विश्वाच्या बेंबीत बोट

- संवेद


"अंजली, अंजली, अंजली, प्यारी अंजली, अंजली..."


सगळ्या मनुष्यबळ असोशिएट्सनी पहिल्याच दिवशी अंजली सुब्रमण्यमचं, चिअर गर्ल्ससारखं हातात पॉम-पॉम उर्फ गुच्चे घेऊन गाण्यासकट, ऑफिसात जोरदार स्वागत केलं, तेव्हा अंजलीचा ऊर भरून आला. कुणीतरी तिला हाताला धरून तिच्या नावाची पाटी असलेल्या क्यूबिकलमधे घेऊन गेलं. बराच जड असलेला एक ऐतिहासिक लॅपटॉप तिथे होता. अंजलीचं मन मोहरीएवढं खट्टू झालं; पण तिनंच तर मुलाखतीत सांगितलं होतं, की तिला आजीच्या जुन्या पातळाचा वास आवडतो… म्हणून तर जुना लॅपटॉप…


"ऍडमिन - ऍडमिन." सोबतची किडमिडीत किडकी किरकिरली.


"काय"? भानावर येत अंजलीनं विचारलं.


"..ऍडमिन - ऍडमिन, तुमचा लॉगिन-पासवर्ड." किडमिडीत किडकी तोंडातले ६४ पिवळसर दात दाखवत हसली. गंमत म्हणजे तिचा कुर्ताही सूर्यफुलाचे मोठे छाप असलेला, पिवळ्या रंगाचाच होता. तिच्या बांगड्या, डोक्यावरचा बॅंड, सॅंडलचे बंद सारंच पिवळ्या रंगाचं होतं - फ्लूरोसंट पिवळं!


अंजलीनं तिचं खास एम्बीए हसू चेहराभर पसरवलं आणि किडमिडीत किडकीला विचारलं, "तुझं नाव काय व्हिन्सेंट व्हॅन गॉग आहे काय?"


"नाही, नाही, आपल्याकडे व्हिन्सेन्ट कुणी नाही, जोसेफ आहे - रिक्रूटमेन्टवाला. माझं नाव तर सपना आहे." कि० कि० उत्तरली.


’तो जोक होता..’ अंजली पुटपुटली. "अगं, तुझा ड्रेस बघून मला वाटलं..."


"हॉं..." तोंडातली सगळी सूर्यफुलं दाखवत कि० कि० म्हणाली, "मम्मी लव्ह्स यलो. तुम्हीपण घालत चला, बघा मम्मीला किती आवडेल ते."


"पण, तुझ्या मम्मीला यल्लो आवडतं, तर तू वापर. मी पिवळ्यात अजून काळी दिसते." अंजलीनं कि० कि०ला कंटाळवाणं उत्तर दिलं.


कि० कि०नं या वेळी सूर्यफुलं घशातच खचवली. "मम्मी म्हणजे यशोदा मॅम. आम्ही त्यांना मम्मीच म्हणतो. शी जस्ट लव्ह्स यलो."


मघाचपासून आपल्याला कावीळ झाल्याची भावना का होतेय याचं उत्तर अंजलीला आत्ता मिळालं.


यशोदा देसाई म्हणजे ’वाय्यम वाय्यम टेक’च्या एचआर व्हाईस प्रेसिडेन्ट. बाईंवर ती हजारेक लोकांची कंपनी वर्षभरात दोन हजारांची करण्याची मोठ्ठी जबाबदारी होती. त्यामुळेच त्यांनी आधी स्वतःचं दुकान नीट बसवण्याचं मनावर घेतलं होतं. रिक्रूटमेंट आणि पगार बघणारा जोसेफ सोडला, तर बाईंकडे साऱ्या सपनाचं होत्या. सगळ्या सपना जेमतेम ग्रॅजुएट होत्या आणि बाईंसाठी पडेल ती कामं करायच्या. पण कंपनी दुप्पट करायची, तर जोसेफसारखे अजून लोक लागणार हे ओळखून बाईंनी अंजलीसकट पाचेक रंगरूट एम्बीए कॅम्पसमधून उचलले होते. बाईंना चिंता होती, ती या नव्या मुलींना इथे मुरवायचं कसं याची.


"अंजली, तुला मी जावा प्रॅक्टिसची एचार पार्टनर बनवणार आहे. चालेल ना?" बाईंनी जमेल तेवढा मृदू आवाज काढला. "तिथल्या लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे, त्यांची ट्रेनिंग्स, ऍपरायजल… सगळं सगळं तू बघायचंस."


अंजली मन लावून बाईंचे टेबलावर ठेवलेले पाय बघत होती. बाईंची खुर्ची पूर्णपणे मागे रेललेली होती आणि त्या खुर्चीत स्वतःला कसबसं कोंबून बाई छताकडे बघत होत्या. खोलीत त्यांनी लावलेल्या पर्फ्यूमचा मंद वास येत असला, तरी अंजलीला तिच्या नाकाजवळ असलेल्या त्यांच्या पायाचा अद्भुत वास येत होता.


"ही टेकी लोकं आपल्याच जगात असतात. त्यांना नियम, प्रोसेस काऽही कळत नाही. तू त्यांची आई असल्यासारखं त्यांना वळण लाव." बाईंनी पायाला एका बोटाआड एक असं गर्द पिवळं नेलपेंट लावलं होतं.


अंजलीनं घाईघाईनं विचारलं, "पण ते तर तुम्हांला मम्मी म्हणतात..."


बाई ठसका लागेपर्यंत हसल्या. "सपनासारख्या असोशिएट्स मला मम्मी म्हणतात, सगळे नाही. तू मला यशोदा म्हण, फक्त यशोदा."


सपना उर्फ कि० कि० आवाज न करता आली आणि तिनं कागदांचा मोठा ढिगारा अंजलीच्या टेबलावर ठेवला.


"जावाच्या कुंडल्या..." अंजलीच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह अजून गडद झालं.


"अहो, त्यांचे रिझ्युमे, आत्तापर्यंतचे त्यांचे ऍपरायजलचे निकाल, त्यांचे ई-सॅटचे निकाल..."


"हे कंप्युटराईज्ड नाहीत?" अंजली जवळजवळ किंचाळलीच.


"तुम्हांला सिस्टीम ऍक्सेस नाही… अजून तरी. मम्मी म्हणाल्या, प्रिंटा दे. म्हणून दिल्या."


"जोसेफ, मला येऊन महिना होऊन गेला, अजून कसा ऍक्सेस नाही रे?" अंजलीनं तिच्याच बाजूला बसणाऱ्या जोसेफला विचारलं. तो मन लावून पेन्सिलचं दुसरं टोक खात होता.


"माईन्ड योर बिझनेस. फालतू प्रश्न विचारशील, तर बाई फेकून देतील बाहेर." त्यानं पेन्सिल जवळजवळ संपवतच आणली होती. "आणि तुझ्या जावा प्रॅक्टिसमधे मोठं भोक पडलंय. वीसेक लोक सोडून गेलेत. तू हर्षा किंवा नीताशी बोलून काही रिझ्युमे मिळतात का बघ. मी वीकेन्ड ड्राईव्ह ठेवतोय रिक्रूटमेन्टचा".


अंजलीनं तिच्याच नकळत नंदीबैलासारखी मान हलवली आणि झालेल्या किंचित अपमानाचा वचपा काढायचा म्हणून तिनं तिच्या टेबलावरच्या चार-सहा रंगीत पेन्सिली जोसेफच्या पुढ्यात आपटल्या, "संपली ती पेन्सिल, आता बोटं खातोयंस. ह्या घे रंगीत पेन्सिली, खा आणि संपव जंगल एकदाचं!!"


महिन्याभरात जोसेफ पहिल्यांदाच तिच्याकडे बघून हसला. "सॉरी, खूप टेन्शन्स आहेत. चल, आजचा लंच माझ्याकडून."


हर्षवर्धन पिंपळखरेनं कुणाला कळेल नकळेल अशा बेतानं अंजलीला निरखलं. त्याला मंद, सुगंधी वाटलं. नीता वधवानीनंही करकरीत अंजलीला उभं-आडवं न्याहाळलं. आपल्या शिळेपणाच्या जाणिवेनं तिची आत्मिक चिडचिड झाली. हेकट आवाजात ती ओरडलीच, "मी रिझ्युमे का देऊ?"


सेकंदभर अंजलीला वाटलं, आपण चुकून बाईंना इस्टेट तर नाही मागितली? रि-झ्यु-मे… तिनं चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न केला. "नीता, आपलं ना, बकासुरासारखं झालंय. रोज ताजी माणसं हवीत."


हर्षाला वाटलं हा नीताच्या बिनलग्नाच्या स्टेट्सवर टोमणा आहे आणि नीताला वाटलं हा अंजलीचा बाष्कळ आणि पोरकट विनोद आहे. वातावरण अजूनच गोरंमोरं झालं. तंतुवाद्यावर बसवाव्यात, तशा नीताच्या घशाच्या शिरा ताणून बसवल्यासारख्या दिसत होत्या. "मी रिजेक्ट केलेला माणूस महिन्याभरात इथे जॉईन होतो. कसा? इथे मुलाखत फक्त हर्षा आणि मी घेते. मग याला कुणी आणला? त्याला ढीगभर पगारावर आणून माझ्या बजेटचा बाजा वाजवला."


"मी बोलते जोसेफशी." अंजली कशीबशी उत्तरली.


"कधी?" नीतानं तलवार काढली. "आणि आता या माणसाचं मी काय करायचं? तू माझी एचार पार्टनर आहेस. याला इथून उडवायची जबाबदारी तुझी. कसं ते तू बघ."


हर्षानं चष्मा पुसला आणि त्याच्या सुप्रसिद्ध शांत आवाजात तो म्हणाला "मिस्‌. सुब्रमण्यम, आपल्याला बरंच काम करायचं आहे. तुमचं जावा प्रॅक्टिसमधे पहिल्या दिवशी असं स्वागत करावं असं मला आणि नीताला वाटत नव्हतं; पण..."


अंजलीला तो द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळच्या विदुरासारखा वाटला, किंचित आशादायक! "अंजली म्हटलं, तर चालेल मला." पोटभर अपमान झाल्यावर निघू शकतो, तेवढ्या मवाळ आवाजात तिनं सांगितलं.


अंजलीनं बघितलं तेव्हा जोसेफ जागेवर नव्हता. बोलण्याची ऊर्मी अनावर झाली की अनोळखी नात्यांनाही आकार मिळतो. आजूबाजूला दोन-चार सपनांचं सतत ’पिवळ्या पानांत, पिवळ्या पानांत, चावळ-चावळ चालती…’ सुरू होतं. तिनं त्यातून कि०कि०ला बरोबर हेरलं.


"हॉ.."
"तुला माहितै..."
"अय्या..."
"मम्मी..."
"नीता डुचकीचै..."
"श-क्य-च-नाही!"


संवाद संपतो म्हणजे फक्त शब्दांची स्पंदनं संपतात. त्यातून उमटणाऱ्या प्रतिध्वनींचे पडसाद तरीही दूरवर कुठेतरी उमटंतच राहतात.


पलीकडच्या केबीनमधे बाईंची खुर्ची किंचित करकरली.


"अंजली," बाईंचा मधात घोळलेला आवाज अंजलीच्या कानात किणकिणला. बाईंनी त्यांच्या ऑफीसचा लॉनमधे उघडणारा दरवाजा उघडा ठेवला होता. मोकळ्या लॉनमधे हॉटेलसारख्या छत्र्या आणि खुर्च्या ठेवल्या होत्या.


"डू यू स्मोक?" बाईंनी पाकीट पुढे करत विचारलं.


"हो, पण आत्ता नको." अंजलीनं जमेल तेवढ्या नम्रपणे सांगितलं.


"तुला तीनेक महिने झाले ना? कसं वाटतंय?" मधाचा एक शिपकारा परत अंजलीच्या कानांवर पडला. प्रश्नाचा रोख नक्की कळला नाही की संदिग्ध उत्तर द्यावं. अंजलीनं तोंडभर हसू पसरवलं आणि “शिकतेय.” असं धुकट उत्तर चिकटवून दिलं.


