, विस्तीर्ण आहे. कालखंडाच्या दृष्टीकोनातून पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत; आणि विविधतेच्या दृष्टीकोनातून – केवळ थक्क करून सोडणारा.
खड़कांची निर्मिती, त्यांचे तीन प्राथमिक प्रकार, पृथ्वीच्या अंतरंगात घडणाऱ्या उलथापालथीमुळे आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे पृष्ठभागावर होणारी स्थित्यंतरं, निर्माण होणारे प्रचंड डोंगर, सुळके, कडेकपाऱ्या, गुहा, बोगदे, दऱ्या, घळी, तलाव यांचा परिचय यांतील लेखांमधून आपल्याला होतो. त्याचबरोबर या डोंगरदऱ्यांच्या आधाराने उभे राहिलेले गडकिल्ले, वेरूळ-अजंठासारखी जगप्रसिद्ध कोरीव लेणी अशा मानवनिर्मित गोष्टींचंही दर्शन घडतं.
याखेरीज याच पृथ्वीतत्त्वाच्या विविध, विस्मयकारी आविष्कारांचा परामर्श घेतलेलाही सापडतो. दगडांमधली सच्छिद्रता, जलधारण शक्ती, त्यांच्या थरांचे विविध आकारप्रकार, स्थानिक खनिजांच्या आणि मातीच्या संयोगामुळे त्यांच्यामध्ये उमटणारे विविध रंग, खनिजांवरच्या प्रक्रियेमुळे तयार झालेले सुंदर स्फटिक या सर्वांचा होणारा परिचय चित्तवेधक आहे. त्यांमधल्या काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांचा उल्लेख करावासा वाटतो.
दगडावरील माळरानं : नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर इथपासून मराठवाड्याच्या परिसरातदेखील काळ्या पाषाणावर बहरणारी माळरानं आणि त्यांच्यामधील जैवविविधता.
कातळसडे (पुष्पपठारं) : उन्हाळ्यात वैराण असणारे, पावसाळ्यात पानाफुलांनी बहरून जिवंत होऊन उठणारे प्रदेश – पाचगणी, महाबळेश्वर, कास अशा ठिकाणी पुष्पपठारं म्हणून ओळखले जाणारे कातळसडे.
कडा : हरिश्चंद्रगडावरील १४२४ मीटर उंचीचा, काळजात धडकी भरवणारा आणि रौद्ररूप कोकणकडा.
सरोवर : बावन्न हजार वर्षांपूर्वी अशनिपातामुळे निर्माण झालेलं बुलढाण्यातील लोणार सरोवर.
घाट : अनेक शतकांपूर्वी कातळातून पायऱ्या खोदून बनवला गेलेला जुन्नरजवळील नाणेघाट.
सह्याद्री ही भारतीय गिर्यारोहकांची पंढरी मानली जाते. काही धाडसी गिर्यारोहकांचे अनुभव सांगणारे, चढाईला योग्य असलेल्या ठिकाणांची माहिती देणारे लेख या अंकात आहेत. तसेच पट्टीच्या गिर्यारोहकाला आव्हान देणाऱ्या काही खास कडेसुळक्यांचा परिचयदेखील कसलेल्या गिरिप्रेमींनी करून दिला आहे. गिर्यारोहणाचा छंद जोपासण्यासाठीदेखील हे लेख मोलाचे ठरतील.
ज्यांचं आयुष्यच पिढ्यानपिढ्या दगडांशी निगडित आहे, अशा वडार या भटक्या समाजाची ओळखही या अंकातून घडते. स्वतःला भगीरथाचे पुत्र मानणारे वडार लोक. प्राचीन काळापासून लेणी, किल्ले, घरं यांच्या निर्मितीमध्ये वडार जमातीचं मोठं योगदान असे. जुन्या शिलालेखांमध्ये ‘पाथरवट’ असं त्यांचं नामाभिधान झालेलं सापडतं म्हणे. दगडांच्या बाबतीत वडार निष्णात असतात. दगडांची जात, त्यांची घडण, पोत (Texture), वय यांबाबतची जाण आणि पारख त्यांना पिढीजात असते. आजही रस्ते-तलाव यांची बांधणी, खाणी-विहिरींचं खोदकाम, पाटा-वरवंटा, जातं, रगडे यांसारख्या स्वयंपाकघरातील आयुधांची घडण हे सगळं वडार करतात. अशा या समाजाच्या कारागिरीबरोबर त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची ओळखही या अंकामधून आपल्याला होते.
वर उल्लेखल्यानुसार या सर्व विषयांची मांडणी होते ती अतिशय उद्बोधक, माहितीपूर्ण आणि रंजक अशा लेखांमधून. या लेखांना जोड आहे ती उत्कृष्ट छायाचित्रांची. अतिशय सुबोध आणि दर्जेदार भाषेतून हे लेख सादर होतात.
लेखक आहेत पुरातत्त्व​शास्त्र​, भूशास्त्र​, पर्यावरण, भूकंप यांचे अभ्यासक; कलाइतिहासतज्ज्ञ; वन्यजीवांचे-पुष्पपठारांचे अभ्यासक; कन्झर्वेशन आर्किटेक्टस; निसर्गनिरीक्षक; मुक्तपत्रकार; चित्रकार; कलाकार; अध्यापक; प्राध्यापक; छायाचित्रकार; गिर्यारोहक वगैरे.
वरील सर्व विषयांच्या पलीकडे पसरलेलं या दगडाखडकांचं एक जादुई विश्व आहे – खनिजांचं  आणि स्फटिकांचं! या अद्भुत दुनियेचं दर्शनही या अंकातून आपल्याला घडतं. महाराष्ट्रातील खडक म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून उफाळलेल्या लाव्हारसाचं रूप. तो थंड  होत असताना तयार झालेल्या खडकांमध्ये अनेक पोकळ्या निर्माण झाल्या. त्यांच्यात दीर्घकाळ कैद (trap) होऊन राहिलेली खनिजं कालांतराने थंड होत असताना स्फटिकरूप (crystalise) झाली. लाल, निळ्या, हिरव्या, जांभळ्या, पांढऱ्या अशा विविध रंगांमध्ये आणि आकारांमध्ये हे स्फटिक नेत्रदीपक स्वरूपात प्रकटले. त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेचं रहस्य उलगडून सांगणाऱ्या लेखांबरोबर अनेक स्फटिकांची सुंदर छायाचित्रंही समाविष्ट केली गेली आहेत. काळ्याकभिन्न फत्तरांमधून व्यक्त झालेली सौंदर्याची खाण!
स्फटिकांचा असा सुंदर, मोहक खजिना इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि उत्तम स्वरूपात महाराष्ट्राखेरीज जगात इतरत्र कुठेही सापडत नाही म्हणे.
हा खास खजिना जगापुढे उलगडून दाखवण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे ज्येष्ठ खनिजसंग्राहक श्री. एम. एफ. मक्की यांचं.  राज्यभर भटकून ही खनिजं शोधणं, जगभरातील ‘शोज्’मध्ये पोचवणं, अभ्यासकांसाठी आणि संग्रहालयांसाठी ती उपलब्ध करून देणं हे मोलाचं काम श्री. मक्की गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ करताहेत. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक भूशास्त्र परिषदेच्या (Geology Conference) निमित्ताने भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनात त्यांच्या व्यक्तिगत संग्रहातील नमुने प्रदर्शित होतात; आणि जिज्ञासूंना माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी ते स्वतः उपलब्धही असतात. अशा या व्यक्तीचा आणि त्यांच्या कामाचा विस्तृत परिचय करून देणारा लेख या अंकाचं मोल निश्चितच वाढवतो.
महाराष्ट्रातून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन अशा अनेक देशांतील संग्रहालयांमध्ये जाऊन पोचलेल्या काही स्फटिकांचा तपशीलही या अंकात समाविष्ट आहे.
‘हा दगड आम्हांला कोणी शिकवलाच नाही’ अशी खंत संपादकीयामधून व्यक्त करत असतानाच या अंकाचे संपादक श्री. अभिजीत घोरपडे यांनी योग्य दिशेने योग्य पाऊल उचललंय. ते स्वतः वरिष्ठ पत्रकार आणि पर्यावरण-अभ्यासक आहेत. अनेक तज्ज्ञांना आणि अभ्यासकांना बरोबर घेऊन त्यांनी हा देखणा, वाचनीय आणि संग्राह्य अंक आपल्यासाठी आणला आहे. जेणेकरून ‘हा दगड आम्हांला कोणी शिकवलाच नाही’ अशी तक्रार आपली पुढची पिढी आपल्याबद्दल करू शकणार नाही!
दगड न्याहाळण्याचा, अभ्यासण्याचा हा छंद आपल्याला निसर्गाच्या खूप जवळ घेऊन जाऊ शकतो; निखळ, निर्मळ आनंद देऊ शकतो. त्यासाठी तेवढी जिज्ञासा आणि संवेदनशीलता मात्र हवी.
नवख्या आणि अनभिज्ञ व्यक्तींना या विषयाकडे आकर्षित करणं, हौशी खडक-अभ्यासकाला खूप माहिती पुरवणं आणि सखोल अभ्यासकाला मौल्यवान  विदा (data) उपलब्ध करून देणं असं तिहेरी उद्दिष्ट या अंकाने साधलंय. त्याबद्दल ‘भवताल’ दिवाळी विशेषांकाच्या सर्वच निर्मात्यांचं मनःपूर्वक अभिनंदन.
– एक हौशी खडकसंग्राहक आणि अभ्यासक
इमेल : vaidya.mv@gmail.com
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *