पाव्हणा

- सतीश वाघमारे

पोलिसात असणारा एक लांबचा पाव्हणा, दोनेक वर्षांपूर्वी रिटायर्ड झाला.

श्रीरंग सुभाणा साळवे. मा० पो० उपनिरीक्षक अशी पाटी त्याच्या घरावर झोकात झळकतेय. रिटायर्ड व्हायच्या काही दिवस आधी हा बढतीने पोलीस उपनिरीक्षक झाला. हा वस्तीत राह्यला कधीच नव्हता. पण पाहुण्या-रावळ्यांना अधेमधे भेटायला यायचा. हा आमचा लांबचा पाव्हणा जेव्हा जेव्हा वस्तीत यायचा, तेव्हा हा खरेच लांबचा वाटायचा. कायम आदबशीर शिस्तबद्ध अंतर. शेणानं सारवलेल्या भुईवर बूट न काढता, अंथरलेल्या चटईकडे, चादरीकडे, किंवा पोत्याच्या चवाळ्याकडे ‘नाईलाज को क्या ईलाज’ या धारणेतून बघत, बुटासहीत मांडी घालून बसणारा हा बहाद्दर! बढती मिळाली आणि याच्या सामाजिक परात्मतेला पारावार उरला नाही. चेष्टा वाटेल , पण आईबापदेखील याने शेजार्‍यात जमा केले. ते खंगून खंगून शेजार्‍यांचंच मरण मेले. हा दारूने सुजलेला, पैशाने माजलेला, माणूसघाणा म्हणून गाजलेला, नामवंत असामी. जाती-जमातीत, पाव्हण्या-रावळ्यात, दोस्तमंडळीत उठबस करताना हा कायम बेफिकीर, अवघडलेला. “आपण कुणीतरी भलतेच वेगळे, झग्यातून जन्म पावलेले. आणि हे काय करतोय? कुणाला ‘जयभीम’ / ‘नमस्कार’ घालतोय? का? कशासाठी? यांना माझी जरब वाटू नये?” असल्या प्रश्नांच्या जंजाळात हा कायम. स्वतःहून कुणाला ओळख देणं म्हणजे याच्यासाठी ‘डूब मरने के बराबर’. हा वस्तीत फार यायचा नाही. पण आलाच, तर दर वेळी मला एक प्रश्न नेमानं विचारणार, “कुठलं कॉलेज? कुठली साईड?” माझं ठरलेलं उत्तर. आंबेडकर कॉलेज आर्ट् साईड. हा आईबापादेखत तुच्छतापूर्वक मला सुनवायचा, “फालतू साईड! नोकरी मिळत नाही. बी. ए. झालेले गटार काढतात.” वगैरे वगैरे. आईबाप खचून आणि अवघडून याचा पाहुणचार करायचे. पत्र्याच्या घरात लय गरम होतं असं चारदा म्हणून हा निघून जायचा. वस्तीत शिकणार्‍या पोरांच्या आईबापांना खचवूनच! समोरच्याला मान देत, अपमान करण्याची याची स्टाईल फार जिव्हारी लागणारी. हा कधीतरी भलताच खूश होऊन, गरीब पाव्हण्याच्या घरी जाऊन, त्याच्या घरी जेवण्याची इच्छा व्यक्त करायचा. ’मोठा मनुषी जेवाय आहे’ म्हणून इच्छा व्यक्त केलेलं घर लगबगीने हलू लागायचं. हलत्या घराला थांबवून हा घरधन्याला विचारायचा, “आरं बापू, जेवाय काय करणार?” गरीब घरधनी विचारात पडायचा. पण हा फार वेळ त्याला विचारात पडू द्यायचा नाही. खिशातून शंभराच्या चारसहा नोटा काढून, ’नकु नकु’ म्हणणार्‍या गरीब बापूरावच्या हातात जरबेनं कोँबून, हा त्याला मटण, दारू आणायला सांगायचा. आणलेला सरंजाम हरखून पाह्यचा. मग हा चवीने प्यायचा, चवीने खायचा. आणि गरीब पाव्हण्यालादेखील पाजायचा. टिर्‍या लाल होईपर्यँत स्वतःचं कौतुक करून घ्यायचा. तृप्त होऊन तिथून निघायचा. दुसर्‍याच क्षणाला, तिसर्‍याने केलेल्या चहाच्या आग्रहाला नकार देत, ’बापूरावच्या घरी मटन खाल्लं’ असं सांगायचा. त्याला ’वाटं’ लावायला आलेल्या बापूरावच्या बायको-पोरासमोर तो चहाचा आग्रह धरणार्‍या इसमाबरोबर चर्चा करायचा. चर्चेत प्रश्न विचारायचा, ’उत्तर दिलंच पाहिजे’ अशा हुकमी स्वरात! “बापूरावला तरी बकर्‍याचं कवा भेटायचं? हालगाट आनि जाबाडाचंच कवर खावं त्यानं? म्हनून बेत केल्ता झालं.” असं म्हणून प्रश्नार्थक मुद्रेनं पाहायचा. बापूरावनं खाल्लेल्या त्याच्या पैशाच्या मटनाचा रगतघास करून, बापूरावच्या बायको-पोरांना जहरी लाज आणून, मटण-दारूतून उरलेले पैसे वस्तीतल्या लहान पोरांत वाटून हा राक्षसी कृतज्ञतेने हसून खूप खूप फुगायचा. मटण खाल्लेलं कुटुंब गुदमरून जावं इतका!

हा कुणाच्या लग्नात आला की लोकांच्या गराड्यात उभा राहून गोरगरीब समाज, भिकारचोट लोक, सुधारणा नाही, बाबासाहेबांचं तत्त्व, दारूचा परिणाम, सोरटाचा नाद, हे आणि यासदृश बरेचसे शब्द
वाक्या-वाक्यात कोँबत, वस्तीतल्या लोकांना आणि लग्नघरच्या नव्या पाव्हण्यांना पार भंजाळून टाकतो. मंडपात मानाने टॉवेल-टोपी घेतो, पान खातो आणि बुलेटवर बसून ’डाग डाग डाग डाग…’ करत निघून जातो. याची बायको याला चळाचळा कापते. याच्यातला अधिकारी तिला कायम चिरडत आलाय. ’भेटाय’ आलेल्या सख्ख्या भावालाही ती जेवायचा आग्रह करू शकत नाही. तरी त्यात हा पोलिसात आहे म्हणून बरं. हा बराच काळ बाहेर असतो. हा जेवढा काळ बाहेर थांबतो, तेवढा काळ माणुसकी याच्या घरात नांदते. हा घरात आला की ती लाथ घालून हाकललेल्या निराधार बाईसारखी उंबर्‍याबाहेर पडते. याच्याकडे जाऊन आलेले पाव्हणे-रावळे, यार-मैतर याचा विषय निघाला की तोँड कडूझर करतात.

हे असंच याचं वर्षानुवर्ष चाललं. माणुसकी याच्या घरी स्थिरावलीच नाही. मुली मोठ्या झाल्या, लग्नाला आल्या, याचे आईबाप कधीच मरण पावले आणि हा बघता बघता रिटायर्ड झाला. दाबून जमवलेल्या पैशाचं, समाधानाचं कौतुक करवून घेत हा चिक्कार फिरला, दमला आणि अवघड वळणावर थांबला. चित्र बदललं!

दोन्ही मुली अर्धवट शिक्षण सोडलेल्या, मस्तीत वाढलेल्या, अहंकारानं घडलेल्या. खूप खूप बिघडलेल्या. दिसायला बर्‍यापैकी सामान्य - सध्या लग्नासाठी उमेदवार म्हणून सज्ज आहेत. यांचं कुठंच लग्न जमत नाही. बापाची ख्याती पाव्हण्या-रावळ्यात सर्वदूर पसरलीय. 'बाप तशी लेक आणि खानवाटी एक' या जबरी दहशती उक्तीने यांच्यापासून पुरुष उमेदवार बरेच लांब आहेत. मुलीँच्या वागणुकीची सुपरा झलक एका मयतीत वस्तीने पाहिली. पोरींच्या हातातल्या बिसलरी बाटल्या, मोबाईलवरचं बोलणं, टॉप आणि जीन्समधलं अंतर, उघडी बेँबाटं... छ्या! वस्ती दंग झाली. मेल्या माणसाला क्षणभर विसरली आणि या मुलींच्या भावी भविष्याची काळजी, वस्तीने - चुटपुटती का होईना, पण लगेच - वाहिली. त्या बापाला मयतीच्या प्रगतिशील घडामोडींचा ताजा अहवाल, म्हणजे करंट अपडेट्स, देत होत्या. रनिंग कॉमेंट्रीच्या धर्तीवर. कोण आलंय, कुणाची वाट पाहणं चालू आहे, साधारण प्रोग्रॅम किती वाजता आटोपेल, वगैरे वगैरे...

आता या पोरी वैतागल्यात. ’नवरा पाह्यजेल!’ पण जुळेना कुठे. आणि समाजापासून तुटलेला यांचा बाप दिवाना झालाय. यानं याच्यातला अधिकारी मारला. नुसता बाप उरला. खुलेआम प्रॉपर्टी जाहीर करू लागलाय ह्यो. ’माझे जे जावई होतील, त्यांचं लै लै भलं होईल’ असा डांगोरा पिटू लागलाय. येता जाता कुणालाही जयभीम घालू लागलाय. चहापानावर मुबलक पैसा खर्च करू लागलाय. मरणातोरणाच्या आमंत्रणाची वाट बघू लागलाय. सुखात दुप्पट सुखाने, आणि दुःखात तिप्पट दुःखाने सामील होऊ लागलाय. पाव्हण्या-रावळ्यात सलगी वाढवायचे लय प्रकार करू लागलाय. आता वस्तीत जातोय, पण ’सारवलेल्या भुई राहिल्या नाहीत’ म्हणून कष्टी होतोय. म्हाडानं फरशीची सोय केली म्हणून, नाहीतर यानं सलगीचं उट्ट काढलं असतं. सारवल्या भुईवर बैठक मांडली असती. तेलचटणी खाल्ली असती. ’गरम होतंय’ हे उद्गार गिळले असते.

पण याच्या हातून हे निसटलं. बापूराव आता बकरं नाही, पण चिकन खाऊ शकतो. आणि हा - हा मात्र दुःखही गिळू शकत नाही. याचे सगळेच चान्स गेलेत. हा अडाणचोट हिरवट दत्तूबप्पाला स्वतः जयभीम घालतो. भिमाआबाला तंबाखू मागतो. कुणालाच कुठली साईड विचारत नाही. हा बाबासाहेब, चळवळ, सुधारणा हे शब्द विसरला. हा भेटेल त्याला खाऊ घालायला बघतो. ’मटन चारनं मजी लै भारी’ या दाबात व्हेजवाल्याला नॉनव्हेजचा आग्रह धरतो. अपेक्षा एकच, बाहेर याच्याविषयी बरं बोलावं. ह्याला जातीनं जागा दावली. हा दोन दिवसांपूर्वी कालेजवर आला. मोप कौतुक केलं शिक्षणाचं-नोकरीचं. घरी यायचा जोरदार आग्रह करत घरी घेऊन गेला. लय गप्पा मारल्या, पण विषय वळवता आला नाही. शेवटी निघताना म्हणाला, “सोनीला एखादं वळकीचं स्थळ बघ तुझा एखादा दोस्त!” मी हरलो आहे म्हटलं. “फाल्तू साईडनी शिकल्याला दोस्त आहे. चालेल का?” थेट विचारलं. त्याच्यातला हरलेला बाप हरलेलंच हास्य हासला. मला जाम गिल्टी वाटलं. समाजापासून तुटलेली स्वतःची नाळ जोडण्याची त्याच्यातल्या बापाची धडपड मला अस्वस्थ करून गेली. घरातनं बाहेर पडताना बरं वाटलं. मी मलाच विचारलं, काय कारण? चटकन आठवली आत्मविश्वासानं वावरलेली त्याची बायको आणि मुक्कामी थांबलेली माणुसकी…
***

***

4 comments