मौनोत्सवाचा गलबला

- संवेद


कविता: टोकदार भावनांची मोजक्या शब्दांमधे, प्रतीकांचे आधार घेत केलेली, नादमय उत्स्फूर्त मांडणी.


कविता कशी वाचावी हे आपल्याकडं क्वचितच शिकवलं जातं. त्यातही तुम्ही भाषेचे विद्यार्थी नसाल तर, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर कविता वाचायला शिकता. कविता हा एक मौनोत्सवाचा गलबला असतो आणि त्यातून नेमके सूर शोधणं, हे थोडं कौशल्याचं काम असतं. लेखाच्या मूळ मुद्द्याकडे वळण्याआधीो, वॉर्म-अप म्हणून, कविता समजून घेण्याच्या प्राथमिक तंत्राकडे बघू :
कवितेकडे असंख्य कोनांमधून बघता येईल (असा एक प्रयत्न: इथे). पण या लेखासाठी कवितेचे मी तीन ढोबळ प्रकार करतो : समूहमग्न कविता, सहमग्न कविता आणि आत्ममग्न कविता. या प्रत्येक प्रकाराच्या, वाचकांकडून काही विशिष्ट मागण्या असतात, ज्यामुळे त्यांच्या वाचनाचा पॅटर्न ठरतो. (उदा. समूहमग्न कविता आवडणाऱ्याला फार तर सहमग्न कविता आवडू शकतात आणि आत्ममग्न कविता आवडणारा वाचक शक्यतो सहमग्न कवितेच्या पलीकडे जात नाही. तर असे हे एकूण ५ पॅटर्न्स). हे महत्त्वाचं आहे कारण तुम्ही कवितेला समजून घेऊ शकता किंवा नाही हे तुम्ही त्या काव्यप्रकाराची मागणी मान्य करू शकता किंवा नाही यावर अवलंबून असतं.  


समूहमग्न - समूहाची कविता. सर्वांची कविता! या कवितांना मास अपील असतं. या व्यासपीठावरून हातखंडा यशस्वीरित्या प्रस्तुत करता येऊ शकतात. यात शाहिरी काव्य, लावण्या, ओव्या, अभंग, विडंबन, सामाजिक कविता, विद्रोही कविता, विनोदी कविता, बालकविता, चारोळ्या, गजल इ. प्रकार येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर यात गुंतागुंत कमी असते, विचार स्पष्ट असतो, श्रोत्यांची गुंतवणूक सहज आणि अपेक्षित असते.
सहमग्न - दोघांची कविता! हा थोडा अधलामधला प्रकार आहे. यातली कविता कधी कुंपणाबाहेर (समूहमग्न) जाऊ शकते, तर कधी उंबऱ्याच्या आत (आत्ममग्न) येऊ शकते. निसर्गकविता, प्रेमकविता, स्त्रीवादी कविता, गजल वगैरे प्रकार यात मोडतात. यात श्रोता वाचकाच्या भूमिकेत आलेला असतो. मास अपील कमी झालेलं असतं. वाचकाची काही सामान्य अनुभवांशी जोडवणूक गृहीत धरलेली असते. वाचकाकडून विचारशक्ती, सौंदर्यवाद, अभिरुची, कलावादी दृष्टीकोन, शब्दांची पारख, किंचित गुंतागुंत / शब्दभ्रम सोडवण्याची हातोटी अपेक्षित असते .


आत्ममग्न - माझी कविता! स्वकेंद्रित, संदिग्ध, प्रस्तरी, दुर्बोध, क्वचित तुटक असं काहीसं या कवितांचं वर्णन करता येईल. इथे वाचकाचा परकाया प्रवेश गृहीत धरलेला असतो. विशिष्ट अनुभवांना विशिष्ट तीव्रतेनं भिडणं, शब्दांच्या/ अर्थांच्या नेमक्या छटांना उलगडणं,  वैयक्तिक संदर्भांचं वैश्वीकरण इ. गुणविशेष वाचकाकडून अपेक्षित असतात.


या लेखाचा मूळ उद्देश, अशा आत्ममग्न कवितांशी निगडीत आहे.


***   
                                                                                                                             
॥ग्रेस वाचताना॥


कविता : टोकदार भावनांची मोजक्या शब्दांमधे, प्रतीकांचे आधार घेत केलेली, नादमय उत्स्फूर्त मांडणी.


आत्ममग्न कवितांचा वाचक ग्रेसला टाळून सहजी पुढे जाऊ शकत नाही. माझ्यापुरतं सांगायचं तर आठवी-नववीत कधीतरी अचानक झालेली ग्रेसांची ओळख भक्ती, वेड, व्यसन या सगळ्या वळणांवरून शेवटी तटस्थ अभ्यास या टोकावर स्थिरावली आहे. ग्रेसांच्या कवितेने छळलेले बरेच जीव कुठे कुठे भेटत राहातात आणि ग्रेस समजून घेण्यासाठी घनघोर चर्चेचीही त्यांची तयारी असते. व्यक्तिशः मला मात्र कवितेवर चर्चा करायला आवडत नाही, तो माझ्यापुरता एक अत्यंत वैयक्तिक अनुभव असतो. पण चंद्रमाधवीच्या प्रदेशात चकवा लागू नये म्हणून काही खुणा मी नक्कीच सांगू शकतो. या खुणा मी कवितेच्या वर दिलेल्या ढोबळ व्याख्येच्या आधारे करणार आहे.


टोकदार भावना - कविता तीन प्रकारे समजून घेता येते; कवितेतील शब्दांमागचे अर्थ शोधणे आणि/किंवा कवितेची एकूण मांडावळ (इकोसिस्टीम) समजून घेणे आणि/किंवा कवीच्या खाजगी आयुष्यातील संदर्भ कवितेशी जुळवून पाहणे.


ग्रेसांच्या बाबतीत बोलायचं, तर शब्दकोशातून तुम्ही त्यांच्या शब्दांचे अर्थ तर शोधाल; पण त्या शब्दांचा पोत आणि ज्या वातावरणात त्यांना रुजू घातलं आहे, ते तुम्ही कुठून आणाल? ती मांडावळ सर्वसाधारण वाचकाच्या कल्पनेच्या पार पल्याडची आहे. शिवाय हा कवी स्वतःचं खाजगीपण प्राणपणाने जपतो. थोडक्यात, कविता समजून घेण्याचे तुमच्या परिचयाचे सर्व मार्ग इथे बंद होतात. आणि मग जो मार्ग उरतो, तो पूर्णपणे स्वतःच्या हिकमतीवर पार करावा लागतो.


वाचकाला सुरुवातीला या कवितेला शरण जावं लागतं. ही पुन्हापुन्हा वाचावी लागते. तिची अद्भुत शब्दकळा अंगात भिनवावी लागते ( त्या शब्दकळेच्याच प्रेमात पडून, तिथेच ‘संपणारे’ असंख्य भक्तही मला माहीत आहेत!). हा टप्पा तसा सोपा आहे.  


पुढचा टप्पा क्लिशे आहे. ग्रेसांची कविता ही ‘अनुभवावी’ लागते... असंख्य वेळा ऐकलेलं आणि वाचलेलं हे वाक्य प्रत्यक्षात उतरवणं महाकठीण काम आहे. ग्रेसांच्या कवितेशी रेझोनेट होण्यासाठी, भावनांच्या ज्या टोकाला कवी गेला आहे, त्या टोकापर्यंत वाचकाला पोचावंच लागतं. हे टोकाला पोचणं स्वानुभवांना कवितेशी जोडून-ताडून तरी साध्य होतं किंवा कल्पनाशक्तीच्या दांडग्या भरारीनं तरी. या अर्थाने ग्रेसांची कविता ही ‘भोगायची’ कविता आहे.


ग्रेसांच्या कवितेत वारंवार येणारे ख्रिश्चन धर्मातले किंवा संत साहित्यामधले किंवा पौराणिक संदर्भ, संध्याकाळच्या उदास हाका आणि मिथकांनी भारलेली त्यांची एकूणच मांडावळ या एका विशिष्ट संवेदनशीलतेला आवाहन करतात. एकटेपणा, भयगंड, नाकारलेपण, अपराधीपणा, विरोधाभास, शारीर वास्तव, समर्पण, द्वैतवाद, दुभंगता, उदासी, नार्सिझम, ईडिपस कॉम्लेक्स, खाजगीपणा जपत वैश्विक होण्याची कुतरओढ… हा एक पॅटर्न जेव्हा जेव्हा वाचकाला ओळखीचा वाटतो, तेव्हा तेव्हा तो त्या कवितांशी स्वतःला जोडू शकतो. (‘राजपुत्र आणि डार्लिंग’सारख्या रूपकविता हा एक पूर्ण स्वतंत्र अनुभव. आणि ग्रेसांनी तो अर्पणही केला आहे जीएंना! हा लेख ग्रेसांच्या कवितेच्या समीक्षेसाठी नसल्याने (हे माझंच दुर्दैव) हा एक प्रकार मी बाजूला ठेवला आहे. असो.) उदा.


आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतों
नदीच्या प्रवाहांत...   (वाट)


किंवा


मी उदास बसलो आहे
या एकट ओढ्यापाशी
परतीच्या गाई मजला
कां दिसती आज उपाशी?     (गाणे)


मोजके शब्द - मोजके शब्द हे कवितेचं दुसरं गूढ. सरगममधे चढत्या भाजणीतले सात सूर असतात - सा - रे - ग - म... जेव्हा एखादा गायक ‘सा’नंतर ‘रे’ लावतो, तेव्हा ते दोन स्वर एकमेकांमधे घट्ट रुतलेले नसतात, त्यांच्यामध्ये अंतराळ असतो. प्रतिभावंत गायकाला, संगीतकाराला या शब्दातीत अंतराळाचा अर्थ समजतो आणि त्याच्या योग्य वापराने ते आपलं गाणं परिणामकारकरीत्या   नटवतात. कवीचंही तसंच असतं. तो मोजक्या शब्दांमध्ये खूप काही सांगू पाहतो. त्यामुळे वाचणाऱ्याला गाळलेल्या जागा भरण्याचा उपद्व्याप करावा लागतो. मोजके शब्द वापरण्यामागे जशी (कविता) या फॉर्मची निवड आहे, तशीच ती कधी कवीची आंतरिक गरजही असू शकते. योग्य तेवढी संदिग्धता सोडली की कविता ही व्यक्तिसापेक्ष आकलनासाठी मोकळी होते. मोजके शब्द वापरण्यामागे  कधी कधी टोकदार भावना + उत्स्फूर्त मांडणी हे मिश्रणदेखील कारणीभूत ठरतं.


ग्रेसांच्या कविता रूढार्थाने लघुकविता नाहीत. पण वाचताना एक सुजाण वाचक म्हणून तुम्हांला त्यांचा विस्तार करता यायला हवा. त्या कवितांमागची गोष्ट, दोन ओळींमधल्या न लिहिलेल्या ओळी, तुम्हांला दिसायला हव्यात. ग्रेसांनी जाहीर कार्यक्रमात सांगेपर्यंत ‘ती गेली तेव्हा’ या कवितेचा अन्वयार्थ ‘आई देवाघरी गेली’ असंच होतं. मग ग्रेसांनी सांगितलं तिकडेच आई गेली असं लोक समजू लागले! का यावर विश्वास ठेवायचा? ही गोष्ट एखाद्या कर्ण नावाच्या मुलाची असू शकते (हे रक्त वाढतानाही । मज आता गहिवर नाही । वस्त्रांत द्रौपदीच्याही । तो कृष्ण नागडा होता ।) किंवा आपल्या याराबरोबर पळून गेलेल्या आईचीदेखील ही गोष्ट असू शकते.


किंवा "तहान" नावाची कविता-


कुठल्याही क्षणी यावेसें वाटतें.
हुतात्म्याच्या समाधीवरील फुलांसारखे
मंद मधुर दिवस…
मृत्युच्या पार्श्वभूमीवर गळणारे तुझें लावण्य
कुठल्याही क्षणी प्यावेंसे वाटतें...


ही कविता समजुन घ्यायची असेल तर ती वाचताना, तुमच्यासमोर एक गोष्ट उलगडायलाच हवी; एक अशी गोष्ट ज्यात प्रेमभंग आहे, ज्यात भेटण्याची ईच्छा आहे पण काही मर्यादा आहेत, ज्यात कुणी मृत्युशय्येवर आहे...


प्रतीकांचे आधार- कवितेचा आकृतिबंध हा प्रतिमा, प्रतीकं आणि संदर्भ यांनी भरलेला असतो. कवितेच्या व्याकरणात फारसं न अडकता मी सोयीसाठी प्रतिमा आणि प्रतीकांसाठी एकच शब्द - प्रतीकं - वापरत आहे.


ग्रेसांच्या कवितेत घोडा, हत्ती, कावळा, मोर, गाय, बगळे हे काही प्राणी/पक्षी; महाकाव्यातील व्यक्ती (उर्मिला, द्रौपदी, कर्ण, गांधारी, कुंती, कृष्ण); काही नाती - आई, सखी, मुली; काही नैसर्गिक घडामोडी - संध्याकाळ, पाऊस इ. सतत भेटत राहतात. पार ‘संध्याकाळच्या कविता’ ते शेवटच्या ‘बाई! जोगियापुरुष’पर्यंत सतत. उर्दू, इंग्रजी साहित्यातील संदर्भ जागोजागी पेरलेले असतात. यात कुठे काही मिरवण्याची वृत्ती किंवा चूस नसते, ती ग्रेसांची गरज असते.


ग्रेसांची कविता जशी नादमयी आहे, तशीच ती बऱ्याच अंशी चित्रमयीदेखील आहे. तुम्ही डोळस वाचक असाल, तर कॅनव्हासवर चित्र उलगडावं तशी ती कविता तुमच्या डोळ्यासमोर उलगडते. प्रतिमांचा वापर कवितेत वाचकाच्या डोळ्यांसमोर काही चित्र उभं करण्यासाठी केलेला असतो. उदा. मेघांचे कोसळती पर्वत । दरी निनादे दूर । गाव चिमुकला वाहुन जाईल । असा कशाला पूर (पाऊसगाणे). कवितेतला प्रतीकांचा वापर हा तुलनात्मक असतो. ग्रेस मुक्तहस्ते प्रतीकं वापरतात. उदा. जशा उडती घारी(१) गगन तितुके उंच जाई । तुझ्या हंबरणाऱ्या परत फिरवी सर्व गाई(२) (कवितेचं नाव : शब्द) (१- प्रतीक, २- प्रतिमा). किंवा आवर्तांच्या नृत्यभूमीत भटकणारा एक पक्षी । तसे तुझे केस (मरलीन मन्रो).


प्रतीकांच्या या खेळात मी काही नाती गृहीत धरली आहेत. कारण वाचकांनी त्यांच्याकडे निव्वळ शब्दशः रूढार्थाने बघितलं तर कवितांचं जंगल होऊन जाईल. इडिपस कॉम्प्लेक्सच्या टोकापर्यंत पोचलेलं मातृप्रेम, सखीच्या पातळीवर उतरलेली मैत्रीण, मुलीमध्ये प्रतिबिंबित होणारा इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स, उत्कट शारीर अनुभव या साऱ्या धीट भावना ग्रेसांच्या कवितेत नात्यांच्या प्रतीकांखाली खुबीने दडवलेल्या आहेत. सामान्य माणूस सहजगत्या या आवेगाने अशा नात्यांना भिडत नाही. म्हणून त्याचं नात्यांसंबंधीचं आकलन पारंपरिक राहतं आणि तो त्याच चश्म्यातून कविता वाचायला जातो. जेव्हा त्या कवितेचा पोत आणि नाती यांचा संबंध लागत नाही, तेव्हा तो हताश होतो (आणि कविता दुर्बोध ठरते!).


ग्रेसांच्या कवितेत महाकाव्यातील काही व्यक्तिरेखा पुन्हापुन्हा येत राहतात. या व्यक्तिरेखांमध्ये काही समान दुवे आहेत. उदा. उर्मिला किंवा कर्ण यांना त्यांची अत्यंत जवळची माणसं कारण न देता सोडून गेलेली आहेत. तिथे एक दुखावलेपण आहे. कुंतीच्या व्यक्तिरेखेतच एक अपराधगंड आहे. कविता वाचताना हे दुवे आपोआप उलगडायला हवेत.


ग्रेसांची कविता कळत नाही असं म्हणणारा एक मोठा वाचकवर्ग इंग्रजी वाङ्मय न वाचणारा आहे. ग्रेसांची प्रतिमासृष्टी ही या वाङ्ममयाशी ओळख सांगणारी आहे. उदा. कावळा (रोजचा असूनही घरात प्रवेश नसणारा, कर्कश, नकोसा इ.), घोडा आणि साप (प्रखर लैंगिकता, पौरुष इ.). अर्थात हे सुलभीकरण होय. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही वाचताना शब्द आणि अर्थ यांची या प्रतीकांशी सरसकट अदलाबदल करावी. सहज गंमत म्हणून मोजाल, तर घोडा/ घोडेस्वार हे प्रतीक कवितांच्या निव्वळ नावांमध्येसुद्धा आठ-दहा वेळा आलेलं दिसतं; ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’मध्येच जवळ जवळ पाच वेळा.


तिच्या देहाची वस्त्रदूर शरम  
माझ्या देहात आली
तेव्हा;
माझ्या घोड्यांना मी आंघोळ घातली
या झऱ्याच्या निर्मळ
पाण्याने... (पाषाणाचे घोडे)


किंवा


केशरी दिव्यांची तंद्रा
प्रासाद उभा कललेला
राणीच्या स्तनगंधाचा
ये वास इथे घोड्याला (घोडा)


नादमय उत्स्फूर्त मांडणी - चांगल्या शब्दांना तितक्याच ताकदीच्या संगीताची जोड मिळाली, तर त्या कवितांचं आयुष्य वाढतं. इतकंच नाही, तर तो एकूणच अनुभव वाचकांसाठी कविता सुलभ करायला मदत करतो.


ग्रेसांच्या छंदयुक्त कवितेला मुळातच एक नाद आहे. हा नाद अस्पष्ट स्वरूपात का होईना, पण तयार कानांना ऐकू येतो. त्याला ठोस स्वरूपात आणायला प्रयोगशील प्रतिभावंत संगीतकार हवा. असे प्रयोग त्या कवितांना एक कायमचा आकार देऊन, वाचकांचं काम हलकं करतात. हृदयनाथांनी ‘निवडुंग’मध्ये हे असं काम करून ठेवलं आहे. ग्रेसांचे कातर शब्द, हृदयनाथांचा विरक्त आवाज आणि हृदयाला हात घालणाऱ्या रचना; वाचकांसमोर ‘घर थकलेले संन्यासी’ किंवा ‘ती गेली तेव्हा’ यांसारख्या कवितांचं एक श्राव्यचित्र उभं करतात.


संगीताच्या सारणीतून झरणारी कविता वाचकाला अचानक भेटण्याची शक्यता दाट असते. त्यात चंद्रकांत काळ्यांनी ग्रेसांचेच ललितलेख वापरून त्या कवितांभोवती एक सूत्र मांडण्याचा अचाट उपक्रम केला. ग्रेसांच्या अनवट कवितांसाठी आनंद मोडकांनी तितक्याच अनवट चाली ‘साजणवेळा’मध्ये बांधल्या आणि त्या कवितांना मंगेशकरांच्या बरोबरीनं न्याय दिला. मुकुंद फणसळकरांचा स्वमग्न आवाज आणि माधुरी पुरंदरेंच्या आवाजातला विक्षिप्त टोकदारपणा, ‘साजणवेळा’मधून ग्रेसांची कविता अगदी अलगद वाचकांच्या झोळीत आणून सोडतात.


ग्रेस मला आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर भेटले, जिथं निवांतपण आणि गलबला एकाच वेळी पेलावा लागला आणि दोन टोकांवरचं जगणं त्यांच्या कवितांमुळे किंचित सुकर झालं. ग्रेसांसाठीचं एक जुनं टिपण सापडलं -


नाकारीत जून शकुनांना
गहिवरली संध्यासखी कळी
ना दिठीत रुजती शब्द
पण उघडी काळीज झोळी


ग्रेस वाचायचा असेल तर त्यांचे पहिले तीन कवितासंग्रह जरूर वाचा. त्यानंतर माणिक गोडघाटे लोकांसाठी व्यासपीठावर उपलब्ध झाले आणि कुठेतरी एका कवीची तपश्चर्या भंग झाली. त्यानंतर उरला तो निव्वळ शब्दांचा झगमगता पिसारा आणि काही हट्टी दुराग्रह. ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ हा ग्रेसांची परंपरा जपणारा शेवटचा कवितासंग्रह. ग्रेसांच्या प्रतिमासृष्टीला समजून घेण्यासाठी ‘चर्चबेल’ आणि ‘मितवा’मधले ललितलेख नक्कीच मदत करतात, पण तो अट्टहास नसावा.


कविता हा आयुष्यभराचा छळवाद असतो. काही कविता पुनःपुन्हा वाचाव्या लागतात, रोजच्या जगण्यात असा एखादा क्षण येतो, जिथे कवितेतल्या नेमक्या ओळींची अनुभूती येते आणि त्या वेळी ती कविता नव्यानेच भेटते.


॥गोरखधंदा॥


गंभीर कविता मी पहिल्यांदा १९९२ मध्ये लिहिली, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात. घरापासून लांब असण्याचं निमित्त नव्हतं, वायफळ मजा चालायच्या हॉस्टेलवर. पण ते जग उथळ आणि गुदमरून टाकणारं होतं. व्यवहाराला चिकटून येणारे सर्व गुण त्या जगात होते. संवेदनशील माणसाची वीण नकळत उसवून टाकण्याची अजब रीत असते अशा वातावरणाची. आपलं जग आणि ‘ते’ जग यांतला असा गुंता सोडवायचा तर चिवट मुखवटे लागतात. दोन टोकांना निभावण्याच्या या कसरतीत कुठेतरी कविता उगवून आली. भिडस्त माणसालाही कधी तरी बोलावंसं वाटतंच ना? स्वगतांच्या कविता झाल्या. कविताच का? कदाचित कवितांचं क्रिप्टिक स्वरूप असेल, कदाचित त्या सर्व आवेशाला पेलू शकणारा कविता हाच एक फॉर्म असेल; पण  आपला पिंड कवीचा हा तेव्हा नव्यानेच लागलेला शोध.  त्या काळी लिहिलेल्या टिपणाचा हा एक भाग : ‘मानसिक पातळीवरचे  भोगवटे हे नेहमीच दुय्यम मानले गेले आहेत. पण त्यांच्या अनावर स्फोटांची परिणती सर्जनाने आपल्याकडे वाटचाल करण्यात होते. ही मानसिक तरलता अंशरूप तरी वास्तवात आणणे ही सर्जनाची आत्यंतिक गरज असते. कारण त्या स्फोटाला सामोरे जाण्याची ताकद त्याच्यात नसते. त्याची तीव्रता कमी करण्याचे कागद हे केवळ माध्यम असते.’


तेव्हाची कविता ही बऱ्याच अंशी अभिव्यक्तीतून दिलेल्या प्रतिसादासारखी.


