Uncategorized

शुभ ‘दीपावली’

– सन्जोप राव
माझ्या टेबलावरील दिवाळी अंकांचा गठ्ठा उचकटून बघताना माझी एक मैत्रीण म्हणाली, “‘तू हंस’, ‘किस्त्रीम’, ‘साप्ताहिक सकाळ’चे अंक घेतोस यात काही नवल नाही”. तिच्या ‘नवल’ या शब्दावर मी हसलो.  त्याकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करत ती म्हणाली,”पण तू ‘दीपावली’ कशासाठी घेतोस, आणि कशासाठी वाचतोस?” “एका वाक्यात सांगायचं तर..” मी तिला म्हणालो, “त्यात नंदिनी आत्मसिद्धांचे उर्दू, फारसी लेखकांवरचे, शायरांवरचे अप्रतिम लेख असतात म्हणून.”
‘दीपावली’चा या वर्षीचा अंक वाचताना मला मीच दिलेले कारण तर पटलेच, पण त्याशिवाय इतरही… पण थांबा. हे असं उभ्या-उभा सांगता येणार नाही. नीट मांडी घालून बसून बैजवार सांगावं लागेल. सांगतो. बसा.
प्रथमदर्शने मक्षिकापात. ‘दीपावली’च्या अंकाची अनुक्रमणिका बघा. मिलिंद बोकीळ? सुबोध बावडेकर? पहिल्याच पानावर अशी कच्ची भाजणी का असावी? पण ते जाऊ दे. नंदिनी आत्मसिद्ध यांचे लेखन अप्रतिम असते. उर्दू शायरी आणि लेखन म्हणजे ग़ालिबपासून सुरु होऊन ग़ालिबबरोबर संपते असली बाळबोध कल्पना बाळगणाऱ्या (माझ्यासारख्या) वाचकांना उत्तमोत्तम लेखकांची आणि शायरांची ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आत्मसिद्ध यांनी केलेले आहे. मंटो, मजा़ज़ यांच्यावरचे त्यांचे लेख दीर्घकाळ स्मरणात राहातील.
‘पुरजोश शायर जोश मलिहाबादी’ हा त्यांचा लेख त्यांच्या आतापर्यंतच्या लेखनाला शोभेसा असाच आहे. फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेलेल्या (आणि नंतर त्याचा घनघोर पश्चाताप झालेल्या) असंख्य गुणी कलावंतांमध्ये ‘जोश’ यांचा समावेश होतो. वस्तुत: ते नेहरूंचे निकटवर्तीय. पण नेहरूंनंतर तुमचे, तुमच्या मुलाबाळांचे काय, असल्या फसव्या चिंतांना आणि कराचीचे मुख्य आयुक्त नकवी यांनी घातलेल्या गळीला बळी पडून  ते १९५८ साली पाकिस्तानला निघून गेले आणि पस्तावलेही. पण ती नंतरची गोष्ट झाली. भारतात असताना विशेषत: स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ‘जोश’ यांची बंडखोर आणि तीक्ष्ण लेखणी एखाद्या समशेरीसारखी तळपत राहिली. प्रतिभा आणि परखडपणा यांचे काही गूढ नाते असावेच. इतर बऱ्याच प्रतिभावंतांप्रमाणे ‘जोश’ हे अत्यंत परखट, प्रसंगी उद्धट वाटावे असे, होते. सरंजामी थाटाचे, कधी क्रूर वाटावे असे त्यांचे वागणे असे. ते व्यसनी तर होतेच. शिवाय कधीकधी आपल्या लेखनाशी, त्यातल्या विचारांशी विसंगत असेही ते वागून दाखवत. म्हणजे एकूण ज्याच्यापासून चार हात लांब राहावेसे वाटावे असा माणूस. पण या लोकांचे असेच सगळे तिरपागडे असते की काय कुणास ठाऊक.  शायरीची परंपरा ‘जोश’ यांच्या घरातच होती. त्यांचे वडील शायर बशीर अहमद खान यांना ‘दाग’ यांचे ‘उसको कहते है जबान-ए-उर्दू, जिसमें न हो रंग फारसी का’ हे मत मान्य होते. तरीही ‘जोश’ यांनी स्वत: उर्दू शायरी करताना फारसी, अरबी शब्दांचा मुबलक वापर केला. तरीही उर्दूवर ‘जोश’ यांनी मनापासून प्रेम केले. या संदर्भात उर्दू भाषेवर आत्मसिद्ध यांनी केलेले भाष्य मला (उर्दूचा अजिबात अभ्यास नसतानाही) फार आवडले. उर्दू म्हणजे मुस्लिमांची भाषा, पाकिस्तानची भाषा असे ढोबळ समज घेऊन वावरणाऱ्यांना (तसे पुष्कळ लोक आहेत!) आत्मसिद्ध यांचे हे विवेचन एक नवा दृष्टीकोन देईल असे वाटले. अर्थात असा समज असलेले किती लोक आत्मसिद्ध यांचे हे लेखन वाचतील हा वेगळा प्रश्न! त्या काळात शायरी म्हणजे गजल असेच समीकरण असताना ‘जोश’ यांनी गजलेपेक्षा कवितेला- नज्मला- अधिक जवळ केले. या बंडखोरीशिवाय मला स्वत:ला ‘जोश’ यांचा वाटलेला विशेष म्हणजे शब्दांच्या वापराबद्दलचा, भाषेबद्दलचा त्यांचा काटेकोरपणा. पकिस्तानचे जनरल अयूब खान यांनी ‘जोश’ यांची प्रशंसा करताना वापरलेला ‘आलम’ हा शब्द चुकीचा आहे, असे ‘जोश’ यांनी अयूब यांना त्यांच्या तोंडावर सुनावले होते अशी एक कथा आहे. खरे-खोटे कुणास ठाऊक, पण असला सडेतोडपणा आणि विक्षिप्तपणा – अव्यवहारीपणा म्हणा तर – अल्लाचा हात डोक्यावर घेऊन आलेल्यांना (आणि फक्त त्यांनाच!) शोभूनच दिसतो.  स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आणि धर्मावर आधारित फाळणीच्या काळात ‘जोश’ यांनी अत्यंत ज्वलंत शब्दांत लिहिलेल्या कवितांचे अंश आत्मसिद्ध यांच्या लेखात मुळापासून वाचावे असे आहेत. अशा लेखकांची, शायरांची ओळख करुन दिल्यावर तो लेखक, शायर संपूर्ण वाचावा असे वाटणे हे त्या ओळखीचे मोठे यश आहे असे मी समजतो. आत्मसिद्ध यांच्या या लेखाने हे साधले आहे. विनया जंगले यांच्या लिखाणाप्रमाणेच आत्मसिद्ध यांच्या अशा लेखांचे पुस्तक कधी प्रसिद्ध होते याची मी वाट पाहतो आहे.  विनोद दुवा त्यांच्या ‘जायका इंडिया का’ या (फारच सुंदर) कार्यक्रमात ते एखाद्या भोजनातील सर्वोत्तम पदार्थासाठी ‘हासिल-ए-महफिल’ हा शब्द वापरत असत. आत्मसिद्ध यांचा ‘जोश’ यांच्यावरील हा लेख ‘दीपावली’च्या अंकाचे ‘हासिल-ए-महफिल’ आहे, असे मला वाटले.
व्यवस्थापनात, विशेषत: विपणनशास्त्रात, ‘Product Life Cycle’ (उत्पादनाची सुरुवात, वाढ, उत्कर्ष आणि र्‍हास) अशी एक संकल्पना आहे.  पूर्वी ही जीवनचक्रे खूप मोठी, लांबलचक असायची. म्हणजे एखाद्या उत्पादनाची लोकप्रियता बरेच दिवस टिकून राहायची. लाईफबॉय साबणाचे उदाहरण घ्या. कित्येक वर्षे तो भारतात सर्वात अधिक विकला जाणारा अंघोळीचा साबण होता. आता मात्र हे टप्पे संकुचित झाले आहेत. लेखकाचेही असेच होते की काय कुणास ठाऊक! लेखकाला ठरावीक काळानंतर येणाऱ्या Writer’s Block ला न जुमानता लेखक तसाच मुर्दाडपणाने लिहीत राहिला, की त्याचे लेखन पचपचीत, मचूळ होते की काय? ‘मौजे’च्या दिवाळी अंकातल्या मिलिंद बोकिलांची ‘सरोवर’ कादंबरी वाचून बोकिलांच्या लेखणीतली धार आता कमी झाली की काय, असे मला वाटले होते. ‘दीपावली’तल्या बोकिलांच्या ‘नेचर पार्क’ने बाकी माझी जवळजवळ खात्रीच झाली. धकाधकीचे आयुष्य जगणाऱ्या जोडप्याबरोबर वाचकानेही बदल म्हणून बाहेरगावी (या कादंबरीत, परदेशी) जायचे आणि मग तिथले असंख्य कंटाळवाणे तपशील सोसत शेवटी कंटाळूनच परत यायचे एवढेच मला बोकिलांच्या या कादंबरीत सापडले. नवीन म्हणाल तर काय; तर ज्या ठिकाणी हे जोडपे जाते, तेथे कपडे घालणे ऐच्छिक आहे. बरं मग?  Shallow people demand variety. I have been writing the same story of my life, each time trying to cut nearer to the aching nerve असे स्ट्रिंडबर्ग म्हणतो. पण बोकिलांच्या लिखाणातली ही दुखरी नस मला काही सापडता सापडेना. पण ज्यांच्याकडून कधी फार अपेक्षा होत्या त्या बोकिलांचे हे असे झालेले बघून काही बरे वाटले नाही.
अंबरीश मिश्र यांचा ‘टॅली हो!’ हा शम्मी कपूरवरचा लेख वाचनीय आहे. शम्मी कपूरचे कौतुक करताना त्याचे उगाचच उदात्तीकरण करण्याचा मोह मिश्र यांनी टाळला आहे. त्यांची भाषा खेळीमेळीची आणि मिश्किल आहे. काही वेळा ती खूपच श्रीमंत होऊन येते. आपल्या शाळेतल्या शिक्षिकेचे, मिस एफींचे, वर्णन करताना ते लिहितात, ‘शिडशिडीत देहयष्टी, सावळा रंग, अतिशय तेजस्वी डोळे आणि काळजात जिव्हाळ मायेचा पायलीभर चंद्रचुरा.’ हीच मिस एफी मुलांना सिनेमाला घेऊन जाते. (आताच्या काळात हे झालं असतं, तर सोशल नेटवर्किंग साईट्सवर तिची पूर्णपणे बदनामी झाली असती. ‘चोंबाळते’ की काय लहान मुलांना? India wants to know वगैरे. या संदर्भात मिश्र यांनी या लेखात वापरलेलं ‘in that order’ हे पालुपदही गंमतीशीर आहे.) ‘आसमानसे आया फरिश्ता’ गात शम्मी कपूर शर्मिला टागोरशी यथेच्छ झोंबाझोंबी करतो हे सांगून ते पुढं लिहितात, ‘खरंतर फरिश्ता असा वाह्यातपणा करत नसतो. देवदूताच्या डोळ्यांत तर समर्पणाची निरांजनं तेवत असतात आणि तो दिलीपकुमारप्रमाणं भावव्याकूळ, आर्त स्वरात ‘यह हवा यह रात यह चांदनी’ असं संथखोल आणि गहिरं गात असतो.’ हे मजेशीर आहे. ते पुढं लिहितात, ‘पन्नासच्या दशकातल्या सिनेमांत दिलीपकुमार, मीनाकुमारी, मधुबाला वगैरे मंडळींचं दु:ख गोपुराप्रमाणं उदात्त असायचं. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा’ असं म्हणण्याची खोटी, की त्यांच्यावर मरणाचा वर्षाव सुरू झालाच म्हणून समजा.’ मिश्र यांचा हा ‘टंग इन चीक’ विनोद मजेदार आहे. काही वेळा बाकी ते जरासे घसरल्यासारखे होतात.
‘एहसान तेरा होगा मुझपर’ हे ‘जंगली’तलं गाणं चांदीच्या पालखीत बसून आलं. जयकिशनदेखील आपल्या खास, वाळ्याचं अत्तर शिंपडलेल्या चाली शम्मीसाठी राखून ठेवायचा, शम्मीचा (हे असं लोकांना एकेरीत संबोधणं मला आवडत नाही. जणू काही तो माणूस आपला लंगोटीयार असावा, त्याच्याबरोबर आपण जोडीने इतिहासाच्या पेपरला कॉपी केलेली असावी आणि ज्याच्याबरोबर पहिली सिगारेट अर्धी-अर्धी  ओढली असावी. पण बरेच लेखक असं करतात. मिश्र यांनी तरी त्याला अपवाद का असावं?) पर्सोना नाईल नदीइतका विशाल होता. सत्यनारायणाच्या प्रसादाप्रमाणे तो घरोघरी पोचला.
असली किणीकरी भाषा त्यांच्या लिखाणात येते. पण एकूण हा लेख वाचताना मला फार मजा आली.
विजय पाडळकरांनी आवंदा शैलेंद्र आणि राज कपूरला वेठीला धरलं आहे. शैलेंद्र उत्तम गीतकार होता, राज कपूर आणि तो यांनी मिळून काही सुंदर कलाकृती दिल्या, वगैरे सगळं ठीक आहे. पाडळकरांच्या ‘मेरा नाम राजू’ या लेखामध्ये मात्र काहीही नवीन नाही. एक नायक, एक गायक आणि सात गीते असा काहीसा या लेखाचा विषय आहे. ‘तीसरी कसम’, ‘मारे गये गुलफाम’ वगैरे सगळे त्यांनी ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकातल्या ‘सजनवा बैरी हो गये हमार’ या लेखात लिहिले आहेच. खरे तर खुद्द बासु भट्टाचार्यांकडूनच हे सगळे ‘अनुभव’मध्ये वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याचा रवंथ का व्हावा ते कळत नाही. असो. विजय पाडळकरांचे लेखन (मला) एकतर अत्यंत आवडते (‘कवडसे पकडणारा कलावंत’), किंवा अजिबात आवडत नाही (‘जी.एंची निवडक पत्रे’ ची प्रस्तावना). एकूण, लेखकांना लिहिते करणे हे पूर्वी जसे उत्तम संपादकांचे काम समजले जायचे, तसे काही लेखकांनी प्रत्येक वर्षी लिहिलेच पाहिजे असे काही बंधन नाही हे त्या लेखकांना – प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या – समजावून द्यायचे हे आताच्या संपादकांचे काम असले पाहिजे, असे मला वाटले.
सुबोध जावडेकरांची ‘मेंदूची बाळं’ ही विज्ञानकथा रोचक आहे. तिच्यावर जरा संपादकीय कात्री चालली असती, तर ती आणखी चांगली झाली असती असे मला वाटले. (तिच्यातलाही ‘हंबक!’ हा मुद्रणदोष खटकतोच.) कथेतले शेवटचे वाक्य खटकेदार आणि सूचक असणे हे (नारायण धारपांच्या कथांमध्ये दिसते तसे) वैशिष्ट्य या कथेतही दिसते.
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या डबक्यांना चुकवत, पाय सांभाळत, ओलांडून जावे; तसा मी दिवाळी अंकांमधील इतर कथा आणि कविता यांना चुकवत-चुकवत जातो. याचे कारण म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा कथा-कविता मला समजतच नाहीत. नील आर्ते नावाचे कुणी लेखक आहेत. त्यांच्या कथा मी काही दिवाळी अंकांत चाळल्या आणि आता नवीन कथा आपल्याला समजणारच नाही या निर्णयाप्रत आलो. ‘आटपाट नगर होते, नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता…’ अशी सुरुवात असणाऱ्याच कथा आपल्याला कळतील असे हल्ली मला वाटू लागले आहे. दोष अर्थातच माझा. ‘डोक्यावर पुस्तक मारले आणि ‘ठक्क’ असा आवाज आला की प्रत्येक वेळी दोष पुस्तकाचाच असतो असे नाही’ हे आइनस्टाइनचे वाक्य कधीकधी आठवते, इतकेच.   कवितेचेही तेच. ‘कबूल कर की, तू मत्सर करतेस माझा, कबूल कर की, तू द्वेष करतेस माझा, कबूल कर की, तू घृणा करतेस माझी, कबूल कर की, आपण प्रेम करतो परस्परांवर’ अशी एक कविता या अंकात आहे. झाले. एवढेच. ‘तू इडली, मी डोसा, तू खार, मी ससा’ हे काय वाईट होते मग?
‘मौजे’प्रमाणे ‘दीपावली’मध्येही राशीभविष्य नाही. धन्यवाद. पण मुक्तांगण वगैरे आहेच. शेवटी’ ‘मी अमक्याकडून काय घेतले, तमक्याकडून काय घेतले, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावेत…’ असलेही सगळे आहे. इतके सगळे घेता येते, तर यांच्याकडून त्यांच्या लेखण्या कायमच्या हिसकावून घेण्यासाठी काय करावे या विचारात आपण पडलो असता हा अंक संपतो. (‘इचका’ आणि ‘टग्या’ यांबाबत तात्या माडगूळकरांनी केलेले मौलिक भाष्य आठवते. तरीही) हे पिकासोप्रमाणे जिभेने कारागृहाच्या भिंतींवर चित्रे काढतील की काय, बजावलेल्या समन्सांची ओरिगामी करतील की काय आणि कारागृहाच्या गजांची बासरी करून तिच्यातून मारवा ऐकवतील की काय या शंकेने जिवाचे पाणी पाणी होते! तरीही शिरीष बेरींवरचा लेख मी ‘त्यांनी मला काय दिलं’ या अटळ प्रश्नासकट वाचला आणि हताश होत्सासा पुढे गेलो.
‘सेलिब्रेटींचं प्रस्थ –कोणामुळे? कशासाठी’ या विषयावरची एक लेखमाला ‘दीपावली’च्या दिवाळी अंकात आहे. भीष्मराज बाम, राजन खान, अभिराम भडकमकर, विक्रम गायकवाड आणि प्रवीण दवणे यांची टिपणे या लेखमालेत आहेत असे तिचे शीर्षक सागते. सेलिब्रिटींना लोकमान्यता, लोकप्रियता, ‘स्टेटस’ आहे आणि चिकाटीने, न हरता काम करणाऱ्या लोकांबद्दल मात्र समाजाला आस्था नाही. असे का असावे, अशा बाळबोध प्रश्नाने या लेखमालेची सुरुवात होते. पण ते असो. ‘सेलेब्रिटी’ या शब्दाला चपखल मराठी शब्द काय? राजन खान त्याचा शब्दकोशातला अर्थ ‘प्रसिद्ध, गाजलेला’ असा देतात. ‘दिग्गज’ हा त्यांना सुचलेला शब्द सांगतात (आणि ‘सेलेब्रिटी’ हा शब्द ‘दिग्गज’ या शब्दाच्या उंचीचा नाही हेही लिहितात). पण तेही काही खरे नव्हे. एकूण काय, सेलेब्रिटी म्हणजे सेलेब्रिटी. सगळ्या लेखांमध्ये एक समान सूर दिसतो. तो म्हणजे एकूणच समाजात साचलेला उथळपणा (एका प्रसिद्ध पण आता डबघाईला आलेल्या मराठी संकेतस्थळावर दिगम्भा यांनी वापरलेला ‘थैल्लर्य’ हा अफलातून शब्द आठवतो!) आणि चकचकीत कचकड्यांच्या व्यक्तिपूजेचे स्तोम यांसाठी या सर्व लेखकांनी प्रसारमाध्यमे, चित्रवाणी, संगणक, चलभाष आणि आंतरजाल यांना जबाबदार धरले आहे. सकृतदर्शनी ते तसे आहेही. पण खान यांच्या लेखात ते म्हणतात त्याप्रमाणे, चांगल्याचा अपमान आणि वाइटाचा मान ही वैशिष्ट्ये असणारा हा सांप्रतकाळ केवळ भांडवली व्यवस्थेने निर्माण केलेला नाही, तर भारतीय मानसिकताही तशीच आहे. हे मला अधिक महत्त्वाचे वाटले. ‘Money does not change people, it only magnifies what is already there’ हे खरेच आहे. मुळात अंगार नसेल, तर बाहेरून येणारा कोणताही वारा वणवा पेटवू शकत नाही. म्हणजे बटबटीतपणाचे हे बी कुठूनतरी बाहेरून येऊन इथे रुजले, वाढले आणि त्याला माध्यमे, संगणक यांनी खतपाणी घातले, असे नाही. ते मुळात इथे होतेच. फक्त वाव मिळताच ते फोफावले, इतकेच. मला हे अगदी हुबेहूब मान्य आहे. भीष्मराज बाम यांनी राजेंद्र जक्कल आणि त्याच्या साथीदारांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीचे वर्णन केले आहे आणि ‘पोलिसांनी त्या गुन्हेगारांना परत नेण्यासाठी गाडीत बसवले, तेव्हा त्या लोकांनी जमलेल्या गर्दीकडे बघून हात हलवले आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मी हादरून गेलो.’ असे लिहिले आहे. हे वाचताना माझ्या अंगावर काटा आला. जोशी-अभ्यंकर हत्याकांडाला आता इतकी वर्षे झाली. त्यामुळे आज समाजात सुटलेले सैराट वारे ही काही नव्याने निर्माण झालेली वावटळ नाही; त्या काळात लोकांकडे स्मार्टफोन्स असते, तर लोकांनी या गुन्हेगारांचे चित्रीकरण केले असते आणि जमले असते तर त्यांच्याबरोबर स्वत:च्या ‘सेल्फीज’पण काढल्या असत्या असे मला वाटले. फक्त बाम हे या उथळपणाला अमेरिकी आणि युरोपीय व्यक्तिस्वातंत्र्याशी जोडतात, ते काही मला पटले नाही. खान यांचे या विषयावरचे टिपण प्रगल्भ आहे, पण त्यांनीही ‘संगणक येताना मुळात सेवा म्हणून नाही, तर धंदा म्हणूनच आला’ असे एक सरधोपट विधान केले आहे. विक्रम गायकवाड यांच्या मते आपण मानसिकदृष्ट्या भ्रष्ट झालो आहोत. त्यांच्या टिपणात बाकी बहुतांश ‘मी आणि माझे जीवन’ हेच आहे. दवणे यांच्या अत्यंत हसऱ्या आणि सकारात्मक फोटोखाली ‘सेलेब्रिटी: ‘ध्रुव कोण? उल्का कोण?’ असे खांडेकरी वळणाचे शीर्षक आहे.
जाहिरातींत ‘डब’ केलेलं अत्यंत अशुद्ध मराठी आम्हांला आता खटकत नाही, यामागे सारं काही समजून घेऊन समोरच्याला सन्मान देण्याची महाराष्ट्रीयन (हा कोणता शब्द बुवा?) संस्कृती आहे, न्यूनगंड नाही. न्यूनगंडाची ठिकाणं वेगळी आहेत, ती जोपासण्याचं पद्धतशीर कार्य सुरू आहे.
असं लिहून ते पुढं लिहितात,
‘न्यूनगंड भाषेचा नसून परंपरेने जपलेल्या आर्थिक गरिबीचा आहे. चाळकरी सामान्य जीवनशैलीतून तो आलेला आहे.’ (या दोन वाक्यांचा एकत्रित अर्थ लावण्याचा मी अजून प्रयत्न करत आहे.)
अपेक्षेप्रमाणे –
उल्का आणि ध्रुव यांतला फरक जाणिवेने आकळला की मग कितीही प्रस्थ वाढो, ते ओलांडून नवी पिढी शाश्वत ध्रुवताऱ्याकडे वळेल. निश्चितच वळेल.’
अशा आशावादी वळणावर दवणे यांचे हे टिपण संपते. अभिराम भडकमकरांना त्यांच्या टिपणात काय म्हणायचे आहे हे मला सांगता येणार नाही, कारण या अंकात मला ते टिपण सापडलेच नाही!
शेवटी सुहास बहुळकर यांच्या अब्दुलरहीम अप्पाभाई आलमेलकरांविषयीच्या दीर्घ लेखाबद्दल. बहुळकर यांची भाषा साधी आणि अनलंकृत आहे. आलमेलकरांची या लेखात दिलेली जी चित्रे आहेत, त्यांत न समजण्यासारखे काही नाही. या चित्रांमधील माणसे माणसांसारखी दिसतात आणि घरे घरांसारखी दिसतात. त्यामुळे मला हा लेख आवडला. हा लेख वाचतानाही विलक्षण प्रतिभा आणि विक्षिप्तपणा यांचे नाते मनात अधोरेखित झाले. ‘कलंदर’ हा शब्द त्याच्या अतिवापरामुळे बदनाम झाला आहे; पण आयुष्य ज्यांना घारीसारखे (‘चील’ की तरह!) धरून ठेवते आणि ज्यांना पोटापाण्यासाठी, रोजच्या जगण्याच्या झगड्यासाठी तडफडावे लागते अशा कलावंतांची फरफट आणि तिच्यातूनही त्यांची दिसणारी झळाळती प्रतिभा यांबद्दलचे पूर्वी अजिबात माहिती नसलेले एक प्रकरण मला या लेखात सापडले.
Uncategorized

