Uncategorized

शुभ ‘दीपावली’

– सन्जोप राव
माझ्या टेबलावरील दिवाळी अंकांचा गठ्ठा उचकटून बघताना माझी एक मैत्रीण म्हणाली, “‘तू हंस’, ‘किस्त्रीम’, ‘साप्ताहिक सकाळ’चे अंक घेतोस यात काही नवल नाही”. तिच्या ‘नवल’ या शब्दावर मी हसलो.  त्याकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करत ती म्हणाली,”पण तू ‘दीपावली’ कशासाठी घेतोस, आणि कशासाठी वाचतोस?” “एका वाक्यात सांगायचं तर..” मी तिला म्हणालो, “त्यात नंदिनी आत्मसिद्धांचे उर्दू, फारसी लेखकांवरचे, शायरांवरचे अप्रतिम लेख असतात म्हणून.”
‘दीपावली’चा या वर्षीचा अंक वाचताना मला मीच दिलेले कारण तर पटलेच, पण त्याशिवाय इतरही… पण थांबा. हे असं उभ्या-उभा सांगता येणार नाही. नीट मांडी घालून बसून बैजवार सांगावं लागेल. सांगतो. बसा.
प्रथमदर्शने मक्षिकापात. ‘दीपावली’च्या अंकाची अनुक्रमणिका बघा. मिलिंद बोकीळ? सुबोध बावडेकर? पहिल्याच पानावर अशी कच्ची भाजणी का असावी? पण ते जाऊ दे. नंदिनी आत्मसिद्ध यांचे लेखन अप्रतिम असते. उर्दू शायरी आणि लेखन म्हणजे ग़ालिबपासून सुरु होऊन ग़ालिबबरोबर संपते असली बाळबोध कल्पना बाळगणाऱ्या (माझ्यासारख्या) वाचकांना उत्तमोत्तम लेखकांची आणि शायरांची ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आत्मसिद्ध यांनी केलेले आहे. मंटो, मजा़ज़ यांच्यावरचे त्यांचे लेख दीर्घकाळ स्मरणात राहातील.
‘पुरजोश शायर जोश मलिहाबादी’ हा त्यांचा लेख त्यांच्या आतापर्यंतच्या लेखनाला शोभेसा असाच आहे. फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेलेल्या (आणि नंतर त्याचा घनघोर पश्चाताप झालेल्या) असंख्य गुणी कलावंतांमध्ये ‘जोश’ यांचा समावेश होतो. वस्तुत: ते नेहरूंचे निकटवर्तीय. पण नेहरूंनंतर तुमचे, तुमच्या मुलाबाळांचे काय, असल्या फसव्या चिंतांना आणि कराचीचे मुख्य आयुक्त नकवी यांनी घातलेल्या गळीला बळी पडून  ते १९५८ साली पाकिस्तानला निघून गेले आणि पस्तावलेही. पण ती नंतरची गोष्ट झाली. भारतात असताना विशेषत: स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ‘जोश’ यांची बंडखोर आणि तीक्ष्ण लेखणी एखाद्या समशेरीसारखी तळपत राहिली. प्रतिभा आणि परखडपणा यांचे काही गूढ नाते असावेच. इतर बऱ्याच प्रतिभावंतांप्रमाणे ‘जोश’ हे अत्यंत परखट, प्रसंगी उद्धट वाटावे असे, होते. सरंजामी थाटाचे, कधी क्रूर वाटावे असे त्यांचे वागणे असे. ते व्यसनी तर होतेच. शिवाय कधीकधी आपल्या लेखनाशी, त्यातल्या विचारांशी विसंगत असेही ते वागून दाखवत. म्हणजे एकूण ज्याच्यापासून चार हात लांब राहावेसे वाटावे असा माणूस. पण या लोकांचे असेच सगळे तिरपागडे असते की काय कुणास ठाऊक.  शायरीची परंपरा ‘जोश’ यांच्या घरातच होती. त्यांचे वडील शायर बशीर अहमद खान यांना ‘दाग’ यांचे ‘उसको कहते है जबान-ए-उर्दू, जिसमें न हो रंग फारसी का’ हे मत मान्य होते. तरीही ‘जोश’ यांनी स्वत: उर्दू शायरी करताना फारसी, अरबी शब्दांचा मुबलक वापर केला. तरीही उर्दूवर ‘जोश’ यांनी मनापासून प्रेम केले. या संदर्भात उर्दू भाषेवर आत्मसिद्ध यांनी केलेले भाष्य मला (उर्दूचा अजिबात अभ्यास नसतानाही) फार आवडले. उर्दू म्हणजे मुस्लिमांची भाषा, पाकिस्तानची भाषा असे ढोबळ समज घेऊन वावरणाऱ्यांना (तसे पुष्कळ लोक आहेत!) आत्मसिद्ध यांचे हे विवेचन एक नवा दृष्टीकोन देईल असे वाटले. अर्थात असा समज असलेले किती लोक आत्मसिद्ध यांचे हे लेखन वाचतील हा वेगळा प्रश्न! त्या काळात शायरी म्हणजे गजल असेच समीकरण असताना ‘जोश’ यांनी गजलेपेक्षा कवितेला- नज्मला- अधिक जवळ केले. या बंडखोरीशिवाय मला स्वत:ला ‘जोश’ यांचा वाटलेला विशेष म्हणजे शब्दांच्या वापराबद्दलचा, भाषेबद्दलचा त्यांचा काटेकोरपणा. पकिस्तानचे जनरल अयूब खान यांनी ‘जोश’ यांची प्रशंसा करताना वापरलेला ‘आलम’ हा शब्द चुकीचा आहे, असे ‘जोश’ यांनी अयूब यांना त्यांच्या तोंडावर सुनावले होते अशी एक कथा आहे. खरे-खोटे कुणास ठाऊक, पण असला सडेतोडपणा आणि विक्षिप्तपणा – अव्यवहारीपणा म्हणा तर – अल्लाचा हात डोक्यावर घेऊन आलेल्यांना (आणि फक्त त्यांनाच!) शोभूनच दिसतो.  स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आणि धर्मावर आधारित फाळणीच्या काळात ‘जोश’ यांनी अत्यंत ज्वलंत शब्दांत लिहिलेल्या कवितांचे अंश आत्मसिद्ध यांच्या लेखात मुळापासून वाचावे असे आहेत. अशा लेखकांची, शायरांची ओळख करुन दिल्यावर तो लेखक, शायर संपूर्ण वाचावा असे वाटणे हे त्या ओळखीचे मोठे यश आहे असे मी समजतो. आत्मसिद्ध यांच्या या लेखाने हे साधले आहे. विनया जंगले यांच्या लिखाणाप्रमाणेच आत्मसिद्ध यांच्या अशा लेखांचे पुस्तक कधी प्रसिद्ध होते याची मी वाट पाहतो आहे.  विनोद दुवा त्यांच्या ‘जायका इंडिया का’ या (फारच सुंदर) कार्यक्रमात ते एखाद्या भोजनातील सर्वोत्तम पदार्थासाठी ‘हासिल-ए-महफिल’ हा शब्द वापरत असत. आत्मसिद्ध यांचा ‘जोश’ यांच्यावरील हा लेख ‘दीपावली’च्या अंकाचे ‘हासिल-ए-महफिल’ आहे, असे मला वाटले.
व्यवस्थापनात, विशेषत: विपणनशास्त्रात, ‘Product Life Cycle’ (उत्पादनाची सुरुवात, वाढ, उत्कर्ष आणि र्‍हास) अशी एक संकल्पना आहे.  पूर्वी ही जीवनचक्रे खूप मोठी, लांबलचक असायची. म्हणजे एखाद्या उत्पादनाची लोकप्रियता बरेच दिवस टिकून राहायची. लाईफबॉय साबणाचे उदाहरण घ्या. कित्येक वर्षे तो भारतात सर्वात अधिक विकला जाणारा अंघोळीचा साबण होता. आता मात्र हे टप्पे संकुचित झाले आहेत. लेखकाचेही असेच होते की काय कुणास ठाऊक! लेखकाला ठरावीक काळानंतर येणाऱ्या Writer’s Block ला न जुमानता लेखक तसाच मुर्दाडपणाने लिहीत राहिला, की त्याचे लेखन पचपचीत, मचूळ होते की काय? ‘मौजे’च्या दिवाळी अंकातल्या मिलिंद बोकिलांची ‘सरोवर’ कादंबरी वाचून बोकिलांच्या लेखणीतली धार आता कमी झाली की काय, असे मला वाटले होते. ‘दीपावली’तल्या बोकिलांच्या ‘नेचर पार्क’ने बाकी माझी जवळजवळ खात्रीच झाली. धकाधकीचे आयुष्य जगणाऱ्या जोडप्याबरोबर वाचकानेही बदल म्हणून बाहेरगावी (या कादंबरीत, परदेशी) जायचे आणि मग तिथले असंख्य कंटाळवाणे तपशील सोसत शेवटी कंटाळूनच परत यायचे एवढेच मला बोकिलांच्या या कादंबरीत सापडले. नवीन म्हणाल तर काय; तर ज्या ठिकाणी हे जोडपे जाते, तेथे कपडे घालणे ऐच्छिक आहे. बरं मग?  Shallow people demand variety. I have been writing the same story of my life, each time trying to cut nearer to the aching nerve असे स्ट्रिंडबर्ग म्हणतो. पण बोकिलांच्या लिखाणातली ही दुखरी नस मला काही सापडता सापडेना. पण ज्यांच्याकडून कधी फार अपेक्षा होत्या त्या बोकिलांचे हे असे झालेले बघून काही बरे वाटले नाही.
