जिमी

- आदूबाळ
नव्या नोकरीचा पहिला दिवस नेहेमीच जरा भीतिदायक असतो. काम जमेल का? सहकारी कसे असतील? हजार प्रश्न. त्या नोकरीच्या वेळी तर धोपटमार्गा सोडून मुद्दाम बिकट वाटेची वहिवाट करायला घेतली होती. आमच्या सत्तावन्न पिढ्यांत कोणी हॉटेलात नोकरी केली नव्हती. मीही तसा कारकुनी पेशात असल्यामुळे करण्याची शक्यता नव्हतीच, पण या हॉटेलाने नोकरी देऊ केली, म्हटलं - बघू या तरी कसं असतंय.
मध्य मुंबईतल्या जागेचे भाव प्रचंड. त्यामुळे हॉटेलातली जास्तीत जास्त जागा गेस्ट एरिया म्हणून वापरायला ठेवलेली. त्याखालोखाल किचन, बेकरी वगैरेचा नंबर. त्याखालोखाल हाऊस कीपिंगचा. अकाउंट्स, एचार वगैरे भाकड डिपार्टमेंटांना कुठल्यातरी भोकात जागा दिलेली. दोन अरुंद जिने, वरून पाईप गेलेली एक काळपट बोळकंडी आणि एक शिडीवजा जिना चढून आम्ही अकाउंट्समध्ये पोचलो. पंचतारांकित हॉटेलाच्या चकचकीत आणि गुळगुळीत ग्राहकांपैकी कोणी इथपर्यंत पोचला असता, तर झीट येऊन पडला असता. दृष्टीआड सृष्टी!
आत जुन्या पद्धतीची टेबलं आणि हातवाल्या लाकडी खुर्च्यांवर अकाउंट्सचा स्टाफ विराजमान होता. टेबलखुर्च्यांची रचना शाळेच्या वर्गासारखी - एकामागे एक. वर्गशिक्षक बसतात त्या जागी मात्र लाकडी पॅनल्सने बनवलेली तकलादू केबिन आणि त्यावर 'Financ Controller' असा बोर्ड. 'e' पडून गेला होता. कुणी पाटी बदलायचे कष्टसुद्धा घेतले नव्हते. अकाउंट्स डिपार्टमेंटच्या सौभाग्यचिन्हांसारख्या असलेल्या बॉक्स फायली, जंबो पंच आणि स्टेपलर इतस्ततः पसरले होते.
आम्हांला पाहून आतला कोलाहल हळूहळू शांत झाला. डॉटमॅट्रिक्स प्रिंटरचा खरखराट तेवढा राहिला. झूमध्ये आलेल्या नवीन प्राण्याकडे जुने प्राणी कसे पाहत असतील, तसा समोर बसलेला समुदाय मला निरखून पाहू लागला. 'नया पंछी आनेवाला है'ची खबर बहुधा त्यांना लागली असावी. मीही त्यांना निरखून पाहू लागलो. काळ्या केसांपेक्षा करड्या-पांढर्‍या केसांचा आणि टकलांचाच भरणा जास्त दिसत होता. एकंदर वातावरण आणि सहकारी पाहून 'ये कहाँ आ गये हम' अशी भावना आल्याचं स्पष्ट स्मरतं.
आमचा नजरबंदीचा खेळ चालू असताना शेवटच्या टेबलावरून एक गोलमटोल इसम उठला आणि माझ्या दिशेने गडगडत यायला लागला.
"हेलो यंग मॅन! वेलकम! आय एम जिमी." माझा हात खांद्यापासून हलवत तो म्हणाला. हा हसरा गुब्ब्या पारशी आहे हे समजायला त्याचं बर्थ सर्टिफिकेट पाहायची गरज नव्हती. बावाजींनी लगेच माझा ताबा घेऊन टाकला. सगळ्यांशी ओळख करून दिली, लाकडी केबिनमधल्या बादशहाकडे पेशी करून आणली, हॉटेलच्या शिंप्याकडे रवाना करून युनिफॉर्मचा सूट शिवायला टाकला वगैरे. मला स्टाफ कँटीनमध्ये जेवायला घेऊन गेला. मी मराठी आहे हे कळल्यावर सरळ मराठीत बोलायला लागला. माझं वय कळल्यावर 'मला मुलगा असता, तर तुज्याच वयाचा असता' हे त्यानं सांगितल्यावर त्याच्या वयाचा अंदाज आला. एरवी त्याचं वय समजणं अवघड होतं - पस्तिशीपासून साठीपर्यंत कुठल्याही वयाचा असू शकत होता तो.
शेवटी त्याने मला माझं टेबल दाखवलं. त्याच्या टेबलाच्या पुढेच होतं, शेवटून दुसरं. "तू तुज्या स्क्रीनवर काय बघतो ते कोनाला कलनार नाही, मला सोडून." आपले वाकडेतिकडे दात दाखवत म्हणाला. "पोर्न बगू नकोस फक्त, आयटीवाल्याला कलेल!" तो खट्याळपणे म्हणाला.
[जिमी-वाणीचं एक स्पष्टीकरण इथे देणं गरजेचं आहे - म्हणजे वाचकांना जिमीचा आवाज 'ऐकू' येईल. च, ज या अक्षरांचा हलका उच्चार (उदा. चमचा, जहाज) त्याच्या झोराष्ट्रीयन जिभेबाहेरचं काम होतं. ही अक्षरं जड बनून यायची (उदा. चार, जिरे). सोयीसाठी ती ठळक केली आहेत.]
युनिफॉर्मचा सूट शिवून आला आणि मंडळींनी मला त्यांच्यातलं मानलं. बरेचसे कोकणातून आलेले - राणे, सावंत, सामंत, महाडिक, संगे. दोनतीन बोहरी. दोनतीन गोवन कॅथलिक. बाकीचे पिढीजात मुंबैकर. इतका मोकळाढाकळा माणसांचा कळप मी कधी पाहिलाच नव्हता. जात/धर्म आणि त्या अनुषंगाने येणार्‍या गुणदोषांची चर्चा दबक्या आवाजात, बंद दारामागे व्हावी अशा पार्श्वभूमीतून मी आलेला - आणि इथे सगळंच उघडं, नागडं आणि वेशीला टांगलेलं. गोवन कॅथलिक डिकास्टाला सरळ सरळ 'ए बाटग्या' असं पुकारलं जायचं. बिलात जमा झालेली टीप हिशोब करून कॅप्टनच्या स्वाधीन करणं हे माझ्या कामांपैकी एक होतं. त्यावरून "भटाच्या हातून कसले पैसे सुटतायत?" अशी माझी संभावना होत असे.
त्यातही जिमी आघाडीवर. साध्यासाध्या गोष्टींत चुका करणार्‍या अरिफ संगेला "अकलेलापण कटपीस आहे गेलचोदिया" असं खणखणीत आवाजात सांगायचा. मुंबईतली चौथी पिढी असलेल्या वेंकटचलमला "हटाव लुंगी, बजाव पुंगी"ची घोषणा देऊन सतावायचा. कॅशियर म्हात्रे तर जिमीचं लाडकं गिर्‍हाईक. "पांकलसी पांकलसी" म्हणून तो फार मागे लागायचा. कॅशियरच्या जाळीदार केबिनमध्ये एसी पोचायचा नाही, म्हणून म्हात्रे शर्ट काढून बनियनवर बसायचे. जिमीची बडबड असह्य झाली की तसेच बाहेर यायचे आणि शिव्या घालायचे. जिमी अर्थातच पलटवार करायचा आणि पुढची पंधरा मिनिटं ही शिव्यांची मैफिल रंगायची.
जिमी अकाउंट्स पेयेबल बघायचा - पेरिशेबल्सचे. म्हणजे आईस्क्रीमपासून लिंबापर्यंत हॉटेलला लागणार्‍या सगळ्या नाशिवंत पदार्थांची बिलं याच्याकडून पास व्हायची. या वस्तूंचे व्यापारी म्हणजे वाशी, भायखळ्याच्या बाजारातली मोठमोठी धेंडं. पैसे देण्यासाठी नव्वद दिवसांचं क्रेडिट असे. यानंतर व्यापार्‍यांच्या घिरट्या सुरू होत. पण जिमीचं स्वतःचं एक टाईमटेबल असे. म्हणजे सोमवारी भाजीपाल्याची बिलं पास करायची, मंगळवारी मांसमच्छीची, वगैरे. श्रावण पाळणार्‍या भटाच्या श्रद्धेने हे टाईमटेबल पाळलं जायचं. (याला अपवाद दोनच होते - कुलाब्यातल्या मच्छीमार नगरच्या कोळणींची सोसायटी आणि मोहम्मद अली रोडवरचा गोळ्या विकणारा एक बोहरी म्हातारा. त्यांची बिलं ताबडतोब पास व्हायची - बर्‍याचदा नव्वद दिवसांच्या आतच.) चुकीच्या दिवशी चुकीचा व्यापारी पैसे मागायला आला की जिमीची खोपडी सटकायची; आणि तो वयाने, मानाने, पैशाने किती का मोठा असेना - त्याला जिमी शिव्यांच्या फायरिंग स्क्वाडसमोर उभं करायचा.
सकाळी नवाच्या ठोक्याला जिमी त्याच्या खुर्चीत हजर असायचा. वाराप्रमाणे बिलांचे गठ्ठे अरिफ संगेने बांधून ठेवलेले असायचे. एक एक बिल काढून ते तपासायला सुरुवात. पद्धतशीरपणे बिलांवर लाल-हिरवे फराटे ओढले जायचे. मध्येच त्या वाराचं नसलेलं बिल सापडलं की अरिफच्या नावाने शंख. मग हिरव्या बिलांची सिस्टिममध्ये एंट्री. मग लाल बिलवाल्यांना फोन फिरवले जायचे. स्वभावाप्रमाणे प्रथम शिव्यांची बरसात, मग शंकानिरसन. शंका किमतीविषयी असेल, तर त्याच्या दृष्टीने प्रश्न संपलेला असायचा - कारण ‘जिमीवाक्यं प्रमाण‌म्‌’!
क्वांटिटीविषयक शंका असेल तर वेगळं नाटक. स्टोअरकीपर सामंत 'रिसीव्ड क्वांटिटी'चा रिपोर्ट पाठवायचे. 'बिल्ड क्वांटिटी' बर्‍याचदा जास्त असायची. व्हेंडर कुरकुरायचा. एरवी बारीकसारीक कारणावरून व्हेंडरची आईबहीण काढणारा जिमी अशा वेळी मात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा  राहायचा. जिमीचा सामंतांना फोन: "बाल सामंत, तू जीआरेन काढतो, तेवा काय मूनशाईन पिऊन येतो काय?" अशी प्रस्तावना करून "माजा व्हेंडर माज्यावरच चढतो!" अशी तक्रार करायचा. सामंत वैतागायचे: "च्यायला जिम्या, फोकलीच्या तूच काय तो कामं करतो आणि आम्ही पाट्या टाकतो होय रे भाड्या?" सामंत, जिमी आणि व्यापारी यांची एकत्र रुजुवात होऊन शेवटी एकदाचा बिलाला मोक्ष मिळायचा आणि सिस्टिममध्ये जायचं.
एकदा आम्हांला कसल्याशा ट्रेनिंगला बरोबर जायचं होतं. वक्त का पाबंद जिमी आवरून माझ्या टेबलाशी घोटाळत होता. मला केबिनस्वामीने नेमकं एक अर्जंट काम दिलं होतं. जिमी अस्वस्थ होऊन घिरट्या घालत होता. माझं जरा आवरल्यासारखं दिसताच म्हणाला: "काय रे आदूबाल, कु कदी करायचा आपण?"
माझा कानांवर विश्वास बसेना! "काय कधी करायचं जिमी? परत बोल?"
"कु, कु. बरोबर बोलला ना मी?"
"शब्द एकदम पर्फेक्ट आहे जिमी! एवढं हाय क्लास मराठी कुठून शिकलास?"
"अरे काय सांगतोस!" खूश होत जिमी म्हणाला "बीस बरसपूर्वी अकाउंट्समदे आलो. तेवा एका बाजूला जोशी आणि एका बाजूला रनदिवे बाय. मराठी शिकेल नायतर काय होईल?"
"वीस वर्षांपूर्वी? त्याआधी काय करत होतास?"
त्या आधी दहा वर्षं जिमी 'रनर' होता. दक्षिण मुंबईतली बडीबडी धेंडं हॉटेलात यायची. पंचतारांकित हॉटेलात आपण नेहमीचे आहोत, आपल्याला ओळखतात, बिल येत नाही, हा म्हणे एक स्टेटस सिंबॉल होता. मग असं गिर्‍हाईक (बिल न भरताच) गेलं, की रनरने त्याच्या मागोमाग जायचं आणि 'मेत्ता'कडून किंवा अकाउंटंटकडून ते सेटल करून आणायचं.
अशाच एका सेठजीकडे त्याला महानाज दाडीसेट भेटली. आपण रनर, ती सेठजीची मुलगी असला कुठलाही विचार मनात न आणता तो तिला पटवण्याच्या उद्योगाला लागला. यथावकाश महानाज दाडीसेट आणि जमशेद रुस्तमजी सेठना यांचं लग्न झालं.
सासर्‍याचं आणि जिमीचं फारसं पटलं नाही. सासरा हिंदी सिनेमांचा परदेशातला डिस्ट्रीब्यूटर होता. त्या व्यवसायात जिमीने मदत करावी अशी त्याची अपेक्षा होती. जिमीला सासर्‍याच्या अंगठ्याखाली राहणं मान्य नव्हतं. त्याने हॉटेलमधली नोकरी चालू ठेवली. सासर्‍याने वैतागून जिमीला आणि महानाजला 'जायदाद से बेदखल' करायची धमकी दिली.
"साला आय डोंट ब्लडी केर... आहे त्यात मी खूश आहे."
माझ्या मनात एक अस्सल पुणेरी प्रश्न होता, पण विचारायचा संकोच वाटत होता. जिमीला बरोबर समजलं.
"नॉट ऑल पारसीज्‌ आर वेल्दी. सगले गोदरे आनि टाटा नसतात. माज्यासारखे गरीब पारसीज्‌पन असतात."
गरीब पारशांसाठी त्यांच्या समाजाने अल्प भाड्यात राहायची सोय केली आहे. त्यातल्या एका "कॅप्टन्स कॉलनी" नावाच्या चाळीत जिमीच्या दोन खोल्या होत्या.
"या कावळ्यांचं काही सांगता येत नाही." आमचं संभाषण ऐकत असलेले म्हात्रेशेट म्हणाले. "उद्या सासरा खपला की याचंच आहे सगळं. ** पुसायला पण नोटा घेईल साला."
जिमी ठो ठो करून हसला. "आय वुड डाय सूनर दॅन द ओल्ड मॅन. मी असा राहनार, म्हात्रे. कॅप्टन्स कॉलनीतून शेवटचा अगियारीत जानार..."
जिमी सासर्‍याला बरोबर ओळखून होता, पण स्वतःबद्दलचं त्याचं भविष्य चुकणार होतं.
***
"रामजीभाई कमानी मार्ग कुठे आला रे जिमी?"
बिकट वाटेची वहिवाट करायला काही साधलं नव्हतं. मी नवी नोकरी शोधत, इंटर्व्यू देत हिंडत होतो. भारताच्या आर्थिक राजधानीच्या कुठल्याकुठल्या कोपर्‍यांत जावं लागे. मुंबईतले - विशेषतः 'टाऊन'मधले (जिमीचा शब्द) रस्ते बर्‍याचदा सासरची, माहेरची अशी दोन नावं घेऊन वावरतात. कॅडल रोड म्हणजेच वीर सावरकर मार्ग, हुतात्मा चौक म्हणजेच फ्लोरा फाउंटन, एस्प्लनेड रोड म्हणजे पी डिमेलो मार्ग हे कळायला बरेच टल्ले खावे लागतात. अशा वेळी सर्वात सोपा उपाय म्हणजे जिमीला विचारणे. रनर असण्याच्या काळात सगळे रस्ते त्याच्या पायाखालचे होते. "तुला कशाला पायजे रे? कुठे जाचाय?" कधी फारसा भोचकपणा न करणारा जिमी या वेळी मात्र खोदखोदून विचारत होता.
कसाबसा त्याला कटवून त्याच्याकडून इष्ट माहिती काढली आणि इंटर्व्यूला दाखल झालो. बॅलार्ड इस्टेटमधली जुनाट इमारत. कंपन्यांची कॉर्पोरेट ऑफिसेस, वकिलांची चेंबर्स वगैरे टिपिकल गोष्टींनी भरलेली. इंटर्व्यू संपवून बाहेर आलो आणि लिफ्टसाठी थांबलो होतो. सहज समोर नजर गेली, तर एका चेंबरच्या अॅन्टेरूममध्ये जिमी बसला होता. मुंबईचा बर्‍यापैकी प्रतिष्ठित वकील होता. 'याच्याकडे जिमीला काय काम?' असा विचार मनात येऊन गेला. त्यानेही पाहिलं असावं मला. अशा वेळी 'तेरी भी चुप, मेरी भी चुप' हेच धोरण योग्य आहे हे आमच्या दोघांच्याही लक्षात आलं.
यथावकाश मला नोकरी मिळाली. माझा पंचतारांकित प्रवास संपला. अकाउंट्समधल्या मंडळींनी नाही म्हटलं तरी जीव लावला होता. त्यांना सोडून जाताना कसंसंच होत होतं. मंडळींनी झकास सेंड ऑफ दिला. जिमीने आपणहून आयोजन स्वीकारलं असल्यामुळे त्याच्या आवडीच्या ब्रिटानिया रेस्टॉरंटमध्ये पार्टी झाली. जिमीने आग्रह करकरून रेस्टॉरंटची स्पेशालिटी असलेला खास पारशी 'बेरी पुलाव' खायला घातला. निरोप देताना सगळ्यांचेच डोळे ओलसर झाले होते.
पुण्याला आलो, नव्या नोकरीत रमलो. Out of sight is out of mind या तत्त्वानुसार मंडळींचा संपर्कही कमी कमी होत तुटल्यासारखाच झाला.
वर्षा-दीड वर्षांनंतरची गोष्ट. एका कॉन्फरन्ससाठी त्याच हॉटेलात जायचं होतं. म्हटलं, वा! चांगली संधी आहे, मंडळींना भेटून घेऊ. राणेला फोन करून अमुक दिवशी येतो आहे, स्टाफ कँटीनमध्ये जेवायला जाऊ, इतरांना सांग वगैरे कळवलं.
कॉन्फरन्सच्या लंच ब्रेकमध्ये इतर सहकार्‍यांना कटवून कँटीनच्या दिशेने जाणार, तोच बँक्वेट हॉलचा मॅनेजर आला आणि म्हणाला, “तुम्हांला साहेबांनी बोलावलंय सातव्या मजल्यावर.”
सातव्या मजल्यावर डायरेक्टर्सची ऑफिसं होती. हॉटेलची मालकी अग्रवाल नावाच्या कुटुंबाकडे होती. पूर्वी काही ना काही कारणाने त्यांना भेटलो होतो, पण आज त्यांनी आवर्जून आठवण काढायचं कारण काय, असा विचार करत सातव्या मजल्यावर पोचलो. न्यायला आलेल्या मनुष्याने मला एका लाकडी दरवाज्यासमोर नेऊन उभं केलं.
त्यावरची 'जमशेदजी रुस्तमजी सेठना, डायरेक्टर' ही पाटी बघून मी पडायचाच बाकी राहिलो होतो! जिमी?! डायरेक्टर?! असं कसं काय झालं?! वंडर ऑफ वंडर्स!! बरं, मला कुणीच काहीच कसं बोललं नाही?! दरवाजा उघडला आणि आत युनिफॉर्मच्या सुटाऐवजी बिस्पोक टेलरिंगचा झकास सूट परिधान केलेला साक्षात जिमी!
माझ्या वासलेल्या ‘आ’वर नेहेमीप्रमाणे गडगडाटी हसत त्याने मला आत ओढलं आणि घट्ट मिठी मारली. कुठल्यातरी झकास परफ्यूमचा वास सुटाला येत होता. (पूर्वीचा जिमी अरिफ संगेकरवी नळबाजारातून कुठली कुठली भयानक अत्तरं आणवायचा.) मी काही बोलायच्या आधीच शँपेनचा उंच निमुळता पेला हातात सरकवला.
"जिमी! हे काय रे बाबा?"
"आय कुड हॅव नॉक्ड यू डाऊन विथ अ फेदर!" हसायचा गडगडाट संपला नव्हता. "एटले राजू बन गया जेंटलमन, आं!"
जिमीची कोणतीतरी दूरची आत्या निपुत्रिक वारली होती आणि तिचा एकमेव वारस जिमी होता.
"बूढीकडे फारसा काय नवता रे. नो कॅश, नो जुवेलरी. हर हजबंड वॉज फाउंडर ऑफ धिस हॉटेल, विथ अग्रवाल्स. त्याच्याच रेफरन्सनी मी इथे लागला रनर म्हणून. ही हॅड शेअर्स."
"हो, पण एकदम डायरेक्टर?"
"तुला मायती आहे अग्रवालसायबाचा कसा असतो. बूढा डिविडंड देतो कुठे? दॅट्स वाय माय आन्ट डिण्ट हॅव कॅश. सगला पैसा आतल्याआत ठेवतात बास्टर्डस. सो मी गेला दुर्गेससायबाकडे, आणि म्हणला - मेक मी अ डायरेक्टर."
दुर्गेश अग्रवाल म्हणजे 'बूढ्या अग्रवालसायबा'चा मुलगा. या दिवट्या चिरंजीवांचे 'चौफेर पराक्रम' हा आख्ख्या हॉटेलच्या गॉसिपचा पेटंट विषय असायचा. याची व्यसनं ट्रॅडिशनल 'बाई-बाटली'पुरतीच मर्यादित राहिली असती, तर म्हातार्‍याने भगवान अग्रसेनाचे आभार मानून कधीच सुखाने प्राण सोडला असता.
"दुर्गेशने बरं ऐकलं तुझं?"
"आय गेव्ह हिम अॅन ऑफर विच ही कुडंट रेजिस्ट." जिमीने ऐटीत मार्लन ब्रँडोचा आजरामर डायलॉग मारला.
माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. स्वार्थासाठी दुर्गेश अग्रवालने स्वतःच्या आईला फोरास रोडला उभं करायला कमी केलं नसतं - या लायकीचा मनुष्य होता तो.
"अँड व्हॉट वॉज हिज पाउंड ऑफ फ्लेश?"
"अबे छोड ना यार! वॉट बिजिनेस टॉक! शँपेन घे थोडा - पॉमेरी आहे." जिमीने सफाईने विषय टाळला. तो घेणार असलेला नवीन बंगला, पोर्शे, क्रूज वगैरेबद्दल बरंच काय काय सांगत बसला. पण दुर्गेश अग्रवालच्या उल्लेखाने मला एक अस्वस्थपणा आला होता, तो तसाच राहिला. "बाकीच्यांनापण भेटायचं आहे," असं सांगून शेवटी मी त्याचा निरोप घेतला.
माझी वाट पाहून मंडळींनी जेवून घेतलं होतं. तरी मला कंपनी द्यायला थांबले. गावभरच्या गप्पा झाल्या. एकमेकांच्या बातम्या देऊनघेऊन झाल्या. अरिफ संगेचं लग्न झालं होतं, सामंतांच्या मुलाला आयआयटीत प्रवेश मिळाला होता, महाडिकच्या हृदयात ब्लॉकेज सापडलं होतं. कुणी स्वतःहून जिमीचा विषय काढला नाही. मी काढला तेव्हा "आलास भेटून साहेबांना?" यापलीकडे कुणी प्रतिक्रियासुद्धा दिली नाही. म्हात्रेशेटने खूण केली. मी समजलो आणि विषय वाढवला नाही. हा काय प्रकार होता? मत्सर? पोटदुखी? आपल्यातलाच एक लायकी नसताना पुढे गेल्याची जळजळ? का अजून काही?
रात्री मी म्हात्रेशेटना त्यांच्या नेहमीच्या पानाच्या दुकानावर गाठलं. नेहमीप्रमाणेच ते तीर्थप्राशन करून आले होते. त्यामुळेच की काय, दुपारपेक्षा जास्त मोकळेपणाने बोलले.
दुर्गेश अग्रवालचा मामा - ओसवाल - हॉटेलवर कबजा करू पहात होता. त्यासाठी त्याने पद्धतशीरपणे होल्डिंग गोळा करून ‘होस्टाईल टेकओवर’चं गंडांतर आणलं होतं. दुर्गेशला अर्थातच ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी हातची जाऊन द्यायची नव्हती. आपल्या ताब्यात सव्वीस टक्के शेअरहोल्डिंग ठेवण्यासाठी त्याला जिमीच्या शेअर्सची गरज होती आणि त्याबदल्यात त्याने जिमीला डायरेक्टर बनवून आपल्या बाजूला ठेवलं होतं.
"च्यायला! जिमीने बरा फायदा करून घेतला स्वतःचा..." मी अचंब्याने म्हणालो.
"अरे, त्या भाड्याला काय घंटा कळतंय? भोसडीचा मॅट्रिक नापास आहे." पानाच्या पिचकारीबरोबर आंबूस वासाचा भपकारा सोडत म्हात्रेशेट म्हणाले. "त्याचा वकील आहे कुणीतरी ब्यालाड इस्टेटमधे. त्याची अक्कल."
मला रामजीभाई कमानी रोडवरच्या चेंबरमध्ये बसलेला जिमी आठवला.
"पण तुला एक सांगू का?" म्हात्रेशेट तांबारलेले डोळे माझ्यावर रोखत म्हणाले. "ही माणसं भिकारचोट आहेत रे. जिम्याला हजारदा सांगितलं या सांडांच्या साठमारीत पडू नकोस. पण तुला माहितीय तो कसा आहे - साठीला आला तरी मूलपणा गेला नाही भडव्याचा. आपल्या फायद्यासाठी दुर्गेशने चढवलं त्याला, आणि तोपण चढून गेलाय."
"हो ,सांगत होता तो - नवा बंगला, पोर्शे.... काय काय!"
"आज गरज आहे दुर्गेशला म्हणून ओरबाडू देतोय पायजे तसं. उद्या काम झालं की देईल फेकून कुठल्यातरी गटारात." म्हात्रेशेट कळवळून सांगत होते.
"पण म्हात्रेशेट, हे सगळं तर त्याच्या सासर्‍याने दारात आणून उभं केलं असतं. तेव्हा नाही म्हणाला, आणि आज का असं हपापल्यागत करतोय?"
"अरे, मूल आहे तो. काही काही मुलांचं कसं असतं बघ; त्यांना स्वतःचंच खेळणं हवं असतं, दुसर्‍याचं दिलेलं नको असतं." म्हात्रेशेट म्हणाले. "आता मी काय सांगणार म्हणा मुलांबद्दल! मी तर निकम्मा बाप..."
या विषयात मला जायचं नव्हतं. म्हात्रेशेट आणि त्यांच्या कुटुंबाचे संबंध हा एक वेगळाच भयानक विषय आहे. तसंही त्यांचं विमान उंच हवेत गेलं होतं, त्यामुळे निरोप घेऊन मी सटकलो.
‘सांडांची साठमारी’ हे म्हात्रेशेटचे शब्द कुठेतरी ठसल्यासारखे झाले होते. या भानगडीत जिमी फक्त एक प्यादं आहे हे सरळसरळ दिसत होतं. अभद्राची शंका येत होती. एखाद्या किळसवाण्या गोष्टीचा विचार करायलासुद्धा मन धजावत नाही, तसं काहीतरी होत होतं. मैत्रीचा लिप्ताळा जिमीला सावध करायला सांगत होता. दुसरीकडे स्वभावातला पाषाणकोरडा व्यवहारी भाग म्हणत होता "अरे, काय सांगणारेस तू त्याला? तुझ्या बापाच्या वयाचा तो. तुझी हैसियत काय? आणि ‘सावध राहा, जपून राहा’ यापलीकडे सांगणार तरी काय? कशाच्या बळावर?"
अशा उलटसुलट विचारातच मी पुण्याला परतलो. परत रुटीन. Out of sight is out of mind. पण दातात बडिशेपेचं तूस अडकावं तसा हा विषय डोक्यात अडकून बसला होता. फायनान्शियल वृत्तपत्रांतून हॉटेल टेकओवरच्या ओसवालच्या प्रयत्नांबद्दल छापून यायला लागलं होतं. अग्रवाल-ओसवाल साठमारी कोर्टात पोचली होती. कुठेही जिमीचं नाव येतंय का, हे मी बारकाईने बघायचो; पण ते नसायचं. बहुधा या मोठ्ठ्या गेममधला तो छोटासा प्लेयर होता.
असेच आठ-दहा महिने गेले. दिवाळीला जिमीचं ग्रीटिंग कार्ड ऑफीसच्या पत्त्यावर आलं, ते वगळता काही संपर्क नव्हता. माझंही मुंबईला जाणं झालं नाही.
एके दिवशी अचानक म्हात्रेशेटचा फोन आला.
"जिमी मेला."
कुठलीही प्रस्तावना न करता म्हात्रेशेट म्हणाले. सुन्न होऊन मी ऐकत राहिलो. अंबरनाथजवळ दगडाच्या कुठल्यातरी खाणीत त्याचं प्रेत मिळालं. दोनतीन दिवस तसंच पडलेलं, सडलेलं, कुजलेलं. हल्ली तो रात्र-रात्र घरी येत नसे. दोन दिवस आला नाही म्हणून महानाजने पोलीस कंप्लेंट केली, तेव्हा हा प्रकार समजला.
"मारून टाकलं रे मादरचोदांनी त्याला..." म्हात्रेशेट फोनवर हमसून हमसून रडत होते. मलाही कढ आवरेना, मी फोन कट करून टाकला.
तीनचार महिन्यांत ओसवालचं टेकओवर बिड यशस्वी झाल्याची बातमी सीएनबीसीवर पाहिली. आज ते हॉटेल एका आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी समूहाचा भाग आहे. ओसवालने आपलं उखळ चांगलंच पांढरं करून घेतलं.
दैववशात प्याद्याचा वजीर होतो. मग तो वजिराच्या कर्माला बांधला जातो. त्याचं परत प्यादं होऊ शकत नाही. हा वजीर मात्र प्याद्याच्या मोलाने गेला. खेळणार्‍यांनी पट आवरून ठेवला.
माझ्यापुरतं बोलायचं झालं, तर मी आयुष्यात परत बेरी पुलाव खाऊ शकलेलो नाही.
***

***
1 comment