फर्मास तर्री आणि रंग – पण मिसळ अजून जमून यायला हवी!

– ऋषिकेश‘दिवाळी अंकांना मोठा इतिहास आस्तोय! मोठमोठे लेखक आस्तायेत! नवे लेखकु तिथे हात अजमावून बघतायेत! थितल्या संपादक वगैरे बॉस मंडलींचा चष्मा ऑलमोस्ट नाकाच्या टोकावर ठेवलेला आस्तोय. लेखकुने लिवलेला कागुद एका मिन्टात वाचून ते केराच्या टोपलीत टाकतायेत. नि एकदा का कागुद असे टाकून झाले की उरलेले कागुद न टाकता संपादकाने आपल्या लाल पेनाने त्यावर खरडाय लागलेलं दिस्ताच, दुसरा एक जन छापखान्याचे खिळे जुळवायला घेतोय…’,  ही अशी वर्णनं कल्पतच आम्ही आणि आमच्यासारखे गल्लीत जगप्रसिद्ध लेखक धास्तावून वर्षानुवर्षे लिहिते झाले नाहीत. गेल्या पाच-सात वर्षांत आमचा वावर असणार्‍या मराठी सायटींनीच (अचानक) दिवाळी अंक काढायला सुरुवात केल्यावर “अरे, हा तर घरचाच अंक आहे!” असं म्हणून मी नि माझ्यासारख्या अनेकांनी त्यावर आपला हात अजमावायला सुरुवात केली. या अंकांत फार थोर लेखकु वगैरे व्हायची स्वप्ने घेऊन कोणी लिहीतच नाही. शिवाय सगळा हौशी-बिनपैशांचा मामला. जमेल तशी लोकं, कधी इमेली लिहून, कधी फोन करून गाठायची आणि त्यांना काही वेगळालं लिहायला लावायचं, हे काम या अंकाचे संपादक करत असतातच. त्याचबरोबर त्या त्या संस्थळाचे सदस्यही काही लिहीत असतात. मराठी दिवाळी अंक म्हणजे जे काही चाकोरीबद्ध तुमच्या डोळ्यांसमोर येतं, त्याला साफ फाट्यावर मारत हे अंक सादर होतात. अनेक संस्थळांवर अंक सुरू होऊन काही वर्ष झालीयेत. सुरवातीला घरी बुंदी पाडण्याप्रमाणे बहुतेक सायटींनी उत्साहात अंक काढले खरे; पण आता त्यांतले काही-काहीच अंक स्थिरावले आहेत. (बुंदी पाडायचा उत्साह जितका काळ टिकतो त्याहून कमी काळात) काही अंक, तर काही साईट्स बंदसुद्धा पडल्या आहेत! (शेवटी ऑनलाईन असले तरी काय, मराठी अंकच ते!)

हे अंक विनामूल्य असतात, जालावर असतात. त्यामुळे लोक अगदी प्रवासात आपला मोबाईल उघडून सहज वाचू शकतात. कोणत्याही वितरण व्यवस्थेशिवाय हे अंक प्रत्येकाला वाचता येतात. तेव्हा व्यावसायिक छापील अंकांसोबत, मराठी जालीय अंकांवरही ‘अंकनामा’मध्ये लिहून येणं गरजेच ठरतं. ‘मायबोली.कॉम’ हे मराठीतलं सर्वांत मोठं संस्थळ; पण त्यांचा अंक गेली दोन वर्षे आलाच नाहीये. मराठीतील त्यानंतरच्या भरपूर वर्दळ असणार्‍या सध्याच्या लोकप्रिय संकेतस्थळाच्या अंकाबद्दल, म्हणजे ‘मिसळपाव.कॉम’च्या दिवाळी अंकाबद्दल, मी लिहिणार आहे.
मराठीतल्या छापील दिवाळी अंकांप्रमाणे हरेक अंकाला आपापली प्रवृत्ती असते. मिसळपाव हे संस्थळ आणि त्यांचा अंक याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या सदस्यांचा उत्साह आणि आपुलकी. काही पार्ट्या या केडरबेस्ड असतात, तसं हे केडरबेस्ड संस्थळ. इथले लेखक हेच इथले कार्यकर्तेसुद्धा आहेत; आणि सगळे जण घरचं कार्य असल्याप्रमाणे आपल्याला मिळेल ते काम करत असतात. गांधीजी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणायचे. मराठी माणसाची काही ठळक वैशिष्ट्यं मिरवणार्‍या मिसळपाव.कॉम या साइटमध्ये हे एक वैशिष्ट्य पुरेपूर आलं आहे.
तर अंकाकडे वळू या. यंदा ‘मिसळपाव.कॉम’चा अंक आहे ‘रहस्यकथा विशेषांक’. या संकेतस्थळावर पहिल्यांदाच एखादा दिवाळी अंक हा असा विशेषांक म्हणून निघतोय. सर्वात आधी त्यांच्या मुखपृष्ठाबद्दल लिहिणं अगत्याचं आहे. मिसळपाव हा इतर अनेक संस्थळांप्रमाणे हौशी मामला आहे. मिसळपावच्या अ‍ॅक्टिव्ह सदस्यांपैकी एक असलेल्या ‘अभ्या..’ यांनी हे मुखपृष्ठ रचलं आहे. रचलं यासाठी म्हणतोय, की ते चितारलेलं नाही किंवा ते एखादं छायाचित्रही नाही. पण अंकाच्या विषयाच्या दृष्टीने  समर्पक असलेली रचना त्यात दिसते. त्यातले घटक नेमके आहेतच; त्यांची रंगसंगती, त्यामुळे आलेलं गूढरम्य वातावरण… सगळंच सहीसही उतरलं आहे. त्याहून मुख्य म्हणजे; आहे दिवाळी तर “किमान एक पणती किंवा कंदील, नाहीतर गेला बाजार एखादं झेंडूचे तोरण तर्री हव्वंच बै!” असला मोह टाळून एक खणखणीत मुखपृष्ठ दिलं आहे. अनेक छापील दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांवर स्त्रियांची चित्रं अजूनही असतात. ऑनलाईन अंकांनी मात्र ती परंपरा केव्हाच झुगारून दिलेली आहे.
हा रहस्यकथा विशेषांक आहे, म्हणजे यात फक्त रहस्यकथाच आहेत असं नाही. मात्र रहस्यकथांसाठी एक खास विभाग राखलेला आहे. त्यातल्या कथांकडे वळण्यापूर्वी ‘रहस्यकथा’ या प्रकाराबद्दल थोडं लिहिणं मला गरजेचं वाटतं. रहस्यकथा हा लेखनप्रकार तसा गोंधळात टाकू शकणारा आहे. गूढकथा, भयकथा, थरारकथा, गुन्हे-अन्वेषण, न्यायालयीन नाट्य यांत; इतकंच काय काही वेळा प्रेमकथांमध्येही, रहस्याचा मोठा वाटा असतो. मात्र म्हणून यातल्या प्रत्येक प्रकाराला आपण रहस्यकथा म्हणत नाही. रहस्यकथांची व्याख्या करणं थोडं कठीण आहे. रहस्य ही वाचकाला भारून टाकत; टेन्शन, भीती, थरार, अंदाज आणि उत्सुकता या सगळ्यांचं मिश्रण करत; वाचकाला अलगद आपल्यात गुंतवून घेणारी एक गोष्ट आहे. मात्र अखेरीस रहस्यकथालेखनात नाट्य आणि मनोरंजन यांचाही तितकाच वाटा आहे. रहस्य हा त्या गोष्टीचा गाभा असला, तरी तो एकमेव घटक नाही. अशा वेळी रहस्यकथा, थरारकथा आणि गूढकथा या तिघांमध्ये गोंधळ होण्याचा धोका आहे. माझा असा अजिबात दावा नाही, की ही तीन वर्गीकरणं म्हणजे अगदी ठळकपणे विलग झालेले कप्पे आहेत. मात्र जेव्हा  ‘रहस्यकथा’ विशेषांक निघतो, तेव्हा याकडे बघणंही क्रमप्राप्त ठरतं. गूढ-रहस्य (सस्पेन्स-मिस्टरी), रहस्य-थरारक कथा (सस्पेन्स-थ्रिलर) हे रूढ प्रकार आहेतच. पण अशा लेखनालाही रहस्यकथा म्हणायचं असेल, तर त्यात रहस्याचा वाटा मोठा हवा. या अंकाला ‘रहस्यकथा विशेषांक’ म्हणताना त्या विधेबद्दलचं (genre बद्दलचं) लेखन, मराठी रहस्यकथांचा आणि लेखकांचा धांडोळा (सिंहावलोकन), जमल्यास एखाद्या रहस्यकथाकाराची मुलाखत वगैरे भागही आला असता; तर अंक परिपूर्ण वाटला असता. सध्या मात्र अंकात केवळ कथांचा सहभाग आहे. रहस्यकथा या विधेबद्द्लचं काहीच लेखन नाही. मला ही या अंकामधली मोठी त्रुटी वाटते.
आता या अंकातल्या कथांकडे वळू या. अंकात तब्बल १४ रहस्यकथा आहेत. माझ्या मते त्यांतली प्रत्येक कथा ही रहस्यकथा म्हणता येणार नाही. मला आवडलेल्या कथा म्हणजे आदूबाळ यांची ‘गारपार्‍यातील गहनकथा‘ ही फॅनफिक, बोका-ए-आझम यांची ‘गॅलरी‘, विशाल कुलकर्णी यांची ‘ऑपरेशन ब्लाइंड हॉक‘ आणि सोन्याबापु यांची ‘दंगल’. पैकी ‘गॅलरी’ ही कथा तर एखाद्या सराईत लेखकाने उत्तम प्रकारे धागे गुंफत विणावी, तशी लिहिलेली रहस्यकथा आहे. ही कथा एका इंग्रजी कथेवरून स्फुरल्याचं लेखक आधीच मान्य करतो. मी ती मूळ कथा वाचलेली नसल्याने त्यातल्या भन्नाट प्लॉटचं आणि त्या पात्रांच्या सुरेख गोफाचं श्रेय कोणाला द्यायचं याचा गोंधळ असला, तरी त्याचं भारतीयीकरण मात्र बेमालूम झालं आहे. त्याबद्दल लेखकाचं विशेष अभिनंदन करायला हवं. (प्लॉट व पात्रउभारणीचं श्रेय लेखकाने योग्य त्या प्रमाणात घ्यावं. 🙂 )
‘आदूबाळ’ यांची ही दुसरी फॅनफिक. (फॅनफिकबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर मेघनाचा हा लेख वाचा) .’ऐसी अक्षरे.कॉम’च्या ‘भा.रा.भागवत’विशेषांकामधली फास्टर फेणेची फॅनफिक आणि या अंकातली ‘फेलुदा’ची फॅनफिक या दोन्ही कथा प्रकृतीने पूर्ण भिन्न. फॅनफिक या प्रकारात आताच्या मराठी जालीय / ऑनलाइन लेखनविश्वात आदूबाळ यांचा हात धरणारा कोणीही नसावा. (लिहिणारे कमी आहेत, असे समजू नका. दुनियादारी, शाळा, कोसला वगैरें कादंबर्‍यांमधली पात्रं उधार घेऊन अनेकांनी आपल्या लेखण्या परजून पाहिलेल्या तुम्हांला फेसबुक, ब्लॉग्ज इत्यादींवर मिळतील.) अनेकदा पात्राची सहीसही नक्कल केली जाते; मात्र त्या पात्राच्या लकबींबरोबरच गोष्ट फुलवत न्यायची मूळ लेखकाची पद्धत, त्या लेखकाच्या मर्यादा यांची जाण ‘आदूबाळ’ यांच्याइतकी कुणी ठेवलेली फारच क्वचित बघायला मिळते. ‘फेलुदा’-कथांमधले रहस्यही इतर तत्सम रहस्यकथांइतके मजबूत नसते. वाचकाने साधारणतः योग्य दिशेने तर्क केला तर तो रहस्याच्या जवळपास सहज पोचू शकतो. मात्र फेलुदांनी नेमकं रहस्य उघड करेपर्यंत कळीची गोष्ट वाचकाच्या लक्ष्यात येत नाही. या फॅनफिकमध्येही रहस्याबद्दल अंदाज आधीच करता येतो, पण ’नेमकं कसं?” याचा शोध घेत वाचक पुढे वाचत राहतो. (खरंतर ‘आदूबाळ’ हा जालीय कथाकार किंवा फॅनफिक कथाकार यांमध्येच नाही, तर एकूणच मराठी कथाकारांमधला असा नवा लेखक आहे;  ज्याची अगत्याने नोंद घेऊन; त्याच्या वाटचालीवर लक्ष ठेवावं. पण हा लेख दिवाळी अंकापुरता असल्याने इतकं पुरे 🙂 )
या अंकातील ‘सर्वात खतरनाक शिकार‘ हा रिचर्ड कॉनेल यांच्या कथेचा शशिधर केळकर यांनी केलेला अनुवादही सहज झाला आहे. मात्र ही मूळ कथा निव्वळ ‘थरारकथा’ आहे असं माझं मत आहे. तसं असलं, तरी कथा मराठीत आणण्याचं मोठं काम या अंकाने केलं आहे. त्याचबरोबर स्पार्टाकस यांनी ‘सायक्लॉप्स’ या रहस्यमय जहाजाची दिलेली माहिती महत्त्वाची आहे आणि रंजकही आहे. मात्र त्यालाही ‘रहस्यकथा’ म्हणता येईल का, याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. इतर रहस्यकथा ‘छान ते ठीक’ या पट्टीवर अधेमधे कुठेतरी मोडतात.
रहस्यकथांव्यतिरिक्त इतरही चार कथा अंकात आहेत. पैकी आतिवास यांची ’धोंडा’ सर्वांत भाव खाऊन जाते. आतिवास यांचं लेखन नेहमीच सहज आणि प्रवाही असतं. त्यांचा वेगवेगळ्या भूभागांत राहण्याचा अनुभव, विविध बोलींबद्दलची जाण हेही त्यांच्या कथेत डोकावून जातं. इतर लेखांमध्ये स्वाती दिनेश यांचा ‘ए ब्लाइंड डेट‘ हा लेख आणि आतिवास यांचा ‘तडिंजु‘ हे लेखही उल्लेखनीय आणि वाचनीय.
याव्यतिरिक्त या अंकातला विशेष उल्लेख करण्यासारखा भाग म्हणजे यातल्या मुलाखती. खरंतर दिवाळी अंकांतल्या मुलाखती हा काही माझा फारसा लाडका प्रकार नाही. अगदी प्रसिद्ध व्यक्तींच्या थोरवीला साजेसे तेच प्रश्न विचारत, त्यांच्याच तोंडून त्यांची अपेक्षित उत्तरं ऐकवण्याची कसरत दिवाळी अंकांत केलेली असते. दिवाळी अंकांतल्या अगदी राजकारण्यांच्या मुलाखतीतही त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न नसतात. मात्र या अंकातल्या दोन मुलाखती या मर्यादेपलीकडे जाणार्‍या आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर यांची मुलाखत ही रूढार्थाने मुलाखत नाही. त्याला गप्पा असं म्हणणंच अधिक सयुक्तिक ठरेल. त्यातली माहिती वगैरे रंजक आहेच, पण मुलाखतीचा ओघ अतिशय सहज वठला आहे. ‘व्यसनाच्या मगरमिठीतून सुटताना’ ही आणखी एक मुलाखत. व्यसन लागणे, ते बळावणे इथपासून ते ‘मुक्तांगण’मध्ये उपचार घेणारा एक व्यसनी माणूस या नात्याने आलेले अनुभव सांगणारी – ‘मोदक’ हे टोपणनाव घेणार्‍या सदस्याने घेतलेली – ही मुलाखत दृष्ट लागावी इतकी सुरेख तर आहेच; मुख्य म्हणजे प्रांजळ आणि थेट आहे. कितीतरी दिवसांनी मुलाखत वाचून त्यावर इतका वेळ विचार करत होतो. या दोन मुलांखतींव्यतिरिक्त तिसरी मुलाखत डॉ. आशुतोष जावडेकर यांची. ही मुलाखतही वाचनीय असली, तरी नेहमीच्या साच्यातली, अर्थात गोग्गोड, आहे.
आता अंकाच्या इतर बाबींकडे बघायचं, तर काही गोष्टींवर बोट ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे संपादन, मुद्रितशोधन आणि रेखाटनं. रहस्यकथांपैकी वर उल्लेखलेल्या काही कथा छान असल्या, तरी त्या आणि इतरही अनेक कथांवर संपादकीय संस्कार आवश्यक होते. काही कथांवर भाषेच्या अंगाने तर काहींवर शैलीच्या अंगाने. संपादकांनी काही सुचवण्या दिल्या का, हे कळायला मार्ग नाही. (फक्त ’मिसळपाव’च नव्हे, यंदा मी जितके जालीय अंक वाचले, त्या सर्वांतच ‘संपादनातील त्रुटी’ हा दोष जाणवतो आहे. त्यासाठी एकट्या ’मिसळपाव.कॉम’ला वेगळे काढावे का, असा प्रश्न रास्त ठरेल.) मुद्रितशोधन हा या अंकाचा दुसरा कच्चा दुवा. इथे मात्र संपादक चमूला आणखी खूपच काम करणं गरजेचं आहे. लेखक निर्मितीच्या तंद्रीत असू शकतो हे ग्राह्य धरलं, तरी संपादकांनी मात्र ते भान पाळणं अगत्याचं असतं. मुद्रितशोधन म्हणजे केवळ उकार-इकारात र्‍हस्व-दीर्घ दुरुस्त करणे इतकंच नसून विरामचिन्हं, लेखनाचा आणि क्रियापदांचा काळ, क्रियापदांची पद्धत (ग्रांथिक की बोली), अशा खूप अंगांनी खूप काम होणं आवश्यकअसल्याचं दिसतं. सर्वच जालीय अंकांसमोरचा आणखी एक प्रश्न म्हणजे रेखाटनं. कथांसोबत रेखाटनं असली, तर अनेकदा कथेची मजा द्विगुणित होते. पण तशी रेखाटनं करणारे कलाकार मिळवणं जालीय अंकांसाठी कठीण असतं. कारण अंक हौशी असतात – कलाकारांना मोबदला मिळतोच, असंनाही.) मात्र ’मिसळपाव’सारख्या, मोठी सदस्यसंख्या असलेल्या, अंकांत तरी ही त्रुटी दूर करण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत.
आणखी एक बाब म्हणजे हा अंक जालीय असला, तरी आंतरजाल या माध्यमाचा फायदा करून घेणारं लेखन या अंकात नाही. लेखात काही आवश्यक ते दुवे किंवा व्हिडिओ संदर्भासाठी, पूरक माहिती म्हणून किंवा पुरवणी म्हणून देणं, हे फक्त जालीय अंकात करता येतं. त्याव्यतिरिक्त व्हिडिओ किंवा ऑडिओ मुलाखती, उत्तमोत्तम छायाचित्रं, शक्य झाल्यास अ‍ॅनिमेशन, वाचकांशी संवाद साधत फुलणारं लेखन… असे अनेक प्रयोग करण्याची संधी जालावरचा ‘अ-छापील’ अंक देतो. पण या अंकात त्या दृष्टीने काहीच नाहीये.
बाकी कोणत्याही जालीय दिवाळी अंकात असतं, तसं काही ’निव्वळ हौशी लेखन याही अंकात आहे. लेखकाला प्रचंड हौस आहे, या माहितीपलीकडे वाचकाला त्या लेखनातून काहीही मिळत नाही. माझ्या मते अशा लेखनामुळे भल्या भल्या अंकांची मजा कमी होते. एरवी हे लेखन बरं वाटेलही, पण दिवाळी अंकात त्याचं प्रयोजन समजत नाही. त्यातल्या काही लेखनावर (उदा. व्यंगचित्रं, ्काही ’पाडलेल्या’ कविता) संपादकीय अधिकारात सरळ काट मारली असती, तरी काही बिघडलं नसतं – अंकाचा दर्जा उलट वाढलाच असता.
अर्थात, जालीय अंकातल्या लेखनाच्या दर्जाची छापील अंकांशी तुलना करण्यात हशील नाही; कारण हा अंक विनामूल्य नि हौशी मामला आहे. पण तुलना केली जातेच. नि तरीही या अंकातून नेहमीच काही ना काही वेचक आणि वेधक मिळत आलं आहे. दस्तुरखुद्द ’मिसळपाव’च्या जुन्या अंकांशीच या अंकाची तुलना केली, तर त्यांच्या आधीच्या दिवाळी अंकांपेक्षा हा यंदाचा अंक निश्चितच उजवा आहे.
या अंकातल्या काही रहस्यकथा आणि ‘मोदक’ यांनी घेतलेली मुलाखत या दोन गोष्टी तरी कोणत्याही छापील अंकाच्या तोडीस तोड ठरेल असं काम आहे. त्या आवर्जून वाचा.इमेल: rushikeshonrere@gmail.com

