Uncategorized

अंकनामा – लवकरच येत आहे…

खूप दिवे आहेत आजूबाजूला.फटाके, रोशणाई, सजलेली उत्फुल्ल गर्दी, मिठाई, भेटवस्तू आणि भेटीगाठी…. आणि दिवाळी अंक.

दिवाळी अंकांची रेलचेल आहे यंदा. जुने-जाणते-स्थिरावलेले-तडाखेबंद खपाचे अंक. अभिरुचीचं भूषण म्हणून मिरवणारे काही. आपल्या भाषेपासून वाहत दूर कुठल्या बेटावर स्थिरावल्यानंतर मायबोलीच्या ओढीनं, हौशीनं काढलेले काही. काही महाराष्ट्रातल्या अनेक लहानमोठ्या गावांतून निष्ठेनं आणि सातत्यानं होणारे प्रयोग. कागदाच्या मर्यादा आणि जाहिरातींची गणितं झुगारत स्क्रीनवर झळकणारे ऑनलाईन अंक थोडे. तीही आता नॉव्हेल्टी नव्हेच… शिवाय नाना अडचणींपोटी यंदा साखळीतला दुवा न होता गळालेले, आणि आपल्या जोडलेल्या वाचकांकडून होणारी विचारपूस कृतज्ञतेनं मिरवणारेही काही… ते आपल्याला दिसत नसले, तरी तेही आहेतच मागे – विंगेतल्या अंधारात, साखळीचा दुवा होऊन.

असे खूप अंक आहेत.

फेसबुकाची अडचण होता होता आपण फेसबुक सराईतपणे वापरूही लागलो आहोत. तिथे मिळताहेत आपल्याला अनेक दिवाळी अंकांमधले आपल्या मित्रांचे लेख… आपल्या आवडत्या लेखकांचं लेखन. कथा-कविता… थोड्या चर्चा आणि वादविवाद. लेखकांशी संपर्क होणं, त्यांना दाद देणं कधी नव्हे इतकं सोपं झालेलं. मोबाईल, व्हॉट्सॅप आणि इमेल आयडी सगळ्यांना जोडणारे. पण वाचक वाढले आहेत का खरेच? वाचकाचा गोंधळ कमी झाला आहे थोडा तरी? या सगळ्या उखीरवाखीर पसार्‍यात आणि निवडीच्या अनंत पर्यायांमध्ये त्याला आपल्या आवडीच्या वाचनखुणा सापडताहेत का सहजी?

आम्हांला माहीत नाही. साहित्यासाठी, गंभीर संभाषितासाठी, मोकळ्या मतभेदांसाठी अधिकाधिक आक्रसत जाणार्‍या शब्दमाध्यमांच्या जगात – दिवाळी अंक अतिशय महत्त्वाचेही असतात आणि परंपरेचा भाग असूनही समकालीनत्वाच्या खुणा मिरवणारे – म्हणून आश्वासक-आकर्षकही. तिथूनच अनेक प्रवाहांचा कानोसा घेता येत असतो आपल्याला. आपल्यासारख्या कुणा वाचकाशी बोलायचं असतं, काय वाचलं, काय निसटलं, याबद्दल.

केवळ तितक्याच ओढीनं सुरू केलेला हा उपक्रम. येत्या महिन्याभरात इथे शक्य तितक्या दिवाळी अंकांबद्दल काही छोटी टिपणं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही वाचा, या वाचनखुणा वापरा, मतभेद नोंदवा… ’रेषेवरची अक्षरे’चा अंक यंदा नसला, तरी आमचं घोषवाक्य म्हणावं, अशा शुभेच्छा घेऊन हा नवा उपक्रम तुमच्यासमोर सादर करणार आहोत –

मनसोक्त लोळा, फराळा आणि भरपूर दिवाळी अंक चाळा!

हॅप्पी दिवाळी! 🙂

Facebook Comments

1 thought on “अंकनामा – लवकरच येत आहे…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *