तंत्रज्ञान आणि कवितांचा मनगुंती संगम : शाप की वरदान?

- संहिता अदिती जोशी


मी एके काळी पॉकेटमनीसाठी एका कॉलेजात कंत्राटी पद्धतीने शिकवायचे. माझं काम सिलॅबसचा ठरावीक भाग शिकवणं एवढंच होतं... असं मीच समजून घेतलं होतं. हजेरी वगैरे मी घ्यायचे नाही. तासाला शंभर रुपयांत एवढंच मिळेल, असं मीच माझं ठरवून टाकलं होतं. पहिल्याच दिवशी मी बीएस्सीच्या पहिल्या वर्षाच्या वर्गात जाहीर करून टाकलं, "तुम्हांला वर्गात बसायचं असेल तर शांतपणे बसा. ऐकायचं असेल तर ऐका किंवा नका ऐकू. मी हजेरी घेणार नाहीये, तेव्हा गैरहजेरीच्या भीतीपोटी इथे बसून मला त्रास देऊ नका. तुम्ही वर्गात बसलात किंवा नाही बसलात तरी मला तासाचे शंभर रुपये मिळणारेत. आणि माझं शिक्षण आधीच झालेलं आहे. त्यामुळे माझं काहीही नुकसान होणार नाहीये."


हे सांगण्याचं कारण? ‘अमुक तमुक - शाप का वरदान?’ या छापाचे शाळकरी निबंध तुम्ही चिक्कार वेळा वाचले असतील. हा आला त्यातलाच एक, असं समजून पुढचं वाचणार नसाल तर नुकसान तुमचंच आहे. कारण पुढे किती थोर विचार आणि विश्लेषण लिहिलेलं आहे, ते मी वाचलेलं आहे. तुम्ही वाचलं नाहीत तर नुकसान तुमचंच आहे. अंकाच्या संपादकांनी मला निबंध लिहायला सांगितलं आहे; वाचकांनी त्यात गुंतून पडावं का नाही, याबद्दल आमचं बोलणं झालेलं नाही. (शिवाय हा निबंध वाचून निबंधावर टीका करायचीही गरज नाही. नाक बंद करून तुमच्या नरड्यात हा निबंध कोणीही ओतलेला नाही.)


***


कविता आणि अँडी वॉरहॉल यांच्यात एक साधर्म्य आहे. लोक एकतर त्यांच्यावर प्रेम करतात किंवा त्यांचा तिरस्कार करतात. (अँडी वॉरहॉलबद्दल असं विधान सचिन कुंडलकरने केलं होतं. त्याला कलेतलं बरंच काही कळतं, कळतच असणार. तो प्यारीसमध्ये राहून आलाय. आपण असे लोकांचे संदर्भ टाकले की स्पष्टीकरणाची जबाबदारी आपल्यावर येत नाही.)  पण come technology हे चित्र पालटायला लागलेलं आहे. पुन्हा एकदा मी माझंच (थोर) उदाहरण देऊन हे सिद्ध करणार आहे.


शाळेत शिकत असताना दुर्दैवाने माझी आणि कवितांची गाठ पडली. मी तेव्हा मार्कवादी असल्यामुळे कविताही रटणं भाग होतं. मोकळ्या मैदानावर मधोमध एखादी गगनचुंबी इमारत उभारली की ती किती ओंगळ दिसेल, तशाच मला कविता दिसत असत. आडव्या-तिडव्या, प्रशस्त पसरलेल्या, विरामचिन्हांनी नटलेल्या गद्याच्या गुबगुबीत मैदानात या उंचच उंच कविता येत असत. त्या काळात, म्हणजे बालपणात, त्याला पद्य म्हणत. माझ्यासाठी बालपणाचा काळ मराठी अस्मिता चेकाळायच्या आधीचा होता. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी ओव्यांमध्ये पूर्णविरामाच्या जागी वापरलेले हिंदी-संस्कृत छापाचे दंड बघून कोणीही मांड्यांवर हाताच्या ओंजळी आपटत शड्डू ठोकत नसत. थोडक्यात दंडातही मराठीपण आहे इतपत माहिती त्या कवितांमधून मिळाली. 'हिंदी हटाओ'छाप चळवळी मराठी लोकांनी दंड थोपटून सुरू केल्यावर त्यात दंडाची काडी न पेटण्याची सोय झाली खरी। [मुद्रितशोधकांसाठी सूचना - हा दंड मुद्दाम वापरलेला आहे. [संपादक: ठीक.]]


सुनीताबाईंनी 'आहे मनोहर तरी'मध्ये एक किस्सा सांगितलाय. पुलंच्या पुस्तकांतली चित्रं चित्रकार शि. द. फडणीस काढायचे. त्यांच्या कोणत्याशा चित्रावरून एकमत होत नव्हतं, वाद होत होता. तेव्हा शि.द. सुनीताबाईंना म्हणाले होते, “मराठी माणसांना दृश्यकलांमधलं फार ज्ञान नाही.” कविता बघितल्यावर मला अगदी तस्संच शि. द. फडणिसांसारखंच वाटायचं. भारतातल्या कोणत्याही शहरात, भारतीय हवेत गगनचुंबी इमारती चांगल्या का दिसतात? पर्यटन म्हणून आपण कोकणात, जयपुरात किंवा स्वित्झर्लंडलाच जातो ना! तिथे जाऊन सुंदर इमारती आणि छान-छोटी घरं बघूनच आपल्याला आनंद होतो ना! गद्यासारखी सुंदर सोय असताना लोक या काचबंद, गगनचुंबी पद्याच्या, सॉरी कवितांच्या, इमारती उभ्या का करतात?


सुदैवाने, माझं बालपण संपलं तशी मार्कवादावरची निष्ठा ढळायला लागली. बारावीनंतर आयुष्याचे निर्णय घेण्याची संधी मिळाल्यावर मी धावतपळत जाऊन ती हिसकावून घेतली आणि कवितांना अभ्यासक्रमातून हद्दपार केलं. आता पुस्तकांमध्ये पूर्णविराम, उद्गारचिन्ह, किंवाचा स्लॅश यांच्यासारख्या विरामचिन्हांच्या जोडीला इंटिग्रल, समेशन, d/dx आणि δ/δu यांच्यासारख्या सुंदर, स्वप्नवत गोष्टी अभ्यासक्रमात आल्या. आयुष्य एवढं सुंदर झालं होतं की एकदम एक कविताच पाडावीशी वाटायला लागली.


पण कविता (किंवा गगनचुंबी इमारती) बनवणं तसं सोपं नसतं. आधी प्लॅन बनवावा लागतो. मग उंची किती याचा अंदाज करून खोलीची गणितं करावी लागतात. बुडातला मजला अरुंद आणि वरचा मजला (पंप्रंच्या ५६ इंची छातीसारखा) रुंद असं करून चालत नाही. (बघा ५६ इंची छाती असून बिहारमध्ये करिश्मा चालला का? पायाची गणितं करावी लागतात.) कविता किंवा इमारत स्त्रीलिंगी असल्या, तरीही सिंहकटी आणि वर... हॅ हॅ हॅ, चालत नाही. (बार्बीला चालताना बघितलंय का कधी?) एवढं करून ती घट्टमुट्ट कविता बांधण्यासाठी लिहिणाऱ्यांचं हृदय मात्र कोमल वगैरे असायला लागतं. आनंदाची काही वर्षं अशीच कोरडी, कोणतीही भावना व्यक्त न करता गेली. कवितांबद्दलचे माझे मनोव्यापार 'तुझं माझं जमेना...' या पातळीवर आले होते, याची कल्पना मला पुढची काही वर्षं येणार नव्हती.


... आणि माझ्या आयुष्यात ‘ते’ आलं. ते एकटंच नाही आलं, जोडीला कविताही आली. d/dx, δ/δu या सगळ्यांबरोबर फ्लर्टिंग, डेटिंग अशा आणि बाकीच्या सगळ्या पायऱ्या [हॅहॅहॅ!!! [हॅहॅहॅ!!? - संपादक]] करून हे लोक जुने झाले होते. जुनं सोडून जाणार नाही, याची खात्री पटल्यावर मला माझ्या दिलात पुन्हा नव्याची आच जाणवायला लागली होतीच. तेव्हाच ‘ते’ आलं. [अहो, काय ‘ते’? इथे आम्हांला चोखंदळ आणि परंपराप्रिय वाचक सांभाळावे लागतात. तुम्हांला काय?!? नाही नाही ते अश्लील नव्वदोत्तरी चाळे लिहाल नि मोकळ्या व्हाल. - संपादक]


‘ते’ म्हणजे तंत्रज्ञान, इंटरनेट, इमेल, इमेलमधले फॉरवर्ड आणि त्यात असणाऱ्या कविता.


'दिल गार्डन गार्डन हो गया' ही कविता नंतरच्या जमान्यात आली असली; तरीही इमेलमधून पहिली फॉरवर्ड कविता आल्यावर कवीला या भावना जाणवल्या असणार याबद्दल मला १००% खात्री आहे. ती कविता हातात घेऊन घरभर नाचावंसं वाटलं मला!! तेव्हाचे कंप्यूटर, मॉनिटर्स काहीही हातात घेऊन नाचणं मला जमणार नव्हतं. मग फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी माउस हातात घेऊन घरभर नाचले; उश्या-पांघरुणं घरभर उडवली (आणि ती न आवरण्याबद्दल आईवडलांचा ओरडा खाल्ला).


माझे कवितांसंदर्भात असणारे मनोव्यापार द्वेषाच्या चिखलातून उमलणाऱ्या प्रेमाच्या कमळासारखे अल्लाद उमलले होते, याची पहिली जाणीव मला तो ओरडा खाताना झाली. आमचं प्रेम युक्लिडीय रेषात्मक नसून अयुक्लिडीय अरेषात्मक आहे, त्याच वेळेस ते समकालीन आणि अ‌व्यापारेषु आहे याचीही जाणीव मला झाली. [काय (घेऊन) बरळताय बाई? - संपादक (उघड) आम्हांलाही हवं झालंय. (स्वगत)] पण तो क्षण आला जेव्हा मी पहिली कविता एका सुंदर फोटोवर छापलेली पाहिली. माथेरान किंवा ग्रँड कॅन्यन [वा! काय रेंज आहे. नशीब ठाण्याचा किल्ला नाही आणला. - संपादक] कुठेतरी होणारा सूर्योदय आणि त्या पार्श्वभूमीवर छापलेली एक प्रेमकविता मी वाचली.


[हॅम्मिंगलव डॉट कॉमवरून सप्रेम साभार: संपादक]


अशा कवितांना कुणी समीक्षक कदाचित वेदनवाद (sensationalism) म्हणतीलही. पण माझ्या मनात भावनांचा जो कल्लोळ झाला, त्यामुळे मला केऑस थिअरीही नीटच समजली. आफ्रिकेत फुलपाखराने पंख फडफडवल्यामुळे युरोपात हिमवादळं उठू शकतात, हे मी फक्त वाचलं होतं. आता हे माझ्यासमोर प्रत्यक्ष घडत होतं, माझ्या अनुभवविश्वाचा भाग बनलेलं होतं. लांब कुठेतरी, कुणीतरी अनाम व्यक्तीने काढलेल्या नेचर फोटोवर प्रेमभावनांचं हे उत्कट [पॉर्नला जरा पॉर्न शब्द सुचवा बघू! [संपादक: उसासमैथुन चालेल?] अं, हं… घासून घासून एवढाच सापडला? ठीक. सध्या वापरून घेऊ.] उसासमैथुन बघून माझ्या मनात वादळं उठत होती. केऑसच्या नावाखाली शिकवलेले फ्रॅक्टल्स, [संपादक: फ्रॅक्टल्स म्हणजे काय गं दिदी?] [गूगल वापरा. इमेज सर्च. म्हणजे कळेल.] एकात एक तोच-तोच आकार पुन्हा-पुन्हा दिसणं, हे कवितेतही दिसत होतं. d/dx, δ/δu या सगळ्यांबरोबर सगळं काही करून झालं, हा माझा समज किती बालीश होता याची जाणीव मला त्या पहिल्या कवितेने करून दिली.


फास्ट फॉरवर्ड - आजचा दिवस :
तर - कविता करणं आणि इमारती बांधणं हे अतिशय किचकट काम आहे असं मी समजत होते. मधल्या काळात मला कवितांचं मॅग्नेटोहायड्रोडायनॅमिक [संपादक: म्हणजे?] [संपादक ना तुम्ही? अभ्यास वाढवा. काय सर्च करायचं ते स्पेलिंगही सांगायचं का आता? संपादक म्हणून मिरवायला तेवढं पाहिजे...] विश्लेषण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. त्यातून मला कवितांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या आहेत.


कविता बांधणं हे काम तंत्रज्ञानाने फार सोपं केलं आहे. सर्वात आधी गद्याचं मोकळं पसरलेलं मैदान तंत्रज्ञानाने साफ करायला घेतलं. पुस्तकात एका टोकापासून दुसऱ्या टोकापासून पसरलेलं गद्य आता मोबाईलच्या दोन-चारशे पिक्सलमध्ये येतं. एके काळी आपली रेष मोठी आहे हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेष लहान करण्याची परंपरा होती. [हल्ली लोक त्यासाठी ऑनलाईन दिवाळी अंक काढतात. पण ते असो. विषयांतर होतंय. (कुजबुजत बोलत्ये, अंकाचं नाव काय ते पहा.)] पण फोन रेषेवर आल्यापासून हा प्रश्न पारच सुटला. कंप्यूटरची आडवी स्क्रीन मोबाईलसाठी उभी झाल्यावर विस्तीर्ण मैदानच कापून-कातरून गगनचुंबी इमारती बसवण्यासाठी फिट झालं. आता पाया किती खोल आहे, किती उंची गाठायची याचं गणित, विचार करायची काही गरजच राहिली नाही. कविता या साहित्यविधेचं लोकशाहीकरण झालं. विटेवर वीट चढवायची, ओळंबा वगैरे लावायची गरज नाही; मोबाईलची स्क्रीन बारीक असल्यामुळे लाईन हलून हलून किती हलणार!


गूगलमुळे ग्रँड कॅन्यन किंवा माथेरानला जाऊन पहाटे उठून सूर्योदयाचे फोटो काढायची आवश्यकता राहिली नाही. फोटोशॉपमुळे संध्याकाळी सूर्यास्ताचे फोटो काढून, तिथे 'मि पाहीलेला सुरयोदय' असं लिहिण्याची सोय झाली. कवितांसाठी फोटोची गरज काय, असा एक जुनाट प्रश्न पडलाच असेल तर? कविता कशी आहे यापेक्षा ती कुठे आणि कशी प्रदर्शित केली जाते हे आज माध्यमस्फोटाच्या कालात महत्त्वाचं ठरलं आहे. माध्यम जेवढं महत्त्वाचं तेवढाच फॉर्मही. एके काळी स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, उदारमतवाद ही मूल्यं महत्त्वाची नव्हती. आता झाली आहेत. तसंच आता कवितेच्या पार्श्वभूमीला असणारा फोटोही फार महत्त्वाचा झालेला आहे. सूर्योदय किंवा सूर्यास्ताचा सौंदर्यसंपृक्त फोटो अतिशय लोकप्रिय आहे. त्यावर हातात हात धरणारं जोडपं असेल तर उत्तम. हे सापडलं नाही तर कष्टप्रद पर्याय वापरला जातो. फेसबुकवर मित्रमंडळ यादीत काही जण आपले श्लील जोडपी(य) संस्कार दाखवणारे असतात. त्यातला नेमका फोटो उचलला जातो. पुरुषाचा हात बाईच्या खांद्यावर ‘ही माझ्या मालकीची आहे’ असं दाखवणारा आहे आणि बाई गोडशी हसत, त्याच्या दिशेला चेहरा वाकवून आपली आपणच उभी आहे असा काव्यात्म फोटो सिल्हूएट बनवून सूर्योदयास्तावर वापरला जातो. [उदाहरणादाखल फोटो मिळेल काय? - संपादक][इथे या आणि माझ्याबरोबर फोटो काढून घ्या. मग दाखवते.][न-नको नको, राहू दे. - संपादक]


तर हे झालं फोटोचं. आता प्रत्यक्ष कवितेच्या मजकुराकडे वळू.


एखादी बहुजनप्रिय भावना घ्या, शक्यतो शिळी. उदाहरणार्थ स्मरणरंजन. त्यातही आई-वडील-आजी यांच्याबद्दल असणारं प्रेम (शक्यतोवर स्त्री नातेवाईकांबद्दलचं प्रेम दाखवावं. ते विकणं सोपं जातं.). स्त्रीवाद मुळातच कवीला झेपायला थोडा कठीण असतो; पण उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, उच्चशिक्षित, होममेकर (हौसाबाई) बाई आजही कशी पिचलेली आहे, ही भावना चलनी नाणं आहे. (टीप: स्त्रीवाद थोडा जड असतो, अननुभवी लोकांनी जपून हाताळावा. नवशिक्यांनी बहिणाबाईंची नक्कल करून बघावी.) या भावनांबद्दलची कविता काळजाला अचूक हात घालते. (सराईत पाकिटमाराचा हात खिशातच जातो किंवा अंधारात जेवतानाही आपला हात तोंडातच जातो, तशी. किंवा… असो. You get the idea, no?) त्यातही हमखास विकल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे शाळेतले शिपाई’काका’, शाळेतलं बाक, शाळेतला गळका नळ. (टीप:  शाळेतल्या संडासांमध्ये लिहिलेल्या साहित्याबद्दल लिहिणं हा पर्याय स्त्रीवादाची सवय झाल्यानंतरच हाताळला जातो. ही अतिशय कठीण विधा . जपून. पहिल्या प्रयत्नात नको. तोंडावर आपटायला होतं. लोक रॅगिंग करतात ते निराळंच.) पुढे कॉलेजच्या गोष्टींचा फार उपयोग नसतो, पण पहिलं प्रेम कॉलेजात सेट केलं तर चालू शकेल. पण ज्युनियर कॉलेजच्या पुढे जाऊ नये. सिनियर कॉलेजबद्दल लिहायचं असेल तर हॉस्टेल लाईफ हा एक विषय महत्त्वाचा असतो; पण कविता या विधेद्वारे हे मनोव्यापार हाताळण्यासाठी भावनांनी शब्द लथपथ होणं अत्यावश्यक असतं. हॉस्टेलबद्दल लिहिण्याला एक बायपोलर छटाही सापडते. कधी त्यात जुने मित्र, प्राध्यापक, कॉपी केलेल्या असाईनमेंट्स अशा प्रकारचं स्मरणरंजन असू शकतं किंवा होस्टेलातल्या शिळं, बेचव आणि वास येणाऱ्या तेलकट अन्नाबद्दल असणारी घृणासुद्धा सुंदर, भावनाळलेल्या कवितेचा विषय ठरू शकते. आयुष्यातल्या यापुढच्या भावना मात्र बहुतांशी आई-वडील-आजी-आजोबा यांच्या मृत्यूनंतर ज्वालामुखीसारख्या फसफसून वर येतात. मृत्यू ही गोष्ट साहित्यासाठी अतिशय पोषक कच्चा माल ठरते. प्रेम, आपुलकी, आदर, आनंद, सुख याबाबत कुपोषण होणं तितकं महत्त्वाचं नाही. लक्षात घ्या, एके काळी आपलं कुपोषण होत नव्हतं, पण आता होतं आहे, याचा भावनातिरेक तंत्रकवींच्या बाबतीत फार महत्त्वाचा असतो. कुपोषण, दुःख, वेदना यांतूनच सुंदर आणि अभिजात साहित्य जन्माला येतं हे विसरू नये.


दुसरं महत्त्वाचं म्हणजे, ‘आमच्या काळात आयुष्य किती छान होतं,’ ही भावना कविता लिहिण्यासाठी खूप सुंदर आणि खरंतर उपयुक्त आहे. ती भावना मनात येत नसेल एक गोष्ट लक्षात ठेवा. वृत्तबद्ध, प्रमाणलेखनाचे नियम पाळून लिहिलेल्या कवितेला एके काळी किंमत होती.  पण आता तसं उरलेलं नाही. कवितांचं गगनचुंबी इमारतींचं हिडीस रुपडं जाऊन त्याजागी निसर्गाचे अतिसुंदर फोटो आल्यामुळे कविता लोकप्रिय होत आहेत. वृत्त, छंद, मात्रा या आस्पेक्ट्समध्ये कवितांचं भणंगीकरण होणं, ही लोकप्रियता आणि सौंदर्याची किंमत आहे. [आणि मी ती देणारच!!!] [दे बाई दे, आम्हांला सोडव लवकर. - संपादक (अर्थात स्वगत).]


***
आम्ही खरंतर एसीत, गुबगुबीत खुर्चीत बसून विश्लेषण करणारे. पण संपादकांच्या खास [आणि ’खास’, समजलं ना!] आग्रहास्तव एका आल्गोरिदमची पाककृती देत आहोत. हे आल्गोरिदम नीट उबवल्यास तुम्हांलाही तंत्रज्ञानी कविता जमण्याची बरीच शक्यता आहे. न जमल्यास सराव करत राहणे. सरावासाठी संधी म्हणून दिवाळी येतच आहे, नातेवाइकांना त्या सरावाचं ग्रीटींग कार्ड बनवून पाठवू शकता. (पैशे [श मुद्दाम] [कळलं हॉ. - संपादक] पडत नाहीत, इमेलवर हे फुकटच  होतं. तेव्हा, हूं… )


कवितेसाठी लागणारे साहित्य -
१. एक रत्तल प्रेमानंदमयी भावना. वर उल्लेख केलेल्या भावनांपैकी कोणतीही चालेल. उदा. शाळेतल्या बाकाप्रती स्मरणरंजन.  (टीप: स्मरणरंजन ही भावना रडारडबहुल असण्याचा समज आधुनिकोत्तर काळात मोडून निघतो आहे. तंत्रज्ञान वापरून कविता लिहिताना, तंत्रज्ञानापूर्वीचं जग किती सुंदर होतं ही स्मरणरंजनी भावना तंत्रज्ञानबहुल जगात सकारात्मक आणि उत्सवी समजली जाते.)
२. अर्धा तोळा (तरी) विरामचिन्हं. (होय, तंत्रज्ञानी कवितेत विरामचिन्हं फार लागतात. फोडणीत मोहरी-जिरं कमी पडलं तरी चालेल, पण कवितेत टिंबं - अर्थातच तीन - कमी पडल्यास कविता फसफसण्याऐवजी नुसतीच फसते.)
३. दोन रत्तल यमकं. यमकं जुळवताना ती एकाच भाषेत असावीत असा आग्रह नाही. उदाहरणार्थ ‘ग्रॅम -राम’ असं यमकही चालेल; नव्हे ध‌ावेल. [पाहा: खालील तीन कॉलमी कविता. - संपादक]
४. दोन गुंजा इमोटीकॉन्स. तंत्रज्ञानी कवितेत निदान एकतरी हसरा चेहेरा - अर्थात स्मायली - न आल्यास फाउल मानला जातो. स्मरणरंजन ही भावना सकारात्मक कशी बनते याचा अंदाज इथे सुज्ञ वाचकांस आला असेलच.
५. वर गार्निशिंगसाठी प्रमाणलेखनातल्या चुका. उदाहरणार्थ: ‘ऊन, हून’ असे पंचमीचे प्रत्यय असणारे सगळे शब्द (राहून, खाऊन, करून, जाऊन) ऱ्हस्व उकारी लिहायचे. उदाहरणार्थ, राहुन, खाउन, करुन, जाउन.
६. आर्थिक आणि वैचारिक दारिद्र्याबद्दल अभिमान - चवीनुसार.  [हा शब्द खरंतर ’स्वादानुसार’ असाच हवा. आपलं आधुनिकोत्तर ज्ञान मिरवणार्‍या या उद्धट लेखिकेचा इथे फाउल झालेला आहे. पण लेखनस्वातंत्र्य मान्य करत असल्यामुळे आणि स्त्रीवादा(द्यां)ची भीती असल्यामुळे नाईलाजानं ही चूक तशीच ठेवावी लागत आहे. - संपादक][संपादक बिनडोक आहेत. असो.][आता मात्र अती होतंय. - संपादक][बॉर्र. मला लेख छापून हवाय.]
७. “वेळात वेळ काढून वाचाच”, “शाळेवर (किंवा …. गोष्टीवर) खरं प्रेम असेल तर ही कविता शेअर कराच” अशा प्रकारचा चार रत्तल पेट्रनायझिंग आणि ब्लॅकमेलिंग गळेपडूपणा.


