मराठी कवितेची बदलती उच्चारसरणी

विसाव्या शतकातल्या मराठी कवितेची बदलती उच्चारसरणी 
विंदा करंदीकरांच्या कवितेतली उदाहरणे
- धनंजय वैद्य
विसाव्या शतकातील मराठी प्रमाणबोलीतील पद्य कविता मोठ्याने वाचताना एक गोष्ट जाणवते - उच्चारातल्या स्वाभाविक ध्वनिजोडणीचे (फोनोटॅक्टिक्सचे) वेगवेगळे प्रकार आहेत. पुष्कळ वाचकांच्या तोंडून जरी हे वेगवेगळे उच्चार आपोआप उमटत असले, तरी जाणिवेच्या स्तरावर हे त्यांना ठाऊकही नसते. या वेगवेगळ्या उच्चारसरणी कुठल्या? त्यांचा कवितेच्या आशयाशी संबंध आहे का? या मुद्द्यांचा मागोवा विंदा करंदीकरांच्या कवितांमार्फत मला या लेखात घ्यायचा आहे.
विंदा करंदीकरांच्या कवितांतली पुढील तीन उदाहरणांत हा फरक आपण अनुभवूया :
उदाहरण १ ('माझ्या मना बन दगड', १९४९) :


हा रस्ता अटळ आहे!
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शीव!
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्वास.
विसर त्यांना दाब कढ;
माझ्या मना बन दगड.


उदाहरण २ ('निळा पक्षी', १९५०) :


याचे गान
याचे गान
अमृताची
जणू सुई;
पांघरूण
घेतो जाड,
तरी टोचे;
झोप नाही
जागविते
मेलेल्याला;
जागृतांना
करी घाई.


उदाहरण ३ ('यंत्रावतार', १९४९)


ये यंत्रा ये!
ये ये घडवित सृष्टी,
ये ये सुखवित कष्टी;
ये ये होउन ब्रह्मा, विष्णू, शंकर;
ये उच्चारित वेद नव्या रचनेचे,
ये ये फिरवित अपुले चक्र सुदर्शन;
ये ये नाचत युगप्रवर्तक तांडव;
ये ये टाकित वाफेच्या फूत्कारा;
ये ये फिरवित नेत्रांतून विजांना;
ये ये तोडित अणू-अणूच्या बेड्या;
शक्तीच्या सम्राटा!
चिरशांतीच्या भाटा!
ये ये हुडकित दडलेल्या मंत्रांना;
मानवतेला दे ज्ञानांतुन मुक्तीचा नजराणा!


(जमल्यास जोडलेली ध्वनिफीत ऐकावी.)

तीन्ही उदाहरणांची योग्य वाचने:


उदाहरण १ (योग्य व विपरीत वाचन):


उदाहरण २ (योग्य व विपरीत वाचन):


उदाहरण ३ (योग्य व विपरीत वाचन):

तीन्ही उदाहरणांत अक्षरे (सिलॅबले) उच्चारण्याच्या तीन वेगवेगळ्या तर्‍हा आहेत. तर्‍हा वेगवेगळ्या आहेत म्हणून प्रत्येक उदाहरणातल्या ओळी शब्दांतले आघात, तालमात्रा किंवा वजनाच्या (लघुगुरुत्वाच्या) अशा वेगवेगळ्या लयींत बद्ध आहेत – ध्वनिफितीत लयमापकाच्या (मेट्रोनोमच्या) टाळ्यांची काटेकोर साथ आहे.
पारंपरिक छंद-वृत्तांतील नाहीत, अशी ही तीन उदाहरणे मुद्दाम घेतलेली आहेत. पहिल्या उदाहरणातील बोलगीत कविता या बहुधा विसाव्या शतकातल्या उत्तरार्धातच कवी वापरू लागले. दुसऱ्या उदाहरणात शालेय आठवणींतील अक्षरे मोजणारे छंद आठवतील, उदाहरणार्थ अष्टाक्षरी, पण येथे चतुरक्षरी अशी वेगळीच बांधणी आहे. तिसर्‍या उदाहरणात मात्रा मोजणारी वृत्ते आठवतील, उदाहरणार्थ पादाकुलक, पण येथे ४-४ मात्रांचे गण असले तरी ओळीगणिक कमीअधिक गण आहेत. हे मुद्दे थोडे विंचरून बघूया :
(१) पहिल्या उदाहरणात आधुनिक मराठीतील सहज बोलण्याची सरणी आहे. काही काही शब्दांतील सहज आघात लयीत यावेत, म्हणून मधली अक्षरे कमीअधिक वेगाने उच्चारली जातात, इतके सहज बोलण्यापेक्षा वेगळे. त्यात आधुनिक वापराप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी पुराणमराठीतील 'अ'कारांचा लोप होतो -
ज्ञानाशिवाय्, मानाशिवाय् \ कुड्-कुड्-णारे हे जीव् \ पाहू को! डोळे शीव्!
हिला आपण या लेखात 'सरणी १' म्हणू या.
(२) दुसर्‍या उदाहरणात लिहिलेल्या प्रत्येक अक्षराला समसमान काळ देऊन उच्चारले जाते, उच्चारात र्‍हस्वदीर्घ वा लघुगुरू असा फरक केला जात नाही, आणि सर्व लिहिलेले 'अ'कारही आधुनिक सरणीप्रमाणे लुप्त न होता समान काळ देऊन उच्चारले जातात, हे तर आहेच.
या-चे- गा- न॑ \ अ-म्रु-ता-ची \ ज-णू- सु-ई \
पां-घ॑-रू-ण॑ \ घे-तो-जा-ड॑ \ त॑-री-टो-चे \
(आकड्यांत अक्षरे मोजलेली आहेत.) हिला आपण या लेखात 'सरणी २' म्हणू या.
(३) तिसर्‍या उदाहरणात गुरू अक्षरे दोन मात्रांचा काळ देऊन उच्चारली जातात, आणि लघु अक्षरे एका मात्रेचा काळ देऊन उच्चारली जातात. आणि सर्व लिहिलेले 'अ'कार एका मात्रेचा काळ देऊन उच्चारले जातात, हे तर आहेच.
ये१-२उच्३-४चा५-६रित॑ वे१-२ न॑व्या५-६ र॑च॑ने१-२चे३-४ \
ये१-२ ये-३४ फिर॑वित॑ अ॑पुले३-४ चक्५६र॑ सुदर्१-२श॑न॑ \
(आकड्यांत मात्रा मोजलेल्या आहेत. सर्व 'अ'कार लोप न करता उच्चारायचे आहेत, याची खूण म्हणून त्यांच्यावर उभी रेघ दिलेली आहे.) हिला आपण या लेखात 'सरणी ३' म्हणू या.
वरील तीन प्रकारचे उच्चार हे कवीला अभिप्रेत आहेत, आणि वाचकालाही अनायासे तेच पटतात. हे निदर्शनास यावे म्हणून मुद्दामून तीन्ही पद्यखंड 'चुकीच्या' उच्चारसरणीने वाचून म्हटलेली ध्वनिफीतही ऐकावी. उच्चाराची तऱ्हा चुकली, तर लय विद्रूप वाटते, शब्द आकळणे कठीण होते, अर्थाची हानी होते.
कवितेसारख्या ध्वनिप्रधान कलामाध्यमात उच्चारसरणीची निवड सहेतुक होते, ही बाब स्वयंस्पष्ट भासते. तरी या निवडप्रक्रियेचे उघड वर्णन मी ऐकलेले-वाचलेले नाही. इतकेच काय, छापलेल्या कवितेत वाचकाने कुठल्या सरणीत उच्चार करावा, त्याबाबत साधारणपणे काहीही निर्देश नसतो. करंदीकरांनी साधारण याच काळात (१९४९ मध्ये) रचलेल्या 'धोंड्या न्हावी' कवितेत अनायासे हा पडदा किंचित सारला, आणि आपल्याला या निवडप्रक्रियेची झलक मिळते. या एकाच कवितेत वेगवेगळ्या कडव्यांत सरणी १ व ३ मध्ये उच्चार अपेक्षित आहेत. या मिश्र अपेक्षेमुळे कवीला लेखी चिन्हांनी उच्चारसरणीचा निर्देश करावा लागला.
कथाकथक सरणी १ मध्ये बोलतो :
उदाहरण ४ ('धोंड्या न्हावी', कडवे १, १९४९)


कधी कधी मी
कोकणातल्या गावी गेल्यानंतर
जुन्या स्मृतींच्या गांधिलमाशा मजला येउन डसती


उदाहरण ४ चालू ('धोंड्या न्हावी', कडवे १, मात्रा मोजणी)


कधी कधी मी|
कोकणातल्या| गावी गेल्या| नंतर|४
जुन्या स्मृतींच्या| गांधिलमाशा| मजला येउन| डसती|४


जर कोणी पहिल्या दोन ओळी सरणी १ वा २ मध्ये वाचू लागले असेल, तर तिसऱ्या ओळीत 'येउन' शब्दावर हमखास अडखळायला होते. प्रमाणलेखन 'येऊन' मध्ये '' ऐवजी '' लिहून कवी स्पष्ट संकेत देतो – येथे ऱ्हस्वदीर्घ विचलित का असेनात, ते कवी सांगतो तसेच काटेकोरपणे उच्चारणे अपेक्षित आहे. सरणी ३ मध्ये वाचताना सवयीनुसार लगेच लक्षात येते, की ८-८ मात्रांचे गण आहेत, व बहुतेक ओळींत शेवटाला ४ मात्रा अधिक आहेत :
पुढल्या एका कडव्यात धोंड्या न्हाव्याच्या तोंडचे बोल असे दिले आहेत :
उदाहरण ५ ('धोंड्या न्हावी', कडवे ७)
त्ये पैसे मी| फेडिन् साक्षी| ईश्वर|४
झिलाक लिव्’ला| होता ‘पैसे| पाठव’|४
- लिव्’णारो हो| तुम्’चो पांडू|मास्तर|४


कवीने येथे ८-८ मात्रांचे गण कायम ठेवले आहेत, परंतु काही शब्द सरणी १ मध्ये उच्चारायचे आहेत, असा काही अक्षरांचा पाय मोडून स्पष्ट निर्देश केलेला आहे. येथे फरक केवळ कथन विरुद्ध संवाद असा नाही, कारण कथाकथकाच्या नात्यातले दादा सरणी ३ मध्येच बोलतात :
उदाहरण ६ ('धोंड्या न्हावी', कडवे ५)
धोंड्या न्हावी|
‘म्हणजे निव्वळ| फत्तर’|४
म्हणती *अमुचे| दादा|४
एका वर्षा|मध्ये|४
लागोपाठ त|याचे|४
पोर वारले| पटकीने चौ|घेजण|४
अमुचा हा धों|ड्या पण|४
आहे तैसा| आहे! बदल न| बिलकुल|४


पुढल्या कडव्यात विष्णू वाण्याच्या तोंडी मात्र सरणी १ उच्चारातले शब्द आहेत. तर 'धोंड्या न्हावी' कवितेत तरी सरणी १ म्हणजे अशिक्षित वा अब्राह्मण, आणि सरणी ३ म्हणजे सुशिक्षित वा ब्राह्मण, असे पात्रे रंगवायचे तंत्र आहे.
अर्थातच हे विश्लेषण आपल्या पहिल्या 'माझ्या मना बन दगड' उदाहरणाला लागू होत नाही. तरी हा सुगावा म्हणून उपयोगी ठरतो. सरणी १ मध्ये आधुनिकता आणि अनौपचारिकता आहे. मोकळ्याढाकळ्या आत्मनिवेदनाकरिता सरणी १ चांगले वाहन आहे. विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात आशय आणि तंत्राचे परंपराभंजक प्रयोग करणाऱ्या मर्ढेकरांना सरणी १ ची अनौपचारिकता पटली नव्हती. मर्ढेकरांनी गद्य अनौपचारिकतेची खिल्ली करायला सरणी १ वापरलेली आहे :
उदाहरण ७ ('आणखी कांही कविता, १२', कडवे ५)


इरेस पडलों| जर बच्चम्’जी|
तर भाषेची| ऐशीतैशी|
उलटीसुलटी| करीन मीहि|
भव्य भयानक| विराट् कप्’बशी|


मात्र शतकाच्या उत्तरार्धात करंदीकर आशयाचे पोषण करण्यासाठी तीन्ही उच्चारसरणी यथायोग्य निवडण्याचे यशस्वी प्रयोग करू शकले. उच्चारसरणी ३ औपचारिक आहे, हा त्यांनी दोष म्हणून बघितला नाही – सार्वकालिक सत्य सांगताना ही सरणी आशयाला पोषक असते.
उच्चारसरणी २ ही संतकाव्य आणि स्त्रीकाव्यात जपलेली आहे. हे सांस्कृतिक पडसाद जेव्हा आशयाला आधार देतात, तेव्हा कवितेत ती वापरलेली दिसते. वर 'निळा पक्षी' या आध्यात्मिक-तात्त्विक आशय असलेल्या कवितेचे उदाहरण दिलेले आहे. स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या कवितेचे हे अष्टाक्षरी छंदातले उदाहरण :
उदाहरण ८ ('थोडी सुखी थोडी कष्टी', कडवे ४-५)


ओळखीचे आले वाडे,
आली, आली, गेली शाळा
"अगबाई! तोच हा का?"
तिला चंदू आठवला!
आठवले सारे सारे,
आठवले त्याचे डोळे;
आणि तिच्या काळजात
काही थरारून गेले


स्त्रीबद्दल ममत्वाने पण पुरुषाच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या कवितेत वेगळीवेगळी उच्चारसरणी निवडलेली दिसते :
येथे उच्चारसरणी ३  :
उदाहरण ९ ('फितुर जाहले तुजला अंबर')


तुडुंब भरलिस| मातृत्वाने;|
काजळ वाहव|ले गालावर.|


तर येथे उच्चारसरणी १  :
उदाहरण १० ('झपताल')


ओचे बांधून पहाट उठते... तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस.
...कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून दोन डोळे उमलू लागतात;
आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर
बाळसे चढते. ...


एकविसाव्या शतकात उच्चारसरणी ३ चा वापर काहीसा कृतक, वा गतकाळात अडकलेला वाटायचा धोका जाणवतो. 'कविता : विसाव्या शतकातली' या संग्रहात १२० निवडक कविता कालक्रमाने दिलेल्या आहेत, त्यात अंतिम १० पैकी ९ कविता सरणी १ मध्ये आहेत, उरलेली १ सरणी २ मध्ये आहे. तुलना करावी - या संग्रहातील पहिल्या १० पैकी १० कविता सरणी ३ मध्ये आहेत, हा फरक प्रचंड आहे.
ध्वनिजोडणीचे (फोनोटॅक्टिक्सचे) हे संक्रमण ज्यांनी आपल्या रचनाकाळात जगले, त्या मराठी कवींनी हा भाषिक बदल कसा पेलला आणि आत्मसात केला? विंदा करंदीकरांची कविता याबाबत वस्तुपाठ ठरावी.
***
तळटीप
*अमुचे - ‘आमुचे’ असा छापील पाठ निश्चितच प्रामादिक आहे. दोन ओळी पुढे ‘अमुचा’ असे ठीक छापलेले दिसते.
संदर्भ
१. संहिता : विंदा करंदीकरांची निवडक कविता, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, चतुर्थावृत्ती १९९७
२. मर्ढेकरांची कविता, मौज प्रकाशन, मुंबई, प्रथमावृत्ती १९५७ (पुनर्मुद्रण १९९४)
३. कविता : विसाव्या शतकातली. संपादक – शां. ज. शेळके, प्र. ना. परांजपे, व. आ. डहाके, नी. गुंडी, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, द्वितीयावृत्ती २००६.

***
2 comments