Uncategorized

‘शुद्ध साहित्य’ आणि पद्मगंधा

– मेघना भुस्कुटे

‘पद्मगंधे’च्या अंकाची मुख्य थीम आहे ‘मिथकांचे अवतरण’. रा. चिं. ढेरे यांना श्रद्धांजली म्हणूनच हा विषय निवडण्यात आला असल्याचं आणि हा अंक त्यांना श्रद्धांजली म्हणूनच प्रसिद्ध केला जात असल्याचं प्रस्तावनेत संपादकांनी नोंदलं आहे. परिणामी ढेरे यांच्या कामाचा आढावा घेणारे, त्यांची थोरवी उजळवणारे असे काही लेख आहेत. ढेर्‍यांचा एक अप्रकाशित लेख आहे. आणि मुख्य म्हणजे मिथक या संकल्पनेचा वेगवेगळ्या अंगांनी वेध घेण्याचा प्रयत्न आहे.
‘विषयच किती जड…. सर्वसामान्यांनी काय नि का वाचावं?’ अशा प्रकारची रडारड करण्याचा माझा इरादा नाही, हे आधी स्पष्ट करते. कोणताही विषय असला तरी तो वाचकाच्या आयुष्याशी जोडून घेता येतो, योग्य पद्धतीनं समजावून सांगता येतो आणि त्यामुळे दिवाळी अंक वाचायची इच्छा असणार्‍या (=किमान वाचन करणार्‍या) मराठी वाचकाला अतिशय इंट्रेष्टिंगही वाटू शकतो. साहित्यधुरिणांना खरोखरच असं करायची इच्छा आहे का, असा प्रश्न मात्र ‘पद्मगंधे’च्या थीमवरचं लेखन वाचताना पडला. वाचकाभिमुख आणि लालित्यपूर्ण लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ढेर्‍यांना वाहिलेला अंक वाचताना हे अधिकच खुपलं.
पहिलं म्हणजे जवळपास प्रत्येक लेखामध्ये ‘मिथक म्हणजे काय?’ या प्रश्नाचा पानभर तरी ऊहापोह आहे. निरनिराळ्या कोशांमधल्या व्याख्या घेऊन त्यांचा कीस काढायचा आणि मग आपल्याला ‘या लेखापुरता’ कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते सांगून मग (एकदाची) विषयाला सुरुवात करायची, असा हा मामला आहे. यात संपादकीय प्रक्रिया कुठे आहे, ते मला कळेना. एकदा एक व्याख्या / चौकट / व्याख्यासमुच्चय गृहीतक म्हणून मांडायला हरकत काय आहे? ज्या लेखकाला त्यापासून फटकून असायचे आहे, काही कारणानं मतभेद मांडायचा आहे, त्याचा अपवाद यथावकाश केला जाईलच. पण हरेक लेखकानं एक पान ‘मिथक म्हणजे काय?’ याच्या चर्चेत आणि उदाहरणांत खर्ची घालायचं म्हणजे अवघडच आहे. याउलट व्याख्यानिश्चितीसाठी एका लेखाचा ऐवज वापरला असता, तर पुढे ही पुनरावृत्ती आणि परस्परविरोधी अर्थांची गर्दी बर्‍याच अंशी टळली असती.
दुसरं म्हणजे प्रशांत बागड, शाहू पाटोळे, आनंद पाटील आणि इतर काही जणांच्या लेखांचा अपवाद वगळता बहुतांश लेखकांनी वापरलेली संज्ञाजड भाषा. ही काही वानगीदाखल उद्धृतं:
“…अद्भुताचे अतार्किकाशी वास्तववादी प्रमाण, ओटो म्हणतो त्या ‘पवित्र-स्वेतरा’शी (‘Ganz Andere’ जर्मन शब्द) मिथकात आणि साहित्यात कमीअधिक प्रमाणात व भिन्न रूपात असते. विश्वसाहित्याची उकल करण्याचे जे सुखद, रंजक आणि उद्बोधक प्रयत्न साहित्यात आणि मिथकात अंतर्भूत असतात, होतात व जे ‘विसरलेले’ (व ‘विखुरलेले’) पुनः जाणवून देण्याघेण्याचे ज्ञानात्मक सुखद जाणीव देणारे कलाप्रकार आहेत, त्यात हे ‘वेगळे वास्तव’ असते…”
– वाङ्‍मयाची मिथकात्मता आणि मिथकात्म वाङ्मय, चंद्रशेखर चिंगरे
“… पृथ्वीचे परब्रह्ममूलक सूर्यान्वयी अस्तित्व हा एखाद्या त्रिशंकूचा कणा मानला तर तीही त्रिकोणी भासमान होताहोताच वर्तुळाकार प्रत्यय घडवितो आणि त्रिशंकूच्या तीन भुजाही आपसूकच शिरोबिंदूपाशी एकरूप होत त्या वर्तुळाकृतीचा शंकू करतात आणि त्याची त्रिविधता एकत्वात विलीन होऊन भासमान होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या कलात्मक शक्तीही एकात्म स्वरूपात मूल कारणाकडे निर्देश करतात आणि सर्व भेद भ्रामक व तात्कालिक अस्तित्वे वाटतात. मात्र जाणिवेच्या कक्षेत ज्ञानात्मक अवस्थेपर्यंत पोचेपर्यंत सर्व अस्तित्वे ही भौतिकतः भिन्न अनुभूती घडविणारी अनुभूती जीवांस देतात. या संपूर्ण प्रक्रियेत विविध अनुभवसिद्ध द्रष्ट्यांनी विविध प्रकारे जीवसृष्टीशी भरणपोषणात्मक तसेच उत्पत्तिविनाशात्मक प्रक्रियेत कार्यान्वित असणार्‍या….”
– दैवत निर्मिती : मानवी प्रवृत्ती, अनिल सहस्रबुद्धे
काय समजावं माणसानं? विषय काहीसा अमूर्त आहे हे मला कबूलच आहे. माझी तक्रार त्याबद्दल नाही हे पुन्हा पुन्हा नोंदवते आहे. पण “…समाजानेही आता ग्रंथसन्मुख होणे ही आपली जबाबदारी समजली पाहिजे…. शुद्ध वाङ्मयीन भूमिका घेऊन काम करणार्‍या सर्वच प्रकाशनसंस्थांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे…” असं प्रस्तावनेतलं संपादकांचं म्हणणं पाहता प्रश्न पडतो, की ही जबाबदारी फक्त ‘बा वाचका’चीच आहे की काय? दिवाळी अंक वाचणारा वाचक – अगदी ‘शुद्ध साहित्य’ वाचणाराही – संशोधक वा अभ्यासक नाही, याचा थोडा विचार संपादकांनी करायला काय हरकत आहे?
तिसरं म्हणजे भाषाशास्त्रज्ञ, साहित्यिक, समीक्षक आणि संस्कृती-/ दैवताभ्यासक – तेही गतकालीन खुणांच्याच अभ्यासात रमलेले – वगळता इतर जणांच्या आयुष्यात मिथकाचं काहीच महत्त्व वा उपयोजन नसतं का? नुकतंच ‘Sapiens: A Brief History of Humankind’, Yual Noah Harari हे पुस्तक वाचनात आलं होतं. भाषा आणि पर्यायानं गोष्टी (अर्थात मिथकं) या बाबींचा किती प्रचंड मोठा वाटा माणसांच्या उत्क्रांतीत आहे, आणि आजच्या आयुष्यातही किती वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी (मिथकं!) आपलं आयुष्य व्यापून असतात त्याबद्दलचं प्रतिपादन, हा त्या पुस्तकातला एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या मंडळींना मिथकांच्या अशा प्रकारच्या अर्थनिर्णयनात अजिबातच रस नाही का? निळ्या आणि भगव्या झेंड्यांमागची, फक्त भारतातच उलगडतील अशी प्रतीकं आणि त्यांमागे असलेली, स्थानिक संस्कृतीशी परिचित असलेल्या माणसालाच कळतील अशी मिथकं – हे एक समकालीन उदाहरण आनंद पाटील यांच्या लेखात आल्यावर मी ऑलमोस्ट हर्षभरित झाले होते. पण अशी उदाहरणं अपवादानं नियम सिद्ध करण्याइतकीच आहेत, हे दुर्दैव!
या सगळ्या विद्वज्जड लेखांनी दमून गेल्यावर नागनाथ कोत्तापल्ले यांची कथा वाचली आणि आधीच्या सगळ्या झटापटीचं सार्थक झालं. ‘भावना उचंबळून येणार्‍या देशात’ असं नाव असलेली ही कथा अंकाच्या विषयाला थेट ‘आज’मधून भिडते. कथानायक एक साधासरळ सरकारी कारकून आहे. जातीनं सवर्ण नसलेला. तो राहतो लहानशा तालुक्याच्या गावी. त्याला लिहिण्यावाचण्यात-इतिहासात रस आहे. बाकी कुणाच्या अध्यात-मध्यात तो नाही. त्याला रूढार्थानं प्रगती करवून घेण्याची, आर्थिक उत्कर्षाची महत्त्वाकांक्षा नाही; तशी अभिव्यक्तीची-साहित्यिक प्रसिद्धीची आसही नाही. लिहिताना-शोधताना येते तितकीच गंमत त्याला पुरेशी असलेली. त्याच्या जातीच्या रक्तलांछित इतिहासाबद्दल तो एक शोधनिबंध लिहितो आणि त्याचं आयुष्य ढवळून निघतं. सध्याच्या राजकीयदृष्ट्या ज्वालाग्राही-असहिष्णू वातावरणात त्याला ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, ते खरे आयुष्याला भिडणारे आणि मिथकांच्या अर्थाचा आणि महत्त्वाचा धांदोळा घेणारे प्रश्न आहेत. ही कथा नसती, तर या अंकाला काही वजन उरलं नसतं. (वीरा राठोड यांच्या ‘गावकुसाबाहेरची मिथके‘ या लेखाची आठवण झाली. तो या अंकात शोभेल असा लेख होता.)
उल्लेखलाच पाहिजे असा दुसरा लेख म्हणजे जयप्रकाश सावंत यांनी हरमान हेसे (योग्य जर्मन उच्चार: हेसं) आणि त्याच्या प्रकाशकावर लिहिलेला. लेखक आणि प्रकाशक यांचे संबंध किती गुंतागुंतीचे आणि खोलवर जाणारे असतात, त्याचा प्रत्यय हा लेख वाचताना पुन्हा एकदा आला. (यंदाच्याच ‘मुक्त शब्द’मध्ये त्यांनी अजून एका युरोपीय प्रकाशकाचा परिचय करून देणारा लेख लिहिला आहे. असे आणखी दोन-तीन जरी लेख त्यांच्याकडे असतील, तरी प्रकाशक या विषयावरचं एक भारीपैकी पुस्तक येऊ घातलं आहे, यावर मी पैज लावायला तयार आहे.)
समीना दलवाई यांची ‘मयत’ ही छोटेखानी कथाही मला खूप आवडली. एका मुस्लीम निवृत्त खेडूत शेतकर्‍याच्या मयतानंतरचं तटस्थ वातावरण तिच्यात रेखलेलं आहे. मयताची दोन लग्नं, चार-पाच मुलं, गावकरी, गावातलं वातावरण याचा एक तपशीलवार नि बोलका छेद घेत कथा पुढे सरकते. अजिबात काहीही न बोलता, लेखकाचा चेहरा जराही दिसू न देता केलं गेलेलं, पण बोलकं असलेलं लेखन किती दुर्मीळ असतं; ते ठाऊक असल्यामुळे तिचं अप्रूप वाटलं. समीना दलवाई या अजून काय लिहितील, अशी उत्सुकता वाटावी असं हे छोटेखानी लेखन आहे. याउलट लक्ष्मी होळेहोन्नूर यांची कथा. कथेची कल्पना तशी जुनीच आहे. उतारवयाच्या उंबरठ्यावर मुलाची चाहूल लागल्यानं भांबावलेलं एक जोडपं. बाकी सगळं ठीक आहे; पण नवरा-बायकोंमधले संवाद इतके पुस्तकी, नाटकी आणि लेखकाच्या डोक्यातले मुद्दे तसेच्या तसे टाचून लिहिल्यासारखे वाटतात की एकदम नको नको होतं. काही विशिष्ट वातावरणात मुद्दाम प्रयोग म्हणून घडवायचं चर्चानाट्य सोडल्यास पात्रांना आपापला इतिहास-भूगोल असतो आणि त्याबरहुकूम त्यांची भाषा-बोली-देहबोली रचावी-दाखवावी लागते, हे साधं सूत्र न पाळल्यामुळे वाचताना जामच कंटाळा आला.
असो.
शाहू पाटोळे यांचा दैवतांच्या उन्नयनाबद्दलचा लेख अतिशय इंट्रेष्टिंग आहे. ‘जुन्या रूढींचं उदात्तीकरण अभिप्रेत नाही; पण अभिजनांच्या संस्कृतीनं लोकसंस्कृतीवर जाणीवपूर्वक हातपाय रोवल्याचं मात्र स्पष्ट दिसतं. जर तसं झालं नसतं, तर उत्क्रांतीच्या ओघात आज कशा प्रकारची संस्कृती जन्माला आली असती, त्याबद्दल कुतूहल वाटतं,’ असं अगदी नवीन काही हा लेख नोंदतो. विवेक आणि कल्पना हे मुदलातच परस्परविरोधी असतात, असं मानल्यामुळे गोष्टींतलं तत्त्वज्ञान आपल्याला दिसत नाही. पण मिथकं हे अंतर लीलया मिटवतात. विवेकाच्या पलीकडचं, तर्काधारित स्पष्टीकरण न देता येणारं, पण अतिमहत्त्वाचं ‘काहीतरी’ – आणि समूहमनानं अंगीकारलेला नेणिवेतला तर्क एकाच वेळी कवेत घेतात – असं सांगणारा प्रशांत बागड यांचा लेखही मला आवडला-पटला-कळला! तसाच स्थानिक संस्कृतीमधली मिथकं नीट ‘आ’कळल्याशिवाय (आय नो! मी ‘पद्मगंधा’ वाचलाय, आख्खा. भाषेला थोडा तरी रंग लागेल का नाही!) अनेक सांस्कृतिक बाबी नीटशा कळणं शक्यच नाही, असं म्हणणारा आनंद पाटील यांचाही लेख कळला. पण या लेखावर संपादकीय हात फिरलेलाच नाही, हे जाणवत राहिलं. अनेक तोडकी-मोडकी, काहीशी असंबद्ध वाक्यं आणि विस्कळीतपणा हे दोष या लेखात आहेत. बाकी ग्रेसच्या कवितेतलं आदिमातेचं मिथक उलगडणारा देवानंद साबळेंचा लेख वाचनीय आहे. पण ग्रेसच्या कवितेतल्या प्रतिमा आणि त्यांना लगडून येणारी मिथकं हा इतका आवृत्त विषय आहे, की – पुनश्च असो! महेंद्र कदम यांचा ‘मराठी कादंबरीतील मिथक’ हा लेख आशेनं उघडला. पण मला तो जामच भोंगळ वाटला. शिव आणि शक्ती हे मिथक साधारणपणे कुठल्याही बाई-बुवा असलेल्या कथानकाला लागू करता येईल, असं मला तो लेख वाचून होईस्तो वाटायला लागलं होतं. दोष माझाही असेल. भूमिकन्या सीतेवरचा अरुणा ढेरे यांचा लेख अगदी अपेक्षित होता. विषय आणि शैली अशा दोन्ही अंगांनी. तो अपेक्षेबरहुकूम – शैलीमुळे वाचनीय, पण वाक्य संपतासंपता पुढच्या वाक्याचा अंदाज येत गेल्यामुळे आणि तो बरोबर ठरल्यामुळे थोडा कंटाळवाणा – असा झाला. ते ठीकच. पण माधवी भट यांनी सही-सही अरुणा ढेर्‍यांच्याच शैलीत, त्यांच्याच कवितेमधलं मिथक समजावून सांगण्यात काय मजा होती?
जाऊ द्या, झालं.
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *