Uncategorized

जेनेटिकली मॉडिफाइड फुलांचं एलीट अत्तर

– बघ्या

मी दिवाळी अंकांचा चोखंदळ वाचक नाही. मी ‘ऐसी अक्षरे’ हा फोरम पूर्वी केव्हातरी नियमाने वाचत असे. पण नंतर जे नेटावर थेट आणि अधिक शुद्ध स्वरूपात आहे, त्याबद्दल तिथे परत वाचणं नकोसं वाटायला लागलं. पुढे-पुढे लोकांच्या गीकीसदृश होत गेलेल्या कमेंट्सही कंटाळवाण्या होत गेल्या, त्यामुळे मी ते सोडून दिलं. पण अर्थात फेसबुकवर त्यांच्या दिवाळी अंकाबद्दल कळलं होतं. ‘ऐसी अक्षरे’ने ह्याअगोदर काढलेल्या पॉर्न विशेषांकात ‘जलपर्णीच्या नशिबाचे साडेतीन फेरे‘ हा फर्मास प्रकार होता. त्यामुळे ‘ऐसी अक्षरे’चा दिवाळी अंक मी बऱ्यापैकी वाचला. काही लिखाण वेगाने वाचलं; काही परत-परत, आणि काही केवळ चाळून सोडून दिलं.
इतर साऱ्या गोष्टींसारख्या दिवाळी अंकांबद्दलच्याही – काही चेरीश्‍‍ केलेल्या, पण आता पुसट झालेल्या – इमेजेस्‌ माझ्या डोक्यात आहेत. त्यात एक आहे अभय बंगांचा लेख (बहुतेक ‘मौजे’तला २००२ किंवा २००३ सालचा), आणि त्या अंकातली किनाऱ्यावरचे मासे समुद्रात फेकणाऱ्या माणसाची गोष्ट; एक आहे ‘प्रयास’च्या गिरीश संतांचा लेख (मौज दिवाळी २००५ बहुधा), ज्या लेखाने माहितीपर लिखाणाबद्दल मला जागं केलं; सदानंद देशमुख ह्यांची २०१० सालच्या (‘अंतर्नाद’ किंवा ‘मौज’च्या) दिवाळी अंकामधली कथा (एड्‌स झालेला भाऊ आणि त्याला फकिराकडे घेऊन गेलेली वहिनी); केव्हातरी वाचलेली अनंत सामंतांची कादंबरी – बहुतेक ‘ऑक्टोबर एंड’.
मी दिवाळी अंकांकडून काही अपेक्षा वगैरे ठेवत नाही. त्यामुळे मला धक्का बसलाच, तरी दुःख न देणारा धक्काच बसण्याची शक्यता होती. ‘ऐसी अक्षरे’च्या २०१६ दिवाळी अंकामधल्या असा दुःख न देणारा धक्का देणार्‍या किंवा वर दिलेल्याप्रमाणे लक्ष्यात राहणार्‍या कोणत्या गोष्टी असतील, तर त्या ह्या :
१. ‘विभक्ती’चे प्रत्यय आणि सापेक्ष सुरक्षिततेचे सिद्धांत : म्हणजे, मी वाचत गेलो ही गोष्ट. अ, ब, क अशी थोडी त्रयस्थ, निरपेक्ष नावं असली; तरी त्या गोष्टीचा नूर ‘घडलं असेल असं कदाचित लिहिणाऱ्याबाबत’ असा काहीसा आहे. अर्थात तसं ह्या गोष्टीत काही घडत नाही. खूप टोकाची संवेदना, बऱ्यापैकी उत्पन्न आणि तसेच मित्र-मैत्रिणी असलेल्या माणसांच्या रकान्यात मी ही गोष्ट सोडून देईन.
२. लोकशाही राज्यपद्धतीचे फायदे-तोटे : ह्या कथेचा फॉर्म आणि त्यातलं कोडं लक्ष्यात राहील. ह्या कथेत लोकशाहीबद्दल जी सटल्‌ कमेंट वगैरे आहे, ती काही मला मान्य नाहीय. रॅशनल निवडीने किंवा स्ट्रॅटेजिक मॅन्युप्युलेशनने लोकशाही मॉडेल होत नाही, असं मला वाटतं. पण ही बाब अलाहिदा आहे. ती एक सरस कथा आहे. कथा अशा अर्थाने वाचत असलेल्या काही वाचकांना मधला गणिताचा भाग अगम्य वाटू शकतो. पण कथेची शैली ही काही प्रमाणात मराठी कथांचे जनुकीय प्रणेते जीए ह्यांच्याशी जुळणारी असल्याने आणि मानवी वर्तनाचा पेच अशी एकूण कथेची मांडणी असल्याने आणि तिच्या चिरेबंद मांडणीमुळे मजा येते.
३. आधुनिक कविता अवघड का असते? :  असण्यामधल्या अनेक असण्यांचा पेच माझ्या लेखी ही कविता अचूक पकडते.  कवितांची उत्क्रांती वगैरेंबद्दल मला काही ठोस माहिती नाही. पण तरीही कवितांच्या बाह्य स्वरूपात आणि त्या काय सांगताहेत यानुसार नक्कीच दोन मोठे गट पडतात. गेयता, अर्थाच्या टोकदार पाठलागापेक्षा तंत्राची आस, आणि मुळात जगाला काहीएक नैतिक बैठक आहे अशा गृहितकावर आधारित असलेल्या कविता एका गटात. आणि दुसरा गट, जो कालान्वयेही नंतरचा असणार, तो म्हणजे जगाकडे बघायचा एकच एक असा बरोबर कोन नाही, असं मानणारा. जो जिथे आहे, तिथून त्याला जे दिसतंय, ते त्यानं मांडावं; अशी भूमिका असलेला. यमकाचा, गेयतेचा आणि अन्य तंत्राचा सोस सुटण्यामागे मुळात कसं बघावं ह्यात झालेला बदल कारणीभूत आहे असं मला वाटतं.
म्हणजे हा काही फक्त कवितांमधला बदल नाहीये. कोणत्याही मानवी कृतीकडे बघायचं कसं या भूमिकेतलाच हा बदल आहे. आपल्या भोवतीच्या जगाकडे बघायचा एक असा चश्मा नाही असं मानल्यावर चूक-बरोबर हे सात्त्विक वर्गीकरण एकदम ढासळून जातं आणि त्यातून विविधता येते. पण विविधता आली की त्याची जटिलता वाढते आणि काही वेळा हा केवळ ‘अगम्य कोलाहल’ वाटू लागतो. मुळात कविता हा प्रामुख्याने कवीचा स्वतःशी बोलण्याचा मार्ग आहे अशा अर्थाने आपण तिच्याकडे बघायला लागल्यावर, मग त्यात इतरांसाठी काही आहे का नाही असा प्रश्नच उद्भवत नाही. जे काही आहे, ते ज्याचं त्यानं बघून घ्यावं.
हे त्रोटक विवेचन आहे, पण माझ्यामते ह्यामुळे काही जणांना ‘आधुनिक’ कविता कठीण / जटील वाटत असणं शक्य आहे.
‘आधुनिक कविता अवघड का असते?’ हा खरा प्रश्न आहे का सटायर आहे, हे मला ठाऊक नाही. मला जेवढं कळलं, त्यानुसार ही कविता मॉक करतेय आणि काही वेळा एकदम सरळ काहीतरी सांगतेय. सिनिक, सहानुभूतीने बघणारा, विसंगती पकडणारा असे सारे कोपरेही तिला आहेतच. तरी शेवटच्या चार ओळी मला बेहद्द आवडलेल्या आहेत. त्यात एक थंड निष्कर्षाचा सुस्कारा आहे, का शब्दांच्या रचनेत दडवलेली कुत्सित कमेंट आहे,  हे कवीच जाणे!
४. आय-क्यू पंक्चरलेली बाहुली : मला गोष्ट आवडली. “इट्स क्यूट!” असं म्हणतात ना, तशा रकान्यात!
५. काळीजमाया : हा लेख मात्र मी दोनदा वाचला. मी केव्हातरी जीएंच्या रूपककथासदृश लिखाणाचा फॅन होतो. कदाचित मी कधीकाळी जे काही लिहिलं होतं, त्यातल्या काहीवर त्यांच्या शब्दांची झाक होती. (उरलेल्या काहीवर अजून कोणी असेल!) बरं म्हणा किंवा वाईट म्हणा; नेमाडे, ग्रेस, जीए अशा लोकांनी त्यांच्या-त्यांच्या जॉनरवर त्यांची मोठी सावली सोडलेली आहे. अनेक वाचक हे सारे प्रकार वाचताना सुरुवातीला त्याच सावलीत चाचपडू लागतात. ह्या सावलीतून बाहेर पडल्यावर त्यातील न्यून, किंवा त्याहून सरस किंवा रंजक काही सापडतं. हे सापडूनही काही जण आधीच्या चाचपडीशी भावनिक जवळीक ठेवू शकतात. काही जण तिला पूर्णपणे झिडकारू शकतात. लेखकाने जीएंच्या कथांना स्पर्शत जात त्यांच्या कथात येणाऱ्या, सुख रसरसून जगण्याच्या आशेला आणि त्या आशेचा निश्चित चुराडा झाल्यावर मागे उरलेल्या माणसांना याद केलेलं आहे. त्यांच्या शैलीमुळे हा लेख जमला आहे एवढं नक्की. तो वाचल्यावर सदाभाऊ आणि सीताबाई आणि त्या कथेचा शेवट मला आठवला.
एके काळी जीए आणि सुनीता देशपांडे ह्यांचा पत्रव्यवहार मी वाचायचो. आता कधी ते पुस्तक काढलं, तर फार वाचवत नाही. तसंच जीएंच्या कथांबद्दलही होतं, विशेषतः मानवी स्वभावाच्या एखाद्या मूलभूततेला रूपकवाटेने हात घालू पाहणाऱ्या कथांबद्दल. त्यापेक्षा करवादलेल्या, चिरडीला येऊन सणकेने काही करू जाणाऱ्या लोकांच्या, किंवा अनपेक्षिताच्या एखाद्या फटक्याने तुटलेल्या, मोडक्या लोकांच्या त्यांनी लिहिलेल्या गोष्टी मी केव्हा-केव्हा वाचतो.
‘काळीजमाया’चंही असंच झालं. मला पहिल्यांदा तो गारद आवडला. मग दुसऱ्यांदा काही शब्द जड-जड, अधिक नटवलेले वाटू लागले.
बाकी काही लेखांचा, बहुतकरून माहितीपर लेखांचा, उद्देश मला कळलाच नाही.  अनेकदा हे लेख नेमकं कोण वाचणार आहे आणि त्यातून वाचणाऱ्याला शॉर्ट रनमध्ये आणि लॉंग रनमध्ये काय वाटणं अपेक्षित आहे, का असं काही नाहीच; ह्याचा काही उलगडा झाला नाही. ‘नाती’ हा माणसांबद्दल लिहिल्या जाणाऱ्या बहुतेक गोष्टींचा कच्चा माल असतोच. त्याची थीम जरी दिवाळी अंकाला असली, तरी तिला फार पक्केपणा आलेला नाही.
मुळात माहितीपर लेखांच्या बाबतीत, त्यातही मराठीत असलेल्या अशा लेखांच्या बाबतीत, मी आता स्वतःला काही प्रश्न विचारतो:
१. लिहिणारा ज्या क्षेत्रात काम करतो, त्यातल्या नैपुण्याच्या आधारे आणि माहिती इतरांत वाटावी अशा भावनेने लिहिलेला लेख असेल; तर – मला आत्ता ह्या माहितीची गरज आहे का? किंवा हे माझ्या डोक्यात घोळणाऱ्या गोष्टींबाबत आहे का? उदाहरणार्थ, ‘महाराष्ट्रातील अमुक एका देवतेची मंदिरे’ असं असेल, तर मी ते थोडसं बाजूला ठेवतो. मंदिरं, देवता आहेत म्हणून नाही, तर ह्या लेखात जे असेल ते मला आत्ता नकोय म्हणून.
२. लेख लिहिताना घडलेल्या किंवा घडायच्या अवस्थेत असणाऱ्या आणि लोकांच्या भौतिक सुखावर परिणाम करू शकणाऱ्या गोष्टींची, वैयक्तिक अनुभवावर आधारित नसलेली, इतरांना तपासून पाहता येईल अशा पुराव्यांवर आधारित असलेली आणि काही उपाय सुचवायचा प्रयत्न करणारी, किंवा प्रस्थापित उपायांचा तर्काधारित प्रपोगंडा करणारी मांडणी असेल; तर मी ती प्राधान्याने वाचतो. पण वरील घटकांपैकी एखादा घटक नसेल, तर मी थोडा साशंक असतो. अमुक एक अमुक एका क्षेत्रात थोर आहेत, म्हणून त्यांचं म्हणणं प्रमाण माना किंवा त्यांची मांडणी जशी असेल तशी प्रमाण माना; असं असू नये असं मला वाटतं. हे एक प्रकारचं दैवतीकरण झालं.
३. आत्मविवरणपर किंवा अन्य कोणाच्या कृतींचं वर्णन असलेले माहितीपर लेख : इथे मी थोडा डळमळीत आहे. मला आत्मचरित्र हा प्रकार मुळातच स्वतःचे हिशोब जुळवायला केलेला प्रकार वाटतो. माझी माणसांच्या उतरंडीची जी परीक्षा आहे; त्यात ‘माझं असं, माझं तसं’ न करणारे आणि एखाद्या विषयातच मुरून, त्या विषयाचं अंग होऊन गेलेले लोक, किंवा अशी माझ्या मनातली त्यांची इमेज हीच काय ती जगण्याची पद्धत आहे. तरीही काही संदिग्धतेवर अधिक प्रकाश टाकायला, काही पूर्ण काळोखातल्या गोष्टी – धूसर का होईना – दाखवायला चरित्रं अथवा आत्मचरित्रं उपयोगी पडू शकतात. पण हे अशा कृतींमध्ये फार कमी वेळा लागू पडतं. अनेकदा, अमुक एका गोष्टीबद्दल कुणाला काही विचारायचं असेल, तर ह्याबद्दल ह्यांना विचारता येईल – अशी एन्ट्री बनवायला आपल्याला अशा लेखांचा उपयोग होतो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘ऐसी..’ मधल्या माहितीपर लेखांत मला फारसं काही गवसलेलं नाही. पण अर्थात हे थोडसं तिरकस सापेक्ष आहे.
‘कथा’ विभागातल्या बहुतेक कथा ह्या धक्का-तंत्रावर उभ्या केल्यासारख्या वाटतात. कदाचित सध्याचे बहुतेक सिनेमे, प्रख्यात कादंबऱ्या ह्या सगळ्यांचाच हा गुण आहे किंवा एकूणच जीवनाची गुणवत्ता या अर्थी सपक होत चाललेल्या आयुष्यात धक्कातंत्र हाच मजा आहे.
‘खेळ’मध्ये संवादांचा अतिरेक आहे. ‘खेळ’ ही कथा नाटक म्हणून परत सादर केली, तर अधिक चांगलं होईल, असं मला वाटत राहिलं. ‘कुलंगी कुत्र्याला…’मध्ये जननेंद्रियं, स्तन ह्यांचे उल्लेख नेमके कशाला आहेत हे कळलं नाही आणि केवळ शेवटावरच सारी कथा फिरवायचा प्रयत्न आहे असं वाटत राहिलं. तसंच ‘अंतर‘चं. काही पद्धतशीर स्टिरिओटाईप ठोकळे घेऊन ही कथा लिहिलेली आहे. (ही कथा वाचताना काही वेळा झुम्पा लहिरीच्या ‘लोलँड’ची आठवण येते, विशेषतः ‘बेला’ ह्या नावामुळे.) खरंतर चीअरलीडर हे थोडं वेगळं सूत्र होतं. भारतात वाढून-जन्मून परदेशात स्थायिक झालेल्या लोकांच्या पाल्यांबद्दल, विशेषतः त्यांच्यातल्या डीवियंट्सबद्दल (सेक्शुअली अशाच अर्थाने नाही. करिअर, भारताबद्दल काही वाटणं, खेळांची आवड अशा अनेक अर्थांनी. डॉ. अतुल गावंडे हे एक उदाहरण म्हणून मी देईन. ) मला कुतूहल आहे.  ‘वाढदिवस’च्या शेवटाचा मी अजून विचार करतो आहे. ‘धनुष्यातून सुटलेला बाण‘ निवांत सुरू होते, पण मग कमेंट करण्याच्या नादात कशीतरी संपते. ‘डावलच्या स्वप्नात पतंगी’ मी काही तांत्रिक कारणाने ऍक्सेस न मिळाल्याने वाचू शकलो नाही. उरलेल्या कथांबद्दल काही आठवत नाही.
ब्रह्मे आता जाम ताणू लागले आहेत.
‘ऐसी’च्या लेखनिवडीत रोमॅन्टिसिझमला किंवा सरासरी डोक्यावर घेतल्या जाणाऱ्या फॉर्म्सना नाकारणं अशी एक ठरवून केलेली निवड दिसते. आपण जेव्हा असं ठरवून सगळं नाकारतो आणि मुद्दामून, हेतूपूर्वक लिखाण करतो; तेव्हा ती प्रामुख्याने बौद्धिक निर्मिती बनते. ‘ऐसी’च्या दिवाळी अंकाला हा बौद्धिक गंध आहे. त्यापाठचं रसायन हळूहळू मराठीच्या जेनेटिकली मॉडिफाईड फुलांचं एलीट अत्तर बनेल का काय, असं काही वेळा वाटतं. कथा, कविता, अधिक लांबीचं फिक्शन ह्यांवर काम करणाऱ्या लोकांना चोखंदळ संपादन पुरवणं आणि दुसऱ्या प्रतलावर, अधिक स्ट्रक्चर्ड असलेल्या आणि निव्वळ उष्णता निर्माण करण्यापेक्षाही काहीएक प्रकाश पाडण्याच्या दृष्टीने बनणाऱ्या वैचारिक लिखाणाचं चोखंदळ संपादन आणि प्रसार – ह्या दोन दिशांना ‘ऐसी अक्षरे’ जाऊ शकेल काय?
इमेल : kiranlimaye11@gmail.com
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *