कवितेची गोष्टखूप जुनी - म्हणजे जवळ जवळ माणूस सुसंस्कृत होण्याच्या पहिल्या पायरीवर होता म्हणा ना,  तेव्हाची - गोष्ट आहे. नेहमी असतं तसंच या गोष्टीतही एक आटपाट नगर होतं. बरीचं माणसं कामाची होती, तर काही बिनकामाचीही होती.

काही बिनकामाची माणसं फिरत फिरत झाडांच्या जंगलात गेली
त्यांना तिथं झऱ्यांचं गाणं ऐकू आलं
फुलांचं निर्व्याज हसू त्यांनी डोळाभर पाहिलं  
उन्हाचा निवांत तुकडा त्यांनी मुठीत धरून बघितला
तृणपात्यावर लगडलेल्या दवबिंदूची चव त्यांनी चाखली
त्यांच्या आत काहीतरी दाटून आलं...

काही बिनकामाची माणसं निराकार माणसांच्या जंगलात रुजली
त्यांनी नर-मादीतलं मैथुन तटस्थ पाहिलं
चाबकाच्या फटकाऱ्यानिशी उडणारं चरचर रक्त त्यांनी जिभेला लावून पाहिलं
बाळाच्या गुरगुट्या बोलांना त्यांनी कानात साठवून बघितलं
माजोरी कधी, तर कधी संन्यस्त अभोग, त्यांनी अंगावर घेऊन बघितले
त्यांच्या आत काहीतरी दाटून आलं...

काही बिनकामाची माणसं आक्रसून स्वतःतच हरवून गेली
त्यांनी स्वतःतून माणसं उगवताना आणि मावळताना पाहिली
आठवणींची श्वापदं त्यांनी अंगावर घेऊन भोगली
"सो..हं"भोवती त्यांनी सृष्टीचा अक्ष तीव्रपणे खोचून बघितला
परकाया प्रवेशाचा गोरखधंदा त्यांनी करून बघितला
त्यांच्या आत काहीतरी दाटून आलं...

...त्यांच्या आत काहीतरी दाटून आलं आणि त्याची कविता झाली.

झाली असेल?

अनुभुतीच्या प्रस्तरांना छेदत शब्दांची नेमकी लय आणि पोत कुण्या शब्दवेत्त्यांना सापडतातही कधी, त्यांची मग कविता होते.

झाली असेल.

कवितेच्या भवितव्याविषयी आज बऱ्याच चर्चा झडत असतात; तिच्या शिलकीचा, उरलेल्या आयुष्याचा लेखाजोखा घेतला जातो. पण कविता या सगळ्यातून निसटून तरीही उरतेच. कवी कधी विनोदाचे विषय झाले; तर कधी त्यांनी माणसाला चेतवण्याचं काम केलं. पण ‘कवी तो दिसतो कसा आननी’ ही उत्सुकता आजही लोकांमधे दिसून येतेच.  ‘रेषेवरची अक्षरे’च्या या विशेष विभागात आम्ही कवितेची आणि पर्यायाने कवींची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कवींच्या प्रेरणा, कवितांचं उलगडणं, नव्या माध्यमातली कविता, कवितेचे व्यवहार, कवींशी गप्पा अशा वेगवेगळ्या कोनांतून कवितेला जोखण्याचा हा एक अनवट प्रयोग.

***

कवितेची गोष्ट
पाकीट आणि चपला गायब : अभिजित बाठे
आमचं हॉगवर्ट्स : जास्वंदी
नवं जग, नवी कविता : विश्राम गुप्ते
तापशतानि वितरतानि : वितरकांच्या चश्म्यातून (अक्षरधारा)
कवितेचे व्यवहार : प्रकाशकांच्या चश्म्यातून (इंद्रायणी साहित्य)
वाचकही पुस्तकापर्यंत पोचू पाहत असतो! : संपादकांच्या चश्म्यातून (सतीश काळसेकर)
श्रीधर तिळवे यांची मुलाखत : राहुल सरवटे

***
चित्रश्रेय : कल्याणी
अक्षरलेखन : संवेद
***
Post a Comment