Uncategorized

अपेक्षापूर्तीची ‘मौज’– सन्जोप राव
‘छापील दिवाळी अंकाचे भविष्य काय?’ या विषयावर दिवाळीत एका मित्राशी बोलत असताना तो म्हणाला की बहुधा छापील दिवाळी अंक आपल्या पिढीबरोबर संपणार. याचे कारण म्हणजे नव्या पिढीला हाडामासांच्या पुस्तकांशी फारसे काही देणेघेणे नाही. दिवाळी अंकांशी तर नाहीच नाही. (ते खरेच आहे. माझे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थीही “अमुक पुस्तकात हे आहे, हे वाचा.” असे म्हटल्यावर “लेकिन वो नेटपे कहां है?” असं विचारतात.) दुसरं असं की दिवाळी म्हणजे धम्माल, एन्जॉय, पडे रहो असल्या कल्पना घेऊन जगणाऱ्यांची मांदियाळी असल्यामुळे विचार करायला लावणारे, कदाचित काहीसे अस्वस्थ करणारे दिवाळी अंक वाचणार कोण? वाचनाने मनोरंजन व्हावे हे खरे, पण मनोरंजन हे वाचनाचे एकमेव उद्दिष्ट आहे का? मी तुम्हांला डिस्टर्ब केलं का?” असं तेंडुलकरांना विचारल्यानंतर “आपण सगळ्यांनी एकमेकांना सतत डिस्टर्ब करत राहिलं पाहिजे.” असं ते म्हणत असत. वाचकाच्या मेंदूला, बुद्धीला चालना देणे हेच वाचनाचे अधिक महत्त्वाचे उद्दिष्ट असावे की नाही? ‘ऐन दिवाळीत, सणाच्या दिवशी कशाला हे असलं डोक्याला ताप देणारं काही कशाला वाचायचं?’ या विधानाचा तर मला अर्थच समजत नाही. पण काही दिवाळी अंकांकडून कायम अपेक्षा असतात. ‘मौज’ हा तसाच एक अंक. ज्या अंकाची मुद्दाम वाट बघावी असा हा अंक असतो.

त्यातला विनया जंगलेंचा लेख मी नेहमीच सगळ्यात आधी वाचतो. जंगलेंचे लेखन मला नेहमीच आवडते. पशुवैद्यक या व्यवसायात काम करणाऱ्या जंगलेंसारख्या स्त्रिया फारच कमी आहेत. या पेशात काम करत असताना आलेले अनुभव विनया जंगले फार ओढीने लिहितात. पक्षी, प्राणी, निसर्ग यांच्यावर त्या सहृदयतेने पण वस्तुनिष्ठपणाने लिहितात. त्यांच्या लिखाणात गहिवर आलाच तर तो अस्सल असतो. या वर्षीच्या ‘मौजे’त जंगलेंनी ‘कथा फुलपाखरांची’ हा फुलपाखरांवरचा दीर्घ लेख लिहिला आहे. तांत्रिक स्वरूपाच्या लिखाणातल्या या लेखनात त्या रॉबर्ट फ्रॉस्ट आणि भा. रा. तांबेंचा उल्लेख करतात, हा कदाचित craftsmanshipचा भाग असेल; पण फुलपाखरांच्या स्थलांतराच्या अभ्यासाने झपाटलेल्या फ्रेड आणि नोरा यांचा उल्लेख करताना जंगले यांनी लिहिले आहे, ‘फुलपाखरं कुठं जातात हे कळल्यानं काही आपल्याला पैसे मिळणार नाहीत किंवा आपण काही श्रीमंत होणार नाही; पण तरीही ही फुलपाखरं नेमकी कुठं जातात एवढंच त्यांना शोधायचं होतं’. ‘Because it is there’ ची आठवण करून देणारं हे वाक्य मला खूप जरीपदराचं, किनखापी वाटलं. एकूणच हा लेख जंगले यांच्या इतर लेखांप्रमाणे खानदानी झाला आहे. मराठी लिखाणात अमराठी शब्दांचा वापर अगदी अत्यावश्यक असेल तरच करावा असे माझे (जुनाट आणि कालबाह्य झालेले) मत आहे. त्यामुळे ‘कढीलिंब’ हा मराठी शब्द उपलब्ध असताना जंगले यांनी ‘कढीपत्ता’ हा शब्द का वापरला असावा याचे मला नवल वाटले. तसे मी त्यांना विचारलेही. कढीपत्ता हाच शब्द त्यांच्या भागात प्रचलित आहे असे त्या म्हणाल्या. असेलही. (याच अंकातल्या आशा बगेंच्या ‘अदृश्य’  या (संपूर्ण निराशा करणाऱ्या) कथेत ‘टोकणे’ हा शब्द आहे. (पुढे बाळ फोंडके यांच्या लेखात ‘खिलवाड’ हा तसाच टोचून जाणारा शब्द आहे.) बगे यांच्या कथेत असे नागपुरी ढबीचे (देशावरच्या लोकांना अमराठी वाटणारे)  शब्द असतातही. भाषेची वाढ अशीच होते की काय कुणास ठाऊक. बगे यांची ही कथा अगदी सामान्य, अगदी या  अंकातून  ‘अदृश्य’ झाली असती तर बरे, असे वाटण्याइतपत सामान्य, आहे. वास्तविक बगे या माझ्या आवडत्या लेखिका.  (‘रुक्मिणी’!) पण या कथेने मला साफ निराश केले. असो, हे विषयांतर झाले.) जंगले यांच्या या देखण्या लेखाला त्यांच्याच शेवटच्या तीन परिच्छेदांचे गालबोट लागले आहे. ‘फुलपाखरांनी मला काय शिकवलं? त्यांच्याकडून मी काय घेतलं?’ अशा धर्तीचे ते किंचित दवणाळलेले परिच्छेद आहेत. ‘प्रत्येक गोष्टीतून मी काय शिकलो, आपण काय घ्यावे, जगातल्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या गोष्टी कायम आपल्याला काहीतरी शिकवत कशा असतात,’ असल्या सानेगुरुजी छापाचे आचरट लेखन करणाऱ्या; ‘पालींकडून काय शिकावे, निवडुंगाकडून काय शिकावे, झुरळांकडून काय घेता येईल,’ असले सतत लिहिणाऱ्या एका प्रसिद्ध लेखकाची आठवण करून देणारे हे तीन परिच्छेद जंगले यांनी गाळले असते; तर बरे झाले असते असे मला वाटले. तरीही एकूण अपेक्षापूर्ती करणारा (आणि ‘मौजे’कडूनच प्रसिद्ध होणाऱ्या जंगले यांच्या समग्र लेखांच्या पुस्तकाची वाट पाहावी असे वाटायला लावणारा) विनया जंगले यांचा हा लेख आहे.

 

चंद्रमोहन कुलकर्णी यांचा ‘दे दान’ हा लेख/कथा/अनुभव – जे काही आहे ते – मला महत्त्वाचे वाटले. याचे पहिले कारण म्हणजे त्यातील भाषा. ही भाषा एका चित्रकाराची आहे. चित्रकाराचे निरीक्षण सामान्य माणसांपेक्षा चांगले, वेगळे असते. सामान्यांच्या नजरेतून सहज सुटून जातील असे बारीकसारीक तपशील चित्रकाराला हुबेहूब टिपता येतात. चित्रकाराच्या लेखनातून त्याच्या (आणि वाचकाच्याही) नकळत एक पोर्ट्रेट तयार होत असते. ( उदाहरणार्थ : ‘सारवलेल्या स्वच्छ घरात प्रवेश करावा तसे धारवाडमध्ये शिरताना वाटले. सकाळची पिवळी उन्हे नुकती कुठे गावावर डोकावून पाहायला लागली होती. धारवाडात शिरताना चुना फासलेल्या पांढऱ्या बैठ्या घरांच्या भिंती, छोट्याशा बागा, सुळकांडी मारून वर गेलेले नारळाचे झाड…’ – सुभाष अवचट.) भय्यासाहेबांच्या मुलांमध्ये आणि काशिनाथ घाणेकरांमध्ये लेखकाला प्रथमदर्शनीच आढळणारे साम्य, पुरवण्यांच्या चित्रांचे तपशील, दीर-भावजय नात्यांचे त्या काळातले वेगळे संदर्भ हे सगळे वाचताना लेखकाच्या मागे उभा असलेला चित्रकार दिसतोच.  त्यातून चित्रकाराच्या व्यवसायानिमित्त त्याला जी भाषा वापरावी लागते, तिच्याही छटा त्याच्या लेखनात येतात. क्वार्टर साईजचे ड्रॉइंग पेपर्स, ब्लॅक आणि इतर कलर्सच्या (काळ्या आणि इतर रंगांच्या नव्हे!) बाटल्या, ब्लॅक आणि व्हाईट फोटो वगैरे अशी काही उदाहरणे. दुसरे असे, की गुरूबाबत शक्यतो चांगलेच, आणि जमले तर घसा भरून आणूनच, बोलायचे असा दंडक असल्यासारख्या लिखाणांच्या मांदियाळीत कुलकर्णी यांनी भय्यासाहेबांचे वस्तुनिष्ठ वर्णन केले आहे. त्यांच्या बारीकसारीक गुणदोषांसकट. मला हा त्यांच्या लिखाणाचा विशेष वाटला. वस्तुत: त्यांनी साताठ पाने रंगवलेला अनुभव, तसा बघायला गेला तर सामान्यच आहे; पण त्यातल्या बारकाव्यांनी तो वाचनीय झाला आहे. पण या सगळ्या लेखातले मला काय आवडले म्हणाल, तर ते लेखकाच्या वडिलांचे, नानांचे पात्र. पोलीस लायनीत, दोन खोल्यांच्या जागेत राहणारे नाना ताठ कण्याचे आहेत. “तुला हवं ते शीक, हव्या त्या साइडला जा, चित्रं काढ हवी तेवढी, मोठा चित्रकार हो. सगळं शिक्षण करीन मी तुझं, आणि तेपण सगळी फी भरून…!” असे त्या काळात सांगणाऱ्या या माणसाचे लेखकावर (आणि आपल्यावरही) खूप उपकार आहेत, असे मला वाटले. अशा सुंदर लेखातल्या त्रुटी कशासाठी काढायच्या? पण छिद्रान्वेषी मन ते करतेच. ‘नं’ हा या लेखातला शब्द मला खटकला. अगदी खांडेकरांची उपमा घेऊन लिहायचे, तर नाजूक काचसामानाच्या दुकानात बैल शिरावा तसे वाटले. ‘नं’ हा शब्द बोलीभाषेतही मला खटकतो. पण आता तो माझाच दोष असला पाहिजे या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. असो.
‘आप्पांच्या आठवणी’ हा रवींद्र अभ्यंकरांचा लेख म्हणजे – त्यांच्याच शब्दांत लिहायचे तर – ‘ही सर्व भावनिक बंधने असतात – मानणाऱ्यांसाठी!’ असा आहे. कसल्यातरी वेडाने झपाटलेल्या अशा लोकांच्या वर्तनात आणि विचारांत सुसंगती शोधू नये हे मान्य, पण सिंधुदुर्गावरुन काढून आणलेल्या महाराजांच्या पायाच्या ठशाच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या प्रतिकृतीला तीन वेळा मुजरा करूनच तो लोकांना दाखवणे हे जरा जास्तच होते असे मला वाटले. यावरून आठवले, ‘अनुभव’ या पुस्तकात बासू भट्टाचार्य यांनी इंदिरा गांधी यांच्यावर करावयास घेतलेल्या माहितीपटाची कथा सांगितली आहे. बाई घरात चालत असताना त्यांना जवाहरलाल की मोतीलाल यांच्यापैकी कुणाच्या तरी तसबिरीवर धूळ दिसते आणि त्या जाता-जाता ती धूळ पुसतात असा तो प्रसंग होता. तो कळल्यावर इंदिराबाई फडके आणण्यासाठी वळल्या. बासुजींनी त्यांना सूचना केली, की ती धूळ त्यांनी आपल्या पदराने पुसावी. त्यावर इंदिराबाई म्हणाल्या, की मला आदर आहे तो या तसबिरीबद्दल, तिच्यावरच्या धुळीबद्दल नाही. धूळ ही मी धूळ पुसायच्या फडक्यानेच पुसणार. वैचारिक स्पष्टता असावी तर ती अशी. अर्थात यावर आदर त्या व्यक्तींबद्दल, मग तसबिरीचे तरी काय महत्त्व, असा प्रश्न उपस्थित करता येईलच. पण तेही असो. आप्पांबद्दलचा लेख म्हणजे आधी ओवाळण्यासाठी तबक सजवायचे आणि मग कुणाला ओवाळायचे हे हुडकत बसायचे असे केल्यासारखा वाटला.
अरुण टिकेकरांबद्दल बऱ्याच दिवाळी अंकांत बरेच काही लिहून आले आहे. ‘विवेक पेरणारे गुरू’ या शुभदा चौकर यांच्या अशाच एका उत्तम लेखातल्या दोन गोष्टींचा मला विशेष उल्लेख करावासा वाटतो. टिकेकर (आणि कदाचित टिकेकरांचे लेखन) हे लोकाभिमुख संपादक नव्हते असा त्यांच्यावर आरोप केला जातो. म्हणजे काय? तर थोडक्यात म्हणजे; बातम्या असोत, संपादकीय असो की ललित लेखन असो, सगळ्याचे सोपे, सुलभ आणि बाळबोध ‘प्रीडायजेस्टेड फॅरेक्स’ करून वाचकाला भरवणाऱ्यांपैकी ते नव्हते. ते योग्यच आहे. वाचायचे आहे ना, मग घेऊ देत लोकांना थोडे कष्ट, शिणवू देत थोडासा मेंदू! आवडले तर ठीक, नाही आवडले तर तसा विचार करून, नेमकेपणाने सांगा – (जुनी उपमा : झेब्रा आवडला नाही तर तसे सांगा, ‘हा कसला पट्ट्यापट्ट्याचा उंट?’ असे म्हणू नका!) हा टिकेकरांचा विचारप्रवाह म्हणजे त्यांच्या वैचारिक परिपक्वतेचे द्योतक आहे असे मला वाटते. दुसरे म्हणजे शब्दांच्या नेमकेपणाबद्दल त्यांचा असलेला आग्रह. याबाबत लेखिकेने prepone या शब्दाच्या वापराचे उदाहरण दिले आहे. या शब्द म्हणजे postpone चे सोयीस्कर भारतीयीकरण केलेले रूप आहे असे मलाही वाटत होते. त्यामुळे हा शब्द वापरू नये (neck to neck competition, demotivation, momento, dais यांप्रमाणे) टिकेकरांनी असा शब्दच अस्तित्वात नाही हे २००२ सालाच्या आसपास त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले होते. (त्यानंतर २०१० साली ऑक्सफर्ड  डिक्शनरीत त्या शब्दाची भर पडली ही या लेखातून मिळालेली नवीन माहिती.)
सय्यद हैदर रझा यांच्याबद्दलचा प्रभाकर कोलतेंचा लेख या अंकात आहे, यापलीकडे मला त्यावर काही लिहिताच येणार नाही. आपल्या चित्रांबद्दल त्यांनी म्हटलेले ‘दृष्टी-संवेदना आणि दृष्टी-सुख जिथे सुरू होते आणि विलय पावते त्या नग्न दृक्‌-संवेदनेला मला माझ्या चित्रांतून भेटायचं आहे’ हे वाक्य मी पन्नास वेळा वाचले आणि शेवटी ‘आपला घास नव्हे’ असे म्हणून पुढे गेलो.
‘बगदादपर्व’ हा श्रीरंग भागवतांचा लेख हा या अंकाचा एक high point आहे. बगदादमध्ये १९८३ ते १९८५, म्हणजे सद्दाम हुसेन राजवटीच्या सुवर्णकाळात, ओबेरॉय ग्रूपतर्फे बगदादमध्ये चालवण्यात येणाऱ्या एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करण्याचे हे लेखकाचे अनुभव आहेत. या हुकूमशहाच्या मनमानी कारभाराची, दहशतीची आणि क्रौर्याची एकूण समाजावर पडलेली अस्पष्ट पण तीव्र पडछाया या संपूर्ण लेखात जाणवत राहते. आपल्याबरोबर काम करणारा, ज्याच्याशी कदाचित थोडेसे मैत्रीचे संबंध आहेत असा, एखादा माणूस अचानक चक्क गायब होतोआणि त्याबाबत कुठेही, काहीही बोलायचीदेखील सोय नाही ही घुसमट काय असू शकेल या कल्पनेनेही मला चरकायला झाले. ‘इफ देअर इज अ पर्सन, देअर इज डेफिनेटली अ प्रॉब्लेम. रिमूव्ह द पर्सन ऍंड ऑल द प्रॉब्लेम्स आर ओव्हर.’ हे स्टालिनचे वाक्य प्रमाण मानणाऱ्या सद्दाम हुसेनला फाशी देतानाची चित्रफीत बघून मला कसेसेच वाटले होते (अजूनही वाटते). हा असला न्यायनिवाडा करण्याचा अमेरिकेला काय अधिकार असे वाटले होते (अजूनही वाटते). भागवतांचा हा लेख वाचून त्या वाटण्याची धार थोडी कमी झाली असे मला वाटले. आपल्या सैन्यातून ‘पळून गेलेले’ सैनिक असा खोटा आरोप कोर्टात (!) सिद्ध करून घेऊन कैक निरपराध लोकांना सार्वजनिक ठिकाणी दगडांनी ठेचून मारणे काय किंवा आपल्या मुलीच्या वाढदिवसाला कापला जाणारा केक ज्या आचाऱ्याने केला आहे त्याला – तो केक ‘फूड टेस्टर’ला खायला देऊन त्यात काही विष वगैरे नाही ना याची खात्री करून घेईपर्यंत – बांधून ठेवणे काय, सगळेच मला अतर्क्य आणि अनाकलनीय वाटले. मानवतेला काळिमा फासणारे वगैरे तर वाटलेच.
मानवी मन, मेंदूचे कार्य, त्याचे कार्य, सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता या विषयांवर बाळ फोंडके यांचा ‘प्रतिभा वेध’ आणि सुबोध जावडेकर यांचा ‘युरेका क्षण आणि सर्जनशीलता’ हे दोन अप्रतिम लेख या अंकात आहेत. ज्यांना या विषयांत रस नाही त्यांना हे लेख फारच लांबलचक आणि कंटाळवाणे वाटू शकतील. मला बाकी या दोन्ही लेखांनी गुंतवून ठेवले. मानवी सर्जनशीलतेचे नेमके रहस्य काय? ती जेनेटिक-जनुकीय घटकांवरच अवलंबून असते की इतर कशांवर? बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेचे समीकरण प्रत्येक वेळी जुळतेच असे नाही. मग बुद्धी कशाला म्हणायचे आणि सर्जनशीलता कशाला? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न फोंडके यांच्या लेखात आहे. आईनस्टाईनचा मेंदू त्याच्या मृत्यूनंतर काढून घेण्यात आला आणि त्याचा अभ्यास केला गेला इतपत ढोबळ माहिती आपल्याला असते. पण याचा सविस्तर वृत्तान्त फोंड्के यांच्या या लेखात आहे. बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेचा आधार जर जनुकीय असेल; तर अभूतपूर्व बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांची पुढची पिढी  सामान्य, सुमार बुद्धिमत्तेची, प्रसंगी मतिमंद किंवा गतिमंद कशी हा प्रश्न विज्ञानाच्या अभ्यासकांना कोड्यात टाकतो. ज्या पर्यावरणात माणसाची वाढ झाली आहे त्यावरही माणसाची बुद्धिमत्ता अवलंबून असते, डावा मेंदू किंवा उजवा मेंदू प्रबळ असणाऱ्या लोकांचे प्रतिभाविष्कार वेगळे असतात हा भ्रम आहे, टोकदार सर्जनशीलता आणि प्रतिभा असणारे लोक आपल्या मेंदूतील चेतापेशींचं जाळं सततच्या वापरातून कार्यरत ठेवत असतात (म्हणजे ‘1% inspiration and 99% perspiration’ हे वपुटलेले वाक्य खरेच आहे म्हणायचे!) आणि एकलकोंडेपणा, मानसिक अस्वास्थ्य, थोडासा विक्षिप्तपणा हे सर्जनशीलतेसाठी गरजेचेच आहेत हे सगळे फोंडके यांच्या लेखात सोदाहरण आणि अत्यंत रंजक पद्धतीने मांडले आहे. मेंदूचा डावा भाग तर्कसंगत चिकित्सा करत असतो, त्यामुळे ज्यांच्या मेंदूच्या डाव्या भागाला तात्पुरती इजा झाली होती अशा लोकांना तर्कसंगत विचारांच्या काचातून सुटका झाल्यासारखे वाटते आणि एका असीम मोकळेपणाची, आनंदाची अनुभूती येते हे तर मला फारच रोचक वाटले. (पुढेमागे मेंदूच्या डाव्या भागाला किंचित लुळे करून अशा भराऱ्या मारण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल काय?) जाताजाता फोंडके कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिच्या मर्यादा यावर काही मनोरंजक भाष्य करून जातात. अशा सोन्यासारख्या लेखाचा शेवट ‘मगदुरानुसार’च्या ऐवजी ‘मगदुमानुसार’ (मगदूम हे आडनाव असते हो!)  या  मुद्रणदोषाने व्हावा हे मला फारच ‘हर हर शिव शिव वाटले. असो.
मानवी सर्जनशीलता याच विषयावरचा जावडेकरांचा या अंकातला लेखही असाच रंजक आहे. कदाचित थोडासा कमी क्लिष्ट आणि अधिक रंजक. त्यामुळे या दोन्हीं लेखांमधल्या माहितीची पुनरावृत्ती खटकत नाही. बहुतेक सर्व प्रतिभावंतांचे मन पटकन विचलित होऊ शकते, सर्जनाला बंधनांचा जसा जाच होतो, तसा दुनियेच्या गजबजाटाचाही होतो (म्हणूनच हल्ली लेखकाचा लेखकराव झालेले एक प्रतिभावंत तंतोतंत कायम निव्वळ रात्रीच लिखाण करत असावेत काय?) आणि मुख्य म्हणजे प्रतिभेचे, सर्जनशीलतेचे कारंजे व्यवहाराचा पृष्ठभाग फोडून कधी उसळी मारून वर येईल हे सांगता येत नाही, त्यासाठी सर्जनशीलता वाढवायची असेल तर मुद्दाम प्रयत्न करत राहिले पाहिजे, चुका करत राहिले पाहिजे (आणि फ्रॅंक बंकर गिल्ब्रेथ  म्हणतो तसे ‘आणि तुमचे मन त्यातच गुंतले असेल तर एखादा पेग घ्यायचा!.’ चेष्टा नाही, माफक मद्यपानानेही सर्जनशीलता वाढते असेही २०१२ साली शिकागो विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे!) असे जावडेकर म्हणतात. एकूण हे दोन्ही लेख मला फार आवडले.

 

‘रणधुमाळी अमेरिकन निवडणुकांची’ हा निळू दामलेंचा लेख ‘मौजे’च्या या अंकात आहे. अमेरिकेतल्या काळ्या लोकांविषयी त्यांनी या लेखात दिलेली माहिती वाचून मनात नकळत भारतातल्या मुस्लीम समाजाशी त्यांची तुलना होते. अमेरिकेत १३ टक्के काळे आहेत, २५ ते ४९ या वयोगटातले ३५ टक्के बेरोजगार आहेत, इतर समाजाच्या तुलनेने सगळ्यांत जास्त काळे तुरुंगवासात आहेत. दुर्दैवाने भारतात मुस्लीम समाजाचे असेच चित्र आहे. काळे-गोरे संबंध ठीक आहेत असे म्हणणाऱ्या अमेरिकनांची टक्केवारी आता ४६ टक्क्यांवर घसरली आहे ही चिंतेची बाब वाटू लागते. सामान्यत: काळ्या लोकांबद्दल अढी असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी आता कदाचित कोणत्याही चमत्काराची गरज नाही असेही एक भाकीत आहे. तसे जरी झाले नाही, तरी हिलरी क्लिंटन यांच्याविषयीही अमेरिकन काळ्यांना फारशी आत्मीयता वाटत नाही. एकुणात कुणीही राष्ट्राध्यक्ष झाले तरी अमेरिकेतल्या काळ्या लोकांच्या भविष्यासमोरचे प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे असे दिसते. अमेरिकेच्या आर्थिक अडचणी तर आहेतच. मुस्लीम दहशतवादाचा जगाला भेडसावणारा प्रश्न अमेरिकेत अधिकच तीव्र होणार की काय अशी भीती आहे. याशिवाय अमेरिकेतल्या सांसदीय कार्यपद्धती लक्षात घेता कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला संसदेचे लांगूलचालन करण्यापलीकडे फारसे काही करता येणार नाही वगैरे वगैरे… दामले यांच्या लेखात नवीन असे फारसे काही नाही. किंबहुना तो सगळा लेखच माहितीच्या विविध तुकड्यांची एक सुबक गोधडी असल्यासारखा वाटतो. लेखाचा शेवट दामले यांनी ‘हंsssss जे जे होईल ते ते पाहावे!’ असा केला आहे. त्यातल्या ‘हंssss’ वर तर मी फारच वेळ थबकलो.  ‘मौजे’च्या संपादकांनी यंदा नुसते वेणीफणी केलेले, पावडर-कुंकू लावलेले लेख स्वीकारायचे नाहीत, त्याच्या गालावर तीट असेल तरच त्याला आत घ्यायचे असा निकष लावला आहे की काय कुणास ठाऊक! संपादनाबाबत, लेखांच्या निवडीबद्दल, शब्दांच्या वापराबद्दल फार म्हणजे फारच दक्ष असलेल्या भागवत-पटवर्धनांचे या निमित्ताने स्मरण होते.
विवाहित, कुटुंबवत्सल स्त्री-पुरुषांना आपापले जोडीदार सोडून इतरांविषयी वाटणारे आकर्षण या जुन्याच विषयावरची मिलिंद बोकिलांची ‘सरोवर’ ही लघुकादंबरी ‘मौजे’च्या या अंकात आहे. बोकील हे तसे माझे आवडते लेखक. त्यांच्या लिखाणात तपशीलवार वातावरणनिर्मिती असली तरी त्याचबरोबर एक मोहक तटस्थपणा असतो. बोकिलांचे हेच वैशिष्ट्य त्यांची मर्यादा होऊ लागले आहे की काय अशी शंका मला ‘सरोवर’ वाचून आली. बोकिलांनी एका सामान्य कथेची एक सामान्य लघुकादंबरी केली आहे. बोकिलांची बरीचशी पुस्तके (कथासंग्रह, कादंबऱ्या) मी विकत घेतली आहेत. ‘सरोवर’ पुस्तकरूपात आल्यानंतर मी ती विकत घेईन का असे मी स्वत:लाच विचारले आणि त्याचे उत्तर शेवटी ‘नाही’ असे आले.
बाकी ‘जिणं डंपिंगवरचं’ हा वृषाली मगदूम यांचा लेख वाचून मी नुसताच बसून राहिलो. माझ्या घरातल्या डस्टबिनकडे मी बघितले. प्लॅस्टीक, थर्माकोल, काच, भाजीपाला सगळे एकत्रच. एकाच डब्यात. महानगरपालिकेने ‘ओला कचरा’ आणि ‘सुका कचरा’ असे छापलेले वेगवेगळ्या रंगांचे कचऱ्याचे डबे दिले आहेत. ओला कचरा जागच्या जागेवर मुरवा, त्याला कचऱ्याच्या डेपोपर्यंत जाऊ देऊ नका असे माध्यमांपासून पंतप्रधानांपर्यंत सगळे सांगताहेत. पुन्हापुन्हा. माझ्या घरातला कचरा तसाच, वर्गीकरण न करता, जातो. त्यातल्या प्लॅस्टिकचे डबे गोळा करत असताना त्या कचऱ्यातल्या काचेने कचरा गोळा करणार्‍या एखादीचा हात कापला; तर मला त्याचे काय? शिळे, खराब झालेलं अन्न त्यातच आहे. त्यात जीवाणू वाढतील, कचरा डेपोवर काम करणाऱ्या एखाद्याला इन्फेक्शन होईल. मला त्याचे काय? कचरा डेपोवर कचरा गोळा करण्यासाठी जाणाऱ्या बायकांना आत जाण्यासाठी कुण्या आण्णाला रोज पन्नास रुपये द्यावे लागतात, कुठल्या बॅंकेत त्यांचे खाते उघडायचे झाले तर त्या निरक्षर बायकांना सतरा हेलपाटे मारावे लागतात, त्या मुजोर अधिकाऱ्याकडून कारण नसताना वाटेल ते ऐकून घ्यावे लागते माझ्या भागातल्या नगरसेवकाला त्याची फिकीर नाही, आमदाराला नाही, मंत्र्यालाही नाही. मलाच मुळात काही वाटत नाही, तर या लोकांना तरी त्याचे काही कशासाठी वाटावे?  लेखिकेचा हा हतबल करून सोडणारा लेख किंचित निराश सुरात संपतो. ही वस्तुनिष्ठताही मला कौतुकास्पद वाटली. उगीच ‘मी त्या पर्वतासारख्या कचऱ्याच्या ढिगाकडं पाहिलं. त्या कुजणाऱ्या ढिगामागून आजचा नवा सूर्य उगवत होता. त्याच्या सोनेरी किरणांनी तो कचऱ्याचा धुमसता ढीग उजळून निघाला होता. मला वाटून गेलं…’ असले काही नाही. ‘समाजाचं आपण काही देणं लागतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे..’ असले भाबडे विचार करण्याचे दिवस संपले. आता जे आहे ते तसेच स्वीकारले पाहिजे. आवडो किंवा न आवडो. मी अनारसा उचलला.
‘मौजे’च्या अंकात इतरही बरेच काही वाचनीय आहे. पण त्या सगळ्यावर लिहिणे हा काही या टिपणाचा उद्देश नाही. बरेच दिवाळी अंक आतापर्यंत नुसतेच चाळले. ‘मौजे’चा बाकी जरा सविस्तर वाचला. आवडलाही. त्यातून हाती आलेले हे काही. बाकीचे वाचणे आणि त्यावर आपापली मते बनवणे हे ‘बा वाचकां’वर सोपवतो. ‘मौजे’च्या अंकात राशिभविष्य नाही, ही आणखी एक जमेची बाजू. शेवटी ‘मौजे’चा अंक अगदीच परिपूर्ण, सर्वांगसुंदर आहे असे वाटायला नको म्हणून ‘शेळक्यांचं घर’ आणि ‘साधनेचा वाडा’ ही अनिल अवचटांची दोन टिपणेही या अंकात आहेत असा इशारा देऊन थांबतो.
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *