Uncategorized

वाचनकक्षा रुंदावणारा ‘अक्षर’

दर दिवाळीला काही दिवाळी अंक वाचलेच पाहिजेत असा एक नियम ठरून गेलाय. त्या यादीत ‘अक्षर’  असतोच. चांगले लेख, काही वेगळ्या कथा, हे तर असतंच; पण विनाकारण गुळगुळीत कागदांवरच्या, तुपट चेहर्‍याच्या माणसांच्या तितक्याच गुळगुळीत झालेल्या जाहिरातीही नसतात हीदेखील विशेष संतोषाची बाब.
यंदाच्या अंकाचं इरावती कर्णिकांनी केलेलं मुखपृष्ठ आवडलं. काहीशा उष्ण रंगसंगतीत रंगवलेल्या – थकलेल्या गांधीच्या डोळ्यांतून येणारे कोलाजचे कढ नक्कीच हिंसाचाराचा निषेध करत असतील. पण त्यात काही शीतल पाण्याचे ओघळ आहेत हे आशादायक आहे…
या वर्षीचा अंक ‘हिंसेचे दशावतार’ विशेषांक आहे. या हिंसा का होतात, त्यांतून कुणाला काय मिळतं; हे नि असे प्रश्न या वर्षी ‘अक्षर’ मांडत आहे.  या लेखमालेत त्यांनी एन्कांउटर्स, मुस्लीम दहशतवाद, जाती आणि जमातवाद, घरगुती आणि बालहिंसा, सोशल मिडियावरचा डिजिटल दहशतवाद, सिनेमातला हिंसाचार असे वेगवेगळे पैलू घेतले आहेत. या सर्वांचा शेवट होतो तो हिंसेच्या मानसिकतेबद्दलच्या लेखाने. यांतले बहुतेक सारे लेख मुद्दाम बेतून त्यांचं सुसूत्रीकरण केलं गेलं असावं इतकी शंका येण्याइतपत हे लेख एकमेकांना पूरक झाले आहेत. त्यामुळे ते वेगवेगळे तुकडे वाटत नाहीत. लेखांचा आवाका बांधीव आहे आणि ते आपापल्या चौकटीबाहेर वाहवत नाहीत, आणि तरीही एकूण लेखमालेचं चित्र पाहता काही राहून गेल्याचं भासत नाही. काही ठिकाणी – विशेषत: मूलतत्त्ववादी, जाती आणि जमातवादी यांच्याबद्दलच्या लेखांत – काही घटक सामाईक आहेत. पण तिथेही लेखांत पुनरावृत्ती होत नाही, उलट ते  एकमेकांना पूरक ठरतात. काहीतरी एकसंध वाचल्याचं समाधान ही लेखमालिका वाचून मिळतं.
या लेखांच्या मांडणीत डॉ. आशिष देशपांडेंचा ‘का होते हिंसा’ हा हिंसेच्या मानसशास्त्रावरचा लेख अंकात सगळ्यात शेवटी असला, तरी मी त्याचा उल्लेख प्रथमत: करेन. डॉक्टरच ते. अर्थातच हिंसेची मानसशास्त्रीय मीमांसा करतात, दुजोरा म्हणून काही मानसशास्त्रीय प्रयोगांबद्दलही सांगतात. हिंसा आणि आक्रमकता यांतली भिन्नता, त्यांचे वेगवेगळे पैलू आणि आक्रमकतेचं हिंसाचाराशी असलेलं नातं हे अगदी साध्या-सोप्या भाषेत सांगतात.  हिंसाकर्ते आणि हिंसापीडित यांच्याबद्दलचं इतर लेखातलं विवेचन  अगदी परिभाषेत नसलं तरी साधारण त्याच धर्तीवर जाणारं. इथं लेखमालेचं वर्तुळ पूर्ण होतं.
या हिंसेच्या दशावतारातला पहिलाच लेख आहे रघू कर्नाड आणि ग्रेस जॅजो यांचा – ‘एका मारेकरी पोलिसाचा कबुलीजबाब’. मणिपूरमधल्या एका कमांडोने केलेल्या खोट्या एन्काउंटर्सचा कबुलीजबाब.  या कमांडोचं नांव हिरोजीत असलं, तरी लेख त्याला हिरोही करत नाही आणि व्हीलनही. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय असलेला हा लेख खास वाचनीय. असं असलं, तरी काही ठिकाणी मूळ इंग्रजीत असल्यासारखी वाटावीत अशा वाक्यांचं शब्दश: मराठी  भाषांतर खड्यासारखं टोचतं. मूळ लेख ‘गार्डियन’साठी लिहिला गेला होता असं तळटिपेत लिहिलंय. त्यामुळेही कदाचित असेल, पण ती त्रुटी राहून गेलीय खरी.
मुस्लीम देशांतल्या दहशतवादी संघटनांबद्दल निळू दामलेंचा लेख आहे. या दहशतवादाचं मूळ शोधणारा, तो रोजच्या आयुष्यात कसा निरुपयोगी आहे याबद्दल साधकबाधक गोष्टी सांगणारा आणि त्याचा नायनाट करायचा असेल, तर उपाययोजनाही सुचवणारा. कुराणात सांगितलेली कालबाह्य जीवनपद्धती आणि आजच्या समाजाच्या मूलभूत गरजा यांतली विसंगती या लेखातून नोंदवली जाते. कुराणातला जिहाद किंवा दहशतवाद या गरजा भागवायला कसे असमर्थ आहेत यावरचे त्यांचे विचार वाचनीय आहेत. निळू दामलेंचे लेख मला बरेचदा आवडतात. हाही पुन्हा वाचावासा वाटावा असा.
धर्माच्या नावावर हिंसाचार करणार्‍यांबद्दलचा हेमंत देसाईंचा लेख आणि जाती-जमातींच्या नावावर राजकारण करणार्‍यांवरचा दीप्ती राउतांचा लेख स्वार्थी राजकारणाबद्दल खोलात जाऊन बोलतात. हिंसा कशी घडवून आणली जाते, तिचे करविते आणि विनाकारण होरपळणारे कर्ते यांच्याबद्दल देसाई लिहितात; तर स्त्रिया आणि दुर्बल घटक जातीय अस्मितेमध्ये नि कट्टरतेमध्ये कसे भरडले जातात, त्याबद्दल दीप्ती राऊत.  साधारण जवळच्या विषयांवरचे दोन स्वतंत्र लेख असूनही तेच ते मुद्दे न घोळवल्यानं दोन्ही लेख तितकेच वाचनीय.
मला व्यक्तिश: अनुराग आणि त्याचे सिनेमे आवडतात. कधीकधी मनातल्या मनात काडीमोड होतो, पण घाऊकरीत्या ज्याच्याबद्दल नावड उत्पन्न व्हावी, असा तो प्राणी नाही. शिवाय लोकांचे जेवढ्यास तेवढे ‘बाइट्स’ घेऊन त्यांतली संकलित क्षणचित्रं मुलाखत म्हणून देण्यापेक्षा त्या विषयाच्या अनुषंगानं इतर गोष्टींबद्दलही थोडीफार वाहवत गेलेली मुलाखतही मला आवडते. काटेकोरपणाचा माझा तितकासा आग्रह नसतो. त्यामुळे समीर विद्वांसने घेतलेली अनुराग कश्यपची मुलाखत फक्त ‘असहिष्णुता आणि अनुराग’ इथपर्यंतच न थांबता; त्यापलीकडे जाऊन आसपासचं जग, त्यातली माणसं, त्यांचे परस्परनातेसंबंध, वाढती असहिष्णुता आणि हिंसा या सर्वांकडे पाहण्याची अनुरागची नजर… इथपर्यंत जाते; तेव्हा मला ती आवडायला हरकत नव्हती. पण ही मुलाखत ‘सापडलाय अनुराग, विचारा त्याला प्रश्न!’ छापात खूपच लांबलीय. अनेक वळसे घेत घेत, ती पुन्हा-पुन्हा मुख्य विषयाकडे परतत राहते. भलतीकडेच जात नाही, पण मग टोकदार-क्रिस्पही राहत नाही. याच विषयावरचे इतर लेख वाचायला सुरुवात केल्यानंतर संपवल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटले नाहीत. त्यातही शैलीचा भाग कमी आणि गाभ्याला अधिक महत्त्व होतं.  इथे मात्र ‘अजून किती पानं राहिलीयत’ हे मी एकदा न राहवून मोजलंच.
‘छडी वाजे छमछम’ हा संतोष शिंदेंचा लेख लहान मुलांबाबत घडणार्‍या हिंसाचाराबद्दल आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून या विषयाचं गांभीर्य ठसवलं जात असलं, तरी ते अजूनही तळागाळापर्यंत आणि जायला हवं तितकं खोल कसं गेलेलं नाही, हे हा लेख दाखवून देतो. घरातच अत्याचार होताहेत, हे घरातल्यांनाच न पटणं किंवा पोलिसांना अशा केसेस्‌ हाताळण्याचं ज्ञान नसणं या गोष्टी खरंच खूप गंभीर आहेत. समाजसेवी संस्थांचा अशा ठिकाणी कस लागतो. त्या मुलांच्या मनावर होणारे परिणामही अतिगंभीर असतात. हिंसामुक्त घर आणि हिंसामुक्त समाजासाठी प्रत्येक जण आपापल्या पातळीवर काय करू शकतो याचं छान विवेचन या लेखाच्या शेवटाकडे येतं.
शाब्दिक हिंसेबद्दलचा ‘हिंसेचा डिजिटल मार्ग’ हा राहुल बनसोडेंचा लेख डिजिटल माध्यमं, लोकांच्या स्वतंत्र आणि फॉर्वर्डेड संदेशांच्या अभिव्यक्ती आणि त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हिंसेला मिळणारं खतपाणी याबद्दल सांगतो. या सायबर हिंसेला तो ‘अमर्याद शाब्दिक हिंसा करण्याचा मार्ग’ म्हणतो. हाही लेख वाचावा असाच.
या सर्व मालिकेत निराशा करत असेल, तर वंदना खरेंचा ‘घराच्या भिंतीआड’ हा लांबलचक लेख. तो  खरंतर नवीन काहीच देत नाही. स्त्रियांवरचे मानसिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचार; वेगवेगळ्या संघटनांनी केलेली त्याबद्दलची सर्वेक्षणं आणि त्यांचे निष्कर्ष, काही महत्त्वाच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातली घटनांची जंत्री इतपतच हा लेख सीमित राहतो. यात नवीन माहिती मिळत नाही. किंवा या सगळ्याबद्दल लेखिकेला काय म्हणायचंय हे्ही कुठे येत नाही. इतर लेखांमध्ये का, कसं, त्याचे दूरगामी परिणाम किंवा काही दुरुस्तीदाखल सुचवण्या असं काही ना काही येतं. परंतु हा लेख वाचल्यानंतर, मी हा लेख का वाचला, हाच प्रश्न मला पडला होता.
या खास विषयाखेरीज इतर लेखांबद्दल बोलायचं, तर अमेय तिरोडकरांचा ‘जेएनयू नावाचं जग’ हा जेएनयूची बलस्थानं सांगणारा लेख चांगला आहे. गेल्या वर्षभरात ‘जेएनयू’बद्दल सगळं विपरीतच माध्यमांतून लिहिलं गेलं. या लेखात ‘जेएनयू’च्या स्थापनेमागची कहाणी, अभिव्यक्तीला स्वातंत्र्य देणारं तिथलं वातावरण, तिथली अभ्यासपद्धती, तिथले ढाबे या सगळ्याबद्दल अगदी छान लिहिलं आहे. काही कोपरखळ्याही आहेत. एकुणात लेख वाचल्यानंतर आपणही तिथं जाऊन शिकावं अशी इच्छा होते.
सोनाली नवांगुळांचा त्यांच्या शरीरात फॉलीस कॅथेटर बसवून घेण्याच्या अनुभवांबद्दलचा लेख चांगला आहे. “मी कशी बघा सहनशील, कसल्या त्रासांतून गेले,” असा, किंवा “मी कशी बिचारी होते,” अशा दोन्ही गोष्टी त्यातून डोकावत नाहीत. मला हा लेख वाचताना प्रश्न पडत होता, असं तिर्‍हाइतासारखं स्वतःकडे बघून स्वतःबद्दल लिहिता येईल का?
‘लोकप्रियतेचे चार प’ हा निमिष पाटगांवकरांचा लेख प्रायोजक, प्रसिद्धी, प्रसारमाध्यमं आणि पैसा यांबद्दल सांगतो. खेळांचं वाढतं जागतिकीकरण आणि बदलतं अर्थकारण, याबद्दल बोलणारा हा लेख त्यांतले तोटेही मांडतो.
मृदुला बेलेंचा ‘तोक्यो डायरी’ हा लेख ‘अय्या! जपान कस्सा भारी आहे बै!’ अशा छापाचा लेख आहे. ‘सकाळ’च्या मुक्तपीठ या सदरात लोकांचे  स्वत:च्या परदेशप्रवासाचं कौतुक करणारे बाळबोध लेख असतात. साधारण आप्तेष्टांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करण्याच्या धर्तीचे. मृदूला बेलेंचा हा लेख त्यातला जपानी भाषेच्या माहितीचा भाग वगळला तर खास ‘मुक्तपीठीय’ आहे. अर्थात पंधरा दिवसांच्या अनुभवावर त्या आणखी काय लिहू शकल्या असत्या हादेखील प्रश्नच आहे. त्यामानाने  सिंगापूर आणि भारत शासनाचा तुलना करणारा अलका धुपकरचा लेख चांगला आहे. तिने दोन्ही बाजूंकडे असलेलं अधिक-उणं नीट मांडलंय आणि त्याचसोबत सिंगापूरसारखी शासनव्यवस्था आपल्याकडे येईल की काय ही धास्तीही. अर्थात पुन्हा एकदा ‘घरेलू’ अत्याचारांसारखे काही शब्द डोळ्यांना त्रास देतातच.
‘स्टेम सेल रिसर्च’वरचा प्रसन्न करंदीकरांचा लेख, हा या विषयावरचा मी मराठीत वाचलेला पहिलाच लेख. या विषयावर इंग्रजीतून पूर्वीच वाचलं असल्यानं मला त्यात काही नवीन सापडलं नाही; पण या विषयावर आधी वाचन केलं नसेल, तर जड नसलेला हा लेख इतरांना आवडू शकेल. जगावरच्या वाढत्या कर्जावर लिहिलेल्या संजीव चांदोरकरांच्या लेखाचा उल्लेख करायलाच हवा. मी सर्वसाधारणपणे अर्थविषयक लेख वाचायचा कंटाळा करते, पण जागतिक कर्जं, मंदीची कारणं आणि परिणाम सांगणारा लेख मी चक्क वाचू शकले.
कथा विभागातली पंकज भोसलेची ‘हिप्स डोंट लाय’ ही कथा म्हणजे अगदी सॉल्लिड. गेल्या वर्षीच्या ‘ऐसी अक्षरे’च्या पॉर्न अंकातल्या डॉली गालाच्या गोष्टीनंतर ही नक्षी नेमाडेची गोष्ट वाचली. हीदेखील भलतीच आवडली. कथेत एमटीव्ही आणि तत्सम संस्कृती भारतात रुळण्याचे जे संदर्भ पेरले आहेत, त्यामुळे तर आणखीनच मजा येते. सतीश तांबेंची ‘मला कमळाबाईवर खटला भरायचाय’ ही कथा तशी उपरोधिक आणि चांगली आहे, पण जरा जास्तच लांबलीय असंही वाटतं. विवेक गोविलकरांची ‘रियुनियन’ ही कथा आणि रूपाली जगदाळेंची ‘दिवळी आणि नागोबा’ ठीकठाक. अविनाश राजारामांची ‘पार्टनर-आरसा आणि बादली’ ही एकमेकांना आजमावणार्‍या रूम पार्टनर्सची कथा रंजक आहे.
कविता हा सोईस्करपणे माझा प्रांत असतो. कधी मनापासून वाचते, तर कधी सरळ पानं गाळून पुढं निघून जाते. फेसबुकवरच्या कवितांत मला उत्पल व. बा. यांची आणि कविता महाजन यांची, अशा दोन कविता समजल्या आणि आवडल्या. योजना यादवची वंशाच्या अर्थाबद्दलची कविताही चांगली आहे. नितीन कुलकर्णींची पोस्टमॉडर्न कविता दोन वेळा वाचूनही सरळ डोक्यावरून गेली. आजकालची यंत्रं, ऍप्स यांच्याभोवती फिरणार्‍या आणि संगणकशास्त्रातली परिभाषा बोलणार्‍या इतर कविता खरंतर आपल्या जगण्याच्या अनुभवाशी निगडित वाटायला हव्यात. पण त्या नुसत्याच तसा आव आणत राहतात असं वाटतं. त्यांना आधुनिकोत्तर तरी का म्हणावं हा प्रश्न मला पडला. संतोष पवारांची कविता आणि प्रणव सखदेवांची कविता, या दोन्ही अर्थपूर्ण आणि इतर कवितांहून थोड्या वेगळ्या वाटल्या. बस, याहून कवितांबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही.
या वर्षी आमच्या दक्षिण भारतीय पेपरवाल्याला इतर अंक न मिळाल्यानं ‘अक्षर’ हा एकमेव दिवाळी अंक हाती लागला. त्यामुळे या वर्षीच्या इतर अंकांशी त्याची तुलना करता आली नाही. पण तरीही अपेक्षापूर्तीचं समाधान मात्र ‘अक्षर’ने दिलंच. मात्र माझी त्यांच्या अनुक्रमणिकेबद्दल तक्रार आहे. वेगवेगळ्या सदरांखाली फक्त लेखकांची नावं आणि लेखांची / कथांची नावंच नाहीत. त्यामुळे कोणता लेख कोणत्या पानावर आहे हे आधी शोधा, मग त्याचा लेखक कोण आहे हे लक्ष्यात ठेवा आणि त्यावरून पुढच्या वेळी लेख शोधा, इतका द्राविडी प्राणायाम करावा लागतो.

ब्लॉग : http://he-jeevan-sundar-ahe.blogspot.in/
इमेल : swatsurmy@gmail.com

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *