कविता: लोक्स, लाइक्स आणि लायकी

- डॉ. आशुतोष जावडेकर


कवितेइतकी अनुभवांची उत्स्फूर्त अभिव्यक्ती दुसरी क्वचितच कुठली असेल. कविता जगण्यामधून स्वत:ला उपसते आणि जगण्यापलीकडे जात दशांगुळे उरते. कवी कविता लिहितो ती स्वत:साठी असा समज आहे, असतो. ते खोटं नाही, पण अपुरं आहे. कवीला मुळात कविता लिहिताना सांगायचं असतं की हे-हे, असं-असं मला वाटतं आहे. तुम्हांलाही तसंच वाटतं का हो? आणि मग कित्येक दशकांनंतर गोविंदाग्रजांची ’प्रेम आणि मरण’ ही कविता वाचताना एखादा तरुण म्हणतो, “हो, गडकरी साहेब. आजही प्रेमात पडताना मला, माझ्यासारख्या असंख्य तरुणांना असंच वाटतं.” अगदी विरळा असतात माणसं, जी कविता लिहितात आणि कुणालाही सांगत नाहीत, वाचून दाखवत नाहीत, वाचायला देत नाहीत. ज्या ज्या कवीनं कवितासंग्रह प्रकाशित केला आहे, तो तो कवी स्वत:च्या आत्मप्रत्ययी भूमिकेतून बाहेर येत असतो. सवंग कवींचं जाऊ द्या, अगदी विंदा करंदीकरांनीही स्वत:चे पैसे घालूनच कवितासंग्रह प्रसिद्ध केला होता. ती उबळ साधारणत: असतेच, आणि आपली कविता प्रसिद्ध होण्याच्या आयामाला आता इंटरनेटचं, फेसबुकचं, ब्लॉगचं एक मोठं, सुलभ, आश्वासक परिमाण लाभलं आहे!


आता प्रकाशकांकडे घिरट्या घालायला नकोत, दिवाळी अंकांसाठी कविता पाठवून त्या छापून येत आहेत की नाहीत याची वाट बघत बसायला नको आणि मग प्रसिद्ध झाल्यावर कुणीच प्रतिक्रिया कळवू न शकल्याची (कारण सहसा कवीचा संपर्क सोबत छापलेला नसतो) खंत बाळगायला नको. एवढंच करायचं आहे: कविता लिहा, फेसबुकवर पोस्ट करा, हवं तर एखादा फोटो सोबत जोडा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे लगोलग वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या! किती लाइक्स आले आहेत यावर कवितेची प्रत ठरेल, काय कमेंट्स येताहेत यावरून कवितेची खोली कळेल!


आणि मग लगोलग उभे राहतात अनेक प्रश्न. कविता जर आता इतक्या सहज प्रसिद्ध होणार असेल - संपादकीय हात न फिरता, तत्क्षणी, पैसे न खर्च करता - तर ते चांगलं का वाईट? तर आधीच सांगायला हवं की हे चित्र मला व्यक्तिश:, त्यातल्या त्रुटी गृहीत धरूनही, आश्वासक; चांगलं  - नव्हे, उत्तम - वाटतं. विशेषत: फक्त समीक्षक म्हणून नव्हे, तर कवी म्हणू्नही. अशा पिढीतला कवी - पस्तिशीच्या पिढीचा - ज्यांच्या कविता बव्हंशी आधीच्या काळात दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत आणि आता फेसबुकावर होत आहेत! आजचे कवी थेट इंटरनेटवर आपल्या कविता सादर करताना मला दिसतात. त्यांना लगेच प्रतिसाद मिळतो; आणि हे खूप मोलाचं आहे.


कविता ही जात्याच उत्स्फूर्त असते. तिला नेटवर तितकाच प्रतिसाद उत्स्फूर्तपणे प्राप्त होतो. या sense of immediacy कडे आपल्याला जरा काळजीपूर्वक बघावं लागेल. एखादी कविता नेटवर पोस्ट होते तेव्हा धपाधप लाइक्स येऊ लागतात. ‘वा!’, ‘अप्रतिम’, ‘सुंदर’ वगैरे कमेंट्स येतात. ब्लॉग असेल तर कधी सविस्तर प्रतिक्रियाही येतात. कवी खूश होतो. पण कवितेचं काय? ती खूश होते का? कधी काहीही न वाचता साहित्यबाह्य कारणासाठी किंवा एक सवय म्हणूनही लाइकचं बटण दाबलेलं आढळतं. खरोखरीच कविता वाचणारेही अर्थात चांगल्या संख्येनं असतात. पण हा एक, न वाचता लाइकचं बटण दाबणारा, वर्ग आपण गृहीत धरायला हवा. आता जे कविता वाचतात, ते कधी कुकरची शिटी होईस्तोवर, कधी लोकलमध्ये, कधी अर्धी आधी - अर्धी नंतर, कधी खरंच शांत बसून अशा अनेक तर्‍हांनी वाचतात. (कवितासंग्रह सर्वसाधारणपणे अशा अनेक तर्‍हांनी वाचला जात नाही.) मग खरंच कविता आवडते तेव्हा तिच्यावर ‘लोक्स’ कमेंट्स लिहितात. आता हे खरंच सगळं चांगलंच आहे. पण त्यातला धोका असा: दोन दिवसांनंतर ती कविता पुन्हा वाचली जाते का? वाचली गेल्यास पहिल्याइतकीच भावते का? भावली नाही तर पुन्हा कमेंट लिहिली जाते का? तर - त्वरित प्रतिक्रिया या उत्तम असल्या तरी खूपदा अपुर्‍या असतात. कविता रेंगाळत रेंगाळत मनात पोचली की तिचे दहा अर्थ वाचकाला कळू शकतात. नेटवरच्या कविता प्रिंट करून वाचल्या किंवा प्रिंट न करता स्क्रीनशॉट घेऊन सावकाशीनं वाचल्या तर रसिकता अधिक वाढीला लागेल असं नमूद करावंसं वाटतं.


तरुण कवींची वाढीला लागलेली संख्या ही ‘नेट’क्या कवितांमुळे आहे असं वाटतं. तरुणांना त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या कंपूत पटकन कविता ‘शेअर’ करता येते, आवडणार्‍या व्यक्तीला ‘टॅग’ करून प्रेमकविता पोस्ट करता येते. :) खेरीज, खराच हाडाचा कवी असेल तर त्याच्या फ्रेंडलिस्टमध्ये तो हळूहळू प्रस्थापित साहित्यिकांना सामावतो आणि आपल्या कविता त्यांच्या डोळ्यांत येतील असंही बघतो. ही नवी पिढी तितपत स्मार्ट आहेच. आणि खर्‍या, हाडाच्या कवीला मिळणारी दाद बघून उर्वरित अनेकांनादेखील काव्यलेखनाची तात्कालिक ऊर्मी येते. तेही नेटवर आपली कविता पाडू लागतात. :) याच्यामागचं एक कारण असं की नेटवर संपादक नसतो, तुमचं काम कुठे अडतच नाही. त्याचाच व्यत्यास असा की तुम्हांला लेखन खरंच करायचं आहे, तर तुम्ही फसू शकता, लाइक्समध्ये हरवू शकता.


हे झालं फेसबुक, स्वत:चा ब्लॉग यांबाबत. आता मराठीमध्येही डिजिटल अंक निघू लागले आहेत. इंग्रजीत तर असंख्य आहेत. त्यांचे संपादक हे उत्तम असतात. ‘खर्‍याखुर्‍या’ समजल्या जाणार्‍या प्रिंट मासिकांपेक्षाही हे डिजिटल अंक इंग्रजीत नावाजले जात आहेत. ‘स्क्रोल’ हे त्याचं उत्तम उदाहरण. अर्थात कवितांसाठी इंग्रजीत लिहिणारे ‘ई-फिक्शन’ किंवा ‘म्यूज’कडे वळतात. तिथे प्रसिद्ध होण्यासाठी आज तरुण कवी धडपड करतात, कारण त्याला इंग्रजी साहित्यिक वर्तुळात (आताशा) पुरेशी प्रतिष्ठा आहे. मोठ्या प्रकाशनगृहांचे संपादक-उपसंपादक नवीन लेखकांच्या सातत्याने शोधात असतात. ते अशा ऑनलाईन कवितांवर लक्ष ठेवतात. हिरा असेल तर तो लपत नाही! मराठीत मात्र तो लपतो. :) अजून तरी इंग्रजीसारखं चित्र मराठीमध्ये दिसायला लागलेलं नाही. मराठी प्रकाशक नेटवरचं साहित्य मनावर घेताना दिसत नाहीत. पण त्याचं एक कारण असंही आहे की मुळात नेटवरती चांगल्या संपादकांनी चालवलेले डिजिटल साहित्य विशेषांक हे अल्प आहेत.


कवितेच्या निर्मितीमध्ये नेटच्या परिमाणानं बदल होतो का, हेही बघितलं पाहिजे. नकळत होत असावा. आपोआप कविता ही बहिर्मुख होत असावी का? तिची अंत:स्पंदनं नेटच्या वाचकमार्‍यापुढे मंदावत असावीत का? किंवा कवितेचे विषय हे ‘नेट’च्या परिप्रेक्ष्यात ठरत असावेत का? - या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निर्णायक स्वरूपात देणं अशक्यप्राय तर आहेच (कारण निर्मिती ही तर्कात मावत नाही); आणि कदाचित काहीसं अनावश्यकदेखील आहे. कारण निर्मितिक्षम मन अनेक ‘स्टिम्युलाय्‌’ना सामोरं जातं आणि मग आपल्याला हवं तेच रचतं. खरी कविता ही तिच्यामागच्या उद्युक्त करणार्‍या कारणांपेक्षाही तिच्या निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित करते. ‘नेट’ हा एक स्टिम्युलस झाला निर्मितीमागचा. तो मोलाचा, महत्त्वाचा; पण अनन्यसाधारण नव्हे! अनेकांतला एक असा असलेला!


त्याहून महत्त्वाचा धागा असतो समाजशास्त्राचा. नेट किती जण वापरतात? विशिष्ट वर्गातले, उच्चवर्णीय असे लोक जास्त नेटवर कविता लिहितात का? नेटच्या कविता ही मूठभरांची मिरास आहे का? - आता याचं एक उत्तर असं की पूर्वी - अगदी सुरुवातीला - इंटरनेट अवतरलं तेव्हा सधन वर्गच ते वापरायचा. तेव्हा हे आक्षेप काही प्रमाणात लागू व्हायचे. आता नेटवर सर्व आर्थिक स्तरांमधले, जाती-समाजांचे लोक आहेत. त्यातले उत्साही कवी कविता रचतात आणि उलट नेटमुळे ते दुर्गम जागी राहत असतील तरी सर्वदूर पोचतात! उदा. सत्यपालसिंग राजपूत चाळीसगावला राहतो. त्या अडनिड्या गावात त्याने लिहिलेल्या बहारदार कविता नेटमुळे सर्व महाराष्ट्रभर पोचतात आणि उत्तम रसिकांना त्याला देता येते. हा दोघांचाही फायदा आहे: कवीला दाद मिळते (ती त्याला हवी असते, त्याने नाकारलं तरी) आणि रसिकांना दाद देता येते! (रसिकांची तर ती आंतरिक गरज असते, अनेकदा त्यांनाही न उमजलेली.)


मात्र असमाधान आहे ते हे की, खरं तर नेटवर जात्याच संवादी, बहिर्मुख असलेल्या कवितांचे ऑडिओ/व्हिडिओ अपलोड करणं शक्य असूनही तसं केलं जात नाही. रंगमंचीय कवितांसाठी नेट हा किती प्रभावी रंगमंच ठरेल! पण अद्याप मराठीत तरी तसं चित्र दिसत नाही. शेवटाला असं वाटतं की कविता ही माध्यमावर काही प्रमाणात अवलंबून असते हे कवींनी अमेरिकी भांडवलशाहीला समोर ठेवून कबूल करावं. पण रसिकांनी, माध्यमांनी हेही ध्यानात ठेवावं की कवितेची जातकुळी ही निराळी आहे. शतकानुशतकं दुर्लक्षित राहिलेली कविता नव्या काळाच्या संदर्भात, नवा अर्थ धारण करून प्रसिद्धी पावू शकते! उदाहरणार्थ एमिली डिकन्सनची आणि जॉन किट्सची कविता, जी फडताळात अनेक वर्षं पडून होती. निदान ‘सिरियल स्टार’ घडवणं हे वाहिन्यांसाठी जितकं सुकर असतं, तितकं ‘स्टार कवी’ बनवणं हे कुठल्याच माध्यमासाठी सोपं नाही! इतकी तात्त्विक बडबड झाल्यावर हा लेख इंटरनेटवर प्रसिद्ध होणार आहे हे ध्यानात घेतो आणि माझ्या एका ऑनलाईन कवितेनेच त्याचा शेवट करतो. :)
***
***

Post a Comment