Uncategorized

वाचनकक्षा रुंदावणारा ‘अक्षर’

दर दिवाळीला काही दिवाळी अंक वाचलेच पाहिजेत असा एक नियम ठरून गेलाय. त्या यादीत ‘अक्षर’  असतोच. चांगले लेख, काही वेगळ्या कथा, हे तर असतंच; पण विनाकारण गुळगुळीत कागदांवरच्या, तुपट चेहर्‍याच्या माणसांच्या तितक्याच गुळगुळीत झालेल्या जाहिरातीही नसतात हीदेखील विशेष संतोषाची बाब.
यंदाच्या अंकाचं इरावती कर्णिकांनी केलेलं मुखपृष्ठ आवडलं. काहीशा उष्ण रंगसंगतीत रंगवलेल्या – थकलेल्या गांधीच्या डोळ्यांतून येणारे कोलाजचे कढ नक्कीच हिंसाचाराचा निषेध करत असतील. पण त्यात काही शीतल पाण्याचे ओघळ आहेत हे आशादायक आहे…
या वर्षीचा अंक ‘हिंसेचे दशावतार’ विशेषांक आहे. या हिंसा का होतात, त्यांतून कुणाला काय मिळतं; हे नि असे प्रश्न या वर्षी ‘अक्षर’ मांडत आहे.  या लेखमालेत त्यांनी एन्कांउटर्स, मुस्लीम दहशतवाद, जाती आणि जमातवाद, घरगुती आणि बालहिंसा, सोशल मिडियावरचा डिजिटल दहशतवाद, सिनेमातला हिंसाचार असे वेगवेगळे पैलू घेतले आहेत. या सर्वांचा शेवट होतो तो हिंसेच्या मानसिकतेबद्दलच्या लेखाने. यांतले बहुतेक सारे लेख मुद्दाम बेतून त्यांचं सुसूत्रीकरण केलं गेलं असावं इतकी शंका येण्याइतपत हे लेख एकमेकांना पूरक झाले आहेत. त्यामुळे ते वेगवेगळे तुकडे वाटत नाहीत. लेखांचा आवाका बांधीव आहे आणि ते आपापल्या चौकटीबाहेर वाहवत नाहीत, आणि तरीही एकूण लेखमालेचं चित्र पाहता काही राहून गेल्याचं भासत नाही. काही ठिकाणी – विशेषत: मूलतत्त्ववादी, जाती आणि जमातवादी यांच्याबद्दलच्या लेखांत – काही घटक सामाईक आहेत. पण तिथेही लेखांत पुनरावृत्ती होत नाही, उलट ते  एकमेकांना पूरक ठरतात. काहीतरी एकसंध वाचल्याचं समाधान ही लेखमालिका वाचून मिळतं.
या लेखांच्या मांडणीत डॉ. आशिष देशपांडेंचा ‘का होते हिंसा’ हा हिंसेच्या मानसशास्त्रावरचा लेख अंकात सगळ्यात शेवटी असला, तरी मी त्याचा उल्लेख प्रथमत: करेन. डॉक्टरच ते. अर्थातच हिंसेची मानसशास्त्रीय मीमांसा करतात, दुजोरा म्हणून काही मानसशास्त्रीय प्रयोगांबद्दलही सांगतात. हिंसा आणि आक्रमकता यांतली भिन्नता, त्यांचे वेगवेगळे पैलू आणि आक्रमकतेचं हिंसाचाराशी असलेलं नातं हे अगदी साध्या-सोप्या भाषेत सांगतात.  हिंसाकर्ते आणि हिंसापीडित यांच्याबद्दलचं इतर लेखातलं विवेचन  अगदी परिभाषेत नसलं तरी साधारण त्याच धर्तीवर जाणारं. इथं लेखमालेचं वर्तुळ पूर्ण होतं.
या हिंसेच्या दशावतारातला पहिलाच लेख आहे रघू कर्नाड आणि ग्रेस जॅजो यांचा – ‘एका मारेकरी पोलिसाचा कबुलीजबाब’. मणिपूरमधल्या एका कमांडोने केलेल्या खोट्या एन्काउंटर्सचा कबुलीजबाब.  या कमांडोचं नांव हिरोजीत असलं, तरी लेख त्याला हिरोही करत नाही आणि व्हीलनही. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय असलेला हा लेख खास वाचनीय. असं असलं, तरी काही ठिकाणी मूळ इंग्रजीत असल्यासारखी वाटावीत अशा वाक्यांचं शब्दश: मराठी  भाषांतर खड्यासारखं टोचतं. मूळ लेख ‘गार्डियन’साठी लिहिला गेला होता असं तळटिपेत लिहिलंय. त्यामुळेही कदाचित असेल, पण ती त्रुटी राहून गेलीय खरी.
मुस्लीम देशांतल्या दहशतवादी संघटनांबद्दल निळू दामलेंचा लेख आहे. या दहशतवादाचं मूळ शोधणारा, तो रोजच्या आयुष्यात कसा निरुपयोगी आहे याबद्दल साधकबाधक गोष्टी सांगणारा आणि त्याचा नायनाट करायचा असेल, तर उपाययोजनाही सुचवणारा. कुराणात सांगितलेली कालबाह्य जीवनपद्धती आणि आजच्या समाजाच्या मूलभूत गरजा यांतली विसंगती या लेखातून नोंदवली जाते. कुराणातला जिहाद किंवा दहशतवाद या गरजा भागवायला कसे असमर्थ आहेत यावरचे त्यांचे विचार वाचनीय आहेत. निळू दामलेंचे लेख मला बरेचदा आवडतात. हाही पुन्हा वाचावासा वाटावा असा.
धर्माच्या नावावर हिंसाचार करणार्‍यांबद्दलचा हेमंत देसाईंचा लेख आणि जाती-जमातींच्या नावावर राजकारण करणार्‍यांवरचा दीप्ती राउतांचा लेख स्वार्थी राजकारणाबद्दल खोलात जाऊन बोलतात. हिंसा कशी घडवून आणली जाते, तिचे करविते आणि विनाकारण होरपळणारे कर्ते यांच्याबद्दल देसाई लिहितात; तर स्त्रिया आणि दुर्बल घटक जातीय अस्मितेमध्ये नि कट्टरतेमध्ये कसे भरडले जातात, त्याबद्दल दीप्ती राऊत.  साधारण जवळच्या विषयांवरचे दोन स्वतंत्र लेख असूनही तेच ते मुद्दे न घोळवल्यानं दोन्ही लेख तितकेच वाचनीय.
मला व्यक्तिश: अनुराग आणि त्याचे सिनेमे आवडतात. कधीकधी मनातल्या मनात काडीमोड होतो, पण घाऊकरीत्या ज्याच्याबद्दल नावड उत्पन्न व्हावी, असा तो प्राणी नाही. शिवाय लोकांचे जेवढ्यास तेवढे ‘बाइट्स’ घेऊन त्यांतली संकलित क्षणचित्रं मुलाखत म्हणून देण्यापेक्षा त्या विषयाच्या अनुषंगानं इतर गोष्टींबद्दलही थोडीफार वाहवत गेलेली मुलाखतही मला आवडते. काटेकोरपणाचा माझा तितकासा आग्रह नसतो. त्यामुळे समीर विद्वांसने घेतलेली अनुराग कश्यपची मुलाखत फक्त ‘असहिष्णुता आणि अनुराग’ इथपर्यंतच न थांबता; त्यापलीकडे जाऊन आसपासचं जग, त्यातली माणसं, त्यांचे परस्परनातेसंबंध, वाढती असहिष्णुता आणि हिंसा या सर्वांकडे पाहण्याची अनुरागची नजर… इथपर्यंत जाते; तेव्हा मला ती आवडायला हरकत नव्हती. पण ही मुलाखत ‘सापडलाय अनुराग, विचारा त्याला प्रश्न!’ छापात खूपच लांबलीय. अनेक वळसे घेत घेत, ती पुन्हा-पुन्हा मुख्य विषयाकडे परतत राहते. भलतीकडेच जात नाही, पण मग टोकदार-क्रिस्पही राहत नाही. याच विषयावरचे इतर लेख वाचायला सुरुवात केल्यानंतर संपवल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटले नाहीत. त्यातही शैलीचा भाग कमी आणि गाभ्याला अधिक महत्त्व होतं.  इथे मात्र ‘अजून किती पानं राहिलीयत’ हे मी एकदा न राहवून मोजलंच.
‘छडी वाजे छमछम’ हा संतोष शिंदेंचा लेख लहान मुलांबाबत घडणार्‍या हिंसाचाराबद्दल आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून या विषयाचं गांभीर्य ठसवलं जात असलं, तरी ते अजूनही तळागाळापर्यंत आणि जायला हवं तितकं खोल कसं गेलेलं नाही, हे हा लेख दाखवून देतो. घरातच अत्याचार होताहेत, हे घरातल्यांनाच न पटणं किंवा पोलिसांना अशा केसेस्‌ हाताळण्याचं ज्ञान नसणं या गोष्टी खरंच खूप गंभीर आहेत. समाजसेवी संस्थांचा अशा ठिकाणी कस लागतो. त्या मुलांच्या मनावर होणारे परिणामही अतिगंभीर असतात. हिंसामुक्त घर आणि हिंसामुक्त समाजासाठी प्रत्येक जण आपापल्या पातळीवर काय करू शकतो याचं छान विवेचन या लेखाच्या शेवटाकडे येतं.
शाब्दिक हिंसेबद्दलचा ‘हिंसेचा डिजिटल मार्ग’ हा राहुल बनसोडेंचा लेख डिजिटल माध्यमं, लोकांच्या स्वतंत्र आणि फॉर्वर्डेड संदेशांच्या अभिव्यक्ती आणि त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हिंसेला मिळणारं खतपाणी याबद्दल सांगतो. या सायबर हिंसेला तो ‘अमर्याद शाब्दिक हिंसा करण्याचा मार्ग’ म्हणतो. हाही लेख वाचावा असाच.
या सर्व मालिकेत निराशा करत असेल, तर वंदना खरेंचा ‘घराच्या भिंतीआड’ हा लांबलचक लेख. तो  खरंतर नवीन काहीच देत नाही. स्त्रियांवरचे मानसिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचार; वेगवेगळ्या संघटनांनी केलेली त्याबद्दलची सर्वेक्षणं आणि त्यांचे निष्कर्ष, काही महत्त्वाच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातली घटनांची जंत्री इतपतच हा लेख सीमित राहतो. यात नवीन माहिती मिळत नाही. किंवा या सगळ्याबद्दल लेखिकेला काय म्हणायचंय हे्ही कुठे येत नाही. इतर लेखांमध्ये का, कसं, त्याचे दूरगामी परिणाम किंवा काही दुरुस्तीदाखल सुचवण्या असं काही ना काही येतं. परंतु हा लेख वाचल्यानंतर, मी हा लेख का वाचला, हाच प्रश्न मला पडला होता.
या खास विषयाखेरीज इतर लेखांबद्दल बोलायचं, तर अमेय तिरोडकरांचा ‘जेएनयू नावाचं जग’ हा जेएनयूची बलस्थानं सांगणारा लेख चांगला आहे. गेल्या वर्षभरात ‘जेएनयू’बद्दल सगळं विपरीतच माध्यमांतून लिहिलं गेलं. या लेखात ‘जेएनयू’च्या स्थापनेमागची कहाणी, अभिव्यक्तीला स्वातंत्र्य देणारं तिथलं वातावरण, तिथली अभ्यासपद्धती, तिथले ढाबे या सगळ्याबद्दल अगदी छान लिहिलं आहे. काही कोपरखळ्याही आहेत. एकुणात लेख वाचल्यानंतर आपणही तिथं जाऊन शिकावं अशी इच्छा होते.
सोनाली नवांगुळांचा त्यांच्या शरीरात फॉलीस कॅथेटर बसवून घेण्याच्या अनुभवांबद्दलचा लेख चांगला आहे. “मी कशी बघा सहनशील, कसल्या त्रासांतून गेले,” असा, किंवा “मी कशी बिचारी होते,” अशा दोन्ही गोष्टी त्यातून डोकावत नाहीत. मला हा लेख वाचताना प्रश्न पडत होता, असं तिर्‍हाइतासारखं स्वतःकडे बघून स्वतःबद्दल लिहिता येईल का?
‘लोकप्रियतेचे चार प’ हा निमिष पाटगांवकरांचा लेख प्रायोजक, प्रसिद्धी, प्रसारमाध्यमं आणि पैसा यांबद्दल सांगतो. खेळांचं वाढतं जागतिकीकरण आणि बदलतं अर्थकारण, याबद्दल बोलणारा हा लेख त्यांतले तोटेही मांडतो.
मृदुला बेलेंचा ‘तोक्यो डायरी’ हा लेख ‘अय्या! जपान कस्सा भारी आहे बै!’ अशा छापाचा लेख आहे. ‘सकाळ’च्या मुक्तपीठ या सदरात लोकांचे  स्वत:च्या परदेशप्रवासाचं कौतुक करणारे बाळबोध लेख असतात. साधारण आप्तेष्टांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करण्याच्या धर्तीचे. मृदूला बेलेंचा हा लेख त्यातला जपानी भाषेच्या माहितीचा भाग वगळला तर खास ‘मुक्तपीठीय’ आहे. अर्थात पंधरा दिवसांच्या अनुभवावर त्या आणखी काय लिहू शकल्या असत्या हादेखील प्रश्नच आहे. त्यामानाने  सिंगापूर आणि भारत शासनाचा तुलना करणारा अलका धुपकरचा लेख चांगला आहे. तिने दोन्ही बाजूंकडे असलेलं अधिक-उणं नीट मांडलंय आणि त्याचसोबत सिंगापूरसारखी शासनव्यवस्था आपल्याकडे येईल की काय ही धास्तीही. अर्थात पुन्हा एकदा ‘घरेलू’ अत्याचारांसारखे काही शब्द डोळ्यांना त्रास देतातच.
‘स्टेम सेल रिसर्च’वरचा प्रसन्न करंदीकरांचा लेख, हा या विषयावरचा मी मराठीत वाचलेला पहिलाच लेख. या विषयावर इंग्रजीतून पूर्वीच वाचलं असल्यानं मला त्यात काही नवीन सापडलं नाही; पण या विषयावर आधी वाचन केलं नसेल, तर जड नसलेला हा लेख इतरांना आवडू शकेल. जगावरच्या वाढत्या कर्जावर लिहिलेल्या संजीव चांदोरकरांच्या लेखाचा उल्लेख करायलाच हवा. मी सर्वसाधारणपणे अर्थविषयक लेख वाचायचा कंटाळा करते, पण जागतिक कर्जं, मंदीची कारणं आणि परिणाम सांगणारा लेख मी चक्क वाचू शकले.
कथा विभागातली पंकज भोसलेची ‘हिप्स डोंट लाय’ ही कथा म्हणजे अगदी सॉल्लिड. गेल्या वर्षीच्या ‘ऐसी अक्षरे’च्या पॉर्न अंकातल्या डॉली गालाच्या गोष्टीनंतर ही नक्षी नेमाडेची गोष्ट वाचली. हीदेखील भलतीच आवडली. कथेत एमटीव्ही आणि तत्सम संस्कृती भारतात रुळण्याचे जे संदर्भ पेरले आहेत, त्यामुळे तर आणखीनच मजा येते. सतीश तांबेंची ‘मला कमळाबाईवर खटला भरायचाय’ ही कथा तशी उपरोधिक आणि चांगली आहे, पण जरा जास्तच लांबलीय असंही वाटतं. विवेक गोविलकरांची ‘रियुनियन’ ही कथा आणि रूपाली जगदाळेंची ‘दिवळी आणि नागोबा’ ठीकठाक. अविनाश राजारामांची ‘पार्टनर-आरसा आणि बादली’ ही एकमेकांना आजमावणार्‍या रूम पार्टनर्सची कथा रंजक आहे.
कविता हा सोईस्करपणे माझा प्रांत असतो. कधी मनापासून वाचते, तर कधी सरळ पानं गाळून पुढं निघून जाते. फेसबुकवरच्या कवितांत मला उत्पल व. बा. यांची आणि कविता महाजन यांची, अशा दोन कविता समजल्या आणि आवडल्या. योजना यादवची वंशाच्या अर्थाबद्दलची कविताही चांगली आहे. नितीन कुलकर्णींची पोस्टमॉडर्न कविता दोन वेळा वाचूनही सरळ डोक्यावरून गेली. आजकालची यंत्रं, ऍप्स यांच्याभोवती फिरणार्‍या आणि संगणकशास्त्रातली परिभाषा बोलणार्‍या इतर कविता खरंतर आपल्या जगण्याच्या अनुभवाशी निगडित वाटायला हव्यात. पण त्या नुसत्याच तसा आव आणत राहतात असं वाटतं. त्यांना आधुनिकोत्तर तरी का म्हणावं हा प्रश्न मला पडला. संतोष पवारांची कविता आणि प्रणव सखदेवांची कविता, या दोन्ही अर्थपूर्ण आणि इतर कवितांहून थोड्या वेगळ्या वाटल्या. बस, याहून कवितांबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही.
या वर्षी आमच्या दक्षिण भारतीय पेपरवाल्याला इतर अंक न मिळाल्यानं ‘अक्षर’ हा एकमेव दिवाळी अंक हाती लागला. त्यामुळे या वर्षीच्या इतर अंकांशी त्याची तुलना करता आली नाही. पण तरीही अपेक्षापूर्तीचं समाधान मात्र ‘अक्षर’ने दिलंच. मात्र माझी त्यांच्या अनुक्रमणिकेबद्दल तक्रार आहे. वेगवेगळ्या सदरांखाली फक्त लेखकांची नावं आणि लेखांची / कथांची नावंच नाहीत. त्यामुळे कोणता लेख कोणत्या पानावर आहे हे आधी शोधा, मग त्याचा लेखक कोण आहे हे लक्ष्यात ठेवा आणि त्यावरून पुढच्या वेळी लेख शोधा, इतका द्राविडी प्राणायाम करावा लागतो.

ब्लॉग : http://he-jeevan-sundar-ahe.blogspot.in/
इमेल : swatsurmy@gmail.com

Uncategorized

ललित, दिवाळी २०१६

– अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी

ललितचं हे  त्रेपन्नावं वर्ष आहे.  २०१४ सालापर्यंत, त्यातल्या पन्नास दिवाळी अंकांची मुखपृष्ठं, जी आतल्या बहुतेक लेखनापेक्षा सरस
असायची, ती वसंत सरवटे यांनी केली!  त्यांच्या २०१४ सालच्या चित्रात त्यांतली काही मुखपृष्ठं दिसतायत.
मागल्या आणि
ह्या वर्षी सतीश भावसारांनी  मुखपृष्ठ केलं. ह्या वर्षी ते छान जमलं आहे. ‘कथा, कादंबरी, कविता व ललित गद्य या सर्जनशील साहित्याची स्थितीगती’ अशी लेखमाला अंकात आहे. त्यावर आधारित आणि सरवटेंच्या वरच्या चित्राने प्रेरित असं ते चित्र आहे. त्याला संलग्न अशी आणखी दोन चित्रं आत आहेत. अर्थात याही वर्षी ‘ललित’च्या मुखपृष्ठावरती सरवटे आहेतच, कारण त्यावरचं ‘ललित’ हे शीर्षक ही त्यांचीच निर्मिती आहे.

***
अलीकडे मासिक ‘ललित’मध्ये मला काय आवडतं, तर ते म्हणजे अनंत देशमुखांनी समन्वयित केलेलं सदर : ‘पन्नाशीपूर्वींची पुस्तके’. त्या सदरात शोभेल असा
लेख
स्वतः देशमुखांनीच या अंकात लिहिलाय : ‘वसंत हजरनीस यांची कविता’. नाट्यछटाकार दिवाकरांची आठवण करून देणारा, पण मिश्किल असा
हा कवी (१९२३-१९६७) विस्मृतीत कसा
गेला याचं आश्चर्य वाटतं.
हजरनीसांनी र. धों. कर्व्यांची फिरकी कशी
घेतली पाहा:
“नग्नसंध आणि।  लैंगिक मासिके।
यांनीच रे, डोके।  शांत केले।।
किती मजा
आली। बायकांची झाली।
अदलाबदली। मित्रांमध्ये।।
बायका पुरुषी। पुरुष बायकी।
खाती कफ्फी-पक्की। प्रेम रोटी ।।”
हे वाचून कर्वे खवळले आणि त्यांनी हजरनीसांची गणना त्यांना आधीच नावडत्या असलेल्या कोणा मर्ढेकरांच्या खालोखाल केली!
त्याच मालिकेत शोभेल असा
लेख  लीला दीक्षित यांनी मराठीत प्रथम १८५४ साली प्रकाशित झालेल्या आणि
१९५४पर्यंत किमान १८ आवृत्ती निघालेल्या ‘नवनीत’ या पुस्तकावर लिहिला आहे.
***
संजीवनी खेरांनी जॉन के (John Keay) या माझ्या आवडत्या इतिहासकारावर लेख लिहिला आहे.  त्याच्या अनेक पुस्तकांचा मराठी वर्तुळाला परिचय करून देणं मलाहीअगत्याचं वाटतं. खेरांचा हा लेख ते काम यथायोग्य करतो. पण जॉन के यांच्या वेगळेपणावर आणि संदेहवादावर (skepticism) हा लेख पुरेसा प्रकाश टाकत नाही.
आपल्याकडचं बरंच इतिहासलेखन व्यक्तिपूजक आणि व्यक्तिकेंद्रित असतं. पण मला मात्र संदेहवादी (skeptic) इतिहासकार आवडतात. आणि के तसे आहेत. त्याचं एक उदाहरण खाली देतोय.
याच
अंकात आशा
बगे
यांचा कै. आनंद विनायक जातेगांवकरांवर लेख
आहे. बगे
यांनी जातेगावकरांच्या ‘अस्वस्थ वर्तमान’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्या पुस्तकातलं हे वाक्य (बाबरी मशीद पडण्याच्या  अनुषंगाने भारतीय / वैदिक संस्कृतीबद्दल केलेलं) पाहा:
“…आजवर हजारो मंदिरं पाडली गेली असतील, लेण्यांतील मूर्तींची तोंडं फोडून हात तोडले गेले असतील. परंतु कुणाचंही प्रार्थनास्थळ या समाजानं, या परंपरेने, या जीवनपद्धतीनं कधी तोडलं नाही…”.
हा भाबडेपणा आहे. जातेगांवकरांनी पुस्तकाचं नाव ‘बखर
वर्तमानाची’ ठेवायला होते. कशावरून म्हणतोय मी हे? वाचा जॉन के:
“…In the course of perhaps several campaigns, more triumphs were
recorded by the Cholas, more treasure was amassed, and more Mahmudian
atrocities are imputed. According to a Western Chalukyan inscription, in
the Bijapur district the Chola army behaved with exceptional brutality,
slaughtering women, children and brahmans and raping girls of decent caste. Manyakheta,
the old Rashtrakutan capital, was also plundered and sacked…
…The classic expansion of Chola power began anew
with the accession of Rajaraja I in 985. Campaigns in the south brought
renewed success against the Pandyas and their ‘haughty’ Chera allies in
Kerala
, both of which kingdoms were now claimed as Chola feudatories. These
triumphs were followed, or accompanied, by a successful invasion of Buddhist
Sri Lanka in which Anuradhapura, the ancient capital, was sacked and its
stupas plundered with a rapacity worthy of the great Mahmud…
…When, therefore, Rajendra I succeeded Rajaraja and
assumed the reins of power in 1014, his priority was obvious. Sri Lanka was
promptly reinvaded and more treasures and priceless regalia seized; prising
open even relic chambers, says a Sri Lankan chronicle, ‘like blood-sucking
yakkhas they took all the treasures of Lanka for themselves’…”
(‘India A History: From the Earliest Civilisations to the Boom of
the Twenty-First Century
‘, 2000/ 2010)
(या
विषयावर मी माझ्या ब्लॉगवर जास्त विस्ताराने इथे
लिहिलं आहे.)
या प्रकारची लेखकाची
सत्याधारित चिकित्सा आपण का करत नाही? जातेगावकरांवरचा लेख वाचूनही मला हा प्रश्न
पडला.
***
‘कथा, कादंबरी, कविता व ललित गद्य या सर्जनशील साहित्याची स्थितीगती’ लेखमालेत चार लेख आहेत. यांतला पहिला लेख चाळला. त्यात मोनिका गजेंद्रगडकरांनी सोशल मीडियाला जवळजवळ सर्जनशील साहित्याचा ‘मारेकरी’च ठरवलं आहे. त्या पुढे
म्हणतात :
”Reading a book’ म्हणजे एक कमिटमेंट असते. पुस्तकाशी तशी त्या लेखकाशीही. त्यासाठी संयमही
लागतो (patience) नि चिकाटीही लागते. तीच ही सोशल माध्यमे संपवत चालली आहेत. (अर्थात याला अपवाद
आहेतही. या मिडियावर होणारं सगळंच लेखन टाकाऊ असतं असं नाही. काही ब्लॉग्ज, काही
चर्चा, काही लेखनं, त्यांतली उत्कटता, चिंतन अस्सल असतं!) दुसरं, सोशल मिडियावरचं
हे लेखन प्रासंगिक, अल्पजीवी असतं. गंभीरपणे ते लिहिलं जातंच असं नाही आणि ते
गंभीरपणे वाचलंही जातंच असं नाही. उलट, ते गंभीरपणे वाचण्याची अपेक्षाही नसते. पण
ते त्या त्या वेळी प्रभावी मात्र वाटतं. या सगळ्यामुळेही सर्जनशील लेखन वाचण्यातला
वाचकांचा ’रस’ कमी होत गेला आहे…’
मला
हे अजिबात मान्य नाही. अशा गोष्टींची कारणमीमांसा क्लिष्ट आहे आणि
नेमक्या शब्दांत पकडणं अशक्य आहे. पण कागदी पुस्तक वाचलं याचा अर्थ वाचकाची कमिटमेंट आहे आणि
सोशल मिडियावर वाचलं याचा अर्थ वाचकाची कमिटमेंट नाही, हे अतिशय पोरकट विधान आहे.
या गोष्टी माध्यमावर अवलंबून असतात असं मला वाटत नाही. माझ्या मते, चांगलं साहित्य हे कमी-जास्त प्रमाणात उपभोगलं (consume) जातं आणि राहीलच, मग माध्यम
कोणतंही असो. खरंतर मराठी साहित्यविश्वातल्या कितीतरी गोष्टींनी या माध्यमाशी
जुळवून घेण्याची गरज आहे.
खुद्द ‘ललित’ला इंटरनेटचं वावडं आहे. ‘वाङ्मयशोभे’चे अंक जसे त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध करून दिले आहेत, तसे ‘ललित’चे गेल्या त्रेपन्न वर्षांतले ठरावीक अंक ऑनलाइन, सर्चेबल अशा फॉर्ममध्ये का उपलब्ध होऊ शकत नाहीत? मोनिका गजेंद्रगडकरांना ‘सोशल मिडिया साहित्य’ आवडत नसेल, पण त्या सध्या ज्या ‘मौज’ प्रकाशनाचं काम पाहतात, त्या ‘मौजे’चं आणि ‘सत्यकथे’चं मराठी
साहित्यातलं स्थान वादातीत आहे. ‘मौजे’चे आणि ‘सत्यकथे’चे सर्व अंक इंटरनेटवर उपलब्ध का करून देता येत नाहीत?
हाच
प्रश्न मला
सर्व दिवाळी अंकांच्या मालकांना आणि संपादकांना विचारायचा आहे. महाराष्ट्राच्या मध्यमवर्गाचा कित्येक दशकांचा इतिहास या अंकांतून बंदिस्त आहे. मराठीत इंटरनेटशिवाय निर्माण  झालेले बहुतेक ज्ञान आणि करमणूक हे कायमचं नाहीसं होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि आपण सोशल
मिडियावरच्या गोष्टी कशा गंभीर नाहीत, असं काहीतरी पोरकट विधान करण्यात रममाण
आहोत.
रामायण, महाभारत, तुळशीदास, तुकाराम वाचले / ऐकले / पाहिले जात राहतीलच. सर्जनशील साहित्याबद्दल यापेक्षा जास्त कोणतंच भाकीत  मला करता येत नाही.
***
कै. रा. चिं. ढेऱ्यांवरती वर्षा गजेंद्रगडकरांचा लेख
आहे. मला ढेरे हे लेखक म्हणून फार
कंटाळवाणे वाटतात.  विकत घेऊनसुद्धा मी त्यांचं एकही पुस्तक अर्धंसुद्धा वाचू शकलो नाहीये आणि तसाच हा लेखही.
***
नीलिमा भावे कृत ‘मराठीतील अनुवाद संस्कृती’तील पुढील विधान वाचून उडालोच:
”… अरुण कोलटकर हे मराठीतील द्वैभाषिक कवीचे जवळजवळ एकमेव नाव आहे आणि किरण नगरकर यांचे द्वैभाषिक कादंबरीकार म्हणून…”.
विलास सारंग जाऊन जेमतेम दीड
वर्ष होतंय. विसरलो त्यांना? सारंगांनी कोलटकरांइतकंच आणि
नगरकरांपेक्षा सरस
काम
या क्षेत्रात केलं आहे. माझ्याकडे सारंगांनी मर्ढेकरांच्या इंग्रजीत अनुवादित केलेल्या कवितांचा खासगी-वितरणासाठी
असलेला संग्रह आहे. दिलीप चित्र्यांच्या अनुवादित कवितांचा
दर्जा वादातीत आहे. सारंगांनी अनुवादित केलेल्या कवितांचा दर्जाही दिलीप
चित्र्यांच्या तोडीस तोड आहे.
***
‘पुराव्याचा आधार नसलेल्या धर्मश्रद्धेला आव्हान देणाऱ्या वैज्ञानिकाचे आत्मचरित्र’ या शीर्षकाखाली विवेक गोविलकर यांनी रिचर्ड डॉकिन्सच्या आत्मचरित्राचं परीक्षण लिहिलं आहे. महाराष्ट्रात नास्तिकता आणि पुरोगामित्व यांची मोट एकोणिसाव्या शतकात आगरकर प्रभृतींमुळे पहिल्यांदा बांधली गेली. एकविसाव्या शतकात ती जास्त घट्ट झाली आणि
त्याचं श्रेय रिचर्ड डॉकिन्सना काही प्रमाणात जातं. ‘पुराव्याचा आधार नसलेल्या धर्मश्रद्धे’ला? श्रद्धेला कुठला पुरावा पाहिजे? तो काय
शास्त्रीय प्रयोग आहे
की ऐतिहासिक वा सामाजिक सिद्धांत? सरळ म्हणा ना, ‘धर्माला आव्हान देणाऱ्या वैज्ञानिकाचे आत्मचरित्र’! डॉकिन्सनापण तेच आवडेल!
जॉन
ग्रे (John N. Gray) यांचे याच
पुस्तकाचे दीर्घ परीक्षण वाचण्यासारखे आहे. ते म्हणतात :
“… To suppose that science can
liberate humankind from ignorance requires considerable credulity. We know how
science has been used in the past—not only to alleviate the human lot, but
equally to serve tyranny and oppression. The notion that things might be
fundamentally different in the future is an act of faith—one as gratuitous as
any of the claims of religion, if not more so. Consider Pascal. One of the
founders of modern probability theory and the designer of the world’s first
mass-transit system, he was far too intelligent to imagine that human reason
could resolve perennial questions. His celebrated wager has always seemed to me
a rather bad bet. Since we cannot know what gods there may be (if any), why
stake our lives on pleasing one of them? But Pascal’s wager was meant as a
pedagogical device rather than a demonstrative argument, and he reached faith
himself by way of skeptical doubt. In contrast, Dawkins shows not a trace of
skepticism anywhere in his writings. In comparison with Pascal, a man of
restless intellectual energy, Dawkins is a monument to unthinking
certitude.”
या प्रकारची चीर-फाड आपण
का करत नाही? कोणत्याही व्यक्तीचं एका क्षेत्रातलं काम कितीही मोठं असलं, तरी
तिच्या कामात उणिवा नसतात असं नाही. आपण अशा उणिवा वस्तुनिष्ठपणे दाखवून देत नाही.
यामुळे त्या व्यक्तीचं जिवंत चित्र उभं राहत नाही. एखादाच गुण दाखवणारं द्विमित
चित्र शिल्लक उरतं. याही लेखातून यापेक्षा निराळं काही झालं नाही, ही निराशेची बाब
वाटली.
***
रा. अ. कुंभोजकरांनी य. गो. जोशींवर लेख
लिहला आहे. य. गो. जोशी हे काहीसे जुन्या वळणाचे कथाकार. ‘शेवग्याच्या
शेंगा’ या त्यांच्या गाजलेल्या कथेमुळेच ते अनेकांना माहीत असतात. त्यांच्यावरच्या लेखातलं एक वाक्य मला खूप आवडलं:
”सामान्य माणसे सुंदर नसतात, ध्येयवादी आणि
त्यागीही नसतात. वाट्याला आलेले सामान्य आयुष्य रस घेऊन ती जगताना दिसतात…”
य. गोंचे नायक सामान्य होते. वास्तविक य. गो.
जोशी हे वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके यांना समकालीन. खांडेकरांचे नायक
ध्येयवादी असत, तर फडक्यांचे अविश्वसनीयपणे रुबाबदार आणि श्रीमंत. य. गोंचे नायक
मात्र या दोन्ही चौकटीतून सुटलेले असत. या वैशिष्ट्याबद्दल हा लेख अचूक बोलतो.
***
प्रवीण दशरथ बांदेकरांचा लेख चेर्नोबिल दुर्घटनेवरच्या ‘Voices from Chernobyl: The
Oral History of a Nuclear Disaster’ या Sviatlana Aleksievich यांनी १९९७ साली लिहिलेल्या  पुस्तकावर आधारित आहे. लेखिका २०१५च्या साहित्य नोबेल पुरस्कार  विजेत्या आहेत. माझ्या अपेक्षेप्रमाणेच हे परीक्षण जैतापूरला जाऊन पोचतं. पुस्तकाबद्दल काही फारशी चर्चा होते की नाही, हा मुद्दा
अलाहिदा. पण बांदेकरांना जैतापुरात हा प्रकल्प व्हायला नको आहे, हे मात्र आपल्याला लगेच समजतं. भविष्यातलं जैतापूर इतकं भीषण असेल, तर भारतात सध्या अणुभट्ट्या असलेली इतर सात गावं कशी असतील या विचाराने काळजाचं पाणी-पाणी होतं आणि
आपल्या बडबड-लोकशाहीत त्या गावातली लोकं इतकी शांत आणि
हतबल कशी
असाही मनात विचार येतो. असं का व्हावं?
आपण आपली विचारधारा, आपला वैचारिक कल पूर्णपणे बाजूला ठेवू शकत नाही हे खरं. पण
साहित्याबद्दल बोलताना आपण त्याखेरीज काही गोष्टींवर बोलणं अपेक्षित आहे, हे
आपल्याला का समजत नाही?
बांदेकरांनी नोबेल पुरस्कारासंबंधीपण बरंच मंथन केलंय :
”… लेखक समकालीन जगाचा विचार  कसा करीत आहे, त्याचे संबंधित पुस्तक आणि त्याच्या प्रकाशित झालेल्या अन्य लेखनामधून कोणती जीवनदृष्टी व्यक्त होत आहे, मानवकेंद्रित कोणती  मूल्ये मांडली जात आहेत, तो या जगातील वास्तवाकडे कोणत्या नजरेने पाहतो आहे,  ही  गोष्ट समितीला महत्वाची वाटते आहे… विशेषतः पर्यावरणवादी, मानवतावादी मूल्यांची जपणूक करणारे… …लेखन पुरस्कारासाठी विचारात घेतले जात आहे…”
हे वाचून पहिला खवचट मनात विचार आला, की प्रश्न
मानवतावादाचाच असता, तर कै. वि. स. खांडेकरांना नोबेल नक्कीच मिळालं असतं. नंतर मी विकिपीडियावर अलीकडील विजेत्यांचा संक्षिप्त परिचय आणि त्यांची सायटेशन वाचू लागलो. मला तरी त्यात पर्यावरणवादी, मानवतावादी मूल्ये वगैरे शब्द त्यांच्या निकषांत
कुठे दिसले नाहीत.
आपल्याला भारतात जास्त परिचित असलेले या शतकातील तीन लेखक पाहू:
१. बॉब डिलन, २०१६ :
‘…for having created new poetic expressions within the great
American song tradition.’
२. ओरहान पामुक, २००६:
‘…who in the
quest for the melancholic soul of his native city has discovered new symbols
for the clash and interlacing of cultures.’
३. सर व्ही. एस. नायपॉल, २००१ :
‘…for having
united perceptive narrative and incorruptible scrutiny in works that compel us
to see the presence of suppressed histories.’
हे लेखक
मानवतावादी आहेत, म्हणून त्यांना नोबेल मिळालं आहे? की त्यांच्या कामात काही
साहित्यगुण आहे, म्हणून त्यांना नोबेल मिळालं आहे? मराठीतल्या बहुतेक वैचारिक लेखनात मला या प्रकारच्या नेमकेपणाचा आणि संदेहवादाचा (skepticism) अभाव कायम जाणवत आला आहे. बहुतेक सगळे जण एका ठरवून घेतलेल्या तथाकथित योग्य भूमिकेतून इतक्या ठामपणे सगळं बोलत असतात… की ते एका टप्प्यावर हास्यास्पद होऊ लागतं. आणि म्हणूनच मला जास्त भावतात पास्कल आणि जॉन केंसारखे लेखक!
***
‘ललित’चं घोषवाक्य असं आहे :
‘ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि
ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मासिक’.
हा दिवाळी अंक बऱ्याच प्रमाणात या घोषवाक्याला धरूनच काढलेला आहे. १८२ पानांचा, अतिशय कमी जाहिराती असलेला अंक १२० रुपयांना मिळतो आहे. पण मला खुपलेली गोष्ट म्हणजे विषयांत जरी वैश्विकता असली, तरी
विचारांत ती पुरेशी  नाही. बहुतेक लेखक आपल्या लेखनासंबंधी अगदी मर्यादित दृष्टिकोनातून विचार करताना दिसतात. संदेह जवळजवळ नाहीच. दृश्यकलांचे उल्लेख, तो विषय नसेल, तर क्वचितच.
हे कधी बदलेल?
इमेल : anikulkarni60@gmail.com
Uncategorized

जेनेटिकली मॉडिफाइड फुलांचं एलीट अत्तर

– बघ्या

मी दिवाळी अंकांचा चोखंदळ वाचक नाही. मी ‘ऐसी अक्षरे’ हा फोरम पूर्वी केव्हातरी नियमाने वाचत असे. पण नंतर जे नेटावर थेट आणि अधिक शुद्ध स्वरूपात आहे, त्याबद्दल तिथे परत वाचणं नकोसं वाटायला लागलं. पुढे-पुढे लोकांच्या गीकीसदृश होत गेलेल्या कमेंट्सही कंटाळवाण्या होत गेल्या, त्यामुळे मी ते सोडून दिलं. पण अर्थात फेसबुकवर त्यांच्या दिवाळी अंकाबद्दल कळलं होतं. ‘ऐसी अक्षरे’ने ह्याअगोदर काढलेल्या पॉर्न विशेषांकात ‘जलपर्णीच्या नशिबाचे साडेतीन फेरे‘ हा फर्मास प्रकार होता. त्यामुळे ‘ऐसी अक्षरे’चा दिवाळी अंक मी बऱ्यापैकी वाचला. काही लिखाण वेगाने वाचलं; काही परत-परत, आणि काही केवळ चाळून सोडून दिलं.
इतर साऱ्या गोष्टींसारख्या दिवाळी अंकांबद्दलच्याही – काही चेरीश्‍‍ केलेल्या, पण आता पुसट झालेल्या – इमेजेस्‌ माझ्या डोक्यात आहेत. त्यात एक आहे अभय बंगांचा लेख (बहुतेक ‘मौजे’तला २००२ किंवा २००३ सालचा), आणि त्या अंकातली किनाऱ्यावरचे मासे समुद्रात फेकणाऱ्या माणसाची गोष्ट; एक आहे ‘प्रयास’च्या गिरीश संतांचा लेख (मौज दिवाळी २००५ बहुधा), ज्या लेखाने माहितीपर लिखाणाबद्दल मला जागं केलं; सदानंद देशमुख ह्यांची २०१० सालच्या (‘अंतर्नाद’ किंवा ‘मौज’च्या) दिवाळी अंकामधली कथा (एड्‌स झालेला भाऊ आणि त्याला फकिराकडे घेऊन गेलेली वहिनी); केव्हातरी वाचलेली अनंत सामंतांची कादंबरी – बहुतेक ‘ऑक्टोबर एंड’.
मी दिवाळी अंकांकडून काही अपेक्षा वगैरे ठेवत नाही. त्यामुळे मला धक्का बसलाच, तरी दुःख न देणारा धक्काच बसण्याची शक्यता होती. ‘ऐसी अक्षरे’च्या २०१६ दिवाळी अंकामधल्या असा दुःख न देणारा धक्का देणार्‍या किंवा वर दिलेल्याप्रमाणे लक्ष्यात राहणार्‍या कोणत्या गोष्टी असतील, तर त्या ह्या :
१. ‘विभक्ती’चे प्रत्यय आणि सापेक्ष सुरक्षिततेचे सिद्धांत : म्हणजे, मी वाचत गेलो ही गोष्ट. अ, ब, क अशी थोडी त्रयस्थ, निरपेक्ष नावं असली; तरी त्या गोष्टीचा नूर ‘घडलं असेल असं कदाचित लिहिणाऱ्याबाबत’ असा काहीसा आहे. अर्थात तसं ह्या गोष्टीत काही घडत नाही. खूप टोकाची संवेदना, बऱ्यापैकी उत्पन्न आणि तसेच मित्र-मैत्रिणी असलेल्या माणसांच्या रकान्यात मी ही गोष्ट सोडून देईन.
२. लोकशाही राज्यपद्धतीचे फायदे-तोटे : ह्या कथेचा फॉर्म आणि त्यातलं कोडं लक्ष्यात राहील. ह्या कथेत लोकशाहीबद्दल जी सटल्‌ कमेंट वगैरे आहे, ती काही मला मान्य नाहीय. रॅशनल निवडीने किंवा स्ट्रॅटेजिक मॅन्युप्युलेशनने लोकशाही मॉडेल होत नाही, असं मला वाटतं. पण ही बाब अलाहिदा आहे. ती एक सरस कथा आहे. कथा अशा अर्थाने वाचत असलेल्या काही वाचकांना मधला गणिताचा भाग अगम्य वाटू शकतो. पण कथेची शैली ही काही प्रमाणात मराठी कथांचे जनुकीय प्रणेते जीए ह्यांच्याशी जुळणारी असल्याने आणि मानवी वर्तनाचा पेच अशी एकूण कथेची मांडणी असल्याने आणि तिच्या चिरेबंद मांडणीमुळे मजा येते.
३. आधुनिक कविता अवघड का असते? :  असण्यामधल्या अनेक असण्यांचा पेच माझ्या लेखी ही कविता अचूक पकडते.  कवितांची उत्क्रांती वगैरेंबद्दल मला काही ठोस माहिती नाही. पण तरीही कवितांच्या बाह्य स्वरूपात आणि त्या काय सांगताहेत यानुसार नक्कीच दोन मोठे गट पडतात. गेयता, अर्थाच्या टोकदार पाठलागापेक्षा तंत्राची आस, आणि मुळात जगाला काहीएक नैतिक बैठक आहे अशा गृहितकावर आधारित असलेल्या कविता एका गटात. आणि दुसरा गट, जो कालान्वयेही नंतरचा असणार, तो म्हणजे जगाकडे बघायचा एकच एक असा बरोबर कोन नाही, असं मानणारा. जो जिथे आहे, तिथून त्याला जे दिसतंय, ते त्यानं मांडावं; अशी भूमिका असलेला. यमकाचा, गेयतेचा आणि अन्य तंत्राचा सोस सुटण्यामागे मुळात कसं बघावं ह्यात झालेला बदल कारणीभूत आहे असं मला वाटतं.
म्हणजे हा काही फक्त कवितांमधला बदल नाहीये. कोणत्याही मानवी कृतीकडे बघायचं कसं या भूमिकेतलाच हा बदल आहे. आपल्या भोवतीच्या जगाकडे बघायचा एक असा चश्मा नाही असं मानल्यावर चूक-बरोबर हे सात्त्विक वर्गीकरण एकदम ढासळून जातं आणि त्यातून विविधता येते. पण विविधता आली की त्याची जटिलता वाढते आणि काही वेळा हा केवळ ‘अगम्य कोलाहल’ वाटू लागतो. मुळात कविता हा प्रामुख्याने कवीचा स्वतःशी बोलण्याचा मार्ग आहे अशा अर्थाने आपण तिच्याकडे बघायला लागल्यावर, मग त्यात इतरांसाठी काही आहे का नाही असा प्रश्नच उद्भवत नाही. जे काही आहे, ते ज्याचं त्यानं बघून घ्यावं.
हे त्रोटक विवेचन आहे, पण माझ्यामते ह्यामुळे काही जणांना ‘आधुनिक’ कविता कठीण / जटील वाटत असणं शक्य आहे.
‘आधुनिक कविता अवघड का असते?’ हा खरा प्रश्न आहे का सटायर आहे, हे मला ठाऊक नाही. मला जेवढं कळलं, त्यानुसार ही कविता मॉक करतेय आणि काही वेळा एकदम सरळ काहीतरी सांगतेय. सिनिक, सहानुभूतीने बघणारा, विसंगती पकडणारा असे सारे कोपरेही तिला आहेतच. तरी शेवटच्या चार ओळी मला बेहद्द आवडलेल्या आहेत. त्यात एक थंड निष्कर्षाचा सुस्कारा आहे, का शब्दांच्या रचनेत दडवलेली कुत्सित कमेंट आहे,  हे कवीच जाणे!
४. आय-क्यू पंक्चरलेली बाहुली : मला गोष्ट आवडली. “इट्स क्यूट!” असं म्हणतात ना, तशा रकान्यात!
५. काळीजमाया : हा लेख मात्र मी दोनदा वाचला. मी केव्हातरी जीएंच्या रूपककथासदृश लिखाणाचा फॅन होतो. कदाचित मी कधीकाळी जे काही लिहिलं होतं, त्यातल्या काहीवर त्यांच्या शब्दांची झाक होती. (उरलेल्या काहीवर अजून कोणी असेल!) बरं म्हणा किंवा वाईट म्हणा; नेमाडे, ग्रेस, जीए अशा लोकांनी त्यांच्या-त्यांच्या जॉनरवर त्यांची मोठी सावली सोडलेली आहे. अनेक वाचक हे सारे प्रकार वाचताना सुरुवातीला त्याच सावलीत चाचपडू लागतात. ह्या सावलीतून बाहेर पडल्यावर त्यातील न्यून, किंवा त्याहून सरस किंवा रंजक काही सापडतं. हे सापडूनही काही जण आधीच्या चाचपडीशी भावनिक जवळीक ठेवू शकतात. काही जण तिला पूर्णपणे झिडकारू शकतात. लेखकाने जीएंच्या कथांना स्पर्शत जात त्यांच्या कथात येणाऱ्या, सुख रसरसून जगण्याच्या आशेला आणि त्या आशेचा निश्चित चुराडा झाल्यावर मागे उरलेल्या माणसांना याद केलेलं आहे. त्यांच्या शैलीमुळे हा लेख जमला आहे एवढं नक्की. तो वाचल्यावर सदाभाऊ आणि सीताबाई आणि त्या कथेचा शेवट मला आठवला.
एके काळी जीए आणि सुनीता देशपांडे ह्यांचा पत्रव्यवहार मी वाचायचो. आता कधी ते पुस्तक काढलं, तर फार वाचवत नाही. तसंच जीएंच्या कथांबद्दलही होतं, विशेषतः मानवी स्वभावाच्या एखाद्या मूलभूततेला रूपकवाटेने हात घालू पाहणाऱ्या कथांबद्दल. त्यापेक्षा करवादलेल्या, चिरडीला येऊन सणकेने काही करू जाणाऱ्या लोकांच्या, किंवा अनपेक्षिताच्या एखाद्या फटक्याने तुटलेल्या, मोडक्या लोकांच्या त्यांनी लिहिलेल्या गोष्टी मी केव्हा-केव्हा वाचतो.
‘काळीजमाया’चंही असंच झालं. मला पहिल्यांदा तो गारद आवडला. मग दुसऱ्यांदा काही शब्द जड-जड, अधिक नटवलेले वाटू लागले.
बाकी काही लेखांचा, बहुतकरून माहितीपर लेखांचा, उद्देश मला कळलाच नाही.  अनेकदा हे लेख नेमकं कोण वाचणार आहे आणि त्यातून वाचणाऱ्याला शॉर्ट रनमध्ये आणि लॉंग रनमध्ये काय वाटणं अपेक्षित आहे, का असं काही नाहीच; ह्याचा काही उलगडा झाला नाही. ‘नाती’ हा माणसांबद्दल लिहिल्या जाणाऱ्या बहुतेक गोष्टींचा कच्चा माल असतोच. त्याची थीम जरी दिवाळी अंकाला असली, तरी तिला फार पक्केपणा आलेला नाही.
मुळात माहितीपर लेखांच्या बाबतीत, त्यातही मराठीत असलेल्या अशा लेखांच्या बाबतीत, मी आता स्वतःला काही प्रश्न विचारतो:
१. लिहिणारा ज्या क्षेत्रात काम करतो, त्यातल्या नैपुण्याच्या आधारे आणि माहिती इतरांत वाटावी अशा भावनेने लिहिलेला लेख असेल; तर – मला आत्ता ह्या माहितीची गरज आहे का? किंवा हे माझ्या डोक्यात घोळणाऱ्या गोष्टींबाबत आहे का? उदाहरणार्थ, ‘महाराष्ट्रातील अमुक एका देवतेची मंदिरे’ असं असेल, तर मी ते थोडसं बाजूला ठेवतो. मंदिरं, देवता आहेत म्हणून नाही, तर ह्या लेखात जे असेल ते मला आत्ता नकोय म्हणून.
२. लेख लिहिताना घडलेल्या किंवा घडायच्या अवस्थेत असणाऱ्या आणि लोकांच्या भौतिक सुखावर परिणाम करू शकणाऱ्या गोष्टींची, वैयक्तिक अनुभवावर आधारित नसलेली, इतरांना तपासून पाहता येईल अशा पुराव्यांवर आधारित असलेली आणि काही उपाय सुचवायचा प्रयत्न करणारी, किंवा प्रस्थापित उपायांचा तर्काधारित प्रपोगंडा करणारी मांडणी असेल; तर मी ती प्राधान्याने वाचतो. पण वरील घटकांपैकी एखादा घटक नसेल, तर मी थोडा साशंक असतो. अमुक एक अमुक एका क्षेत्रात थोर आहेत, म्हणून त्यांचं म्हणणं प्रमाण माना किंवा त्यांची मांडणी जशी असेल तशी प्रमाण माना; असं असू नये असं मला वाटतं. हे एक प्रकारचं दैवतीकरण झालं.
३. आत्मविवरणपर किंवा अन्य कोणाच्या कृतींचं वर्णन असलेले माहितीपर लेख : इथे मी थोडा डळमळीत आहे. मला आत्मचरित्र हा प्रकार मुळातच स्वतःचे हिशोब जुळवायला केलेला प्रकार वाटतो. माझी माणसांच्या उतरंडीची जी परीक्षा आहे; त्यात ‘माझं असं, माझं तसं’ न करणारे आणि एखाद्या विषयातच मुरून, त्या विषयाचं अंग होऊन गेलेले लोक, किंवा अशी माझ्या मनातली त्यांची इमेज हीच काय ती जगण्याची पद्धत आहे. तरीही काही संदिग्धतेवर अधिक प्रकाश टाकायला, काही पूर्ण काळोखातल्या गोष्टी – धूसर का होईना – दाखवायला चरित्रं अथवा आत्मचरित्रं उपयोगी पडू शकतात. पण हे अशा कृतींमध्ये फार कमी वेळा लागू पडतं. अनेकदा, अमुक एका गोष्टीबद्दल कुणाला काही विचारायचं असेल, तर ह्याबद्दल ह्यांना विचारता येईल – अशी एन्ट्री बनवायला आपल्याला अशा लेखांचा उपयोग होतो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘ऐसी..’ मधल्या माहितीपर लेखांत मला फारसं काही गवसलेलं नाही. पण अर्थात हे थोडसं तिरकस सापेक्ष आहे.
‘कथा’ विभागातल्या बहुतेक कथा ह्या धक्का-तंत्रावर उभ्या केल्यासारख्या वाटतात. कदाचित सध्याचे बहुतेक सिनेमे, प्रख्यात कादंबऱ्या ह्या सगळ्यांचाच हा गुण आहे किंवा एकूणच जीवनाची गुणवत्ता या अर्थी सपक होत चाललेल्या आयुष्यात धक्कातंत्र हाच मजा आहे.
‘खेळ’मध्ये संवादांचा अतिरेक आहे. ‘खेळ’ ही कथा नाटक म्हणून परत सादर केली, तर अधिक चांगलं होईल, असं मला वाटत राहिलं. ‘कुलंगी कुत्र्याला…’मध्ये जननेंद्रियं, स्तन ह्यांचे उल्लेख नेमके कशाला आहेत हे कळलं नाही आणि केवळ शेवटावरच सारी कथा फिरवायचा प्रयत्न आहे असं वाटत राहिलं. तसंच ‘अंतर‘चं. काही पद्धतशीर स्टिरिओटाईप ठोकळे घेऊन ही कथा लिहिलेली आहे. (ही कथा वाचताना काही वेळा झुम्पा लहिरीच्या ‘लोलँड’ची आठवण येते, विशेषतः ‘बेला’ ह्या नावामुळे.) खरंतर चीअरलीडर हे थोडं वेगळं सूत्र होतं. भारतात वाढून-जन्मून परदेशात स्थायिक झालेल्या लोकांच्या पाल्यांबद्दल, विशेषतः त्यांच्यातल्या डीवियंट्सबद्दल (सेक्शुअली अशाच अर्थाने नाही. करिअर, भारताबद्दल काही वाटणं, खेळांची आवड अशा अनेक अर्थांनी. डॉ. अतुल गावंडे हे एक उदाहरण म्हणून मी देईन. ) मला कुतूहल आहे.  ‘वाढदिवस’च्या शेवटाचा मी अजून विचार करतो आहे. ‘धनुष्यातून सुटलेला बाण‘ निवांत सुरू होते, पण मग कमेंट करण्याच्या नादात कशीतरी संपते. ‘डावलच्या स्वप्नात पतंगी’ मी काही तांत्रिक कारणाने ऍक्सेस न मिळाल्याने वाचू शकलो नाही. उरलेल्या कथांबद्दल काही आठवत नाही.
ब्रह्मे आता जाम ताणू लागले आहेत.
‘ऐसी’च्या लेखनिवडीत रोमॅन्टिसिझमला किंवा सरासरी डोक्यावर घेतल्या जाणाऱ्या फॉर्म्सना नाकारणं अशी एक ठरवून केलेली निवड दिसते. आपण जेव्हा असं ठरवून सगळं नाकारतो आणि मुद्दामून, हेतूपूर्वक लिखाण करतो; तेव्हा ती प्रामुख्याने बौद्धिक निर्मिती बनते. ‘ऐसी’च्या दिवाळी अंकाला हा बौद्धिक गंध आहे. त्यापाठचं रसायन हळूहळू मराठीच्या जेनेटिकली मॉडिफाईड फुलांचं एलीट अत्तर बनेल का काय, असं काही वेळा वाटतं. कथा, कविता, अधिक लांबीचं फिक्शन ह्यांवर काम करणाऱ्या लोकांना चोखंदळ संपादन पुरवणं आणि दुसऱ्या प्रतलावर, अधिक स्ट्रक्चर्ड असलेल्या आणि निव्वळ उष्णता निर्माण करण्यापेक्षाही काहीएक प्रकाश पाडण्याच्या दृष्टीने बनणाऱ्या वैचारिक लिखाणाचं चोखंदळ संपादन आणि प्रसार – ह्या दोन दिशांना ‘ऐसी अक्षरे’ जाऊ शकेल काय?
इमेल : kiranlimaye11@gmail.com
Uncategorized

‘शुद्ध साहित्य’ आणि पद्मगंधा

– मेघना भुस्कुटे

‘पद्मगंधे’च्या अंकाची मुख्य थीम आहे ‘मिथकांचे अवतरण’. रा. चिं. ढेरे यांना श्रद्धांजली म्हणूनच हा विषय निवडण्यात आला असल्याचं आणि हा अंक त्यांना श्रद्धांजली म्हणूनच प्रसिद्ध केला जात असल्याचं प्रस्तावनेत संपादकांनी नोंदलं आहे. परिणामी ढेरे यांच्या कामाचा आढावा घेणारे, त्यांची थोरवी उजळवणारे असे काही लेख आहेत. ढेर्‍यांचा एक अप्रकाशित लेख आहे. आणि मुख्य म्हणजे मिथक या संकल्पनेचा वेगवेगळ्या अंगांनी वेध घेण्याचा प्रयत्न आहे.
‘विषयच किती जड…. सर्वसामान्यांनी काय नि का वाचावं?’ अशा प्रकारची रडारड करण्याचा माझा इरादा नाही, हे आधी स्पष्ट करते. कोणताही विषय असला तरी तो वाचकाच्या आयुष्याशी जोडून घेता येतो, योग्य पद्धतीनं समजावून सांगता येतो आणि त्यामुळे दिवाळी अंक वाचायची इच्छा असणार्‍या (=किमान वाचन करणार्‍या) मराठी वाचकाला अतिशय इंट्रेष्टिंगही वाटू शकतो. साहित्यधुरिणांना खरोखरच असं करायची इच्छा आहे का, असा प्रश्न मात्र ‘पद्मगंधे’च्या थीमवरचं लेखन वाचताना पडला. वाचकाभिमुख आणि लालित्यपूर्ण लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ढेर्‍यांना वाहिलेला अंक वाचताना हे अधिकच खुपलं.
पहिलं म्हणजे जवळपास प्रत्येक लेखामध्ये ‘मिथक म्हणजे काय?’ या प्रश्नाचा पानभर तरी ऊहापोह आहे. निरनिराळ्या कोशांमधल्या व्याख्या घेऊन त्यांचा कीस काढायचा आणि मग आपल्याला ‘या लेखापुरता’ कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते सांगून मग (एकदाची) विषयाला सुरुवात करायची, असा हा मामला आहे. यात संपादकीय प्रक्रिया कुठे आहे, ते मला कळेना. एकदा एक व्याख्या / चौकट / व्याख्यासमुच्चय गृहीतक म्हणून मांडायला हरकत काय आहे? ज्या लेखकाला त्यापासून फटकून असायचे आहे, काही कारणानं मतभेद मांडायचा आहे, त्याचा अपवाद यथावकाश केला जाईलच. पण हरेक लेखकानं एक पान ‘मिथक म्हणजे काय?’ याच्या चर्चेत आणि उदाहरणांत खर्ची घालायचं म्हणजे अवघडच आहे. याउलट व्याख्यानिश्चितीसाठी एका लेखाचा ऐवज वापरला असता, तर पुढे ही पुनरावृत्ती आणि परस्परविरोधी अर्थांची गर्दी बर्‍याच अंशी टळली असती.
दुसरं म्हणजे प्रशांत बागड, शाहू पाटोळे, आनंद पाटील आणि इतर काही जणांच्या लेखांचा अपवाद वगळता बहुतांश लेखकांनी वापरलेली संज्ञाजड भाषा. ही काही वानगीदाखल उद्धृतं:
“…अद्भुताचे अतार्किकाशी वास्तववादी प्रमाण, ओटो म्हणतो त्या ‘पवित्र-स्वेतरा’शी (‘Ganz Andere’ जर्मन शब्द) मिथकात आणि साहित्यात कमीअधिक प्रमाणात व भिन्न रूपात असते. विश्वसाहित्याची उकल करण्याचे जे सुखद, रंजक आणि उद्बोधक प्रयत्न साहित्यात आणि मिथकात अंतर्भूत असतात, होतात व जे ‘विसरलेले’ (व ‘विखुरलेले’) पुनः जाणवून देण्याघेण्याचे ज्ञानात्मक सुखद जाणीव देणारे कलाप्रकार आहेत, त्यात हे ‘वेगळे वास्तव’ असते…”
– वाङ्‍मयाची मिथकात्मता आणि मिथकात्म वाङ्मय, चंद्रशेखर चिंगरे
“… पृथ्वीचे परब्रह्ममूलक सूर्यान्वयी अस्तित्व हा एखाद्या त्रिशंकूचा कणा मानला तर तीही त्रिकोणी भासमान होताहोताच वर्तुळाकार प्रत्यय घडवितो आणि त्रिशंकूच्या तीन भुजाही आपसूकच शिरोबिंदूपाशी एकरूप होत त्या वर्तुळाकृतीचा शंकू करतात आणि त्याची त्रिविधता एकत्वात विलीन होऊन भासमान होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या कलात्मक शक्तीही एकात्म स्वरूपात मूल कारणाकडे निर्देश करतात आणि सर्व भेद भ्रामक व तात्कालिक अस्तित्वे वाटतात. मात्र जाणिवेच्या कक्षेत ज्ञानात्मक अवस्थेपर्यंत पोचेपर्यंत सर्व अस्तित्वे ही भौतिकतः भिन्न अनुभूती घडविणारी अनुभूती जीवांस देतात. या संपूर्ण प्रक्रियेत विविध अनुभवसिद्ध द्रष्ट्यांनी विविध प्रकारे जीवसृष्टीशी भरणपोषणात्मक तसेच उत्पत्तिविनाशात्मक प्रक्रियेत कार्यान्वित असणार्‍या….”
– दैवत निर्मिती : मानवी प्रवृत्ती, अनिल सहस्रबुद्धे
काय समजावं माणसानं? विषय काहीसा अमूर्त आहे हे मला कबूलच आहे. माझी तक्रार त्याबद्दल नाही हे पुन्हा पुन्हा नोंदवते आहे. पण “…समाजानेही आता ग्रंथसन्मुख होणे ही आपली जबाबदारी समजली पाहिजे…. शुद्ध वाङ्मयीन भूमिका घेऊन काम करणार्‍या सर्वच प्रकाशनसंस्थांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे…” असं प्रस्तावनेतलं संपादकांचं म्हणणं पाहता प्रश्न पडतो, की ही जबाबदारी फक्त ‘बा वाचका’चीच आहे की काय? दिवाळी अंक वाचणारा वाचक – अगदी ‘शुद्ध साहित्य’ वाचणाराही – संशोधक वा अभ्यासक नाही, याचा थोडा विचार संपादकांनी करायला काय हरकत आहे?
तिसरं म्हणजे भाषाशास्त्रज्ञ, साहित्यिक, समीक्षक आणि संस्कृती-/ दैवताभ्यासक – तेही गतकालीन खुणांच्याच अभ्यासात रमलेले – वगळता इतर जणांच्या आयुष्यात मिथकाचं काहीच महत्त्व वा उपयोजन नसतं का? नुकतंच ‘Sapiens: A Brief History of Humankind’, Yual Noah Harari हे पुस्तक वाचनात आलं होतं. भाषा आणि पर्यायानं गोष्टी (अर्थात मिथकं) या बाबींचा किती प्रचंड मोठा वाटा माणसांच्या उत्क्रांतीत आहे, आणि आजच्या आयुष्यातही किती वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी (मिथकं!) आपलं आयुष्य व्यापून असतात त्याबद्दलचं प्रतिपादन, हा त्या पुस्तकातला एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या मंडळींना मिथकांच्या अशा प्रकारच्या अर्थनिर्णयनात अजिबातच रस नाही का? निळ्या आणि भगव्या झेंड्यांमागची, फक्त भारतातच उलगडतील अशी प्रतीकं आणि त्यांमागे असलेली, स्थानिक संस्कृतीशी परिचित असलेल्या माणसालाच कळतील अशी मिथकं – हे एक समकालीन उदाहरण आनंद पाटील यांच्या लेखात आल्यावर मी ऑलमोस्ट हर्षभरित झाले होते. पण अशी उदाहरणं अपवादानं नियम सिद्ध करण्याइतकीच आहेत, हे दुर्दैव!
या सगळ्या विद्वज्जड लेखांनी दमून गेल्यावर नागनाथ कोत्तापल्ले यांची कथा वाचली आणि आधीच्या सगळ्या झटापटीचं सार्थक झालं. ‘भावना उचंबळून येणार्‍या देशात’ असं नाव असलेली ही कथा अंकाच्या विषयाला थेट ‘आज’मधून भिडते. कथानायक एक साधासरळ सरकारी कारकून आहे. जातीनं सवर्ण नसलेला. तो राहतो लहानशा तालुक्याच्या गावी. त्याला लिहिण्यावाचण्यात-इतिहासात रस आहे. बाकी कुणाच्या अध्यात-मध्यात तो नाही. त्याला रूढार्थानं प्रगती करवून घेण्याची, आर्थिक उत्कर्षाची महत्त्वाकांक्षा नाही; तशी अभिव्यक्तीची-साहित्यिक प्रसिद्धीची आसही नाही. लिहिताना-शोधताना येते तितकीच गंमत त्याला पुरेशी असलेली. त्याच्या जातीच्या रक्तलांछित इतिहासाबद्दल तो एक शोधनिबंध लिहितो आणि त्याचं आयुष्य ढवळून निघतं. सध्याच्या राजकीयदृष्ट्या ज्वालाग्राही-असहिष्णू वातावरणात त्याला ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, ते खरे आयुष्याला भिडणारे आणि मिथकांच्या अर्थाचा आणि महत्त्वाचा धांदोळा घेणारे प्रश्न आहेत. ही कथा नसती, तर या अंकाला काही वजन उरलं नसतं. (वीरा राठोड यांच्या ‘गावकुसाबाहेरची मिथके‘ या लेखाची आठवण झाली. तो या अंकात शोभेल असा लेख होता.)
उल्लेखलाच पाहिजे असा दुसरा लेख म्हणजे जयप्रकाश सावंत यांनी हरमान हेसे (योग्य जर्मन उच्चार: हेसं) आणि त्याच्या प्रकाशकावर लिहिलेला. लेखक आणि प्रकाशक यांचे संबंध किती गुंतागुंतीचे आणि खोलवर जाणारे असतात, त्याचा प्रत्यय हा लेख वाचताना पुन्हा एकदा आला. (यंदाच्याच ‘मुक्त शब्द’मध्ये त्यांनी अजून एका युरोपीय प्रकाशकाचा परिचय करून देणारा लेख लिहिला आहे. असे आणखी दोन-तीन जरी लेख त्यांच्याकडे असतील, तरी प्रकाशक या विषयावरचं एक भारीपैकी पुस्तक येऊ घातलं आहे, यावर मी पैज लावायला तयार आहे.)
समीना दलवाई यांची ‘मयत’ ही छोटेखानी कथाही मला खूप आवडली. एका मुस्लीम निवृत्त खेडूत शेतकर्‍याच्या मयतानंतरचं तटस्थ वातावरण तिच्यात रेखलेलं आहे. मयताची दोन लग्नं, चार-पाच मुलं, गावकरी, गावातलं वातावरण याचा एक तपशीलवार नि बोलका छेद घेत कथा पुढे सरकते. अजिबात काहीही न बोलता, लेखकाचा चेहरा जराही दिसू न देता केलं गेलेलं, पण बोलकं असलेलं लेखन किती दुर्मीळ असतं; ते ठाऊक असल्यामुळे तिचं अप्रूप वाटलं. समीना दलवाई या अजून काय लिहितील, अशी उत्सुकता वाटावी असं हे छोटेखानी लेखन आहे. याउलट लक्ष्मी होळेहोन्नूर यांची कथा. कथेची कल्पना तशी जुनीच आहे. उतारवयाच्या उंबरठ्यावर मुलाची चाहूल लागल्यानं भांबावलेलं एक जोडपं. बाकी सगळं ठीक आहे; पण नवरा-बायकोंमधले संवाद इतके पुस्तकी, नाटकी आणि लेखकाच्या डोक्यातले मुद्दे तसेच्या तसे टाचून लिहिल्यासारखे वाटतात की एकदम नको नको होतं. काही विशिष्ट वातावरणात मुद्दाम प्रयोग म्हणून घडवायचं चर्चानाट्य सोडल्यास पात्रांना आपापला इतिहास-भूगोल असतो आणि त्याबरहुकूम त्यांची भाषा-बोली-देहबोली रचावी-दाखवावी लागते, हे साधं सूत्र न पाळल्यामुळे वाचताना जामच कंटाळा आला.
असो.
शाहू पाटोळे यांचा दैवतांच्या उन्नयनाबद्दलचा लेख अतिशय इंट्रेष्टिंग आहे. ‘जुन्या रूढींचं उदात्तीकरण अभिप्रेत नाही; पण अभिजनांच्या संस्कृतीनं लोकसंस्कृतीवर जाणीवपूर्वक हातपाय रोवल्याचं मात्र स्पष्ट दिसतं. जर तसं झालं नसतं, तर उत्क्रांतीच्या ओघात आज कशा प्रकारची संस्कृती जन्माला आली असती, त्याबद्दल कुतूहल वाटतं,’ असं अगदी नवीन काही हा लेख नोंदतो. विवेक आणि कल्पना हे मुदलातच परस्परविरोधी असतात, असं मानल्यामुळे गोष्टींतलं तत्त्वज्ञान आपल्याला दिसत नाही. पण मिथकं हे अंतर लीलया मिटवतात. विवेकाच्या पलीकडचं, तर्काधारित स्पष्टीकरण न देता येणारं, पण अतिमहत्त्वाचं ‘काहीतरी’ – आणि समूहमनानं अंगीकारलेला नेणिवेतला तर्क एकाच वेळी कवेत घेतात – असं सांगणारा प्रशांत बागड यांचा लेखही मला आवडला-पटला-कळला! तसाच स्थानिक संस्कृतीमधली मिथकं नीट ‘आ’कळल्याशिवाय (आय नो! मी ‘पद्मगंधा’ वाचलाय, आख्खा. भाषेला थोडा तरी रंग लागेल का नाही!) अनेक सांस्कृतिक बाबी नीटशा कळणं शक्यच नाही, असं म्हणणारा आनंद पाटील यांचाही लेख कळला. पण या लेखावर संपादकीय हात फिरलेलाच नाही, हे जाणवत राहिलं. अनेक तोडकी-मोडकी, काहीशी असंबद्ध वाक्यं आणि विस्कळीतपणा हे दोष या लेखात आहेत. बाकी ग्रेसच्या कवितेतलं आदिमातेचं मिथक उलगडणारा देवानंद साबळेंचा लेख वाचनीय आहे. पण ग्रेसच्या कवितेतल्या प्रतिमा आणि त्यांना लगडून येणारी मिथकं हा इतका आवृत्त विषय आहे, की – पुनश्च असो! महेंद्र कदम यांचा ‘मराठी कादंबरीतील मिथक’ हा लेख आशेनं उघडला. पण मला तो जामच भोंगळ वाटला. शिव आणि शक्ती हे मिथक साधारणपणे कुठल्याही बाई-बुवा असलेल्या कथानकाला लागू करता येईल, असं मला तो लेख वाचून होईस्तो वाटायला लागलं होतं. दोष माझाही असेल. भूमिकन्या सीतेवरचा अरुणा ढेरे यांचा लेख अगदी अपेक्षित होता. विषय आणि शैली अशा दोन्ही अंगांनी. तो अपेक्षेबरहुकूम – शैलीमुळे वाचनीय, पण वाक्य संपतासंपता पुढच्या वाक्याचा अंदाज येत गेल्यामुळे आणि तो बरोबर ठरल्यामुळे थोडा कंटाळवाणा – असा झाला. ते ठीकच. पण माधवी भट यांनी सही-सही अरुणा ढेर्‍यांच्याच शैलीत, त्यांच्याच कवितेमधलं मिथक समजावून सांगण्यात काय मजा होती?
जाऊ द्या, झालं.
Uncategorized

परिवर्तनाचा वाटसरू

– रमताराम

दोन-अडीच वर्षांपूर्वी ‘गुजरात मॉडेल’ हा शब्द आज पंतप्रधान असलेल्या मोदींच्या दृष्टीने परवलीचा बनला होता. केंद्रातील सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना, ‘आम्ही नुसतेच बोलत नाही, हे पाहा करून दाखवले!’ असे म्हणत गुजरातमधील खर्‍या-खोट्या प्रगतीच्या तपशिलांचा भडिमार तेव्हा भारतीय नागरिकांच्या तोंडावर केला जात होता. त्यातील तथ्य-मिथ्याबद्दल राजकारणातील दोन बाजू आणि त्यांचे पगारी तसेच बिनपगारी समर्थक यांच्यात सतत धुमश्चक्री होत होती, होते आहे. पण हे गुजरात मॉडेल म्हणजे नक्की काय, त्याचा त्या राज्यावर नक्की परिणाम काय झाला, जगण्याच्या विविध पैलूंबाबत त्याने काय बदल घडवले, परिस्थिती नि माणसे कशी आणि किती बदलली याचा साक्षेपी वेध अद्यापपर्यंत कुणी घेतलेला दिसत नाही. कदाचित हीच कमतरता भरून काढण्यासाठी सामाजिक-राजकीय विषयांना वाहिलेले एक महत्त्वाचे पाक्षिक ‘परिवर्तनाचा वाटसरू’ त्यांच्या दिवाळी अंकात ‘बदलता गुजरात’ हे सूत्र घेऊन त्या राज्याची विविधांगी वेध घेते आहे. (याच मालिकेतील आणखी काही लेख पुढील अंकातून येणार आहेत असे सांगण्यात आले आहे.) तोच त्या अंकाचा महत्त्वाचा भाग मानायला हवा.
जरी हे फीचर त्या अंकाचा गुरुत्वमध्य असले, तरी त्यात आलेले सगळे लेख काही सारख्या अथवा उत्तम दर्जाचे आहेत असे मात्र म्हणता येत नाही. उना आंदोलनातून पुढे आलेल्या जिग्नेश मेवानी या नेत्याची मुलाखत हा त्यातील सर्वांत आवर्जून वाचण्याजोगा लेख. २०१४च्या सत्तांतरानंतर देशाच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात बरीच उलथापालथ होते आहे. त्यातून काही नवे तरुण नेतृत्व उभे राहताना दिसते. गोवंशहत्याबंदी कायद्याचे हत्यार हाती घेऊन धुमाकूळ घालणार्‍या स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांनी जेव्हा आपल्याच समाजातील काही घटकांना लक्ष्य केले, तेव्हा त्यातून उफाळलेल्या विद्रोही प्रतिक्रियेचा चेहरा म्हणून जिग्नेश मेवानी समोर आला आहे. एका बाजूने नवे विरोधी राजकीय नेतृत्व हे सत्ताधार्‍यांइतकेच कृतीपेक्षा घोषणाप्रधान असताना जिग्नेश यांचा जो चेहरा समोर येतो आहे, तो अधिक आश्वासक दिसतो. आजच्या वास्तवाची जाण, व्यवहार्यतेचे भान आणि आजवरच्या विद्रोहाचे, इतिहासाचे नेमके आकलन असलेला नेता म्हणून जिग्नेश या मुलाखतीद्वारे समोर येतो. सतत विद्रोहाच्या पोकळ डरकाळ्या फोडणार्‍या किंवा आपल्या सत्तातुरतेला समाजाच्या उत्थानाचे अस्तर लावून हिंडणार्‍या स्वार्थी नेत्यांच्या प्रभावळीतून असा भानावर असलेला नेता जर वंचितांसमोर येत असेल तर ते स्वागतार्हच म्हणावे लागेल.
या विभागातील पहिले पान गुजरातमधे राहून तथाकथित गुजरात मॉडेलचे वास्तव अधिक जवळून पाहिलेले आणि पुरस्कारवापसी अभियानातून बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीविरोधात प्रथम आवाज उठवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्यिक, समीक्षक गणेश देवींना देण्यात आले असले तरी जेमतेम दोन पानांच्या त्या मजकुरातून  नव्याने काही मिळाले नाही. एक सर्वसाधारण आढावा इतकेच त्याचे स्थान म्हणावे लागेल.
ईप्सिता चक्रवर्तींनी पाटीदार आंदोलनासंदर्भात घेतलेली घनश्याम शहांची मुलाखत फारच त्रोटक वाटली.  त्यातील एक मुद्दा मात्र आवर्जून नोंद करण्याजोगा आणि तो म्हणजे ‘सरसकट आर्थिक निकषांवर आरक्षण’ किंवा ‘गरिबांसाठी आरक्षण’ या मुद्द्याचा त्यांनी आकडेवारीनिशी केलेला प्रतिवाद. असे आरक्षण अंतिमतः पुन्हा उच्चजातीयांनाच साहाय्यभूत ठरते आणि आरक्षणातील सामाजिक न्यायाचा मूळ हेतूच बाधित होतो हे पुरेसे स्पष्ट होते. (किंबहुना अलीकडे देशभरात उच्चजातीयांनी चालू केलेल्या आरक्षण मागणी आंदोलनाचा मूळ हेतू असे घडावे हाच आहे असे म्हणता येऊ शकते.) परंतु यात हार्दिक पटेलसारखे तरुण – अगदी नवथर म्हणावे इतके तरुण – नेतृत्व, त्यामागची संभाव्य कारणे, जुन्या नेतृत्वाने पुढे न येणे  अथवा कालबाह्य होणे; कदाचित महाराष्ट्रा मराठा आंदोलनातही जुन्या नेतृत्वाने कटाक्षाने दूर राहणे याच्याशी लागणारी संभाव्य संगती इ. बाबतीत अधिक ऊहापोह व्हायला हवा होता असे वाटले.
गुजरातमधील निवडणुका; त्यांचा इतिहास; दीर्घकाळ सत्तेवर मांड ठेवून असलेल्या भाजपाचे, तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे मतपेटीमार्फत मिळालेले यशापयश या सर्वांचा आकडेवारीसह घेतलेला लेखाजोखा दर्शन देसाईंच्या लेखात सापडतो. सामाजिक घटना, राजकीय भूकंप, शह-काटशह, नैसर्गिक आपत्तींचे परिणाम अशा विविध घटकांचा मतपेटीवर झालेला परिणाम त्यांनी रोचकपणे मांडला आहे. ज्यांना बेफाट विधाने करण्यापेक्षा आकडेवारीच्या नि अर्थनिर्णयनाच्या आधारे केली जाणारी मांडणी अधिक आवडते, त्यांनी तो आवर्जून वाचावा.
Communal Violence, Forced Migration and the State: Gujarat since 2002 या संजीवनी बाडीगर-लोखंडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा काही अंश शैलेश जोशी यांनी अनुवादित केला आहे. २००२ साली झालेल्या धार्मिक दंगलींनंतरच्या जगाचा मागोवा घेणारे हे पुस्तक नक्कीच एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे याची चुणूक त्या प्रस्तावनेच्या या भागातून पुरेपूर मिळते आहे. तात्कालिक कारणाचा दोष नक्की कुणाचा हा प्रश्न वादग्रस्त असला, तरी नंतरच्या परिणामांबाबत तेवढी संदिग्धता मुळीच नाही. सदर घटनेतून मुस्लिम समुदायाचे झालेले घेट्टोकरण आणि त्यानंतर सामाजिक राजकीय बदलांतून झालेले औद्योगिक फेरबदल इत्यादिंचा साक्षेपी आढावा प्रस्तावनेच्या या भागातून पुरेसा स्पष्टपणे मांडला गेला आहे.
या अतिशय महत्त्वाच्या लेखाचा एक मोठा दोष म्हणजे अत्यंत विद्वज्जड भाषा. मी काही लिहितो, तेव्हा ‘प्राज्ञ मराठी लिहितोस. जरा सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहीत जा.’ असा सल्ला मला अनेकदा मिळतो. माझ्यासारख्या आरोपीलाही ही भाषा अनावश्यक जड आणि नि केवळ त्या कारणानेच वाचकाला लेखापासून दूर ठेवू शकेल अशी वाटते यावरून काय ती कल्पना यावी. एखाद्या अभ्यासपूर्ण पुस्तकाची भाषा नि लेखाची भाषा यात फरक असायला हवा. उदाहरणच द्यायचे तर ‘अंतःस्थ/बहिर्गत द्विविभाजन’, ‘प्रतिमानक विकास’, ‘बृहद्-सिद्धांत’, ‘अनुभविक दाखले’ असे शब्द खडयासारखे त्रास देतात. मूळ लेखन जरी अभ्यासपूर्ण असले, तरी लेखस्वरूपात त्याचा अनुवाद करताना त्याचे भान ठेवून सोपे प्रतिशब्द निवडण्याची, ते नाही जमले तर मूळ इंग्रजी शब्दही सोबत देण्याची काळजी घ्यायला हवी होती.
भाषेच्या राजकारणासाठी केलेल्या वापरावरचा नरेंद्र पंजवानींचा लेख ठाकठीक. एखादा अपवाद वगळला, तर त्यावर आवर्जून लिहावे असे फार नाही.
मुख्यतः गुजरातमध्ये, पण एकुणात भारतातीलच, सिंहाच्या विस्तारा-विहाराबद्दलचा महेश रंगराजन यांचा ‘गीर अभयारण्यातील सिंह’ हा लेख अतिशय अभ्यासपूर्ण. तळटिपा, संदर्भ यांसह लिहिलेला हा लेख तसा अकॅडेमिकच आहे. वन्यजीवांचा अभ्यास करत असताना निसटणारे  काही मुद्दे त्यांनी नोंदवले आहेत. तेव्हा हा लेख अभ्यासकांसाठीच आहे.  याबाबत दोन प्रश्न पडले. एक म्हणजे गीर हा गुजरातचा भाग आहे, तेव्हा हा लेख गुजरातच्या एका पैलूबाबत आहे हे मान्यच. सिंहांच्या वाटचालीबद्दल आहे हेही मान्य. परंतु तरीदेखील ‘बदलता’ या शीर्षकाला अनुसरून यात काही आहे असे म्हणता येईल का याबद्दल मला शंका आहे. त्या अर्थी या गटात त्याचा समावेश जरा आश्चर्यकारक आहे. आणखी एक दोष म्हणजे इतके संदर्भ आणि टिपा असूनही काही विधाने बेधडक येतात; इतकेच नव्हे, तर त्यांचा मागच्या पुढच्या मजकुराशी नक्की संबंध काय असा प्रश्न पडतो. कदाचित लेख मोठा असल्याने क्रॉस-रेफरन्सिंग असेल, नि म्हणून एका वाचनात ध्यानात आले नसेल ही शक्यताही आहे.
या शिवाय गुजरातच्या चित्रपटसृष्टीबद्दल, बुधन नाट्यचळवळीबद्दलचे लेखही यात समाविष्ट केले आहेत. याशिवाय ‘हे पुस्तक तुम्हांला का लिहावंसं वाटलं?’ या सुमार प्रश्नाने सुरुवात झालेली, अपेक्षेप्रमाणे उरलेल्या मजकुरातही फारशी उंची गाठण्याचा प्रयत्न न केलेली, ‘The Political Biography of An Earthquake’ या पुस्तकाचे लेखक एडवर्ड सिम्प्सन यांची आतिश पटेल यांनी घेतलेली मुलाखत केवळ सामान्यच नव्हे; तर न वाचली तरी चालेल अशी.
या अंकाचा सर्वाधिक महत्त्वपूर्ण भाग आहे ती अंकात सर्वांत प्रथम छापलेली आयन रँड या लेखिकेची ‘अँथम’ ही लघुकादंबरी – तिचा नितीन साळुंखे यांनी केलेला भावानुवाद. काही वैयक्तिक अनुभवांमुळे कट्टर कम्युनिस्टविरोधक असलेली आयन रँड साहित्यिकांना ठाऊक आहे; ती तिच्या ‘फाउंटनहेड’, ‘अ‍ॅटलाश श्रग्ड’, ‘वी द लिविंग’ या दीर्घकादंबर्‍यांमुळे. टोकाची व्यक्तिस्वातंत्र्यवादी असलेली आणि ‘कॅपिटॅलिजम, द अननोन आयडियल’ आणि ‘कम्युनिजममधे दोष नाहीत, कम्युनिजम हाच दोष आहे’ असे म्हणणारी ही लेखिका प्रामुख्याने तिच्या कम्युनिजम नि कम्युनिस्ट यांना असलेल्या विरोधामुळेच अमेरिकेत अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. पण त्यापलीकडे तत्त्वविचारावर आधारित लेखन करणारी आणि ‘ऑब्जेक्टिविजम’ या नव्या विचारव्यूहाचा पाया घालणारी ही लेखिका एकोणिसाव्या शतकातील एक महत्त्वाची लेखिका मानली जाते.
जॉर्ज ऑर्वेलने सर्वंकश एकाधिकारशाहीच्या विरोधात लिहिलेली ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी त्या वेळी सोविएत युनिअनच्या प्रयोगामुळे भरात असलेल्या कम्युनिस्टांच्या विरोधातील मानली गेली; त्याच्या नेमके उलट रँडच्या ‘अँथम’बद्दल घडते आहे. मुळात तथाकथित एकांगी कम्युनिस्ट मॉडेल समोर ठेवून तिने लिहिलेली ही टीका, तिच्याही नकळत धर्मसंस्थेवरची टीका म्हणूनही समोर आली आहे. याला कारण त्यात तिच्या कम्युनिस्टविरोधापेक्षाही तिचा व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह अधिक ठळक आहे. आणि साहजिकच स्वहितासाठी समाजाचे एकसाचीकरण करू इच्छिणार्‍या कोणत्याही व्यवस्थेला असा आग्रह बाधक ठरत असतो. धर्मसंस्था ही अशा प्रकारची, आजही अस्तित्वात असलेली सर्वात जुनी व्यवस्था आहे. जगण्याचा योग्य मार्ग एकच आहे, तो आम्हांलाच सापडला आहे आणि तुमचे उत्थान केवळ ही वस्तुस्थिती स्वीकारण्यानेच होणार आहे असे मानणारे या धर्मसंस्थेचे हस्तक जेव्हा प्रबळ होतात; तेव्हा व्यक्तिस्वातंत्र्याचा होत जाणारा संकोच, त्यातून मावळत जाणार्‍या नवनिर्मितीच्या शक्यता, सर्जनशीलतेपेक्षा आज्ञाधारकतेला आलेले महत्त्व, गुणवत्तेपेक्षा संख्याबलामुळे वा जन्मबलामुळे अधिकारी होऊन बसलेले खुजे लोक, त्यातून अधःपाताकडे जाणारा समाज आणि त्याविरोधात ताठ उभे राहण्याचा एका व्यक्तीने केलेला प्रयत्न, त्यासाठी परागंदा होण्याचा पत्करलेला पर्याय… या मार्गाने जाताना ही कादंबरी अशा वास्तवाचे अनेक पैलू उलगडून दाखवत जाते. किंबहुना कादंबरीच्या कथनापेक्षाही इंग्रजीत ज्याला ‘एक्स्ट्रपोलेशन’ म्हणतात – किंवा ढोबळपणे मराठीत आपण ज्याला ‘रेघ लांबवून घेतलेला वेध’ असे म्हणू शकतो – तसा हा वेधच अधिक लक्षणीय. तो तिचा ‘यूएसपी’ म्हणायला हवा. एरवी कादंबरीचा शेवट फडके-खांडेकर पठडीतला, रँड यांच्या दृष्टीकोनाला अजिबात न शोभणारा.
इमेल : ramataram@gmail.com
Uncategorized

अपेक्षापूर्तीची ‘मौज’
– सन्जोप राव

‘छापील दिवाळी अंकाचे भविष्य काय?’ या विषयावर दिवाळीत एका मित्राशी बोलत असताना तो म्हणाला की बहुधा छापील दिवाळी अंक आपल्या पिढीबरोबर संपणार. याचे कारण म्हणजे नव्या पिढीला हाडामासांच्या पुस्तकांशी फारसे काही देणेघेणे नाही. दिवाळी अंकांशी तर नाहीच नाही. (ते खरेच आहे. माझे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थीही “अमुक पुस्तकात हे आहे, हे वाचा.” असे म्हटल्यावर “लेकिन वो नेटपे कहां है?” असं विचारतात.) दुसरं असं की दिवाळी म्हणजे धम्माल, एन्जॉय, पडे रहो असल्या कल्पना घेऊन जगणाऱ्यांची मांदियाळी असल्यामुळे विचार करायला लावणारे, कदाचित काहीसे अस्वस्थ करणारे दिवाळी अंक वाचणार कोण? वाचनाने मनोरंजन व्हावे हे खरे, पण मनोरंजन हे वाचनाचे एकमेव उद्दिष्ट आहे का? मी तुम्हांला डिस्टर्ब केलं का?” असं तेंडुलकरांना विचारल्यानंतर “आपण सगळ्यांनी एकमेकांना सतत डिस्टर्ब करत राहिलं पाहिजे.” असं ते म्हणत असत. वाचकाच्या मेंदूला, बुद्धीला चालना देणे हेच वाचनाचे अधिक महत्त्वाचे उद्दिष्ट असावे की नाही? ‘ऐन दिवाळीत, सणाच्या दिवशी कशाला हे असलं डोक्याला ताप देणारं काही कशाला वाचायचं?’ या विधानाचा तर मला अर्थच समजत नाही. पण काही दिवाळी अंकांकडून कायम अपेक्षा असतात. ‘मौज’ हा तसाच एक अंक. ज्या अंकाची मुद्दाम वाट बघावी असा हा अंक असतो.

त्यातला विनया जंगलेंचा लेख मी नेहमीच सगळ्यात आधी वाचतो. जंगलेंचे लेखन मला नेहमीच आवडते. पशुवैद्यक या व्यवसायात काम करणाऱ्या जंगलेंसारख्या स्त्रिया फारच कमी आहेत. या पेशात काम करत असताना आलेले अनुभव विनया जंगले फार ओढीने लिहितात. पक्षी, प्राणी, निसर्ग यांच्यावर त्या सहृदयतेने पण वस्तुनिष्ठपणाने लिहितात. त्यांच्या लिखाणात गहिवर आलाच तर तो अस्सल असतो. या वर्षीच्या ‘मौजे’त जंगलेंनी ‘कथा फुलपाखरांची’ हा फुलपाखरांवरचा दीर्घ लेख लिहिला आहे. तांत्रिक स्वरूपाच्या लिखाणातल्या या लेखनात त्या रॉबर्ट फ्रॉस्ट आणि भा. रा. तांबेंचा उल्लेख करतात, हा कदाचित craftsmanshipचा भाग असेल; पण फुलपाखरांच्या स्थलांतराच्या अभ्यासाने झपाटलेल्या फ्रेड आणि नोरा यांचा उल्लेख करताना जंगले यांनी लिहिले आहे, ‘फुलपाखरं कुठं जातात हे कळल्यानं काही आपल्याला पैसे मिळणार नाहीत किंवा आपण काही श्रीमंत होणार नाही; पण तरीही ही फुलपाखरं नेमकी कुठं जातात एवढंच त्यांना शोधायचं होतं’. ‘Because it is there’ ची आठवण करून देणारं हे वाक्य मला खूप जरीपदराचं, किनखापी वाटलं. एकूणच हा लेख जंगले यांच्या इतर लेखांप्रमाणे खानदानी झाला आहे. मराठी लिखाणात अमराठी शब्दांचा वापर अगदी अत्यावश्यक असेल तरच करावा असे माझे (जुनाट आणि कालबाह्य झालेले) मत आहे. त्यामुळे ‘कढीलिंब’ हा मराठी शब्द उपलब्ध असताना जंगले यांनी ‘कढीपत्ता’ हा शब्द का वापरला असावा याचे मला नवल वाटले. तसे मी त्यांना विचारलेही. कढीपत्ता हाच शब्द त्यांच्या भागात प्रचलित आहे असे त्या म्हणाल्या. असेलही. (याच अंकातल्या आशा बगेंच्या ‘अदृश्य’  या (संपूर्ण निराशा करणाऱ्या) कथेत ‘टोकणे’ हा शब्द आहे. (पुढे बाळ फोंडके यांच्या लेखात ‘खिलवाड’ हा तसाच टोचून जाणारा शब्द आहे.) बगे यांच्या कथेत असे नागपुरी ढबीचे (देशावरच्या लोकांना अमराठी वाटणारे)  शब्द असतातही. भाषेची वाढ अशीच होते की काय कुणास ठाऊक. बगे यांची ही कथा अगदी सामान्य, अगदी या  अंकातून  ‘अदृश्य’ झाली असती तर बरे, असे वाटण्याइतपत सामान्य, आहे. वास्तविक बगे या माझ्या आवडत्या लेखिका. (‘रुक्मिणी’!) पण या कथेने मला साफ निराश केले. असो, हे विषयांतर झाले.) जंगले यांच्या या देखण्या लेखाला त्यांच्याच शेवटच्या तीन परिच्छेदांचे गालबोट लागले आहे. ‘फुलपाखरांनी मला काय शिकवलं? त्यांच्याकडून मी काय घेतलं?’ अशा धर्तीचे ते किंचित दवणाळलेले परिच्छेद आहेत. ‘प्रत्येक गोष्टीतून मी काय शिकलो, आपण काय घ्यावे, जगातल्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या गोष्टी कायम आपल्याला काहीतरी शिकवत कशा असतात,’ असल्या सानेगुरुजी छापाचे आचरट लेखन करणाऱ्या; ‘पालींकडून काय शिकावे, निवडुंगाकडून काय शिकावे, झुरळांकडून काय घेता येईल,’ असले सतत लिहिणाऱ्या एका प्रसिद्ध लेखकाची आठवण करून देणारे हे तीन परिच्छेद जंगले यांनी गाळले असते; तर बरे झाले असते असे मला वाटले. तरीही एकूण अपेक्षापूर्ती करणारा (आणि ‘मौजे’कडूनच प्रसिद्ध होणाऱ्या जंगले यांच्या समग्र लेखांच्या पुस्तकाची वाट पाहावी असे वाटायला लावणारा) विनया जंगले यांचा हा लेख आहे.
चंद्रमोहन कुलकर्णी यांचा ‘दे दान’ हा लेख/कथा/अनुभव – जे काही आहे ते – मला महत्त्वाचे वाटले. याचे पहिले कारण म्हणजे त्यातील भाषा. ही भाषा एका चित्रकाराची आहे. चित्रकाराचे निरीक्षण सामान्य माणसांपेक्षा चांगले, वेगळे असते. सामान्यांच्या नजरेतून सहज सुटून जातील असे बारीकसारीक तपशील चित्रकाराला हुबेहूब टिपता येतात. चित्रकाराच्या लेखनातून त्याच्या (आणि वाचकाच्याही) नकळत एक पोर्ट्रेट तयार होत असते. ( उदाहरणार्थ : ‘सारवलेल्या स्वच्छ घरात प्रवेश करावा तसे धारवाडमध्ये शिरताना वाटले. सकाळची पिवळी उन्हे नुकती कुठे गावावर डोकावून पाहायला लागली होती. धारवाडात शिरताना चुना फासलेल्या पांढऱ्या बैठ्या घरांच्या भिंती, छोट्याशा बागा, सुळकांडी मारून वर गेलेले नारळाचे झाड…’ – सुभाष अवचट.) भय्यासाहेबांच्या मुलांमध्ये आणि काशिनाथ घाणेकरांमध्ये लेखकाला प्रथमदर्शनीच आढळणारे साम्य, पुरवण्यांच्या चित्रांचे तपशील, दीर-भावजय नात्यांचे त्या काळातले वेगळे संदर्भ हे सगळे वाचताना लेखकाच्या मागे उभा असलेला चित्रकार दिसतोच.  त्यातून चित्रकाराच्या व्यवसायानिमित्त त्याला जी भाषा वापरावी लागते, तिच्याही छटा त्याच्या लेखनात येतात. क्वार्टर साईजचे ड्रॉइंग पेपर्स, ब्लॅक आणि इतर कलर्सच्या (काळ्या आणि इतर रंगांच्या नव्हे!) बाटल्या, ब्लॅक आणि व्हाईट फोटो वगैरे अशी काही उदाहरणे. दुसरे असे, की गुरूबाबत शक्यतो चांगलेच, आणि जमले तर घसा भरून आणूनच, बोलायचे असा दंडक असल्यासारख्या लिखाणांच्या मांदियाळीत कुलकर्णी यांनी भय्यासाहेबांचे वस्तुनिष्ठ वर्णन केले आहे. त्यांच्या बारीकसारीक गुणदोषांसकट. मला हा त्यांच्या लिखाणाचा विशेष वाटला. वस्तुत: त्यांनी साताठ पाने रंगवलेला अनुभव, तसा बघायला गेला तर सामान्यच आहे; पण त्यातल्या बारकाव्यांनी तो वाचनीय झाला आहे. पण या सगळ्या लेखातले मला काय आवडले म्हणाल, तर ते लेखकाच्या वडिलांचे, नानांचे पात्र. पोलीस लायनीत, दोन खोल्यांच्या जागेत राहणारे नाना ताठ कण्याचे आहेत. “तुला हवं ते शीक, हव्या त्या साइडला जा, चित्रं काढ हवी तेवढी, मोठा चित्रकार हो. सगळं शिक्षण करीन मी तुझं, आणि तेपण सगळी फी भरून…!” असे त्या काळात सांगणाऱ्या या माणसाचे लेखकावर (आणि आपल्यावरही) खूप उपकार आहेत, असे मला वाटले. अशा सुंदर लेखातल्या त्रुटी कशासाठी काढायच्या? पण छिद्रान्वेषी मन ते करतेच. ‘नं’ हा या लेखातला शब्द मला खटकला. अगदी खांडेकरांची उपमा घेऊन लिहायचे, तर नाजूक काचसामानाच्या दुकानात बैल शिरावा तसे वाटले. ‘नं’ हा शब्द बोलीभाषेतही मला खटकतो. पण आता तो माझाच दोष असला पाहिजे या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. असो.
‘आप्पांच्या आठवणी’ हा रवींद्र अभ्यंकरांचा लेख म्हणजे – त्यांच्याच शब्दांत लिहायचे तर – ‘ही सर्व भावनिक बंधने असतात – मानणाऱ्यांसाठी!’ असा आहे. कसल्यातरी वेडाने झपाटलेल्या अशा लोकांच्या वर्तनात आणि विचारांत सुसंगती शोधू नये हे मान्य, पण सिंधुदुर्गावरुन काढून आणलेल्या महाराजांच्या पायाच्या ठशाच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या प्रतिकृतीला तीन वेळा मुजरा करूनच तो लोकांना दाखवणे हे जरा जास्तच होते असे मला वाटले. यावरून आठवले, ‘अनुभव’ या पुस्तकात बासू भट्टाचार्य यांनी इंदिरा गांधी यांच्यावर करावयास घेतलेल्या माहितीपटाची कथा सांगितली आहे. बाई घरात चालत असताना त्यांना जवाहरलाल की मोतीलाल यांच्यापैकी कुणाच्या तरी तसबिरीवर धूळ दिसते आणि त्या जाता-जाता ती धूळ पुसतात असा तो प्रसंग होता. तो कळल्यावर इंदिराबाई फडके आणण्यासाठी वळल्या. बासुजींनी त्यांना सूचना केली, की ती धूळ त्यांनी आपल्या पदराने पुसावी. त्यावर इंदिराबाई म्हणाल्या, की मला आदर आहे तो या तसबिरीबद्दल, तिच्यावरच्या धुळीबद्दल नाही. धूळ ही मी धूळ पुसायच्या फडक्यानेच पुसणार. वैचारिक स्पष्टता असावी तर ती अशी. अर्थात यावर आदर त्या व्यक्तींबद्दल, मग तसबिरीचे तरी काय महत्त्व, असा प्रश्न उपस्थित करता येईलच. पण तेही असो. आप्पांबद्दलचा लेख म्हणजे आधी ओवाळण्यासाठी तबक सजवायचे आणि मग कुणाला ओवाळायचे हे हुडकत बसायचे असे केल्यासारखा वाटला.
अरुण टिकेकरांबद्दल बऱ्याच दिवाळी अंकांत बरेच काही लिहून आले आहे. ‘विवेक पेरणारे गुरू’ या शुभदा चौकर यांच्या अशाच एका उत्तम लेखातल्या दोन गोष्टींचा मला विशेष उल्लेख करावासा वाटतो. टिकेकर (आणि कदाचित टिकेकरांचे लेखन) हे लोकाभिमुख संपादक नव्हते असा त्यांच्यावर आरोप केला जातो. म्हणजे काय? तर थोडक्यात म्हणजे; बातम्या असोत, संपादकीय असो की ललित लेखन असो, सगळ्याचे सोपे, सुलभ आणि बाळबोध ‘प्रीडायजेस्टेड फॅरेक्स’ करून वाचकाला भरवणाऱ्यांपैकी ते नव्हते. ते योग्यच आहे. वाचायचे आहे ना, मग घेऊ देत लोकांना थोडे कष्ट, शिणवू देत थोडासा मेंदू! आवडले तर ठीक, नाही आवडले तर तसा विचार करून, नेमकेपणाने सांगा – (जुनी उपमा : झेब्रा आवडला नाही तर तसे सांगा, ‘हा कसला पट्ट्यापट्ट्याचा उंट?’ असे म्हणू नका!) हा टिकेकरांचा विचारप्रवाह म्हणजे त्यांच्या वैचारिक परिपक्वतेचे द्योतक आहे असे मला वाटते. दुसरे म्हणजे शब्दांच्या नेमकेपणाबद्दल त्यांचा असलेला आग्रह. याबाबत लेखिकेने prepone या शब्दाच्या वापराचे उदाहरण दिले आहे. या शब्द म्हणजे postpone चे सोयीस्कर भारतीयीकरण केलेले रूप आहे असे मलाही वाटत होते. त्यामुळे हा शब्द वापरू नये (neck to neck competition, demotivation, momento, dais यांप्रमाणे) टिकेकरांनी असा शब्दच अस्तित्वात नाही हे २००२ सालाच्या आसपास त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले होते. (त्यानंतर २०१० साली ऑक्सफर्ड  डिक्शनरीत त्या शब्दाची भर पडली ही या लेखातून मिळालेली नवीन माहिती.)
सय्यद हैदर रझा यांच्याबद्दलचा प्रभाकर कोलतेंचा लेख या अंकात आहे, यापलीकडे मला त्यावर काही लिहिताच येणार नाही. आपल्या चित्रांबद्दल त्यांनी म्हटलेले ‘दृष्टी-संवेदना आणि दृष्टी-सुख जिथे सुरू होते आणि विलय पावते त्या नग्न दृक्‌-संवेदनेला मला माझ्या चित्रांतून भेटायचं आहे’ हे वाक्य मी पन्नास वेळा वाचले आणि शेवटी ‘आपला घास नव्हे’ असे म्हणून पुढे गेलो.
‘बगदादपर्व’ हा श्रीरंग भागवतांचा लेख हा या अंकाचा एक high point आहे. बगदादमध्ये १९८३ ते १९८५, म्हणजे सद्दाम हुसेन राजवटीच्या सुवर्णकाळात, ओबेरॉय ग्रूपतर्फे बगदादमध्ये चालवण्यात येणाऱ्या एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करण्याचे हे लेखकाचे अनुभव आहेत. या हुकूमशहाच्या मनमानी कारभाराची, दहशतीची आणि क्रौर्याची एकूण समाजावर पडलेली अस्पष्ट पण तीव्र पडछाया या संपूर्ण लेखात जाणवत राहते. आपल्याबरोबर काम करणारा, ज्याच्याशी कदाचित थोडेसे मैत्रीचे संबंध आहेत असा, एखादा माणूस अचानक चक्क गायब होतोआणि त्याबाबत कुठेही, काहीही बोलायचीदेखील सोय नाही ही घुसमट काय असू शकेल या कल्पनेनेही मला चरकायला झाले. ‘इफ देअर इज अ पर्सन, देअर इज डेफिनेटली अ प्रॉब्लेम. रिमूव्ह द पर्सन ऍंड ऑल द प्रॉब्लेम्स आर ओव्हर.’ हे स्टालिनचे वाक्य प्रमाण मानणाऱ्या सद्दाम हुसेनला फाशी देतानाची चित्रफीत बघून मला कसेसेच वाटले होते (अजूनही वाटते). हा असला न्यायनिवाडा करण्याचा अमेरिकेला काय अधिकार असे वाटले होते (अजूनही वाटते). भागवतांचा हा लेख वाचून त्या वाटण्याची धार थोडी कमी झाली असे मला वाटले. आपल्या सैन्यातून ‘पळून गेलेले’ सैनिक असा खोटा आरोप कोर्टात (!) सिद्ध करून घेऊन कैक निरपराध लोकांना सार्वजनिक ठिकाणी दगडांनी ठेचून मारणे काय किंवा आपल्या मुलीच्या वाढदिवसाला कापला जाणारा केक ज्या आचाऱ्याने केला आहे त्याला – तो केक ‘फूड टेस्टर’ला खायला देऊन त्यात काही विष वगैरे नाही ना याची खात्री करून घेईपर्यंत – बांधून ठेवणे काय, सगळेच मला अतर्क्य आणि अनाकलनीय वाटले. मानवतेला काळिमा फासणारे वगैरे तर वाटलेच.
मानवी मन, मेंदूचे कार्य, त्याचे कार्य, सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता या विषयांवर बाळ फोंडके यांचा ‘प्रतिभा वेध’ आणि सुबोध जावडेकर यांचा ‘युरेका क्षण आणि सर्जनशीलता’ हे दोन अप्रतिम लेख या अंकात आहेत. ज्यांना या विषयांत रस नाही त्यांना हे लेख फारच लांबलचक आणि कंटाळवाणे वाटू शकतील. मला बाकी या दोन्ही लेखांनी गुंतवून ठेवले. मानवी सर्जनशीलतेचे नेमके रहस्य काय? ती जेनेटिक-जनुकीय घटकांवरच अवलंबून असते की इतर कशांवर? बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेचे समीकरण प्रत्येक वेळी जुळतेच असे नाही. मग बुद्धी कशाला म्हणायचे आणि सर्जनशीलता कशाला? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न फोंडके यांच्या लेखात आहे. आईनस्टाईनचा मेंदू त्याच्या मृत्यूनंतर काढून घेण्यात आला आणि त्याचा अभ्यास केला गेला इतपत ढोबळ माहिती आपल्याला असते. पण याचा सविस्तर वृत्तान्त फोंड्के यांच्या या लेखात आहे. बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेचा आधार जर जनुकीय असेल; तर अभूतपूर्व बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांची पुढची पिढी  सामान्य, सुमार बुद्धिमत्तेची, प्रसंगी मतिमंद किंवा गतिमंद कशी हा प्रश्न विज्ञानाच्या अभ्यासकांना कोड्यात टाकतो. ज्या पर्यावरणात माणसाची वाढ झाली आहे त्यावरही माणसाची बुद्धिमत्ता अवलंबून असते, डावा मेंदू किंवा उजवा मेंदू प्रबळ असणाऱ्या लोकांचे प्रतिभाविष्कार वेगळे असतात हा भ्रम आहे, टोकदार सर्जनशीलता आणि प्रतिभा असणारे लोक आपल्या मेंदूतील चेतापेशींचं जाळं सततच्या वापरातून कार्यरत ठेवत असतात (म्हणजे ‘1% inspiration and 99% perspiration’ हे वपुटलेले वाक्य खरेच आहे म्हणायचे!) आणि एकलकोंडेपणा, मानसिक अस्वास्थ्य, थोडासा विक्षिप्तपणा हे सर्जनशीलतेसाठी गरजेचेच आहेत हे सगळे फोंडके यांच्या लेखात सोदाहरण आणि अत्यंत रंजक पद्धतीने मांडले आहे. मेंदूचा डावा भाग तर्कसंगत चिकित्सा करत असतो, त्यामुळे ज्यांच्या मेंदूच्या डाव्या भागाला तात्पुरती इजा झाली होती अशा लोकांना तर्कसंगत विचारांच्या काचातून सुटका झाल्यासारखे वाटते आणि एका असीम मोकळेपणाची, आनंदाची अनुभूती येते हे तर मला फारच रोचक वाटले. (पुढेमागे मेंदूच्या डाव्या भागाला किंचित लुळे करून अशा भराऱ्या मारण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल काय?) जाताजाता फोंडके कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिच्या मर्यादा यावर काही मनोरंजक भाष्य करून जातात. अशा सोन्यासारख्या लेखाचा शेवट ‘मगदुरानुसार’च्या ऐवजी ‘मगदुमानुसार’ (मगदूम हे आडनाव असते हो!)  या  मुद्रणदोषाने व्हावा हे मला फारच ‘हर हर शिव शिव वाटले. असो.
मानवी सर्जनशीलता याच विषयावरचा जावडेकरांचा या अंकातला लेखही असाच रंजक आहे. कदाचित थोडासा कमी क्लिष्ट आणि अधिक रंजक. त्यामुळे या दोन्हीं लेखांमधल्या माहितीची पुनरावृत्ती खटकत नाही. बहुतेक सर्व प्रतिभावंतांचे मन पटकन विचलित होऊ शकते, सर्जनाला बंधनांचा जसा जाच होतो, तसा दुनियेच्या गजबजाटाचाही होतो (म्हणूनच हल्ली लेखकाचा लेखकराव झालेले एक प्रतिभावंत तंतोतंत कायम निव्वळ रात्रीच लिखाण करत असावेत काय?) आणि मुख्य म्हणजे प्रतिभेचे, सर्जनशीलतेचे कारंजे व्यवहाराचा पृष्ठभाग फोडून कधी उसळी मारून वर येईल हे सांगता येत नाही, त्यासाठी सर्जनशीलता वाढवायची असेल तर मुद्दाम प्रयत्न करत राहिले पाहिजे, चुका करत राहिले पाहिजे (आणि फ्रॅंक बंकर गिल्ब्रेथ  म्हणतो तसे ‘आणि तुमचे मन त्यातच गुंतले असेल तर एखादा पेग घ्यायचा!.’ चेष्टा नाही, माफक मद्यपानानेही सर्जनशीलता वाढते असेही २०१२ साली शिकागो विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे!) असे जावडेकर म्हणतात. एकूण हे दोन्ही लेख मला फार आवडले.
‘रणधुमाळी अमेरिकन निवडणुकांची’ हा निळू दामलेंचा लेख ‘मौजे’च्या या अंकात आहे. अमेरिकेतल्या काळ्या लोकांविषयी त्यांनी या लेखात दिलेली माहिती वाचून मनात नकळत भारतातल्या मुस्लीम समाजाशी त्यांची तुलना होते. अमेरिकेत १३ टक्के काळे आहेत, २५ ते ४९ या वयोगटातले ३५ टक्के बेरोजगार आहेत, इतर समाजाच्या तुलनेने सगळ्यांत जास्त काळे तुरुंगवासात आहेत. दुर्दैवाने भारतात मुस्लीम समाजाचे असेच चित्र आहे. काळे-गोरे संबंध ठीक आहेत असे म्हणणाऱ्या अमेरिकनांची टक्केवारी आता ४६ टक्क्यांवर घसरली आहे ही चिंतेची बाब वाटू लागते. सामान्यत: काळ्या लोकांबद्दल अढी असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी आता कदाचित कोणत्याही चमत्काराची गरज नाही असेही एक भाकीत आहे. तसे जरी झाले नाही, तरी हिलरी क्लिंटन यांच्याविषयीही अमेरिकन काळ्यांना फारशी आत्मीयता वाटत नाही. एकुणात कुणीही राष्ट्राध्यक्ष झाले तरी अमेरिकेतल्या काळ्या लोकांच्या भविष्यासमोरचे प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे असे दिसते. अमेरिकेच्या आर्थिक अडचणी तर आहेतच. मुस्लीम दहशतवादाचा जगाला भेडसावणारा प्रश्न अमेरिकेत अधिकच तीव्र होणार की काय अशी भीती आहे. याशिवाय अमेरिकेतल्या सांसदीय कार्यपद्धती लक्षात घेता कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला संसदेचे लांगूलचालन करण्यापलीकडे फारसे काही करता येणार नाही वगैरे वगैरे… दामले यांच्या लेखात नवीन असे फारसे काही नाही. किंबहुना तो सगळा लेखच माहितीच्या विविध तुकड्यांची एक सुबक गोधडी असल्यासारखा वाटतो. लेखाचा शेवट दामले यांनी ‘हंsssss जे जे होईल ते ते पाहावे!’ असा केला आहे. त्यातल्या ‘हंssss’ वर तर मी फारच वेळ थबकलो.  ‘मौजे’च्या संपादकांनी यंदा नुसते वेणीफणी केलेले, पावडर-कुंकू लावलेले लेख स्वीकारायचे नाहीत, त्याच्या गालावर तीट असेल तरच त्याला आत घ्यायचे असा निकष लावला आहे की काय कुणास ठाऊक! संपादनाबाबत, लेखांच्या निवडीबद्दल, शब्दांच्या वापराबद्दल फार म्हणजे फारच दक्ष असलेल्या भागवत-पटवर्धनांचे या निमित्ताने स्मरण होते.
विवाहित, कुटुंबवत्सल स्त्री-पुरुषांना आपापले जोडीदार सोडून इतरांविषयी वाटणारे आकर्षण या जुन्याच विषयावरची मिलिंद बोकिलांची ‘सरोवर’ ही लघुकादंबरी ‘मौजे’च्या या अंकात आहे. बोकील हे तसे माझे आवडते लेखक. त्यांच्या लिखाणात तपशीलवार वातावरणनिर्मिती असली तरी त्याचबरोबर एक मोहक तटस्थपणा असतो. बोकिलांचे हेच वैशिष्ट्य त्यांची मर्यादा होऊ लागले आहे की काय अशी शंका मला ‘सरोवर’ वाचून आली. बोकिलांनी एका सामान्य कथेची एक सामान्य लघुकादंबरी केली आहे. बोकिलांची बरीचशी पुस्तके (कथासंग्रह, कादंबऱ्या) मी विकत घेतली आहेत. ‘सरोवर’ पुस्तकरूपात आल्यानंतर मी ती विकत घेईन का असे मी स्वत:लाच विचारले आणि त्याचे उत्तर शेवटी ‘नाही’ असे आले.
बाकी ‘जिणं डंपिंगवरचं’ हा वृषाली मगदूम यांचा लेख वाचून मी नुसताच बसून राहिलो. माझ्या घरातल्या डस्टबिनकडे मी बघितले. प्लॅस्टीक, थर्माकोल, काच, भाजीपाला सगळे एकत्रच. एकाच डब्यात. महानगरपालिकेने ‘ओला कचरा’ आणि ‘सुका कचरा’ असे छापलेले वेगवेगळ्या रंगांचे कचऱ्याचे डबे दिले आहेत. ओला कचरा जागच्या जागेवर मुरवा, त्याला कचऱ्याच्या डेपोपर्यंत जाऊ देऊ नका असे माध्यमांपासून पंतप्रधानांपर्यंत सगळे सांगताहेत. पुन्हापुन्हा. माझ्या घरातला कचरा तसाच, वर्गीकरण न करता, जातो. त्यातल्या प्लॅस्टिकचे डबे गोळा करत असताना त्या कचऱ्यातल्या काचेने कचरा गोळा करणार्‍या एखादीचा हात कापला; तर मला त्याचे काय? शिळे, खराब झालेलं अन्न त्यातच आहे. त्यात जीवाणू वाढतील, कचरा डेपोवर काम करणाऱ्या एखाद्याला इन्फेक्शन होईल. मला त्याचे काय? कचरा डेपोवर कचरा गोळा करण्यासाठी जाणाऱ्या बायकांना आत जाण्यासाठी कुण्या आण्णाला रोज पन्नास रुपये द्यावे लागतात, कुठल्या बॅंकेत त्यांचे खाते उघडायचे झाले तर त्या निरक्षर बायकांना सतरा हेलपाटे मारावे लागतात, त्या मुजोर अधिकाऱ्याकडून कारण नसताना वाटेल ते ऐकून घ्यावे लागते माझ्या भागातल्या नगरसेवकाला त्याची फिकीर नाही, आमदाराला नाही, मंत्र्यालाही नाही. मलाच मुळात काही वाटत नाही, तर या लोकांना तरी त्याचे काही कशासाठी वाटावे?  लेखिकेचा हा हतबल करून सोडणारा लेख किंचित निराश सुरात संपतो. ही वस्तुनिष्ठताही मला कौतुकास्पद वाटली. उगीच ‘मी त्या पर्वतासारख्या कचऱ्याच्या ढिगाकडं पाहिलं. त्या कुजणाऱ्या ढिगामागून आजचा नवा सूर्य उगवत होता. त्याच्या सोनेरी किरणांनी तो कचऱ्याचा धुमसता ढीग उजळून निघाला होता. मला वाटून गेलं…’ असले काही नाही. ‘समाजाचं आपण काही देणं लागतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे..’ असले भाबडे विचार करण्याचे दिवस संपले. आता जे आहे ते तसेच स्वीकारले पाहिजे. आवडो किंवा न आवडो. मी अनारसा उचलला.
‘मौजे’च्या अंकात इतरही बरेच काही वाचनीय आहे. पण त्या सगळ्यावर लिहिणे हा काही या टिपणाचा उद्देश नाही. बरेच दिवाळी अंक आतापर्यंत नुसतेच चाळले. ‘मौजे’चा बाकी जरा सविस्तर वाचला. आवडलाही. त्यातून हाती आलेले हे काही. बाकीचे वाचणे आणि त्यावर आपापली मते बनवणे हे ‘बा वाचकां’वर सोपवतो. ‘मौजे’च्या अंकात राशिभविष्य नाही, ही आणखी एक जमेची बाजू. शेवटी ‘मौजे’चा अंक अगदीच परिपूर्ण, सर्वांगसुंदर आहे असे वाटायला नको म्हणून ‘शेळक्यांचं घर’ आणि ‘साधनेचा वाडा’ ही अनिल अवचटांची दोन टिपणेही या अंकात आहेत असा इशारा देऊन थांबतो.
Uncategorized

अपेक्षापूर्तीची ‘मौज’– सन्जोप राव

अंकनामा… लवकरच येत आहे!

खूप दिवे आहेत आजूबाजूला.

फटाके, रोशणाई, सजलेली उत्फुल्ल गर्दी, मिठाई, भेटवस्तू आणि भेटीगाठी…. आणि दिवाळी अंक.

दिवाळी अंकांची रेलचेल आहे यंदा. जुने-जाणते-स्थिरावलेले-तडाखेबंद खपाचे अंक. अभिरुचीचं भूषण म्हणून मिरवणारे काही. आपल्या भाषेपासून वाहत दूर कुठल्या बेटावर स्थिरावल्यानंतर मायबोलीच्या ओढीनं, हौशीनं काढलेले काही. काही महाराष्ट्रातल्या अनेक लहानमोठ्या गावांतून निष्ठेनं आणि सातत्यानं होणारे प्रयोग. कागदाच्या मर्यादा आणि जाहिरातींची गणितं झुगारत स्क्रीनवर झळकणारे ऑनलाईन अंक थोडे. तीही आता नॉव्हेल्टी नव्हेच… शिवाय नाना अडचणींपोटी यंदा साखळीतला दुवा न होता गळालेले, आणि आपल्या जोडलेल्या वाचकांकडून होणारी विचारपूस कृतज्ञतेनं मिरवणारेही काही… ते आपल्याला दिसत नसले, तरी तेही आहेतच मागे – विंगेतल्या अंधारात, साखळीचा दुवा होऊन.

असे खूप अंक आहेत.

फेसबुकाची अडचण होता होता आपण फेसबुक सराईतपणे वापरूही लागलो आहोत. तिथे मिळताहेत आपल्याला अनेक दिवाळी अंकांमधले आपल्या मित्रांचे लेख… आपल्या आवडत्या लेखकांचं लेखन. कथा-कविता… थोड्या चर्चा आणि वादविवाद. लेखकांशी संपर्क होणं, त्यांना दाद देणं कधी नव्हे इतकं सोपं झालेलं. मोबाईल, व्हॉट्सॅप आणि इमेल आयडी सगळ्यांना जोडणारे. पण वाचक वाढले आहेत का खरेच? वाचकाचा गोंधळ कमी झाला आहे थोडा तरी? या सगळ्या उखीरवाखीर पसार्‍यात आणि निवडीच्या अनंत पर्यायांमध्ये त्याला आपल्या आवडीच्या वाचनखुणा सापडताहेत का सहजी?

आम्हांला माहीत नाही. साहित्यासाठी, गंभीर संभाषितासाठी, मोकळ्या मतभेदांसाठी अधिकाधिक आक्रसत जाणार्‍या शब्दमाध्यमांच्या जगात – दिवाळी अंक अतिशय महत्त्वाचेही असतात आणि परंपरेचा भाग असूनही समकालीनत्वाच्या खुणा मिरवणारे – म्हणून आश्वासक-आकर्षकही. तिथूनच अनेक प्रवाहांचा कानोसा घेता येत असतो आपल्याला. आपल्यासारख्या कुणा वाचकाशी बोलायचं असतं, काय वाचलं, काय निसटलं, याबद्दल.

केवळ तितक्याच ओढीनं सुरू केलेला हा उपक्रम. येत्या महिन्याभरात इथे शक्य तितक्या दिवाळी अंकांबद्दल काही छोटी टिपणं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही वाचा, या वाचनखुणा वापरा, मतभेद नोंदवा… ’रेषेवरची अक्षरे’चा अंक यंदा नसला, तरी आमचं घोषवाक्य म्हणावं, अशा शुभेच्छा घेऊन हा नवा उपक्रम तुमच्यासमोर सादर करणार आहोत.

मनसोक्त लोळा, फराळा आणि भरपूर दिवाळी अंक चाळा!

हॅप्पी दिवाळी! 🙂