झाडे,
सारे ऋतू पानगळ मनात;
असून नसल्यासारखी अलिप्त.
खोल मुळे गाडून घट्ट उभी राहिल्यासारखी.
झाडे,
माणसांवर कलम होतात कधी,
स्वतःच्याही नकळत रुजून जातात
झाडे, मात्र वाटतात कधी कधी झाडांसारखी
(१९९२ - ‘झाडे’ कवितेतला भाग)


स्वतःत डोकावून बघण्याची निकड, माणसांचं प्रतिमाभंजन, नात्यांची बदलती परिमाणं या वळणांवरून कवितेचा प्रवास बरीच वर्षं चालला. कधीतरी टोकं थोडी बोथट झाली, स्वीकारा-नकारात समजूतदारपणा आला आणि कवितेत एक स्वल्पविराम आला. तोही बरीच वर्षं पुरला.
एका अर्थानं ते बरंही होतं. कवितेवरचे प्रभाव, कवितेची विचार करण्याची पद्धत आणि एकूणच कवितेचं उभं राहणं यांत थोडे बदल करता आले. लोक काहीतरी सांगण्याकरिता लिहितात, मला लपवण्यासाठी लिहायचं असायचं. त्या टोकापासून, ते ‘The more personal it is, the more universal it becomes.’ या टोकापर्यंत कवितेनं एक दीर्घ झोका घेतला.


पाण्याचे गोत्र निराळे
ते तहानलेले ओले
प्रतिमा वाहून नेताना
झाडास पुसे ना बोले
प्रतिमांचे साजण ओझे
झाडे जळता झुकली
माशांचे रडणे पाहून
पण झाडे भ्रमिष्ट झाली


(२००९ - ‘झाडे भ्रमिष्ट झाली’ कवितेतला भाग)

कवितेचं सुचणं ही माझ्यासाठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एखादी प्रतिमा, दॄश्य, शब्द, संगीताचा तुकडा, अनुभव रेंगाळत राहतो, तळ ढवळतो. त्या आकारहीन प्रतिमेला (प्रतिमाच ना? एक तरंग असतो निव्वळ.) अर्थाच्या नेमक्या छटेत बंदिस्त करण्याचा एक अगम्य अट्टहास केलाच, तर ती कवितेच्या जन्माची सुरुवात असते.


हैरान हूं इस बात पे, तुम कौन हो क्या हो?
हाथ आओ तो बुत, हाथ ना आओ तो खुदा हो
तुम एक गोरखधंधा हो


अर्थाचा साचा सापडला(च) तर शब्दांचे पोत न्याहाळत बसावं लागतं, गण-मात्रा-वृत्तांचे हिशेब ही निव्वळ उत्क्रांतीनंतरची गोष्ट आहे. हा विदेही ते सदेही प्रवास काही क्षणांचा असू शकतो किंवा अनंत काळचा. (‘सखीचे किनारे । असे पावसाळी । जसा बुद्ध । डोळ्यातुनी हासला’ या ओळी लिहिल्यानंतर पुढची पूर्ण कविता लिहायला कैक वर्षं लागली). आपलं कवीपण या काळात जपणं ही तशी जोखमीची बाब. त्या नंतरच्या प्रक्रियेशी माझा कवी म्हणून फारसा संबंध नसतो. कविता कुठेतरी प्रसिद्ध व्हावी ह्याबाबत मी ठरवून उदास असतो (नपेक्षा ब्लॉग बरा). कुणीतरी ती वाचावी हे उत्तम, पण त्यावर चर्चा करावी हे महापाप.
  
कवितेच्या छापून येण्याशी कुणी कवी असण्या-नसण्याचा काही संबंध नसतो, नसावाही. कवीपणाचा माज मात्र मिरवता आला पाहिजे.


***


संदर्भ:
ग्रेसांचे काव्यसंग्रह :
संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)
बाई! जोगियापुरुष (२०१३)


ललितलेखन
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)

ओल्या वेळूची बासरी (२०१२)
***
चित्रश्रेय : ऋतुजा
चित्रातले शब्द : संजीवनी बोकील
5 comments