अमान आणि चांदसिंग बुलू

- जयंत कुलकर्णी

अमान
माझ्या बापाचे नाव ‘नासिर’.
माझे नाव बुलू. हे माझे लाडाचे नाव. खरे नाव माझे मलाच माहीत नाही.
आमच्या वस्तीचे नाव पुरा. नर्मदेच्या किनाऱ्यावर या वस्तीच्या आसपास आमच्या जमिनी होत्या. वस्तीवर दहा-एक घरे असतील. एकूण लोकसंख्या असेल शंभर!
आब्बाचा मी खूप लाडका होतो. माझा भाऊ ‘अमान’ हा माझा लाडका होता. शेतात दिवसभर उंडारायचे आणि गिळायला घरी अम्माच्या मागे भुणभुण लावायची एवढेच काम आम्ही करीत असू. एकदा एका घोड्याला आम्ही विहीरीत पाडले, पण कोणी आम्हांला रागावले नाही. आब्बाने तर माझ्या पाठीत लाडाने गुद्दा घातला. आमचे तसे चांगले चालले होते. पण ते कसे काय, त्याची आम्हांला कल्पना असायचे कारण नव्हते. सगळे सातआठ महिने शेतावर काम करीत व उरलेले महिने बाहेर काम शोधत फिरत. आमच्या वस्तीचा प्रमुख होता ‘बुखूतखान’. याला सगळे आदराने ‘जमादार’ म्हणत.
हे सगळे बदलले दोन वर्षांपूर्वी. दर वर्षी आब्बा मला छोट्या तट्टावर बसवून त्यांच्याबरोबर हिंडायला न्यायचा. तट्टाचा लगाम असायचा माझ्या चाचाकडे. त्याचे नाव ‘फिरंगी’. मी एकदा आब्बाला विचारले,
“आब्बा! चाचाजानचे नाव फिरंगी कोणी ठेवले?”
“बुलू, एकदा फिरंग्यांनी आपल्या जुन्या वस्तीवर हल्ला चढवला. तेव्हा हा तुझा चाचा त्याच्या अम्माच्या पोटात होता. त्या धावपळीतच तो या उघड्या जगात आला. तेव्हापासून त्याला ‘फिरंग्या‘ हे नाव पडले! पण तू मात्र त्याला ’फिरंग्या’ म्हणू नकोस. नाहीतर थप्पड खाशील. तो तुझा उस्ताद आहे माहिती आहे ना?”
“हो अब्बा!”
त्या सफरीत आम्ही चंपानेरपाशी नर्मदा पार केली. गेली दोन वर्षे मी या सफरीवर येत होतो. पहिल्या वर्षी मी तट्टावर बसून ऊस सोलत सगळ्यांच्या मागून आरामात जात असे. पुढे काय चालले आहे याची मला कल्पनाही नसायची. पुढच्याच वर्षी पुढे काय चालले असते त्याची मला झलक दाखविण्यात आली. मला अजूनही ते सगळे स्पष्ट आठवते. एका जाजमावर आब्बा, फिरंगी व अजून दोघे जण गपशप करीत होते. त्या दोघांच्या मागे जमादार व अजून दोघे बसले होते. गप्पांना अगदी जोर चढला होता. तेवढ्यात जमादार मोठ्यांने हसत ओरडला, ‘चलो, पान लाओ’. हा इशारा, ज्याला आमच्या भाषेत झिरनी म्हणतात, मिळाल्यावर, त्याच क्षणी त्या दोन उतारूंच्या मानेभोवती रुमाल पडले व आवळले गेले. एकाने त्यांची डोकी खाली दाबली. थोड्याच वेळात त्या माणसांचे तडफड करणारे पाय शांत झाले. एवढे झाल्यावर लगेचच मला तेथून हलविण्यात आले. त्या रात्री मी आब्बाला बरेच फालतू प्रश्र्न विचारले आणि त्याने त्या सगळ्यांची सविस्तर उत्तरेही दिली.
“माणसे ठार मारणे वाईट नाही का?”
“माणसाने मारले म्हणून थोडेच कोणी मरतो? त्याला तर भवानी घेऊन जाते.” माझ्या बापाने उत्तर दिले होते.
त्यानंतर गेल्या दोन वर्षांत मात्र मी माझ्या आब्बाला, बुखूतखान व फिरंगीचाचाला रुमाल फेकताना अगदी जवळून पाहिले होते. एका वेळी तर मी आब्बाला मदतही केली होती. आज माझ्या इम्तहानचा दिवस होता. ती धड पार पडली, तर मला रुमाल मिळणार होता. त्या सफरीत आम्ही चौदा हजार रुपये लुटले व जवळजवळ दीडशे माणसांचे मुडदे पाडले. (त्या वेळी रोज रात्री आमच्या तळावर मांजर येत असे. हा आम्ही शुभशकून समजतो.) माझा उस्ताद माझ्या कामगिरीवर खूश होता. संध्याकाळी अंधार पडल्यावर भवानीला गुळाचा नैवेद्य दाखविण्यात आला व फिरंगीसमोर मला उभे करण्यात आले. त्याने त्याच्या हातातील रुमालाची गाठ सोडविली व त्यातील रुपयाचे नाणे माझ्या हातात दिले. प्रार्थना म्हटली. शेवटी माझ्या हातात एक रुमाल दिला व मला ‘ बरतोत’ म्हणून जाहीर केले.
या वर्षी अमानला तट्टावर बसवून फिरवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. मी त्याला सगळ्यांच्या मागे बरेच अंतर सोडून चालवत होतो. त्याची चेष्टामस्करी करत होतो. मधेच ते तट्टू पळवत होतो. अचानक काय झाले ते कळले नाही, पण ते तट्टू उधळले व पळून गेले. ते सरळ पुढे जाऊन आमची माणसे जेथे थांबली होती, तेथे थांबले. तेथे अमानने जे पाहिले, ते व्हायला नको होते. तेथे अब्बा मुडद्यांचे पाय गुढघ्यात तोडत होता व फिरंगी एका मुडद्याच्या गळ्याभोवतीचा रुमाल सोडवत होता. गुडघ्यात पाय तोडून ते उलटे मुडपण्यात येत, म्हणजे पुरायला कमी जागा लागत असे. पुढे जे घडले ते भयानक होते. अमान ते बघून थरथरू लागला व एकसारखा किंचाळू लागला. त्याला कोणी हात लावला की तो अधिकच तारस्वरात किंचाळू लागे. आब्बा तर त्याला नजरेसमोरही नको होता. त्याला शेवटी फेफरे भरले. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. सगळ्यांनी त्याला धरण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याच्या अंगात बारा रेड्यांची शक्ती संचारली होती. तो हात हिसाडून पळून जाई व परत धाडकन जमिनीवर पडे. शेवटी संध्याकाळी अमानला सडकून ताप भरला व त्यातच त्याचा अंत झाला.
तळावर आता स्मशानशांतता पसरली. आब्बाने घरी परत जायची तयारी चालविली. तो सारखा अम्माची आठवण काढत होता. असे यापूर्वी कधी झाले नव्हते. सगळ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याचीही वाचा बसली. अब्बाला मी तर त्याच्या नजरेसमोरही नको होतो. शेवटी तो परत गेल्यावर फिरंगीने मला जवळ घेतले. मी कावराबावरा हो़ऊन केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे बघू लागलो...
“बुलू, तू हा धंदा सोड.”
“पण आब्बाला काय झाले?”
“अमान त्याचा रक्ताचा मुलगा होता. तू तर... रस्त्यावरुन उचलून आणलेला पोर आहेस… एका मुडद्याचा!”
मी निपचीत पडलेल्या अमानकडे एक नजर टाकली. मी आमची ठगांची टोळी सोडली व तडक तसाच मुंबई इलाख्याला निघून गेलो...
***
चांदसिंग बुलू
सकाळीच अफजलचा दिल्लीहून फोन आला.
“औलियाभाई, रामराम!”
“हां बोला औलियाखान, सलाम!”
“बुरकासाब एलोराला येणार आहे ना संमेलनाला?” बुरका म्हणजे प्रमुख.
“म्हणजे काय! येणार तर!”
“माझ्या मुलाला तुमच्याच हातून दिक्षा द्यायची आहे, आठवण आहे ना?’’
“अफजल, ते तर लक्षात आहेच; पण साधू बुलूला तो कसला कागद सापडला आहे, त्याचे वाचनही करायचे आहे हे लक्षात ठेव.”
“हो! हो! ते तर आहेच बुलूसाब.”
आमचा बुलू समाज तसा फार जुना नाही, पण आहे अत्यंत सधन. असे म्हणतात, ब्रिटिशांच्या काळात आमचा मूळपुरुष ब्रिटिशांच्या सैन्यात काही कारणाने भरती झाला व त्याने मगदाला येथे थिओडोर राजाविरुद्ध झालेल्या कारवाईत भाग घेतला. त्या वेळी जिवावर उदार होऊन त्याने गाजविलेल्या शौर्याबद्दल कंपनी सरकारने त्याला पदक व बढतीही दिली होती. पण त्याअगोदर तो एका ठगाच्या टोळीत सामील होता व नंतर एक नामांकित ठग झाला. मुख्य म्हणजे ठगांची परंपरा, धंदा हा त्या मूळपुरुषाच्याच कृपेने चालू राहिला आहे हे कोणीही मान्य करेल.
अर्थात आमच्या धंद्याचे स्वरूप काळानुसार पुष्कळच बदलले आहे. आता ना कुणी रस्त्यावर वाटमारी करत, ना कुणी प्रवाशांवर रुमाल फेकत. आता शक्यतो कागदोपत्री चालणार्‍या आर्थिक वाटमारीवर आमची जमात जास्त लक्ष देते. म्हणजे बघा, सत्यम बुडविली ती आमच्यातील एकानेच. म्हणजे मालक होता राजू, पण त्याचा आर्थिक सल्लागार होता एक बुलूच. मोठमोठ्या आर्थिक घोटाळ्यांच्या मागे कोणीतरी बुलू असतोच, असे आमच्या मेळाव्यात मोठ्या विनोदाने म्हटले जाते. विनोद सोडल्यास एक मात्र सांगतो : येथे घोटाळा होणार आहे असा नुसता वास जरी बुलूंना लागला ,तरी त्याचा फायदा उपटण्यास कोणीतरी बुलू तेथे पोहोचतोच. म्हणजे त्या गडबड घोटाळ्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग जरी नसला, तरीही त्यातून पैसे उकळता येतातच. मिळालेल्या पैशाच्या दोन टक्के भाग प्रत्येक बुलू त्याच्या संघटनेला देतो.
गुप्तता पाळणे हे आमच्या समाजाच्या रक्तातच भिनले आहे. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत सर्वांकडून गुप्तता पाळली जाते. बुलू एक वेळ प्राण देईल, पण गुपित फोडणार नाही. बुलूंची लग्ने बुलूंशीच होतात, त्यामुळे आमच्या समाजाची वस्त्रवीण अगदी घट्ट आहे. आम्ही ठगांची पारंपरिक भाषा वापरतो. त्याचा अर्थ तुम्हांला वाटतो तो नसतो. उदाहरणार्थ, समोरचा माणूस ठग आहे हे पहिल्यांदा भेटल्यावर कसे ठरविणार? त्यासाठी त्याला चुकीच्या नावाने हाक मारली जाते. उदाहरणार्थ, औलिया. समोरच्याने योग्य प्रतिसाद दिल्यावरच पुढचे संभाषण सुरू होते. तोपर्यंत नाही.
ज्याने रामायण रचले त्या वाल्मिकीला आम्ही आमचा पूर्वज मानतो. आमच्या घरी वाल्मिकीची पूजा केली जाते, रामाची नाही. अठरापगड जातींच्या माणसांनी ठगीचा व्यवसाय स्वीकारल्यामुळे आमची नावे मोठी मजेशीर झाली आहेत. उदाहरणार्थ, आमच्या घराण्यात मी आहे बारू बुलू; तर माझा भाऊ आहे सलीमखान बुलू. कोणाचेही कोणावाचूनही काही अडत नाही. पैसा माणसाला एकाच पातळीवर आणतो यावर आमच्या जमातीचा दृढ विश्र्वास आहे. एक बुलू दुसऱ्या बुलूला स्वत:च्या प्राणाची किंमत देऊनही वाचवतो. तशी शपथच आम्हांला घ्यावी लागते. उदाहरण द्यायचे झाले, तर एका खटल्यात  - जो ब्रिटिशांच्या काळात एका न्यायालयात चालला होता, त्यात - आरोपी होता बुलू. त्याने कोणाचातरी खून केला होता. त्याच्या नशिबाने न्यायाधीशही बुलू होता. अर्थात खटल्याचा निकाल काय लागला असेल हे सांगण्याची गरज नाही. बुलूंना दुसरे नाव घेऊन समाजात वावरायची पूर्ण मुभा असते. त्यामुळे तुम्हांला तुमच्या समोरचा माणूस बुलू आहे की आणखी कोण हे समजणे जवळजवळ अशक्यच. आता आम्ही आमच्यातील माणसाला कसे ओळखतो हे मी सांगू शकत नाही, पण तशी गरज पडत नाही; कारण आमच्यातीलच एकाने आता जमातीतील ठगांचा डाटाबेस तयार केला आहे व त्यात प्रत्येकाला एक टोपण नाव आहे. जमातीचे जमलेले पैसे सफेद करण्यासाठी आता आमच्याकडे तज्ज्ञपण आहेत. अर्थात तेही आमच्या जमातीतलेच आहेत. आता आम्ही मुडदे फार कमी प्रकरणात पाडतो. याचा अर्थ असा नाही, की आम्ही ते काम करतच नाही. करतो, पण अनिच्छेने; फारच जरुरी असल्यास.
असो. आमच्या जमातीबद्दल एवढी माहिती सध्या पुरे. त्याबद्दल मी परत केव्हातरी सांगेन.
माझे नाव आहे बारू बुलू. बारू हा आमच्या भाषेतील एक शब्द आहे. त्याचा अर्थ सांगायचा म्हणजे, सेलिब्रेटी. अर्थात ज्याचे नाव हे आहे, त्याला समाजात भरपूर मान असणार हेही ओघाने आलेच. तर - मला उद्या रात्री एलोराला जायचे आहे. औरंगाबादला ‘ताजमहल’मधे एक हॉल घेतला आहे संमेलनासाठी. नंतर दुसऱ्या दिवशी एलोराच्या देवळाला भेट व पूजा. त्याच संध्याकाळी बरतोतीचा कार्यक्रम, त्यानंतर परत असा बेत ठरला आहे. आमचे हात इतके वरपर्यंत पोहोचले आहेत, की ‘ताजमहल’मधे त्या हॉलमधे त्या दिवशी अन्न आमच्या ताब्यात देऊन तो हॉल बंद करण्यात येईल. सर्व व्हिडिओ कॅमेरे काढून टाकण्यात येतीलच. जे बुलू विमानांनी येणार आहेत, त्यांना आणण्यासाठी खास काळ्या काचांच्या गाड्या तयार ठेवण्यात येतील. हे सगळे दर वर्षी होत असते, यात विशेष काही नाही. हा सगळा कार्यक्रम वर्षातून एकदा होतच असतो.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक एक करून बुलू जमण्यास सुरुवात झाली. सगळे मिळून छपन्न बुलू जमले होते. हॉल आमच्या ताब्यात आल्यावर मी माझी सूटकेस उघडली व टेबलावर त्यातील वस्तू कढून ठेवण्यास सुरुवात केली. कुदळीची सोन्याची प्रतिकृती, बारा महिन्यांची बारा चिन्हे असलेले बारा बुग्ना रुमाल… हे सर्व काढले व टेबलावर नीट पसरून ठेवले. चांदीच्या एका छोट्या घंगाळात किसलेला गूळ व दुसऱ्यात खोबऱ्याचे तुकडे काढून ठेवले. नंतर दुसऱ्या सूटकेसमधून मी कालीमातेची एक मूर्ती काढली. पूर्ण सोन्याच्या असलेल्या या मूर्तीच्या डोळ्यांच्या ठिकाणी मात्र काळ्या कवड्या लावल्या होत्या. थोडीशी भीतिदायकच होती ती मूर्ती. पण सभासदांना धाक वाटावा, म्हणूनच तिचे रूप असे होते असे बुजुर्गांचे म्हणणे होते. हे सगळे नीट मांडल्यानंतर माझ्या मुलाने एक धारधार, चमकणारी बोरकी (सुरी) त्या टेबलावर काढून ठेवली.
सगळ्यांनी आपापले सेलफोन एका टेबलापाशी असलेल्या बुलूच्या ताब्यात दिल्यावर सगळे त्या टेबलाभोवती उभे राहिले. अर्थात आमच्या टेक्निकल टीमने अगोदरच मोबाईल जॅमर्स चालू केले होते. कालीमातेची प्रार्थना करून सभेला सुरुवात झाली. जे काही घडत होते, त्याची टिपणे सचिव काढत होता. मागच्या सभेचा वृत्तांत वाचून त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर नवीन बरतोतला दिक्षा देण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
अफजलच्या मुलाला मुख्य टेबलावर आणण्यात आले. तेथे कालीमातेच्या मूर्तीसमोर तो उभा राहिल्यावर त्याच्या मागे मी व दोन दांडगे बुलू उभे राहिले. कोणाला काही कळायच्या आत मी टेबलावरचा एक लाल रंगाचा रेशमी रुमाल उचलला व त्याच्या गळ्याभोवती फेकला. त्याचा जीव घुसमटेपर्यंत आवळला. जेव्हा त्याच्या घशातून आवाज घरघर आवाज येऊ लागला तेव्हा माझ्या रुमालाची पकड मी सोडून दिली व त्याला हाताने मागे ढकलले. मागे जे दोघे जण उभे होते, त्यांनी त्याला अलगद जमिनीवर झोपवले. जीव घुसमटल्यामुळे तो बिचारा जवळजवळ बेशुद्धच झाला होता. मग त्याला तेथेच टाकून मी देवीला नैवेद्य दाखवला. बरतोत शुद्धीवर येण्याआधी मला तो प्रसाद त्याच्या तोंडात घालणे आवश्यक होते. मी तो प्रसाद घेणार, तेवढ्यात दोघे जण मला आडवे आले. मी सोन्याच्या कुदळीने त्यांच्या कपाळावर मारण्याचा आविर्भाव केला. हा सगळा त्या विधीचाच भाग होता. मी तो प्रसाद त्या खाली पडलेल्या बरतोतच्या तोंडात घातला व शांतपणे एका कोचावर जाऊन बसलो. दमायचे कारण म्हणजे, हे सगळे होत असताना मला सतत काही मंत्रांचा जप करावा लागत होता. हा कार्यक्रम झाल्यावर जेवण व मद्यपान असा कार्यक्रम होता. बरीच रात्र झाल्यावर कॅमेरे नसलेल्या मार्गाने आम्हांला आमच्या खोलीत सोडण्यात आले.
एलोराच्या डोंगरावर कैलासच्या मागचा जो डोंगर आहे, तेथे आतमधे आमचे लेणे आहे. अर्थात आम्ही आता तेथून जात नाही, तर मागून जातो. ब्रिटिशांनी वेरूळ ए० एस्० आय्०च्या ताब्यात देण्याआधी आमचे पूर्वज कैलासच्या शेजारच्या लेण्यातून - तेथे जो भुयारी मार्ग आहे, त्यातून - आमच्या लेण्यात उतरायचे. सामान्य जनतेच्या दृष्टीने हा पाण्यासाठी काढलेला रस्ता आहे. तो पुढे पुढे इतका अरुंद होत जातो, की शेवटी त्यातून माणूस जाऊ शकत नाही, असे जनतेला वाटते. पण तेथून आत जाता येते हे निश्चित. त्यात ठगांच्या रुमाल फेकण्याच्या पद्धतींवर आधारित शिल्पे आहेत, तसेच तसा एक प्रसंगही कोरला आहे.
आज पूजा झाल्यावर आमच्या मूळपुरुषाने लिहिलेल्या कागदाचे वाचन तेथेच करायचे आहे.
यथासांग पूजा झाल्यावर साधू बुलूने तो जीर्ण झालेला कागद मोठ्या काळजीने त्याच्या बॅगेतून काढला व माझ्या हातात दिला. थरथरत्या हाताने मी त्याला वंदन केले व ’वाचू का?’ असे सगळ्यांना विचारले.
सगळ्यांनी होकारार्थी मान डोलाविल्यानंतर मी आमच्या आद्य पुरुषाची कहाणी वाचू लागलो.
मी हे लिहितो आहे, ते माझ्या पुढच्या पिढ्यांची माफी मागण्यासाठी...
‘‘अमानच्या त्या चटका लावणाऱ्या मृत्यूनंतर मुंबई इलाख्यास जायचे ठरवून मी निघालो खरा; पण मधे वेरुळात आमच्या लेण्यात जाऊन दर्शन करावे, म्हणून मी वेरूळची वाट धरली. वाटेत माझ्या मनात तऱ्हेतऱ्हेचे विचार येत होते. माझ्या तथाकथित बापाने मला कसे फसविले होते, हे आता माझ्या लक्षात येऊ लागले होते. वाईट तेच चांगले असे एखाद्याला पटविले की मग त्याला वाइटाची काय तमा? ठगांच्या बाबतीत तसेच होते. ठगीत मेलेल्या सावजांची आयुष्येच संपत आलेली असल्यामुळे कालीमाता त्यांना मृत्यूच्या दारी आणून सोडते हे एकदा मानायचे; की मग कसले पाप अन् कसले पुण्य, कसले चांगले आणि कसले वाईट! हे सगळे माणसाच्या विचारांचे रंगच आहेत. आता समजा, मी लाल रंगाला काळा असे म्हटले, तर तो रंग काळा म्हणूनच ओळखला जाईल की नाही? हातून घडणाऱ्या पापाची जबाबदारी एकदा का कोणावर तरी टाकली, की आपण मुडदे पाडायला मोकळे. ठगांची रीतच तशी होती. त्यामुळे आम्हांला मुडदे पाडण्यात व त्यांचे किडूकमिडूक लुटण्यात काही वावगे वाटत नव्हते. एक-दोन रुपयांसाठीही आम्ही सहज मुडदे पाडत असू. त्यास आम्ही कालीची इच्छा असे मोठे आध्यात्मिक नाव दिले होते. त्या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटून आल्यावर मला माझीच मोठी शरम वाटली. मी ज्यांच्या गळ्याभोवती रुमाल आवळले होते, त्या सर्व मुडद्यांचे चेहरे माझ्याभोवती फेर धरून नाचू लागले. ते काही नाही. मी हा धंदा सोडला असे एकदा कालीमातेसमोर मी विधिपूर्वक जाहीर करणार होतो. तसे केले, की मी या धंद्यातून मोकळा. पुढच्या आयुष्यात रुमालाला हातही लावायचा नाही अशी प्रतिज्ञा मी केली. अमानच्या मृत्यूनंतर आमच्या वडिलांनी मला ज्या सहजपणे टाकून दिले होते, त्याने माझ्या मनात ठगांबद्दल घृणा उत्पन्न झाली होती.
मजल-दरमजल करत मी वेरूळला पोहोचलो तेव्हा माझ्या प्रवासाचा तिसरा किंवा चौथा दिवस असेल. नक्की आठवत नाही. पण मी वेरूळला पोहोचलो होतो, तेव्हा अंधार पडला होता. मी पूर्वी फिरंगीबरोबर येथे येऊन गेलेलो असल्यामुळे आमच्या लेण्यात कसे उतरायचे हे मला माहीत होते. मी काळोख पडण्याची वाट बघत तेथेच कैलासाच्या लेण्याच्या पायाशी पथारी पसरली. एक-दोन जण मला ठेचकाळून शिव्या देत पुढे गेले. काळोख पडल्यावर मीही ठेचकाळत त्या घळीत उतरलो. नीट काटकोनात कापलेली ती घळ प्रथम सरळ जाऊन गप्पकन जमिनीत घुसली होती. थोड्याच वेळात मी आमच्या गुहेत पोहोचलो. आत कोणीतरी होते हे निश्चित. मी पावलांचा आवाज न करता एका खांबाच्या आड लपलो व काय चालले आहे ते पाहू लागलो. ठगच होते ते. त्यांनी एक मशाल पेटवली व कालीमातेसमोर जमिनीत रोवली.
पूजा झाल्यावर त्यांनी एक गाठोडे उघडले व आतील लुटीची ते वाटणी करू लागले. त्यातील काही लूट त्यांनी देवीसमोर ठेवली व ते तेथून मागे फिरले. त्यांच्या पावलांचा आवाज नाहीसा होईपर्यंत मी तेथे तसाच गप्पगार बसलो. त्या मशालीच्या उजेडात चमचम करणारा तो दागिना व त्यापुढे खोबरे व गुळाचा नैवेद्य पाहून मी आत उडी मारली आणि अधाशासारखा तो नैवेद्य खाऊन घेतला. तो सोन्याचा दागिना माझ्या पोतडीत टाकला. कालीमातेसमोर उभे राहून मी तिचा धिक्कार केला व तेथेच पडलेली कुदळ तिच्या डोक्यात घातली. त्या आघाताचा आवाज तेथे घुमला. तिच्या डोक्याची काही शकले उडाली व माझ्या पायाशी पडली. मी मोठ्याने म्हणालो,
“यापुढे तू कोणालाही या मार्गाला लावू शकणार नाहीस. मी आजपासून ठगी सोडली. मी धर्मही सोडणार आहे. तू माझे काहीही वाकडे करू शकणार नाहीस हे लक्षात ठेव!”
एवढे बोलून मी आल्या मार्गे बाहेर पडलो. प्रतिज्ञा तर करून बसलो होतो, पण जगायचे कसे हा प्रश्न होता. मी जालन्याला काही दिवस काढले. तेथे मोलमजुरी करताना कंपनी सरकारच्या फौजेत भरती झालो. तेथे भरती कारकुनाने माझे नाव हे आडनाव समजून लिहिले व नाव काय असे विचारले. मी दडपून दिले, “चाँदसिंग”.
त्यामुळे मी झालो चाँदसिंग बुलू.
तेथून आम्हांला मुंबईस नेण्यात आले. मोठ्या खडतर प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष लढाईची वेळ आली, ती टिपूविरुद्ध. त्यानंतर समुद्रामार्गे जाऊन मगदाला येथे. ॲबेसिनियामधे कसाला बंदरात उतरून चारशे मैल पायपीट करून आम्ही मगदाला किल्ल्यावर कबजा मिळवला. या लढाईत मी खूपच शौर्य गाजविल्यामुळे मला भरपूर बक्षिसी मिळाली व सुभेदारपदी बढतीही मिळाली. मुख्य म्हणजे आजवर केलेल्या पापाचा बोजा माझ्या मनावरून उठला. मला रात्री शांतपणे झोप लागू लागली. डोळ्याभोवती फेर धरणारे मुडद्यांचे चेहरे पळाले व मी सामान्य माणसांसारखे जीवन जगू लागलो.
या सगळ्या वर्षांत मी फक्त एकदाच रुमालाचा उपयोग केला, तो म्हणजे मगदालाच्या किल्ल्यावर एका पहारेकऱ्याचा जीव घेताना. मला आठवतंय, तेव्हासुद्धा मी कोणी बघत नाही असे बघून रुमाल फेकला होता.
सुभेदाराला ब्रिटिश अधिकारी चांगलाच मान देत असत. म्हणजे जवळजवळ एखाद्या गोऱ्या अधिकाऱ्याइतकाच म्हणा ना...
मगदालाच्या लढाईनंतर आमच्या रेजिमेंटने, ’बाँबे सिपॉय’ने, विश्रांतीसाठी बेळगावला मुक्काम टाकला. येथेच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याबद्दल मीच काय, माझे वंशजही मला कधी माफ करणार नाहीत.
त्या काळात बेळगावला कँपची उभारणीचे काम चालू असल्यामुळे आम्हांला गावात कुठेही राहण्याची मुभा दिली गेली होती. आम्ही तीन मित्रांनी एक जागा भाड्याने घेतली. जगदाळे, भोसले व मी. आम्ही एकाच रेजिमेंटमधे असलो, तरीही आमच्या पलटणी वेगवेगळ्या होत्या.
बेळगावाच्या वेशीबाहेर जरा आड बाजूला एक गुत्ता होता. तेथे आमचे सगळे सैनिक व अधिकारी दारू पिण्यास दररोज हजेरी लावत असत. मीही जात असे, पण माझे पिणे मर्यादित व वागणे आदबशीर असे. त्या गुत्याच्या मालकाला एक सुंदर मुलगी होती. तेथे दररोज जाण्याचे तेही एक कारण होते. माझ्या दोन सहकाऱ्यांची लग्ने झालेली असल्यामुळे ते माझी या मुलीवरून नेहमी चेष्टा करीत. खोटे कशाला सांगू? मलाही ती आवडत असे. तिचा बाप नेहमी बाहेर कुठेतरी हिंडत असे. वर्षातून कधीतरी एखाद-दोनदा तो घरी येई. हा दारूचा धंदा ती व तिचा भाऊ मिळून चालवीत असत.
आमच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले हे कळलेल नाही. आता मी चांगलाच स्थिरस्थावर झालो होतो, समाजात मान होता व गाठीशी दोन पैसेही बांधले होते. लग्न करण्यात तशी कुठलीच अडचण नव्हती. मी मंजुळेला रीतसर मागणी घालण्याचे ठरविले. पण तिचा बाप गावाला गेलेला असल्यामुळे ’तो आल्यावर बघू’ असे तिचा भाऊ म्हणाला, व त्यामुळे ते काम जरा लांबणीवर पडले. पण त्याची या विवाहाला काहीच हरकत नव्हती. आता फक्त तिच्या वडिलांची वाट बघायची एवढेच आमच्या हातात होते. त्या काळात आम्ही दोघे नको तेवढे जवळ आलो. पण मंजुळेचा माझ्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे व लग्नाला थोडेच दिवस राहिल्यामुळे आम्ही बेफिकीर होतो.
आम्ही दोघे लग्न करणार आहोत ही बातमी रेजिमेंटमधे पसरल्यावर सगळ्यांनी माझे अभिनंदन केले व माझ्याकडून मेजवानी उकळली. अर्थात दारूही पाण्यासारखी वाहत होतीच.
तिचे वडील काही येईनात. त्यांना होणारा उशीर पाहून म्हणा किंवा आणखी काही अज्ञात कारणाने म्हणा, मला एक शंका येत होती, की तिचे वडील गावाला वगैरे गेलेले नसावेतच. ते फक्त माझ्यासमोर येत नसावेत. ते बेळगावातच कुठेतरी राहत असणार व त्यांना सगळी खबरबात व्यवस्थित पोहोचत असणार. शेवटी मी एकदा तिच्या भावाला स्पष्टपणेे विचारलेच, की त्यांना आमचे लग्न मान्य नाही का? यावर त्याने सांगितले, की ते लवकरच आपल्याला भेटतील. असे करता करता एका रविवारी ही भेट ठरली.
त्या दिवशी मी माझा रेजिमेंटचा पोषाख घालून त्यांच्या घरी गेलो. गुत्त्याच्या मागेच त्यांचे घर होते. मी गेल्या गेल्या तिच्या वडिलांनी आमचे आगतस्वागत केले व माझ्या मित्रांना गुत्यात बसण्याची विनंती केली. तिचा भाऊ त्यांना घेऊन गुत्त्यात गेल्यावर आमच्यात बोलणे सुरू झाले.
“सुभेदार, मला हे लग्न मान्य नाही! गैरसमज करून घेऊ नका! पण त्यात तुमचे भले नाही व हे लग्न टिकणारही नाही!”
“पण का?” मी विचारले.
“तुम्ही कृपा करून मला हे विचारू नका. मी याचे उत्तर सांगणार नाही.”
हे ऐकताच मंजुळेवर आकाश कोसळले. पण त्या काळात पुरुषांनाही वडीलधाऱ्या माणसासमोर बोलता येणे अशक्य होते; मुलींचा तर प्रश्नच नव्हता. ती आपली बिचारी, रडत बसली. हे लग्न झाले नाही, तर पुढे काय वाढून ठेवले आहे हे लक्षात येताच तिच्यापुढे ब्रह्मांड उभे राहिले. त्या काळात हा फारच मोठा गुन्हा ठरला असता व माझीही छीथू झाली असती. परत साहेब काय म्हणाले असते ही चिंता वेगळीच.
माझ्या मनात त्या वेळी काय चालले होते हे कोणाला सांगून समजण्यासारखे नाही.
“पण तुमच्या नकाराचे कारण तर कळू द्या मला.” मीही अखेर हट्टाला पेटलो.
“ऐकायचे आहे का तुम्हांला? आज ना उद्या कंपनी सरकार मला अटक करणार आहे हे विधिलिखित आहे, कारण मी एक ठग आहे. आज ना उद्या माझा हा व्यवसाय तुम्हांला कळल्यावर तुम्ही माझ्या मुलीचा द्वेष करणार. ते मला टाळायचे आहे. आम्ही आहोत तेथे सुखी आहोत. तिच्याशी आमच्यापैकीच कुणीतरी लग्न करेल. तेच ठीक होईल. पण तुम्ही सरकारची नोकरी सोडून माझा व्यवसाय स्वीकारलात, तर मात्र हा प्रश्न निकालात निघेल. बोला, आहे कबूल?”
हे ऐकताच मंजुळा भोवळ येऊन खाली कोसळली. तिला सावरत मी म्हणालो, “माझ्यासमोर दुसरा मार्ग नाही…” असे म्हणून काही दिवसांपूर्वी आमच्या हातून जे काही घडले होते, त्याची कल्पना मी त्यांना दिली व डोक्याला हात लावून बसलो.”
पुढे बरीच पाने होती. पण आम्ही तेथेच थांबलो.
ही कहाणी वाचून झाल्यावर आमच्या मूळपुरुषाने हा धंदा कोणत्या कारणामुळे सोडला होता व त्याला परत हा व्यवसाय स्वीकारण्यास कुठली परिस्थिती कारणीभूत झाली हे समजले. आम्ही स्तब्ध झालो. आम्ही हा व्यवसाय सोडला असता, तर बुलूंच्या संस्थापकाची इच्छा पूर्ण झाली असती. एकाने तसा प्रस्ताव मांडलादेखील.
काय करायचे यावर बराच विचारविनिमय झाल्यावर ’आता हा व्यवसाय सोडणे शक्य नाही’ असे सर्वांनुमते ठरले. एवढा किफायतशीर धंदा सोडणे कुणाला आवडणार? शिवाय आता ब्रिटिश भारतातून गेल्यामुळे तसा फार धोकाही नव्हता...
तेवढ्यात माझी नजर देवीच्या मूर्तीकडे गेली. मूर्तीच्या मस्तकाच्या उजव्या बाजूच्या ठिकऱ्या उडालेल्या मला स्पष्ट दिसू लागल्या...
‘तिची दुरुस्ती करायला पाहिजे,’ मी मनात म्हटले व सभा संपल्याचे जाहीर केले.
***

***

चित्रस्रोत: आंतरजालावरून साभार

1 comment