आंजी

- आतिवास

टकाटक
परारथना झाली की हजरी घेतेत गुर्जी.
घरी बसलेल्यांना पकडून आणाया पोरास्नी पळवत्यात.
कंदी कामं असत्यात. तळ्यावरनं पाणी आणा; अंगण झाडा; फळा काळा करा.

गमभन लिऊन झालं की पाडे.
लंबरपरमानं येकेकाला हुबा करतेत.
तेनं वरडायचं, “येक रे...” की आमी “येकाचा”. धापत्तुर.
मंग “येकावर येक अकरा”. पन्नासपत्तुर.
गुर्जी येकदम बायेर. च्या प्यायाला, तमाकू खायाला.  
रोजला तेच.

म्या पेंगाया लाग्ली.
मंगली वराडली, “आन्जे, पाडे म्हन, नायतर गुर्जीस्नी नाव सांगते बग.”
शिवाजीम्हाराज समजतेय सोताला.

मंगली वराडली, “साहा रे...”
म्या हळूच “आटाचा” बोल्ली.
कुणाला कायबी नाय समजलं.
मंगली, “येकावर चार,”
म्या, “पंचेईस.”

समद्यांच्यात कायबी म्हन्लं तर चालतंय – फकस्त हळू म्हनायचं.

म्या जागीच झाली.
टकाटक.

***

मद्दान

“शाळा नाही आज, मतदान आहे,” आय म्हन्ली.
त्ये काय असतंय बगाया लगी साळत.

पोलिसमामाबी व्हते.
राती आमच्यातच आल्ते जेवाया. हसले; जा म्हन्ले आत.

मोटी मान्सं येकेक आत यणार. मंग म्हाडिक गुर्जी कागुद बग्णार.
मोहिते गुर्जी शै लावनार; येक कागुद देणार त्यास्नी.
मान्सं गपचिप खोक्यात कागुद टाकून जाणार.. ठप्प करत.

आण्णा बसलेले छातीला बिल्ला लावून.
म्या म्हन्लं, “मलाबी कागुद; शै; बिल्ला.”
आण्णा म्हन्ले, “जा घरी.”

बापूकाका आले. म्या बोल्ली “शै.”

बापूकाका आण्णांना म्हन्ले, “बाळ्याच्या मेल्या म्हातारीचं नावं आहे यादीत मास्तर. होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!”

आण्णा लटलट कापत व्हते.
मला वराडले, “जा मुकाट घरी."

आण्णांना बापूकाकांचं भ्यावं वाटलं?
मद्दान लई वंगाळ.
***

दुस्री

म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास.
गुर्जी म्हन्लं, ‘आता दुस्रीत.’

म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.”
आयनं हसून श्येंगदानं दिलं.
आज्जीनं गूळ दिला हातात.
आण्णा पेन देनार हायेत.

गावभर हिंडून दारात बसली.
मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली.

आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी.
कायबी कराया गेलं की ‘ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा’ म्हनत्येत.
त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत.
पन सोताला शाने समजत्येत जादा.

म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!”
राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!”

म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत.
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?

***

***

Post a Comment