हे सर्व पदार्थ एका कोऱ्या फायलीवर ओतावेत. ते आपापल्या कुवतीनुसार ढवळून काढावेत. जे मिश्रण होईल ते खपेल. बदफाईल, अर्थात कविता बरी न झाल्यास, लेखिका जबाबदार नसेल. ही कविता कितीही लोकांना वाढता येते. जितक्या लोकांना वाढाल, तितकी चव वाढेल.


आता सादर आहेत अशा प्रकारच्या दोन कविता.


(सूचना: या कविता आम्ही केलेल्या नाहीत. आम्ही विश्लेषक आहोत. फारतर सिम्युलेशनसाठी आल्गोरिदम देऊ शकतो. त्यातही ‘स्वादानुसार’ [हं, वाचा संपादक.] [संपादकांची शुद्ध हरपली आहे. - संपादक] फेरफार करावे लागतील. तेव्हा आल्गोरिदम आपापल्या जबाबदारीवर वापरावे.)


***


फक्त तुझी साथ हवी - ही कविता नक्की वेळ काढुन वाचा...
अप्रतिम रचना...
...
...
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला..
शरीर तुटकं पाय बारीक,
थोडा म्हाताराच वाटला...
"ओळखलसं का मला?",
विचारलं त्याने हसुन...
वेळ असेल तुला तर,
बोलुया थोडं बसुन...
गाडी पाहताचं आनंदला,
हलवली तुटकी मान...
"खुप मोठा झालासं रे,
पैसा कमावलासं छानं"
"ओळखल्यास का बघ ह्या,
माझ्यावरच्या रेघा...
भांडण करुन मिळवलेली,
दोन बोट जागा...
अजुनही भेटतात का रे,
पक्या, मन्या, बंटी...?
टाळ्या देत करत असालं,
मनमोकळ्या गोष्टी...
डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?
निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?
टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन...
मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन...
धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं...
एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं...
त्राण गेलं, आवेश संपला,
करावं तरी काय..?
कोरड पडली घशाला,
थरथरले तरणे पाय...
तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत...
बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत...
"अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण...
कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन..."
मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट...
वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट...
शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला...
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला...
Miss u all friends
आता कितीही गाणी ऐकली तरी शाळेतल्या बेंचवर कान लाऊन🙇 हाताने वाजवलेल्या music ची मजा काय वेगळीच होती.
एक आठवण शाळेची..🙇


***


कविता क्र २.
dreaded_poem.png


[हुश्श. - संपादक]


***
चित्रस्रोत : पहिले चित्र - स्नेहल, इतर चित्रे : आंतरजालावरून साभार

9 comments