टोलनाक्यावर..

- गवि

मी टोलनाक्यावर उभा असतो.
हौसेने नाही राहत.
टोलनाक्यावर उभं राहणं हाच माझा जॉब.
मुश्किलीने लागलाय. दोन वर्षं गेली, तिसरंही जाईल.
उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.
पण मी टोलनाक्यावर उभा असतो.
***
तसा मी ब्राह्मणाचा.
अण्णाआईंसोबत चांगला होतो.
अण्णा गांजा भरून सिगरेट ओढायचे अन मग तासन्‌तास शांत.
आई नुसती तडतडत राहायची, कढल्यात जळलेल्या मोहरीसोबत.
मोहरी करपली, तडतड थांबली...
मला शाळेच्या पुस्तकांनी ओकारी यायची. अण्णा म्हणायचे, कशाला शिकतोस... व्यर्थ आहे सगळं.
अण्णा एकदम आध्यात्मिक. महिनामहिना घराबाहेर.
मग वर्ष-वर्ष.
एकदम आईला म्हणाले, तू माझी माउली... आणि गेले निघून.
मग मी शाळेला लावला घोडा आणि चैन्या केल्या जिवाच्या वर्षामागून वर्षं… आईच्या जिवावर... अन नानांच्या...
अण्णा गेले अन्‌ नाना आले.
आईच्या मदतीला खूप जण पैदा झाले एकदम...
नानांनीच आईसमोर शाळा घेतली माझी. ताळ्यावर ये, म्हणे. गाव सोड, म्हणे. शिक्षण नाही, म्हणे... शिपाई म्हणूनही लायकी नाही, म्हणे.
नानांनीच लावला टोलनाक्यावर.
साला भाड्या... आई घेतलीन्‌ माझी...
***
दिवसभर टोलनाक्यावर मी उभा असतो.
रापरापून कातडीचा बामणपणा कंप्लीट गेलाय.
मला कलेक्शनलापण नाही उभे करत. लायकी नाही माझी. नाना म्हणालेले, तशी.
मी फक्त उभा राहतो. बूथपासून लांब. दबा धरून.
टोल चुकवून पळणार्‍या गाडीला कोलदांडा घालायला.
दर गाडीच्या वेळी दबा धरायचो… आता शांत झालोय.
दिवसात एकतरी माजुरडा भेटतो.
कोणाकोणाची नावं सांगून टोलऐवजी कचाकचाकचा बडबडत राहतो.
कलेक्शनवाले त्याच्यावर चढतात.
मी कोलदांडा काढत नाही.
मागून अडकलेल्या गाड्यांच्या केकाटण्याचा जोर मिन्टामिन्टाला डब्बल होत असतो.
मला काम मिळाल्याचा आनंद असतो.
शेवटी त्याने नोटा भिरकावल्या की मी कोलदांडा काढतो.
अस्सा माजुरडा दोन दिवस भेटला नाही, तर नोकरीची चिंता लागते...
पायाचे नळ आणखीन दुखतात. कंटाळा येतो.
उन्हात जळत मी टोलनाक्यावर उभा असतो.
टोल भरताना दरेक गाडीची खिडकी उघडते अन्‌ माझ्यापर्यंत पोचेस्तो बंद होते.
वर सरकणार्‍या काचेतून शेवटची थंड फुंकर मला चिडवून जाते.
त्या बंद होणार्‍या काचेतून मधेच दिसतो एक गोर्‍या गोर्‍या छातीचा तुकडा. आणि त्यात एक घळ.
पायातली ताकद एकदम जाते.
पण कोलदांडा पकडून मी उभाच असतो.
दोन वर्षं गेली, तिसरंही जाईल.
उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.
पण मी टोलनाक्यावर उभाच असतो.

***

***
Post a Comment