बाईंसाठी हा खेळ अजिबातच नवा नसतो. "नीता वाधवानीला नक्की काय प्रॉब्लेम आहे? रिजेक्टेड कॅ्न्डिडेट्स घेतले हा कसला ओरडा करते आहे ती? तू जोसेफशी बोललीस? मला का नाही सांगितलंस? हा फार गंभीर आरोप केलाय तिनं आपल्यावर." बाईंनी तडतड्या फुलबाज्यांचा मळाच पेटवून दिला. आपले पाय लटपटू शकतात हा नवाच साक्षात्कार अंजलीला झाला. तिनं आठवून सगळ्या घटना धडाधडा सांगितल्या.


बाईंनी कपाळावर हात आपटला. "तू मला सांगायला हवं होतंस." बाईंचे मिचमिचे डोळे अजूनच बारीक झाले. "तुला माहितै, नीता जोसेफबरोबर झोपते आणि त्यांचं काही महिन्यांपासून पटत नाहीये." बाईंचा आवाजही बारीक, पण लिबलिबीत कारस्थानी झाला होता. "ऍन्ड दॅट फकिंग व्होअर इज अक्यूजिंग अस?"


अंजलीला जोसेफच्या टेबलावर ठेवलेला त्याच्या बायकोचा आणि हसऱ्या मुलाचा फोटो आठवला.


बाई पुढे म्हणाल्या, "मला त्यांच्या बेडरूममधे काय चालतं यात अजिबात रस नाही. मला जावात पन्नासेक लोक हवे आहेत आणि नीता जर त्यात तिचे वैयक्तिक प्रश्न मिसळणार असेल, तर मलाच काही तरी करावं लागेल. आणि तू, जावाची पार्टनर म्हणून, या सगळ्यात काय करणार आहेस?"


अंजलीनं दोन महिन्यांत हा प्रश्न दोनदा ऐकला होता; एकदा नीताकडून आणि आत्ता यशोदाकडून. माणसांचं नेमकं काय करायचं असतं? गृहितकामधल्या स्थिरांकाला हात लावता येत नसतो. समीकरणाचं समाधान होईपर्यंत चलांकाच्या किंमती मात्र बदलत राहायच्या. कंपनी देते त्या पगारात पन्नास काय, पाच अनुभवी लोकपण इथे येणार नाहीत इतपत अंदाज अंजलीला आलेला होता.


"मॅम," अंजलीनं एक चलांक बदलायचा ठरवला. "माझ्या कॉलेजची एक ऑड सेमिस्टर बॅच असते. त्यात बहुधा १-२ वर्षं काम केलेले लोक असतात. आपण त्यांना रिक्रूट केलं तर?"


बाईंनी सिगरेटचा एक दीर्घ झुरका घेतला. अंजलीनं छातीभर तो धूर साठवून घेतला.


पुढचे काही दिवस नीता वधवानीच्या बदफैलीच्या कहाण्या ऑफीसच्या सोशल साइटवर, विविध ग्रुप्सवर निसटत्या संदर्भांसह उगवत राहिल्या...
पुढचे काही दिवस सगळ्या सपना ऑफीसभर चायनीज व्हिस्परचा खेळ खेळत राहिल्या...
पुढचे काही दिवस जोसेफ ऑफीसच्या कामासाठी इटलीला जात येत राहिला...
पुढचे काही दिवस अंजली गाज़ियाबादला एचारमधला ऍडव्हान्स डिप्लोमा करायला जाऊन राहिली...

***


"अंजू, चहा पिणार?" हर्षानं निरुत्साही आवाजात विचारलं.


"ब्लडी हेल पिंपळ!" अंजलीनं लाडात येत हर्षाला घोळात घेतलं. "किती दिवसांनी भेटतो आहेस!"


"आधी ग्राहक समाधानासाठी ऑनसाईट, नंतर चाळीस चोरांची भरती आणि त्यांचं शिक्षण. नीता नसल्यानं सगळा लोड माझ्यावरच!" हर्षानं निर्लेपपणे उत्तर दिलं.


"नीता नेमकी तू नसताना तडकाफडकी निघून गेली." अंजलीनं आवाज जमेल तेवढा स्थिर ठेवला. "...आणि चाळीस चोर काय रे? चांगले एम्बीए झालेले लोक आहेत, माझ्या कॉलेजचे."


हर्षानं चष्म्यावरची वाफ पुसली. "अंजली, शांतपणे ऐक. नीता मागे जे म्हणाली, ते खरं होतं. आपण इंटर्व्ह्यूमधे नाकारलेले लोक, ’के. पी. असोशिएट’मधून परत आपल्याकडे येतात, आपण पगार देतो त्याहून जास्त पैशांवर. त्यासाठी आपण ’के. पी. असोशिएट’ला त्या माणसाचा दोन महिन्यांचा पगार देतो. हे जोसेफला, मला, नीताला आणि अजून दोनेक लोकांना माहीत होतं. पण मी बोललो नाही, कारण मला यशोदाची भीती वाटते. नीताला फारशी चिंता नव्हती, कारण ती एकटा जीव आहे. अजून नाही कळलं? के. पी. असोशिएट… कारंथ-प्रधान असोशिएट… अच्छा, यू डम्ब! यशोदा देसाईचं नाव यशोदा देसाई-कारंथ असं आहे, आता कळलं? रवीश कारंथ, ’के.पी.’मधे पार्टनर आहेत. बाईंचे ’हे’."


अंजली अवाक होऊन ऐकत होती.


"सत्य दोन प्रकारचं असतं अंजली, एक - ज्याचा उघड उच्चार करावा आणि दुसरं - ज्याला झाकून ठेवावं. टेक्निकल भाषेत सांगायचं, तर अल्फा एरर आणि बीटा एरर. बरोबर गोष्टीला नाकारलं जाणं आणि चुकीचं स्वीकारलं जाणं. आपण दोन्ही चुका करतोय." हर्षानं चहाचा तिसरा कप घेतला.


"पण मग नीता?" स्वतःलाच ओळखू न येणाऱ्या आवाजात अंजलीनं विचारलं. "नीताचं काय?"


हर्षाच्या आवाजात चहाचा कडवटपणा मिसळला होता. "तुम्ही लोकांनी तिला ट्रॅप केलंत. ती, जोसेफ आणि अजून काही लोक ट्रेकला एकत्र जायचे. ते चांगले मित्र होते असं मला वाटायचं. यापलीकडे कुणाचे कुणाशी संबंध होते यात मला रस नाही. आणि तुझ्या गॉडमदरला तरी का असावा? इथे कोण कुणाबरोबर झोपतं याच्या बऱ्याच रंगीत कहाण्या आहेत. पण त्याचा कामाशी काय संबंध? नीतानी किंवा जोसेफनी एकमेकांना विनाकारण झुकतं माप दिलं असं कुणीच म्हणणार नाही. आय होप, हे सगळं बोलणं तुझ्यापलीकडे जाणार नाही. बाई लोकांना कुठल्या प्रकरणात गुंतवून आयुष्यातून उठवतील याची खात्री नाही. तुला माहीत नसेल, पण मी ’वाय्यम वाय्यम टेक’च्या पालक कंपनीतून इथे डेप्युटेशनवर आलो आहे. आमच्याकडे चर्चा असायची की बाईंना इथला सीईओ व्हायचंय. त्यांच्या मार्गात आलेल्या प्रत्येकाला त्या बाजूला करतात; अगदी शिपायापासून मॅनेजरपर्यंत, प्रत्येकाला."


संदिग्ध बिंदूंना जोडून आकार तयार करण्याचा छंद लागला की कल्पनाशक्तीला ओरबाडून प्रतिमांची मालिकाच पुढ्यात उभी राहते. अंजलीनं प्रश्नमग्न चेहऱ्यानं विचारलं, "तुला माहितै, के. रवी असा कुणीतरी आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलचा ताजा ताजा कॉन्ट्रॅक्टर आहे. ब्लडी एक्सपेन्सिव्ह."
"ओहो, आता मला कळलं, चाळीस चोरांचा सरदार कोण आहे!" हर्षानं नुकत्याच झालेल्या साक्षात्काराचं उघड मनन-चिंतन केलं.
***


अंजलीला वातावरणात सतत ताण जाणवत होता. सर्व प्रकारच्या सपना आजूबाजूला उधळून बागडत होत्या. कि० की० दर अर्ध्या तासाने मारुतीला फेऱ्या माराव्यात, तशी अंजलीच्या क्यूबिकलवरून जायची. शेजारी बसलेल्या जोसेफची नजर चुकवण्याचा खेळही सोपा नव्हता. दिवस झिम्मड लांबत होते.


जोसेफनं आग्रहानं अंजलीला लंचसाठी बाहेर नेलं.


"माझे आई," जोसेफ काकुळतीच्या स्वरात म्हणाला, "कृपा करून बोल."


अंजलीनं तिच्या खास सुब्रमण्यम टपोऱ्या डोळ्यांनी जोसेफकडे बघितलं. अनुभवांनी मरत जाणारं नितळपण तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं, "नीताचं काय? ’के. पी. असोशिएट’चं काय?"


"तुला जर मी कामपिपासू राक्षस वाटत असेन, तर माझे आणि नीताचे तसे कसलेच संबंध नव्हते." कमालीच्या कोरड्या आवाजात जोसेफ म्हणाला. "आणि तुला जर मी पैशांसाठी ’के. पी. असोशिएट’चं काम करतो असं वाटत असेल, तर तू मूर्ख आहेस. तू यशोदाला अजून ओळखलंच नाहीस. नीता मोकळया स्वभावाची होती. आम्ही ट्रेकला एकत्र जायचो, पण आम्ही कधी एकत्र झोपलो नाही; जर तुला नेमकं हेच ऐकायचं असेल तर… ’के. पी.’साठी बाई मला अधूनमधून कट्‌ देतात. पण पैशाच्या मोहापेक्षा मला बाईंची भीती जास्त आहे. नीताच्या बाबतीत बाईंनी माझं नाव सोयीस्कररीत्या वापरलं. बट आयम्‌ जस्ट अ फकिंग फ्रेल पॉन इन धिस एन्टायर सेटप, यू सी..."


"तरीच तू जर्द पिवळा शर्ट घातलायस..." वातावरण जरासं मोकळं करत अंजली म्हणाली.


***


सुटीच्या दिवशी हर्षानं फोन केला तेव्हा त्याच्या आवाजाला नेहमीपेक्षा जास्त गंभीर सूर होता. "अंजली, काहीतरी गडबड आहे. ’तुझा मित्र’ जोसेफ डेटा बदलण्याविषयी बोलत होता. ’वाय्यम वाय्यम टेक’च्या पालक कंपनीतून ऑडिटर्स आले आहेत. आणि जोसेफ म्हणतोय की फक्त त्याच्या किंवा यशोदाच्या कंम्प्यूटरमधला डेटा बदलायचाय, सर्वरमधला नाही. रेम्याडोक्या गाढवाला हे कळत नाहीये, की सगळा डेटा एसएपीच्या सर्वरमधून येतोय आणि त्याच्या किंवा यशोदाच्या कंम्प्यूटरवर काहीही डेटा नाहीये. मी त्याला म्हणालो, असा लोकली डेटा बदलणं शक्य नाही; तर त्यानं ’देसाई मॅडम फोन करतील’ असा डेंजर निरोप देऊन ठेवला आहे."


"अंजली, मला तुझी मदत हवी आहे." बाईंनी एअर कंडिशन्ड केबीनमधे सिगरेट लावून धुक्याचं भीतिदायक वातावरण तयार केलं होतं. "तू ग्रूपच्या इथिकल काउन्सिलकडे तक्रार कर." बाईंना क्षणभरही वेळ घालवायचा नसतो.


अंजलीच्या पोटात खोल काहीतरी उसवायला लागलं.


"तू तक्रार कर, की जोसेफनी तुला सेक्शुअली अब्यूज केलं, म्हणून. ही इज पेन इन द बट. नीता प्रकरणापासून ग्रूपकडून खूप प्रेशर आहे त्याला काढण्याबद्दल. पण धड पुरावे नाहीत आपल्याजवळ. तू तक्रार करशील, तर त्याला लगेच काढता येईल. यू नो, रेग्युलर स्टफ… इनॅप्रोप्रिएट टच ऍण्ड ऑब्सीन इमेजेस्‌ एट्सेट्रा. मी आयटीच्या प्रसादशी बोलून त्याच्या मशीनवर टाकून घेते तसलं काही. आणि जस्ट इमॅजिन, एक वर्षात तुझं प्रमोशन..."


खोलीतला पिवळा रंग विकृतपणे अंगावर चालून आला. अंजलीला किळसवाणं वाटलं, पण तिनं निर्णय घेतला. "मॅम, आयम्‌ लेस्बियन. आय हॅव डिफ्रन्ट सेक्शुअल ओरिएन्टेशन. सॉरी, बट आय डोन्ट नो हाउ टू हॅन्डल धिस."


"ओह!" अनपेक्षित उत्तर आल्यानं नक्की काय बोलावं हे बाईंना कळलं नाही. "...असू दे. मी सपनाशी बोलते, तू जा."


राजासाठी मोहरे बळी घालण्याचा बुद्धिबळाचा खेळ जुनाच असतो. कि० कि० बाईंच्या खोलीत तडफेनं गेली आणि बऱ्याच वेळा्नं बाहेर आली, तेव्हा तिचे डोळे लालभडक होते.


"आय डिड नॉट नो दॅट रोड लॅन्ड्स देअर..." जोसेफच्या आवाजातला ताण लपत नव्हता. मोठ्या प्रयत्नांनी अंजलीनं त्याला आणि हर्षाला जवळच्या हॉटेलमधे एकत्र आणलं होतं.


"बाईंनी खूप खोटी बिलं लावली आहेत; न केलेल्या प्रवासाची, न झालेल्या रिक्रूटमेन्ट ड्राईव्हची, लाखांत आहेत बिलं. ग्रूप ऑडिटमधे हे पकडलं जाणार हे नक्की. सगळ्या एंट्रीज्‌ मी केल्यामुळे माझी चौकशी होणार. पण सगळे अप्रूवल्स बाईंचे असल्याने त्या अडकणार. मी हर्षाला सांगून बघितलं, की तू डेटा बदल. पण तो नाही म्हणाला. हे एकदा सुटतं, तर मी इथून राजीनामा देऊन दुबईत जाणार होतो. पण जर बाईंनी मला असं इथिकल केसमधे अडकवलं, तर माझं करिअर संपलं हे नक्की."


"अरे, असा डेटा बदलता येत नसतो; त्याचा माग राहतो. तो कुणालाही शोधता येतो." हर्षा हताशपणे म्हणाला. "मी परत आपल्या पालक कंपनीत जाणार आहे. त्याआधी अंजलीच्या बाबतीत नीतासारखं होऊ नये, म्हणून मला काहीतरी करायचं आहे. एसएपीमधला डेटा कुणाला बदलता येणार नाही, त्याचं अकाउंटिंग होईल. मी तुझ्या मशीनची इमेज घेतो जोसेफ. म्हणजे प्रसादनं तुझ्या मशीनवर काही बदल केले, तरी तुला ती इमेज दाखवून दोन डेटांमधला फरक दाखवता येईल."


"सपनाचं काय?" अंजली कुठल्याशा निष्कर्षावर आल्यागत बोलली. "तिनं तक्रार केली, तर जोसेफचा कुठलाही बचाव तकलादू होऊन जाईल."


प्रश्नांच्या उत्तरांची नव्याने मांडणी केली की गृहितकांचे अर्थ बदलतात. अंजलीनं विश्वाच्या बेंबीत बोट घालायचं ठरवलं.


"मीच इथिकल काउन्सिलकडे तक्रार केली तर? मीच म्हणाले, की बाईंनी मला सेक्शुअली अब्यूज केलं, म्हणून; तर? आणि नंतर कि० कि०ला देखील… किंवा कि० कि०नंदेखील..."

***

पटावरची अनपेक्षित प्यादी हलली की खेळणाऱ्याचा गोंधळच उडतो.


अंजलीच्या तक्रारीनंतर ’वाय्यम वाय्यम टेक’च्या पालक कंपनीत बऱ्याच जुन्या खोंडांना अचानक एचार फंक्शन आवडायला लागलं. काहींनी प्राथमिक पाहणीनंतर ऑफीसला पिवळ्याऐवजी कोणता रंग बरा दिसेल, यावर रंगाऱ्यांचे सल्लेही मागवायला सुरुवात केली.

***

***

5 comments