अंबरीश मिश्र यांचा ‘टॅली हो!’ हा शम्मी कपूरवरचा लेख वाचनीय आहे. शम्मी कपूरचे कौतुक करताना त्याचे उगाचच उदात्तीकरण करण्याचा मोह मिश्र यांनी टाळला आहे. त्यांची भाषा खेळीमेळीची आणि मिश्किल आहे. काही वेळा ती खूपच श्रीमंत होऊन येते. आपल्या शाळेतल्या शिक्षिकेचे, मिस एफींचे, वर्णन करताना ते लिहितात, ‘शिडशिडीत देहयष्टी, सावळा रंग, अतिशय तेजस्वी डोळे आणि काळजात जिव्हाळ मायेचा पायलीभर चंद्रचुरा.’ हीच मिस एफी मुलांना सिनेमाला घेऊन जाते. (आताच्या काळात हे झालं असतं, तर सोशल नेटवर्किंग साईट्सवर तिची पूर्णपणे बदनामी झाली असती. ‘चोंबाळते’ की काय लहान मुलांना? India wants to know वगैरे. या संदर्भात मिश्र यांनी या लेखात वापरलेलं ‘in that order’ हे पालुपदही गंमतीशीर आहे.) ‘आसमानसे आया फरिश्ता’ गात शम्मी कपूर शर्मिला टागोरशी यथेच्छ झोंबाझोंबी करतो हे सांगून ते पुढं लिहितात, ‘खरंतर फरिश्ता असा वाह्यातपणा करत नसतो. देवदूताच्या डोळ्यांत तर समर्पणाची निरांजनं तेवत असतात आणि तो दिलीपकुमारप्रमाणं भावव्याकूळ, आर्त स्वरात ‘यह हवा यह रात यह चांदनी’ असं संथखोल आणि गहिरं गात असतो.’ हे मजेशीर आहे. ते पुढं लिहितात, ‘पन्नासच्या दशकातल्या सिनेमांत दिलीपकुमार, मीनाकुमारी, मधुबाला वगैरे मंडळींचं दु:ख गोपुराप्रमाणं उदात्त असायचं. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा’ असं म्हणण्याची खोटी, की त्यांच्यावर मरणाचा वर्षाव सुरू झालाच म्हणून समजा.’ मिश्र यांचा हा ‘टंग इन चीक’ विनोद मजेदार आहे. काही वेळा बाकी ते जरासे घसरल्यासारखे होतात.
‘एहसान तेरा होगा मुझपर’ हे ‘जंगली’तलं गाणं चांदीच्या पालखीत बसून आलं. जयकिशनदेखील आपल्या खास, वाळ्याचं अत्तर शिंपडलेल्या चाली शम्मीसाठी राखून ठेवायचा, शम्मीचा (हे असं लोकांना एकेरीत संबोधणं मला आवडत नाही. जणू काही तो माणूस आपला लंगोटीयार असावा, त्याच्याबरोबर आपण जोडीने इतिहासाच्या पेपरला कॉपी केलेली असावी आणि ज्याच्याबरोबर पहिली सिगारेट अर्धी-अर्धी  ओढली असावी. पण बरेच लेखक असं करतात. मिश्र यांनी तरी त्याला अपवाद का असावं?) पर्सोना नाईल नदीइतका विशाल होता. सत्यनारायणाच्या प्रसादाप्रमाणे तो घरोघरी पोचला.
असली किणीकरी भाषा त्यांच्या लिखाणात येते. पण एकूण हा लेख वाचताना मला फार मजा आली.
विजय पाडळकरांनी आवंदा शैलेंद्र आणि राज कपूरला वेठीला धरलं आहे. शैलेंद्र उत्तम गीतकार होता, राज कपूर आणि तो यांनी मिळून काही सुंदर कलाकृती दिल्या, वगैरे सगळं ठीक आहे. पाडळकरांच्या ‘मेरा नाम राजू’ या लेखामध्ये मात्र काहीही नवीन नाही. एक नायक, एक गायक आणि सात गीते असा काहीसा या लेखाचा विषय आहे. ‘तीसरी कसम’, ‘मारे गये गुलफाम’ वगैरे सगळे त्यांनी ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकातल्या ‘सजनवा बैरी हो गये हमार’ या लेखात लिहिले आहेच. खरे तर खुद्द बासु भट्टाचार्यांकडूनच हे सगळे ‘अनुभव’मध्ये वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याचा रवंथ का व्हावा ते कळत नाही. असो. विजय पाडळकरांचे लेखन (मला) एकतर अत्यंत आवडते (‘कवडसे पकडणारा कलावंत’), किंवा अजिबात आवडत नाही (‘जी.एंची निवडक पत्रे’ ची प्रस्तावना). एकूण, लेखकांना लिहिते करणे हे पूर्वी जसे उत्तम संपादकांचे काम समजले जायचे, तसे काही लेखकांनी प्रत्येक वर्षी लिहिलेच पाहिजे असे काही बंधन नाही हे त्या लेखकांना – प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या – समजावून द्यायचे हे आताच्या संपादकांचे काम असले पाहिजे, असे मला वाटले.
सुबोध जावडेकरांची ‘मेंदूची बाळं’ ही विज्ञानकथा रोचक आहे. तिच्यावर जरा संपादकीय कात्री चालली असती, तर ती आणखी चांगली झाली असती असे मला वाटले. (तिच्यातलाही ‘हंबक!’ हा मुद्रणदोष खटकतोच.) कथेतले शेवटचे वाक्य खटकेदार आणि सूचक असणे हे (नारायण धारपांच्या कथांमध्ये दिसते तसे) वैशिष्ट्य या कथेतही दिसते.
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या डबक्यांना चुकवत, पाय सांभाळत, ओलांडून जावे; तसा मी दिवाळी अंकांमधील इतर कथा आणि कविता यांना चुकवत-चुकवत जातो. याचे कारण म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा कथा-कविता मला समजतच नाहीत. नील आर्ते नावाचे कुणी लेखक आहेत. त्यांच्या कथा मी काही दिवाळी अंकांत चाळल्या आणि आता नवीन कथा आपल्याला समजणारच नाही या निर्णयाप्रत आलो. ‘आटपाट नगर होते, नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता…’ अशी सुरुवात असणाऱ्याच कथा आपल्याला कळतील असे हल्ली मला वाटू लागले आहे. दोष अर्थातच माझा. ‘डोक्यावर पुस्तक मारले आणि ‘ठक्क’ असा आवाज आला की प्रत्येक वेळी दोष पुस्तकाचाच असतो असे नाही’ हे आइनस्टाइनचे वाक्य कधीकधी आठवते, इतकेच.   कवितेचेही तेच. ‘कबूल कर की, तू मत्सर करतेस माझा, कबूल कर की, तू द्वेष करतेस माझा, कबूल कर की, तू घृणा करतेस माझी, कबूल कर की, आपण प्रेम करतो परस्परांवर’ अशी एक कविता या अंकात आहे. झाले. एवढेच. ‘तू इडली, मी डोसा, तू खार, मी ससा’ हे काय वाईट होते मग?
‘मौजे’प्रमाणे ‘दीपावली’मध्येही राशीभविष्य नाही. धन्यवाद. पण मुक्तांगण वगैरे आहेच. शेवटी’ ‘मी अमक्याकडून काय घेतले, तमक्याकडून काय घेतले, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावेत…’ असलेही सगळे आहे. इतके सगळे घेता येते, तर यांच्याकडून त्यांच्या लेखण्या कायमच्या हिसकावून घेण्यासाठी काय करावे या विचारात आपण पडलो असता हा अंक संपतो. (‘इचका’ आणि ‘टग्या’ यांबाबत तात्या माडगूळकरांनी केलेले मौलिक भाष्य आठवते. तरीही) हे पिकासोप्रमाणे जिभेने कारागृहाच्या भिंतींवर चित्रे काढतील की काय, बजावलेल्या समन्सांची ओरिगामी करतील की काय आणि कारागृहाच्या गजांची बासरी करून तिच्यातून मारवा ऐकवतील की काय या शंकेने जिवाचे पाणी पाणी होते! तरीही शिरीष बेरींवरचा लेख मी ‘त्यांनी मला काय दिलं’ या अटळ प्रश्नासकट वाचला आणि हताश होत्सासा पुढे गेलो.
‘सेलिब्रेटींचं प्रस्थ –कोणामुळे? कशासाठी’ या विषयावरची एक लेखमाला ‘दीपावली’च्या दिवाळी अंकात आहे. भीष्मराज बाम, राजन खान, अभिराम भडकमकर, विक्रम गायकवाड आणि प्रवीण दवणे यांची टिपणे या लेखमालेत आहेत असे तिचे शीर्षक सागते. सेलिब्रिटींना लोकमान्यता, लोकप्रियता, ‘स्टेटस’ आहे आणि चिकाटीने, न हरता काम करणाऱ्या लोकांबद्दल मात्र समाजाला आस्था नाही. असे का असावे, अशा बाळबोध प्रश्नाने या लेखमालेची सुरुवात होते. पण ते असो. ‘सेलेब्रिटी’ या शब्दाला चपखल मराठी शब्द काय? राजन खान त्याचा शब्दकोशातला अर्थ ‘प्रसिद्ध, गाजलेला’ असा देतात. ‘दिग्गज’ हा त्यांना सुचलेला शब्द सांगतात (आणि ‘सेलेब्रिटी’ हा शब्द ‘दिग्गज’ या शब्दाच्या उंचीचा नाही हेही लिहितात). पण तेही काही खरे नव्हे. एकूण काय, सेलेब्रिटी म्हणजे सेलेब्रिटी. सगळ्या लेखांमध्ये एक समान सूर दिसतो. तो म्हणजे एकूणच समाजात साचलेला उथळपणा (एका प्रसिद्ध पण आता डबघाईला आलेल्या मराठी संकेतस्थळावर दिगम्भा यांनी वापरलेला ‘थैल्लर्य’ हा अफलातून शब्द आठवतो!) आणि चकचकीत कचकड्यांच्या व्यक्तिपूजेचे स्तोम यांसाठी या सर्व लेखकांनी प्रसारमाध्यमे, चित्रवाणी, संगणक, चलभाष आणि आंतरजाल यांना जबाबदार धरले आहे. सकृतदर्शनी ते तसे आहेही. पण खान यांच्या लेखात ते म्हणतात त्याप्रमाणे, चांगल्याचा अपमान आणि वाइटाचा मान ही वैशिष्ट्ये असणारा हा सांप्रतकाळ केवळ भांडवली व्यवस्थेने निर्माण केलेला नाही, तर भारतीय मानसिकताही तशीच आहे. हे मला अधिक महत्त्वाचे वाटले. ‘Money does not change people, it only magnifies what is already there’ हे खरेच आहे. मुळात अंगार नसेल, तर बाहेरून येणारा कोणताही वारा वणवा पेटवू शकत नाही. म्हणजे बटबटीतपणाचे हे बी कुठूनतरी बाहेरून येऊन इथे रुजले, वाढले आणि त्याला माध्यमे, संगणक यांनी खतपाणी घातले, असे नाही. ते मुळात इथे होतेच. फक्त वाव मिळताच ते फोफावले, इतकेच. मला हे अगदी हुबेहूब मान्य आहे. भीष्मराज बाम यांनी राजेंद्र जक्कल आणि त्याच्या साथीदारांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीचे वर्णन केले आहे आणि ‘पोलिसांनी त्या गुन्हेगारांना परत नेण्यासाठी गाडीत बसवले, तेव्हा त्या लोकांनी जमलेल्या गर्दीकडे बघून हात हलवले आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मी हादरून गेलो.’ असे लिहिले आहे. हे वाचताना माझ्या अंगावर काटा आला. जोशी-अभ्यंकर हत्याकांडाला आता इतकी वर्षे झाली. त्यामुळे आज समाजात सुटलेले सैराट वारे ही काही नव्याने निर्माण झालेली वावटळ नाही; त्या काळात लोकांकडे स्मार्टफोन्स असते, तर लोकांनी या गुन्हेगारांचे चित्रीकरण केले असते आणि जमले असते तर त्यांच्याबरोबर स्वत:च्या ‘सेल्फीज’पण काढल्या असत्या असे मला वाटले. फक्त बाम हे या उथळपणाला अमेरिकी आणि युरोपीय व्यक्तिस्वातंत्र्याशी जोडतात, ते काही मला पटले नाही. खान यांचे या विषयावरचे टिपण प्रगल्भ आहे, पण त्यांनीही ‘संगणक येताना मुळात सेवा म्हणून नाही, तर धंदा म्हणूनच आला’ असे एक सरधोपट विधान केले आहे. विक्रम गायकवाड यांच्या मते आपण मानसिकदृष्ट्या भ्रष्ट झालो आहोत. त्यांच्या टिपणात बाकी बहुतांश ‘मी आणि माझे जीवन’ हेच आहे. दवणे यांच्या अत्यंत हसऱ्या आणि सकारात्मक फोटोखाली ‘सेलेब्रिटी: ‘ध्रुव कोण? उल्का कोण?’ असे खांडेकरी वळणाचे शीर्षक आहे.
जाहिरातींत ‘डब’ केलेलं अत्यंत अशुद्ध मराठी आम्हांला आता खटकत नाही, यामागे सारं काही समजून घेऊन समोरच्याला सन्मान देण्याची महाराष्ट्रीयन (हा कोणता शब्द बुवा?) संस्कृती आहे, न्यूनगंड नाही. न्यूनगंडाची ठिकाणं वेगळी आहेत, ती जोपासण्याचं पद्धतशीर कार्य सुरू आहे.
असं लिहून ते पुढं लिहितात,
‘न्यूनगंड भाषेचा नसून परंपरेने जपलेल्या आर्थिक गरिबीचा आहे. चाळकरी सामान्य जीवनशैलीतून तो आलेला आहे.’ (या दोन वाक्यांचा एकत्रित अर्थ लावण्याचा मी अजून प्रयत्न करत आहे.)
अपेक्षेप्रमाणे –
उल्का आणि ध्रुव यांतला फरक जाणिवेने आकळला की मग कितीही प्रस्थ वाढो, ते ओलांडून नवी पिढी शाश्वत ध्रुवताऱ्याकडे वळेल. निश्चितच वळेल.’
अशा आशावादी वळणावर दवणे यांचे हे टिपण संपते. अभिराम भडकमकरांना त्यांच्या टिपणात काय म्हणायचे आहे हे मला सांगता येणार नाही, कारण या अंकात मला ते टिपण सापडलेच नाही!
शेवटी सुहास बहुळकर यांच्या अब्दुलरहीम अप्पाभाई आलमेलकरांविषयीच्या दीर्घ लेखाबद्दल. बहुळकर यांची भाषा साधी आणि अनलंकृत आहे. आलमेलकरांची या लेखात दिलेली जी चित्रे आहेत, त्यांत न समजण्यासारखे काही नाही. या चित्रांमधील माणसे माणसांसारखी दिसतात आणि घरे घरांसारखी दिसतात. त्यामुळे मला हा लेख आवडला. हा लेख वाचतानाही विलक्षण प्रतिभा आणि विक्षिप्तपणा यांचे नाते मनात अधोरेखित झाले. ‘कलंदर’ हा शब्द त्याच्या अतिवापरामुळे बदनाम झाला आहे; पण आयुष्य ज्यांना घारीसारखे (‘चील’ की तरह!) धरून ठेवते आणि ज्यांना पोटापाण्यासाठी, रोजच्या जगण्याच्या झगड्यासाठी तडफडावे लागते अशा कलावंतांची फरफट आणि तिच्यातूनही त्यांची दिसणारी झळाळती प्रतिभा यांबद्दलचे पूर्वी अजिबात माहिती नसलेले एक प्रकरण मला या लेखात सापडले.
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *